6/28/2010

आठवणी

'आठवणी' ह्या शब्दाशी सहसा भल्याभल्यांच्या मनाचे कोपरे हळवे होतात आणि काहीकाहींच्या डोळ्यांचे कोपरे पाणावतात. आठवणी गोड असतात तशा कडू असतात, चांगल्या असतात तशा वाईट असतात, हसर्‍या असतात तश्याच मुसमुसणार्‍याही असतात, आनंदाचं निधान असतात तशा दुःखद विधानही असतात; एकंदर रॅंडम व्हेरिएबल असतात. तुम्ही आठवणी असं इनपुट दिलं, की आऊटपुट काय असेल त्याचा नेम नाही!

अनेकदा ह्या चित्रविचित्र आठवणी इतक्या अनप्रेडिक्टेबल असतात की, तुम्हाला कुठल्या सिच्युएशनमध्ये काय आठवण येईल, ह्याचा नेम नाही! माझं बरेचदा असं होतं. मी उभा असतो रेल्वे तिकिटांच्या लायनीत आणि शांत चित्ताने इकडे तिकडे बघत असतो, अशा वेळी मला सहजच शाळेची आठवण येते. आता काय संबंध. काहीतरी असेल, कदाचित आमच्या शाळेतल्या बर्‍याचश्या बाई ट्रेनने घरी जाण्याचा उल्लेख करत म्हणून असेल, किंवा अजून काही. मी स्वतः शाळेत असताना कधी लोकलच्या पुलाची पायरी चढलो नाही पण रेल्वेच्या लायनीत बरेचदा शाळेची आठवण येते. रेल्वेतून जाताना कॉलेजच्या आठवणी येतात. हे लॉजिकल आहे. कॉलेजच्या सोनेरी वर्षांमधल्या ऍक्च्युअल सोनेरी काळातला एक हिस्सा ट्रेनमध्ये मित्रांसोबत व्यतीत केलाय. इथे मिलानच्या बंदिस्त लिफ्टमध्ये एकटा असताना तर, शाळेत व्यवसायावर मिळालेल्या पहिल्या(आणि एकमेव) अपूर्ण शेर्‍यापासून ते स्वतःहून पहिल्यांदाच बनवलेल्या गोडाच्या शिर्‍यापर्यंत काहीही आठवतं. बरेचदा कुठल्याही पाळीव प्राण्याचा उल्लेख झाला, की आमच्या समोर राहणार्‍यांनी पाळलेल्या दोन वेगवेगळ्या कुत्र्यांच्या आठवणी जागृत होतात.

एके दिवशी सहज एका मित्राबरोबर नोकरी आणि भवितव्य असल्या गहन विषयावर चर्चा करत होतो आणि एकदम गाडी लग्नावर कशी आली कळलं नाही. तो मला एकदम त्याच्या अनेक सुखद(आणि आता दुःखद) अश्या आठवणी सांगायला लागल्या. तिला घरच्यांच्या विरोधामुळे कसं सोडलं, मग लग्नासाठी मुली कश्या पाहिल्या असल्या काय काय आठवणी तो सांगत बसला. आता बोला.

पण ह्या अनप्रेडिक्टेबिलिटीबरोबरच ह्या आठवणी बरेचदा समोरच्याची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर आणतात. आठवणींच्या कल्लोळामध्ये माणूस एव्हढा हरवून जातो, की मग त्याने जगासाठी घातलेली सगळी कवचकुंडलं गळून पडतात, सगळे मुखवटे लुप्त होतात. त्याक्षणी तो माणूस फक्त तो माणूस असतो. ह्याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा मला अगदी जवळून ह्या वेळच्या सुट्टीत आलं. मी माझ्या बाबांबरोबर नेहमीसारखाच सातार्‍यात फिरत होतो. फक्त फरक एव्हढाच होता की आमच्याकडे त्यादिवशी मोकळा वेळ होता. आम्ही दोघे नेहमीसारखेच बाबांच्या शाळेसमोरून चाललो होतो. बाबांची नज़र भिरभिरत होती. शाळेचं पटांगण, त्याच्याबाजूला असलेला सायकली लावायचा स्टँड, गेट, इमारत, इमारतीच्या बाहेरचा कठडा.

अचानक बाबा बोलायला लागले. "हे इथे आम्ही खेळायचो. ह्या इथे सायकली लावायचो. छ्या! स्टँडची पार वाट लागलीय. गेटही कोलमडलंय. इमारतीची पार रया गेलीय. इथनं आम्ही आत शिरायचो. आणि इथे ह्या कठड्यावर आम्ही दौती फोडायचो. तेव्हा रस्ता एव्हढा वर नव्हता."

"दौती फोडायचात? म्हणजे? कशासाठी?" मी.

बाबांच्या चेहर्‍यावरचे भाव त्याक्षणी अनमोल होते. "उगाच. काहीच कारण नाही. परीक्षा संपली की सगळेजण फोडायचे. आम्हीही फोडायचो." एक मिश्किल हसू होतं त्यांच्या चेहर्‍यावर. कदाचित त्याक्षणीही ते त्या वर न आलेल्या रस्त्यावर गुडघ्यांवर बसून त्या कठड्यावर दौती फोडत होते, चहूकडे काचा आणि शाईचा खच पडला होता; पण तो फक्त त्यांच्या नजरेला दिसत होता.

बाबा आणि माझं नातं बाप-लेकाच्यापेक्षाही पुढचं आहे. मित्रासारखंच. ते मला खूपदा खूप काही सांगतात, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या एकंदर आयुष्याबद्दल. अगदी जेवतानाही सगळ्या कुटुंबगप्पांमध्येही. माझी आईसुद्धा तिचं लहानपण वगैरेंबद्दल सांगताना विलक्षण हळवी होते. कॉलेजातली प्रोफेसर असलेल्या माझ्या आईला तिच्या बालपणी चॉकलेटं आणि विविधरंगी रिबीनी कश्या आवडायच्या हे सांगते तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचे भाव प्राईसलेस असतात. माझ्या बाबांची कवचकुंडलं उतरताना मी खूपदा पाहिलीत. जगासाठी टफ गाय असणारे माझे बाबा आठवणी सांगताना हळवे कसे होतात हे मी पाहिलंय. पण त्यादिवशी का कुणास ठाऊक, मी त्यांच्याशी आयडेंटिफाय केलं. कदाचित शाळा हा त्यांच्या आणि माझ्या बालपणातला कॉमन पॉईंट होता, 'लघुत्तम सामायिक विभाजक'. त्यादिवशी बाबा ज्या नजरेनं शाळेकडे बघत होते, कदाचित त्याच नजरेनं मीही आज पाहत असेन.

दोन दिवसांपूर्वी मी माझ्या जुन्या इमारतीमधल्या (जिथे मी जन्मापासून १४ वर्षांचा होईपर्यंत राहत होतो) माझ्या बालमित्राला भेटलो. त्यानेही १५ व्या वर्षी ती इमारत सोडली होती(बाबांच्या कंपनीची क्वार्टर होती ती). आम्ही दोघे हॉटेलात बसलो होतो. नोकरी, पुढचं शिक्षण, भविष्य आणि मुली असल्या तारूण्यसुलभ गप्पा झाल्यावर आम्ही आमच्या एकत्र घालवलेल्या लहानपणावर आलो. आमचा त्यादिवशी मिसिंग असलेला तिसरा भिडू, आम्ही लहानपणापासून केलेले विविध उद्योग, आमच्या इमारतीत आम्ही तीन १२ वर्षाच्या पोरांनी मिळून सुरू केलेली होळी पूजेच्या पाण्याने कशी विझली आणि मग डगमगून न जाता आम्ही पुढच्या वर्षी कशी अजून चांगली केली आणि आज १२ वर्षांनंतर कसा त्या होळीचा रोपट्याचा वटवृक्ष झालाय, कसे आम्ही पतंगांच्या मागे धावायचो आणि गाडीमागे धावणार्‍या कुत्र्याप्रमाणे कित्येक दिवस पकडलेल्या पतंगांच हिशोब ठेवण्यापलिकडे काहीच करत नसू, कसे गच्चीत क्रिकेट खेळायचो, कसे त्या सिमेंटच्या गच्चीत डाईव्ह मारून फिल्डिंग करायचो, छ्या! न जाणे काय काय बोलत बसलो. वेटर आमच्याकडे पाहत असतील कदाचित. आम्ही पार हरवून गेलो होतो. मला आत्ताही आठवतंय, विषय निघाला तेव्हा माझ्या हातांना सूक्ष्म कंप सुटला होता. आत्ताही तसंच वाटलं हे सगळं टंकताना.

