12/16/2010

नामर्द -१

स्मृती वारंवार अभयच्या चेहर्‍याकडे वळून पाहत होती. रिक्षा मधेच गचके खात होती, पण अभयची लागलेली तंद्री भंग होत नव्हती. स्मृतीला अभयची खूप काळजी वाटत होती. त्याला काय वाटत असेल? त्यानं किती मनाला लावून घेतलं असेल? ह्याचा अदमास घ्यायचा ती प्रयत्न करत होती. डॉक्टरांकडून निघाल्या क्षणापासून अभय तिच्याशी एक शब्द बोलला नव्हता. तो गप्पच होता अजून. घरी गेल्यावर बोलू ह्या विचारानं स्मृती सारखी स्वतःला समजावत होती.

"अभय अरे बोल ना रे काहीतरी!" स्मृतीला शांतता सहन होत नव्हती. पण अभय घरी आल्यापासून सोफ्यावर एकटक कुठेतरी नजर लावून बसला होता.

"अभय..." तिनं त्याचा खांदा हलवला.

"हं.." अभय भानावर आला, "काय झालं गं?"

"अरे मला काय विचारतोयस? असा गप्प नकोस रे बसू!" तिच्या नजरेत काळजी होती.

"हं.." अभयनं एक सुस्कारा सोडला.

"अरे डॉक्टर म्हणालेत ना आपण इन व्हिट्रो करू किंवा दुसरा काहीतरी इलाज होईलच ना रे! वंध्यत्वावर हल्ली खूप उपाय आहेत."

"हं..ते ही आहेच म्हणा!" अभय थोडासा सावरत म्हणाला. "पण थोडंसं वाईट वाटलं गं!" तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि एकदम त्याच्या चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं स्मित आलं.

"काय झालं रे?" तिनं आनंदून विचारलं.

"आपण मारे तीन वर्षं फॅमिली प्लॅनिंग करत होतो. आणि मॅच आधीपासूनच फिक्स्ड होती!" तो तिला डोळा मारत म्हणाला. मग दोघेही खळखळून हसले. तिच्या मनावरचं एक ओझं कमी झालं.

"आपण लवकरात लवकर पुढचा इलाज सुरू करू." ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.

"आणि नाहीच जमलं तर मूल दत्तक घेऊ, चालेल तुला?" त्याच्या ह्या उद्गारांनी एकदम चकित होऊन तिनं त्याच्याकडे पाहिलं.

"ऐसे ना मुझे तुम देखो...सीने से लगा लूंगा"

"धत्, उठा आता जेवायला चला!"

----------

"हो आई येऊ ना आम्ही नक्की! अच्छा!" स्मृतीनं फोन ठेवला.

"काय गं? बिनधास्त आपलं येऊ की आम्ही. सुट्टी कोण देणार आहे मला?"

"दोन दिवसही नाही देणार का रे तुला सुट्टी! आई एव्हढ्या आग्रहानं बोलावताहेत. गुरूवारी निघू आणि रविवारी परत येऊ."

"आवरा. तुझं प्लॅनिंग पूर्ण झाल्यावर तू मला सांगतेयस! अगं विचारत जा ना आधी. बिनधास्त कमिट करून टाकते."

"हे बरं आहे. आई तुझी, आग्रह तिचा आणि बोल तू मला लावतोयस."

"बरं बरं. लगेच ट्रॅक नको बदलूस."

"मी ट्रॅक बदलला नाहीये. तूच मला उगाच बोलतोयस."

"तू ट्रॅक बदलला नाहीस? नातेवाईकांवर पोचली नाहीस?"

"माफ कर रे बाबा मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत." ती त्रासून म्हणाली.

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तो मिश्किल हसत म्हणाला. "काहीतरी झोलझाल करून सुट्टी मिळवेन मी!"

----------

अभय डोळे चोळत उठला. एकदम अंधार पडला होता.

'च्यायला दुपारी तासभरासाठी म्हणून झोपलो, तर आता संध्याकाळ होत आलीय.' तो आळस देत स्वतःशीच बोलत होता. "ह्या गावच्या मस्त हवेल झोपही मस्त लागते. पण हिनं उठवायचं नाही का मला!'

