7/18/2010

पुणं आणि मी

पुणं. नाव घेतलं की एकदम भरीव काहीतरी म्हटल्यासारखं वाटतं. दोन अक्षरांचा शब्द, पण त्यात जो भरीवपणा मला जाणवतो तो, तिथल्या माझ्या जन्मामुळे की माझ्या आजोळामुळे की त्या स्थानाच्या एकूणच महात्म्यामुळे हे मला कळत नाही.

पुणं प्रसिद्ध झालं, ते पेशव्यांमुळे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशव्यांनी पुण्याला राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. पुण्याची सांस्कृतिक जडणघडण व्हायला हे एक महत्वाचं कारण होतं. पुण्यात ज्ञानदानाचीही जुनीच परंपरा आहे. म्हणूनच पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात. पुण्यात अनेक मोठे वाडे आहेत. पर्वती, सिंहगड ह्यांनी पुण्याची शान वाढवलीय. च्यायला, मी काय विकिपीडिया एंट्री लिहितोय का! येतो नॉर्मलला.

पुणं म्हटलं, की पुणं तिथं काय उणं हे वाक्य मला पहिलं आठवत नाही! कारण, पुणं माझं आजोळ आहे (हे मी मगाशीच म्हणालो). त्यामुळे असली बाष्कळ वाक्य मला आवडत नाहीत उगाच; निबंधांमध्ये लिहायला वगैरे ठीक आहे. पुण्याची स्पेशालिटी म्हणजे पु.ल. म्हणतात त्याच्यागत 'जाज्वल्य अभिमान', मग तो कुठल्याही गोष्टीचा असो. मला आमच्या आजोबांच्या सदाशिव पेठेमध्ये एकेकाळी असलेल्या एका वाड्यातल्या (भाड्याच्या) दोन खोल्यांचा बरोबर खाली असलेल्या नवरत्न भेळेचा 'जाज्वल्य अभिमान' आहे. का नसावा, आमची मर्जी. अहो लोकांना त्यांच्या वाडीच्या कॉर्नरला असलेल्या उघड्या गटाराचाही जाज्वल्य अभिमान असतो. तसा टेक्निकली मी पुण्याचा नाही. पण माझा जन्म आणि लहानपणच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीतले काही दिवस पुण्यातलेच. त्यामुळे जन्मल्या जन्मल्या जे पाणी लागलंय पुण्याचं ते उतरत नाही. आयुष्य मुंबईत गेलं, त्यामुळे कुठल्याही स्थानाबद्दल प्रेम दाखवण्यासाठी त्या स्थानाला शिव्या घालण्याचा गुणही आपोआप बाणवला. त्यामुळे सहसा कोणी पुण्याला 'एक भिकार' म्हटलं, तर मी 'दहा भिकार' म्हणून मोकळा होतो. कदाचित मुंबईकरांचा 'इफ यू कान्ट बी फेमस, बी इन्फेमस' हा फंडा असावा. कारण, मी नेहमी पाहतो. मुंबई विरुद्ध दुसरं शहर असल्या विवादांमध्ये सहसा मुंबईकर पडत नाहीत. आणि पडलेच तर ते मुंबई कशी भिकार आहे हेच वर्णन करून समोरच्याच्या आर्ग्युमेंट मधली हवा काढून घेतात. असो, विषयांतर होतंय.

तर पुणेकरांना कशाचा ना कशाचा जाज्वल्य अभिमान असतो. आता ही बाब अगदी हल्लीची पिढीही इमानेइतबारे पाळतेय, हे मला माझ्या ह्यावेळच्या पुणे ट्रीपमध्ये दिसलं, आणि भरून आलं. 'दुर्गा कॅफे' बद्दल मी ह्यापूर्वीच उल्लेख केलाय, त्याशिवाय जर्मन बेकरी पासून स्वाद अमृततुल्य पर्यंत 'जाज्वल्य अभिमान' देखील चक्क युवापिढीला असलेले पाहिले. वैशाली, रुपाली आणि वाडेश्वर ह्या हॉटेलात जाणारे कधीही 'आपलं नेहमीचं' हॉटेल सोडून दुसर्‍या हॉटेलात पाय ठेवत नाहीत. पुणं बदललं नाहीय हे जाणवलं.

