6/11/2012

मृत्युदाता -१९ (अंतिम-पूर्वार्ध)


"रमेश, त्या शिक्षिकेचं काय झालं?" सिन्नरकर बसत म्हणाले
"जर मी त्या लोकांना व्यवस्थित ओळखतो आणि तुम्ही सांगितलेली तिची माहिती खरी आहे, तर एकतर ती गायब असेल किंवा मेलेली असेल." रमेश खोलीवर एक नजर फिरवत म्हणाला.
"डोन्ट वरी रमेश, ह्या जागेबद्दल मी पर्सनली खात्री केलेली आहे. इथे आपल्याला व्यवस्थित डिस्कस करता येईल. कर्नलची माणसं इथवर पोचणार नाहीत."
"हम्म"
"मग पुढे काय केलंत तिचं?"
"मी तिचं नाव बेपत्तांच्या यादीत शोधलं आणि तिथे मला ते सापडलं. बरोब्बर दोन वर्षांपूर्वीपासून ती बेपत्ता आहे आणि कधीही सापडली नाही."
"ती कल्पना मलाही होतीच."
"मग?"
"ती कुणाची मैत्रिण होती ते महत्वाचं होतं."
"कुणाची?"
"उत्तमराव बेळे-पाटलांच्या पुतण्याची."
"म्हणजे खुन्याला भेटायला, खून झालेल्याच्याच पुतण्याची मैत्रिण?"
"एक्झॅक्टली. हे प्रकरण दिसतं तितकं सरळ नाहीये रमेश."
रमेश विचारात गढला होता इतक्यात दरवाजा वाजला.
"शिंदे आले असतील." म्हणून रमेशनं दार उघडलं.

