12/12/2010

निवड - पुन्हा

मागे एकदा निवड ह्या विषयावरच पोस्ट लिहिली होती, त्यामुळे वरती एक पुन्हा टाकलंय (नंतर अजून एखादी टाकली तर 'पुन्हा एकदा', त्यापुढे 'पुन्हा पुन्हा एकदा' आणि मग 'अजून पुन्हा पुन्हा एकदा'... असो फार पाणचटपणा झाला आणि नेमका विषय थोडा गंभीर आहे, त्यामुळे आवरतो).

तर निवड, म्हणजे एखादा मार्ग निवडणे हे कितपत आपल्या हातात असतं, किंवा ती निवड करायला कुठले घटक कारणीभूत ठरतात, ह्याची "अ क्लॉकवर्क ऑरेंज" ह्या सिनेमाच्या अनुषंगानं गेल्या वेळेस मी थोडी चर्चा करायचा बाळबोध प्रयत्न केला होता, आणि ह्यावेळेस बेसिकली चांगलं आणि वाईट हे नक्की कसं ठरू शकतं, ह्याशी थोडीशी निगडीत चर्चा 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' ह्या कमर्शियलकडे झुकणार्‍या परंतु जाणते-अजाणतेपणी एक विचित्र गडद थीम दर्शवणार्‍या सिनेमाच्या अनुषंगानं करायचा अजून एक बाळबोधसा प्रयत्न.

मी 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' चांगला आहे असं सगळ्यांनी सांगूनही बघायचं टाळत असण्याचं एकमेव कारण म्हणजे मी सहसा कुठल्याही 'गँगस्टर'चं आणि बहुतेकदा 'दाऊद'चं उदात्तीकरण (जाणते-अजाणतेपणी) करणारे सिनेमे (मीडिऑकर असतील तर) सहसा टाळतो. कारण मीडिऑकर असल्यानं त्यातनं सिनेमॅटिक अनुभवही मिळत नाही आणि फुकट गँगस्टरांची पब्लिसिटी होते हे पाहून मला त्रास होतो. अर्थात पब्लिसिटी फुकट नसते, त्यांचेच पैसे लागलेले असतात सिनेमात म्हणा. तर 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई'चं असंच काहीसं असावं असं माझ्यावर इम्प्रेशन होतं. त्यामुळे मी फारसा उत्सुक नव्हतो, पण विमानात झोप येत नव्हती आणि त्यात रणदीप हूडा असल्याचं दिसलं (जे मला माहीत नव्हतं) त्यामुळे मी बघण्याचा निर्णय घेतला.

बर्‍याच केसेसप्रमाणे रणदीप हूडाच्या बाबतही लोकांचे माझ्याशी तीव्र मतभेद असू शकतात. पण पोलिसाच्या भूमिकेमध्ये रणदीप हूडाईतका अक्षय कुमार सोडल्यास सांप्रतच्या कलावंतांमध्ये कुणीही शोभत नाही, हे माझं ठाम मत आहे. असो. तर हूडानं ह्यामध्ये पोलिसाची भूमिका केलीय. सिनेमाची सुरूवात एका विचित्र वळणावर होते. १९९३ सालच्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट्स नंतर डीसीपी ऍग्नेल विल्सन (रणदीप हूडा) आत्महत्येचा प्रयत्न करतो. आणि त्याचं कारण त्याला कमिश्नर विचारतो तेव्हा तो मुंबईच्या आजच्या अवस्थेला स्वतः कारणीभूत असल्याचं सांगत काही वर्षांपूर्वी घडलेला घटनाक्रम सांगायला सुरूवात करतो आणि त्यातून सुलतान मिर्ज़ा (अजय देवगण) हा हाय-प्रोफाईल स्मगलर (हाजी मस्तानशी साम्य दर्शवणारं पात्र) आणि शोएब खान (इमरान हाश्मी) हा कुठल्याही मार्गाने पैसा आणि अनिर्बंध ताकद आणि सत्ता मिळवायची स्वप्न असलेला बेदरकार आणि उलट्या काळजाचा तरूण (दाऊदशी साधर्म्य दाखवणारं पात्र) ह्यांची गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते.

