त्यानंतर येते वर्षप्रतिपदा अर्थात मराठी नववर्षदिन. गुढीपाडवा. गुढीपाडव्याला मला फारसं काही खास वाटत नसलं, तरी गुढी उभारणं आणि त्यावर लागलेली ती साखरेची पदकं खाण्याची संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहणं ह्यासाठी तो दिवस मला चांगलाच लक्षात राहिलाय. मला ती साखरेची पदकं दोर्यावरून खायला जाम म्हणजे जाम मजा वाटते. अजूनी. पण गेल्या काही वर्षांपासून ती संधी हुकतेय. काहीतरी गोडधोड बनतं, ते खायचं आणि एन्जॉय करायचं. तसा मस्त असतो हा सणपण. पण जास्त लिहिण्यासारख्या ती पदकं सोडल्यास काही आठवणी नाहीत.
गुढीपाडव्यानंतर आमच्या घरी वेध लागतात ते हनुमान जयंतीचे. हनुमान जयंती आमच्या कुटुंबात शंभरहून जास्त वर्षं साजरी केली जातेय. हनुमान आमचं मानलेलं कुलदैवत आहे असं कधीतरी बाबा सांगत होते. त्यामुळे आमच्यात हनुमान जयंतीचं प्रस्थ असतं. हनुमान जयंतीच्या सात दिवस आधीपासून घरातल्याच हनुमानाची सेपरेट प्रतिष्ठापना करतात आणि त्याच्याशेजारी सात दिवस सलग एक समई तेवत ठेवतात. मला लहानपणापासून त्या विझू न देण्याच्या समयीबद्दल जाम कुतूहल वाटतं. ती विझू नये म्हणून सात दिवस त्या खोलीतला पंखा बंद. सहसा प्रतिष्ठापना हॉलमध्ये. पुन्हा हनुमान जयंती उन्हाळ्यातच, आणि कहर म्हणजे टीव्ही हॉलमध्ये. सात दिवस फुल गेम. एका वर्षी पाहुणे आले होते कुणीतरी. तर आतमध्ये झोपताना मला आणि भावाला जाम छोट्याशा जागेत झोपण्याची पाळी आली होती. मग मी म्हटलं, मी झोपतो हॉलमध्ये आणि मोठ्या धैर्याने उकाड्याला सामोरा गेलो. अर्धी रात्र बिन झोपेचा, घामाघूम तळमळत होतो. नशीबाने पाहुणे एकच रात्र आधी आले होते. आणि जयंतीच्या दिवशी पहाटे सगळे लवकर उठतात. मोठे उठल्यावर मी पटकन आत जाऊन पंख्याखाली तासभराची एक्स्ट्रा झोप घेतली होती.
पण एव्हढं सगळं असलं तरी हनुमान जयंती म्हटली की माझ्या डोळ्यासमोर आधी चणे आणि गुळाची खिरापतच येते. मस्त मजा यायची नेहमीच. सात दिवस आरत्या म्हणायच्या. ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी मी कधीतरी हट्ट करून बाबांसारखं सोवळं नेसायचो, हट्टाने आरतीचं ताट धरायचो (हट्ट अति होत होता नै..पण आता समजून काय उपयोग!) अजूनी आई-बाबा तसेच हनुमान जयंती साजरी करतात. ज्या आत्यांना जमतं त्या जयंतीच्या दिवशी येऊन जातात. हनुमान जयंती तसा मोठा सण नसल्याने आणि महत्वाचं म्हणजे 'बँक हॉलिडे' नसल्याने सगळ्यांनाच येणं जमत नाही. पण माझ्या सणजीवनाचा हनुमान जयंती हा एक अविभाज्य घटक आहे.
