5/04/2010

आग - द स्टेन - ३

सूचनाः ही कथा भलतीच मोठी झाल्याने मला तीन भागांमध्ये विभागावी लागली आहे. एकच भाग वाचल्यास जास्त अर्थबोध न होण्याची शक्यता आहे.
भाग १
भाग २ पासुन पुढे

वजिरा-वजिरी
"त्या हरामखोर चिमण्याने मुद्दाम आपल्या होणार्‍या बायकोला माझ्या घामाचा पैसा दिला, मी काही बोललो नाही. त्याच्यामुळे गुजरातेची पार्टी नाराज झाली, मी काही बोललो नाही. तुमच्या लातूरवाल्यांना पण काम मिळू नाही दिलं साल्यानं, मी काही बोललो नाही. पण काका आता हद्द झालीये. त्यानं माझ्या त्या "तिला" स्वतः लक्ष घालून व्हिसा मिळवून दिलाय. आता ती येतेय इथे माझ्या उरावर बसायला." तुळजाराम रागाने लाल झालेले असतात. “त्यातून ती मूर्ख तारा आपली खरेदीविक्री सोडून त्या प्रेम आणि प्रेमभंगामध्ये बुडून बसलीये, फोनपण नाही उचलत आहे आपला. साले सगळेच पार्टनर्स एकाहून एक भ्रमिष्ट आहेत. एक दारू बनवणारा, एक स्वतःच्या प्रेमात पडलेला सिनेनट. ग्रहच फिरलेत म्हणायचे माझे."
(आता कॅमेरा पुन्हा डोक्याकडून)"शांत हो, तुळ्या. असं एक्साईट व्हायचं नसतं. थंड डोक्याने गेम करायचा असतो. मी गेली चाळीस वर्ष का टिकलोय असं तुला वाटतंय? हे पाणी पी आधी."
(कॅमेरा हळूवार उजवीकडून फिरत तुळ्याच्या डोक्यामागे स्थिरावणार.)काकांचं हे काळजी घेणारं नवंच रूप पाहून तुळ्या थोडा शांत होतो.
"हे बघ. अजूनी वेळ गेलेली नाही. आता त्याच्याच शस्त्राने त्याला मात दे. काढ एखादं लफडं बाहेर. मी दिल्लीत सांभाळतो."
".."
[दोन दिवसांनंतर]
(कॅमेरा काकांच्या डोक्यामागून, त्याच्या उजवीकडे असणारा त्यांचा टीव्ही फ्रेम मध्ये येईल असा)
(टीव्हीवरचा रिपोर्टर सांगत असतो)"काल तुळजारामांनी गौप्यस्फोट केल्यानंतर अडचणीत आलेल्या चिमणरावांनी आज तुळजारामांवर पलटवार केलाय. दरम्यान, दिल्लीत चिमणरावांच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टीचीच हवा आहे. हे वैयक्तीक हेव्यादाव्यांचं फलित आहे, की बुद्धिबळाच्या पटावरच्या दोन खेळाडूंनी केलेली वजिरा-वजिरीची जोखमीची चाल आहे, हे वेळच सांगेल."
काकांच्या टेबलावरचा फोन वाजतो.
"हॅलो काका, अहो, तो चिमण्या भलताच चिवट निघतोय हो. च्यायला, आपली पण सगळी कुलंगडी बाहेर येतील हो. बघा जरा."
"शांत व्हा उत्फुल्ल." काकांचा पेटंट गालात कापसाचा बोळा ठेवल्यासारखा धीरगंभीर आवाज."बघू काय करता येतंय ते. आपण चुकीच्या माणसाला वजिर बनवलंय हे खरंय, पण समोरचा वजिर घेऊनच मी आपला वजिर मारलाय. थोडे दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल, पण दोनेक महिन्यांत सगळेजण विसरून जातील. विश्वास ठेवा, मी तुमच्याहून जास्त पावसाळे पाहिलेत." ते कुत्सित हसत म्हणतात. "बरं ते सोडा. पोरीला सांगा, माझा जावई आणि पोरगी सिंगापूरहून येतायत, एक चार्टर प्लेन बुक करून ठेव म्हणावं."
स्प्लीट स्क्रीन करून उत्फुल्ल आणि काकांचा टॅटू दाखवायचे आणि मग फेडींग स्क्रीन.

"बिन नावाचा प्रसंग"
तो चेहर्‍यावर पाणी मारून पुन्हा आरश्याकडे बघतो. तोंड पुसतो आणि दरवाजा उघडून बाहेर पडणार एव्हढ्यात मला शर्टावर कसलासा डाग पडल्याचं दिसतं. तो साफ करायला पुन्हा नळ उघडतो आणि अचानक कसलासा मोठा आवाज होतो. तो बाहेर बघणार एव्हढ्यात त्याला मागून कुणीतरी आल्याचा भास होतो, तो वळणार एवढ्यात त्याला एकदम हलका हलका झाल्यासारखं वाटायला लागतं. तो पाहतो, तर त्याचं निष्प्राण शरीर जमिनीवर पडलेलं असतं.
"आयला, हे काय?" तो जिवाच्या आकांतांने ओरडतो आणि वळून पाहतो, तर "एकलव्य" मधल्या अमिताभसारखा गेटप करून एकजण उभा असतो. (एकलव्य मधल्या अमिताभ सारखीच ह्याची ही दृष्टी अधू दिसली पाहिजे.)
"मी यमदूत, मित्रा. आपल्याला आता अनंताच्या सफरीला जायचंय."
"अहो, पण इतक्या लवकर? अहो, माझं लग्नही नाही झालंय अजून."
"आता मी काय करू पोरा, माझाही जीव तुटतो रे, पण काय करणार नोकरी आहे. रिटायरमेंटला दोन महिने आहेत अजून, काम पूर्ण नाही केलं तर चित्रगुप्त पेन्शनीचे वांधे करेल रे."
"खरंय आजोबा, समजू शकतो मी. असो. चला." तो आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं आपलं ऑफिस बघून ओरडतो. "च्यायला ऑफिसात आग कसली?"
"अरे वेड्या, बॉम्ब फुटलाय तिथे." तो कपाळाला हात मारतो.
आजोबा त्याला घेऊन तरंगत एका व्हिडीओकोच बसपाशी येतात. चल आत.
"पण, माझ्या ऑफिसातले बाकी लोक कुठे आहेत?"
"अरे ही पहिली बस आहे. तुला मी जरा जास्तच लवकर आणलेलं दिसतंय. ते येतील मागच्या बसनी. चढ बघू तू आत.
तो आत चढतो, तर आत ७०-८० गणवेशातले लोक बसलेले असतात. तो चालत चालत बसच्या शेवटाकडे जातो, तर तिकडे अगदी गरीब पोटं खपाटीला गेलेले, डोळ्यांखाली काळं झालेले असे गावाकडचे लोक असतात.
"हे कोण लोक हो आजोबा?"
"अरे हे पुढे आहेत ते सीआरपीएफ चे जवान आहेत, आजच नक्षली हल्ल्यात मेलेत. आणि हे विदर्भातले शेतकरी आहेत."
"..."
अचानक बस सुरु होते आणि बसमधला टीव्ही सुरू होतो.
बसवर कुठल्याश्या न्यूजचॅनेलवर आधी चिमणरावांच्या आणि तुळजारामांच्या गच्छंतीची बातमी चघळली जात असते. मग तासाभराने सानिया मिर्झाच्या शोएब मलिकशी होत असलेल्या लग्नाचं रिसेप्शन दाखवत असतात. सगळे जवान आणि शेतकरी नवलानं ती बातमी पाहू लागतात. तो ही उत्सुकतेनं आपली बातमी येतेय का ते पाहू लागतो. पुढचा अर्धा तास तीच बातमी चालू असते. खाली फक्त "नक्षलवादी हल्ल्यात ८० सीआरपीएफ जवान ठार" आणि "मुंबईत खाजगी कंपनीत बॉम्बस्फोट" एवढ्या बातम्या स्क्रोल होतात. शेतलर्‍यांची तर काहीच बातमी नसते. तो डोळे मिटून स्वस्थपणे बातमीच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू असलेलं "राजा की आयेगी बारात.." हे गाणं ऐकत राहतो.
"अहो ह्याचं नाव सापडत नाहीये, हजार चौर्‍याऐंशी" चित्रगुप्त वैतागून यमदूत आजोबांना म्हणतो.
"काय?" तो चाट पडतो.
"असं कसं असेल हो. मी वेळेच्या दोन मिनिटं आधीच ह्याला बाहेर काढलं, पण म्हणून काय नाव नसेल असं थोडंच. जरा पुन्हा बघा ना!" आजोबा अजिजीने म्हणतात.
"अहो नाहीये हो. कॉम्प्युटरला किती वेळा सर्च क्वेरी देऊ मी."
"अहो. पांढराशुभ्र स्वच्छ शर्ट घातलेला आरश्यासमोर उभा असलेला मुलगा, असंच वर्णन सांगितलं होतंत ना तुम्ही मला?" आजोबा विचारतात.
"ते वर्णन मी नाही, कॉम्प्युटरनी दिलं होतं."
(त्याच्या डोक्यावर प्रकाशझोत पडतो.) "आयला आजोबा, गेम केलात तुम्ही. तो मी नसणार. हे बघा, माझ्या शर्टावर डाग आहे. तो माझा मित्र, बाहेरच्या आरश्यासमोर उभा होता, त्याला आणायचं होतं. त्यानेही पांढराशुभ्र शर्ट घातला होता."
चित्रगुप्त कपाळाला हात मारतो. "आता जा परत सोडून या ह्याला. गेल्या दोन महिन्यातली ही तिसरी केस आहे. आणि आता त्यामुळे ह्याच्या मित्रालाही आणता येणार नाही. त्याची वेळ गेली. मायनॉरिटी रिपोर्ट बनवावा लागेल त्याचा. आणि हो, ह्याचं शरीर अजून ठीक असेल तरच ह्याला जाता येईल. नाहीतर, पुढच्या जन्माची वेळ येईपर्यंत हा इथेच प्रवेशद्वाराजवळ थांबेल त्या मागच्या तीन केसेस सारखा."
तो चित्रगुप्ताने केलेल्या अंगुलीनिर्देशाकडे बघतो. तिकडे एक सुंदर मुलगी बसलेली असते आणि बरोबर एक म्हातारा-म्हातारी. तो (मनात) "च्यायला, थांबावं लागलं, तरी एव्हढी वाईट अवस्था नाही."(इथे एक पांढर्‍या कपड्यांतलं ढगांवरचं गाणं टाकता येऊ शकतं.)
मग एकदम भानावर येऊन तो म्हणतो, "आजोबा, चला लवकर, त्या बसपेक्षा फास्ट काही आयटम नाहीये का?"
चित्रगुप्त आजोबांकडे एक चावी फेकतो.
तो, हार्ले डेव्हिडसनवर आजोबांच्या मागे बसलेला असतो. दोघेजण त्याच्या ऑफिसपाशी येतात. आग आटोक्यात आलेली असते. अग्निशामक दलाचे जवान त्याच्या शौचालयाच्या दिशेने येत असतात. तो आजोबांकडे बघतो, आजोबा हार्लेचा स्टॅंड शोधत असतात.
तो ओरडतो, "अहो आजोबा, इथे माझा जीव खालीवर होतोय. आणि तुम्ही.." तो पुढे होऊन स्वतः स्टॅंडवर लावतो.
"अरे पोरा, माझ्या ग्रॅच्युईटीतून कापून घेतील डॅमेजेस. म्हणून एव्हढी काळजी."
मग ते त्याला पुन्हा त्याच्या बॉडीत टाकायला जातात, तेव्हा त्याची बॉडी उचलली जात असते. ते चटकन त्याच्या डोक्यावर हात ठेवतात.
तो एकदम दमेकर्‍यासारखा खोकत उठतो. जवान दचकून स्ट्रेचर पाडतात.
------
बाहेर त्याचा मित्र त्याच्या स्ट्रेचरजवळ येतो.
"तुझे देखके कितनी तसल्ली हो रही है! तू जानता है, सब कहते है मेरा बचना चमत्कार है। मैने तेरी तो उम्मीद ही छोड दी थी।"
तो स्वतःशीच एक स्मित करतो, (मनात) "तू पूछ रहा था ना, किधर जा रहा है? उस सवालका असली जवाब अभी देखके आया हूं।"
त्याच्या त्या स्मितावरच फेडींग स्क्रीन.
समाप्त
कास्टींग तुम्हीच सगळे ठरवा.

