प्रस्तावना - गेल्या सोमवारी माझं नेहमीचं स्फूर्तीस्थान, 'झी सिनेमा यूके' वर एक चित्रपट लागला होता.(त्याला मी अप्रतिम, बेकार किंवा तत्सम कुठलंही विशेषण लावलं नाही, कारण काही सुचत नाहीये.) तर त्या सिनेमाचं नाव - "दाग - द फायर". मी हा सिनेमा कदाचित चौदाव्यांदा पाहत असेन. मग तो सिनेमा जेव्हा नुकताच रिलीज झाला होता, तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही मित्र मित्र चर्चा करत असताना विचार करत होतो, की सिनेमाचं नाव,"आग- द फायर" असं तरी असायला हवं होतं किंवा "दाग - द स्टेन" असं तरी असायला हवं होतं. पण मग तेव्हाही कुणाच्यातरी सुपीक डोक्यात ही कल्पना आली की जेव्हा आपण सिनेमा काढू, तेव्हा "आग - द स्टेन" असं नाव ठेवून काव्यात्म न्याय करू. मग अनेक वर्षे लोटली. इतक्या वर्षांत जितके वेळा सिनेमा पाहिला, तितके वेळा माझ्या भविष्यकालीन सिनेमा विषयी डोक्यात विचार आला. पण कथा काही सुचत नव्हती. मग काही दिवसांपूर्वी बझाबझी करताना, सचिनच्या बझवर थोडीशी रंगलेली एक चर्चा वाचताना(आणि अर्थात करताना) डोक्यात कीडा वळवळला. नाही नाही, डोक्यात सफरचंद पडलं, बाथटब मधून पाणी बाहेर पडलं आणि शेवटी, "आग- द स्टेन" ला कथा मिळाली. म्हटलं, उडवून टाकू बार.
"बिन नावाचा प्रसंग"
वेळ - संध्याकाळी ५.३०.
तो त्याच्या कार्यस्थानकावरून संगणक बंद करून उठतो. अंगावर जाकीट चढवतो आणि दप्तर खांद्यावर टाकून तो बाहेरच्या दिशेने चालायला लागतो. बाहेर निघण्याच्या दरवाजाच्या अगदी बाजूलाच असलेल्या प्रसाधनगृहामध्ये तो प्रवेशतो. प्रसाधनगृहात आरशासमोर त्याचा मित्र उभा आहे. तो त्याचा टाय व्यवस्थित करतोय.
तो(मनात) - साहेबाने थांबायला सांगितलेले दिसतेय.
मित्र(माझ्याकडे पाहून - व्यक्त) - किधर जा रहा है?
तो(प्रतिक्षिप्तपणे) - घरपे (आणि तो एका शौचालयात प्रवेशतो)
मित्र(तो दरवाजा उघडून अगदी आत शिरतानाच) - अबे..वैसे नही...(पुढचे तो ऐकू शकत नाही)किसी सुपरमार्केट जा रहा है क्या? ऐसे पूछ रहा था...
तो(आतमध्ये आरशाच्या समोर{आतमध्ये देखील एक आरसा आहे}-मनात) - "मी "शौचालयात" असे अजून समर्पक उत्तर देऊ शकलो असतो" आणि तो स्वतःशीच हसतो.
त्याच्या कुत्सित हसणार्या चेहर्यावर फेडींग स्क्रीन.
