4/25/2011

अक्षय कुमार यास अनावृत पत्र

अक्कीदादा (तुझ्याबद्दल प्रचंड आपुलकी वाटते त्यामुळे, तुम्हाला/आपल्याला वगैरे न वापरता थेट अरे दादावर घसरतोय),
तुला मराठी उत्तम कळतं आणि बोलता येतं त्यामुळे बिनधास्त मराठीमध्ये पत्र लिहितोय. बर्‍याच वर्षांपासून तुला पत्र लिहिण्याची इच्छा होती, पण नेहमी काही ना काही कारणामुळे राहून गेलं. प्रत्येक वेळी पत्र लिहिण्याचं कारण आणि विषयही वेगळे होते. आज मात्र अनावृत पत्र लिहितोय कारण मी जे लिहू इच्छितो ते थेट तसंच्यातसं तुझ्या इतर असंख्य चाहत्यांनाही वाटतं.
मी तुझा एक असा पंखा आहे जो कधीच फिरायचा बंद होणार नाही. तुझ्या असंख्य कट्टर चाहत्यांपैकी एक. तुझ्या 'खिलाडी' सिनेमापासून तुझ्याशी जडलेलं नातं 'जीना इसी का नाम है' कार्यक्रमातल्या तुझ्या मुलाखतीनं घट्ट झालं. ही मुलाखत पाहेपर्यंत एक मार्शल आर्ट एक्सपर्ट ऍक्शन हिरो वाटणारा तू थेट आपल्यातला वाटू लागलास. तुझं सामान्य बालपण आणि त्यातनंच पुढे येऊन तू मिळवलेलं असामान्य यश आणि तरीही आपल्या सामान्य बालपणाशी कधीच तुटू न दिलेली नाळ हे सगळं तुझ्याशी कनेक्ट करून गेलं. मग तुझे 'मिस्टर बॉन्ड' पासून ते 'अंगारे', 'जानवर' इत्यादी इत्यादी सारे सिनेमे पाहिले. काहींची नावे विसरलोही असेन, पण टीव्हीवर तुझा सिनेमा आहे आणि मी चॅनेल बदलला असं कधी झालं नाही. तू अनेक सामान्य ते तद्दन भिकार सिनेमे केलेस, हे तू स्वतःही मान्य करतोस. किंबहुना तुझा हाच सच्चेपणा मला भावतो. नसीरूद्दीन शाह हा असामान्य कलावंत तुझ्याबरोबर दोन-तीन मसाला सिनेमांमध्ये होता. तेव्हा तू छोटा स्टार होतास. सुपरस्टार झाल्यानंतर एकदा नसीरूद्दीन शाहनं एका मुलाखतीत तुझा उल्लेख केला होता. तो म्हणाला, "अक्की स्वतः मला म्हणतो की मला ठाऊक आहे मी चांगला अभिनेता नाही, पण मी नेहमीच उत्तम देण्याचा प्रयत्न १०० टक्के करतो. आणि अक्की खरंच सिनेमाला जेव्हढं देतो, जेव्हढी मेहनत करतो ती काबीलेतारीफ आहे." ती मुलाखत पाहिल्यावर मला तुझा आणखीनच अभिमान वाटलेला.
मी तसा एलिटिस्टही गणला जाऊ शकतो असा सिनेरसिक आहे. फेस्टिव्हल फिल्म्स किंवा आर्ट फिल्म्सवर तासनतास विचार करणं आणि मग अगम्य भाषेत लिहिणं हा माझा छंदही आहे. पण तरीही तू माझा आजच्या पिढीतला सर्वांत आवडता अभिनेता आहेस, ह्याचं लोकांना आश्चर्य वाटतं. कधीकधी मलाही वाटतं, पण हे सत्य आहे. एक मिथुनदा आणि त्यानंतर थेट तू. तू केलेली असंख्य लफडीसुद्धा मला तुझा फॅन होण्यापासून कधीच रोखू शकली नाहीत. त्याचं कारण कदाचित हे आहे की तू कधी त्यांपासून दूर पळायचा प्रयत्न केला नाहीस. जे जसं होतं तसंच तू मान्य केलंस. एका वर्षांत अर्धा डझन फ्लॉप सिनेमे दिल्यावर तू एकदा सिनेसंन्यासाची भाषा केली होतीस, पण मग 'जानवर' आला आणि तू निर्णय बदललास. योग्यच केलंस कारण नाहीतर 'हेराफेरी' आला नसता आणि हिंदी सिनेमाला एक वेगळा प्रकार मिळाला नसता. 'हेराफेरी' येईपर्यंत कधीच सिनेमाचे मुख्य नायक 'कॉमेडी' करत नव्हते. त्यासाठी स्पेशल पात्र असायची. पण 'हेराफेरी' नं मुख्य नटाला 'कॉमेडीयन' बनता येतं हे सिद्ध केलं. त्यानंतर अशा सिनेमांची लाट आली, त्यातच तू ही काही सारखे सिनेमे केलेस पण 'हेराफेरी' पुन्हा जमला नाही. चालायचंच.
पण तू त्यात वाहावत गेलास, ह्याचं वाईट वाटतं. शाहरूख खानमध्ये जर काही अभिनय असलाच तर तो चोपडा-जोहर कंपनीनं झाकून टाकला आणि तुझ्यातला कलाकार तू स्वतःच. मिथुनदांनीही त्यांच्या उतारवयात तेच केलेलं. माझ्या दोन सर्वाधिक आवडत्या नटांचा एकसारखा रस्ता पाहून थोडंसं आश्चर्य आणि वैषम्य वाटतं. तुझे 'कॉमेडी' च्या नावाखाली हल्ली जे सिनेमे येतात, ते पाहून अपार यातना होतात. मी तरीदेखील भारतात असेन तर तुझा प्रत्येक पिक्चर थेटरात जाऊन पाहतोच. पण खरंच माझ्यासोबत येणार्‍या मित्रांना तुला नावं ठेवताना पाहून काळीज तुटतं. तुला आपला मानलंय त्यामुळे प्रत्येक वेळी तुझी बाजू घेऊन मी भांडत राहीनच. पण आता खरंच बदलाची वेळ आहे रे.
माझ्या मते हिंदी सिनेसृष्टीला मिळालेलं सर्वोत्तम ऍक्शन हीरो मटेरियल तू आहेस. जर हॉलीवूडच्या तोडीस तोड कुणी ऍक्शन हीरो असेल तर तूच आहेस आणि ह्यात कुणीही हरकत घेऊ शकत नाही. पण तू ते सगळं वाया घालवतोस असं वाटतं. तू अभिनेता नाहीस असं नाही, पण तुला जेव्हढा अभिनय येतो त्याच्या एकशतांशाचाही तू वापर करत नाहीस. तुझी गणितं आणि तुझे निर्णय सर्वस्वी तुझेच आहेत आणि ह्या गोष्टीचा मान राखूनच मी सांगतो की तुझी सिनेमांची निवड हल्ली मला कोड्यात टाकते. तू आता मोठा माणूस आहेस त्यामुळे तू थेट सहनिर्माता बनून नफ्यातला हिस्सा घेतोस. मग एव्हढी ताकद हाताशी असताना तू 'थँक यू' आणि 'खट्टा मीठा' सारखे सिनेमे का करतोस? मला तुलना आवडत नाही पण मी तुला बॉलीवूडचा विल स्मिथ मानतो, पण तू असे सिनेमे करत राहशील तर कसं होईल? तुझ्या व्यक्तिमत्वात जादू आहे हे 'खतरों के खिलाडी' सारख्या शोजच्या यशावरून सिद्ध होतं. पण ती जादू योग्य जागी लागत नाही असं नाही वाटत तुला?
आजच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत चाळिशी उलटून गेलेल्या हिरोंचीच चलती आहे, त्यामधलंच एक नाव तू. पण तू इतर सर्वांहून वेगळा आहेस. तुझा रस्ता निराळा आहे आणि तुझी कलाही. तू तुझा आब वेगळ्याच पद्धतीनं राखला आहेस, पण मग ही हुशारी तुझ्या सिनेमांच्या निवडीत का दिसत नाही ह्याचं प्रचंड वैषम्य वाटतं. थेट हॉलीवूडपर्यंत झेप घेण्याची तुझी क्षमता आहे आणि तशी तू घेतलीही असल्याचं मध्यंतरी कानावर आलं होतं. पण मग अचानक ह्या बथ्थड सिनेमांची लाट आली आणि काहीतरी मोठी चूक झाल्यागत जाणवू लागलं.
तुझ्याबद्दल प्रचंड तळमळ वाटते म्हणून एव्हढं सगळं लिहिलं. तू अजून मोठा व्हावंस अशी नेहमीच इच्छा आहे. म्हणूनच एकदा आपल्या सिनेमांच्या निवडीवर लक्ष देऊन पाहा. तू प्रयत्न करतोस हे '८x१० तस्वीर' वरून दिसतंच पण एक प्रयत्न फसला म्हणून प्रयत्न करणं सोडू नकोस. आणि सिनेमामध्ये 'अक्षय कुमार' बनून राहू नकोस, जे शाहरूखचं झालं तेच तुझंही होताना दिसतंय, पण शाहरूखच्या इमेजला(लव्हरबॉय) मरण नाही, हे त्याचं नशीब आणि तुझ्या 'स्ट्रीटस्मार्ट' इमेजला तेव्हढं शेल्फ लाईफ नाही हे तुझं. त्यामुळे लवकरात लवकर ह्या फेजमधून बाहेर पड. माझ्यासारख्या चाहत्यांच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत.
तुझा,
(तुला आणि मिथुनदांना घेऊन 'शॉशँक रिडेम्प्शन'चा रिमेक बनवायचं स्वप्न बाळगणारा चाहता) विद्याधर.

