3/08/2011

लोकाभिमुख कला - वारली चित्रकला

एकेका कलेचं नशीब असतं. हे वाक्य मी म्हणणं म्हणजे काजव्यानं तार्‍यांच्या श्वेतबटू बनण्याबद्दल वगैरे चर्चा करण्यासारखं आहे, पण असो. तर माझं असं म्हणणं केवळ एव्हढ्याचसाठी आहे, की एखादी कला अचानकपणेच काही कारणानं प्रचंड लोकप्रियता मिळवते, मोठ्या लोकसंख्यपर्यंत पोचते अन तिच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी ह्या गोष्टीची मदत होते. ती कला पुढे जात राहते, नवनवे स्तर पार करत राहते. तर काही कला ह्या अज्ञात कारणानं तेव्हढ्या लोकप्रिय होऊ शकत नाहीत, त्या लोकांपर्यंत त्या संख्येनं किंवा तीव्रतेनं पोचत नाहीत. आणि त्या कारणास्तव त्या एका विशिष्ट छोट्या परिघाबाहेर न पडल्यानं नामशेष होतात की काय अशी भीती निर्माण होते. पण कधी कधी एक छोटासा कल्पक प्रयत्नदेखील त्या कलेच्या लोकांपर्यंत न पोचू देणार्‍या मर्यादा ओलांडायला कारणीभूत ठरू शकतो आणि कलेचं पार नशीबच पालटवूनच टाकू शकतो.
उदाहरणं बघायची झाली तर युरोपियन बॅले किंवा पश्चिम युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन नृत्यप्रकार ह्या कला योग्य त्या स्तरावर मार्केटिंग झाल्यामुळे म्हणा किंवा योग्य त्या पद्धतीनं (संख्येनं आणि तीव्रतेनं) त्यांचा प्रचार झाल्यामुळे आणि त्यामध्ये बदलावांस आवश्यक तो वाव राहिल्यामुळे जगभरातल्या लोकसंख्येपर्यंत पोचल्या. आणि त्यामुळेच त्यांचा टिकाव तर लागलाच पण मोठ्या प्रमाणावर त्यांचं संवर्धनही होत आहे. पण त्याच ठिकाणी कित्येक भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांकडे आपण नजर टाकली तर योग्य त्या पद्धतीच्या मार्केटिंगचा अभाव आणि कधीच एका ठराविक परिघाबाहेर न पडल्यामुळे बहुतेक (अन्यही अनेक कारणं असतील, माझ्या मर्यादित ज्ञानावर आधारलेली अगोचर वक्तव्य मी नेहमीच करत असतो, त्यामुळे चुकत असल्यास क्षमा करावी) त्या कला जास्त लोकसंख्येपर्यंत पोचू शकल्या नसल्याचं चित्र दिसतं. आणि तसं पाहता पाश्चिमात्य नृत्यप्रकार सोपे असतात किंवा किचकट, क्लिष्ट नसतात अशातला भाग नाही, त्यांचेही असंख्य नियम आणि गरजा असतात, पण योग्य त्या मार्केटिंगचा अभाव आणि बदलांंस सक्त विरोध असल्याकारणे परिघाबाहेर पडण्याची नसलेली शक्यता ह्यांमुळे भारतीय नृत्यकला मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचल्या नाहीत असं मला वाटतं. अर्थात मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचणं हे कलेच्या उच्चनीचतेचं मोजमाप आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. कारण मुळामध्ये कलांमध्ये तुलना किंवा कला चांगली-वाईट ठरवणं हे पूर्णतः सापेक्ष असतं. पण मी हे सगळं ह्यासाठी महत्वाचं मानतो कारण, कला जेव्हा मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचते तेव्हा ती ज्या संस्कृतीतून आली, त्या संस्कृतीची दूत असते. ती अप्रत्यक्षपणे त्या संस्कृतीलाच एका मोठ्या वर्गापर्यंत पोचवत असते. उदाहरणात वापरलेलीच पाश्चात्य नृत्य पाहिलीत तर आज कित्येक पाश्चात्य नृत्यप्रकार तुमच्या दरवाजापर्यंत येऊन पोचलेत. मोठ्या शहरांमध्ये हे नृत्यप्रकार शिकवणारे क्लासेस सहजगत्या उपलब्ध आहेत आणि टीव्ही, सिनेमामधल्या जबरदस्त मार्केटिंगमुळे त्यांच्याकडे वळण्याचा ओघ वाढलाय हे निश्चित. अर्थात ह्याचा अर्थ असा नव्हे की ह्या नृत्यकला चांगल्या आहेत म्हणून हे होतंय, ह्यामागे आर्थिक कारणं, प्रसिद्धी इत्यादी इत्यादी बर्‍याच गोष्टी आहेत. त्यांचा ऊहापोह करणे हा हेतू नव्हे. पण लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही, की हे नृत्यप्रकार बर्‍यापैकी लोकाभिमुख आहेत. कुठल्याही सामान्य माणसाच्या सहज आवाक्यातले आणि त्यामध्ये एक लवचिकता आहे. त्याचबरोबर ह्या नृत्यप्रकारांच्या आपल्या जीवनातील चंचुप्रवेशामुळे त्या त्या संस्कृतींची आपल्याला जास्त ओळख होऊ लागली आहे. अर्थात, टीव्ही/सिनेमे ह्यांमुळे होते आहेच, पण टीव्ही/सिनेमे हे देखील कलाप्रकारच नव्हेत का?