5/03/2010

आग - द स्टेन - २

सूचनाः ही कथा भलतीच मोठी झाल्याने मला तीन भागांमध्ये विभागावी लागली आहे. एकच भाग वाचल्यास जास्त अर्थबोध न होण्याची शक्यता आहे.
भाग १ पासून पुढे

"काका"
स्थळ - काकांचं ऑफिस.
वेळ - स्पेसिफिक काही नाही, कारण सगळं ऑफिस कृत्रिम दिव्यांनी उजळलेलं आहे.
(काकांवर कॅमेरा मागून मारायचा. काकांचं टक्कल फक्त दिसलं पाहिजे. थोडं कंटेम्पररी वाटण्यासाठी डोक्याच्या खालच्या भागापासून मानेपर्यंत एखादा टॅटू दाखवता येईल. डब्ल्यू डब्ल्यू ई च्या बटिस्टा वगैरे सारखा. आणि काकांच्या पात्राचा आवाज थोडासा धीरगंभीर पण गालात कापसाचा बोळा ठेवल्यासारखा{काकांचं माऊथ कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे.} आणि काकांचं पात्र बोलताना माना हलवणार नाही. फक्त डोक्याच्या स्नायूंची जी हालचाल होईल तेव्हढीच. बाकी व्हॉईसओव्हर वाटावा असाच आवाज. समोर दोन गूढ व्यक्तिमत्व बसलीयत.)
"काय आहे? आमचा माणूस थोडा काळजीत पडलाय. तुम्ही जरा बघा की चिमणराव." काका.
"त्याचं काय आहे काका, आम्ही आमच्या पार्टीला शब्द दिलाय हो. म्हणून म्हणतो थोडं कन्सिडर करा. ह्यावेळेस सांभाळून घ्या. तेव्हढे टक्के पोहोचवतो की." डावीकडे {कॅमेराच्या} बसलेले चिमणराव डोळा मारतात.
मग बाजूच्यांनाही कंठ फुटतो. "काका, अहो एव्हढं ह्यावेळेस सांभाळून घ्या. मी पण मराठी, तुम्ही पण मराठी."
"हाहाहा..."काका पेटंट हसतात. "च्यायला अहो, आपल्या महाराष्ट्राच्या स्थापनेला पन्नास वर्षं झाली आणि अजून तुम्ही मराठी-मराठी करताय. अहो, बाहेर पडा ह्या कूपमंडूक वृत्तीतनं."
"काका, तुम्ही जनतेसमोर भाषण नाही देत आहात. हिअर, देअर(हो, हिअर आणि देअर एका मागोमाग एक. इफेक्ट आला पाहिजे ना) इज सिरियस मनी इन्व्हॉल्व्हड."
"हाहाहा. तर तुम्ही ऐकणार नाही तर." काका सुस्कारा सोडतात.
चिमणराव मनातून चांगलेच धास्तावतात. (मनात) "च्यायला, ह्या नंदेनं सगळा घोटाळा करून ठेवला राव. त्यादिवशी काय मला बुद्धी सुचली आणि मी ते स्वेट इक्विटी बोलून गेलो. आता हे नसतं झेंगाट गळ्यात आलंय. चांगला चिवचिवत होतो. आधीच नको तिकडे नको ते बोलून अडकलेलो आहे. त्यातून आता काकांसारख्या मुरब्बी खेळाडूशी पंगा घ्यावा लागतोय. बाईपाई राज्य बुडाली म्हणतात, आमचंही योगदान ह्या वदंतेला असं नको व्हायला."
चिमणराव आणि तो दुसरा माणूस दोघंही खाली मान घालून बसतात.
"ठीक." (आता कॅमेरा हळूवार डावीकडून फिरत, समोर बसलेल्या दोघांच्या मध्ये येऊन स्थिरावतो. काकांचा चेहरा आता मध्यभागी आहे. त्यांच्या मागे एकीकडे एक १०.१० वाजता थांबलेलं घड्याळ आहे आणि दुसर्‍या बाजूला चालू घड्याळ आहे.) काका सावकाश डोळ्यांवरचा चष्मा काढतात. "जाऊ शकता तुम्ही. बघतो आता काय करता येतं ते."
चिमणराव दरवाजा उघडून बाहेर पडतात. त्यांचे हातपाय अजून थरथरताहेत. आणि समोरून तुळजाराम चालत येतात. तुळजारामांबरोबर अजून कोणीतरी आहे. तुळजाराम आणि चिमणराव एकमेकांकडे अनोळखी नजरेने बघतात. जणू एकमेकांचा अदमास घेतात. तुळजाराम आत शिरतात आणि चिमणराव आपल्याबरोबरच्या माणसाला म्हणतात. "पक्का आहे हा साला."
(आत) "नमस्कार काका." (कॅमेरा अजूनी काका आणि दोन घड्याळे असाच आहे.)
"हं. तुळ्या, हेच का ते गुजरातेची पार्टी."
"होय. काका. तो चिमण्या साला. पाठीत खंजीर खुपसला काका त्याने."
"असं म्हणू नको. त्यानं चान्स मारला. तुला जमलं नाही सांभाळायला." मग ते गुजरातेच्या पार्टीकडे बघून म्हणतात. "माफ करो भाई. इस बार गडबडी हो गयी. अगली दफा जरूर करेंगे. अभी आप जाईये, मेरा सेक्रेटरी आपका सारा इन्तजाम कर देगा." काका 'इंतजाम' शब्दावर जोर देतात आणि त्यावेळी आचमनाची क्रिया करून दाखवतात.
पार्टी उठल्यावर ते तुळजारामांकडे बघतात आणि त्याच्याकडे रोखून पाहत तर्जनी उचलून म्हणतात, "हे बघ तुळ्या, आता शेवटचा चान्स आहे. लातूरची पार्टी आलीय एक. ह्या गुजरात्यांऐवजी त्यांना द्यायचंय काम. तेव्हा चिमणला आता कसं पटवायचं ते बघ. अजून तरी मला वाटत नाही, मी ह्या सगळ्यात उतरायची गरज आहे." तुळ्या काकांच्या क्षणोक्षणी भाव बदलण्याच्या विलक्षण हातोटीकडे पाहून भावविभोर झालेला असतो. "आणि तुला कुठेही जायचं असलं तर आपले उत्फुल्लजी आहेतच विमानमंत्री, हा त्यांच्या पोरीचा नंबर घे. एअर इंडीयाचं कुठलंही विमान, कधीही कुठेही न्यायची सोय करून देईल ती. ठीक आहे? निघा आता."