-----

तो त्याच्या कोठडीमध्ये नेहमीसारखा उंचावरच्या छोट्या खिडकीतून येणार्‍या थोड्याशा प्रकाशाकडे पाहत भिंतीला टेकून बसला होता, जेव्हा हवालदारानं त्याला दरवाजाजवळ बोलावलं आणि कुणीतरी भेटायला आलं असल्याचं सांगितलं आणि हातांसाठीची फट उघडली. 'ती'च असेल असा विचार मनाशी करत त्यानं नेहमीप्रमाणे पाठमोरा होऊन दोन्ही हात छोट्याशा फटीतून बाहेर काढले. हवालदारानं हातांना हातकड्या अडकवल्यावर त्यानं हात आत घेतले. हवालदारानं फट बंद करून दरवाजा उघडला. त्याबरोबर तो बाहेर पडला. हवालदाराच्या मागे चालत चालत तो मुख्य बराकीत आला आणि तिथनं इतर सेल्सच्या समोरून जात ते एका वेगळ्या कॉरिडॉरमध्ये आले. तिथनं सरळ चालत ते भेटींच्या कक्षात शिरले. भल्याथोरल्या काचेच्या अलिकडे जाळी आणि त्याच्याअलिकडे सात-आठ कैदी ओळीनं बसले होते आणि काचेच्या पलिकडे त्यांना भेटायला आलेली मंडळी ज्याच्या-त्याच्या समोर बसलेली होती. बोलण्यासाठी दोन्हीकडे टेलिफोन दिलेले होते. भेटायला आलेल्या मंडळींच्या मागे तीन बंदुकधारी हवालदार उभे होते आणि त्यामागे खोलीत शिरण्याचा दरवाजा. त्यामागे मात्र केवळ एका कॉरिडॉरची भिंत दिसत होती. मागचा कॉरिडॉर बराच मोठा असावा कारण तिथे नैसर्गिक प्रकाश फारसा दिसत नसे. त्याची नजर हॉलभर तिला शोधत होती. पण ती कुठेच दिसेना. तो तसाच खोलीत शिरल्याजागी स्तब्ध उभा राहिला. हवालदारानं ते पाहून त्याला टोकलं आणि नजरेनंच काय झालं विचारलं, पण तो नेहमीसारखाच गप्प राहिला आणि खोलीच्या दरवाज्याकडे एकटक पाहत राहिला. हवालदारानं त्याला हाताला धरून ओढलं आणि एका रिकाम्या खुर्चीच्या दिशेनं ढकललं. त्यानं समोर पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. त्यानं हवालदाराकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. हवालदारानं त्याला बसायची खूण केल्यावर तो खुर्चीत बसला. लगोलग त्याच्यासमोरच्या टेलिफोनमध्ये काहीतरी वाजलं. फोनचं रेकॉर्डिंग सिस्टम बंद झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. खोलीतल्या सिक्युरिटी कॅमेर्‍यांवरचे लाईट एकदम फ्लिकर होऊ लागले आणि ती आत शिरली. दिसायला फार सुंदर नसली तरी ठसठशीत. नाक थोडंसं अपरं, गव्हाळ वर्ण, कोरलेल्या भुवया आणि स्लीव्हलेस ब्लाऊज सोबत ऑफ व्हाईट साडी अशा नेहमीच्याच पेहरावात ती आली होती. ती त्याच्याकडे पाहून हसली तरी त्याचा चेहरा कोराच होता. ती त्याच्यासमोर बसली आणि तिनं फोन उचलून त्यालाही तसंच करायची खूण केली.
"तब्येतीची काळजी घे स्वतःच्या. तुला आम्ही काही होऊ देणार नाही. लवकरच सुटका होईल." एव्हढं बोलून तिनं फोन ठेवला आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागली.
त्यानं फक्त मान डोलावली, फोन खाली ठेवला.
ती उठली आणि चटकन निघून गेली. त्याबरोबर रेकॉर्डिंग मशीन पूर्ववत झालं आणि कॅमेरे पूर्ववत झाले. त्याबरोबर तो ही उठला आणि चालू लागला. पुनश्च स्वतःच्या कोठडीच्या दिशेनं चालू लागल्यावर हवालदारानं त्याला बंदुकीनं ढोसलं. त्यानं प्रश्नार्थक चेहर्‍यानं हवालदाराकडे पाहिलं.
"मोकळा वेळ." हवालदार म्हणाला आणि त्यानं मैदानाच्या दिशेनं हात केला. नाईलाजानंच तो मैदानाच्या दिशेनं चालू लागला. ह्या सगळ्याचा त्याला कंटाळा आला होता.
