12/08/2010

चान्स पे डान्स

कुठेतरी वाचलं होतं, की यशस्वी माणूस तो असतो, जो कुठलीही स्थिती स्वतःला अनुकूल बनवून घेऊ शकतो. आणि गेल्या काही दिवसांत मला ह्याचा बरेचदा प्रत्यय येत होता, पण नजीकच्या काळात दोन प्रसंगांमध्ये मात्र प्रकर्षानं ह्या सत्याची जाणीव झाली.

'मुन्नी' नं बदनाम होताना झंडू बाम लावला तेव्हा झंडू बामवाले गपचूप बसून मजा बघत राहिले. मग एकदा मुन्नी पुरेशी बदनाम झाल्यावर कॉपीराईटची धमकी देऊन मलाईका अरोराला फुकटात ब्रँड ऍम्बॅसेडर (भूषण अग्रदूत) म्हणून करारबद्ध करून घेतलं. ही बातमी ऐकून खरंतर माझा झंडू बामबद्दलचा आदर द्विगुणितच झाला होता. पण आज एक अजून जबरा बातमी ऐकायला मिळाली आणि बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे झंडू बामबद्दलच्या आदराच्या रेषेशेजारी एक अजून मोठी रेषा ओढली गेली, बर्नी एक्लस्टनबद्दल.

बर्नी एक्लस्टन, हा ८० वर्षांचा गृहस्थ, फॉर्म्युला वन, अर्थात एफ-वन, ह्या जगातल्या सर्वांत महागड्या कार रेसिंग खेळांच्या कंपनीचा अध्यक्ष आणि सीईओ. तो गेल्या आठवड्यात आपल्या ऑफिसबाहेर पडून आपल्या गाडीत बसत असताना त्याच्यावर काही भामट्यांनी हल्ला केला आणि एक-दोन गुद्दे लगावून त्याच्या हातावरचं 'हुब्लो' ह्या लग्झरी घड्याळ कंपनीचं १७००० अमेरिकन डॉलर्स किंमतीचं (सुमारे ७ लाख भारतीय रुपये) मनगटी घड्याळ हिसकावून पळून गेले. लगावलेल्या गुद्द्यांमुळे बर्नीचा एक डोळा काळा-निळा झाला आणि चेहर्‍यावर एखाद दोन छोट्या जखमाही आहेत. एकतर बर्नीचं वय ८०, त्यात असा मार बसलेला, आणि अशा स्थितीत त्याच्या बायकोनं त्याचा फोटो तिच्या कॅमेरात काढला. दोन दिवसांनंतर बर्नी हुब्लो कंपनीच्या सीईओ वगैरे लोकांबरोबर सहज बोलत होता, की तुमच्या घड्याळापायी मला मार पडला वगैरे. तेव्हा अचानक बर्नीला 'फ्लॅश ऑफ जिनियस' झाला. तो म्हणाला, "माझ्या बायकोच्या मोबाईलमध्ये माझा फोटो आहे. तो घ्या आणि त्याला हाय डेफिनेशन वगैरे बनवा आणि हवंतर तुमच्या जाहिरातीसाठी वापरा." झालं, 'हुब्लो' वाल्यांनी पडत्या फळाची आज्ञा घेत त्याचा फोटो घेतला आणि "'बघा, हुब्लो' घड्याळांसाठी लोक काय काय करतात?" अशा काहीशा अर्थाची एक टॅगलाईन बनवून जाहिरात बनवली आणि हल्ल्याच्या घटनेला आठवडा होण्याच्या आतच ती मासिकांमध्ये देखील झळकली.

ह्या 'हुब्लो' च्या सीईओची सीएनएन वाला मुलाखत घेत होता, तेव्हा 'हुब्लो' च्या सीईओनं काही पथप्रदर्शक वक्तव्यं केली. जसे, "आता आपण नव्या शतकात जगत आहोत, जिथे लग्झरी ही एक जीवनपद्धती आहे. लग्झरी ही आता केवळ चैन नसून गरज बनतेय." माझे डोळे खडाखड उघडत असतानाच, सीएनएन वाल्यानं प्रश्न केला, की अशा प्रकारे हल्ल्याला ग्लॅमराईज करणं योग्य आहे का? तेव्हा 'हुब्लो'चा सीईओ म्हणाला, "हिंसा ही निंदनीयच आहे आणि आम्ही आमच्या जाहिरातीतून हिंसेला कुठेही ग्लॅमराईज करत नाही आहोत. आज हिंसा किती वाढलीय वगैरे वगैरे." आणि प्रश्नाला साफ बगल देऊन त्यानं माझा त्याच्याबद्दलचा आदर अजून वाढवला.

