1/15/2011

आप्पाच्या लग्नाची गोष्ट -१

नमस्कार सर्वांना अन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रण केलेला असूनही माझ्या लिखाणात सुट्टीच्या निमित्ताने खंड पडला अन त्यामुळे मलाच फार चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. तर अनेकजणांनी बर्‍याच दिवसांत पोस्ट नाही, नवी पोस्ट कधी असं आपुलकीनं विचारल्यामुळे अतिशय सुखावून गेलो. आता मी पुन्हा नव्या जोमाने पूर्वीप्रमाणे नियमित लिखाण करायचा प्रयत्न करेन. सर्व वाचकांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद!

चॅप्टर वन - ट्रेन टू नांदेड
"१९ तारखेला ठेवलंयस लग्न ते बरं केलंस. मला येता येईल." मी
"खरंच येणार आहेस?" आप्पा.
"असं का विचारतोस?" मी.
"नाही. तू मिलानहून येणार, अजूनही ठिकाणी जायचे प्लॅन्स असतील. नांदेडास येऊन-जाऊन दमायला नाही ना होणार?" आप्पा.
"तू म्हणत असशील तर नाही येत." मी
"मी असं बोललो का बे?" आप्पा.
बहुतेक नोव्हेंबरच्या शेवटाकडला एक दिवस होता आणि मी आनंद पत्रे ऊर्फ आप्पाशी उपरोक्त चॅट करत होतो. ह्या चॅटचा उल्लेख करून गोष्टीची सुरूवात करण्याचं कारण गोष्टीच्या शेवटी कळेल.
तर आप्पाचं लग्न १९ डिसेंबरला होतं. लग्नाला कोण कोण येणार ह्याची हवा तब्बल महिनाभर आधीपासून होती अन रोज एक जण कन्फर्म करत होता अन लगेच दोनेक दिवसांत रद्द करत होता. मी जायचं ठरवलंच होतं, फक्त जाण्यायेण्याची सोय काय, ह्या विवंचनेत होतो. मला इतक्या दूर बसनं जायचं-यायचं नव्हतं. पण अर्धवट रिझर्व्हेशनं करण्यात अर्थ नव्हता. कधी बस, कधी प्रायव्हेट गाडी तर कधी ट्रेन असे रोज नवनवे प्लॅन्स बनत होते, अन उधळले जात होते. मला पूर्ण विश्वास होता की शेवटच्या दिवशीपर्यंत कसं जायचं हे ठरणार नाहीये. पण सचिननं (सपा) मी इथून निघण्याच्या दोनेक दिवस आधी जाण्याचं ट्रेनचं सहा जणांचं (मी, सचिन (पाटील), सुहास (झेले), सागर (बाहेगव्हाणकर), योगेश (मुंढे), दीपक (परूळेकर)) रिझर्व्हेशन केलं. पण परतीचा लोचा होता. कारण, सगळ्या बाकी मंडळींना (मी आणि सागर सोडून) दुसर्‍या दिवशीच कामावर हजर राहायचं होतं. त्यामुळे त्यांना रात्रीची गाडी हवी होती, तिचं रिझर्व्हेशन मिळालं नाही. त्यामुळे ते तत्कालमध्ये बघण्याचा निर्णय घेण्यात आला.
यथावकाश मी मुंबईला आलो. थोडी हपिसाची कामे वगैरे उरकण्यात पहिला आठवडा संपत आला. अन तत्कालमध्येही रिझर्व्हेशन न मिळाल्याचा सचिनचा फोन आला. त्यामुळे बाकी सर्वांनी येण्यासाठी बसचं रिझर्व्हेशन करण्याचं ठरवलं होतं. सागर तिथून थेट त्याच्या जवळच असलेल्या घरी जाणार होता, त्यामुळे तो बाद होता. मग राहिलो मी एकटाच. अन मला काय बुद्धी सुचली, मी परतीचा १२ तासांचा ट्रेनचा प्रवास लग्नाच्या दुसर्‍या दिवशी एकट्याने करण्याचा निर्णय घेतला. सागरनं फक्त मला सोबत म्हणून एक रात्र जास्त नांदेडात राहायची तयारी दर्शवली. प्रत्यक्ष जाण्याच्या आदल्या दिवशी भारतही (मुंबईकर) येत असल्याचं मला कळलं.
