टीप : नोंद लिहिताना मी उपस्थितांच्या नावांचे स्वैर उल्लेख केलेत, त्यामुळे सुरूवातीलाच उपस्थितांची यादी लिहितो, जेणेकरून वाचताना प्रश्न पडणार नाहीत.
१. सुरेश पेठे उर्फ पेठेकाका. २. अनुजाताई. ३.(तन्वीताई+अमित+ ईशान+गौरी) देवडे. ४. सुहास झेले. ५.सचिन उथळे-पाटील ६. देवेंद्र चुरी. ७.भारत मुंबईकर. ८.आनंद(पत्रे+काळे). ९.अभिजीत वैद्य. १०.अस्मादिक.(कोणी राहिलं नाहीये ना? हा प्रश्न मला नेहमी छळतो आणि कोणी खरंच राहिलं असेल तर तो नंतर छळतो.)
८ मे चा ब्लॉगर्स मेळावा थोडक्यात हुकल्याची जी रुखरुख लागली होती, ती थोडीफार कमी होईल अश्या धनविचाराने प्रेरित होऊन मी ऋणभारित विद्युतकणाने धनभारित कणाच्या दिशेने ओढले जावे तश्यागत पुण्याकडे निघालो होतो. मागचं वाक्य उगाच जडबंबाळ केलंय हे मलाही माहितीय, तुम्हालाही माहितीय पण त्याचं स्पष्टीकरण वाक्यातच मिळेल नीट वाचा (अजून नाही कळलं? बरं सांगतो, मी पुण्याला जाऊन आलोय. बाकी, हे माझी टीप वाचूनही चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आलं असेल.).
पहाटेची वेळ होती. उठायचा अशक्य कंटाळा आला होता. बर्याच वर्षांत एकट्याने एसटीने प्रवास केला नव्हता, त्यामुळे थोडं दडपण आलं होतं. बाकी एकट्यानेचा भाग वगळला, तरी एसटीनेही बर्याच दिवसांत प्रवास केलेला नव्हता हेही कारण पुरेसं होतं. हळूहळू आवरून कसाबसा तयार होईस्तोवर ७ वाजले. बाबा म्हणाले स्टॅंडला सोडायला येतो. खाली उतरून पाहिलं तर गाडीचं टाय पंक्चर('पंचर' हा शब्द अगदी बोटांवर आला होता). मग रिक्षा धरून स्टॅन्ड गाठला. एक गाडी बारामती व्हाया स्वारगेट होती, आणि दुसरी स्वारगेट. बारामतीची ७.४५ आणि स्वारगेट ७.३०. स्वारगेट निम-आराम पकडली एकदाची. सुटकेचा निःश्वास टाकला. कंडक्टरने तिकिट फाडलं(अक्षरशः फाडलं हो! दोन तुकडे हातात दिले. मला क्षणभर सिनेमाला आलोय की काय असं वाटून गेलं. माझा शहाणपणा इथेच थांबवतो.). मग निवांत झालो. सकाळपासून काय शुभशकुनी सुरूवात झाली असं म्हटलं आणि टाकली मान. मग गाडी एक्स्प्रेसवेवर ट्रॅफिकात अडकली. पुढे शेवटी एकदाची धूर ओकायला लागली आणि बंद पडली. सकाळपासून चाललेले शुभशकुन पाहून गलबलून आलं. शांतपणे रस्त्यावर उतरलो. का कुणास ठाऊक माझा मूड फार म्हणजे फारच चांगला होता(हे सार्कॅस्टिक नाहीय). मला राग-तगमग असलं काहीही वाटत नव्हतं. कदाचित ज्यासाठी चाललो होतो ते असावं किंवा झकास वातावरणाचा परिणाम असावा. मग मागून येणार्या दुसर्या निम आरामेत चढलो. चढण्याच्या आधी नाव वाचलं होतं, त्यामुळे स्टॅंडिंग होतो तरी एकदा आढ्याकडे पाहिलं, मग लक्षात आलं बसला आढं नसतं. दैवाची गहन गती, ती गाडी तीच बारामतीची(काकांची) गाडी होती, जी सोडण्याची मी गुस्ताख़ी केली होती. असो.
