1/16/2011

आप्पाच्या लग्नाची गोष्ट -२

भाग १ पासून पुढे

चॅप्टर टू - सम गाईज कॅन हँडल नांदेड

सकाळची वेळ होती. ७ च्या आसपास डोळे उघडले. अपेक्षेएव्हढी नसली तरी छान गुलाबी थंडी पडलेली होती. एखाद्या दुसर्‍या दिवशी, पहिल्या जागेला मी चादर पुन्हा डोक्यावर ओढून झोपलो असतो, पण त्यादिवशी निराळ्या गोष्टीचा उत्साह होता. खरं म्हणजे मी आदल्या दिवशी रात्रीची एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरलो. आदल्या रात्री आम्हांला बॅचलर्स पार्टी करायची होती. आनंदला बोलावून :) ! एकदम 'द हँगओव्हर' स्टाईलमध्ये. पण आनंद त्या रात्री सापडणार नाही हे आधी लक्षात आलं अन 'हँगओव्हर' स्टाईलमध्ये केल्यास दुसर्‍या दिवशी पहाटे सापडणार नाही हे नंतर लक्षात आलं. मग आदल्या रात्रीच न सापडणं जास्त सेफ आहे, ह्यावर शिक्कामोर्तब करून आनंदऐवजी सचिनची (ज्याचे फेब्रुवारीत दोनाचे चार होणार आहेत) बॅचलर्स पार्टी करण्याचं ठरलं. पण सचिन जेवण उरकल्या उरकल्या मोबाईल बॅलन्स रिचार्ज मारून जो मोबाईलला चिकटला तो थेट रात्री झोपेस्तो (झोपेतही त्याचा हात मोबाईलवरून न हटल्याचं काही खात्रीलायक सूत्रांकडून समजलेलं आहे.). अशा पद्धतीनं आमच्या 'हँगओव्हर' च्या आशा धुळीत मिळाल्या :P. तर अशा एकंदर इव्हेंटफुल किंवा अनइव्हेंटफुल रात्रीनंतर आलेला दिवस खात्रीलायकरित्या इव्हेंटफुल करण्याची जवाबदारी आमच्या भक्कम खांद्यांवर येऊन पडलेली होती.
सचिननं जरी बॅचलर्स पार्टीला टांग दिलेली होती, तरी त्यानं सकाळी बाहेर पडून टूथपेस्ट, तेल आणि वर्तमानपत्र अशा आवश्यक गोष्टी (ज्या सगळेजण सोयीस्कररित्या विसरलेले होते) आणल्या अन थोडी कसर भरून काढली.
आनंदरावांनी मराठवाडी पाहुणचाराच्या सगळ्या सीमा गेल्या रात्री हे सांगून ओलांडल्या होत्या की सकाळी लग्नस्थळी घेऊन जायला एक गाडी येईल (शहरात थांबलेल्या सगळ्या पाहुण्यांना थोडं शहराबाहेर असलेल्या लग्नस्थळी घेऊन जायला ही सोय होती). आम्ही आपले तयार झालो अन सागर आमची वरात एका प्रसिद्ध डोसेवाल्याकडे घेऊन गेला. एकाच वेळी दहाच्या आसपास डोसे घालणारा मुख्य आचारी ही ह्यांची खासियत. बटर ओनियन, बटर मसाला वगैरे वगैरे नावं असलेले डोसे अन त्यांचा वातावरणात भरून राहिलेला सुगंध अन त्याला जोड लागलेल्या भुकेची. मग सगळे स्थानापन्न झालो अन सागरच्या रेकमेंडेशनवर ऑर्डरी सुटल्या. सुहासनं काही फोटोज काढले, पण भुकेपुढे फोटो फिके पडले. यथेच्छ पोटपूजा झाल्यावर आम्ही गाडीसाठी फोन केला अन परत हॉटेलवर आलो, अन चहाच्या ऑर्डरी देऊन लाऊंजमध्ये पेपर वाचत बसलो.
'पत्रे विवाह सोहळा' असं लिहिलेली गाडी आली, ज्यामध्ये आनंदचे बहुतेक हैदराबादेचे मित्रही होते. अन आनंदची वरात काढायला आमची वरात निघाली. थोड्याच वेळात विवाहस्थळी आम्ही पोचलो, तर नवरामुलगा हनुमानाच्या देवळात जाण्यासाठी म्हणून दरवाजाशीच येऊन उभा होता. चांगला सूट-बूट घालून अन दोन्ही हात भरून मेहंदी काढून! आम्ही जाऊन त्याला मिठ्या मारल्या अन त्याची खेचायला तिथेच सुरूवात केली :) बिचारा आधीच लग्नाच्या टेन्शननं गांगरलेला होता, त्यात आम्ही अन त्याचे इतरही मित्र त्याची यथेच्छ खेचत होते. मग तिथेच त्याच्या मेहंदीचं अन