11/13/2011

लिमिटेड माणुसकी

आमच्या ऑफिसमध्ये इतर ऑफिसेसमध्ये असतात तसाच एक पोस्ट विभाग आहे. आलेली पत्रं आणि जाणारी पत्रं ह्यांचं काम बघणारा विभाग. त्यामध्ये कुणाकुणाची आलेली पत्र ऑफिसभर फिरून पोचवण्याचं काम करणारा एक मनुष्य आहे. रोज सकाळी मी ऑफिसात पोचल्यानंतर २०-२५ मिनिटांनंतर तो मी बसतो त्या मजल्यावर कुणाकुणाची पत्र, लिफाफे पोचवायला येतो. मी माझ्या मजल्याच्या अगदी दरवाजातच दरवाजाकडे तोंड करून बसतो आणि त्यात मला अटेन्शन डेफिसिट डिसॉर्डर असण्याचा संभव असल्यामुळे हलकीशीही हालचाल झाली की माझं लक्ष विचलित होतं, त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक व्यक्तिकडे माझं लक्ष जातंच. आणि सहसा इथली सगळीच लोक सकाळी दिसणार्‍या अगदी अनोळखी माणसालाही ग्रीट करतात, तद्वतच गेली तीन वर्षं तो मला रोज सकाळी ग्रीट करतो आणि मी त्याला. गेल्या तीन वर्षांच्या ओळखीनंतर फायनली दोनेक महिन्यांपूर्वी तो माझ्याशी बोलायला थांबला. पण त्याला येतं फक्त इटालियन. अगदी गेल्या वर्षीपर्यंत मला तोडकंमोडकंही इटालियन बोलता येत नसे, पण आता थोडंफार बोलू शकतो त्यामुळे आमचा थोडाफार अर्थपूर्ण संवाद झाला. त्यावरून मला एक आश्चर्यकारक गोष्ट कळली, की इतर काहीकाही अगदी शिकल्या-सवरलेल्या इटालियन माणसांनाही भारतीय माणसांच्या इथे असण्याचा जो एक सल आहे, तो ह्या अल्पशिक्षित आणि ऑफिसातील खालच्या स्तरावर काम करणार्‍या माणसाला मात्र अजिबात नाही.
मी इथे केवळ अजून सहा महिनेच असेन, हे ऐकल्यावर त्याला जेन्युईनली वाईट वाटल्याचं मला जाणवलं. आधी त्याला वाटलेलं की मी इथेच नोकरी करतो. आणि अशी चुकीची समजूत असूनही त्याला भारतीय लोक इथे असण्याचं वाईट न वाटणं मला स्पर्शून गेलं.
त्यानंतर इथे एक विचित्र घटना घडली. लिबियन युद्धामुळे बरेच निर्वासित समुद्र पार करून इटलीत शिरले. ते मुख्यत्वे लिबियात काम करणारे परदेशी कामगार. म्हणजे एकतर आफ्रिकन्स किंवा पाकिस्तानी/बांग्लादेशी (ज्यांच्या देशांनी त्यांना परत नेण्याची कुठलीही सोय केली नाही). तर रेडक्रॉसनं त्या सगळ्यांना मिलानमध्ये आणलं आणि चक्क आम्ही ज्या फोर-स्टार रेसिडन्समध्ये राहतो, तिथेच त्यांची राहण्याची सोय केली. आमचा रेसिडन्स लॉसमध्ये चालला होता आणि रेडक्रॉसकडून मिळाणारा भरघोस पैसा हा हमखास कमाईचा मार्ग, हे इंगित आम्हाला नंतर कळलं. पण संपूर्ण गोर्‍या माणसांच्या लोकॅलिटीमध्ये आफ्रिकन आणि बांग्लादेशी/पाकिस्तानी मजूरांना आणून टाकल्यानं थोडंसं विचित्र वातावरण निर्माण झालं. त्यात भर म्हणजे रेडक्रॉस त्यांना देत असलेल्या सोयी - फुकट जेवण, कपडे, सायकली, मोबाईल फोन्स, इंटरनेट. सामान्य टॅक्सपेयिंग इटालियन माणसास राग न येता तरच नवल. आम्हाला भेटणारा प्रत्येक इटालियन ह्या गोष्टीबद्दल प्रचंड राग व्यक्त करतो. आणि गंमत म्हणजे आम्हालाही त्या निर्वासितांचा हेवा वाटतो. कदाचित मत्सर हा शब्द योग्य असेल. तद्दन मूर्खपणा आहे तसं वाटणं म्हणजे, मनाविरूद्ध देशाबाहेर, घराबाहेर राहणं ह्याबद्दल कुणाचा हेवा वाटण्यात काही अर्थ आहे का? पण वाटतो. त्याची कारणं अनेक आहेत.
