2/24/2011

क्रांतीची मशाल -२-'फॅरो' चा अस्त

ट्युनिशियन क्रांतीनंतर पुढे जे घडतंय ते पाहून मला ती एका हत्तीच्या पिल्लाची गोष्ट आठवते. एका छोट्याशा हत्तीच्या पिल्लाला पकडून आणून प्राणीसंग्रहालयामध्ये एका छोट्याशा दोराच्या तुकड्यानं एका मोठ्या खिळ्याला बांधून ठेवलं. बांधल्या बांधल्या काही दिवस त्यानं त्या दोराला झटके द्यायचा प्रयत्न केला, पण खूप प्रयत्न करून देखील त्याला तो दोर तोडणं, किंवा तो खिळा उखडणं जमलं नाही. हळू हळू ते पिल्लू मोठं होऊ लागलं, पण वर्षांनुवर्षं त्या पिल्लाला एक छोटासा फेरफटका मारून आणून पुन्हा त्याच दोरीच्या तुकड्यानं बांधून ठेवलं जात होतं. पिल्लाचं रूपांतर मोठ्या हत्तीत झालं, पण कधीच त्या हत्तीनं त्या दोराला एक झटका द्यायचा प्रयत्न केला नाही. कारण त्याच्या मनात लहानपणी केलेले असफल प्रयत्न ताजे होते. त्याच्या बुद्धिसाठी तो दोर त्याच्या शक्तिपलिकडचा होता. प्रत्यक्षात आता मोठा झालेल्या हत्तीनं दिलेला हलकासा झटकाही तो खिळा उखडू शकत होता. पण त्याला स्वतःच्याच शक्तीची जाणीव नव्हती. असंच काहीसं मध्यपूर्वेकडच्या वर्षांनुवर्षं एकाधिकारशाहीनं पिचलेल्या जनतेचं झालेलं होतं. त्यांना स्वतःच्याच शक्तीची जाणीव नव्हती. मुहम्मद बुअज़िज़ीच्या बलिदानानंतर उसळलेल्या उत्स्फूर्त निदर्शनांपुढे सरकारी यंत्रणा हतबल ठरलेली दिसताच त्या आतल्या शक्तिची जाणीव बळकट बनली. आणि ट्युनिशियाच्या यशस्वी उठावानंतर तर समस्त अरब जनतेला आपल्या शक्तीची जाणीव झाली.
त्यातूनच मग बदलाची केव्हापासूनची लागलेली भूक डोकं काढून वर आली. समस्या कित्येक वर्षांपासून त्याच होत्या. असंतोष साचतच होता, पण प्रतिक्रिया नव्हती. आता आपणही काही करू शकतो ही भावना निर्माण झाली. अन इतक्या वर्षांच्या साचलेल्या असंतोषाला वाट मिळाली आणि तडकाफडकी सर्वप्रथम ट्युनिशियाच्या शेजारीच अल्जिरियामध्ये सरकारविरोधी निदर्शनं सुरू झाली.अल्जिरियामधली निदर्शनं फारशी ताकदवान नव्हती आणि अल्जिरियन सरकारची प्रतिक्रिया बरीचशी तत्पर होती. त्यातही पोलिस दलानं योग्य व्यूहरचना आखून परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जाणार नाही, ह्याची काळजी घेतली. पण एव्हाना ट्युनिशिया हे अरब जगतात रोल मॉडेल बनू लागलं होतं. दूरवरच्या येमेनमध्ये आणि एक देश सोडून पलिकडे वसलेल्या इजिप्तमध्येदेखील असंतोष उफाळून यायची चिह्नं दिसू लागली.
इजिप्तचा इतिहास बराच विचित्र आहे. गमाल अब्देल नासर पासून सुरू झालेला लष्करशहांचा इतिहास मुबारकपाशी येऊन थांबतो. गमाल नासरनं 'एक अरब राज्य' ची संकल्पना प्रथम लोकांसमोर आणली. नासर बर्‍यापैकी उदारमतवादी होता अशी त्याची प्रतिमा तरी होती. अर्थात एक लष्करशहा जितका उदारमतवादी असू शकतो तितकाच तो होता. हा नासर म्हणजे तोच नेहरूं आणि मार्शल टिटोबरोबर 'अलिप्ततावादी चळवळ' स्थापनेत हातभार लावणारा. तर ह्या नासरला सर्व अरब राज्यं एका छत्राखाली आणायची इच्छा होती. तो अरब आयकॉन होता. त्याचाच विश्वासू म्हणजे अन्वर सादत. हादेखील लष्करी अधिकारीच. हा मात्र अर्धा इजिप्शियन आणि अर्धा सुदानी. कारण पूर्वीच्या काळी इजिप्त आणि सुदान एकच राष्ट्र होतं. त्यामुळे अन्वर सादत जरी अरब असला तरी कृष्णवर्णाकडे झुकणारा होता. पण अन्वर सादत नासरच्याही एक पाऊल पुढे उदारमतवादी समजला जात होता. वर्षानुवर्षं इस्रायलबरोबर चालू असलेल्या संघर्षात त्यानं फार मोठा बदल घडवला. इस्रायल अनेकदा इजिप्तला भारी पडलेलं होतं. इजिप्तची बरीच जमीन इस्रायलनं बळकावली होती.
