7/14/2010

साखळी

ही कथा मला का सुचली ते ठाऊक नाही. पण अचानक लिहावंसं वाटलं आणि लिहिता लिहिता पूर्ण झाली. मी कधी ड्राफ्ट्स ठेवायचे नाहीत असा एक पण केलेला आहे, त्यामुळे जशी आहे तशीच पब्लिश करतोय. काहीही न कळण्याचीही शक्यता आहे. एक प्रयत्नच आहे, तेव्हा चुका असतीलच. चांगलं-वाईट आवर्जून सांगा मात्र!

आणि हो, ह्यातल्या कुठल्याही पात्राचा किंवा घटनेचा, जीवित किंवा मृत व्यक्तिशी वा प्रत्यक्ष घडलेल्या कोणत्याही घटनेशी कसलाही संबंध नाही. संपूर्ण कथा काल्पनिक आहे.

त्यानं डोळे उघडले. पण डोळ्यासमोर मिट्ट काळोख. चारी दिशांना भयाण शांतता. क्षणभर त्याला कळतच नव्हतं, आपण कुठे आहोत. एकदम त्याच्या डोळ्यांसमोर सगळा घटनाक्रम आला.

----------

पवन, कॉलेजचा सुपर कूल ड्यूड. सगळ्या पोरांचा आदर्श. कॉलेजच्या सगळ्या पोरी पवनच्या मागे आणि पवन मात्र सगळीकडेच पुढे पुढे. कॉलेजचा सगळ्यात लोकप्रिय मुलगा पवन, कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी पवन, कॉलेजच्या सगळ्या एक्स्ट्रा-करिक्युलर ऍक्टिव्हिटिजमध्ये पुढे पवन. बस पवन, पवन, पवन. कॉलेज कॅम्पसच्या गेटपासून वर्गातल्या बेंचपर्यंत पोहोचताना पवन किमान २०-२५ लोकांना हात करत असेल. शैक्षणिक कारकीर्दही दैदिप्यमान नसली तरी वाखाणण्याजोगी होतीच. स्पोर्ट्समध्येही आवडीने भाग घेणारा. अगदी कॉलेज स्टाफच्याही जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता पवन. त्या दिवशी शेवटच्या सेमिस्टरचा निकाल होता. पवनच्या डोळ्यांत अश्रू होते. आयुष्यातलं एक पर्व संपलं होतं. आता बाहेरच्या जगात पाऊल ठेवायचं होतं. नव्या जोमाने, नव्या ईर्ष्येने. प्रिन्सिपलनीही डोळ्यांत अश्रूंसहच त्याला निरोप दिला. त्याच्या उज्ज्वल भविष्याची कामना करत.

----------

इन्स्पेक्टर वाळिंबेंच्या पट्ट्याचा सर्र सर्र असा आवाज, फटक्याच्या आवाजाने थांबत होता आणि कैद्याच्या किंकाळीने भैरवी होत होती. असं जवळपास गेल्या अर्ध्या तासापासून चालू होतं. वाळिंबेंचा कंट्रोल सुटला होता. ते दात-ओठ खात त्या कैद्याला तुडवत होते. अचानक कैद्याच्या किंकाळ्या बंद झाल्या. त्यांना काहीतरी चुकल्यासारखं जाणवलं. ते थांबले. कैदी बेशुद्ध पडला होता. त्यांनी हवालदाराला बोलावलं आणि आपण बाहेर गेले. पट्टा टेबलावर टाकला आणि सुस्कारा टाकत खुर्चीत बसले. रात्रीचे दहा वाजत होते. तालुक्याचं ठिकाण असूनही स्मशानशांतता होती. 'कसला तालुका न् कसलं काय, गाव आहे सालं गाव!' मनाशी म्हणत वाळिंबे टेबलावरचा ग्लास उचलून घटाघट त्यातलं पाणी प्यायले. ड्यूटीवरचे बाकी दोन हवालदार पेंगत होते. वाळिंबेंनी टेबलावरच्या लिफाफ्यातला कागद संध्याकाळपासून १५व्यांदा काढून वाचला.