बळेच निघालो. पुन्हा जिथे वाटा वेगळ्या होत होत्या, तिथे अर्धा तास गप्पा मारल्या. तो आता यूकेला निघालाय. न जाणे अजून दोनेक वर्षांत भेट तरी होईल की नाही. निघताना त्याला मिठी मारली. त्या दोन तासांत मी आयुष्याची कळायला लागल्यापासूनची महत्वाची वर्षं पुन्हा जगलो होतो. जड अंतःकरणानं रिक्षात बसलो. दुसर्‍या दिवशी रात्रीचं फ्लाईट होतं. मी शून्य नजरेनं बाहेर बघत होतो. रिक्षा माझ्या जुन्या इमारतीवरूनच जाते. रात्रीचे अकरा वाजत होते. ती इमारत जवळ येत होती. माझ्या अंगावर शहारा आला होता. धडधड थोडीशी वाढली होती. मी रिक्षातून वाकून वाकून पाहत होतो. ती इमारत आली. मी डोळे भरून ती संपूर्ण पाहिली.

आजच्या तारखेला त्या इमारतीत असंख्य बदल झालेत, पण त्याक्षणी माझ्यासमोर माझी जुनी इमारतच होती. तिच्या कानाकोपर्‍यात मी दोन सेकंदात मनातल्या मनात जाऊन आलो. तिच्या कुशीत खेळून आलो. जिन्यांवरून धडाधड उड्या मारत पतंग पकडायसाठी गच्चीपासून ग्राउंड फ्लोअरपर्यंतचे पाच मजले उतरून आलो. आईबाबांचं किंवा कुठल्याही मोठ्यांच लक्ष नाही पाहून जिन्याच्या कठड्यावरून पाचव्या मजल्यापासून खालपर्यंत घसरतही आलो. मग रिक्षा पुढे आली. माझी जाणीव गडद व्हायला लागली. माझं वय आता २५ आहे. मी नोकरी करतो. क्षणभर काहीतरी उणीव राहून गेल्यागत वाटलं.

म्हटलं ना मगाशी. सगळी कवचकुंडलं गळून पडतात त्याक्षणी! आठवणी!

6/21/2010

ब्लॉगवाले आणि शेंह्गड!

टीप : नोंद लिहिताना मी उपस्थितांच्या नावांचे स्वैर उल्लेख केलेत, त्यामुळे सुरूवातीलाच उपस्थितांची यादी लिहितो, जेणेकरून वाचताना प्रश्न पडणार नाहीत.

१. सुरेश पेठे उर्फ पेठेकाका. २. अनुजाताई. ३.(तन्वीताई+अमित+ ईशान+गौरी) देवडे. ४. सुहास झेले. ५.सचिन उथळे-पाटील ६. देवेंद्र चुरी. ७.भारत मुंबईकर. ८.आनंद(पत्रे+काळे). ९.अभिजीत वैद्य. १०.अस्मादिक.(कोणी राहिलं नाहीये ना? हा प्रश्न मला नेहमी छळतो आणि कोणी खरंच राहिलं असेल तर तो नंतर छळतो.)

८ मे चा ब्लॉगर्स मेळावा थोडक्यात हुकल्याची जी रुखरुख लागली होती, ती थोडीफार कमी होईल अश्या धनविचाराने प्रेरित होऊन मी ऋणभारित विद्युतकणाने धनभारित कणाच्या दिशेने ओढले जावे तश्यागत पुण्याकडे निघालो होतो. मागचं वाक्य उगाच जडबंबाळ केलंय हे मलाही माहितीय, तुम्हालाही माहितीय पण त्याचं स्पष्टीकरण वाक्यातच मिळेल नीट वाचा (अजून नाही कळलं? बरं सांगतो, मी पुण्याला जाऊन आलोय. बाकी, हे माझी टीप वाचूनही चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आलं असेल.).

पहाटेची वेळ होती. उठायचा अशक्य कंटाळा आला होता. बर्‍याच वर्षांत एकट्याने एसटीने प्रवास केला नव्हता, त्यामुळे थोडं दडपण आलं होतं. बाकी एकट्यानेचा भाग वगळला, तरी एसटीनेही बर्‍याच दिवसांत प्रवास केलेला नव्हता हेही कारण पुरेसं होतं. हळूहळू आवरून कसाबसा तयार होईस्तोवर ७ वाजले. बाबा म्हणाले स्टॅंडला सोडायला येतो. खाली उतरून पाहिलं तर गाडीचं टाय पंक्चर('पंचर' हा शब्द अगदी बोटांवर आला होता). मग रिक्षा धरून स्टॅन्ड गाठला. एक गाडी बारामती व्हाया स्वारगेट होती, आणि दुसरी स्वारगेट. बारामतीची ७.४५ आणि स्वारगेट ७.३०. स्वारगेट निम-आराम पकडली एकदाची. सुटकेचा निःश्वास टाकला. कंडक्टरने तिकिट फाडलं(अक्षरशः फाडलं हो! दोन तुकडे हातात दिले. मला क्षणभर सिनेमाला आलोय की काय असं वाटून गेलं. माझा शहाणपणा इथेच थांबवतो.). मग निवांत झालो. सकाळपासून काय शुभशकुनी सुरूवात झाली असं म्हटलं आणि टाकली मान. मग गाडी एक्स्प्रेसवेवर ट्रॅफिकात अडकली. पुढे शेवटी एकदाची धूर ओकायला लागली आणि बंद पडली. सकाळपासून चाललेले शुभशकुन पाहून गलबलून आलं. शांतपणे रस्त्यावर उतरलो. का कुणास ठाऊक माझा मूड फार म्हणजे फारच चांगला होता(हे सार्कॅस्टिक नाहीय). मला राग-तगमग असलं काहीही वाटत नव्हतं. कदाचित ज्यासाठी चाललो होतो ते असावं किंवा झकास वातावरणाचा परिणाम असावा. मग मागून येणार्‍या दुसर्‍या निम आरामेत चढलो. चढण्याच्या आधी नाव वाचलं होतं, त्यामुळे स्टॅंडिंग होतो तरी एकदा आढ्याकडे पाहिलं, मग लक्षात आलं बसला आढं नसतं. दैवाची गहन गती, ती गाडी तीच बारामतीची(काकांची) गाडी होती, जी सोडण्याची मी गुस्ताख़ी केली होती. असो.

मग एकदाचा १ वाजता बहिणीच्या घरी पोचलो. जेवलो आणि ताणून दिली. पहाटेचा बॅकलॉग होता. ती संध्याकाळ नातेवाईकांना भेटण्यात व्यतीत केली. सगळ्या ब्लॉगरमित्रांना फोनाफोनी करून दुसर्‍या दिवशीचा प्लॅन ठरला का? ठरवायचा का? असले निरर्थक प्रश्न विचारले. कुणी पिंपळे, कुणी वाकड, कुणी कोरेगाव पार्क, कोणी मयूर कॉलनी तर कुणी एरंडवणे(मी) असे सगळे जण पुण्यावर ताबा मिळवण्यासाठी आल्यागत शहराच्या वेगवेगळ्या भागात होतो. रात्री १० पर्यंत ही परिस्थिती स्टेलमेटमध्येच कायम होती. मग शेवटी एकदाचा मी ओंकार भारद्वाजला भेटलो. म्हटलं चला कमीतकमी एकाला तरी भेटलो. ओंकार अनिश सानेबरोबर मयूर कॉलनीतल्या 'दुर्गा कॅफे' मध्ये भेटला. आता हे 'दुर्गा कॅफे' काय प्रकरण आहे, ते अस्सल पुणेकरांना (त्यातही तरूणांना) विचारा. त्याची कशी एकही शाखा नाही, त्याचा कॉफी बनवणारा कसा पळून गेला, त्याने पेटंट न घेतल्याने भलत्याच लोकांनी कशी चेन सुरू केली, मग ओरिजिनल(कोठेही शाखा नाही) आणि चेन वाल्याच्या पाटीच्या रंगात कसा फरक आहे वगैरे सुरस, चमत्कारिक फॅक्ट्स ऐकायला मिळतील. एकंदर 'दुर्गा कॅफे' हे प्रकरण 'लेजेन्ड' किंवा 'कल्ट' ह्या सदरात मोडतं असा विचार करत मी सदर्‍याचं एक बटन उघडलं आणि एक हॉट कॉफी मागवली. मस्त वातावरण होतं, आजूबाजूला कॉलेज आणि आयटीवाले तरूण-तरूणी होते. अश्या वेळीच गप्पांना बहर येतो. धमाल गप्पा झाल्या. ओंकार महिनाभरात यूएसला चाललाय त्यामुळे भेट झाल्याने खूपच छान वाटलं. मग साडेअकराच्या सुमाराला घरी पोचलो. रात्री १२ वाजता मी झोपायला निघालो होतो तेव्हा सुहासचा फोन आला. म्हणाला, आम्ही पुणं भटकतोय. मला वाटलं मंडळी एन्जॉय करतायत. पण दुसर्‍या दिवशी कळलं, की पुण्यानेच मंडळींना एन्जॉय केलं होतं. तपशीलवार वर्णन सुहासच्या ब्लॉगवर येईलच.