4/21/2011

बर्न नोटीस

'मालिका' ह्या गोष्टीबद्दलच्या माझ्या संकल्पना 'फक्त एका रूपयासाठी' वगैरेंपासून सुरू होऊन 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' पर्यंत, फारतर 'सीआयडी' आणि 'आहट' पर्यंत येऊन थांबतात. आणि इंग्रजी मालिकांमध्ये अगदी लहान असताना जेव्हा 'स्टार प्लस' हे अप्रूप टीव्हीवर लागायचं तेव्हा 'सांता बार्बरा' आणि मजेशीर टायटल ट्रॅकवाली 'नेबर्स' (अर्थातच त्यापुढे काही कळण्याचा किंवा आता आठवण्याचा प्रश्न उद्भवत नाही) एव्हढंच आठवतं. त्यानंतर मूळच्या इंग्लिश पण हिंदीमध्ये डब केलेल्या 'डेनिस द मेनेस', 'डिफरन्ट स्ट्रोक्स', 'आय ड्रेम्ट ऑफ जिनी', 'सिल्व्हर स्पून्स', 'हूज द बॉस' किंवा 'बिविच्ड' ह्या मात्र सगळ्याच लक्षात आहेत. पण हे सर्व आजपासून किमान दहा ते बारा वर्षांपूर्वीचं. त्यानंतर मी 'इंग्रजी मालिका' ह्या प्रकाराच्या कधी वाटेला गेलो नाही. पण मालिका नावाखाली हिंदी-मराठी चॅनेल्सवर जे ही लागतं ते निमूटपणे पाहणं मी कर्तव्यकर्म मानतो. कारण आपली कुठलीही कामं उरकताना सोबत म्हणून चालू ठेवता येण्याजोगं अन मधेच एखादा सीन पाहिला तरी हरकत नसणारं असं काही केवळ मालिकाच देऊ शकते. आणि मालिका ही टीव्हीवरच पाहिली पाहिजे हा माझा आजवरचा अलिखित नियम होता. त्यामुळे अनेक मित्रांनी रेकमेंड करूनही मी कधीही 'फ्रेंड्स' च्या वाट्याला गेलो नाही. अन्यही अशा बर्‍याच मालिकांना मी टांग दिली. पण एक दिवस '३० रॉक' ही इंग्रजी मालिका मी मित्र फारच मागे लागल्यानंतर पाहिली अन प्रथमच 'मालिका' कॉम्प्युटरवरही पाहता येऊ शकते आणि ती प्रत्यक्षात मनोरंजन करू शकते ह्याचा साक्षात्कार झाला. पण माझा मूळ स्वभाव कर्मठ, त्यामुळे '३० रॉक' चे माझ्याजवळचे एपिसोड्स संपल्यावर मी दुसरीकडे कुठेही पाहणं टाळलं. 'फ्रेंड्स' रिक्वेस्टही रिजेक्ट केल्या आणि माझं एकमालिकाव्रत पाळलं.
पण मग गेल्या सुट्टीत भारतात होतो तेव्हा कधीतरी चॅनेल्स बदलताना एका नव्या इंग्रजी मालिकेची जाहिरात दृष्टीस पडली. 'बर्न नोटीस' अशा वेगळ्या नावानं आणि कल्पक जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. इथे परत आलो अन एक दिवस इंटरनेटचे बरेच तास शिल्लक असल्याकारणे चाळा म्हणून बर्न नोटीसचा पहिला सीझन उतरवायला सुरूवात केली. बर्‍याच फाईल्स असल्यानं टप्प्याटप्प्यानं पार्ट टाईम करत दोनेक महिन्यांमध्ये पूर्ण पहिला सीझन येऊन माझ्या कॉम्प्युटरवर पडून राहिला. मध्यंतरी मित्रही 'बर्न नोटीस' ची बरीच तारीफ करत होता, पण नेहमीप्रमाणेच माझा कर्मठपणा अन 'कॉम्प्युटरवर पाहायची मालिका' ह्या विषयाबद्दल माझं औदासिन्य ह्यामुळे मी निवांत होतो. अन एके दिवशी फारच कंटाळा आलेला असताना मी कॉम्प्युटर चाळत होतो तेव्हा हा फोल्डर दृष्टीस पडला. ज्या सिरियलमागे मी बरेच तास घालवले होते, ती पाहू तर कशी आहे अशा अतिशय विरक्त विचाराने मी पहिला भाग सुरू केला.
मायकल वेस्टन हा एक सीआयए चा कॉन्ट्रॅक्टेड गुप्तहेर. जो अमेरिकेसाठी हेरगिरी करतो अन अमेरिकेच्याच असंख्यांपैकी एका सुरक्षायंत्रणेचा भाग आहे, पण थेट सीआयएसाठी काम न करता त्यांचीच काही अंडरकव्हर कामं करतो. पहिल्या भागाची सुरूवातच मायकलच्या नायजेरियातल्या एका छुप्या कामगिरीपासून होते. ही कामगिरी पार पाडताना अर्ध्यातच त्याला अमेरिकन सुरक्षायंत्रणा 'बर्न' करतात. जसं नोकरदारांना 'फायर' केलं जातं, तसंच गुप्तहेरांना 'बर्न' केलं जातं. एखाद्याच्या नावानं 'बर्न नोटीस' बजावली की त्याच्याशी असलेला सरकारचा सर्व संबंध संपला. त्याचा सगळा इतिहास, पैसे रेकॉर्डसमधून पुसलं जातं. अन सरकारला त्याच्यापासून धोका वाटत असेल तर त्याच्या मरणाचाही बंदोबस्त केला जाऊ शकतो. कामगिरीच्या मध्यातच 'बर्न' झालेला मायकल जीव वाचवून पळतो आणि विमानातच अतिदमणुकीनं बेशुद्ध होतो. जेव्हा तो उठतो, तेव्हा तो त्याच्या मूळ शहरात 'मायामी' मध्ये असतो. कामावरचा किंवा कामाशी निगडीत एकही मनुष्य त्याच्याशी संबंध ठेवू शकत नाही किंवा इच्छित नाही आणि त्याच्या 'बर्न' केलं जाण्याची कारणं किंवा 'बर्न नोटीस' कुणी अन का बजावली ह्याचंही उत्तर कुणी देऊ शकत नाही. त्याच्याकडे पैसे नाहीत अन तो शहराच्या बाहेर पडू शकत नाही ह्याची काळजी घ्यायला त्याच्यावर चोवीस तास पाळत आहे. प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि इतर आयडेंटिटी प्रूफ्सही त्याच्याजवळ नाहीत.
