ही कथा फारच लांब झाली. पण मला ती क्रमशः म्हणून पोस्ट करायची नाहीये, म्हणून एकत्रच टाकतोय. बाकी, नेहमीप्रमाणेच प्रयत्न आहे. गोड मानून घ्या!
"विक्रम, तुला माहितीय काल मी माझी लास्ट इयरची पुस्तकं आवरत होते!" समीना उत्साहानं सांगत होती.
"हं." विक्रमनं फक्त हुंकार भरला.
"विक्रम?" समीनानं त्याच्याकडे बघितलं. त्याचं लक्ष त्याच्या ब्लॅकबेरीकडेच होतं.
"विक्रम!" तिनं थोडं जोरानं म्हणताच त्यानं तिच्याकडे पाहिलं.
"हं. काय? काय झालं गं?"
हे हल्ली असंच झालं होतं. त्यांच्या लग्नाला दोन वर्षंच होत होती. पण लग्नापूर्वीचा आणि लग्न झाल्यावर वर्षभरानंतरचा विक्रम ह्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. तो पूर्णपणे कामात बुडून गेला होता. रात्रंदिवस फक्त काम काम. समीना कंटाळून गेली होती.
त्यांचं लव्ह मॅरेज होतं. ते दोघंजण तिच्या कॉलेजच्या हिस्टरी फेस्टिव्हलमध्ये भेटले होते. विक्रम इंजिनियर होता, पण इतिहासात त्याला खूप रस आणि गती होती. ती मराठा, मुघल आणि राजपूत हिस्टरीवरची मास्टर. एका इव्हेंटमध्ये त्या दोघांच्या गप्पा ज्या रंगल्या, त्या पार प्रेमापर्यंत पोचल्या होत्या. तो हिंदू आणि ती मुसलमान, त्यामुळे गोंधळ उडणार हे ठाऊकच होतं. तेव्हढ्यातच नशीबानं विक्रमला दिल्लीत नोकरीही मिळाली होती. मग त्या दोघांनी पळून लग्न केलं आणि सरळ दिल्लीला स्वतःचा स्वतंत्र संसार थाटला.
स्वतंत्र संसार म्हणजे त्या दोघांची परीक्षाच होती. विक्रमनं सुरूवातीला तिला खूप साथ दिली. पण मग हळूहळू त्याच्या कामाचा व्याप वाढत गेला. विक्रम दिवसातला फारच कमी वेळ तिला मिळायचा. सुरूवाती सुरूवातीला ती रुसायची तेव्हा तो गंमतीनं म्हणायचा, "सॅम, स्वातंत्र्याची किंमत ही चुकवावीच लागते. एकतर स्वातंत्र्याच्या आधी किंवा स्वातंत्र्यानंतर!"
पण मग तिचे रुसवे जाणवण्यापुरता वेळही त्या दोघांना एकत्र मिळेनासा झाला. समीना दिवस ढकलत होती. तिच्या डोक्यात वेळ घालवण्यासाठी नोकरी शोधण्याचे विचार येऊ लागले होते. योग्य वेळ झाली, की आपण त्याला सांगू असा विचार तिनं केला होता.
तो दिवस १५ ऑगस्टचा होता. विक्रमला सक्तीची सुट्टी होती. मग तिला बाहेर घेऊन जाणं भाग होतं. दोघेजण दिल्लीतच फेरफटका मारू असा विचार करून निघाले होते. "आज फार सिक्युरिटी असेल गं. कशाला जायचं?" वगैरे प्रकार त्यानं करून पाहिले, पण समीनाला जायचंच होतं.
दोघेजण रस्त्यानं चालले होते. विक्रमनं पांढर्या रंगाची पँट आणि चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला होता, त्यावर पांढरा कोट. डोळ्यांवर काळा चष्मा होता आणि हातात त्याचा जीव की प्राण, "ब्लॅकबेरी".
समीना आपल्या सवतीकडे बघावं, तशी त्या ब्लॅकबेरीकडे पाहत होती.
"तू सूट कशाला घातलायस. कुठे कामाची अपॉइंटमेंट वगैरे नाहीये ना?" समीनानं साशंक होत विचारलं.
"नाही नाही, ते म्हणजे, मला काही दुसरं मिळालं नाही."
"कसं मिळेल, ह्या असल्या कपड्यांशिवाय, गेल्या वर्षभरात काही घातलंयस. असो."
