8/30/2010

आय लव्ह हेट स्टोरीज - उत्तरार्ध

पूर्वार्ध पासून पुढे

"पप्पा, तो आपला अकाऊंटंट आहे ना?" अनु वडिलांना ब्रेकफास्टच्या वेळी सांगत होती.
"कोण?"
"तो सिटी ऑफिसला बसतो ना, सहा महिन्यांपूर्वी जॉईन झालाय."
"ओह्ह, उमेश! ब्राईट बॉय. दिवस-रात्र न बघता मान मोडून काम करतो, असा रिपोर्ट आलाय त्याचा. मुलगा मेहनती आहे, पुढे जाईल."
तिच्या चेहर्‍यावर हलकं स्मित आलं. "पप्पा, त्याला साहित्य वगैरेंमधलं खूप चांगलं कळतं."
क्षीरसागरांनी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं.
"म्हणजे पप्पा, मीच दोन तीनदा जबरदस्तीनं जाऊन त्याला भेटले. तसं त्याच्या मनातही काही नाहीये आणि अजून काही नाहीये."
"पण तुला एका मामुली अकाऊंटंटमध्ये एव्हढा का इंटरेस्ट!"
"पप्पा, तो खूप चांगला मुलगा आहे. बाकी काही नाहीये अजून."
"हे अजून अजून काय लावलंयस?"
"पप्पा, मी एव्हढंच म्हणतेय, की त्याला तुमच्या पब्लिकेशनमध्ये एडिटोरियल साईडला शिफ्ट करा. बघा काय कमाल करेल तो!"
क्षीरसागर विचारात पडले. पब्लिकेशन शहराबाहेर होतं. म्हणजे तो इथून दूर गेला असता. एका दगडात दोन पक्षी.
पण सगळेच फासे उलटे पडले. उमेशनं पब्लिकेशनमध्ये दोन वर्षं काढली आणि सगळी ट्रेड शिकून तो शहरात स्वतःचं पब्लिकेशन काढायला परतला. अनु तर त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. पण उमेशचं लक्ष फक्त स्वतःच्या पब्लिकेशनमध्येच होतं. पाच वर्षं राबून त्यानं स्वतःचं एक स्थान शहरात निर्माण केलं. एक अतिशय प्रथितयश असा तरूण उद्योगपती म्हणून तो उभ्या शहरात प्रसिद्ध होता. पण स्त्रियांबद्दल त्याची असलेली विलक्षण अलिप्तता हीदेखील त्याच्याबद्दलच्या चर्चेचा कायम विषय होती. क्षीरसागरांनाही त्याचं कौतुक होतं, त्यामुळेच अनुच्या इच्छेनुसार त्यांनी उमेशच्या आई-वडिलांशी आणि उमेशशी बोलणी करून त्यांचा साखरपुडा उरकला होता. अनु उमेशच्या होकारानंतर हवेतच होती. तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. उमेश आपल्यावर प्रेम करत नाही, ह्याची तिला जाणीव होती. त्यातून उच्च स्थानाचा आणि अति कामाचा उमेशवर वाईट परिणाम सुरू झाला होता. पण ह्या सगळ्यातून लग्नानंतर मार्ग निघेल हा अनुचा विश्वास होता.
आणि आज तो दिवस आला होता. आज उमेश कायमचा अनुचा होणार होता. अनु लग्न पूर्ण एन्जॉय करत होती. पण उमेशच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. तशात कमलेश घाबराघुबरा आला होता.
"काय झालं? सांगशील लवकर."
"अरे, गंधेची बायको..."
"हां तिचं काय?"
"अरे ती... ती नाहीये रे..."
"काय?" उमेशला घेरी यायचीच बाकी होती.
"काय बरळतोयस तू?"
"होय. मी स्वतः बघून आलो आत्ता. कन्फर्म करून आलोय. ती गंधेचीच बायको आहे, पण ती, ती नाहीये."
"अरे, पण हा सुरेश पुरुषोत्तम गंधेच आहे ना. लग्नपत्रिका मी स्वतः बघितली होती."
"होय रे. पण ती, ती नाहीये."
उमेश अवाक् झाला होता. थोडा वेळ तो विचारात गढला.
"मला गंधेच्या बायकोला भेटावं लागेल."
"वेडा झालायस काय?" कमलेश काळजीत पडला.
उमेशनं एक फोन फिरवला.
----
मिसेस गंधे अनोळखी घरात जसं चालावं तश्याच चालत नोकरानं दाखवलं, त्या खोलीत शिरल्या. आणि समोर उमेशला पाहून एकदम दचकल्या.
"दचकू नका. मीच खोटं बोलून इथे बोलावलं तुम्हाला. माझ्या होणार्‍या सासूनं नाही, मीच तो निरोप पाठवला, कारण मला काहीतरी फार महत्त्वाचं विचारायचंय तुम्हाला!"