एव्हढं सगळं रटाळ पुराण लावण्याचं कारण हे की काही महिन्यांपूर्वी एका अशाच वेगळ्या कलेनं माझं लक्ष वेधून घेतलं. तसा मी कलाशून्य मनुष्य. पण दैवयोगानं मी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येतो ती सगळी मंडळी कलाकार असतात. असंच एकदा मित्राच्या बायकोनं काढलेलं एक चित्र, मित्र मला कौतुकानं दाखवत होता. मी दोन मिनिटं चित्र निरखून पाहिलं. आधीच सांगितल्याप्रमाणे मला कलेतलं फार कमी (जवळपास शून्य) कळतं. पण मला ते चित्र आधी चित्र आहे हेच कळायला वेळ लागला. त्यामध्ये अतिशय सामान्य पद्धतीनं दोन त्रिकोण जोडून बनवलेली माणसं होती. उभे त्रिकोण काढलेली झाडं आणि डोंगर, सूर्य असावासा वाटणारा गोल आणि शेतीची कसलीशी क्रिया करणारी ती माणसं ज्या जमिनीवर काम करत होती तो जमिनीचा तुकडा चौकोन काढून दाखवलेला होता. पण त्या सगळ्यात एक पॅटर्न होता. अर्थात तो समजण्याइतपत अक्कल मला असती तर अजून काय हवं होतं, पण अधिक चौकशी करता ही 'वारली चित्रकला' असल्याचं मला सांगण्यात आलं. आणि 'वारली' ही महाराष्ट्र अन गुजरातेमध्ये असणारी एक आदिवासी संस्कृती असल्याचं ज्ञान मला मित्राकडून मिळालं. ते चित्र आमच्या इथल्या गणेशोत्सवामध्ये घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतलं असल्यानं बर्‍याच लोकांनी पाहिलं अन आश्चर्य म्हणजे माझ्या अजून दोघा-तिघा मित्रांनी ही वारली चित्रकला असल्याचं लगेच ओळखलं अन त्यांचीही बहिण/बायको किंवा तत्सम कुणीतरी ती शिकत असल्याचं किंवा शिकलं असल्याचं कळलं. माझ्यासाठी हा धक्का होता. एक आदिवासी कला, शहरी, सुसंस्कृत माणसांपर्यंत बर्‍यापैकी पोचली होती.
नंतर एक दिवस तन्वीताईनंही तिच्या काही वारली चित्रांचे फोटो टाकलेले मध्यंतरी. त्यामुळे माझ्या विस्मरणात गेलेलं 'वारली चित्रकले'बद्दलचं कुतूहल पुन्हा उफाळून वर आलं. मग नेटवर थोडी शोधाशोध केली. तेव्हा 'वारली' ही संस्कृती निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करणारी आणि मनुष्य हा निसर्गाचाच भाग असल्याने त्याचं आयुष्य नैसर्गिक समतो राखण्यास हातभार लावणारं असावं असा जीवनविषयक दृष्टिकोन असणारी आहे हे वाचनात आलं. वारली भाषा ही न लिहिली जाणारी, लिपि नसणारी भाषा. त्यामध्ये संस्कृत, गुजराती अन मराठीतल्या आधुनिक शब्दांचाही भरणा आहे. पण मग संपर्काचं दुसरं साधन म्हणजे चित्रलिपी किंवा चित्रकला. घराच्या भिंतींवर लिहून साधला जाणारा संपर्क. त्यातूनच शेतीचे हंगाम, पीक घेणं किंवा शुभकार्यांशी निगडीत वेळी केली जाणारी ही वारली चित्रकला जन्म घेते. मुळात ही वारली चित्रकला, वारली परंपरा आहे. काटक्या, माती आणि शेणापासून बनवलेल्या भिंतीवर गेरूनं लाल पार्श्वभूमी तयार करायची आणि मग तांदळाचा लगदा आणि पाणी ह्यांचं मिश्रण आणि ते बांधण्यासाठी त्यात गोंद घालून तयार केलेल्या पांढर्‍या रंगानं त्यावर चित्र काढणे अशी मूळ परंपरा. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ असे अतिशय मूलभूत आकार वापरणं हे 'वारलीं'च्या साध्या सरळ निसर्गाच्या जवळ जाणार्‍या आयुष्याशी मेळ खातं. त्यातही माणूस दोन सारख्याच त्रिकोणांना जोडून बनवण्यामध्ये नैसर्गिक समतोलाचाही संकेत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. अशी ही वैशिष्ट्यपूर्ण कला जर तशीच चित्रलिपीमाणे वारली वस्त्यांमध्ये ठराविक वेळांवर केली जात राहिली असती, तर कधीच परिघाबाहेर पडली नसती. मग इथेच जिव्या सोमा म्हशे, भास्कर कुलकर्णी आणि यशोधरा दालमियांचं योगदान येतं.
