8/19/2010

कालछिद्र -१

ही एक कथा आहे. पण एक मिनिट, पळू नका. नेहमीसारखी पकवापकवी होऊ नये असा मी प्रयत्न करतोय. ह्यानंतर मी किमान महिनाभर तरी कथा टाकणार नाही. आज एक डाव माफी द्या! सहन करा!

हे सगळं ५ वर्षांपूर्वी सुरू झालं. मी माझं साधंसं सरळमार्गी, मध्यमवर्गीय आयुष्य जगत होतो. एक छोटीशी नोकरी, एक छोटंसं घर, घरात आई-वडिल आणि मी. सुबत्ता नसली तरी शांतता होती. त्या दिवशी झालं असं. रात्रीची वेळ होती. दमून भागून आलो होतो. जेवण वगैरे उरकलं आणि घराच्या गॅलरीत शांतपणे पेपर वाचत बसलो होतो. आभाळ भरून आलं होतं. अचानक ढग कडाडायला लागले. विजा चमकायला लागल्या. आणि काही समजायच्या आत एक वीज माझ्यावर पडली. एकदम प्रकाशाचा मोठा लोळ उठल्यागत वाटलं. डोळे दिपून गेले. आपण चितेवर बसलो आहोत असं वाटलं आणि पुढचं काही आठवत नाही. आई-बाबा सांगतात की मी फ्रीज झाल्यागत पडलो होतो. आता एव्हढ्या उष्ण वीजेनं मी फ्रीज कसा झालो मला ठाऊक नाही, पण झालो असेन.

तर त्या वीजेतून मी वाचलो. कसा वाचलो, ते मला ठाऊक नाही. पण खरी गोष्ट पुढेच आहे. तेव्हापासून एक विचित्र गोष्ट सुरू झाली. आणि ती मला कळली ती अशी.

एक दिवस मी हॉस्पिटलमध्येच पेपर वाचत बसलो होतो. पेपरात राहुल गांधींनी कशी एका दलिताच्या घरी रात्र घालवली. किती कामं केली, अशी बातमी होती. ती वाचता वाचता अचानक माझं डोकं भिरभिरायला लागलं. मला अचानक खूप तहान लागल्यासारखं झालं. मी पाणी घेण्यासाठी हात बाजूला करणार एव्हढ्यात हातातलं त्राण गेल्यागत वाटायला लागलं. आणि मी एकदम एका पर्णकुटीसमोर उभा असल्याचा मला साक्षात्कार झाला. पर्णकुटीच्या आजूबाजूला अनेकानेक सुरक्षारक्षक उभे होते. मी एकदम सावध झालो. एव्हढ्यात त्यातला एकजण माझ्या दिशेनंच येत असल्याचा मला भास झाला. मी चटकन आजूबाजूच्या किर्र अंधाराचा फायदा घेतला. मला कळेना, की आपण इथे काय करतोय. डोकं काम करेनासं झालं होतं. मी लपत छपत कसातरी त्या पर्णकुटीच्या मागच्या बाजूला पोचलो. तिथे एक छोटीशी खिडकी होती आणि त्यातून मिणमिणता प्रकाश येत होता. मी हळूवार पावलं टाकत टाकत खिडकीपर्यंत पोचलो आणि आतलं दृश्य पाहून त्या मिणमिणत्या प्रकाशातही माझे डोळे दिपून गेले. राहुल गांधी कंदिलाच्या प्रकाशात जेवत होते. ती माऊली आपल्या पोरांबरोबरच कोरडं-ओलं जे काही होतं, ते त्यांना घालत होती. ते ही मोठ्या आनंदाने ते खात होते. मी मनाशीच म्हटलं, आपण काय समजत होतो राहुलजींना. चुकलंच आपलं.

मग मी बराच इथे तिथे फिरलो, पण मला अंदाजच येईना मी कुठेय. शेवटी कंटाळून पुन्हा पर्णकुटीजवळ आलो आणि खिडकीतून डोकावलो. कंदिलाचा उजेड थोडा कमी केला होता आणि राहुलजी इतरांबरोबरच गोधडीवर झोपले होते. शांत, लहान मुलासारखे. माझे डोळे भरून येताहेत वाटेस्तोवर कुणीतरी माझा दंड धरल्याची मला जाणीव झाली आणि मी एकदम भानावर आलो. आई माझ्या दंडाला धरून मला हलवत होती. मी माझ्या हॉस्पिटलच्या खाटेवर होतो. माझ्यासमोर पेपर पडला होता.

