Showing posts with label पुणे. Show all posts
Showing posts with label पुणे. Show all posts

7/18/2010

पुणं आणि मी

पुणं. नाव घेतलं की एकदम भरीव काहीतरी म्हटल्यासारखं वाटतं. दोन अक्षरांचा शब्द, पण त्यात जो भरीवपणा मला जाणवतो तो, तिथल्या माझ्या जन्मामुळे की माझ्या आजोळामुळे की त्या स्थानाच्या एकूणच महात्म्यामुळे हे मला कळत नाही.

पुणं प्रसिद्ध झालं, ते पेशव्यांमुळे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशव्यांनी पुण्याला राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. पुण्याची सांस्कृतिक जडणघडण व्हायला हे एक महत्वाचं कारण होतं. पुण्यात ज्ञानदानाचीही जुनीच परंपरा आहे. म्हणूनच पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात. पुण्यात अनेक मोठे वाडे आहेत. पर्वती, सिंहगड ह्यांनी पुण्याची शान वाढवलीय. च्यायला, मी काय विकिपीडिया एंट्री लिहितोय का! येतो नॉर्मलला.

पुणं म्हटलं, की पुणं तिथं काय उणं हे वाक्य मला पहिलं आठवत नाही! कारण, पुणं माझं आजोळ आहे (हे मी मगाशीच म्हणालो). त्यामुळे असली बाष्कळ वाक्य मला आवडत नाहीत उगाच; निबंधांमध्ये लिहायला वगैरे ठीक आहे. पुण्याची स्पेशालिटी म्हणजे पु.ल. म्हणतात त्याच्यागत 'जाज्वल्य अभिमान', मग तो कुठल्याही गोष्टीचा असो. मला आमच्या आजोबांच्या सदाशिव पेठेमध्ये एकेकाळी असलेल्या एका वाड्यातल्या (भाड्याच्या) दोन खोल्यांचा बरोबर खाली असलेल्या नवरत्न भेळेचा 'जाज्वल्य अभिमान' आहे. का नसावा, आमची मर्जी. अहो लोकांना त्यांच्या वाडीच्या कॉर्नरला असलेल्या उघड्या गटाराचाही जाज्वल्य अभिमान असतो. तसा टेक्निकली मी पुण्याचा नाही. पण माझा जन्म आणि लहानपणच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीतले काही दिवस पुण्यातलेच. त्यामुळे जन्मल्या जन्मल्या जे पाणी लागलंय पुण्याचं ते उतरत नाही. आयुष्य मुंबईत गेलं, त्यामुळे कुठल्याही स्थानाबद्दल प्रेम दाखवण्यासाठी त्या स्थानाला शिव्या घालण्याचा गुणही आपोआप बाणवला. त्यामुळे सहसा कोणी पुण्याला 'एक भिकार' म्हटलं, तर मी 'दहा भिकार' म्हणून मोकळा होतो. कदाचित मुंबईकरांचा 'इफ यू कान्ट बी फेमस, बी इन्फेमस' हा फंडा असावा. कारण, मी नेहमी पाहतो. मुंबई विरुद्ध दुसरं शहर असल्या विवादांमध्ये सहसा मुंबईकर पडत नाहीत. आणि पडलेच तर ते मुंबई कशी भिकार आहे हेच वर्णन करून समोरच्याच्या आर्ग्युमेंट मधली हवा काढून घेतात. असो, विषयांतर होतंय.

तर पुणेकरांना कशाचा ना कशाचा जाज्वल्य अभिमान असतो. आता ही बाब अगदी हल्लीची पिढीही इमानेइतबारे पाळतेय, हे मला माझ्या ह्यावेळच्या पुणे ट्रीपमध्ये दिसलं, आणि भरून आलं. 'दुर्गा कॅफे' बद्दल मी ह्यापूर्वीच उल्लेख केलाय, त्याशिवाय जर्मन बेकरी पासून स्वाद अमृततुल्य पर्यंत 'जाज्वल्य अभिमान' देखील चक्क युवापिढीला असलेले पाहिले. वैशाली, रुपाली आणि वाडेश्वर ह्या हॉटेलात जाणारे कधीही 'आपलं नेहमीचं' हॉटेल सोडून दुसर्‍या हॉटेलात पाय ठेवत नाहीत. पुणं बदललं नाहीय हे जाणवलं.