मग एकदाचा १ वाजता बहिणीच्या घरी पोचलो. जेवलो आणि ताणून दिली. पहाटेचा बॅकलॉग होता. ती संध्याकाळ नातेवाईकांना भेटण्यात व्यतीत केली. सगळ्या ब्लॉगरमित्रांना फोनाफोनी करून दुसर्या दिवशीचा प्लॅन ठरला का? ठरवायचा का? असले निरर्थक प्रश्न विचारले. कुणी पिंपळे, कुणी वाकड, कुणी कोरेगाव पार्क, कोणी मयूर कॉलनी तर कुणी एरंडवणे(मी) असे सगळे जण पुण्यावर ताबा मिळवण्यासाठी आल्यागत शहराच्या वेगवेगळ्या भागात होतो. रात्री १० पर्यंत ही परिस्थिती स्टेलमेटमध्येच कायम होती. मग शेवटी एकदाचा मी ओंकार भारद्वाजला भेटलो. म्हटलं चला कमीतकमी एकाला तरी भेटलो. ओंकार अनिश सानेबरोबर मयूर कॉलनीतल्या 'दुर्गा कॅफे' मध्ये भेटला. आता हे 'दुर्गा कॅफे' काय प्रकरण आहे, ते अस्सल पुणेकरांना (त्यातही तरूणांना) विचारा. त्याची कशी एकही शाखा नाही, त्याचा कॉफी बनवणारा कसा पळून गेला, त्याने पेटंट न घेतल्याने भलत्याच लोकांनी कशी चेन सुरू केली, मग ओरिजिनल(कोठेही शाखा नाही) आणि चेन वाल्याच्या पाटीच्या रंगात कसा फरक आहे वगैरे सुरस, चमत्कारिक फॅक्ट्स ऐकायला मिळतील. एकंदर 'दुर्गा कॅफे' हे प्रकरण 'लेजेन्ड' किंवा 'कल्ट' ह्या सदरात मोडतं असा विचार करत मी सदर्याचं एक बटन उघडलं आणि एक हॉट कॉफी मागवली. मस्त वातावरण होतं, आजूबाजूला कॉलेज आणि आयटीवाले तरूण-तरूणी होते. अश्या वेळीच गप्पांना बहर येतो. धमाल गप्पा झाल्या. ओंकार महिनाभरात यूएसला चाललाय त्यामुळे भेट झाल्याने खूपच छान वाटलं. मग साडेअकराच्या सुमाराला घरी पोचलो. रात्री १२ वाजता मी झोपायला निघालो होतो तेव्हा सुहासचा फोन आला. म्हणाला, आम्ही पुणं भटकतोय. मला वाटलं मंडळी एन्जॉय करतायत. पण दुसर्या दिवशी कळलं, की पुण्यानेच मंडळींना एन्जॉय केलं होतं. तपशीलवार वर्णन सुहासच्या ब्लॉगवर येईलच.
मग दुसर्या दिवशी सकाळचा प्लॅन ठरला. सगळ्या जमलेल्या ब्लॉगरांनी शनिवारवाड्याजवळ भेटायचं आणि तिथून सिंहगड पायथ्याला जायचं. मग वर जायचं(गडावर) की फार्मवर बसून गप्पा टाकायच्या हे तिथेच ठरवू असा 'प्लॅन ठरला'. किमान एव्हढी प्रगती झाली. मग मी ओंकारला फोन केला, दुर्दैवाने तो थोडा आजारी असल्याकारणे त्याचं येणं रद्द झालं. मग मी अभिजीत वैद्यला('आवरा' फेम) फोन केला. त्याने होकार दिला. अर्धं काम झालं असं मला वाटलं. मला पोहोचायला थोडा उशीर झाला(इतरांनाही झाला तसा, पण सहसा मोठ्या मनाची माणसे स्वतःवर आळ घेतात, मी लहानपणीही लपाछपीत नेहमीच स्वतःवर राज्य घ्यायचो). त्यामुळे ९.५० ची बस सुटली. पुढची १०.५० ची. म्हणून मग शनिवारवाड्यावर जायचे ठरले. त्यावेळीच मला कळलं की तन्वीताई पण पुण्यात आलीय. मी तिला नाशिकला येईन असं आश्वासन देऊन मुरब्बी नेत्याप्रमाणे मोडलं होतं(परिस्थिती हो, मी तसा वाईट नाही), त्यामुळे तिची आयतीच भेट होणार तिही सहपरिवार म्हटल्यावर मी आनंदलो(दोन आनंद बरोबर असल्याने आनंद द्विगुणित झाला). मी कित्येक वर्षांनी शनिवारवाड्यात शिरलो. उगाच नारायणरावांचं टेन्शन येत होतं. ते मलाच गारदी समजणार नाहीत ना असा विचार करत दाढी कुरवाळत होतो. मग आनंद काळे आणि अन्य काही मंडळींनी फोटो काढायला सुरूवात केली. आम्ही उगाच पेशवे असल्यागत सगळ्यांवर नजर ठेवून हिंडत होतो(इथे 'आम्ही' हा 'शनिवारवाडा इफेक्ट' आहे).
