11/18/2010

आवर रे-२

(स्थळ - कॉलेजचं कॅंटीन.)

बभ्रुवाहन प्रचंड टेन्शनमध्ये जर्नल वाचत होता. टेबलावर जर्नलशेजारीच कटिंगचा ग्लास होता. आणि दृष्टद्युम्न खांद्याला बॅग लटकवलेल्या अवतारात कँटीनच्या प्रवेशद्वारातून अवतीर्ण झाला.

"बब्या!!!" दृष्टद्युम्नाचा आवाज कँटीन फारसं भरलेलं नसल्यानं घुमला, पण एका कोपर्‍यात गलका करणार्‍या टग्या ग्रुपने मात्र वळून पाहिलंच आणि त्या ग्रुपबरोबर बसलेल्या सुंदर मुलीनंही बब्या कोण, हे वळून पाहिल्यानं बब्या जास्तच ओशाळला.

"काय रे डी! आयुष्यात पहिल्यांदाच मला पाहिल्यासारखा काय बोंबलतोस?" बब्या डोळ्यांच्या कोपर्‍यातून, अजून ती आपल्याकडे बघतेय का हे चेक करत म्हणाला.

"च्चच्च.. पहिल्यांदा कसा रे? दुसर्‍यांदा किंवा बर्‍याच गॅपने बघितल्यासारखा म्हण. पहिल्यांदाच पाहिला असता तुला, तर तुझं नाव घेऊन बोंबललो असतो का रे?" डी नेहमीप्रमाणेच भावशून्य चेहर्‍याने म्हणाला आणि बॅग टेबलावर ठेवत बसला. बब्या त्याच्याकडे असूया, संताप, हेवा आणि अन्य अनेक मिश्र भावनांनी पाहत होता.

"काय वाचतोयस?" डी बब्याचं जर्नल ओढत म्हणाला.

"तू आत्ता जी व्हायव्हा देऊन आलायस तेच वाचतोय!" बब्या ते त्याच्या हातून हिसकून घेत म्हणाला.

"ते मलाही ठाऊक आहे, मी नक्की कुठला पार्ट वाचतोयस ते विचारत होतो!" डी कटिंगचा ग्लास उचलून घेऊन निरखून पाहत शांतपणे म्हणाला.

"तुमच्या बॅचची संपली का? आणि आमची ठरलेल्या वेळीच सुरू होणार आहे की उशीर लागणार आहे? फटाफट देतोय सर सह्या की पीडतोय?" बब्या डीच्या विक्षिप्त चाळ्यांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या टेन्शनला वाट करून देत होता.

"मला सांग, हा ग्लास अर्धा रिकामा आहे की..." डीला वाक्यही पूर्ण करू न देता बब्या ओरडला, "ही फिलॉसॉफीची वेळ नाहीये डी!" आणि टग्या ग्रुप आणि त्यातल्या सुंदर मुलीसकट सगळ्यांनी बब्याकडे पाहिलं. बब्या ओशाळला.

डीनं एकदा बब्याकडे नेहमीच्याच शांत नजरेनं पाहिलं आणि ग्लास खाली ठेवला. "मी विचारत होतो, की हा चहा तू अर्धा प्यायला आहेस की कटिंगच मागवला होतास! ग्लासच्या ओघळांवरून कटिंग दिसतोय, मला पिता आला असता म्हणून विचारलं."

बब्या अजून ओशाळला. "अबे, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतोयस का?" बब्यानं थोडं वैतागून विचारलं.

"हं विचार!" डी बॅगेतून ताजं वर्तमानपत्र काढत म्हणाला.

बब्यानं पुन्हा एकदा दुर्लक्ष करत आपले प्रश्न विचारायला सुरूवात केली. "आमच्या बॅचची किती वाजता सुरू होणार?"

"होईल नेहमीच्या वेळीच बहुतेक." डी अगदी वर्तमानपत्रात हरवूनही गेला.

बब्याला डीच्या ह्या रूपाची सवय होतीच, त्यामुळे तो ही रेटत राहिला, "मग काय विचारलं सरांनी?"

"आँग सान सू ची पुढे काय करणार?" डी.

"काय?" बब्या पुन्हा ओरडला. पुन्हा टग्या ग्रुप आणि सुंदर मुलीनं पाहिलं, पण त्यात ह्यावेळेस गल्ल्यावरच्या तंबीनं आणि टेबल पुसणार्‍या छोटूनंही पाहिलं त्यामुळे बब्याचं ओशाळणं चौपट होतं. "तो पेपर बाजूला ठेव ना बे! मी तुला प्रश्न काय विचारतोय, तू उत्तरं काय देतोयस?"