हे सगळे पूर्वार्धातले सण. त्यानंतर थेट येतो तो गणेशोत्सव. म्हणजे मधे असतील काही पण माझ्या विशेष लक्षात राहिलेत असं काही सुचत नाहीये. पण गणेशोत्सव मात्र चांगलाच म्हणजे चांगलाच लक्षात राहतो. आमच्या घरी गौरी-गणपती असतात. म्हणजे ज्या दिवशी गौरी जातात, त्याच दिवशी गणपती. पण मजा भरपूर येते. घरात मोठ्या प्रमाणावर पक्वान्न बनतात. माझे आवडते उकडीचे मोदक बनतात. पाच-सहा दिवस सण असल्यासारखं वाटतं. हट्टाने पूजा करायला किंवा सांगायला बसणे हा माझा लहानपणापासूनचा शिरस्ता आहे (हट्ट फार झालाय ना लेखातसुद्धा). मग हळूहळू जसाजसा मोठा झालो, तसतसा समजूतदारपणे वडिल जे सांगती ते करू लागलो. पण असं आहे ना, की जेव्हा पूजा चालू असते, तेव्हा जर मी तिथे इन्व्हॉल्व्ह नसेन, तर मला प्रचंड कंटाळा येतो. आई पोहे वगैरे काहीतरी बनवत असते आणि मला भूक लागलेली असते. पण काही खाता येत नाही. पूजा हॉलमध्ये, टीव्ही तिकडे. फुल बोर होतं. त्यामुळे पूजेत बसणं, कुठल्याही भूमिकेत हे नेहमीच सोयीस्कर!
एकदा पहिली पूजा झाली, की मग सकाळ संध्याकाळच्या आरत्या, प्रत्येक आरतीच्या वेगवेगळ्या प्रसांदांमध्ये मला लहानपणापासूनच आरतीपेक्षा जास्त इंटरेस्ट राहिलेला आहे. लहान असताना एकदा मित्राच्या घरी त्याच्या वडिलांनी रात्रभर जागून वगैरे केलेली आरास पाहिली होती. मित्र आणि त्याचे वडिल व काका नेहमी एक अख्खी रात्र जागून आरास करायचे, ह्याचं मला अप्रूप वाटायचं. आमच्या घरी एकदम साधं प्रकरण. एखादा काहीतरी स्टिकर आणून लावायचा. बाकी दोन समया आणि चांगलंस उपरणं गणपतीला, बास. कारण आमच्यात कलाकार कुणीच नाही. पण मला एकदा खूप म्हणजे खूप न्यूनगंड म्हणतात तो झाला. म्हटलं, ह्यावर्षी आपण पण आरास करायची. आई-बाबांनी थोडं समजावून पाहिलं. पण मी बधलो नाही. ते नाईलाजानेच काही थर्मोकोलच्या गोष्टी घेऊन आले. मलापण रात्रभर जागून आरास करायची होती. प्रत्यक्षात आई-बाबांनी रात्रभर जागण्याएव्हढं सामान हुशारी करूनच आणलं नव्हतं. एक डोक्यामागे लावायचं दिवे लावलेलं फिरणारं चक्रही आणायला मी बाबांना भाग पाडलं होतं. जे काही आणलं होत त्यात मी माझ्या अप्रतिम कलाकुसरीने वाकडं तिकडं कापून थोडंफार वाया घालवल्यावर आई म्हणाली, 'केलीस तेव्हढी मेहनत खूप केलीस' आता जाऊन झोप. बाबा माझ्यासारखेच कलाशत्रू. त्यातल्यात्यात माझ्या आईच्या हातात कला आहे. तिनं आपलं जागून कसंतरी काहीतरी बरं दिसेलसं उभं केलं. मला मिळायचा तो धडा मिळाला होता. त्यानंतर आई-बाबा जी छोटीशी सजावट करतात (आईच करते, बाबा टीपी करतात) त्यात गणपती आणि मी दोघेही समाधान मानतो. त्यावेळेस आणलेले मखराचे खांब अजूनी कुठल्यातरी माळ्यावर पडलेले असतील, किंवा फेकून दिले असतील. गंमतच होती सगळी! अजूनही कुठे कुठे केलेली आरास, मखर पाहतो, तेव्हा हे सगळं डोळ्यांपुढे येतं.