मग दुसर्‍या दिवशी सकाळचा प्लॅन ठरला. सगळ्या जमलेल्या ब्लॉगरांनी शनिवारवाड्याजवळ भेटायचं आणि तिथून सिंहगड पायथ्याला जायचं. मग वर जायचं(गडावर) की फार्मवर बसून गप्पा टाकायच्या हे तिथेच ठरवू असा 'प्लॅन ठरला'. किमान एव्हढी प्रगती झाली. मग मी ओंकारला फोन केला, दुर्दैवाने तो थोडा आजारी असल्याकारणे त्याचं येणं रद्द झालं. मग मी अभिजीत वैद्यला('आवरा' फेम) फोन केला. त्याने होकार दिला. अर्धं काम झालं असं मला वाटलं. मला पोहोचायला थोडा उशीर झाला(इतरांनाही झाला तसा, पण सहसा मोठ्या मनाची माणसे स्वतःवर आळ घेतात, मी लहानपणीही लपाछपीत नेहमीच स्वतःवर राज्य घ्यायचो). त्यामुळे ९.५० ची बस सुटली. पुढची १०.५० ची. म्हणून मग शनिवारवाड्यावर जायचे ठरले. त्यावेळीच मला कळलं की तन्वीताई पण पुण्यात आलीय. मी तिला नाशिकला येईन असं आश्वासन देऊन मुरब्बी नेत्याप्रमाणे मोडलं होतं(परिस्थिती हो, मी तसा वाईट नाही), त्यामुळे तिची आयतीच भेट होणार तिही सहपरिवार म्हटल्यावर मी आनंदलो(दोन आनंद बरोबर असल्याने आनंद द्विगुणित झाला). मी कित्येक वर्षांनी शनिवारवाड्यात शिरलो. उगाच नारायणरावांचं टेन्शन येत होतं. ते मलाच गारदी समजणार नाहीत ना असा विचार करत दाढी कुरवाळत होतो. मग आनंद काळे आणि अन्य काही मंडळींनी फोटो काढायला सुरूवात केली. आम्ही उगाच पेशवे असल्यागत सगळ्यांवर नजर ठेवून हिंडत होतो(इथे 'आम्ही' हा 'शनिवारवाडा इफेक्ट' आहे).

मग एकदाची बस आली आणि आम्ही सगळे बशीत(बसमध्येला 'त'कारान्त असंच करावं लागेल, बशीमध्येचंही असंच होईल..म्हणून लवकरात लवकर 'बस' ह्या आंग्ल शब्दाला पर्यायी मराठी शब्द शोधावा लागेल, नाहीतर चहाला राग येईल. अति पाणचटपणा{इथे 'इति पाणचटपणा' म्हटलं असतं तरी चाललं असतं}.) बसलो एकदाचे. मग तन्वीताईचा फोन आला. ती म्हणाली आम्ही पंधरा मिनिटांत पोचतोय पायथ्याला. मी म्हटलं आम्ही अर्ध्या तासात, इथे मी अर्धा तास जाणून बुजून कमी सांगितला उगाच कशाला सकाळी सकाळी खरं बोला. मग अभिजीत वैद्यला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. त्याने बिचार्‍याने त्याचा लोणावळ्याचा प्लॅन रद्द केला होता आणि ऑलरेडी सकाळ वाया गेलेली होती. त्याने मला विचारलं, की गाडी आणू की बसने येऊ? मी म्हटलं बसला गर्दी आहे, गाडी आण(माझ्या ह्या प्रसंगावधानाचा मला पुढे फार फायदा झाला). मग मी थोडा शांत झालो. मग बसमध्ये पेठे काका आणि अनुजाताई बसल्यावर आम्हा बाकी मंडळींमध्ये खेचाखेची सुरू झाली. शेवटून दुसर्‍या स्टॉपला बसमध्ये जीपवाले चढले आणि ओरडायला लागले, "चला शेंह्गड शेंह्गड, जीपनं शेंह्गड!" आम्ही सगळे त्या टिपिकल उच्चाराचे एव्हढे फॅन झालो की ह्यापुढे मी शेंह्गडच लिहिणार आहे. मजल दरमजल करत आम्ही एकदाचे पोचलो. मग पोचल्यावर खल सुरू झाला. पुढे काय? प्लॅन इथपर्यंतचाच होता. पुढचं प्लॅनिंग पायथ्याशीच करायचं असाच आमचा प्लॅन होता.

मग तन्वीताई सहपरिवार आली. ईशान आणि गौरीला प्रत्यक्ष बघण्यासाठी केव्हाचा उत्सुक होतो, ऑफकोर्स तन्वीताई आणि अमितलाही. गौरीला बघून तर मला माझ्या अजून एका भाचीची आठवण होते. बाई मूडमध्ये नव्हत्या. पण भाचा फुल फॉर्मात होता. मग पुन्हा एकदा 'मोमेंट ऑफ ट्रुथ' आली. शनिवारवाडा बस स्टॅंडवर बस सुटल्याने प्लॅन बदलला, इथे शेंह्गड पायथ्याशी आनंद काळे सुटल्याने प्लॅन बदलला.

त्याचं झालं असं. आम्हा सगळ्या आळशी मंडळींना गडावर चढून जायचा कंटाळा आला होता. आम्हा चार जणांना(मी, सुहास, सचिन आणि देवेंद्र) मुंबईला जायची घाई होती, कारण संध्याकाळी चार-पाचची बस पकडायची होती. त्यात देवेंद्रला तर बोईसर(गुजरात बॉर्डर) पर्यंत जायचं होतं(पुढे हा कळीचा मुद्दा झाला). म्हणून फार्मवरच बसून गप्पा टाकायचं ठरलं. पण आका(आनंद काळे) पेटला. 'मला आर्टिफिशियल आवडत नाही' अशी शेंह्गडाला शोभेलशी शेंह्गर्जना त्याने केली आणि सगळ्यांचाच आळस झटकला. मुंबईवाल्यांना त्याने 'देवेंद्रला तर बोईसर पर्यंत जायचंय, तो काही बोलत नाही तर तुम्ही का?' असं म्हणून गप्प केलं, कारण देवेंद्र खरंच गप्प होता. मग मांडवली झाली, मिळेल त्या वाहनाने गडावर जायचं ठरलं. आकाची स्वारी खुश आणि त्यामुळे आम्ही खुश, शेवटी मित्र आहोत त्याचे. पण बरंच झालं, आकामुळे शेंह्गड झाला. हे सगळेच मान्य करतील.

अभिजीत गाडी घेऊन येणार, हे विधान मिसलिडिंग आहे. पण तो पुणेकर आहे त्यामुळे ती बाईकच असणार हे माझ्या चाणाक्ष पुणेप्रेमी बुद्धीने ओळखलं होतं. आणि त्याची बाईक येताच मी हक्काने त्याच्या मागे बसलो. ते थेट शेंह्गडावर जाऊन उतरलो. आता आम्ही दोघे रविवारच्या गर्दीत हळूवार भुरभुरत्या पावसात बाकीच्यांची वाट पाहत होतो. पंधरा मिनिटांनी तन्वीताईच्या गाडीने देवडे परिवार, अनुजाताई आणि पेठेकाका पोचले. तेव्हढ्यातच त्यांच्या गाडीची क्लचप्लेट त्रास देऊ लागली होती. दिवस भलताच इव्हेंटफुल होत होता(हे पोस्टही भलतंच लांबत चाललंय).

