4/15/2010

योगायोग

आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी, घटना अश्या घडत असतात, की ज्यामध्ये कमालीचा योगायोग असतो. आता हे बघा ना, एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या मुलानं/मुलीनं एखाद्या मुसलमान मुलीशी/मुलाशी प्रेमविवाह करावा, अगदी सोवळंओवळं पाळणार्‍या घरातल्या मुलांनी आंतरजातीय विवाह करावे, हे आणि असे अनेक विचित्र योगायोग रोजच्या रोज घडत असतात. जगातल्या मोठमोठ्या माणसांनाही हे असले विचित्र चेष्टाप्रद योगायोग चुकले नाहीत. अहिंसावादी म्हटले जाणारे गांधी बंदुकीच्या गोळीने मेले. कार्ल मार्क्सचा साम्यवादावरचा ग्रंथ कोणी प्रकाशक मिळेना म्हणून एका भांडवलदाराच्या मदतीने प्रकाशित केला गेला. काही योगायोग मात्र काळजाला चटका लावून जातात. ते योगायोगांपेक्षा जास्त काळाची क्रूर थट्टा म्हणून शोभतात. एखाद्या महान स्वावलंबी माणसाचं जीवनाच्या अखेरच्या काळात परावलंबी होणं, एखाद्या शूर सैनिकाचा रुग्णशय्येवर थोड्क्याच आजाराने अंत होणं. असाच चटका मला माझ्या एका मित्रांनी सांगितलेल्या बातमीने लागला. त्यांचे अतिशय जीवाभावाचे स्नेही असलेले "सर्पमित्र', एका सर्पाच्याच चावण्याने दगावले.
मराठीमध्ये एक शब्द आहे, "दैवदुर्विलास". ह्या शब्दाशिवाय दुसरा कुठलाही शब्द मला सुचला नाही ही बातमी ऐकल्यानंतर. सर्पमित्र सुनील रानडे, ही एक वल्ली होती. अर्थात मी त्यांना प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही. जेव्हढंही ऐकलं ते सगळं आमच्या कंपनीतलेच एक सहकारी मित्र आहेत, त्यांच्याकडून. हे आमचे सहकारी, सर्पमित्र रानडेंचे स्नेही. दोघेही होमगार्डमध्ये एकत्र होते. त्यावेळी आमचे सहकारी रानडेंचे सिनीयर होते. त्यांची चांगली मैत्री होती. रानडेंनी प्रेमविवाह केला. घरच्यांच्या इच्छेविरोधात जाऊन. त्यावेळीही आमच्या सहकार्‍यांचा त्यांचा विवाह घडवून आणण्यात मोलाचा वाटा होता. साहजिकच, त्यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. रानडे, परळच्या प्राणिइस्पितळात नोकरीला होते. आणि त्यांच्या कुटुंबासमवेत ते तिथल्याच स्टाफ क्वार्टर्समध्ये राहायचे. दवाखान्यात सापांना ठेवण्याची जागा नव्हती, म्हणून रानडे सापांना आपल्याच घरी ठेवायचे. रानडेंनी एकदा एका जहाजातून अजगरही जिवंत पकडून त्याचे प्राण वाचवले होते. त्यांनी बर्‍याच सापांना असंच जीवदान दिलं होतं.
एक दिवस बायको माहेरी गेली असताना, रात्री सापांना बघताना, किंग कोब्रा त्यांना चावला. त्यांनी स्वतः विष उतरवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्यांना यश आलं नाही. आणि शेजार्‍यांनी त्यांना इस्पितळात नेईपर्‍यंत उशीर झाला होता. वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी एका सर्पमित्राचा सर्पाच्याच चावण्याने मॄत्यू झाला. दैवदुर्विलास - दुसरं काय?
आता त्यांच्या पत्नी त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहाय्याने पुन्हा उभ्या राहायचा प्रयत्न करतायत. मुलांच्या शाळेसाठी म्हणून आणि दुसरी सोय करता यावी म्हणून क्वार्टर्समध्ये थोडा कालावधी वाढवून मिळावा ह्यासाठी आता त्यांचे प्रयत्न चाललेत. साहजिकच आमचे सहकारीही प्रयत्न करतच आहेत.
बातमी ऐकून दुःख झालं होतं, पण त्याहून जास्त हतबलता येते, ती आपण काही करू शकत नाही ह्या भावनेने. दैवाचे क्रूर खेळ तर थांबवू नाही मी, पण प्रार्थनेपलीकडेही कुणासाठी काही करता यावं, ह्यासाठी मात्र प्रार्थना कराविशी वाटतेय; हा काही योगायोग नाही.