त्याचं लक्ष अजूनही ब्लॅकबेरीकडेच होतं. समीना नुसती धुमसत होती. हिरव्या रंगाच्या सलवार कमीजचा दुपट्ट्याचं एक टोक हातात घेऊन खेळवत होती.
दोघेही गप्प होते. आपापल्याच विचारात. रस्त्याला वर्दळ तुरळक होती. विक्रमला थोडंसं विचित्र वाटलं.
"ते पुस्तकांचं काहीतरी म्हणत होतीस."
"अरे वा, तुझं लक्ष होतं माझ्या बोलण्याकडे?" समीना कुत्सितपणे म्हणाली.
विक्रमला थोडं वाईट वाटलं. "अगं जरा.."
"राहू दे, राहू दे"
"बोलशील तर काय झालं?"
"अरे नाही, तर काल वाचत होते. आपले योद्धे, आपले सरदार, त्यांचे पराक्रम. आणि हे गोरे लोक त्यांना दरोडेखोर, चोर वगैरे म्हणतात."
"अगं, जसा आपला इतिहास आहे, तसा त्यांचा पण आहे नाही का? आपल्याला जशी आपल्या पूर्वजांपासून स्फूर्ती मिळते, तशीच त्यांनाही त्यांच्या पूर्वजांकडून. बाकी, इतिहासाचा वापर हा वर्षानुवर्ष राजकारण्यांनी केलेला आहे. जर त्यांनी आपल्या बाजूनं इतिहास लिहिला, तर त्यांच्या देशाच्या मनोधैर्याचं काय होईल? खरा इतिहास हा फार कमी वेळा लिहिला जातो. असा इतिहास जो निष्पक्ष असतो, तो मिळणं कठीणच असतं. म्हणून मला नेहमी वाटतं. इतिहास फक्त शिकायचा नसतो, तर इतिहासापासून शिकायचं असतं. आणि तो कवटाळून तर बिलकुलच बसायचं नसतं."
"तुला मी काय वाटते. मी इतिहासाची बी.ए. आहे. आणि तू मला असा ज्ञान देत असतोस जणू मी कुणी मूर्ख आहे." समीना वड्याचं तेल वांग्यावर ओतत होती.
आणि अचानक त्याच्या ब्लॅकबेरीचा लाईट फ्लॅश झाला. त्यानं झपाट्यानं मेसेज वाचला.
"सॅम..." तो अत्त्यानंदानं ओरडला. "सॅम आय हॅव डन इट."
"काय झालं?"
"मी आता माझा स्वतःचा बिझनेस चालू करतोय. यू.एस. मध्ये."
"काय?" तिला काहीच कळेना.
"नोकरीला लागल्यापासूनच एक ठरलं होतं. मला स्वतंत्र व्हायचंय. मी कुणाची चाकरी करू शकत नाही, तो माझा पिंड नव्हे. त्यासाठीच मर मर मरत होतो. अनेक लोकांशी संपर्कात होतो. एक क्लायंट होता, त्याच्याशी बरीच चर्चा झाली होती. पैसे उभे करत होतो. अनेक बाकीच्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करत होतो. तो तिकडचं बघत होता. हा बघ त्याचा मेसेज आलाय आत्ता. मी सकाळपासून ह्याच मेसेजची वाट बघत होतो. पुढच्या महिन्यांत आपण दोघे न्यू यॉर्कला."
"..."
"अगं काही बोलशील?"
"काय बोलू. तुला मला एका शब्दानंही विचारावंसं वाटलं नाही ना? आयुष्याचा एव्हढा मोठा निर्णय तू मला न विचारताच घेतलास. माझी काय इच्छा आहे, मला काय वाटतं, कशाचीच गरज नाहीय ना."
"अगं पण, तू तर हाऊवाईफच आहेस. तुला इथे काय तिथे काय. उलट तिथे जास्त आराम आहे गं! आपल्या दोघांसाठीच तर करतोय सगळं."
"वा वा! दोघांसाठी म्हणे. मग दोघांचीही मतं विचारात घ्यायची असतात. हे सगळं तू स्वतःसाठीच करतोयस."
"समीना!" त्याला कळतच नव्हतं.
"बस झालं आता. मला कंटाळा आलाय ह्या असल्या आयुष्याचा. अशा घरात जिथे मला कस्पटाएव्हढीही किंमत नाही, तिथे मला राहायचंच नाहीय."
"काय? सॅम डोन्ट ओव्हररिऍक्ट!"
