मी आज कविता लिहायचीच असा निश्चय करून बसलो होतो. पण नेहमीप्रमाणेच काव्यदेवता माझ्यावर रूष्ट आहे. काही म्हणजे काही केलं ना, तरी कविता हा प्रकार मला वश होतच नाही. कित्येकदा अनेकांच्या ब्लॉग्जवरच्या सुंदर सुंदर कविता वाचून आनंद घेण्याऐवजी, 'कसं जमतं राव?' असले कोते विचार मनात येऊन मूड खराब होतो. हल्ली मात्र ते कमी झालंय, कारण एकदा स्वतःची लायकी स्वतःला समजावली की असले प्रकार आपोआप कमी होतात.
आई-बाबा सांगतात की मी जेव्हा लहान होतो, तेव्हा अगदी पार दोन वर्षांचा वगैरे होईपर्यंत बोलत नव्हतो. गप्प स्वतःचे धंदे चालू असायचे. तेव्हा मी बोलावं असं सगळ्यांना वाटायचं. पण मग मी एकदाचा बोलायला लागलो आणि पार 'आता पुरे बोलणं' असं म्हणायची पाळी आली लोकांवर. तर सांगण्याचा मुद्दा हा, की बोलणं मुबलक. त्यामुळे लिहिण्याची खुमखुमी असणं स्वाभाविक आहे. त्यातूनच लहानपणी निबंध आणि मोठेपणी ब्लॉग लिहिणंही आलं. पण एव्हढं सगळं होऊनही ती अप्राप्य कला काही साधेना ज्यासाठी पार लहानपणापासून तपश्चर्या केली. अगदी लहानपणी जेव्हा लिखाणाची खुमखुमी प्रथम सुरू झाली, तेव्हा आपण कवी व्हावं ही इच्छा होती. कशी, का ठाऊक नाही, पण वाटायचं जाम की आपण कवी व्हावं. कुठेतरी वाचलं असेल कुसुमाग्रज वगैरेंबद्दल. ते जे काय असेल ते, पण मुद्दा हा की आम्हाला व्हायचं होतं कविराज. पण कुसुमाग्रज वगैरे सोडा, आम्ही कवि कलश अर्थात कब्जी कलुषा पण नाही होऊ शकलो.
मग एकदा संध्याकाळी बिल्डिंगच्या आवारात आवारागर्दी करताना एकदम 'स्फूर्ती' मिळाली. मी धावत धावत घरी गेलो आणि एक वही आणि पेन घेऊन खाली आलो. बागेत जाऊन बसलो आणि चंद्राकडे एकटक पाहू लागलो. सोबत खेळणारा मित्र काळजीने काय झालं म्हणून विचारू लागला. 'कविता सुचतेय' असं कविराज वदले. आणि कविराजांनी चक्क एक कविता पाडली. ही 'हा पिवळसर चंद्र' अशी काहीशी सुरूवात असलेली कविता महत्प्रयासाने शाळेच्या वार्षिकात छापून आणली होती. आणि अशा प्रकारे मी पहिली पायरी पार केली. माझ्या नावावर ऑफिशियली एक कविता लागली. चार शिक्षक ओळखू लागले. थोडक्यात आमचं काम झालं.
तसा मी एकदम गद्य माणूस, कवितांमध्ये कधी फारसा रमलो नाही हे सत्य. एकदा शाळेत काव्यपठण/वाचन स्पर्धा होती. आवडलेली कविता वाचून किंवा हावभावांसकट पाठ म्हणून दाखवायची होती. आईनं तिच्या कॉलेज लायब्ररीतून कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह आणला होता आणि मी हौसेनं त्यातली एक कविता पाठ करून म्हणालो. मला उत्तेजनार्थ मिळालं होतं. मी ते उत्तेजन खूप सिरियसली घेतलं आणि रद्दीच्या दुकानातून कुठलासा काव्यसंग्रह विकत घेऊन आलो. दोनेक पानांमध्ये कळलं, की हे आपले काम नोहे. ना मला ती पाठ केलेली कविता कळली होती, ना त्या रद्दीच्या दुकानातल्या पुस्तकातली. थोडक्यात जिथे शॉर्टकट तिथे आम्ही नाही. उगाच दोन ओळींमधे वीस ओळींचा अर्थ शोधा, त्यापेक्षा वीस ओळी वाचा की. पुन्हा अलंकार, मात्रा, वृत्त, गेयता आणि न जाणे काय काय. कुणी सांगितलेत नाही ते धंदे. मस्त टेकायचं आणि गद्य वाचायचं शांत.