पाकिटामध्ये 'इमर्जन्सी कॉन्टॅक्ट' म्हणून एक्स-गर्लफ्रेंडचा नंबर असल्यानं तो बेशुद्ध असताना तिला बोलावलं जातं. तीदेखील गुन्हेगारी टोळ्यांमधली असल्यानं नवं शहर म्हणून निघून येते. मूळ शहर असल्यानं मायकलची कुटुंबवत्सल पण चेनस्मोकर आई आणि छोटेमोठे गुन्हे करणारा भाऊदेखील त्याच शहरात आहेत. आणि ह्यांच्या व्यतिरिक्त एफबीआयचा इन्फॉर्मर असलेला मायकलचा जुना जिगरी दोस्त सॅम (जो मायकलच्या सांगण्यावरून मायकलबद्दलच एफबीआयला खबरी देतो), एव्हढीच ओळखीची लोकं मायकलशी बोलतात.
विचित्र परिस्थितीत अडकलेला मायकल आपल्या 'बर्न' होण्यामागचं रहस्य जाणून घ्यायचा निश्चय करतो आणि त्यादिशेनं पावलं टाकू लागतो. पण ह्या सगळ्यासाठी पैशांची गरज आहे. मग तो बिना लायसन्सचा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बनतो. त्यापुढे प्रत्येक भागामध्ये मायकल आपल्या 'बर्न नोटीस'च्या रहस्याकडे एक एक पाऊल टाकतो आणि त्या त्या भागात एक एक 'मायामी'मधली केस सोडवतो. अशा भन्नाट प्रकारे ही मालिका पुढे सरकते.
मायकल वेस्टनचं काम करणारा 'जेफ्री डोनोव्हन' हा मालिकेची जान आहे. त्याचा बोलका चेहरा अन मिस्किल हास्य मायकलच्या पात्रात रंगत भरतात. एखाद्या वर्षांनुवर्षं जगभर गुप्तहेरी केलेल्या माणसाला शोभेलसं व्यक्तिमत्व आणि अप्रतिम संवादफेक ह्यामुळे मायकल वेस्टन फारसं काही भव्यदिव्य न दाखवताही प्रचंड विश्वसनीय वाटतो. मालिकेचा फॉर्मॅट ज्यामध्ये बर्‍याच प्रसंगांमध्ये पॉज येतो आणि मायकल व्हॉईसओव्हरने एखाद्या होतकरू गुप्तहेराला टिप्स द्याव्यात तशा टिप्स देतो, मायकल साध्या साध्या गोष्टींमधून विविध यंत्र कशी बनवतो किंवा प्रत्यक्षात काहीही न करता टॅक्टिकली भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी कसं पळवतो आणि सगळ्या पात्रांच्या तोंडी असलेले खुसखुशीत संवाद, ह्यांमुळे एका अर्थानं थ्रिलर असलेली मालिकादेखील तणावपूर्ण किंवा नाटकीय न होता मनोरंजक होते आणि तरीही बर्‍यापैकी विश्वसनीय राहते.
मायकलचं पात्र इतक्या विचारपूर्वक लिहिलंय की लेखकाला सलाम करावासा वाटतो. एका भागात मायकल सांगतो 'People with happy families don't become spies. Bad childhood is the perfect background to become a spy. You don't trust anyone, you are used to getting smacked around and you never get homesick.'. मायकलचं बालपण असंच आहे. त्याचे वडील बिलकुल चांगले नसल्याचं आणि मायकलचं त्यांच्याशी वाकडं असल्याचं आपल्याला मायकल आणि त्याच्या आईच्या प्रत्येक संवादातून कळतं. पण त्याच्या आईनं तरीही केवळ मुलांसाठी अनेक वर्षं संसार केलेला आहे. एका प्रसंगात ती मायकलला म्हणते, 'You missed your father's funeral.. by eight years." मायकलचं आईवर प्रेम आहे, कसाही असला तरी भावाबद्दल ओढ आहे पण विचित्र बालपणामुळे तो नात्यांना घाबरतो, त्यामुळे कायम घरापासून आणि नात्यांपासून पळत राहिलाय. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कामाचं कारण देऊन. पण कुटुंबवत्सल आईमुळे मायकलच्या वागण्यातला फरक प्रत्येक भागानुसार गडद होत जातो. "Thirty years of karate, combat experience on five continents, a rating against every weapon that fires a bullet or holds an edge... still haven't found any defence to mom crying into my shirt." मायकलचा हा डायलॉग त्याची व्यक्तिरेखा स्पष्ट करून जातो. वर्षांनुवर्षं जगाच्या कानाकोपर्‍यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितींमध्ये आणि वाईटात वाईट लोकांसोबत आयुष्य घालवलेला गुप्तहेर मायकल अचाट कामगिर्‍या करून एकेक केस सोडवतोच पण एक माणूस म्हणूनही ह्या मालिकेमध्ये पदोपदी दिसत राहतो. त्यामुळेच मी आजवर पाहिलेल्या किंवा वाचलेल्या सर्व गुप्तहेरांमधला माझा सर्वांत आवडता गुप्तहेर हे बिरूद मी मायकल वेस्टनलाच देईन.
पाच दिवसांमध्ये मी 'बर्न नोटीस' च्या पहिल्या सीझनचे पाऊण तासाचे १२ भाग संपवले. आता ह्या सप्ताहांताला दुसरा सीझन आणि कदाचित दोनेक आठवड्यांत आजवरचे सगळे भाग पाहून होतील, पण मायकल वेस्टन आणि त्याच्या जगाचं गारूड उतरणं थोडं अवघडच आहे.