एखाद्या सामान्य वारली मुलाप्रमाणेच त्यांचं आयुष्य होतं. पण त्यांची आई त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी गेली. त्या धक्क्यानं म्हशेंचं बोलणंच बंद झालं. पुढली कित्येक वर्षं ते न बोलता धुळीमध्ये, मातीमध्ये चित्र काढत राहायचे. त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचं एकमेव माध्यम म्हणजे चित्र. त्यांच्या समाजातही त्यांना एक वेगळंच स्थान मिळालं ते ह्यामुळेच. त्याच्या अशा गप्प राहण्यामुळे त्यांची सगळी शक्ती आणि विचार चित्र ह्या एकमेव व्यक्त होण्याच्या माध्यमात एकवटले. त्यांची कल्पकता, प्रतिभा सर्वच अत्यंत उच्च दर्जाचं असल्यामुळे त्यांची 'वारली चित्र' फारच बोलकी असत. स्त्रियांनी चित्रकला करण्याची प्रथा म्हशेंनीच मोडली. असं म्हणतात की १९७५ मध्ये आदिवासी कलांचं संवर्धन करण्यासाठी इंदिरा गांधींनी सुरू केलेल्या मोहिमेवेळी भास्कर कुलकर्णींना म्हशे यांची अन त्यांच्या कलेची ओळख झाली आणि 'वारली चित्र' ह्या कलेची अन त्या माध्यमाच्या ताकदीची ओळख झाली. मग त्यांनी ही कला आधुनिक समाजासमोर आणली. त्यामुळे म्हशेंना कागद आणि कॅनव्हासची ओळख झाली आणि म्हशेंची कला अजून बंधनांमधून मुक्त झाली. नवी माध्यमं अन नवे प्रकार हाताळून म्हशेंनी कलेला नव्या स्तरावर नेलं, ज्यामुळे 'वारली चित्रकला' परिघाबाहेर पडली. यशोधरा दालमियांनी म्हशेंची मदत घेऊन 'पेंटेड वर्ल्ड ऑफ वारलीज' हे पुस्तक लिहून ही कला इंग्रजी भाषेत जगासमोर आणल्यानं एकदम कक्षाच रुंदावल्या. वारली संस्कृती पूर्ण जगभरात पोचली. वारली चित्रकलेचं नशीबच पालटलं.
तिथून मग म्हशेंनी कधी मागे वळून बघितलंच नाही. त्यांनी दिल्लीत कला सादर केली. राष्ट्रपती पुरस्कारही मिळवला. पुढे त्यांचे देशोदेशी अनेक सत्कार झाले. २०१० चं पद्मश्री म्हशेंना देऊन शासनाने उशीराने का होईना ८० वर्षीय मशेंचा सन्मान केला हे ही नसे थोडके. म्हशेंच्या मते वारली संस्कृतीचा गाभा असणारा विचार म्हणजे, "माणसं, पक्षी, प्राणी, दिवस-रात्र सगळंच गतिमान, चलत आहे. थोडक्यात आयुष्य म्हणजे चलन." त्यामुळे वारली चित्रकलेतही नेहमी हेच प्रतिबिंबित होत आलेलं आहे. मुळात वारली चित्रलिपी ही वारली आयुष्याचं प्रतिबिंबच आहे. पण म्हशेंमुळे वारली चित्रकला अनेक घटकांपासून स्वतंत्र झाली. खर्‍या अर्थाने लोकाभिमुख झाली.पण म्हशेंचं खरं योगदान हे आहे की त्यांनी ही वारली परंपरा जगासमोर एक सुटसुटीत आणि आयुष्य प्रतिबिंबित करण्याचं एक माध्यम म्हणून आणली. सामान्य माणसापर्यंतही ती पोचलीय त्याचं कारण हे की एक म्हणजे ती सामान्यांच्या आवाक्यातील आहे कारण मुळात ती निसर्गाच्या आणि मानवी जीवनाच्या जवळ जाणारी आहे आणि ती परिघाबाहेर पडू शकली. पण ही वारली चित्रकला खर्‍या अर्थानं लोकांपर्यंत पोचली असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा केवळ वारलीच नाही तर इतरही संस्कृतींचं प्रकटीकरण करण्यासाठीही वारली चित्रकलेचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणावर होईल.