'किती दिवस अजून जिवंत राहायचं आहे तेच कळत नाही. आत्तापर्यंत पाच वेळा आत्महत्या केली असती मी. ह्या लोकांची निवडणुकांसाठी राजकारणं आणि माझ्यावर जिवंत राहायची बळजोरी. प्रातर्विधी करतानाही माणूस सोबत असण्यापेक्षा वाईट अवस्था ती कोणती' असा स्वतःशी विचार करतच तो मैदानात जाळी पार करून शिरला आणि नेहमीच्या बेंचवर जाऊन बसला. आज तो थोडासा लवकर आला होता. बाकीच्या कैद्यांना एक एक करून आत सोडायला आत्ता सुरूवात होत होती. दूर एका कोपर्‍यात 'अहिंसा ट्रस्ट'चा तंबू होता. तिथे स्वयंसेवक चटया टाकत होते. त्या तंंबूच्या मागे १०० फूटांवर तुरूंगाची आतली भिंत होती. किमान २० फूट उंचीच्या त्या भिंतीवर दोन फुटांचं तारेचं कुंपण होतं. त्याच्या पलिकडे जी मोकळी जागा होती त्यामध्ये दर पन्नास फुटांवर एक गार्ड टॉवर होता. आणि त्यामागे तुरूंगाची दुसरी भिंत जी पंचवीस फूट उंच होती. त्यावर जे तारेचं कुंपण होतं, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सोडलेली होती. प्रत्येक गार्ड टॉवरमध्ये एक बंदुकधारी गार्ड होता. त्याची नजर अशी भिरभिरत होती, की त्याच्याकडे पाहणार्‍याला वाटावं तो सहज इकडेतिकडे बघतोय. पण तो रोज तिथल्या प्रत्येक गार्डची हालचाल पाहायचा. त्यांतल्या कुणाचं कामामध्ये जास्त लक्ष नसतं, कधीतरी वाजणारे हॉर्न्स आणि लोकांच्या येणार्‍या अत्यंत क्षीण आवाजावरून पलिकडे नक्की काय असावं ह्याचा तो अंदाज बांधत असे. त्याला काही करायचं नसलं तरी त्याचं डोकं असंच धावत असे.
तेव्हाच नेहमीप्रमाणे पुराणिक त्याच्यादिशेनं आला आणि शेजारी बसून तो पाहत होता त्या दिशेनं पाहू लागला.
"गांधीवादी येतील आता. येणार आहेस काय आज? फुल टीपी चालतो. लोक इमोशनल होतात उगाच." पुराणिक नेहमीसारखाच एकटा बोलू लागला.
त्याची नजर अजूनही भिरभिरतच होती ती पलिकडच्या बाकावर बसलेल्या ग्रुपवर स्थिरावली. त्यातल्या वल्लभवर क्षणभर जास्तच. त्या दोघांची नजरानजर झाली आणि ते दोघे पुन्हा वेगवेगळ्या दिशेला पाहू लागले.
तेव्हाच 'अहिंसा'वाल्यांचा एक ग्रुप त्यांच्या दिशेनं चालत येऊ लागला. त्यातले दोनजण वल्लभच्या ग्रुपकडे गेले आणि बाकीचे दोघे, त्यात एक स्त्री आणि एक पुरूष होते, ते पुराणिक आणि त्याच्याकडे आले.
"ग्रुप थेरपीसाठी येता का? मनःशांती लाभेल." त्यांच्यातला पुरूष बोलू लागला. पण त्याची नजर त्यातल्या स्त्रीवर स्थिरावली. तीदेखील त्याच्याकडेच पाहत होती.
"चला तुम्हीदेखील. विचार नका करू फार." ती बोलत होती. मैदानात प्रचंड ऊन होतं, त्यामुळे त्याच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप येत होती. त्याला फक्त तिचे डोळे नीट दिसले. चॉकलेटी रंगाचे त्याच्यावर रोखलेले.
त्याला काय वाटलं ते त्यालाही कळलं नाही. तो चटकन उठला.
"रतन." जाळीपलिकडून हवालदाराचा घोगरा आवाज आला, "कुठे जातोयस?"
त्यानं जागच्याजागीच वळून हवालदाराकडे पाहिलं.
"त्यांना आमच्यासोबतच घेऊन जातो आहोत." तिनं हवालदाराला नम्रतेनं सांगितलं. त्याबरोबर हवालदारानं दुसर्‍या एकाला स्वतःच्या जागी उभं राहायला बोलावलं आणि तो त्याच्यासोबतच तंबूकडे निघाला.
तंबूजवळ गेल्यावर हवालदार थोडासा लांब उभा राहिला आणि रतन आणि पुराणिक केलेल्या गोलामध्ये बसले. मग गांधीजी म्हणायचे त्या प्रार्थना म्हणायला सुरूवात झाली. त्या गोलाच्या आतमध्ये, स्वयंसेवकांसोबत दोन आणि गोलाच्या बाहेर चार हवालदार उभे होते. सगळेजण तल्लीन होऊन प्रार्थना म्हणत होते पण रतन अर्थातच गप्प होता. पुराणिक इथेतिथे पाहण्यात मग्न होता तेव्हा ती रतनच्या शेजारी येऊन बसली आणि त्या आवाजामध्येच हळूच त्याच्या कानात ती काहीतरी कुजबुजली. त्याबरोबर रतन एकदम चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. त्याची नजर तिच्या लांबसडक केसांकडे गेली पण तो लगेच भानावर आला आणि चटकन उठून उभा राहिला. त्याबरोबर हवालदारानं बंदूकीची नळी त्याच्या पाठीवर लावली. तिनं गडबडीनं उठून सारवासारव केली पण तो तिथून निघून गेला.

