मी लहान होतो तेव्हा (हे मी कितव्यांदा लिहितोय ते आठवत नाहीये) मी एक छानशी गोष्ट ऐकली होती.
एकदा एका गावामध्ये सभा सुरू असते. सभा गावाच्या शाळेशेजारच्या मैदानावर सुरू असते. सभेचा विषय हा गावाच्या विकासाशी आणि भविष्याशी निगडीत असा महत्वाचा असतो. नुसतेच समाजधुरिण नाही, तर गावातल्या प्रत्येकानेच आवर्जून ऐकले पाहिजेत असे तज्ज्ञ, मान्यवर वक्ते सभेला आलेले असतात. सभा शांततेत आणि चांगल्या प्रकारे सुरू असते. एक महत्वाचा वक्ता उठून भाषणाला उभा राहतो. त्याचं भाषण सुरू असतानाच शाळेची मधली सुट्टी होते. मुलं बाहेर येऊन शाळेच्या अंगणात खेळ खेळायला लागतात. थोडासा गोंधळ घालायला लागतात. त्यामुळे सभेतल्या श्रोत्यांचं लक्ष तिकडे जातं आणि बरेचसे श्रोते मुलांच्या लीला पाहण्यात मग्न होतात. थोड्याच वेळात वक्त्याच्या हे लक्षात येतं. त्याचं भाषण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आलेलं असतं, पण हळूहळू जवळपास ८०% श्रोत्यांचं लक्ष विचलित झालेलं असतं. सभेचा नूर बघून एकदम वक्ता म्हणतो.
"आता मी एक गोष्ट सांगतो. तुमच्यापैकी कुणीच ही गोष्ट कधीच ऐकली नसेल."
गोष्ट शब्द ऐकताच अनेक श्रोत्यांचं लक्ष पुन्हा वक्त्याकडे जातं. वक्ता पुढे सुरू करतो.
"एकदा काय होतं. देवांचे गुरू बृहस्पती, एक चिमणी आणि एक मासा असे तिघेजण अरण्यामार्गे इंद्राकडे निघालेले असतात. रस्ता काट्याकुट्यांचा असतो. मजल दरमजल करत ते तिघे पुढे पुढे जात असतात."
आता हळूहळू सगळ्या श्रोत्यांचं लक्ष पुन्हा वक्त्याकडे वळतं.
"अचानक त्यांना रस्त्यात खूप मोठी नदी लागते. आता आली का पंचाईत. नदी पार कशी करायची? चिमणी उडते आणि थेट नदीच्या पलिकडे जाऊन पोचते. मासा पाण्यात झेपावतो आणि पोहत पोहत पलिकडे जाऊन पोचतो. आता ते दोघेजण बृहस्पतीकडे बघू लागतात."
श्रोते गोष्टीत पूर्णपणे शिरलेले असतात आणि ह्याच क्षणी वक्ता आपल्या भाषणातला महत्वाचा मुद्दा मांडून पुढच्या भाषणाला सुरूवात करतो.
लोक एकदम भांबावतात. ते एकदम गोंधळ सुरू करतात. वक्त्याला ही कल्पना असतेच, त्यामुळे तो लगेच थांबून काय झालं म्हणून विचारतो. लोक म्हणतात, "बृहस्पतीचं पुढे काय झालं सांगा?"
वक्ता म्हणतो, "जेव्हा माणसं महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फुटकळ गोष्टींकडेच लक्ष देण्यात किंवा फुटकळ गोष्टी करण्यात वेळ घालवणं बंद करतील, तेव्हा बृहस्पती आपोआप नदीपार पोहोचेल."
आता हेच बघा ना, आजच बातमी वाचली, गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा उभारणार आहेत. मोदीभाईंना मी मानतो, एक अतिशय उत्तम प्रशासक आहेत ते. पण हा निर्णय वाचून मला धक्काच बसला. इकडे आपल्याकडे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचाय. सगळे पुतळा पुतळा खेळणार आहेत. करोडो रुपयांचा चुराडा करायचा, तितकेच सगळ्यांनी घशात घालायचे आणि बांधायचे काय, तर पुतळे? आणि जास्त पुतळे पुतळे करू नका राव, तिकडे मायावती उत्तर प्रदेशात स्वतःचा एखादा भव्य पुतळा बांधेल. पूल, महामार्ग, धरणं वगैरे महत्वाच्या गोष्टी बांधता येतात, पण आपण फुटकळ गोष्टी बांधायच्या - पुतळे!
