Showing posts with label सण. Show all posts
Showing posts with label सण. Show all posts

11/26/2010

माझे सणजीवन -२

भाग १ पासून पुढे

त्यानंतर येते वर्षप्रतिपदा अर्थात मराठी नववर्षदिन. गुढीपाडवा. गुढीपाडव्याला मला फारसं काही खास वाटत नसलं, तरी गुढी उभारणं आणि त्यावर लागलेली ती साखरेची पदकं खाण्याची संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहणं ह्यासाठी तो दिवस मला चांगलाच लक्षात राहिलाय. मला ती साखरेची पदकं दोर्‍यावरून खायला जाम म्हणजे जाम मजा वाटते. अजूनी. पण गेल्या काही वर्षांपासून ती संधी हुकतेय. काहीतरी गोडधोड बनतं, ते खायचं आणि एन्जॉय करायचं. तसा मस्त असतो हा सणपण. पण जास्त लिहिण्यासारख्या ती पदकं सोडल्यास काही आठवणी नाहीत.
गुढीपाडव्यानंतर आमच्या घरी वेध लागतात ते हनुमान जयंतीचे. हनुमान जयंती आमच्या कुटुंबात शंभरहून जास्त वर्षं साजरी केली जातेय. हनुमान आमचं मानलेलं कुलदैवत आहे असं कधीतरी बाबा सांगत होते. त्यामुळे आमच्यात हनुमान जयंतीचं प्रस्थ असतं. हनुमान जयंतीच्या सात दिवस आधीपासून घरातल्याच हनुमानाची सेपरेट प्रतिष्ठापना करतात आणि त्याच्याशेजारी सात दिवस सलग एक समई तेवत ठेवतात. मला लहानपणापासून त्या विझू न देण्याच्या समयीबद्दल जाम कुतूहल वाटतं. ती विझू नये म्हणून सात दिवस त्या खोलीतला पंखा बंद. सहसा प्रतिष्ठापना हॉलमध्ये. पुन्हा हनुमान जयंती उन्हाळ्यातच, आणि कहर म्हणजे टीव्ही हॉलमध्ये. सात दिवस फुल गेम. एका वर्षी पाहुणे आले होते कुणीतरी. तर आतमध्ये झोपताना मला आणि भावाला जाम छोट्याशा जागेत झोपण्याची पाळी आली होती. मग मी म्हटलं, मी झोपतो हॉलमध्ये आणि मोठ्या धैर्याने उकाड्याला सामोरा गेलो. अर्धी रात्र बिन झोपेचा, घामाघूम तळमळत होतो. नशीबाने पाहुणे एकच रात्र आधी आले होते. आणि जयंतीच्या दिवशी पहाटे सगळे लवकर उठतात. मोठे उठल्यावर मी पटकन आत जाऊन पंख्याखाली तासभराची एक्स्ट्रा झोप घेतली होती.
पण एव्हढं सगळं असलं तरी हनुमान जयंती म्हटली की माझ्या डोळ्यासमोर आधी चणे आणि गुळाची खिरापतच येते. मस्त मजा यायची नेहमीच. सात दिवस आरत्या म्हणायच्या. ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी मी कधीतरी हट्ट करून बाबांसारखं सोवळं नेसायचो, हट्टाने आरतीचं ताट धरायचो (हट्ट अति होत होता नै..पण आता समजून काय उपयोग!) अजूनी आई-बाबा तसेच हनुमान जयंती साजरी करतात. ज्या आत्यांना जमतं त्या जयंतीच्या दिवशी येऊन जातात. हनुमान जयंती तसा मोठा सण नसल्याने आणि महत्वाचं म्हणजे 'बँक हॉलिडे' नसल्याने सगळ्यांनाच येणं जमत नाही. पण माझ्या सणजीवनाचा हनुमान जयंती हा एक अविभाज्य घटक आहे.
हे सगळे पूर्वार्धातले सण. त्यानंतर थेट येतो तो गणेशोत्सव. म्हणजे मधे असतील काही पण माझ्या विशेष लक्षात राहिलेत असं काही सुचत नाहीये. पण गणेशोत्सव मात्र चांगलाच म्हणजे चांगलाच लक्षात राहतो. आमच्या घरी गौरी-गणपती असतात. म्हणजे ज्या दिवशी गौरी जातात, त्याच दिवशी गणपती. पण मजा भरपूर येते. घरात मोठ्या प्रमाणावर पक्वान्न बनतात. माझे आवडते उकडीचे मोदक बनतात. पाच-सहा दिवस सण असल्यासारखं वाटतं. हट्टाने पूजा करायला किंवा सांगायला बसणे हा माझा लहानपणापासूनचा शिरस्ता आहे (हट्ट फार झालाय ना लेखातसुद्धा). मग हळूहळू जसाजसा मोठा झालो, तसतसा समजूतदारपणे वडिल जे सांगती ते करू लागलो. पण असं आहे ना, की जेव्हा पूजा चालू असते, तेव्हा जर मी तिथे इन्व्हॉल्व्ह नसेन, तर मला प्रचंड कंटाळा येतो. आई पोहे वगैरे काहीतरी बनवत असते आणि मला भूक लागलेली असते. पण काही खाता येत नाही. पूजा हॉलमध्ये, टीव्ही तिकडे. फुल बोर होतं. त्यामुळे पूजेत बसणं, कुठल्याही भूमिकेत हे नेहमीच सोयीस्कर!
