भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६, भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१०, भाग -११, भाग -१२, भाग -१३, भाग -१४, भाग -१५ आणि भाग -१६ पासून पुढे
नरेंद्र आणि रेखा हळूहळू चालत रस्त्याच्या दिशेनं निघाले होते.
"आपण
इतके हळूहळू का चालतो आहोत?" रेखा
अजूनही झालेल्या प्रकारानं थोडीशी हादरलेली होती.
"कारण
धावत जाऊन काही उपयोग नाहीये. आपण
एनर्जी वाचवलेली बरी."
"आणि
मागून अजून लोक आले तर?"
"अजून
लोक येणार नाहीत हे नक्की. आता
येतील ती कल्पनाची माणसं. पण
त्यांनाही यायला वेळ आहे. तोवर
आपण इथून गेलेलो असू."
त्यानंतर थोडा वेळ कुणीही काहीही बोललं नाही. थोड्या वेळानं ते रस्त्याजवळ पोचले.
रस्ता जरी थोडाफार मोठा असला तरी आडगावात असल्यानं फारसा
रहदारीचा नव्हता आणि त्यातून मध्यान्ह जवळ असल्यानं रहदारी अगदीच कमी होती. त्यामुळेदेखील दूर अंतरावर झालेल्या शूटआऊटकडे कुणाचं लक्ष
गेलं नव्हतं आणि गेलं असलं तरी तो घाबरून पळून गेला असण्याचीच शक्यता होती. पोलिसांना बोलावणं हे एकंदरच भारतीय संस्कृतीत बसत नसल्यामुळे
नरेंद्र निवांत होता. एका
छोट्या बॅगेत त्यानं कामाचा दारूगोळा आणि काही निवडक हाताला सोप्या अशा बंदुका
घेतल्या होत्या.
"बर्याच
दिवसांनी बिन खर्चाचं कामाचं सामान मिळालं." नरेंद्र
बॅगेकडे इशारा करत डोळे मिचकावत म्हणाला.
रेखा काहीही बोलली नाही.
"काय
झालंय तुला?"
रेखानं त्याच्याकडे रोखून पाहिलं.
"काय
झालंय? तू झालायस. तुला
रक्ताचं, माणसांचं, मृतदेहांचं
काहीच वाटत नाही का रे? किती
सहजपणे कुणाच्याही डोक्यात गोळी घालतोस. रक्ताच्या
थारोळ्यात फिरतोस. अंगावरचे
रक्ताचे डाग पुसतोस. आणि
मी तुझ्यावर.." रेखा
शहारली.
नरेंद्र सगळं शांतपणे ऐकत होता. समोरून
एक सरकारी बस थडथडत येत होती. नरेंद्रनं
हात करून बस थांबवली आणि ते दोघेजण त्या जवळपास रिकाम्या बसमध्ये अगदी शेवटी जाऊन
बसले.नरेंद्रनं बॅग थोडीशी पुढे वरच्या
स्टँडवर ठेवली.
"तिथे
का ठेवतो आहेस?"
"वेळ
पडली तर आपली नाही म्हणून सांगता येईल."
"ड्रायव्हरनं
पाहिलं असेल ना."
"तेव्हा
ही दाखवायची." नरेंद्रनं
शर्टातून तशीच दुसरी बॅग बाहेर काढली आणि सीटखाली सरकवली.
"ते लोक सारख्या बॅगा घेऊन फिरत होते,
त्याचा आपल्याला फायदा." नरेंद्रनं
माफक विनोद केला पण रेखाचा चेहरा कोराच राहिला आणि ती खिडकीबाहेर पाहू लागली. नरेंद्रनं बसमधल्या इतर लोकांवर एक नजर फिरवली.
-----
"तू
त्या लोकांना पहिल्या भिंतीवरून उडी मारताना पाहिलं होतंस?"
जेलच्या कॅन्टीनमध्ये एक कैदी दुसर्या कैद्याला विचारत होता.