(नेहमीप्रमाणेच केवळ कुतूहलापोटी गोळा केलेली माहिती एकत्रित लिहिण्याचा प्रयत्न. मला ह्यातला ८०% भाग १० दिवस पूर्वीपर्यंत ठाऊक नव्हता. www.warli.in ह्या संकेतस्थळावर बरीच माहिती उपलब्ध आहे. तसेच वरील सर्व माहिती मी प्रस्तुत चार ठिकाणांवरून मुख्यत्वे गोळा केलेली आहे. , , आणि .)

34 comments:

  1. पैठणीची पण अशीच काहीशी कथा आहे. काहीवर्षापुर्वी पुर्णपणे संपत आलेली ही कला पुनर्जिवित केलेली आहे. एकाकुठल्या तरी स्त्रीने पुढाकार घेऊन यांची प्रदर्शनं वगैरे भरवून पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले आहे पैठणीला.

    ReplyDelete
  2. काही गोष्टी अगदी पटल्या आणि त्यावर माझ्या टिप्पण्याः
    १. कला जेव्हा मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचते तेव्हा ती ज्या संस्कृतीतून आली, त्या संस्कृतीची दूत असते. ती अप्रत्यक्षपणे त्या संस्कृतीलाच एका मोठ्या वर्गापर्यंत पोचवत असते. --- अगदी खरं. ती कला लोकप्रिय होणं यामुळे त्या संस्कृतीचा प्रसार होतो.

    २. निव्वळ लोकाभिमुख नव्हे, तर चौकट मोडण्याचं धैर्य त्या कलेमध्ये आणि कलाकारांमध्ये पाहिजे. यालाच ज्ञानाभिमुखतापण म्हणता येईल. काळाच्या गतीला सामावून घेण्याची त्या कलेमध्ये आणि पर्यायाने त्या संस्कृतीमध्ये क्षमता पाहिजे. कित्येक प्रादेशिक भाषांच्या -हासाकडे या दृष्टिकोनातून पाहता येईल.

    ३. पण ही वारली चित्रकला खर्‍या अर्थानं लोकांपर्यंत पोचली असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा केवळ वारलीच नाही तर इतरही संस्कृतींचं प्रकटीकरण करण्यासाठीही वारली चित्रकलेचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणावर होईल. -- एकमत अगदी. एखाद्या कलेच्या लोकप्रियतेमध्ये ती संस्कृती थोड्याफार प्रमाणात युनिव्हर्सल असण्याचा पुरावा असतो.