-----

"तीच त्यांची पहिली भेट. त्यानंतर दोन दिवसांनी रतनला फाशी डिक्लेअर झाली आणि त्यानंतर दोनच दिवसांत सुप्रीम कोर्टात अपील झालं." शिंदे बोलत होते.
"म्हणजे तिचा अन ह्या अपिलाचा काही परस्परसंबंध असावा असं तुम्हाला वाटतं?" रमेश स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला.
"शक्य आहे. पण अपीलांवर रतनच्या सह्या होत्या. ते इतकं सोपं नसतं. कायद्याची जाणकार मंडळी असल्याखेरीज असलं काही अशक्य आहे." सिन्नरकर थोडा विचार करून म्हणाले.
"ती वकीलच आहे. चांगली नावाजलेली." रमेश म्हणाला.
"पण ती रतनला पळवेल कशाला मग? आणि काय रिलेशन आहे हे सगळं?" शिंदे.
"मग नंतर काय झालं पण?" रमेशनं विषय पूर्वपदावर आणायला म्हटलं.
"त्यानंतर तेच. त्यानं अन्नपाणी वगैरे सोडलं आणि एकदम खंगला. त्यानंतर सुप्रीम कोर्टातही फाशी टिकली आणि त्यानंतर जेव्हा माफी याचिका गेली, तेव्हा त्याचं आत्महत्यासत्र सुरू झालं. तो कुणाशीच फारसा जवळ नव्हता, आणि एकांतवास असल्यानं कुणाला काही माहित नाही, त्यामुळे हा कालखंड पोलिस सांगतात त्यावरच अवलंबून आहे."
"मग पुढे?"
"मग एक दिवस पुराणिक त्याला जबरदस्तीनं ग्रुप थेरपीला घेऊन गेला आणि म्हमद्याच्या सांगण्याप्रमाणं पुराणिक, ती आणि रतन तिघे जवळजवळ बसले. रतनची इच्छा नसूनही रतननं बरंच काही ऐकून घेतलं.

-----

"तुला ऐकायची इच्छा नसली तरी एकदा मी काय बोलते ऐकून घे. तुझा माफीअर्ज टाकण्याइतकी रिस्क मी घेतलीय तर एव्हढं तर तू माझ्यासाठी करूच शकतोस." ती हे म्हणाल्याबरोबर त्यानं चिडून वर पाहिलं.
पुराणिकनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "मीच तिची मदत केलीय."
आता त्यानं पुराणिककडे रागानं पाहिलं.
"काय दिलंय रे तुला ह्या लोकांनी? तुला मरायचंय मरायचंय म्हणतोयस? पण इतके दिवस तुझ्या केसचं मायलेज घेत होते आणि तुला मरू देत नव्हते. आता हिनं तुझा जीव वाचवायचं ठरवलं तर तुला मारायला निघालेत कारण आता तुझं जिवंत राहणं त्यांच्या फायद्याचं नाही." पुराणिक पुढे म्हणाला, "ही काय सांगते ते ऐक, मग तुझ्या डोक्यात प्रकाश पडेल."
त्यानं तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
"मी सायली सरपोतदार. त्यादिवशी म्हणाले त्याप्रमाणे तुमचा जीव वाचवणार्‍या सब-इन्स्पेक्टरची पत्नी." तिचा आवाज बदलला तरी चेहरा तसाच करारी होता. त्याला समोरच्याचं नीट निरीक्षण करण्याची सवयच होती. ती पुढे बोलू लागली, "तुमचा जीव वाचवल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं गप्प राहू लागलात, त्यावरून माझ्या नवर्‍याला तुमच्याबद्दल एकूणातच संशय येऊ लागला. कारण तुम्हाला बेळे-पाटलांच्या काफिल्याची जेव्हढी माहिती होती. त्यावरून तुम्हाला कुणीतरी आतून खबर दिली असण्याची शक्यता त्यांना नक्की वाटू लागली. त्यातच बेळे-पाटलांसारखं व्यक्तिमत्व मेल्यावर सहानुभूतीच्या लाटेनं महाराष्ट्रात शंभर टक्के त्यांच्याच पक्षाचं सरकार परत येणार हे निश्चित झालं आणि तुमची केस इमानदारीनं चालवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हवा उभं करायचं काम सुरू असल्याचं तुम्हालाही कळत असेलच. तुम्हाला मरू देत नव्हते असं मला ह्यांच्याकडून कळलं." तिनं पुराणिककडे पाहून म्हटलं त्याबरोबर त्यानं चिडून त्याच्याकडे पाहिलं.
"ती काय सांगतेय ते नीट ऐक मग तुला कळेल मी का तिला सर्व सांगितलं ते."
"तुम्हाला ते काय म्हणताहेत ते कळतंय?" ती आश्चर्यानं म्हणाली.
"होय. आम्ही काही वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं तेव्हा बनवलेली सायलेंट भाषा आहे. त्याला बोलता येतं आणि मला समजते." पुराणिक म्हणाला, "पण ते सोडा. पुढे सांगा."
"तर ह्या मोठ्या हालचालीकडे पाहून विराजनं म्हणजे माझ्या नवर्‍यानं स्वतः तपास सुरू केला आणि सिक्युरिटी कंपनीतल्या माणसामार्फत ते प्रादेशिक पक्ष कार्यालयातल्या एका कार्यकर्त्यापर्यंत पोचले. त्याच्याकडून त्यांना बीडच्या प्रदेशाध्यक्षाचं नाव कळलं. म्हणजे पक्षातल्याच लोकांनी बेळे-पाटलांचा काटा काढला असावा असा त्यांचा ठाम समज झाला."
"अशक्य आहे ते. मला सुपारी विरोधी पक्षवाल्यांकडून मिळाली होती." त्याच्या तोंडून चक्क शब्द फुटले आणि एकदम प्रार्थना संपून शांतता झाली.
मग सगळ्यांनी आपापले आठवडाभरातले अनुभव सांगायला सुरूवात झाल्यावर ते तिघेजण गप्प बसले.