पुन्हा पुण्याची दुसरी खासीयत म्हणजे वादविवादाची विलक्षण हातोटी. हा गुण माझ्यातही आहे, पण ती पुण्याची देणगी आहे हे मला पु.लं.नी सांगितल्यावर कळलं. उदाहरण देतो, मी आणि माझा माझ्याच वयाचा भाचा दोघेजण गप्पा मारत होतो. तो फुटबॉलचा फॅन आहे. खरं सांगायचं म्हणजे त्याला जेन्युईनली फुटबॉलमधलं बरंच कळतं. आमचं ज्ञान म्हणजे इथून तिथून ऐकलेलं. पण जेव्हा तो म्हणाला की मी चेल्सीचा फॅन आहे, झालं मी लगेच चेल्सीचा विरोधक झालो. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली, की मी आपण अजूनही इंग्रजांचे मानसिक गुलाम कसे आहोत, ज्यामुळे आपण आंग्ल फुटबॉल टीम्सना सपोर्ट करतो, देशी खेळांची आपल्याला पर्वाच नाही, हॉकीला वाली नाही इथपर पोहोचलो. मग मला स्वतःलाच जाणवलं आणि मी आवरलं. माझा भाचा शॉकमध्ये किती वेळ होता माहित नाही. पण अर्थात तो पुणेकर असल्याने त्यालाही चेल्सीचा 'जाज्वल्य अभिमान' आहे, तो माझ्यासारख्या अर्धपुणेकरामुळे सोडायचा नाही. बाकी, मी स्वतः आर्सेनल ह्या दुसर्‍या आंग्ल फुटबॉल टीमचा पार्टटाईम समर्थक(इथे 'जा.अ.' अभिप्रेत आहे) आहे, पण वादाच्यावेळी वाद, तेव्हा असले आत्मघातकी मुद्दे पुढे आणायचे नसतात. एरव्हीही मी क्रिकेटपेक्षा फुटबॉल कसं चांगलं आहे आणि रग्बीपेक्षा कबड्डीत कसा जास्त कस लागतो वगैरे फुटकळ वाद घालतो, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

पुण्याची महत्वाची खासीयत म्हणजे तिरकस बोलणे. आणि हे तिरकस म्हणजे बुद्दिबळातल्या उंटाहूनही तिरकस. अगदी समोरचा लाजेने पाणीपाणी होईस्तो. पुन्हा शब्दनिवड इतकी अचूक की किमान शब्दांत कमाल अपमान. म्हणजे आता बघा, एखादा पुणेकर कुणाच्या घरी गेला आणि समोरच्याने चहा-पाणी वगैरे केलं, की ह्यांची एक कॉमेंट, "तुमच्यात कुणाला डायबिटीस आहे वाटतं." आता काही गरज ह्या वाक्याची! सगळं यथास्थित झालंय, तरी. हा गुण त्या पवित्र पुणेरी पाण्यातून माझ्यातही उतरलाय, हे मला कधीकधी जाणवतं. एकदा आम्ही कॉलेजातले मित्र बर्‍याच दिवसांनी भेटत होतो, सगळॅ नोकर्‍या करत होते. भेटलो आणि पाहिलं तर एका मित्रानं केस बरेच वाढवले होते. प्रतिक्षिप्त क्रियेगत माझ्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले, "चला रे आपण वीस रुपये कॉन्ट्रिब्यूट करू!" बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि त्या पाण्याच्या ताकदीची खात्री पटली.

तुसडेपणामध्येसुद्धा पुणेरी लोकांचा हात धरणं अशक्य. त्यात पण पुणेरी दुकानदार असेल तर दुधात साखर. समोरच्याचा पाणउतारा करायचाय, तर पुणेकर दुकानदार हवा. ह्यांच्या दुकानात सर्वांत दुर्लक्ष करण्याजोगी वस्तू म्हणजे गिर्‍हाईक हे पु.लं. नी सांगून ठेवलंय.

"ओ भाऊ, जरा शर्टपीस दाखवता का?"एक गिर्‍हाईक.

दुकानदार वरपासून खालपर्यंत न्याहाळेल गिर्‍हाईकाला आणि म्हणेल, "तुमचं बजेट काय आहे सांगा, फार महाग आणि फार स्वस्त माल आम्ही ठेवत नाही."

