5/08/2010

शॉर्ट फॉर्म्स

काही दिवसांपूर्वी ब्लॉगविश्वाची सफर करताना, मी 'दिसामाजी काहीतरी' ह्या ब्लॉगवर गेलो होतो. तसा मी ह्या ब्लॉगचा जुना वाचक आहे. पण मी असाच अधून मधून भेटी देऊन एकदम भरपूर वाचतो. तर त्यादिवशी त्यावर "महू" ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाबद्दल पोस्ट होती. मी तसं थोडंफार ऐकून होतो, पण 'महू' (इंग्रजीमध्ये MHOW) ह्या नावाचा "मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वेस्टर्न इंडिया " हा फुलफॉर्म आहे, हे वाचून मी थंड झालो('असा मी असामी' मधले धोंडोपंत जसे 'पॉपकॉर्न म्हणजे लाह्या' हे पाहून थंड होतात अगदी तसाच). मग मी आपल्या नेहेमीच्या कामांना लागलो(पक्षी {आता हे पक्षी का लिहितात, 'बर्डस आय व्ह्यू' शी ह्याचा काही संबंध असेल का?}) - ब्लॉग वाचणे मेल चेक करणे आणि अधूनमधून ऑफिसचे काम देखील करणे). त्यानंतर थोडे दिवस उलटले असतील, मी टीव्हीवर बातम्या पाहत होतो. त्यात आपल्या नेहेमीच्या सामाजिक संघटनांबद्दल काहीतरी उपयुक्त माहिती देणं चाललं होतं. तेव्हा माझ्या एका फेव्हरीट संघटनेचा उल्लेख आला, "लष्कर-ए-तोयबा"(हल्ली हे "लष्कर-ए-नायबा" झालेत). हे लोक बहुतांशी स्वतःचा काहीही संबंध नसलेल्या लोकांच्या(पक्षी - काश्मीर) स्वातंत्र्यासाठी शस्त्र वगैरे हातात उचलतात, जिहाद का कायसा करतात, म्हणजे थोडक्यात 'लष्करच्या भाकर्‍या(भाकरी-ए-लष्कर) भाजतात'. (मग मी थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं, की कदाचित त्यांच्यात पण असा काहीसा वाक्प्रचार असेल, 'भाकरी-ए-लष्कर भूनना', म्हणून ह्यांच्या स्थापनकर्त्यांनी संघटनेच्या नावातच लष्कर ठेवलं, जेणेकरून कोणी लष्करच्या भाकर्‍या भाजताय, असे टोमणे मारू नये. असो पाणचटपणा पुरे झाला.) मुद्द्यावर येऊ या. थोडा अधिक विचार करता माझ्या डोक्यात हे आलं, की उर्दू भाषेची मजा अशी आहे, की इंग्रजीत नाव लिहिल्यावर सहज शॉर्टफॉर्म मिळू शकेल अशी नावं ठेवता येतात. उदाहरणार्थ, लष्कर-ए-तोयबा(LeT), हरकत-उल-मुजाहिदीन(HuM), जैश-ए-मोहम्मद(JeM). त्यातून आता माझी आवडती भाकर्‍या भाजणारी संघटना बंद झाल्याने त्यांच्या पॅरेंट कंपनीचं नाव हल्ली बातम्यांमध्ये यायला लागलंय; 'जमात-उद-दवा'(JuD). सगळ्यांना मस्त शॉर्टफॉर्म्स मिळतात. पण अजून एक सामाजिक संघटना आहे, ज्याचा माझ्यामते शॉर्टफॉर्म आधी ठरवला असावा आणि मग नाव ठरलं असावं, हुजी (HuJI-हरकत-उल-जमात-ए-इस्लामी), किंवा ऍट लीस्ट त्यांनी शॉर्टफॉर्मसाठी नाव नक्कीच ऍडजस्ट केलं असावं. कारण मोठ्या शिताफीने -ए- वगळलाय.
मग शॉर्टफॉर्मचा विचार करताना, माझ्या डोक्यात अनेक शॉर्टफॉर्म यायला लागले. लोकं पण च्यायला काय काय झोल करून शॉर्टफॉर्म्स ऍडजस्ट करतात. आता हेच बघा, मुंबईत हॉटेल्सच्या मालकांची संघटना आहे, त्याचा शॉर्टफॉर्म - आहार(AHAR(Assosication of Hotel And Restaurant owners)). डोकं पाहिजे खरंच. माझा एक आवडता अर्थहीन शॉर्टफॉर्म - मामि(Mumbai Association of Moving Images). हा मला उगाच उच्चारण जमावं म्हणून ऍडजस्ट