एकदा पहिली पूजा झाली, की मग सकाळ संध्याकाळच्या आरत्या, प्रत्येक आरतीच्या वेगवेगळ्या प्रसांदांमध्ये मला लहानपणापासूनच आरतीपेक्षा जास्त इंटरेस्ट राहिलेला आहे. लहान असताना एकदा मित्राच्या घरी त्याच्या वडिलांनी रात्रभर जागून वगैरे केलेली आरास पाहिली होती. मित्र आणि त्याचे वडिल व काका नेहमी एक अख्खी रात्र जागून आरास करायचे, ह्याचं मला अप्रूप वाटायचं. आमच्या घरी एकदम साधं प्रकरण. एखादा काहीतरी स्टिकर आणून लावायचा. बाकी दोन समया आणि चांगलंस उपरणं गणपतीला, बास. कारण आमच्यात कलाकार कुणीच नाही. पण मला एकदा खूप म्हणजे खूप न्यूनगंड म्हणतात तो झाला. म्हटलं, ह्यावर्षी आपण पण आरास करायची. आई-बाबांनी थोडं समजावून पाहिलं. पण मी बधलो नाही. ते नाईलाजानेच काही थर्मोकोलच्या गोष्टी घेऊन आले. मलापण रात्रभर जागून आरास करायची होती. प्रत्यक्षात आई-बाबांनी रात्रभर जागण्याएव्हढं सामान हुशारी करूनच आणलं नव्हतं. एक डोक्यामागे लावायचं दिवे लावलेलं फिरणारं चक्रही आणायला मी बाबांना भाग पाडलं होतं. जे काही आणलं होत त्यात मी माझ्या अप्रतिम कलाकुसरीने वाकडं तिकडं कापून थोडंफार वाया घालवल्यावर आई म्हणाली, 'केलीस तेव्हढी मेहनत खूप केलीस' आता जाऊन झोप. बाबा माझ्यासारखेच कलाशत्रू. त्यातल्यात्यात माझ्या आईच्या हातात कला आहे. तिनं आपलं जागून कसंतरी काहीतरी बरं दिसेलसं उभं केलं.  मला मिळायचा तो धडा मिळाला होता. त्यानंतर आई-बाबा जी छोटीशी सजावट करतात (आईच करते, बाबा टीपी करतात) त्यात गणपती आणि मी दोघेही समाधान मानतो. त्यावेळेस आणलेले मखराचे खांब अजूनी कुठल्यातरी माळ्यावर पडलेले असतील, किंवा फेकून दिले असतील. गंमतच होती सगळी! अजूनही कुठे कुठे केलेली आरास, मखर पाहतो, तेव्हा हे सगळं डोळ्यांपुढे येतं.
गणपती संपल्यावर येते नवरात्र. नवरात्राचं माझ्या जीवनात वेगळंच स्थान आहे ते दोन गोष्टींमुळे (आता तुम्ही म्हणाल प्रत्येकच सणाचं वेगळं स्थान आहे. पण आहे तर काय करू!) एक म्हणजे आमच्या पहिल्या घराशेजारी, जिथे मी नववीपर्यंत राहिलो, एक मैदान आहे. जे नवरात्रीत गरबा-दांडियासाठी भाड्यानं दिलं जातं. एकेकाळी तिथला दांडिया खूप फेमस होता. जॉनी लीव्हर वगैरे फेमस असताना तिथे येऊन गेलेला होता. असो. तर तिथे रात्रभर दंगा चालत असे. त्यावेळी रात्री दहा वगैरेंची बंधनं नव्हती. त्यामुळे ते भगभगलेले दिवे आणि रात्रभर येणारा प्रचंड आवाज अजूनही मला आठवतात. आम्हाला सगळ्यांनाच त्या गोंगाटाची इतकी सवय झालेली होती, की आम्ही अत्यंत सहजगत्या त्या गोंगाटात झोपू शकायचो. तिथे मिळालेल्या ह्या ट्रेनिंगमुळेच आमच्यातलं कुणीही, कितीही आवाजामध्ये झोपू शकतं. झोपायसाठी शांतता लागते म्हणणारे भेटले की हसू येतं. एव्हढं शेजारीच मैदान असून मी कधी दांडियाला गेल्याचं आठवत नाही. कदाचित एकदा कधीतरी कुणातरी ओळखीच्यांकडच्या इमारतीत गेलो असेन पण खरंच आठवत नाही.
नवरात्रीचं आयुष्यात स्थान असण्याचं दुसरं कारण म्हणजे मी शाळेत असताना, बहुतेक चौथी-पाचवीत होतो, आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये आमच्या वर्गशिक्षिकेनं आमच्या वर्गाचं दांडिया नृत्य बसवलं होतं. त्यांनी काय समजून माझी निवड केली होती मला ठाऊक नाही, पण मी त्यात होतो. दांडिया येत नव्हता, फक्त त्यावेळी वाजणारी गाणी माहित होती. मी नक्कीच बर्‍यापैकी चांगलं सादरीकरणही केलं असावं बहुदा. ते एव्हढं लक्षात नाही. पण नाच झाल्यावर आम्हा सहभागी मुलांना नाष्ट्याचं कूपन दिलं गेलं होतं आणि काही गडबडीमुळे ते मला मिळालं नाही. मग आमच्या वर्गशिक्षिकेनं त्यांना मिळालेलं कूपन माझ्या हातात दिल्याचं आठवतं! छ्या राव, जाम नॉस्टॅल्जिक व्हायला होतं कधीकधी! कशावरून काय आठवेल ना, त्याचा नेम नाही.