त्यानंतर मात्र आम्ही मूळ अर्थात गद्य स्वभावाकडेच वळलो, अर्थात इमानेइतबारे शालेय निबंध लिहू लागलो. मग कॉलेजात असताना एकदा सावरकरांचं छोटंसं चरित्र कुठेतरी वाचून आणि दामोदर चाफेकरांवरचा त्यांचा पोवाडा वाचून पुन्हा एकदा स्फूर्ती आली. आणि मग सावरकरांवरच एक कविता रचली होती. 'कसली भारी झालीय' असं मला बरेच दिवस वाटत होतं. मी 'काव्यकेसरी' झाल्यागत ती कविता मी आई-बाबांना दाखवली होती आणि 'छान छान' एव्हढं ऐकलं होतं. आता ती कविता कुठे आहे ते लक्षात नाही. फडतूस होती, पण जपून ठेवायला हवी होती असं मात्र वाटतं.
कॉलेजच्या मासिकासाठी म्हणून वर्गाच्या खिडकीतून दिसणार्या एका सुंदर चेहर्यावरही एकदा कविता केली होती. पण ती घडी वगैरे घालून खणात ठेवलेली होती आणि एके दिवशी खण आवरताना ती आमच्या ज्येष्ठ बंधूंच्या नजरेस पडली. त्यांनी आश्चर्यमिश्रित काळजीनं आम्हाला बोलावून तो कागद आमच्यासमोर नाचवला. आम्हाला घाम फुटला आणि कविराज अनेकवचनातून एकवचनात आले. मी कसाबसा त्याला समजावू शकलो, की ती खरंच कॉलेजच्या मासिकासाठी लिहिली होती. पण त्या प्रसंगा नंतर मी ती कॉलेजच्या मासिकात न देण्याचं निश्चित केलं. ती कविताही आमच्या कपाटाच्या उदरात गडप झाली कुठेतरी.
पण मग अचानक प्रगल्भता किंवा प्रौढत्व का काय म्हणतात ते आलं बहुतेक. कारण मला ते अलंकार, मात्रा, वृत्त, गेयता अर्थांमागचा अर्थ वगैरे फंडे कळायला लागले. अगदीच दुर्बोध असं काही वाटेनासं झालं. कवितेचा आनंद घेणं म्हणजे काय, ते थोडंफार का होईना कळू लागलं. मग आमच्यातले सुप्त कविराज पुन्हा जागे झाले. पण हाय रे दुर्दैवा, ह्यापूर्वी तीन चारदा जसे सहज सुलभ ते प्रकटले होते, तसे आताशा होईनात. कारण आता त्यांच्यावर विविध साहित्यिक मूल्यांचं ओझं पडलं होतं. प्रतिभेच्या मर्यादा ह्या ओझ्यांमुळे अधिकच आक्रसल्या होत्या. ती जुनी 'स्फूर्ती आलीय' वाली निरागसता लोप पावल्याचं कविराजांच्या लक्षात आलं आणि ते आले तसेच नाहीसे झाले.
अजूनही स्वतःला वारंवार समजावूनही कधी कधी मनाच्या विविध अवस्थांमध्ये तो कवि जागा होतो आणि व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो. पण मनावरची ओझी आणि प्रतिभेच्या मर्यादा त्याला झेपत नाहीत. मग खरडलेले चार शब्द बॅकस्पेसचं भक्ष्य बनतात. मग बोटं काहीतरी असंबद्ध टंकत राहतात, डोळे कवितेची एक झलक पाहण्यासाठी तरसत राहतात आणि कविता दूर धुक्यात बसून मोनालिसासारखं गूढ स्मित करत राहते, आपल्या अप्राप्य असण्याची जाणीव करून देत राहते.