"हो
यार. सगळंच पाह्यलं मी. बर झालं नाही गेलो ते."
"म्हणजे? तुला पण विचारलं होतं?"
"हो
यार. तो दाढीवाला होता एक, तो एकदा हळूच विचारायला मला."
"मग?"
"माझी
दोन वर्षं बाकीयेत रे. पुरी
करणं ठीक ना यार."
"ह्म्म."
"मायला
तू इतका साफ कसा बोलतो रे?"
"व्हाईट
कॉलर लोकांच्यात राहून. बरं
ते सोड. पण मग नक्की काय काय अन कसं कसं झालं
ते सांगतोस का?"
-----
रेखा खिडकीबाहेरच पाहत होती. तिच्या
डोक्यात असंख्य विचारांचं मोहोळ उठलेलं होतं. 'मी
कशासाठी सगळं सुरू केलं? काय
काय नाही केलं. आणि आज काय होऊन बसलंय. अजूनही मी त्याच रस्त्यावर चालतेय. पण
आता त्याहून जास्त काहीतरी वेगळं का हवंसं वाटावं? भावना
एव्हढ्या तकलादू असाव्यात की एकीमुळे दुसरी तुटून जावी? की
प्रेमाची भावना द्वेषाच्या भावनेपेक्षा मजबूत असते म्हणून ती द्वेषाच्या भावनेला
मोडून काढते? पण खरंच मला जे वाटतंय
ते प्रेम आहे नुसतंच शारीरिक आकर्षण? झालेल्या
गोष्टीला थोडीथोडकी नव्हे, दोन
वर्षं उलटलीत. शारीरिक आकर्षण शक्य आहे. पण खरंच शारीरिक आकर्षण? नुसतं
त्याच्याबरोबर असावंसं वाटणं आणि त्याच्या प्रत्येक दोषाकडे काणाडोळा करणं म्हणजे
शारीरिक आकर्षण? ओढ वाटते त्याच्याबद्दल
पण तरी हे नुसतंच शारीरिक आकर्षण कसं असेल? पण
मग प्रेम? अशा माणसावर? जो
कायम 'मी माणूस नाही'
असं सांगत असतो?' तिचं
विचारचक्र नरेंद्रच्या आवाजानं मोडलं.
"मी
ट्रेनच्या ज्या डब्यात बसलो होतो, तिथे
तीन बंदूकधारी येऊन उभे राहिले होते आणि गाडी संथगतीनं पुढे सरकत होती." नरेंद्र हळू आवाजात एका सुरात
तिच्याकडे न पाहता बोलत होता.
रेखाला त्याच्याकडे पाहून थोडंसं हसू आलं. आणि मग ती पुढे ऐकू लागली.
थोड्या वेळानं डब्यातल्याच दोघा तरूणांनी एका बंदूकधार्यावर झडप घातली आणि त्याला आडवा घातला. तोवर दुसर्या बंदूकधार्यानं त्या दोघांवर गोळ्या झाडायला सुरूवात केली आणि तिसरा बंदूक सरसावून तिथे पाहू लागला. मी तिसर्याच्या मागे होतो. मी चाकूसकट खाली उडी मारली आणि तिसर्याला कंठस्नान घालून दुसर्यावर झडप घातली. त्यालाही मारून मी त्या दोघा तरूणांकडे गेलो. ते गोळ्या लागल्यामुळे विव्हळत पडलेले होते. त्यांनी झडप घातलेला तिसरा अर्धवट गुंगीत पडला होता. त्याच्याही गळ्यावरून चाकू फिरवून मी उभा राहिलो.