4/11/2010

अ, ब आणि क

मी जेव्हापासून सिनेमे अनुभवण्यासाठी म्हणून बघायला लागलो, तेव्हापासून माझी नजर नुसतीच गोष्ट किंवा अभिनय किंवा आवडते नट-नट्या (नट आपलं उगाच जोडशब्द म्हणून लिहिलंय) ह्याकडे न राहता इतर अनेक गोष्टींकडे जाऊ लागली (हे लिहिणार होतो म्हणूनच आवडते नट-नट्या{पुन्हा नट ...} आधी लिहिण्याचा खटाटोप). असो. तर इतर गोष्टी म्हणजे कॅमेरा ऍंगल, प्रकाशयोजना पण ह्या तांत्रिक गोष्टी फारश्या समजत नसल्यामुळे त्यांचा जास्त विचार न करता माझी गाडी वळते ती संवाद आणि संवादफेकीकडे.
मला वैयक्तिकदृष्ट्या ब-क दर्जाचे सिनेमे फक्त संवाद आणि संवादफेकीसाठी आवडतात (उदाहरणार्थ, मिथुनदांचं सेल्ल्युलॉईडवरचं महाकाव्य - "गुंडा"(१९९८)). हे सिनेमे तद्दन भिकार वाटू शकतात लोकांना. वाटोत, बिचार्‍यांना आयुष्यातल्या केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकावं लागतं ते त्यांना नाही कळायचं.  मला हे सिनेमे आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे, ते कुठेही सत्य किंवा पाथब्रेकिंग वगैरे असण्याचा आव आणत नाहीत. नागवे तर नागवे, उगाच 'नग्नचित्र ही काय कला आहे तुम्हाला नाही कळायचं' असले आव आणणं नाही. म्हणूनच मला त्यातून निर्मळ मनोरंजन मिळतं. अर्थात, त्यामध्ये बीभत्सपणा अंमळ जास्त असतो, पण शेवटी ह्या सिनेमांचा टारगेट ऑडियन्स असतो. आता वानगीदाखल गुंडातला पुढचा संवाद पहा,
"ए कौन है बे तु?"-एक व्हिलन मिथुनदाला.
"मैं हूं जुर्म से नफरत करनेवाला, गरीबों के लिये ज्योती और तुझ जैसे गुंडों के लिये ज्वाला।"-मिथुनदा.
"बना के तुझे मौत के मुंह का निवाला, गाड दूंगा तेरी छाती में मौत का भाला।"-....
आता मला सांगा ह्या असल्या फालतू संवादांपासून सिनेमातले जवळपास सगळे संवाद यमक जुळवून आहेत, काही बीभत्स, काही खरंच विनोदी. मग का नाही मी ह्या सिनेमाला महाकाव्य म्हणायचं. असेच संवाद मिथुनदा आणि धर्मेंद्रच्या उतारवयातील अनेक सिनेमांमध्ये आहेत. पण असो, मी जर सुरु झालो तर फक्त संवादांचाच एक ब्लॉग होईल.
ह्या सिनेमांमध्ये आपले मराठीतले आघाडीचे अभिनेते मोहन जोशी हटकून असतातच. गुंडा, लोहा अश्या अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या ब-अभिनयाचा लोहा मनवलेला आहे. तर आपण कुठे होतो. संवाद आणि संवादफेक. तर अश्या सिनेमांमध्ये बरेचसे कलाकार फडतूस असतात. स्वस्तात कामे करणारे. त्यामुळे त्यांचा दर्जा हा सिनेमाच्या एकूण दर्जाशी साधर्म्य साधणारा असतो. पण ह्या सिनेमांमध्ये जे मिथुनदा, धर्मेंद्र, शक्ति कपूर सारखे मंझे हुए कलाकार असतात त्यांचीसुद्धा खास ह्या सिनेमांसाठी एक टाळ्या घेणारी संवादफेक असते. एरव्ही "आय एम कृष्णन अय्यर येम ये." म्हणून अप्रतिम अभिनय करणारा मिथुनदा, जेव्हा "दो..चार..छे..आठ..दस.....बस.." म्हणतो, तेव्हा तो फक्त कूली शंकर असतो. "मेरा नाम है सुरज..ट्रक ड्रायव्हर सुरज." ह्या संवादाची कल्ट फॉलोईंग तर "द नेम इज बॉन्ड.." पेक्षाही जास्त असेल. धर्मेंद्रचं "कोई हसीना जब रूठ जाती है तो..." हे तुम्हाला पानीकम वाटायला लागेल, जर तुम्ही "पुट ऑन द घुंगरू ऑन माय फीट ऍंन्ड वॉच माय डीराम्मा.."(तहलका) पहाल. आणि तुम्ही जगप्रसिद्ध "सुसाsssईड" म्हणणारा हाच का धर्मेंद्र असा विचार कराल जेव्हा तो "मैं हूं गरम धरम...मुझे कैसी शरम."(पुन्हा तहलका) असं म्हणत नाचतो.
हे सिनेमे नुसतेच भिकार असतात अशातला भाग नाही, कधीकधी अत्यंत हिडीस उपमा देऊन संवादांना नटवलेलं असतं. आता लोहामध्ये एक भिकार सिच्युएशन आहे. एकेकाळचा मोठा भाई दीपक शिर्के('एक शून्य शून्य वाला) आता अगदी बरबाद आहे आणि तो दुसर्‍या एका भाईकडे मदतीची याचना करायला आलाय. त्याच्या ओळी आहेत, "मैं बिना पेट्रोल की गाडी हूं, मैं बिना नशे की ताडी हूं, मैं वो फटेली साडी हूं, जिसे कोई हिजडा भी नही पेहनेगा।"
अशा वेळी माझा सलाम जेव्हढा त्या कलाकाराला असतो, तेव्हढाच त्या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन पुन्हा ओरडून पहा मी किती खालच्या पातळीवर आहे हे सांगण्यासाठी कलेजा लागतो, तो जर चोप्रा आणि जोहरकडे असता, तर "कांताबेन" आणि "ये कान में डाल.."(कल हो ना हो), "बोमन इराणीचं दोस्तानामधलं पात्र" आणि "सेक्सी सॅम" (कभी अलविदा ना कहना) हे बीभत्स विनोद आजची पिढी किंवा मॉडर्न सोसायटीच्या नावाखाली खपवण्याचा दांभिकपणा त्यांनी केला नसता. असो. माझे मुद्दे, दृष्टीकोन सगळ्यांनाच पटतील असं नाही. ते पटावेत असा अट्टाहासही नाही. आपण पुढे जाऊ.
माझी अजून एक आवडती गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा. नाचातले नाही. एकूणातच सिनेमातले, किंवा अगदी हल्लीच्या सिरियलमधलेही (होय मी सिरियल्स बघतो. मी खुल्लम खुल्ला सांगतो की मी सिरियल्स बघतो). आणि हे फक्त ब-क वाले नाही सगळ्याच अगदी मेनस्ट्रीम (इथे द्व्यर्थ आहे का? मेन म्हणजे पुरुष सुद्धा होतं) सिनेमातलेही. हे लोकसुद्धा एक प्रकारचे 'ब आणि क'च, कारण मुख्य पात्र म्हणजे 'अ', हे आपले उगाच पूरक. ह्याचा अर्थ मला ब आणि क हा प्रकार एकूणातच भलताच आवडतो असा होतो. पण शाळेत मी 'अ' वर्गात होतो आणि गणितातल्या 'ब, क आणि ड' गटाशी माझे फारसे सलोख्याचे संबंध नव्हते.