"काय?" मिसेस गंधेंना काहीच कळत नव्हतं.
"तुमचं आणि मिस्टर गंधेंचं लग्न कधी झालं? आणि तुम्ही त्यांच्या पहिल्या पत्नी आहात का? आणि नाही, तर त्यांच्या पहिल्या पत्नीचं काय झालं?"
ह्या विचित्र प्रश्नांच्या सरबत्तीनं त्या गांगरून गेल्या. पण मग उमेशच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून त्यांच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला लागला.
"तुम्ही तेच उमेश का?"
----
उमेश लग्नमंडपात उभा होता. पण मिसेस गंधेंचे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. तो आतून पूर्ण कोलमडला होता. त्याला पुन्हा एकदा तीच असहायतेची भावना घेरत होती. त्याच्या डोक्याला मुंडावळ्या होत्या. शेजारी सजून अनुप्रिया बसली होती. स्वर्ग त्याच्या पायाशी येणार होता. कित्येक कॅमेरे त्याच्यावर रोखलेले होते. समोर हवनकुंड होतं. पण तो त्यात कसली आहुती देत होता.
अनुप्रियाला त्याचा अस्वस्थपणा जाणवत होता. कारण कळत नव्हतं. तो अजूनी चुळबुळत होता. मंत्रोच्चारण सुरू झालं होतं. आणि अचानक त्याला समोर मिस्टर आणि मिसेस गंधे दिसले. मिसेस गंधेंच्या चेहर्‍यावरचे भाव त्यानं बघितले मात्र तो मंडपातच उठून उभा राहिला. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. अनुप्रियाचे वडील, अनुप्रिया, त्याचे आई-वडिल सगळेच गडबडले. त्यानं मुंडावळ्या काढल्या आणि अनुप्रियाच्या डोळ्यांत बघितलं. तिच्या काय ते लक्षात आलं. त्यानं मुंडावळ्या तिच्या हातात ठेवल्या आणि तो सरळ दरवाजाच्या दिशेनं चालायला लागला. सगळेच गडबडले. एकच गोंधळ उडाला.
उमेश बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडला आणि त्यानं सर्वप्रथम आपला कोट काढून फेकला. चालता चालताच त्यानं टाय काढून टाकला आणि त्यानं रिक्षाला हात केला. रिक्षा एका छोट्याश्या बिल्डिंगसमोर थांबली. त्यानं रिक्षावाल्याला पाचशेची नोट काढून दिली आणि सुटे न घेताच तो बिल्डिंगमध्ये शिरला. त्यानं बाह्यांची बटणं सोडवली आणि बाह्या दुमडतच तळमजल्यावरच्या घराची बेल वाजवली. एक मिनिटानं दरवाजा उघडला.
तिची नजर उमेशवर पडली मात्र, ती स्तब्ध झाली. तिला कळतच नव्हतं काय चाललंय.
"आत तरी घेशील?"
आत शिरून तो सोफ्यावर बसला.
"तुला काय वाटलं, तू मला भीक देशील आणि मी घेईन?"
तिच्या चेहर्‍यावर फक्त प्रश्नचिन्ह होतं.
"तुझ्या बहिणीनं मला सगळं सांगितलं. तू कसा ऐनवेळी लग्नाला नकार दिलास आणि मला शोधायला निघालीस. ज्यामुळे तुझ्या चुलत बहिणीचं तडकाफडकी लग्न गंधेशी लावलं गेलं. पण मी शहर सोडून गेलो होतो, हे कळल्यावर तू माझ्या आई-बाबांना काहीही न सांगता परत आलीस. आणि महिन्याभराने मी शहरात परतलो, तेव्हा तुला कळलं नाही. पण जेव्हा मी खूप मोठा झालो, तेव्हा माझ्यावर हक्क न सांगण्याचा तू निर्णय घेतलास."
ती त्याच्या चेहर्‍याकडे पाहत होती. आणि तो तिच्या डोळ्यांत.
"सगळे निर्णय तूच घेतलेस ना. मला सोडायचाही, गंधेशी लग्न न करण्याचाही, आणि माझ्याकडे परत न येण्याचाही! स्वतःला तू समजतेस तरी कोण?" त्याच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या. तोच असहायपणा पुन्हा त्याला जाणवत होता. तो मनानं आज पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये बसला होता आणि आपल्या आयुष्याचे निर्णय आपोआप झालेले बघत होता. "मी तिथे तुझ्याबद्दलची हेट्रेड, तुझ्याबद्दलचा द्वेष मनात जागवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या