सागर अन योगेश पुण्याहून रात्री निघून पहाटे मुंबईला पोचणार होते. अन मग सचिन अन ते दोघे सीएसटीहून ट्रेन पकडणार होते. मी, सुहास, भारत अन दीपक दादरहून चढणार होतो. पण ऐन आदल्याच दिवशी काही वैयक्तिक कारणांमुळे योगेशचं येणं रद्द झालं. त्यामुळे सागर एकटा पडला. मग सचिननं पहाटे लवकर सीएसटीला जाऊन सागरला सोबत करण्याचं ठरलं. त्यानुसार सागर रात्री अकराला पुण्याहून निघाला. मग प्रत्यक्ष जाण्याची पहाट उजाडली. मी ट्रेन यायच्या अर्धा तास आधी दादरच्या प्लॅटफॉर्मवर पोचलो. तिथे भारत आणि सुहास भेटले. अन तिथेच दीपकचंही येणं काही कारणाने रद्द झाल्याचं कळलं. मग ट्रेनमध्ये विवक्षित डब्यात चढल्यावर झोपलेला सागर अन सचिनचं दर्शन घडलं. मी सचिन, सुहास अन भारतला पूर्वी भेटलो होतो. पण सागर अन माझी प्रत्यक्ष भेट अशी नव्हतीच. ती होण्यास अजून थोडा अवकाश होता. तूर्तास मुटकुळ करून झोपलेला सागर अन दोन रिझर्व्ह केलेल्या रिकाम्या सीट्स राखत आम्ही गप्पा टाकत बसलो.
थोड्या वेळाने गाडी हळूहळू भरू लागली. आणि सागर उठून बसला. एकदाची भरतभेट झाली! :) मग चौघांमध्ये पाचव्याची भर पडल्यामुळे गप्पांना चांगलाच रंग चढू लागला. गाडीत गर्दी वाढू लागल्यावर आमच्या दोन रिकाम्या सीट्स राखणं अवघड होऊ लागलं. मग एका लहानग्याला घेऊन प्रवास करणार्‍या ताईंना सीट देऊन आम्ही मोकळे झालो. अजून किमान दहा तासाचा प्रवास शिल्लक होता. पण फिकर कुणाला होती. आनंदनं तिकडे राहण्याची सोयही केल्याचं कळवलं होतं. आणि गप्पा टाकायला सोबत मित्र होते. आणि महत्वाचं म्हणजे गप्पांसाठी विषयांची कमतरताच नव्हती. तासांमागून तास उलटू लागले तसतसा हळूहळू सकाळचा उत्साह ओसरू लागला. पण जशी ट्रेन मराठवाड्यात शिरली, तसा सागर थोडा फुलला. हा फिनॉमेनन मी बरेचदा पाहिलाय. सातार्‍याजवळ पोचल्याबरोबर माझ्या बाबांच्या बॉडी लँग्वेजमध्ये पॉझिटिव्ह बदल होतो. तसाच काहीसा बदल गाव जवळ येऊ लागल्यावर सागरमध्ये आला. सागर मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक मतदारसंघातील आजी अन माजी (अन क्वचितप्रसंगी पाजी) आमदारांचे विविध किस्से सांगू लागला. मग त्यातच पोलिस, मुख्यमंत्री वगैरे शब्द ओघानं येतच होते. त्याचं बोलणं ऐकून महाराष्ट्राचे बहुतांश मुख्यमंत्री का ह्या मला अनेक वर्षांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. त्यातच सचिननं विचारलं, "इथे मराठवाड्यात काय पिकतं रे?" सागर बोलायच्या आत मीच म्हणालो, "राजकारण!"