सादत स्वतःही एकदा इस्रायलकडून मार खाल्लेला होता. सर्वप्रथम त्यानं भरपूर ताकद जमवून इस्रायलवर मोठा वार केला. ह्या पहिल्या धडकेनंच इस्रायलला धडकी भरली. इस्रायलनं परत हल्ला करून बरीचशी जमीन परत मिळवली. पण इजिप्तच्या सुरूवातीच्या मुसंडीनं इस्रायलला हे प्रकरण जड जाणार हे दिसू लागलं. एव्हाना इजिप्तच्या कामगिरीचं अरब जगात कौतुक होत होतं. सादत आता ज्यूंना भारी पडल्यामुळे अरबांचा आयकॉन बनू लागला होता. असं युद्ध वारंवार होणं इस्रायलला परवडणारं नव्हतं, त्यामुळे इस्रायलनं अमेरिकेकडे दाद लावली. अन अमेरिकेनं इजिप्तला मोठा आर्थिक मोबदला देण्याच्या बदल्यात इजिप्त-इस्रायल तह घडवून आणला. ह्या तहाअंतर्गत आजतागायत दरवर्षी इजिप्तला १.३ बिलियन डॉलर्स मिळतात. ज्यातून इजिप्तनं आपलं सैन्यदल बरंच विकसित केलं आहे. पण ह्या तहानं सादतची प्रतिमा डागाळली. मध्यपूर्व शांत झाली, पण इजिप्तच्या सैन्यात थोडा असंतोष दाटला. ह्यातनंच सादत मिलिटरी परेड पाहत असताना सैन्याच्याच लोकांनी सादत बसलेल्या गॅलरीवर गोळीबार केला आणि सादतचा अंत झाला. ह्याच हल्ल्यामध्ये सादतचा विश्वासू उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारकदेखील जखमी झाला.
पण ह्यातून बरा होत होस्नी मुबारकनं सगळी बंड मोडून काढली आणि सत्तेवर मांड बसवली. इजिप्तच्या नशीबात आणखी एक लष्करशहा होता. होस्नी मुबारकनं अमेरिकन तह जिवंत ठेवला आणि मिळत असलेला पैसा मात्र थोड्या प्रमाणात सैन्यावर खर्च केला. पण इजिप्तचा सामान्य माणूस त्यापासून वंचितच राहिला. इजिप्तचा सामान्य माणूस इतक्या वर्षांच्या आर्थिक मदतीनंतरही पिरॅमिड्स आणि तत्सम प्राचीन इजिप्तच्या जीवावर मिळणार्‍या पर्यटन महसूलावरच अवलंबून होता. आधुनिक इजिप्त यायला बरीच वर्षं जावी लागली. गेल्या काही वर्षांमध्ये मुबारकने काही उदारमतवादी बदल घडवून आणले, पण ते कधीच पुरेसे नव्हते. तीसहून अधिक वर्षं राष्ट्राध्यक्षपदावर बसल्यावर काही वर्षांपूर्वी लोकलज्जेस्तव मुबारकनं राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा फार्स घडवून आणला. पण इतकी वर्षं हाती सैन्यासकट पूर्ण सत्ता असतानाही मुबारक देशाचं भलं करू शकला नाही. जे सर्वांनी केलं असतं, तेच त्यानं केलं, कुटुंबाचं कोटकल्याण. नाही म्हणायला शर्म-एल-शेख सारखं एक रिझॉर्टसदृश शहर वसवून ठेवलं, जिथे तो सध्या स्वतःच आश्रय घेऊन बसलाय. त्याअर्थी बघायला गेलं तर अन्वर सादत हाच सर्वांत उजवा ठरतो, पण अरबवर्चस्वाच्या उथळ भावनेच्या अतिरेकामुळे बहुतेक इजिप्तनं स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली.
काही महिन्यांपूर्वीच इजिप्तमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या (राष्ट्राध्यक्षाखालचं सरकार निवडण्यासाठी). त्यामध्ये मुबारकच्या अनुकूल लोकांच्या अभूतपूर्व विजयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण विरोधी पक्षांचा थोडा कांगावा सोडता फारसं काही झालं नव्हतं. पण आता ह्या परिस्थितीमुळे मरगळलेल्या विरोधी पक्षामध्येसुद्धा जीव आला. मुस्लिम ब्रदरहूड आणि लोकशाहीवादी असे दोन परस्परविरोधी गटदेखील मुबारकविरूद्ध एकत्र