Showing posts with label इजिप्त. Show all posts
Showing posts with label इजिप्त. Show all posts

2/24/2011

क्रांतीची मशाल -२-'फॅरो' चा अस्त

ट्युनिशियन क्रांतीनंतर पुढे जे घडतंय ते पाहून मला ती एका हत्तीच्या पिल्लाची गोष्ट आठवते. एका छोट्याशा हत्तीच्या पिल्लाला पकडून आणून प्राणीसंग्रहालयामध्ये एका छोट्याशा दोराच्या तुकड्यानं एका मोठ्या खिळ्याला बांधून ठेवलं. बांधल्या बांधल्या काही दिवस त्यानं त्या दोराला झटके द्यायचा प्रयत्न केला, पण खूप प्रयत्न करून देखील त्याला तो दोर तोडणं, किंवा तो खिळा उखडणं जमलं नाही. हळू हळू ते पिल्लू मोठं होऊ लागलं, पण वर्षांनुवर्षं त्या पिल्लाला एक छोटासा फेरफटका मारून आणून पुन्हा त्याच दोरीच्या तुकड्यानं बांधून ठेवलं जात होतं. पिल्लाचं रूपांतर मोठ्या हत्तीत झालं, पण कधीच त्या हत्तीनं त्या दोराला एक झटका द्यायचा प्रयत्न केला नाही. कारण त्याच्या मनात लहानपणी केलेले असफल प्रयत्न ताजे होते. त्याच्या बुद्धिसाठी तो दोर त्याच्या शक्तिपलिकडचा होता. प्रत्यक्षात आता मोठा झालेल्या हत्तीनं दिलेला हलकासा झटकाही तो खिळा उखडू शकत होता. पण त्याला स्वतःच्याच शक्तीची जाणीव नव्हती. असंच काहीसं मध्यपूर्वेकडच्या वर्षांनुवर्षं एकाधिकारशाहीनं पिचलेल्या जनतेचं झालेलं होतं. त्यांना स्वतःच्याच शक्तीची जाणीव नव्हती. मुहम्मद बुअज़िज़ीच्या बलिदानानंतर उसळलेल्या उत्स्फूर्त निदर्शनांपुढे सरकारी यंत्रणा हतबल ठरलेली दिसताच त्या आतल्या शक्तिची जाणीव बळकट बनली. आणि ट्युनिशियाच्या यशस्वी उठावानंतर तर समस्त अरब जनतेला आपल्या शक्तीची जाणीव झाली.
त्यातूनच मग बदलाची केव्हापासूनची लागलेली भूक डोकं काढून वर आली. समस्या कित्येक वर्षांपासून त्याच होत्या. असंतोष साचतच होता, पण प्रतिक्रिया नव्हती. आता आपणही काही करू शकतो ही भावना निर्माण झाली. अन इतक्या वर्षांच्या साचलेल्या असंतोषाला वाट मिळाली आणि तडकाफडकी सर्वप्रथम ट्युनिशियाच्या शेजारीच अल्जिरियामध्ये सरकारविरोधी निदर्शनं सुरू झाली.अल्जिरियामधली निदर्शनं फारशी ताकदवान नव्हती आणि अल्जिरियन सरकारची प्रतिक्रिया बरीचशी तत्पर होती. त्यातही पोलिस दलानं योग्य व्यूहरचना आखून परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जाणार नाही, ह्याची काळजी घेतली. पण एव्हाना ट्युनिशिया हे अरब जगतात रोल मॉडेल बनू लागलं होतं. दूरवरच्या येमेनमध्ये आणि एक देश सोडून पलिकडे वसलेल्या इजिप्तमध्येदेखील असंतोष उफाळून यायची चिह्नं दिसू लागली.