"गॅबीचा पासपोर्ट"
तुळ्या बाहेर पडतो आणि घरी फोन लावतो.
"हॅलो मीना.."
"ओ डार्लिंग, मी मीना नाही मी गॅबी बोलतेय."(इथे बजेट असल्यास आपण प्रत्यक्ष परदेशी नटी वापरू शकतो {राज ठाकर्‍यांची परवानगी घेऊन} किंवा नुसता आवाज.)
तुळजाराम चमकून आपल्या फोनच्या स्क्रीनकडे बघतो. (मनात) "आयला, हे जान म्हणून बायकोचा आणि जानू म्हणून हिचा नंबर ठेवल्यामुळे सगळा घोळ झालाय."
"हाय जान आपलं जानू, कसं चाललंय. आज तुझी आठवण झाली म्हणून फोन केला."
"हो..हो..माहितीये किती आठवण येते ती." गॅबी जेन्युईनली लटक्या रागाने म्हणते."
"अगं तुझ्या गळ्याशप्पथ."
"माझ्या का, स्वतःच्या गळ्याशप्पथ घे की."
"बरं, माझ्या गळ्याशप्पथ." तुळजाराम ऊर्फ तुळ्या शेजारच्या खांबावर हात ठेवून म्हणतो.
"अं.."गॅबी. तुळजाराम (मनात) "लाडे लाडे अक्कल वाढे."
"ह्यावेळेस किनई, मी आले की आपण एकत्र ताजमहाल बघायला जाऊ. आणि ए, तू बायकोला कधी सोडणार आहेस. मग आपण लग्न करू. हां"
तुळजाराम (मनात) "हं. रंगव स्वप्नं. आधी येऊन तर दाखव इथे." (व्यक्त) "कधी येणार आहेस जान, आपलं जानू."
"ए, हे सारखं जान काय म्हणतोयस. कुणी दुसरी तर नाही ना."
"अगं नाही गं. तुम्हा बायकांची जातच संशयी. तिकडे ती आणि इकडे तू."
"कोण तिकडे?"
"ए, ते सोड गं, तू आधी सांग कधी येतेयस ते."
"अरे माझा पासपोर्टच हरवला होता सांगितलं ना तुला. आता मला भारताचा व्हिसा परत काढायचाय. अर्ज केलाय. बघू किती दिवस लागतील ते. ए. तू तेव्हढं बघ ना रे."
"बरं बरं, पूर्ण नाव काय म्हणालीस?"
"इश्श, विसरलास?"
"..."
"...."
"बरं. मी बघतो. ठेवू आता फोन?"
फोनकडे निरखून बघत आता तुळ्या नीट बायकोला फोन लावतो.
"जान, मी बोलतोय गं."
"हां."
"ए, तू त्या नंदा धक्केला ओळखतेस ना चांगली?"
"कोण, ती नटवी? चिमणरावांची होणारी तिसरी बायको?"
"हो, हो तीच."(मनात)"च्यायला ह्या बायका.."
"आमच्या किटी पार्टीतच तर आहे. तिचं काय झालं? मोडलं की काय?"
"अगं नाही गं माझे आई. तिला एकदा चहाला बोलाव आपल्याकडे. कशाला ते नको विचारूस. मी सांगतो घरी आल्यानंतर."
आता तुळ्या चिमणरावांना फोन लावतो.
"चिमण, मी तुळ्या बोलतोय रे."
"का रे बाबा आमची आठवण झाली? मघाशी तर ओळखही दाखविनास."
"अरे बाबा, दुसर्‍या माणसांसमोर अश्या ओळखी दाखवायच्या नसतात. कधी शिकणार बाबा तू. अरे काकांकडून शिक काही, नाहीतर दिल्लीत निभाव लागणं कठीण आहे तुझा."
"ते सगळं सोड रे. काम काय काढलंस बोल."
"अरे हो, ते जरा नाजूक काम आहे रे."
"बोल तर." एक छद्मी हसू आणत चिमणराव म्हणतात.
"अरे ते एका पोरीबद्दल बोललो होतो आठवतंय मी मागे? तेच रे आपण काकांच्या फार्म हाऊसवर हुरडा पार्टीसाठी गेलो होतो आणि तू तुझ्या ब्रॅंडच्या स्कॉच साठी अडून बसला होतास."
"बरं बरं. ते होय." चिमणराव थोडेसे वरमून म्हणाले.
"हां. तर तिचा व्हिसा अर्ज आला असेल. तो.."
"लगेच प्रोसेस करू का?"
"नाही नाही. तेच तर. रिजेक्ट करून टाका."
"काय?" चिमणरावांना कळेना. (मनात) "च्यायला काकांसारखंच काकांच्या माणसांचंही काही कळत नाही.)
"हो. ते जरा महत्वाचं आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो ना मित्रा?" तुळ्या अधीर झाला होता.
"बरं बरं, तू एक काम कर आमच्या जोश्यांना मेल करून टाक. मी बघतो पुढे."

"तारा आणि मिकीमाऊस - २"
मैदानाच्या कडेला एकटीच तारा उभी आहे.
"नेहमी मॅचच्या वेळेस मिकी ऑफलाईन असतो. नक्कीच माझ्या टीममधला कोणी असावा. प्रॅक्टीस सेशनच्या वेळेसही तो ऑफलाईन असतो. कोण असेल तो? मेघनाद तर नाही. ई! पण तो राक्षस आहे. पण तरी काय झालं. मला कित्ती समजून घेतो तो. आणि पुन्हा चांगला फिट आहे. एव्हढाही वाईट नाहीये काही तो. कॉन्ट्रास्ट मॅचिंग छानच दिसेल आमचं. पण तो नसला तर. कोणी दुसरा हॅंडसम असला तर? कित्ती मजा नाही." तिची तंद्री अचानक शांत झालेल्या प्रेक्षकांमुळे भंग पावते.
छावा मान खाली घालून आपला तुंदिलतनू देह सावरत डगआऊटच्या दिशेने चालत येत असतो.
"मेल्या सुक्कळीच्या तुजा मुडदा बशिवला .. माजं करोडाचं नुसकान केलं मेल्या तू..."
"अगं पण तारा ऐकशील तर खरं! अशी उल्केसारखी कोसळतेस काय सारखी!"
"मला कायबी ऐकायचं न्हाय. तुला येव्हढं साधं समजत न्हाई, आरं तुझ्यावर येव्हढा पैसा ओतला म्या. तू जिंकून द्यावस म्हून आणि तू खाण्या-पिण्याबिगर आन पोरी फिरवल्याबिगर कायबी न्हाय केलंस. आरं एखाद्या मॅचमध्ये तरी खेळायचंस. त्यो मेघनाद बघ कसा झ्याक खेळतो ते. उगाच न्हाय मी त्यास्नी कर्णधार केलं."
"मग घेऊन बस उरावर त्यालाच." बॅट फेकून छावा ड्रेसिंगरूमकडे निघून गेला. ताराला का कुणास ठाऊक वाईट वाटतं.
छावा (स्वतःशीच) "येतो एखाद्याला बॅडपॅच. म्हणून काय कर्णधारपदावरून काढून टाकायचं. हिच्यावरच्या प्रेमापोटी तो अपमानही गिळला. पण ही त्या राक्षसाच्याच प्रेमात. त्या फ्रिजवाल्यानं सोडल्यावर हिला आधार दिला मी. आणि आता फळं खातोय हा मेघनाद." तो फोन उचलतो, कुणालातरी डायल करतो, तर समोरच्याची कॉलर ट्यून असते, "भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राज कुंवर.." रागाच्या भरात छावा फोन फेकून देतो. तो फोन ड्रेसिंगरूमच्या बाहेर जाऊन पडतो.
"श्या." छावा मटकन खाली बसतो. "ही माझ्यापासून दूर जायला लागल्याने मी दारूच्या आहारी गेलोय, अनिर्बंध खातोय, त्यामुळे फॉर्म आणि फिटनेस दोन्हीचे बारा वाजलेत आणि त्यामुळेच तीही अजून दूर जायला लागलीये. काय करू कळत नाही."
काहीश्या अंतःप्रेरणेने तारा ड्रेसिंगरूमकडे येते आणि तिला बाहेर छाव्याचा मोबाईल दिसतो. ती तो उचलते तर त्याच्या वॉलपेपरवर तिचाच फोटो असतो, गेल्या स्पर्धेवेळी तिनं एका सामन्यानंतर आनंदातिशयाने त्याला मिठी मारली होती तेव्हाचा. ती विचारातच त्याचं कॉन्टॅक्ट बुक उघडते. त्यात तिला तिचं नाव दिसत नाही. (मनात) "असं कसं?" मग ती स्वतःचा नंबर डायल करते आणि कॉलचं बटण दाबते. स्क्रीनवर अक्षरं झळकतात, "मिनी". तिच्या हातून त्याचा मोबाईल गळून पडतो. तिच्या डोळ्यांत अश्रू गर्दी करतात. ती जायला वळते तेव्हढ्यात त्याचे ते शब्द तिच्या अंगाअंगावर रोमांच उभे करतात.
"हो मी वारा, मी पाऊस - अगं तारा, मीच तुझा मिकीमाउस."
ती भावातिशयाने त्याला जाऊन बिलगते. तिच्या मोबाईलवर कुठलातरी फोन वाजत राहतो, पण तिला आता जगाची पर्वा राहिलेली नाही.


क्र....म....शः......!!!

 भाग ३

5/02/2010

आग - द स्टेन - १

प्रस्तावना - गेल्या सोमवारी माझं नेहमीचं स्फूर्तीस्थान, 'झी सिनेमा यूके' वर एक चित्रपट लागला होता.(त्याला मी अप्रतिम, बेकार किंवा तत्सम कुठलंही विशेषण लावलं नाही, कारण काही सुचत नाहीये.) तर त्या सिनेमाचं नाव - "दाग - द फायर". मी हा सिनेमा कदाचित चौदाव्यांदा पाहत असेन. मग तो सिनेमा जेव्हा नुकताच रिलीज झाला होता, तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही मित्र मित्र चर्चा करत असताना विचार करत होतो, की सिनेमाचं नाव,"आग- द फायर" असं तरी असायला हवं होतं किंवा "दाग - द स्टेन" असं तरी असायला हवं होतं. पण मग तेव्हाही कुणाच्यातरी सुपीक डोक्यात ही कल्पना आली की जेव्हा आपण सिनेमा काढू, तेव्हा "आग - द स्टेन" असं नाव ठेवून काव्यात्म न्याय करू. मग अनेक वर्षे लोटली. इतक्या वर्षांत जितके वेळा सिनेमा पाहिला, तितके वेळा माझ्या भविष्यकालीन सिनेमा विषयी डोक्यात विचार आला. पण कथा काही सुचत नव्हती. मग काही दिवसांपूर्वी बझाबझी करताना, सचिनच्या बझवर थोडीशी रंगलेली एक चर्चा वाचताना(आणि अर्थात करताना) डोक्यात कीडा वळवळला. नाही नाही, डोक्यात सफरचंद पडलं, बाथटब मधून पाणी बाहेर पडलं आणि शेवटी, "आग- द स्टेन" ला कथा मिळाली. म्हटलं, उडवून टाकू बार.


"बिन नावाचा प्रसंग"
वेळ - संध्याकाळी ५.३०.
तो त्याच्या कार्यस्थानकावरून संगणक बंद करून उठतो. अंगावर जाकीट चढवतो आणि दप्तर खांद्यावर टाकून तो बाहेरच्या दिशेने चालायला लागतो. बाहेर निघण्याच्या दरवाजाच्या अगदी बाजूलाच असलेल्या प्रसाधनगृहामध्ये तो प्रवेशतो. प्रसाधनगृहात आरशासमोर त्याचा मित्र उभा आहे. तो त्याचा टाय व्यवस्थित करतोय.
तो(मनात) - साहेबाने थांबायला सांगितलेले दिसतेय.
मित्र(माझ्याकडे पाहून - व्यक्त) - किधर जा रहा है?
तो(प्रतिक्षिप्तपणे) - घरपे (आणि तो एका शौचालयात प्रवेशतो)
मित्र(तो दरवाजा उघडून अगदी आत शिरतानाच) - अबे..वैसे नही...(पुढचे तो ऐकू शकत नाही)किसी सुपरमार्केट जा रहा है क्या? ऐसे पूछ रहा था...
तो(आतमध्ये आरशाच्या समोर{आतमध्ये देखील एक आरसा आहे}-मनात) - "मी "शौचालयात" असे अजून समर्पक उत्तर देऊ शकलो असतो" आणि तो स्वतःशीच हसतो.
त्याच्या कुत्सित हसणार्‍या चेहर्‍यावर फेडींग स्क्रीन.

