8/08/2010

स्वामी तिन्ही जगांचा..

परवा माऊताईबरोबर सहजच्या गप्पा मारताना आईला मुलासाठी किती काय काय करावं लागतं असा विषय निघाला. मी विचारात पडलो. आपण आईला किती गृहित धरतो (इथे आपण म्हणजे मी स्वतः आहे, ह्याची नोंद घ्यावी). किती म्हणजे कुठल्या हद्दीपर्यंत. विचार भिरभिरायला लागले होते, पण तेव्हढ्यात कलिग बोलवायला आला आणि नावेची दिशा बदलली. जोवर दिवस संपत आला, मी थकून गेलो होतो. मीटिंग रूममध्ये तेच तेच बोलून बोलून डोकं भणाणून गेलं होतं. अचानक माझा मोबाईल व्हायब्रेट व्हायला लागला. मी घड्याळाकडे बघितलं. ५.४५ झाले होते. मी नेहमी ५-५.१५ ला घरी फोन करतो. आता तीन वर्षं झालीत इथे, तरीसुद्धा मला ५ मिनिटं जरी उशीर झाला तरी आईचे तिथून फोन सुरू. मी थोडा वैतागूनच मनात विचार करायला लागलो, "काल सांगितलं होतं की आज मीटिंग आहे!" मी फोन उचलत नव्हतो, म्हटलं १५-२० मिनिटांत उरकेल मग निवांत करू फोन. पण एकदा वाजून थांबला नाही तो पुन्हा सुरू. शेवटी मी बाहेर पडलो, मोबाईलवरूनच फोन लावला, म्हटलं, "अगं आई, दम धर की थोडा. बोललो होतो ना काल. संपली मीटिंग की करतो ना निवांत." तिनं बरं म्हणून फोन ठेवला. मला ठाऊक होतं की आता नाही केला तरी चालणार होता, आईला आजच्या दिवसाची खात्री झाली होती की मी ठीक आहे. 'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी!'

त्यानंतर काल बीबीसीवर मी पाकिस्तानच्या पुरांची बातमी पाहत होतो. एक बाई गुडघाभर पाण्यातून चालत होती. कॅमेरा पहिल्यांदा मागून चालत होता. मग कॅमेरा पुढे गेला. तिच्या हातांमध्ये तिचं दोनेक वर्षांचं बाळ होतं. त्याच्या इवल्याश्या हाताला सलाईन लावलेलं होतं आणि त्या सलाईनची पिशवी त्या माऊलीनं हातात धरली होती. ती अथक रडत होती. बोलतानाही रडत होती. तिच्या बाळाला डायरिया झाला होता. तिला काही डॉक्टरांनी औषधं दिली होती आणि सलाईन दिलं होतं. पण पुढच्या इलाजासाठी हॉस्पिटललाच जावं लागेल असंही सांगितलं होतं. आता ती एकटीच हॉस्पिटल शोधत निघाली होती. बीबीसीवाल्यांनी तिची मदत केली की नाही, ते ठाऊक नाही, पण माझ्यासाठी ती पाकिस्तानी आहे हे सत्य क्षणभरासाठी बाजूला पडल्यागत वाटलं. त्या आईचा आपल्या मुलासाठी चाललेला जिवाचा आटापिटा पाहून क्षणभर काळीज हललं. पण मग बातमी बदलली.

मग दिवसभर बरंच काही केलं, वाचलं. पण विचार बदलत नव्हते. आई दोन आठवड्यापूर्वी १० दिवसांसाठी माझ्या एका मामेबहिणीकडे जाऊन आली. बाबा सांगत होते आईचं माहेरपण व्यवस्थित झालं तिथे. आईला खरंच छान आराम मिळाला. मग मी पुन्हा विचारात पडलो, की खरंच घरी आई किती राबत असते. मी सुट्टीवर गेलो की तर तिच्या लगबगीला उधाण येतं. तुला हे करून घालायचंय, तुला ते करून घालायचंय. मग जायच्या दिवशी तिला अचानक एखादी गोष्ट आठवते, जी राहून गेली. मग चुटपुटत बसते. दिवसभर काम करत राहते, पण तिला मदत नाही केली तर चालतं, फक्त , "आई किती दमलीस गं!" एव्हढं बोललेलंही पुरतं. पण आपण ते ही किती वेळा बोलतो. लहानपणापासून आजपर्यंतची एक क्विक रिकॅप आत्ता माझ्या डोळ्यासमोर येतेय. आनंदाचे क्षण, यशाचे क्षण, दुःखाचे क्षण, अपयशाचे क्षण; पण प्रत्येक वेळी आईच्या डोळ्यांत अश्रूच दिसताहेत मला. की मलाच धूसर दिसतंय सगळं!