"स्मृती.." तिला हाक मारतच तो खोलीबाहेर आला. "स्मृती???"

"अरे ती आईसोबत कुठेतरी गेलीय बाहेर!" त्याची वहिनी म्हणाली.

"बरं बरं..पण इतक्या संध्याकाळी म्हणजे कमालच झाली!"

अभ्यास करत बसलेल्या पुतणीच्या टपलीत मारून तो बाहेर व्हरांड्यात जाऊन बसला.

"नाष्टा बनवून ठेवलाय रे. ये खायला, चहा टाकते मी. हे पण येतील एव्हढ्यातच." वहिनी म्हणाली.

"नको वहिनी, ही आली की मग जेवेनच सरळ."

"काय रे जोरू का गुलाम!"

एव्हढ्यात त्याला आई आणि स्मृती येताना दिसल्या. स्मृती एकदम थकून गेल्यासारखी वाटत होती.

"काय गं आई? कुठे घेऊन गेली होतीस हिला?" तो तिचा हात पकडत म्हणाला. तिचं अंग तापलं होतं.

"अरे कुठे नाही... देवळात" आई म्हणाली. पण त्या दोघींची झालेली नजरानजर त्याच्या नजरेतून सुटली नाही.

"तुला ताप भरलाय स्मृती!" चल आत आधी आणि तो तिला घेऊन आत गेला.

"परवा परत जायचंय आपल्याला आणि ताप कसला गं घेऊन आलीस?" तिच्या डोक्यावर तो पट्ट्या ठेवत होता.

"असंच रे..दमणूक झाली." ती त्याच्या नजरेला नजर न देता म्हणाली. त्याला काहीतरी विचित्र वाटलं.

----------

दोन महिने उलटले होते अभय आणि स्मृतीला गावाहून येऊन. अभयचा इलाज चालू होता. पण कदाचित इन व्हिट्रो - आयसीएसआय करावं लागणार होतं. अजून महिन्याभरात काही ना काहीतरी मार्ग निघेलच असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. स्मृती खुष होती कारण अभयनं सगळंच खूप सहज स्वीकारलं होतं.

आणि एक दिवस स्मृती अभयला परत म्हणाली.

"अभय, आईंनी बोलावलंय रे!"

त्यानं तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. "गेल्या वेळेस काय केलं होतंस तिथे लक्षात आहे ना? इथे परत आल्यावरही आठवडाभर आजारी होतीस. अशक्तपणा जाईस्तो महिना उलटला. आणि आता पुन्हा?"

"अरे एकदा आजारी पडले म्हणजे काय नेहमीच पडणार आहे का? आणि ह्यापूर्वीही कित्येकदा गेलोय ना आपण गावाला?"

"बरं माफ कर. मला नाही तुझ्याशी भांडता येत."

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तिनं हसून टीव्ही चालू केला.

----------

"स्मृती, तू नक्की आमच्याबरोबर येत नाहीयेस? असं शेवटच्या क्षणी काय गं!" अभयचा स्वर दुखावलेला होता.

"नाही रे. मला आईंबरोबर खूप सार्‍या गप्पा मारायच्यात. तू, भाऊजी, वहिनी आणि अबोली जाऊन या ना!"

"पण मग उद्या जाऊ ना आम्ही!"

"असं कसं रे, एव्हढी तयारी करताहेत वहिनी कालपासून."

"मग मी कशाला जाऊ, त्यांना जाऊ देत ना! तिकडे स्पेशली तुझ्यासाठी जायचं होतं. ते ठिकाण काय मी लहानपणापासून हजारदा पाहिलंय."

"असं कसं रे. त्यांना किती वाईट वाटेल. आपण जाऊ ना पुन्हा!"

"अगं पण उशीर होईल गं बये यायला!"

"अरे आहेत ना आई माझ्यासोबत!"

