7/11/2010

हिंदी, उर्दू, हिंदुस्थानी आणि बरंच काही

परवाच अमिताभचा (जुना) दीवार बघत होतो (तोच तो, 'मेरे पास मां है' वाला). अमिताभचे डायलॉग्ज कसले एक से एक.

"तुम लोग मुझे ढूंढ रहे हो, और मैं तुम्हारा यहां इंतज़ार कर रहा हूं।"

"यह ताला मैं तुम्हारी जेब से चाभी निकालके खोलूंगा पीटर।"

"मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता।"

"अगले हफ्ते एक और कूली पैसे देने से इन्कार करनेवाला है।"

"दोस्तोंके नाम भी हुआ करते हैं।"

"क्या तुम सोचते हो की यह काम तुम अकेले कर सकते हो?" "मैं जानता हूं की यह काम मैं अकेले कर सकता हूं।"

असले एक से एक डायलॉग्ज, प्रत्यक्षात वाचताना पानीकम वाटतात. त्यावरच एकदा सलीमचा किंवा जावेदचा इंटरव्ह्यू झाला होता(आठवत नाही नक्की कुणाचा). तो म्हणाला होता, की आम्ही लिहिले तेव्हा हे पंचलाईन म्हणून नव्हते लिहिले. अमिताभने त्यांना पंचलाईनमध्ये रुपांतरित केलं. मग मी विचार करत होतो, की अमिताभची ह्या भाषेवर किती चांगली पकड आहे. मग मी पुढे विचार केला, कुठली भाषा? हिंदी की उर्दू? की दोन्ही. अमिताभ काय म्हणत असेल ह्या भाषेला. सिनेमाची भाषा सर्टिफिकेटवर हिंदी म्हणून येते, पण इंतज़ार, इन्कार हे शब्द हिंदी प्युरिस्ट्स मान्य करणार नाहीत. मग? मग मी थोडासा काळामध्ये मागे गेलो.

माझ्या डोक्यात हिंदू-मुसलमान आणि भारत-पाकिस्तान ह्या गुंतागुंतीच्या संबंधांचा खूप मोठा कीडा आहे. मला ह्या संबंधांमधल्या दोन्ही बाजूंबद्दल माहित करायची जाम हौस. ह्या हौसेखातरच मी काही महिन्यांपूर्वी ऑर्कुटवर 'इंडिया ऍन्ड पाकिस्तान' नामक एका कम्युनिटीचा भाग झालो. असल्या कम्युनिटी सहसा द्वेषपूर्ण असतात, म्हणूनच पहिल्यांदा काही टॉपिक्स पाहिले आणि कचरा थोडा कमी आहे पाहून मी मेंबर झालो. एकंदरच तिथे मध्यममार्गी लोकांचा वावर अधिक होता, पण तरीही 'तिकडचे' लोक आपल्या मूळ स्वभावाला सहसा जागतच होते. 'आपली' माणसं सहसा मॉडरेट स्टॅन्ड घ्यायची, मग हे लोक थयथयाट सुरू करायचे. अर्थात, त्यांच्यातही मध्यममार्गी होते; सामोपचाराने बोलणारे, पण अर्थात त्यांची संख्या नगण्य होती. विषय काहीही असू दे, कला, क्रीडा, राजकारण सगळीकडे 'आम्ही, आम्ही आणि फक्त आम्ही', 'तुम्ही सगळं आमच्याकडून घेता किंवा घेतलंय' अश्या आषयाची विधानं करण्यात हे लोक स्पेशालिस्ट. सगळ्यात अल्टिमेट विधान म्हणजे, 'तुमच्याकडे चांगले गायक नाहीत, कॉमेडीयन नाहीत, म्हणून तुमच्या रिऍलिटी शोजमध्ये आमची माणसं बोलावता." आणि माझं पर्सनल फेव्हरेट म्हणजे, "१९६५, १९७१ आणि कारगिल" तिन्ही युद्ध पाकिस्ताननंच जिंकली, भारतानं फक्त प्रोपॅगॅन्डा केला. मला एकंदर जाम मजा यायची. मग एकदा माझा जिव्हाळ्याचा विषय आला. सिनेमा. मग तिथे एका मुलीनं म्हटलं की, तुम्ही तुमच्या सिनेमांमध्ये, 'तुमची हिंदी' वापरायचं सोडून 'आमची उर्दू' वापरता. हे ऐकून मी चाट पडलो. 'ह्यांची' उर्दू? उर्दू आमची नाही? पण मी गप्प बसलो. शांतपणे मी तिला विकिपीडियाची लिंक दिली, ज्यात 'हिंदी आणि उर्दू ह्या दोन भाषा नसून एकच भाषा आहेत, फक्त राजकीय आणि धार्मिक कारणांमुळे वेगवेगळा शब्दसंग्रह वापरून दोन भाषा असल्याचा आभास निर्माण केला जातो' असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. इव्हन मलेशिया सारख्या देशातही हिंदी/उर्दू ह्या भाषेला हिंदुस्थानी/हिंदुस्तानी ह्या एका नावानेच ऑफिशियली रेकग्नाईज केलेलं आहे. मुळात ह्या आजच्या हिंदी/उर्दू म्हणजे अवधी, लखनवी आणि खडी बोली ह्या तीन भाषांचं मिश्रण आहेत. त्यामध्ये एकात संस्कृतचा तडका दिलाय आणि दुसर्‍यात फारसीची फोडणी. ह्या विषयावर आजवर केलेल्या वाचनातून माझ्या अल्पमतीला एव्हढंच कळलंय. काही चूकही असेल. जाणवलं, तर कृपया सांगा.