4/05/2011

तो

वैराण रस्त्यावरचा मैलाचा दगड
त्यावर बसलेला तो
आणि जमिनीमध्ये विरघळलेली नजर
डोक्यात केवळ प्रश्न
साथीला भर दुपारी भरून आलेलं आभाळ
आणि तितकंच भरून आलेलं मन
नजर जाईल तिथवर फक्त वैराण रस्ता
पण पावलं पुढं सरकायला नाखुष
अधूनमधून मागे पडलेल्या रस्त्याचा अदमास घेणारे डोळे
कधी काठोकाठ भरून तर कधी कोरडे पडून
अचानकच जसा नेहमी येतो, तसाच
त्याही थांब्यावर 'तो' आला
'ह्या'ला रस्त्याची कधीच गरज का पडत नाही
असा विचारही त्याच्या मनात तरळून गेला
साधंसंच पण आश्वासक हसत त्यानं
खांद्यावर टाकलेला ओळखीचा हात
आणि त्याच्या स्पर्शातली ती ऊब
हजारो जन्मांचा शीण जणू वितळवून टाकणारी
"मागे वळून काय पाहतोस?" 'त्या'नं विचारलं
मागल्या फाट्यावर सुटलेलं बरंच काही आठवलं
"फाटा तरी दिसतो का आता?"
शोधक नजर पुन्हा निराश झाली
"आणि फाट्यापर्यंत पोचेस्तोवरची पावलं?"
निराशेचं रूपांतर वेदनेत झालं
"आता पावलांचे ठसे पाहत अश्रू गाळणार?
की पुढच्या रस्त्यावर नवे ठसे उमटवणार?"
वेदना कमी झाली नाही पण
पुढच्या पावलांसाठीचा जोर आला
नजरेचा मागे वळण्याचा हट्ट कमी झाला नाही
पण पुढे बघायची इच्छा झाली
पुन्हा पुढे वैराण रस्ता, नवनव्या फाट्यांची भीती
मनकवड्या 'त्या'चा हात लगेच पडला खांद्यावरती
पुन्हा ते साधंसंच हसू, 'आहे मी' असं सांगणारं
बिनधास्त पुढे हो असं न बोलून समजावणारं
पावलं पुढे टाकण्याआधी त्यानं 'त्या'ला मिठी मारली
भरून आलेलं आभाळ अखेर एकदाचं बरसलं
वैराण रस्त्याचा दाह थोडा कमी झाल्यागत वाटलं
पहिलं पाऊल टाकून तो एकदा मागे वळला
फाट्याप्रमाणेच 'तो'ही आता तिथे नव्हता
पुढची पावलं टाकताना एकच विश्वास होता
पुन्हा फाटा फुटताना खांदे पडताच सावरायला
'तो' नक्कीच येणार होता