"तारा आणि मिकीमाऊस - १"(प्रेरणा यॉनिंग डॉगची ही नोंद)
छावा एका लालसर रंगाच्या खेळाच्या पोषाखात एका गोल फिरणार्‍या काचेच्या दरवाजातून आपला तुंदिलतनू देह सावरत प्रवेश करतो. त्याच्या पाठीवर लिहिलेलं छावा नाव वाचून दरवान त्याला ओळखतो आणि त्याची सही घेण्यासाठी आत धावतो, पण तो काचेचा दरवाजा त्याच्या उत्सुकतेच्या आड येतो आणि नाक चोळत तो धडपडत पुन्हा उभा राहतो. छावाच्या उजवीकडून आणि डावीकडून दोन मुली अचानक प्रकटतात आणि ते एका कोपर्‍यातल्या टेबलाकडे जातात. अचानक दरवाज्यातून विजेच्या वेगाने एक मध्यमवयीन तरूणी आत शिरते. तिच्या डोळ्यांवर मोठा काळा चष्मा असतो आणि अंगात मिकीमाऊसचं चित्र असलेला, छाव्याच्या पोषाखाच्याच रंगाचा टीशर्ट असतो. ती तडक छाव्याच्या टेबलाच्या दिशेने जाते. तिला येताना पाहून छावा थोडा चपापतो आणि एकदम दोन्ही मुलींना उद्देशून म्हणतो,
"ताई, आपण 'सांप्रतच्या स्त्रियांना सतावणारी वस्त्रटंचाई' ह्या विषयी चालवलेल्या कामाचा जो आढावा आत्ता घेतला, तो मला तितकासा समाधानकारक वाटला नाही, तेव्हा आपण लवकरच पुन्हा भेटून ह्याबाबत सविस्तर चर्चा करू आणि मग मी तुम्हाला तुमच्या ह्या चळवळीसाठी काही आर्थिक मदतही तेव्हाच देऊ करीन."
ताई, ह्या शब्दाने चपापलेल्या त्या तरूणी, पुढील वाक्य ऐकून चेहर्‍यावर एक मंद स्मित आणतात आणि एकदा त्या मध्यमवयीन तरूणीकडे आणि एकदा छाव्याकडे पाहून उठून निघून जातात.
"ये तारा, बस ना ! अशी धूमकेतूसारखी अचानक कशी काय?" त्याच्याकडे ती नक्की कोणत्या नजरेने पाहतेय हे त्याला तिने घातलेल्या मोठ्या चष्म्यामुळे कळत नव्हतं.
"आरं मेल्या, मी कवाची धुंडाळतेय तुला? कितींदा सांगितलंय तुला की आसं मैदान सोडून हिकडं-तिकडं भटकू नै. त्यो मेघनाद बघ कसा दिवसंरात घाम गाळित असतो."
"काय गं? अशी का बोलतेयस? तब्येत ठीक आहे ना?" छावाला कळेना प्रकार काय आहे!
"आरं, म्या नवा शिनुमा करत्ये. "हेच सौभाग्यवतीचं कुंकू". त्यामदी मला मुख भूमिका मिळालीया. मंग त्यापायी ह्याच पधतीनं बोलायाचं हाय मला आता. आतापरीस फकस्त एक दिस झालाया, अजून दुन म्हैने आसंच चालायाचं."
"..."
"आरं मेल्या, त्ये सम्दं सोड. आधी सांग, तू मैदान सोडून हितं काय करायाला आलयसा? तिकडं त्ये मेघनाद, त्येचा भाऊ, आनि त्ये बरीच मंडळी तुझी वाट पाहत्यात, जा! तुला कर्णधारावरून काढला आणि पार वाटोळं करून घेतलयंस रे.." त्याच्या वाटोळ्या पोटाकडे पाहत ती म्हणाली.
त्यानं आपला चष्मा काढला आणि दाढीचे खुंट कुरवाळत म्हणाला, "त्येनला आन तू लंकेस्नं आणि...मायला मी पण तुझ्यासारखाच बोलायला लागलो की...हां..ते साले लंकेचे राक्षस तुला प्रिय आहेत आणि मी आपला माणूस तुला नकोसा झालोय. तुला ना देशाची काही पर्वाच नाही. तुझा प्रेमी पण कोण तर म्हणे "मिकीमाऊस"..."
त्याचं बोलण तोडत रागाने ती म्हणाली, "माझ्या मिकीमाऊसबद्दल एक शब्द काढशीला तर कानाखली समई काढीन मी. त्यो किनई, माझा चॅट फ्रेंड आहे.." ती बोलता बोलता सुरनळी करण्यासाठी पदर शोधू लागली, मग टेबलावरचाच एक टिश्यू पेपर घेऊन त्याची सुरनळी करता करता पुढे म्हणाली, "तो फ्रिज दुरुस्तीवाला सोडून गेल्यावर ह्यो मला भेटला इंटरनेटवर. "मिकीमाऊस" हे त्याचं चॅटनेम हाय. मला आक्षी समजून घेतो तो. मी त्याला कध्धीच पाहिलं न्हाई अजून. त्यो म्हंतो, योग्य वेळ आल्यासुदीक भेटायचं न्हाय."
छावा आपल्या ओठांच्या कोपर्‍यातून हसत होता, एवढयात मेघनाद विकट हास्य करत त्यांच्या टेबलाजवळ आला. आणि त्याला पाहताच त्याच्या भोवती आजूबाजूच्या लोकांचा गराडा पडला, स्वाक्षर्‍या घेण्यासाठी. त्यांना मनसोक्त स्वाक्षर्‍या दिल्यावर तो आपल्या मूळच्या काळ्या चेहर्‍यावरचा काळा चष्मा काढत बसला.
"बरं झालं चष्मा काढलास ते, नाहीतर ह्या अंधुक उजेडात मला तुझे फक्त दात दिसत होते." छावा. तारा अस्वस्थ होऊन मेघनादाकडे पाहू लागली.
"हं हं हं..छान जोक मारतोस हां...बाकी अंधाराचा फायदा चांगला आहे, लोकांनी तुला ओळखलंच नाही." मेघनाद आपलं स्वाक्षरीचं पेन नाचवत म्हणाला.
"हं, ते मी मुद्दामहून वजन वाढवून घेतलंय, जेणेकरून लोकांनी ओळखू नये आणि सारखा त्रास देऊ नये. आम्ही काय तुमच्यासारखे दोन महिन्यांसाठी जंगलातून शहरात येत नाही ना खेळायला."छावाचा चेहरा एरंडेल तेल पी.(हे तेलाचं नाव आहे) प्यायल्यासारखा झाला होता.
तारा मधे पडणार एवढ्यात तिचं लक्ष मेघनादाच्या पेनाकडे गेलं, त्यावर मिकीमाऊसचं चित्र होतं.