तर ह्या मुद्द्यावर ती बया भडकली. मला म्हणाली, 'अगर मैं कसरत के साथ उर्दू का इस्तेमाल करूंगी, तो तुम्हें इस तो क्या अगले जनम में भी समझ नहीं आयेगा'. मी म्हटलं बये, 'तू जनम हा जो शब्द वापरतेयस तो संस्कृत शब्दावरून आलेला आहे, बाकी तू फारसीत फाडाफाड केलीस, तर ती मला समजणार नाहीच. पण ती चीटिंग होईल.' पुढे मी तिकडे गेलो नाही. कारण ती फारच कट्टरतावादी पोरगी आहे, हे तिच्या बाकी थ्रेडवरच्या प्रश्नोत्तरांवरून मला जाणवलं. पण हा कीडा डोक्यात राहिला. उर्दू की हिंदी, आपले सिनेमे नक्की कोणत्या भाषेत असतात. मी क्लिअर होतो, की ही हिंदुस्थानीच आहे, ना हिंदी धड ना उर्दू. मग मी प्रत्येक डायलॉग लक्षपूर्वक ऐकू लागलो. "हमारे वतनपरस्त नौजवानों ने अपना कर्तव्य पूरा करनें में कोई कसर नहीं छोडी।" ह्यात 'कर्तव्य' हा संस्कृत शब्द आहे, पण वतनपरस्त, कसर हे फारसी उद्भव शब्द आहेत. म्हणजे हा हायपोथेसिस की आपली भाषा एकच आहे, बर्‍याच अंशी खरा आहे. वेगवेगळ्या लिपीत लिहिली, म्हणून भाषा बदलत नाही. पुन्हा एक गोष्ट जाणवेलच, की सुरुवातीच्या काळात गीतकार, कथाकार आणि संवादलेखक हे सहसा मुस्लिम असायचे, त्यामुळे फारसीउद्भव शब्दांची रेलचेल असायची. त्यातून उर्दू(फारसी शब्दसंग्रहयुक्त हिदुस्थानी) ही स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मुशायरे वगैरेंमुळे अगदी हिंदूंमध्ये सुद्धा भाषासौंदर्यामुळे लोकप्रिय होती. म्हणूनच गुरूदत्तही उर्दूचा पंखा होता(प्यासातल्या गाण्यांमधले कित्येक शब्द मला कळत नाहीत) आणि राजकुमार(अभिनेता) कधीही उर्दूतच बोलायचा. पण मग फाळणीमुळे कटुता वाढली. पाकिस्तानने उर्दूला स्वतःची राष्ट्रभाषा म्हणून भारतात बदनाम केलं. लिपीमुळे एका भाषेचे दोन तुकडे पाडले गेले. पण तरीही हिंदी सिनेमात उर्दू त्याच स्थानी राहिली. पुढेपुढे हिंदी शब्दांची जागा इंग्रजी शब्दांनी घेतली, तरी उर्दूची जागा अटळ राहिली. त्यामुळेच ती बया माझ्याशी भांडायला बसली. असो. तर मुद्दा हा की आपल्या हिंदी सिनेमांमुळे पब्लिकचं उर्दू सुधारलं.

मी शाळेत होतो, तेव्हा पाचवी आम्हाला पहिल्यांदा हिंदी आलं. मला फार आवडली ती भाषा. त्यामुळे मी 'राष्ट्रभाषा सभे'च्या चार परीक्षा दिल्या. आठवीत हिंदी सोडून संस्कृत(स्कोरिंग होतं) घेऊनही, मी आठवीतही राष्ट्रभाषा सभेची परीक्षा दिली. हिंदीच्या वर्गातल्या मित्राकडून उधारीवर पुस्तक आणून दिली. मग पुढच्या वर्षी मात्र ते पुस्तक उधारीवर आणणं जीवावर आलं, म्हणून परीक्षा दिली नाही. तर मुद्दा हा, की मला हिंदीची आवड होतीच, त्यामुळे कठीण गेली नाही. पण बर्‍याच पब्लिकची गोची व्हायची. उदाहरण सांगतो, एका मित्रानं, परीक्षेमध्ये 'चमन' ह्या शब्दाला समानार्थी म्हणून 'टकलू' असं लिहिलं होतं. दुसरी एक मुलगी एकदा बाईना म्हणाली, 'कल मैं मां-बाबा के साथ बहार गयी थी।" मग बाई आपल्या तिला १५ मिनिटं बहार आणि बाहर मधला फरक समजावत होत्या. मी काही फार शहाणा नव्हतो. मीही लोचे करायचो, पण आपलं ठेवावं झाकून, दुसर्‍याचं पहावं वाकून. (त्यातला माझा एक 'नहीं सोडूंगा' वाला किस्सा मी पूर्वी कबूल केलाय, नाही असं नाही.)

