प्रत्येकाचे सणांचे आपले आपले अनुभव असतात. आणि प्रत्येकाच्या केसमध्ये बरेचदा प्रत्येक सणाशी निगडीत काही अविस्मरणीय असे अनुभव असतात की त्या सणाचा उल्लेख आला रे आला की तोच अनुभव पहिला आठवावा. माझ्या बाबतीत अनेक सणांच्या नुसत्या उल्लेखाला माझ्या डोळ्यासमोर विविध गोष्टी आणि विविध प्रसंग उभे राहतात. आता दिवाळी आलीय (आम्हा मित्रांमध्ये 'दिवाळी आलीय?' ह्या प्रश्नाचा अर्थ होतो, 'तुला अतिमहत्वाकांक्षेची बाधा झालीय!' पण ऐन दिवाळीच्या आधी ह्या ताकदवान शब्दप्रयोगातली हवाच निघून जाते). आणि दिवाळी म्हणजे सणांचा राजा/राणी असं काय काय म्हणता येईल. त्यामुळेच म्हटलं की माझ्या आजवरच्या सणजीवनाचा एक तात्विक परामर्श घ्यावा.
आपण सुरूवात करू इंग्रजी वर्षाच्या सुरूवातीपासून. संक्रमण किंवा संक्रांत. तसं पाहायला गेलं, तर दिवाळी संपली रे संपली की मुंबईमध्ये संक्रांतीचे लागलेले वेध आकाशात पतंगरूपाने विहरताना दिसतात. मी लहान असल्यापासून संक्रांत म्हणजे पतंग हे समीकरण डोक्यामध्ये प्रचंड फिट बसलेलं आहे. खरं म्हणजे लोकांना संक्रांत म्हटलं की तीळगूळ, गुळपोळ्या आणि तूप असलं काही काही सात्विक दिसतं, पण आम्हाला (पक्षि- अस्मादिक) फक्त रंगीबेरंगी पतंग आणि त्यांचे विविध जाडीचे (विड्थ - सांगणेस कारण की ह्यास विशेषण समजून गैरसमज उद्भवू नयेत) मांजे डोळ्यासमोर येतात. तीळगूळ, गुळपोळ्या वगैरे चीजा नंतर येण्याचं कारण की ते सगळे एक दिवसाचे चोजले असतात. पण पतंग आणि मांजे ही जवळपास दोन-अडीच महिन्यांची अशक्य मेहनत असते. संध्याकाळी शाळेतून घरी येताना मुंबईतल्या एस.व्ही.रोडसारख्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या रस्त्यावरून समोर न पाहता वर आकाशात पाहत घरी येणं असो, की घरी आल्यावर दप्तर टाकून कसंबसं काहीतरी घशात कोंबून कधी कपडे बदलून किंवा कधी न बदलताच दौडत थेट गच्चीवर जाणं असो, किंवा आपल्या कुठल्याही खिडकीत एखाद्या पतंगाचा मांजा अडकलाय का हे ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजने रिकाम्या मोज्यात काही टाकलंय का हे पाहण्याच्या परदेशी खुळापेक्षा जास्त खुळेपणाने पाहण असो, किंवा मग गच्चीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जीवाचीही तमा न बाळगता हवेतून लटकत चाललेला मांजा पकडण्यासाठी घेतलेली वेडी धाव असो, किंवा एखादा पतंग गच्चीवर न येता खाली कंपाऊंडमध्ये पडण्याची चिन्ह दिसताच पाचव्या माळ्याच्या गच्चीपासून थेट तळमजल्याकडे चार-चार जिन्यांच्या उड्यांनी घेतलेली बेफाम धाव असो, संक्रांत म्हणजे माझ्यासाठी नेहमीच मेहनतीचं आणि वेडाचं प्रतीक राहिल.