आई नेहमी सांगते, लहान असताना, म्हणजे अगदी ४-५ वर्षांचा असताना तिनं मला एक गोष्ट सांगितली होती.

एक मुलगा त्याच्या आईचा फार लाडका असतो. तो मोठा होतो आणि लग्न करतो. पण त्याची बायको वाईट असते. एक दिवस ती त्याला त्याच्या आईचं काळीज घेऊन यायला सांगते. तो बर्‍याच विचारांती जातो आणि आईचं काळीज घेऊन परतीला निघतो. रस्त्यात त्याला ठेच लागून तो पडतो. तर आईच्या काळजातून आवाज येतो, "बाळा, लागलं तर नाही ना तुला?"

आई सांगते, त्या काहीच न कळण्याच्या वयात मी हमसून हमसून रडलो होतो. बराच वेळ रडत होतो. पण आता मोठा झालो ना. आता कळतं, की गोष्ट सिंबॉलिक आहे. त्यावेळेस निरागस असेन, आई हेच विश्व असतं त्या वयामध्ये. 'स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी' ह्या ओळींचे अर्थ तेव्हा जसे कळतात, तसे जग कळायला लागल्यावर कळेनासे होतात. मग आई मोठ्या विश्वाचा एक भाग बनून जाते. पण मग काही काही घटना दिसतात आणि पुन्हा जाणीव होत रहाते, की आपल्यासाठी आता आई मोठ्या विश्वाचा एक भाग असेल पण आईसाठी तिचं मूल हेच तिचं विश्व असतं, कायमसाठी!

आणि आपण आईला किती गृहित धरतो!
(ही पोस्ट माझ्या आईसाठी आहेच, पण सगळ्याच आईंसाठी आहे, आणि माझ्या सगळ्याच तायांसाठी ज्या आईसुद्धा आहेत. खासकरून माऊताई जिच्यामुळे मी विचारात पडलो.)

39 comments:

  1. विद्याधर,काय म्हणु तुला आता..ओळ न ओळ वाचताना डोळे पाणावले रे...खुप भावुक आणि हृदयस्पर्शी लिहीले आहेस...प्रेमस्वरुप आई,वात्सल्य सिंधु आई...हे खरे आहे नं..
    आपल्यासाठी आता आई मोठ्या विश्वाचा एक भाग असेल पण आईसाठी तिचं मूल हेच तिचं विश्व असतं, कायमसाठी!अगदी खरे आहे रे...

    खुप खुप आभार !!!

    आणि हो..आई ला आपण किती गृहित धरतो..ह्याची जाणिव होणे हे ही खुप झाले..

    ReplyDelete
  2. विभि मित्रा काय बोलू यावर..डोळे पाणावले रे :( :(

    आपल्यासाठी आता आई मोठ्या विश्वाचा एक भाग असेल पण आईसाठी तिचं मूल हेच तिचं विश्व असतं, कायमसाठी + १००००

    ReplyDelete
  3. विभि गेले 7 वर्ष मी बाहेर आहे शिकण्यासाठी पण 7 वर्षात एकाच गोष्ट कायम राहिली सकाळी बाबांचा फोन उठलास का?काय करतोयस म्हणून अन संध्याकाळी आईचा फोन झालं का रे जेवण?पोटभर जेवलास का?
    खरच आपण खूप गृहीत धरतो आईला

    ReplyDelete
  4. विभि, बाबा फारच छान लिहीलं आहेस. केवळ आईच नाहीरे.....पण अश्या कोणत्याही व्यक्तीला गृहीत धरता कामा नये की जी तुमच्यावर निर्व्याज प्रेम करते. वाचताना मनात कालवा कालव झाली.

    ReplyDelete
  5. बाबा रे... कशाला हळवा करतो आहेस??? कसे-बसे दिवस काढतोय इकडे... :| गेला आठवडाभर इतके काम होते की मी फारसा फोन करू शकतो नाही.. काल बोललो तेंव्हा जरा बरे वाटले... :)

    (स्वागत: आयला.. 'बाबा'ला फोन करायचा राहूनच गेला की.. हेहे)

    ReplyDelete
  6. बाबा, अगदी सेम सेम ५ मि. जरी उशीर झाला तरी लगेच फोन वाजायला चालू होतो.

    खरच रे,आई ला आपण किती गृहित धरत ना........

    ReplyDelete
  7. विभ्या...खुप हळव लिहल आहेस....कधी शक्य झाल तर सिंधुताइ सपकाळांना जरुर ऐक.

    ReplyDelete
  8. काय बोलू, मला घरापासून दूर राहुन आता ६ वर्ष झालीत पण आईच्या बोलण्यातील काळजी आणि माझ्याबद्दल जाणुन घेण्याची अधिरता ही तसूभरही कमी झाली नाहीये.... एव्हडं कळूनही मी...

