आज सहजच विचार आला. सिनेमाचा इफेक्ट जबरदस्त असतो. पण सिनेमातली गाणी? हा प्रकार फक्त आपल्या भारतीय सिनेमांमध्ये पहायला मिळतो. ते आपलं महत्वाचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. गाणी कधीकधी नुसतीच श्राव्य असतात, तर कधीकधी त्यांचं पिक्चरायझेशनही जोरदार असतं. कधीकधी ती सिनेमात अगदी दुधातल्या साखरेप्रमाणे विरघळून जातात, तर कधी ती जेवणात खडा दाताखाली यावा तशी त्रास देतात. तर कधी फक्त गाण्यांचं पिक्चरायझेशनच पूर्ण सिनेमात विरंगुळा देतं. नुसती श्राव्य गाणी किंवा गाण्यांचा दर्जा वगैरे माझा प्रांत नाही. माझ्या..माझ्याच काय प्रत्येकाच्याच संगीतात वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. पण आजवर पाहिलेल्या वेगवेगळ्या काळातल्या सिनेमातली वेगवेगळी अनेक गाणी आहेत, जी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पिक्चरायझेशनमुळे माझ्या मनावर छाप सोडून गेलीत. आत्ता त्याबद्दल लिहावंसं वाटलं म्हणून लिहितोय.
(मी ज्या क्रमाने लिहितोय, त्या क्रमाला काहीही अर्थ नाहीय. जशी आठवतायत तशीच लिहितोय.)
१. हम आपकी आखों में इस दिल को जगह दे तो (प्यासा) - गुरुदत्त आणि माला सिन्हावर चित्रित झालेलं हे गाणं, हिंदी सिनेमातलं पहिलं ड्रीम सिक्वेन्स म्हणून ओळखलं जातं. हे गाणं अतिशय मधुर आहे, पण मला हे सिनेमा पाहताना दाताखाली खडा आल्यासारखं वाटलं (ह्याबाबत माझा बहुतेकांशी मतभेद आहे). सिनेमा मस्त आपल्या लयीत चाललेला असतो आणि एकदम गुरुदत्त आणि माला सिन्हा ड्रीमसिक्वेन्ससाठी नाचायला लागतात. बाकी गाण्याचं चित्रिकरण मस्त झालंय, पण सिनेमात गाण्याचा मोह केव्हा टाळावा ह्यासाठीचं एक क्लासिक एग्झांपल म्हणूनच ते माझ्या लक्षात राहिल.
सिनेमा पाहून झाल्यावर कालांतराने कुठेतरी वाचताना कळलं, की गुरुदत्तने शूटिंग झाल्यावर गाणं सिनेमातून काढायचा निर्णय घेतला होता. पण डीस्ट्रीब्युटर्सच्या दबावाखाली ते गाणं त्याला ठेवावं लागलं. पण डीस्ट्रीब्युटर्सचा दबाव योग्यच ठरला, कारण ते गाणं फारच हिट झालं आणि सिनेमा सुपरहिट ठरला. पण मी आजही विचार करतो, ते गाणं काढलं असतं, तर 'प्यासा' तेव्हढाच मोठा हिट ठरला असता का?
२. जिन्हें नाज है हिंद पर वो कहां हैं (पुन्हा प्यासा {पुन्हा प्यासा हे सिक्वेलचं नाव नसून ते, हे देखील प्यासातलंच आहे, ह्या अर्थी आहे})- हे गाणं नुसत्या बोलांसाठीच नाही, तर त्याच्या पिक्चरायझेशनसाठी माझ्या ऑलटाईम फेव्हरेट्स लिस्ट मध्ये आहे. उध्वस्त विजय आपल्या मित्रांच्या नादाने वेश्यावस्तीत आलाय. पण ते वातावरण, ते एक्सप्लॉयटेशन तो सहन करू शकत नाही. तो स्वतःच्या नैतिक अधःपतनामुळे दुखावलाय. समाजाच्या एकंदरितच अधःपतनाचं दुःख तो ह्या गाण्यातून व्यक्त करतो. आणि ह्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे विजयचं त्या मोहल्ल्यात फिरणं त्या त्या क्षणाचं वर्णन करणार्या बोलांबरोबर समोर दिसतं. काही क्षण अगदीच सरधोपट चित्रित झालेत, पण अनेक बोल, बरोबरच्या दृश्यांमुळेच जास्त अर्थपूर्ण वाटतात आणि अंगावर येतात. काय आणि कुठले ते सांगत नाही बसत (मेलडी खाओ खुद जान जाओ).