इजिप्तचा इतिहास बराच विचित्र आहे. गमाल अब्देल नासर पासून सुरू झालेला लष्करशहांचा इतिहास मुबारकपाशी येऊन थांबतो. गमाल नासरनं 'एक अरब राज्य' ची संकल्पना प्रथम लोकांसमोर आणली. नासर बर्‍यापैकी उदारमतवादी होता अशी त्याची प्रतिमा तरी होती. अर्थात एक लष्करशहा जितका उदारमतवादी असू शकतो तितकाच तो होता. हा नासर म्हणजे तोच नेहरूं आणि मार्शल टिटोबरोबर 'अलिप्ततावादी चळवळ' स्थापनेत हातभार लावणारा. तर ह्या नासरला सर्व अरब राज्यं एका छत्राखाली आणायची इच्छा होती. तो अरब आयकॉन होता. त्याचाच विश्वासू म्हणजे अन्वर सादत. हादेखील लष्करी अधिकारीच. हा मात्र अर्धा इजिप्शियन आणि अर्धा सुदानी. कारण पूर्वीच्या काळी इजिप्त आणि सुदान एकच राष्ट्र होतं. त्यामुळे अन्वर सादत जरी अरब असला तरी कृष्णवर्णाकडे झुकणारा होता. पण अन्वर सादत नासरच्याही एक पाऊल पुढे उदारमतवादी समजला जात होता. वर्षानुवर्षं इस्रायलबरोबर चालू असलेल्या संघर्षात त्यानं फार मोठा बदल घडवला. इस्रायल अनेकदा इजिप्तला भारी पडलेलं होतं. इजिप्तची बरीच जमीन इस्रायलनं बळकावली होती.
सादत स्वतःही एकदा इस्रायलकडून मार खाल्लेला होता. सर्वप्रथम त्यानं भरपूर ताकद जमवून इस्रायलवर मोठा वार केला. ह्या पहिल्या धडकेनंच इस्रायलला धडकी भरली. इस्रायलनं परत हल्ला करून बरीचशी जमीन परत मिळवली. पण इजिप्तच्या सुरूवातीच्या मुसंडीनं इस्रायलला हे प्रकरण जड जाणार हे दिसू लागलं. एव्हाना इजिप्तच्या कामगिरीचं अरब जगात कौतुक होत होतं. सादत आता ज्यूंना भारी पडल्यामुळे अरबांचा आयकॉन बनू लागला होता. असं युद्ध वारंवार होणं इस्रायलला परवडणारं नव्हतं, त्यामुळे इस्रायलनं अमेरिकेकडे दाद लावली. अन अमेरिकेनं इजिप्तला मोठा आर्थिक मोबदला देण्याच्या बदल्यात इजिप्त-इस्रायल तह घडवून आणला. ह्या तहाअंतर्गत आजतागायत दरवर्षी इजिप्तला १.३ बिलियन डॉलर्स मिळतात. ज्यातून इजिप्तनं आपलं सैन्यदल बरंच विकसित केलं आहे. पण ह्या तहानं सादतची प्रतिमा डागाळली. मध्यपूर्व शांत झाली, पण इजिप्तच्या सैन्यात थोडा असंतोष दाटला. ह्यातनंच सादत मिलिटरी परेड पाहत असताना सैन्याच्याच लोकांनी सादत बसलेल्या गॅलरीवर गोळीबार केला आणि सादतचा अंत झाला. ह्याच हल्ल्यामध्ये सादतचा विश्वासू उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारकदेखील जखमी झाला.
पण ह्यातून बरा होत होस्नी मुबारकनं सगळी बंड मोडून काढली आणि सत्तेवर मांड बसवली. इजिप्तच्या नशीबात आणखी एक लष्करशहा होता. होस्नी मुबारकनं अमेरिकन तह जिवंत ठेवला आणि मिळत असलेला पैसा मात्र थोड्या प्रमाणात सैन्यावर खर्च केला. पण इजिप्तचा सामान्य माणूस त्यापासून वंचितच राहिला. इजिप्तचा सामान्य माणूस इतक्या वर्षांच्या आर्थिक मदतीनंतरही पिरॅमिड्स आणि तत्सम प्राचीन इजिप्तच्या जीवावर मिळणार्‍या पर्यटन महसूलावरच अवलंबून होता. आधुनिक इजिप्त यायला बरीच वर्षं जावी लागली. गेल्या काही वर्षांमध्ये मुबारकने काही उदारमतवादी बदल घडवून आणले, पण ते कधीच पुरेसे नव्हते. तीसहून अधिक वर्षं राष्ट्राध्यक्षपदावर बसल्यावर काही वर्षांपूर्वी लोकलज्जेस्तव मुबारकनं राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा फार्स घडवून आणला. पण इतकी वर्षं हाती सैन्यासकट पूर्ण सत्ता असतानाही मुबारक देशाचं भलं करू शकला नाही. जे सर्वांनी केलं असतं, तेच त्यानं केलं, कुटुंबाचं कोटकल्याण. नाही म्हणायला शर्म-एल-शेख सारखं एक रिझॉर्टसदृश शहर वसवून ठेवलं, जिथे तो सध्या स्वतःच आश्रय घेऊन बसलाय. त्याअर्थी बघायला गेलं तर अन्वर सादत हाच सर्वांत उजवा ठरतो, पण अरबवर्चस्वाच्या उथळ भावनेच्या अतिरेकामुळे बहुतेक इजिप्तनं स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली.