"तुळजाराम आणि चिमणरावांची होणारी (तिसरी) बायको"
स्थळ - तुळजारामांच्या घरचा दिवाणखाना. चहाच्या टेबलावर तुळजाराम, मीनाताई आणि नंदाताई बसलेल्या असतात.
"आमचे हे किनई फारच द्वाड आहेत हो. मागे एकदा अमरावतीला शिकायला असताना, ह्यांनी आणि ह्यांच्या मित्रांनी काही पोरांना चिंचोके विकायचे आहेत म्हणून दुसर्‍या एका गल्लीतल्या पोरांना कळवलं. तर ती पोरं आली हो आणि कसलं काय, ह्यांच्याकडे चिंचोके नव्हतेच, मग ह्यांनी त्या पोरांना गावठी छर्र्याच्या बंदुकीचा धाक दाखवून पैसे काढून घेतले. पण नशीब म्हणतात ना, त्या पोरांमधला एक पोलिसाचा पोरगा." मीनाताई कौतुकाने आपल्या नवर्‍याचे पराक्रम सांगत असतात.
"अय्या मग?" नंदाताई खोटीखोटी उत्सुकता दाखवत म्हणतात.
"मग काय, काढल्या दोन रात्री जेलमध्ये. आहे काय त्यात. देशातली सगळी मोठी माणसं जेलमध्ये जाऊन आलीत. तेव्हाच मी मनानं ह्यांना वरलं." चहा भुरकणार्‍या तुळजारामांकडे कौतुकानं पाहत मीनाताई म्हणतात.
"पण मीनाताई, तुमचं हे दुसरं लग्न ना? आणि त्यातून तुम्ही तुळजाभाऊजींपेक्षा नऊ वर्षं मोठ्या नाही का? म्हणून भाऊजींच्या वडीलांनी तुम्हाला वारश्यातून बेदखल केलंय." नंदाताई निरागसतेचा आव आणून म्हणतात. तुळजारामांना चहा पिता पिता ठसका लागतो. मीनाताईंच्याही कपाळावर आठ्या उमटतात.
"वर बघा, वर बघा हो." त्यांच्या पाठीवरून हात फिरवत मीनाताई म्हणतात.
"हो, अगदी अहो. होते चूक एखादेवेळेस नाही का? पण बाकी तुमचं आणि चिमणरावांचं दोघांचंही तिसरं लग्न नाही का?" मीनाताई पलटवार करतात. ह्यावेळी कौतुकाने बघायची पाळी तुळजारामांची असते.
"चला मला निघायला हवं." मानापमानाचा प्रयोग आटपता घेण्यासाठी नंदाताई म्हणतात.
"अहो, जा बरं त्यांना सोडून या." तुळजाराम चमकून मीनाताईंकडे पाहतात. ते मनात म्हणतात, "मीनाताई काकांपेक्षाही जास्त वेगाने रंग बदलतायत." नंदाताईही चपापतात. त्या दारात जोडे पायात घालत असताना, मीनाताई प्रश्नार्थक चेहरा केलेल्या तुळजारामांना कानात म्हणतात, "त्या मॉडेलांना कसं बोलण्याच्या ओघात गंडवता, तसंच हिलाही जरा झुलवा. माहिती काढा. " आपल्या बायकोकडे अभिमानाने बघत तुळजाराम गाडीकडे जातात.
गाडीत बसून पट्टा लावल्यावर तुळजाराम रेडीओ लावतात.
"सात समुंदर....सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी"
"अय्या तुम्हाला कसं माहिती, मला आणि आमच्या ह्यांना हे गाणं फार आवडतं म्हणून. ते यू.एस. हून आणि मी दुबईहून जेव्हा भारतात आलो आणि भेटलो ना तेव्हा रेडीओवर हेच गाणं लागलं होतं. हाऊ सिंबॉलिक ना?"
"तुम्हाला हाऊ रोमॅंटीक म्हणायचंय का?" तुळजाराम शांतपणे म्हणतात.
"जाऊ दे." नंदाताई कॅटलकडे बघावं तश्या बघून म्हणतात.
"बाय द वे. मी गाणं लावलं नाहीये, रेडीओवर लागलंय."
"हम्म."
थोडावेळ शांततेत जातो. मागे रेडीओची गाणी अखंड चालू. "सात समुंदर.." संपल्यावर "बोई, बोई, बम ब ब बम बोई.." हे गाणं चालू होतं(रेडीओचं दृश्य असल्याने कॉपीराईटचा प्रॉब्लेम यायचा नाही बहुतेक). गाडी कायम वेगाने जात असते. तुळजाराम नंदाताईना न्याहाळतात. (मघाशी बायकोसमोर कसं न्याहाळणार). कॅमेरा हळूहळू नंदाताईंच्या महागड्या घड्याळावरून, त्यांच्या महागड्या जरीकाम केलेल्या पदरावरून त्यांच्या भरमसाठ मेकप केलेल्या चेहर्‍यावर येतो. तुळजारामांना एकदम "शेहनाझ हुसेन"चा चेहरा आठवतो आणि अचानक गाडी गचका खाते.
"सॉरी हां" तुळजाराम ओशाळून जात म्हणतात.
"ठीक आहे, जरा नीट पाहून चालवा हो." नंदाताई पुन्हा कॅटलकटाक्ष टाकून म्हणतात. मनात म्हणतात, "माझं मेकपचं सामान चांगलंच काम करतंय असं दिसतं. हा ही चांगलाच भाळलाय. आता ही नवी लाईन बाजारात उतरवायला हवी - 'मुड मुड के'"
"बाय द वे. ही स्वेट इक्वीटीची आयडीया कुठून आली हो." तुळजाराम फायनली विषयाला हात घालतात.
नंदाताई थोड्या सावध होतात. "का हो? हे काही बोलले नाहीत का तुम्हाला?"
"नाही म्हणजे तसं नाही, आपलं सहज विचारलं." आपण जरा जास्तच थेट हात घातला हे त्यांना जाणवतं."आता तुमच्यासारख्या देखण्या बाई आय मीन होणार्‍या बायकोसाठी कुणीही इतकं करेल हो. पण स्वेट इक्वीटी ही आयडीया भन्नाटच. आता आम्हीही आपल्या बाईसाठी आय मीन बायको साठी इकडेतिकडे जुगाड करतो, पण हे डोक्यात यायला फाईव्ह स्टार मेंदूच पाहिजे." तुळजाराम नावाला जागत शाब्दिक कंदी पेढ्यांचा पुडाच उघडतात.
नंदाताई मोहरतात. "अहो, काय सांगू, परवा किनई एक सिनेमा लागला होता कुठलासा. त्यात तो व्हिलन असतो ना तो एक डायलॉग मारतो. तो पाहून अचानक त्यांना ही कल्पना सुचली."
"काय?" गाडी पुन्हा गचका खाता खाता राहते. "कुठला सिनेमा?"
"अहो तो हो..." नंदाताई विचारात गढतात. तेव्हाच "बोई, बोई.." संपून "क्यूं ये बर्फ पिता है व्हिस्की में डालके.." हे गाणं सुरू होतं. आणि नंदाताईंच्या डोक्यावर सफरचंद पडतं (बाथटबचा सीन टाकल्यास, प्रेक्षक खेचण्यासाठी मदत होईल, पण "ए" सर्टिफिकेट मिळण्याचा धोका उत्पन्न होईल. मध्यममार्ग म्हणजे असा सीन होता, पण तो कापावा लागला अशी आवई उठवायची.). "हे गाणं होतं त्या सिनेमात.." नंदाताई, एकदम ओरडतात. गाडी पुन्हा गचका खाते.
"हे गाणं?"तुळजाराम विचारात गढतात. (मनात)"इथून स्वेट इक्वीटी?" (व्यक्त) "हे तर गुंडामधलं गाणं आहे!" आणि एकदम त्यांच्या चेहर्‍यावर प्रकाश पडतो.(डोक्यात पडतो हे दाखवायचा वेगळा प्रकार. किंवा डोक्यावर झोत पाडूनही हवा तसा इफेक्ट मिळेल कदाचित.
नंदाताई चालू होतात. "इश्श हो. गुंडा नाही का. मी किनई विसरभोळी झालीये मेली. अहो, त्यात नाही का तो व्हिलन पुढे "हसीना का पसीना" असा कायसा डायलॉग म्हणतो..तेव्हाच अगदी हे डोक्यावर सफरचंद पडल्यासारखे उठले.(इथे बाथटब टाकून काही फायदा नाही. ऑन द सेम लाईन आपण ह्या कथेचं नाव, "तुळजाराम, चिमणरावांची होणारी (तिसरी) बायको आणि सफरचंद(लक्षात आहे ना बाथटबची फक्त आवई आहे)" असं ठेवू शकतो.)..."
नंदाताई पुढे काय म्हणत होत्या हे तुळजाराम ऐकतच नाहीत, आणि आपणही त्यांचा साऊंडट्रॅक बंद करून, "क्यूं ये बर्फ पीता है.." बॅकग्राऊंडला चालू ठेवायचं. कॅमेरा विंडशिल्डवरून सरळ दोघांच्या चेहर्‍यावर. बाई अजून बरळतायत, तुळजाराम समोर पाहतायत आपल्याच तंद्रीत. गूढ इफेक्ट येण्यासाठी पाऊस दाखवू आणि इंटरमिटन्ट व्हायपर. बर्फाचं गाणं आहे म्हणून छोट्या गाराही दाखवता येतील.
अचानक बॉनेटमधून ठिणग्या उडायला लागतात आणि गाडी आचके देत थांबते. नंदाताई आणि तुळजाराम आळीपाळीने बॉनेटकडे आणि एकमेकांकडे बघतात आणि रेडीओवरचं गाणं बदलतं."टिप टिप बरसा पानी...पानी ने आग लगायी"(फायनान्सर्स ची इच्छा असल्यास इथे एक पावसातला सिडक्टीव्ह ड्रीम सिक्वेन्स टाकता येईल. मला विचाराल तर नको.) तुळजारामांचा फोन वाजायला लागतो, " नायक नही...खलनायक हूं मैं" दोन्ही गाणी एकत्र चालू. इथेच हळू हळू फेडींग स्क्रीन.


क्र....म....शः......!!!

 भाग २ 

4/28/2010

"बाबा" ची भिंत!

मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण...वाटो.
लहान असताना सिनेमे म्हणजे काय हे ही माहित नसताना मी अमिताभ बच्चनचा 'जंजीर' पाहिला होता. अगदी मनावर ठसला होता तो सिनेमा. ती पांढरा घोडावाली चेन, रात्री स्वप्नात खिंकाळणारा पांढरा घोडा पाहून उठणारा घामाघूम अमिताभ, "यह पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं।" म्हणत खुर्चीला लाथ घालणारा अमिताभ, "यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी" वर रुमाल उडवत नाचणारा केस लाल रंगवलेला प्राण, रुळावर फेकून दिलेला जखमी अमिताभ (आणि टेन्शनमध्ये आलेला मी) आणि ऐनवेळी त्याला रुळावरून खेचणारा(आणि माझ्या दुवा मिळवणारा) प्राण. मी विसरूच शकत नाही. मग पुढे त्याचा खास लहान मुलांसाठी बनवलेला(कुणीही काहीही म्हणो, माझ्या म्हणण्यानुसार तो लहान मुलांसाठीच बनवलेला होता)'अजूबा'. अजूबा तर मी कित्येक वेळा आवडीने बघितला होता(अजूनी लागला की बघतो, कदाचित मी मनाने मोठा झालो नाही{लोकांना सांगायला, "मी तो सिनेमा 'नॉस्टॅल्जिक' होण्यासाठी बघतो"}). मग माझ्या लहानपणी माझा आवडता अजून एक आवडता सिनेमा होता, "हाथी मेरे साथी". त्या सिनेमातलं जास्त काहीही माझ्या लक्षात नाही. पण तो सिनेमा मला तेव्हा जाम आवडायचा, कारण त्यातला हिरो - रामू हत्ती(मला आवडण्याचं अजून एक कारण हेही असावं की मला नावीन्याची हौस आहे{पुलं सांगतात त्याप्रमाणे 'भर वर्गात सदरा काढून डोक्याला गुंडाळण्या'च्या सदरातली हौस नाहीये, पण} आणि एरव्ही नोकरासाठी म्हणून राखून ठेवलेलं नाव हिरोला देण्यात आलं होतं). तो जेव्हा मरतो तेव्हा, रस्त्याने राजेश खन्ना गाणे गात जातो तेव्हा मीही रडायचो. पण त्या सिनेमाशी माझी एक एम्बॅरॅसिंग आठवण पण जुळलेली आहे. त्यातल्या शेवटच्या प्रसंगात राजेश खन्ना व्हिलनला त्वेषाने सांगतो, "मैं तुम्हें नही छोडूंगा", तर हा प्रसंग आई-वडिलांना रंगवून सांगतेवेळी(का सांगत होतो ते आठवत नाही) मी तेव्हढ्याच त्वेषात येऊन, "मैं तुझे नही सोडूंगा" असे म्हणालो होतो. आई-बाबा बराच वेळ हसले, मला कळेना आपलं काय चुकलं. मग त्यांनी बर्‍याच जणांना माझ्या भूमिकेत शिरण्याची ही कथा सांगून माझा साफ वडा केला (अजूनी करतात, त्यानंतर मी त्याच त्वेषाने राष्ट्रभाषा सभेच्या चार परीक्षा 'विशेष योग्यते'त पास करूनही माझ्या कपाळीचा हा डाग पुसला गेला नाही आहे). असो, तर मी नेहेमीप्रमाणेच मुद्द्यापासून बराच भरकटलो आहे, तेव्हा पुन्हा मुद्द्यावर येतो.
मुद्दा हा, की मी लहान असताना माझे काही ठराविक सिनेमे आवडीचे होते(दूरदर्शन एक वर शनिवारी रात्री लागणारे). पण आवडीचा नट एकच. अमिता बच्चन(मी 'भ' नजरचुकीने विसरलेलो नाही). फक्त अमिता बच्चन अशासाठी कारण तो ढिशूम ढिशूम करायचा, राजेश खन्ना नाही कारण त्या सिनेमाचा हिरो रामू होता. पण मग एखादं वर्ष झालं असेल. दूरदर्शनवर "बॉक्सर" हा सिनेमा लागणार होता. आमच्याकडे व्ही.सी.आर. होता, काही ठराविक सिनेमे आम्ही रेकॉर्ड करायचो. मी बॉक्सर ह्या नावानेच प्रभावित झालो होतो, त्यामुळे साहजिकच मी बाबांच्यामागे तो रेकॉर्ड करण्यासाठी धोशा लावला. माझ्या भावाने मला त्या सिनेमाचा हिरो मिथुन चक्रवर्ती याची माहिती पुरवली - "तो गरीबांचा अमिताभ आहे." बस माझ्या डोक्यात ते चांगलंच ठसलं. आणि मला मिथुन एकदम आपला माणूस वाटायला लागला (ह्या घटनेचा सोशिओ-सायको ऍनॅलिसिस असा करता येईल की - मला एव्हढंच माहित होतं की आपण श्रीमंत नाही, म्हणजे आपण गरीबच असलं पाहिजे. आणि आपण गरीब तर गरीबांचा अमिताभ तो आपला अमिताभ. लॉजिक.) बॉक्सर मधल्या मिथुनच्या बॉडीची वाहवा त्यानंतर मी कित्येक दिवस जो भेटेल त्याच्याकडे करायचो (रती अग्निहोत्रीची वाहवा करण्याएव्हढं वय झालं नव्हतं माझं तेव्हा). मी काही मुव्ही बफ नव्हतो तेव्हा, की मिथुन आवडतो म्हणून मिथुनचे सगळे सिनेमे बघ (अर्थात तेव्हा काही सोयही नव्हती, सिनेमांच्या कॅसेटी भाड्याने आणून बघणे ही ३-४ महिन्यांतून एकदा केली जाणारी चैन मानली जायची.). तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही माझा मिथुन ह्या माणसाबद्दलचा आदर कमी झाला नाही. 'डीस्को डान्सर', 'डान्स डान्स', वगैरेंबद्दल मी पूर्ण अनभिज्ञ होतो. अमिताभ हा का कुणास ठाऊक फार दूरचा वाटायला लागला. मिथुन आपला माणूस वाटायचा. माझ्या दादाने दिलेल्या तत्वज्ञानाची आणि बालमानसशास्त्राची सांगड घातली, तर कदाचित ह्या अतर्क्य घटनेचा अन्वयार्थ लागण्याची शक्यता आहे(हे वाक्य मी का लिहिलं, ह्या अतर्क्य घटनेच्या मागचं कारण कदाचित आज ऑफिसात कामे सोडून वाचलेले अनेक मराठी ब्लॉग्ज हे असू शकतं). मग त्याचा क्रिष्नन अय्यर येम.ये. आला आणि माझ्या दीवानगीला पुरावा मिळाला. "विजय दीनानाथ चौहान" ह्या गारूड करणार्‍या पात्रापेक्षा मी "क्रिष्नन अय्यर येम.ये." च्या जास्त प्रेमात पडलो, हाच तो पुरावा. "ये लडका, चिंगारी, बडा होके हम सबको, जलाके राख कर देगा. आऐ(ह्या उच्चाराला शब्दबद्ध करण्यासाठी मला मार्गदर्शनाची गरज आहे)." हा डायलॉग मला आवडला पण ,"हम ये लुंगी उठाती, तुमको डिस्को दिखाती" चा जप मी कित्येक दिवस करत होतो.
मग पेपरात मिथुनला त्याच्या "जल्लाद" ह्या सिनेमासाठी "बेस्ट व्हिलन"चं फिल्मफेअर मिळालं हे वाचून मला झालेला आनंद मला आजही आठवतो. जल्लाद हा मिथुनदाच्या पुढे येणार्‍या अनेक "ब" सिनेमांची नांदी होती. हे बॉलीवूडच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला अलगद बाजूला केलं. त्यालाही फरक पडत नव्हता. त्याने ऊटीमध्ये हॉटेल बांधलं होतं.  के.एल.व्ही. प्रसाद हा पार्टनर दिग्दर्शक, स्वतः हिरो, स्वस्तातली हिरॉईन, सगळं शूटिंग हॉटेलात किंवा आवारात. आणि एवढ्या स्वस्तात बनवूनही यू.पी. बिहारमध्ये होणारी कमाई, हा फायद्याचाच सौदा होता. मग "गुंडा", "लोहा", "हिटलर", "चीता", असं सगळं चालू होतं. एव्हढ्या गुणी कलाकाराला असं करताना पाहून जीव तुटायचा. "चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबूतर रे" म्हणणार्‍या मिथुनचा राग मात्र कधी आला नाही.
इकडे अमिताभ, ABCL, टॅक्स बुडवणे असले प्रकार करून नजरेतून उतरत होता तेव्हाच कचरापेटीत सापडणालेल्या मुलीला दत्तक घेणार्‍या आणि एकही मेनस्ट्रीम सिनेमा न करून सर्वात जास्त कर भरणार्‍या मिथुनबद्दल वाचून अभिमान वाटायचा. नक्षलवादाची कास सोडून चहाच्या टपरीपासून नव्या आयुष्याची सुरुवात करणारा आणि मोठा माणूस झाल्यावर त्याच टपरीवाल्याला मोठं हॉटेल काढून देणारा मिथुनदा वेगळा आहे ह्याची खात्री पटली.मग मी कॉलेजात आलो. आणि मिथुनचा "तितली" नावाचा बंगाली सिनेमा आल्याचं वाचलं. त्यात अपर्णा सेन आणि कोंकोणा सेन होती. मिथुनदाच्या अभिनयाची स्तुती वाचून तेव्हाही बरं वाटलं होतं. मग वर्षभरातच ती बातमी आली - "मिथुनदा मेनस्ट्रीम सिनेमात परततोय." विक्रम भट्टचा "ऐलान". कॉलेजातल्या मित्रांनी चिडवलं, पण मी म्हटलं, पिंजर्‍यात राहिला म्हणून वाघाची शेळी होत नाही. सिनेमा साफ पडला, पण माझ्यासाठी त्यातलं मिथनदाचं पात्र "बाबा सिकंदर" हे त्याच्या परतीचं द्योतक होतं. मग मी आणि माझे काही टवाळ मित्र कॉलेजात एकमेकांना "हेल मोगॅम्बो" सारखे "जय बाबा सिकंदर" किंवा "बाबा की जय" असे म्हणून ग्रीट करायचो. मग हे लोण बर्‍यापैकी पसरलं, काही माहीत नसणारेही मला असंच ग्रीट करायचे. हळूहळू माझं टोपणनाव बाबा पडलं. त्याच सुमारास मी माझा इंग्रजी ब्लॉग मजा म्हणून ब्लॉगस्पॉट वर चालू केला होता. मी बाबा धर्माची पताका खांद्यावर घेतलेली असल्याने त्याचं युआरएल "द बाबा प्रॉफेट" असं ठेवलं. त्याचं नाव ठेवलं "बाबा की जय!" पासवर्ड होता, "जयबाबासिकंदर" (प्रयत्न करू नका आता बदललाय). आता ब्लॉगरचं युजरनेम गुगल बरोबर मर्ज केलंय, पूर्वी ब्लॉगरला वेगळं युजरनेम असायचं, आणि माझं युजरनेम "द प्रॉफेट" असं होतं. मी खेळाडूंमध्ये राहुल द्रविडचा सच्चा भक्त असल्याने टॅगलाईन होती, "ग्रेट वॉल ऑफ बाबा!". प्रोफाईल फोटो मिथुनदाचा. मग पुढे मी तो ब्लॉग बंद करून सोफिस्टिकेटेड ब्लॉग बनवला. रूढार्थाने मी मोठा झालो.
तीन-चार वर्षे गेली. मी मिथुनदाचे सगळे नवे-जुने सिनेमे पाहिले. "ट्रक ड्रायव्हर सुरज", "कूली शंकर", "हिटलर", "अमावस" सगळ्या लीला पाहिल्या मी. पण तोच "ब" मिथुनदा गुरू मध्ये आपला खरा दर्जा दाखवताना पाहून अभिमानही वाटला. मग मी एक दिवस मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश केला. माझ्या साईटवरचा माझा मराठी-इंग्रजी ब्लॉग काही कारणास्तव तिथे जोडला गेला नाही, मग मी तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा ब्लॉगर उघडलं. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. "मराठी ब्लॉगला काय नाव द्यायचं?", हा प्रश्न मला पडलाच नाही. "ग्रेट वॉल ऑफ बाबा" चं "'बाबा' ची भिंत" झालं आणि प्रोफाईल फोटो बदलण्याचा प्रश्नच नव्हता.
मी आजही मिथुनदाचा तेव्हढाच मोठा पंखा आहे. त्याच्या ब सिनेमांची मी कितीही टवाळी केली तरी त्यात कौतुकाचा भागच जास्त असतो. पण हे मात्र खरं की मृगया साठी नॅशनल ऍवॉर्ड घेऊन कारकीर्दीची सुरुवात करणारा आणि अभिनयासाठी दोन नॅशनल ऍवॉर्ड मिळवणारा मिथुन ह्यांच्याबरोबरच, "ये खून नही, मेरे क्रोध का रंग है, चाटेगा इसे?"(क्लासिक डान्स ऑफ लव्ह), "बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा!"(गुंडा) आणि "दिखनेमें बेवडा, दौडने मे घोडा और मारने मे हाथोडा हूं मैं" (लोहा) म्हणणारा मिथुनही माझा तितकाच आवडता आहे. कदाचित तारा जुळल्यात.
(तळटीप{वटवट सत्यवानाकडून साभार} - मला बर्‍याच जणांनी ब्लॉगच्या विचित्र नावाबद्दल विचारलं. परवा आनंदशी बोलताना त्याने ह्याबद्दल एक ब्लॉग पोस्ट लिहायची कल्पना सुचवली. मग त्याबद्दल लिहायचं तर हे सगळं आपोआपच आलं. इथपर्यंत वाचलं असाल तर सहनशीलतेबद्दल धन्यवाद. आणि आनंद, कल्पने बद्दल धन्यवाद{लोकहो, शिव्या घालायच्या असतील तर डायरेक्ट त्यालाच घालणे.})
आणि हो ....
मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण...वाटो.