तो चेहरा पाडून गेला, तेव्हा स्मृतीलाच खूप वाईट वाटलं. त्याच्याशी ती कधीच खोटं बोलली नव्हती. तिला खूप अपराधी वाटत होतं.

----------

अभय रिक्षातून उतरला आणि पायवाटेवरून झपझप घराकडे निघाला. घराचा दरवाजा उघडा बघून त्याला शंका आली. आणि एकदम घरातून धूराचा वास येत होता. अचानक घरातून कुणीतरी मंत्रोच्चारण करत असल्याचा आवाज येऊ लागला. तो पटकन आवाजाच्या दिशेनं निघाला. आवाज स्वयंपाकघरातून येत होता. तो आत शिरला आणि आतलं दृश्य पाहून हादरलाच.

एक मांत्रिक एक हवन पेटवून बसला होता. त्याचे पांढरे कपडे, लांब वाढलेले काळे केस, दाढी-मिशा आणि कपाळाचं मोठ्ठं गंध ह्यांबरोबरच असलेल्या दाट भुवयांमुळे तो अजूनच भयावह दिसत होता. शेजारीच त्यांच्या ओळखीतल्या मुसळेबाई होत्या. आणि तो मांत्रिक स्मृतीवर काहीबाही उधळत होता. स्मृतीशेजारी बसून त्याची आई भक्तिभावानं हे सगळं बघत होती. अभयच्या आण्याची कुणालाच कल्पना आली नाही. अभय थिजूनच गेला होता. हे सगळं त्याच्या घरात चालू होतं ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. एव्हढ्यात त्या मांत्रिकानं स्मृतीला प्यायला काहीतरी दिलं. आणि अभय भानावर आला.

"थांब स्मृती!" तो जोरानंच म्हणाला.

सगळेच दचकून त्याला पहायला लागले. मुसळेबाई घाबरल्या, आई बावरली, स्मृतीला खूपच वाईट वाटत होतं. मांत्रिक त्याचे लालभडक डोळे रोखून त्याच्याकडे पाहत होता.

"स्मृती हे तू प्यायचं नाहीस!" तो पुढे होऊन तिच्या हातून ते भांडं काढून घेत म्हणाला.

"अरे अभय.."

त्याची आई काही बोलायला सुरूवात करणार इतक्यात मांत्रिक म्हणाला. "का नाही प्यायचं? तिला गरज आहे. तिचं औषध आहे ते."

"तिचं औषध? काय झालंय तिला?" तो अविश्वासानं स्मृतीकडे पाहत म्हणाला.

"ती वांझ आहे!" मुसळेबाई धीर एकवटून म्हणाल्या.

"मुसळेबाई!" अभय कडाडला, "तोंड सांभाळा आपलं! पाहुण्या आहात पाहुण्यांसारखं वागा." तशी मुसळेबाईंची बोलती बंद झाली.

"काय चुकीचं बोलल्या त्या?" आता चक्क अभयची आई म्हणाली.

"आई.." अभयच्या स्वरात दुःख ओतप्रोत भरलं होतं. "तू पण? तुला माहित तरी आहे..."

त्यानं वाक्य पूर्ण करायच्या आधीच स्मृतीनं त्याचा हात धरला. त्यानं स्मृतीकडे पाहिलं. ती त्याला डोळ्यानंच विनवत होती. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. मग त्याचं लक्ष मांत्रिकाकडे गेलं आणि अश्रूंची जागा संतापानं घेतली.

"आई, हे सगळं थोतांड बंद कर!" तो मांत्रिकाकडे बोट दाखवत म्हणाला.

"मुला, तू अजाण आहेस म्हणून माफ करतोय तुला. पण तुझ्या बायकोचा इलाज अजून बाकी आहे." मांत्रिक म्हणाला.

"मी तुझ्याशी बोलतोय का?"

"अभय! आदरानं बोल गुरूजींशी, गेल्या वेळेसही त्यांनी प्रयत्न केले, पण गुण येईना म्हणून ह्यावेळेस मोठं हवन ठेवलं. त्यांच्या हाताने गुण येत नाही असं झालं नाही आजवर."