    ReplyDelete
  3. >>मला ह्यातला ८०% भाग १० दिवस पूर्वीपर्यंत ठाऊक नव्हता.

    Same Here...

    ह्या माहितीबद्दल खुप खुप आभार.

    ReplyDelete
  4. Anonymous7:43 PM

    बाबा नेहेमीप्रमाणे अगदी माहितीपुर्ण लिहीलं आहेस... वाट पहातच होते मी तुझ्या या पोस्टची :)

    ही साईट आदियूवामुळे माहिती असली तरी तुझ्याइतकी अभ्यासू मी नसल्यामूळे यातली बरिचशी माहिती मलाही आजच मिळतेय... जिव्या सौम्या मशेंबद्दल वाचलं, ऐकलं तेव्हा खरच कुतूहल अभिमान कौतूक वाटलं होतं!!
    जियो विद्याधर!! :)

    (जाता जाता मी अजून काढलेल्या वारली चित्रांचे आणि २ फोटो मेल केले होते तूला... त्यावर तू उत्तर पाठवलेले नाहीस अजून:( :( ...लगेच पाठवं लिही ’अगं ताई ....’ :) )

    ReplyDelete
  5. पुन्हां एकदा 'G K' समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद. मी आमच्या घरातले मोठमोठे पडदे वारली चित्रांनी रंगवले होते. त्याची आठवण झाली. आणि मग एकदोन ऑर्डर्स पण मिळाल्या!! चादरी वगैरे! :p
    :)

    ReplyDelete
  6. वा! बाबा, लेखात बर्‍याच नवीन गोष्टी आहेत. धन्यवाद.

    ReplyDelete
  7. मी वारली लोकांपेक्षा जन्माने वारली नसलेल्या लोकांचीच 'वारली पेंटिंग' जास्त पाहिली आहेत. त्यामुळे मला नेहमी गम्मत वाटत आली आहे याबाबतीत!

    ReplyDelete
  8. एकदम माहितीपूर्ण लेख झालाय रे! मस्त!!

    ReplyDelete
  9. hey nice!
    i also wrote about warali paintings you can check
    http://vicharmoti.blogspot.com/2010/07/blog-post.html

    ReplyDelete
  10. सही बाबा. मस्त माहिती मराठीत रेडीमेड वाचायची सवय लावणार आहेस तू :) .. काही गोष्टी माहिती होत्या. बऱ्याच गोष्टी नवीन कळल्या..

    >> तसा मी कलाशून्य मनुष्य.

    लेखन ही कला धरली (म्हणजे ती आहेच) तर तुझं हे वाक्य चुकीचं ठरतं :)

    ReplyDelete
  11. गेल्या मायदेशाच्या भेटीत वारली, मधुबनी शिकायचेच हे ठरवूनच गेल होते. :) साधले. त्यावेळी यामागचा थोडा इतिहासही ओघाओघात समजला होता. तुझ्या या पोस्टने सखोल माहिती मिळाली. यावेळी विचार करतेय अजून जास्त शिकता येईल तर... :)

    ReplyDelete
  12. तूच अमुचा गुगल ..
    तूच अमुचा विकिपेडिया...
    अशीच कृपादृष्टी असू द्यावी..
    अमुच्यावरी बाबा विभीराया ..

    ReplyDelete
  13. महेंद्रकाका,
    होय.. खरंच.. कुठेतरी हे वळण येतं.. अन त्यासाठी एक छोटंसं कारणही पुरतं!! :)

    ReplyDelete
  14. योगेश,
    :) हल्ली अभ्यास अभ्यास फार झालाय ना! :P

    ReplyDelete
  15. तन्वीताई,
    ती साईटही तूच त्यादिवशी शोधून दिली होतीस ना! :) तुझ्या त्या फोटोंमुळेच माझं सुप्त कुतूहल पुन्हा जागृत झालं होतं. आणि म्हशेंचं कर्तृत्व खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि त्याहूनही जास्त आदराची गोष्ट म्हणजे इतक्या प्रसिद्धीनंतरही ते तसेच सामान्य आयुष्य जगतात!
    अन तुझा अंदाज खरा ठरला ना "अगं..." :D:D