आता मला सांगा, एखादी वस्तू आमच्याकडे नाही, हे सांगायला अभिमान कोणाला वाटेल, पण पुणेकर दुकानदारांना नक्की वाटतो.

अहो अगदी आजही जगप्रसिद्ध मिसळवाल्यांकडे जा, जर दुकानात मिसळ असेल, तर ते तुम्हाला उपकार केल्यागत वाढतील आणि नसेल तर विजयी मुद्रेने, "आजचा माल संपला आता उद्या" हे सांगतील.

'आमची कोठेही शाखा नाही' ही पुणेकरांच्या जाज्वल्य अभिमानाची आणखी एक ओळख. भैये तर अगदी केळ्यांच्या गाड्यासुद्धा शाखा असल्यागत प्रत्येक कोपर्‍यावर लावतात. आणि सहकाराने धंदा करतात. पण पुणेकरांना शाखा असण्यापेक्षा नसण्याचाच अभिमान जास्त. अगदी आजच्या तरूण पिढीचा हॅपनिंग स्पॉट 'दुर्गा कॅफे'वरही मी 'आमची कोठेही शाखा नाही' हे वाक्य वाचलं आणि मला गहिवरून आलं. पुण्याच्या पाण्याचा महिमा पटला.

पुण्यातल्या दुचाक्या हे एक अजब प्रकरण आहे. आपला सिग्नल हिरवा झाला की नाही, ह्यापेक्षा अलिकडच्यांचा सिग्नल पिवळा झाला का, हे पाहून गाडी चालवणारे बहुधा फक्त पुण्यातच सापडतील. सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग ही टेम्पररी पार्किंग असल्याच्या थाटात फक्त पुणेकरच उभे राहू शकतात. मला तर कधी भीती वाटते, की झेब्रा क्रॉसिंगवर चालल्याबद्दल एखाद्या पादचार्‍यालाच फाईन पडेल. सिग्नलला ट्रॅफिक कंट्रोल करण्याऐवजी, सिग्नलपुढे एका झाडामागे लपून उभे फक्त पुण्याचे ट्रॅफिक पोलिसच राहू शकतात(अर्थात हल्ली हा रोग मुंबईतही वेगाने पसरतोय). आणि दिवसांत किती जास्त गिर्‍हाईकं नाकारली त्यावरच पुण्याचे रिक्षावाले आपली कमाई मोजत असावेत. सगळ्यात स्पेशल म्हणजे दुचाकीस्वार. बाकी, दुचाकीला 'गाडी' म्हणण्याचं औद्धत्य फक्त पुणेकरच करू जाणोत. रस्ता हा आपल्या तीर्थरुपाचा असल्यागत कुठेही न पाहता चालवणे आणि मोटो जीपी मधल्यागत तिरकी करून 'गाडी' वळवणे हे फक्त पुणेकरच करू जाणोत. मजकडे अजूनही लायसन्स नसल्याने आणि मी मुंबईच्या वाहतुकीत लहानाचा मोठा झाल्याने मी ह्या बाबतीत अजून पुणेकर नाही, हा उर्वरित अर्धा भाग असावा.

बाकी एक गोष्ट मात्र मी मान्य करतो की कितीही तिरकस आणि कितीही तुसडे असले, तरी एक पुणेकर दुसर्‍या पुणेकराबद्दल आकस ठेवत नाहीत. भले ते नियमांचा मान राखणार नाहीत पण पुणेकरांचा मान राखतात. मी माझ्या भाच्याच्या 'गाडी'वर मागे बसलो होतो. तो पुणेरी बेफिकीरीने गाडी चालवत होता. एका वळणाला समोरून दुसरा पुणेरी 'गाडी'स्वार आला. आणि अपेक्षेप्रमाणेच दोघेही एकमेकांना ठोकता ठोकता राहिले. मी काळजीत पडलो, म्हटलं झालं आता. भांडण होणार. पण फक्त एक छोटीशी नेत्रपल्लवी झाली आणि दोघंही आपापल्या मार्गाने निघाले. दोघांपैकी एक जरी पुणेकर नसता तरी भांडण संभवत होतं. मला वाटतं, आधी 'गाडी' घालण्यावरूनच त्यांना एकमेकांच्या पुणेकर असण्याची खात्री पटली असावी. कारण, एवढ्या उद्दामपणे चुकीच्या बाजूने गाडी फक्त पुणेकरच दामटवू शकतो. पुणेकरांची आपापसातली आपुलकी पाहून मला आनंद वाटला.