पुन्हा पुण्याची दुसरी खासीयत म्हणजे वादविवादाची विलक्षण हातोटी. हा गुण माझ्यातही आहे, पण ती पुण्याची देणगी आहे हे मला पु.लं.नी सांगितल्यावर कळलं. उदाहरण देतो, मी आणि माझा माझ्याच वयाचा भाचा दोघेजण गप्पा मारत होतो. तो फुटबॉलचा फॅन आहे. खरं सांगायचं म्हणजे त्याला जेन्युईनली फुटबॉलमधलं बरंच कळतं. आमचं ज्ञान म्हणजे इथून तिथून ऐकलेलं. पण जेव्हा तो म्हणाला की मी चेल्सीचा फॅन आहे, झालं मी लगेच चेल्सीचा विरोधक झालो. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली, की मी आपण अजूनही इंग्रजांचे मानसिक गुलाम कसे आहोत, ज्यामुळे आपण आंग्ल फुटबॉल टीम्सना सपोर्ट करतो, देशी खेळांची आपल्याला पर्वाच नाही, हॉकीला वाली नाही इथपर पोहोचलो. मग मला स्वतःलाच जाणवलं आणि मी आवरलं. माझा भाचा शॉकमध्ये किती वेळ होता माहित नाही. पण अर्थात तो पुणेकर असल्याने त्यालाही चेल्सीचा 'जाज्वल्य अभिमान' आहे, तो माझ्यासारख्या अर्धपुणेकरामुळे सोडायचा नाही. बाकी, मी स्वतः आर्सेनल ह्या दुसर्‍या आंग्ल फुटबॉल टीमचा पार्टटाईम समर्थक(इथे 'जा.अ.' अभिप्रेत आहे) आहे, पण वादाच्यावेळी वाद, तेव्हा असले आत्मघातकी मुद्दे पुढे आणायचे नसतात. एरव्हीही मी क्रिकेटपेक्षा फुटबॉल कसं चांगलं आहे आणि रग्बीपेक्षा कबड्डीत कसा जास्त कस लागतो वगैरे फुटकळ वाद घालतो, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

पुण्याची महत्वाची खासीयत म्हणजे तिरकस बोलणे. आणि हे तिरकस म्हणजे बुद्दिबळातल्या उंटाहूनही तिरकस. अगदी समोरचा लाजेने पाणीपाणी होईस्तो. पुन्हा शब्दनिवड इतकी अचूक की किमान शब्दांत कमाल अपमान. म्हणजे आता बघा, एखादा पुणेकर कुणाच्या घरी गेला आणि समोरच्याने चहा-पाणी वगैरे केलं, की ह्यांची एक कॉमेंट, "तुमच्यात कुणाला डायबिटीस आहे वाटतं." आता काही गरज ह्या वाक्याची! सगळं यथास्थित झालंय, तरी. हा गुण त्या पवित्र पुणेरी पाण्यातून माझ्यातही उतरलाय, हे मला कधीकधी जाणवतं. एकदा आम्ही कॉलेजातले मित्र बर्‍याच दिवसांनी भेटत होतो, सगळॅ नोकर्‍या करत होते. भेटलो आणि पाहिलं तर एका मित्रानं केस बरेच वाढवले होते. प्रतिक्षिप्त क्रियेगत माझ्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले, "चला रे आपण वीस रुपये कॉन्ट्रिब्यूट करू!" बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि त्या पाण्याच्या ताकदीची खात्री पटली.

तुसडेपणामध्येसुद्धा पुणेरी लोकांचा हात धरणं अशक्य. त्यात पण पुणेरी दुकानदार असेल तर दुधात साखर. समोरच्याचा पाणउतारा करायचाय, तर पुणेकर दुकानदार हवा. ह्यांच्या दुकानात सर्वांत दुर्लक्ष करण्याजोगी वस्तू म्हणजे गिर्‍हाईक हे पु.लं. नी सांगून ठेवलंय.

"ओ भाऊ, जरा शर्टपीस दाखवता का?"एक गिर्‍हाईक.

दुकानदार वरपासून खालपर्यंत न्याहाळेल गिर्‍हाईकाला आणि म्हणेल, "तुमचं बजेट काय आहे सांगा, फार महाग आणि फार स्वस्त माल आम्ही ठेवत नाही."

आता मला सांगा, एखादी वस्तू आमच्याकडे नाही, हे सांगायला अभिमान कोणाला वाटेल, पण पुणेकर दुकानदारांना नक्की वाटतो.