"काय झालं रे?"

"कुठे काय?"

नाही, ते स्वप्न नव्हतं. मलाही आधी तसंच वाटलं होतं. पण मग मी तो प्रयोग दुसर्‍या दिवशी लगेच पुन्हा केला. ह्यावेळी मी मंत्रीमंडळाच्या बैठकीचा रिपोर्ट वाचत होतो. मी आपोआप मंत्रालयात बैठकीच्या सभागृहात पोहोचलो. अतिशय सामंजस्यानं जनहिताचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. साधक-बाधक चर्चा होत होती. योग्य ते निर्णय सार्वमतानं घेतले जात होते. एव्हढंच काय तर मंत्र्यांनी नाष्टाही केला नाही हो. तसाच पडून राहिला बैठक संपल्यावर. मी पडद्याच्या मागे उभा राहून सगळं पाहत होतो. मंत्री कलटल्यावर मी राहिलेल्या नाष्ट्यातले दोन वडेही हाणले. मग सभागृहातून बाहेर पडायचा प्रयत्न केला. पण मी बाहेर पडूच शकत नव्हतो. मला कळेना. मला सभागृहाचा दरवाजा दिसत होता. तिकडूनच सगळ्यांना बाहेर जातानाही पाहिलं होतं मी. पण माझ्यासाठी मात्र ती एक भिंत झाली होती. एखाद्या भित्तीचित्रासारखी! मग माझ्या लक्षात आलं. माझी बातमी फक्त बैठकीची आहे. मग मी टंंगळमंगळ करत बसलो. दोन वडे अजून हाणले. कुणीतरी उठवायची वाट बघत बसलो. शेवटी एकदाचं नर्सनं हलवलं आणि मी बातमीतून बाहेर आलो.

आता कन्फर्म झालं होतं की ते स्वप्न नव्हतं. एक विचित्र थकवा जाणवत होता. आदल्या दिवशीही असंच झालं होतं. असं वाटत होतं जणू माझ्या आत्म्याला कुणीतरी शरीरातून खेचून नेतं. मी वेड्यासारखा झोपलो. तब्बल १४ तास सलग. काहीतरी घोळ होता खास. तिसर्‍या दिवशी मी आराम करायचं ठरवलं. माझ्या विचित्र झोपण्याने बावचळलेल्या डॉक्टरांनी मला अजून थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवशीही मी पेपरापासून दूरच राहिलो. मला क्षणभर असंही वाटून गेलं की हा एखादा मानसिक आजार तर नाहीये! पण मग मन कसंतरी शांत केलं. पण पाचव्या दिवशी मन स्वस्थ बसू देईना. सकाळचा नाष्टा उरकल्यावरची औषधं झाली, की दुपारपर्यंत कुणी येत नाही, तेव्हाच मी धडधडत्या छातीनं पेपर हातात घेतला.

मग लक्षात आलं की मी पुरवणी उचललीय. मी एका घरामध्ये बसलो होतो. विचित्र वाटत होतं. घरामध्ये कुणीच नव्हतं. असं कसं होईल, हा मी विचार करत होतो. मी नक्कीच कुणाच्यातरी अनुभवांचा लेख वाचायला घेतला होता. तेव्हढ्यात मला काही वेगवेगळे आवाज ऐकू आले. ते घराच्या बाहेरून येत होते. मी आवाजाच्या दिशेनं गेलो तर घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि बाहेर एक नवरा-बायको एक कावळ्याला बुंदीचा लाडू खायला घालत होते. माझा क्षणभर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो कावळा चक्क एखाद्या लहान बाळाच्या आकाराएव्हढा मोठा होता. मी डोळे चोळले आणि दरवाज्यातून बाहेर पडून अंगणात आलो, तर एक २०-२५ वर्षांचा तरूण व्हिडिओ कॅमेरानं त्या सोहळ्याचं शूटिंग करत होता. मी सुन्न झालो होतो. ते नवरा-बायको 'घे लाडू, लाडू! घे ना!' असं काहीतरी असंबद्ध बरळत होते. एव्हढ्यात तो शूटिंग करणारा मुलगा म्हणाला, "मामी, तुमचा हा लाडू कावळा भारी बरं का?" मला मूर्च्छना येते की काय असं वाटायला लागलं. त्या कावळ्याच्या समोरच एक पाण्याचा मोठा वाडगा भरून ठेवला होता, मी काही विचार न करता धावत धावत तिथे गेलो, आणि तो वाडगा उचलून तोंडावर पाणी मारलं. ह्या धक्क्यानं लाडू कावळ्यालाच मूर्च्छना आली, त्या तरूणाचा व्हिडिओकॅमेरा जमिनीवर पडला आणि नवरा-बायको हातात लाडू घेऊन अविश्वासाने एकदा मूर्च्छित कावळ्याकडे आणि एकदा माझ्याकडे पाहत होते. तो तरूण 'माझा अमेरिकन व्हिडिओ कॅमेरा पडला' असं काहीसं पुटपुटत होता. आता मात्र मी टेन्शनमध्ये आलो. मी लेखातला घटनाक्रम बदलला होता. काहीतरी लोचा होऊ शकला असता. पण नशीबानं एक नर्स मला हलवायला आली आणि मी परतलो. मी पूर्ण भिजलो होतो. खोलीभर पाणी झालं होतं. म्हणूनच अवेळी नर्स बघायला आली होती. मला खूपच अशक्तपणा आला होता. मी आडवा पडलो, पण विचारचक्र फारच जोरात सुरू झालं होतं.