हे सगळं सोडलं तर आमच्या घरामध्ये नवरात्र म्हणजे घटस्थापना आणि नऊ दिवस उगवणारी ती नाजूकशी रोपं! रोज त्याच्यावर एक एक माळ आई चढवायची. त्याचीही एक वेगळी गंमत वाटायची. पण अशाच एका नवरात्राच्या दुसर्‍या माळेला माझी आजी (माझ्या आईची आई) गेली होती. मला धूसरसंच आठवत होतं. पण नुकतंच आईशी बोलणं झाल्यानं आत्ता चांगलंच लक्षात आहे.
त्यानंतर येतो खरा मोठा गेम. दिवाळी. ज्यावरून हा सगळाच लेखनप्रपंच सुरू केलाय. दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठीच पर्वणी. देशात जवळपास सर्व भागांमध्ये सारख्याच उत्साहाने साजरा केला जाणारा बहुतेक देशातला सर्वांत मोठा सण. लहानपणापासून दिवाळी म्हणजे अभ्यंगस्नान, फराळ आणि फटाके सर्वप्रथम आठवतात. आईनं उटणं लावून घातलेलं अभ्यंगस्नान म्हणजे दिवाळीची खरी सुरूवात. शाळेची दिवाळीची सुट्टी खूप आधी सुरू झालेली असायची. दिवाळीचा अभ्यास आणि फंड उभा करण्यासाठी खपवायला दिलेलं वीस तिकिटांचं पुस्तक घेऊन सहामाही परीक्षा संपवून आम्ही घरी यायचो. वेगळेच दिवस होते. अगदी शाळा संपण्याचा दोनेक वर्षं आधी अक्कल आली की परीक्षा संपल्यासंपल्याच दिवाळीचा अभ्यास उरकून ठेवावा, म्हणजे सुट्टी मजेत जाते. नाहीतर आम्ही मूर्खासारखे सुट्टी संपत आली की एकतर सहामाहीचा निकाल आणि दिवाळीचा अभ्यास ह्या दुहेरी भीतीनं कावरेबावरे होत असू. ती पावतीपुस्तकं इमारतीतल्याच काका लोकांच्या माथी तिकिटं मारून आम्ही संपवत असू.
दिवाळीचे वेध लागले की फटाक्यांची दुकानं ओव्हरटाईममध्ये चालायची. बाबांच्या मागे लागून (इथे हट्ट नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी) आमची वरात (मी, दादा आणि बाबा) फटाक्यांच्या दुकानात. तिथे तुफान गर्दी! मग त्या काऊंटरवरून छापलेला फॉर्म घ्यायचा. कुठले फटाके किती हवेत हे त्यात भरायचं. आमचं बजेट ठरलेलं असायचं नेहमी. त्यामुळे जास्त वेळ लागायचा नाही. तसा मी बालपणापासून फटाक्यांच्या बाबतीत घाबरट होतो. अगदी सहावी सातवीपर्यंत मी लक्ष्मीबॉम्ब आणि सुतळीबॉम्बला बिचकूनच असायचो. माझी झेप म्हणजे झाडं (अनार) आणि भुईचक्र आणि रॉकेट्स! त्यातल्यात्यात रॉकेट उडवणं हे मला एकदम शौर्याचं लक्षण वाटायचं. मग हळूहळू ह्या फोबियातूनही बाहेर आलो. सगळे फटाके निर्धास्त उडवू लागलो. पण एकंदरच आमच्यात जास्त फटाके आणण्याची पद्धत नव्हती. इतरांना भरपूर फटाके उडवताना पाहत हेवा करत बसायचो कधीकधी. नंतर नंतर त्यातला फोलपणा कळला, पण तोवर मी मोठा झालो होतो.
नववीत असताना आम्ही घर बदललं होतं. तिथूनही आम्ही वर्षभरात अजून एकदा घर बदललं नंतर. पण त्या एका वर्षीची दिवाळी माझ्या दिवाळीजीवनाला कलाटणी देणारी ठरली. पूर्वीच्या इमारतीत आम्ही गच्चीवर फटाके उडवत असू. पण इथे तळमजल्यावर फटाके उडवण्याची पद्धत होती. रॉकेट्स सुद्धा जमिनीवर बाटल्या ठेवूनच. असंच एकदा मी रॉकेट पेटवायला गेलो. हातात उदबत्ती होती. रॉकेट काही पेटेना. मी आपला शक्य तेव्हढं अंतर राखत, बाटली पडू नये ह्याची काळजी घेत उदबत्ती वातीला लावत होतो. एव्हढ्यात मागे उभा असलेला आमच्याच इमारतीतला जमाव ओरडू लागला. मी मागे वळून पाहिलं. सगळे काहीतरी ओरडत होते, पण सगळे एकत्र वेगवेगळं काहीतरी बोलत असल्याने मला काहीच अर्थबोध होईना. मी दुर्लक्ष करून पुन्हा समोर पाहिलं आणि नकळतच थोडा वाकलो आणि झर्रकन माझ्या डोळ्यांपासून जवळपास एक इंचावरून रॉकेट उडालं. प्रकाशाच लोळ डोळ्यात जावा असं क्षणभर वाटलं. दोन-चार सेकंद काही दिसेना. मी घाबरलो. म्हटलं गेले डोळे. पण मग एकदम नॉर्मलला आलो. शांतपणे मागे गेलो. ते सगळे मला 'रॉकेट पेटलंय, मागे ये', असंच सांगत असल्याचं मला नंतर कळलं.