आम्ही तीन समवयस्क मुलं होतो. आमच्या इमारतीत आमच्यापेक्षा ५ ते ८ वर्षं मोठा असा एक मुलांचा गट होता किंवा आमच्याहून ६-१० वर्षं लहान असा एक गट, त्यामुळे आम्ही अल्पसंख्यक गट होतो. पण तरीही आम्हाला कसल्याही सवलती नव्हत्या. वयामुळे आमच्या नशीबी फक्त मोठ्या मुलांची फिरकी धरणं आलं होतं (ह्यामध्ये माझा थोरला भाऊही होता). पुन्हा त्यांना पाहून पतंग उडवणं ही काहीतरी अप्राप्य कला असावी असा आमच्या निरागस बालमनांचा समज झाला होता. त्यामुळे आम्ही आपले कौतुकानं त्यांना पतंग उडवताना, 'कायपो छे' म्हणून ओरडताना किंवा 'ए लप्पेट' म्हणून ओरडताना पाहायचो आणि आपल्या हातात फिरकीऐवजी कधीतरी मोठं झाल्यावर मांजा येईल ह्या आशेत दिवस कंठायचो. कधीतरी आकाश निरभ्र आणि निर्धोक निर्पतंग असेल तर आम्ही ज्याची फिरकी धरलीय तो उदार, दयाळू आण कनवाळू वगैरे होऊन बागडोर आमच्या हातात सोपवायचा. पतंग दिसणारही नाही एव्हढ्या उंचीवर असायचा. आम्ही आपले आपल्याला पतंग उडवता येतो ह्या थाटात विविध हातवारे करायचो. पुन्हा जवळपास धोका दिसला की आमच्या समर्थ हातांतून मांजा हिसकावला जायचा आणि पुन्हा फिरकी हाती यायची. मांजाचे दोन प्रकार, एक 'ढील' द्यायचा मांजा आणि दुसरा 'घसटी' मांजा. ढीलवाला मांजा जाड असतो म्हणून बोट कापतं आणि घसटी मांजा बारीक असतो म्हणून हे ऐकून आम्ही पतंग उडवणं ह्या कलेपासून फारकत घेतली होती.
पण कधीतरी पाचवी सहावीत आमच्यातल्या एकाला भन्नाट कल्पना सुचली की आपण पतंग उडवू शकत नाही, तर किमान पकडू तरी शकतो. आपल्याला कुणी पतंग उडवू देत नाहीत आणि उडवायला शिकवतही नाहीत, तर आपण पतंग पकडू आणि जमा करून ठेवू. झालं, त्या वर्षीपासून आमच्या पतंगतपश्चर्येला सुरूवात जाहली. वर वर्णन केल्याप्रमाणे दोन ते अडीच महिने 'एकच ध्यास, एकच भास हा पतंग आमचा आहे आणि आगच्चीतळमजला सार्या भागावर आमचं राज्य आहे.' कुणाचा विश्वास बसणार नाही. एकाच सीझनमध्ये आम्ही तीन मस्केटियर्सनी तब्बल दोनशेच्या जवळपास पतंग पकडले होते. पुन्हा आमच्यात अनहेल्दी कॉम्पिटिशन असायची. अनहेल्दी अशासाठी की कधीकधी पतंग कुणाचा यावरून जबरा वाद व्हायचे. कारण बरेचदा मांजा एकाच वेळी दोघांनी आणि कधीकधी तर तिघांनी पकडलेला असायचा. मग ह्या खटल्याचा निकाल ठरलेला असायचा. विवादित पतंगाचं त्रिभाजन व्हायचं (हे सोल्यूशन आम्ही अलाहाबाद उच्चन्यायालयाच्या आधी शोधलं होतं)!