-----

"त्यादिवशी म्हमद्यानं ते तिघे काय खिचडी पकवतात त्यावर लक्ष द्यायचं ठरवलं आणि पुढच्या आठवड्यात त्याच्याजवळ बसायचं ठरवलं."
"पण जर तिला असंच काही करायचं होतं तर तिनं घरी का सांगितलं की ती 'अहिंसा ट्रस्ट' मध्ये जाते आहे? तिला ते गुप्त ठेवता आलं असतंच ना?" रमेश स्वतःशीच बोलला.
"ती प्रो नाहीय रमेश. आणि तिचा संबंध ह्या सगळ्याशी असा जोडला जाईल असं तिला वाटलंही नसेल. कारण तुरूंगात हे स्वयंसेवक खरी नावं सांगत नाहीत. आणि तिच्या घरपर्यंत कुणी पोचेल ह्याचा तिला अंदाजही आला नसेल." सिन्नरकर विचार करत म्हणाले, "तुम्ही तिच्या नवर्‍याचे मित्र निघणं हा केवळ योगायोग ज्यामुळे ती कोण आहे ह्याची ओळख पटली, नाहीतर कसं शक्य होतं."
"बीसाईड्स आपण अंदाज बांधून चाललोय की ही तीच आहे जी रतनसोबत पळाली. कारण म्हमद्यानं पळणारीला दोनशे फूटांवरून पाहिलं आणि त्याचं म्हणणं आहे की तिनं केस कापून बॉयकट केलेला होता."
"आणि ट्रस्टच्या सांगण्यानुसार तिनं नोकरी रतनच्या पळण्याच्या दोन महिने अगोदर सोडली होती. त्यामुळे आपण फक्त स्पेक्युलेट करू शकतो की ही ती होती."
"पण म्हमद्या छाती ठोकून सांगतोय ना की तुरूंगात भेटायला येणारी तीच पळून जाणारी नव्हती."
"हो पण दॅट डझन्ट प्रूव्ह एनीथिंग. ती कुणीतरी तिसरीही असू शकते." सिन्नरकर म्हणाले.
रमेशनं डोक्याला हात लावला. "नथिंग मेक्स सेन्स. इमिग्रेशन रेकॉर्ड्सप्रमाणे विराजची बायको एक वर्षाच्या व्हिजावर टर्कीला गेली आहे आणि माझ्याकडे तिच्याविरूद्ध काहीच नसल्यामुळे तिथल्या एम्बसीला काही विचारूही शकत नाही."
"वी हॅव टू अझ्युम की विराजची बायको सायलीच रतनसोबत पळाली आहे."
"ऍझम्प्शन्सवर आपण किती पुढे जाणार?" सिन्नरकर.
"ऍझ्युम नाही केलं तर कुठेच जाणार नाही आपण. पुढे बोला शिंदे." रमेश रेस्टलेस झाला होता.
"त्या आठवड्यात दुसरं आक्रित घडलं. रतन वल्लभकडे स्वतःहून गेला आणि त्याच्याशी बोलू लागला..."