"अरे पण भावा, हाच प्रश्न विचारला मला सरांनी!" डी पेपराची घडी घालून ठेवत म्हणाला.

"काय?" बब्यानं ह्यावेळेस नियंत्रणात आश्चर्य व्यक्त केलं. "सरांनी आँग सान सू ची बद्दल विचारलं?"

"वेल. तुला असं वाटतं का?" डीनं बब्याच्या चेहर्‍यावरचे अवर्णनीय भाव निरखत एक क्षणाचा पॉज घेतला आणि पुढे म्हणाला, "काय आहे ना, आपल्याला सांगितल्या गेलेल्या बर्‍याचशा गोष्टींवर विश्वास ठेवायची सवय असते."

"अरे पण मी कुठे विश्वास ठेवला."

"मी जर ए. राजासारखी काहीतरी थाप विणून सांगितली असती तर तू विश्वास ठेवला असतास?" डी बब्याकडे रोखून पाहत म्हणाला.

"आवरा!"

"काही उत्तर नसलं की आवरा.." डी शांतपणे म्हणाला.

बब्याला नवीन वादाचा वास येऊ लागला. "तू काय रेडबुल मारून आलायस का?" बब्या वातावरणातला ताण हलका करायचा प्रयत्न करत म्हणाला.

"व्यसनं वाईट आणि निर्व्यसनी असणं चांगलं, हे लहानपणापासून ठसवलं जातं ना आपल्या मनावर." डीची मुद्रा विचारमग्न वाटत होती. बब्या थोडा सावध झाला. डी गंभीर असला की ज्वालामुखीसदृश स्थिती असते.

"डी तुझ्यासाठी पण एक चहा मागवू का रे?" बब्या म्हणाला आणि वळला, "छोटू, एक कटिंग रे!"

"बापाचं चहाचं व्यसन चांगलं, पण पोराचं सिगरेटचं व्यसन वाईट. अमुक एक गोष्ट चांगली, तमुक एक गोष्ट वाईट. चांगलं-वाईट नावाचा प्रकार असतो काय नक्की?" डीचा आवाज थोडा चढला होता. आपण काहीही बोललो तरी निखार्‍याला हवा घालणं होईल, हे समजून बब्या शांत बसला.

"सांग ना मला तू, चांगलं आणि वाईट म्हणजे नक्की काय? तुझ्यासाठी मांस खाणं वाईट आहे, ते सातासमुद्रापारच्या माणसासाठी पवित्र आहे, अफू घेतल्यानं पण किक लागते आणि ध्यानधारणा केल्यानं पण जवळपास तोच अनुभव येतो तर मग नक्की चांगलं काय आणि वाईट काय?" डीनं बब्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. बोलणं भाग होतं.

"अरे जे केल्यानं आपल्याला समाधान मिळतं, ते चांगलं आणि जे केल्यानं वाईट वाटतं ते वाईट" बब्या ह्या वाक्यात बर्‍याच कमकुवत जागा असल्याचं जाणून होता.

"पण मला समाधान का मिळतं, कारण मला लहानपणापासून हेच सांगितलं जातं, की हे चांगलं आहे, ध्यानधारणा केल्यानं पुण्य मिळतं, आणि अफू घेणं वाईट आहे, त्यानं पाप लागतं. आपल्या मनावर आपण ज्या समाजात राहतो, त्याचे नियम बिंबवले जातात. आणि तेच नियम आपल्यासाठी चांगल्या-वाईटाचे निर्णय घेत असतात. माणूस कधीच निर्णय घेत नाही, समाज आणि त्याच्यावरचे संस्कार घेतात, थेट किंवा आडून. आपल्या चांगल्या वाईटाच्या व्याख्या कुठला ना कुठला समाज ठरवत असतो." डी आज भलताच सिरियस झाला होता.

बब्याला बोलण्याची उबळ आली (आणि एका शर्टाच्या दुकानावर लिहिलेली पाटी आठवली, "बोलना सरल है, मौन कठीन है"), "अरे पण आपण म्हणतो, की जेव्हा मी माझ्या अंतरात्म्याचं ऐकून निर्णय घेतलाय आणि तो योग्यच आहे."