तर आपण ब आणि क कॅटेगरीच्या पात्रांवर होतो. म्हणजे बघा हिरो हिरॉईनला पाणीपुरी खायला घालतोय, तेव्हा पाणीपुरीच्या गाडीवाल्याच्या चेहर्‍याचं कधी निरीक्षण केलंय तुम्ही कधी? अगदी मजेदार भाव असतात. म्हणजे कधी कधी एखादा हळूच आपण कॅमेरात दिसतोय की नाही हे डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघत असतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो आणि तो इस्त्री (मला कधीकधी प्रश्न पडतो, काही उत्तर भारतीय, 'स्कूल'ला 'इस्कूल' 'स्तर'ला 'इस्तर' म्हणतात, मग ते 'स्त्री' ला 'इस्त्री' म्हणत असतील का?{समस्त स्त्रीवर्गाची आत्ताच माफी मागतो}) मारल्यागत करून उभा राहतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो पण त्याला दाखवायचं नसतं की तो कॅमेरा कॉन्शस आहे, मग तो उगाच खोटं हसू किंवा आपण आजूबाजूला बघण्यात गर्क आहोत असा आव आणत राहतो किंवा एखादा एवढा कॅमेरा अनकॉन्शस असतो की आपण सीनचा भाग नसून आपणपण शूटींग बघायला आल्यासारखा पूर्ण सीनभर हिरो हिरॉईनकडे पाहत राहतो. मग एखाद्या सीनमध्ये, स्पेशली ९०' च्या दशकातल्या सिनेमांमध्ये हिरो किंवा हिरॉईन रस्त्यावर नाचगाणी करत असतात, तेव्हा उभ्या क्राऊडमध्ये एखाद्याकडे जाऊन काहीतरी वेगळं म्हणजे त्याची टोपी काढतात किंवा त्याची दाढी कुरवाळतात किंवा त्याचा विग काढतात वगैरे, तेव्हा त्या एका माणसाचा चेहरा बघण्यासारखा असतो. कारण हे क्राऊड म्हणजे बरेचदा खरंच रस्त्यावरचं शूटींग बघायला आलेलं क्राऊड असतं, तेव्हा सिनेमाच्या मुख्य कलाकाराबरोबर आपण एका सीनमध्ये आहोत हा अनुभवच त्यांचा चेहरा तेजोमय करायला पुरेसा असतो, त्यामुळे बरेचदा त्यांची फजिती होतेय असा सीन असतो, पण त्या माणसाच्या चेहर्‍यावर असे भाव असतात की त्यावेळी समर्थांनी त्याला विचारलं की "जगी सर्व सुखी असा कोण आहे?' तर तो "मी" असं छाती ठोकून उत्तर देईल(मला माहितेय की ही जरा ओढून ताणून उपमा झालीय, खरं म्हणजे मी "स्वतः मेनका त्याचे पाय चोळून देतेय" असे भाव असतात असं लिहीणार होतो, मग अचानक पुलंचं 'असा मी असामी' आठवलं, मग म्हटलं टॅरॅंटीनो स्टाईल 'होमेज' देऊया. आणि बघा एकाच कंसात मला पुलं आणि टॅरॅंंटीनो दोन्ही माहितीयेत हे सांगूनही झालं). पण त्याहून जास्त मजेशीर भाव असतात ते ह्या फजिती होणार्‍याच्या शेजारी उभे असणार्‍यांच्या चेहर्‍यावर. आपण कॅमेरात व्यवस्थित येत असू की नाही ह्याची एकीकडे काळजी आणि येत असू तर नीट दिसत असू ना ही विवंचना (कारण सिनेमा रिलीज झाल्यावर नातेवाईक, शेजारी, सहकारी सगळ्यांना दाखवायचं तर धड दिसायला तर हवं ना). माझा हा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे, मी लहान होतो तेव्हा - साधारण सहावी सातवीत असेन - माझ्या एका मित्राच्या आईने "ताकधिनाधिन" ह्या तेव्ह्याच्या सह्याद्रीवरच्या हीट टीव्ही शोसाठी पासेस मिळवले होते. तो शो होता "लहान मुलांचा खास", त्यामुळे माझा मित्र, मी आणि अजून एक अशी आम्ही तीन लहान मुलं गेलो होतो शूटींगला. आम्ही नशीबवान म्हणून ऍंकर उभे राहतात त्यांच्या शेजारीच आम्ही होतो. आपल्या तिरंग्याच्या तीन रंगाच्या टोप्या पोरांना वाटल्या होत्या. मला भगवा मिळाला होता. ती टोपी मी बरेच वर्ष जपून ठेवली होती, अजूनही घरी कुठेतरी असेल. च्यायला अर्ध्या तासाचा तो शो पण त्याचं शूटींग पाच तास चाललं होतं. प्रत्यक्ष शूटींगमध्ये तुम्ही मुख्य कलाकार नसाल तर काहीच मजा नसते हे तेव्हा माझ्या बालमनाला पहिल्यांदाच कळलं होतं. असो, तर मी एंकर्स च्या शेजारी बसलो होतो त्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये आपण असू असं वाटत होतं (अर्थात ते थोडंफार खरंही होतं), त्यामुळे जेव्हाही ते ऍक्शन म्हणायचे मी एकदम विचारवंतासारखा चेहरा करायचो आणि स्पर्धकांबरोबर काही विनोद झाला की उगाच फार मोठा विनोद झाल्यागत कंपल्सरी हसायचो. आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या की अगदी जीवाच्या आकांताने टाळ्या वाजवायचो. अर्थात माझ्या मेहनतीचं मार्जरीन झालं (चीजमध्ये खूप अनवॉन्टेड फॅट्स असतात), कारण कधीतरी कुणीतरी तो एपिसोड पाहून, तू त्यात होतास का, म्हणून विचारल्याचं आठवतंय, नाही नाही एक मिनिट, त्यांनी विचारलं, तेव्हा मी ती भगवी टोपी घातली होती काय? च्यायला, कुठून तुम्हाला सांगायला गेलो, आयुष्यातल्या एका निखळ आनंदाच्या क्षणावर कायमसाठी संशयाचा बोळा फिरला. जाऊ द्या.
त्यानंतर असेच मस्त हावभाव न्यूज चॅनेलचे पत्रकार ज्या राह चलत्या आम आदमीचे इंटरव्ह्यू घेतात त्यांचे असतात ("अ वेन्सडे" चित्रपटात स्नेहल दाभी ह्या कलावंताने ते अप्रतिम दर्शवलेत). आपण कोणीतरी फार जाणकार दिसतो म्हणून आपल्याला विचारताहेत असं काहींना वाटत असतं, तर काहींना आपण स्मार्ट दिसतो असं वाटत असतं, तर काही आपण खरंच विचारवंत आहोत असं समजून पल्लेदार वाक्य फेकतात. तर त्याच्या आजूबाजूला उभे असलेले 'ह्यालाच का विचारतायत" असा विचार करत असतात, तर काही त्याच्यानंतर आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं ह्याची जुळवाजुळव (मनातल्या मनात) करण्यामध्ये गुंतलेले असतात, तर काही घरी फोन करून अमका चॅनेल लावा, मी दिसतोय का बघा आणि शेजार्‍यांना सुद्धा सांगा वगैरे करण्यात व्यस्त असतात. इथे सुद्धा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे (आहेच का? म्हणजे काय, माझा ब्लॉग आहे, मी स्वतःची लाल नाही करणार तर कोणाची). एकदा आमच्या कॉलेजात एक न्यूज चॅनेलवाले आले होते, मी तेव्हा जी.एस. असल्याने (कळला ना महत्वाचा मुद्दा, मी जी.एस. होतो, बाकी नाही वाचलंत तरी चालेल) मी समन्वय करत होतो. सगळी जनता कॅमेरासमोर उभी झाली. मग त्यांनी "बसमध्ये कंडक्टर २५ पैश्यांचं नाणं परत देईल तर तुम्ही काय कराल?" असला काहीतरी प्रश्न विचारला. कोणी कोणी काय काय पुड्या सोडत होतं, कसलं उत्तर आणि कसलं काय, सगळं लक्ष कॅमेराकडे. नाहीतर आम्ही, कॅमेराचं आमच्याकडे बिलकूल लक्ष नसूनही नेटाने फ्रेममध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो. कुणी घरी फोन लावले, मी मात्र मला विचारलं तर मी काय सांगावं ह्याची जुळवाजुळव करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. व्यर्थ अशासाठी की मी प्रश्न नीट ऐकलाच नव्हता आणि दुसरं मी समन्वयक असल्याने तांत्रिकदृष्ट्या मी कॅमेराच्या मागचा माणूस होतो आणि त्या निर्दयी कॅमेरामनने माझं कॅमेरासमोरचं टॅलेंट लोकांसमोर येउ नये ह्याची पुरेपूर खबरदारी घेतली. म्हणतात ना मीडिया बायस्ड आहे, खरंच.
तर असो. मुद्दा हा की सगळ्यांनी आजपासून मुख्य पात्र, कथा, आणि आवडत्या नट-नट्या (पुन्हा नट..) यांच्या पलीकडे बघायला सुरुवात करा. कारण तरच तुम्ही कुठल्याही कलाकृतीतला निखळ आनंद घेउ शकाल आणि त्या पात्रांनाही(आमच्यासारख्या) त्यांचं ड्यू क्रेडीट मिळेल.