----------

शिर्के पोलिस स्टेशनात तावातावानं भांडत होते.

"अरे मुंबईसारख्या शहरात तुम्ही लोक पासपोर्टची कामं का लवकर करत नाही. मुलाला अशी संधी परत मिळायची नाही."

"हे बघा साहेब, सरकारी कामांची एक पद्धत असते."

इतका वेळ हुज्जत घालून थकलेल्या शिर्केंनी खिशातून ५००ची नोट काढली. त्यांचा मुलगा पोलिस स्टेशनातला टीव्ही बघत होता.

"जोगदंड, ते रजिस्टर आणा पाहू!" दात पसरून हसत सब-इन्स्पेक्टरसाहेबांनी ऑर्डर सोडली.

टीव्हीवर मोनिका बेदीच्या खोट्या पासपोर्ट केसची बातमी चालू होती.

----------

शिर्केंचा मुलगा नुकताच परदेशातून परतून त्याच्या नव्या कंपनीच्या साईटवर रुजू झाला होता. एव्हढ्यातच त्याला त्याच्या आईच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली. तो धावतपळत घरी पोचला. शिर्केंची बायको मेट्रो बांधकामादरम्यान क्रेन कोसळून झालेल्या अपघातात दगावली होती.

"बाबा, आपण केस करूया. हे लोक काहीही सांगतायत. असा अपघात फक्त निष्काळजीपणामुळेच होऊ शकतो. तांत्रिकदृष्ट्या ते म्हणतायत ते होऊच शकत नाही. मी सांगतो ना बाबा. मी साईटवर क्रेनची खूप कामं बघतो." तो पोटतिडीकीनं सांगत होता. शिर्के नुसतेच शून्य नजरेनं त्याच्याकडे पाहत होते.

----------

वाळिंबेंनी तो लिफाफा खिशात टाकला, पट्टा बांधला आणि पिस्तुल घेऊन ते पोलिस स्टेशनबाहेर पडले. त्यांनी जीप स्वतःच सुरू केली. दोन हवालदार अजून पेंगत होते आणि तिसरा आत लॉकपच्या बाहेर खुर्चीवर झोपला होता.

वाळिंबेंचं मन आता थोडंसं थार्‍यावर येत होतं. त्यांचा निर्णय एकदाचा झाला होता. हळूहळू त्यांचं डोकं पूर्ण शांत झालं. त्या छोट्याश्या तालुक्यात एव्हाना सगळे निद्राधीन झाले होते. वाळिंबे गाडी चालवत हायवेपर्यंत येऊन पोचले. त्यांनी एक टर्न घेतला आणि आता ते हायवेवरून सुसाट निघाले. थोड्याच वेळात दुतर्फा जंगलं सुरू झाली होती. एका विवक्षित ठिकाणी वाळिंबेंनी गाडी हळू केली आणि त्यांनी गाडी झाडीमध्ये घातली.

----------

पवनला हे सगळं अनपेक्षित होतं. एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी म्हणजे आपण आणि आपलं आयुष्य ह्या त्याच्या संकल्पनेला आज छेद गेला होता. अर्थात फक्त कमनशिबामुळेच ही वेळ त्याच्यावर आली होती. त्यानं भल्या पहाटे साईटवर काहीतरी हालचाल पाहिली आणि जवळ जाऊन पाहिलं तर चक्क मृतदेह ट्रान्सफॉर्मरच्या खाली टाकण्यात येत होता. ड्यूटी इंजिनियर म्हणून त्याचीही सही लागणार होती, तो अपघात आहे हे कन्फर्म करण्यासाठी. पोलीस आधीच मॅनेज झाले होते. त्यानं ऐनवेळी भोवळ आल्याचं नाटक केल्यानं त्याला हॉस्पिटलला आणलं होतं. त्यानं सकाळीच पंच केल्यानं कंपनीला त्याची सुट्टी दाखवता येत नव्हती. सही त्याचीच लागणार होती.