डब्यातल्या लोकांना नक्की कशाला घाबरावं तेच बहुदा कळत नव्हतं. गोळ्यांच्या आवाजानं पलिकडच्या डब्यातून वायरलेसवर मेसेजेस येऊ लागले होते. मी वायरलेस उचलून एका गृहस्थाच्या हातात दिला आणि सगळं ठीक असल्याचं तेलुगुत सांग म्हणून समजावलं. पण आवाज ऐकून काहीतरी शंका येणारच पलिकडे हे मी जाणून असल्यानं दोन डबे जोडण्याच्या इंजिनच्या दिशेचा दरवाजा बंद करून मी इंजिनच्या विरूद्ध दिशेच्या दरवाज्याकडे गेलो. तिथून मागे दोनच डबे होते. दरवाजा बंद करून मी जास्तीत जास्त पाच मिनिटं जास्त मिळवली असती. पण काहीतरी करणं भागच होतं. मला खरं तर अजून कळत नाही की मी जे काही करत होतो, ते कुठल्या आंतरिक ऊर्मीनं करत होतो. मी मागच्या दरवाजाकडे पोचलो, तोवर ट्रेन थांबली. मी शांत उभा राहून कानोसा घेऊ लागलो. आणि अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले. मी घाईगडबडीनं मागचाही दरवाजा बंद केला आणि एका सीटमागे उभा राहिलो.
जवळपास पंधरा मिनिटांनी आमच्या कंपार्टमेंटचा दरवाजाच्या कुलूपावर गोळीबार झाला आणि दरवाजा तोडून पोलिस आत आले. नशीबानं माझ्या वेळीच लक्षात आलं नाहीतर मी झडप घालण्याच्या तयारीत होतो.
पोलिसांनी धडक कृती करून नक्षलवाद्यांचा बीमोड केला होता. आणि त्यानंतर डब्यातल्या इतर लोकांनी माझ्या शौर्याची गाथा पोलिसांना सांगायला सुरूवात करेपर्यंत मी हळूच सटकण्याचा प्रयत्न करत होतो. पण एका पोलिसानं मला गाठलंच. "
"दोन दिवसांत सहा खून?", रेखाचे डोळे विस्फारले होते.
"खून? खून म्हणू शकतो आपण त्याला?" नरेंद्र स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला, "ह्म्म. कदाचित. की वध? की हत्या? की फक्त मृत्यू??"
रेखा काहीच बोलली नाही. त्याचा चेहरा शांत होता. कोरा नव्हता नेहमीसारखा. त्याला आतून कसलंतरी समाधान वाटत होतं.
"त्यानं माझी चौकशी सुरू केली. मी त्याला माझी खोटीच माहिती दिली. शंकर नावाची सुरूवात तिथेच झाली. आणि त्यानं मला नक्षलवाद्यांमध्ये शिरून पोलिसांचा खबर्या बनण्याची ऑफर दिली. मी कसलाही विचार न करता हो म्हटलं.
त्यानं मला ट्रेन ऑपरेशनमध्ये पकडलेला नक्षलवादी म्हणून ताब्यात घेतलं आणि मी तुरूंगामध्ये नक्षलवाद्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या पोलिसानं माझी एका नक्षलवाद्यासोबत तुरूंगातून पळायची सोय केली आणि मी त्यांचा विश्वास मिळवण्याची सुरूवात झाली."
"तू नक्षलवाद्यांमध्ये पोलिसांचा खबर्या होतास?" रेखाला एखादी गुंतागुंतीची रहस्यकथा वाचावी तसं वाटू लागलं होतं.
"नाहीतर मग इतक्या सहजी बाहेरचा माणूस त्यांच्या गोटात शिरेल कसा आणि पोलिस रेकॉर्डमध्ये रतनला मी सहजासहजी कसा रिप्लेस करेन?"
"मग काय बिनसलं नक्की?"
"बरंच काही." नरेंद्र बसच्या पुढच्या काचेतून बाहेर पाहत म्हणाला.
समोर एक पोलिस चेकपोस्ट होती आणि बस हळूहळू रांगेतून पुढे सरकत होती.
"भणगेंच्या मदतीनं मी सिक्युरिटी टेप्समधून रहस्यमयरित्या हरवलेल्या, रतनला तुरूंगात भेटायला येणार्या बाईचा चेहरा शोधून काढला आहे." सिन्नरकर हातातली फाईल टीपॉयवर ठेवत म्हणाले.