मग एकदाची बस आली आणि आम्ही सगळे बशीत(बसमध्येला 'त'कारान्त असंच करावं लागेल, बशीमध्येचंही असंच होईल..म्हणून लवकरात लवकर 'बस' ह्या आंग्ल शब्दाला पर्यायी मराठी शब्द शोधावा लागेल, नाहीतर चहाला राग येईल. अति पाणचटपणा{इथे 'इति पाणचटपणा' म्हटलं असतं तरी चाललं असतं}.) बसलो एकदाचे. मग तन्वीताईचा फोन आला. ती म्हणाली आम्ही पंधरा मिनिटांत पोचतोय पायथ्याला. मी म्हटलं आम्ही अर्ध्या तासात, इथे मी अर्धा तास जाणून बुजून कमी सांगितला उगाच कशाला सकाळी सकाळी खरं बोला. मग अभिजीत वैद्यला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. त्याने बिचार्याने त्याचा लोणावळ्याचा प्लॅन रद्द केला होता आणि ऑलरेडी सकाळ वाया गेलेली होती. त्याने मला विचारलं, की गाडी आणू की बसने येऊ? मी म्हटलं बसला गर्दी आहे, गाडी आण(माझ्या ह्या प्रसंगावधानाचा मला पुढे फार फायदा झाला). मग मी थोडा शांत झालो. मग बसमध्ये पेठे काका आणि अनुजाताई बसल्यावर आम्हा बाकी मंडळींमध्ये खेचाखेची सुरू झाली. शेवटून दुसर्या स्टॉपला बसमध्ये जीपवाले चढले आणि ओरडायला लागले, "चला शेंह्गड शेंह्गड, जीपनं शेंह्गड!" आम्ही सगळे त्या टिपिकल उच्चाराचे एव्हढे फॅन झालो की ह्यापुढे मी शेंह्गडच लिहिणार आहे. मजल दरमजल करत आम्ही एकदाचे पोचलो. मग पोचल्यावर खल सुरू झाला. पुढे काय? प्लॅन इथपर्यंतचाच होता. पुढचं प्लॅनिंग पायथ्याशीच करायचं असाच आमचा प्लॅन होता.
मग तन्वीताई सहपरिवार आली. ईशान आणि गौरीला प्रत्यक्ष बघण्यासाठी केव्हाचा उत्सुक होतो, ऑफकोर्स तन्वीताई आणि अमितलाही. गौरीला बघून तर मला माझ्या अजून एका भाचीची आठवण होते. बाई मूडमध्ये नव्हत्या. पण भाचा फुल फॉर्मात होता. मग पुन्हा एकदा 'मोमेंट ऑफ ट्रुथ' आली. शनिवारवाडा बस स्टॅंडवर बस सुटल्याने प्लॅन बदलला, इथे शेंह्गड पायथ्याशी आनंद काळे सुटल्याने प्लॅन बदलला.