द्वेषापोटी, त्या ईर्ष्येपोटी वर वर चढत होतो. पण आत्ता जाणवतंय, की तो द्वेष तुझ्याबद्दल नव्हता, तर माझ्याबद्दल होता. मी स्वतःचाच द्वेष करत होतो. आणि त्यापायीच मी पुढे जाण्यासाठी धावत होतो, जेणेकरून मला स्वतःकडे बघायला वेळच मिळू नये. धावता धावता मी सगळं मिळवलं, आलिशान गाडी, घर, महागडा मोबाईल, उंची कपडे, मोठ्या लोकांमध्ये ऊठबस, उंची लाईफस्टाईल. पण एव्हढं सगळं बाह्य आणि लौकिक यश मिळूनही मी सुखी नव्हतो, कायम एक बोचरी जाणीव मन कुरतडत राहायची. पूर्वी सहज कवितेतून मिळत असलेली शांतता त्या रेस्टॉरंटमधून तू उठून गेल्यापासून कधीही परत मिळाली नाही. आजही माझ्या लग्नात मी पाण्यासारखा पैसा खर्च करून तुला जळवायला निघालो होतो खरा, पण त्यात माझाच स्वतःबद्दलचा द्वेष कमी करण्याची धडपड जास्त होती. पण माझं हे यशही तूच भीकेत दिल्यासारखं वाटतंय मला. कारण ह्या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस. प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुझ्याचमुळे मी आज जसा आहे, तसा आहे."
तो जितकं बोलला, त्यानंच त्याला थकल्यासारखं वाटत होतं. तो नुसताच तिच्याकडे पाहत होता.
"तुला मी काय सांगू, त्या संध्याकाळी तुझे पाणावलेले डोळे मला तुझ्या हृदयाची शकलं दाखवत होते. ते पाहून माझं काळीज पिळवटत होतं. कॉलेजात तुझ्या आधारानं असलेली मी, तुलाच मोडताना पाहत होते. पण त्याहीपेक्षा दुःखदायक जाणीव ही होती, की तुझ्या मोडण्याचं कारण मीच होते. तुझ्या दाटलेला स्वर, तुझी विनवणी मला काहीच सहन होत नव्हतं. पण तुझ्यासमोर स्वतःला दुबळं दिसू द्यायचं नव्हतं मला.
रात्री गादीवर पडल्यावर मी खूप अस्वस्थ होते. तुझे डोळे माझा पाठलाग करत होते. तुझ्या मिठीतली ती आश्वासक ऊब आता मला पुन्हा कधीच मिळणार नाही, ही भयावह जाणीव अचानकच मला झाली आणि माझ्या मनानं बाजू बदलली. दुसरा अख्खा दिवस मी काय करू पेक्षा कसं करू ह्याच विचारात होते आणि शेवटी मी एका अविवेकी निर्णयामुळे दुसरा अविवेकी निर्णय घेतला. मी घरातून निघून गेले. माझ्या आई-वडिलांना, सगळ्या कुटुंबियांना अवघड स्थितीत ढकलून. पण वसुधानं तिच्या काका-काकूंची म्हणजे माझ्या आई-वडिलांची लाज राखली आणि माझ्याऐवजी लग्नाला उभी राहिली.
इकडे मी तुझ्या घरी पोचले, तर तू शहर सोडून गेल्याचं तुझ्या आई-वडिलांकडून कळलं. तू तुझ्या घरी आपल्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतंस, हे त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं. मी तर त्याक्षणी कोलमडूनच गेले होते. मी एकाच वेळी किती जीवांना भरकटवलं होतं आणि दुःखात टाकलं होतं. त्याच विमनस्क अवस्थेत माझ्या मैत्रिणीनं मला आधार दिला. आई-वडिलांनीही मोठ्या मनानं मला माफ केलं आणि मी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. तू शहरात परत आल्याचं मला कळलं नाही. आणि कदाचित तुझे आई-बाबा तुला माझ्या येण्याबद्दल सांगायला विसरले. आणि अचानक दोन-तीन वर्षांनी तुझं नाव दुमदुमायला लागलं. मी हर्षभरित झाले आणि सरळ तुझ्याकडेच यायला निघणार होते. पण मग विचार केला, की आज तू तिथे आहेस कारण मी तुझ्यासोबत नाहीये. कदाचित मीच तुझ्या आयुष्याला लागलेलं ग्रहण होते. आणि पुन्हा तेव्हा तुझ्याजवळ जाणं म्हणजे तुझ्या यशातला वाटा मागण्यासारखं वाटलं मला.