"हो. जेव्हा आपण असे काही निर्णय घेतो तेव्हा ते योग्य किंवा अयोग्य म्हणून नाही तर कुठल्यातरी आंतरिक ऊर्मीनं किंवा कधीतरी नकळत घडलेल्या कुठल्यातरी संस्कारानं असेल, पण तो योग्य किंवा अयोग्य म्हणून घेत नसतो आपण. बस आपण एक निवड करत असतो. मग स्वतःला बळ देण्यासाठी, त्याला 'योग्य' 'असण्याची' लेबलं लावतो."

"अरे पण तो निर्णय आपल्याला योग्यच वाटत असतो ना."

"एग्झॅक्टली. योग्य 'वाटतो', योग्य 'असतो' नाही. तू कधी ऑब्झर्व्ह केलंयस? आपल्याला सगळं वाटतं. आनंद वाटतो, वाईट वाटतं. ह्या आपल्या जन्मापासून घडत गेलेल्या आंतरिक व्याख्या असतात, प्रोग्रॅमिंग म्हण, ज्यामुळे आपली प्रत्येक सिच्युएशनला रिऍक्ट होण्याची एक पद्धत बनते. थोडक्यात रेफरन्स पॉईंट्स बनतात. संस्कार, आपण राहतो तो समाज ह्या सगळ्यानी घडवलेले रेफरन्स पॉईंट्स. मग आपण प्रत्येक गोष्ट क्लासिफाय करत राहतो. हे चांगलं, हे वाईट, हे सुंदर, हे कुरूप. पण प्रत्यक्षात काही असतं का? काहीच नाही. प्रत्यक्षात ह्या गोष्टी फक्त असतात, त्यांचं वर्गीकरण आपण आपल्या सोयीसाठी करतो. तू एक गोष्ट करतोस, मी एक गोष्ट करतो, पण आपण त्या गोष्टीचं मूल्यमापन करत बसतो. फक्त एक गोष्ट केली, एव्हढं ढोबळ वर्णन आपण करूच शकत नाही."

"अरे पण तुला म्हणायचं काय आहे?"

"मला हे म्हणायचंय, की ह्या जगात हत्ती, मुंग्या, कोल्ह्या, माशा, डास ह्यांच्या अतित्वाला जो अर्थ आहे, तोच अर्थ माणसाच्या जीवनाला आहे." डीनं नेहमीप्रमाणे बॉम्बगोळा टाकला आणि शेजारी थिजून उभा असलेल्या छोटूच्या हातून कटिंगचा ग्लास घेतला.

"अरे पण आपल्याला मेंदू आहे, आपण प्रगत आहोत." बब्याला ठाऊक होतं, ह्याही वाक्याचं पानिपत होणार, पण त्याला आज मजा येत होती. कधी नव्हे तो डी वाहावत चालला होता.

"प्रगत? हा शब्द कुणाचा? आपला! आपल्यासाठी प्रगती. आपण ठरवलं की ही प्रगती. टेलिफोन, तारा, विमानं, रेल्वे, इंटरनेट, कॉम्प्युटर ही प्रगतीची व्याख्या. सगळंच पर्सेप्शन आहे. मानण्यावर. मी मानतो की माझ्याकडे कॉम्प्युटर आला आणि मी हजार मैलांवर कुणाशीतरी बोललो म्हणजे मी प्रगती केली. काय मिळालं प्रगती करून? काय उखडलं मानवानं?"

"अरे प्रगतीतूनच तर माणसं सुखी झाली."

"सुखी झाली? मग सहस्रकांपूर्वी शोधलेल्या ध्यानधारणेकडे कशासाठी वळताहेत प्रगत माणसं?"

"ते काहीजणांचं 'पर्सेप्शन' आहे समाधान आणि शांतता मिळवण्यासाठीचं!" बब्या 'पर्सेप्शन' शब्दावर जोर देत म्हणाला.

"बरं. असो पर्सेप्शन. झाले लोक सुखी तुमच्या 'प्रगती'नं. मग पुढे? काय फरक पडला? तुम्ही जर प्रगती केलीच नसती. म्हणजे तुम्ही अश्मयुगातच असतात, तर काय फरक पडला असता. मनुष्य तेव्हाही सुखीच असेल की!"

"हो पण आम्ही विविध औषधांचा शोध लावला. ज्यामुळे मानवजात कित्येक एपिडेमिक्सपासून वाचली. पेनिसिलिनचा शोध लावला!"