आले. आंदोलनं सुरू झाल्यावर सर्वप्रथम मुबारकनं आंदोलनं दडपायला सुरूवात केली. पण लोकांना आता न जाणे कसला आत्मविश्वास आला होता. ट्युनिशियात झालं तसंच इजिप्तमध्येही सैन्य नागरिकांवर अत्याचार करणार नाही ह्याची लोकांना खात्री होती. इजिप्त काहीही झालं तरी बर्‍यापैकी खुला देश असल्यामुळे उघडउघड नियमांची पायमल्ली करता येणं अवघड होतं. सैन्य अप्रत्यक्षपणे मुबारकच्याच इशार्‍यावर होतं. पण एक विचित्र स्टेलमेट निर्माण झाला होता. इजिप्तमध्ये इंटरनेटचं बर्‍यापैकी प्रस्थ आहे. आणि नुकतीच इंटरनेटनं ट्युनिशियन उठावात पार पाडलेली भूमिका पाहता, इजिप्शियन नागरिकही तिकडे वळू लागले.
ह्यातच आघाडीवर होता गुगलचा सॉफ्टवेयर इंजिनियर नोकरदार वाएल ग़ोनिमनं मोठ्या प्रमाणावर इंटरनेटच्या माध्यमातून होस्नी मुबारकविरूद्ध लढा उभा केला. लवकरच त्याला अटक करण्यात आली आणि जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याचबरोबर संपूर्ण इजिप्तचं इंटरनेट जवळपास पूर्णपणे तोडून टाकण्यात आलं. ज्यामुळे असंतोषाचा भडका उडाला. परिस्थिती विचित्र होत चालली होती. गुगलचा इंजिनियर आता आयकॉन बनला होता. तरूणाई रस्त्यांवर उतरली होती. सैन्य आणि मुबारक फारसे वेगळे नाहीत, पण इजिप्शियन जनता सैन्याला आपलं मानत होती. त्यांचा रोष, असंतोष मुबारकविरूद्ध एकवटत चालला होता. काही ठिकाणी तुरळक चकमकी वगळता, सैन्याकडून आंदोलकांबरोबर फारशी आगळीक घडली नाही.
मुबारकनं टीव्हीवर येऊन एक भाषण दिलं ज्यात त्यानं जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकांत निवडून आलेलं सरकार ताबडतोब बरखास्त करत असल्याची घोषणा केली. पण त्याच्या स्वतःच्या जाण्याबद्दल त्यात काहीच नसल्यानं आंदोलकांमध्ये नाराजी पसरली. एव्हाना कायम परदेशात राहिल्यानं पाश्चात्य देशांमध्ये ओळखीचा चेहरा, नोबेलविजेत्या आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा समितीचा पूर्व प्रमुख मुहम्मद एल-बरदाई आता प्रमुख विरोधी नेता म्हणून समोर आला. इजिप्तच्या सामान्य लोकांना तो फारसा ओळखीचा किंवा जवळचा नाही. पण पाश्च्यात्य देशांना मुबारक गेल्यानंतर कुणीतरी अनुकूल मनुष्य हवा आहे, तो एल-बरदाई बनू शकतो, त्यामुळे पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी जाणूबबुजून त्याचं महत्व वाढवल्याचं मला जाणवलं. तर ह्या पहिल्या भाषणानंतर मुबारकविरोधी जनमत अजून टोकाचं बनलं. तहरीर चौकामध्ये निदर्शकांनी ठाणच मांडलं. अशातच ग़ोनिमला आंतरराष्ट्रीय दबावाखाली सोडून देण्यात आलं. तो परत आला तो हिरो बनून आणि नव्या जोमानं नवा लढा उभा करायचं ठरवून. ग़ोनिमनं तहरीर चौकात लोकांना प्रोत्साहन देत राहण्याचं आणि संयत संदेश देत राहून ती भावना कायम ठेवण्याचं महत्वाचं कार्य केलं. ग़ोनिमचा लढा हा नव्या युगाचा लढा असल्याचं काही लोकांनी निरिक्षण नोंदवलंय. एव्हाना इंटरनेटही पूर्ववत झालं होतं. मुबारकवरचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता.
मुबारक इस्रायलचे हितसंबंध जपण्यासाठी अत्यंत महत्वाचा माणूस होता, त्यामुळे अमेरिकेला चटकन त्याच्या विरूद्ध जाता येईना. इतक्या वर्षांचं अप्पलपोटं धोरण क्षणात कसं बदलणार. पण जगासमोर उभं केलेलं महान देशाचं सोंगही सोडून चालणार नव्हतं. मग हळूहळू हो नाही करत आठवडाभरामध्ये अमेरिकेची भूमिका सूचकपणे मुबारकला जायला सांगण्याइतपत बदलली. आता अमेरिकेनंही हात झटकायची तयारी केली म्हटल्यावर मुबारकचे जवळपास सगळेच मार्ग बंद झाले. तरी तो काहीतरी व्यवस्था करण्यात मग्न होता.