पवन आढ्याकडे बघत होता. आज त्याला आईचं तेरावं आठवत होतं.

तो वडलांशी हुज्जत घालत होता.

"पण बाबा का तुम्हाला केस नाही करायची? का तुम्ही असे भेकडासारखे बसून आहात? तुमचं आईवर प्रेम नव्हतं? तिला न्याय नको मिळायला? असं गप्प बसून काय होणार बाबा? बोला काहीतरी."

त्यांच्या शून्य नजरेत अश्रू तरळले.

"आजपासून २२ वर्षांपूर्वी जेव्हा मी म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये होतो. तेव्हा एका फॅक्टरीच्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होऊन हजारो जणांना विषबाधा झाली होती आणि शंभरएक लोक मेले होते."

"मग? त्याचा आज काय संबंध?" त्याने रेस्टलेस होत विचारलं.

"फॅक्टरीतून बाहेर पडणार्‍या पाण्यामुळे हे प्रदूषण होत नसल्याच्या रिपोर्टवर तेव्हा मीच साईन केली होती."

पवन धक्का पचवू शकत नव्हता.

"तेव्हा मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या सुरक्षिततेसाठी सही केली होती. आज कदाचित त्या क्रेनच्या रिपोर्टवर सही करणार्‍याचीही काही मजबूरी असेल. केस करून काहीही होणार नाही. तुझं उर्वरित आयुष्य मात्र कोर्टाच्या चकरा मारण्यात जाईल."

त्याच्या हॉस्पिटलच्या खोलीबाहेर डॉक्टरांचा आवाज ऐकू यायला लागला. त्याचा निर्णय झाला होता.

----------

वाळिंबे एका झोपडीत शिरले. एका कोपर्‍यात पवन अंगाची जुडी करून बसला होता. कंदिलाचा उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडल्याबरोबर तो घाबरला.

"श्श. शांत हो."

वाळिंबे त्याच्या शेजारी जाऊन बसले.

"तुला अभय देण्याचं मान्य केलंय ना आमदार साहेबांनी त्या कंपनीवाल्यांपासून."

त्यानं हताशपणे मान डोलावली.

"तुला कोर्टातून म्हणूनच उचलून आणलं आम्ही, नाहीतर तुझा कोर्टात गेम करायचा प्लॅन होता कंपनीवाल्यांचा. अरे येड्या तुझ्या साक्षीनं करोडो रुपयांचं नुकसान नसतं का झालं!"

त्याला काहीच समजत नव्हतं.

वाळिंबेंनी एक दीर्घ श्वास घेतला. खिशातून तो लिफाफा काढला आणि त्याला वाचायला दिला.

"बिळातल्या उंदराला संपवा आणि कारखान्यावर नेऊन गरम पाणी ओता. लाल घूस मेली म्हणून सांगणे." पवननं प्रश्नार्थक नजरेनं वर पाहिलं. वाळिंबेंनी बंदूक त्याच्यावरच रोखली होती.

----------

इन्स्पेक्टर वाळिंबेंचं नाव पेपरात छापून आलं होतं. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणापासून थोड्या दूर असलेल्या बंद कारखान्यावर झालेला नक्षली हल्ला परतवला होता. नक्षल्यांनी बरंच धातूचं सामान चोरलं होतं, पण चकमकीत एक महत्वाचा नक्षली नेता ठार झाला होता. पण चकमकीतच कारखान्याला भीषण आग लागली होती. त्यांना आमदारसाहेबांनी खास बंगल्यावर बोलावलं होतं. आमदार साहेब खूष होते. मुंबईतल्या मेट्रो अपघातामध्ये कंपनीला द्यावी लागलेली भरपाई आमदारसाहेबांनी चतुराईने गावाकडच्या बंद कारखान्याच्या इन्शुरन्समधून मिळवून दिली होती. त्यांना त्यांचा 'कट' मिळाला होता. पुन्हा मोठा नक्षली नेता ठार झाल्याचंही सांगता येत होतं. दिवस झक्क होता अगदी. वाळिंबेंना पदकाचं वचन देऊन त्यांनी निरोप दिला.