"ओह्ह...आणि पेनिसिलिनचा शोध लावणारा काय आकाशातून पडला? त्याच्या आधी मानवजात टिकली नाही? आणि ही एपिडेमिक्स कुणाच्या कर्मानं वाढली? आणि बाय द वे, लगेच 'आम्ही' आणि 'तुम्ही'? मी काय एलियन आहे का?"

"अरे पण मग तुला म्हणायचं काय आहे?" बब्या थोडा वैतागला.

"मला एव्हढंच म्हणायचंय की आपण आणि इतर सजीव, ह्यांची जगाच्या लेखी किंमत एकच आहे. आपण सगळे जगाच्या चक्राचा एक भाग आहोत. आपल्याला वाटतं की आपण वरचढ वगैरे आहोत. ह्यात तथ्य दिसत नाही. अगदी बेसिक लेव्हलवर विचार कर. त्रयस्थपणे पृथ्वीच्या बाहेरचा तू कुणी जीव आहेस असा विचार कर. मानवाची जागा काय आहे बघ. नीट पाहिलं तर जाणवेल की आपण जास्तीत जास्त जगाच्या चक्राचा वेग थोडा कमी जास्त करू शकतो, ते ही आपल्यासाठी पण ते चक्र थांबवणं किंवा सुरू ठेवणं आपल्या हातात नाही. जग जसं चालायचंय तसंच चालतंय. आपण स्वतःच स्वतःसाठी चौकटी आखून घेतल्या आहेत आणि निष्कारण स्वतःच्या काही समजूती करून घेतल्या आहेत..."

"एक मिनिट, एक मिनिट डी.." बब्या त्याला तोडत म्हणाला, "आता हे खूप आवरा होतंय."

"ओके. टू कट द लॉन्ग स्टोरी शॉर्ट. आपला आनंद आणि आपलं दुःख हे सगळं आपण बनवलेलं असतं. जगात आनंद, दुःख अशी गोष्ट अस्तित्वातच नाही. आपण स्वतःच स्वतःच्या गरजा बनवतो आणि मग पूर्ण नाही होत म्हणून दुःख करतो किंवा पूर्ण झाल्या म्हणून आनंद. आपली मूलभूत गरज फक्त अन्न हीच होती, पण आपल्या अट्टाहासामुळे आपण स्वतःच्या विविध गरजा बनवल्या आणि उत्क्रांती होत होत आपण आपल्या मूलभूत गरजा अगदी इंटरनेटपर्यंत आणल्यात. त्यामुळे डोन्ट क्राय फॉर एनिथिंग. इट्स ऑल युअर पसेप्शन." डी बोलत होता.

"यू नॉ व्हॉट डी." बब्या अनकॅरॅक्टरिस्टिक शांतपणे म्हणाला. "गौतम बुद्ध वर्षानुवर्ष बोधीवृक्षाखाली बसले आणि त्यांना साक्षात्कार झाला की इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे."

"मग?" डी पुन्हा शांत होता.

"आणि आपल्याला चौथीच्या पुस्तकात हे लिहून दिलं होतं की इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे."

"ह्म्म" डीला कळत होतं गाडी कुठे निघालीय ते.

"पण एव्हढं मोठं सत्य आपल्याला इतक्या सहज मिळूनही काही फरक पडला का? आपण अजूनही इच्छा करतच राहतो. तस्मात् तू आत्ता मला इतकं ज्ञानामृत फुकटात पाजलंयस तरी मी तुला चहा पाजला हे माझं पर्सेप्शन मी बदलणार नाही. तू बोलत असलेलं सगळं मला पटतं आणि इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे हे ही पटतं, पण सॉरी, मी ते आचरणात आणू शकत नाही. मला असंच 'सामान्य' माणसासारखं समाजात राहायचंय आणि जमलं तर 'माणसांसाठी' काहीतरी असामान्य करून दाखवायचंय. जगाच्या चक्रात कुठलीही भर न घालता अवतार संपवायचाय."

"बाय द वे. तुझ्या जर्नल चेकिंगची वेळ होत आली असेल. बेस्ट ऑफ लक." डी नेहमीच्या निर्विकार मुद्रेनं म्हणाला.

बब्यानं आश्चर्यानं घड्याळात पाहिलं. "साल्या, माझी एकदा रिव्हिजन झाली असती इतक्या वेळात. दळण दळत होतास ते!"