ह्या सगळ्या गोंधळामुळे येमेनमध्ये निदर्शनं वाढू लागली होती. त्यामुळे घाबरून तिथल्या ३० वर्षं असलेल्या राष्ट्राध्यक्षानं २०१३ मध्ये संपणारा पुढचा कार्यकाल अजून पुढे न वाढवण्याची आणि आपल्या मुलालाही त्यावर्षीच्या निवडणुकीला उभं न करण्याची दांभिक घोषणा केली. ज्यामुळे तिथलीही आग विझण्याऐवजी अजूनच भडकली.
इकडे एक दिवस पुन्हा बातमी आली की मुबारक देशासमोर अजून एक भाषण करणार आहे. पण त्या भाषणात त्यानं सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याची घोषणा केली. आणि नवे संवैधानिक बदल घडवून राष्ट्राध्यक्षानं पाचहून अधिक वर्षं सत्तेत राहू नये अशी तरतूद करण्याचा मानस व्यक्त केला. ह्या दांभिकपणामुळे तर असंतोषाचा भडका उडाला. तहरीर चौकात न भूतो न भविष्यति अशी गर्दी लोटली. लोक मागे हटायला तयारच नव्हते. काही ऐकूनही घ्यायला तयार नव्हते. पस्तीसच्या आसपास वर्षांच्या कार्यकालात कधीही उपराष्ट्राध्यक्षाची गरज न पडलेल्या मुबारकनं शेवटचा महिनाभर तो ही ठेवला होता. शेवटी जनमतापुढे झुकून निदर्शनांच्या १८व्या दिवशी मुबारकनं पायउतार होण्याचा निर्णय घेतला. पण एव्हाना तो स्वतःची व्यवस्था लावून बसला होता. तो सहकुटुंब गुपचूप शर्म-एल-शेखला निघून गेला. तो कुठे गेला हे सैन्याशिवाय कुणालाही ठाऊक नाही. पण इजिप्शियन जनतेला त्याची पर्वा नाही. तो गेला ह्यातच ते धन्यता मानतात. त्यांना तो देशात राहण्यावरही आक्षेप नाही. ह्यावरून इजिप्शियन क्रांती थोडीशी जवाबदार अन प्रौढ वाटते. मुबारकच्या लंब्याचौड्या कारकीर्दीमुळे त्याला उपहासाने 'फॅरो' म्हणतात. 'फॅरो' हे प्राचीन इजिप्तमध्ये सूर्याच्या वंशज मानलेल्या राजाला म्हणत असत.
इजिप्तच्या बर्‍यापैकी खुलं असण्याचा अन जगासमोर असण्याचा क्रांती घडवण्यास बराच हातभार लागला. इजिप्तचं भौगोलिक आणि राजकीय स्थानदेखील ह्या सगळ्या घटनांना कुठे न कुठे कारणीभूत ठरलं. पण ठळकपणे समोर आला तो ग़ोनिमचा भावपूर्ण, देशप्रेमी लढा. इजिप्तच्या नागरिकांची चिकाटी आणि एकजूट. अर्थातच प्रो-मुबारक निदर्शनकार्‍यांनी घातलेला गोंधळ आणि पर्यटनावर पोट असणार्‍या नागरिकांचा निदर्शकांवर असणारा रोष अशी काही तुरळक उदाहरणं सोडता लढा एकसंध आणि एकजीव होता. सैन्यानं बाळगलेलं परिस्थितीचं भानदेखील लक्षात घेण्याजोगं आहे.
पण इजिप्तमध्ये सध्या सैन्याच्या हातीच सत्ता आहे. सहा महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची घोषणातरी झालेली आहे. पण सध्यातरी संविधान निलंबित स्थितीत आहे. पण अजूनही नागरिकांमध्ये विजयोन्माद आणि सुटकेचा निश्वास आहे. लवकरच भानावर येऊन सैन्यावरही दबाव ठेवणं भाग आहे. नाहीतर नवा मुबारक बनायला वेळ लागणार नाही.
ट्युनिशिया आणि इजिप्त हे दोन गड तर सर झाले. पण ह्या दोघांच्यामध्ये वसलेला आणि सर्वांत घट्ट अशा पोलादी मुठीत जखडलेला आफ्रिकेतील सर्वाधिक तेलसाठे असलेला लिबिया अजून बाकी आहे. तिकडे एव्हाना घमासान सुरू झालंय. आणि कर्नल गद्दाफी क्रौर्याच्या सगळ्या सीमा पार करत स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्बर विमानाचे हल्ले करवतोय. तिथली स्थिती पुढच्या वेळेस!