गणपती संपल्यावर येते नवरात्र. नवरात्राचं माझ्या जीवनात वेगळंच स्थान आहे ते दोन गोष्टींमुळे (आता तुम्ही म्हणाल प्रत्येकच सणाचं वेगळं स्थान आहे. पण आहे तर काय करू!) एक म्हणजे आमच्या पहिल्या घराशेजारी, जिथे मी नववीपर्यंत राहिलो, एक मैदान आहे. जे नवरात्रीत गरबा-दांडियासाठी भाड्यानं दिलं जातं. एकेकाळी तिथला दांडिया खूप फेमस होता. जॉनी लीव्हर वगैरे फेमस असताना तिथे येऊन गेलेला होता. असो. तर तिथे रात्रभर दंगा चालत असे. त्यावेळी रात्री दहा वगैरेंची बंधनं नव्हती. त्यामुळे ते भगभगलेले दिवे आणि रात्रभर येणारा प्रचंड आवाज अजूनही मला आठवतात. आम्हाला सगळ्यांनाच त्या गोंगाटाची इतकी सवय झालेली होती, की आम्ही अत्यंत सहजगत्या त्या गोंगाटात झोपू शकायचो. तिथे मिळालेल्या ह्या ट्रेनिंगमुळेच आमच्यातलं कुणीही, कितीही आवाजामध्ये झोपू शकतं. झोपायसाठी शांतता लागते म्हणणारे भेटले की हसू येतं. एव्हढं शेजारीच मैदान असून मी कधी दांडियाला गेल्याचं आठवत नाही. कदाचित एकदा कधीतरी कुणातरी ओळखीच्यांकडच्या इमारतीत गेलो असेन पण खरंच आठवत नाही.
नवरात्रीचं आयुष्यात स्थान असण्याचं दुसरं कारण म्हणजे मी शाळेत असताना, बहुतेक चौथी-पाचवीत होतो, आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये आमच्या वर्गशिक्षिकेनं आमच्या वर्गाचं दांडिया नृत्य बसवलं होतं. त्यांनी काय समजून माझी निवड केली होती मला ठाऊक नाही, पण मी त्यात होतो. दांडिया येत नव्हता, फक्त त्यावेळी वाजणारी गाणी माहित होती. मी नक्कीच बर्यापैकी चांगलं सादरीकरणही केलं असावं बहुदा. ते एव्हढं लक्षात नाही. पण नाच झाल्यावर आम्हा सहभागी मुलांना नाष्ट्याचं कूपन दिलं गेलं होतं आणि काही गडबडीमुळे ते मला मिळालं नाही. मग आमच्या वर्गशिक्षिकेनं त्यांना मिळालेलं कूपन माझ्या हातात दिल्याचं आठवतं! छ्या राव, जाम नॉस्टॅल्जिक व्हायला होतं कधीकधी! कशावरून काय आठवेल ना, त्याचा नेम नाही.
हे सगळं सोडलं तर आमच्या घरामध्ये नवरात्र म्हणजे घटस्थापना आणि नऊ दिवस उगवणारी ती नाजूकशी रोपं! रोज त्याच्यावर एक एक माळ आई चढवायची. त्याचीही एक वेगळी गंमत वाटायची. पण अशाच एका नवरात्राच्या दुसर्या माळेला माझी आजी (माझ्या आईची आई) गेली होती. मला धूसरसंच आठवत होतं. पण नुकतंच आईशी बोलणं झाल्यानं आत्ता चांगलंच लक्षात आहे.