त्याचं आमच्यासोबत फोटोसेशन चटकन उरकलं अन त्याची वरात काढायची तयारी सुरू झाली. वरात म्हणजे अर्धा किलोमीटरवर असलेल्या हनुमानाच्या देवळापर्यंत अन परत. वरातीसाठी घोडं नव्हतं, तर गाडी होती. मी कारण विचारलं असता, बँडवाल्यांना "तेनु घोडी किन्ने चढाया, भूतनीके" हे गाणं वाजवावयास सांगता येऊ नये ह्यासाठीची ही तजवीज असल्याचं मला सांगण्यात आलं. मग बाकायदा बँडसकट वरात निघाली, अन वरातीमागून गाडी ज्यात नवरामुलगा होता.
मी आजवर कधी गणपती विसर्जनातही नाचलो नव्हतो, पण त्यादिवशी आनंदच्या विसर्जनासाठी नाचायचंच असं ठरवून स्वतःही नाचलो अन सचिन, सुहास, भारत आणि सागरलाही नाचवलं. अर्थात सचिनला नाचवणं थोडं अवघड गेलं, पण जमलं शेवटी :D देवळात काय काय विधी करायचे हे सचिननं नीट पाहून घेतलं अन ते नीट पाहताना आम्ही सचिनला पाहून घेतलं. मग वरात परतताना पुन्हा सगळ्यांच्या नृत्यकौशल्याला बहर आला. सरतेशेवटी तर गाडीतून उतरवून नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचवलं गेलं, अन मग खाली उतरवून पुन्हा नाचवलं गेलं. नवरदेवाचा उत्साह चांगलाच ओसंडून वाहू लागला होता.
मग आम्ही सर्व लग्नमंडपात पोचलो. आणि तो प्रचंड मोठा माणसांनी भरून वाहणारा हॉल पाहून आम्हा शहरी लोकांची छातीच दडपली. सागर म्हणाला गावाकडे लग्नात असंच असतं. सगळी सजावट अन स्टेजवर नवरानवरीनं जाण्यासाठी बनवलेला स्पेशल कमानी रस्ता वगैरे पाहून मस्त वाटत होतं. आनंद येऊन कमानी रस्त्याच्या सुरूवातीला उभा राहिला. ऑर्केस्ट्रावाले गाणी गात होते. त्यावेळेस चालू होतं, "रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना!" पण आनंदराव यायला आय मीन जायला तयारच नव्हते. पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली. मी आपला, 'वाळू अन बन नाहीये ना, म्हणून जात नसेल तो" असले माफक विनोद करून पाहिले. पण माणसांच्या अशक्य कोलाहलात अन ऑर्केस्ट्राच्या आवाजात माझे विनोद हवेतच विरून गेले. मग लक्षात आलं, की नवरा-नवरी दोघे एकत्रच स्टेजवर जाणार आहेत, म्हणून आज्ञाधारक वर वाळू अन बनाला भुलत नव्हता. एकदाची वधू आली, अन मग दोघे जोड्यानं स्टेजकडे गेले अन जोडे काढून बसले. मग विधी सुरू झाले. आनंदनं आधीच सांगितलं होतं, की मेजर विधी आदल्या दिवशीच झालेले आहेत अन आज जास्त नाही, तद्वत अर्ध्या तासातच विधी झाले अन मंगलाष्टकं सुरू झाली. आम्ही बरेच मागे होतो अन सचिन मात्र थोडा पुढे गेला होता. त्यामुळे आम्ही आनंदच्या अक्षता थोड्याफार सचिनवरही टाकून त्याच्या लग्नाला जाता न येण्याची कसर थोडी भरून काढली.
लग्न लागलं अन इथे आम्हाला भुका लागल्या. पण आधीच आनंदला भेटून घेण्यात शहाणपणा होता. त्यामुळे गर्दीतून वाट काढत आम्ही स्टेजजवळ पोचलो, पण सचिन गायब. मग त्याला फोन करून स्टेजजवळ बोलावलं तोवर जिन्यांवरती बायकांचा घोळका. मग सरळ समोरच्या बाजूनंच स्टेजवर चढलो अन वाट काढत आनंदच्या जवळ जाऊन पोचलो. स्टेजवर बरीच माणसं होती, त्यामुळे आनंद काय बोलतोय ते ऐकूच येत नव्हतं. वहिनींशी आनंदने ऐकू न येणारी ओळख करून दिली, नमस्कार केले आणि फोटो काढले. पण ह्या कोलाहलामुळे मला जो पीजे मारायचा होता तो मारता आला नाही. ती हौस इथे भागवून घेतो. आम्ही ठरवून गेलेलो की स्टेजवर त्याला आलं द्यायचं. पण आलं घ्यायला विसरलो, त्यामुळे मी तिथे त्याला म्हणणार होतो की "तेव्हढं आलं राहिलं बघ!". मग त्यानं विचारलं असतं "काय?" मग मी म्हटलं असतं, की "तू लग्नाच्या निमंत्रणात लिहिलं होतंस ना, की लग्नाला आलंच पाहिजे म्हणून!" :D