तर मुद्दा पुन्हा तोच. चमन आणि बहार हे दोन्ही शब्द उर्दू आहेत असं उर्दू प्युरिस्टही म्हणतील. मग ते आमच्या हिंदीच्या पुस्तकात कसे? उत्तर सोपं आहे. ते हिंदीचं नाही, हिंदुस्थानीचं पुस्तक आहे. पुस्तकाला नाव चुकीचं आहे. असो. ह्यात बरेच वाद-उपवाद आहेत. माझ्यासारख्या सामान्य, वरवरच्या अभ्यासकाला जे कळलं, ते इथे लिहिलं.

जाता जाता, हिंदी सिनेमाने जनतेवर किती प्रभाव टाकला, ह्याची काही उदाहरणं. यश चोप्राप्रभृतींच्या पंजाबी(हिंदी ह्या नावाखाली खपवलेल्या) सिनेमांमुळे, इथे मिलानमध्ये माझे काही पंजाबी पाकिस्तानी मित्र आहेत; त्यांचं आपापसातलं बोलणंही मला ७० टक्के कळतं(टक्केवारी कशी काढली ते प्लीज विचारू नका).

दुसरं, मी ७-८वीत होतो. माझ्या बाकावर माझ्या शेजारी बसणार्‍या मुलाचं इतिहासाचं पुस्तक बाकावर ठेवलेलं होतं(मी माझं पुस्तक घरीच विसरलो होतो). त्यानं पुस्तकातल्या विविध मोठ्या माणसांच्या चित्रांना मुकुट, टोप्या आणि स्त्रियांना दाढी-मिशा वगैरे बरंच चित्रकाम केलं होतं. त्यातून बर्‍याच आकृत्यांखाली कल्पक मेसेजेसही होते. असाच एका पगडीवाल्या(टिळकांसारखी पगडी, नाव नेमकं आत्ता आथवत नाहीये) माणसाला सरदारजीसारख्या दाढीमिशा काढलेल्या होत्या. त्याचा एक डोळा काळा करून टाकला होता आणि खाली मेसेज लिहिला होता, "पंजाबी कूडा आंख मारे।" माझा क्षणभर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मी त्याच्याकडून कन्फर्म केलं, की तू हे नक्की काय लिहिलंयस.

तो म्हणाला, "पंजाबी कूडा आंख मारे।"

मी म्हटलं "म्हणजे(मला कळलं होतं काय घोळ झालाय ते, पण मला त्याच्याकडून वदवून घ्यायचं होतं)?"

तो म्हणाला, "कूडा म्हणजे पंजाबीत मुलगा."

मी गप्प बसलो. त्यानं कुडी म्हणजे मुलगी ह्यावरून कूडा म्हणजे मुलगा असा शोध लावला होता(हा "दिलवाले दुल्हनिया.." इफेक्ट होता). पण तो हे विसरला (आणि माझ्या पक्कं लक्षात होतं) कूडा म्हणजे कचरा. तसं बघायला गेलं तर मलासुद्धा हे सगळं कळायची काही गरज नव्हती. पण तीच गाणी पुन्हा पुन्हा ऐकून माझं पंजाबी सुधारलं होतंच.

32 comments:

 1. उर्दू जुबान की अपनी खास मिठास, अदब और रूबाब है जो हिंदी में नहीं, मुआफ किजीये लेकीन मराठी में भी नहीं. शायद इसीलिये फिल्मी दुनिया में उर्दू में का इस्तेमाल होता रहा है. अगर सोलह आना हिंदी इस्तेमाल की जाय तो फिल्म ऐसी लगेगी मानो बी.आर. चोप्रा का महाभारत ! किन्तू, षड्यंन्त्र, पिताश्री....!!!
  ऐसा लगता है जैसे इन लफ्जों को अभी-अभी गर्म देसी घी से बाहर निकाला गया हो.
  मला तर हिंदी ही भाषा फक्त तिच्यातील हां-जी, हां-जी च्या तुपाळ टोनमुळे, पोकळ, दिखावू वाटते.
  म्हणूनच जुन्या सिनेमांचे उर्दू-फारशी मिश्रीत संवाद ( उदा.मुघल-ए-आझम) पूर्ण कळले नाही तरी कानाला बरे वाटतात.
  आणि मराठी कशी वाटते म्हणाल तर मनोगत डॉट कॉम (http://www.manogat.com/node/11488) वरून घेतलेला जी.ए.कृत हा संवाद पाहा:
  आणि दररोजची, दररोजची भाषा म्हणून तुम्ही गवगवा करता, त्या भाषेत आम्ही काय दिवे लावतो? कशासाठी ती वापरतो? - तर मोलकरीण अजून आली नाही काय? राकेल संपले आहे! आला वाटते पुन्हा हा खवीस सकाळीच पैसे उसने मागायला! अहो, देतो की तुमचे पाच रुपये. का कुठे पळून चाललो आहे? आता काय करणार ऐन वेळी? परटाने पॅंटची सारी बटणेच तोडून टाकली आहेत! ए बाई, मला जरा आणखी थोडा वेळ झोपू दे.
  - (उर्दू शिकण्यासाठी कधीकाळी मशिदीत जाऊन बसलेला) यशवंत.

  ReplyDelete
 2. Masta jhalay post tumcha. Tumche vihchar agadi khare aahet ani tyach mule post motha asun suddha vachayla maja aali, kantala yena shakyach navhata. Hindi-Urdu la ekatra Hindustani mhanana mhanje ek uttam vichar aahe. Shevti tumhi mhanta tasa purve kadil hindi var sanskrut cha prabhav jhala tar paschime kadil hindi var farsi. Ani he khup varshanpurvi jhalyamule ya don sanskarancha ek sundar mishran tayar jhala. Tyamule tumhi mhanta tasa ya mishranala nusta hindi kinwa urdu madhe vibhajit karnya peksha hindustani mhanane vaicharik drushtya uttam vatale. Ani samevar tumchi ji kahi fatkebaji jhali aahe ti mhanje ekdam kaatil. Aflatoon. Ata he kaatil ani aflatoon shabda mulche marathi nahit pan apan tyanchi chirphad na karta marathit vapartoch ki. Masta post, parat ekda.

  ReplyDelete
 3. विद्याधर, अतिशय विस्तृत व मुद्देसुद परामर्ष.लेख मला खूपच भावला. एकतर मधले पंधरा दिवस अगदी नेटसंन्यास झाला होता. आल्या आल्या इतका मस्त लेख वाचायला मिळाल्याने दिल खूश झाला. :)

  ’उर्दू ’ भाषा मला अतिशय आवडते.अर्थात याचे सारे श्रेय मी हिंदी सिनेमातील तिच्या मुबलक वापरालाच देईन. त्यातही १९६० पर्यंतच्या सिनेमांना अधिक. अनेकदा गझलेतले शब्द कळत नसत म्हणून चक्क धुंडाळून मी हिंदी अनुवादीत गझलांची पुस्तके आणत असे. उर्दू शिकण्याचाही एक दौर येऊन गेला. एक अजब मिठ्ठास आहे तीत. हिंदी तर उच्च श्रेणीचीच ( शाळेत ) असल्याने खूप चांगली पकड होती-आहे.

  पंजाबी 'कूडा ’...हा हा...बिचा~याचा " म चा क " झाला रे.