३.नायक नहीं खलनायक हूं मैं (खलनायक) - सुभाष घईचा तेव्हाचा मॅग्नम ओपस. ठीकठाक म्हणता येईल अश्या सिनेमातलं हे गाणं, ऐकायला मस्त वाटतं. पर्सनली हे गाणं मला खूप आवडतं. पण सिनेमाच्या शेवटाजवळ जेव्हा संजय दत्त विचित्र सूट घालून ह्या गाण्यावर नाचतो, ते दृश्यही माझ्या मनात ठसलंय. ह्या गाण्याचा जो कोणी कोरियोग्राफर आहे त्याचे मला पाय धरावसे वाटतात. संजय दत्तला जे हावभाव करायला सांगितलेत, ते पाहून हसून हसून पुरेवाट होते. तो खलनायक न वाटता जोकर वाटतो. इथे संजय दत्त वेड्यासारखा नाचत असतो(अंगविक्षेप करत असतो), तिथे रम्या (हे अजून एक कारण गाणं लक्षात राहण्याचं) काहीतरी वेगळेच नृत्यप्रकार करून डोळ्यांचं पारणं फेडत असते, टकलू व्हिलन उगाच रहस्यमय चेहरे आणि गूढ हास्य करत हातात दारूचा ग्लास घेऊन फिरत असतो, जॅकी श्रॉफ राखीला हातावरच्या घड्याळात ट्रान्स्मिटर लावून पाठवतो आणि ते घड्याळ व्हिलन काढून टाकतात, आणि इथे पार्टीत व्हिलनच्या हेडक्वार्टर्समध्ये सगळे एक्स्ट्रॉज कोरस देत देत नाचत असतात. एव्हढा मूर्खपणा एकाच गाण्यात एकाचवेळी बघायला मिळण्याची अशी संधी विरळाच.
४. ७० च्या दशकातलं हिरोनं पियानोवर बसून म्हटलेलं प्रत्येक गाणं - प्रत्येक गाण्याचा इफेक्ट मला सेम यायचा. बहुधा थीम एकच असायची. हिरॉईनचं दुसर्या कुणाशी लग्न ठरलंय. ह्या केसमध्ये दोन पॉसिबिलीटीज असायच्या - अ. हिरॉईनला मजबुरीमध्ये (ही बापाचा आग्रह पासून मरणासन्न दादीमा पर्यंत काहीही असू शकते) करावं लागतंय किंवा ब - हिरोला काही कारणंस्तव हिरॉईनशी बेवफाई करावी लागतेय (ह्याचीही कारणं जवळपास तीच, पण ऍडीशनल महत्वाचं कारण त्याला त्याच्या बापाच्या खुन्याचं रहस्य सांगणार्यानं ही प्रीकंडीशन घातलीय). असो, तर अश्या वेळी तो आपलं दुःख पियानोवर बसून सांगतो. आणि ९९% वेळा तो सूट घालूनच असतो(मला आजवर कधीही साधे कपडे घालून पियानो वाजवतानाचं कॅरॅक्टर सिनेमात दिसलेलं नाही; कदाचित पियानो वाजवायचा सूट हा युनिफॉर्म असल्याचा दिग्दर्शकांचा समज असावा)कारणं थोडी इकडे तिकडे होतील, पण पियानोचा प्रत्येक सीन माझ्या मनःपटलावर कोरला गेलाय. पियानोचा आवाज मी ऐकला की हिरो सूट घालून कुठल्या पोझिशनमध्ये बसलाय हे माझ्या डोळ्यांसमोर येतं, त्याचे कुठल्या पीसला केस कसे उडतात, कुठल्या पीसला तो डोळे मिटतो आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात, अगदी जिवंत चित्र उभं राहतं. माझं सगळ्यांत आवडतं - दिल के झरोखे में तुझको बिठाकर, यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर, रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरी जां उदास!