धरपकडीचं धोरण लागू झाल्यानंतरच्या दुसर्या किंवा तिसर्या सीझनमध्ये मी एकट्याने शंभर धरले होते. हा माझा वैयक्तिक रेकॉर्ड आहे आणि बहुतेक तो अजून अबाधित असावा (कदाचित दुसर्या दोघांपैकी कुणीतरी बरोबरी साधली असेल, पण मोडला नक्कीच नाहीये). तर असं आमचं धरपकडीचं धोरण गोमटी फळं आणत होतं. घरच्या माळ्यावर पतंगांची चळत बनली होती आणि मी हट्टानं ते माझ्या भावाला मिळू नयेत अशी तजवीज केली होती. तोवर भाऊही कॉलेजात डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला पोचला होता बहुधा. सीए चालू होतं, त्यामुळे त्याचा संक्रांतीचा उत्साह कमी झाला होता. मग अशातच एक दिवस मी आणि माझ्या एका मित्रानं क्रांती घडवण्याचं निश्चित केलं. माळ्यावरचे पतंग खाली आले. अर्ध्याहून अधिक फाटले होते. जेव्हढे धड होते तेव्हढे गच्चीत नेण्यात आले आणि थोड्या प्रयत्नांनंतर इतके दिवस अप्राप्य वाटणारी कला आम्हाला सहज वश झाली. आयुष्यातला एक बोळा निघाला, पाणी वाहतं झालं (हे सखाराम गटणेतलं वाक्य ढापलं, इथे फारसं शोभत नाही पण टाकावंसं वाटलं म्हणून टाकलं). त्यानंतर माझं पतंग पकडण्यावरच प्रेम कमी होऊन उडवण्यावर बसलं. पण मी मूलतः कंजुष ह्या प्रकारात मोडणारा असल्याकारणे महाग मांजा आणणं माझ्या जीवावर यायचं. मग मी कल्पना लढवली आणि पकडलेल्याच पतंगांचे मांजे जोडून चक्क फिरकीभर मांजा गोळा केला आणि ह्याच गाठी गाठीच्या मांजाने मी पतंग उडवू लागलो. त्यामुळेच माझे पतंग कल्पनेतच दुसर्यांचे कापायचे, प्रत्यक्षात स्वतःच हुतात्मे व्हायचे. ह्यामुळे लवकरच माझा साठा संपला आणि मला नव्या बायकोचे लाड पुरवण्यासाठी पहिल्या बायकोचा अर्थात पतंग पकडण्याच्या कलेचा वापर करावा लागला. आणि तिनेही पतिव्रतेप्रमाणे माझी पुढचे दोन ते तीन सीझन पूर्ण साथ दिली. संक्रांत संपली की बोटांवरच्या कापलं गेल्याच्या खुणा शौर्याच्या खुणा वाटायच्या. आजूबाजूच्या गुजरात्यांच्या इमारतींवर लावलेले डेक, हवेत विहरणार्या अनेकांतला एक आपला पतंग, उन्हं, डोक्यावरची टोपी, कानापाशी लागलेली घामाची धार आणि एकेकाळी अनहेल्दी कॉम्पिटिशन करणारे आता एकमेकांना पतंग पकडून देणारे आम्ही थोडे मोठे झालेले मित्र, ते सगळं भारावलेलं वातावरण अजूनही माझ्या डोक्यात ताजं आहे.
त्यानंतर वडलांनी क्वार्टर सोडली (कंपनीने दिलेली जागा). आणि आम्ही नव्या इमारतीत आलो. एक वर्ष मी पुन्हा जुन्याच ठिकाणी संक्रांतीसाठी आलो. पण त्याच्या पुढच्या वर्षी माझ्या साथीदारांनीही इमारत सोडल्यावर माझा पतंग ह्या प्रकरणाशी जवळपास काडीमोडच झाला. वर्षभरातच जागा पुन्हा बदलून जिथे आलो तिथे पतंग उडवणारा मी एकटाच. उत्साहाचा पतंग एका वर्षातच खाली आला. तेव्हापासूनच संक्रांत म्हणजे फक्त गुळपोळ्या आणि तीळगूळांपर्यंतच मर्यादित झाली. आता प्रत्येक संक्रांतीला जुन्या दिवसांच्या, त्या पाच-सहा झपाटलेल्या वर्षांच्या आठवणी काढत उसासे टाकण्याखेरीज काहीच करता येत नाही.