3/27/2011

माणुसकी

तो निर्विकार चेहर्‍यानं गाडी चालवत होता. त्याच्या शेजारच्या सीटवर दोन लहान मुलं खिडकीला टेकून डोळे विस्फारून बाहेरचं दृश्य पाहत होती. मागच्या सीटवर त्या मुलांची आई होती. गाडीची गती सामान्यच होती. प्राप्त परिस्थितीही जास्त वेगास अनुकूल नव्हती अन रस्त्यांची स्थितीही. तो हेच काम गेले कित्येक दिवस करत होता. त्यामुळे त्याच्या चर्येवर किंवा मनोवस्थेवर फारसा परिणाम होत नव्हता. थंडपणे त्यानं गाडी एका ठिकाणी उभी केली आणि गाडीचं इंजिन बंद केलं. एकदम स्मशानशांतता पसरल्यासारखी वाटली. त्यानं एकवार मुलांकडे अन मग मागे बसलेल्या त्यांच्या आईकडे पाहिलं. तिघंही कुठेतरी हरवलेली होती. त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. तो थोडासा खाकरला. मुलांची आई एकदम भानावर आली आणि डोळ्यांतलं पाणी टिपत तिनं त्याच्याकडे पाहून मान हलवली. तो चटकन गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उतरला आणि मुलांच्या बाजूला आला. आधी त्यानं आईचा दरवाजा उघडला आणि ती उतरल्यावर मग मुलांचा दरवाजा. पण आईला आधी उतरवण्याचा त्याचा उद्देश सफल झाला नाही. मुलं वार्‍यासारखी वेगात समोर अथांग पसरलेल्या सिमेंट-विटा-मातीच्या ढिगार्‍याकडे धावली आणि आई फक्त हताशपणे पाहत राहिली. तो दरवाजाही न लावता ते विचित्र दृश्य पाहत उभा राहिला.
रोज थोड्याफार फरकानं अशीच दृश्यं पाहूनही रोज ह्याच क्षणी त्याच्या अंगावर सरसरून काटा येत असे. नजर जाईल तिथवर पसरलेला तो ढिगारा. धरणी अन समुद्राच्या रौद्र रूपाने उद्भवलेल्या दुहेरी नैसर्गिक संकटानंतर उरलेले मानवी संस्कृतीचे अवशेष. त्याखाली न जाणे किती संसार गाडले गेले असतील, किती स्वप्नं मातीत पुरली गेली असतील, किती महत्वाकांक्षा क्षणात जमीनदोस्त झाल्या असतील आणि किती मायेला आसुसलेले जीव थेट धरणीमातेच्या कुशीत विसावले असतील. कशाचाच थांग लागू न शकणार्‍या त्या ढिगार्‍याच्या भयंकर पोकळीमध्ये आपल्या संसारांचे, नात्यांचे किंवा स्वप्नांचे अवशेष शोधणारे ते व्याकुळ जीव रोजच्या रोज पाहताना त्याच्या गणवेषाच्या इस्त्रीआतला माणूस रोज चुरगळला जायचा. दूर दूर नजर फिरवल्यावर फक्त शोधकाम करणारे किंवा आपल्याच भूतकाळामध्ये वर्तमानाशी लढण्यासाठी एक आधार शोधणारी माणसं. पण क्षणात तो भानावरही यायचा. आजही आला. त्यानं स्वतःला सावरलं. दरवाजा बंद केला. गणवेषाचा शर्ट ठीकठाक केला. टोपी नीट केली आणि अदबीनं पुढे झाला. थोड्या अंतरावरून त्या भागातल्या शोधकार्याच्या ऑफिसातून एका कार्यकर्त्याला आणायला गेला.
एव्हढं होईस्तोवर मुलांनी त्यांचं घर एकेकाळी ज्या जागी उभं होतं ती जागा शोधून काढली होती. आणि एक परदेशी पत्रकारांचा गटही कॅमेरांसकट तिथे पोचून सगळं शूट करत होता. "इथे माझी बेडरूम होती. आणि इथे वरती माझं अभ्यासाचं टेबल." मुलगा सांगत होता. एव्हढ्यात मुलगी थोड्या अंतरावरून धावत धावत हातात एक वाळूनं भरलेली स्कूलबॅग घेऊन आली. "मी ह्यामध्ये काहीबाही भरून बाबांसोबत समुद्रावर जायचे." 'समुद्र' ऐकूनच तो क्षणभर दचकला. ती मुलगी अजूनही ती बॅग निरखून पाहत होती आणि मुलगा ढिगारा उपसत होता. आईला कदाचित अश्रूंमुळे सगळं धूसर दिसत असावं, पण तिला समोर तो ढिगारा दिसत नसावा. तिला तिथे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत उभं असलेलं तिचं छोटंसं विश्वच दिसत असावं. एव्हढ्यात तो घेऊन आलेल्या शोधकार्यकर्त्यानं तिला त्या विश्वातून बाहेर आणलं. "तुमच्या नवर्‍याची अजूनही काही माहिती नाही." असं तो कार्यकर्ता तिला पाहताच थेट बोलला. तो इतका वेळ शून्य नजरेनं सगळं पाहत होता. हा संवाद ऐकून तो थोडा संभ्रमात पडला, हा कार्यकर्ता हिला कसा ओळखतो. "हे बघ काय?" मुलगी आईला काहीतरी दाखवत होती. तिला एक मोडलेली फोटो फ्रेम मिळाली होती. त्यामध्ये त्या कुटुंबाचा त्यांच्या कुटुंबप्रमुखासोबतचा फोटो होता. त्या माऊलीनं ती फ्रेम फेकून दिली आणि त्या फोटोवरून एकदा प्रेमानं हात फिरवला. इतका वेळ कडांपर्यंत येऊन थांबलेले अश्रू एकदाचे गालांवरून ओघळले. आत्तापर्यंतची प्रत्येक गोष्ट शूट करणारे कॅमेरामन आता तिच्याकडे कॅमेरा रोखून उभे राहिले. एक स्त्री पत्रकार तिच्याजवळ गेली आणि तिला काहीतरी विचारू लागली. पण तिला इंग्रजी येत नव्हतं मग ती पत्रकार इथे तिथे पाहू लागली. हा प्रसंग पाहत असलेला तो दुभाष्या म्हणून पुढे झाला.
"हा फोटोतला तुमचा नवरा का?"- पत्रकार.
"हो." ती डोळे पुसत म्हणाली. गरज नसतानाही त्यानं भाषांतरित करून सांगितलं.
"तुमची अन तुमच्या नवर्‍याची ताटातूट कशी झाली?"- पत्रकार.
"ते इथल्या आपत्कालीन यंत्रणांचे समन्वयक होते. संकट उद्भवल्यावर इथल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर पडण्याचे मार्ग दाखवण्याची जवाबदारी त्यांची होती. त्यामुळे सगळे नागरिक सुखरूप मार्गस्थ होईस्तो ते बाहेर पडू शकत नव्हते. आम्हाला तिघांना त्यांनी पुढे पाठवलं." भाषांतरित करायचं आहे हे विसरून तो तिच्याकडे पाहतच राहिला.
हजारो लोकांचं सर्वकाही हरवलेल्या त्या ढिगार्‍यांमध्ये अचानकच त्याला माणुसकी सापडली होती.

टीप - जपानच्या भूकंपानंतर चाललेल्या शोध आणि मदतकार्यामध्ये समोर आलेली एक सत्यघटना पाहून ही कथा लिहावीशी वाटली.