पोस्टचा शेवट मात्र काव्यमय गद्यात झालाय.
ReplyDeleteमी समदुःखी आहे कवितांच्या बाबतीत. एकतर स्वप्नील दुनियेत रमणं जमत नाही आपल्याला बुवा. :P
अरे सगळे कविता लिहायला लागले तर आम्हा गद्यप्रेमींना गद्य ब्लॉग कसे मिळायचे.. त्यामुळे आहे तसं चालुदे. छान चाललंय..
ReplyDeleteतुला लवकरात लवकर कविता सुचो (वाचा भेटो) या दिवाळीच्या शुभेच्छा ;)
अरे कविता लिहणं सोप्प आहे. बघ... आधी 'क'... (मग 'व' ला पहिली वेलांटी...) 'वि'... मग 'त'ला एक मात्रा ता!!! झाली 'कविता'
ReplyDelete(ख्यॅंकख्यॅंक) असो, फालतूपणा पुरे... हेरंबशी सहमत. कविता काय कधीही सुचेल आणि लिहशीलही... तु जे लिहतोस तेच एवढं भारी आहे.. आपल्याला लय हेवा वाटतो. सो जो है बढीया है!!! :)
झोल झोल... 'त'ला मात्रा नाय रे... काना दे.. (की रफार??? चायला!!! आपलं साला बेसिकच गंडलय!!!) असो, (फुकटचा सल्ला:)तु गद्यंच लिही रे...
ReplyDeleteकविता लिहिणे (म्हणजे ट ला ट लावून ओळी लिहिणे) मी बरेचदा केले होते. शेम टू शेम .. असाच माझा पण अनूभव आहे.. :) अरे तुझ्या ब्लॉग वर पण बरेचदा कॉमेंट्स देता येत नाहीत- ती कॉमेट ची विंडॊच दिसत नाही क्लीक केल्यावर.
ReplyDeleteकविता लिहिणं फार सोपं आहे रे... काय वाट्टेल ते लिहायचं. फक्त समोरच्याला कळता कामा नये. समोरच्याला कळायला जेवढी दुर्बोध तेवढी त्या कवितेची होणारी स्तुती जास्त. उदाहरणार्थ:
ReplyDeleteधुक्यात हरवली वाट एका कोवळ्या जिवाची
जेव्हा जमली जोडी रखमी आणि भिवाची
एकच अडचण होती रखमीच्या भावाची
पण केली त्याने भक्ती पार्वती आणि शिवाची...
हाय काय अन् नाय काय...
इथे कमेंट करणारे बहुदा सर्वच समदुःखी आहेत; कारण मला हि जमत नाही त्या करायला. पण सौरभ आणि हेरंब म्हणालेत तसं तू जे काही लिहितोयस तेच इतका भारी आहे की काय सांगू.
ReplyDeleteअसो, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा :)
कवींना मूर्खात काढणाऱ्या कोण्या एका विद्वानाला अलेक्झांडर पोप महाशयांनी सुनावले होतेः
ReplyDeleteSir, I admit your general rule
That every poet is a fool;
But you yourself may serve to show it,
That every fool is not a poet
त्याचप्रमाणे कविता ही आकाशाची वीज आहे, असं केशवसुतांनीही सांगून ठेवलं आहेच. मराठीची बहुतेक वाटचाल पद्यातून झालेली असल्याने आपणा मराठी माणसांना कवितेचं उपजत प्रेमच असतं. पण बाबाच्या भींतीवर लिहिलेलं गद्य कुठल्याही दृष्टीने कमी पडत नाही. बाकी येणार असेल एखादी कविता तर वाचू आम्ही आनंदाने.
त्यामुळे लगे रहो बाबाभाई!