मग आम्ही द्रोह केला आणि बाकीच्यांची वाट न पाहताच खादाडीप्रारंभ केला. कांदाभजी, मटका दही आणि ताक असा अल्पोपहार सुरू केला. तेव्हढ्यात बाकी मंडळी पोहोचली आणि मैफल रंगतदार होऊ लागली. मग गडावर फिरण्यास निघालो. जेवणं नंतरच करावी असं ठरलं. (पण ते 'नंतर' कधी आलं नाही त्यामुळे निषेधांपेक्षा खसखसच जास्त पिकेल. ) मग मस्त भटकंती सुरू झाली. फोटो काढणे, गप्पा-विनोद, मुक्त आणि चालता फिरता मेळावा झाला. तन्वीताईच्या भाषेत, 'निम-पावसाळी ब्लॉगर्स ट्रेक' झाला. तपशीलात शिरलो तर मजा जाईल. पण एकंदरच खूप मजेशीर तास-दीड तास गेला. वातावरण एकदम आल्हाददायक होतं. मधेच हलका पाऊस, धुकं, ढग. एकदम मस्त. मग 'आम्हा मुंबईकरांना' परतीची वाट खुणावू लागली. पुन्हा आम्ही 'देवेंद्रला दूरपर्यंत जायचंय' हा इलेक्शनचा मुद्दा काढला. एक बरं होतं, देवेंद्र दोन्ही वेळेस काही बोलत नव्हता, त्यामुळे मुद्दा वापरणारे आम्ही मुरब्बी की दोन्ही वेळेस मौन पाळणारा तो, हे कोडंच आहे.

मग आम्ही सगळ्यांना घाई करत करत पुन्हा वाहनतळापाशी घेऊन आलो. दुपारचे अडीच वाजून गेले होते. गर्दी फार होती. परतीला बराच उशीर झाला असता. पण आकाचा पत्ता नव्हता. तो वेगळ्या रस्त्याने येतो सांगून धुक्यात हरवला होता. नंतर कळलं की तो ४० मिनिटे गायब होता आणि धुक्यात असल्याचा फायदा घेऊन, एकटाच मलाई कुल्फी खाऊन आला. बाकी सगळे मुंबईकर थेट स्वारगेटला पोचणार होते, पण माझं सामान बहिणीकडे होतं त्यामुळे मला जाणं भाग होतं. मी अभिजीतबरोबर निघालो. आम्ही गेल्यावर सगळ्यांनी कैरी, शेंगा असली खादाडी केली.

अभिजीतनं मला घरपोच सोडलं आणि टेन्शन मिटवलं. मग मी थोडा जेवलो आणि तयार झालो, पण बाकी मंडळींचा पत्ता नाही. ते सगळे ६ वाजता स्वारगेटला पोचतो म्हणून ६.४५ ला पोचले. आनंद पत्रे, सचिन आणि भारत खास आम्हाला सोडायला स्टॅंडपर्यंत आले. मला भरून आलं होतं, पण 'इट गोज अगेन्स्ट द इमेज'. आका ठाण्याच्या गाडीत बसला व मी, सुहास आणि देवेंद्र बोरिवलीच्या गाडीत बसलो. आनंद पत्रे, सचिन आणि भारतशी शेकहॅन्ड केला आणि बस निघाली. पुन्हा एकदा अख्खा दिवस मनातल्या मनात जगलो.

बसमध्ये देवेंद्रला त्याचा एका मित्राचा फोन आला. त्यानं त्याला विचारलं, 'पुण्याला कशाला गेलायस?' त्यावर देवेंद्रनं उत्तर दिलं, 'मित्रांना भेटायला.' समोरच्यानं विचारलं, 'कुठले मित्र?'. हा म्हणाला, 'ब्लॉगवरचे मित्र'. समोरचा, 'काय?'. अगदी हीच सिच्युएशन मीच काय सगळ्यांनीच फेस केली असेल. गंमत वाटली. मनात उजळणी केली. आम्ही सगळेच कधीच एकमेकांना न भेटलेले, फारतर ४-५ जण आधी भेटलेले असतील एखादवेळेला. पण एकत्र आल्यावर कुठेच कसलीच औपचारिकता जाणवली नाही. सगळेच एकमेकांशी फार पूर्वीची ओळख असल्यासारखे मोकळेढाकळे होतो. अगदी मोठं कुटुंब असल्यागत, काका होते, ताया होत्या, भाचा-भाची होते, त्यांचे खूप सारे मामा होते. किती लिहू आणि किती नाही.

मी ११.४५ला, सुहास १२.४५च्या आसपास आणि देवेंद्र पार २.३० वाजता घरी पोचला. एक अविस्मरणीय अनुभव संपला होता.

तीन गोष्टींची मात्र रुखरुख लागलीय. सगळ्यांशी निवांत दिवसभर गप्पा मारायला झालं नाही, गौरी-ईशानचे लाड करता आले नाहीत नीट आणि आंद्या तुला कडकडून मिठी मारायची होती रे, बस सुटताना जाणवलं. असो. पेंडिंग ठेवू काहीतरी तरच पुढच्या भेटीसाठी धनविचाराने प्रेरित होऊन मी ऋणभारित विद्युतकणाने धनभारित कणाच्या दिशेने ओढले जावे तश्यागत पुन्हा कुठेतरी येईन.

ता.क.(इथे सहभागी लोकांना गडावरचं ताक आठवणं स्वाभाविक आहे) - सगळ्यांना आज दुपारीच पोस्ट टाकेन असं आश्वासन देऊन मी आत्ता तांत्रिकदृष्ट्या उद्या पोस्ट टाकतोय. माझ्यात नेता होण्याची क्षमता दिसतेय. आणि फोटो टाकणार होतो, पण तन्वीताई आणि बाकीच्यांनी फोटो पाठवले नाहीत अजून. पैकी तन्वीताईने फोटो दुपारपर्यंत पाठवण्याचं आश्वासन न पाळून त्याबाबतीतही माझी मोठी बहीण असल्याचं दाखवून दिलंय. जसे फोटो मिळतील. इथे लिंक देईन. पेठेकाकांच्या कल्पनेमुळे आणि पुढे अनुजाताईच्या पुढाकाराने सगळ जमून आलं, तन्वीताई आणि अमित अगदी गाडी घेऊन नाशकापासून आले आणि बाकी सर्वांचंच ही भेट यशस्वी केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आभार. इति लेखनसीमा (इथे 'अति लेखनसीमा' सुद्धा चालेल.)

फोटोंचा दुवा (सौजन्य : सुहास झेले)

6/15/2010

लेख आणि लेखावरच्या प्रतिक्रिया - वाईड ऍन्गल!

हल्ली एका गाजलेल्या वर्तमानपत्राच्या संस्थळावर एक सदर येतं, ज्यात लोक आपले अनुभव वगैरे लिहून पाठवतात. आता सामान्य माणूस लिहिणार म्हणजे, ते काय वर्ल्डक्लास लिखाण नसणार. लोक जमेल तसं पाठवतात हौसेने. पण तिथे काही नेहेमीचे कॉमेंटणारे शिलेदार असतात, जे दांडपट्टे घेऊन तयार असतात. आला लेख की पावनखिंडीतले बाजीप्रभू चाट पडतील अश्या त्वेषाने हे लोक लेखावर तुटून पडतात. पार चिंध्या करून ठेवतात. एखाद्या सदगृहस्थाने चुकून जर स्वतःच्या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचल्या, तर तो उभ्या आयुष्यात लेखणीला हात लावायचा नाही. बरं बरेचसे लोक टोपणनावांनी कॉमेंटतात. त्यात एकच माणूस वाट्टेल तितक्या नावांनी कॉमेंटतो. एकंदरित मजा येते. पुलं 'असा मी असामी'त म्हणतात, 'नारदाच्या वाक्याला टाळी आमच्या बाबांनी घेतली' तसं, लेखापेक्षा प्रतिक्रिया वाचूनच जास्त करमणूक होते.

इथे सगळ्यांना कल्पना यावी म्हणून मी एक काल्पनिक लेख आणि त्यावरच्या काल्पनिक प्रतिक्रिया लिहितोय. ह्यातलं काहीही मूळ संस्थळावरून घेतलेलं नाही. सगळंच्या सगळं काल्पनिक आहे. कुठल्याही जीवीत अथवा मृत व्यक्तीशी ह्यातल्या कशाचाही संबंध नाही.



ती घटना आजही उडवते थरकाप!