सुलतान मिर्ज़ाचा रंकापासून राजापर्यंतचा प्रवास, मग त्याला प्रसिद्धीची आवड असणं, छानछोकीची आवड असणं, तरी कायम गरीबांची (एस्पेशली डोंगरी भागातल्या) मदत करून तिथल्या भागातलं प्रतिसरकार सारखं बनणं हे सगळं थोड्याशा फिल्मी पद्धतीनं दाखवलं गेलंय. सुलतान हा गोदीमध्ये लहानाचा मोठा झालेला एक तस्कर. सोनं आणि परदेशी घड्याळं (ज्यांवर पूर्वीच्याकाळी बरीच कस्टम ड्यूटी पडायची) ह्यांची तस्करी करून सर्वांत मोठा बनलेला असतो. सुलतानचा शब्द मुंबईच्या गुन्हेगारी जगतात शेवटचा समजला जातो, कारण त्यानं सर्व गुन्हेगारांना भाग वाटून देऊन आपापसांत भांडण्यापासून अडवलंय. मुंबईतले रस्ते आणि सामान्य माणसं सुरक्षित आहेत, कारण त्याचे स्वतःचे धंद्याबाबतचे काही नियम आहेत. जसे ड्रग्ज आणि दारूची तस्करी न करणे, सुपार्‍या घेऊन खून न करणे इत्यादी. पण बाकी बेकायदेशीर कामं करण्यास त्याची ना नाही. सुलतानची निवड धार्मिक प्रभावांखाली ठरल्यासारखं जाणवतं. त्याच्या योग्य अयोग्याच्या कल्पना धार्मिक बाबींवर मूलतः अवलंबून आहेत आणि बाकीच्या पोटापाण्यावर त्या त्या वेळच्या सोयीनुसार. पण इथे ही थीम येते, की प्रसिद्धी माध्यमं आपल्या सवंगपणानं सुलतानला हिरो बनवून टाकतात आणि मोठी स्वप्नं असलेला प्रत्येक बेकार तरूण सुलतानला आपला आदर्श समजू लागतो. इथेच त्याकाळी एसीपी असलेला ऍग्नेल विल्सनची विचारसरणी पहिल्यांदाच आपल्यासमोर येते.

ऍग्नेल सरकारी नोकर आहे, आणि त्याचा सरकार ह्या व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. भले सरकारी कारभारामध्ये काहीजणांवर अन्याय होत असेल, तरीही मी त्या व्यवस्थेसाठी काम करतो आणि तीच सर्वोत्तम मार्ग असून तिच्याविरुद्ध उठणारी प्रत्येक गोष्ट अयोग्य असल्याचा दुर्दम्य विश्वास ऍग्नेलमध्ये आहे. आणि तो आपल्या मानलेल्या कर्तव्यपूर्तीपुढे स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही. त्याची निवड मूलतः सामाजिक आणि शैक्षणिक प्रभावाखाली ठरते आणि तो आपल्या निवडीबाबत पूर्णपणे ठाम आहे. त्यामुळे साहजिकच सरकारी महसूल बुडवून तस्करी करून मग गरीबांची थोडी मदत करून मसीहा बनलेल्या सुलतानबद्दल ऍग्नेलला केवळ तिरस्कार वाटतो. आणि त्याचं समाजासमोर ग्लोरिफिकेशन होत असलेलं पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो सुलतानची पाळंमुळं खणून काढायचा निर्णय घेतो. सुलतानची गर्लफ्रेंड असलेली सिनेनटी रेहानावर दबाव आणून तिच्याकडून काही पुरावे मिळवायचा प्रयत्न करताना रेहाना आणि सुलतान बनाव रचून त्याला लाच घेताना मीडियासमोर आणून त्याचा पाया हलवतात. ह्या घटनेमुळे तर पोलिसातही सुलतानचे प्रशंसक वाढलेले पाहून ऍग्नेल दुखावतो, पण तो सुलतान ह्या फिनॉमेनाला संपवायचे मार्ग शोधत राहतो. तो वेळोवेळी सुलतानसकट त्याच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्या सो कॉल्ड समाजसेवेतला फोलपणा समजावत राहतो पण पालथ्या घड्यावर पाणी पडत राहतं. सुलतानच्या करिष्म्यानं अनेक राजकीय पक्षदेखील प्रभावित असतात. आणि अशातच मग सुलतानसमोर शोएब येतो. शोएबमधलं वेड पाहून सुलतान त्याला आपल्या पंखाखाली घेतो आणि शोएबची प्रगती होऊ लागते. पण शोएबची निवड फारच सरळसोट असते. त्याला नीतीमत्ता नावाचा प्रकारच माहित नसतो. फक्त पैसा आणि अनिर्बंध सत्ता एव्हढ्या दोनच लक्ष्यांकडे त्याची दौड सुरू असते. त्यामध्ये चांगलं-वाईट वगैरे वर्गीकरण करण्याची त्याला गरज नसते. त्याला एक दिवस सुलतानसारखं बनायचं असतं आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायला त्याची ना नाही.