५. यादों की बारात (यादों की बारात) - मागे ह्या सिनेमावर आणि ह्यासारख्या अनेक सिनेमांवर पोस्ट लिहिली होती. ह्यात हे गाणं बरेचदा बरेच जण गातात. पण भावांच्या मिलनाच्या वेळचं दृश्य माझ्या डोक्यात बसलंय. ठरल्याप्रमाणे दुसरा भाऊ गाणं पूर्ण करतो. जाऊन भावाला मिठी मारतो. धाकट्या भावाची लहानपणापासूनची केअरटेकर आया (हे कॅरॅक्टर बॅड मेकपची क्लासिक केस आहे. ती बाई नुसती केस पांढरे केल्यासारखी वाटते, म्हातारी बिलकुल वाटत नाही) अश्रू पुसते. धर्मेंद्र भावांना ओळखतो, पण सगळ्यांसमोर दाखवू शकत नाही, म्हणून चुपचाप अश्रू गाळतो. पॉवरफुल सीन (!).
६. जां जब तक है जान, जाने जहां मैं नाचूंगी (शोले) - हे गाणं माझ्याच काय अलम हिंदुस्थानाच्या मनःपटलावर कोरलं गेलं, ते त्या गाण्याआधी येणार्या, "बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना!" ह्या धर्मेंद्रच्या डायलॉगमुळे (पुढे कुत्रा हा धर्मेंद्रचा ट्रेडमार्क बनला तो कायमचा, एव्हढा की आजही धर्मेंद्र म्हटलं, की त्याच्या उत्तम अभिनयाचे सिनेमे न आठवता 'कुत्ते-कमिने मैं तेरा खून पी जाऊंगा' हेच आठवतं, त्याच्या ह्या ट्रेडमार्कचा वारसा सनीनेही घायलमध्ये "बलवंतराय के कुत्तों" म्हणून चालवला). बिचारा धर्मेंद्र डायलॉग मारतो, पण बसंतीला कुत्तों के सामने नाचावच लागतं, तेही काचांच्या तुकड्यांवर. आज ह्या सीनवर राजू श्रीवास्तव पासून जॉनी रावत पर्यंत सगळ्यांनी स्पूफ बनवलेत, पण तो बालिश वाटणारा सॉन्गसीनसुद्धा शोलेमध्ये फक्त जबरदस्त पटकथेचा भाग असल्यामुळे अजरामर झाला. कदाचित तो बालिश आहे, म्हणूनच माझ्या वेगळा लक्षात राहिला असेल.
७. यम्मा यम्मा (शान) - हे गाणं एका अतिशय महत्त्वाकांक्षी पण तेव्हढ्याच बालिश सिनेमातलं, तेव्हढंच बालिश गाणं, म्हणून लक्षात राहतं. च्यायला, तो शाकाल काय वेडा असतो का, हे लोक गाणी गात नाचत त्याला बनवायला निघालेले असतात. आणि तो शाकाल पण हुशार असतो, तो अख्खं गाणं एन्जॉय करतो आणि मग त्यांना पकडतो. शोलेसारखा अप्रतिम सिनेमा दिल्यावर रमेश सिप्पीला काय अवदसा सुचली आणि त्याने हा सिनेमा काढला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण अगदी हास्यास्पद अश्या चित्रीकरणामुळे आणि सिनेमातल्या तेव्हढ्याच हास्यास्पद प्लॉटींगमुळे हे गाणं चांगलंच लक्षात राहतं.
८. तहलका सिनेमातलं गाणं - बोल लक्षात नाहीत माझ्या आत्ता - तहलका सिनेमा म्हटला म्हणजे, पहिलं आठवतं, ते "पुट ऑन द घुंगरू ऑन माय फीट ऍंड वॉच माय डीराम्मा" म्हणणारा धर्मेंद्र आणि दुसरं आठवतं ते "शॉम शॉम शॉम शामो शा शा" म्हणणारा चिनी भुवया केलेला डॉन्ग अमरीश पुरी. पण ह्यातलं हे गाणं स्टॅंडआऊट आहे, ज्याचे बोल मला आठवत नाहीत. आता हे गाणं मला का एव्हढं लक्षात, तर असं.