पुणेरी तिरकसपणा आणि पुणेरी दुचाकी ह्यांच्यावरचा एक छान विनोद नुकताच वाचनात आला(बाकी पुणेकरांच्या नावावर जेव्हढ्या दंतकथा आणि जेव्हढे विनोद खपतात तेव्हढे अमेरिकन रेडनेक्स आणि सरदारजींवरही निघत नसतील. पण ह्या गोष्टीचाही कुणाला जाज्वल्य अभिमान असू शकतो. उदाहरणार्थ, पुण्याच्या IPL टीमची खिल्ली पुणेकरांनीच जास्त उडवली. असो.) -

एकदा कर्वे रस्त्यावरून एक दुचाकीस्वार वायुवेगाने गाडी चालवत जात असतो. तेव्हा पदपथावरून चालणारे एक पेन्शनर जोरात ओरडतात,

"ओ कर्वे, कुठे निघालात?"

तो तरूण एकदम गाडी थांबवतो आणि म्हणतो, "मी कर्वे नाही."

"मग तीर्थरूपांचा रस्ता असल्यागत गाडी कशाला दामटताय?"

38 comments:

 1. मस्त लिहिलं आहेस रे.मला 1च वर्ष झालय येवून पुण्यात.मज्जा येते यार पुण्यात

  ReplyDelete
 2. अरे...बाबा....झकास्स्स्स्स्सSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS....प्रत्येक ओळ वाचुन पुण्य़ात आणून सोडलेस....सहिच्या सही obseravtion...मान गये !!!

  ReplyDelete
 3. पुणेकर बाबा कि जय हो.

  बाबा कसाही असो पण तू स्वताला जन्माने पुणेकर मानतोस हे वाचून मलाही अगदी भरून आल बघ. पुणेकर कुठेही जावोत, अगदी शेवटपर्यंत स्वताला पुणेकरच समजतात.

  ReplyDelete
 4. "पु णं" म्हटलं की मला पु.ल.च आठवतात....त्यांनी त्यात माझ्यासारख्या लोकांचं जे प्रबोधन केलंय त्याला तोड नाही...:)
  थांब विषय तुझ्या पोश्टीचा आहे आणि मी काय मुंबईतल्या ट्रेनमध्ये पहिलेच चढायचा प्रयत्न केल्यासारखं भरकटतेय...एकदम भन्नाट झालंय आणि सगळी उदा. एक सो एक आहेत...लो ट पो ट...(किंवा लोळ...आपलं ते lol...)

  ReplyDelete
 5. Anonymous9:14 AM

  आयला विद्याधरा एक सो एक सही उदाहरण आणि अप्रतिम मांडणी...अपर्णा, तुला लोल म्हणायाच हाय काय? lol

  ReplyDelete
 6. aaj pahilyandach thumchya blog la bhet dili........pune & me post khupch chan aahe.....khup enjoy keli mi thumchi post.....

  ReplyDelete
 7. सागर,
  धन्यवाद भौ.
  पुण्यात वर्षभरातच पुण्याच्या प्रेमात पडलायस तर!;)
  बेस्टच!

  ReplyDelete
 8. माऊताई,
  एव्हढं मोठ्ठं झकास!!:D
  तुझ्याकडून शाबासकी मिळाली की छान वाटतं. :)
  (मी तुला धन्यवाद म्हणणार नाही. :P)

  ReplyDelete
 9. सचिन,
  अरे जन्मच पुण्यात झाला. पहिली हवा पुण्याचीच लागली! आजोळ पुण्याचं...पुण्याचा फार घनिष्ट संबंध आहे! :D
  >>पुणेकर कुठेही जावोत, अगदी शेवटपर्यंत स्वताला पुणेकरच समजतात.
  हे बाकी अगदी खरं आणि ह्यात भर घालतो..ते पुणेकरांसारखेच वागतात..:P

  ReplyDelete
 10. अपर्णा,
  हे मात्र खरं, की पुण्याला अधिक लोकप्रिय करण्यात आणि अनेकांपर्यंत पोचवण्यात पु.लं.चा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पुलंच्या उल्लेखाशिवाय पुण्यावरच लेख पुरा होऊच शकत नाही...
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 11. सुहास,
  अरे पुणं जिव्हाळ्याचा विषय आहे...;)
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 12. सुषमा,
  ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार!
  अशीच भेट देत राहा!