त्यादिवशी मी कुठलीही दुखापत न होता बचावलो. मग दुसर्‍या दिवशी मी पाच भुईचक्र ओळीनं ठेवली आणि एकाच फुलबाजीनं ती लावायला सुरूवात केली. उगाच मस्ती! धडाधड पाच लावली आणि पुढे सहावं होतं. मला समजेना, मी सहावं कधी ठेवलं. म्हटलं असेल चुकून ठेवलेलं. पण ते कुणाचं तरी अर्धवट चालून थांबलेलं भुईचक्र होतं. मी फुलबाजी लावताच ते फुटलं आणि पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर प्रकाशाचा लोळ. ह्यावेळेस हात भाजला होता. अंगठ्याचं कातडं भाजलं होतं. माझा फटाके उडवायचा उत्साह अर्ध्याहून जास्त कमी करण्यास ही दिवाळी जवाबदार ठरली.
त्याच्या पुढच्या दिवशी अजून एका नव्या घरात. जिथे मी अजून राहतो. आदल्या वर्षीच्या घटनाक्रमानंतर राहिलेले फटाके शिल्लक होते. तेव्हढेच फोडायचं ठरवलं होतं. मी आणि भाऊ जाऊन हळूहळू लक्ष्मीबॉम्ब वगैरे लावत होतो. मी थोडासा हात आवरूनच, पण मला भीती बसू द्यायची नव्हती, म्हणून हे सगळं चालू होतं. तेव्हढ्यात कंपाऊंडमधून रस्त्यावरची काही पोरं आम्हाला बघत होती. कारण आमच्या इमारतीत आम्ही दोघेचजण फटाके फोडत होतो. कदाचित माझ्या भावाची कल्पना, किंवा आईनं वरून बघून सांगितलं ते लक्षात नाही पण आम्ही त्या मुलांना बोलावून त्यांनाच ते फटाके फोडायला दिले, आमच्याच समोर. त्यांनाही बरं वाटलं, आम्हालाही. सगळे फटाके संपले. आणि माझ्या आयुष्यातलं फटाके पर्व संपलं.
हल्ली पहाटे चारचार पर्यंत फटाके फोडतात. आणि हल्ली आवाजाच्या फटाक्यांचं प्रस्थ वाढलंय. मला दिवाळीत धुराचा जाम त्रास होतो. पूर्वी का व्हायचा नाही ठाऊक नाही. किंवा होत असेल, पण मी दुर्लक्ष करत असेन. पण हल्ली आवाजाच्या फटाक्यांच्या अतिरेकामुळे दिवाळी बेरंग होऊन गेलीय. त्यामुळे मी गेल्या तीन दिवाळ्या घराबाहेर असूनही मला हायसंच वाटतं. फक्त आई घालते ते उटणं लावून अभ्यंगस्नान आणि फराळ नसल्याने खूप चुकल्यासारखं वाटतं.
सगळ्याच सणांना बहुतेक करून सकाळी आम्हाला ठेवणीतल्या सोन्याच्या चेन्स घालायला मिळायच्या. सकाळी नवे कपडे घालून, त्या चेन्स घालून भावाबरोबर आणि नंतर मित्रांबरोबर आई देवळात धाडायची. त्या देवळात जाण्याचीपण एक मजा असायची. मी कधी एकदम श्रद्धेने देवळात गेलोय असं मला स्मरत नाही, पण तो सगळाच एक सोहळ्याचा भाग असायचा. त्यातली खुमारी वेगळीच. एकदा देवळातून आलं की चांगलंचुंगलं खायचं. पुन्हा मित्रांबरोबर खेळायला जायचं, ते थेट दुपारी गोडाधोडाचं खायला परत. त्यानंतर वामकुक्षी आणि मग पुन्हा फराळ, खेळ! ते दिवस आता तसेच राहिले नाहीत. जवळचे मित्र पांगलेत. शहरात कुणीच नाही. कधीतरी चुकून आम्ही सणावारांना एकत्र भेटतो. भावाचं कुटुंब आहे. सणांना सगळे भेटतो, पण आम्ही आता लहान राहिलो नाही. सगळीच गणितं बदलल्याचं जाणवतं.
मी गेल्या तीन वर्षांपासून एकाही उपरोल्लेखित सणाला घरी नाही. आता वर्षाभराने कधीतरी जेव्हा कायमचा परतेन, तेव्हा येणार्‍या सणांना काय नवीन बघायला मिळेल कुणास ठाऊक! बदल होतच राहतात. नीट पाहिलं तर कधीकधी त्यातही वेगळी मजा असते. तीच शोधायचा प्रयत्न करेन बहुदा!
लिहिता लिहिता फारच लिहून गेलो. वाचल्याबद्दल खूप धन्यवाद!
तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिपावली सुखसमृद्धीची, आनंदाची आणि आरोग्यपूर्ण ठरो!

(समाप्त)
टीप - हा माझा जालरंग प्रकाशनच्या इ-दिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. पूर्ण लेख फार लांब असल्याने एकाहून अधिक भागांमध्ये देत आहे.

