6/26/2012

पंचाईत


जगात नेहमीप्रमाणे वावरताना माझ्या जीवाची प्रचंड घालमेल करणारे काही प्रसंग -

. मी (परदेशात) रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नलवर उभा आहे. पादचारी क्रॉसिंगसाठी सिग्नल लाल आहे, त्यामुळे प्रत्येक इमानदार भारतीयाप्रमाणे मी सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत उभा आहे. आणि त्यावेळी रस्त्यावर एकही गाडी दूरदूरपर्यंतदेखील नाही. आता आली का पंचाईत? माझे भारतीय इंस्टिक्ट्स मला सांगत असतात की 'कर तिच्यायला रस्ता क्रॉस. कसले भंकस नियम पाळत बसला आहेस?' आणि टिपिकल इमानदार परदेशस्थ भारतीय मन, आपण भारतात नसल्यामुळे मला सगळे नियम काटेकोरपणे पाळायला सांगत असतं. आणि नेमकं त्याच वेळेला माझ्या बाजूनं किंवा समोरच्याही बाजूनं, सिग्नल लाल असतानाच गोरे लोकदेखील बिन्धास्त रस्ता क्रॉस करू लागतात. आणि मी अजूनच संभ्रमात पडतो. इतका वेळ धरून ठेवलेला धीर सोडायचा का? आपला काटेकोरपणा पाहून हे सगळे लोक हसत असतील का?

. एअरपोर्टवर एखाद्या चीप लो कॉस्ट एअरलाईनच्या बोर्डिंग डेस्कसमोर मी आणि अन्य साठ-सत्तर लोक उभे आहेत. आणि बोर्डिंग डेस्क चालू होतो. असल्या एअरलाईन्सना बिन रिझर्व्हेशन्स एसटी सारखं असतं. जागा पकडायची. त्यामुळे एकच झुंबड उडते. पण तरी तो एअरपोर्ट असल्यानं आणि मुख्य म्हणजे परदेशातला असल्यानं झोंबाझोंबी होत नाही, पण एका लायनीला दोन फाटे फुटतात. दोन्ही फाट्यांतले लोक आपापल्या सोयीप्रमाणे डेस्कासमोर शिरत असतात. थोडक्यात काय, तर सोफिस्टिकेटेड घाईगर्दी सुरू झालेली असते. मी ह्या फाट्यामध्ये उभा आहे त्याच्या टोकाशी म्हणजेच मूळ लायनीपर्यंत पोचतो आणि माझा 'क्लासिक मॉरल डायलेमा' निर्माण होतो. मी बाजूच्या फाट्यातल्या कुणाला फाटा देऊन लायनीत शिरायचं? मुळात दोन फाटे असणंच चुकीचं आहे, त्यामुळे मी कुणाला फाटा वगैरे देत नाहीये, आम्ही दोघेही बरोबर आणि दोघेही चुकीचे आहोत. पण तरीही मला म्हातारं माणूस, सुंदर स्त्री, लेकुरवाळी कुटुंब असल्या लोकांना फाटा देणं अप्रस्तुत वाटतं, पण तरीही माझ्या फाट्यामध्ये मी सर्वात पुढे असल्यानं माझ्या फाट्यातर्फे फाटा देण्याची जवाबदारी माझ्यावर आहे. आता आली का पंचाईत?

३. मी फूटपाथवरून चाललोय आणि माझ्यापुढे तीन-चार माणसं एकत्र उभी राहून रस्त्याच्या पलिकडे काहीतरी बघताहेत.  मीदेखील हळूच वळून पाहायचा प्रयत्न करतो. पण ते त्यांचंच काही सिक्रेट असेल तर काय घ्या, त्यामुळे शिस्तीत उभं राहून मी पाहत नाही. थोडा पुढे जातो तोवर अजून तीन-चार माणसं थांबून तिथे पाहू लागतात. पुन्हा मी हळूच वळून पाहतो, पण मला अजूनही पाहण्यासारखं काही दिसत नाही. पाहणारे फक्त पुरूष नाहीत, त्यामुळे पलिकडे काहीतरी सर्वसामान्य उत्सुकता चाळवणारं असायला हवं. पण मला खरंच काही दिसत नाहीय. आता आली का पंचाईत? बरं दोन मिनिटं थांबून उभं राहावं आणि तरीही काही दिसलं नाही तर काय घ्या? आणि आपला काहीही संबंध नसलेलं काहीतरी पूर्णपणे निरर्थक असलं तर उगाच मूर्खासारखं बिनकामाच्या बघ्यांपैकी एक कशाला व्हा?

