5/04/2010

आग - द स्टेन - ३

सूचनाः ही कथा भलतीच मोठी झाल्याने मला तीन भागांमध्ये विभागावी लागली आहे. एकच भाग वाचल्यास जास्त अर्थबोध न होण्याची शक्यता आहे.
भाग १
भाग २ पासुन पुढे

वजिरा-वजिरी
"त्या हरामखोर चिमण्याने मुद्दाम आपल्या होणार्‍या बायकोला माझ्या घामाचा पैसा दिला, मी काही बोललो नाही. त्याच्यामुळे गुजरातेची पार्टी नाराज झाली, मी काही बोललो नाही. तुमच्या लातूरवाल्यांना पण काम मिळू नाही दिलं साल्यानं, मी काही बोललो नाही. पण काका आता हद्द झालीये. त्यानं माझ्या त्या "तिला" स्वतः लक्ष घालून व्हिसा मिळवून दिलाय. आता ती येतेय इथे माझ्या उरावर बसायला." तुळजाराम रागाने लाल झालेले असतात. “त्यातून ती मूर्ख तारा आपली खरेदीविक्री सोडून त्या प्रेम आणि प्रेमभंगामध्ये बुडून बसलीये, फोनपण नाही उचलत आहे आपला. साले सगळेच पार्टनर्स एकाहून एक भ्रमिष्ट आहेत. एक दारू बनवणारा, एक स्वतःच्या प्रेमात पडलेला सिनेनट. ग्रहच फिरलेत म्हणायचे माझे."
(आता कॅमेरा पुन्हा डोक्याकडून)"शांत हो, तुळ्या. असं एक्साईट व्हायचं नसतं. थंड डोक्याने गेम करायचा असतो. मी गेली चाळीस वर्ष का टिकलोय असं तुला वाटतंय? हे पाणी पी आधी."
(कॅमेरा हळूवार उजवीकडून फिरत तुळ्याच्या डोक्यामागे स्थिरावणार.)काकांचं हे काळजी घेणारं नवंच रूप पाहून तुळ्या थोडा शांत होतो.
"हे बघ. अजूनी वेळ गेलेली नाही. आता त्याच्याच शस्त्राने त्याला मात दे. काढ एखादं लफडं बाहेर. मी दिल्लीत सांभाळतो."
".."
[दोन दिवसांनंतर]
(कॅमेरा काकांच्या डोक्यामागून, त्याच्या उजवीकडे असणारा त्यांचा टीव्ही फ्रेम मध्ये येईल असा)
(टीव्हीवरचा रिपोर्टर सांगत असतो)"काल तुळजारामांनी गौप्यस्फोट केल्यानंतर अडचणीत आलेल्या चिमणरावांनी आज तुळजारामांवर पलटवार केलाय. दरम्यान, दिल्लीत चिमणरावांच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टीचीच हवा आहे. हे वैयक्तीक हेव्यादाव्यांचं फलित आहे, की बुद्धिबळाच्या पटावरच्या दोन खेळाडूंनी केलेली वजिरा-वजिरीची जोखमीची चाल आहे, हे वेळच सांगेल."
काकांच्या टेबलावरचा फोन वाजतो.
"हॅलो काका, अहो, तो चिमण्या भलताच चिवट निघतोय हो. च्यायला, आपली पण सगळी कुलंगडी बाहेर येतील हो. बघा जरा."
"शांत व्हा उत्फुल्ल." काकांचा पेटंट गालात कापसाचा बोळा ठेवल्यासारखा धीरगंभीर आवाज."बघू काय करता येतंय ते. आपण चुकीच्या माणसाला वजिर बनवलंय हे खरंय, पण समोरचा वजिर घेऊनच मी आपला वजिर मारलाय. थोडे दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल, पण दोनेक महिन्यांत सगळेजण विसरून जातील. विश्वास ठेवा, मी तुमच्याहून जास्त पावसाळे पाहिलेत." ते कुत्सित हसत म्हणतात. "बरं ते सोडा. पोरीला सांगा, माझा जावई आणि पोरगी सिंगापूरहून येतायत, एक चार्टर प्लेन बुक करून ठेव म्हणावं."
स्प्लीट स्क्रीन करून उत्फुल्ल आणि काकांचा टॅटू दाखवायचे आणि मग फेडींग स्क्रीन.