11/25/2010

माझे सणजीवन -१

सण ह्या गोष्टीला आपल्या भारतीय समाजपरंपरेमध्ये फार महत्वाचं आणि अढळ स्थान आहे. सणांमुळे आपण आपल्या नातेवाईकांच्या किंवा शेजारीपाजारी किंवा एकदम समाज वगैरेंच्या संपर्कात येतो आणि आपले अनुभवविश्व, भावविश्व आणि कसली कसली विश्व समृद्ध होतात असली वाक्य बर्‍याच सांस्कृतिक मासिकांमध्ये वगैरे वाचायला मिळतात. आता ही वाक्य अगदीच खोटी असतात असं मी म्हणत नाही, पण अशा भाषेमुळे खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचता पोहोचता राहतो ना हो, निबंध वगैरे लिहायला ठीक असतात असली वाक्य! पण सणांमध्ये मजा असते हे मात्र खरं! बहुदा सगळ्यांना सुट्या असतात, बहुदा घरातले सगळे चांगल्या मूडमध्ये असतात, बहुदा घरातल्यांसाठी खरेदी होते आणि बहुदा घरामध्ये काहीतरी स्पेशल खाद्यपदार्थ बनतात (किंवा हल्ली विकत आणले जातात).
प्रत्येकाचे सणांचे आपले आपले अनुभव असतात. आणि प्रत्येकाच्या केसमध्ये बरेचदा प्रत्येक सणाशी निगडीत काही अविस्मरणीय असे अनुभव असतात की त्या सणाचा उल्लेख आला रे आला की तोच अनुभव पहिला आठवावा. माझ्या बाबतीत अनेक सणांच्या नुसत्या उल्लेखाला माझ्या डोळ्यासमोर विविध गोष्टी आणि विविध प्रसंग उभे राहतात. आता दिवाळी आलीय (आम्हा मित्रांमध्ये 'दिवाळी आलीय?' ह्या प्रश्नाचा अर्थ होतो, 'तुला अतिमहत्वाकांक्षेची बाधा झालीय!' पण ऐन दिवाळीच्या आधी ह्या ताकदवान शब्दप्रयोगातली हवाच निघून जाते). आणि दिवाळी म्हणजे सणांचा राजा/राणी असं काय काय म्हणता येईल. त्यामुळेच म्हटलं की माझ्या आजवरच्या सणजीवनाचा एक तात्विक परामर्श घ्यावा.
आपण सुरूवात करू इंग्रजी वर्षाच्या सुरूवातीपासून. संक्रमण किंवा संक्रांत. तसं पाहायला गेलं, तर दिवाळी संपली रे संपली की मुंबईमध्ये संक्रांतीचे लागलेले वेध आकाशात पतंगरूपाने विहरताना दिसतात. मी लहान असल्यापासून संक्रांत म्हणजे पतंग हे समीकरण डोक्यामध्ये प्रचंड फिट बसलेलं आहे. खरं म्हणजे लोकांना संक्रांत म्हटलं की तीळगूळ, गुळपोळ्या आणि तूप असलं काही काही सात्विक दिसतं, पण आम्हाला (पक्षि- अस्मादिक) फक्त रंगीबेरंगी पतंग आणि त्यांचे विविध जाडीचे (विड्थ - सांगणेस कारण की ह्यास विशेषण समजून गैरसमज उद्भवू नयेत) मांजे डोळ्यासमोर येतात. तीळगूळ, गुळपोळ्या वगैरे चीजा नंतर येण्याचं कारण की ते सगळे एक दिवसाचे चोजले असतात. पण पतंग आणि मांजे ही जवळपास दोन-अडीच महिन्यांची अशक्य मेहनत असते. संध्याकाळी शाळेतून घरी येताना मुंबईतल्या एस.व्ही.रोडसारख्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या रस्त्यावरून समोर न पाहता वर आकाशात पाहत घरी येणं असो, की घरी आल्यावर दप्तर टाकून कसंबसं काहीतरी घशात कोंबून कधी कपडे बदलून किंवा कधी न बदलताच दौडत थेट गच्चीवर जाणं असो, किंवा आपल्या कुठल्याही खिडकीत एखाद्या पतंगाचा मांजा अडकलाय का हे ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजने रिकाम्या मोज्यात काही टाकलंय का हे पाहण्याच्या परदेशी खुळापेक्षा जास्त खुळेपणाने पाहण असो, किंवा मग गच्चीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जीवाचीही तमा न बाळगता हवेतून लटकत चाललेला मांजा पकडण्यासाठी घेतलेली वेडी धाव असो, किंवा एखादा पतंग गच्चीवर न येता खाली कंपाऊंडमध्ये पडण्याची चिन्ह दिसताच पाचव्या माळ्याच्या गच्चीपासून थेट तळमजल्याकडे चार-चार जिन्यांच्या उड्यांनी घेतलेली बेफाम धाव असो, संक्रांत म्हणजे माझ्यासाठी नेहमीच मेहनतीचं आणि वेडाचं प्रतीक राहिल.