अहो अगदी आजही जगप्रसिद्ध मिसळवाल्यांकडे जा, जर दुकानात मिसळ असेल, तर ते तुम्हाला उपकार केल्यागत वाढतील आणि नसेल तर विजयी मुद्रेने, "आजचा माल संपला आता उद्या" हे सांगतील.

'आमची कोठेही शाखा नाही' ही पुणेकरांच्या जाज्वल्य अभिमानाची आणखी एक ओळख. भैये तर अगदी केळ्यांच्या गाड्यासुद्धा शाखा असल्यागत प्रत्येक कोपर्‍यावर लावतात. आणि सहकाराने धंदा करतात. पण पुणेकरांना शाखा असण्यापेक्षा नसण्याचाच अभिमान जास्त. अगदी आजच्या तरूण पिढीचा हॅपनिंग स्पॉट 'दुर्गा कॅफे'वरही मी 'आमची कोठेही शाखा नाही' हे वाक्य वाचलं आणि मला गहिवरून आलं. पुण्याच्या पाण्याचा महिमा पटला.

पुण्यातल्या दुचाक्या हे एक अजब प्रकरण आहे. आपला सिग्नल हिरवा झाला की नाही, ह्यापेक्षा अलिकडच्यांचा सिग्नल पिवळा झाला का, हे पाहून गाडी चालवणारे बहुधा फक्त पुण्यातच सापडतील. सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग ही टेम्पररी पार्किंग असल्याच्या थाटात फक्त पुणेकरच उभे राहू शकतात. मला तर कधी भीती वाटते, की झेब्रा क्रॉसिंगवर चालल्याबद्दल एखाद्या पादचार्‍यालाच फाईन पडेल. सिग्नलला ट्रॅफिक कंट्रोल करण्याऐवजी, सिग्नलपुढे एका झाडामागे लपून उभे फक्त पुण्याचे ट्रॅफिक पोलिसच राहू शकतात(अर्थात हल्ली हा रोग मुंबईतही वेगाने पसरतोय). आणि दिवसांत किती जास्त गिर्‍हाईकं नाकारली त्यावरच पुण्याचे रिक्षावाले आपली कमाई मोजत असावेत. सगळ्यात स्पेशल म्हणजे दुचाकीस्वार. बाकी, दुचाकीला 'गाडी' म्हणण्याचं औद्धत्य फक्त पुणेकरच करू जाणोत. रस्ता हा आपल्या तीर्थरुपाचा असल्यागत कुठेही न पाहता चालवणे आणि मोटो जीपी मधल्यागत तिरकी करून 'गाडी' वळवणे हे फक्त पुणेकरच करू जाणोत. मजकडे अजूनही लायसन्स नसल्याने आणि मी मुंबईच्या वाहतुकीत लहानाचा मोठा झाल्याने मी ह्या बाबतीत अजून पुणेकर नाही, हा उर्वरित अर्धा भाग असावा.

बाकी एक गोष्ट मात्र मी मान्य करतो की कितीही तिरकस आणि कितीही तुसडे असले, तरी एक पुणेकर दुसर्‍या पुणेकराबद्दल आकस ठेवत नाहीत. भले ते नियमांचा मान राखणार नाहीत पण पुणेकरांचा मान राखतात. मी माझ्या भाच्याच्या 'गाडी'वर मागे बसलो होतो. तो पुणेरी बेफिकीरीने गाडी चालवत होता. एका वळणाला समोरून दुसरा पुणेरी 'गाडी'स्वार आला. आणि अपेक्षेप्रमाणेच दोघेही एकमेकांना ठोकता ठोकता राहिले. मी काळजीत पडलो, म्हटलं झालं आता. भांडण होणार. पण फक्त एक छोटीशी नेत्रपल्लवी झाली आणि दोघंही आपापल्या मार्गाने निघाले. दोघांपैकी एक जरी पुणेकर नसता तरी भांडण संभवत होतं. मला वाटतं, आधी 'गाडी' घालण्यावरूनच त्यांना एकमेकांच्या पुणेकर असण्याची खात्री पटली असावी. कारण, एवढ्या उद्दामपणे चुकीच्या बाजूने गाडी फक्त पुणेकरच दामटवू शकतो. पुणेकरांची आपापसातली आपुलकी पाहून मला आनंद वाटला.