मी कायमसाठीच एकटी राहायचं एव्हाना ठरवलं होतं. मी केलेल्या चुकांची भरपाई म्हणून. दुःख खूप होतं, पण तुझ्या यशाकडे बघून मी खुश राहायचे. मग एक दिवस तुझ्या साखरपुड्याची बातमी वाचली आणि क्षणभर खूप दुःख झालं. ढसाढसा रडावंसं वाटत होतं. पण मग सावरलं. तू आनंदात असशील ह्या जाणीवेनंच मन शांत केलं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वसुधा तुझी लग्नपत्रिका मला दाखवत होती. तिला ठाऊक नव्हतं की तू तोच आहेस. पण मी ती पत्रिका डोळेभरून पाहिली. गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर सगळीकडे येत असलेल्या तुझ्या लग्नसराईच्या बातम्या पाहून मला किती आनंद होत होता आणि किती दुःख होत होतं, हे माझं मलाच कळत नाही."
"ही सगळी प्रसिद्धी फक्त तुला जळवण्यासाठी होती." तो खजील होत म्हणाला. "मला ह्या लग्नात फक्त एव्हढाच इंटरेस्ट होता."
तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. "मी माझ्या एका अविवेकी निर्णयामुळे किती जणांची आयुष्य बदलली आणि किती जणांना दुखावलं ह्याची काही गणतीच नाहीये. पण आज तू इथे आलास आणि हे सगळं बोललास. तुला खरं सांगू, मला प्रायाश्चित्त झाल्यासारखं वाटतंय."
ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती.
तो पुढे झाला, त्यानं तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या भाळी ओठ टेकवले.
"अश्रू बापुडे अथक वाहती,
शब्दांना न सुचे काही,
शब्द हरवले ओठांत कुठे,
अर्थ डोळ्यांवाटे वाही"
आज कित्येक वर्षांनंतर त्यानं पुन्हा काव्य केलं होतं.
"मला जे हवं होतं ते मिळालं उमेश! तू आलास आणि मला आणि तुला दोघांनाही हरवलेला तू सापडलास. आता मात्र तू परत जा!"
"काय?"
"होय. जी चूक आठ वर्षांपूर्वी मी केली, ती तू आज करू नकोस. तुझ्यावर प्रेम करणार्‍या इतक्या माणसांना दुखवू नकोस. मी तुझ्याशिवाय राहायला शिकलेय आणि ह्या आठवणी मला आयुष्यभर पुरतील. पण जी तिथे मंडपात तुझ्या जाण्यानं कोसळली असेल, तिला तुझी गरज आहे!"
उमेश तिच्या डोळ्यांत पाहत होता. ही तीच होती, जिनं प्रॅक्टिकल निर्णय घेऊन त्याला तोडलं होतं आणि इमोशनल निर्णय घेऊन स्वतःचं लग्न मोडलं होतं. तीच आज त्याला सुवर्णमध्य काढायला सांगत होती.
----
उमेश रिक्षातून बंगल्यासमोर उतरला. सगळे पाहुणे पांगले होते. उमेश शांतचित्तानं चालत बंगल्यात शिरला. दिवाणखान्यातच मंडप होता. मंडपाशेजारीच त्याचे आई-वडिल आणि अनुचे वडिल चिंताग्रस्त चेहर्‍याने बसले होते. उमेशकडे त्यांचं लक्ष गेलं पण उमेशची नजर अनुला शोधत होती. आणि त्याला अनु दिसली. ती अजूनी हवनकुंडासमोरच्या तिच्या जागेवर स्तब्ध बसली होती. तिचे वडिल त्याला काहीतरी बोलणार ह्याआधी तो बोलला.
"अनु..."
तिनं एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिचा विश्वासच बसत नव्हता. ती उठून उभी राहिली आणि धावतच त्याच्याजवळ गेली. ती त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत होती आणि तो मिश्किल हसत होता. आणि ती त्याला एकदम बिलगली. आजवर कधीही हे तिनं केलं नव्हतं. त्याच्या अंगावर एक गोड शिरशिरी आली. ती शांतता, ज्यासाठी तो इतके दिवस धडपडत होता, जिला क्षणभर फक्त स्पर्शून आल्यागत वाटायचं आत्ता त्याच्या चहूकडे असल्याचं त्याला जाणवत होतं.
"स्पर्शातूनही न कळे असे कुठले कोडे पडले,
श्वासातूनही न कळे असे कुठले काव्य हे स्फुरले,
स्पर्शा-श्वासापलिकडले हे बंध आज जे जुळले,
दोन जीवांचे स्वतंत्र असे अस्तित्वही मग नुरले."