पहिलं म्हणजे बालिश कारण, त्यातले पाकिस्तानी/बांग्लादेशी कुठल्याही ऍन्गलनी घरापासून दूर आहेत म्हणून दुःखी असल्यासारखं वाटत नाही. आमच्यातल्या अनेकांचा (इन्क्ल्युडिंग मी) असा कयास आहे की ते खरे लिबियन वॉर रेफ्युजीज नाहीच आहेत, ते असेच कुठल्यातरी बोटीत बसून (जसे नॉर्मली युरोपात घुसतात) तसे आलेत आणि लिबियन वॉरच्या नावाखाली मजा मारताहेत आणि इथेच सेटल होतील.
दुसरं  म्हणजे अजून बालिश, त्यांना फुकटात इटालियनही शिकवतात आणि कदाचित इथे सेटल व्हायला मदतही करतील, आणि आम्हाला साधं वर्किंग व्हिजा एक्स्टेन्शन मिळवायचं म्हणजे मारामारी. हे म्हणजे अधिकृतरित्या प्रयत्न केले तर त्रास आणि असं बोटीत बसून आलं की मजा. (बोटीत बसून येणं ही मजा नाही हे अर्थातच अधिक विचार केल्यावर आणि त्यामागची केविलवाणी अपरिहार्यता जाणवल्यावर कळतं).
तिसरं म्हणजे बालिशाहूनही बालिश, ह्या लोकांमुळे आजूबाजूचे गोरे कधीकधी आम्हालाही निर्वासित समजतात. आता कुणी म्हणेल त्यात काय? पण इट हर्ट्स. वंशवादाचं आणि वर्गवादाचं माईल्ड स्वरूप आहे हे. आम्ही इंजिनियर आहोत, नोकरी करतो बाकायदा आणि यू इक्वेट अस विथ दीज पीपल? गोर्‍या वंशवादाच्या दाट सावलीखाली चाललेली भुर्‍या वंशवादाची आणि वर्गवादाची घुसमट. ऑसम.
चौथं आणि थोडंफार प्रॅक्टिकल कारण म्हणजे, ह्या लोकांपैकी बर्‍याच लोकांना इंग्लिशची मारामारी आणि एव्हढ्या मोठ्या हजार खोल्यांच्या हॉटेलात ते सुरूवातीला बावरून गेले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या खोल्याही लक्षात राहत नसत. मग रात्री अपरात्री फिरून आल्यानंतर ते चुकीच्या खोल्यांच्या बेल्स दाबत. बरं इथे पीप-होल्स नसल्यामुळे कळत नाही कोण ते. मग गोंधळ, गैरसमज. त्यात काळ्या लोकांबद्दल आपल्या मनात असलेली अनामिक भीती, जणू ती जनावरंच आहेत. अर्थात, त्यांनी काही कमी उपद्रव केले असं नाही. उगाच लोकांच्या घरांच्या बेल्स मारून नेलकटर आहे का? चाकू आहे का? असले धंदे करणेही चालू होते (अर्थात ह्यामध्ये पाक/बांगला आघाडीवर होते कारण त्यांना आपली भाषा येते). दिवसरात्र कॉरिडॉर्समध्ये फेर्‍या मार, मोठमोठ्याने गप्पा आणि हास्यविनोद. पण अर्थातच ते अशिक्षित कामगार लोक, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? ते काय बॉरबॉन किंवा स्कॉच पीत ब्रिज खेळत बसणारेत? असो. पण ज्यांच्या बायका आणि पोरं दिवसभर घरी एकटी असायची त्यांना ह्या लोकांचा प्रचंड वीट आला होता. ते आजही ह्या लोकांना शिव्या घालतात. त्यांच्याजागी ते बरोबर असणार, ह्यात वादच नाही. पण मला माझा स्टँड नक्की काय आहे हे आजही माहित नाही.