4/25/2010

ब्लाईंड चान्स, किएस्लोव्स्की आणि मी

"समांतर विश्व" नावाचा एक प्रकार असतो, ऐकला असेल तुम्ही सगळ्यांनी, सगळ्यांनी नाही तरी बर्‍याच जणांनी. थोड्क्यात सांगायचं झालं तर आपण जशी निवड करतो,जश्या शक्यता असतात किंवा जसे निर्णय घेतो, त्यावरून पुढची घटना ठरते. म्हणजे उदाहरणार्थ, लल्या मोदी सकाळी उठतो, तो ठरवतो की आज थरूरला कोपर्‍यात घ्यायचा, चांगलीच जिरवायची त्याची. 'आपल्याशी पंगा घेतो काय?' मग तो संगणक चालू करतो, जालसंपर्कित(ऑनलाईन - आभार-"शुद्ध मराठी") होतो आणि ट्विटर चालू करतो. कोची टीमच्या काळे पैसे धारकांची नावे टाईप करतो आणि कळ दाबणार तेव्हा -
१. तो विचार करतो की जाउ दे. कशाला उगाच नडनडी, आपण पुन्हा एकदा बोलू त्याच्याशी, गॅबीचं प्रकरणही वेगळ्या प्रकारे निस्तरता येईल. शरदकाकांशी बोलून लातूरच्या पार्टीलाही शांत करू आणि वसूमावशींशी बोलून नंदूकाकालाही समजावता येईल. शश्या कसाही असला तरी आपला एकेकाळचा दोस्त आहे. हां आता लडकी की वजह से दोस्ती मे दरार तो आती है, पण दोस्त दोस्त को समझ नही पायेगा तो कौन? आणि तो लिहिलेलं खोडून टाकतो. गॅबीसाठी शश्याला पाठवलेले मेल्स काढून टाकतो. गॅबीला लिहिलेले मेल्स काढून टाकतो. शांत चित्ताने पैश्यांचे नवे आकडे तपासतो आणि संगणक बंद करून पुढच्या कामांना लागतो. मग सगळं ठरल्याप्रमाणे होतं. "एकमेकां साह्य करु, अवघे धरू सुपंथ।"
२. तो विचार करतो - "साला मित्राच्या पाठीत खंजीर खुपसतो, तेही एका बाईवरून! रॉट इन हेल!" आणि कळ दाबतो. पुढे काय होतंय ते सगळ्यांना दिसतंय.
ही म्हणजे दोन "समांतर विश्व". एका निवडीवर, एका शक्यतेवर अवलंबून. ही समांतर विश्व खरोखर अस्तित्वात असतात असंही काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे, आत्ता मी जसा आहे, त्याहून वेगळा मी पण ह्या अथांग विश्वात कुठेतरी आहे, म्हणजे थोडक्यात माझ्या असंख्य निवडींवरून जन्मलेले असंख्य मी अस्तित्वात आहेत आणि अजून चालूच आहेत. असो, मुद्दा तो नाही. मुद्दा हा की ह्या जबरदस्त संज्ञेचा वापर करून कोणी चित्रपट बनवला नाही तरच आश्चर्य वाटेल. पण सत्य हे आहे की आजवर माझ्या माहितीप्रमाणे ह्यावर जास्त सिनेमे आलेले नाहीत. आणि त्यातले दोन मी स्वतः पाहिलेत, बाकींबद्दल मी फक्त ऐकलंय किंवा वाचलंय. पण जो सिनेमा मी काल पाहिला - 'किएस्लोव्स्की'चा "ब्लाईंड चान्स" - त्याचं गारूड अजूनी उतरत नाहीये.
त्याचं झालं असं. मी इथे 'झी टीव्ही यूके' चा पंखा आहे. पर्यायच नाहीये, माझ्याकडे झी यूके आणि झी सिनेमा यूके एव्हढे दोनच हिंदी चॅनेल्स येतात. तर त्यावरती जे विलक्षण सिनेमे लागतात ते पाहून माझं भारतीय सिनेमाबद्दलचं ज्ञान प्रचंड वाढलंय. नावही न ऐकलेले हिंदी सिनेमे, जुन्या काळचे हिंदी सिनेमे, ते दक्षिणेकडचे डब केलेले सिनेमे असे सगळे प्रकार इथे आवर्जून पाहायला मिळतात. एकदा असाच एक दक्षिणेकडचा सिनेमा डब केलेला लागला होतो.  दाक्षिणात्य भारतीय सिनेमाला माझ्या मनात एक वेगळंच (आदराचं{हे तिरकस पकडायचं की सरळ वळणाचं हे तुमचं तुम्ही ठरवा}) स्थान आहे. त्यामुळे मी मनापासून तो चित्रपट पाहू लागलो. पण काही तसंच महत्वाचं काम निघाल्याकारणे मी तो सिनेमा पाहू शकलो नाही. पुन्हा महिन्याभरात तोच सिनेमा लागला(हे अतिशय सामान्य आहे, चकित होण्यासारखं काही नाही. म्हणूनच एखादा सिनेमा मिस केल्याचं टेन्शन येत नाही). ह्यावेळी मी तासभर पाहिला(मधूनच) पण मला बिलकुल काहीही अर्थबोध झाला नाही. हा माझ्या बुद्धीचा आणि सिनेमाविषयक ज्ञानाचा सरळसरळ अपमान होता. सिनेमाचं नाव होतं 'दो रास्ते-१२B'(रास्तावरून आठवलं - कुठल्याही आर्मीच्या कॅम्पाबाहेर पाटी असते 'यह आम रस्ता नही है।' मी लहान असताना ती पाटी 'यह आम सस्ता नही है' अशी वाचल्याचं आठवतंय.असो.). मग मी विकीमातेला प्रणाम केला आणि माहिती काढली. तर त्या सिनेमाचं मूळ तामिळ नाव "१२B" एव्हढंच होतं. आणि पूर्ण वाचल्यावर कळलं की तो समांतर विश्वाच्या तत्वावर बनला होता आणि मी तो मूळ निवडीचा भाग न बघितल्यामुळे मला अर्थबोध होत नव्हता. आणि हे ही कळलं की तो सिनेमा ग्विनेथ पॅल्ट्रोच्या "स्लायडींग डोअर्स' ह्या इंग्रजी सिनेमावर बेतलेला आहे. मग मी 'स्लायडींग डोअर्स' बद्दल वाचलं तर कळलं त्याची मूल संकल्पना 'ब्लाईंड चान्स' ह्या क्रिश्तॉफ किएस्लोव्स्कीच्या सिनेमावरून घेतलेली आहे. आता किएस्लोव्स्कीचं नाव आलं की माझं डोकं बाकी कामे बंद करून सिनेमाच्या शोधात लागतं आणि अखेर तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'ब्लाईंड चान्स' माझ्या हातात आला आणि मी तो काल पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर माझी किएस्लोव्स्कीवरची श्रद्धा अधिकच दृढ झाली. माहित नसणार्‍यांसाठी सांगतो(ह्यात कुठेही बढाई नाही, मला किएस्लोव्स्की माहितीये तो ही एक प्रकारचा ब्लाईंड चान्सच, कसा ते पुढे), किएस्लोव्स्की हा एक पोलिश सिनेलेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होता. त्याने एकाहून एक सरस चित्रनिर्मिती केली आहे. तो आणि त्याचा मित्र आणि सहपटकथालेखक क्रिश्तॉफ पिएसिविच ह्यांनी पोलिश व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक जबरदस्त सिनेमे बनवलेत. नुसते पोलिशच नाही तर कॅथॉलिसिझम वर आणि टेन कमांडमेंट्सवर बनवलेले "डेकालॉग" हे दहा लघुपट माझ्यामते जगात ऑल टाईम बेस्ट आहेत. फ्रान्सच्या तिरंग्यावरून बनवलेले ब्ल्यू, व्हाईट आणि रेड हे ही सांकेतिक आणि कलात्मक सिनेमाची अप्रतिम उदाहरणे आहेत.
समांतर विश्वाचा धागा पकडून सांप्रत समाजाची अवस्था आणि व्यवस्था दाखवणं किती लोकांना सुचेल. किएस्लोव्स्कीनं एका काल्पनिक संकल्पनेला वास्तवाची एवढी धार लावलीय, की ती तत्कालीन पोलिश समाजरचनेला आडवा छेद देऊन जाते. एकच मुख्य पात्र, वैद्यकीय शिक्षणाच्या चौथ्या वर्षाला असलेला. थोडंसं वेगळं लहानपण गेलेला तो वडीलांच्या मृत्यूनं आणि मृत्यूपूर्वी त्यांना न भेटू शकल्यानं अस्वस्थ होतो. त्याला सारखं वाटत राहतं की ते त्याला काहीतरी सांगू इच्छित होते. त्या अस्वस्थतेतच तो सुट्टी घेऊन आयुष्याचा पुनर्विचार करू इच्छितो आणि वॉर्साला जायची ट्रेन पकडायला जातो. पण त्याला उशीर झालाय, ट्रेन फलाटावरून निघालीय. तो ट्रेनच्या मागे धावतो. इथे दोन शक्यता आहेत, तो ट्रेन पकडतो किंवा नाही. किएस्लोव्स्की त्यात तिसरी शक्यता टाकतो, तो ट्रेन सुटल्यावर कशी प्रतिक्रिया देतो. त्यावरून तीन समांतर विश्व निर्माण होतात. एकात तो कम्युनिस्ट असतो, दुसर्‍यात तो कम्युनिस्टविरोधी(क्रांतिकारक) असतो आणि तिसर्‍यात तो सरळमार्गी, पापभीरू, बूर्झ्वा मध्यमवर्गीय असतो. त्याच्या तीन समांतर विश्वात तीच पात्र असतात पण त्यांचं महत्व त्या त्या विश्वात वेगवेगळं असतं. सुरुवातीला पडलेली अनेक कोडी उलगडत जातात. शेवट असा नाहीच ह्या सिनेमाला, कारण उद्देश्य चान्स म्हणजे शक्यता ही संकल्पना ठसवणं आणि महत्वाच म्हणजे तत्कालीन पोलिश व्यवस्थेवर भाष्य करणं. शक्यता ही संकल्पना तर इतकी कल्पकपणे वापरलीये, की नीट पाहिलं तर सिनेमातल्या प्रत्येक पात्रावर शक्यतेचा परिणाम झाल्याच जाणवतं.
मी कॉलेजात असताना मित्रांबरोबर गप्पा मारत रस्त्याच्या कडेला उभा होतो. त्यादिवशी मी आतल्या बाजूला उभा होतो. एका गाडीचं नियंत्रण सुटलं आणि ती आमच्या अंगावर आली. दोन्ही मित्र बाहेरच्या बाजूला होते त्यामुळे ते वाचले, गाडीनं मला ठोकलं. पाय फ्रॅक्चर झाला. आणि पुढे त्यातून पाठीचं दुखणं उद्भवलं. त्यामुळे ऐन शेवटच्या वर्षी मी दोन महिने बेडरेस्टवर होतो. मग तेव्हा "जिंदा" नावाचा टुकार सिनेमा आला. घरीच असल्यामुळे मी उगाच नेटवर चाळा करताना रेडीफवर त्याचं परीक्षण वाचलं. त्यातून कळलं की तो 'ओल्डबॉय' ह्या कोरियन सिनेमावर बेतलेला आहे, जो इतका बोल्ड आहे की बघायला जिगर पाहिजे. झालं, मी तो सिनेमा शोधला आणि पाहून कोरियन सिनेमाच्या प्रेमात पडलो. पार्क चान वूक चे सगळे सिनेमे मिळवून पाहिले. घरी बसल्याबसल्या हेच धंदे. मग विचार केला आता फक्त कोरियन का बाकीचेही पाहू. मग बरा झाल्यावरही वेड संपलं नाही. मुंबईच्या प्रभात चित्र मंडळाची सदस्यता घेतली. माझा पहिलावहिला मामि चित्रपट महोत्सव पाहायला गेलो. आणि तिथे डेकालॉग सिरिज चालली होती. मला रोज येणं शक्य नव्हतं. मग ती सिरिजही मिळवली आणि किएस्लोव्स्कीच्या प्रेमात पडलो ते आजतागायत. त्याचे थोडेच सिनेमे असतील आता जे मी पाहिले नाहीयेत. किएस्लोव्स्कीला जाऊनही बरीच वर्षे झालीत.
इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत थेटरात सगळे मिळून सात सिनेमे बघितलेल्या माझा, सिनेमा हा प्राणवायू झाला. कोण कुठला पार्क चान वूक, कोण कुठला किएस्लोव्स्की आणि कोण कुठला मी. हे सगळं कसं आणि का घडलं. मी त्या दिवशी रस्त्याच्या कडेला आतल्या बाजूला उभा होतो म्हणून. ब्लाईंड चान्स.