"तारा आणि मिकीमाऊस - १"(प्रेरणा यॉनिंग डॉगची ही नोंद)
छावा एका लालसर रंगाच्या खेळाच्या पोषाखात एका गोल फिरणार्या काचेच्या दरवाजातून आपला तुंदिलतनू देह सावरत प्रवेश करतो. त्याच्या पाठीवर लिहिलेलं छावा नाव वाचून दरवान त्याला ओळखतो आणि त्याची सही घेण्यासाठी आत धावतो, पण तो काचेचा दरवाजा त्याच्या उत्सुकतेच्या आड येतो आणि नाक चोळत तो धडपडत पुन्हा उभा राहतो. छावाच्या उजवीकडून आणि डावीकडून दोन मुली अचानक प्रकटतात आणि ते एका कोपर्यातल्या टेबलाकडे जातात. अचानक दरवाज्यातून विजेच्या वेगाने एक मध्यमवयीन तरूणी आत शिरते. तिच्या डोळ्यांवर मोठा काळा चष्मा असतो आणि अंगात मिकीमाऊसचं चित्र असलेला, छाव्याच्या पोषाखाच्याच रंगाचा टीशर्ट असतो. ती तडक छाव्याच्या टेबलाच्या दिशेने जाते. तिला येताना पाहून छावा थोडा चपापतो आणि एकदम दोन्ही मुलींना उद्देशून म्हणतो,
"ताई, आपण 'सांप्रतच्या स्त्रियांना सतावणारी वस्त्रटंचाई' ह्या विषयी चालवलेल्या कामाचा जो आढावा आत्ता घेतला, तो मला तितकासा समाधानकारक वाटला नाही, तेव्हा आपण लवकरच पुन्हा भेटून ह्याबाबत सविस्तर चर्चा करू आणि मग मी तुम्हाला तुमच्या ह्या चळवळीसाठी काही आर्थिक मदतही तेव्हाच देऊ करीन."
ताई, ह्या शब्दाने चपापलेल्या त्या तरूणी, पुढील वाक्य ऐकून चेहर्यावर एक मंद स्मित आणतात आणि एकदा त्या मध्यमवयीन तरूणीकडे आणि एकदा छाव्याकडे पाहून उठून निघून जातात.
"ये तारा, बस ना ! अशी धूमकेतूसारखी अचानक कशी काय?" त्याच्याकडे ती नक्की कोणत्या नजरेने पाहतेय हे त्याला तिने घातलेल्या मोठ्या चष्म्यामुळे कळत नव्हतं.
"आरं मेल्या, मी कवाची धुंडाळतेय तुला? कितींदा सांगितलंय तुला की आसं मैदान सोडून हिकडं-तिकडं भटकू नै. त्यो मेघनाद बघ कसा दिवसंरात घाम गाळित असतो."
"काय गं? अशी का बोलतेयस? तब्येत ठीक आहे ना?" छावाला कळेना प्रकार काय आहे!
"आरं, म्या नवा शिनुमा करत्ये. "हेच सौभाग्यवतीचं कुंकू". त्यामदी मला मुख भूमिका मिळालीया. मंग त्यापायी ह्याच पधतीनं बोलायाचं हाय मला आता. आतापरीस फकस्त एक दिस झालाया, अजून दुन म्हैने आसंच चालायाचं."
"..."
"आरं मेल्या, त्ये सम्दं सोड. आधी सांग, तू मैदान सोडून हितं काय करायाला आलयसा? तिकडं त्ये मेघनाद, त्येचा भाऊ, आनि त्ये बरीच मंडळी तुझी वाट पाहत्यात, जा! तुला कर्णधारावरून काढला आणि पार वाटोळं करून घेतलयंस रे.." त्याच्या वाटोळ्या पोटाकडे पाहत ती म्हणाली.
त्यानं आपला चष्मा काढला आणि दाढीचे खुंट कुरवाळत म्हणाला, "त्येनला आन तू लंकेस्नं आणि...मायला मी पण तुझ्यासारखाच बोलायला लागलो की...हां..ते साले लंकेचे राक्षस तुला प्रिय आहेत आणि मी आपला माणूस तुला नकोसा झालोय. तुला ना देशाची काही पर्वाच नाही. तुझा प्रेमी पण कोण तर म्हणे "मिकीमाऊस"..."