  ReplyDelete
 4. अतिशय आनंद झाला.. समानशील लोक भेटले की असा आनंद नेहमीच होतो. हिंदी उर्दू तर खास जिव्हाळ्याचा विषय. यशवंत म्हणाले तसे मशिदीत जायची अजून आवश्यकता नाही पडली पण उर्दू/फार्सी थोडेबहुत वाचायला यायला लागले तेव्हापासून तर अजूनच गुंतत गेलो. माझ्या मते या विषयाचे ३ कालखंड पडतात. इंग्रजांनी भारतात येण्यापूर्वी, इंग्रजी अंमल असताना आणि स्वातंत्र्योत्तर.
  पहिल्या भागात फार्सी ही राजभाषा होती आणि जवळ जवळ संपूर्ण भारत इस्लामच्या अधिपत्याखाली होता. हिंदी-उर्दू जबान एकंच आहे याचा उत्कृष्ट ऐतिहासिक मासला म्हणजे अमीर खुसरोच्या रचना....खुसरो दरिया प्रेमका, उलटी वाकी धार, जो उतारा सो डूब गया, जो डूबा सो पार...हे १३-१४ व्या शतकातले आहे जेव्हा मुघल आले पण नव्हते आणि इस्लामच्या अरबवर्चस्वावर मंगोल संस्कृतीचा झालेल्या प्रभावाची राजकीय आणि सांस्कृतिक परिणामे दिसू लागली होती. 'उर्दू' या शब्दचा अर्थ होता cantonment किंवा छावणी. तुर्की/इराणी लोकांच्या लष्करी छावण्या जेव्हा डेरा देऊन असत तेव्हा त्यांच्यात जो काही बाजार होई त्यासाठी त्यांच्या स्थानिकांशी संबंध येत असे त्याच्या मिश्रणातून तयार झालेली भाषा म्हणजे 'उर्दू'मध्ये बोलली जाणारी भाषा म्हणून उर्दू. (शब्द बघा - लष्कर, छावणी, डेरा, बाजार..) तरी फार्सीला एक क्लासिक टच पूर्वीपासून आहे. उर्दू होती पूर्वी ती व्यावहारिक भाषा.. पण तिला जो लहेजा आहे तो आला त्याचे कारण मग नंतर ती दरबारात बादशाह सरकार ची हांजी हांजी करायची भाषा म्हणून उत्क्रांत झाली. तिच्यातले काव्यही बघाल तर मुसद्दस, कसिदे वगैरे प्रकार लगेच डोळ्यात भरतात..तसे मर्सिया, मुरब्बा, मुब्की, सरापा वगैरे बरेच आहे... सुफी आणि भक्ती मुव्हमेंटचा अभ्यास करताना तर हिंदी/उर्दू विषय सारखा जाणवतो. कबीराच्या रचना वाचतानाही जाणवते. ज्ञानेश्वरकालीन मराठी ते आगरकर/चिपळूणकर मराठी मधला प्रवास बघायचा असेल तर फार्सी-मराठी संबंध अभ्यासायला लागतात.
  इंग्रजांनी जेव्हा भारत ताब्यात घ्यायला सुरुवात केली (१७४७ ला खरी सुरुवात) त्यानंतर लवकरच त्यांना राज्यकारभार हाकण्यासाठी सिस्टीम तयार करणे गरजेचे झाले. आणि त्यांनी तेव्हा फार्सीपेक्षा सामन्यांची भाषा म्हणून हिंदुस्तानी वापरायला सुरुवात केली(साधारण १८३४ च्या आसपास). त्याला जो विरोध झाला त्याहीपेक्षा जास्त विरोध त्यांनी फार्सी लीपिऐवाजी देवनागरी आणली तेव्हा झाला.. मग आपोआप दोन्ही बाजू तयार झाल्या.. आणि काय योग्य काय अयोग्य यावर बराच वाद-विवाद, भांडणे झाली...धर्म, संस्कृती यापलीकडेही भाषा ही गोष्ट कधी कधी जास्त कैफ चढवते.
  आणि जेव्हा फाळणीचा कालावधी होता पाकिस्तानला राष्ट्रीय अस्मिता नावाची गोष्ट तयार करणे अत्यावश्यक होते. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी सांगितलेला उर्दू वरचा हक्क. आणि आपण पण त्याला तुमची तर ठेवा तुमच्याकडे म्हणून सोडून दिली हे फार दुर्दैवी. एक सरळ गोष्ट बघा - चित्रपटाच्या सुरुवातीला येणाऱ्या पाट्या पूर्वी रोमन, देवनागरी आणि फार्सी तिन्ही लिप्यांमध्ये येत असत.. कालावकाशाने फार्सी लिपी गायब झाली आणि आता देवनागरी पण गायब झाली...यापरते आपल्याकडेही भाषा-शुद्धीचे अनेक प्रयोग/प्रयत्न झाले. तिकडेही झाले...मात्र स्वातंत्र्योत्तर काळात भारतामाधेय उर्दूचे व्यवस्थित खच्चीकरण झाले हे मात्रमान्य.

  http://disamajikahitari.wordpress.com/category/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%82/

  ReplyDelete
 5. बाबा, एकदम झक्कास.. नेहमीप्रमाणेच.

  याच विषयावर किंचित इनोदी ढंगात मागे लिहिलं होतं.
  http://www.harkatnay.com/2010/02/blog-post_22.html

  ReplyDelete
 6. I broadly agree with Yashwant!
  I am almost of his genre... i mean, he went to Masjid, i went to a Madarsa.

  However, Marathi is not as defunct/hopeless in the matter of sweetness... but to understand that, one needs to look beyond Mumbai-Pune KHICHDI language. Look at the spoken marathi used in villages and you would know how sweet it is!!

  ReplyDelete
 7. mi baryach hindi movies chya suruvatila "Bhasha:URDU" asehi pahile ahe.

  ReplyDelete
 8. मला अजिबात काही समजत नाही ती भाषा. वैचारीक गोंधळ, आणि मग त्या शब्दाचा अर्थ काय असेल हा विचार न करता आपल्याला जो अर्थ लावायचा तो लाऊन घेत असतो मी नेहेमी.