त्याचं झालं असं. आम्हा सगळ्या आळशी मंडळींना गडावर चढून जायचा कंटाळा आला होता. आम्हा चार जणांना(मी, सुहास, सचिन आणि देवेंद्र) मुंबईला जायची घाई होती, कारण संध्याकाळी चार-पाचची बस पकडायची होती. त्यात देवेंद्रला तर बोईसर(गुजरात बॉर्डर) पर्यंत जायचं होतं(पुढे हा कळीचा मुद्दा झाला). म्हणून फार्मवरच बसून गप्पा टाकायचं ठरलं. पण आका(आनंद काळे) पेटला. 'मला आर्टिफिशियल आवडत नाही' अशी शेंह्गडाला शोभेलशी शेंह्गर्जना त्याने केली आणि सगळ्यांचाच आळस झटकला. मुंबईवाल्यांना त्याने 'देवेंद्रला तर बोईसर पर्यंत जायचंय, तो काही बोलत नाही तर तुम्ही का?' असं म्हणून गप्प केलं, कारण देवेंद्र खरंच गप्प होता. मग मांडवली झाली, मिळेल त्या वाहनाने गडावर जायचं ठरलं. आकाची स्वारी खुश आणि त्यामुळे आम्ही खुश, शेवटी मित्र आहोत त्याचे. पण बरंच झालं, आकामुळे शेंह्गड झाला. हे सगळेच मान्य करतील.
अभिजीत गाडी घेऊन येणार, हे विधान मिसलिडिंग आहे. पण तो पुणेकर आहे त्यामुळे ती बाईकच असणार हे माझ्या चाणाक्ष पुणेप्रेमी बुद्धीने ओळखलं होतं. आणि त्याची बाईक येताच मी हक्काने त्याच्या मागे बसलो. ते थेट शेंह्गडावर जाऊन उतरलो. आता आम्ही दोघे रविवारच्या गर्दीत हळूवार भुरभुरत्या पावसात बाकीच्यांची वाट पाहत होतो. पंधरा मिनिटांनी तन्वीताईच्या गाडीने देवडे परिवार, अनुजाताई आणि पेठेकाका पोचले. तेव्हढ्यातच त्यांच्या गाडीची क्लचप्लेट त्रास देऊ लागली होती. दिवस भलताच इव्हेंटफुल होत होता(हे पोस्टही भलतंच लांबत चाललंय).
मग आम्ही द्रोह केला आणि बाकीच्यांची वाट न पाहताच खादाडीप्रारंभ केला. कांदाभजी, मटका दही आणि ताक असा अल्पोपहार सुरू केला. तेव्हढ्यात बाकी मंडळी पोहोचली आणि मैफल रंगतदार होऊ लागली. मग गडावर फिरण्यास निघालो. जेवणं नंतरच करावी असं ठरलं. (पण ते 'नंतर' कधी आलं नाही त्यामुळे निषेधांपेक्षा खसखसच जास्त पिकेल. ) मग मस्त भटकंती सुरू झाली. फोटो काढणे, गप्पा-विनोद, मुक्त आणि चालता फिरता मेळावा झाला. तन्वीताईच्या भाषेत, 'निम-पावसाळी ब्लॉगर्स ट्रेक' झाला. तपशीलात शिरलो तर मजा जाईल. पण एकंदरच खूप मजेशीर तास-दीड तास गेला. वातावरण एकदम आल्हाददायक होतं. मधेच हलका पाऊस, धुकं, ढग. एकदम मस्त. मग 'आम्हा मुंबईकरांना' परतीची वाट खुणावू लागली. पुन्हा आम्ही 'देवेंद्रला दूरपर्यंत जायचंय' हा इलेक्शनचा मुद्दा काढला. एक बरं होतं, देवेंद्र दोन्ही वेळेस काही बोलत नव्हता, त्यामुळे मुद्दा वापरणारे आम्ही मुरब्बी की दोन्ही वेळेस मौन पाळणारा तो, हे कोडंच आहे.
मग आम्ही सगळ्यांना घाई करत करत पुन्हा वाहनतळापाशी घेऊन आलो. दुपारचे अडीच वाजून गेले होते. गर्दी फार होती. परतीला बराच उशीर झाला असता. पण आकाचा पत्ता नव्हता. तो वेगळ्या रस्त्याने येतो सांगून धुक्यात हरवला होता. नंतर कळलं की तो ४० मिनिटे गायब होता आणि धुक्यात असल्याचा फायदा घेऊन, एकटाच मलाई कुल्फी खाऊन आला. बाकी सगळे मुंबईकर थेट स्वारगेटला पोचणार होते, पण माझं सामान बहिणीकडे होतं त्यामुळे मला जाणं भाग होतं. मी अभिजीतबरोबर निघालो. आम्ही गेल्यावर सगळ्यांनी कैरी, शेंगा असली खादाडी केली.