त्यानंतर येतो खरा मोठा गेम. दिवाळी. ज्यावरून हा सगळाच लेखनप्रपंच सुरू केलाय. दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठीच पर्वणी. देशात जवळपास सर्व भागांमध्ये सारख्याच उत्साहाने साजरा केला जाणारा बहुतेक देशातला सर्वांत मोठा सण. लहानपणापासून दिवाळी म्हणजे अभ्यंगस्नान, फराळ आणि फटाके सर्वप्रथम आठवतात. आईनं उटणं लावून घातलेलं अभ्यंगस्नान म्हणजे दिवाळीची खरी सुरूवात. शाळेची दिवाळीची सुट्टी खूप आधी सुरू झालेली असायची. दिवाळीचा अभ्यास आणि फंड उभा करण्यासाठी खपवायला दिलेलं वीस तिकिटांचं पुस्तक घेऊन सहामाही परीक्षा संपवून आम्ही घरी यायचो. वेगळेच दिवस होते. अगदी शाळा संपण्याचा दोनेक वर्षं आधी अक्कल आली की परीक्षा संपल्यासंपल्याच दिवाळीचा अभ्यास उरकून ठेवावा, म्हणजे सुट्टी मजेत जाते. नाहीतर आम्ही मूर्खासारखे सुट्टी संपत आली की एकतर सहामाहीचा निकाल आणि दिवाळीचा अभ्यास ह्या दुहेरी भीतीनं कावरेबावरे होत असू. ती पावतीपुस्तकं इमारतीतल्याच काका लोकांच्या माथी तिकिटं मारून आम्ही संपवत असू.
दिवाळीचे वेध लागले की फटाक्यांची दुकानं ओव्हरटाईममध्ये चालायची. बाबांच्या मागे लागून (इथे हट्ट नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी) आमची वरात (मी, दादा आणि बाबा) फटाक्यांच्या दुकानात. तिथे तुफान गर्दी! मग त्या काऊंटरवरून छापलेला फॉर्म घ्यायचा. कुठले फटाके किती हवेत हे त्यात भरायचं. आमचं बजेट ठरलेलं असायचं नेहमी. त्यामुळे जास्त वेळ लागायचा नाही. तसा मी बालपणापासून फटाक्यांच्या बाबतीत घाबरट होतो. अगदी सहावी सातवीपर्यंत मी लक्ष्मीबॉम्ब आणि सुतळीबॉम्बला बिचकूनच असायचो. माझी झेप म्हणजे झाडं (अनार) आणि भुईचक्र आणि रॉकेट्स! त्यातल्यात्यात रॉकेट उडवणं हे मला एकदम शौर्याचं लक्षण वाटायचं. मग हळूहळू ह्या फोबियातूनही बाहेर आलो. सगळे फटाके निर्धास्त उडवू लागलो. पण एकंदरच आमच्यात जास्त फटाके आणण्याची पद्धत नव्हती. इतरांना भरपूर फटाके उडवताना पाहत हेवा करत बसायचो कधीकधी. नंतर नंतर त्यातला फोलपणा कळला, पण तोवर मी मोठा झालो होतो.
नववीत असताना आम्ही घर बदललं होतं. तिथूनही आम्ही वर्षभरात अजून एकदा घर बदललं नंतर. पण त्या एका वर्षीची दिवाळी माझ्या दिवाळीजीवनाला कलाटणी देणारी ठरली. पूर्वीच्या इमारतीत आम्ही गच्चीवर फटाके उडवत असू. पण इथे तळमजल्यावर फटाके उडवण्याची पद्धत होती. रॉकेट्स सुद्धा जमिनीवर बाटल्या ठेवूनच. असंच एकदा मी रॉकेट पेटवायला गेलो. हातात उदबत्ती होती. रॉकेट काही पेटेना. मी आपला शक्य तेव्हढं अंतर राखत, बाटली पडू नये ह्याची काळजी घेत उदबत्ती वातीला लावत होतो. एव्हढ्यात मागे उभा असलेला आमच्याच इमारतीतला जमाव ओरडू लागला. मी मागे वळून पाहिलं. सगळे काहीतरी ओरडत होते, पण सगळे एकत्र वेगवेगळं काहीतरी बोलत असल्याने मला काहीच अर्थबोध होईना. मी दुर्लक्ष करून पुन्हा समोर पाहिलं आणि नकळतच थोडा वाकलो आणि झर्रकन माझ्या डोळ्यांपासून जवळपास एक इंचावरून रॉकेट उडालं. प्रकाशाच लोळ डोळ्यात जावा असं क्षणभर वाटलं. दोन-चार सेकंद काही दिसेना. मी घाबरलो. म्हटलं गेले डोळे. पण मग एकदम नॉर्मलला आलो. शांतपणे मागे गेलो. ते सगळे मला 'रॉकेट पेटलंय, मागे ये', असंच सांगत असल्याचं मला नंतर कळलं.