हे सगळं काय होतं? एक काळाला पडलेलं छिद्र, जे माझ्या मेंदूशी आणि आत्म्याशी त्या वीजेनं जोडलं गेलं होतं? की नुसतेच माझ्या मनाचे खेळ?

क्रमशः (हा फालतूपणा आहे, गोष्टीत क्रमशः टाकण्यासारखं काहीही नाहीये. पण खूप रात्र झालीय, मला झोपणं भाग आहे. त्यामुळे मन मारून मी क्रमशः करतोय.)

भाग - २

40 comments:

  1. क्रमशः ??? हा खरच फालतूपणा आहे बाबा... अरे काय कुठून सुचते हे??? आणि तू दिवसभर मिटिंगमध्ये असतोस तेंव्हा हे असे उद्योग करतोस ना!!! लाडूकावळ्या बरोबर फिरायला जातोस.. राहूल गांधीबरोबर वडे हाणतोस... बझ वरून गायब असतोस ... :D

    ReplyDelete
  2. बाबा, क्रमशः ची काहीच गरज नाही. तू असाच कालछिद्रातून रोज फिरून येत जा आणि दर आठवड्याला आम्हाला बातम्या देत जा.

    खास विनंती : बाबा, मला ना कतरिना कैफ जाम आवडते रे. तिच्याबद्दलच्या बातम्या वाचून तिच्या घरून फिरून ये ना रे.

    ReplyDelete
  3. विभी,तुझ काही खरे नाही रे..बरा आहेस नं?काय सुचतय तुला..बासुंदीचा परीणाम एवढा होईल असे वाटले नव्हते...आणि हे क्रमशःचा मात्र मी निषेध करतेय...>>>>रोहन,आजकाल तर विभी जास्तीतजास्त बझ्झ वर असतो..जाउन बघुन ये...

    ReplyDelete
  4. बाबा,
    राहुल गांधी, मंत्रिमंडळ इंटरेस्टींग वाटत होतं की.. मधेच मुपीत का शिरलास?

    ReplyDelete
  5. छिद्रान्वेशी कुठचा,
    लब्बाsssssड!!!
    :)

    ReplyDelete
  6. भंजाळलेय मी. :D

    ही अशी केमिकल लोचा... स्वप्ने बघत, शालजोडीतले शेलके शेलके फटके.... काय चाललेय तरी काय तुझे? आणि हो, हेरंब म्हणतोय तसेच म्हणते.... रात्र होता होता मधेच मुपीत कशाला घुसतोयस तू???? :P

    विभी, मला न देता बासुंदी हाणलीस तू..... :(

    ReplyDelete
  7. माउ ताइ....लवकरात लवकर याच लग्न उरकुन टाक....नाही तर अजुन काय काय वाचायला लागणार आहे देव जाणो.

    >> माउ ताइ... ही पोस्ट वाचल्यावर तुला त्या बझवरील आमच म्हणण आता पटलचं असेल ना?? ;)
    (विभि हलके घेणे)

    >> अरे तुला, फ़िरुन फ़िरुन पुन्हा भोपळे चौक सारख...प्रत्येक गोष्टीत मुपी ला आणावच लागत का??? मुपीच व्यसन लागलय...आवरा रे याला आवरा..