आम्ही तीन समवयस्क मुलं होतो. आमच्या इमारतीत आमच्यापेक्षा ५ ते ८ वर्षं मोठा असा एक मुलांचा गट होता किंवा आमच्याहून ६-१० वर्षं लहान असा एक गट, त्यामुळे आम्ही अल्पसंख्यक गट होतो. पण तरीही आम्हाला कसल्याही सवलती नव्हत्या. वयामुळे आमच्या नशीबी फक्त मोठ्या मुलांची फिरकी धरणं आलं होतं (ह्यामध्ये माझा थोरला भाऊही होता). पुन्हा त्यांना पाहून पतंग उडवणं ही काहीतरी अप्राप्य कला असावी असा आमच्या निरागस बालमनांचा समज झाला होता. त्यामुळे आम्ही आपले कौतुकानं त्यांना पतंग उडवताना, 'कायपो छे' म्हणून ओरडताना किंवा 'ए लप्पेट' म्हणून ओरडताना पाहायचो आणि आपल्या हातात फिरकीऐवजी कधीतरी मोठं झाल्यावर मांजा येईल ह्या आशेत दिवस कंठायचो. कधीतरी आकाश निरभ्र आणि निर्धोक निर्पतंग असेल तर आम्ही ज्याची फिरकी धरलीय तो उदार, दयाळू आण कनवाळू वगैरे होऊन बागडोर आमच्या हातात सोपवायचा. पतंग दिसणारही नाही एव्हढ्या उंचीवर असायचा. आम्ही आपले आपल्याला पतंग उडवता येतो ह्या थाटात विविध हातवारे करायचो. पुन्हा जवळपास धोका दिसला की आमच्या समर्थ हातांतून मांजा हिसकावला जायचा आणि पुन्हा फिरकी हाती यायची. मांजाचे दोन प्रकार, एक 'ढील' द्यायचा मांजा आणि दुसरा 'घसटी' मांजा. ढीलवाला मांजा जाड असतो म्हणून बोट कापतं आणि घसटी मांजा बारीक असतो म्हणून हे ऐकून आम्ही पतंग उडवणं ह्या कलेपासून फारकत घेतली होती.
पण कधीतरी पाचवी सहावीत आमच्यातल्या एकाला भन्नाट कल्पना सुचली की आपण पतंग उडवू शकत नाही, तर किमान पकडू तरी शकतो. आपल्याला कुणी पतंग उडवू देत नाहीत आणि उडवायला शिकवतही नाहीत, तर आपण पतंग पकडू आणि जमा करून ठेवू. झालं, त्या वर्षीपासून आमच्या पतंगतपश्चर्येला सुरूवात जाहली. वर वर्णन केल्याप्रमाणे दोन ते अडीच महिने 'एकच ध्यास, एकच भास हा पतंग आमचा आहे आणि आगच्चीतळमजला सार्‍या भागावर आमचं राज्य आहे.' कुणाचा विश्वास बसणार नाही. एकाच सीझनमध्ये आम्ही तीन मस्केटियर्सनी तब्बल दोनशेच्या जवळपास पतंग पकडले होते. पुन्हा आमच्यात अनहेल्दी कॉम्पिटिशन असायची. अनहेल्दी अशासाठी की कधीकधी पतंग कुणाचा यावरून जबरा वाद व्हायचे. कारण बरेचदा मांजा एकाच वेळी दोघांनी आणि कधीकधी तर तिघांनी पकडलेला असायचा. मग ह्या खटल्याचा निकाल ठरलेला असायचा. विवादित पतंगाचं त्रिभाजन व्हायचं (हे सोल्यूशन आम्ही अलाहाबाद उच्चन्यायालयाच्या आधी शोधलं होतं)!
धरपकडीचं धोरण लागू झाल्यानंतरच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या सीझनमध्ये मी एकट्याने शंभर धरले होते. हा माझा वैयक्तिक रेकॉर्ड आहे आणि बहुतेक तो अजून अबाधित असावा (कदाचित दुसर्‍या दोघांपैकी कुणीतरी बरोबरी साधली असेल, पण मोडला नक्कीच नाहीये). तर असं आमचं धरपकडीचं धोरण गोमटी फळं आणत होतं. घरच्या माळ्यावर पतंगांची चळत बनली होती आणि मी हट्टानं ते माझ्या भावाला मिळू नयेत अशी तजवीज केली होती. तोवर भाऊही कॉलेजात डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला पोचला होता बहुधा. सीए चालू होतं, त्यामुळे त्याचा संक्रांतीचा उत्साह कमी झाला होता. मग अशातच एक दिवस मी आणि माझ्या एका मित्रानं क्रांती घडवण्याचं निश्चित केलं. माळ्यावरचे पतंग खाली आले. अर्ध्याहून अधिक फाटले होते. जेव्हढे धड होते तेव्हढे गच्चीत नेण्यात आले आणि थोड्या प्रयत्नांनंतर इतके दिवस अप्राप्य वाटणारी कला आम्हाला सहज वश झाली. आयुष्यातला एक बोळा निघाला, पाणी वाहतं झालं (हे सखाराम गटणेतलं वाक्य ढापलं, इथे फारसं शोभत नाही पण टाकावंसं वाटलं म्हणून टाकलं). त्यानंतर माझं पतंग पकडण्यावरच प्रेम कमी होऊन उडवण्यावर बसलं. पण मी मूलतः कंजुष ह्या प्रकारात मोडणारा असल्याकारणे महाग मांजा आणणं माझ्या जीवावर यायचं. मग मी कल्पना लढवली आणि पकडलेल्याच पतंगांचे मांजे जोडून चक्क फिरकीभर मांजा गोळा केला आणि ह्याच गाठी गाठीच्या मांजाने मी पतंग उडवू लागलो. त्यामुळेच माझे पतंग कल्पनेतच दुसर्‍यांचे कापायचे, प्रत्यक्षात स्वतःच हुतात्मे व्हायचे. ह्यामुळे लवकरच माझा साठा संपला आणि मला नव्या बायकोचे लाड पुरवण्यासाठी पहिल्या बायकोचा अर्थात पतंग पकडण्याच्या कलेचा वापर करावा लागला. आणि तिनेही पतिव्रतेप्रमाणे माझी पुढचे दोन ते तीन सीझन पूर्ण साथ दिली. संक्रांत संपली की बोटांवरच्या कापलं गेल्याच्या खुणा शौर्याच्या खुणा वाटायच्या. आजूबाजूच्या गुजरात्यांच्या इमारतींवर लावलेले डेक, हवेत विहरणार्‍या अनेकांतला एक आपला पतंग, उन्हं, डोक्यावरची टोपी, कानापाशी लागलेली घामाची धार आणि एकेकाळी अनहेल्दी कॉम्पिटिशन करणारे आता एकमेकांना पतंग पकडून देणारे आम्ही थोडे मोठे झालेले मित्र, ते सगळं भारावलेलं वातावरण अजूनही माझ्या डोक्यात ताजं आहे.
