मी लहान होतो तेव्हा (हे मी कितव्यांदा लिहितोय ते आठवत नाहीये) मी एक छानशी गोष्ट ऐकली होती.
एकदा एका गावामध्ये सभा सुरू असते. सभा गावाच्या शाळेशेजारच्या मैदानावर सुरू असते. सभेचा विषय हा गावाच्या विकासाशी आणि भविष्याशी निगडीत असा महत्वाचा असतो. नुसतेच समाजधुरिण नाही, तर गावातल्या प्रत्येकानेच आवर्जून ऐकले पाहिजेत असे तज्ज्ञ, मान्यवर वक्ते सभेला आलेले असतात. सभा शांततेत आणि चांगल्या प्रकारे सुरू असते. एक महत्वाचा वक्ता उठून भाषणाला उभा राहतो. त्याचं भाषण सुरू असतानाच शाळेची मधली सुट्टी होते. मुलं बाहेर येऊन शाळेच्या अंगणात खेळ खेळायला लागतात. थोडासा गोंधळ घालायला लागतात. त्यामुळे सभेतल्या श्रोत्यांचं लक्ष तिकडे जातं आणि बरेचसे श्रोते मुलांच्या लीला पाहण्यात मग्न होतात. थोड्याच वेळात वक्त्याच्या हे लक्षात येतं. त्याचं भाषण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आलेलं असतं, पण हळूहळू जवळपास ८०% श्रोत्यांचं लक्ष विचलित झालेलं असतं. सभेचा नूर बघून एकदम वक्ता म्हणतो.
"आता मी एक गोष्ट सांगतो. तुमच्यापैकी कुणीच ही गोष्ट कधीच ऐकली नसेल."
गोष्ट शब्द ऐकताच अनेक श्रोत्यांचं लक्ष पुन्हा वक्त्याकडे जातं. वक्ता पुढे सुरू करतो.
"एकदा काय होतं. देवांचे गुरू बृहस्पती, एक चिमणी आणि एक मासा असे तिघेजण अरण्यामार्गे इंद्राकडे निघालेले असतात. रस्ता काट्याकुट्यांचा असतो. मजल दरमजल करत ते तिघे पुढे पुढे जात असतात."
आता हळूहळू सगळ्या श्रोत्यांचं लक्ष पुन्हा वक्त्याकडे वळतं.
"अचानक त्यांना रस्त्यात खूप मोठी नदी लागते. आता आली का पंचाईत. नदी पार कशी करायची? चिमणी उडते आणि थेट नदीच्या पलिकडे जाऊन पोचते. मासा पाण्यात झेपावतो आणि पोहत पोहत पलिकडे जाऊन पोचतो. आता ते दोघेजण बृहस्पतीकडे बघू लागतात."
श्रोते गोष्टीत पूर्णपणे शिरलेले असतात आणि ह्याच क्षणी वक्ता आपल्या भाषणातला महत्वाचा मुद्दा मांडून पुढच्या भाषणाला सुरूवात करतो.
लोक एकदम भांबावतात. ते एकदम गोंधळ सुरू करतात. वक्त्याला ही कल्पना असतेच, त्यामुळे तो लगेच थांबून काय झालं म्हणून विचारतो. लोक म्हणतात, "बृहस्पतीचं पुढे काय झालं सांगा?"
वक्ता म्हणतो, "जेव्हा माणसं महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फुटकळ गोष्टींकडेच लक्ष देण्यात किंवा फुटकळ गोष्टी करण्यात वेळ घालवणं बंद करतील, तेव्हा बृहस्पती आपोआप नदीपार पोहोचेल."
आता हेच बघा ना, आजच बातमी वाचली, गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा उभारणार आहेत. मोदीभाईंना मी मानतो, एक अतिशय उत्तम प्रशासक आहेत ते. पण हा निर्णय वाचून मला धक्काच बसला. इकडे आपल्याकडे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचाय. सगळे पुतळा पुतळा खेळणार आहेत. करोडो रुपयांचा चुराडा करायचा, तितकेच सगळ्यांनी घशात घालायचे आणि बांधायचे काय, तर पुतळे? आणि जास्त पुतळे पुतळे करू नका राव, तिकडे मायावती उत्तर प्रदेशात स्वतःचा एखादा भव्य पुतळा बांधेल. पूल, महामार्ग, धरणं वगैरे महत्वाच्या गोष्टी बांधता येतात, पण आपण फुटकळ गोष्टी बांधायच्या - पुतळे!