    ReplyDelete
  8. मनमौजी....कालच एक मुलगी पाहिली आहे विभी करता....आता फोटो मेलच करत होती...तुम्ही फक्त अक्षता घेउन उभे रहा..ह्या मौसमात विभीचे दोनाचे चार करायचेच...[:P]

    ReplyDelete
  9. ऐं आता कैपण का?

    ReplyDelete
  10. मला तर आवडलं रे... वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानावर चक्कर मार... अजुन पेज थ्री, खेळीयाड, आंतरराष्ट्रीय आणि अर्थ राहीलेत ;)

    >> पण नशीबानं एक नर्स मला हलवायला आली आणि मी परतलो. मी पूर्ण भिजलो होतो. खोलीभर पाणी झालं होतं.

    लय भारी श्लेष

    ReplyDelete
  11. माऊताई सहीये... डिसेंबरात उरकून टाकू याचं...
    विभ्या अभिनंदन रे...

    ReplyDelete
  12. अशक्य भार्री..!
    पुढच्या वेळी विश्वसंचार किंवा सिनेतरंग वाचायला घे आणि सचिनची विच्छा पूरी कर.
    आणि..

    क्रमश:

    (उर्वरीत कमेंट पुढच्या भागात)

    ReplyDelete
  13. हे हे... मस्तच...आणि "नेहमीसारखी पकवापकवी...???" मला तर बुवा तुझ्या पोस्ट्स नेहमीच Interesting वाटतात.
    Btw, विभि दादा चे लग्न...? यीप्पी... सहीये...!!! मी येणार हां...विभि दादा ने बोलावले नाही तरी....!!! ;-) लग्न भारतातच करणार न पण... ??? ( अजुन कशात काही नाही आणि माझे हवेत इमले बांधने सुरु... :P ;)...)

    ReplyDelete
  14. हम्मम्मम्म....
    संध्यानंद वाचणार का?

    ReplyDelete
  15. हेरंब said...
    बाबा,राहुल गांधी, मंत्रिमंडळ इंटरेस्टींग वाटत होतं की.. मधेच मुपीत का शिरलास? +1

    Tujhyavar MUPIcha jastach parinam jhalay bar ka ;)

    baki bhari jamalay he :)

    ReplyDelete
  16. भंजाळलेय.. हा शब्द मी कैक वर्षांनी ऐकतोय .. :D

    काही वर्षांपूर्वी एका शोर्टफिल्म बद्दल ऐकले होते. त्यात कन्सेप्ट असा होता की पेपरच्या पहिल्या पानावर असलेला नायकाचा फोटो आणि शेवटच्या पानावरचा नायिकेचा फोटो एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मधली सर्व पाने पार करत एकमेकांना भेटायला निघतात.. त्यात त्यांना विविध बातम्या मधल्या विविध लोकांना पार करत एकमेकांपर्यंत पोचायचे असते.... भारीच..

    हा असे काहीतरी पेपर वाचतो आणि नको तिकडे शिरतो.. माझी कुठलीही न्यूज मी ह्याला देणार नाही आहे :P

    ReplyDelete
  17. माउ ताइ आम्ही तर केव्हाचं तयार आहोत....तु फ़क्त लवकरात लवकर मुलगी फ़ायनल कर...का रे आप बरोबर आहे ना???

    ReplyDelete
  18. Anonymous4:28 AM

    हा लाडूकावळा मुक्तपीठवरचा का हो?

    ReplyDelete
  19. पहिली २ स्वप्ने(??) वाचून जरा घाबरलो होतो मी पण "लाडूकावळा" बघून तू नॉर्मलला आल्याचे कळले. पुध्याच्या भागांची वाट बघतोय.

    ReplyDelete
  20. विभी आवर रे सावर स्वत:ला... हे सगळं वाचलं आणि तुझी पहिली कथा आठवली...त्यातही पहिल्या दिवशी २/३ वेळा अख्खी पोस्ट वाचूनही मी पांढरे निशाण लावले होते आजही तसेच काहीसे...

    मात्र दुसऱ्या दिवशीचा पोस्ट (त्याच कथेचा उर्वरीत भाग) वाचून तुला सॉर्री म्हटलं होतं तसचं करायला लावणार असशील तर ठीक आहे नाहितर....

    तू मुपीचा नाद सोड बघू आधि...

    जाता जाता... कथानकात चमक आहे हे निश्चित... की त्या विजेच्या उजेडाने डोळे दिपताहेत आमचेही :)

    टाक पटकन पुढचा भाग... वाट पहातेय!!!