काही महिन्यांपूर्वीच इजिप्तमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या (राष्ट्राध्यक्षाखालचं सरकार निवडण्यासाठी). त्यामध्ये मुबारकच्या अनुकूल लोकांच्या अभूतपूर्व विजयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण विरोधी पक्षांचा थोडा कांगावा सोडता फारसं काही झालं नव्हतं. पण आता ह्या परिस्थितीमुळे मरगळलेल्या विरोधी पक्षामध्येसुद्धा जीव आला. मुस्लिम ब्रदरहूड आणि लोकशाहीवादी असे दोन परस्परविरोधी गटदेखील मुबारकविरूद्ध एकत्र आले. आंदोलनं सुरू झाल्यावर सर्वप्रथम मुबारकनं आंदोलनं दडपायला सुरूवात केली. पण लोकांना आता न जाणे कसला आत्मविश्वास आला होता. ट्युनिशियात झालं तसंच इजिप्तमध्येही सैन्य नागरिकांवर अत्याचार करणार नाही ह्याची लोकांना खात्री होती. इजिप्त काहीही झालं तरी बर्‍यापैकी खुला देश असल्यामुळे उघडउघड नियमांची पायमल्ली करता येणं अवघड होतं. सैन्य अप्रत्यक्षपणे मुबारकच्याच इशार्‍यावर होतं. पण एक विचित्र स्टेलमेट निर्माण झाला होता. इजिप्तमध्ये इंटरनेटचं बर्‍यापैकी प्रस्थ आहे. आणि नुकतीच इंटरनेटनं ट्युनिशियन उठावात पार पाडलेली भूमिका पाहता, इजिप्शियन नागरिकही तिकडे वळू लागले.
ह्यातच आघाडीवर होता गुगलचा सॉफ्टवेयर इंजिनियर नोकरदार वाएल ग़ोनिमनं मोठ्या प्रमाणावर इंटरनेटच्या माध्यमातून होस्नी मुबारकविरूद्ध लढा उभा केला. लवकरच त्याला अटक करण्यात आली आणि जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याचबरोबर संपूर्ण इजिप्तचं इंटरनेट जवळपास पूर्णपणे तोडून टाकण्यात आलं. ज्यामुळे असंतोषाचा भडका उडाला. परिस्थिती विचित्र होत चालली होती. गुगलचा इंजिनियर आता आयकॉन बनला होता. तरूणाई रस्त्यांवर उतरली होती. सैन्य आणि मुबारक फारसे वेगळे नाहीत, पण इजिप्शियन जनता सैन्याला आपलं मानत होती. त्यांचा रोष, असंतोष मुबारकविरूद्ध एकवटत चालला होता. काही ठिकाणी तुरळक चकमकी वगळता, सैन्याकडून आंदोलकांबरोबर फारशी आगळीक घडली नाही.
मुबारकनं टीव्हीवर येऊन एक भाषण दिलं ज्यात त्यानं जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकांत निवडून आलेलं सरकार ताबडतोब बरखास्त करत असल्याची घोषणा केली. पण त्याच्या स्वतःच्या जाण्याबद्दल त्यात काहीच नसल्यानं आंदोलकांमध्ये नाराजी पसरली. एव्हाना कायम परदेशात राहिल्यानं पाश्चात्य देशांमध्ये ओळखीचा चेहरा, नोबेलविजेत्या आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा समितीचा पूर्व प्रमुख मुहम्मद एल-बरदाई आता प्रमुख विरोधी नेता म्हणून समोर आला. इजिप्तच्या सामान्य लोकांना तो फारसा ओळखीचा किंवा जवळचा नाही. पण पाश्च्यात्य देशांना मुबारक गेल्यानंतर कुणीतरी अनुकूल मनुष्य हवा आहे, तो एल-बरदाई बनू शकतो, त्यामुळे पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी जाणूबबुजून त्याचं महत्व वाढवल्याचं मला जाणवलं. तर ह्या पहिल्या भाषणानंतर मुबारकविरोधी जनमत अजून टोकाचं बनलं. तहरीर चौकामध्ये निदर्शकांनी ठाणच मांडलं. अशातच ग़ोनिमला आंतरराष्ट्रीय दबावाखाली सोडून देण्यात आलं. तो परत आला तो हिरो बनून आणि नव्या जोमानं नवा लढा उभा करायचं ठरवून. ग़ोनिमनं तहरीर चौकात लोकांना प्रोत्साहन देत राहण्याचं आणि संयत संदेश देत राहून ती भावना कायम ठेवण्याचं महत्वाचं कार्य केलं. ग़ोनिमचा लढा हा नव्या युगाचा लढा असल्याचं काही लोकांनी निरिक्षण नोंदवलंय. एव्हाना इंटरनेटही पूर्ववत झालं होतं. मुबारकवरचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता.