    ReplyDelete
  9. http://anukshre.wordpress.com/2010/04/06/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%8a/ post vach

    ReplyDelete
  10. विभी, आज भल्या सकाळीच निघालेलो शोमूला आणायला ते रात्री दहाला परत आलो. आज घर भरलेयं. जेवणं झाली आणि नेटवर आले तर तुझी ही पोस्ट समोर.

    लेक घरात डोळ्यासमोर आहे या क्षणी तरी डोळ्यात पाणी आलं. आधीच मन हळवं झालंय त्यात तुझ्या या पोस्टने कढ उतू गेले.

    दुपारी मला पाहताच त्यानी मारलेली मीठी...

    परत येताना गाडीतूनच आईला ( माझ्या ) फोन केलेला... ती फोन ठेवतांना म्हणाली, " कधी भेटशील गं आता? लवकर या. मी वाट पाहतेयं. "

    एक डोळा हसतोयं लेक आलायं म्हणून तर एक डोळा रडतोय आईच्या आठवाने... आईचे मूल कितीही मोठे होवो तिच्यासाठी ते कायम तिचे विश्व असते... हेच खरं.

    ReplyDelete
  11. जगात फकत आईलाच गृहित धरतो आपण. मी एकटा रहात असतांना फोन वगैरे पण इतके कॉमन नव्हते, कधीतरी बोलणं व्हायचं...
    पण पत्र मात्र अगदी नियमीत असायचे.. :) एखादा आठवडा पत्र गेलं नाही की आई अस्वस्थ व्हायची. मग ऑफिस मध्ये फोन ! ट्रंक कॉल - पी पी ( परटीक्युलर पर्सन).. गेले ते दिवस. पण तू आठवण करून दिलीस.

    ReplyDelete
  12. विभी काय लिहू??? खरचं काही सुचत नाहिये... काकुंशी (तुझी आई) प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे माझं त्यामूळॆ तुमचं नातं ओळखीचं आहे ....

    ही पोस्ट मी मुलगी आणि ’आई’ दोन्ही रुपात वाचली... ईतके दिवस तुझी ताई असल्याचा अभिमान आहे सांगायचे ना... आज ईतकेच म्हणेन की माझा ईशान मोठा होऊन तुझ्यासारखा मुलगा व्हावा!! मग मी पण काकूंसारखीच मुलाबद्दल फोनवर बोलताना हळवी होत राहीन आणि त्या हळवेपणात एक अभिमान असेल की हे समजून घेणारा मुलगा देवाने मला दिलाय.... :)

    जियो!!!

    ReplyDelete
  13. बाबा, रडवलंस... !! :( :(

    अजून काही लिहीत नाही.. !!

    ReplyDelete
  14. आणि आपण आईला किती गृहित धरतो!

    +++1000000000

    चुक कळली... धन्यवाद..

    ReplyDelete
  15. प्रिय विद्याधर,
    फारच मस्त.खूप दिवसांनी चांगल वाचायला मिळाल.अगदी सहज फिरत फिरत इथ पर्यंत आलो होतो.भिंतीच्या पलीकडचे बघण्यासाठी,मी "फेवरिटचा" चष्मा लाऊन ठेवलाय.बघू ..

    धन्यवाद,पुन्हा भेटूच

    ReplyDelete
  16. काय बोलावे सुचत नाही

    ReplyDelete
  17. माऊताई,
    ह्या पोस्टवर पहिली प्रतिक्रिया तुझीच यावी, हा छानच योगायोग.
    तुझ्यामुळेच तर विचारांची साखळी सुरू झाली..तुझेच आभार मानायला हवेत..पण..मानणार नाही मी! हक्क आहे तो माझा! :)

    ReplyDelete
  18. सुहास,
    अरे आपल्या धावपळीत आपण कशाचाच विचार करत नाही रे...दोन क्षण थांबून विचार केला ना, तर कळायला लागतं की काय चुकतंय...
    कधी कधी आपोआपच जाणीव होते, कधीकधी एखादी घटना किंवा व्यक्ती कारणीभूत ठरते!

    ReplyDelete
  19. सागर,
    अरे 'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी!' आईची माया आणि वडलांची काळजी अशीच असते!

    ReplyDelete
  20. atishay sundar ! Aavndha gilatcha vachala mi he! "Aai mhanun koni aaias haak maari " yaa kavitechya oli aathavalya.
    Dnyanoba-rayana mhanunacha mauali mhanatata bara kaa? Asaach jivhala tyachya thayi hota.
    NY-USA

    ReplyDelete
  21. अलताई,
    धन्यवाद!
    >>केवळ आईच नाहीरे.....पण अश्या कोणत्याही व्यक्तीला गृहीत धरता कामा नये की जी तुमच्यावर निर्व्याज प्रेम करते
    अगदी खरं बघ ताई आणि आपण नेमकं तेच करतो...कारण समोरची व्यक्ति निरपेक्ष प्रेम करते!