मनोज के., लातूर

(इथे एक कार्टून, ज्यात एका १०-१२ वर्षांच्या मुलावर हल्ला करणार्‍या कुत्र्याचं विनोदी चित्र आहे.)

ही घटना साधारण २० वर्षांपूर्वीची असेल. तेव्हा मी चार-पाच वर्षांचा असेन. मी आपल्या आईसोबत मोठ्या भावाला सोडायला शाळेत चाललो होतो. त्याकाळात आम्ही सातार्‍यात राहायचो. वरच्या गुरूवार पेठेतून न्यू इंग्लिश स्कूलला जायचा रस्ता छोट्या गल्ल्यांमधून जायचा (कदाचित अजूनही जात असेल). ह्याच छोट्या गल्ल्यांमध्ये सहसा आम्ही गोट्या खेळायचो. म्हणजे माझा मोठा भाऊ खेळायचा आणि मी कच्चा लिंबू.

तर आम्ही तिघेजण रस्त्याच्या कडेने चाललो होतो. त्यावेळी रस्त्याच्या कडेने चालणं शक्य होतं, कारण लोकांकडे आजच्यासारख्या वाट्टेल तेव्हढ्या गाड्या नव्हत्या. त्यावेळी दुचाकी असणं म्हणजे सुखवस्तू असण्याचंच लक्षण होतं. आमच्या बाबांकडे तेव्हा प्रिया स्कूटर होती. म्हणजे ती आजही आहे आणि चांगली चालते. बाबांनी आणि त्यानंतर मी आणि भावाने ती व्यवस्थित ठेवली ही एक गोष्ट आणि प्रिया ही स्कूटर कंपनी चांगल्या स्कूटर बनवायची ही दुसरी गोष्ट. कुठलीही गोष्ट व्यवस्थित सांभाळून ठेवायची ही सवय आम्हाला आमच्या आजोबांकडून मिळाली असावी. त्यांनी इंग्रजांच्या काळात विकत घेतलेलं पॉकेट वॉच आजही व्यवस्थित चालत आहे. बाकी प्रिया ही स्कूटर कंपनी बंद का पडली हे मला कळत नाही, कदाचित त्यांना स्पर्धेला तोंड देता आलं नाही.

तर मुद्दा हा की, त्याकाळात रस्त्याच्या कडेने चालणं शक्य होतं, कारण लोकांकडे आजच्यासारख्या वाट्टेल तेव्हढ्या गाड्या नव्हत्या. आणि लोकांना त्या वाट्टेल तश्या वाट्टेल तिथे लावायच्या सवयीसुद्धा नव्हत्या. त्यामुळे आम्ही तिघे (मी, आई आणि भाऊ) रस्त्याच्या कडेने शाळेकडे चाललो होतो. भावाची पाटी-पुस्तक त्याच्या दप्तरात होते. सहसा तो जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याचे पाटी-पुस्तक जसे च्या तसे असत, तो शाळेत काय पाट्या टाकायचा कुणास ठाऊक. जशी गाडी नेहमी काढतात, स्लॅब नेहमी पाडतात, समिती किंवा चौकशी बसवतात, तश्या पाट्या नेहमी टाकतात असे का? हे मला आजतागायत कळलेले नाही. असो.

तर माझ्या भावाच्या दप्तरात त्याचे पाटी-पुस्तक होते. चालताना त्याला ठेच लागली आणि तो पडला. त्याचे दप्तर मात्र आईच्या हातात असल्याने पडले नाही. आई त्याला उचलण्यासाठी वाकली, तेव्हा दप्तरातून खडू पडले. आता रडणार्‍या भावाला गोळी आणि एक खडू घेऊन देणे भाग असल्याकारणे घाईगडबडीत ती शेजारच्या वाण्याच्या दुकानाकडे वळली. भाऊ एकीकडे रडत होता आणि मी लहान होतो त्यामुळे आईचे अर्धे लक्ष आमच्याकडे आणि अर्धे खरेदीकडे होते. तेव्हढ्यात माझे लक्ष कोपर्‍यावर बसलेल्या कुत्र्याकडे गेले. त्याच्यासमोर एक रंगीत कागद पडला होता. माझे बालमन आकर्षिले गेले आणि मी चटकन त्याच्याकडे गेलो. आईचे नेमके तेव्हाच थोडे दुर्लक्ष झाले होते.

मी कुत्र्यासमोर पोहोचलो. कुत्रा पायांत डोके घालून शांत बसला होता. मधेच त्याचे पाय चाटणे चालू होते. त्याचा धपाधप चाललेला श्वासोच्छ्वास मला आजही स्पष्ट आठव्बतो. त्याच्या बरोब्बर समोर तो रंगीत कागद पडला होता. मी तो रंगीत कागद उचलणार एव्हढ्यात कुत्र्याने वर पाहिले. शेजारीच त्याचे हाडूक पडले होते. मी त्याचे हाडूक घेत आहे असे त्याला वाटले असावे त्यामुळे त्याने एकदम माझ्यावर झेप घेतली. तो माझा चावा घेणार एव्हढ्यात कुठूनसा एक दगड भिरभिरत आला आणि कुत्र्याच्या पेकाटात बसला. कुत्रं कोकलत दूर पळून गेलं.

अचानक बसलेल्या धक्क्यातून मी भानावर आलो आणि भोकाड पसरलं. तोवर आईही तिथे पोहोचली. त्या कुत्र्याने त्यादिवशी नक्कीच माझी जीवनयात्रा संपवली तरी असती, नाहीतर आयुष्यभराची खूण तरी दिली असती लचके तोडून. तो संरक्षक दगड माझ्या मोठ्या भावाने मारला होता हे थोड्यावेळाने समजले. मग त्याला एका ऐवजी दोन आणि मला एक अश्या गोळ्या मिळाल्या.

ती घटना आजही काळजाचा थरकाप उडवते. जर माझ्या भावाने प्रसंगावधान दाखवून तो दगड वेळेत मारला नसता तर!

प्रतिक्रिया

कीर्ती - आई गं, केव्हढा बांका प्रसंग. माझ्याही अंगावर शहारा आला.

भुंगा - काही पण! लोक काहीही लिहितात आणि पेपरवाले काहीपण छापतात.

नाम्या - का हो त्या कुत्र्याला दिली की नाही एखादी गोळी, तुमच्या भावाचं रडं थांबवलं ना त्याने!

मुक्ता - तुम्ही तुमच्या पूर्ण लेखात कुत्रा, कुत्रा म्हणता मग मधेच कुत्रं का लिहिता? व्याकरणातलं सातत्य वगैरे काही असतं की नाही?

दुभाष - प्रिया तुम्हीपण एखादी कॉमेंट लिहा ना, किती छान कॉमेंट लिहिता तुम्ही!

चिंतामणराव - पहिली गोष्ट, जर तुमची आई भावाला शाळेत सोडायला चालली होती, तर तुमच्यासारख्या उचापती कार्ट्याला शेजार्‍यांकडे ठेवून का नाही गेली? दुसरी गोष्ट तुम्ही जर रस्त्याच्या कडेने चालला होतात, तर टेक्निकली तुम्ही लहान असल्याने रस्त्याच्या एकदम आतल्या बाजूला असणार ज्याकारणे तुमच्या भावाला ठेच लागण्याची शक्यता कमी होते. तिसरी गोष्ट, तुम्ही दोघेहीजण जर रडण्याएव्हढे लहान होतात, तर तुमची आई तुमचे हात धरायचे सोडून दप्तर धरून कशाला जात होती? चौथी गोष्ट, तुमचा भाऊ आणि तुम्ही नुसत्या गोळीने शांत होत होतात तर तुमची आई गोळ्या घेऊन फिरत का नव्हती? आणि पाचवी व महत्वाची गोष्ट, ४-५ वर्षांच्या मुलाला एव्हढं सगळं आठवतं का?

टोण्या - जियो चिंतामणराव!

वांगं - च्यायला चिंत्या, लय भारी!

उत्तम - चिंतामण, चित्रात मुलगा मोठा आहे, लक्षात राहिलं असेल.

दीप्ती - कसला ऍनॅलिसिस चिंतामणराव, तुफान!

दुभाष - प्रिया कॉमेंट लिहा ना! मी वाट बघतोय!

फेफ्या - अरे ह्या दुभाषला आवरा रे कुणीतरी!

टिपरे - चिंतामणराव तुम्ही नियमितपणे का लिहित नाही, जबरा विनोदी लिहिता राव.