-----

"गडचिरोली का? कुठलं गाव?" तो विचारत होता.
"सिरोंचा." वल्लभ म्हणाला, "पण तुला कसं कळलं की.."
"त्यानं काय फरक पडतो." तो तुटकपणे म्हणाला.
"पण आज माझ्याकडे?"
"तू रोज आमच्यावर नजर का ठेवून असतोस आणि माझा जीव वाचवण्याचं सत्कार्य तू का केलंस असे प्रश्नही मी विचारू शकतो, पण मला आत्ता त्यांची उत्तरं नको आहेत."
"मग?"
"मला एका दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर हवंय." तो शांतपणे म्हणाला.
"काय?"
"आम्ही दोन महिन्यांनंतर जेलमधून पळून जाणार आहोत. तू येणार का?"
"काय?" वल्लभ एकदम आश्चर्यचकित झाला.

-----

"त्या दोघांचं काय बोलणं झालं हे म्हमद्याला कळलं नाही पण म्हमद्यानं हे त्याचा खास मित्र बबनला सांगितलं आणि दोघांनीही रतनच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते दोघेजण पुढल्या आठवड्यामध्ये रतनच्या जवळच बसले आणि प्रार्थना सुरू झाल्याबरोबर कान टवकारून बसले. पण रतन त्यादिवशी पूर्णवेळ गप्प बसला आणि एक शब्दही बोलला नाही. फक्त इथे तिथे विचित्रपणे पाहत राहिला आणि ती आणि पुराणिक दोघेजण त्याच्याकडे टक लावून पाहत राहिले. पण वल्लभ तिथे कुठेच जवळपास नव्हता.
प्रार्थना संपल्याबरोबर रतन उठला आणि तिथून निघाला, त्याबरोबर म्हमद्या आणि बबन त्याच्यामागे गेले. तो थेट वल्लभकडे गेला आणि ते दोघे फक्त एकमेकांच्या शेजारी पंधरा मिनिटं काहीही न बोलता बसून राहिले..." शिंदे बोलतच होते.