    ReplyDelete
  16. अनघाताई,
    जीके समृद्ध करणारा विकिपीडिया आणि वारली.इन.. मी फक्त माध्यम! :)
    अन बघ... घराघरापर्यंत पोचलीय बघ वारली चित्रकला म्हटलंय की नाही मी :D

    ReplyDelete
  17. कांचनताई,
    धन्यवाद! मी फक्त माध्यमाचं काम केलं आहे! :)

    ReplyDelete
  18. सविताताई,
    गंमतच आहे... पण मी देखील.. अर्थात माझं सामाजिक वर्तुळ फारसं मोठं नाही त्यामुळे असेल.. :)

    ReplyDelete
  19. श्रीराज,
    धन्यवाद रे भाऊ! :)

    ReplyDelete
  20. निवेदिता,
    ब्लॉगवर स्वागत! तुमचा लेख वाचला, अतिशय छान लिहिलेला आहे. तुमचा अभ्यास अधिक जास्त आहे.. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! भेट देत राहा!

    ReplyDelete
  21. हेरंब,
    अरे उगाचच चालू आहे. आता जरा ही उचलाउचली थांबवावी म्हणतोय... सगळं अधिक सकस रूपात बर्‍याच ठिकाणी उपलब्ध असतं. :)
    लेखन ही कला धरली तर मी 'कलाशून्य दशांश एक किंवा दोन' असेन फारतर ;)

    ReplyDelete
  22. श्रीताई,
    ह्यावेळेस हे उपक्रम होते होय.. तुझं मधुबनी पाहिलेलं.. वारलीचं नजरेतून सुटलं की तू टाकलंच नाहीस?? टाक ना जमलं तर! :)

    ReplyDelete
  23. संकेतानंद,
    धन्यवाद भावा! आता जरा विकिपीडियाला विश्रांती द्यावी म्हणतो.. आता पुनश्च हरिओम! :D

    ReplyDelete
  24. ओंकार,
    आयला तुला लिहिलेली कॉमेंट कुठे गेली????
    तुझ्या सगळ्या टिप्पण्यांशी मी बर्‍याच प्रमाणात सहमत आहे.. पण भाषांच्याबाबत मात्र अनेकविध अन्य कारणं अन पैलू आहेत, त्यामुळे तो चर्चेचा एक स्वतंत्रच विषय होईल असं मला वाटतं! :)
    धन्यवाद भावा! :)

    ReplyDelete
  25. बाबा! भास्कर कुलकर्णी हेच नाव तुमच्या लेखात शोधत होतो.ते मुळचे मालाडचे.मालाड स्टोन ही दगडाच्या प्रसिद्ध जातीची खाण त्यांच्या वाडवडलांच्या मालकीची (गेटवे ऑफ इंडियाचे दगड याचेच) ’मधुबनी’ या मध्यप्रदेशातल्या शैलीला आणि जीवा सोमाला त्यानीच प्रकाशात आणलं.भास्कररावांवर एक संपूर्ण अंक वाचला होता, बहुतेक ’चिन्ह’चा होता.प्रचंड ताकदीचा कलावंत तेवढाच प्रचंड व्यसनाधीन.त्यांचं देऊळ बनवलंय आदिवासींनी मध्यप्रदेशात पण त्यांचा अंत झाला अत्यंत करूण! हे सगळं सांगायची ही जागा नव्हे पण तुमच्या पोस्टमुळे सगळं बाहेर आलं!

    ReplyDelete
  26. विनायकजी,
    भास्कर कुलकर्णींबद्दल ही माहिती मला नव्हती. ती इथे दिलीत ते चांगलंच झालं. मलाही त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचंच होतं. ते मालाडचेच होते हे वाचून छान वाटलं. आता शोधतो अजून माहिती. माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :)
    (मला अरे-तुरे च करा हो! :) )

    ReplyDelete
  27. Anonymous10:43 PM

    मागे असाच काही कामानिमित्त आदिवासी पाड्यात फिरत असतांना शेणान सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर अश्या प्रकारची चित्रे पाहावयास मिळाली होती आणि मलाही कलेतल शून्य ज्ञान असूनही मी त्या चित्रांकडे दुर्लक्ष करू शकलो नव्हतो....बाकी बरीच नवीन माहिती मिळाली ह्या लेखात ...धन्स ...