पुणेरी तिरकसपणा आणि पुणेरी दुचाकी ह्यांच्यावरचा एक छान विनोद नुकताच वाचनात आला(बाकी पुणेकरांच्या नावावर जेव्हढ्या दंतकथा आणि जेव्हढे विनोद खपतात तेव्हढे अमेरिकन रेडनेक्स आणि सरदारजींवरही निघत नसतील. पण ह्या गोष्टीचाही कुणाला जाज्वल्य अभिमान असू शकतो. उदाहरणार्थ, पुण्याच्या IPL टीमची खिल्ली पुणेकरांनीच जास्त उडवली. असो.) -

एकदा कर्वे रस्त्यावरून एक दुचाकीस्वार वायुवेगाने गाडी चालवत जात असतो. तेव्हा पदपथावरून चालणारे एक पेन्शनर जोरात ओरडतात,

"ओ कर्वे, कुठे निघालात?"

तो तरूण एकदम गाडी थांबवतो आणि म्हणतो, "मी कर्वे नाही."

"मग तीर्थरूपांचा रस्ता असल्यागत गाडी कशाला दामटताय?"

6/21/2010

ब्लॉगवाले आणि शेंह्गड!

टीप : नोंद लिहिताना मी उपस्थितांच्या नावांचे स्वैर उल्लेख केलेत, त्यामुळे सुरूवातीलाच उपस्थितांची यादी लिहितो, जेणेकरून वाचताना प्रश्न पडणार नाहीत.

१. सुरेश पेठे उर्फ पेठेकाका. २. अनुजाताई. ३.(तन्वीताई+अमित+ ईशान+गौरी) देवडे. ४. सुहास झेले. ५.सचिन उथळे-पाटील ६. देवेंद्र चुरी. ७.भारत मुंबईकर. ८.आनंद(पत्रे+काळे). ९.अभिजीत वैद्य. १०.अस्मादिक.(कोणी राहिलं नाहीये ना? हा प्रश्न मला नेहमी छळतो आणि कोणी खरंच राहिलं असेल तर तो नंतर छळतो.)

८ मे चा ब्लॉगर्स मेळावा थोडक्यात हुकल्याची जी रुखरुख लागली होती, ती थोडीफार कमी होईल अश्या धनविचाराने प्रेरित होऊन मी ऋणभारित विद्युतकणाने धनभारित कणाच्या दिशेने ओढले जावे तश्यागत पुण्याकडे निघालो होतो. मागचं वाक्य उगाच जडबंबाळ केलंय हे मलाही माहितीय, तुम्हालाही माहितीय पण त्याचं स्पष्टीकरण वाक्यातच मिळेल नीट वाचा (अजून नाही कळलं? बरं सांगतो, मी पुण्याला जाऊन आलोय. बाकी, हे माझी टीप वाचूनही चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आलं असेल.).

पहाटेची वेळ होती. उठायचा अशक्य कंटाळा आला होता. बर्‍याच वर्षांत एकट्याने एसटीने प्रवास केला नव्हता, त्यामुळे थोडं दडपण आलं होतं. बाकी एकट्यानेचा भाग वगळला, तरी एसटीनेही बर्‍याच दिवसांत प्रवास केलेला नव्हता हेही कारण पुरेसं होतं. हळूहळू आवरून कसाबसा तयार होईस्तोवर ७ वाजले. बाबा म्हणाले स्टॅंडला सोडायला येतो. खाली उतरून पाहिलं तर गाडीचं टाय पंक्चर('पंचर' हा शब्द अगदी बोटांवर आला होता). मग रिक्षा धरून स्टॅन्ड गाठला. एक गाडी बारामती व्हाया स्वारगेट होती, आणि दुसरी स्वारगेट. बारामतीची ७.४५ आणि स्वारगेट ७.३०. स्वारगेट निम-आराम पकडली एकदाची. सुटकेचा निःश्वास टाकला. कंडक्टरने तिकिट फाडलं(अक्षरशः फाडलं हो! दोन तुकडे हातात दिले. मला क्षणभर सिनेमाला आलोय की काय असं वाटून गेलं. माझा शहाणपणा इथेच थांबवतो.). मग निवांत झालो. सकाळपासून काय शुभशकुनी सुरूवात झाली असं म्हटलं आणि टाकली मान. मग गाडी एक्स्प्रेसवेवर ट्रॅफिकात अडकली. पुढे शेवटी एकदाची धूर ओकायला लागली आणि बंद पडली. सकाळपासून चाललेले शुभशकुन पाहून गलबलून आलं. शांतपणे रस्त्यावर उतरलो. का कुणास ठाऊक माझा मूड फार म्हणजे फारच चांगला होता(हे सार्कॅस्टिक नाहीय). मला राग-तगमग असलं काहीही वाटत नव्हतं. कदाचित ज्यासाठी चाललो होतो ते असावं किंवा झकास वातावरणाचा परिणाम असावा. मग मागून येणार्‍या दुसर्‍या निम आरामेत चढलो. चढण्याच्या आधी नाव वाचलं होतं, त्यामुळे स्टॅंडिंग होतो तरी एकदा आढ्याकडे पाहिलं, मग लक्षात आलं बसला आढं नसतं. दैवाची गहन गती, ती गाडी तीच बारामतीची(काकांची) गाडी होती, जी सोडण्याची मी गुस्ताख़ी केली होती. असो.