"बिन नावाचा प्रसंग"
तो चेहर्‍यावर पाणी मारून पुन्हा आरश्याकडे बघतो. तोंड पुसतो आणि दरवाजा उघडून बाहेर पडणार एव्हढ्यात मला शर्टावर कसलासा डाग पडल्याचं दिसतं. तो साफ करायला पुन्हा नळ उघडतो आणि अचानक कसलासा मोठा आवाज होतो. तो बाहेर बघणार एव्हढ्यात त्याला मागून कुणीतरी आल्याचा भास होतोतो वळणार एवढ्यात त्याला एकदम हलका हलका झाल्यासारखं वाटायला लागतंतो पाहतो, तर त्याचं निष्प्राण शरीर जमिनीवर पडलेलं असतं.
"आयला, हे काय?" तो जिवाच्या आकांतांने ओरडतो आणि वळून पाहतो, तर "एकलव्य" मधल्या अमिताभसारखा गेटप करून एकजण उभा असतो. (एकलव्य मधल्या अमिताभ सारखीच ह्याची ही दृष्टी अधू दिसली पाहिजे.)
"मी यमदूत, मित्रा. आपल्याला आता अनंताच्या सफरीला जायचंय."
"अहो, पण इतक्या लवकर? अहो, माझं लग्नही नाही झालंय अजून."
"आता मी काय करू पोरा, माझाही जीव तुटतो रे, पण काय करणार नोकरी आहे. रिटायरमेंटला दोन महिने आहेत अजून, काम पूर्ण नाही केलं तर चित्रगुप्त पेन्शनीचे वांधे करेल रे."
"खरंय आजोबा, समजू शकतो मी. असो. चला." तो आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं आपलं ऑफिस बघून ओरडतो. "च्यायला ऑफिसात आग कसली?"
"अरे वेड्या, बॉम्ब फुटलाय तिथे." तो कपाळाला हात मारतो.
आजोबा त्याला घेऊन तरंगत एका व्हिडीओकोच बसपाशी येतात. चल आत.
"पण, माझ्या ऑफिसातले बाकी लोक कुठे आहेत?"
"अरे ही पहिली बस आहे. तुला मी जरा जास्तच लवकर आणलेलं दिसतंय. ते येतील मागच्या बसनी. चढ बघू तू आत.
तो आत चढतो, तर आत ७०-८० गणवेशातले लोक बसलेले असतात. तो चालत चालत बसच्या शेवटाकडे जातो, तर तिकडे अगदी गरीब पोटं खपाटीला गेलेले, डोळ्यांखाली काळं झालेले असे गावाकडचे लोक असतात.
"हे कोण लोक हो आजोबा?"
"अरे हे पुढे आहेत ते सीआरपीएफ चे जवान आहेत, आजच नक्षली हल्ल्यात मेलेत. आणि हे विदर्भातले शेतकरी आहेत."
"..."
अचानक बस सुरु होते आणि बसमधला टीव्ही सुरू होतो.
बसवर कुठल्याश्या न्यूजचॅनेलवर आधी चिमणरावांच्या आणि तुळजारामांच्या गच्छंतीची बातमी चघळली जात असतेमग तासाभराने सानिया मिर्झाच्या शोएब मलिकशी होत असलेल्या लग्नाचं रिसेप्शन दाखवत असतात. सगळे जवान आणि शेतकरी नवलानं ती बातमी पाहू लागतात. तो ही उत्सुकतेनं आपली बातमी येतेय का ते पाहू लागतो. पुढचा अर्धा तास तीच बातमी चालू असते. खाली फक्त "नक्षलवादी हल्ल्यात ८० सीआरपीएफ जवान ठार" आणि "मुंबईत खाजगी कंपनीत बॉम्बस्फोट" एवढ्या बातम्या स्क्रोल होतात. शेतलर्‍यांची तर काहीच बातमी नसते. तो डोळे मिटून स्वस्थपणे बातमीच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू असलेलं "राजा की आयेगी बारात.." हे गाणं ऐकत राहतो.
"अहो ह्याचं नाव सापडत नाहीये, हजार चौर्‍याऐंशी" चित्रगुप्त वैतागून यमदूत आजोबांना म्हणतो.