(ह्या सर्व घटना घडत असताना अधाश्यासारखं टीव्हीवर मिळेल ते पाहून अन विकिपीडिया वाहून मिळालेली बहुतांश माहिती हाच वरील लेखाचा आधार आहे. ट्युनिशियाबद्दलही बरंच लिहायची इच्छा होती पण आवरली. पण इजिप्तच्या बाबतीत नाट्य जास्त असल्यानं आवरू नाही शकलो स्वतःला :) )

28 comments:

 1. सही.. भरपूर माहिती मिळाली. विकी/सीएनएन बघणं चालूच आहे रोज. पण हे असं एकसंध वाचायला मजा आली एकदम. जिओ.. मस्तच !!

  अवांतर : पोस्टमध्ये २-३ टायपो आहेत तेवढे दुरुस्त करशील का प्लीज? एवढ्या चांगल्या लेखाला इतकासाही डाग नको वाटतो.

  ReplyDelete
 2. सही.. भरपूर माहिती मिळाली ++

  ReplyDelete
 3. विभि खुप माहितीपुर्ण पोस्ट...शर्म अल शेक अन इजिप्त यामध्ये खुप फ़रक आहे....तिकडे गेल्यावर आपण युरोप मध्ये आल्याचा भास होतो...आम्ही जेव्हा शर्म अल शेक मध्ये गेलो होतो तेव्हा इजिप्तशिअन खुप कमी दिसले....मी याविषयी नंतर सहजच मित्राला विचारल..तेव्हा त्याच्या म्हणण्यानुसार सामान्य इजिप्त्शिअन नागरिक तिकडे जाउ शकत नाही...फ़क्त श्रीमंतवर्गीयांना तिकडे प्रवेश आहे...शर्म अल शेकच्या प्रवेशद्वारावर जे आयडेंटी चेकींग होत अन जर तुम्ही मध्यमवर्गीय असाल तर तिथुनच तुमच्या हातात परतीचा नारळ दिला जातो...याव्यतरिक्त ही जर चुकुन कोणी घुसलाच तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा असते...अर्थात आता हे सगळ बदलेल.