भारतीय वंशाच्या लोकांना जागतिक स्तरावर सन्मान मिळतात, आपलं पब्लिक त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जाणून बिणून घेत नाही, ते लोक भारतीय वंशाचे आहेत असं सांगत चार दिवस मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणून सांगत फिरतात. (आणि माझ्यासारखे ते भारतीय नाहीतच हे सगळ्या आजूबाजूच्यांना ओरडून समजावून सांगण्यात मग्न असतात.)
गेल्या निवडणुकीवेळी वाचलेला माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग. प्रियांका गांधी-वड्रा आपल्या मुलांना घेऊन कुठल्यातरी गावात प्रचाराला गेली होती. मुलांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं होतं. मुलं पांढरे कपडे घालून सगळ्यांना नमस्कार वगैरे करत होते. गावाच्या मुखियानं मुलांकडे बघून म्हटलं, "ये इंदिराजी की चौथी पिढी है। गुण तो दिखायी दे रहें हैं।"
आवरा. अरे चौथी पिढी म्हणून काय काहीही! आणि हे छापायचं? च्यायला इथे सिग्नलवरचं पोरही नमस्कार करून भीक मागतं, तिथे गुण नाही दिसत का?
संजय दत्त कोर्टाच्या फेर्या मारत होता, तेव्हा न्यूज चॅनेलवर त्याने आज त्याचा लकी निळा शर्ट घातलाय, आज त्याने काळा शर्ट घातलाय, आज त्याच्या हातात अंगठी होती हे सगळं दाखवत होते. च्यायला, मला तर डाऊट आहे बर्याच जणांना त्याच्यावर कसली केस चाललीय ते माहित नसेल. माझंच बघा, मला तो निळा शर्ट घालून हवालदाराला सलाम करत आत जाणारा संजय दत्त आठवतोय, पण त्याचं एग्झॅक्ट निकालपत्र आठवत नाहीये.
अबू सालेम क्लिन शेव्ह करून कोर्टात कसा चिकना दिसत होता, राहुल गांधीनं दाढी बाळगली, मग काढली मग पुन्हा बाळगली. आयला राहुल गांधीनं भाषणात काहीही चुका केल्या त्या दिसत नाहीत. आपलं पब्लिक म्हणजे काय विचारू नका!
आपल्याला २ ऑक्टोबरला गांधी आठवतात लालबहादूर शास्त्री आठवत नाहीत, लोकसभेत सोनिया चालते सावरकरांचं तैलचित्र चालत नाही, लालू लक्षात राहतो लोहिया लक्षात राहत नाहीत, निवडणुकांच्या दिवशी सुट्टी दिसते मतदान दिसत नाही, गुजरात दंगली लक्षात राहतात गोध्रा आणि दंगलीनंतरचा गुजरात लक्षात राहत नाही, रामदासांची जात दिसते (च्यायला इथेपण आणलं का मी) रामदास दिसत नाहीत, (रामदासांवरून आठवले) रामदास आठवले दिसतो बाबासाहेब आठवत नाहीत, आमच्या भागात संजय निरुपम दिसतो पण बिनखड्ड्याचा रस्ता दिसत नाही, अस्लम शेख आणि निरूपमचे बॅनर दिसतात झाडं दिसत नाहीत, टीव्हीवर जाहिराती दिसतात सिरियल्स दिसत नाहीत, सिरियल्समध्ये चकचकीत कपड्यातले स्त्रीपुरूष दिसतात स्टोरी दिसत नाही, आयपीएल घोटाळ्यात ललित मोदी लक्षात राहतो शरद पवार लक्षात राहत नाहीत ('आयपीएल घोटाळ्यात' असं मुद्दाम लिहिलं नाहीतर शरद पवार कसे लक्षात राहणार नाहीत, एकवेळ सावरकरांना विसरतील लोक पण शरद पवारांना शक्यच नाही), आयपीएल दिसते चीअरलीडर्स दिसत नाहीत, दबंगमध्ये पडदाभर सलमान दिसतो सोनाक्षी दिसत नाही, गोलमाल-३ च्या प्रोमोमध्ये जास्तवेळ प्रभुजी दिसत नाहीत, कपुच्चिनो दिसतं सकस गरम दूध दिसत नाही, जेवताना पिझ्झा दिसतो सलाड दिसत नाही.
छ्या! बघा ह्या पोस्टमध्येसुद्धा बृहस्पती पार होता होता राहिले!