मुबारक इस्रायलचे हितसंबंध जपण्यासाठी अत्यंत महत्वाचा माणूस होता, त्यामुळे अमेरिकेला चटकन त्याच्या विरूद्ध जाता येईना. इतक्या वर्षांचं अप्पलपोटं धोरण क्षणात कसं बदलणार. पण जगासमोर उभं केलेलं महान देशाचं सोंगही सोडून चालणार नव्हतं. मग हळूहळू हो नाही करत आठवडाभरामध्ये अमेरिकेची भूमिका सूचकपणे मुबारकला जायला सांगण्याइतपत बदलली. आता अमेरिकेनंही हात झटकायची तयारी केली म्हटल्यावर मुबारकचे जवळपास सगळेच मार्ग बंद झाले. तरी तो काहीतरी व्यवस्था करण्यात मग्न होता.
ह्या सगळ्या गोंधळामुळे येमेनमध्ये निदर्शनं वाढू लागली होती. त्यामुळे घाबरून तिथल्या ३० वर्षं असलेल्या राष्ट्राध्यक्षानं २०१३ मध्ये संपणारा पुढचा कार्यकाल अजून पुढे न वाढवण्याची आणि आपल्या मुलालाही त्यावर्षीच्या निवडणुकीला उभं न करण्याची दांभिक घोषणा केली. ज्यामुळे तिथलीही आग विझण्याऐवजी अजूनच भडकली.
इकडे एक दिवस पुन्हा बातमी आली की मुबारक देशासमोर अजून एक भाषण करणार आहे. पण त्या भाषणात त्यानं सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याची घोषणा केली. आणि नवे संवैधानिक बदल घडवून राष्ट्राध्यक्षानं पाचहून अधिक वर्षं सत्तेत राहू नये अशी तरतूद करण्याचा मानस व्यक्त केला. ह्या दांभिकपणामुळे तर असंतोषाचा भडका उडाला. तहरीर चौकात न भूतो न भविष्यति अशी गर्दी लोटली. लोक मागे हटायला तयारच नव्हते. काही ऐकूनही घ्यायला तयार नव्हते. पस्तीसच्या आसपास वर्षांच्या कार्यकालात कधीही उपराष्ट्राध्यक्षाची गरज न पडलेल्या मुबारकनं शेवटचा महिनाभर तो ही ठेवला होता. शेवटी जनमतापुढे झुकून निदर्शनांच्या १८व्या दिवशी मुबारकनं पायउतार होण्याचा निर्णय घेतला. पण एव्हाना तो स्वतःची व्यवस्था लावून बसला होता. तो सहकुटुंब गुपचूप शर्म-एल-शेखला निघून गेला. तो कुठे गेला हे सैन्याशिवाय कुणालाही ठाऊक नाही. पण इजिप्शियन जनतेला त्याची पर्वा नाही. तो गेला ह्यातच ते धन्यता मानतात. त्यांना तो देशात राहण्यावरही आक्षेप नाही. ह्यावरून इजिप्शियन क्रांती थोडीशी जवाबदार अन प्रौढ वाटते. मुबारकच्या लंब्याचौड्या कारकीर्दीमुळे त्याला उपहासाने 'फॅरो' म्हणतात. 'फॅरो' हे प्राचीन इजिप्तमध्ये सूर्याच्या वंशज मानलेल्या राजाला म्हणत असत.