मग एकदाचा १ वाजता बहिणीच्या घरी पोचलो. जेवलो आणि ताणून दिली. पहाटेचा बॅकलॉग होता. ती संध्याकाळ नातेवाईकांना भेटण्यात व्यतीत केली. सगळ्या ब्लॉगरमित्रांना फोनाफोनी करून दुसर्‍या दिवशीचा प्लॅन ठरला का? ठरवायचा का? असले निरर्थक प्रश्न विचारले. कुणी पिंपळे, कुणी वाकड, कुणी कोरेगाव पार्क, कोणी मयूर कॉलनी तर कुणी एरंडवणे(मी) असे सगळे जण पुण्यावर ताबा मिळवण्यासाठी आल्यागत शहराच्या वेगवेगळ्या भागात होतो. रात्री १० पर्यंत ही परिस्थिती स्टेलमेटमध्येच कायम होती. मग शेवटी एकदाचा मी ओंकार भारद्वाजला भेटलो. म्हटलं चला कमीतकमी एकाला तरी भेटलो. ओंकार अनिश सानेबरोबर मयूर कॉलनीतल्या 'दुर्गा कॅफे' मध्ये भेटला. आता हे 'दुर्गा कॅफे' काय प्रकरण आहे, ते अस्सल पुणेकरांना (त्यातही तरूणांना) विचारा. त्याची कशी एकही शाखा नाही, त्याचा कॉफी बनवणारा कसा पळून गेला, त्याने पेटंट न घेतल्याने भलत्याच लोकांनी कशी चेन सुरू केली, मग ओरिजिनल(कोठेही शाखा नाही) आणि चेन वाल्याच्या पाटीच्या रंगात कसा फरक आहे वगैरे सुरस, चमत्कारिक फॅक्ट्स ऐकायला मिळतील. एकंदर 'दुर्गा कॅफे' हे प्रकरण 'लेजेन्ड' किंवा 'कल्ट' ह्या सदरात मोडतं असा विचार करत मी सदर्‍याचं एक बटन उघडलं आणि एक हॉट कॉफी मागवली. मस्त वातावरण होतं, आजूबाजूला कॉलेज आणि आयटीवाले तरूण-तरूणी होते. अश्या वेळीच गप्पांना बहर येतो. धमाल गप्पा झाल्या. ओंकार महिनाभरात यूएसला चाललाय त्यामुळे भेट झाल्याने खूपच छान वाटलं. मग साडेअकराच्या सुमाराला घरी पोचलो. रात्री १२ वाजता मी झोपायला निघालो होतो तेव्हा सुहासचा फोन आला. म्हणाला, आम्ही पुणं भटकतोय. मला वाटलं मंडळी एन्जॉय करतायत. पण दुसर्‍या दिवशी कळलं, की पुण्यानेच मंडळींना एन्जॉय केलं होतं. तपशीलवार वर्णन सुहासच्या ब्लॉगवर येईलच.