'व्हेअर इगल्स डेअर' असा एक क्लिंट इस्टवूडचा सिनेमा आहे. त्यात नाझी कॅम्पमध्ये शिरायसाठी दोघेजण एक युक्ती लढवतात. नाझी युनिफॉर्म्सचा जुगाड करतात आणि कॉन्फिडन्टली जर्मन बोलत बोलत गेटमधून आत प्रवेश करतात. त्यामुळे त्यांना कुणीही आयकार्ड, बॅज विचारत नाहीत. पण तहलकात नसीरूद्दीन शाह आणि धर्मेंद्र नाचत गात शत्रूच्या कॅंम्पमध्ये प्रवेशतात. हे साम्य मी लोकसत्तातल्या परीक्षणात वाचलं, मग मी व्हेअर इगल्स डेअरमधला तो सीन पाहिला, त्यानंतर जेव्हा मी तहलका पाहिला, तेव्हापासून तो सीन कायमचा लक्षात राहिलाय. धन्य तो अनिल शर्मा (तहलकाचा डायरेक्टर, होय तोच गदरवाला)
९. जुम्मा चुम्मा दे दे (हम) - हे गाणं स्ट्रिक्टली कुठल्यातरी हॉलिवूड फिल्मवरून कॉपी केलेलं बियरचे फेसाळलेले ग्लास पिणारे गोदीकामगारांचं दृश्य आणि किमी काटकर ह्यामुळे लक्षात राहतं. ते गोदीकामगार आणि ते बियरचे फेसाळलेले ग्लास ही क्लियरली कुठल्यातरी हॉलिवूड सिनेमाची कॉपी दिसते. पण त्यातल्या डान्स स्टेप्स, अमिताभचा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स, किमी काटकरचा ग्लॅमर कोशन्ट आणि सुदेश भोसलेंचा थेट अमिताभचा वाटेल असा आवाज हे एक डेडली कॉम्बिनेशन होतं.
१०. सिंग इज किंग (सिंग इज किंग) - मध्यंतरानंतर अतिशय असंबद्धपणे उगवणारं गाणं. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अश्या रितीनं हे गाणं अचानक स्क्रीनवर सुरू होतं. आपल्याला क्षणभर काहीच कळत नाही. एकदम झगमग लाईट्स सिनेमातली सगळी पात्र एकामागोमग एक येऊन सिग्नेचर स्टेप करून जातात. बाहुली कटरिना आणि अनावृत बाहुली नेहा धुपिया काही न कळणार्या स्टेप्स करतात. आपण अजून विचार करतोय की सिनेमा संपला की काय (हुश्श). पण मग अक्षय कुमार येतो. (माझ्या पुढच्या वक्तव्यावरून भांडणं उद्भवू शकतात) माझ्या मते अमिताभ बच्चननंतर जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स सध्या फक्त अक्षय कुमारचा आहे(संपलं वक्तव्य). हे गाणं सिनेमात का आहे, हे मला अजून कळलं नाहीये. ते शेवटचा व्हिडीयो म्हणून असायला हवं होतं (त्याने सिनेमाच्या ओव्हरऑल क्वालिटीत काहीही फरक पडला नसता हा भाग अलाहिदा).