4/08/2010

कहानी में ट्विस्ट!

आज संध्याकाळी ('संध्या काळी' नव्हे, सांजवेळ) घरी आलो, तेव्हा 'झी सिनेमा'वर ऑल टाईम हीट "यादों की बारात" लागला होता. मग तो बघता बघता ७०' ते ८०' च्या कालावधीतले बरेच सिनेमे आठवायला लागले. मग 'अचपळ मन माझे' त्यांच्या फॉर्म्युलाचा विचार करू लागले. मग(ही सगळी प्रस्तावना, मला सिनेमातलं बरंच कळतं हे सांगण्यासाठी चालली आहे, हे सुज्ञांस सांगणे न लगे(अगदी 'औषध नल गे{आता किती कंस आणि किती समजवा समजवी, पुन्हा सुज्ञांस सांगणे म्हटले तर इनफायनाईट लूप होणार} आणि न लगे मजला' [आता समजावू की नको, जाऊ द्या, सुज्ञांस..च्यायला पुन्हा इनफायनाईट लूप] सारखंच))(मायला संपले एकदाचे. किती अर्थबोध होतोय कुणास ठाऊक, अर्थात सुज्ञांस सांगणे न लगे (नाही हां, आता कंस संपलाय, इनफायनाईट लूप होणार नाही).
जाऊ द्या मूळ विषय राहिला बाजूला. पण विषयावरून आठवलं, परवा बाबा सांगत होते, कुठल्यातरी पौराणिक कथेत, एक राजा आपल्या मुलाला मारण्यासाठी (आता का ते विचारू नका, माहीत नाहिये मलापण, पण तो मुद्दा महत्वाचा नाही) त्याला एक पत्र लिहून देतो आणि सांगतो की त्या दुसर्‍या राज्याच्या राजाला जाऊन दे आणि तो जे देईल ते घेऊन ये. पत्रात लिहिलं, " विष यासी द्यावे।". (मायला, आता पत्रात कोणी असली काव्यात्मक वाक्य लिहितो का? ते काय प्रेमपत्रं होतं? पण जाऊ दे, कारण हा मुद्दा महत्वाचा आहे पुढे) मग तो मर्यादा पुरुषोत्तम आज्ञाधारक राजपुत्र निघाला मजल दरमजल करत. (हा शब्दप्रयोग मॅडेटरी आहे, नाहीतर इथे एक फाऊल धरला जाईल) पोचला पलीकडच्या राज्यात. थकलाभागला एका उद्यानात (अजून एक फाऊल वाचवला) आडवारला (धरा खुशाल फाऊल, च्यायला पोचलायस ना राज्यात, मग झोपा कसल्या काढतोस?) तर एका सुंदर ललनेने त्याला पाहिले. (मी वाटच पाहत होतो, केव्हा येते, केव्हा येते) बघताक्षणी प्रेमात पडली. (कशी काय, ते विचारू नका, ष्टोरी पुढे नको का जायला!) त्याच्या शेजारी बसून ती त्याला निरखू लागली. (कलियुगात रोल्स एक्स्चेन्ज झालेत नाही का?) तिची नजर पत्रावर गेली. (आता ह्या दीड शहाण्यानं इतकं महत्वाचं पत्र असं वेंधळ्यासारखं ठेवावं, पण तो नायक आहे, त्याला सगळं अलाऊड आहे, इथे च्यायला अप्रेझल लेटर कुणाला दिसू नये म्हणून आमचा जीवाचा आटापिटा आणि हा..) तिनं पत्र उघडलं आणि, काही नाही, वाचलं. मग बालाजीच्या सिरियल्ससारखा तिच्या चेहर्‍यावर दोनतीनदा क्लोजअप शॉट, म्युझिक सकट हवा तर.
कट टू, राजमहाल.(पोरगी वगैरे सगळं गायब. डायरेक्ट क्लायमॅक्स. आपले दिग्दर्शक उगाच हॉलीवूड हॉलीवूड करतात, खरं इन्स्पिरेशन इथे आहे) राजा पत्र वाचतो. मग एकदा त्याच्याकडे आणि एकदा पत्राकडे पाहतो. आणि उगाच काही मचमच न करता, आपल्या पोरीचं लग्न त्याच्याशी लावून देतो.
काय भौ, कळलं नाही ना. आता आपण टॅरॅंटिनो इष्टाईल (पुन्हा हॉलीवूड) कालमानामध्ये थोडे मागे जाऊ. ती पोरगी, जी उद्यानात होती, तीच राजपुत्री होती. तिनं   पत्र वाचलं आणि ... गेम केला. "विष यांसी द्यावे" चं "विषयासी द्यावे" असं केलं आणि मग काय? आयला मेन तर सांगायचंच राहिलं. त्या राजपुत्रीचं नाव "विषया" होतं. आता राजानं "विषयासी द्यावे" वाचल्यावर डायरेक्ट पत्रंच विषयाला का नाही दिलं? हा सामान्य प्रश्न माझ्या सामान्य बुद्धिला पडला होता, पण मग माझ्याच तैलबुद्धीनं उत्तरही दिलं, की पत्र ऍक्च्युअली मोठं होतं, मायना-बियना, मग हे माझं कार्टं-बिर्टं आणि शेवटी पंचलाईन असेल. पण दुसर्‍या राजाला, हे कार्टं-बिर्टं लाडाचं वाटलं असेल आणि पंचलाईन वाचून झाला मोकळा.
आईशप्पथ, 'विषया'वरून केव्हढं विषयांतर झालं. तर मी काय सांगत होतो. झी सिनेमा, यादों की बारात, सिनेमे, ७०' आणि ८०' चे सिनेमे आणि फॉर्म्युला(हा सिक्वेन्स आहे माझ्या मेंदूच्या आज्ञावलीचा). तर ह्या फॉर्म्युला सिनेमांमध्ये असले धमाल कन्सेप्ट असायचे की विचारू नका. मी ह्या कन्सेप्ट्सचा आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या ट्विस्ट्स चा फॅन आहे.
हिरोचं अख्खं कुटुंब, सहसा दोन तीन भाऊ आणि किंवा एक बहीण (आता बहीण एकच का हा प्रश्न निरर्थक आहे), आई बाप आणि हिरो (ऑब्व्हियसली, ह्यावरून एक कोडं आठवलं लहानपणचं! चिंगूच्या आईला चार मुलं, इन, मीन आणि तीन, तर चौथ्याचं नाव काय?) सगळे जण कुठलं तरी गाणं गात असतात. (हेच गाणं गाऊन पुढे बिछडी हुइ फॅमिली भेटणार, लिहून घ्या) शक्यतो बाप किंवा आई पियानो वाजवत असतात आणि वाजवता वाजवता (आणि गाता गाताही) मुलांना शिकवतही असतात. (आता पियानोच का? तर माझे चार आणे असे की संगीतकारांची वाजवावाजवी रियलिस्टीक वाटायला सोपं जात असेल.) आणि अगदी ह्याच कौटुंबिक आनंदाच्या परमोच्च क्षणी व्हिलन हल्ला करतो. आई-बाप मरतात किंवा कोणीतरी एक मरतो आणि व्हिलनचा चेहरा किंवा काहीतरी स्पेशल खूण हिरो लहानपणीच बघून ठेवतो. आता हे असले व्हिलन नेहमी हिरोच्या सोईसाठी काहितरी खूण घेउनच फिरतो. हां, ती खूण किंवा व्हिलनचा चेहरा घरातला वफादार नोकर, किंवा व्हिलनबरोबरचाच एखादा कमजोर कडी-जो नंतर पश्चात्तापदग्ध वगैरे होतो- तोही बघून ठेवू शकतो. (खूण कोण बघणार, हे लेखकाच्या कल्पनाशक्तीवर किंवा निर्मात्याच्या बजेटवर अवलंबून असतं).