काका - अरे मूळ लेखाबद्दल लिहा काहीतरी, काय चिंतामण चिंतामण, की तोच वेगवेगळे आयडी घेऊन स्वतःची स्तुती करतोय.

चिंधी - कैच्च्याकै, "मी, आई आणि भाऊ शाळेत जात असताना, मी कुत्र्याची खोडी काढली आणि कुत्रा माझ्यावर झेपावला, भावाने दगड मारून वाचवलं" एव्हढं लिहिलं असतं तरी चाललं असतं. सिरियल्स बघण्याचा परिणाम दुसरं काय?

अनिकेत - अहो सातार्‍याचं काय घेऊन बसलात, आमच्या पुण्यात तर कुत्रा पार्क करायला पण जागा नाही.

उल्हास - खूप उकडतंय....

सासरा - खरं आहे अनिकेत, अहो हे बाहेरचे लोक पुण्यात आले ना त्यामुळे पुण्याचा पार बोजवारा उडालाय.

उन्नती - तुमच्या भावाच्या प्रसंगावधानाचं खरंच कौतुक करावंसं वाटतं.

भोचक - काय च्यायला, हे पुणेकर कुठलीही गोष्ट ओढून ताणून पुणं आणि बाहेरचे लोक ह्यावर घेऊन येतातच. बाहेरच्या लोकांमुळे पुणेकर सुधरावेत ही अपेक्षा.

एक पुणेकर - भोचक, तुम्ही पुण्यात बाहेरून आलेले दिसता. चालू दे तुमचं!

विदर्भवनराज - पुणेकर पुण्याबाहेरचं काही बघू शकत नाहीत का? सारखं काय कुठेही पुणे पुणे. काय एकच शहर आहे काय जगात. उद्या न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनबद्दल कुणी लिहिलं तर हे लोक, कोरेगाव पार्कचा रेफरन्स देतील. रिकामटेकडे लोक!

कुचका - माझ्या ह्याआधीच्या दोन कॉमेंट्स दिसतच नाहीत. पेपरवाले फक्त लेखाच्या स्तुतीपर कॉमेंट छापतात काय?

डोंगळे - काय हो विदर्भवनराज. तुम्ही किंवा तुमचा मुलगा, मुलगी-जावई कुणी अमेरिकेत राहतं काय?

काळे - तुमचा आणि तुमच्या भावाचा एखादा फोटो असला(आणि त्यात दत्तगुरूंसारखा पायाशी तो कुत्रा असला तर उत्तम) पाठवून द्या. देवघरात लावतो.

सीताफळ - डोंगळे. आवडलं आपल्याला. तरीच म्हणतो अजून कोणी अमेरिकेपर्यंत कसं गेलं नाही!

कायकायएकएकलोकअसतात - तुमच्या आजोबांनी इंग्रजांच्या काळात पॉकेट वॉच घेतलं होतं, तुमच्या बाबांनी २० वर्षांपूर्वी प्रिया स्कूटर घेतली, ह्याच्याशी आम्हाला काय करायचंय. काहीतरी फालतू लिहून तुमचा आणि आमचा वेळ कशाला वाया घालवता.

उडाणटप्पू - मुद्दा सोडून लिहिण्यात तुमचा हात कुणीही धरू शकत नाही. प्रिया कंपनी काय, आजोबांचं पॉकेट वॉच काय. तुम्हाला दुसरी कामं नाहीयेत का हो. कुत्रा तुम्हाला न चावता ही अवस्था, चावला असता तर आम्हाला काय काय वाचावं लागलं असतं.

ओर्गा सारळकर इस्रायल - तुम्ही लहान असून तुमच्या आईने तुमचा हात का धरला नव्हता. असो. पण खरंच तुमच्या भावाच्या प्रसंगावधानामुळे तुम्ही वाचलात. त्याचे तुम्ही जन्मभर ऋणी राहायला हवं, हे माझं मत आहे. ओर्गा सारळकर इस्रायल.

टकले - कळशी लावा नळाला. पाणी आलंय...

पिल्लू - हा/ही ओर्गा सारळकर जाम डोक्यात जातो/जाते.

उस्ताद - लेखापेक्षा कॉमेंट्स भारी आणि फोटो लय भारी!

निषाद - ओ ओर्गाबाई, सारखं काय ते नावापुढे इस्रायल इस्रायल, कोणीतरी खेडेगावातला माणूस फॉरेनला गेल्यासारखं वाटतं.

कल्पना - काय गं बाई त्या आईवरचा प्रसंग!

(बाकी, एका गाजलेल्या हिंदी वर्तमानपत्राच्या संस्थळावरसुद्धा एक सदर चालतं, ज्यात लोक नातेसंबंधांबद्दल चित्रविचित्र(सहसा विचित्र) प्रश्न विचारतात आणि लोकांचे अभिप्राय मागवतात. आता तुम्ही लोकांचे अभिप्राय मागवले म्हणजेच 'आ बैल मुझे मार!'. तिथे तर उदंड कापाकापी चालते. त्याचा सॅम्पल लेख(आणि प्रतिक्रिया) जागेअभावी आणि परिणाम गडद होण्यासाठी पुढच्या वेळी!)

6/11/2010

भ्रूण

निवेदन : प्रस्तुत नोंद ही एक कथा असून, पूर्णतया काल्पनिक आहे. हा माझा अनुभव नाही. नोंद टाकली तेव्हा लक्षात नाही आलं, पण काहीजणांचे गैरसमज होत आहेत असं जाणवलं म्हणून हे निवेदन. झालेल्या-न झालेल्या गैरसमजाबद्दल
क्षमस्व.

मी भोपाळला जाणार्‍या गाडीत चढलो आणि माझा बर्थ शोधत हळू हळू पुढे सरकू लागलो. ही माझी नेहमीची सवय आहे, मी कधीच फर्स्ट किंवा सेकंड एसीने जात नाही, सर्वसामान्य माणसं सहसा तिथे भेटत नाहीत. माझी सीट आणि बर्थ मिळाल्यावर मी माझी छोटी बॅग सीटखाली सरकवून शांतपणे जीएंचं एक पुस्तक काढून वाचत बसलो. आत्ताशी संध्याकाळ होती, त्यामुळे इतक्यात बर्थवर जाण्याचा प्रश्न नव्हता. आता वाट पाहायची होती सहप्रवाश्याची. मला एकच सहप्रवासी मिळणार होता, कारण मी दोन सीटांच्या बाजूला होतो. हळूहळू ट्रेन भरत होती. मी पुस्तकात चांगलाच गुंतलो होतो. एव्हढ्यात, समोर येऊन कुणीतरी बसल्याचं जाणवलं. मी मान वर करून पाहिलं. एक पंचविशीचा पोरगेलासा युवक माझ्यासमोर बसला होता. माझ्याकडे पाहून त्याने हलकं स्मित केलं, मी ही.

"आप भोपालके हैं?" त्यानं भाबडेपणानं विचारलं. त्याच्या नाजूक, गोर्‍या, देखण्या चेहर्‍यावर एक अशक्तपणा जाणवत होता.

"नहीं, लेकिन कामके सिलसिलेमें अक्सर वहां जाना होता है. क्यूं?" मी.

"नही, मैं असलमें वहीं का हूं, लेकिन कभी गया नही आज तक." माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तो पुढे म्हणाला, "मतलब, मेरे मां-बाप वहीं के हैं, मेरी पैदाईश मुंबईकी है! अप्रैल, १९८५"

माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

"आप क्या काम करते हैं?" त्याच्या पुढच्या प्रश्नाने मी भानावर आलो.

"मैं डॉक्टर हूं, 'संभावना' जानते हो? उनके क्लिनिक के लिये काम करता हूं थोडा-बहुत, मेरा रिसर्च सब्जेक्ट है"

"सॉरी आपका नाम?"

"अरे हां, वो तो बताया ही नहीं, ...."

"तुम्ही पण मराठी?" तो प्रफुल्लित चेहर्‍याने म्हणाला.

"तुम्ही पण?" मी.

"हो, माझे बाबा तिथे नोकरीला होते तेव्हा. " मग अचानक त्याच्या चेहर्‍यावर शोककळा पसरली.

"डॉक्टर, तुम्ही श्वसनाच्या विकारांचा इलाज करता का हो?" त्याने भाबडेपणाने विचारलं.

"हो, थोडंफार, पण मी ऍक्च्युअली संशोधन करतोय, इलाज करणारे वेगळे असतात."

"..."