मग चटाचट जेवून अन लग्नाचा (खरा) लाडू खाऊन (व्हर्च्युअल लाडू आनंदनं खाल्ला होता) आम्ही निघालो. सागर आमची वरात नांदेडच्या प्रसिद्ध हुजूरसाहेब गुरूद्वाराला घेऊन गेला. अतिशय सुंदर संगमरवरी बांधकाम अन इतकी स्वच्छता अन शांतता पाहून शीण कमी झाला. शीख समाज गुरुद्वारेच्या अन एकंदरितच त्यांच्या धर्माच्या बाबतीत फार कट्टर आहे, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पण धर्मासाठी अन धर्मबांधवांसाठी ते काय काय करतात (इतरधर्मीयांना त्रास न देता) ह्यांतलं बरंच काही शिकण्यासारखंदेखील आहे. सागर एखादा ऑफिशियल गाईड असावा तशागत त्या जागेचा इतिहास, भूगोल अथक सांगत होता. तिथून बाहेर पडल्यावर थोडी कडी अन हातरूमालांची खरेदी होईस्तो सचिनचं बालपण जागृत झालं अन तो कुल्फीवाल्याकडे पोचला. मग आमचंही सर्वांचं बालपण जागृत झालं. त्यानंतर तिथून रिक्षा करून सगळे गपगुमान हॉटेलावर पोचलो. रिक्षापण भारी होती. आम्ही सगळे (सागर सोडून) हट्टेकट्टे नौजवान, तरी आदल्या दिवशीपासून एकाच रिक्षात पाचजण फिरत होतो. आदल्या रात्री एकजण पुढे बसला त्यामुळे ठीक होतं, पण लग्नाच्या दिवशी शाळेच्या पोरांसारखे पाचजण मागच्या बाजूला बसलो होतो. सीटवर तिघे अन छोट्याशा लाकडी फळीवर मी अन सागर. पण त्यातही गंमतच होती.
सचिन, सुहास अन भारत संध्याकाळीच बसने निघणार होते, पण मी दुसर्‍या दिवशी सकाळच्या ट्रेनने एकटाच जाणार होतो. मग मला सोबत द्यायला म्हणून सागर थांबणार होता, नाहीतर तो घरी जाणार होता त्याच्या गावी. मराठवाडी पाहुणचाराचं हे अजून एक उदाहरण. मीही स्वार्थीपणा करून घेतला, कारण तेव्हढ्याच अजून गप्पा झाल्या असत्या आणि ह्यानंतर पुन्हा इतकं निवांत भेटणं सहा महिने तरी शक्य नव्हतंच.
दुपारी हॉटेलावर पोचल्यावर आम्ही सगळ्यांनी झोप काढायचं ठरवलं. झोपा झाल्यावर सागर त्याच्या मित्रांना भेटायला गेला अन तिघेजण तयार झाले. आम्ही दुपारसाठी गरमगरम बोर्नव्हिटा मागवले. आणि ते पिऊन ताजेतवाने होऊन सगळेजण बाहेर पडलो. आनंदचं लग्न नक्की झालंय ना अशी शंका यावी इतक्या वेळा तो बिचारा आमच्याशी फोनवर बोलत होता. आमचं सगळं व्यवस्थित होतंय ना ह्या काळजीनं तो अस्वस्थ होत होता. मंडळी निघाली तेव्हाही हॉटेलच्या रिसेप्शनवर थोडा गैरसमज झाल्यावर आम्ही त्यालाच फोन करून त्रास दिला. पण हा सदैव तत्परच होता. बसस्टॉपवर पोचलो तर बस निघायला थोडा वेळ शिल्लक होता. मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मंडळी स्लीपर बसमध्ये स्थानापन्न झाली. बस निघाली अन आम्ही आनंदला सगळं व्यवस्थित पार पडल्याचं कळवलं. व्हॉटेव्हर हॅपन्स इन नांदेड स्टेज इन नांदेड! इथे क्रेडिट्स रोल करता येतील. सिनेमा संपला.
पण क्रेडिट्सबरोबरसुद्धा बरेचदा काही स्टोरी पुढे गेलेली दाखवतात. तस्मात माझी स्टोरी अजून शिल्लक आहे. ती उद्याच्या भागात!