इजिप्तच्या बर्‍यापैकी खुलं असण्याचा अन जगासमोर असण्याचा क्रांती घडवण्यास बराच हातभार लागला. इजिप्तचं भौगोलिक आणि राजकीय स्थानदेखील ह्या सगळ्या घटनांना कुठे न कुठे कारणीभूत ठरलं. पण ठळकपणे समोर आला तो ग़ोनिमचा भावपूर्ण, देशप्रेमी लढा. इजिप्तच्या नागरिकांची चिकाटी आणि एकजूट. अर्थातच प्रो-मुबारक निदर्शनकार्‍यांनी घातलेला गोंधळ आणि पर्यटनावर पोट असणार्‍या नागरिकांचा निदर्शकांवर असणारा रोष अशी काही तुरळक उदाहरणं सोडता लढा एकसंध आणि एकजीव होता. सैन्यानं बाळगलेलं परिस्थितीचं भानदेखील लक्षात घेण्याजोगं आहे.
पण इजिप्तमध्ये सध्या सैन्याच्या हातीच सत्ता आहे. सहा महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची घोषणातरी झालेली आहे. पण सध्यातरी संविधान निलंबित स्थितीत आहे. पण अजूनही नागरिकांमध्ये विजयोन्माद आणि सुटकेचा निश्वास आहे. लवकरच भानावर येऊन सैन्यावरही दबाव ठेवणं भाग आहे. नाहीतर नवा मुबारक बनायला वेळ लागणार नाही.
ट्युनिशिया आणि इजिप्त हे दोन गड तर सर झाले. पण ह्या दोघांच्यामध्ये वसलेला आणि सर्वांत घट्ट अशा पोलादी मुठीत जखडलेला आफ्रिकेतील सर्वाधिक तेलसाठे असलेला लिबिया अजून बाकी आहे. तिकडे एव्हाना घमासान सुरू झालंय. आणि कर्नल गद्दाफी क्रौर्याच्या सगळ्या सीमा पार करत स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्बर विमानाचे हल्ले करवतोय. तिथली स्थिती पुढच्या वेळेस!

(ह्या सर्व घटना घडत असताना अधाश्यासारखं टीव्हीवर मिळेल ते पाहून अन विकिपीडिया वाहून मिळालेली बहुतांश माहिती हाच वरील लेखाचा आधार आहे. ट्युनिशियाबद्दलही बरंच लिहायची इच्छा होती पण आवरली. पण इजिप्तच्या बाबतीत नाट्य जास्त असल्यानं आवरू नाही शकलो स्वतःला :) )

2/04/2011

समान शत्रू

काल मित्रांसोबत कॉफी घेताना नेहमीप्रमाणेच 'चिंता करितो विश्वाची' चाललं होतं. विषय होता 'इजिप्त'. मी म्हटलं, 'वेस्टर्न मीडिया सध्या लोकशाहीवादी अन मुस्लिम ब्रदरहूड ह्या दोन विरोधी पक्षांमध्ये कसे मतभेद आहेत हे दाखवण्यात गुंग आहे. अन खरंच गंमत होणार आहे सगळी. कारण मुस्लिम ब्रदरहूड हा कट्टरवादी पक्ष आहे अन बाकी लोकशाहीवादी आहेत. पण दोघेही होस्नी मुबारकच्या मात्र विरूद्ध आहेत.'
तेव्हा एका मित्रानं एका सामाजिक प्रयोगाबद्दल सांगितलं, ज्यामध्ये दोन युवकांचे गट बनवण्यात आले अन त्यांना एका कॅम्पवर ठेवण्यात आलं. अन काही कारणांचं निमित्त करून त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण करण्यात आलं. मग त्यांचं आपापसातलं वैमनस्य मिटवायचे प्रयत्न सुरू केले गेले. पण वैमनस्य मिटेना. मग त्यांच्या धर्मांचे धर्मगुरूही बोलावले गेले. धर्मगुरूंचं सांगणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं अन त्यानंतर त्यांनी आदरपूर्वक वैमनस्य संपवायला नकार दिला. निर्वाणीचा उपाय म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणार्‍या ह्या गटांच्या कॅम्पचं पाणीच तोडून टाकण्यात आलं. दोनेक दिवस उलटल्यानंतर पाण्याची समस्या गंभीर बनली. अन मग थोडा शोध घेता दोन्ही गटांच्या लक्षात आलं की पाण्याचा मुख्य पाईपच कापण्या आलाय अन आता तो पाईप दुरूस्त करण्यासाठी सगळ्यांना एकत्र काम करावं लागेल. मग त्या दोन्ही गटांनी मिळून एकत्र तो पाईप दुरूस्त केला अन कॅम्पवरचं संकट टळलं. पण इतक्या उपायांनीही शक्य न झालेलं काम म्हणजे दोन्ही गटांचं मनोमिलन पाणीटंचाईनं घडवलं. अर्थात नंतर त्यांच्यात पुन्हा भांडणं झाली का वगैरे तपशील मला ठाऊक नाहीत. पण तात्पर्य हे की, समान शत्रू नेहमीच दोन किंवा अधिक गटांना एकत्र आणतो.