3/24/2011

वाईट दिवस

सकाळी घड्याळाचा गजर वाजलाच नाही
वेळेवर झोप उडालीच नाही
चहाचं आधण ऊतू गेलं
अन इस्त्री केलेल्या एकमेव शर्टाचं बटण तुटलं
चुरगळलेल्या शर्टावर चहाचा थेंब आणि
बससाठीची धाव नेहमीचीच सेम
आज नेमकी बस डोळ्यासमोर सुटली
कधी नव्हे ती पावलं रिक्षाकडे वळली
एरव्हीचे रिकामटेकडे रिक्षावाले आज कामात गर्क होते
एरव्हीचा तोंडी अपमान आज फक्त नजरेनंच करत होते
चरफडत उन्हात स्टेशनाकडे चालत
निघालो सोमवार बाजाराची गर्दी पाहत
आज ट्रेनांना कशानं दुप्पट गर्दी
डब्यामध्ये नेमके संगीतरसिक दर्दी
स्टेशनातनं बाहेरचीसुद्धा बस पुन्हा चुकली
चरफडतच पुन्हा रिक्षाकडे नजर गेली
चमत्कारच की रिक्षावाला चक्क हो म्हणाला
त्याक्षणी कदाचित मुलीचा होकारही असता मिळाला
माझ्याच आनंदाला माझीच नजर लागली
रिक्षा ट्रॅफिकात दोन तास थांबली
घामेजलेला शर्ट आणि आंबलेलं मन
ऑफिसातला लेट पंच अन नुसतीच तणतण
"बेक्कार दिवस आहे यार.." शेजार्‍याला म्हणालो
तो दिसला नाही म्हणून नुसताच सुस्तावलो
"त्याचं कळलं नाही का?" आवाज आला दुरून
प्रश्नार्थक नजरेनंच पाहिलं मी दोन टेबलं सोडून
"दोन तासांपूर्वी इथेच एक चौक आधी
घाईत रस्ता ओलांडताना आला तो गाडीखाली
नेला लगेच उचलून सगळ्यांनी हॉस्पिटलात
आहे ठीक आता पण तीनेक आठवडे घरात"
ट्रॅफिकचा गोंधळ आता माझ्या नीट लक्षात आला
वाईट दिवस माझा चक्क वरदान वाटू लागला

3/13/2011

भोग

(माझ्या सर्वांत आवडत्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'ओल्डबॉय' (हिंदीत 'ज़िंदा' ही निर्लज्ज, भ्रष्ट कॉपीदेखील आहे). त्यामध्ये मध्यवर्ती पात्राला अचानक किडनॅप करून कोठडीत बंद केलं जातं. कशासाठी, कुणी, किती काळासाठी ह्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. खोली एखाद्या हॉटेलच्या खोलीसारखी मूलभूत सोयींनी युक्त, पण बाकी काहीच नाही. अशी चौदा वर्षं तो काढतो. त्याच्या अवस्थेवर सुचलेली एक कविता. अर्थात कविता जास्त कळण्यासाठी सिनेमा बघितलेला असणं चांगलं. पण एक वॉर्निंग ही की हा सिनेमा फार म्हणजे फारच बोल्ड आणि हिंसक आहे, सर्वांना झेपणारं काम नाही.)