----------

हळूहळू पूर्वेकडे फटफटायला लागलं होतं. इतका वेळ असलेला मिट्ट काळोख आता सुसह्य झाला होता.

'ही मालबोट थोड्याच वेळात चेन्नईला पोहोचेल. मग पुन्हा नवी सुरूवात. पुन्हा सर्व तेच. काही गरज आहे का ह्या सर्वांची?' पवनचं विचारचक्र फिरत होतं. त्याला तो संवाद पुन्हा आठवत होता.

त्या रात्री त्यानं पत्र वाचून वर पाहिलं आणि वाळिंबेसाहेबांनी गोळी चालवली. त्यानं घाबरून मागे पाहिलं. एक गावकरी मरून पडला होता.

"हा आमदाराचा इन्फॉर्मर आणि गाववाल्यांचा शत्रू होता." वाळिंबे शांतपणे म्हणाले.

"पण तुम्ही?"

" हे बघ. प्लॅन काय आहे, तो मी तुला समजावण्यात अर्थ नाही. तू फक्त एव्हढंच समज, की तू मेलायस."

तो एका वेगळ्याच नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. त्यांना राहावलं नाही.

"जसा तू एक मोहरा आहेस, तसाच मीही एक मोहरा आहे. एक प्यादं. ह्या मोठ्यांच्या बुद्धिबळातलं. आपल्या अस्तित्वाला किंमत नाही. आपण ह्या लोकांसाठी आपलं उभं आयुष्यही उद्ध्वस्त झालं तरीही गप्प राहायचं. हाच नियम आहे. मीही तोच नियम आजवर पाळत होतो. डोळे मिटून. पण तू जे केलंस. ते पाहून मी आतल्याआत हललो. मला स्वतःचीच शरम आली. तुला न्यायालयातून आणल्यावर मी जरा आनंदलो होतो आणि मग ही ऑर्डर आल्यावर मी पिसाटलो. सगळा राग एका कैद्यावर काढला. मग थोडा शांत झालो आणि निर्णय घेतला. आज मी एक चांगलं काम करणार.

पण एक लक्षात ठेव. मी तुला फक्त जीवन देऊ शकतो, न्याय नाही. आता पुढे तूच ठरव, तुला न्याय हवाय की जीवन."

उगवतीच्या सूर्याकडे पाहत पवन पुटपुटत होता.

"तुला न्याय हवाय की जीवन...तुला न्याय हवाय की जीवन..." हेच शब्द त्याच्या वडलांच्या त्याला उद्देशून लिहिलेल्या स्युसाईड नोटमध्ये होते.

क्षणार्धात समुद्रात किंचितशी खळबळ झाली. एका जागचं पाणी डचमळलं आणि पुन्हा शांत झालं. त्यानं निवड केली होती.

-समाप्त-

42 comments:

  1. bhraShTaachaar koNatya Tokaaparyant
    jaau shakato te spaSta paN todakyat maaMDale aahe. kathaakaaraache kowtook karawe tewaDhe thode aahe.

    ReplyDelete
  2. Anonymous5:34 PM

    मस्तच रे विभि. सुरूवातीला थोडं डोक्यावरून जात होतं कारण नेहमीची मांडणी नव्हती. पण हळूहळू गोष्टीने पकड घेतली आणि सगळे धागे जुळले. लगे रहो......भिंतीवर खरडणे......

    ....शांतीसुधा

    ReplyDelete
  3. बाबा कथा अगदी उत्तम. पुन्हा पुन्हा वाचावी लागली तेव्हा कुठे कलायला लागली.
    अगदी धागेदोरे लक्षात ठेवून वाचावी लगत्तेय कथा.

    क्रिस्टोफर नोलन नंतर तूच बघ.