    ReplyDelete
  28. देवेन,
    खरंच ह्या चित्रांमध्ये साधेपणासोबत वेगळंच असं काहीतरी आहे.. त्यामुळे ती लक्ष वेधून घेतात! :)

    ReplyDelete
  29. माझ्या मामाकडे काम करणारे सगळे आदिवासीच असत.. त्या सर्व काका/काकूनी आम्हाला खूप मायेने वाढवलंय आणि त्यामुळे त्यांच्या घरीही आम्ही कधीतरी जायचो..तिथे लहानपणापासून कुडाच्या भिंतीवर काढलेली ही चित्रं पाहिलीत..मुळात मी बर्‍याच कलांमध्ये शून्य त्यामुळे गुळाची चव काय या न्यायाने माहिती बिहिती कसली मिळवली नाही रे...तेव्हा कॅमेरा नसल्याने फ़ोटो पण नाही....पण काही वर्षांपूर्वी माझ्या भाचीने वारली पेंटिंगचा क्लास केला आणि मला एक होळीचं चित्र पाठवलं ते ब्लॉगवर टाकलं होतं....आज तुझा लेख वाचून मी पाहिलेल्या त्या चित्रांबद्दलची ही माहिती कळली...खूप आभारी...आणखी एक अभ्यासू पोस्ट....:)

    ReplyDelete
  30. एव्हढं छान छान लिहीलेस..मग एखाद चित्र ट्रायही करुन बघितले असतेस...जास्त शोभा आली असती ....
    आता हे नको म्हणुस..नाय ग तायडे...मला गंध नाय चित्रकलेचा...:P

    ReplyDelete
  31. अपर्णा,
    ती चित्र इतकी बेसिक गोष्टींनी बनतात पण तरीही आकर्षक असतात.. काहीतरी वेगळं आहेच त्या चित्रांमध्ये... त्यात वारंवार त्या चित्रांचा उल्लेख झाल्यानं मी माहिती शोधली अन मग लिहून टाकली.. :)
    धन्स!!

    ReplyDelete
  32. माऊताई,
    अगं चित्रकलेच्या नावानंच काय, कलेच्याच नावानं बोंब आहे! :D

    ReplyDelete
  33. परांजपे, मेहता अशा (अर्थातच बिगरआदिवासी) आडनावांच्या महिला ‘वारली आर्ट करतात’! म्हणजे काय करतात? तर क्लासेस चालवतात किंवा ऑर्डरप्रमाणे भिंत, कपडे आदींवर डिझाइन्स काढून देतात.... अशा क्लासेसवर ‘आदिवासी अत्याचार विरोधी कायद्या’खाली खटले भरले जायला हवेत. एका आदिवासी जमातीची बौद्धिक संपदा हिसकावून त्यांची पिळवणूक करणं हा कायद्यानं गुन्हाच मानला जायला हवा. वारली चित्रकलेच्या जीवनमार्गाला निव्वळ ‘डिझाइन’ (‘शोभिवंत/शोभादायक आकार’ या अर्थानं) समजलं जातंय, ही थट्टा थांबायला हवी... http://www.prahaar.in/collag/36679.html येथे माझा पूर्ण लेख वाचता येईल

    ReplyDelete
  34. वारली ही एक कला आहेच पण त्या आधी तो एक व्यक्तीसमूह आहे. जात आहे. हे लोक मराठी बोलतात, लिहितात.. गुजराती नाही.

    मध्यंतरी मी एक मुलाखत पाहिली होती बहुदा ते म्हशेच असावेत. वारली चित्रकला करताना ते तांदळाचे रंग वापरतात. सध्या मात्र जागतिक स्तरावर तांदळाचे रंग वापरून फार कोणी वारली चित्रकला करीत नाही. लहानपणापासून अगदीच जवळ असलेली आणि पाहिलेली असल्याने वारलीबद्दल माझ्या मनात एक वेगळेच कुतुहलाचे, जिव्हाळ्याचे स्थान राहिले आहे.

    वारली लोकांबद्दल थोडी अधिक माहिती लवकरच माझ्या इतिहासाच्या ब्लॉगवर लिहेन... कालच विमानात पुस्तक वाचत होतो... :)

    ReplyDelete