"ही बाई आणि रतनसोबत पळालेली बाई. दोघी वेगवेगळ्या आहेत." रमेशनं फाईल पाहून रागानंच परत बंद केली.
"आर यू शुअर?"
"शिंदेंनी जेलमधल्या प्रत्यक्षदर्शीच्या वर्णनावरून बनवलेलं हे बघा पोर्ट्रेट." रमेशनं खिशातून दुसरा एक कागद काढून टीपॉयवर ठेवला.
"ह्म्म." सिन्नरकर दोन्ही चित्रं पाहत म्हणाले.
"मलाच जावं लागेल आता तिथे."
"तुम्हाला वाटतंय ही चांगली आयडिया आहे?" सिन्नरकर अविश्वासानं म्हणाले.
"आता वाटण्यासारखं काय आहे साहेब? आय हॅव ऑलरेडी स्क्रूड अप माय लाईफ. आता झालेल्या चुका अन केलेले अन्याय निस्तरायचेत. राजे आणि डॉ. काळेंच्या खुनामागे कोण आहे ते मला रतनशिवाय कुणी सांगू शकणार नाही."
"पण कोल्हेचे पाठीराखे?"
"त्यांनाही रतन हवाय, मलाही रतन हवाय. पाहतो मी कसं जमवायचं ते. पण आता तुम्ही ह्या सगळ्यात पडू नका साहेब. आधीच माझ्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागलेला आहे."
"तुम्ही माझ्यावर उपकारच केलेत असं म्हणेन मी रमेश. पण ते असू दे, मी काय करू ते सांगा फक्त. माझे काही कॉन्टॅक्ट्स अजूनही स्वच्छ आणि चांगले आहेत." सिन्नरकर हसत म्हणाले.
"ह्म्म. ह्या बाईचा काही पत्ता लागतो का ते पाहू शकाल का?" रमेश सिक्युरिटी कॅमेरातल्या फोटोकडे बोट करत म्हणाला."
"ऑलरेडी माहिती काढलीय मी रमेश. ती पुण्यातल्या एका शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे आणि तिथल्या आमदाराची 'खास मैत्रिण'. किंवा आपण असं म्हणू, की ती आमदाराची 'खास मैत्रिण' आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षिका आहे. हा तिचा पत्ता." सिन्नरकर त्याच फायलीतला दुसरा कागद काढत म्हणाले.
"परफेक्ट प्लेस टू स्टार्ट." म्हणत रमेश उठून उभा राहिला.
"एक विचारू का रमेश?" सिन्नरकर अचानकच म्हणाले.
रमेश थांबून त्यांच्याकडे पाहू लागला.
"असं काय झालं की तुम्ही एकदम मुंबईत परतलात आणि आता जीवावर उदार होऊन लढायला उभे राहिला आहात? नुसत्या कोल्हेला मारण्यामुळे हे घडणं अवघड आहे."
रमेश थोडा वेळ शून्यात पाहत राहिला.
"कोल्हेचा मृत्यू हा ट्रिगर होता साहेब. पण खरं कारण आहे साक्षात्कार. कसला, कसा ते शब्दांत सांगणं कठीण आहे."
-----
बस थांबल्यावर रेखा काळजीनंच नरेंद्रकडे पाहू लागली.
"आता इथेही गोळीबार?" तिनं हळूच विचारलं.
"गरज पडली तर." तो तितकाच हळू म्हणाला, "मागे झालेल्या गोळीबाराची बातमी पोलिसांपर्यंत पोचलेली दिसते."
गाडीत पोलिस चढले आणि गाडीतल्या एकूण सात-आठ लोकांकडे पाहून आयडेंटिटी प्रूफ मागू लागले. नरेंद्रनं शर्टाच्या आतल्या कापडाच्या तुकड्यानं शिवून ठेवलेलं छोटं पॅकेट काढलं. त्यात दोन ड्रायव्हिंग लायसन्सेस होती. पोलिस जवळ येताच त्यानं पुढे केली.