असो, माझं दृकश्राव्य परिणाम पुराण संपलं आणि मिथुनदाचं एकही गाणं कसं नाही हा विचार तुमच्या मनात येत असेल तर थांबा. अश्या अशक्य गोष्टींचा विचार करू नका. मिथुनदाच्या गाण्यांना मी कुठल्याही नंबरांत कसा ठेवू शकतो. त्याची अनेकानेक गाणी आहेत. अगदी 'आय ऍम अ डिस्को डान्सर' पासून ते "आपही आपही ...(वीर)" पर्यंत. पण त्याच्या आवडत्या गाण्यांसाठी सेपरेट पोस्ट लिहावी लागेल. म्हणून सर्वांत जास्त परिणाम सोडणारं गाणंच सांगतो. "हम ये लुंगी उठाती तुमको डिस्को दिखाती" (अग्निपथ). एकदम हार्डकोअर दाक्षिणात्य वाटणारा आणि लुंगी हाताळण्यापासून बोलण्यापर्यंत अगदी हुबेहूब वाटणारा मिथुनला पाहून, सुंदर दिसणारी नीलम इम्प्रेस होते हे पाहून लहानश्या माझ्यातला(मी तेव्हा लहान होतो) मिथुनभक्त सुखावला होता. क्रिष्नन अय्यर येम.ये. हे पात्रच अविस्मरणीय होतं, पण हे गाणं आणि तो डान्स माझ्या मनावर कोरला गेलाय.
हा हा सहीच निरिक्षण...
ReplyDelete"कदाचित पियानो वाजवायचा सूट हा युनिफॉर्म असल्याचा दिग्दर्शकांचा समज असावा"
१००% टक्के सहमत.
अनिल शर्मा खरंच धन्य आहे.
मला पाहायला आवडतं गाणं म्हणजे 'जीत' मधील 'यारा ओ यारा' सनी देओलची पाय आदळी भुमी हलवी नॄत्य खास बघण्याजोगे...
आणि धर्मेंद्रचे 'मै जट यमला पगला दिवाना'.. ह्यात त्याचा कल्ट क्लासिक नाच, डोक्यावर बाटली घेतलेला.... ;-)
आनंद...
ReplyDeleteहोय..तो सनी देओल डान्स, मैं जट यमला पगला सुद्धा डेडली आहेत. ह्या दहा गाण्यांव्यतिरिक्त सुद्धा बरीच गाणी आहेत. पण ही पहिली दहा आहेत.
अरे काल अजून एक रिसेन्ट सिनेमा पाहिला. पुन्हा पियानोवर बसलेला हिरो सूटमध्ये...
हा हा .. झक्कास. पुन्हा प्यासास चा कंस आवडला :)
ReplyDeleteश्राव्य परिणाम साधणारी गाणी अनेक आहेत. पण दृक परिणाम साधणारी गाणी आठवताना मला प्रामुख्याने दोन गाणी आठवतात.
१. कैसी है ये ऋत (DCH) : हे श्राव्य म्हणून पण उत्तम गाणं आहे अर्थात.
२. दिल डूबा (खाकी) : हे गाणं बघायला मला प्रचंड आवडतं. कारण एकदम वेगळ्याच कोनातून आणि वेगळ्याच मितीतून गाणं शूट केल्यासारखं वाटतं. खूप छान आहे.
कंसाची प्रेरणा तुमच्याकडूनच मिळते स्वामी हेरंब ;)
ReplyDeleteकैसी है ये ऋत हे खरंच वेगळ्यात विश्वात शूट केलेलं गाणं आहे आपल्याला त्या मुलाच्या विश्वाची सफर घडवतं. आणि दिल डूबा तर एकदम वेगळे रंग आणि कोन लावलेलं मस्त गाणं आहे, ड्रीम सिक्वेन्सेस मधलं वन ऑफ द बेस्ट खरंच. आणि पुन्हा अक्षय कुमार आहेच त्यात.
प्रतिक्रियेसाठी आभार.
मला ऋषीकपुरच्या हम किसिसे कम नही मधली सगळी गाणी खूप आवडायची. तसेच यादोंकीबारात माझा विक पॉईंट होता.
ReplyDeleteआंखे मधली गाणी पण आवडायची.
हम किसीसे कम नही मधलं जुगलबंदीचं गाणं जबरदस्त आहे. अगदी दृकश्राव्य.
ReplyDeleteप्रतिक्रियेसाठी आभार काका!
jabardast zaliye hi post... Aflatoon...!!! sahi nirikshan aahe...!!!
ReplyDelete:) धन्यवाद मैथिली!
ReplyDelete