एकांती बसलो इथे मी
शांत अन हतबुद्धही
पाहतो चोहीकडे अन
नाही पाहत काहीही

दृष्टीस पडणे हे कधी का
पाहण्यासम भासते?
स्थिरचित्रही भिंतीवरीचे
पाहूनी मज लाजते

चलचित्र जेव्हा माणसांचे
भ्रम उभारू लागले
गंध अन संवेदनांचे
बंध निसटू लागले

एक केवळ गंध उरला
गूढ अन परिचित असा
संगीत येई घेऊनी ते
मूर्च्छनेचा एक ठसा

मोजतो मी दिवस वर्षे
अन कधी सेकंदही
वाट बघणे हेच हाती
निस्तेज मग ते अंकही

सर्वकाही तेच ते पण
भास अन आभासही
वीट येतो घेऊनी ते
श्वास अन उच्छवासही

सोडले जेव्हा पळांचे
मांडणेही गणित मी
मांडला मी ठोकताळा
केली मी पापे किती

कोण तो घायाळ इतका
सूड ज्याचा संपे ना
कोण जो निष्ठुर इतका
की मला संपवेही ना

भरली मग पाने वहीची
एकमेकांमागुनी
थक्क झालो मी पुन्हा
ती सर्व पापे पाहूनी

एकदा मी फक्त त्या
चळतीकडे मग पाहिले
भोग माझ्या भाळीचेही
शेवटी ओशाळले

3/08/2011

लोकाभिमुख कला - वारली चित्रकला

एकेका कलेचं नशीब असतं. हे वाक्य मी म्हणणं म्हणजे काजव्यानं तार्‍यांच्या श्वेतबटू बनण्याबद्दल वगैरे चर्चा करण्यासारखं आहे, पण असो. तर माझं असं म्हणणं केवळ एव्हढ्याचसाठी आहे, की एखादी कला अचानकपणेच काही कारणानं प्रचंड लोकप्रियता मिळवते, मोठ्या लोकसंख्यपर्यंत पोचते अन तिच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी ह्या गोष्टीची मदत होते. ती कला पुढे जात राहते, नवनवे स्तर पार करत राहते. तर काही कला ह्या अज्ञात कारणानं तेव्हढ्या लोकप्रिय होऊ शकत नाहीत, त्या लोकांपर्यंत त्या संख्येनं किंवा तीव्रतेनं पोचत नाहीत. आणि त्या कारणास्तव त्या एका विशिष्ट छोट्या परिघाबाहेर न पडल्यानं नामशेष होतात की काय अशी भीती निर्माण होते. पण कधी कधी एक छोटासा कल्पक प्रयत्नदेखील त्या कलेच्या लोकांपर्यंत न पोचू देणार्‍या मर्यादा ओलांडायला कारणीभूत ठरू शकतो आणि कलेचं पार नशीबच पालटवूनच टाकू शकतो.
उदाहरणं बघायची झाली तर युरोपियन बॅले किंवा पश्चिम युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन नृत्यप्रकार ह्या कला योग्य त्या स्तरावर मार्केटिंग झाल्यामुळे म्हणा किंवा योग्य त्या पद्धतीनं (संख्येनं आणि तीव्रतेनं) त्यांचा प्रचार झाल्यामुळे आणि त्यामध्ये बदलावांस आवश्यक तो वाव राहिल्यामुळे जगभरातल्या लोकसंख्येपर्यंत पोचल्या. आणि त्यामुळेच त्यांचा टिकाव तर लागलाच पण मोठ्या प्रमाणावर त्यांचं संवर्धनही होत आहे. पण त्याच ठिकाणी कित्येक भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांकडे आपण नजर टाकली तर योग्य त्या पद्धतीच्या मार्केटिंगचा अभाव आणि कधीच एका ठराविक परिघाबाहेर न पडल्यामुळे बहुतेक (अन्यही अनेक कारणं असतील, माझ्या मर्यादित ज्ञानावर आधारलेली अगोचर वक्तव्य मी नेहमीच करत असतो, त्यामुळे चुकत असल्यास क्षमा करावी) त्या कला जास्त लोकसंख्येपर्यंत पोचू शकल्या नसल्याचं चित्र दिसतं. आणि तसं पाहता पाश्चिमात्य नृत्यप्रकार सोपे असतात किंवा किचकट, क्लिष्ट नसतात अशातला भाग नाही, त्यांचेही असंख्य नियम आणि गरजा असतात, पण योग्य त्या मार्केटिंगचा अभाव आणि बदलांंस सक्त विरोध असल्याकारणे परिघाबाहेर पडण्याची नसलेली शक्यता ह्यांमुळे भारतीय नृत्यकला मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचल्या नाहीत असं मला वाटतं. अर्थात मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचणं हे कलेच्या उच्चनीचतेचं मोजमाप आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. कारण मुळामध्ये कलांमध्ये तुलना किंवा कला चांगली-वाईट ठरवणं हे पूर्णतः सापेक्ष असतं. पण मी हे सगळं ह्यासाठी महत्वाचं मानतो कारण, कला जेव्हा मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचते तेव्हा ती ज्या संस्कृतीतून आली, त्या संस्कृतीची दूत असते. ती अप्रत्यक्षपणे त्या संस्कृतीलाच एका मोठ्या वर्गापर्यंत पोचवत असते. उदाहरणात वापरलेलीच पाश्चात्य नृत्य पाहिलीत तर आज कित्येक पाश्चात्य नृत्यप्रकार तुमच्या दरवाजापर्यंत येऊन पोचलेत. मोठ्या शहरांमध्ये हे नृत्यप्रकार शिकवणारे क्लासेस सहजगत्या उपलब्ध आहेत आणि टीव्ही, सिनेमामधल्या जबरदस्त मार्केटिंगमुळे त्यांच्याकडे वळण्याचा ओघ वाढलाय हे निश्चित. अर्थात ह्याचा अर्थ असा नव्हे की ह्या नृत्यकला चांगल्या आहेत म्हणून हे होतंय, ह्यामागे आर्थिक कारणं, प्रसिद्धी इत्यादी इत्यादी बर्‍याच गोष्टी आहेत. त्यांचा ऊहापोह करणे हा हेतू नव्हे. पण लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही, की हे नृत्यप्रकार बर्‍यापैकी लोकाभिमुख आहेत. कुठल्याही सामान्य माणसाच्या सहज आवाक्यातले आणि त्यामध्ये एक लवचिकता आहे. त्याचबरोबर ह्या नृत्यप्रकारांच्या आपल्या जीवनातील चंचुप्रवेशामुळे त्या त्या संस्कृतींची आपल्याला जास्त ओळख होऊ लागली आहे. अर्थात, टीव्ही/सिनेमे ह्यांमुळे होते आहेच, पण टीव्ही/सिनेमे हे देखील कलाप्रकारच नव्हेत का?
एव्हढं सगळं रटाळ पुराण लावण्याचं कारण हे की काही महिन्यांपूर्वी एका अशाच वेगळ्या कलेनं माझं लक्ष वेधून घेतलं. तसा मी कलाशून्य मनुष्य. पण दैवयोगानं मी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येतो ती सगळी मंडळी कलाकार असतात. असंच एकदा मित्राच्या बायकोनं काढलेलं एक चित्र, मित्र मला कौतुकानं दाखवत होता. मी दोन मिनिटं चित्र निरखून पाहिलं. आधीच सांगितल्याप्रमाणे मला कलेतलं फार कमी (जवळपास शून्य) कळतं. पण मला ते चित्र आधी चित्र आहे हेच कळायला वेळ लागला. त्यामध्ये अतिशय सामान्य पद्धतीनं दोन त्रिकोण जोडून बनवलेली माणसं होती. उभे त्रिकोण काढलेली झाडं आणि डोंगर, सूर्य असावासा वाटणारा गोल आणि शेतीची कसलीशी क्रिया करणारी ती माणसं ज्या जमिनीवर काम करत होती तो जमिनीचा तुकडा चौकोन काढून दाखवलेला होता. पण त्या सगळ्यात एक पॅटर्न होता. अर्थात तो समजण्याइतपत अक्कल मला असती तर अजून काय हवं होतं, पण अधिक चौकशी करता ही 'वारली चित्रकला' असल्याचं मला सांगण्यात आलं. आणि 'वारली' ही महाराष्ट्र अन गुजरातेमध्ये असणारी एक आदिवासी संस्कृती असल्याचं ज्ञान मला मित्राकडून मिळालं. ते चित्र आमच्या इथल्या गणेशोत्सवामध्ये घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतलं असल्यानं बर्‍याच लोकांनी पाहिलं अन आश्चर्य म्हणजे माझ्या अजून दोघा-तिघा मित्रांनी ही वारली चित्रकला असल्याचं लगेच ओळखलं अन त्यांचीही बहिण/बायको किंवा तत्सम कुणीतरी ती शिकत असल्याचं किंवा शिकलं असल्याचं कळलं. माझ्यासाठी हा धक्का होता. एक आदिवासी कला, शहरी, सुसंस्कृत माणसांपर्यंत बर्‍यापैकी पोचली होती.