  चष्मेबद्दूर म्हणजे जाड भिंगाचा चष्मा लावणारी मुलगी असे वाटायचे मला! तसेच तशरीफ म्हणजे काय हे पण कधीच कळले नाही

  ReplyDelete
 9. हिन्दी, उर्दू दोन्हीत माझी गती नाही.
  त्यावेळंचे डायलॉग सिनेमात जरी बरे वाटले, तरी ते तद्दन खोटे वाटतातच... कितीही सिनेमॅटीक लिबर्टी गॄहीत धरली तरी...

  बाकी लेख मात्र भावला... विश्लेषण योग्य आहे...

  ReplyDelete
 10. @विभि
  चांगला लेख आहे...

  ReplyDelete
 11. बाबा, एकदम झक्कास.. नेहमीप्रमाणेच.+1

  बाबा, माझी उर्दूची मजल हिदी सिनेमापुरतीच.

  मराठी भाषेच्या गोडीबद्दल बोलायचं झाल तर आपल्याकडे मराठीच किती प्रकारची आहे बघ. सुदीप म्हणतो त्याच्याशी सहमत.
  आपल्या मराठी भाषेच्या बोलीवरून लोक ओळखतात कि तो कुठला आहे म्हणून.
  सोलापुरी (कानडी मिश्रित), कोकणी, मराठवाडी,कोल्हापुरी, नागपुरी या सगळ्या मराठी कितीतरी मस्त वाटतात कानाला ऐकायला.

  "गार्भीचा पाऊस" मद्ये पण मस्त वाटते मराठी. (शिनेमा पण मस्त आहे बर का.......)
  मकरंद अनासपुरे तर खास त्याच्या मराठी बोलण्याच्या स्टाइल मुळे फेमस आहे.

  ReplyDelete
 12. विभि...जबर्‍या लिहल आहेस रे!!!

  ReplyDelete
 13. यशवंत,
  अरे हिंदीची पण आपली मिठास आहे. अख्खा लगान अवधी भाषेत होता. त्यातली गाणी किती गोड वाटतात कानांना, त्यात फारसी शब्द जवळजवळ नाहीत. आणि तुला जसे षड्यंत्र वगैरे शब्द कठीण वाटतात, तसे वतनपरस्त वगैरे शब्दही अनेकांना वाटू शकतात ना. मुख्य कारण हे की, हे शब्द रेग्युलरली आपल्या कानांवर पडत नाहीत, त्यामुळे आपल्याला त्यांची ओळख होत नाही. आता हेच बघ, एक्साईटमेंट आणि उत्सुकता, टेक्निकली(तांत्रिकदृष्ट्या) ह्यांच्यात सारखीच जोडाक्षरं आहेत, पण मला एक्साईटमेंट पट्कन जिभेवर येतो, कुणाला उत्सुकता लवकर येईल. आणि ऑफकोर्स, उर्दू ही जास्त गेय की हिंदी असा भेदभाव मला तरी अशक्य आहे. कारण माझं दोन्हींवर सारखंच प्रेम आहे.
  पुन्हा आत्ताच्याच काळातलं, 'लंडन ड्रीम्स' सिनेमातलं, 'मन को अति भावे सैंया' हे गाणं ऐक. एकही फारसी शब्द नाही. इतकं गोड वाटतं कानांना. शेवटी माझ्या मते सगळंच पर्सेप्शन आहे. कुणाला उर्दू गोड, कुणाला हिंदी. आता मला सांग, हेच षड्यंत्र सारखे शब्द घेऊन कालिदासाने संस्कृत शाकुंतल लिहिलं, त्याची गेयता, गोडवा कमी कुठेय?
  बाकी मराठीबद्दल मी काय बोलू, ज्ञानेश्वरांनीच सांगितलं, "अमृतातेही पैजा जिंके".
  अधिकृत मराठी आणि बोली मराठी वेगळ्या. पुन्हा कॉस्मोपॉलिटन मराठी आणि गावरान मराठी वेगळ्या. अरे इथे युरोपात नेहमीच्या वापरात नाही, म्हणून मला फ्रेंचही गोड वाटते. आपण मराठीला 'टेकन फॉर ग्रॅन्टेड' करतो. बाकी काही नाही, आजही सातार्‍याकडचं मराठी मला ऐकायला मस्त वाटतं.
  असो. शेवटी पर्सेप्शन इज द ट्रुथ.
  प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार.
  बाकी यशवंता, मशिदीत जाऊन उर्दू शिकलास, मानलं तुला!

  ReplyDelete
 14. पांथस्थ,
  ब्लॉगवर स्वागत.
  अहो हिंदी की उर्दू हा किडा बरेच दिवस होता. विकिपीडियानं बर्‍याच शंका दूर केल्या. मग कायमचाच मी सत्य शोधतोय. एक एक तुकडा हातात येतो. मग मधेच काहीतरी निमित्त घडतं आणि विचार एकत्र येतात. असो. तुम्हाला पोस्ट आवडली, बरं वाटलं. असेच भेट देत रहा.
  प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!