मग दुसर्‍या दिवशी सकाळचा प्लॅन ठरला. सगळ्या जमलेल्या ब्लॉगरांनी शनिवारवाड्याजवळ भेटायचं आणि तिथून सिंहगड पायथ्याला जायचं. मग वर जायचं(गडावर) की फार्मवर बसून गप्पा टाकायच्या हे तिथेच ठरवू असा 'प्लॅन ठरला'. किमान एव्हढी प्रगती झाली. मग मी ओंकारला फोन केला, दुर्दैवाने तो थोडा आजारी असल्याकारणे त्याचं येणं रद्द झालं. मग मी अभिजीत वैद्यला('आवरा' फेम) फोन केला. त्याने होकार दिला. अर्धं काम झालं असं मला वाटलं. मला पोहोचायला थोडा उशीर झाला(इतरांनाही झाला तसा, पण सहसा मोठ्या मनाची माणसे स्वतःवर आळ घेतात, मी लहानपणीही लपाछपीत नेहमीच स्वतःवर राज्य घ्यायचो). त्यामुळे ९.५० ची बस सुटली. पुढची १०.५० ची. म्हणून मग शनिवारवाड्यावर जायचे ठरले. त्यावेळीच मला कळलं की तन्वीताई पण पुण्यात आलीय. मी तिला नाशिकला येईन असं आश्वासन देऊन मुरब्बी नेत्याप्रमाणे मोडलं होतं(परिस्थिती हो, मी तसा वाईट नाही), त्यामुळे तिची आयतीच भेट होणार तिही सहपरिवार म्हटल्यावर मी आनंदलो(दोन आनंद बरोबर असल्याने आनंद द्विगुणित झाला). मी कित्येक वर्षांनी शनिवारवाड्यात शिरलो. उगाच नारायणरावांचं टेन्शन येत होतं. ते मलाच गारदी समजणार नाहीत ना असा विचार करत दाढी कुरवाळत होतो. मग आनंद काळे आणि अन्य काही मंडळींनी फोटो काढायला सुरूवात केली. आम्ही उगाच पेशवे असल्यागत सगळ्यांवर नजर ठेवून हिंडत होतो(इथे 'आम्ही' हा 'शनिवारवाडा इफेक्ट' आहे).

मग एकदाची बस आली आणि आम्ही सगळे बशीत(बसमध्येला 'त'कारान्त असंच करावं लागेल, बशीमध्येचंही असंच होईल..म्हणून लवकरात लवकर 'बस' ह्या आंग्ल शब्दाला पर्यायी मराठी शब्द शोधावा लागेल, नाहीतर चहाला राग येईल. अति पाणचटपणा{इथे 'इति पाणचटपणा' म्हटलं असतं तरी चाललं असतं}.) बसलो एकदाचे. मग तन्वीताईचा फोन आला. ती म्हणाली आम्ही पंधरा मिनिटांत पोचतोय पायथ्याला. मी म्हटलं आम्ही अर्ध्या तासात, इथे मी अर्धा तास जाणून बुजून कमी सांगितला उगाच कशाला सकाळी सकाळी खरं बोला. मग अभिजीत वैद्यला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. त्याने बिचार्‍याने त्याचा लोणावळ्याचा प्लॅन रद्द केला होता आणि ऑलरेडी सकाळ वाया गेलेली होती. त्याने मला विचारलं, की गाडी आणू की बसने येऊ? मी म्हटलं बसला गर्दी आहे, गाडी आण(माझ्या ह्या प्रसंगावधानाचा मला पुढे फार फायदा झाला). मग मी थोडा शांत झालो. मग बसमध्ये पेठे काका आणि अनुजाताई बसल्यावर आम्हा बाकी मंडळींमध्ये खेचाखेची सुरू झाली. शेवटून दुसर्‍या स्टॉपला बसमध्ये जीपवाले चढले आणि ओरडायला लागले, "चला शेंह्गड शेंह्गड, जीपनं शेंह्गड!" आम्ही सगळे त्या टिपिकल उच्चाराचे एव्हढे फॅन झालो की ह्यापुढे मी शेंह्गडच लिहिणार आहे. मजल दरमजल करत आम्ही एकदाचे पोचलो. मग पोचल्यावर खल सुरू झाला. पुढे काय? प्लॅन इथपर्यंतचाच होता. पुढचं प्लॅनिंग पायथ्याशीच करायचं असाच आमचा प्लॅन होता.

मग तन्वीताई सहपरिवार आली. ईशान आणि गौरीला प्रत्यक्ष बघण्यासाठी केव्हाचा उत्सुक होतो, ऑफकोर्स तन्वीताई आणि अमितलाही. गौरीला बघून तर मला माझ्या अजून एका भाचीची आठवण होते. बाई मूडमध्ये नव्हत्या. पण भाचा फुल फॉर्मात होता. मग पुन्हा एकदा 'मोमेंट ऑफ ट्रुथ' आली. शनिवारवाडा बस स्टॅंडवर बस सुटल्याने प्लॅन बदलला, इथे शेंह्गड पायथ्याशी आनंद काळे सुटल्याने प्लॅन बदलला.