मग हिरो(लहानपणचा) पोळी वगैरे चोरताना पळतो आणि त्याच्यामागे पोलिस किंवा लोक लागतात.कॅमेरा हिरोच्या पायांवर असतो आणि पळतापळताच हाफ पॅंंटची फुल पॅंट होते. कधीकधी त्याला कोणी चांगला चोर बाबा भेटतो, किंवा हिरोने व्हिलनचा चेहरा बघितला नसेल तर त्याला व्हिलनच गॉडफादर म्हणून भेटतो.(ह्या सिच्युएशनमध्ये व्हिलनला एक पोरगी असते जी पुढे हिरॉईन होणार)  मग शिरस्त्याप्रमाणे हिरो चोर किंवा पाकीटमार किंवा तत्सम काहीतरी होतो. मग त्याचा त्या धंद्यात हात धरणारा कुणी नसतो. 'ग्यारह मुल्कों की पुलिस' वगैरे मागे लागते. पण त्याची सूडभावना अजूनही धगधगती असते. त्याने व्हिलनला पाहिलं असेल तर व्हिलनने एवढ्या वर्षांत गेटप बदललेला असतो. नसेल पाहिलं तर त्याची ती स्पेशल खूण आजही हिरोच्या स्वप्नांत येत असते. पण समहाऊ त्याला व्हिलन भेटत नाही. मग दोन-चार गाणीबिणी झाली की एकदम सगळी पात्र भेटायला लागतात. वफादार नोकर, व्हिलनचा पश्चात्तपदग्ध सहकारी वगैरे पब्लिकपण येतं, पण हाय रे दुर्दैवा आयडेंटीफिकेशनच्या आधीच (माझं पर्सनल फेव्हरेट "दोन पायांत वेगळ्या साईझचे बूट" हे आहे) व्हिलन(कारण त्याने हिरोला आधीच ओळखलेलं असतं) (किंवा त्याचा वफादार सहकारी ऐनवेळी) कोणालातरी उचलून आणतो.  व्हिलनची जागा पण धमाल असते, कळ दाबून उघडणारे दरवाजे, टाळ्या वाजवून चालू बंद होणारे लाईट वगैरे. मग काहीतरी डेडली छळाचे प्रकार होतात (हळूहळू भरणारं पाणी, दोन बाजूनी खिळे लावलेल्या हळूहळू सरकणार्‍या भिंती, किंवा दोन हिरोंची आपापसातली फाईट, पण माझं पर्सनल फेव्हरेट आहे, "बता तेरे दो बेटों में किसकी मौत पेहले देखना पसंद करोगे/करोगी तुम?" मग दोन्ही हिरो मा मुझे मर जाने दो वगैरे म्हणणार आणि व्हिलन गडगडाटी हसणार). मग कधी कधी एखादा हिरो व्हिलनचाच पोरगा वगैरे असतो. मग काय, एकतर हिरो काहीतरी झोलझाल करून बेड्या तोडतो किंवा त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणारी व्हॅम्प (व्हिलनीण) त्याच्या बेड्या उघडून त्याच्या हातात बंदूक देते. मग ढिशॅं‌व ढिशॅंव, थोडी तोडफोड, युजुअली व्हिलनच्या अड्ड्यावर मारामारीच्यावेळी रिकामी पण शेवटी आग वगैरे लागली तर पेट्रोल किंवा तत्सम पदार्थ भरलेली पिंपं असतात. हिरोने लटकून दोघातिघांना लाथाडावं म्हणून एखादा दोरखंड वगैरे. आवडते ही फाईट आपल्याला, व्हिलनची किंवा त्याच्या माणसांची एकही गोळी हिरोला लागत नाही अगदी मशीनगनचीही, पण हिरो अभिमन्युसारखा आईच्या पोटातूनच नेमबाजी शिकून आलेला असतो.
शेवटी ती एकतर्फी प्रेमवाली व्हॅम्प (व्हिलनीण) किंवा हिरॉईन नसलेला एखादा हिरो हे बलिदान देतात आणि बराच वेळ गोळी चघळत कुणाच्यातरी मांडीत काहीतरी सेंटी मारतात. बाकी जनता एकदा डॉक्टरला बोलवायची हालचाल करते, मग मरणारा "मैं जानता हूं, ये मेरा आखरी समय हैं" म्हणाला, की पडत्या फळाची आज्ञा घेऊन मजा बघत उभी राहते. त्या मरणार्‍याचे डायलॉग संपले, की तो मान टाकतो. हा पोलिसांच्या येण्याचा क्यू असतो. मग पोलिस येतात. एखादा इन्स्पेक्टर " गिरफ्तार कर लो इन्हे" म्हणून व्हिलन्सकडे बोट दाखवतो. मग आपला थोडावेळपूर्वीपर्यंत 'बेस्ट इन डर्टी बिझनेस' असलेला हिरो स्वतःला 'कानूनच्या हवाले' करतो. हिरॉईन करारी चेहरा करते. अरे पण काहीतरी राहतंय. हां. पाठलाग राहिलाच. क्लायमॅक्स पूर्वी एक हॉलीवूड्ला लाजवेल असा पाठलाग असतो. व्हिलनच्या मागे हिरो असतो, जनरली व्हिलनच्या गाडीत हिरॉईन किंवा आई असते. मग पुढून व्हिलनची नवशिकी माणसं चिक्कार गोळ्या घालतात पण हिरोला एकही लागत नाही. पण ह्या पाठलागांची खरी स्पेशालिटी असते की ठराविक वाहनाचा ठराविक वाहनानेच पाठलाग होतो, नाहीतर फाऊल धरला जातो. उदाहरणार्थ, जीपच्या मागे घोड्याशिवाय काही असूच शकत नाही, किंवा साध्या कारमागे साधी कारच हवी, ट्रेनबिनचा पाठलाग असेल तर बाईकला पर्याय नाही.
हां तर आपण हिरॉईनच्या करारी मुद्रेकडे होतो. तेव्हा, आपला इन्स्पेक्टर हिरोला म्हणतो, "फिक्र मत करो, मैं अदालत से गुजारिश करूंगा की तुम्हे कमसे कम सजा हो।". मग अदालत हिरोने समाजकार्य केल्याबद्दल त्याला टोकन शिक्षा देते आणि मग डायरेक्ट दोन वर्षांनी सेंट्रल जेल असे लिहिलेल्या फिल्मसिटीतील सेटसमोर अख्खं कुटुंब उभं असतं आणि दरवाजा उघडल्यावर नुकताच शेव्ह करून आलेला हिरो खाली वाकून येतो. आणि जणू काही कोणी येणारच नाही असे गॄहित धरून आल्यासारखा कुटुंबाला बघून आश्चर्यचकित होतो. मग पुन्हा ते कौटुंबिक समूहगान वाजायला लागतं. मग काही ठराविक पाट्या येतात. "द एन्ड" हे अगदीच अनक्रियेटीव्ह लोक टाकतात. बाकी लोक, "फिर मिलेंगे", "धिस इज द बिगिनिंग" वगैरे टाकतात.
ह्यामध्ये अजून थोडी गुंतागुंत वाढवायला हिरोचा बाप तुरूंगात व्हिलनमुळे आणि हिरोला माहितच नाही, आई उगाच खोटंखोटं विधवेचं नाटक करते वगैरे पण टाकता येतं, पण ते पुन्हा लेखकाच्या कल्पनाशक्तीवर किंवा निर्मात्याच्या बजेटवर अवलंबून असतं.
बरं आता कुणी विचारेल की, हे सगळं लिहिण्यामागचा उद्देश काय? तर काही नाही. दोन घटका (आमची) करमणूक आणि आम्हाला सिनेमातलं किती कळतं हे दाखवायचा एक सफल(?) प्रयत्न.
बाय द वे, चिंगूच्या आईच्या चौथ्या मुलाचं नाव कळलं की नाही?