त्याचं बोलण तोडत रागाने ती म्हणाली, "माझ्या मिकीमाऊसबद्दल एक शब्द काढशीला तर कानाखली समई काढीन मी. त्यो किनई, माझा चॅट फ्रेंड आहे.." ती बोलता बोलता सुरनळी करण्यासाठी पदर शोधू लागली, मग टेबलावरचाच एक टिश्यू पेपर घेऊन त्याची सुरनळी करता करता पुढे म्हणाली, "तो फ्रिज दुरुस्तीवाला सोडून गेल्यावर ह्यो मला भेटला इंटरनेटवर. "मिकीमाऊस" हे त्याचं चॅटनेम हाय. मला आक्षी समजून घेतो तो. मी त्याला कध्धीच पाहिलं न्हाई अजून. त्यो म्हंतो, योग्य वेळ आल्यासुदीक भेटायचं न्हाय."
छावा आपल्या ओठांच्या कोपर्यातून हसत होता, एवढयात मेघनाद विकट हास्य करत त्यांच्या टेबलाजवळ आला. आणि त्याला पाहताच त्याच्या भोवती आजूबाजूच्या लोकांचा गराडा पडला, स्वाक्षर्या घेण्यासाठी. त्यांना मनसोक्त स्वाक्षर्या दिल्यावर तो आपल्या मूळच्या काळ्या चेहर्यावरचा काळा चष्मा काढत बसला.
"बरं झालं चष्मा काढलास ते, नाहीतर ह्या अंधुक उजेडात मला तुझे फक्त दात दिसत होते." छावा. तारा अस्वस्थ होऊन मेघनादाकडे पाहू लागली.
"हं हं हं..छान जोक मारतोस हां...बाकी अंधाराचा फायदा चांगला आहे, लोकांनी तुला ओळखलंच नाही." मेघनाद आपलं स्वाक्षरीचं पेन नाचवत म्हणाला.
"हं, ते मी मुद्दामहून वजन वाढवून घेतलंय, जेणेकरून लोकांनी ओळखू नये आणि सारखा त्रास देऊ नये. आम्ही काय तुमच्यासारखे दोन महिन्यांसाठी जंगलातून शहरात येत नाही ना खेळायला."छावाचा चेहरा एरंडेल तेल पी.(हे तेलाचं नाव आहे) प्यायल्यासारखा झाला होता.
तारा मधे पडणार एवढ्यात तिचं लक्ष मेघनादाच्या पेनाकडे गेलं, त्यावर मिकीमाऊसचं चित्र होतं.
"तुळजाराम आणि चिमणरावांची होणारी (तिसरी) बायको"
स्थळ - तुळजारामांच्या घरचा दिवाणखाना. चहाच्या टेबलावर तुळजाराम, मीनाताई आणि नंदाताई बसलेल्या असतात.
"आमचे हे किनई फारच द्वाड आहेत हो. मागे एकदा अमरावतीला शिकायला असताना, ह्यांनी आणि ह्यांच्या मित्रांनी काही पोरांना चिंचोके विकायचे आहेत म्हणून दुसर्या एका गल्लीतल्या पोरांना कळवलं. तर ती पोरं आली हो आणि कसलं काय, ह्यांच्याकडे चिंचोके नव्हतेच, मग ह्यांनी त्या पोरांना गावठी छर्र्याच्या बंदुकीचा धाक दाखवून पैसे काढून घेतले. पण नशीब म्हणतात ना, त्या पोरांमधला एक पोलिसाचा पोरगा." मीनाताई कौतुकाने आपल्या नवर्याचे पराक्रम सांगत असतात.
"अय्या मग?" नंदाताई खोटीखोटी उत्सुकता दाखवत म्हणतात.
"मग काय, काढल्या दोन रात्री जेलमध्ये. आहे काय त्यात. देशातली सगळी मोठी माणसं जेलमध्ये जाऊन आलीत. तेव्हाच मी मनानं ह्यांना वरलं." चहा भुरकणार्या तुळजारामांकडे कौतुकानं पाहत मीनाताई म्हणतात.