विषय बदलावा म्हणून मी सहज विचारलं, "भोपाळला काही विशेष?" आणि एकदम मी जीभच चावली.

त्याचा चेहरा एकदम वेदनाग्रस्त झाला. आणि मग हळूहळू तो मोकळा होत गेला आणि माझ्या बर्‍याच शंकांचं खात्रीत रुपांतर होत गेलं.

तो ६ जून होता, ७ जूनला न्यायालयात भोपाळ गॅस दुर्घटना खटल्याचा निर्णय होता आणि हा भोपाळ गॅसपीडित तिथे पहिल्यांदाच चालला होता, न्याय घेण्यासाठी!

डिसेंबर २, १९८४ ची रात्र होती. भोपाळच्या एका कोपर्‍यात शांत झोपलेले एक नवरा आणि गरोदर बायको. युनियन कार्बाईडने हाहाकार माजला आणिइतर अनेकांप्रमाणेच हे छोटं कुटुंबही उद्ध्वस्त झालं. मग तसेच विकार घेऊन ते मुंबईत आले आणि नव्या उमेदीने संसार सुरू केला. पोटातल्या भ्रूणावरही त्या गॅसचा आघात झाला होता. आईच्या पोटातच आजार जडलेला तो निष्पाप भ्रूण माझ्यासमोर बसून मला आपली कर्मकहाणी सांगत होता. त्याचे उसासे वाढले की त्याला दम लागायचा. माझ्या पोटात कालवाकालव होत होती. त्या दिवशी पहिल्यांदाच मला आपण किती अज्ञानी आणि हतबल आहोत असं वाटत होतं.

८ जूनची सकाळ. मी सेकंड एसीमध्ये आपली सीट शोधत होतो. हातामध्ये सवयीने जीए आले आणि अचानक शेजारच्या सीटवरच्या माणसाच्या पेपराकडे लक्ष गेलं. सगळ्या बातम्या माहितीतल्याच होत्या. दुर्दैवाने सगळ्याच. पातळ कागदामुळे पहिल्या पानावरच्या बातम्या आणि दुसर्‍या पानावरच्या बातम्या मिसळून गेल्यासारख्या दिसत होत्या. 'युनियन कार्बाईडचे दोषी कर्मचारी फक्त दोन वर्षांची शिक्षा घेऊन जामीनावर सुटल्याची व गोर्‍या अधिकार्‍यांना निर्लज्जपणे सोडल्याची' आणि 'भ्रूणहत्येची' बातमी मिसळून एकच होऊन गेली होती.

कदाचित त्याच ट्रेनच्या सेकंड क्लासमध्ये एक भ्रूणावस्थेतच हरवलेलं आयुष्य, न मिळालेल्या न्यायाचा शोक करत असेल, आणि गोर्‍यांच्या गुलामगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा आजार भ्रूणावस्थेतच लागलेली भारतीय न्याय आणि लोकशाही व्यवस्था ही लक्षणं झाकण्याच्या क्षीण प्रयत्नात असेल.

6/04/2010

कॉन्ग्रेस, उपयुक्ततावाद आणि रसग्रहण

आठवड्याभरापूर्वी केंद्रातल्या कॉन्ग्रेसप्रणित सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्याखुषीत पंतप्रधान मनमोहन सिंगांनी एक पत्रकार परिषद घेतली. आणि त्यात त्यांची पुरती फेफे उडाली. त्यांनी तुफान सारवासारव केली आणि राहुलचे गोडवे गायले(तळवे चाटले लिहिण्यास बोटं उत्सुक होती). पण 'महाराष्ट्र टाईम्स'मधला त्या पत्रकारपरिषदेबद्दलचा हा अग्रलेख वाचनात आला आणि मी लेखकाच्या ह्या क्षमतेमुळे चाटच पडलो. मी लेखक बनायचा प्रयत्न करतोय, पण कुठल्याही गोष्टीला कश्याही प्रकारे पेश करण्याचं हे कसब माझ्याकडे आहे का? हा संशय माझ्या मनाला चाटून गेला.

मग थोड्या दिवसांनी सहजच एक गाणं ऐकण्यात आलं. चावटपणाच्या उंबरठ्यावर आहे की काय असं वाटावं असं हे गाणं. पण थोडंसं लक्ष देऊन ऐकलं, तर त्यात आक्षेपार्ह मला काहीच वाटलं नाही. आणि मग कलेबद्दलचा उपयुक्ततावाद, ह्याबद्दल माझ्या वाचनात आलं. म्हणजे कला ही सुंदरच असावी असं नाही, पण त्यात नैतिकता, संदेश किंवा उपयुक्तता हवी. आणि ह्या क्रायटेरियात हे गाणं चपखल बसतं. मग लगेच मटाच्या उपरोल्लेखित अग्रलेखाला स्मरून मी ह्या गाण्याचं रसग्रहण करायला घेतलं.

वैधानिक इशारा : ह्या गाण्यातले शब्द थोडे सभ्य माणसांना खटकण्यासारखे असू शकतील, पण अगदीच काही 'हे' नाहीयेत. तरीही, आपल्याच जवाबदारीवर हे रसग्रहण वाचा आणि गाणंही ऐका. गाण्याची लिंक मुद्दामहूनच लेखाच्या शेवटी दिलेली आहे, म्हणजे तिथवर पोहोचलातच नाहीत तरी हरकत नाही.

अजून एक महत्वाची माथाटीप : हे रसग्रहण गंमतीने केलेलं आहे आणि ह्याला गंभीरतेने घेऊ नये. मी ह्या लेखाच्या माध्यमातून पहिल्यांदाच 'लवचिक वैचारिक लेखणी'चा प्रयोग करतोय. आणि हो, कुणाच्याही भावना दुखावल्या जात असल्यास पुन्हा सांगतो, हे केवळ एक गंमत म्हणून केलेलं लेखन आहे; तरीही आधीच क्षमा मागतो.

अथ।

सांप्रतच्या काळात, "जनरेशन वाय", "जनरेशन एक्स", "जेननेक्स्ट", "यंगिस्तान" ह्या आणि असल्या इंग्रजाळलेल्या फुटकळ आणि बाष्कळ शब्दांनी हल्लीच्या पिढीचं वर्णन करण्याची लाट आलीय. आणि वर कहर म्हणजे काहीतरी हाय-फाय म्हणजे "ऍक्सेसरीज", "स्टाईल स्टेटमेंट", "आयडेंटिटि क्रायसिस" असले परकीय शब्द वापरून उगाच गोंधळलेल्या आजच्या पिढीला अजून कन्फ्युज्ड करून टाकतात. ह्या असल्या गदारोळात आमच्यासारख्या मराठमोळ्या आणि ह्या भारताच्या मातीशी नाळ जुळलेल्या "हल्लीच्या पोरां"च्या एका महत्वाच्या समस्येला अगदी मातीशी इमान राखणार्‍या भाषेत भाष्य करणारं एक गाणं मध्यंतरी ऐकिवात आलं आणि ह्या देशात आमच्यासारख्यांचीही किंमत आहे ह्याची साक्ष पटून डोळ्यांत पाणी उभं राहिलं.

ह्या गाण्याच्या ध्रुवपदाची सुरूवातच मुळी "हल्लीच्या पोरांना.." अशी आहे. इतक्या आपुलकीनं उल्लेख झाल्याने माझ्या मनावर जी अनेकानेक इंग्रजी शब्दांची पुटं चढली होती, ती जळमटं झटकावीत तशी झटकली गेली. ह्या हाय-फाय जमान्यात राहून आमच्यासारख्या भूमीपुत्र मुलांची जी 'घर के ना घाट के' अशी अवस्था झालीय, त्याचं अगदी यथार्थ वर्णन ह्या गाण्यात आलं आहे. इथे मी ह्या गाण्याचं प्रत्येक ओळीप्रमाणे रसग्रहण करायचा एक क्षीण प्रयत्न करतो आहे.

ना साडी, ना झंपर, ना मॅक्सी पाहिजे। हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(ध्रु.)(२)

स्पष्टीकरण - गीतकार ध्रुवपदालाच सिक्स मारतो. मला वाटतं साडी, झंपर आणि मॅक्सी ही तीन वेगवेगळ्या सामाजिक स्तरांच्या स्त्रियांची(त्या वापरत असलेल्या वस्त्रांप्रमाणे) प्रतीकं म्हणून वापरली आहेत. ह्यातूनच गीतकाराची निरिक्षणशक्ती आणि अगदी सहज रुपकं वापरण्याची हातोटी समोर येते. आणि पुन्हा 'सेक्सी' हा जो शब्द आहे, तो हाय-फाय जमान्याच्या चकचकाटाला भुलून गेलेल्या तरूणाची मनःस्थिती अगदी अचूक दर्शवतो.