    ReplyDelete
  22. रोहना,
    अरे माझी स्थिती बघ...मी अजून ४ महिने जाऊ शकणार नाहीये...स्काईपचा आधार आहे फक्त!
    बाकी...मी तुझ्या फोनची वाट पाहत होतो...आता, ह्या सप्ताहांताला पाहीन...;)

    ReplyDelete
  23. सचिन,
    अरे आईच्या जीवाला काय घोर लागतो, आणि आपण आपल्या कामांमध्ये बिझी असतो..आपल्याला पत्ताच नसतो..

    ReplyDelete
  24. योगेश,
    अरे अचानक साठलेलं सगळं बाहेर आलं रे!
    सिंधुताई सकपाळ? मला ठाऊक नाहीत रे!

    ReplyDelete
  25. आनंदा,
    आपली बंधनं तिलाही कळतच असतात..पण ती समजावू शकत नाही स्वतःला...कारण ती आई असते...!!!
    आणि आपण जगाच्या रहाटगाडग्याला बांधून ठेवल्यागत फिरत राहातो...

    ReplyDelete
  26. अनुजाताई,
    खूपच वेगळी पोस्ट आहे गं!

    ReplyDelete
  27. श्रीताई,
    अगं, दर सहा महिन्यांनी मुंबई एअरपोर्टवर थोड्याबहुत फरकाने तू सांगतेस तसाच सीन असतो!
    बाकी काय बोलू मी!

    ReplyDelete
  28. महेंद्रकाका,
    >>जगात फकत आईलाच गृहित धरतो आपण.
    हे अगदी खरं आहे...तिची निरपेक्ष माया असते ना! तिथे जगाचे सगळेच नियम कोलमडतात!

    ReplyDelete
  29. तन्वीताई,
    अगं तुला काय उत्तर लिहू मी!
    काल लिहिताना डोळे पाणावले होते, आज तुझी प्रतिक्रिया वाचताना..

    ReplyDelete
  30. हेरंबा,
    अचानकच जाणीव होते रे...अंधार्‍या रस्त्यावर चालताना वीज चमकावी आणि सगळा आसमंत उजळून जावा तसं!

    ReplyDelete
  31. आनंद,
    अरे चूक/बरोबर आई मुलाच्या नात्यात कधी नसतंच..
    आपल्याला जाणीव होणं महत्वाचं!

    ReplyDelete
  32. mynac,
    ब्लॉगवर स्वागत भाऊ!
    प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!!
    पुन्हा अवश्य भेट दे!

    ReplyDelete
  33. विक्रम,
    भावना पोचल्या भाऊ!

    ReplyDelete
  34. मैथिली,
    भावना पोचल्या गं तुझ्या!

    ReplyDelete
  35. पुरुषोत्तमजी,
    खरंय तुमचं...माझे बाबाही सांगतात...ज्ञानोबांना माऊली त्यांच्याठायी असलेल्या मातृवत मायेमुळेच म्हणतात!
    खूप खूप आभार!

    ReplyDelete
  36. Anonymous10:20 AM

    बाबा...अतिशय भावनात्मक पोस्ट...सात वर्षा आधी राजस्थानला होतो ते्व्हा आईबरोबर फ़ोनवर बोलतांना आपोआप डोळ्यात पाणी यायच ते आठवल लगेच...नशीबवान आहे मी, आई-बांबाबरोबरच राहतो ...

    ReplyDelete
  37. देवेन..
    अरे खरंच नशीबवान आहेस..

    ReplyDelete
  38. पोस्टबद्द्ल काय लिहू?? एक चांगलं केलंस एका मुलाला आईबद्द्ल इतकं सगळं वाटू शकतं हे वाचुन बरं वाटलं..मला मुलगी नाही नं म्हणून..आणि एक मुलगी म्हणून जमेल तेवढं आईला समजून घ्यायचं असतं ते आपसूक होतं पण मुलंही अलमोस्ट तसा विचार करतील अशी आशा या पोस्टने आलीय....छानच लिहितोस तू....बरं झालं तुझा ब्लॉग वाचते ते....(अर्थात आधी म्हटलं तसं टैमप्लीज घेऊन)

    ReplyDelete
  39. अपर्णा,
    त्या टैमप्लीजच्या बाबतीत म्हणायचं तर माझंही बरेचदा होतंच.. ;)
    बाकी..खूप बरं वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचून..

    ReplyDelete