--समाप्त--

अख्खी कथा एकत्र इ-बुक म्हणून इ-बुक्स पानावर वाचा!

39 comments:

 1. छान आहे ही कथा. धर्मेश दर्शनला पाठवून द्यायला पाहिजे म्हणजे तो धडकनच्या कथेत सुधारणा करून पुन्हा प्रदर्शित करू शकेल.

  ReplyDelete
 2. "स्पर्शातूनही न कळे असे कुठले कोडे पडले,
  श्वासातूनही न कळे असे कुठले काव्य हे स्फुरले,
  स्पर्शा-श्वासापलिकडले हे बंध आज जे जुळले,
  दोन जीवांचे स्वतंत्र असे अस्तित्वही मग नुरले."

  सुपर्ब सुपर्ब यार...मस्तच झालीय

  ReplyDelete
 3. फुल टू फिल्मी.. फक्त बझ्झवूड टच... सही कथा आहे...

  ReplyDelete
 4. बाबा, फुलटू फिल्मी !! मधेमधे ती छोटी काव्यं (मुद्दाम चारोळी म्हणत नाहीये) खूप छान पेरली आहेस !!

  ReplyDelete
 5. कथा भयानक आवडली. आया मस्ट से आय लव्ह धिस हेट स्टोरी. शेवट निराळा असल्याने एकदम छान वाटली. चारोळी खंग्री आहे.

  ReplyDelete
 6. विभीSSSSS...सोलिड,चाबुक....मी तुला म्हटले होते न..कथा नक्कीच सगळ्याना आवडेल...आणि त्यातली काव्य तर जास्तच आवडुन जातील..भन्नाट्च...मी टु अग्री विथ कांचन..आय लव थिस हेट स्टोरी......हिहिहि..

  ReplyDelete
 7. विभी, मस्तच रे. मला हे काव्य खूपच भावले. :)
  "अश्रू बापुडे अथक वाहती,
  शब्दांना न सुचे काही,
  शब्द हरवले ओठांत कुठे,
  अर्थ डोळ्यांवाटे वाही"

  ReplyDelete
 8. विभी क्या बात है! जबरदस्त कथा होती. कथेच्या शेवटाचा अंदाज २-३ वेळा बांधला आणि प्रत्येक वेळी तो चुकला. त्यामुळे अजुनच मजा आली. चारोळ्यापण छान आहेत. लघुकथेचं पुस्तक लिहिण्याबद्दल विचार कर भविष्यात. मी नक्की विकत घेइन ते पुस्तक. तु प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद देण्याएवजी आज मी या लिखाणाबद्दल तुला धन्यवाद देतो आहे. धन्यवाद!