  ReplyDelete
 13. एकदम मस्त. पुणे वगळलं तर अर्धं मराठी साहित्य नाहिसं होईल (अनेक अर्थाने). तरीही या शहराबद्दल सगळ्यांना तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती असते.

  ReplyDelete
 14. थेट पुण्यात नेऊन ठेवलंस की रे बाबा! अन् थेट गाडीवरच नेऊन बसवलंस. माझे विनापरवाना सिग्नलसुसाट दिवस मिस करतोय सध्या. त्यातल्यात्यात अमेरिकेत सायकल चालवताना पुण्याची रॉंग साईड धरल्याबद्दल जाज्वल्य अभिमान बाळगून खूश आहे.

  ReplyDelete
 15. विभी, पुण्याचे गुणगान एकदम दिलसे केले आहेस. शेवटचे उदा पर्फेक्ट पुणेरी. दोन वर्षांपूर्वी जंगली महाराज रोड ओलांडावा म्हणून मी पंधरा मिनिटे उभी होते... त्या वेळात शोमू तिनदा पलीकडे जावून पुन्हा माझ्यापाशी आला. शेवटी माझा हात धरला व डोळे बंद कर म्हणाला... दोन मिनिटात मी पलीकडे गेलेली.:D

  बाकी मी पक्की मुंबईकर असल्याने ( आजकाल खरं तर मी कुठलीच नाहीये... नुसता वैताग झालायं )शांतम पापंम. पोस्ट खूपच छान रे. झक्कास.:)

  ReplyDelete
 16. 'गाडी'चा हेडलाईट चालू केला तर विरुद्ध बाजूने चालवायला परवानगी आहे असाही एक नियम पुण्यात आहे, असा मला पुण्यात रस्त्यावरून चालताना समजलं होतं.

  ReplyDelete
 17. तू एकदम कोअर पुण्याचे रापचिक वर्णन केले आहेस. म्हणजे पेठ, डेक्कन, ई. भाग. पण पुण्याचा जो बाहेर पसरलेला भाग आहे- पिंपळे सौदागर, खराडी, कल्याणीनगर, ई.; त्याचं टोटल मुंबईकरन झाले आहे. ते पण लईच फास्ट. कालच एक SMS आला होता. "देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली. !!!"
  पुणेकर आणि तू व्हीलेर्स वर एखादी पोस्त टाक!

  ReplyDelete
 18. आणि दिवसांत किती जास्त गिर्‍हाईकं नाकारली त्यावरच पुण्याचे रिक्षावाले आपली कमाई मोजत असावेत. हाहाहा जबरी...
  एकदम भन्नाट लेख आहे.. मुपी मध्ये द्यायलाच हवा.... ;)

  ReplyDelete
 19. देविदासजी,
  खरं आहे. तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना..;)
  धन्यवाद!

  ReplyDelete
 20. नॅकोबा,
  सहीच...
  >>विनापरवाना सिग्नलसुसाट
  बेस्ट एकदम...चांगलं आहे..जाज्वल्य अभिमान जागृत ठेव...;)
  धन्यवाद!

  ReplyDelete
 21. धन्यवाद भाग्यश्रीताई..;)
  माझ्या आईला मुंबईत असं होतं रस्ता क्रॉस करताना...ती पुणेकर आहे ना!..:)
  शेवटचा तो विनोद म्हणजे अर्क आहे एकदम!

  ReplyDelete
 22. हर्षद,
  हाहा...होय...ते विसरलंच...तो पुणेरी स्पेशल नियम आहे! ;)
  धन्यवाद!