अभिजीतनं मला घरपोच सोडलं आणि टेन्शन मिटवलं. मग मी थोडा जेवलो आणि तयार झालो, पण बाकी मंडळींचा पत्ता नाही. ते सगळे ६ वाजता स्वारगेटला पोचतो म्हणून ६.४५ ला पोचले. आनंद पत्रे, सचिन आणि भारत खास आम्हाला सोडायला स्टॅंडपर्यंत आले. मला भरून आलं होतं, पण 'इट गोज अगेन्स्ट द इमेज'. आका ठाण्याच्या गाडीत बसला व मी, सुहास आणि देवेंद्र बोरिवलीच्या गाडीत बसलो. आनंद पत्रे, सचिन आणि भारतशी शेकहॅन्ड केला आणि बस निघाली. पुन्हा एकदा अख्खा दिवस मनातल्या मनात जगलो.
बसमध्ये देवेंद्रला त्याचा एका मित्राचा फोन आला. त्यानं त्याला विचारलं, 'पुण्याला कशाला गेलायस?' त्यावर देवेंद्रनं उत्तर दिलं, 'मित्रांना भेटायला.' समोरच्यानं विचारलं, 'कुठले मित्र?'. हा म्हणाला, 'ब्लॉगवरचे मित्र'. समोरचा, 'काय?'. अगदी हीच सिच्युएशन मीच काय सगळ्यांनीच फेस केली असेल. गंमत वाटली. मनात उजळणी केली. आम्ही सगळेच कधीच एकमेकांना न भेटलेले, फारतर ४-५ जण आधी भेटलेले असतील एखादवेळेला. पण एकत्र आल्यावर कुठेच कसलीच औपचारिकता जाणवली नाही. सगळेच एकमेकांशी फार पूर्वीची ओळख असल्यासारखे मोकळेढाकळे होतो. अगदी मोठं कुटुंब असल्यागत, काका होते, ताया होत्या, भाचा-भाची होते, त्यांचे खूप सारे मामा होते. किती लिहू आणि किती नाही.
मी ११.४५ला, सुहास १२.४५च्या आसपास आणि देवेंद्र पार २.३० वाजता घरी पोचला. एक अविस्मरणीय अनुभव संपला होता.
तीन गोष्टींची मात्र रुखरुख लागलीय. सगळ्यांशी निवांत दिवसभर गप्पा मारायला झालं नाही, गौरी-ईशानचे लाड करता आले नाहीत नीट आणि आंद्या तुला कडकडून मिठी मारायची होती रे, बस सुटताना जाणवलं. असो. पेंडिंग ठेवू काहीतरी तरच पुढच्या भेटीसाठी धनविचाराने प्रेरित होऊन मी ऋणभारित विद्युतकणाने धनभारित कणाच्या दिशेने ओढले जावे तश्यागत पुन्हा कुठेतरी येईन.
ता.क.(इथे सहभागी लोकांना गडावरचं ताक आठवणं स्वाभाविक आहे) - सगळ्यांना आज दुपारीच पोस्ट टाकेन असं आश्वासन देऊन मी आत्ता तांत्रिकदृष्ट्या उद्या पोस्ट टाकतोय. माझ्यात नेता होण्याची क्षमता दिसतेय. आणि फोटो टाकणार होतो, पण तन्वीताई आणि बाकीच्यांनी फोटो पाठवले नाहीत अजून. पैकी तन्वीताईने फोटो दुपारपर्यंत पाठवण्याचं आश्वासन न पाळून त्याबाबतीतही माझी मोठी बहीण असल्याचं दाखवून दिलंय. जसे फोटो मिळतील. इथे लिंक देईन. पेठेकाकांच्या कल्पनेमुळे आणि पुढे अनुजाताईच्या पुढाकाराने सगळ जमून आलं, तन्वीताई आणि अमित अगदी गाडी घेऊन नाशकापासून आले आणि बाकी सर्वांचंच ही भेट यशस्वी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आभार. इति लेखनसीमा (इथे 'अति लेखनसीमा' सुद्धा चालेल.)