केलेला वाटतो. उगाच जुळवाजुळवीसाठी शॉर्टफॉर्म ऍडजस्ट करण्याचा अजून एक प्रकार म्हणजे एकेका शब्दातली दोन तीन अक्षरं उचलायची, उदाहरणार्थ, आदिदास हा इंटरनॅशनल स्पोर्टिंग ऍक्सेसरीजचा ब्रॅंड, मला कित्येक दिवस तिथे काहीतरी भारतीय कनेक्शन असावं असं वाटायचं, मग कळलं Adolf Dassler ह्या मालकाच्या नावावरून कंपनी बनली, पण मग आयडिया सुचली आणि "All Day I Dream About Sports" झालं. छ्या, मला नसतं सुचलं असलं काही(म्हणूनच मी अजून नोकरी करतोय). त्याहून मजेशीर अजून एका सामाजिक संघटनेचं नाव आहे, LTTE . बिचार्‍यांनी नाव मनापासून ठेवलं असावं, म्हणजे ठेवण्याआधी शॉर्टफॉर्मचा वगैरे विचार केलेला नसावा, त्यामुळे बात कुछ जमी नही. मग मीडीयाला काही झेपेना एव्हढं, मग त्यांनीच क्लृप्ती(कुणी हा शब्द मला सलग पाच वेळा न थांबता{आणि न चुकता} म्हणून दाखवावा) लढवली आणि पहिल्या शब्दातला एल आणि आय घेऊन लिट्टे(LiTTE) असं थोडं भारदस्त नाव बनवलं असावं. मला वाटतं हे असले फंडे सांगायचे लोक पैसे सुद्धा घेत असतील. अजून एक कॉमन प्रकार म्हणजे, ऍन्ड, ऑफ असले फडतूस शब्द वगळायचे किंवा जरूरतीप्रमाणे वापरायचे. बीसीसीआय ह्यांना उगाच ऑफ, फॉर, इन नको होते कारण मजा गेली असती नावातली, आता तुम्हीच सांगा बीएफसीओआयआय(BfCoCiI) ह्यात काय मजा आहे, धड उच्चारही नाही. ह्याउलट पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर(PoK), किंवा प्रिझनर्स ऑफ वॉर(PoW) हे लिहिताना, बोलताना ऑफ ला किंमत मिळते.
निरनिराळ्या जागतिक संघटना जसे, संयुक्त राष्ट्रसंघ(UNO), आंतरराष्ट्रीय कामगार संघटना(ILO), आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना(WHO) किंवा युनिसेफ(UNICEF) ह्यांनी ऍडजस्ट केलंय की नाही, ते कळायला मार्ग नाही, पण जमून मात्र झक्क गेलंय. मग नंबर येतो आंतरराष्ट्रीय खेळ संघटनांचा. इथे क्रिकेट सोडलं तर वेगळीच मजा आहे. कारण बाकीच्या सगळ्या संघटना स्थापण्यामध्ये फ्रान्सचा पुढाकार होता, त्यामुळे सगळीकडे पूर्ण नावं फ्रेंच आहेत आणि त्यामुळे शॉर्टफॉर्म बनायला थोडीशी मदतच झालीये. उदाहरणार्थ, फिफा(FIFA{Fédération Internationale de Football Association}), आईबा(हे आई-बाबा च्या प्रचंड जवळ जातं पण हे बॉक्सिंग संघटनेचं नाव आहे)(AIBA{Association Internationale de Boxe Amateur}).
आता थोडी वेगळी नावं, आयएसओ(ISO{International Organization for Standardization}) हे जवळपास प्रत्येक नोकरदार वर्गाने ऐकलेलं नाव आहे, ह्याचा पण फुलफॉर्म शॉर्टफॉर्म ह्यात काहीही संबंध नसून शॉर्टफॉर्म हा ग्रीक शब्द isos(equal) वरून घेतला आहे हे मला ठाऊकच नव्हतं. मला आयएसओ ट्रेनिंग होईपर्यंत 'इंटरनॅशनल स्टॅंडर्ड्स ऑर्गनायझेशन' असं समजत होतो. जगातल्या जवळजवळ प्रत्येक भाषिक माणसाला कळणारा एक सर्वव्यापी सर्वसमावेशक शब्द म्हणजे "ओके"(OK). आता ह्या शब्दाला फुलफॉर्म सहसा लोक "ऑल करेक्ट" असा काहीसा सांगतात, प्रत्यक्षात "Ola Kala"(Everything is good) ह्या ग्रीक शब्दांवरून घेतला असण्याची दाट शक्यता आहे. शॉर्टफॉर्मची मजा आणि इंग्रज फ्रेंच अस्मितेचा टकराव ह्यांचं उत्तम उदाहरण म्हणजे जागतिक प्रमाणवेळेचा जगन्मान्य शॉर्टफॉर्म - UTC(Coordinated Universal Time). इंग्रजी की फ्रेंच अशी दुविधा निस्तरण्यासाठी, दोघांचाही नसलेला अर्थहीन शॉर्टफॉर्म मान्य केला गेला. मला विकीमातेने सांगितलं.