मल्लिका बिपाशा, नटी जणू रंभा। नको देसी गावठी हवा इन्गलिस खंबा॥(कोरस)

ना सोडा, ना लेमन ना पेप्सी पाहिजे।

हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२, कोरस)

स्पष्टीकरण - हे पहिलं कडवं गाण्याचा टोन व्यवस्थित राखतं. सिनेनट्यांचं वर्णन स्वर्गातल्या अप्सरांशी करून गीतकार आपल्याला संस्कार आणि सामाजिक परिस्थिती ह्यांच्यातलं मानसिक द्वंद्व दाखवतो. पुन्हा आपलं ते सर्व वाईट आणि परकीय ते सर्व चांगलं असं समाजमनावर जे आज विविध माध्यमांतून बिंबवलं जातंय, त्यावर गीतकार "नको देसी गावठी.." ह्या वाक्यातून प्रहार करतो, पुन्हा स्वदेशीच्या उत्त्थानाचा एक छुपा संदेशही तो ह्याच वाक्यातून विरोधाभासाचा वापर करून देतो. आणि "आपलं ते वाईट..." हाच मुद्दा तो "ना सोडा, ना लेमन..." मधूनही देतो, पण ह्यावेळेस विरोधाभासाचा वापर करून तो "पेप्सी"सारख्या आरोग्यास घातक शीतपेयांपेक्षा सोडा, लेमन हे कसे चांगले पर्याय आहेत, असा छुपा संदेश देतो.

नको लठ्ठ जाडी हवी नाजूक बॉडी। मग फिरायाला हवी एक स्कॉर्पियो गाडी॥

ना टांगा, ना रिक्शा, ना टॅक्सी पाहिजे।

हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२, कोरस)

स्पष्टीकरण - ह्या कडव्यात तो तोंडदेखल्या सौंदर्यावर प्रहार करतो. थोडक्यात म्हणजे तो सुंदर पेक्षा टिकाऊ कसं महत्वाचं आहे, हे पहिल्या वाक्यातून विरोधाभासाच्या माध्यमातून दाखवतो. इथपर्यंत वाचताना आपल्याला गीतकाराची शैली स्पष्ट होते. मग पुढ्च्या वाक्यात काही परिणाम मिळत नाही, कारण पुढचं आणि तिसरं अशी दोन्ही वाक्य एकत्रित वाचल्यास परिणाम साधतात. स्कॉर्पियो गाडी आणि टांगा, रिक्शा आणि टॅक्सी ह्यातून तो आजच्या पिढीच्या चंगळवादाकडे झुकणार्‍या मानसिकतेवर प्रहार करतो. आणि पुन्हा अगदी सहजपणे एका सामान्य वाक्यातून टांगा, रिक्शा आणि टॅक्सी अश्या रूपकांमधून तो तीन सामाजिक स्तरांना एकत्रित गुंफतो. गीतकाराचा सामाजिक उतरंडीचा अभ्यास दांडगा असल्याची प्रचिती वारंवार अश्याप्रकारे येत राहते.

सिनेमात पाहूनी त्या अर्धनग्न बाया। एकनाथा गेली बघ ही तरूण पिढी वाया॥

ना पतली, ना जाडी, ना फोक्सी पाहिजे।

हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२, कोरस)

ना साडी, ना झंपर, ना मॅक्सी पाहिजे। हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२)

ना साडी, ना झंपर, ना मॅक्सी पाहिजे। हल्लीच्या पोरांना पोरगी सेक्सी पाहिजे॥(२, कोरस)

स्पष्टीकरण - हे माझ्या मते पूर्ण गाण्यातलं सर्वाधिक बोल्ड आणि म्हणूनच अगदी थेट परिणाम साधणारं कडवं आहे. ह्यामध्ये तो कुठेही छुपे प्रहार करत नाही, इथे सर्व मामला थेट. सिनेमातल्या अंगप्रदर्शनाला पहिल्याच वाक्यात फटकारून तो थेट संत एकनाथांना आपलं दुःख सांगतो. त्यांच्यासमोर आपलं गार्‍हाणं मांडतो. आणि ह्याप्रकारे संत एकनाथांच्या उल्लेखातून तो आपल्या संतकाव्याशी जोडलेल्या नाळेचंही दर्शन घडवतो. पुन्हा तो बाह्य सौंदर्यावर भाळणार्‍या आजच्या भरकटलेल्या पिढीला शेवटच्या वाक्यानी लाथाडतो आणि चौखूर उधळलेल्या प्रतिभेला लगाम घालतो.

हे एव्हढं लिहितानाच माझे कर गीतकाराच्या प्रतिभेपुढे आपोआप जुळलेत. पण ह्या गाण्याचं यश गीतकाराचं फारतर ७५% असेल, पण संगीत दिग्दर्शक आणि गायकानेही आपल्या प्रतिभेने आणि बारकाव्यांवर घेतलेल्या मेहनतीने ह्या गाण्याला एका परमोच्च पातळीवर नेऊन बसवलंय.

संगीत दिग्दर्शकाने ह्या गाण्यासाठी एक अतिशय सरळ आणि साधी चाल निवडलीय. वाद्यही सगळी कानाला सुखावतील अशी. ह्यामुळे कसं, गीतकाराने जे आसूड ओढलेत ते थेट काळजाला भिडतात, अजून परिणामकारक ठरतात. विचार करा, जर ह्या गाण्याला रॉक संगीतासारखी चाल घेतली असती, तर हा परिणाम मिळणं केवळ अशक्य होतं. पुन्हा कोरससाठी स्त्रियांचा परिणामकारक वापर हाही एक महत्वाचा बारकावा. कारण, गाण्यात 'सेक्सी' हा आक्षेपार्ह मानला जाणारा शब्द आहे. समाजाचा एक मोठा वर्ग नाहक ह्या शब्दाला अश्लील समजतो. ह्या शब्दाचा नुसत्या उल्लेखालाही लोक कानावर हात ठेवतात, अश्या काळामध्ये स्त्रियांना 'सेक्सी' हा शब्द असलेलं ध्रुवपद कोरसमध्ये गायला लावून संगीत दिग्दर्शकाने हा टॅबू(निषिद्ध गोष्ट) मोडायचा स्तुत्य प्रयत्न केलाय.

आणि गायक, ह्या गायकाच्या आवाजाचा पोत हा लोकसंगीताचा आहे, त्यामुळे हे समाजजागृतीपर गाण्यासाठी त्याचा आवाज अगदी चपखल बसतो. सुरूवातीपासून शेवटापर्यंत मला वाटतं तो 'हल्लीच्या पोरांना..' ही टॅगलाईन नऊ वेगवेगळ्या प्रकारे म्हणतो, कदाचित कमी जास्तही असेल, पण ते केवळ संगीतातल्या जाणकारांच्याच तयार कानांना जास्त योग्य समजू शकतं. पण शेवटच्या वेळेस जेव्हा तो म्हणतो, तेव्हा गाण्याला तो एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो आणि आपल्या तोंडून आपोआपच दाद निघते, "वाह!". मग रेग्युलर कोरस चालत राहतो आणि हळूहळू ती लागलेली किक उतरते.

पण गायकाचा खरा मास्टरस्ट्रोक आहे तो 'पाहिजे' ह्या शब्दाचा उच्चार. गायक आपल्या लोकसंगीताच्या पार्श्वभूमीचा इथे पूर्ण उपयोग करतो आणि 'हल्लीच्या पोरांना..' अशी सुरूवात असलेल्या वाक्याच्या शेवटी 'पाहिजे' चा वेगळा उच्चार करतो जेणेकरून ते वाक्य अधोरेखित होतं. कारण ही पंचलाईन आहे आणि त्याचा परिणाम ह्या विशिष्ट उच्चारामुळे अधिक गडद होतो.

ह्याहून अजून काही जास्त असल्यास, राहून गेलं असल्यास कृपया तो माझ्या अल्पमतीचा दोष मानून क्षमा करावी.

इति॥

इथपर्यंत वाचूनही मला मारण्यासाठी शोधत नसाल, तर गाणं इथून डाऊनलोड करता येईल(सौजन्यः अभिजित वैद्य).