त्यादिवशी मी कुठलीही दुखापत न होता बचावलो. मग दुसर्या दिवशी मी पाच भुईचक्र ओळीनं ठेवली आणि एकाच फुलबाजीनं ती लावायला सुरूवात केली. उगाच मस्ती! धडाधड पाच लावली आणि पुढे सहावं होतं. मला समजेना, मी सहावं कधी ठेवलं. म्हटलं असेल चुकून ठेवलेलं. पण ते कुणाचं तरी अर्धवट चालून थांबलेलं भुईचक्र होतं. मी फुलबाजी लावताच ते फुटलं आणि पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर प्रकाशाचा लोळ. ह्यावेळेस हात भाजला होता. अंगठ्याचं कातडं भाजलं होतं. माझा फटाके उडवायचा उत्साह अर्ध्याहून जास्त कमी करण्यास ही दिवाळी जवाबदार ठरली.
त्याच्या पुढच्या दिवशी अजून एका नव्या घरात. जिथे मी अजून राहतो. आदल्या वर्षीच्या घटनाक्रमानंतर राहिलेले फटाके शिल्लक होते. तेव्हढेच फोडायचं ठरवलं होतं. मी आणि भाऊ जाऊन हळूहळू लक्ष्मीबॉम्ब वगैरे लावत होतो. मी थोडासा हात आवरूनच, पण मला भीती बसू द्यायची नव्हती, म्हणून हे सगळं चालू होतं. तेव्हढ्यात कंपाऊंडमधून रस्त्यावरची काही पोरं आम्हाला बघत होती. कारण आमच्या इमारतीत आम्ही दोघेचजण फटाके फोडत होतो. कदाचित माझ्या भावाची कल्पना, किंवा आईनं वरून बघून सांगितलं ते लक्षात नाही पण आम्ही त्या मुलांना बोलावून त्यांनाच ते फटाके फोडायला दिले, आमच्याच समोर. त्यांनाही बरं वाटलं, आम्हालाही. सगळे फटाके संपले. आणि माझ्या आयुष्यातलं फटाके पर्व संपलं.
हल्ली पहाटे चारचार पर्यंत फटाके फोडतात. आणि हल्ली आवाजाच्या फटाक्यांचं प्रस्थ वाढलंय. मला दिवाळीत धुराचा जाम त्रास होतो. पूर्वी का व्हायचा नाही ठाऊक नाही. किंवा होत असेल, पण मी दुर्लक्ष करत असेन. पण हल्ली आवाजाच्या फटाक्यांच्या अतिरेकामुळे दिवाळी बेरंग होऊन गेलीय. त्यामुळे मी गेल्या तीन दिवाळ्या घराबाहेर असूनही मला हायसंच वाटतं. फक्त आई घालते ते उटणं लावून अभ्यंगस्नान आणि फराळ नसल्याने खूप चुकल्यासारखं वाटतं.
सगळ्याच सणांना बहुतेक करून सकाळी आम्हाला ठेवणीतल्या सोन्याच्या चेन्स घालायला मिळायच्या. सकाळी नवे कपडे घालून, त्या चेन्स घालून भावाबरोबर आणि नंतर मित्रांबरोबर आई देवळात धाडायची. त्या देवळात जाण्याचीपण एक मजा असायची. मी कधी एकदम श्रद्धेने देवळात गेलोय असं मला स्मरत नाही, पण तो सगळाच एक सोहळ्याचा भाग असायचा. त्यातली खुमारी वेगळीच. एकदा देवळातून आलं की चांगलंचुंगलं खायचं. पुन्हा मित्रांबरोबर खेळायला जायचं, ते थेट दुपारी गोडाधोडाचं खायला परत. त्यानंतर वामकुक्षी आणि मग पुन्हा फराळ, खेळ! ते दिवस आता तसेच राहिले नाहीत. जवळचे मित्र पांगलेत. शहरात कुणीच नाही. कधीतरी चुकून आम्ही सणावारांना एकत्र भेटतो. भावाचं कुटुंब आहे. सणांना सगळे भेटतो, पण आम्ही आता लहान राहिलो नाही. सगळीच गणितं बदलल्याचं जाणवतं.