त्यापुढे सीएनएन वाल्यानं विचारलं की तुम्ही बर्नी एक्लस्टनला रिप्लेसमेंट घड्याळ दिलंत का? तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. तो म्हणाला की, "आम्ही बर्नीला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा आम्ही रिकाम्या हातांनी तर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही एक छोटीशी भेट म्हणून एक घड्याळ घेऊन गेलोच होतो."

आता ह्यावर सीएनएन वाला जे म्हणाला तेच मी म्हणेन, "कधी आम्हालाही भेटायला या!"

34 comments:

  1. च्यायला खराखुरा चान्स पे डान्स आहे यार हा माणूस !!

    >> "कधी आम्हालाही भेटायला या!"

    नको रे बाबा. त्याचा तो तसला डोळा बघून मला असं म्हणवत नाहीये ;)

    ReplyDelete
  2. मस्त रे....या पूर्ण प्रकरणाला इतके कंगोरे आहेत की खूप काही शिकण्यासारख आहे त्यातून नाही का?? marketting , diplomacy, how to take advantage of something that sounds like a prblem... आणि असच काही
    एकदम आवडेश....

    ReplyDelete
  3. हे असले शाळेच्या पुस्तकात हव. तरच लोक चान्स पे डान्स करतील.

    ReplyDelete
  4. हे हे ..सही. खरच चान्स पे डान्स. आयडियाची कल्पना आवडली.. :)

    अवांतर - त्याला खूपच जबरी मारला होता..काय त्याच्या चेहर्‍याचा नक्षाच बिघडवलाय ... :)

    ReplyDelete
  5. पण त्यासाठी आधी तुमच्याकडे महागड्या गोष्टी हव्यात, तुम्ही प्रसिद्ध असायला हवं आणि तुम्हाला मारही पडायला हवा .... फारच महागाचा सौदा वाटतोय!

    ReplyDelete
  6. सहिच... भारी कल्पना आहे...

    ReplyDelete
  7. आयला हा भारी आहे रे चान्स पे डान्स...सहीच लिहिलेस.

    ReplyDelete
  8. सुरक्षारक्षक पानबिडीला गेलेले का?? ऑफिसबाहेर त्याच्या गाडीतुनच घड्याळासकट त्यालापण पळवला असता तर जास्त फायदा झाला असता(??).

    ReplyDelete
  9. बाबा रे, बड्डे लोग असे चान्स पे डान्स करू शकतात. त्यांना हवे तसे मिडियाचे सहाय्य देखील मिळते. आपण साला फुकट मार खायचो.
    कालच मी Consumer Court मध्ये कसे अपील करायचे हे वाचत होतो. लैई जटिल अन् कुटिल प्रक्रिया असते ब्वा.

    ReplyDelete
  10. :) अहो साहेब, आमच्या पोटापाण्याच्या व्यवसायाबद्दलच बोलताय कि हो राव तुम्हीं! हम्म्म्म आहे खरं असं! दुनिया नाचती ही...सिर्फ नचानेवाला चाहिये! :|

    ReplyDelete
  11. आयला भारीच आहे की...

    ReplyDelete
  12. सगळेच डोकेबाज आणि संधीसाधू... आपल्या सारख्याला हे कुठले जमायला. भुरट्या चोरांची पण कमालच म्हणायची... पाहवत नाहीये रे अगदी चेहरा...

    ReplyDelete
  13. हेरंबा,
    हाहा...तुझा स्मायली एग्झॅक्टली त्याच्यासारखाच झालाय ;)

    ReplyDelete
  14. अपर्णा,
    लई हुशार मंडळी आहेत सगळीच...धडेच धडे देताहेत सगळ्यांना!!!