"पण मीनाताई, तुमचं हे दुसरं लग्न ना? आणि त्यातून तुम्ही तुळजाभाऊजींपेक्षा नऊ वर्षं मोठ्या नाही का? म्हणून भाऊजींच्या वडीलांनी तुम्हाला वारश्यातून बेदखल केलंय." नंदाताई निरागसतेचा आव आणून म्हणतात. तुळजारामांना चहा पिता पिता ठसका लागतो. मीनाताईंच्याही कपाळावर आठ्या उमटतात.
"वर बघा, वर बघा हो." त्यांच्या पाठीवरून हात फिरवत मीनाताई म्हणतात.
"हो, अगदी अहो. होते चूक एखादेवेळेस नाही का? पण बाकी तुमचं आणि चिमणरावांचं दोघांचंही तिसरं लग्न नाही का?" मीनाताई पलटवार करतात. ह्यावेळी कौतुकाने बघायची पाळी तुळजारामांची असते.
"चला मला निघायला हवं." मानापमानाचा प्रयोग आटपता घेण्यासाठी नंदाताई म्हणतात.
"अहो, जा बरं त्यांना सोडून या." तुळजाराम चमकून मीनाताईंकडे पाहतात. ते मनात म्हणतात, "मीनाताई काकांपेक्षाही जास्त वेगाने रंग बदलतायत." नंदाताईही चपापतात. त्या दारात जोडे पायात घालत असताना, मीनाताई प्रश्नार्थक चेहरा केलेल्या तुळजारामांना कानात म्हणतात, "त्या मॉडेलांना कसं बोलण्याच्या ओघात गंडवता, तसंच हिलाही जरा झुलवा. माहिती काढा. " आपल्या बायकोकडे अभिमानाने बघत तुळजाराम गाडीकडे जातात.
गाडीत बसून पट्टा लावल्यावर तुळजाराम रेडीओ लावतात.
"सात समुंदर....सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी"
"अय्या तुम्हाला कसं माहिती, मला आणि आमच्या ह्यांना हे गाणं फार आवडतं म्हणून. ते यू.एस. हून आणि मी दुबईहून जेव्हा भारतात आलो आणि भेटलो ना तेव्हा रेडीओवर हेच गाणं लागलं होतं. हाऊ सिंबॉलिक ना?"
"तुम्हाला हाऊ रोमॅंटीक म्हणायचंय का?" तुळजाराम शांतपणे म्हणतात.
"जाऊ दे." नंदाताई कॅटलकडे बघावं तश्या बघून म्हणतात.
"बाय द वे. मी गाणं लावलं नाहीये, रेडीओवर लागलंय."
"हम्म."
थोडावेळ शांततेत जातो. मागे रेडीओची गाणी अखंड चालू. "सात समुंदर.." संपल्यावर "बोई, बोई, बम ब ब बम बोई.." हे गाणं चालू होतं(रेडीओचं दृश्य असल्याने कॉपीराईटचा प्रॉब्लेम यायचा नाही बहुतेक). गाडी कायम वेगाने जात असते. तुळजाराम नंदाताईना न्याहाळतात. (मघाशी बायकोसमोर कसं न्याहाळणार). कॅमेरा हळूहळू नंदाताईंच्या महागड्या घड्याळावरून, त्यांच्या महागड्या जरीकाम केलेल्या पदरावरून त्यांच्या भरमसाठ मेकप केलेल्या चेहर्यावर येतो. तुळजारामांना एकदम "शेहनाझ हुसेन"चा चेहरा आठवतो आणि अचानक गाडी गचका खाते.
"सॉरी हां" तुळजाराम ओशाळून जात म्हणतात.