"ओव्हररिऍक्ट? अरे मी आहे म्हणून इतके दिवस सहन केलंय. मला साधा एक तासही मिळत नाही दिवसाकाठी तुझ्याबरोबर. एनीवे, संपलंय आता. मला अम्मी कित्येक दिवसांपासून परत बोलावतेय."
"हे कधीपासून..." पण त्याचं वाक्य पूर्ण ऐकायलाही ती तिथे उभी नव्हती.
विक्रम थिजला होता. त्याला कळतच नव्हतं काय झालं होतं. मेंदूला झिणझिण्या आल्यागत वाटत होतं. तो ती गेली त्या दिशेला बघतच राहिला होता. ती दिसेनाशी झाली, तेव्हा तो भानावर आला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. तो जिथे उभा होता तिथल्या एका दुकानदारानं टीव्हीवर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम लावला होता. त्याच्या टीव्हीच्या शेजारीच घड्याळ होतं. सकाळचे ९.३० वाजत होते. विक्रमला अचानक जाणीव झाली आणि तो धावतच निघाला. त्यादिवशी मेट्रोही उशीरानं चालत होत्या. त्याला मेट्रो मिळायला उशीर झाला आणि घरी पोचायलाही. त्याच्या घराचं घरपण गेलं होतं. त्याच्या स्वातंत्र्यानं किंमत वसूल करायला सुरूवात केली होती.
अभयनं अजून एक झुरका घेतला आणि सिगरेट शेजारी बसलेल्या शीबाकडे दिली. तिनंही झुरका घेतला आणि परत अभयला दिली. ती साधी सिगरेट नव्हती. त्यात गांजा होता. कान फाडून टाकेल इतक्या कर्कश आवाच्या संगीतानंही त्या सगळ्यांना चढलेली झिंग उतरत नव्हती, उलट वाढतच चालली होती. रात्र रंगत होती. शंभरच्या आसपास उच्चभ्रू घरातली मुलं-मुली ह्या रेव्ह पार्टीला आली होती. ह्यातले अनेकजण रेग्युलर होते. आणि ५-६ जण डीलर्स. हा प्रकार फारच सामान्य होता. दिल्लीसारख्या शहरात श्रीमंतांना काय कमी. अनेक नाईट क्लब्ज आणि पब्जमधून बनवलेलं डिलर्सचं जवळपास अख्खं नेटवर्कच अश्या पार्ट्यांची शान वाढवत असतं. सगळे श्रीमंत, उच्चभ्रू. पार्टीमध्ये उंची मद्य, जेवण आणि सर्व प्रकारच्या नश्याच्या पदार्थांचे पाट वाहत होते.
अभय आणि शीबा ही जोडी अश्या प्रत्येक पार्टीत असायची. ते दोघेजण दिल्लीतल्या दोन मोठ्या उद्योगपतींची मुलं होती. बाप पार्टनर्स, त्यामुळे दोघांची मैत्री लहानपणापासून. आई-वडलांची दुर्लक्ष झालेली ही दोघंच एकमेकांचा आधार होती. पण अक्कल यायची त्याआधीच हातात नको तेव्हढा पैसा आला होता आणि दोघंही वाहावत गेली होती. दोघंही आत्ता जेमतेम २१ वर्षांची होती. कॉलेजची शेवटच्या वर्षाची पार्टी अगदी रंगात आलेली होती. आता शीबाच्या हातात कोकेनची एक पुडी आली होती. तिनं ती पुडी सोडली आणि ओढली आणि.. आणि एकदम ती कोसळली. तिच्या नाकातून रक्त येत होतं. अभय एकदम गडबडला, त्याची झिंग उतरली. ती त्याच्याच मांडीवर पडली होती. त्यानं ती पुडी उचलून वास घेतला. ते हेरॉईन होतं. तो पॅनिक झाला आणि आरडाओरडी करायला लागला. कुणी ऐकण्याच्या स्थितीत नव्हतं हे एक आणि कर्णकर्कश संगीतामध्ये त्याच्या किंकाळ्या विरून जात होत्या. शेजारीच उभा एक डीलर पुढे झाला आणि त्यानं तिला उचलायला अभयची मदत केली.
"आम्ही तिला वाचवू शकतो." खुर्चीवर बसलेला इसम म्हणत होता.
"तिला हॉस्पिटलला घेऊन चला ना लवकर. तिला काहीतरी होईल." अभयच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. त्याचा गळा दाटला होता. तो सारखे हुंदके देत होता.
"हॉस्पिटलला नेलंस तर दोघंही आत जाल."