"काय?" तो चाट पडतो.
"असं कसं असेल हो. मी वेळेच्या दोन मिनिटं आधीच ह्याला बाहेर काढलं, पण म्हणून काय नाव नसेल असं थोडंच. जरा पुन्हा बघा ना!" आजोबा अजिजीने म्हणतात.
"अहो नाहीये हो. कॉम्प्युटरला किती वेळा सर्च क्वेरी देऊ मी."
"अहो. पांढराशुभ्र स्वच्छ शर्ट घातलेला आरश्यासमोर उभा असलेला मुलगा, असंच वर्णन सांगितलं होतंत ना तुम्ही मला?" आजोबा विचारतात.
"ते वर्णन मी नाही, कॉम्प्युटरनी दिलं होतं."
(त्याच्या डोक्यावर प्रकाशझोत पडतो.) "आयला आजोबा, गेम केलात तुम्ही. तो मी नसणार. हे बघा, माझ्या शर्टावर डाग आहे. तो माझा मित्र, बाहेरच्या आरश्यासमोर उभा होता, त्याला आणायचं होतं. त्यानेही पांढराशुभ्र शर्ट घातला होता."
चित्रगुप्त कपाळाला हात मारतो. "आता जा परत सोडून या ह्याला. गेल्या दोन महिन्यातली ही तिसरी केस आहे. आणि आता त्यामुळे ह्याच्या मित्रालाही आणता येणार नाही. त्याची वेळ गेली. मायनॉरिटी रिपोर्ट बनवावा लागेल त्याचा. आणि हो, ह्याचं शरीर अजून ठीक असेल तरच ह्याला जाता येईल. नाहीतर, पुढच्या जन्माची वेळ येईपर्यंत हा इथेच प्रवेशद्वाराजवळ थांबेल त्या मागच्या तीन केसेस सारखा."
तो चित्रगुप्ताने केलेल्या अंगुलीनिर्देशाकडे बघतो. तिकडे एक सुंदर मुलगी बसलेली असते आणि बरोबर एक म्हातारा-म्हातारी. तो (मनात) "च्यायला, थांबावं लागलं, तरी एव्हढी वाईट अवस्था नाही."(इथे एक पांढर्‍या कपड्यांतलं ढगांवरचं गाणं टाकता येऊ शकतं.)
मग एकदम भानावर येऊन तो म्हणतो, "आजोबा, चला लवकर, त्या बसपेक्षा फास्ट काही आयटम नाहीये का?"
चित्रगुप्त आजोबांकडे एक चावी फेकतो.
तो, हार्ले डेव्हिडसनवर आजोबांच्या मागे बसलेला असतो. दोघेजण त्याच्या ऑफिसपाशी येतात. आग आटोक्यात आलेली असते. अग्निशामक दलाचे जवान त्याच्या शौचालयाच्या दिशेने येत असतात. तो आजोबांकडे बघतो, आजोबा हार्लेचा स्टॅंड शोधत असतात.
तो ओरडतो, "अहो आजोबा, इथे माझा जीव खालीवर होतोय. आणि तुम्ही.." तो पुढे होऊन स्वतः स्टॅंडवर लावतो.
"अरे पोरा, माझ्या ग्रॅच्युईटीतून कापून घेतील डॅमेजेस. म्हणून एव्हढी काळजी."
मग ते त्याला पुन्हा त्याच्या बॉडीत टाकायला जातात, तेव्हा त्याची बॉडी उचलली जात असते. ते चटकन त्याच्या डोक्यावर हात ठेवतात.
तो एकदम दमेकर्‍यासारखा खोकत उठतो. जवान दचकून स्ट्रेचर पाडतात.
------
बाहेर त्याचा मित्र त्याच्या स्ट्रेचरजवळ येतो.
"तुझे देखके कितनी तसल्ली हो रही है! तू जानता है, सब कहते है मेरा बचना चमत्कार है। मैने तेरी तो उम्मीद ही छोड दी थी।"
तो स्वतःशीच एक स्मित करतो, (मनात) "तू पूछ रहा था ना, किधर जा रहा है? उस सवालका असली जवाब अभी देखके आया हूं।"
त्याच्या त्या स्मितावरच फेडींग स्क्रीन.
समाप्त
कास्टींग तुम्हीच सगळे ठरवा.