-----

"तो काय बोलला हे तुम्हाला कळलं का?" पुराणिकनं तिला विचारल्यावर तिनं नकारार्थी मान डोलावली.
"इथे जे दोघेजण बसलेले, ते आपलं बोलणं ऐकायला आलेले होते, त्यामुळे तो फक्त संकेतांमध्ये बोलून गेला." पुराणिकनं म्हमद्या आणि बबनच्या जागेकडे इशारा करत म्हटलं.
ती काहीच बोलली नाही.
"तुमच्या नवर्‍याला सापडलेल्या डायरीतली मी त्याला सांगितली. ती नावं ऐकल्यावर त्यालाही खात्री पटलीय की तुमच्या नवर्‍याचा संशय योग्य आहे. हे खूप मोठं षड्यंत्र आहे आणि त्यामध्ये त्याच्या मनःस्थितीचा फायदा घेऊन त्याला वापरलं गेल्याचं त्यालाही लक्षात आलंय. तुम्ही आता परत इथे येऊ नका. आता बरोब्बर दोन महिन्यांनी २५ तारखेला तुम्ही जेलसमोरच्या पोस्ट ऑफिसच्या गच्चीवर येऊन उभं राहायचं."
"काय?" तिला काही कळेनासं झालं.
"दॅट्स हाऊ इट वर्क्स. त्याचे प्लॅन्स फक्त त्यालाच कळतात."
"पण हा माझा प्लॅन असायला हवा. माझ्या नवर्‍याचा खून झालाय, मला सूड हवाय."
"तुम्ही त्याच्याकडे आला आहात मदतीसाठी, तर आता त्याच्याच कलांनी घ्या माझं ऐकाल तर. तो जितक्या सहजतेनं हे सर्व करू शकेल, तितकं कुणीही करू नाही शकणार."
"मग तो इतके दिवस का पळत नव्हता?"
"कारण त्याला मरायचं होतं."
"मग आता काय झालं?"
"त्याचा वापर झाल्याचा त्याला राग आलाय. मुळात वापर त्याचा वापर होत होता हे लक्षात आल्यानंच त्यानं नक्षलवादी गट सोडला आणि तो मुंबईत आला. मुंबईत तो फक्त मला ओळखत होता कारण मी अधूनमधून नक्षलवाद्यांचे फंड ट्रान्सफर करत असे. त्यानं जगण्याची इच्छाच गमावली होती. पण त्याला काहीतरी चांगलं करून मरायचं होतं. त्यामुळे ह्या देशातल्या सर्वाधिक भ्रष्ट नेत्याची सुपारी निघाली आहे हे कळताच त्यानं माझ्यामार्फतच ती सुपारी मिळवली. माझा काही संबंध राहू नये म्हणूनच मी स्वतः पकडला जाऊन आत येऊन बसलो. आणि त्यानं तिथे काम फत्ते करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण आधी तुमच्या नवर्‍यानं मग तुम्ही आणि मग इथे वल्लभनं त्याचा वारंवार जीव वाचवला. आणि आता त्याला कळलं की त्यानं जे केलं ते व्यर्थच होतं. मृत्यूच्या दाढेतून इतक्या वेळा वाचण्यालाही काही अर्थ असावा."
ते दोघेजण चटया गोळा करण्याच्या मिषानं बोलत होते. चटया आवरून झाल्यावर कोपर्‍यामध्ये ठेवलेल्या मोठ्या सतरंजीवर त्यांनी सर्व चटयांच्या गुंडाळ्या ठेवल्या आणि पुराणिक तिथून निघून गेला.

-----

"..त्यानंतर पुराणिक परत आला आणि त्यानं रतनला काहीतरी खूण केली त्याबरोबर रतन उठून निघून गेला आणि वल्लभ आणि पुराणिक आपापल्या रस्त्यानं गेले."
"एक मिनिट. आपण हे सगळं वर्णन का ऐकतो आहोत?" सिन्नरकर शिंदेंना मध्येच रोखत म्हणाले.
"कारण ह्यावरून आपल्याला काही क्लू लागू शकतो का हे कळेल." रमेश म्हणाला.
"पण तू म्हमद्याची कुंडली मांडणार होतास त्याचं काय झालं?"
"त्याच्या घरच्यांकडे अचानक पैसे आले आहेत. पण कुठून आले हे कसं कळणार?"
"अजून कुठून येणार?" सिन्नरकर सूचकपणे म्हणाले.
"ओह राईट. इट मस्ट बी पुराणिक."

आणि सिन्नरकरांचा फोन वाजू लागला. पाच मिनिटं फोनवर बोलून त्यांनी फोन खाली ठेवला.

"ओरिसामध्ये वल्लभची डेड बॉडी पोलिसांना मिळाली आहे." ते म्हणाले आणि रमेश आणि शिंदेंकडे पाहू लागले.