:) :) :)
ReplyDeleteशेवटचा परिच्छेद आवडला पण शेवट किंचित भरकटल्यासारखा वाटला. पण भापो.. हरकत नाय. बृहस्पती पार होतीलच.. एकाच पोस्टीत झाले पाहिजेत अशी अट थोडीच आहे? ;)
वाह रे, गोष्ट छानच आहे. (बाय द वे, पोस्ट कशाबद्दल होता? ;) :P just kiddin) अरे तो बृहस्पती पाण्यात जरी उतरला ना तरी आपली जनता पिटाळून पुन्हा काठावर आणुन उभी करते. त्याशिवाय का व्यवहार आणि राजकारण चालणार.
ReplyDeleteहंऽऽऽ... Agree with हेरंब. शेवटचा परिच्छेद भरकटला आहे बराच. पण असो. बाकी लेख चांगला आहे. :-)
ReplyDeleteसही बाबा...
ReplyDeleteनशीब बृहस्पतीच्या वेळी ही राजकारणी मंडळी नव्हती नाय तर काय झाला असता त्या नदीच, माश्याच आणि चिमणीच ;)
बृहस्पतीच्या गोष्टीचा आधार घेत केलेली पोस्ट मनाची पकड घेते. छान आहे
ReplyDeleteमायावतीने तर स्वता:च्या पुतळ्यांचा कारखाना काढलाय. मिडियाला कशाला शिव्या घाला? संजय सलमानवर कितीही केसेस चालू असल्या तरी त्यांचे चित्रपट हाउसफुल्ल करणारे आपणच. इतकच कशाला थोडा थांब, CWG यशस्वी पार पडले म्हणून कलमाडी कॉलर ताठ करून स्वता:ची मिरवणूक काढून घेईल की नाही बघ. ये है इंडिया मेरी जान. इधर ऐसाच चलता.
ReplyDeleteबाकी सलाड्बद्दल काही बोलू नको. हेरंबने ताजी पोस्ट लिहाली आहे त्यावर.
hmmmmm.
ReplyDeleteहळूहळू पकड घेते पोस्ट.
आणि आपली नजर कमजोरच आहे मुळी!....त्यामुळे हे असं आपल्याला काही दिसत नाही!! आणि कितीही ऑपरेशन्स करा! दृष्टी सुधारण्याची सुतराम शक्यता दिसत नाही!
हेरंबा,
ReplyDeleteअरे शेवट भरकटला म्हणूनच तर बृहस्पती पार होता होता राहिले ;)
सौरभ,
ReplyDeleteपोस्ट वाकडे तिकडे विचार एकाच पोस्टीत कोंबण्यासाठी घातलेला घाट आहे! :)
आणि हो व्यवहार आणि राजकारण तर चालायलाच हवं नाही का रे, बृहस्पती पार होण्याने आपले प्रश्न सुटणार थोडेच आहेत! ;)
संकेत,
ReplyDeleteहेरंबला उत्तर दिलं बघ रे मी!
सुहास,
ReplyDeleteहाहाहा...भारीच मी हा विचार केला नव्हता...
नदी, चिमणी आणि माशाचाही गेम झाला असता ;)
अनुजाताई,
ReplyDeleteखूप धन्यवाद गं! :)
सिद्धार्थ,
ReplyDeleteहो ना रे भाऊ! तीन बोटं नेहमीच आपल्याकडे असतात! शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे आपल्याला! :(
आणि हो..अरे सलाड जाम आवडतं रे मला!.. पण पिझ्झा मेरी जान है! ;)
अनघा,
ReplyDeleteआपली नजर आणि स्मरणशक्ती दोन्ही क्षीण आहेत...वाईट वाटतं! आणि अपराधीही वाटतं!
गोष्ट आणि पोस्ट दोन्ही मस्त बर का ;)
ReplyDeleteविक्रम,
ReplyDeleteधन्यवाद भौ! :)
काय करणार? आपण असेच आहोत!
ReplyDeleteसविताताई!
ReplyDelete:-|
वा! बाबा मस्तच!पोस्ट भयानक आवडली!
ReplyDeleteमला पोस्ट जबरीच आवडली.. शेवटी तुझ्या रागाचं रुपांतर हतबलतेत आणि तिथुन पुढं हास्य कारुण्यापर्यंत पोचलं.. भापो... पुढार्यांना हे होईलच याची चांगली खात्री आहेच :(
ReplyDelete>> आयपीएल दिसते चीअरलीडर्स दिसत नाहीत, दबंगमध्ये पडदाभर सलमान दिसतो सोनाक्षी दिसत नाही
हे १००% मान्य...