फोटोंचा दुवा (सौजन्य : सुहास झेले)
बाबा, ज ब्ब र द स्त !!!! कसला सुटलायस तू. (हे तुला नाही तुझ्या पोस्टला उद्देशून आहे.).. जाम धमाल आली वाचताना. सगळे पंचेस भार्री.. !! आपल्यात उत्तम विनोदी (विथ ऑल द राईट पंचेस अॅट राईट प्लेसेस) फार कमी जण लिहितात/लिहू शकतात.. ती कमतरता तू पूर्ण केली आहेस.. अजून येऊदे !!
ReplyDeleteभन्नाट लिहिलास ....
ReplyDeleteमजा आली वाचताना
आत्ताच ऑरकुटवर तन्वीने टाकलेले फोटू पाहून तुझ्या या जबरी जळवण्यावर... आय मीन वर्णनावर आले. मस्तच लिहीले आहेस. जाम मज्जा केलीत ती अगदी भरभरून जाणवतेयं. :)
ReplyDeleteयकदम इव्हेंटफ़ुल्ल पोश्ट बगा.....सॉलिड डिटेल्स दिलेत त्यावरुन इव्हेंटफ़ुल्ल दिवसाची कल्पना येतेय....:)
ReplyDeleteविभि, खूप मस्त वाटला भेटून आणि ट्रेकला पण (दोन्ही दिवस माझा ट्रेकच ;-) याच स्पष्टीकरण लवकरच ब्लॉगवर येईल माझ्या हा हा)
ReplyDeleteपण मज्जा आली..
मी असतो तर फार्मा-बिर्मावर बसलोच नसतो... गडावर तर गेलोच असतो शिवाय डोणजे दरवाजा चढून पार कल्याण दरवाजा उतरवला असता सर्वांना :D
ReplyDeleteअर्थात गडावरच्या भजी आणि ताकला कसलीच सर नाही... पण तिकडून दिसणारा राजगड आणि तोरणा ह्यांनादेखील कसलीच सर नाही...
सविस्तर वृतांत मस्त आहे... ख़ास करून कंस.. :) आणि हो तू राहायला कुठे मुंबईमध्ये ??? आपल्या ट्रेकला येणार नाहीस का??? भेट होइल सर्वांची पुन्हा... :)
विद्याधर,
ReplyDeleteखूपच मस्त लिहिले आहेस रे ! पुन:प्रत्ययाचा आनंद म्हणजे काय असतो ते तुझा हा लेख वाचून कळले सुरवातीला माझ्याही मनात ’शेंहगड’च होता पण त्यातील येणाऱ्या अडचणी ही नजरे समोर होत्या, शिवाय निर्णय मी एकटा घेऊ शकत नव्हतो.
मला काय बुध्दी झाली त्या घाटगे फॉर्म वाल्याला मी कच्ची यादी करायला सांगीतली होती म्हणून बरे नाहीतर पक्की पावती केल्यावर पैसे परत करतांना त्याने थयथयाट केला असता तो वेगळाच !
एकूण ऐनवेळचा का होईना आपला हा कार्यक्रम अनंत काळ लक्षात राहील असा नक्कीच झाला.व तुझ्या ह्या लेखाने त्याचा पुन: पुन:प्रत्ययाचा आनंद मिळत रहाण्याची सोय झाली.
माझ्या कॅमेऱ्याने ऐनवेळी दगा दिला पण सुरवातीचे काही काढलेले फोटो मी माझ्या ब्लॉगवर टाकलेले आहेत.
वाह वाह...जळवा जळवा...एकटया एकटयाने केली ना धमाल.....पण वाचुनच खुप छान वाटले..तुमच्या बरोबर आम्हालाही फ़िरवुन आणलेत...
ReplyDeleteविदयाधरा वृतांत खासच झालाय.
ReplyDeleteबाकी नेता होण्याचे पुरेपुरे गुण आहेत याची झलक पाह्यला भेटली बर का........