मी कॉलेजात असताना डब्ल्यू डब्ल्यू एफच्या कुस्त्या पाहायचो (अजूनही वेळ मिळेल तेव्हा पाहतो). त्यात जेव्हा ट्रिपल थ्रेट किंवा फोर-वे अर्थात निघांचा किंवा चौघांचा सामना असायचा, तेव्हा सर्वांत ताकदवान एकासमोर बाकीचे सगळे एक व्हायचे अन सर्वप्रथम सगळ्यांत ताकदवान प्रतिस्पर्ध्याला बाहेर काढण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग ते आपापसात लढून पुढचा निर्णय घ्यायचे. तसंच काहीसं इजिप्तमध्ये चालू आहे. होस्नी मुबारकच्या ३० वर्षांच्या एकछत्री सत्तेला विरोध करण्यासाठी सगळेच अतृप्त गट उभे राहिलेत. मग समान शत्रू मुबारकला प्रथम हटवण्यासाठी ते सगळे आपापसांतले मतभेद भांडणंदेखील बाजूला ठेवून एकत्र लढत आहेत.
त्यावरनं पुढे थोडी विवादास्पद चर्चा झाली. ती म्हणजे भारतासारखा प्रचंड विरोधाभासी देश फक्त दहशतवाद, पाकिस्तान ह्यांसारख्या समान शत्रूंमुळे अजूनही एकत्र उभा आहे. ज्या दिवशी ही कारणं संपतील, त्यादिवशी आपले तुकडे पडणं निश्चित आहे. मला स्वतःला हे विधान फारसं पटलं नाही, पण एक क्षण अंगावर काटा आला. म्हणजे, ज्या गोष्टीसाठी पाकिस्तानातल्या अनेक शक्ति अक्षरशः आकाशपाताळ एक करताहेत, ते फक्त त्यांना स्वतःला संपवून मिळू शकतं? पण मग आपले लोक निरक्षरता, गरीबी, बेरोजगारी, अंधश्रद्धा असल्या समान शत्रूंविरूद्ध का एक होऊन लढू इच्छित नाहीत? असा एक काव्यात्म विचारही माझ्या मनात आला. पण पुढच्या क्षणी ते कोडंसुद्धा सुटलं, कारण जर ह्या समान शत्रूंविरूद्ध आपण लढलो, तर आपण एक होऊ अन आपल्यातल्या दुहीचा फायदा घेणारी माणसं आयुष्यातून उठतील. त्यामुळे सध्या ते सगळे (वाचा राजकारणी) आपापसातले मतभेद विसरून फक्त त्यांचा समान शत्रू म्हणजे सामान्यांमधली जागृती, एकी ह्याविरूद्ध लढताहेत अन लोकांसमोर अस्तित्वात नसलेला शत्रू उभा करून आपला कार्यभाग साधताहेत. सध्यातरी ते त्यात यशस्वी होतानाच दिसताहेत. महाराष्ट्रात ह्याचं जिवंत उदाहरण पुतळे, समाध्या अन चित्रांवरून निर्माण होणार्‍या दंगलसदृश स्थितीच्या रूपात समोरच आहे.

1/28/2011

जाळ

गेल्या दोन आठवड्यांपासून जगामध्ये एक फार मोठा बदल व्हायला सुरूवात झालीय. बर्‍याच जणांना त्या बदलाचं महत्व कळत नसलं तरी त्याचे सुरू झालेले अन पुढे होतच राहणारे परिणाम प्रचंड दूरगामी असतील. हा बदल म्हणजे मध्यपूर्वेमध्ये (अर्थात पश्चिम आशिया अन उत्तर आफ्रिकेचा काही भाग) सुरू झालेली सरकारविरोधी आंदोलनं.