"कालपासून तू १५ वेळा रिव्हाईज केलं असशील. वाचलेलं मुरायलाही वेळ दिला पाहिजे ना. नेमका तोच तू देत नाहीस आणि परीक्षेत फाफलतोस."

"म्हणून तू हे सगळं..." बब्या अविश्वासानं डीकडे पाहत होता.

"काल रात्री अभ्यास करताना तुझ्या बाबांचं एक पुस्तक टीपॉयवर पडलं होतं. त्यात हे सगळं होतं. कुठलंही वाचन वाया जात नाही म्हणतात, ते सत्य आहे." डी मिश्किल हसत म्हणाला.

बब्या दप्तर आवरून लॅबकडे पळत सुटला.

35 comments:

 1. सहीच. मज्जा आली वाचताना. आणखी लिही ‘आवर रे’ चे भाग.

  ReplyDelete
 2. एक गोष्ट सांगायची राहिली. मी अजूनही हसतोय.

  ReplyDelete
 3. Very clever writting. Mast jamalay..
  AWaraaaaaaaaaaa..

  ReplyDelete
 4. "आपल्या अट्टाहासामुळे आपण स्वतःच्या विविध गरजा बनवल्या आणि उत्क्रांती होत होत आपण आपल्या मूलभूत गरजा अगदी इंटरनेटपर्यंत आणल्यात. त्यामुळे डोन्ट क्राय फॉर एनिथिंग. इट्स ऑल युअर पसेप्शन." डी म्हणाला.

  "ऍन्ड धिस इज योर पर्सेप्शन." बब्या म्हणाला.
  "ऍन्ड धिस इज योर पर्सेप्शन." डी म्हणाला.
  "ऍन्ड धिस इज योर पर्सेप्शन." बब्या म्हणाला.
  "ऍन्ड धिस इज योर पर्सेप्शन." डी म्हणाला.
  "ऍन्ड धिस इज योर पर्सेप्शन." बब्या म्हणाला.

  आवरा रे! कामं करा आपापली दोघांनीही! गोदो येईलच एवढ्यात..

  ReplyDelete
 5. हा हा हा... मस्त रे विभी!

  ReplyDelete
 6. अरे व्वाह!!! छानच आहे... अनावरणिय/अवर्णनिय साक्षात्कार झाला!!! खरंच छान घुसळण आहे... आवडली.

  ReplyDelete
 7. अप्रतिम लिहलय ...
  आवडले लेखन

  ReplyDelete
 8. काहीच छान नसते.. सुंदर नसते.. आवडलेले असते, कारण "धिस इज योर पर्सेप्शन"..
  (आवरा...)

  ReplyDelete
 9. Existentialism again?

  ReplyDelete
 10. मस्तच भाई !!

  ReplyDelete
 11. मला बरेचदा वाटतं...'एरीअल व्हू'तून कधी जग बघितलं तर सगळे कसे अगदी किडामुंगी...फुकटचे हेवेदावे...नसते रुसवेफुगवे! असंच काहीसं म्हणायचंय ना तुला??

  ReplyDelete
 12. संकेत,
  धन्यवाद रे... जमेल तेव्हा करेन पुन्हा प्रयत्न! :)

  ReplyDelete
 13. महेंद्रकाका,
  खूप आभार...

  ReplyDelete
 14. ओंकार,
  एक छानसं वाक्य आहे...
  There is no truth, Perception is the only truth.
  विचार करून बघ! :D:P

  ReplyDelete
 15. अभिलाष,
  धन्यवाद भाऊ! :)

  ReplyDelete
 16. सौरभ,
  अरे घुसळणीनं जीव जायची वेळ आली होती... कसंतरी आवरलं मग! ;)

  ReplyDelete
 17. हाहाहा.. बाबा झक्कास..

  ReplyDelete
 18. बायनरी बंड्या,
  बहुतेक तुमची पहिलीच प्रतिक्रिया...ब्लॉगवर स्वागत..
  प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद...भेट देत राहा...

  ReplyDelete
 19. मयूर,
  आवरा नाही...डी तेच सांगतोय केव्हाचा :P

  ReplyDelete
 20. सविताताई,
  एग्झिस्टेन्शियलिझम आणि निहिलिझमच्या मधेच कुठेतरी आमचं गाडं अडकतं नेहमी...
  कायम अपूर्णच... :)

  ReplyDelete
 21. सुहास,
  धन्यवाद भाऊ!! :)

  ReplyDelete
 22. अनघा,
  ऍक्च्युअली मला काय नक्की म्हणायचंय ते कळेना.... पण एक मुद्दा तुम्ही म्हणता तोही आहे..बाकी सगळं धुकंच धुकं आहे!!! :-S

  ReplyDelete
 23. हेरंबा,
  धन्यवाद रे भावा!!!