    ReplyDelete
  21. रोहना,
    अरे दिवसभराच्या मीटिंग्जमुळेच बहुधा डोक्यावर परिणाम होतोय! :D
    आणि बझवर जमेल तेव्हढा वेळ येऊन जातो बरं मी.. तिथूनदेखील अनेक कल्पना मिळतात... :P

    ReplyDelete
  22. अरे सचिन,
    मी फिरत राहीन रे वेगवेगळ्या ठिकाणी, पण माझ्यावर वीज नाही पडलीय रे आणि ह्या पात्राला फिरवायचं तर, माझ्या प्रॉडक्शनची एक सिरीयल असायला हवी ;)
    बाकी, कतरिनाचं बघू कितपत जमतंय ते :)

    ReplyDelete
  23. माऊताई,
    मी एकदम भलाचंगा आहे... तुला तर ठाऊकच आहे ना! ;)
    बासुंदी अंगावर आली हे खरं असलं तरी डोक्यापर्यंत नाही पोचली, ती खायला पेशल मी तुझ्याकडे येणारे!

    ReplyDelete
  24. हेरंबा,
    अरे कारण होतं...ते काय ते कळेलच आज तुला!
    कॉमिक रिलीफ हा ही एक पैलू आणि मुपीप्रेम हा दुसरा ;)

    ReplyDelete
  25. नॅकोबा,
    कसले जबरा शब्द टाकताय राव..
    छिद्रान्वेषी.. कित्येक दिवसांनी ऐकला शब्द!
    बाकी...
    संध्यानंद आपला बी फेव्हरेट बरं का! ;)

    ReplyDelete
  26. श्रीताई,
    >>भंजाळलेय.. हा शब्द मी कैक वर्षांनी ऐकतोय .. +१
    अगं ताई..ती इष्टोरीच अशी सुचत गेली, मुपी आपोआपच कथेचा भाग बनलं :)
    मग उतारा हवा ना...म्हणून बासुंदी :D
    तू येईपर्यंत समद्यांनी उडवून टाकली! :(

    ReplyDelete
  27. मनमौजीदादा(हा मैथिलीचा शब्द आहे),
    आम्हा सुखी जीवांना दुःखी करायचा विडा तुम्ही का उचललाय ;)
    आणि त्या मुपीनं सगळ्यांचं काय घोडं मारलंय राव.. बिचारं मुपी! :(

    ReplyDelete
  28. माऊताई,
    अगं काय हे! तू पण! :(
    गरीब बिचार्‍या मला, सगळे टपले छळण्याला!

    ReplyDelete
  29. सागर,
    स्टोरीची थीम कैच्याकै वरून प्रेरित आहे.. ;)

    ReplyDelete
  30. आनंद,
    आ व रा!!!!!

    ReplyDelete
  31. मीनल,
    तुमच्या सर्वांच्या फर्माईशी ऐकून मी भंजाळलोय... ;)
    बाकी...
    क्रमशः आज संपवतोय!

    ReplyDelete
  32. मैथिली,
    तूच फक्त आधार दिलास बघ(कथा आवडली सांगून). बाकी इथल्या चर्चा बघून माझं अवसानच गळालंय!

    ReplyDelete
  33. मकरंद,
    ब्लॉगवर स्वागत!
    प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार! असेच भेट देत राहा!

    ReplyDelete
  34. विक्रम,
    हेरंबला सांगितलं तसंच, एक कारणही होतं आणि कॉमिक रिलीफ, तसेच निखळ प्रेम हे सगळं कारणीभूत होतं... ;)
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  35. मनमौजीदादा,

    आ व रा!!

    ReplyDelete
  36. आल्हाद,
    हो रे भाऊ... मुपीवरचाच... :)

    ReplyDelete
  37. अभिजीत,
    :D
    टाकतोय आजच पुढचा भाग!

    ReplyDelete
  38. रोहना,
    त्या शॉर्टफिल्मबद्दल ऐकलं नाही रे कधी!
    मिळेल का कुठे...जबरा वाटतेय... ;)

    ReplyDelete
  39. तन्वीताई,
    मला हीच काळजी आहे, उर्वरित भाग पाहून सगळ्यांनी मला 'आवर रे' म्हणू नये! ;)
    टाकतोय आत्ताच दुसरा आणि अंतिम भाग...!!

    ReplyDelete