    ReplyDelete
  4. विद्याधर, मांडणी मस्तच रे. आणि मेसेजही. " तुला न्याय हवाय की जीवन... " आजकाल हीच तडजोड जळीस्थळी... गत्यंतरच नाहीये.

    ReplyDelete
  5. जबरी रे.. नोलन किंवा टेरेन्टिनोचा एखादा चित्रपट बघतोय असं वाटलं :) खूप छान. मेसेज पण सही पोचलाय.

    रच्याक,
    >> मी कधी ड्राफ्ट्स ठेवायचे नाहीत असा एक पण केलेला आहे

    जबरी नियम आहे आणि तू तो पाळतोस हे विशेष !! असाच नियम मी इमानेइतबारे पाळला असता तर अजून कमीत कमी २७ पोस्ट्स वाढल्या असत्या माझ्या ब्लॉगवर ;)

    (स्वतःच्या कौतुकात रमलेला),
    वटवट सत्यवान

    ReplyDelete
  6. विभि...मस्त लिहली आहेस...सुरुवातीला काहीच झेपल नाही पण नंतर "साखळी" उमगली...संदेश पण मस्त आहे.

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर कथा आहे! खूप आवडली!
    -निरंजन

    ReplyDelete
  8. अप्रतिम कथा...फ़ार छान लिहिले आहेस रे !

    ReplyDelete
  9. विभी भाई, मस्त रे! माझी अवस्था पण इतरांसारखीच होती. सुरुवातीला निट कळत नव्हतं, पण पुढे पुढे लिंक जुळत गेल्यावर कथा एकदम interesting झाली. भ्रष्टाचाराचा मुद्दा छान मांडला आहेस. लगे रहो!

    ReplyDelete
  10. फॉलोइंगचा परिणाम का माहित नाही, पण ही कथा मी ब्लॅक एण्ड व्हाईट पाहीली. एकदम किस्टोफर नॉलॅनच... पासपोर्ट्साठी ५०० ची लाच देताना मुलगा टिव्हीवर मोनिका बेदीच्या फेक पासपोर्टची न्युज बघत होता.. सही... ग्रेट पोस्ट

    ReplyDelete
  11. बाबा अरे काय चालवलेस काय एका पाठी एक भन्नाट पोस्ट्स येताहेत.... 'मान गये बाबा' तुमको.....
    सुरूवातीला लिंक लागेना आणि तुझ्या मागच्या एका कथेची आठवण आली..... पण नंतर समद्या साखळ्या जुळल्या बगा!!

    लिहीत रहा रे!!!!!

    ReplyDelete
  12. Chaan ch jhaliye katha...Suruwatila malahi kahi kalale nahi....nantar haluhalu kalale...!!!

    ReplyDelete
  13. मस्तच कथा बाबा.
    पण तो शेवटी मेला की नावेत बसून गेला?

    ReplyDelete
  14. Anonymous9:18 AM

    सिंप्ली ग्रेट भाउ..मनाला चटका देऊन गेली

    ReplyDelete
  15. भीड रे बाबा!!!
    जबऱ्या
    मानलं पाहिजे

    ReplyDelete
  16. जिगसॉ वाचत असल्यासारखं वाटलं!
    खूप छान!

    ReplyDelete
  17. baba,
    ब्लॉगवर स्वागत!
    खूप खूप आभार. एव्हढी छोटी कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता.
    प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
    असेच भेट आणि प्रोत्साहन देत राहा!

    ReplyDelete
  18. अलताई,
    धन्यवाद! मला तीच काळजी होती. की कळतंय की नाही, मी वाहावत जाऊन फारच तुकडे पाडले होते. ;)

    ReplyDelete
  19. सचिन,
    'पुन्हा पुन्हा वाचावी लागली' ही मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो.;)
    आणि नोलान..डायरेक्ट नोलान म्हणजे डायरेक्ट हरभर्याचं झाड...:)
    मंडळ आभारी आहे!

    ReplyDelete
  20. भाग्यश्रीताई,
    अगदी, सगळीकडे हेच आहे. वाईट वाटतं, पण...
    असो..
    खूप खूप आभार!