सविस्तर वृत्तांत वाचून मजा आली. पन फोटू नाय का?
ReplyDelete(नेहमीप्रमाणेच) मस्त लिहिले आहेस... वाचताना प्रसंग आठवुन अजुनच हसू आले..
ReplyDeleteबाकी तुझा निषेध आहेच.. आणि हा अगदी खर्राखुर्रा निषेध...
जेवढी धमाल काल केली तेवढीच मजा आता ही पोस्ट वाचतांना आली...एकदम जबरा लिहलस रे...
ReplyDeleteदेवेंद्र + १
ReplyDeleteमस्त लेख लिहिला आहेस एकदम !
बाबाची भिंत वाचता वाचता आपलं चढता चढता (सिंहगड) दम लागला. पण छान लेखन. भारीच.
ReplyDeleteहेरंबा,
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद रे!
खूप मोठी कॉम्प्लिमेंट दिलीस! विश्वास टिकवायचा प्रयत्न करेन!
भाग्यश्रीताई,
ReplyDeleteखूपच मजा आली...आता तुम्हा सगळ्या राहिलेल्यांनाही कधी एकदाचा भेटतोय असं झालंय!
धन्यवाद सागर!
ReplyDeleteतुझा अप्रत्यक्ष सहभाग ह्यात टाकला नाही कारण मला जास्त कल्पना नव्हती..आज सुहास आणि देवेनच्या ब्लॉगवर वाचूनच तुझं पूर्ण योगदान कळलं..तोडलंस रे(नियमसुद्धा)!
होय अपर्णा(तुझ्या विनंतीस मान दिलाय, 'ताई मत कहो ना!':D)
ReplyDeleteखूप खूप इव्हेंटफुल झाला दिवस...आपणही भेटूच केव्हातरी! :)
सुझे,
ReplyDeleteडेडलीच रे तुमचा ट्रेक..शहरी आणि डोंगरी दोन्ही ट्रेक केलेत..तुझ्या आणि देवेंद्रच्या ब्लॉगवर वाचून हैराण झालो...
मस्त वाटलं तुम्हा सर्वांना भेटून खरंच!
हाहा रोहन,
ReplyDeleteअरे वेळेचं बंधन आणि पायथ्याशी रखरखणारं ऊन यामुळे थोडा मनःशक्तीवर परिणाम झाला...
मग आका आणि त्याचा फोन ह्यातल्या काही रसायनामुळे एक छोटा स्फोट झाला आणि एकदम प्लॅन बदलला...तरी ३-४ तासच हातात होते म्हणून...
एक फुल फ्लेज ट्रेक करायचाय रे...
मी मालाडला आहे मुंबईत..पण मी २७ जूनला परत चाललोय मिलानला..पावसाळी ट्रेक मिस होणार आहे!..:(
>>पण तिकडून दिसणारा राजगड आणि तोरणा ह्यांनादेखील कसलीच सर नाही.
अगदी मान्य!
धन्यवाद पेठेकाका,
ReplyDeleteतुमचा ब्लॉग वाचला...फोटोज मस्त आलेत..
तुमच्या पुढाकारानेच तर शक्य झाली ही भेट...
बाकी, तिकडच्या फार्मवाल्याच्या थयथयाटापेक्षा आकाचा थयथयाट पाहण्यासारखा होता...;)
खरंच हा ऐनवेळी ठरलेला कार्यक्रम मस्तच झाला, एकदम अविस्मरणीय!
माऊ खूप धन्यवाद!
ReplyDeleteभाग्यश्रीताईला म्हटलं तसंच, तुम्हा राहिलेल्यांनाही भेटायचंय लवकरात लवकर!
म्हणजे नवे अजून लोक जळतील आणि मग त्यांनापण भेटायला मिळेल...;)
धन्यवाद सचिन!
ReplyDeleteआता मला नेत्यांबद्दल खूप सहानुभूती वाटतेय..आश्वासनं पाळणं लय अवघड काम गड्या! ;)
धन्यवाद महेंद्रकाका,
ReplyDeleteखूपच मस्त वाटलं तिथे सगळ्यांना भेटून, तेच थोडंफार प्रतिबिंबित झालंय वृत्तांतात...:)
फोटू आता सुझेने त्याच्या ब्लॉगावर टाकलेत...!