4/04/2010

पाऊस

खरं म्हणजे महिनाभरापूर्वी जेव्हा मी 'गाभ्रीचा पाऊस' पाहिला, तेव्हाच मी लिहिणार होतो, पण असो. आज टीव्हीवर 'समर २००७' हा पडलेला पण एक चांगला प्रामाणिक प्रयत्न असलेला सिनेमा पाहताना मला 'गाभ्रीचा पाऊस'ची प्रकर्षाने आठवण झाली. 'समर २००७' सुद्धा विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. शहरातल्या लोकांची ह्या समस्येकडे पाहण्याची मानसिकता दाखवतो. अतिशय अंगावर येणारे असे काही प्रसंग आहेत ह्या सिनेमात. पण आपल्या कचकड्याच्या दुःखांमध्ये रमणार्‍या प्रेक्षकांनी अपेक्षेप्रमाणेच ह्या सिनेमाकडे पाठ फिरवली. त्या दिग्दर्शकाने व्यावसायिक सिनेमाचं भान ठेवूनही एक विचारप्रवृत्त करणारा, अंगावर येणारा असा सिनेमा बनवल्याबद्दल त्याचं कौतुकच वाटलं मला.
पण 'गाभ्रीचा पाऊस' हे एक वेगळंच प्रकरण आहे. गावात एक शेतकरी आत्महत्या करतो, आणि त्याच्या मित्राच्या बायकोला आपलाही नवरा असं काही करेल ही भीती वाटायला लागते. मग ती त्याची प्रत्येक कृती संशयाने बघायला लागते. चोवीस तास त्याच्यावर पाळत ठेवायला लागते. तो घराबाहेर पडला की मुलाला त्याच्याबरोबर धाडते. त्याला आवडेल असं सगळं करायचा आपल्या ऐपतीबाहेर प्रयत्न करू लागते. "गडद विनोदा"ची-कधीकधी अंगावर शहारे आणणार्‍या विनोदाची- झालर देऊन सिनेमा पुढे सरकत राहतो. आपणही कळत नकळत शेतकर्‍याच्या एकतर्फी लढाईचा भाग होत जातो. शेतकर्‍यांची हतबलता, दुसर्‍याच्या मृत्यूत आपला फायदा शोधणारी माणसं, नोकरशाहीरूपी अदृश्य शत्रू, त्यातही काही जणांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावाद, शत्रू बनलेली नियती आणि आधी बिलकुलच न पडलेला आणि नंतर धोधो कोसळून नकोसा झालेला सगळ्यात मोठा खलनायक-पाऊस.
सिनेमात सुरुवातीला शेतकर्‍याचा मुलगा पावसाला 'गाभ्रीचा पाऊस' म्हणतो, तेव्हा शेतकरी त्याला दामटतो, 'गाभीचा' ही विदर्भाकडची शिवी आहे. पण नंतर स्वतः शेतकर्‍यालाच पाऊस 'गाभ्रीचा' वाटू लागतो. पिकाचं दोनदा नुकसान झाल्यावर जेव्हा एक दुसरा शेतकरी पहिल्याला म्हणतो, की आकडा टाकून वीज घे, तेव्हा त्या हत्बल परिस्थितीतही तो शेतकरी म्हणून जातो 'पण हा गुन्हा आहे'. इथे शहरात सगळं सुखासुखी असूनही आपण ड्रायव्हिंग लायसन्स पासून, ट्रॅफिक सिग्नल पर्यंत सगळीकडे 'गुन्हे' करत असतो आणि आपण त्यांना गुन्हेही मानत नाही आणि तो सगळा संसार उसवण्याच्या मार्गावरचा शेतकरीही जेव्हा आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत असल्याचे दाखवतो, तेव्हा कुठेतरी खोल एक वेदना उमटते.
आपण शहरात पाऊस पडला की काय विचार करतो. माझ्यासारखे अरसिक 'आज बाहेर जायचे वांधे' म्हणणार, काही थोडे जास्त रसिक गरम चहा आणि गरमागरम भजी खात खिडकीत बसून पाऊस बघत गप्पागोष्टी करणार, काही त्याहून थोडे जास्त रसिक गाणी ऐकणार, त्याहून थोडे जास्त गाणी म्हणणार, त्याहून जास्त असतील तर त्यांना भन्नाट कल्पना अशाच वेळी सुचतात आणि अगदीच रोमॅटीक लोक पावसात भिजणार. पण आपण इतके करंटे की पाऊस ही आपल्यासारख्या देशाला किती महत्वाची गोष्ट आहे ह्याचा विचारही आपल्या कोणाच्या मनात येत नाही. पाऊस पडण्या न पडण्यावर कित्येक लोकांचं आजचं जेवण अवलंबून आहे ह्याचा विचारही आपल्याला शिवत नाही. पण महत्वाचं हे की आपलंही आजचं नसेल, पण उद्याचं जेवण ह्याच पावसावर अवलंबून आहे हे आपल्याला कळत नाही. बातम्या संपल्या की हवामान वृत्ताला आपण वाहिनी बदलतो, पण त्या वृत्तावर कुणाची आजची शांत झोप अवलंबून असेल असं आपल्याला वाटतं का?
आजकाल मी पाऊस पडून कुठे बाहेर पडण्याचा बेत रद्द झाला तरी चिडचिड करत नाही. हवामान वृत्त आवर्जून बघतो. आणि हो, आता 'गुन्हे' न करण्याचं ठरवलंय.

3/22/2010

जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे...

मला लहानपणी रामदास स्वामींचं जाम कुतुहल वाटायचं. त्याचं एकमेव कारण म्हणजे ' ते लग्नमंडपातून 'सावधान' हा शब्द ऐकल्यबरोबर पळून गेले होते' ही त्यांची ऐकलेली कथा. 'लग्नात पळून जाण्यासारखं काय?' असं वाटायचं. आता स्वतःच तसं करावे लागेल की काय? असे वाटून उगाच रामदास स्वामींबद्दलचा आदर वाढतो. अर्थात अजून दिल्ली दूर आहे. असो, विषयांतर झालं. पुढे शाळेत असताना त्यांचे मनाचे श्लोक पाठ केले, आणि पाठांतर स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्यावर तर रामदास स्वामी अगदी 'फेव्हरेट' झाले. मग वडिलांकडून त्यांची आणि शिवाजी महाराजांची 'खडक फोडिता रोडकी। निघे तयातून एक बेडकी॥ सिन्धू नसता तियेचे मुखी पाणी कोण घालितो। तो राम आम्हाला देतो॥' ही गोष्ट ऐकली. आणि मग पु.लं. कडून 'हरितात्यां'च्या तोंडून 'आई, चिंता करितो विश्वाची' ऐकलं आणि रामदास ही व्यक्ती पुरती डोक्यात भिनली.
रामदास स्वामींची एवढी प्रस्तावना देण्याचं कारण म्हणजे, आज सहजच, म्हणजे अगदी सहज, काही संंबंध नसताना मला, "जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे। जनी वंद्य ते सर्व भावे करावे॥' ह्या ओळी आठवल्या. मग असंच विचारचक्र फिरायला लागलं. रामदास स्वामींसारखा माणूस जो स्वतः प्रस्थापित समाजाचे संकेत सोडून संन्यस्त झाला, तो लोकांना मात्र 'जनी निंद्य' ते न करण्याचा आणि 'जनी वंद्य' ते 'सर्व भावे' करण्याचा का सल्ला देतोय. की रामदास स्वामींचा त्याकाळच्या माणसांवरून विश्वास उडाला होता? ज्यामुळे ते त्यांना नाकासमोरच चालण्याचा सल्ला देत होते. सामान्य माणसांमधली असामान्य बनण्याची क्षमताच नष्ट करू शकणारा हा श्लोक वाटतो. 'जनी' च्या ऐवजी 'मनी' असतं तर बरं झालं असतं का? की मग ते ओशोचं तत्वज्ञान झालं असतं?
अर्थात पुढे 'मना वासना दुष्ट कामा न ये रे..' वगैरे आहे, पण हे 'जनी निंद्य' मला भलतंच खटकतंय. काही कळत नाही, लहानपणापासून हजारो वेळा ऐकलं असेल हे, पण आज असा जो विचार येतोय, तस कधीच आला नाही. माझा विचार चुकीचाही असेल, कारण एवढ्या मोठ्या माणसाच्या श्लोकाचा कदाचित मी योग्यं अर्थ लावू शकत नसेन. पण मला तो पटत नाहीये हे मात्र खरं.
असो. आता स्वामीचं बाकी साहित्य वाचणं भाग आहे, खरा अर्थ जाणून घेण्यासाठी. पण कुणाला वेगळा अर्थ लागत असल्यास जरूर सांगा.
बाकी तोपर्यंत मी 'चिंता करितो विश्वाची!'