"पण मग. ती बरी कशी होणार. प्लीज, तिला वाचवा हो." अभय गयावया करत होता. त्याला काय करावं सुचत नव्हतं. वडलांना फोन करून हे सगळं कसं सांगणार!
"आम्ही तिला वाचवतो. इथेच डॉक्टरची सोयही होईल."
"मग करा ना. वाट कसली बघताय." शेजारीच सोफ्यावर शीबा निश्चेष्ट पडली होती. नाकातून आलेलं रक्त तसंच वाळलं होतं.
"त्याच्यासाठी एक काम करावं लागेल तुला."
"कसलं काम?"
"सांगतो." तो इसम दात विचकून हसला. "तुझ्या बापाचं ऑफिस ज्या बिल्डिंगमध्ये आहे, तिथे खूप सारी मोठी मोठी ऑफिसेस आहेत."
"मग?"
"तिथे आत जाण्यासाठी खूप सुरक्षा तपासणी होते."
"मग?" अभयला काही कळतच नव्हतं. "ह्या सगळ्याचा शीबाला वाचवण्याशी काय संबंध?"
"पण तिथे तुला कोणी हटकणार नाही."
"हो. ते आहे."
"मग, मी एक छोटीशी बॅग देतो, तेव्हढी नेऊन तिथल्या दुसर्या मजल्यावर लिफ्टच्या शेजारच्या कचरापेटीमागे ठेवायची आणि परत यायचं. बस."
"काय? काय आहे त्या बॅगेत?"
"त्याच्याशी तुला काय करायचंय? आम्ही हिचा जीव वाचवतो, पण तुला हे काम करावं लागेल."
"बॉम्ब आहे की काय? मी असलं काहीही करणार नाही."
"बघ. विचार कर. एकतर तुझ्याकडे वेळ कमी आहे. बाकी, इथून बाहेर पडणं फक्त माझ्यावरच अवलंबून आहे."
अभयनं चहूकडे घाबरूनच नजर फिरवली. बरीच माणसं होती.
"आणि त्यातून, तू हा असा. एक दिवस नशा मिळाला नाही, तर भीक मागत येतोस. तुझ्याकडे काही पर्याय आहे तरी का दुसरा? कमीत कमी तिचा जीव वाचवल्याचं समाधान तरी मिळेल." तो दात विचकत हसत होता. आणि अभय खचत चालला होता.
विक्रम मेट्रोमधून उतरला. त्यानं घड्याळाकडे पाहिलं. अजून ९च वाजत होते. वेळ होता. तो शांतपणे रस्त्यावरून चालत होता. त्यानं पांढरी पँट, चॉकलेटी रंगाचा शर्ट आणि पांढरा कोट घातला होता. फक्त आज काळा चष्मा नव्हता आणि हातात ब्लॅकबेरी नव्हता. चालता चालता तो विवक्षित ठिकाणी आला आणि थांबला. त्याची नजर कुणाला तरी शोधत होती. पण कुणीच नव्हतं. त्या दुकानासमोर तो उभा होता. टीव्हीवर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम चालू होता. विक्रम खिशात हात घालून एकटक टीव्हीकडे बघत होता.
अभय रस्त्यानं चालत होता. त्याचे डोळे एका रात्रीतच खोल गेल्यागत झाले होते. कित्येक वर्षांपासून झोपला नसावा असं वाटत होतं. शेवटचा डोस घेऊन ९ तास होत आले होते. त्याला आत्तापासूनच तल्लफ येत होती. पण त्याच्या खिशात आज नेहमीप्रमाणे पुडी नव्हती. कारण, कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कुणालाही संशय येणं परवडण्यासारखं नव्हतं. हातातली ४-५ किलोंची बॅग त्याला फारच जास्त जड वाटत होती. तो पाय ओढत चालला होता. अंगावरचा शर्ट त्यानं निघण्यापूर्वी बदलला. थोडं सोबर वाटावं म्हणून त्यानं फॉर्मल्स घातले होते. पांढरा शर्ट आणि काळी पँट घालून तो अजूनच कृश वाटत होता. चालून चालून तो थकला. त्याला धाप लागल्यागत झालं म्हणून तो फुटपाथवरच एका दुकानासमोर उभा राहिला. दुकानात टीव्ही चालू होता, पण त्यावर काय चाललंय, ह्याकडे त्याचं लक्ष नव्हतं.