छान संपूर्ण लेख आवडला , शेवटचा परिच्छेद योग्यच आहे... बृहस्पतीही कधीतरी नदी पार करणारच ; प्रश्न आहे तो बिचाऱ्या माश्याचा नदी येईपर्यंत तो कुठे होता आणि - - - - वगैरे....
ReplyDeleteमस्त पोस्ट!! आवडली !!!किती तक्रारी करणार ?? अरे हे फक्त भारतात होत नाही रे !! सगळीकडे एकच पुराण ! मिडिया जे दाखवते ते बघतो !! बतम्यांचं म्हणशील तर ती प्रत्येक पेपरला वेगळ्या पद्धतीने छापून येते.. आणि तुला जे बघायचे ते तुला दिसेल.जग सुंदर की वाईट तुझ्या दृष्टीवर आहे ना..इतका हतबल होऊन फायदा नाही रे.. हा मनुष्य स्वभाव आहे.. आपणच नकळत किती फुटकळ गोष्टी करत असतो..हे असेच चालत राहणार.. be cool..
ReplyDelete>>आपल्याला २ ऑक्टोबरला गांधी आठवतात लालबहादूर शास्त्री आठवत नाहीत<<
महात्मा गांधी फुटकळ आहेत असं म्हणायचं का तुला ?? दोघेही महानच आहेत. एका महान व्यक्तीला आठवतो दुसर्याला विसरतो म्हण.. एका फुटकळ व्यक्तीला आठवतो मात्र महान माणसाला विसरतो असा अर्थ निघतो वरच्या वाक्यातून. कारण बाकीची वाक्ये त्याच अर्थाची आहेत पण बरोबर आहेत.
शेवटचे वाक्य कातील..
विनायकजी,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत!
खूप खूप आभार! असाच लोभ राहू द्या!
आनंद,
ReplyDeleteतुझ्यापर्यंत भावना पोचल्या...भरून पावलो (हे पुणेरी नाहीये ;) ) !!!
शिवचंद्रजी,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत!
माश्याचा प्रश्न मलाही लहान असताना पडला होता...पण कदाचित देवगुरूंबरोबरचा मासा म्हणून त्याला पाण्याबाहेरही श्वास घेणारे स्पेशल कल्ले असतील म्हणून सोडून दिला ;)
प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
असेच भेट देत राहा!
संकेत,
ReplyDeleteअरे मी कूलच आहे...रादर आपण सगळेच कूल आहोत...फक्त आपल्यावर कायमचं थंड होण्याची पाळी येऊ नये असं वाटत राहतं..मग काहीबाही लिहितो.. :)
आणि तुझ्या भावनांची कदर करूनच सांगतो..माझ्यामते गांधी महान नव्हते. गांधींकडे माणसं जोडण्याची अमोघ कला होती. ते फुटकळ होते असं म्हणत नाही मी..पण माझ्यासाठी गांधींपेक्षा लालबहादूर शास्त्रींनी केलेलं कार्य जास्त मोठं आणि महत्वाचं होतं!
पुन्हा सांगतोय, मला तुला दुखवायचं नाही!!
खूप आभार रे!
मला आवडली रे पोस्ट.सगळे मुद्दे इकडे तिकडॆ भरकटत असतांनाही सुरुवातीला दिलेल्या बृहस्पतींच्या गोष्टीमुळे कॉन्स्ट्रेशन जाउ दिल नाही...तु ही पोस्ट कशाला लिहलीस ते माहित पडल रे मला....
ReplyDelete>>गोलमाल-३ च्या प्रोमोमध्ये जास्तवेळ प्रभुजी दिसत नाहीत....हयाच रागातुन ही पोस्ट जन्माला आली आहे... :)
>>>>> :) :) :)
ReplyDeleteशेवटचा परिच्छेद आवडला पण शेवट किंचित भरकटल्यासारखा वाटला. पण भापो.. हरकत नाय. बृहस्पती पार होतीलच.. एकाच पोस्टीत झाले पाहिजेत अशी अट थोडीच आहे? ;)
अक्षरश: असेच म्हणायचेय मला... बाकि वर देव म्हणतोय तेच खरे प्रभुजी आणि सोनाक्षीमूळे आलेला राग आणि उगाच बिचाऱ्या राहूलला धारेवर धरतोस...त्याची आई रागावली ना, माहेरवाला तू....