  ReplyDelete
 15. भाग्यश्रीताई,
  खूप धन्यवाद. मी विचारच करत होतो, की तू आहेस कुठे! मग आज तुझा ब्लॉग वाचल्यावर कळलं.
  होय, अगदी बरोबर बोललीस, सिनेमामुळेच आपल्यावर उर्दूची छाप पडली. आगळी मिठास आहे उर्दूत हे खरंच. प्रत्येक भाषेचा आपलाच एक गोडवा असतो.
  आणि अगं, वाचून मी स्टंप झालोच होतो. ;)

  ReplyDelete
 16. निखिल,
  ब्लॉगवर स्वागत. मी तुझा ब्लॉग बर्‍यापैकी नियमितपणे वाचतो. तुझी कॉमेंट बघून बरं वाटलं.
  तू दिलेल्या माहितीमधली अगदी थोडीशीच माहिती मला होती. तू एव्हढी चांगली माहिती दिलीस त्याबद्दल आभार. बाकी तुम्हा उर्दू-फारसी वाचता येणार्‍यांबद्दल मला फार असूया वाटते, अजून माझा शिकण्याचा योग नाही आलाय. देवनागरीत लिहिलं तर बर्‍यापैकी उर्दू कळतं, पण नस्तलिक़ शिकायची खूप इच्छा आहे. बघू केव्हा योग येतो.
  तुझ्या विस्तृत आणि माहितीपूर्ण प्रतिक्रियेसाठी पुन्हा एकदा खूप आभार! अशीच भेट देत रहा!

  ReplyDelete
 17. हेरंबा,
  अरे खरं सांगतो, मी सुरूवात केली ना हा लिहायला, तेव्हा तुझी पोस्टच डोक्यात आली होती. मग लिहित गेलो आणि गाडी वेगळ्याच ट्रॅकवर गेली. तुझं आझाद-ए-हिंदी कसं विसरणार! ;)
  खूप आभार रे!

  ReplyDelete
 18. सुदीपजी,
  ब्लॉगवर स्वागत.
  तुमचं म्हणणं मला १००% पटतं. गावरान मराठीचा गोडवा निश्चितच वेगळा आहे. शेवटी सगळं पर्सेप्शन आहे. प्रत्येक व्यक्तिच्या प्रकृतीवर त्याच्या आवडी-निवडी ठरतात. असो. बाकी पुणे-मुंबईची आजची कॉस्मोपॉलिटन मराठी सोडली, तर जी "शुद्ध" म्हणवली जाणारी अधिकृत मराठी आहे, ती सुद्धा सुंदरच आहे. मुळात प्रत्येक भाषेची आपली सौंदर्यस्थानं असतातच.
  प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!
  बाकी तुमच्या भाषा शिकण्यासाठी जंग जंग पछाडण्याच्या स्वभावाचं कौतुक करावं तेव्हढं कमीच!
  अशीछ भेट देत राहा!

  ReplyDelete
 19. हर्षद,
  ब्लॉगवर स्वागत.
  शक्य आहे. बी.आर.चोप्रांचा 'निकाह' सारखे, मुस्लिम-सेंट्रिक सिनेमे, किंवा अगदी जुने काही सिनेमे 'उर्दू' सर्टिफिकेट घेत असल्याचं नाकारता येत नाही.
  असो. प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! अशीच भेट देत राहा.

  ReplyDelete
 20. महेंद्रकाका,
  सहीच. पु.लं. म्हणतात ना, चष्मेबद्दूर म्हणजे 'चष्मा लावलेला रावबहाद्दूर'. असतं बर्‍याच जणांचं. नाही जमत एखाद्या भाषेशी. पुन्हा ती भाषा बर्‍याच जणांना जडही वाटते. आणि अनेकदा तिचं जडत्व मर्यादेबाहेर वाढवलं जातं. आणि एकदा इंट्रोडक्शनच असं झालं, की पुढे रस संपतो.
  असो.
  प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!

  ReplyDelete
 21. आनंदा,
  तुझं म्हणणं मला बरेचदा पटतं. जुन्या अनेक सिनेमांमध्ये, पात्रांच्या तोंडी पुस्तकी भाषा देतात. असे संवाद प्रत्यक्षात कुणी आपापसात म्हणत नसतील. पण ते सिनेमात जोरदार 'फलसफे' देण्याच्या नादात विसरलं जातं. त्यातून आपल्या भागामध्ये 'हिंदुस्थानी' अशी बोलली जात नाही, त्यामुळे ती भाषा बेगडी वाटते. कारण ती भाषा संवादलेखकाच्या पार्श्वभूमीप्रमाणे उतरलेली असते. त्यामुळे सगळेच आयडेंटिफाय करू शकतील असं नाही.
  असो.