आमच्या कॉलेजमध्येही (प्रत्येक कॉलेजमध्ये असतात), एकसेएक शॉर्टफॉर्म असायचे. उदाहरणार्थ, अतुल म्हणजे "ऑल टाईम उदास लडका/लडकी". एखादा मुलगा फारच मुली मुली करणारा असेल, किंवा त्याच्या मागेपुढे अनेक मुली असल्या तर 'द्राक्ष आंबट' ह्या भावनेने, त्याला "वापीलिंपी"(वासना पीडित लिंग पिसाट) म्हणायचं. आता ह्याचा फुलफॉर्म अगदीच डेडली असला(आणि प्रत्यक्ष जगात तो अनेक जणांना खरंच लागू होत असला) तरी तो कॉलेजात अगदी कॅज्युअली सांगितला जायचा.
लोक ह्या शॉर्टफॉर्म्स चा उपयोग एकमेकांची विकेट काढण्यासाठी करतात. माझ्या कंपनीतला एका मुलाने एक दिवस सकाळी मेसेंजरवर मला मेसेज पाठवला, "जीएम" (गुड मॉर्निंग), मी त्याला रिप्लाय केला "डीजीएम" (उगाच मस्ती), तर त्याने मला माझं अज्ञान दूर करण्यासाठी "जी आणि एम" हायलाईट करून "गुड मॉर्निंग" असं लिहून पाठवलं, मग मी, "डी, जी आणि एम" हायलाईट करून "डेफिनेटली गुड मॉर्निंग" असं(पुन्हा उगाच मस्ती - यू एम) परत लिहून पाठवलं. आता माझा एक मित्र पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत होता. तो मला त्याच्या एका संध्याकाळीबद्दल सांगत होता. "काय झालं, मी आणि माझा एमएल, माझ्या पीएम बरोबर मीटिंग करत होतो, ती झाल्यावर आम्ही केटी सेशनला गेलो. मग केटी सेशन झाल्यावर आमचं ठरलं की आपण एसपीडीपी खायला बाहेर जाऊया. मग ते झाल्यावर थोडा टीपी करून परत येऊया." मी शांत चित्तानं त्याला म्हटलं आता फुलफॉर्म वापरून वाक्य परत बनव. "काय झालं, मी आणि माझा मॉड्युल लीडर, माझ्या प्रोजेक्ट मॅनेजर बरोबर मीटिंग करत होतो, ती झाल्यावर आम्ही नॉलेज ट्रान्सफर सेशनला गेलो. मग नॉलेज ट्रान्सफर सेशन झाल्यावर आमचं ठरलं की आपण शेव पुरी दही पुरी खायला बाहेर जाऊया. मग ते झाल्यावर थोडा टाईमपास करून परत येऊया." मी एक सुस्कारा सोडला (मनात) "काय ही भाषेची दुरवस्था!" (व्यक्त)"सोड यार मी निघतो आता, माझी सीएसटीची ट्रेन मिस होईल."(पुन्हा मनात)"डब्ल्यू टी एफ(WTF)?"
मग हल्ली बझकट्ट्यावर पाहतो तर सगळेच शॉर्टफॉर्ममध्ये बोलतात. माझा ऊर नुसता अभिमानाने भरून येतो. कारण आत्तापर्यंत सगळे शॉर्टफॉर्म फक्त इंग्रजीतच पाहत होतो(वापीलिंपि चा सन्माननीय अपवाद वगळता), इथे कट्ट्यावर मात्र मराठी शॉर्टफॉर्म्सचं दळिद्र घालवायचा सगळ्यांनीच विडा उचललाय. इथे सुद्धा लोक वर वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला हवे तसे शॉर्टफॉर्म्स बनवतात. शुभ रात्री चं कुणी शुरा करतं, कुणी शुत्री करतं, काय वाट्टेल ते चालतं. पण सगळं मराठीत आहे ना, म्हणून "इट्स ओके!"
फारच पकवापकवी झाली आता इथेच पोस्ट संपवतो नाहीतर कॉमेंट्स मध्ये सगळ्यांना माझ्यासाठी RIP(Rest In Peace) असं लिहावं लागेल.