तश्या खूप खूप कविता बघितल्या राव पण करण जमला नाही.. :) :)
ReplyDeleteशाळेत केला होता एकदा प्रयत्न..मग एक मोठा रिजिस्टर आणून त्यात ती कविता एकदम सुंदर अश्या अक्षरात लिहून काढली पण बाकी कागद त्या रिजिस्टरचे रद्दी किवा किराणा यादी करण्यात गेले...हे हे हे
झेले ते दिन गेले... ;-)
ओंकारशी सहमत! पोस्ट्च्या शेवटी कविता झालेलीच आहे, फक्त फॉरमॅटींग राहिलय..
ReplyDeleteथोडे एन्टर,
बरीच टिंब,
थोडे स्वल्पविराम,
मग झालं की तुझं काम!
e.g. -
>
बोटं काहीतरी असंबद्ध टंकत राहतात...
डोळे कवितेची झलक पाहण्यासाठी तरसत राहतात..
कविता दूर धुक्यात बसून मोनालिसासारखं गूढ स्मित करत राहते,
आपल्या अप्राप्य असण्याची जाणीव करून देत राहते!!
@मीनलः
ReplyDeleteलई भारी!!!
कोणी 'कविता' भेटता भेटता राहून गेली काय? होतं असं कधीकधी! भेटली की स्फुरतीलच रे विद्याधर! आणि जेष्ठ बंधू आता नाही डोळे वटारणार! ;)
ReplyDeleteकविता...आपल्याला फ़क्त पाह्ययला आय मीन वाचायलाच जमते...च्यायला निळे निळे आभाळ अन निळे निळे पाणी...याच्या पुढ कविता कधी गेलीच नाही.
ReplyDelete@मीणल....शॉलीड रे...लय भारी.
विभि भो तु प्रेमात पडला आहेस का??? गद्यातुन एकदम पद्यात आला ...अचानक कस काय बुवा हे परीवर्तन???
-एक चौकस पुणेकर.
(हे आपल उगाचच... ;) ;) )
ओंकार,
ReplyDeleteअरे स्वप्नील सोड..हार्डहिटिंग रियलिस्टिक सुद्धा कविता जमत नाही मला...शेवट म्हणजे असं झालं की मी मॅच हरली असं समजून बॅट फिरवली आणि चक्क एज लागून फोर गेला. :)
हेरंबा,
ReplyDeleteअरे माझ्यासारखा गद्य माणूस खरंच पद्याच्या वाटेला गेला, तर पद्यप्रेमी माझी 'पाद्यपूजा'च घालतील ;)
बाकी शुभेच्छांसाठी धन्यवाद भाऊ! :D
सौरभ,
ReplyDeleteआवडलं आपल्याला.
मला एकदा एकानं 'तुला फ्रस्ट्रेशन येतं का?' असं विचारलं होतं.. मी त्याला हळूहळू म्हणून दाखवलं होतं आणि त्यालाच फ्रस्ट्रेशन आणलं होतं ;)
बाकी हौसलाअफज़ाईसाठी धन्यवाद रे भाऊ!
काना, मात्रा, रफार सोड... भावना पोचली... (च्यायला अवघड आहे राव...कविता काय, भावना काय!)
महेंद्रकाका,
ReplyDeleteजाम त्रास होतो कधीकधी...एकदम कविता करावीशी वाटते...अगदी ओठांपर्यंत शब्द आलेतसं होतं आणि लिहायला बसल्यावर मात्र ...
असो..चालायचंच :)
आणि काका, ते बहुतेक, पॉप-अप ब्लॉकरमुळे ब्लॉक होत असेल..मी सेटिंग चेंज करतो...त्याच विंडोमध्ये रिडायरेक्ट करायचा ऑप्शन...
संकेत,
ReplyDeleteअरे कसली 'जिवं'त, 'भिव'वून सोडणारी, 'भाव'पूर्ण आणि हात 'शिव'शिवायला लावणारी कविता आहे रे :D
पण कविता जेव्हढी दुर्बोध, तेव्हढी होणारी स्तुती जास्त हे बरेचदा सत्य असतं..
'क्लासिक' म्हणवल्या जाणार्या पुस्तकांची व्याख्या आहे -
A book which noone has ever read but everyone wants to boast about having read
श्रीराज,
ReplyDelete>>सगळे समदुःखी आहेत..