मग पुढे निघाल्यावर आपल्याला भेटते होळी. होळी म्हणजे फुल टीपी (टीपी- टाईमपास) प्रकार असतो. होळीचे दोन दिवस असतात. एक म्हणजे पेटवायची (आणि बोंबा ठोकायची) होळी आणि दुसरी म्हणजे खेळायची होळी!
पेटवायची होळी हा माझा खास जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे मला आग लावायला आवडतं आणि दुसरं म्हणजे मला बोंबा मारायला आवडतं. असो. विनोदाचा भाग सोडला, तर होळीविषयी इतकं वाटण्याचं कारण म्हणजे आम्ही तीन मित्रांनी आमच्या इमारतीमध्ये होळीची सुरूवात केली होती. अवघी १२ वर्षांची आम्ही मुलं होतो. आमच्याकडे कोण लक्ष देणार. पण आम्ही कंपाऊंडमध्येच पडलेल्या काटक्या गोळा केल्या आणि माळ्याच्या खोलीसमोर छोट्याशा जागेत होळी पेटवली. होळी कसली, छोटीशी शेकोटी होती. पण आमच्यासाठी ती अचिव्हमेंट होती. दोन तीन काकूंनी खाली येऊन होलिकेची पूजाही केली आणि आम्हाला ऍप्रूव्हल मिळालं. त्यातल्या एका काकूंनी एका फुलपात्रातनं अर्घ्यासारखं काहीतरी ओतलं आणि आमची होळी चक्क विझली! आम्ही एकमेकांकडे केविलवाणे दृष्टिक्षेप टाकले. होळी विझली होती, पण निखारे अजून तप्त होते.
पुढल्या वर्षी आम्ही होळी पेटायच्या महिनाभर आधीपासून पेटलो होतो. बर्याच काकांना आमची दखल घ्यायला आम्ही भाग पाडलं होतं. मोठी जागा मिळाली. आणि ह्यावेळेस चक्क होळीच्या दिवशी सगळी मोठी माणसंही आली होती. आम्ही महिनाभर बरीच लाकडं काकालोकांच्या मदतीनं जमवली होती. त्यामुळे मस्त होळी जमली. अगदी आजूबाजूच्या इमारतींतूनही माणसं आली. त्यानंतरही मी दोन-तीन वर्षे तिथं जात राहिलो. नंतर जाणं झालं नाही होळीत, पण होळी अजून सुरू असल्याच ऐकिवात होतं. ते काहीही असलं, तरी झटक्यात विझलेली पहिली होळी आणि दुसर्या वर्षीच्या पहिल्या यशस्वी होळीनंतर आम्ही तिघांनी एकमेकांना मारलेली मिठी अजून आठवते.
मी जेव्हा एकदम लहान होतो (पर्यायाने निरागस) तेव्हा मी होळीच्या रंगांना प्रचंड म्हणजे प्रचंड म्हणजे प्रचंड घाबरायचो (तसा मी फटाक्यांच्या आवाजांनाही घाबरायचो, पण ते पुढे विस्ताराने येईल). का माहित नाही. पण मी रंगपंचमीला घरीच लपून बसायचो. त्यावेळेस महिनाभर आधीपासून फेकून मारायच्या पिशव्या मिळत नव्हत्या. इज्जतशीर मेहनत करून फुगे फुगवावे लागायचे! त्यामुळे टेन्शन फक्त एका दिवसाचं असायचं. पण असंच कुठल्यातरी वर्षी, बहुतेक चौथी-पाचवीत असेन, मी गच्चीमध्ये रंगपंचमी खेळायला गेलेल्या माझ्या भावाला आणि बाबांना बोलवायला गेलेलो. दुपार झालेली, बहुधा लोकं शांत झालेले असतात. मी दबकत दबकतच वर चाललेलो. तेव्हा एक मुलगा रंग खेळून खाली उतरत होता.मी त्याला चेहर्यावर रंग लावलेल्या अवस्थेत एकदम खिदळताना आणि एन्जॉय करताना पाहिलं. मला तो प्रसंग अजूनही स्वच्छ आठवतो, खरंच! माझं एका क्षणात मतपरिवर्तन झालं होतं. मी मनाचा हिय्या करून पुढे झालो आणि त्याला म्हटलं, मला लाव रंग! तो पण एकदम चाट पडला. त्यानं थोडासा लावला माझ्या गालांना. मग मी पण त्याच्याचकडून रंग घेऊन त्याला लावला. मला जाणवलं आपल्याला गंमत वाटली (हे अति मेलोड्रामाटिक होत चाललंय). खरंच असं झालं होतं. मी वर गेलो आणि बाबा पण मला बघून चाट पडले. मी दोघा तिघांना माझ्या पाठीवर फुगे फोडायला लावले.माझ्या मते हा मानसशास्त्रावरचा उत्तम धडा होता (लाल करणेस सुरूवात). मी स्वतःच्या फोबियावर स्वतःच यशस्वीरित्या मात केली होती (इति लाल करणे).