वरील सर्व प्रसंगांमधलं समान सूत्र म्हणजे, प्रत्येक ठिकाणी 'मी' ह्या पात्राला हवी असलेली समाजमान्यता. मी हे पात्र, प्रत्येक पावलावर बाकीचे काय म्हणतील ह्याचा विचार करतं. ह्यातली सर्वात जबरदस्त गंमत म्हणजे, ते पात्र प्रत्येक निर्णयासाठी इतरांच्या मान्यतेचा विचार करतं, पण ते ह्या गृहीतकावर आधारलेलं आहे की सर्व इतरजण त्याच्याकडेच पाहताहेत, किंवा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. बेसिकली, स्वतःला अवास्तव महत्व प्रदान करून मग स्वतःची किंमत कमी करून घेतली जाते. स्वकेंद्रित गृहीतकातून परकेंद्रीत दृष्टीकोन विकसित होतो. हा कुठल्यातरी प्रकारचा पॅराडॉक्स आहे. "Everybody lies" असं म्हणण्यामध्ये जसा 'Liar Paradox' आहे तसा. कदाचित 'Centralisation Paradox' म्हणता येईल का? पॅराडॉक्सला 'विरोधाभास' हा सगळ्यात जवळचा शब्द असावा. 'केंद्रीकरण विरोधाभास'. मराठी चुकत असलं तरी संकल्पना बहुतेक चुकत नसावी. आणि संकल्पनाही चुकत असेल तर आनंदच आहे. पण उपयोग काय आहे एव्हढ्या चर्वितचर्वणाचा? 'सोशल ऑकवर्डनेस' असं गोंडस नाव देऊन पुढे चालू पडायचं झालं!

11 comments:

 1. होतं असतं रे... सोशल ऑकवर्डनेस म्हणत पुढे चालू पडायचं !! नायतर दुसरा पर्याय हा की तेच्यायला गेलं उडत करत आपला टिपीकल भारतीय बाणा परदेशातही जपायचा.. :)

  ReplyDelete
 2. आयला एकदम पंचाईत आहे ... :)

  ReplyDelete
 3. पुन्हां एकदा...निरीक्षण शक्ती आणि अभ्यासू वृत्ती. :)
  मला आवडलं... :)

  ReplyDelete
 4. खरंय.. असं होतं.. हे वाटणं इतकं कॉमन असेल असं वाटलं नव्हतं.. :D


  टीप- माझे अनुभव भारतातलेच आहेत परदेशातले नव्हे... मुपीची शप्पथ.. :P

  ReplyDelete
 5. आनंद पत्रेंच्या प्रतिक्रियेला +१! :)
  आणि अजुनेक प्रसंग:
  विमान इंग्लंड, जर्मनी किंवा तत्सम कुठल्यातरी देशातून मुंबईला यायला निघतं. बहुसंख्य प्रवासी भारतीय असतात. ते त्या विमानतळावर येणाऱ्या मुठभर गोरयांमध्ये त्यांच्यासारखे वागतात. मुंबईला विमान उतरलं की हेच लोक अस्सल भारतीय होतात आणि दंगा करतात..या सगळ्यात मी कसं वागायचं?

  मस्त पोस्ट..:)

  ReplyDelete
 6. मस्त निरिक्षण....आणि पॅराडॉक्सला "विरोधाभास"च जवळचा शब्द असावा....
  तरी एक लक्षात घे सध्या यातल्या बर्‍याच गोष्टी तू एकटाच करतोयस...मुलांबरोबर नियम मोडताना मला किती विचार करावा लागतो माहित आहे का....;) किंवा सरळ अतिसभ्यपणाचा बुरखाच पांघरायचा.....और क्या???

  आनंद, >>मुपीची शप्पथ
  लोल्स...:D :D

  ReplyDelete
 7. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 8. जग काय म्हणेल या एका भीतीपायी आपल्याला कराव्याशा वाटणाऱ्या कित्येक गोष्टी आपण टाळतो.

  -वपु.

  मस्त पोस्ट !

  ReplyDelete
 9. Anonymous10:27 PM

  पुन्हां एकदा...निरीक्षण शक्ती आणि अभ्यासू वृत्ती. :)
  मला आवडलं... :) +100

  बाबा लिहीत रहा रे :)

  ReplyDelete
 10. एका अर्थी हा आपला संघर्ष लोकांशी नसतोच. तो असतो आपलाच आपल्याशी .. आपल्यातल्या दोन प्रवृत्ती अशा सतत डोकं वर काढत असतात. आपल्या स्वभावानुसार (स्वभाव बनतो पुन्हा अनेक अनुभवांनी, त्याच्या भोगलेल्या परिणामांनी ....) आपण प्रतिसाद देत राहतो इतकंचं खरं असतं!!

  ReplyDelete
 11. निरीक्षण लिखाणातून अगदी तंतोतंत उतरले आहे. मस्त.

  ReplyDelete