  ReplyDelete
 9. क्या बात है बाबा!!

  >>> अश्रू बापुडे अथक वाहती,
  शब्दांना न सुचे काही,
  शब्द हरवले ओठांत कुठे,
  अर्थ डोळ्यांवाटे वाही".......

  मस्तच... लिहीत रहा रे!!

  ReplyDelete
 10. विभिदा सही झालीये कथा....शेवट पर्यंत उत्कंठा टिकून ठेवलीस .....

  "अश्रू बापुडे अथक वाहती,
  शब्दांना न सुचे काही,
  शब्द हरवले ओठांत कुठे,
  अर्थ डोळ्यांवाटे वाही"

  अतिशय सुंदर......

  ReplyDelete
 11. Anonymous12:42 AM

  बाबा..मस्त इस्टोरी आहे रे.एकदम सिनेमा पाहिल्यासारखाच भास झाला.सगळी दृश्य नजरेसमोर येत होती.शेवट मस्त केला आहेस.हॅपीज एन्डींग्ज पण ’ती’ च्या बद्दलची हळ हळ मागे सोडणारा...शेवटची चारोळी तर भारीच...

  ReplyDelete
 12. सही रे !!
  वेगळाच विषय, मस्त लिहिलंयस.

  ReplyDelete
 13. pharach chaan kathaa aahe. yaavar ek film kaadhaayalaa havi.

  ReplyDelete
 14. चेतन,
  खूप खूप धन्यवाद! सजेशन चांगलं आहे!

  ReplyDelete
 15. सुहासा,
  लय लय आभार रे भाऊ!

  ReplyDelete
 16. हाहा भारत,
  कहानी पूरी फिल्मी है!
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 17. हेरंबा,
  अरे काहीतरी नवा प्रयोग. ते मूळ कॅरॅक्टर मी प्यासातलं गुरूदत्तचं ढापलं होतं! ;)

  ReplyDelete
 18. कांचनताई,
  अगं शेवट बराचवेळ सुचत नव्हता! अचानकच गुंता सुटला... :)
  खूप खूप आभार!

  ReplyDelete
 19. माऊताई,
  तू एव्हढ्या विश्वासानं सांगितलं होतंस...म्हणूनच तर मी टाकली कथा... :)

  ReplyDelete
 20. श्रीताई,
  मी कित्येक वर्षांनी सेन्सिबल काव्य लिहायचा 'प्रयत्न' केला. :D तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घेतलात.. बरं वाटलं!
  खूप आभार गं!

  ReplyDelete
 21. अभिलाष,
  अरे तुझ्यासारखे वाचक आहेत, म्हणून आमच्यासारखे लिहू शकताहेत रे!
  एव्हढी दिलखुलास प्रतिक्रिया बघून तर लिहिण्याचा उत्साह खूपच वाढतो!
  खूप बरं वाटलं रे!

  ReplyDelete
 22. तन्वीताई,
  तुला आवडल्या माझ्या चारोळ्या :)
  आणि खीरसुद्धा ;)
  बरं वाटलं एकदम! :D

  ReplyDelete
 23. सागर,
  अरे जाम डोकेफोड झाली शेवटासाठी!
  तुम्हाला आवडला शेवट, त्यामुळे सगळे श्रम सार्थकी लागले! :)
  खूप आभार रे!

  ReplyDelete
 24. देवेन,
  अरे त्रिकोण आला, की एका पात्राला एक तर व्हिलन करावं लागतं किंवा सहानुभूती द्यावी लागते... मी परिस्थितीला व्हिलन बनवलं... ;)
  हॅपीज एन्डिंग्ज!
  आभार रे!

  ReplyDelete
 25. नॅकोबा,
  मंडळ लय आभारी आहे!

  ReplyDelete
 26. डॉ. करंजेकर,
  खूप खूप आभार!