आंद्या!
ReplyDeleteबास का आता? अजून निषेधातच का तू!
चालायचंच...
पण तेव्हढं डिसेंबरात भेटण्याचं लक्षात ठेव राजा!
धन्यवाद देवेंद्र,
ReplyDeleteकाल भलतीच मजा आली खरंच..पण तुम्ही त्याआदल्या दिवशी जी भलभलती मजा केलीत ती तुझ्या आणि सुझेच्या ब्लॉगवर वाचून मलाही खूप थ्रिलिंग वाटलं...;)
अभिजीत,
ReplyDeleteधन्यवाद भाऊ!
नुसतं प्रतिक्रियेसाठीच नाही...त्यादिवशी तुझ्या 'गाडी'चा भलताच आधार होता मला! ;)
२७ला तुझे मिलान बरोबर मिलन आहे का??? हाहा .. ठिक आहे परत कधी येतो आहेस??? तसे कवळ म्हणजे अजून ट्रेक करून टाकू.... हाय काय अन नाय काय!!!
ReplyDeleteधन्यवाद अलताई,
ReplyDeleteकेलेली मजा वृत्तांतामध्ये उमटली असेलच!
तुलाही भेटायचं राहिलंच आहे..पुढच्या सुट्टीत!
होय रे रोहन,
ReplyDeleteएक महिन्याची सुट्टी कशी उडून गेली कळलंच नाही!
परत बहुधा १० डिसेंबर अशी तारीख ठरलीय, पण पुढे मागे होऊ शकते...
भेट जमवूच तेव्हा!
Dhamaal aahe post.... Baki sagali comment Copy-pest from Heramb dada'c comment...!!! :)
ReplyDeletePudhachy weli mi pan yenar.....!!! :)
धन्यवाद मैथिली!
ReplyDeleteनक्की ये...तुलाही भेटायचं आहेच!
बाबा, ज ब्ब र द स्त !!!! कसला सुटलायस तू. (हे तुला नाही तुझ्या पोस्टला उद्देशून आहे.).. जाम धमाल आली वाचताना. सगळे पंचेस भार्री.. !! आपल्यात उत्तम विनोदी (विथ ऑल द राईट पंचेस अॅट राईट प्लेसेस) फार कमी जण लिहितात/लिहू शकतात.. ती कमतरता तू पूर्ण केली आहेस.. अजून येऊदे !!
ReplyDelete+100
Mast lihiles re .... Pethe kaka mhanale tase पुन:प्रत्ययाचा आनंद म्हणजे काय असतो ते तुझा हा लेख वाचून कळले :)
Baki aabhar khare tar AAKA che :)tyachyamule aapan gad gathala :)
हाहा ताई,
ReplyDeleteजाम मजा आली सगळ्या ट्रीपमध्ये...
हे मात्र खरं की आकाचे आभार मानायलाच हवेत! गड आला कारण आपला सिंह आला! ;)
असे म्हण की गड झाला कारण आकाच्या अंगात सिंह संचारला :)
ReplyDeleteहि पोस्ट मी आज पुन्हा वाचली...तुला लवकर भेटण्याची इच्छा आहे रे...
ReplyDeleteसागर,
ReplyDeleteतुझ्यामुळे मी पण परत वाचली!! लवकरच भेट होईल आपली!! मला पण सगळ्यांना भेटायचंय..
निमित्त हेरंबच्या फेसबुक पोस्टचं. वरातीमागूनचं घोडं झालं माझं😂😂😂 अफाट लिहिलयस. त्यावेळेस येता आलं नव्हत म्हणून जळूजळू झालं होतं आज रिपीट टेलिकास्ट झाला.
ReplyDeleteनिमित्त हेरंबच्या फेसबुक पोस्टचं. वरातीमागूनचं घोडं झालं माझं😂😂😂 अफाट लिहिलयस. त्यावेळेस येता आलं नव्हत म्हणून जळूजळू झालं होतं आज रिपीट टेलिकास्ट झाला.
ReplyDelete