त्यावेळी आमच्या इमारतीत एक प्रथा होती, की रंग खेळून झाले की सगळी कुटुंबं जवळच्याच समुद्रावर गाड्या काढून जायचे आणि तिथे आंघोळ वगैरे करून मग तिथला 'बर्फाचा गोळा' खायचे. हा कार्यक्रम उरकूनच मग सगळी कुटुंब परत यायची मग जेवणं बिवणं. मी नेहमीप्रमाणेच घाबरट. समुद्राला प्रचंड घाबरायचो. सुरूवातीला तर पाण्याला स्पर्शही नाही करायचो, पण नंतर नंतर कंबरभर पाण्यापर्यंत मजल गेली. पण हा एक फोबिया आजवरही मात न करता आलेला आहे. पण असो. तिथला गोळा खाणे हा देखील एक सोहळा होता. त्यानंतर घरी येऊन पुरणपोळी!
आम्ही ती इमारत सोडण्याच्या काही वर्षे आधी पाणी भरायच्या पिशव्यांचं पेव फुटलं होतं. अतिशय सोपं काम. नाहीतर ते फुगे आणा आणि बोटं लाल होईस्तो नळाच्या तोटीला लावण्यासाठी त्यांची तोंडं ताणा, ते करताना अर्धे हातातच फाटायचे. मग सगळ्यांत वाईट प्रकार गाठी मारणे. त्या स्टेजला अजून २५% दम तोडायचे. १०० फुग्यांच्या पुड्यात ४० तयार झाले तरी नशीब. त्यामुळे फुगे फोडण्याची एक किंमत वाटायची. पण ह्या पिशव्यांनी त्या मेहनतीलाच चाट दिली. किंमत राहिली नाही. कुणीही सोम्यागोम्या फुगे आय मीन पिशव्या फोडू लागला. मग इमारतीच्या गच्चीतून किंवा घराच्या गॅलर्यांतून रस्त्यावरच्या लोकांवर पिशव्या फोडण्याचं लोण पसरू लागलं. फुग्यांच्या जमान्यात हे नव्हतं असं नाही, पण त्या धंद्यासाठी मेहनत आणि भांडवल दोन्ही जास्त लागायचं, त्यामुळे कमी होतं. पण ह्या पिशव्यांनी गैरप्रवृत्ती फोफावल्या. रंगपंचमीच्या आधीच १० दिवस टेन्शनमध्ये जाऊ लागले. सुरूवातीला मलाही मजा वाटलेली. गच्चीत उभं राहून आम्ही मित्रांनीही दोन तीन पिशव्या एस.व्ही.रोडवर भिरकावल्या. पण मग एक दिवस, आमच्या शाळेत बातमी झाली. आमच्या एका सिनियर मुलीच्या डोळ्यावर फुगा किंवा पिशवी लागल्याने डोळ्याला दुखापत झाली म्हणून. ही बातमी ऐकली आणि गच्चीतून फुगे फेकण्याची विकृती जी आमच्यांत मूळ धरत होती, ती तिथेच उपटून फेकली. अजूनही रंगपंचमीत अशा बातम्या ऐकल्या की वाईट वाटतं. अजून कुणाकुणाला असं जवळच्या लोकांना त्रास झाल्यावरच अकला येणार कुणास ठाऊक! असो.