"लक्षात ठेव, काही शहाणपणा केलास, तर हिच्या जीवावर बेतू शकतं. पोलिसांत जायचा विचारही करू नकोस. सर्वप्रथम ते तुलाच आत टाकतील. आणि सगळ्यांची बेअब्रू निश्चित आहे." तो सांगत होता आणि अभयची एकएक तटबंदी कोसळत होती. तिथून निघताना अभय शीबाजवळ गेला. ती अजूनही निश्चेष्ट पडली होती. तिचा श्वासोच्छवास सुरू होता. नाकाशी सुकलेलं रक्त, त्यानं आपल्या बाहीनं पुसलं आणि एकदमच त्याचा बांध फुटला. तो ओक्साबोक्शी रडायला लागला. मग एकदम सावरला आणि तिथून निघाला. आपल्या घरी गेला आणि तयारी करून तो निघाला होता. आई-वडिल, शीबा, शीबाचे आई-वडिल सगळ्यांचे चेहरे एक एक करून त्याच्या डोळ्यासमोर आले. त्याला ठाऊक होतं, प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आपण दिसणार. आज आपण हाराकिरी करायला निघालोय. त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं.
विक्रमनं एक क्षण आपली नजर फिरवली तर शेजारी एक पोरगेलासा तरून उभा होता. अशक्त वाटत होता आणि तो टीव्हीकडेच एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. आजच्या मुलांमध्येही किती देशभक्ती आहे ते पाहून विक्रमला कौतुक वाटलं. त्यानं अभावितपणे त्या तरूणाच्या खांद्यावर हात ठेवला.
अभय एकदम दचकला आणि भानावर आला. त्यानं शेजारी पाहिलं. एक २७-२८ वर्षांचा तरूण त्याच्याकडे पाहत होता. त्याचा हात अभयच्या खांद्यावर होता आणि चेहर्यावर स्मितहास्य होतं.
"खूप कृतज्ञता वाटते ना!" विक्रम म्हणाला.
".." अभयनं फक्त मान डोलावली.
"स्वातंत्र्यदिनाला असंच मन भरून येतं." विक्रम कुठेतरी शून्यात पाहत म्हणाला.
अभयला काही सुचत नव्हतं. "पण आजच्या दिवशी फार सिक्युरिटी असते हो!" तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
"हं" विक्रमचं क्षणभर लक्ष विचलित झालं होतं. "काय?" तो भानावर येत म्हणाला.
"नाही, मी म्हणतोय, सिक्युरिटी किती असते ना?"
विक्रमच्या चेहर्यावर पुन्हा स्मितहास्य आलं. "स्वातंत्र्याची किंमत आहे ती. कुठल्याही स्वातंत्र्यासाठी किंमत चुकवावी लागते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी किंवा मिळाल्यावर, पण किंमत ही चुकवावी लागतेच."
"पण आपल्याच देशात आपणच घाबरून राहायचं.." अभयला तिथेच काळ थांबावा असं वाटत होतं.
"हो, कारण आपण कर्तव्यांमध्ये कमी पडतो. आपण स्वातंत्र्यामध्ये फक्त हक्क बघतो, कर्तव्यांचा आपल्याला विसरच पडतो. आपण जर हक्कांबरोबरच कर्तव्य पूर्ण केली, तर ही स्वातंत्र्याची किंमत लवकर चुकती होईल." विक्रमला आत काहीतरी डांचत होतं. त्याला आपले बांध फुटतील की काय असं वाटत होतं.
एव्हढ्यात अभयचं लक्ष घड्याळाकडे गेलं. ९.३० वाजत होते.
"चला मला जायला हवं." अभय म्हणाला.
विक्रमला का कुणास ठाऊक, त्याला मिठी माराविशी वाटली. त्यानं त्याला एकदम मिठी मारली. अभयला आधी काही सुधरलं नाही. पण मग त्याला एक अनामिकशी शक्ती मिळाल्यागत वाटलं. त्याच्या डोळ्यांमध्ये थोडंसं तेज आल्यागत झालं. स्मित करून तो निघाला.
"स्वातंत्र्याची किंमत....हक्क, कर्तव्य..." अभयच्या डोळ्यांसमोर चेहरे अजूनही नाचत होते. विक्रमचे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. त्याला काहीच कळत नव्हतं.