क्रमशः

भाग ३

20 comments:

 1. बॅचलर्स पार्टी.. हँगओव्हर.. ओनियन, बटर मसाला वगैरे वगैरे... >> म्हणालो ना इथे निषेध करायला बराच वाव असणार... :D
  लग्नाला 'आलंच' पाहिजे म्हणून... हा हा हा ... कैच्याकै भारी!!!

  आणि तू शेवटी काय झोल केलास रे??? लवकर टाक... मी उडायच्या आधी.. :D

  ReplyDelete
 2. विभि...हे काय..क्रमशः काय चालु आहे?? एकाच वेळी लिहुन टाक की...

  ReplyDelete
 3. वाह वाह....अरे आपण इतक्या सुंदर बातम्या बघितल्या त्या राहिल्या की ;-)
  "सणसणी"त होत्या त्या...हा हा हा

  ReplyDelete
 4. ओ भाऊ, तुम्हांला जे तुमचं नृत्यकौशल्य तिथे सापडलं..ते तुमचे फोटो बझवर पाहून आम्हांला कळलं! ;)

  ReplyDelete
 5. Anonymous11:33 PM

  बाबा तुझ्याकडून आणि सुहासकडून प्रत्यक्ष रिपोर्ट ऐकला असला तरी वाचताना जाम मजा येतीये.... तो आलं वाला पीजे पांचट असला तरी आवडला :) तुमचे नाचणारे आणि आकाचे मेंदीवाले फोटू आठवले :)

  डोश्यांचे फोटो मी सोईस्कर विसरलेय ;)... पुढच्या क्रमश: मधे तुझा परतीचा तपोवन प्रवास आहे ना....हेहे... मला आत्ताच मनमाड स्टेशन दिसतेय डोळ्यासमोर... :)(रहस्यभेद.. ;) )

  पोस्टीतला वाक्यं आणि शब्दछल वाचून वाटतेय तूला म्हणावे... छळवादी कोणिकडचा :)

  ReplyDelete
 6. एकदम सविस्तर वृत्तांत :-) मित्र परतफेड करतीलच :-)