असंच दिसतंय एकंदर... :)
खूप खूप धन्यवाद रे!!
तुलादेखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
देविदासजी,
ReplyDeleteअलेक्झांडर पोपची ही वाक्य खूप भारी आहेत...
कविता आकाशाची वीज आहे हे मात्र अगदी १०० टक्के सत्य...
आणि काही भाग्यवंतांना ती वारंवार डोक्यावर पडण्याचं भाग्य लाभतं..तर काहींना नुसतंच डोक्यावर पडण्याचं ;)
खूप धन्यवाद!
सुहास,
ReplyDelete>>तश्या खूप खूप कविता बघितल्या...
हे लय भारी!
ह्यानंतर तू 'शाळेत एकदा केला होता प्रयत्न' असं लिहिलंस तर माझा गोड गैरसमज झाला ;)
आणि चालतं रे...त्या याद्यांच्या रूक्ष जगामध्ये तुझ्या कवितेचा तेव्हढाच थंडावा... :)
झेले ते दिन गेले... :) खरंच!
मीनल,
ReplyDeleteहे म्हणजे ओंकारला सांगितलं वर तशागत झालं...शेवटच्या चेंडूवर एज ला लागून फोर गेला...फक्त तो चौकार आहे, हे सांगायचं थर्ड अंपायरचं काम तू केलंस.. :D
आणि तेव्हढ्यातला तेव्हढ्यात एक चारोळीही पाडून गेलीस... :)
धन्यवाद गं!
अनघा,
ReplyDeleteअहो ज्येष्ठ बंधू डोळे वटारण्यापलीकडे जाऊन चार वर्षं उलटली..तेव्हापासून त्यांच्यावरच डोळे वटारले जाताना मी सजल आणि सजग नेत्रांनी पाहतोय..
कोणी कविता कधी भेटलीच नाही...
>>दूर धुक्यात बसून मोनालिसासारखं गूढ स्मित करत राहते,
आपल्या अप्राप्य असण्याची जाणीव करून देत राहते!!
आता बघू स्फुरली तर स्फुरली...
नाहीतर आमच्यात काहीच स्फुल्लिंग नुरली!
(इथे शेवटी कान्हा वाजवतो मुरली..किंवा लाराला उडवतो मुरली पण चालेल)
योगेश,
ReplyDeleteनिळे निळे आभाळ न निळे निळे पाणी..भारी...कारण एव्हढ्यावरच 'रॉक ऑन' सिनेमात अख्खं गाणं पाडलेलं आहे...
'आसमां है निला क्यूं.. पानी गिला गिला क्यूं'
असो..
अरे मी प्रेमात नाही..पण डोक्यावर नक्की पडलोय असं वाटतंय हल्ली ;)
आणि चौकस पुणेकर हा रिडन्डन्ट शब्दप्रयोग आहे...पुणेकर असणं म्हणजे चौकस असणं इम्प्लाईड असतं...
(जाता जाता - मीनलला 'रे' म्हणण्याचं प्रयोजन कळलं नाही (प्लीज सत्यजित किंवा लिसा किंवा तत्सम पाणचट मारू नयेत) - एक (खरा) पुणेकर)
ह्म्मम्म्म्म...तरी नशीब तू म्हणतोस तुला फक्त कविता सुचत नाहीत..मला तर ब्लॉग वर कथा कविता वाचयला पण थोडा आळस येतो....:) हसू नकोस पण संदीप खरेच्या कविता तो वाचतो तेव्हा कुठे कळतात..बाकी कविता मात्र जेव्हा एका सुंदर चालीत आणि आवाजात ऐकते तेव्हा कुठे गाणी आणि आठवणी जन्मत.....:)
ReplyDeleteअरे हो दिवाळीच्या शुभेच्छा ...
ReplyDeleteअपर्णा,
ReplyDeleteसंदीप खरे जेव्हा स्वतःच्या कविता वाचतो तेव्हा खरंच न कळलेले अर्थही उलगडतात....
>>कविता मात्र जेव्हा एका सुंदर चालीत आणि आवाजात ऐकते तेव्हा कुठे गाणी आणि आठवणी जन्मत
हे अगदी खरं!