प्रवासाचे उणेपुरे दोनेक तास उरलेले असताना हळूहळू अवसानं आणि गात्रं दोन्ही गळू लागली होती. आनंदचा मधेच फोन येऊन गेला होता, अन त्यानं सांगितलेल्या हॉटेलच्या नावावरून 'निर्मल पॅलेस' सागरनं ते एक उत्तम हॉटेल असल्याचं ताडलं होतं. आणि त्यातच आनंदनं स्टेशनपासून हॉटेलवर घेऊन जायला गाडीचीही सोय असल्याचं सांगून आमचे आ वासले होते. मग कंटाळ्याचा प्रभाव वाढू लागल्यावर मी आपला, "अरे पॅलेसला उतरायचंय, थोडी कळ काढा!" असं म्हणून चीअर-अप करायचा प्रयत्न करत होतो. आमच्या अपेक्षा पाहून सागर आपला, "अरे नावाचं पॅलेस आहे रे. एव्हढंही काही चांगलं नाहीये." असं सांगायचा आपला एक क्षीण प्रयत्न करत होता. गप्पांमध्ये रंग अधूनमधून यायचा, पण एकंदरित कंटाळ्याचे सूर वाढू लागले होते. सचिनच्या स्पेशल 'एग्झॉटिक' बिस्किटांमुळे जी काय ती एनर्जी शिल्लक होती. शेवटी एकदाचं नांदेड आलं. अन सगळ्यांनीच सुटकेचे निःश्वास टाकले.
हुजूर साहेब नांदेड स्टेशनच्या उत्तम बांधलेल्या इमारतीची तारीफ करत आम्ही सगळे निघालो. हॉटेल स्टेशनच्या जवळच असल्याने आम्ही आनंदला फोन करून चालतच जात असल्याचं अन सुखरूप पोचल्याचं कळवलं. अन एकदाचे 'पॅलेस' वर पोचलो. हॉटेल खरोखरच उत्तम होतं. मनातल्या मनात सगळ्यांनी आनंदरावांना अन त्यांच्या मराठवाडी पाहुणचाराला दुवा दिले अन चटचट फ्रेश होऊन जेवण्यासाठी बाहेर पडलो.
सागरचं कॉलेजशिक्षण नांदेडात झालेलं असल्यानं, तो आमचा ऑफिशियल गाईड होता. तो कॉलेजात असताना ज्या घरगुती मेसमध्ये जेवत असे, त्या मेसमध्येच तो आम्हाला घेऊन गेला.
ह्या मेसचे चालक अन मालक 'काका' म्हणजे एक वल्ली. चार जणांच्या टेबलावर आम्ही चौघे बसलो होतो, अन सागर गपचूप दुसर्‍या टेबलावर बसला होता. तेव्हा सुहास सागरला म्हणाला, "ये इथे, ऍडजस्ट करू." सागर खुणेनं नको म्हणेस्तो काकांनी पाहिलं, अन मिश्किल हसून म्हणाले, "शिस्त म्हणजे शिस्त! बस तिथेच." आम्ही सगळे आधी ओशाळवाणे आणि मग खळखळून हसलो. अगदी ताजं, घरगुती जेवण मिळाल्यावर सगळेच पोटभरून जेवले. अन जेवताना काकांची तिथल्या जेवायला येणार्‍या कॉलेजच्या पोरांवरची मायाही पाहिली. मोबाईलवर बोलणार्‍याला "अरे #4&#, ठेव तो मोबाईल, जेवून घे आधी नीट." असं म्हणून धपाटा घालणारे काका घरापासून दूर मिळणं हे त्या मेसच्या पोरांचं भाग्य.
मग जेवणं झाल्यावर काकांचे आभार मानून आमची वरात सागरसोबत "पागल पान भंडार" कडे गेली. तिथे पान घेऊन आम्ही दिवसाच्या खादाडीची इतिश्री केली. मग बर्‍याच दूर असलेल्या हॉटेलपर्यंत चालत चालत जाऊन भरपेट झालेलं जेवण जिरवलं. रस्त्यात पोट भरलेलं असल्यानं गप्पा अन गंमतीजमतींना ऊत आला होता. दिवसभराचा प्रवासाचा शीण हळूहळू अंगावर येत होता. रूमवर पोचल्यावर थोडा वेळ टीव्ही बघत पुन्हा टवाळक्या केल्या अन मग सुहास, भारत आणि सचिन झोपी गेले. मी अन सागर स्टार न्यूजवर लागलेले 'करमणुकीचे' कार्यक्रम पाहत बराच वेळ गप्पा मारत होतो. मग १२.३० च्या आसपास कधीतरी आम्हीही निद्राधीन झालो. सकाळी ७ ला उठून आप्पाच्या लग्नासाठी तयार जे व्हायचं होतं.