8 comments:

  1. ऑ स्स म !!

    >> खाली फक्त "नक्षलवादी हल्ल्यात ८० सीआरपीएफ जवान ठार" आणि "मुंबईत खाजगी कंपनीत बॉम्बस्फोट" एवढ्या बातम्या स्क्रोल होतात. शेतलर्‍यांची तर काहीच बातमी नसते. तो डोळे मिटून स्वस्थपणे बातमीच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू असलेलं "राजा की आयेगी बारात.." हे गाणं ऐकत राहतो.

    हे भयंकर होतं.

    >> मायनॉरिटी रिपोर्ट बनवावा लागेल त्याचा.

    हे एकदम झक्कास :)

    एकुणात, जाम आवडेश !!

    ReplyDelete
  2. आवडली.तत्कालीन सद्य परिस्थितीचा उत्तम वेध. ख~या महत्वाच्या घटना एका ओळीत आणि बरेचदा कुठेच नाहीत... अशाच हरवून जातात. बाकी मिडियालाही त्यात काहीच रस नसतो, त्याने पेपर थोडाच नं खपणार असतो... मायनॉरिटी सहीच.:)

    ReplyDelete
  3. अप्रतिम मित्रा.. अगदी अप्रतिम...
    हेरंबच्या कमेंटला सुद्धा दुजोरा...

    ReplyDelete
  4. मस्त मस्त आणि मस्तच.... पहिल्या भागाला टाकलेला कमेंट हा माझाच वेडेपणा होता हे मान्य करून पुढचं लिहीतेय..

    हेरंब +१००

    थोडावेळ सुन्न झाले होते...सगळं सत्य किती वेगळ्या पद्ध्तीने मांडलय तू...ग्रेट!!! आता आज पुन्हा पहिल्या भागापासून तीनही भाग वाचणार आहे!!!

    ReplyDelete
  5. धन्यवाद हेरंब!
    त्या सानिया शोएबच्या गोंधळानं डोकं विटलं होतं रे...
    मायनॉरिटी रिपोर्ट हा माझा टॉम क्रूझच्या अनेक आवडत्या मूव्हीजपैकी एक आहे...कुठेतरी बाहेर येतंच...

    ReplyDelete
  6. धन्यवाद भाग्यश्रीताई,
    आपला मिडीया हा गेली कित्येक वर्षं बाल्यावस्थेतच आहे. त्यांना प्रौढ व्हायचंच नाहीये. प्रौढ झालं की जवाबदारी येते ना!
    आणि बाकी, ७०-८० जवान जिथे कीडामुंगीसारखे मरतात, तिथे सामान्य जनतेची काय गत!

    ReplyDelete
  7. आनंद,
    तुझ्या हौसला-अफझाईमुळे मी बरंच काही लिहू शकतो.

    ReplyDelete
  8. धन्यवाद तन्वी...
    ती कथा लिहायला बसलो आणि पूर्ण झाली तर ही भलीमोठी...तीन भागांत विभागण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पहिला भाग एकदम ऍब्स्ट्रॅक्ट वाटत होता.
    जवानांच्या मृत्यूच्या बातमीला मिळणारी ट्रीटमेंट बघून मी खूप दुःखी झालो होतो!

    ReplyDelete