3/14/2010

ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा?

बर्‍याच वर्षांपूर्वी एक तद्दन गल्लाभरू आणि कुठल्यातरी इंग्रजी सिनेमावरून ढापलेला चित्रपट आला होता, 'अंगारे'. आता इंग्रजी चित्रपटावरून ढापलेला म्हटलं की तो भट्ट कंपनीचा असल्याचा संशय तुम्हाला आलाच असेल. तर तुमच्या संशयाची मी पुष्टी करतो. आता एवढं जाणलंच आहे तुम्ही, तर तुमच्या ज्ञानात अजून थोडी भर घालतो. ह्या सिनेमानंतर अजून बर्‍याच वर्षांनी आलेला 'फूटपाथ' (आफताब आणि बिपाशा) हा ह्याच भ्रष्ट सिनेमाची आणखी भ्रष्ट नक्कल होता. आता तुम्ही म्हणाल की एवढाच फालतू सिनेमा होता तर तो लक्षात का राहिला इतकी वर्षं. तर त्याचं काय आहे, त्या सिनेमामध्ये माझा आवडता नट 'अक्षय कुमार' होता (तोंड वेंगाडू नका, तो चांगला नट आहे, चुकीचे सिनेमे करतो एवढंच). पण नुसतं एवढंच कारण नाही हा सिनेमा लक्षात राहण्याचं. दुसरं कारण आहे, ह्यामध्ये तो कच्ची अंडी फोडून सरळ तोंडात ओततो, असा सीन आहे (अहो खरंच असा सीन आहे). बरं ठीक आहे, खरं सांगतो. ह्या सिनेमात एक गाणं आहे, त्यातले शब्द आहेत,
इक बात बता मेरे यारा, मैं सोच सोच के हारा। ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा॥
आता पहिल्यांदा ऐकणार्‍याला ह्यात काहीही वाटणार नाही, पण खोल विचार केला तर जाणवतं, वरवर यमक जुळवून बनवलेलं हे गाणं, चुकून (किंवा गीतकाराला खरंच असा अर्थं अभिप्रेत असेल) एक असा प्रश्न विचारतं, जो जगातल्या भल्याभल्या विचारवंतांना अनादिकाळापासून पडत आलेला आहे.
खरंच विचारवंतांना असे प्रश्न पब्लिकली पडतात, पण तुमच्या आमच्यासारख्यांना हा प्रश्न आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगी पडतोच की! अगदी विश्वासातल्या माणसाने धोका द्यावा, अगदी कट्टर वैर्‍याने जीव वाचवावा, रस्त्यावर धडपडल्यावर दोन दिवसांपूर्वी हरवलेली अंगठी टपरीच्या खाली पडलेली सापडावी, आपण अगदी क्षुल्लक कारणावरून कोणावर डाफरावं आणि कुणी आपल्यावर डाफरलं की एवढा राग का येतो ह्याचं विश्लेषण करावं, दुसरा आपल्या बायकोवर फारच हुकूमत गाजवतो असं म्हणताना आपण आपल्या बायकोने कुठे कसे कपडे घालावेत हे ठरवावं आणि पुन्हा मग आपण असे का वागतो ह्याचा विचार करत राहावा, कधीकधी प्रत्यक्ष मृत्यू पाहूनही रडू न यावं आणि एखाद्या वाद्याचा आर्त सूर किंवा गायकाची दर्दभरी तान ऐकून डोळ्यात पाणी उभं राहावं, होणार्‍या बायकोने गृहकृत्यदक्ष असावं की करियर ओरियेंटेड असावं ह्याचं विश्लेषण करावं, एखाद्या शिकल्यासवरलेल्या ओळखीच्या माणसाने मुलगा इंजिनियर झाला तर एवढा हुंडा, एमबीए झाला तर एवढा हुंडा अश्या गोष्टी अगदी सामान्य गोष्टीप्रमाणे कराव्या, हुंडा दिला नाही म्हणून सुनेला जाळून टाकल्याची नेहमीचीच बातमी पुन्हा एकदा पेपरात वाचावी, रस्त्यात दिसणार्‍या प्रत्येक मंदिरासमोर आवर्जून नमस्कार करणार्‍याने ऑफिसमध्ये सहकार्‍यांना विनाकारण त्रास द्यावा, उच्चविद्याविभूषित आईवडिलांनी आपल्या मुलानं/मुलीनं निवड्लेल्या तोलामोलाच्या मुलाला/मुलीला केवळ ती जातीतली नाही म्हणून नकार द्यावा, 'देव सृष्टीच्या चराचरात आहे म्हणणार्‍याने लोकांना अस्पृश्य ठरवून मानवाला सृष्टीचा भाग मानण्यास नकार द्यावा, आधी स्वतःला चराचराहून वर समजून चरत राहावं आणि पुन्हा त्याच 'अस्पृश्य' मर्त्य मानवांना एकदा त्यांच्या देव्हार्‍यातल्या देवाला भेटण्याची 'परवानगी' नाकारावी, कुणीतरी त्याला वाटते त्या 'देवाला मानणे' हे पुण्य ठरवून देवाचे कुठलेही दुसरे रूप मानणार्‍याना देहांत शासन द्यावं (हे वेगळ्या धर्मांतच नाही एकाच धर्मांत देखील घडते आणि वेगळे रूप म्हणजे कामाला देव मानणे म्हणजेच नास्तिकसुद्धा), कुठे जातीच्या नावाखाली जळितकांड व्हावीत, कुणी धर्मप्रसाराच्या नावाखाली कंपनी वाढवण्यासारखे उद्योग करावे आणि धर्माला पैश्यांसाठी बदलून किंवा बदलवून लोकांच्या असहायतेचा फायदा घेवून आपल्या धर्माला मानणार्‍यांची संख्या एवढी वाढली असा बडेजाव मिरवावा, 'तुझा धर्म मोठा कि माझा, तुझा देव महान कि माझा' असले निरर्थक वादविवाद करावे आणि सर्वांनी ते टीव्हीवर पाहून आपापले रक्तदाब खालीवर करून घ्यावे, मधच्यामधे ह्या सर्वांचं सोयरसुतक नसणार्‍या कुणी ह्यात बक्कळ पैसे कमवावे,न्यायानं वागणार्‍यांनी देशोधडीला लागावं आणि गुन्हेगारांनी सुखासीन आयुष्य जगावं, पुन्हा देशोधडीला लागलेल्यांना त्याचं काहीच वाईट न वाटता त्यांनी हिसुद्धा एक परीक्षा समजावी आणि आनंदी रहावं आणि गुन्हेगारंनी एवढं सुखासीन आयुष्य असताना अजून संपत्तीसाठी हायहाय करावी, कुठल्यातरी मानवी गटाने दुसर्‍या गटावर आधिपत्य गाजवावं आणि त्यांची सगळी संपत्ती लुबाडावी, मग त्यांतल्याच कुणा प्याद्याला थोडी संपत्ती देउन त्या लोकांची जवाबदारी सोपवून निघून जावं मग त्या मूर्ख प्याद्याच्या ऐय्याशीमुळे त्या समूहाची अवस्था वाईट झाली की जुन्या सत्तधीशांनी चारदोन कवड्यांची मदत द्यावी आणि आढ्यतेने आपल्या महानतेचा बडेजाव मिरवावा, ह्या आणि अश्या अनेक घटनांनंतर मला ' ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा?" हाच प्रश्न पडतो.
आता मला ठाऊक आहे, तुमच्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकांनी इथपर्यंत वाचलंही नसेल, पण ज्यांनी वाचलं त्यांच्यासाठी पुढे लिहितो. ह्या सगळ्या घटना प्रातिनिधिक आहेत, जगाचा पसारा एवढा आहे की आपल्यासारखी सामान्यं माणसं काय कल्पना करणार. पण ह्या घटना, मग त्याच्यामागे असलेल्या वृत्तीप्रवृत्ती, त्यामागचे उद्देश, त्यांचे परिणाम ह्या सगळ्याचा विचार एकत्र केला तर कधी थोडा मेळ बसतो, तर कधी बिलकुलच नाही, पण मग दुसरी एखादी घटना घडते आणी बसलेला मेळ उलथून जातो. सैरभैर व्हायला होतं. कदाचित सगळ्यांचंच होत असेल. माहीत नाही का, पण काल रात्रीपासूनच ह्याबद्दल लिहावंसं वाटत होतं, सुरुवात केल्यावर गाडी कुठल्या रुळावर कशी गेली ते कळलंच नाही. तुम्हाला काहीच अर्थबोध झाला नसेल तर काही हरकत नाही मी क्षमा मागतो, माझं लिखाण माझ्या विचारांना कदाचित न्याय देऊ शकलं नसेल, किंवा ह्या प्रश्नाला न्याय देऊ शकलं नसेल. पण हा प्रश्न पुन्हापुन्हा अनेकांना पडत राहिल, वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या शब्दांत. पण प्रश्न तसाच राहतो आणि अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत तसाच राहणार, अनुत्तरित.