क्रमशः

भाग २

भाग ३

22 comments:

 1. Anonymous7:44 PM

  फटके हवेत का बाबा तूला??? क्रमश: काय...

  बाकि आम्ही मराठवाडी लोकं पाहूणचारात कमी पडत नसतो बरं... :)

  ReplyDelete
 2. :) राजकारण पिकतं! अगदी वेदनेची झालर असलेला विनोद हो तुमचा भाऊ! :)
  छान वाटलं सकाळी सकाळी ही पोस्ट वाचायला. हे तुझं क्रमश: आहे ना ते मात्र…!

  ReplyDelete
 3. विभी पुनरागमनाबद्दल अभिनंदन! मला वाटलं तू तुझ्या लग्नाकरता सुट्टीवर आहेस. चला आता पुन्हा तुझ्या पोस्ट्स वाचायला मिळतील!

  ReplyDelete
 4. मीही तुझ्याबरोबर आपाच्या लग्नाला निघाले होते तर मध्येच हा क्रमश: चा ब्रेक... :( टंका पटापट. मोठ्ठी सुट्टी झालीये ना... :D

  ReplyDelete
 5. मस्त रे...येवू दे अजून आता.१७ ला आप येणार आहे त्याच्या आत.यार तू पुर्ण्याचे वडे, आप ला फोनवर खोट बोलन कि तू येत नाहीयेस कस विसरलास रे? घाईत नकोस न लिहू.

  BTW एकदाची भरतभेट झाली! याला सुपर LIKE

  ReplyDelete
 6. तन्वीताई,
  अजून एक क्रमशः बाकी आहे! :P
  बाय द वे.. आम्ही मराठवाडी का? बरंय बॉब्बा!!! :D

  ReplyDelete
 7. अनघाताई,
  खरंच तिथला भकासपणा पाहून हेच मनात आलं माझ्या! :-|

  ReplyDelete
 8. अभिलाष,
  अरे मी आपला महिन्याभराच्या सुट्टीवर होतो, तू कायमचीच छुट्टी करायला निघालास की माझी! :D :P
  धन्यवाद रे भाई!

  ReplyDelete
 9. श्रीताई,
  मोठ्या सुट्टीचा 'हँगओव्हर' आहे, त्यामुळे छोटं छोटं टंकून क्रमशः करावं लागतंय! :)
  होईल तीन दिवसांत सुफळ, संपूर्ण!

  ReplyDelete
 10. स्मित,
  धन्स भाऊ!

  ReplyDelete
 11. सागर,
  अरे आपण आनंदला किती त्रास दिला ते सगळं लिहितोच आहे मी. त्यात ते फोनचं लिहायला विसरून गेलो तेच बरं झालं! :D
  पूर्ण्याच्या वड्यांची मात्र मी जाहीर क्षमा मागतो! :) पुढे काही सुटणार नाही, ह्याची काळजी घेईन रे!

  ReplyDelete
 12. वाह सही भाई..येऊ देत पुढचा भाग :)

  ReplyDelete
 13. अनेक महिने झाले मित्रांबरोबर असा प्रवास केलेला नाही... तिकडे असतो तर नक्की सामील झालो असतो... :D
  पुढचा भाग वाचतो.. बहुदा त्यात निषेध करायला वाव असेल... ;)

  ReplyDelete
 14. अरेरे मी ही सगळी मजा मिस केली... :( :(

  ReplyDelete
 15. सुहासा,
  :)

  ReplyDelete
 16. रोहना,
  करू एकदा असाही प्रवास..कुणाचंतरी शुभमंगल असेलच :D

  ReplyDelete
 17. योगेश,
  फुडल्या येळी नक्की!! :)

  ReplyDelete
 18. यावे यावे...तुमच्या लिखाणाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो...
  आनंद च्या लग्नात बरीच धमाल केलेली दिसतेय...येउ दे येउ दे..वाट बघींग...:)

  ReplyDelete
 19. >>चॅप्टर वन - ट्रेन टू नांदेड<<

  आप्पा, लकी यु.... बाबा चक्क टेरेंटीनोलाच घेऊन आला लग्नाला !! ;)

  ReplyDelete
 20. माऊताई,
  :)

  ReplyDelete
 21. हेरंब,
  अरे सिनेमा-कॅनव्हास ओस पडलाय ना...त्याची भरपाई! :D

  ReplyDelete