  ReplyDelete
 27. बाबा, मस्त जमली आहे कथा. ट्विस्ट्स बेस्ट रे... फक्त दुसर्‍या भागात जरा डायलॉगबाजी जास्त झाली आहे.. तसं ते होणारच कारण मेरा फिल्मी दोस्त आहेस तू ;)

  विलंबाने प्रतिक्रियादिल्याबद्दल क्षमस्व :(

  ReplyDelete
 28. शेवट अनपेक्षित वाटला .. पण जरासा फिल्मीही.. म्हणजे प्रेम एकावर, लग्न दुस-याशी, त्याग वगैरे वगैरे.. :-)

  ReplyDelete
 29. आनंदा,
  अरे तसंच झालं असावं....
  पहिल्यांदाच अनोळखी प्रांतात पाय ठेवलेत..आणि इथला प्रत्यक्ष अनुभव शून्य, त्यामुळे सोर्स फक्त फिल्म्स! ;)

  ReplyDelete
 30. सविताताई,
  शेवट फिल्मी झालाय हे खरं..
  कदाचित शेवटचा प्रसंग मी वेगळ्या पद्धतीनं लिहू शकलो असतो (शेवट तोच ठेवून)..पण...इट्स ओके...
  पुढच्या वेळी!
  खूप आभार!

  ReplyDelete
 31. हॅपीज एन्डिंग्ज..:)
  पहिला भाग जास्त सरस वाटला. दोन्ही भागातल्या कविता जब्बर..
  पुढच्या कथेचा फ्लेवर कोणता आहे?
  (प्रतिक्रियेत रहस्यकथा किंवा गूढकथा म्हणून लिही..)

  ReplyDelete
 32. कथा छान वाटली. पण एकूणच भीती वाटली...हे त्यागावर आयुष्य काढायचं, ते देखील तिने सगळं सांगितल्यावर...माहित नाही हे सगळं सोंग गोष्टीतील सगळ्यांना किती काळ जमणार...आणि मग किती जणांचे त्यात जीव जाणार!

  ReplyDelete
 33. मीनल,
  एकंदरितच मिश्र प्रतिक्रिया येण्याची कल्पना मला आधीच आली होती. :)
  असल्या गुंतागुंतीच्या घटना लिहायच्या म्हणजे तेच टेन्शन..पण बरंय...सगळंच करून बघायचंय :D
  पुढचं मलाच ठाऊक नाही....माझ्यासाठीच एक गूढ आणि रहस्य आहे ;)
  (तरी तू सांगितलयंस म्हणून... 'गूढकथा' असं लिहितो :P)

  ReplyDelete
 34. अनघा,
  ब्लॉगवर स्वागत!
  होय, मलाही क्षणभर त्याच विचारानं अस्वस्थ वाटलं..पण खरोखरच्या आयुष्यात अशी काही विचित्र लग्न मी पाहिलीत.. आणि त्यातही काही अतिशय व्यवस्थित जपलेली नातीही!
  चालायचंच! शेवटी मानवी स्वभाव हे जगातलं सर्वात मोठं गूढ, सगळीकडेच आपले रंग दाखवतं!
  प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद!
  अश्याच भेट देत राहा!

  ReplyDelete
 35. विभ्या....लय भारी मित्रा...पहिला भाग तर जबर्‍या आहे...दुसरा चांगला आहे..तरीही पहिलाच जास्त आवडला...कविता सगळ्या उत्तम आहेत.

  (भाग १+२ अश्या दोन्ही प्रतिक्रिया इथेच देत आहे...वाचायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व...)

  ReplyDelete
 36. बाब्बाजानी... तुझी भिंत चिनच्या भिंतीपेक्षा अगडबंब आहे. कथा वाचुन एक मोठा टप्पा पार केल्यासारखा वाटतोय. बिनतोड लिखाण आहे. चारोळ्या... आहाहा... दिलखेच... अप्रतिम.
  अश्याच आशयाचा एक ईमेल कवितेच्या रुपात वाचण्यात आला होता. तोपण असाच दर्दी...
  बाकी भिंतीवरचा प्रवास चालू आहे... :) सुरेख... निव्वळ सुरेख...

  ReplyDelete
 37. सौरभ,
  धन्यवाद रे! खूप खूप धन्यवाद!
  :)

  ReplyDelete
 38. वा... बाबा. कथा मस्तच आहे. :) आवडली.. :)

  ReplyDelete
 39. रोहना,
  धन्यवाद रे!

  ReplyDelete