15 comments:

  1. >> पुन्हा उगाच मस्ती - यू एम

    हा हा हा..

    वापिलीपी, अतुल (याचा एक वेगळा फुलफॉर्म होता आमचा. सवडीने सांगेन.. कदाचित तुमचाही असेल) च्या आठवणीने मजा आली :)

    रच्याक (मराठी BTW), ते IHO च्या ऐवजी WHO (World Health Organization) हवंय का?

    बालेएझ : (बाकी लेख एकदम झक्क्कास .. नको ते ऑफ, फॉर आणि ए.. आपलं बझ मराठी जिंदाबाद :-))

    ReplyDelete
  2. Anonymous6:41 PM

    शॉर्ट फॉर्म्स तर खूप होते. ह्या शिवाय.. BHMB, MBBS असे पण द्वैअर्थी पण होते शाळेत असतांना वापरायचे.

    ReplyDelete
  3. अरे तरी तुझी रेल्वेवाल्यांशी गाठ पडलेली दिसत नाहीये..... ते तर शॉर्टफॉर्मस वापरत असे काही बोलतात की समोरच्याला जाम न्युनगंड वगैरे एकदम, काहीच समजत नाही कारण त्यातलं....

    पोस्ट सहीच झालयं .....
    मागे हेरंबच्या पोस्टवरच्या कमेंटवर लिहीलेय तेच पुन्हा ..नुकत्याच दहावी झालेल्यांचे ऑर्कुट स्क्रॅपबूक मिळाले ;)(आता मी हे का वाचते म्हणशील तर मोठी बहिण म्हणून दिलेल्या ड्यूटीचा तो एक भाग आहे :D ) तर बघ एकदा.... तिथे तर शॉर्टफॉर्म्स चे उदंड पीक आलेले असते... :)

    ReplyDelete
  4. झकास झालय लेख! बरेचदा आपण शॊर्टफॊर्म्स एवढे वापरतो की लॊंगफॊर्म्स विसरायला होते.

    ReplyDelete
  5. अरे हो हेरंब,
    ते चुकून IHO झालं...केलंय आता दुरुस्त. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
    रच्याक - तो जो तुला सांगायचाय कदाचित मला पण तोच ठाऊक आहे. पण...असो आपण नंतर कधी फुलफॉर्म मध्ये चर्चा करू;)

    ReplyDelete
  6. काका,
    ते BHMB, MBBS आम्हीही वापरायचो, पण..ब्लॉगेटिकेट्समुळे...असो...
    रच्याक - हे शॉर्टफॉर्म्स एव्हढे पूर्वीपासून आहेत तर..मी उगाच आमच्या पिढीला दोष द्यायचो..;)

    ReplyDelete
  7. हो तन्वी,
    मला अजूनही कोणीतरी सांगत होतं रेल्वेवाल्यांबद्दल. माझ्या भावाचे सासरे रेल्वेत आहेत, एकदा त्यांच्यांशी शॉर्टफॉर्म्सवर फुलफॉर्म चर्चा करावी म्हणतो.
    आणि हो, ती नुकतीच दहावी झालेली मुले म्हणजे, शॉर्टफॉर्म्सचे बादशाह असतात, कारण त्यांच्या शॉर्टफॉर्म्सचं अजून एक उगमस्थान म्हणजे, एसएमएस आणि चॅट.

    ReplyDelete
  8. निरंजन, ब्लॉगवर स्वागत.
    अहो तुम्ही बोललात आणि एकदम माझ्या लक्षात आलं, की मला SAP फुलफॉर्म अजूनी माहिती नव्हता. विकीमातेला दंडवत घातल्यावर आत्ता कळला. :)

    ReplyDelete
  9. sorry for writing in english....just yesterday i read on some product that "MADE IN PRC" and then my search started .......what is PRC means ......and when i searched i got shocked it is "POPULAR REPUBLIC OF CHINA"....

    ReplyDelete
  10. ते "People's Republic of China" असणार आशिष, टायपिंग एरर झालीय तुझी बहुतेक.
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  11. झक्कास... MBBS BHMB हे लय भारी.. ब्लॉग एटीकेट्स रे बाबा... लेख लई रापचिक ;-)

    ReplyDelete
  12. हाहाहा..आनंद...अरे खूप सारे लिहिता लिहिता थांबलो...;)

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. Punyaat barech shortforms marathi pan asataat. Arthat aata college vishwashi jaast sambandh naslyane aani me mumbaicha aslyanae mala punyache short forms khup mahit nahit. Tarihi mala ek-don vishesh karun aathavataat :

    (For low waist jeans)
    ABCD : Aga Baai Chaddi Disate

    LBW : Lambunach Bari Watate

    There is a classic full form for FERGUSSON college too. Can't write that here due to Blog-etiquettes

    - Onkar Bhardwaj

    ReplyDelete
  15. हाहाहाहा ओंकार...
    हे मी विसरलोच होतो! हे पुण्यातच काय आमच्या(तश्या पुणेरीच) - साठ्ये कॉलेजात पण अस्तित्वात होते.
    ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार!

    ReplyDelete