  ReplyDelete
 24. छान आहे.. एकदम सहीच लिहिलंय.. (अर्थात हे माझं perception):) :D

  ReplyDelete
 25. अपूर्व,
  Perception is the only truth. :D
  धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 26. प्रतिक्रिया कोण देतोय, मी म्हणजे माझे मन की माझा आत्मा की अजून कोणी? मला लेख आवडला म्हणजे नक्की काय झाले? मला हा लेख आवडण्याचे कारण काय? जर मी वेगळ्या वातावरणात जगलो असतो तर मला हा लेख आवडला असता का? जर आपली मूलभूत गरज एकच आहे तर आपण ब्लॉग पाडण्याचे कारण काय? प्रतिक्रिया देण्याचे कारण काय? डी पेपर का वाचतो? तो चहा पितो त्याचे कारण फ़क्त "भूक" इतके सोपे आहे काय?
  मी आवरा प्रतिकिया लिहीतोय काय? तुला वाटलेली आवरा प्रतिक्रिया सर्वांनाच तशी वाटेल काय? हे परसेप्शन आहे काय? आहे तर इतके जीवघेणे कसे काय?जीवघेणे आहे तर कोणासाठी? तुझ्यासाठी की सर्वांसाठीच? जीवघेणे असणेसुद्धा एक परसेप्शनच आहे काय? मी आता थांबावे काय? मी थांबेन म्हणजे नक्की काय होईल? मी आता थांबतोय त्याचे कारण काय? मी थांबल्याच्या घटनेला कोणत्या दृष्टीकोणातून बघावे?जर बघावे तर त्या बघण्यालाच परसेप्शन म्हणावे काय? परसेप्शन पण एक परसेप्शनच नाही काय?प्रत्येक व्यक्तीच्या परसेप्शनच्या कल्पना वेगळ्या नाहीत काय? वेगळ्या आहेत तर किती वेगळ्या?
  ठीक, मी आता थांबतो.(हादेखील एक परसेप्शनच आहे)

  ReplyDelete
 27. ही हा हा!!! ही हा हा!!

  ReplyDelete
 28. संकेतानंद,
  जवळपास इतक्याच मोठ्या मानसिक आंदोलनांमधून कित्येकदा गेल्यानंतरच मी ही पोस्ट लिहिली. तरीदेखील स्पष्टपणा नाहीच. कदाचित तो तसा नसण्यातच खरा अर्थ आहे. ;)
  धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 29. यशवंत,
  तू का हसतो आहेस ते ठाऊक आहे मला :D

  ReplyDelete
 30. Anonymous7:25 PM

  बाबा भारीच...
  खरच काय उखाडल रे मानवाने... :)
  स्वामींची प्रतिक्रियाही खुप बोलकी आहे... ;)

  ReplyDelete
 31. सुपर्ब... हसता हसता कितीतरी विचार रेंगाळले.. अतिशय जबरी..
  कैच्याकै भारी.............

  ReplyDelete
 32. देवेंद्रा,
  खूप उशीरा उत्तर देतोय रे.. सॉरी...
  कधी कधी एकदम असंच वाटतं रे...आपण, आपलं अस्तित्व, सगळंच मूर्खपणा आहे म्हणून ;)
  स्वामी तर भारीच :)

  ReplyDelete
 33. आनंद,
  मी ही चर्चा थोडी मित्राशी आणि थोडी स्वतःशी करत होतो तेव्हा मलाही जाम हसायला येत होतं मधेच ;)

  ReplyDelete
 34. अरे मस्त लिहिले आहेस... मुळात मिस्कीलपणा सोडला तर एखाद्या विषयावर २ माणसांची 'वैचारिक साखळी' जोडून अशी सहज पोस्ट तयार करणे सोपे नाही... आवडले.. :)

  ReplyDelete
 35. रोहन,
  अरे ही दोन माणसांची कल्पना एका मित्राच्या ब्लॉगवरून उचलली आहे... अपिलींग वाटतं जास्त... आणि स्वगताचंही रूपांतर संवादात करता येतं...हवं तसं ;)
  धन्स रे!

  ReplyDelete