4/20/2010

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर

परवाच कुठल्याश्या बातम्यांच्या साईटवर मी सेलेब्स(सेलेब्रिटीज)चे विविध ऑब्सेसिव्ह डिसॉर्डर ह्याबाबतचं एक प्रेझेन्टेशन पाहत होतो. बेकहॅम, लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि अजून कोण कोण. तेव्हाच ते वाचताना मला असं वाटायला लागलं की असल्या बर्‍याच सवयी तर मला सुद्धा आहेत (टीप-ही बढाई नाही). आता हे पहा, दरवाज्याच्या हॅंडलला जीवाणूंच्या भीतीने हात न लावणे, किंवा एखादी गोष्ट वारंवार नीटनेटकी करायचा प्रयत्न करणे (अगदी ती वस्तू जागची हललीही नसली तरी), किंवा लिओनार्डोच्या "एव्हिएटर" प्रमाणे कुठल्याही घराबाहेरच्या व्यक्तिला किंवा वस्तूला हात लावावा लागल्यावर वारंवार हात धुणे ह्या असल्या विचित्र प्रकारांना ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर (ह्यापुढे - ऑकडि) असे म्हणतात.
तर मला काय आहे बरं. हं,मला घरातली हॉट प्लेट बंद केलीय हे तीनचारदा खातरजमा करून घ्यावसं वाटतं. त्याच्या नॉब बरोबर इंडिकेटर लाईट दिलेला असूनही मी दोन दोनदा नॉबला हात लावून बघतो, न जाणो कधी इंडिकेटर लाईट बंद झाला असला तर? मग वरून मी हॉटप्लेटला हातही लावून बघतो (अर्थात अगदी सांभाळून). आता मला सांगा हॉटप्लेट ही बंद केल्याकेल्या कधी थंड होते का? पण तरीही मी हात लावून बघतो. हा तद्दन मूर्खपणा आहे हे मला कळतं, पण वळत नाही. हे सगळं रामायण झालं की मी स्वयंपाकघरातून बाहेर पडताना मोठा दिवा बंद करून पुन्हा हॉटप्लेटकडे बघतो. इंडिकेटर बंद आहे की नाही हे बघायला (नो कॉमेंट्स). मग मी घराबाहेर पडताना आपण किल्ली घेतलीये ना ही काळजी असते. दोनदा खिशात किल्ली चाचपली, की मी दरवाजाबाहेर पडतो. पण दरवाजा लावण्याअगोदर दुसरी शंकेची पाल चुकचुकते. त्याचं काय आहे, मी एका अशा रेसिडेन्समध्ये राहतो, जिथली सगळी व्यवस्था एका हॉटेलची मॅनेजमेंट बघते, त्यामुळे किल्लीचं वगैरे हॉटेलसारखं आहे, राहिली आत किंवा हरवली तर नवीन बनवून मिळते कारण ती इलेक्ट्रॉनिक की असते, सिस्टममध्ये जुनी आपोआप डिसेबल होते. हां तर कुठे होतो, पाल चुकचुकते. तर अशी पाल चुकचुकते की आत्ता की चालते आहे की नाही. कारण दरवाजा बंद केल्यावर मला आत काही राहिल्याचं आठवलं तर खाली रिसेप्शनवर जाऊन पुन्हा किल्ली बनवावी लागेल. असा दगा कधी झालेला नाही, पण इलेक्ट्रॉनिक कीच की हो. मग मी ती खात्री करण्यासाठी चावीचा उघड्या दरवाजावरच प्रयोग करून बघतो. ती चालतेय हे पाहून मी थोडा शांत होतो (आता मला सांगा, जर नसली चालत तर मी काय करणार आहे? पण ऑकडि). मग मी एकदाचा दरवाजा लावतो. मला दरवाजा लावल्यानंतर तो लागलाय कि नाही हे पुन्हा पुन्हा हॅंडल ओढून चेक करायची सवय आहे. पण हे फार सामान्य स्तरावर नाहीये, मी अक्षरशः तीन ते चार वेळा हा प्रकार करतो. त्यामुळे मला हल्ली दरवाज्याचं हॅंडल खिळखिळं झाल्यासारखं वाटायला लागलंय. पुन्हा एव्हढं झाल्यावर मी जसा दूर चालत जातो, दोन तीनदा मागे वळून पाहतो आणि खातरजमा करून बघतो की मी खरंच दरवाजा लावलाय ना! पुढे? मग जिना उतरून खाली आलो की डोक्यात आलंच, हॉटप्लेट व्यवस्थित बंद केलीय ना आपण?
वरील परिच्छेदामध्ये कुठेही मी अतिशयोक्ती अलंकाराचा प्रयोग केलेला नाहीये. मी एकदा व्हेनिसला फिरायला गेलेलो असताना रस्त्यात मला मी हॉटप्लेट बंद न केल्याचं प्रकर्षाने जाणवायला लागलं (अगदी ऑकडि) आणि माझ्याजवळ तेव्हा मोबाईलही नव्हता, तेव्हा मी रस्त्यातल्या एका पब्लिक फोनवरून शेजारच्या अपार्टमेंट मधल्या मित्राला फोन करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. तो घरी नव्हता हे एक, आणि हॉटप्लेट व्यवस्थित बंद केली होती हे दुसरं. वर वर्णिलेला संपूर्ण घटनाक्रम जसाच्या तसा जेव्हा मी सुट्टीच्या दिवशी बाहेर पडतो तेव्हा होतो. ऑफिसच्या दिवशी न होण्याचं एकमेव कारण म्हणजे मी अगदी बसच्या निघायच्या वेळेच्या एक मिनिट आधी हॉटप्लेटच्या प्रसंगापर्यंत आलेलो असतो, त्यामुळे जर मी पुढचा घटनाक्रम बदलला नाही तर माझं दिवसाचं वेळापत्रक बदलू शकतं.
मला दुपारच्या जेवणावेळी संपूर्ण भरलेल्या कॅटीनमधून बरेच वेळा हातातून भरलेला ट्रे घेऊन शेवटच्या बाकाकडे जाताना कुठल्याही क्षणी आपल्या हातून ट्रे पडेल आणि आपली फजिती होईल असं वाटत असतं. लिफ्टमधून एकटं जाताना नेमकी आत्ता लिफ्ट अडकली तर? असं गेली दोन वर्ष त्याच लिफ्टनं प्रवास करूनही वाटतं. कुठल्याही लाईनमध्ये उभा राहिलो की आपल्या नंबरवरंच खिडकी बंद होईल अशी भीती वाटत राहते. एखाद्या सुंदर मुलीसमोर उभं राहून कॉफी पिताना कुठल्याही क्षणी आपल्या हातातला कप निसटून अंगावर सांडेल आणि आपली फजिती होईल असं वाटत राहतं.'अंगावर चट्टा' पाहिल्यावर मला 'डॉक्टरांना भेटा'वं की काय असं वाटायला लागतं. 'नारू टाळ'ण्यासाठी मी 'पाणी गाळतो'. कधी कधी मी जेव्हा स्वतःशी बोलतो, तेव्हा मला वाटायला लागतं की मला स्किझोफ्रेनिया आहे. ब्लड टेस्टहून आल्यावर आपला पांढरपेशा काऊंट कमी येईल की काय असं वाटायला लागतं. पोट बिघडलं की आपल्याला गॅस्ट्रो झाला वाटतं असा विचार मनाला चाटून जातो. ब्लॉग लिहून पोस्ट केला की दर तासाने मला कॉमेंट आली असावी असं वाटत राहतं आणि त्यामुळे मी सारखा मेलबॉक्स चेक करतो. आणि सेलेब्सचे ऑकडि पाहून आपल्यालाही आहे अशी मनाची ठाम समजूत होते.