    ReplyDelete
  21. हेरंबा,
    टॅरॅन्टिनो आणि नोलान...टेन्शन येतं राव...बाकी झाडावरून उतरवायलाही तुम्हीच आहात म्हणून ठीक..;)
    अरे, तो पण पाळणं अवघड नाहीय...ट्राय करून बघ...बाकी आम्ही आहोच, मुपी बनवायला..;)

    ReplyDelete
  22. योगेश,
    धन्यवाद मित्रा!
    साखळी खळ्ळकन तुटली नाही ह्यातच मिळवलं..;)

    ReplyDelete
  23. निरंजन,
    खूप खूप आभार!

    ReplyDelete
  24. माऊताई,
    धन्यवाद गं, अशीच प्रोत्साहन देत रहा!

    ReplyDelete
  25. अभिलाष,
    अरे लोकांना लिंक लागतेय हे पाहून थोडं बरं वाटतंय..नाहीतर सहसा बट्ट्याबोळ होण्याची भीती असते..:)
    धन्यवाद भौ!

    ReplyDelete
  26. सुदीपजी,
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  27. आनंदा,
    फॉलोइंग आता ह्या विकांताला पाहावाच लागणार आहे, केव्हढा बवाल करताय त्याचा तुम्ही सगळे..:P

    मला एकदम सूट-बूट घालून मी उभा आहे आणि माझी निर्माती पत्नी माझ्याकडे कौतुकाने बघतेय असं वाटतंय(नोलान स्टाईल)! :D

    ReplyDelete
  28. तन्वीताई,
    अगं माझ्या डोक्यात असे तुकडे तुकडेच का येतात कोण जाणे.. गेल्या वेळेसही तसंच..आता काहीतरी लिनियर लिहायचा प्रयत्न करीन...:D
    रच्याक - असं अगम्य लिहिलं, की सहसा लोक टीका करत नाहीत(मुपी सोडून, तिथे सगळं रोखठोक)!;)

    ReplyDelete
  29. मैथिली,
    सगळ्यांना म्हटलं तेच. तुम्हाला सर्वांना गोष्ट कळली हे पाहून हुरूप वाढलाय!
    धन्यवाद!

    ReplyDelete
  30. यशवंत,
    अरे मी 'प्यासा'चा पंखा आहे..त्यामुळे ओपन एंडींग..;)
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  31. सुहास,
    अरे इमानदार अधिकार्‍याच्या खुनाच्या बातम्यांनंतर खरंच चटका लागतो रे.
    खूप खूप आभार!

    ReplyDelete
  32. नॅकोबा,
    धन्यवाद..
    प्रतिक्रियेतल्या शब्दनिवडीसाठी स्पेशल आभार...;)

    ReplyDelete
  33. मीनल,
    'जिगसॉ'. हे नावसुद्धा चांगलं आहे कथेसाठी..इंग्रजीत लिहिली तर!..:P
    खूप खूप आभार!

    ReplyDelete
  34. निनाद,
    ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  35. Anonymous10:06 AM

    bhannat katha aahe...susruvatila link lagli nhi pan nantra link lagli....ekdum sahi baba

    ReplyDelete
  36. bhareech re baba
    Deadly ahe goshta

    ReplyDelete
  37. सुषमा,
    खूप आभार!

    ReplyDelete
  38. यॉडॉ भाई,
    खूप धन्यवाद भौ!

    ReplyDelete
  39. आधी खूपच तुटक तुटक वाटत होते... पण मग ते एकत्र व्हायला लागले... पण तू अजून जास्त छान लिहू शकतोस... आणि तू लिहिशील याची खात्री आहे मला...

    (उगाचच सल्ले देण्याचा शाहाणपणा करणारा...) रोहन... :D

    ReplyDelete
  40. रोहना, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद भौ..
    मी नेहमी प्रयत्न करतो रे...तुझ्या माझ्याकडून एव्हढ्या अपेक्षा आहेत हे पाहूनच बरं वाटलं!

    ReplyDelete