"अच्छा, तर गेल्या वेळेस ह्या कर्मांची फळं भोगली होती स्मृतीनं महिनाभर! चल पाखंड्या उचल आपलं चंबूगबाळं आणि निघ इथून!"

"अरे गुरूजींशी नीट बोल. त्यांना पूर्ण करू दे इलाज. स्मृती बरोबरच म्हणत होती, तू नसतानाच हे सगळं व्हायला हवं होतं." आई बोलतच होती. "गुरूजी माफ करा माझ्या मुलाला. गेली दहा वर्षं शहरात राहून बिथरलाय थोडा!"

"आई!" अभय रागानं नुसता थरथरत होता, "काय झालंय काय तुला? काय बोलतेयस तू? बाबा गेल्यापासून तुझं देवदेवस्की वाढलं होतं, ते मला दिसत होतं. पण ह्या थराला गेलंय ठाऊक नव्हतं. हे सगळं ह्या मुसळेबाईंच्या संगतीमुळे झालंय." अभयनं रागानं मुसळेबाईंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. "आणि काय इलाज करणार आहे हा! जग कुठच्या कुठे गेलंय आणि तुम्ही ह्याच्या इलाजाकडे काय डोळे लावून बसलाय. आणि करायचाच असेल काही इलाज तर तो माझ्यावर..." स्मृतीनं त्याचा हात घट्ट धरून ओढला. त्यानं तिच्याकडे पाहिलं. त्याला भरून आलं होतं. तो तिच्याकडे ज्या नजरेनं पाहत होता, ते वर्णन करणं अशक्य आहे. अभयनं स्वतःवर ताबा मिळवायचा प्रयत्न केला.

"बरं झालं मला करमेना म्हणून त्यांना अर्ध्यातच सोडून मी परत आलो." बोलून तो मांत्रिकाकडे वळला, "आता निघतोयस बर्‍या बोलानं की धक्के मारून बाहेर काढू तुला सामानासकट!"

मांत्रिकानं एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे आणि त्याच्या आईकडे टाकला आणि तो त्याची पिशवी उचलून निघाला. अभयची आई त्याच्यामागे, त्याची माफी मागत दारापर्यंत गेली. अभयनं मुसळेबाईंकडे पाहिलं. त्या थिजून स्तब्ध उभ्या होत्या, त्या एकदम भानावर आल्या आणि चटकन बाहेर गेल्या.

अभयनं स्मृतीकडे पाहिलं आणि तिला मिठीत घेतलं. आता तिचा आणि त्याचा दोघांचाही बांध फुटला.

----------

अभय आणि स्मृती त्यांच्या खोलीत बसले होते.

"तू आईला बोलली का नाहीस?"

"काय बोलायचं?"

"हेच की दोष माझ्यात आहे. मी नामर्द आहे!"

"बस! काहीबाही बोलू नकोस."

"कळलं आता मला किती वेदना झाल्या असतील, जेव्हा तुझा काहीच दोष नसताना ते लोक तुला वांझोटी म्हणत होते."

"अरे त्यांना काय कळे. अशिक्षित आहेत त्या!"

"अशिक्षित आहेत म्हणून अमानुष व्हायचं? गेल्या वेळेस तुझी काय अवस्था झाली होती ते आईलाही ठाऊक आहे. तरीही तिनं असं करावं?"

"अरे आजी व्हायचंय त्यांना!"

"आहे की ती अबोलीची आजी!"

"अरे नातू हवाय त्यांना!"

अभयनं कपाळाला हात मारला. "आत्ता लक्षात येतंय माझ्या! स्मृती, हे प्रकरण हाताबाहेर जाणार असं दिसतंय मला. आपण उद्याच्या उद्या पहाटेच इथून निघायचं. आय होप, तुझा चांगुलपणाचा आणि सोशिकपणाचा ताप आता उतरला असेल."

"अरे मी विचार केला इलाज होईस्तो त्या जे बोलतील तसं करावं, एकदा आपला इलाज पूर्ण झाला आणि मी गरोदर राहिले की त्यांनाही समाधान!"