ऍग्नेल सर्व पाहून डोळे मिटून बसतो कारण त्याला शोएबच्या रस्त्यांमध्ये सुलतानच्या मूलभूत नियमांशी फारकत दिसते. विष विषाला मारतं तद्वतच तो शोएबच्या उन्नतीचा वापर सुलतानच्या अस्तासाठी करायचं ठरवतो आणि शोएबला अजाणतेपणीच आयतं मोकळं रान मिळतं. मग एक दिवस सुलतानला स्वतःच्या प्रभावाला राजमान्यता मिळवावीशी वाटते आणि तो राजकीय पक्षात प्रवेश करण्यासाठी दिल्लीला जायचं ठरवतो. आणि काही दिवसांसाठी तो शोएबच्या हाती सत्ता देतो आणि इथेच ऍग्नेलचा प्लॅन यशस्वी होण्याची बीजं दिसू लागतात. शोएब पैशांसाठी कुठलंही बरंवाईट काम करू शकतो आणि तो ते करूही लागतो. अल्पावधीतच शोएब गुन्हेगारी जगतामध्ये खूप पुढे निघून जातो. पण सुलतानचा पूर्ण व्यवसायच सुलतानच्या अनुपस्थितीत पालटून जातो. आपल्या राजकारण प्रवेशाची व्यवस्था लावून सुलतान परततो तेव्हा घडलेल्या घटनांनी तो हादरून जातो. शोएबला अपमानित करून तो टोळीबाहेर काढतो. पण आपल्या नियमांमुळे सुलताननं पूर्वीपासूनच अनेक छुपे शत्रू निर्माण करून ठेवलेले असतात. त्यातलाच एक शोएबला हाताशी धरून सुलतानचा काटा काढायचा प्लॅन करतो.

एव्हाना ऍग्नेलला आपल्या हातून घडलेल्या प्रमादाची कल्पना आलेली असते. पण आता शोएब हाताबाहेर गेलेला असतो. आणि सुलतानला संपवून तो गुन्हेगारी जगताचा सम्राट बनतोच आणि मुंबईला कायमचं गुन्ह्यांच्या छायेखाली आणतो. आणि एक दिवस ह्याचीच परिणती १९९३ ब्लास्ट्समध्ये झाल्याचं ऍग्नेल शेवटाकडे सूचित करतो. त्यामुळेच सुलतान आणि शोएबमधल्या एकाची निवड करण्यात स्वतःची चूक झाल्याचं मान्य करत तो अपराधी भावनेनं आत्महत्येचा प्रयत्न करतो.

शेवटी तो सांगतो की दोन चुकीच्या गोष्टींमधली एकाची निवड करणं अवघड असतं. आणि त्यातच त्याची चूक झाल्याचं सांगतो. पण खरंच तसं असतं का? ऍग्नेल तत्वनिष्ठ आणि स्वच्छ चारित्र्याचा पोलिस असतो. पण सुलतान त्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवतो. ऍग्नेलच्या जवळ असणारे अनेकजण सुलतानचे चाहते असतात ज्यामुळे वेळोवेळी ऍग्नेल तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतो. कदाचित ह्याच कारणांमुळे फक्त सुलतानला संपवणं हेच त्याचं लक्ष्य बनून जातं आणि त्यात शोएब कामास येऊ शकतो हे पाहून तो परिणामांची पर्वा न करतो 'फ्रँकेनस्टाईन मॉन्स्टर' बनवतो (आपल्या निर्मात्यालाच संपवणारा) असं एकंदर जाणवतं. अर्थात प्रत्यक्षात दिग्दर्शकाला इतका ऊहापोह करायचा असावा असं मला वाटत नाही. मीच कदाचित झोप न झाल्याने सिनेमाचा फार खोलात विचार केला.

सिनेमा पूर्णतया कमर्शियल होता हे त्यामध्ये जोडलेली चांगल्या गाण्यांची ठिगळं आणि बिनकामाच्या हिरॉईन्सवरून कळतं. पण तरीही जाणते-अजाणतेपणी सिनेमा मानवी स्वभावाच्या काही पैलूंवर प्रकाश टाकतोच. अजय देवगण भूमिका जगतो. पण त्याचा रोल बराचसा फिल्मी झालाय. इमरान हाश्मीऐवजी एखादा अजून चांगला नट घेता आला असता. तरीदेखील काही अपवादात्मक प्रसंगांमध्ये इमरानही छाप सोडतो. रणदीप हूडाचं नाव सुरूवातीला स्पेशल ऍपिअरन्स म्हणून येतं बहुतेक, पण त्याचा रोल बर्‍यापैकी मोठा आहे. आणि मला तरी त्याचा अभिनय इमरानपेक्षाही चांगला वाटला. काही प्रसंगांमध्ये तो अजयसमोरही घट्ट पाय रोवून उभा राहतो. त्यातून त्याची पर्सनालिटी त्याच्या व्यक्तिरेखेला शोभते.