"ठीक आहे, जरा नीट पाहून चालवा हो." नंदाताई पुन्हा कॅटलकटाक्ष टाकून म्हणतात. मनात म्हणतात, "माझं मेकपचं सामान चांगलंच काम करतंय असं दिसतं. हा ही चांगलाच भाळलाय. आता ही नवी लाईन बाजारात उतरवायला हवी - 'मुड मुड के'"
"बाय द वे. ही स्वेट इक्वीटीची आयडीया कुठून आली हो." तुळजाराम फायनली विषयाला हात घालतात.
नंदाताई थोड्या सावध होतात. "का हो? हे काही बोलले नाहीत का तुम्हाला?"
"नाही म्हणजे तसं नाही, आपलं सहज विचारलं." आपण जरा जास्तच थेट हात घातला हे त्यांना जाणवतं."आता तुमच्यासारख्या देखण्या बाई आय मीन होणार्या बायकोसाठी कुणीही इतकं करेल हो. पण स्वेट इक्वीटी ही आयडीया भन्नाटच. आता आम्हीही आपल्या बाईसाठी आय मीन बायको साठी इकडेतिकडे जुगाड करतो, पण हे डोक्यात यायला फाईव्ह स्टार मेंदूच पाहिजे." तुळजाराम नावाला जागत शाब्दिक कंदी पेढ्यांचा पुडाच उघडतात.
नंदाताई मोहरतात. "अहो, काय सांगू, परवा किनई एक सिनेमा लागला होता कुठलासा. त्यात तो व्हिलन असतो ना तो एक डायलॉग मारतो. तो पाहून अचानक त्यांना ही कल्पना सुचली."
"काय?" गाडी पुन्हा गचका खाता खाता राहते. "कुठला सिनेमा?"
"अहो तो हो..." नंदाताई विचारात गढतात. तेव्हाच "बोई, बोई.." संपून "क्यूं ये बर्फ पिता है व्हिस्की में डालके.." हे गाणं सुरू होतं. आणि नंदाताईंच्या डोक्यावर सफरचंद पडतं (बाथटबचा सीन टाकल्यास, प्रेक्षक खेचण्यासाठी मदत होईल, पण "ए" सर्टिफिकेट मिळण्याचा धोका उत्पन्न होईल. मध्यममार्ग म्हणजे असा सीन होता, पण तो कापावा लागला अशी आवई उठवायची.). "हे गाणं होतं त्या सिनेमात.." नंदाताई, एकदम ओरडतात. गाडी पुन्हा गचका खाते.
"हे गाणं?"तुळजाराम विचारात गढतात. (मनात)"इथून स्वेट इक्वीटी?" (व्यक्त) "हे तर गुंडामधलं गाणं आहे!" आणि एकदम त्यांच्या चेहर्यावर प्रकाश पडतो.(डोक्यात पडतो हे दाखवायचा वेगळा प्रकार. किंवा डोक्यावर झोत पाडूनही हवा तसा इफेक्ट मिळेल कदाचित.
नंदाताई चालू होतात. "इश्श हो. गुंडा नाही का. मी किनई विसरभोळी झालीये मेली. अहो, त्यात नाही का तो व्हिलन पुढे "हसीना का पसीना" असा कायसा डायलॉग म्हणतो..तेव्हाच अगदी हे डोक्यावर सफरचंद पडल्यासारखे उठले.(इथे बाथटब टाकून काही फायदा नाही. ऑन द सेम लाईन आपण ह्या कथेचं नाव, "तुळजाराम, चिमणरावांची होणारी (तिसरी) बायको आणि सफरचंद(लक्षात आहे ना बाथटबची फक्त आवई आहे)" असं ठेवू शकतो.)..."