त्याचं झालं असं. आम्हा सगळ्या आळशी मंडळींना गडावर चढून जायचा कंटाळा आला होता. आम्हा चार जणांना(मी, सुहास, सचिन आणि देवेंद्र) मुंबईला जायची घाई होती, कारण संध्याकाळी चार-पाचची बस पकडायची होती. त्यात देवेंद्रला तर बोईसर(गुजरात बॉर्डर) पर्यंत जायचं होतं(पुढे हा कळीचा मुद्दा झाला). म्हणून फार्मवरच बसून गप्पा टाकायचं ठरलं. पण आका(आनंद काळे) पेटला. 'मला आर्टिफिशियल आवडत नाही' अशी शेंह्गडाला शोभेलशी शेंह्गर्जना त्याने केली आणि सगळ्यांचाच आळस झटकला. मुंबईवाल्यांना त्याने 'देवेंद्रला तर बोईसर पर्यंत जायचंय, तो काही बोलत नाही तर तुम्ही का?' असं म्हणून गप्प केलं, कारण देवेंद्र खरंच गप्प होता. मग मांडवली झाली, मिळेल त्या वाहनाने गडावर जायचं ठरलं. आकाची स्वारी खुश आणि त्यामुळे आम्ही खुश, शेवटी मित्र आहोत त्याचे. पण बरंच झालं, आकामुळे शेंह्गड झाला. हे सगळेच मान्य करतील.

अभिजीत गाडी घेऊन येणार, हे विधान मिसलिडिंग आहे. पण तो पुणेकर आहे त्यामुळे ती बाईकच असणार हे माझ्या चाणाक्ष पुणेप्रेमी बुद्धीने ओळखलं होतं. आणि त्याची बाईक येताच मी हक्काने त्याच्या मागे बसलो. ते थेट शेंह्गडावर जाऊन उतरलो. आता आम्ही दोघे रविवारच्या गर्दीत हळूवार भुरभुरत्या पावसात बाकीच्यांची वाट पाहत होतो. पंधरा मिनिटांनी तन्वीताईच्या गाडीने देवडे परिवार, अनुजाताई आणि पेठेकाका पोचले. तेव्हढ्यातच त्यांच्या गाडीची क्लचप्लेट त्रास देऊ लागली होती. दिवस भलताच इव्हेंटफुल होत होता(हे पोस्टही भलतंच लांबत चाललंय).

मग आम्ही द्रोह केला आणि बाकीच्यांची वाट न पाहताच खादाडीप्रारंभ केला. कांदाभजी, मटका दही आणि ताक असा अल्पोपहार सुरू केला. तेव्हढ्यात बाकी मंडळी पोहोचली आणि मैफल रंगतदार होऊ लागली. मग गडावर फिरण्यास निघालो. जेवणं नंतरच करावी असं ठरलं. (पण ते 'नंतर' कधी आलं नाही त्यामुळे निषेधांपेक्षा खसखसच जास्त पिकेल. ) मग मस्त भटकंती सुरू झाली. फोटो काढणे, गप्पा-विनोद, मुक्त आणि चालता फिरता मेळावा झाला. तन्वीताईच्या भाषेत, 'निम-पावसाळी ब्लॉगर्स ट्रेक' झाला. तपशीलात शिरलो तर मजा जाईल. पण एकंदरच खूप मजेशीर तास-दीड तास गेला. वातावरण एकदम आल्हाददायक होतं. मधेच हलका पाऊस, धुकं, ढग. एकदम मस्त. मग 'आम्हा मुंबईकरांना' परतीची वाट खुणावू लागली. पुन्हा आम्ही 'देवेंद्रला दूरपर्यंत जायचंय' हा इलेक्शनचा मुद्दा काढला. एक बरं होतं, देवेंद्र दोन्ही वेळेस काही बोलत नव्हता, त्यामुळे मुद्दा वापरणारे आम्ही मुरब्बी की दोन्ही वेळेस मौन पाळणारा तो, हे कोडंच आहे.

मग आम्ही सगळ्यांना घाई करत करत पुन्हा वाहनतळापाशी घेऊन आलो. दुपारचे अडीच वाजून गेले होते. गर्दी फार होती. परतीला बराच उशीर झाला असता. पण आकाचा पत्ता नव्हता. तो वेगळ्या रस्त्याने येतो सांगून धुक्यात हरवला होता. नंतर कळलं की तो ४० मिनिटे गायब होता आणि धुक्यात असल्याचा फायदा घेऊन, एकटाच मलाई कुल्फी खाऊन आला. बाकी सगळे मुंबईकर थेट स्वारगेटला पोचणार होते, पण माझं सामान बहिणीकडे होतं त्यामुळे मला जाणं भाग होतं. मी अभिजीतबरोबर निघालो. आम्ही गेल्यावर सगळ्यांनी कैरी, शेंगा असली खादाडी केली.