"पण हे असले अमानुष प्रकार बघूनही तू गप्प राहिलीस?"

"कशाला दुखवायचं रे त्यांना!"

"हो हो आणि मला दुखवलेलं चालतं ना?" तो तिच्याजवळ गेला आणि तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, "एव्हढा चांगुलपणा बरा नाही गं!" तिनं फक्त मान डोलावली.

"बरं ऐक आता. शहरात आमच्या फॅक्टरीत माझ्या अंडर एक सुपरवायझर आहे गगन म्हणून, ह्याच गावचा. त्यानं बोलावलं होतं. त्याच्या घरी जाऊन येतो. तू आराम कर, सामान आवर काही हवंतर आणि अमोल-वहिनी आल्याशिवाय खोलीतून बाहेर पडू नकोस. मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो."

क्रमशः

ही कथा ह्यापूर्वी मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० मध्ये प्रकाशित झाली होती.

15 comments:

 1. च्यायला!! 0 comments?? लोक ना, माजले आहेत! एवढे चांगले लेख वाचायला मिळतात तुझ्या ब्लॉगवर म्हणून माज आला आहे त्यांना! जाऊ दे... मी तरी प्रतिक्रिया देतो. पुढचा भाग कधी?

  ReplyDelete
 2. :)
  ई दीपावली मध्ये वाचली होती. आणि तेव्हाही आवडली होती. पुढे काही लिहित नाही कारण इथे वाचक क्रमश: वाचणार आहेत. :)

  ReplyDelete
 3. तेच मला कळेना आता परत का पोस्ट केलीस..मी पण वाचली होती ही कथा...जबरदस्त आहे..जास्त काही लिहित नाही....तुझ्या प्रत्येक लेखाला,कथेला अप्रतिम ,उत्कृष्ट ह्याच प्रतिक्रीया असतील माझ्या कडुन...असाच लिहित रहा.....:)

  ReplyDelete
 4. आवडेश...पण...क्रमशः...का???

  पुढचा भाग कधी??

  वि.सु.-यापुढे क्रमशः असणार्‍या कथा सर्व भाग लिहल्यावर वाचल्या जातील...अन त्या नंतरच प्रतिक्रिया देण्यात येतील..मंडळाने याची नोंद घ्यावी.

  ReplyDelete
 5. आता पुढची कथा तिकडे आहे तर तिकडेच जाऊन वाचतो... :D

  ReplyDelete
 6. बाबा, मस्त फुलवत नेली आहेस ही कथा.. मस्तच आहे.. आधीच आवडली होती.. स्पॉयलर्स टाळण्यासाठी बाकीचं पुढच्या भागाच्या प्रतिक्रियेत लिहीन :)

  ReplyDelete
 7. aavdla .....pudhcha kevha ???

  ReplyDelete
 8. संकेत,
  :)
  अरे पूर्वप्रकाशित लेखाला असंच होतं... :D
  धन्स भाऊ!

  ReplyDelete
 9. माऊताई,
  तुझी कॉमेंट मला सर्वांत आधी मिळालेली तेव्हा..चॅटवर! :)

  ReplyDelete
 10. योगेश,
  अरे निर्धास्त...कधीही टाक कमेंट..
  अरे वेळ मिळत नाही ना लिहायला सध्या ;) म्हणून क्रमशः चा प्रपंच! :D

  ReplyDelete
 11. Anonymous3:18 AM

  बाबा अरे ही पोस्ट वाचायची राहूनच जात होती.... राहून गेली असती तर एक भन्नाट कथा वाचायची राहीली असती...

  खूप टायपायला वेळ नाही माझ्याकडे भाग-२ वाचायला जातेय...

  सध्या ईतकेच लिहीते की कथेचा ओघ आणि संवाद जाम आवडलेत...

  ReplyDelete
 12. ताई,
  पोष्टा लिहिण्यासोबत कमेंटांना उत्तरं लिहायलाही इसरून गेलो होतो! :)

  ReplyDelete