3/08/2010

म(तलबी). फि(जूल). हुसैन

काहीकाही घटना आणि त्यानंतर प्रतिक्रिया, मतमतांतरे आणि उत्तरक्रिया(!) ह्यामुळे उठणारी राळ मला आपल्या सहिष्णुतेचा असहिष्णुपणाने विचार करायला भाग पाडतात. मतलबी हुसैन आणि त्याच्याशी संबंधित सर्व बातम्या उपरोक्त सदरात मोडतात.
नग्नचित्रे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे जरी मान्य केले, तरी तो आविष्कार फक्त परधर्मीयांच्या देवीदेवता आणि भारतमाता(जिला नमन करणे त्यांच्या धर्मात बसत नाही) ह्यांच्याच बाबतीत प्रकटतो ही बाब पचनी पडण्यासाठी हाडाचे कलावादी हवेत. तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे "तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे। येरागाबाळाचे नाही काम॥". कारण ह्या परमोच्च सौंदर्यदृष्टी लाभलेल्या कलाकाराच्या दैवी कुंचल्यातून जेव्हा इस्लामिक प्रतिमा बाहेर पडतात त्या ऊंची 'वस्तरे'(नटरंग हॅंगओव्हर) लेवूनच. आता सौंदर्यदृष्टीचा हा कोन माझ्या चौकोनी बुद्धीच्या परिघाबाहेरचा आहे. ह्या पुण्यात्म्याचा नुकताच प्रकट झालेला कलाविष्कार 'रेप ऑफ इंडिया' त्याच्या अफाट प्रतिभेची ओरडून ओरडून ग्वाही देतो. त्याचा कलाविष्काराचे स्वातंत्र्य आणि धार्मिक भावनांची कदर ह्यामध्ये समतोल साधण्यात कोणी हात धरू शकत नाही. आठवा, 'मीनाक्षी' चित्रपटातील 'नूर-उन-अल्लाह' गाण्यावर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या आक्षेपानंतर बिनशर्त गाणे काढून टाकण्याची त्याची सामाजिक भान ठेवून केलेली कृती.
असो. तर सध्या तमाम बुद्धिवादी, कलावादी, सौंदर्यवादी, बुटाची वादी, लेंग्याची वादी दुःखी आहेत कारण हा महान, भूलोकीचा संत (बलात्कारित)भारतमातेतील तिच्या काही अजाण लेकरांनी कोर्टात दाखल केलेल्या खटल्यांमुळे, तिच्या मूठभर वाद्यांच्या असतील, नसतील तेवढ्या वाद्या सोडून, कलेची कदर असणार्‍या 'शरिया' कायद्याने चालणार्‍या सौंदर्यवादी राज्यात चाललाय. मराठी माणसं मात्र त्याची कदर करतात. माधुरी दिक्षीत, श्रेयस तळपदे ह्यांच्यासारखे कलावंत तर त्या पुण्यात्म्याच्या गळ्यातले ताईत. त्याच्या जाण्याने ह्या सगळ्या उपरोक्त वाद्या अगदी 'सुटल्यात'. पण दुर्दैवाने मी बटण किंवा बक्कल वापरत असल्याने माझ्या संवेदना बोथट झाल्या आहेत. जर तसं नसतं तर जेव्हा एक उपरोक्त वादी एका अग्रलेखात ' तस्लिमा नसरीनचा कळवळा असलेल्या हिंदुत्ववादी संघटना हुसैनसाहेबांच्या बाबतीत दुटप्पीपणा करतात.' असं म्हणते, तेव्हा सामाजिक अपप्रवृत्तीवर प्रहार आणि नग्नचित्रे ह्यामध्ये साम्य काय, असला बेअकली प्रश्न मला पडलाच नसता. आणि 'सावरकरांच्या मार्सेलिस (खरा उच्चार मार्से) इथल्या पुतळ्याबाबत केन्द्र सरकार उदासीन' असल्या फालतू मथळ्याने दुःखी होणार्‍या मला ' हुसैन यांनी भारताचा पासपोर्ट परत केला' ह्या मथळ्याचं काहीच वाटू नये. छे, छे! माझं काही खरं नाही. आमच्यासारख्या अ-कलावाद्यांमुळे(महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने आम्ही कसलीतरी वादी झालो एकदाचे) बलात्कारित भारतमाता तिचे कपडे काढणार्‍या एका सुपुत्राला मुकली. आमच्या नशीबी 'नूर-उन-अल्लाह' नाहीच, आम्ही 'जहन्नुम' च्याच लायक आहोत.