"नरेंद्र विजयकांत हजारे और रेखा नरेंद्र हजारे। मुंबईसे यहां क्या करने आये हो?" पोलिसानं साशंकपणे विचारलं.
"ट्रेकिंग करने आये थे।"
"सामान कहां है?"
"चोरी हो गया साहब। कपडे देखिये हमारे. चोर का बहुत पीछा किया।" नरेंद्र थोडासा घाबरल्यासारखा आणि चिडल्यासारखा बोलत होता, कुणाचाही त्याच्या गोष्टीवर विश्वास बसावा.
"तो चोर लायसन्स छोड गया क्या?"
"लायसन्स और थोडे पैसे यहां रखे थे साहब।" नरेंद्रनं नुकताच फाडलेला चोरखिसा दाखवला, "अनजान जगह पे यह सब होगा समझकेही आते हैं हम। पहला ट्रेक नही है हमारा।"
"तो यह बॅग किसका है?" पोलिस त्याच्या सीटखाली बोट दाखवत म्हणाला.
नरेंद्रनं एकदम प्रश्नार्थक चेहरा करत खाली पाहिलं आणि घाबरून उठला.
"यह तो पहलेसेही होगा। बम होगा क्या इसमें?" असं म्हणत रेखाचा हात धरून तिला ओढत सीटपासून दूर गेला.
पोलिसही एकदम चक्रावले. ड्रायव्हरला विचारायला त्यांनी घाईघाईनं पुढे बोलावलं. एव्हाना पुढे-मागे गाड्यांची बरीच गर्दी होऊ लागली. त्यातली माणसं उतरून काय सुरू आहे ते पाहू लागली. ड्रायव्हर ती नरेंद्रचीच बॅग असल्याचं म्हणाला तशी नरेंद्रनं रॅकवर ठेवलेली बंदुकांची बॅग हातात घेतली.
"यह हमारा है। उसका पता नहीं.. बम हो सकता है बम..." असं तो जोरात म्हणाला आणि रेखाला जवळपास ओढतच बसमधून खाली उतरला. पोलिसांसकट सगळेच गोंधळले. तो खाली जमलेल्या गर्दीला बॉम्बबद्दल सांगू लागल्यावर तिथे एकच पळापळ झाल. पण रेखा आणि नरेंद्र एका पोलिसांच्या गाडीच्याच आश्रयाला गेले.
मग बॉम्बस्क्वॉड आलं पण बॅगेत काहीच नव्हतं. मग पोलिसांनी परत नरेंद्रला बाजूला घेतलं.
"तुम्हारा सामान चोरी हुआ, तो यह बॅग कैसे रह गया?" पोलिसानं नरेंद्रच्या हातातल्या बॅगेकडे बोट दाखवलं.
"यह खाली बॅग है साहब, खाने का सामान था इसमे।" नरेंद्रनं रिकामी बॅग उघडून दाखवली.
थोड्या वेळानं पोलिसांनी बस पुढे सोडल्यावर रेखा हळूच नरेंद्रच्या जवळ सरकली आणि म्हणाली, "बंदूका कुठे आहेत?"
""ह्या काय इथे?" त्यानं हातातली बॅग उघडून दाखवली.
"मग मगाशी?"
"मी पोलिस व्हॅनच्या आश्रयाला गंमत म्हणून नव्हतो गेलो." नरेंद्र डोळे मिचकावत म्हणाला.
"पण एव्हढी मोठी रिस्क?"
"अवघड नावं घेतली की आयकार्डं विश्वसनीय वाटतात. आणि पोलिसांकडेच मदत मागून घाबरल्याचा उत्तम अभिनय जोडीला असला की पोलिस सहसा विश्वास ठेवतात."
"ह्म्म. पण आता पुढे काय?"
"आता पुढे मुंबईला आपल्या घरी जायचं मिसेस हजारे."
क्रमशः
Please post the next part early
ReplyDeletevery interesting.....please keep it up......
ReplyDelete