अभिजीतनं मला घरपोच सोडलं आणि टेन्शन मिटवलं. मग मी थोडा जेवलो आणि तयार झालो, पण बाकी मंडळींचा पत्ता नाही. ते सगळे ६ वाजता स्वारगेटला पोचतो म्हणून ६.४५ ला पोचले. आनंद पत्रे, सचिन आणि भारत खास आम्हाला सोडायला स्टॅंडपर्यंत आले. मला भरून आलं होतं, पण 'इट गोज अगेन्स्ट द इमेज'. आका ठाण्याच्या गाडीत बसला व मी, सुहास आणि देवेंद्र बोरिवलीच्या गाडीत बसलो. आनंद पत्रे, सचिन आणि भारतशी शेकहॅन्ड केला आणि बस निघाली. पुन्हा एकदा अख्खा दिवस मनातल्या मनात जगलो.

बसमध्ये देवेंद्रला त्याचा एका मित्राचा फोन आला. त्यानं त्याला विचारलं, 'पुण्याला कशाला गेलायस?' त्यावर देवेंद्रनं उत्तर दिलं, 'मित्रांना भेटायला.' समोरच्यानं विचारलं, 'कुठले मित्र?'. हा म्हणाला, 'ब्लॉगवरचे मित्र'. समोरचा, 'काय?'. अगदी हीच सिच्युएशन मीच काय सगळ्यांनीच फेस केली असेल. गंमत वाटली. मनात उजळणी केली. आम्ही सगळेच कधीच एकमेकांना न भेटलेले, फारतर ४-५ जण आधी भेटलेले असतील एखादवेळेला. पण एकत्र आल्यावर कुठेच कसलीच औपचारिकता जाणवली नाही. सगळेच एकमेकांशी फार पूर्वीची ओळख असल्यासारखे मोकळेढाकळे होतो. अगदी मोठं कुटुंब असल्यागत, काका होते, ताया होत्या, भाचा-भाची होते, त्यांचे खूप सारे मामा होते. किती लिहू आणि किती नाही.

मी ११.४५ला, सुहास १२.४५च्या आसपास आणि देवेंद्र पार २.३० वाजता घरी पोचला. एक अविस्मरणीय अनुभव संपला होता.

तीन गोष्टींची मात्र रुखरुख लागलीय. सगळ्यांशी निवांत दिवसभर गप्पा मारायला झालं नाही, गौरी-ईशानचे लाड करता आले नाहीत नीट आणि आंद्या तुला कडकडून मिठी मारायची होती रे, बस सुटताना जाणवलं. असो. पेंडिंग ठेवू काहीतरी तरच पुढच्या भेटीसाठी धनविचाराने प्रेरित होऊन मी ऋणभारित विद्युतकणाने धनभारित कणाच्या दिशेने ओढले जावे तश्यागत पुन्हा कुठेतरी येईन.

ता.क.(इथे सहभागी लोकांना गडावरचं ताक आठवणं स्वाभाविक आहे) - सगळ्यांना आज दुपारीच पोस्ट टाकेन असं आश्वासन देऊन मी आत्ता तांत्रिकदृष्ट्या उद्या पोस्ट टाकतोय. माझ्यात नेता होण्याची क्षमता दिसतेय. आणि फोटो टाकणार होतो, पण तन्वीताई आणि बाकीच्यांनी फोटो पाठवले नाहीत अजून. पैकी तन्वीताईने फोटो दुपारपर्यंत पाठवण्याचं आश्वासन न पाळून त्याबाबतीतही माझी मोठी बहीण असल्याचं दाखवून दिलंय. जसे फोटो मिळतील. इथे लिंक देईन. पेठेकाकांच्या कल्पनेमुळे आणि पुढे अनुजाताईच्या पुढाकाराने सगळ जमून आलं, तन्वीताई आणि अमित अगदी गाडी घेऊन नाशकापासून आले आणि बाकी सर्वांचंच ही भेट यशस्वी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आभार. इति लेखनसीमा (इथे 'अति लेखनसीमा' सुद्धा चालेल.)

फोटोंचा दुवा (सौजन्य : सुहास झेले)