मध्यपूर्व हा जगाची तेलाची गरज पुरवण्यामध्ये फार महत्वाचा वाटा उचलणारा भाग आहे. आणि योगायोगाने हा भाग बहुतांशी अरब अन त्यातही मुस्लिमबहुल असा आहे. इस्लामची पताका इथूनच जगभर गेल्यामुळे अरबी मुस्लिम हे जरा जास्तच कट्टर आहेत. पण त्याच कारणामुळे इथल्या बहुतांश देशांमध्ये उत्तम शिक्षणाचं फारसं महत्व नाही. त्यातच ह्या भागामध्ये तेलाचे प्रचंड साठे असल्यानं औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा सर्व देशांचे इथे हितसंबंध असणं नेहमीच जरूरी होतं. ह्या धंद्यामध्ये अमेरिका नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे, कारण वर्षांनुवर्षांपासून अमेरिकेची तेलाची भूक महाप्रचंड आहे. आणि त्याचबरोबर इस्रायल हे अमेरिकेच्या मांडीवरचं बाळही तिथेच शत्रूंच्या मधोमध राहत असल्यानं तिथे आपली माणसं असणं अमेरिकेसाठी अत्यावश्यक ठरतं. त्यामुळे अमेरिकेने ह्या देशांमध्ये अनेक हुकूमशहा पोसलेले आहेत. जे गेली कित्येक दशकं अशिक्षित अन गरीब जनतेला नाडत सिंहासनांवर बसून आहेत. कधी थेट हुकूमशहा म्हणून तर कधी खोट्या लोकशाहीचा मुखवटा घालून. एकंदर ह्या भागामध्ये गरिबी अन शिक्षणाचा अभाव फार असल्याकारणाने सत्तेवरची मांड लष्कराच्या मदतीनं टिकवणं सोपं जातं.
पण गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटच्या प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रसाराने लोकांच्या, विशेषतः तरूणांच्या आतल्या खदखदणार्‍या विचारांना वाट मिळाली. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून त्यांना व्यक्त होण्याची अन जगाच्या पाठीवरच्या समविचारी लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. इथल्या सरकारांनी कधी माहिती तंत्रज्ञानच काय कसलीच व्यवस्था नीट न ठेवल्यामुळे इंटरनेटचा विस्तारही अव्यवस्थितपणेच होत होता. पण हेच बंडखोर तरूणांच्या पथ्यावरही पडलं कारण त्यांना रोखण्यासाठीही फारसं काही केलं जाऊ शकत नव्हतं. इराण किंवा सौदी अन इतर काही देशांमध्ये बंडखोर तरूणाईच्या इंटरनेट स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचाही प्रयत्न झाला, पण तरूणाई ह्या सगळ्याला पुरून उरली. जग छोटं झाल्यामुळे सगळ्या जगभरात चालणार्‍या गोष्टी, लोकशाही मूल्य अन पुरोगामी विचार ह्यांसारख्या गोष्टी ह्या भागातील लोकांनाही कळू लागल्या. आणि त्यातच गेल्या वर्षीपासून आलेल्या जागतिक मंदीमुळे मध्यपूर्वेतल्या छोट्या देशांची तर अवस्था बिकटच झाली. पण अर्थात जनतेची, शासकांची नाही. त्यामुळे लोकांमध्ये इतक्या काळापासून खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्ह होतीच. प्रथम इराणमध्ये झालेलं अयशस्वी अन निर्दयरित्या दडपलं गेलेलं सरकारविरोधी आंदोलन हे त्याचीच नांदी होतं.