(क्रमशः)
भाग २
टीप - हा माझा जालरंग प्रकाशनच्या इ-दिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. पूर्ण लेख फार लांब असल्याने एकाहून अधिक भागांमध्ये देत आहे.
जालरंगमध्येच खूप आवडला होता...आता वेगळं काय लिहू...असे लेख वाचले की स्वतःच्या त्या दिवसांच्या आठवणीत आपसूक जायला होतं नाही??? मस्त मस्त मस्त.....:)
ReplyDeleteSo, even for your generation life is changing so fast ...!
ReplyDeleteकाही वर्षांपूर्वी खास पतंग उडवण्यासाठी संक्रांतीच्यावेळी अहमदाबादला गेलो होतो आम्ही..मैत्रिणी मैत्रिणी! मज्जा आली होती...पण पतंग नव्हती उडवता आली ! :)
ReplyDeleteआपल्या सगळ्या सणांबरोबर ह्या सगळ्या गमतीजमाती लगडलेल्या असतात. नाही का? माझ्या आठवणी जाग्या केल्याबद्दल...आभार. छान झाला आहे लेख! :)
क्या बात है.... आधिही वाचलाय तूझा हा लेख...तरिही पुन्हा पुर्ण वाचावा वाटला....आणि म्हणावेसे वाटतेय, लवकर टाक पुढचा भाग!! :)
ReplyDeleteमस्तच..
ReplyDeleteएकदम आठवणीत नेणार सणजीवन... आवडल :)
मस्तच.. बाबा, लेख 'पुन्हा' आवडला :)
ReplyDeleteअपर्णा,
ReplyDeleteधन्स गं!
सविताताई,
ReplyDeleteहो ना..काही फारच वेगानं काळ बदलतोय...
अनघा,
ReplyDeleteत्या आठवणींत रमायला खूप मजा येते आणि पुन्हा नव्यानं पुढे पाहायचा जोरही येतो! :)
तन्वीताई,
ReplyDelete:)
सुहास,
ReplyDeleteमंडळ आभारी आहे!
हेरंब,
ReplyDeleteपरत एकदा धन्यु! :)
मस्तच.. बाबा, लेख 'पुन्हा' आवडला +११११ :)
ReplyDeleteदेवेन,
ReplyDelete:D पुन्हा आभारी !!
तू लिहिलेला लेख वाईट असणं शक्य आहे का? त्यामुळे प्रथेप्रमाणे हाही लेख भारी. (‘भारी’च्या खालचा (म्हणजे बरा, ठीक, सामान्य वगैरे वगैरे) तुझा एकही लेख मी आजवर बघितलेला नाही. तुझे सगळे लेख ‘भारी’, ‘मस्त’, ‘सुरेख’, ‘उत्कृष्ट’ या क्याटेगर्यांतच मोडतात...)
ReplyDelete>>हे सोल्यूशन आम्ही अलाहाबाद उच्चन्यायालयाच्या आधी शोधलं होतं
हे बेष्ट होतं. :-)
माझ्या प्रतिक्रियेत मी पतंग स्त्रीलिंगी करून टाकलाय!! शी! :( 'तो' पतंग नाही का? 'ती' पतंग काय?!! बिच्चारा 'तो' पतंग! :)
ReplyDeleteअनघा, माझा नवरा म्हणतो "ती" पतंग आणि "तो" मांजा...तुला ते सचिनच (बहुधा) गाणं पतंग माझी कटली...:)
ReplyDeleteमाझ्या आवडत्या लेखांमधला एक वरच्या नम्बरचा एक लेख.. :)
ReplyDeleteसंकेत,
ReplyDelete:) धन्यवाद भावा!!!
अनघा,
ReplyDeleteचालतं :P
तो जोक वाचला असेल तुम्ही....
तो फळा, ती शाळा आणि 'ते' मास्तर! ;)
अपर्णा,
ReplyDelete:D
रोहन,
ReplyDeleteआपला लसावि :D