नंदाताई पुढे काय म्हणत होत्या हे तुळजाराम ऐकतच नाहीत, आणि आपणही त्यांचा साऊंडट्रॅक बंद करून, "क्यूं ये बर्फ पीता है.." बॅकग्राऊंडला चालू ठेवायचं. कॅमेरा विंडशिल्डवरून सरळ दोघांच्या चेहर्यावर. बाई अजून बरळतायत, तुळजाराम समोर पाहतायत आपल्याच तंद्रीत. गूढ इफेक्ट येण्यासाठी पाऊस दाखवू आणि इंटरमिटन्ट व्हायपर. बर्फाचं गाणं आहे म्हणून छोट्या गाराही दाखवता येतील.
अचानक बॉनेटमधून ठिणग्या उडायला लागतात आणि गाडी आचके देत थांबते. नंदाताई आणि तुळजाराम आळीपाळीने बॉनेटकडे आणि एकमेकांकडे बघतात आणि रेडीओवरचं गाणं बदलतं."टिप टिप बरसा पानी...पानी ने आग लगायी"(फायनान्सर्स ची इच्छा असल्यास इथे एक पावसातला सिडक्टीव्ह ड्रीम सिक्वेन्स टाकता येईल. मला विचाराल तर नको.) तुळजारामांचा फोन वाजायला लागतो, " नायक नही...खलनायक हूं मैं" दोन्ही गाणी एकत्र चालू. इथेच हळू हळू फेडींग स्क्रीन.
क्र....म....शः......!!!
भाग २
माझ्या डोक्यावरुन गेलीये बाबा पोस्ट...
ReplyDeleteतू धडाकेबाज निघालास आनंद...
ReplyDeleteपोस्ट पूर्ण वाचलीस तरी....थोडासा थांब...पूर्ण पोस्टून झालं...कि लागेल अर्थ कदाचित...
नाहीतर एक एब्सट्रक्ट सिनेमा म्हणून थंड बस्त्यात टाकून देऊ...;-)
पांढरं निशाण.. मला बी झ्येपली नाय.. घरी जाऊन पुन्हा एकदा सावकाश वाचतो :)
ReplyDeleteआगाऊपणा : ते वर्ड व्हेरीफिकेशन काढून टाक जमलं तर. जाम त्रास देतं.
अरे थांब हेरंबा ..आज दुसरा भागही टाकतोय...कदाचित थोडा जास्त अर्थबोध होईल. मग उद्या शेवटचा भाग टाकीन. च्यायला टेरेंटिनो स्टाईल तुकड्यांचा सिनेमा बनवायला गेलोय तर तोंडावर पडलोय असें दिसतें. असो..सगळी कथा वाचूनही काही कळलं नाही तर मी आत्ताच पांढरं निशाण फडकावतो...;-)
ReplyDeleteआनंद, हेरंब सेम पिंच.....
ReplyDeleteबा प्रॉफेटा आधि मला वाटले मीच ती एकटी मठ्ठ म्हणून दोन वेळा वाचले.... :)
आता आज तू लिंक लागेल असे म्हणतोयेस तर आजचा भाग वाचतेय आता.....
फुकट सल्ला :केतन मेहेता टाईप नको बनवूस, म्हणजे करण जोहरही नको (मला हिंदी शिनीमे माहितीयेत म्हणुन तिथली उदाहरणे).... :)
@तन्वी - कुणालाच काही कळत नाही बघून मलाच काही कळेना झालंय...ओव्हर सटल लिहिता लिहिता...हाताबाहेर तर नाही ना गेलीय स्टोरी...?
ReplyDeleteअसो...तीन भागांनंतरही नाही कळलं तर .. तर काय...काही नाही...
पुढची पोस्ट! नवा विषय, नवी पोस्ट, नवे कॉमेंट्स..(अशोक सराफ गम्मत जम्मत मध्ये म्हणतो..नवं शहर, नवी नोकरी..नवे देणेकरी..)
आणि हो, केतन मेहता करण जोहर..एकंदर K च्या नावानेही मला भीती वाटते...
@ हेरंब - अरे ते वर्ड व्हेरिफिकेशन पाहिलं मी...काढून टाकलं तर स्पेम कॉमेंट्स येतात रे...