आणि आता आठवड्याभरापूर्वी ट्युनिशियात घडलेली ते अभूतपूर्व आंदोलन. ट्युनिशिया, हा जागतिक नकाशावरचा एक ठिपका. पश्चिम आशियाला जवळ असणार्‍या उत्तर आफ्रिकेच्या किनार्‍याने वसलेला एक छोटासा देश. अक्षरशः इतका छोटा की आम्ही शाळेत नकाशा खेळताना (ह्या खेळात प्रतिस्पर्ध्याला नकाशावरचं एक ठिकाण शोधायला सांगायचं असतं) ट्युनिशिया हमखास सांगत असू. माझी अन ट्युनिशियाची पहिली ओळख ती अन दुसरी ही की त्यांची फुटबॉल टीम बरीच तगडी आहे. तर अशा ह्या नगण्या ट्युनिशियात गेली काही दशकं राज्यपदावर बसलेल्या राष्ट्रप्रमुखाविरूद्ध आंदोलन होतं आणि मोठ्या सातत्याने दडपशाहीविरूद्ध प्रक्षुब्ध जनता आणि तरूणाई आपल्या मागण्या लावून धरते आणि शेवटी त्या राष्ट्रप्रमुखाला देश सोडायला भाग पाडते, ही अभूतपूर्व घटना गेल्या आठवड्यात घडली.
अरब जगताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जनतेनं 'यशस्वी' उठाव घडवून आणला. आणि एकजात सारे अरब नेते हडबडून गेले. कारण त्यातले जवळपास सगळेच कमीअधिक फरकाने हुकूमशहा. आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व प्रगतीमुळे सार्‍या जगानं ही घटना पाहिली आणि ती सार्‍या जगापर्यंत व्यवस्थित पोचवायचं काम सोशल नेटवर्किंग साईट्सनीही केलं. ह्यामुळे आता मध्यपूर्वेच्या सगळ्या देशांमधल्या तरूणाईला एक आदर्श मिळालाय. एक असं उदाहरण जे आशादायी आहे. संपूर्ण व्यवस्थाच उलथून टाकणे हा मार्ग आचरण्यासाठी बरीच तरूणाई उत्सुक आहे. त्यामुळे लगेचच शेजारी अल्जेरियात उठाव सुरू झालेत. आणि आज इजिप्तमध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झालंय.
वर्षांनुवर्षं लोकांना गृहित धरून स्वतःची घरं भरणार्‍या राजकारण्यांना यःकश्चित प्रजाजन देशातून हुसकावून लावायच्या प्रयत्नात आहेत. एका ठिकाणी तर यशस्वीही झालेत आणि बाकी ठिकाणी लढाया सुरू झाल्यात. माझ्या मते तर ही खूप लांब चालणारी लढाई असेल. ह्या हुकूमशहांचे आलिशान प्रासाद जाळून आंदोलनकर्ते योग्य तो संदेश परिणामकारकपणे देताहेत. हा जाळ आता लवकरच पसरेल आणि जर हुकूमशहा जाऊन तिथे योग्य तशी लोकशाही येऊ शकली तरच खरा विजय ठरेल पण अमेरिकेसह तमाम स्वार्थी युरोपियन देशांचे वांधे होतील. अन्यथा अराजकच माजेल आणि त्यात जनतेची परवड अन अजून एखाद्या हुकूमशहाचा उदय एव्हढंच निष्पन्न होईल. पण दोन्हीही परिस्थितींमध्ये जगामध्ये अन जगाच्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत आहेत. ही उलथापालथ अगदी रातोरात नाही झाली तरी हळूहळू पण निश्चितपणे होईल आणि कायमस्वरूपी परिणाम करेल.
पण हा जाळ भारतात कधी येईलसं वाटत नाही. आपले लोक फारच निर्ढावलेत. इतके घोटाळे रोजच्या रोज बाहेर येऊनही फक्त घराणं, नातेवाईक हे बघूनच आपले लोक वर्षांनुवर्षं मतदान करताहेत. सरकारला जाब विचारणं दूरच साधा विरोध प्रदर्शित करणंही आपल्या लोकांच्यानं होत नाही. रोज एकेका जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत चाललेत पण आपल्याला पुतळे, इतिहास, जात ह्या गोष्टींमध्ये प्रचंड स्वारस्य आहे. आणि अन्यायविरोधी आंदोलनांसाठी नाही तर जातीपाती अन धर्मांवरून दंगलींसाठी जाळपोळ करायला अन रक्त सांडायला आपले लोक तयार आहेत.
आपल्या माणसांना कधीतरी हे समजेल का की मेणबत्त्या आणि संग्रहालयं पेटवून काही होत नाही. आयुष्याच्या मशाली पेटवायला लागतात आणि त्यांतूनच जो जाळ निर्माण होतो तो जगातल्या मोठ्यांतल्या मोठ्या पापाच्या पैशांच्या प्रासादांना स्वाहा करायची ताकद ठेवतो.