एकंदर चांगल्या संवादांबरोबरच चांगली कथा असल्यानं (पटकथा थोडी लेटडाऊन करते) सिनेमा मनोरंजन तरी चांगलं करतो. मी वरती जेव्हढं निवड वगैरेंवरून पकवलं त्या सगळ्याचा विचारही न करतादेखील एकदा आरामात बघता येईल.

30 comments:

 1. तू सिनेमा बघताना अजून "निवड" या विषयावर जो काही विचार केलास तोपण लिही ना, कारण त्यावर विशेष चर्चा झालीच नाही.

  ReplyDelete
 2. तुझ्या कोणत्याही चित्रपटसमीक्षणावर मी जी प्रतिक्रिया देतो तीच इथेही:
  ‘बघायला हवा एकदा हा चित्रपट’ :-D

  ReplyDelete
 3. ओंकार,
  ह्म्म...तसंच झालेलं दिसतंय... माझ्याही आत्ता लक्षात आलंय...पण आता पोस्ट एडिटून उपयोग नाही.. 'पुन्हा एकदा' लिहावं लागणार बहुतेक.. विल वेट फॉर अनदर मूव्ही टू कम अलाँग! :P

  ReplyDelete
 4. मी हा शिनेमा खास अजय देवगणसाठी बघितला. बाकी सगळा मसाला नेहमीचाच होता. इम्रान हाशमी हा केवळ दाउदशी साम्य असलेला चेहरा म्हणून आला असेल कारण त्याला अभिनयात खूप पुढे जायच आहे. बाकी परीक्षण मस्त....

  >> पोलिसाच्या भूमिकेमध्ये रणदीप हूडाईतका अक्षय कुमार सोडल्यास सांप्रतच्या कलावंतांमध्ये कुणीही शोभत नाही... +1

  ReplyDelete
 5. >>मी सहसा कुठल्याही 'गँगस्टर'चं आणि बहुतेकदा 'दाऊद'चं उदात्तीकरण (जाणते-अजाणतेपणी) करणारे सिनेमे (मीडिऑकर असतील तर) सहसा टाळतो +१

  परीक्षण मस्त झाल आहे.

  ReplyDelete
 6. >>>>>> पोलिसाच्या भूमिकेमध्ये रणदीप हूडाईतका अक्षय कुमार सोडल्यास सांप्रतच्या कलावंतांमध्ये कुणीही शोभत नाही... +11

  बाबा खरं तर मला झेपत नाहीत असे सिनीमे.... मगर तुम बोलते हो तो हम देख्येंगे ये शिनेमा :)
  दबंग बाबत झालेले एकमत ईतक्यात विसरणार नाही मी :)

  आणि आता भारतात जरा भटक बाहेर, काकुंच्या हातचे मस्त जेवण कर.. नेट, ब्लॉग, बझ सगळे थांबेल तिथेच तुझ्यासाठी.... समजले!!!

  ReplyDelete
 7. मी बघितला नाहीये. पण ह्या अश्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये मला 'परिंदा' ह्या चित्रपटाला तोड नाही असे पुन्हां पुन्हां वाटते.

  ReplyDelete
 8. सुहास,
  होय अगदी...अजय देवगण बराचसा सिनेमा एकट्याच्या जीवावर सुसह्य करतो! :)

  ReplyDelete
 9. योगेशभाऊ,
  लई धन्यवाद!

  ReplyDelete
 10. तन्वीताई,
  अगं एकदम आवर्जून बघावा असा काही नाहीये..पण देवगण फॅन असशील तर बघू शकतेस.. :)
  आणि अगं फिरतोय मी, आत्तातर सुरूवात झालीय सुट्टीची...अगदी अधूनमधूनच येतोय नेटाने नेटावर..डेडिकेशन कमी होऊ द्यायचं नाहीये ब्लॉगाचं! :D

  ReplyDelete
 11. अनघा,
  'परिंदा' अनडाऊटेडली सगळ्यांच बाबतीत सुपिरिअर होता..
  पण क्राईम सिनेमा म्हणजे 'गॉडफादर' गॉड!!!

  ReplyDelete
 12. मलाही बराच वाटला हा सिनेमा...गाणी ऑसम आहेत!