  ReplyDelete
 22. सागर,
  ब्लॉगवर स्वागत आणि खूप धन्यवाद भौ!

  ReplyDelete
 23. सचिन,
  धन्यवाद रे भाऊ.
  अरे बर्‍याच जणांसाठी उर्दूचा एकमेव स्रोत म्हणजे सिनेमा. सुदीपजींनी सांगितलंय ते अगदी योग्यच आहे. मराठीचा फ्लेवर दर कोसाला बदलतो. अगदी बेळगावापासून नागपुरापर्यंत.
  गाभ्रीचा पाऊस ब्येसच, अगदी भाषेसकट.
  मकरंद अनासपुरेच्या लहेजाबद्दल तर मी काही बोलायलाच नको.

  ReplyDelete
 24. योगेश,
  खूप खूप आभार रे! असंच प्रोत्साहन देत राहा! :)

  ReplyDelete
 25. माझा हिंदीद्वेष वेगळा आहे बाबा - अरे मी ट्रान्सलेटर आहे~!!!!!
  मन को अति भावे सैंया - मस्तच - प्रशून जोशी ना?
  मी उर्दू शिकू शकलो नाहीच - मशिदीतल्या मदरशात गेलो हे घरी कळले आणि पुढे यथेच्छ मार खाल्ला !!
  मोठा झाल्यावर इथे-तिथे भेटलेल्या दाढिदिक्षीतांना उर्दू शिकवा म्हटले, तर ते डोळे मिचकून दाढीवर हात फिरवित इस्लाम कसा महान आहे यावर लेक्चर देत (बॅकग्राऊंडला: क्या तुम्हे इस्लाम कूबुल है?). उर्दू वाचता येणारे, पण लिहीता न येणारे शिक्षकही मला भेटले आहेत. हिची सगळी अक्षरं लिहिता, ओळखता येतात - पण अख्खा शब्द लिहीता येत नाही. लिहिण्याची पध्दत माणसागणिक बदलते म्हणे! तरिही ही महिरपी भाषा मला आवडते. बाकी सगळे मान्य!

  ReplyDelete
 26. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 27. ह्म्म यशवंत,
  मग तुझा हिंदीद्वेष मी समजू शकतो - ;)
  अरेरे, एव्हढं धाडस करूनही तुझं उर्दू राहिलंच का. आणि खरंच रे उर्दूला जो इस्लामचा शिक्का पडलाय ना तो डोक्यात जातो. प्रत्येक गोष्टीला का धर्माशी जोडायचं. अरे हो, ती लिहिण्याची पद्धत हा एक डेडली प्रकार आहे. माझ्या एका कलिगने मला समजावलं होतं. असो. चालायचंच. ही कॅलिग्राफीवाली लिपी आणि जिभेला व्यायाम देणारी भाषा मलाही खूप आवडतेच रे. एक दिवस पटवीन तिला पण. :D

  ReplyDelete
 28. वाह! ये हुई ना बात..
  छानच झालाय लेख.
  ’जिसकी जुबॉं उर्दू की तरह’ असं गाण्यात का म्हटल आहे, हे पाहण्यासाठी काही उर्दू मिसरे, सोपे लेख वाचायचा प्रयत्न केला होता.
  मला हिंदीमिश्रित भाषा जास्त छान वाटली होती.

  ReplyDelete
 29. मीनल,
  'जिसकी जुबां उर्दू की तरह', ह्या ओळीचं मला केव्हाचं आकर्षण वाटत आलंय. भाषेचं सौंदर्य वर्णन करायला किती छान ओळ आहे ही. असो.
  पण खरंच 'आपली' 'हिंदुस्थानी'च बेस्ट...;)
  खूप आभार!

  ReplyDelete
 30. Anonymous4:33 AM

  बाबा तुमच्या सारखेच मलाही ह्या विषय बद्दल जाणून घ्यावसं वाटत, आणि या दोन्ही समाजात चांगले संबंध निर्माण व्हावे असे वाटते त्या साठी मी देखील एक छोटासा प्रयत्न केला आहे. वेळ काढून जरा माझ्या "भिंती" ला अवश्य भेट द्यावी आणि तुमची प्रतिक्रिया आणि मार्गदर्शन असुद्या.
  http://marathimuslim.blogspot.com/2010_07_19_archive.html

  ReplyDelete
 31. जहीर,
  मलाही नेहमी वाटतं, की आपसी संबंध सलोख्याचे असावेत. तुमचा ब्लॉग मी आत्ताच पाहिला. तुमचा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे. मी लवकरच तो पूर्ण वाचेन आणि मला काय वाटतं ते तुम्हाला सांगेन!
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 32. Anonymous10:09 PM

  चष्मेबद्दूर चा अर्थ कोणी मला सांगेल का please?

  ReplyDelete