मी गेल्या तीन वर्षांपासून एकाही उपरोल्लेखित सणाला घरी नाही. आता वर्षाभराने कधीतरी जेव्हा कायमचा परतेन, तेव्हा येणार्या सणांना काय नवीन बघायला मिळेल कुणास ठाऊक! बदल होतच राहतात. नीट पाहिलं तर कधीकधी त्यातही वेगळी मजा असते. तीच शोधायचा प्रयत्न करेन बहुदा!
लिहिता लिहिता फारच लिहून गेलो. वाचल्याबद्दल खूप धन्यवाद!
तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिपावली सुखसमृद्धीची, आनंदाची आणि आरोग्यपूर्ण ठरो!
(समाप्त)
टीप - हा माझा जालरंग प्रकाशनच्या इ-दिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. पूर्ण लेख फार लांब असल्याने एकाहून अधिक भागांमध्ये देत आहे.
हाही मस्तच. मला एक कळत नाही, लेख प्रसिद्ध होऊन सहा तासांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही एकही प्रतिक्रिया नाही? कमाल आहे! बाकी लेख मस्तच आहे... आवडला.
ReplyDeleteबाबा, हाही लेख मला 'पुन्हा' आवडला :) .. आणि शेवटचा परिच्छेद यावेळीही टोचला.. !
ReplyDeleteबाबा सुंदर पोस्ट.... मनापासून आवडली... तुझ्या शब्दखेळांची फॅन आहेच मी... :)
ReplyDeleteशेवटही अपतिम.... नॉस्टाल्जिया हा आपल्या सगळ्यांचा स्थायीभाव आहे, बालपणातले तपशीलही थोडेफार जुळणारे आणि आजच्या पिढीपेक्षा वेगळे त्यामूळे आपण अधुनमधून आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेत बालपणात चक्कर टाकून येतो नाही का!!!
सुंदर अप्रतिम ,बालपणाच्या आठवणी आपण ज्यागुत केल्या ,धन्यवाद
ReplyDeleteनॉस्टल्जिक झालो बघ ! मस्त होते रे तुझे सणजीवन! आमचे सणजीवन थोडे वेगळे होते बाबा, पण तेही मस्तच होते ;)
ReplyDeleteतू नेहमीच छान लिहतोस, पुन्हा पुन्हा काय सांगायचे?
नॉस्टल्जिक झालो बघ !!!
ReplyDeleteभाई, हाही लेख मला 'पुन्हा' आवडला :)
संकेत,
ReplyDeleteअरे हा पूर्वप्रकाशित लेख आहे, त्यामुळे बर्याचजणांनी तिथेही वाचून प्रतिक्रिया दिलेली आहेच, त्याबरोबरच शनिवारच्या सुट्ट्यांमुळे असेल, तुझी पहिली प्रतिक्रिया उशीराच आली! :D
हेरंब,
ReplyDeleteअरे शेवटचा परिच्छेद आपल्या सगळ्यांचा लसावि आहे! :)
तन्वीताई,
ReplyDeleteहो ना...आपल्याला सगळ्यांनाच जुन्या सफरीवर जायला आवडतं.. नव्या गोष्टींकडे नव्यानं पाहण्याचं बळ तिथनंच मिळतं ना!
महेशकाका,
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद! :)
संकेतानंद,
ReplyDeleteआता एखादा मुहूर्त पाहून तू देखील तुझ्याकडच्या सणजीवनावर एक पोस्ट लिहून टाक!! :)
सुहास,
ReplyDelete:)
परत एकदा धन्स :D!!
अरे शेवटचा परिच्छेद आपल्या सगळ्यांचा लसावि आहे! +१००
ReplyDeleteश्रीताई,
ReplyDelete:)
शेवटचा परिच्छेद आपल्या सगळ्यांचा लसावि आहे....+100
ReplyDelete