  ReplyDelete
 4. अप्रतिम...माहितीपूर्ण पोस्ट... :)

  ReplyDelete
 5. १. दुसऱ्या कोणीतरी अभ्यास करायचा आणि अशी आयती माहिती वाचून, पाठ करून उत्तरे लिहायची अशी सवय आहेच पहिली पासून!
  आता देखील इथे तिथे वाचत होतेच परंतु अशी एकत्रित माहिती दिली....धन्यवाद!

  २. ह्या सगळ्या युद्धांमध्ये 'जनतेचा रोष' हा समान धागा आहे आणि त्यातून त्यांनी सत्ता उलथून लावली आहे हे दिसून येतं. त्यातून धडा घेण्यासारखे संपूर्ण जगासाठी, बरेच काही आहे. परंतु, एक सत्ता उलथून लावल्यावर त्यांच्याकडे आता दुसरा काय पर्याय आहे ज्यातून आता त्या देशांचे भले होणार आहे ते अजून तरी स्पष्ट नाही. त्या देशांमध्ये आजतागायत 'शिक्षण' ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देण्यात आलेले नाही.(बहुतेक जाणूनबुजून) व त्यामुळे संपूर्ण विचार करू शकेल असा एखादा पुढारी (जो आम जनतेशी संवाद साधू शकेल) वा असा कुठला गट आहे वा नाही हे स्पष्ट होत नाही. आणि त्यामुळे आता जे तिथे अस्थैर्य निर्माण झाले आहे, ते लवकर कसे काय संपणार आहे व जनमान कधी सुरळीत होईल हे नाही कळत....

  २. विद्याधर, तुझ्या ह्या अभ्यासू वृत्तीचं मला नेहेमीच कौतुक व अभिमान वाटतो! तुला मनापासून शुभेच्छा आणि हा आयता अभ्यास अतिशय नीटस रीत्या एकत्रित करून माझ्या डोळ्यासमोर ठेवल्याबद्दल खूप खूप आभार!

  ReplyDelete
 6. Anonymous1:04 AM

  अनघा +101

  विद्याधर खरचं तूझ्या अभ्यासू वृत्तीचं कायम कौतूक आणि अभिमान वाटतो... जियो!!

  ReplyDelete
 7. अनघाताय +१११११
  मस्त.. पुढचा भाग आहे ना??

  ReplyDelete
 8. अनघा +1


  मस्त जमलाय लेख्...भरपूर माहिती देणारा.. आम्हां न फिरणा-या लोकांच्या मेदूंला चांगलच खाद्य आहे...

  ReplyDelete
 9. ह्या सगळ्या युद्धांमध्ये 'जनतेचा रोष' हा समान धागा आहे आणि त्यातून त्यांनी सत्ता उलथून लावली आहे हे दिसून येतं
  अगदी बरोबर. अन्य कुठल्याही माध्यमापेक्षी जनतेतील असंतोष आणि 'करेंगे या मरेंगे'ची भूमिका यांच्यामुळेच अरब देशांत (सध्यातरी केवळ इजिप्त, ट्यूनिशिया आणि लिबिया)वादळ धुमसत आहे. हा असंतोष चीनमार्गे भारतात आला, तरच खरी क्रांती घडेल.

  ReplyDelete
 10. बाबा, एकदम मस्त झालंय. मलाही एकत्रित अशी माहीती एकाच ठीकाणी वाचायला मिळाल्यामुळे वेगवेगल्या ठीकाणी वाचण्याचे प्रयत्न वाचले. :-)

  देविदास, हा असंतोष चीन मार्गे येणं कठीणच आहे पण पाकिस्तानमार्गे येऊ शकतो. आधी अफगाणीस्तान आणि मग पाकिस्तानात भडका उडाला पाहीजे.
  वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की या सगळ्या भडक्यांमुळे तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे आपल्याकडे महागाई अजुन वाढेल अशी भिती वाटतेय.

  ReplyDelete
 11. विद्या, विकी/वर्तमानपत्रे/बातम्या/इंटरनेट... या सगळ्याचा आधार घेऊन जरी लिहीलेले असले तरीही तू ते समजून घेऊन, अभ्यास करून लिहील्याने मला ही क्रांती व्यवस्थित लक्षात राहावी इतपत कळून आली. अनेक धन्यवाद.