  ReplyDelete
 13. मी पाहिला आहे. ठीकच म्हणावं लागेल. मलाही या अश्या लोकांना मध्यवर्ती ठेवून बनवलेले सिनेमे फारसे आवडत नाहीत शिवाय कधी कधी ना मनात घेतच नाही एखादा सिनेमा पहावा...

  सुट्टी सुरूही झाली ना... मस्तच. मज्जा कर. बोलूच आपण. :)

  ReplyDelete
 14. देवगण-पंखा असूनही बघायचा राहिलाय हा.. बाकी असल्या लोकांच्या ग्लोरिफिकेशनचा मुद्दा पूर्ण पटला ! सहमत.

  ReplyDelete
 15. हा मुव्हि मि बघीतला आहे. पण तु ते शब्दात कसा मांडतो आहेस ते वाचायचा होता. छान जमलय. तुझा ब्लॉग वाचताना संपेपर्यंत सोडवत नाहि.

  ReplyDelete
 16. कपिल,
  :)
  सेम हियर!

  ReplyDelete
 17. श्रीताई,
  अगदी अगदी >>कधी कधी ना मनात घेतच नाही एखादा सिनेमा पहावा...
  हो ना...सुट्टी सुरू...पण ब्लॉगला सुट्टी द्यायची नाही असं ठरवलंय..बघू कसं जमतंय.. :)

  ReplyDelete
 18. हेरंब,
  कधी कधी फार त्रास होतो मग..
  पण हो...देवगण-पंखा आहेस, त्यामुळे तू बघच! :)

  ReplyDelete
 19. आशीष,
  ब्लॉगवर स्वागत!
  प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! असाच लोभ राहू द्या!

  ReplyDelete
 20. माझी प्रतिक्रिया काय आहे हे तुला कळलं असेलच... ;-) बघायला हवा हा (हाही!) चित्रपट एकदा... ;-)

  ReplyDelete
 21. अभिनयाबाबतीत अजय देवगण नेहमीप्रमाणे मस्त आणि हो रणदीप हुडा हा पण एक चांगला अभिनेता आहे. त्याचे ह्याआधीचे "डि" आणि "रिस्क" दोन्ही चित्रपट मला आवडले. रिस्कमध्ये पण तो पोलिसाच्या भूमिकेत आहे.
  बाकी "वन्स अपॉन अ टाइम" मला पण आवडला.
  बस्स दुवा में याद रख ना...

  ReplyDelete
 22. "अर्थात प्रत्यक्षात दिग्दर्शकाला इतका ऊहापोह करायचा असावा असं मला वाटत नाही. मीच कदाचित झोप न झाल्याने सिनेमाचा फार खोलात विचार केला." ... धन्य आहेस.... :)

  मी अजूनही पाहिलेला नाही... बघीन वेळ मिळाला की.. येताना विमानात हा पिच्चर पाहिलास? तसाही हा विमानातच पहायचा पिच्चर आहे बहुदा... :D

  ReplyDelete
 23. Anonymous4:26 AM

  बाबा पूर्ण परीक्षण रणदीपच्या बाजूनेच लिहिल्या सारखे वाटते....खरतर मला ह्या चित्रपटातील मेलोड्रामा आणि संवाद आवडले होते त्याबाबत तू काही लिहिलच नाहीस ...एकदा निव्वळ मनोरंजनाच्या नजरेतून हा सिनेमा परत बघ रे... :)

  ReplyDelete
 24. सिद्धार्थ,
  होय आणि आयरॉनिकली "डी" मध्ये हूडानं दाऊदवरून इन्स्पायर झालेला रोल केलाय.. :)

  ReplyDelete
 25. रोहन,
  अरे एम्प्टी माईंड, डेव्हिल्स वर्कशॉप.. :)
  पहा विमानातच..टीपी चांगला आहे...

  ReplyDelete
 26. देवेंद्र,
  अरे एकतर मी वाचलेल्या सर्व रिव्ह्यूजमध्ये रणदीप हूडावर थोडा अन्याय झाल्यासारखं वाटलं होतं मला आणि दुसरं म्हणजे रणदीप हूडाचं कॅरॅक्टर जो विचार करतं, त्या विचाराला आणि तसं वागणार्‍या माणसाबद्दल मला जरा जास्त सहानुभूती वाटते म्हणून असेल..मी रणदीपच्या बाजूने लिहिल्यागत झालं असेल.
  तू म्हणतोस तर बघेन परत कधीतरी! :)

  ReplyDelete
 27. Anonymous11:30 AM

  बाबा,मला पण त्याचच कॅरॅक्टर सर्वात योग्य वाटते पण मी शिनिमा पाहतांना सुलतान मिर्झा च्या बाजूने होतो ना रे... :)

  ReplyDelete