भारतीय वंशाच्या लोकांना जागतिक स्तरावर सन्मान मिळतात, आपलं पब्लिक त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जाणून बिणून घेत नाही, ते लोक भारतीय वंशाचे आहेत असं सांगत चार दिवस मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणून सांगत फिरतात. (आणि माझ्यासारखे ते भारतीय नाहीतच हे सगळ्या आजूबाजूच्यांना ओरडून समजावून सांगण्यात मग्न असतात.)
गेल्या निवडणुकीवेळी वाचलेला माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग. प्रियांका गांधी-वड्रा आपल्या मुलांना घेऊन कुठल्यातरी गावात प्रचाराला गेली होती. मुलांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं होतं. मुलं पांढरे कपडे घालून सगळ्यांना नमस्कार वगैरे करत होते. गावाच्या मुखियानं मुलांकडे बघून म्हटलं, "ये इंदिराजी की चौथी पिढी है। गुण तो दिखायी दे रहें हैं।"
आवरा. अरे चौथी पिढी म्हणून काय काहीही! आणि हे छापायचं? च्यायला इथे सिग्नलवरचं पोरही नमस्कार करून भीक मागतं, तिथे गुण नाही दिसत का?
संजय दत्त कोर्टाच्या फेर्या मारत होता, तेव्हा न्यूज चॅनेलवर त्याने आज त्याचा लकी निळा शर्ट घातलाय, आज त्याने काळा शर्ट घातलाय, आज त्याच्या हातात अंगठी होती हे सगळं दाखवत होते. च्यायला, मला तर डाऊट आहे बर्याच जणांना त्याच्यावर कसली केस चाललीय ते माहित नसेल. माझंच बघा, मला तो निळा शर्ट घालून हवालदाराला सलाम करत आत जाणारा संजय दत्त आठवतोय, पण त्याचं एग्झॅक्ट निकालपत्र आठवत नाहीये.
अबू सालेम क्लिन शेव्ह करून कोर्टात कसा चिकना दिसत होता, राहुल गांधीनं दाढी बाळगली, मग काढली मग पुन्हा बाळगली. आयला राहुल गांधीनं भाषणात काहीही चुका केल्या त्या दिसत नाहीत. आपलं पब्लिक म्हणजे काय विचारू नका!
आपल्याला २ ऑक्टोबरला गांधी आठवतात लालबहादूर शास्त्री आठवत नाहीत, लोकसभेत सोनिया चालते सावरकरांचं तैलचित्र चालत नाही, लालू लक्षात राहतो लोहिया लक्षात राहत नाहीत, निवडणुकांच्या दिवशी सुट्टी दिसते मतदान दिसत नाही, गुजरात दंगली लक्षात राहतात गोध्रा आणि दंगलीनंतरचा गुजरात लक्षात राहत नाही, रामदासांची जात दिसते (च्यायला इथेपण आणलं का मी) रामदास दिसत नाहीत, (रामदासांवरून आठवले) रामदास आठवले दिसतो बाबासाहेब आठवत नाहीत, आमच्या भागात संजय निरुपम दिसतो पण बिनखड्ड्याचा रस्ता दिसत नाही, अस्लम शेख आणि निरूपमचे बॅनर दिसतात झाडं दिसत नाहीत, टीव्हीवर जाहिराती दिसतात सिरियल्स दिसत नाहीत, सिरियल्समध्ये चकचकीत कपड्यातले स्त्रीपुरूष दिसतात स्टोरी दिसत नाही, आयपीएल घोटाळ्यात ललित मोदी लक्षात राहतो शरद पवार लक्षात राहत नाहीत ('आयपीएल घोटाळ्यात' असं मुद्दाम लिहिलं नाहीतर शरद पवार कसे लक्षात राहणार नाहीत, एकवेळ सावरकरांना विसरतील लोक पण शरद पवारांना शक्यच नाही), आयपीएल दिसते चीअरलीडर्स दिसत नाहीत, दबंगमध्ये पडदाभर सलमान दिसतो सोनाक्षी दिसत नाही, गोलमाल-३ च्या प्रोमोमध्ये जास्तवेळ प्रभुजी दिसत नाहीत, कपुच्चिनो दिसतं सकस गरम दूध दिसत नाही, जेवताना पिझ्झा दिसतो सलाड दिसत नाही.
छ्या! बघा ह्या पोस्टमध्येसुद्धा बृहस्पती पार होता होता राहिले!