  अनघा +101

  विद्याधर खरचं तूझ्या अभ्यासू वृत्तीचं कायम कौतूक आणि अभिमान वाटतो... जियो!!

  ReplyDelete
 12. हेरंब,
  ते टायपो दुरूस्त केले रे! धन्यु :)

  ReplyDelete
 13. आनंद,
  आनंद वाटला :D

  ReplyDelete
 14. योगेश,
  शर्म-एल-शेख ची मला जास्त माहिती नव्हती. मी त्याची विकि वाचायचा आळस केला होता.. पण तू कसर भरून काढलीस.. धन्यु रे.. :)

  ReplyDelete
 15. सुहास,
  धन्यवाद रे... इतक्या दिवसांचं लिहायचं होतं.. :D

  ReplyDelete
 16. अनघाताई,
  होय.. त्या देशांमध्ये शिक्षणाचा अभाव आहेच.. त्यातल्यात्यात इजिप्तमध्ये अन इराणमध्ये शिक्षण बर्‍यापैकी आहे...ट्युनिशियात त्याखालोखाल.. पण येमेन तर पूर्ण आदिवासी टोळ्यांनी भरलेला आहे... क्रांतीनंतरच्या स्थैर्यासाठी खरंच त्यांना स्वतःच्या मातीतला (एल-बरदाई मातीतला नेता नाही.. तो त्यांचा शशी थरूर आहे) जाणता नेता हवाय.. तो तसा मिळो ही सदिच्छा!
  आणि ताई, तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच असले अग्रलेखाची खुमखुमी शांत करणारे लेख लिहायला हुरूप येतो! :)

  ReplyDelete
 17. तन्वीताई,
  अगं शाळा-कॉलेजात एव्हढा अभ्यास केला असता तर आज कुठच्या कुठे असतो :P :D

  ReplyDelete
 18. संकेतानंद,
  आहे ना पुढचा भाग... कर्नलसाहेब गद्दाफींबद्दल तर लिहावं तेव्हढं थोडं आहे...पण.. ब्रेक के बाद... सप्ताहांताला मी बाहेर चाललोय :)
  धन्यवाद रे भावा!

  ReplyDelete
 19. सारिका,
  धन्यवाद! फक्त इकडून मिळालेली माहिती तिकडे करतो..स्वतःच्या शब्दांत! :)

  ReplyDelete
 20. >>अन्य कुठल्याही माध्यमापेक्षी जनतेतील असंतोष आणि 'करेंगे या मरेंगे'ची भूमिका यांच्यामुळेच
  खरं आहे...
  आणि आता मीही चीनमध्ये अन पाकिस्तानमध्ये काहीतरी होण्याची वाट पाहतोय.. कारण आपले लोक तहान लागल्याशिवाय विहीर खणत नाहीत! :)

  ReplyDelete
 21. अलताई,
  :)
  >>वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की या सगळ्या भडक्यांमुळे तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताच जास्त.
  होय.. ती भीती आहेच आणि ती खरीही ठरण्याच्या शक्यता आहेत! पाहू पुढे काय काय होतं... पाकमध्ये उठाव होणं तसं मुश्किलच आहे.. पण झाला तर मजा येईल :)
  धन्यवाद गं!

  ReplyDelete
 22. श्रीताई,
  अगं रिकामं डोकं.. रोजच्या बातम्यांनी थोडं ढवळतं.. :)
  आपणच लिहिलेल्याचा नोट्स काढाव्यात तसं वाटतं.. मजा येते! :D

  ReplyDelete
 23. Anonymous9:06 AM

  ही क्रांती आहे असे मला वाटत नाही. माथेफिरू लोकानी जनक्षोभाच्या नावाखाली हात धुवून घेतले आहेत.

  ReplyDelete
 24. Anonymous,
  मी तुमच्याशी असहमत असलो तरी.. तुमच्याही मताचा आदर! आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

  ReplyDelete
 25. छान! माहितीपूर्ण पोस्ट..

  ReplyDelete
 26. अशी एकत्रित आणि सोप्या शब्दातली माहिती कुठे मिळतेय का पहातच होतो आणि सुदैवाने हि पोस्ट मिळाली! धन्यवाद द्यावेत तितके थोडेच..

  ReplyDelete
 27. अखिलदीप,
  ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!
  भेट देत राहा! :)

  ReplyDelete