  ReplyDelete
 23. प्रवीण,
  ब्लॉगवर स्वागत!
  अरे हो..तिकडे मुंबईकरण जोरात चालूच आहे. अशक्य वेगानं तेही!
  पण हा जोक आवडला...त्यात तथ्य आहे...पुणेक्र टू व्हिलरच घेतील..कारण ती चालवायला अक्कल लागत नाही पुण्यात..;))
  लिहिन कधीतरी ह्यावर तपशीलात..:P

  ReplyDelete
 24. आंद्या,
  अरे ते कटू सत्य आहे पुणेरी रिक्षावाल्यांचं! ;)
  मुपीला पाठवला तर बहारदार कॉमेंट्सही येतील!;))

  ReplyDelete
 25. :D Lolzz...!!! Chaan aahe post...!!!

  ReplyDelete
 26. विभि भरपुर अभ्यास केला आहेस रे पुणेकरांचा....एकदम ढासू झाला आहे...:)

  ReplyDelete
 27. अरे कालच टाकली होती कमेंट.. गायब??.. असो.

  एकदम सही झालाय लेख. यावरून पुणेरी आमंत्रण आठवलं.. "एकदा आम्हाला तुम्हाला जेवायला बोलवायचंय" ;)

  ReplyDelete
 28. मैथिली,
  खूप धन्यवाद गं!

  ReplyDelete
 29. हाहा योगेश,
  अरे मी जन्माने पुणेकर...माझं आजोळ पुणं..खूप वेळा येतो मी पुण्याला..माझे ८०% नातेवाईक (दोन्हीकडचे) पुण्यातच...त्यामुळे पुणं फार जवळचं आहे!
  धन्यवाद!

  ReplyDelete
 30. अरे हेरंबा,
  नव्हती मिळाली रे तुझी कॉमेंट...ब्लॉअर हल्ली गंडतं कधीकधी..
  असो..
  पुणेरी आमंत्रण जबरा आहे....असंच दुसरं म्हणजे, "जेवूनच आला असाल!"(हे फार क्लिशे आहे ;) , पण असो).
  धन्यवाद!

  ReplyDelete
 31. Anonymous1:16 PM

  पुणेपुराण छान जमल आहे रे....अगदि लहानपणापासुनच माझ पुण्याशी काही सबंध नसुन सुदधा त्याच्याशी एक जवळच नात जडल आहे...आणि हया नात्याचा मला 'जाज्वल्य अभिमान' आहे...

  ReplyDelete
 32. देवेन,
  तुझं पुण्याशी त्यातही पुणेरी वाहतुकीशी नातं एव्हढं घट्ट कसं हे आम्हाला ठाऊक आहे! :P
  आणि जाज्वल्य अभिमान असणं साहजिक आहे...तूने पुणे का नमक खाया है! ;)
  धन्यवाद रे!

  ReplyDelete
 33. :D
  >आधी 'गाडी' घालण्यावरूनच त्यांना एकमेकांच्या पुणेकर असण्याची खात्री पटली असावी.
  Zakas..

  ReplyDelete
 34. पुणेरी आठवण चांगली वाटली ,आपल्या गावाचा अभिमान असावा हे न थोडके,लेख सुंदर वाटला,

  ReplyDelete
 35. मीनल,
  धन्यवाद. तू कदाचित बघितलेच असशील, पुण्यातले 'गाडी'चालक! :)

  ReplyDelete
 36. महेशकाका,
  अहो मला माझ्या मुंबईइतकाच, पुणे आणि सातारा ह्या दोन्ही माझ्या गावांचा 'जाज्वल्य अभिमान' वाटतो!
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 37. संकेत आपटे11:59 AM

  वा विद्याधरभाऊ वा.... तुमचं कोणतंही विनोदी लिखाण वाचताना पुलंची वारंवार आठवण येते. खूपच छान लिहितोस रे. मी आत्ता office मध्ये आहे आणि आजच्या पूर्ण दिवसात मी फक्त एकच काम केलं आहे. सकाळपासून मी फक्त तुझे blogs वाचतोय.

  ReplyDelete
 38. संकेत,
  अरे खूप मोठं कौतुक केलंस...त्यांचीच उष्टी-खरकटी वापरून लिहितो आम्ही..आठवण येणारच! :)
  खूप धन्यवाद रे...इतक्या दिलखुलास कॉमेंटसाठी!

  ReplyDelete