हमारे देश मे(पॉज)..... ऐसी बातें (पॉज) ....हम बरदाश्त नही करेंगे (पॉज)..... ऐसे ब्लॉग बनाकर (पॉज).... कुछ लोग(पॉज).... गलतफहमियाँ पैदा कर रहें हैं!!! आदरणीय लालबहादूर शास्त्रीजी (....) आदरणीय रामदासजी और (पॉज) आदरणीय बृहस्पतीजीका का नाम लेके (पॉज)..... ये लोगोंको गुमराह करनेकी (पॉज).... कोशीश कर रहे है!!! :)
(आवरा... हे मी स्वत:ला म्हणतेय :) )
देवेन,
ReplyDeleteजगात किती डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि आपण किती सहजगत्या डिस्ट्रॅक्ट होतो हेच सांगायचं होतं. बरेचदा विस्कळितपणातही अर्थ सामावलेला असतो..
रोहित शेट्टीला प्रभुजी मोठ्या मनाने माफ करतीलही...पण आम्ही माफ करू असं वाटत नाही! ;)
तन्वीताई,
ReplyDeleteकिती सहजगत्या भरकटतो आपण महत्वाचा मुद्द्यांपासून नै!!
बृहस्पती जर माझ्या पोस्टमध्येच पार झाले असते, तर मी पोस्ट लिहिण्याला अर्थच उरला नसता! :)
बाकी बर्याच वड्यांचं तेल वेगवेगळ्या वांग्यांवर पडलं हे मात्र खरं ;)
तुझा शेवटचा परिच्छेद मात्र मला फतव्याच्या दिशेने जाताना दिसतोय, राईट अलाईन करायला हवा होतास! :D
विभि ...मस्त रे..आवडली पोस्ट...
ReplyDeleteBJP (भावना जोरात पोहचल्या)
विद्याधर, लालबहादूर शास्त्री आणि वल्लभभाई पटेल! त्यांना नको विसरूया आपण. :)
ReplyDeleteBhareey re !
ReplyDeleteGoshtishee meL ghaloon tar shevatacha para mastach ahe
"एकवेळ सावरकरांना विसरतील लोक पण शरद पवारांना शक्यच नाही" - १००% पटलं! बृहस्पतीची गोष्ट आवडली. आणि जाणून बाजून पोस्ट भरकटवलेल पण आवडलं :)
ReplyDeleteयोगेशा,
ReplyDeleteहे भारी होतं... BJP...
कॉलेजात असले ग्रुप असायचे...मराठी वाक्यांचे इंग्रजी शॉर्टफॉर्मवाले!!!
लय भारी एकदम....
धन्यवाद भाऊ!
अनघा,
ReplyDeleteखरंच ह्यावेळेस मला स्वतःला लालबहादूर शास्त्रींबद्दल २ ऑक्टोबरला संध्याकाळी आठवलं आणि स्वतःचीच लाज वाटली!
वल्लभभाईंना तर विसरणं शक्यच नाही..हैदराबाद म्हटलं की वल्लभभाईच येतात आधी डोळ्यांसमोर! :)
यॉडॉ भाई,
ReplyDeleteबर्याच दिवसांनी दिसलास! खूप बरं वाटलं!
आज सकाळीच काहीतरी वाचत होतो तेव्हा तुझा 'सगळ्यांत वाईट व्यसन अध्यात्माचं' वाला ब्लॉग आठवला होता..आणि संध्याकाळी तुझी कॉमेंट दिसली...योगायोग!!
खूप धन्यवाद रे भाऊ!
निरंजन,
ReplyDeleteअहो, कटू सत्य जाम दाहकसुद्धा असतं ते असं :(
चालायचंच!!
खूप खूप धन्यवाद!
अरे लोकांना इतके काही दिसते की ते काय काय बघणार??? :) मग जे सोपे तितके बघतात बाकी जटील म्हणजेच महत्वाचे सोडून देतात.. :)
ReplyDeleteहे पोस्ट मस्त होतं - रिकर्सिव्ह होतं त्यामुळे अधिक आवडलं :)
ReplyDeleteरोहन,
ReplyDeleteते ही खरंच आहे म्हणा! फिल्टरिंग हे होतंच असतं. प्रत्येकाचा फिल्टर वेगळा! :)
ओंकार,
ReplyDeleteवेगळ्या पद्धतीनं लिहायचा एक प्रयत्न करून पाहिला. :)
लय आभारी आहे रे भौ!
baba aapale sarva lekh mi niyamit vachato. changale asataat. kase suchate he?
ReplyDeleteडॉ. करंजेकर,
ReplyDeleteअसं कुणी नियमित वाचक आहे म्हणून सांगितलं की खूप खूप आनंद होतो. अहो, असंच काहीतरी सुचतं ते लिहितो. तुम्ही इतकं आवर्जून सांगितलंत, खूप आनंद झाला.
खूप आभार!