  ReplyDelete
 7. फोटो पाहिले होतेच.. पण आता वाचायला मजा आली. :) होपफुली ही कॉमेंट पब्लिश होईल. तुझ्या आणि हेरंबच्या ब्लॉग वर कॉमेंट टाकायला गेलो की नेहेमीच वांदे होतात. वर्डप्रेस वर सुरु करा रे ब्लॉग तुम्ही.. :)

  ReplyDelete
 8. सुहास म्हणतोय त्या सुंदर बातम्या कश्या बरे विसरलास तू विद्याधर, ;) आनंदच्या लग्नाला येता आले नाही ती कसर तू मस्त भरून काढलीस. वृत्तांत सहीच! सकाळी सकाळी ते डोशांचे फोटू आठवून भूक लागली. :) उद्या क्रमश: नको रे टाकूस...

  ReplyDelete
 9. आई शपथ....कसली धमाल उड्वली रे तुम्ही लोकांनी..विभी तुझा ' आलं' पीजे भन्नाट...कैच्याकै एकदम...बाकी वृतांत मस्त लिहीला आहेस...

  ReplyDelete
 10. >> आनंदच्या विसर्जनासाठी नाचायचंच असं ठरवून स्वतःही नाचलो <<

  हेहेहेहे.. लोल... आनंदच्या आनंदाचं विसर्जन केलंत यार तुम्ही ;).. पण आता काळजी नाही.. आता आनंदी-आनंद आहे :)

  ReplyDelete
 11. हेहेहे रोहन,
  तरी मी फोटो टाकत नाही ब्लॉगवर म्हणून.. नाहीतर रात्रीच्या जेवणावर तर तू नक्कीच निषेध नोंदवला असतास! :P
  आणि काही विशेष झोल नाही रे... टाकतोच आहे आज! :)

  ReplyDelete
 12. अरे पुनरागमन आहे...हौले हौले!! :D

  ReplyDelete
 13. हेहेहे सुहास,
  असं "सणसणी"त टायटल होतं स्टार न्यूजवर की कधी जन्मात विसरायचो नाही!
  :P

  ReplyDelete
 14. अनघाताई,
  माझं नृत्यकौशल्य तसं वादातीत होतं :D पण ते कधी शाळेच्या स्नेहसंमेलनापलिकडे अन कॉलेजच्या जॅमसेशनच्या पलिकडे गेलं नव्हतं! ;)
  आनंदरावांमुळे ते पब्लिक डिस्प्ले वर आलं!

  ReplyDelete
 15. तन्वीताई,
  अगं वृत्तांत सांगणं लई सोपं आहे.... पण लिहायला जाम वेळ लागतोय आणि फार विचार करावा लागतोय :-|
  आणि त्या तपोवनचं तर बोलूच नकोस काही!! आज शेवटचा भाग लिहिताना तो काळ परत जगायचाय! :)

  ReplyDelete
 16. सविताताई,
  :)
  परतफेडीची वाट पाहतोय मी! :D

  ReplyDelete
 17. महेंद्रकाका,
  काय समस्या आहे कळत नाही... इथे ओपनआयडीची सोय आहे की.. तरी काय लोचा कळत नाही..!!

  ReplyDelete
 18. श्रीताई,
  अगं "सनसनी" पाहत होतो आम्ही! :D "चैन से सोना है तो जाग जाओ!"
  डोशांचे फोटोसुद्धा आहेत :P सुहासच्या पिकासावर बहुतेक!!
  उद्या शेवट... जास्त ताणवत नाहीये :)

  ReplyDelete
 19. माऊताई,
  अगं खरंच ते तीन दिवस मस्त गेले एकदम...चेंज मस्त होता!
  बाकी माझा पीजे अगदीच वाया नाही गेला म्हणायचा :D

  ReplyDelete
 20. हेरंब,
  अरे आनंदचं विसर्जन केलं आम्ही अन तो नवरा म्हणून पाण्यातून बाहेर पडला :D
  आता आनंदी-आनंद झाला हे बरीक खरं!

  ReplyDelete