'आई-वडिलांकडून दुर्लक्ष झालं हे खरं. पण मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपणही किती गैरफायदा घेतला. आपल्या आई-वडिलांची चूक झालीही असेल, पण म्हणून आपण जे केलं ते बरोबर होत नाही. आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार केला आणि आज त्याचे परिणाम भोगतोय. आणि नुसते आपणच नाही, तर परिणाम शीबा, आपले घरचे आणि देशालाही भोगायला लागणार आहेत. हा बॉम्ब दिल्लीतली सगळ्यात मोठी कमर्शियल कॉम्प्लेक्स उडवून टाकेल. हाहाःकार माजेल. आपण ड्रग्जच्या आहारी जाऊन त्याचे गुलाम झाल्याने ही परिस्थिती ओढवलीय. होय गुलामच. ती आता मजा कुठे राहिलीय. पदरचे पैसे खर्च करून आपण गुलामी करतो. आपल्यासाठी बाकी जगणं राहिलंय कुठे?
ह्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं? कॉलेजातल्या इतरांसारखं स्वच्छंद, स्वतंत्र जगणं कसं अनुभवायचं? काय करायचं?'
चालता चालता त्याला परत धाप लागली.
'छातीचा भाता झालाय. वय वर्ष एकवीस आहे फक्त माझं. चाळिशीच्या माणसासारखं होतंय. काय करत होतो मी? काय केलंय? आणि काय करतोय?'
त्याला स्वतःचीच प्रचंड घृणा आणि कीव येऊ लागली. त्यानं एकदा बॅगकडे बघितलं. त्याला एकदम काहीतरी वाटलं. त्यानं निर्णय घेतला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. समोरच एक पोलिस उभा होता. अभय पोलिसाच्या दिशेनं चालायला लागला. त्यानं किंमत द्यायचं ठरवलं होतं!
विक्रम अजून पाच मिनिटं तसाच उभा राहिला. अभय दिसेनासा झाल्यावर तो वळला, आणि... समोर तीच उभी होती. हो, समीना!
आधी विक्रमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तशीच, हिरव्या सलवार कमीजमध्ये. जशी गेली होती, तशीच. आपण स्वप्न पाहतोय, अशी विक्रमला खात्री झाली. आणि त्यानं अभावितपणे तिच्या दिशेनं पाऊल टाकलं. पण मग तिथेच थबकला. आणि उलट दिशेला वळून चालायला लागला.
"बोलणारही नाहीस?" तिचे शब्द कानांवर पडले मात्र तो लगेच थांबला आणि वळला.
त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. आता बांध नक्कीच फुटणार होता. गळा दाटून आला होता. एकेक पाऊल टाकत तो तिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला,
"तू गेल्यावर मी तुला खूप शोधलं. पण तुझ्या आई-वडिलांनी मला तुझा पत्ता लागू दिला नाही. मग मी एकटाच अमेरिकेला निघून गेलो. वाटलं होतं, तुझ्यापासून दूर कदाचित तुला विसरून जाईन. पण तुला गमावल्यावरच मला तुझी किंमत कळली. मी तुझाशिवाय राहूच शकत नाही. मी ५ महिन्यांतच परतलो. माझी खूप मोठी चूक झाली की मी तुला गृहित धरलं. कदाचित तू म्हणतेस तेच खरं. मी फक्त स्वतःचाच विचार करत होतो. मी माझ्या हक्कांचाच विचार केला, कर्तव्य पूर्ण केलीच नाहीत. असो. आता कदाचित फार उशीर झालाय. पण तुला एकदातरी हे सगळं सांगायचं होतं. तुझी माफी मागायची होती. बस. तेव्हढ्यासाठी दरवर्षी इथे येतो. की कधीतरी तू येशील. आता तू मला माफ नाही केलंस तरी चालेल. मी ह्या दुःखाबरोबर जगायला शिकलोय." तिच्या डोळ्यांत पाणी होतं. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तिचे अश्रू त्याला पाहवेनात. तो वळला आणि चालायला लागला.
"माझं ऐकणारही नाहीस?" पुन्हा तिचे शब्द त्याच्या कानी पडले. तो पुन्हा वळला.
आता ती त्याच्या दिशेनं आली.
"तुला तडकाफडकी सोडून मी व्यक्तिस्वातंत्र्याच्या शोधात निघाले होते. पण तुला गमावल्यामुळे हे स्वातंत्र्य महागातच पडलं. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी मला स्वतःच्या विचारांना स्वतंत्र करणं पुरेसं होतं, पण हे लक्षात यायला मला खूप वेळ लागला. तुझ्याशी तेव्हाच बोलले असते, तर कदाचित..! एव्हढी धावाधाव करूनही मी कधीच सुखी होऊ शकले नाही. कारण तू नव्हतास. तीन वर्षं तुझ्याशिवाय मी जगलेच नाहीये. आजही आले नसते, तर.." त्यानं तिच्या ओठांवर हात ठेवला. तिनं त्याचा हात हातात घेतला.