तुलादेखील दिवाळीच्या शुभेच्छा!
संदीप खरेंबद्दल काय सांगणार...मी तर पखा आहे त्यांचा
ReplyDeletehttp://sandeepkharekavitangaani.blogspot.com/
असो- वरील ब्लॉग वर मी त्यांच्या कविता पोस्ट करत आहे...हव्या असल्यास वाचू शकता...(बर्याचशा कळणार नाहीत याची खात्री )
कविता न सूचणे फार अस्वस्थ करते....पण ती जशी सुचेल तशी लिहावी असे मला वाटते...
म्हणून हल्ली माझ्या कविता फार भरकटत चालल्या आहेत...
त्याची लिंक इथे-
http://majhyamanatalyakavita.blogspot.com
कविता लिहिणे जमत नसले तरी कविता पाडणे जमतेच की सर्वाना ! मी तर सढळ हस्ते कविता पाडत असतो.आणि हो, पुन्हा पुनरोक्ती, शेवटचा परिच्छेद कविताच आहे. कविता करत नसला म्हणजे तो कवी नाही असा अर्थ होत नसतो. संवेदनशील मनाचा प्रत्येक व्यक्ती हा कवीच असतो, आणि तो तू आहेस.तू कविमनाचा आहेस, त्यामुळे कविता पद्यात उमटली काय आणि गद्यात लिहिली काय, फरक पडत नाही.तुझे लेखन नितांतसुंदर असते.
ReplyDeleteJust write poem for yourself .. don't think of publishing it.. may be one day, you would publish it then.. hopefully!
ReplyDelete>>>अरे मी प्रेमात नाही..पण डोक्यावर नक्की पडलोय असं वाटतंय हल्ली
ReplyDeleteआपल्याला नाय मान्य....डोक्यावर पडल्यावर हे असल काय सुचणार नाय.
>>>मीनलला 'रे' म्हणण्याचं प्रयोजन कळलं नाही
हे आपल असच...सवयीचा परीणाम...बस का रे...जातो रे...येउ का रे....का रे...नाय रे....चालत रे...
आता तरी समजल का रे?? :) :) :)
सागर कोकणे,
ReplyDeleteतुझे ब्लॉग्ज मी बरेचदा वाचतो..तू चांगलंच लिहितोस ह्यात वाद नाही!
आणि संदीप खरेंचे प्रवाही शब्द खूप काही छान व्यक्त करून जातात! :)
धन्यवाद रे!
सविताताई,
ReplyDeleteतुम्ही म्हणता ते अगदी खरं. पण मी तो प्रयत्नदेखील करून पाहिलाय. माझ्या हाती फक्त ५-६ खोडलेल्या ओळी आणि नवीन ब्लॉगपोस्टची कल्पना, एव्हढंच लागतं! :( :)
योगेश,
ReplyDeleteडोक्यावर पडल्यावर बरंच काही सुचतं, कधी अनुभव घेऊन बघ ;)
बाकी... समजलं रे! :)
मला पण समजलं रे..
ReplyDeleteमी पण समदुक्खी आहे रे ..पण कवितेच्या बाबतीत नव्हे तर गद्याच्या बाबतीत ...! मला नाही रे लिहिता येत हे अस गोड गोड .. !पण असंच असता बघ ... !
ReplyDeleteअतुल,
ReplyDeleteअसंच असतं...हे मात्र सत्य...जे आहे त्याचा आनंद घ्यावा हेच खरं! बाकी आपले प्रयत्न चालू ठेवावेत! :)
बाबा.. कविता लिहिण्यासाठी जर आपल्याकडं प्रतिभा नसेल तर प्रेमात पड.. आपोआप पद्य सुचेल.... :D
ReplyDeleteमाझंही पद्याशी वाकडं आहे, कळतच नाही राव...
@ मीनल, लय भारी...
आनंदा,
ReplyDeleteप्रेमात 'पडण्या'च्याच शक्यता जास्त!! ;)
आपण बेसिकली गद्यच माणसं आहोत...