त्यानंतर वडलांनी क्वार्टर सोडली (कंपनीने दिलेली जागा). आणि आम्ही नव्या इमारतीत आलो. एक वर्ष मी पुन्हा जुन्याच ठिकाणी संक्रांतीसाठी आलो. पण त्याच्या पुढच्या वर्षी माझ्या साथीदारांनीही इमारत सोडल्यावर माझा पतंग ह्या प्रकरणाशी जवळपास काडीमोडच झाला. वर्षभरातच जागा पुन्हा बदलून जिथे आलो तिथे पतंग उडवणारा मी एकटाच. उत्साहाचा पतंग एका वर्षातच खाली आला. तेव्हापासूनच संक्रांत म्हणजे फक्त गुळपोळ्या आणि तीळगूळांपर्यंतच मर्यादित झाली. आता प्रत्येक संक्रांतीला जुन्या दिवसांच्या, त्या पाच-सहा झपाटलेल्या वर्षांच्या आठवणी काढत उसासे टाकण्याखेरीज काहीच करता येत नाही.
मग पुढे निघाल्यावर आपल्याला भेटते होळी. होळी म्हणजे फुल टीपी (टीपी- टाईमपास) प्रकार असतो. होळीचे दोन दिवस असतात. एक म्हणजे पेटवायची (आणि बोंबा ठोकायची) होळी आणि दुसरी म्हणजे खेळायची होळी!
पेटवायची होळी हा माझा खास जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे मला आग लावायला आवडतं आणि दुसरं म्हणजे मला बोंबा मारायला आवडतं. असो. विनोदाचा भाग सोडला, तर होळीविषयी इतकं वाटण्याचं कारण म्हणजे आम्ही तीन मित्रांनी आमच्या इमारतीमध्ये होळीची सुरूवात केली होती. अवघी १२ वर्षांची आम्ही मुलं होतो. आमच्याकडे कोण लक्ष देणार. पण आम्ही कंपाऊंडमध्येच पडलेल्या काटक्या गोळा केल्या आणि माळ्याच्या खोलीसमोर छोट्याशा जागेत होळी पेटवली. होळी कसली, छोटीशी शेकोटी होती. पण आमच्यासाठी ती अचिव्हमेंट होती. दोन तीन काकूंनी खाली येऊन होलिकेची पूजाही केली आणि आम्हाला ऍप्रूव्हल मिळालं. त्यातल्या एका काकूंनी एका फुलपात्रातनं अर्घ्यासारखं काहीतरी ओतलं आणि आमची होळी चक्क विझली! आम्ही एकमेकांकडे केविलवाणे दृष्टिक्षेप टाकले. होळी विझली होती, पण निखारे अजून तप्त होते.
पुढल्या वर्षी आम्ही होळी पेटायच्या महिनाभर आधीपासून पेटलो होतो. बर्‍याच काकांना आमची दखल घ्यायला आम्ही भाग पाडलं होतं. मोठी जागा मिळाली. आणि ह्यावेळेस चक्क होळीच्या दिवशी सगळी मोठी माणसंही आली होती. आम्ही महिनाभर बरीच लाकडं काकालोकांच्या मदतीनं जमवली होती. त्यामुळे मस्त होळी जमली. अगदी आजूबाजूच्या इमारतींतूनही माणसं आली. त्यानंतरही मी दोन-तीन वर्षे तिथं जात राहिलो. नंतर जाणं झालं नाही होळीत, पण होळी अजून सुरू असल्याच ऐकिवात होतं. ते काहीही असलं, तरी झटक्यात विझलेली पहिली होळी आणि दुसर्‍या वर्षीच्या पहिल्या यशस्वी होळीनंतर आम्ही तिघांनी एकमेकांना मारलेली मिठी अजून आठवते.