"आपण एकमेकांच्या पारतंत्र्यात सुखी राहूया ना!" ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली.
अचानक बाजूनं एक पोलिस व्हॅन जोराजोरात सायरन वाजवत आली. दोघांनी तिकडे बघितलं. जशी व्हॅन त्यांच्या शेजारनं गेली, विक्रमला आत बसलेला अभय दिसला.
बाबा, नेहमीप्रमाणे छान कथा! विक्रम आणि समीना चया भागाचा शेवट आवडला. पण शिबाचं काय झालं आणि ते पुडीवाले लोक? त्यांचं काय झालं?
ReplyDeleteअलताई,
ReplyDeleteअगं मला अभयच्या गोष्टीचा अंत सूचक ठेवायचा होता, पूर्ण लिहायचा नव्हता. पण कदाचित एक सूचक वाक्य लिहायचं राहून गेलं. त्यामुळे कन्फ्युजन होत होतं. आता टाकलंय मी. "अभय पोलिसाच्या दिशेनं चालायला लागला."
धन्यवाद गं! एकदम सुपरफास्ट प्रतिक्रिया! :)
आवडली!
ReplyDeleteविभी, कथा मस्त झाली आहे...एकदा वाचायला घेतल्यावर कधीच ती मोठी वाटली नाही...
ReplyDeleteबाबा,लय भारी.
ReplyDelete'इतिहास फक्त शिकायचा नसतो, तर इतिहासापासून शिकायचं असतं. आणि तो कवटाळून तर बिलकुलच बसायचं नसतं'.
बाबा... कथा कुठे लांबली आहे असे वाटले नाही. उलट अधिक विस्तृत असायला हवी होती असे मला तरी वाटले.
ReplyDeleteआजच्या स्वातंत्र्यदिनी फक्त शुभेच्छा ना देता तू एक 'संदेश' दिलास ह्यासाठी तुझे मन:पूर्वक धन्यवाद ...
बाबा, हि कथा चांगलीच होती आणि तू ह्याच्या पेक्षा हि जास्त उत्तम लिहू शकतोस हे हि मला माहित आहे.ऑल द बेस्ट.
ReplyDeleteबाबा कालच वाचली होती कथा.... आणि बाकि सगळ्यांप्रमाणे अभयचे संदर्भ थोडेसे तुटक वाटले होते... मी तूला कळवणार तेव्हढ्यात ती जबाबदारी अपर्णाने पार पाडली... तुझ्यामताप्रमाणे तो शेवट सुचक होत होता तरिही काहितरी सुटल्यासारखे वाटत होत... आज तू एक वाक्याची भर टाकून ती कसर भारून काढलीस...
ReplyDeleteआज हम कह सकते है, बाबा मस्त झालीये कथा आणि ’स्वातंत्र्य’ ही कल्पना... :)
लिहीत रहा!!
Interesting story.
ReplyDeleteमस्त झालीये.. छान फुलवलीस.. ओपन एन्ड्स असले की अजूनच मजा येते..
ReplyDeleteतो नाकातून रक्त वाला सीन वाचून मला वाटलं 'पल्प फिक्शन'च्या वाटेने जाणार की काय ? ;)
कपिल,
ReplyDeleteमित्रा, धन्यवाद! ;)
देवेन,
ReplyDeleteधन्यु रे! माझं मोठं ओझं उतरवलंस! :)
सचिन,
ReplyDeleteअरे हल्ली इथेच सगळा घोळ होतोय..म्हणून जे वाटलं ते लिहिलं..
तुला आवडलं..लय बरं वाटलं! :)
आभार रे!
रोहन,
ReplyDeleteमी विचारात होतो थोडं अजून डिटेलिंग करायच्या, पण मी हल्ली छोट्या कथा लिहायच्या प्रयत्नात असतो..कारण मी तीन-चार कथा मध्यंतरी लिहायला सुरूवात केली, आणि सगळ्या अर्ध्यातच आहेत, कारण मला त्यात खूप काही लिहायचंय आणि ते वाढतंच चाललंय त्याची मला काळजी वाटतेय.
असो..तू म्हणतोस ते बरोबरच असावं..