"तुरूंगातून पळताना बबनचा खून झाला." शिंदे म्हणाले.
"लास्ट वी हर्ड, रतन पूर्व भारतातच कुठेतरी होता आणि आपल्याला वल्लभ मेल्याची खबर आली आहे." रमेश म्हणाला.
"आता मी म्हमद्याची चूक समजून असं ऍझ्युम केलं की तुरूंगातून पळताना रतनसोबत ती शिक्षिका होती. आणि ती पण आता मेली आहे. तर जर का मी रतनचा चौथा साथीदार असेन, तर मी कुठे असेन?" सिन्नरकर रमेशकडे पाहत म्हणाले.
रमेशची ट्यूब पेटली, "एकतर स्वर्गात किंवा देशाबाहेर."
शिंदे बाकी दोघांकडे पाहत होते.
"आणि देशाबाहेर जर तो गेला असेल तर त्याचा माग काढणं अवघड नाही." रमेश पुढे म्हणाला.
सिन्नरकरांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
"वकार." रमेश हसत म्हणाला आणि सिन्नरकरांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरलं. त्यांनी फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट उघडली आणि तिवारींचा फोन डायल केला.

-----

"तुमचा पळायचा प्लॅन आहे हे मी सगळ्यांना जाऊन सांगेन." बबन अचानकच पुराणिक आणि त्याच्याजवळ येऊन म्हणाला.
"आणि? त्यानं काय होईल असं तुला वाटतं?" तो शांतपणे म्हणाला.
"प्रत्येकालाच यायची घाई होईल आणि तुमचा प्लॅन फ्लॉप होईल." बबन तोंड विचकून हसत म्हणाला. म्हमद्या थोड्या अंतरावर उभा राहून पाहत होता आणि वल्लभ नेहमीच्याच जागेवर त्याच्या ग्रुपसोबत बसून सर्व ऐकत होता.
तो नेहमीच्याच कोर्‍या चेहर्‍यानं दोन मिनिटं बबनकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, "जा सांग सगळ्यांना. बघू काय होतं ते."
बबनला अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. तो चकित होऊन पाहतच राहिला.
"ए काय चाललंय रे?" थोड्या अंतरावर उभा हवालदार हे चौघे-पाचजण एकत्र झाल्याचं पाहून दरडावून म्हणाला.
"काही नाही साहेब." म्हणून बबन त्याच्याजवळ गेला आणि काहीतरी गोड बोलू लागला. पाच मिनिटांनी हवालदार 'धार मारून येतो रे साल्यांनो, गपचूप राहा' असं म्हणून तिथून निघून गेला.
बबन परत त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. "मी चुकीच्या पद्धतीनं बोललो. मला पण तुझ्या प्लॅनमध्ये सामील करा प्लीज. माझी बायको, पोरं आहेत यार. आणि माझी तुरूंगात थोडी वटपण चालते, पाहिलंसच तू."
"तुझी एव्हढी वट चालते तर तुला माझी काय गरज आहे?" तो तितक्याच शांतपणे म्हणाला.
"प्लीज यार प्लीज." तो एकदम गयावया करत म्हणाला.
"एक म्हणजे मी तुझा यार नाही आणि दुसरं म्हणजे हा शहाणपणा माझ्यासमोर परत करायचा नाही." तो दरडावून म्हणाला.
"सॉरी."
"उद्या ह्याच वेळेस ये इथे. चल निघ आता."
बबन आणि म्हमद्या गेल्यावर वल्लभ त्यांच्याजवळ आला.
"तो कसा माणूस आहे ठाऊक आहे ना तुला?" पुराणिक म्हणाला.
"पण त्यानं बवाल केला तर आपल्याला महागात पडेल." तो म्हणाला.
"पण मग कामातही मदत घ्यायला हवी ना त्याची?"
"हो तर. प्लॅनचा प्रत्येक भाग त्याला व्यवस्थित कळायला हवा." तो म्हणाला.
तेव्हढ्यात हवालदार परत आला आणि मोकळा वेळ संपल्याचा भोंगा वाजला.

क्रमशः 

टीप - अंतिम भाग म्हणून जे लिहिलं ते फारच लांब झाल्याकारणे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून पोस्ट करतोय. आजच संध्याकाळी उत्तरार्ध आणि पर्यायाने शेवटचा भागही पोस्ट करेन.

No comments:

Post a Comment