मी जेव्हा एकदम लहान होतो (पर्यायाने निरागस) तेव्हा मी होळीच्या रंगांना प्रचंड म्हणजे प्रचंड म्हणजे प्रचंड घाबरायचो (तसा मी फटाक्यांच्या आवाजांनाही घाबरायचो, पण ते पुढे विस्ताराने येईल). का माहित नाही. पण मी रंगपंचमीला घरीच लपून बसायचो. त्यावेळेस महिनाभर आधीपासून फेकून मारायच्या पिशव्या मिळत नव्हत्या. इज्जतशीर मेहनत करून फुगे फुगवावे लागायचे! त्यामुळे टेन्शन फक्त एका दिवसाचं असायचं. पण असंच कुठल्यातरी वर्षी, बहुतेक चौथी-पाचवीत असेन, मी गच्चीमध्ये रंगपंचमी खेळायला गेलेल्या माझ्या भावाला आणि बाबांना बोलवायला गेलेलो. दुपार झालेली, बहुधा लोकं शांत झालेले असतात. मी दबकत दबकतच वर चाललेलो. तेव्हा एक मुलगा रंग खेळून खाली उतरत होता.मी त्याला चेहर्‍यावर रंग लावलेल्या अवस्थेत एकदम खिदळताना आणि एन्जॉय करताना पाहिलं. मला तो प्रसंग अजूनही स्वच्छ आठवतो, खरंच! माझं एका क्षणात मतपरिवर्तन झालं होतं. मी मनाचा हिय्या करून  पुढे झालो आणि त्याला म्हटलं, मला लाव रंग! तो पण एकदम चाट पडला. त्यानं थोडासा लावला माझ्या गालांना. मग मी पण त्याच्याचकडून रंग घेऊन त्याला लावला. मला जाणवलं आपल्याला गंमत वाटली (हे अति मेलोड्रामाटिक होत चाललंय). खरंच असं झालं होतं. मी वर गेलो आणि बाबा पण मला बघून चाट पडले. मी दोघा तिघांना माझ्या पाठीवर फुगे फोडायला लावले.माझ्या मते हा मानसशास्त्रावरचा उत्तम धडा होता (लाल करणेस सुरूवात). मी स्वतःच्या फोबियावर स्वतःच यशस्वीरित्या मात केली होती (इति लाल करणे).
त्यावेळी आमच्या इमारतीत एक प्रथा होती, की रंग खेळून झाले की सगळी कुटुंबं जवळच्याच समुद्रावर गाड्या काढून जायचे आणि तिथे आंघोळ वगैरे करून मग तिथला 'बर्फाचा गोळा' खायचे. हा कार्यक्रम उरकूनच मग सगळी कुटुंब परत यायची मग जेवणं बिवणं. मी नेहमीप्रमाणेच घाबरट. समुद्राला प्रचंड घाबरायचो. सुरूवातीला तर पाण्याला स्पर्शही नाही करायचो, पण नंतर नंतर कंबरभर पाण्यापर्यंत मजल गेली. पण हा एक फोबिया आजवरही मात न करता आलेला आहे. पण असो. तिथला गोळा खाणे हा देखील एक सोहळा होता. त्यानंतर घरी येऊन पुरणपोळी!
आम्ही ती इमारत सोडण्याच्या काही वर्षे आधी पाणी भरायच्या पिशव्यांचं पेव फुटलं होतं. अतिशय सोपं काम. नाहीतर ते फुगे आणा आणि बोटं लाल होईस्तो नळाच्या तोटीला लावण्यासाठी त्यांची तोंडं ताणा, ते करताना अर्धे हातातच फाटायचे. मग सगळ्यांत वाईट प्रकार गाठी मारणे. त्या स्टेजला अजून २५% दम तोडायचे. १०० फुग्यांच्या पुड्यात ४० तयार झाले तरी नशीब. त्यामुळे फुगे फोडण्याची एक किंमत वाटायची. पण ह्या पिशव्यांनी त्या मेहनतीलाच चाट दिली. किंमत राहिली नाही. कुणीही सोम्यागोम्या फुगे आय मीन पिशव्या फोडू लागला. मग इमारतीच्या गच्चीतून किंवा घराच्या गॅलर्‍यांतून रस्त्यावरच्या लोकांवर पिशव्या फोडण्याचं लोण पसरू लागलं. फुग्यांच्या जमान्यात हे नव्हतं असं नाही, पण त्या धंद्यासाठी मेहनत आणि भांडवल दोन्ही जास्त लागायचं, त्यामुळे कमी होतं. पण ह्या पिशव्यांनी गैरप्रवृत्ती फोफावल्या. रंगपंचमीच्या आधीच १० दिवस टेन्शनमध्ये जाऊ लागले. सुरूवातीला मलाही मजा वाटलेली. गच्चीत उभं राहून आम्ही मित्रांनीही दोन तीन पिशव्या एस.व्ही.रोडवर भिरकावल्या. पण मग एक दिवस, आमच्या शाळेत बातमी झाली. आमच्या एका सिनियर मुलीच्या डोळ्यावर फुगा किंवा पिशवी लागल्याने डोळ्याला दुखापत झाली म्हणून. ही बातमी ऐकली आणि गच्चीतून फुगे फेकण्याची विकृती जी आमच्यांत मूळ धरत होती, ती तिथेच उपटून फेकली. अजूनही रंगपंचमीत अशा बातम्या ऐकल्या की वाईट वाटतं. अजून कुणाकुणाला असं जवळच्या लोकांना त्रास झाल्यावरच अकला येणार कुणास ठाऊक! असो.

(क्रमशः)

भाग २

टीप - हा माझा जालरंग प्रकाशनच्या इ-दिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. पूर्ण लेख फार लांब असल्याने एकाहून अधिक भागांमध्ये देत आहे.