नंतर एक दिवस तन्वीताईनंही तिच्या काही वारली चित्रांचे फोटो टाकलेले मध्यंतरी. त्यामुळे माझ्या विस्मरणात गेलेलं 'वारली चित्रकले'बद्दलचं कुतूहल पुन्हा उफाळून वर आलं. मग नेटवर थोडी शोधाशोध केली. तेव्हा 'वारली' ही संस्कृती निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करणारी आणि मनुष्य हा निसर्गाचाच भाग असल्याने त्याचं आयुष्य नैसर्गिक समतो राखण्यास हातभार लावणारं असावं असा जीवनविषयक दृष्टिकोन असणारी आहे हे वाचनात आलं. वारली भाषा ही न लिहिली जाणारी, लिपि नसणारी भाषा. त्यामध्ये संस्कृत, गुजराती अन मराठीतल्या आधुनिक शब्दांचाही भरणा आहे. पण मग संपर्काचं दुसरं साधन म्हणजे चित्रलिपी किंवा चित्रकला. घराच्या भिंतींवर लिहून साधला जाणारा संपर्क. त्यातूनच शेतीचे हंगाम, पीक घेणं किंवा शुभकार्यांशी निगडीत वेळी केली जाणारी ही वारली चित्रकला जन्म घेते. मुळात ही वारली चित्रकला, वारली परंपरा आहे. काटक्या, माती आणि शेणापासून बनवलेल्या भिंतीवर गेरूनं लाल पार्श्वभूमी तयार करायची आणि मग तांदळाचा लगदा आणि पाणी ह्यांचं मिश्रण आणि ते बांधण्यासाठी त्यात गोंद घालून तयार केलेल्या पांढर्‍या रंगानं त्यावर चित्र काढणे अशी मूळ परंपरा. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ असे अतिशय मूलभूत आकार वापरणं हे 'वारलीं'च्या साध्या सरळ निसर्गाच्या जवळ जाणार्‍या आयुष्याशी मेळ खातं. त्यातही माणूस दोन सारख्याच त्रिकोणांना जोडून बनवण्यामध्ये नैसर्गिक समतोलाचाही संकेत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. अशी ही वैशिष्ट्यपूर्ण कला जर तशीच चित्रलिपीमाणे वारली वस्त्यांमध्ये ठराविक वेळांवर केली जात राहिली असती, तर कधीच परिघाबाहेर पडली नसती. मग इथेच जिव्या सोमा म्हशे, भास्कर कुलकर्णी आणि यशोधरा दालमियांचं योगदान येतं.
एखाद्या सामान्य वारली मुलाप्रमाणेच त्यांचं आयुष्य होतं. पण त्यांची आई त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी गेली. त्या धक्क्यानं म्हशेंचं बोलणंच बंद झालं. पुढली कित्येक वर्षं ते न बोलता धुळीमध्ये, मातीमध्ये चित्र काढत राहायचे. त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचं एकमेव माध्यम म्हणजे चित्र. त्यांच्या समाजातही त्यांना एक वेगळंच स्थान मिळालं ते ह्यामुळेच. त्याच्या अशा गप्प राहण्यामुळे त्यांची सगळी शक्ती आणि विचार चित्र ह्या एकमेव व्यक्त होण्याच्या माध्यमात एकवटले. त्यांची कल्पकता, प्रतिभा सर्वच अत्यंत उच्च दर्जाचं असल्यामुळे त्यांची 'वारली चित्र' फारच बोलकी असत. स्त्रियांनी चित्रकला करण्याची प्रथा म्हशेंनीच मोडली. असं म्हणतात की १९७५ मध्ये आदिवासी कलांचं संवर्धन करण्यासाठी इंदिरा गांधींनी सुरू केलेल्या मोहिमेवेळी भास्कर कुलकर्णींना म्हशे यांची अन त्यांच्या कलेची ओळख झाली आणि 'वारली चित्र' ह्या कलेची अन त्या माध्यमाच्या ताकदीची ओळख झाली. मग त्यांनी ही कला आधुनिक समाजासमोर आणली. त्यामुळे म्हशेंना कागद आणि कॅनव्हासची ओळख झाली आणि म्हशेंची कला अजून बंधनांमधून मुक्त झाली. नवी माध्यमं अन नवे प्रकार हाताळून म्हशेंनी कलेला नव्या स्तरावर नेलं, ज्यामुळे 'वारली चित्रकला' परिघाबाहेर पडली. यशोधरा दालमियांनी म्हशेंची मदत घेऊन 'पेंटेड वर्ल्ड ऑफ वारलीज' हे पुस्तक लिहून ही कला इंग्रजी भाषेत जगासमोर आणल्यानं एकदम कक्षाच रुंदावल्या. वारली संस्कृती पूर्ण जगभरात पोचली. वारली चित्रकलेचं नशीबच पालटलं.
तिथून मग म्हशेंनी कधी मागे वळून बघितलंच नाही. त्यांनी दिल्लीत कला सादर केली. राष्ट्रपती पुरस्कारही मिळवला. पुढे त्यांचे देशोदेशी अनेक सत्कार झाले. २०१० चं पद्मश्री म्हशेंना देऊन शासनाने उशीराने का होईना ८० वर्षीय मशेंचा सन्मान केला हे ही नसे थोडके. म्हशेंच्या मते वारली संस्कृतीचा गाभा असणारा विचार म्हणजे, "माणसं, पक्षी, प्राणी, दिवस-रात्र सगळंच गतिमान, चलत आहे. थोडक्यात आयुष्य म्हणजे चलन." त्यामुळे वारली चित्रकलेतही नेहमी हेच प्रतिबिंबित होत आलेलं आहे. मुळात वारली चित्रलिपी ही वारली आयुष्याचं प्रतिबिंबच आहे. पण म्हशेंमुळे वारली चित्रकला अनेक घटकांपासून स्वतंत्र झाली. खर्‍या अर्थाने लोकाभिमुख झाली.पण म्हशेंचं खरं योगदान हे आहे की त्यांनी ही वारली परंपरा जगासमोर एक सुटसुटीत आणि आयुष्य प्रतिबिंबित करण्याचं एक माध्यम म्हणून आणली. सामान्य माणसापर्यंतही ती पोचलीय त्याचं कारण हे की एक म्हणजे ती सामान्यांच्या आवाक्यातील आहे कारण मुळात ती निसर्गाच्या आणि मानवी जीवनाच्या जवळ जाणारी आहे आणि ती परिघाबाहेर पडू शकली. पण ही वारली चित्रकला खर्‍या अर्थानं लोकांपर्यंत पोचली असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा केवळ वारलीच नाही तर इतरही संस्कृतींचं प्रकटीकरण करण्यासाठीही वारली चित्रकलेचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणावर होईल.

(नेहमीप्रमाणेच केवळ कुतूहलापोटी गोळा केलेली माहिती एकत्रित लिहिण्याचा प्रयत्न. मला ह्यातला ८०% भाग १० दिवस पूर्वीपर्यंत ठाऊक नव्हता. www.warli.in ह्या संकेतस्थळावर बरीच माहिती उपलब्ध आहे. तसेच वरील सर्व माहिती मी प्रस्तुत चार ठिकाणांवरून मुख्यत्वे गोळा केलेली आहे. १, २, ३ आणि ४.)