    ReplyDelete
  15. सचिन,
    अरे हे कितीही पुस्तकांत घातलं ना तरी, ते आतूनच यावं लागतं...हे टॅलेंट दैवी देणगीच वाटते मला...आपल्यासारख्यांना बापजन्मात सुचायचं नाही असलं काही!!

    ReplyDelete
  16. सुहास,
    खाल्लेला मार व्याजासकट वसूल केला की नाही त्यानं!! ;)

    ReplyDelete
  17. सविताताई,
    हो ना...सौदा तसा महागाचाच आहे!! त्याला स्वस्तात पडला मात्र!!

    ReplyDelete
  18. आनंद,
    :) करून बघ एकदा.. ;)

    ReplyDelete
  19. माऊताई,
    मला बातमी बघून एकदम कौतुकच वाटलं त्याचं!! :P

    ReplyDelete
  20. सौरभ,
    मला पण हाच प्रश्न पडलेला...पण बहुतेक एखादा अगदी बेसावध क्षण गाठून केलेलं कार्य वाटतंय ;)
    बाकी त्यालाच पळवला असता तर भांडवल, परताव्याचा वेळ आणि रिस्क सगळंच वाढलं असतं... ;)

    ReplyDelete
  21. सिद्धार्थ,
    हो ना...डान्स करायचा चान्स मोठ्यांनाच..आपण आपले प्रेक्षकांत बसून टाळ्या वाजवायला.. :D
    ते कन्झ्युमर कोर्टाचं मलाही अभ्यासायचंय राव...आपल्याकडे सगळ्या लोकाभिमुख गोष्टी अवघड आणि जटिल का असतात?

    ReplyDelete
  22. अनघा,
    इथे हाच नाचतोय आणि दुनियेला सोबत नाचवतोय खरंच!!
    :D

    ReplyDelete
  23. योगेश,
    लईच भारी एकदम!! :)

    ReplyDelete
  24. श्रीताई,
    हो ना, त्या भुरट्या चोरांची कमालच आहे...मला वाटतं बरेच दिवस निरीक्षण करून, अभ्यासपूर्ण चोरी केलीय त्यांनी! :P

    ReplyDelete
  25. >> मलाईका अरोराला फुकटात ब्रँड ऍम्बॅसेडर (भूषण अग्रदूत) म्हणून करारबद्ध करून घेतलं. ही बातमी ऐकून खरंतर माझा झंडू बामबद्दलचा आदर द्विगुणितच झाला होता. +100
    टायटल भारी आहे. चान्स पे डान्स

    ReplyDelete
  26. Anonymous11:19 PM

    wow prophet
    मला आज प्रोफेटचा आर्थ दिक्तिओनर्य मध्ये शोधावाच लागला ईत्क्य सुंदर सुंदर पोस्ट नंतर आज!!!

    ReplyDelete
  27. प्रज्ञा,
    ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
    भेट देत राहा!

    ReplyDelete
  28. Anonymous,
    इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!!!!
    असाच लोभ राहू द्या! :)

    ReplyDelete
  29. हुशार आहे... बर्नी एक्लस्टनपण आणि 'हुब्लो'चा सीईओपण :-)

    ReplyDelete
  30. हा हा हा... :-D
    सही...
    मला पण टायटल आवडले...भारी आहे... :-)

    ReplyDelete
  31. Anonymous4:10 AM

    >>>पण त्यासाठी आधी तुमच्याकडे महागड्या गोष्टी हव्यात, तुम्ही प्रसिद्ध असायला हवं आणि तुम्हाला मारही पडायला हवा .... फारच महागाचा सौदा वाटतोय!....

    ही आयडीयाची कल्पना भारी असली तरी साविताताईनी सांगितलेल्या वरील मुद्द्यांचा देखील विचार करायला हवा ...:)

    टायटल भारीच... ;)

    ReplyDelete
  32. संकेत,
    अरे म्हणून तर मिलियन आणि बिलियन कमावत बसलेत ना! :D

    ReplyDelete
  33. मैथिली,
    :D:D:D

    ReplyDelete
  34. देवेंद्र,
    सौदा महागाचाच आहे... हे तर सत्यच.. पण.. इट मे जस्ट बी वर्थ इट! ;)
    अरे स्टोरी पाहिल्या पाहिल्या पहिल्याप्रथम हेच डोक्यात आलं माझ्या :D

    ReplyDelete