आणि हो रे, मला स्वातंत्र्यावर वेगळी पोस्ट लिहायची होती, कारण बाकी सगळं अनेकांनी अतिशय सुंदर पद्धतीनं लिहिलंच आहे.
खूप धन्यवाद रे!
(प्रतिक्रिया वाचून तुझ्या लक्षात आलंच असेल, मी लहान कथा लिहायचा का प्रयत्न करतोय ते! ;) )
mynac,
ReplyDeleteखूप धन्यवाद रे! तुझ्या माझ्याकडून एव्हढ्या अपेक्षा आहेत, हे वाचूनच बरं वाटलं..
बाकी, ही कथा वाचून पळून नको जाऊस..मी ह्याहून बरं काहीतरी टाकीनच लवकर अशी मला आशा आहे (कथेचा कीडा अधूनमधून वळवळतो).. ;)
तन्वीताई,
ReplyDeleteअगं आपणच कथा लिहितो, तेव्हा आपण त्या पात्रांशी आणि ते करणार असलेल्या/करत असलेल्या क्रियांशी इतके एकरूप होऊन जातो, की त्यांची कुठलीही कृती जशी आपण पाहतो, तशी कुणीच पाहू शकत नाही. त्यामुळे मला हेच लक्षात आलं नाही, की मी लिहिलेल्या वाक्याचा जसा अर्थ मला लागतो, तसा कुठल्याही त्रयस्थाला वेगळाच लागू शकतो.
मग अलताई म्हणाली आणि डोक्यात प्रकाश पडला. :)
सविताताई,
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद!
हेरंबा,
ReplyDeleteओपन एन्ड्सचं फॅसिनेशन कदाचित किएस्लोव्स्कीमुळे आलेलं आहे मला. किएस्लोव्स्कीचाच 'थ्री कलर्स - ब्ल्यू' पाहिला होता ना, तेव्हाच स्वातंत्र्यावर असं काहीतरी लिहावंसं वाटलं होतं (हे माझं वाक्य म्हणजे, देवानं जेव्हा पाऊस बनवलेला पाहिला, तेव्हाच मला हे पाणी जमिनीवर ओतायची स्फूर्ती आली, असं म्हणण्यासारखं आहे, तरीही..)
बाकी, नाकातून रक्त हा सीन मी 'पल्प फिक्शन'चाच घेतला. ते माझं 'होमेज' होतं टॅरँटीनोला .. :) (नाहीतर काय घेतल्यानं काय होतं, ते मज पामराला कसं ठाऊक असणार!)
hadacha lekhakh ahes ! chhaan lihilis katha !!
ReplyDeleteछान बाबा.. संदेशासह कथा.. आवडली.
ReplyDeleteमला मुख्यतः दोन सिनेमे आठवले हे वाचून
थोडंफार 'क्रॅमर वर्सेस क्रॅमर' ही विक्रम समीना कथा.. अभयची कथा 'आमीर'सारखी..
नितूभाऊ,
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत रे!
तुला माझं लेखन आवडलं आणि तू आवर्जून सांगितलंस..खूप बरं वाटलं!
असाच भेट देत राहा!
आनंद,
ReplyDeleteअरे खरं आहे तू म्हणतोस ते..
काही संदर्भ असतील, अजाणतेपणी आलेले. कारण गेल्या काही दिवसांत ह्या दोन सिनेमांशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध आला होता.
बाकी, वर म्हटलं तशागत किएस्लोव्स्की ही मूळ प्रेरणा! :)
उत्तम लेख. ! सुंदर संदेश दिला आहे. पण मला वाटते, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय याचे मर्म कळणार नाही.
ReplyDeleteअभिजीत,
ReplyDeleteधन्यवाद रे...
खरंच अनुभवाशिवाय कळायचं नाही!
क्या बात है! विद्याधर भिसे, तुमच्यात talent आहे बुवा... :-)
ReplyDeleteसंकेतभाई,
ReplyDeleteसगळी उत्तरं उशीराने देतोय तुला...पण हपिसात काम अचानक फार वाढलंय. आणि तुझ्या कॉमेंटचा पाऊश पाहून मी भारावून गेलोय एकदम!
खूप धन्यवाद रे!
वाहव्वा... देश आणि व्यक्ती स्वातंत्र्याची छान गुंफण घातलिये... एकूण संदेश पुरेप्पुर आणि हवा तो परिणाम साधत पोचला...
ReplyDeleteसौरभ,
ReplyDeleteतुझ्यापर्यंत संदेश पोचला, हे वाचून बरं वाटलं!
धन्यवाद रे!