आता कुणी विचारेल, फोर स्टार हॉटेलमध्ये ह्या लोकांना कसंकाय ठेवू दिलं? तर पैसा हे एक कारण आधीच सांगितलं आणि दुसरं म्हणजे, जसे आमच्या कंपनीतले लोक हॉटेलात राहतात, तसेच आमच्या हॉटेलचं पोलिसांशीही कॉन्ट्रॅक्ट आहे. आमच्या हॉटेलात पोलिसही बरेच राहतात. त्यामुळे ह्या लोकांवर आपसूकच जरब आणि कंट्रोल राहतो. पुन्हा रेडक्रॉसचे लोक असतातच.

तर ही सगळी पार्श्वभूमी अशासाठी की परवा माझ्या ऑफिसातल्या पोस्टवाल्या मित्राशी पुन्हा भेट झाली. ह्यावेळेस कॉफी मशीनवर. मी आणि माझा एक मित्र त्याच्याशी बोलत होतो. गप्पा भारतीय सिनेमावरून तुम्ही कुठे राहतावर आल्या. मग जागेचं नाव सांगताच तो म्हणाला की मी तिथे काही वर्षं कामाला होतो. हे बोलल्यावर माझ्या मित्रानं सध्याच्या ह्या काळ्या लोकांच्या फुकट राहण्या/जेवण्याबद्द्ल त्याच्या भावना त्याला बोलून दाखवल्या, मी त्याचा चेहरा निरखत होतो. आणि तो बोलला, "ते बिचारे निर्वासित आहेत रे. काय करणार आपण? परवाच मी एका निर्वासिताबद्दल बातमी पाहिली. कचर्‍याच्या डब्यात पडलेली बाटली उचलून त्यातला उरलेला ज्यूस पित होता."
त्या माणसाला प्रत्यक्ष स्थिती काय आहे ह्याची जास्त कल्पना नसावी. कारण इथल्या निर्वासितांची तशी चैनच चालू आहे. पण तरीही त्याच्याइतकीच, किंबहुना त्याच्याहूनही कमी माहिती असलेले वेल-टू-डू सुशिक्षित इटालियन लोकही त्या लोकांना ऍट स्लाईटेस्ट प्रोव्होकेशन शिव्या घालायला कमी करणार नाहीत. पण एक अल्पशिक्षित, अल्प पगारावर काम करणारा सामान्य इटालियन मनुष्य ह्या घटनेकडे कुठलाही चष्मा न घालता, निव्वळ माणुसकीनं पाहताना बघून मला एकदमच हलायला झालं.
तो ज्या नजरेनं आम्हाला बघतो, त्याच नजरेनं त्या निर्वासितांकडे पाहतो आणि त्याच नजरेनं इतरही कुठल्या अगदी श्रीमंत इटालियन माणसाकडेही पाहतो. कुठे शिकला असेल तो हे? जे आमच्या ऑफिसात काम करणारे काही गोरे इंजिनियर्सही नाही शिकू शकले? जे आम्हीसुद्धा वर्षानुवर्षं शिकूनही आणि गोर्‍यांचे जुलूम सहन करूनही नाही शिकू शकलो? आमची माणुसकी लिमिटेडच का राहिली?

'शिंडलर्स  लिस्ट' पाहिल्यानंतर मी ओस्कार शिंडलरबद्दल वाचत होतो. त्यामध्ये शिंडलरनं नक्की हे सगळं का केलं? आपला जीव आणि आपली सारी संपत्ती पणाला लावून त्यानं एव्हढ्या ज्यूंचे प्राण नक्की का वाचवले? अचानकच एक संधीसाधू कारखानदार इतका मानवतावादी कसा झाला? ह्याची उत्तरं शोधताना शिंडलरला एका मुलाखतकारानं विचारलं. तेव्हा शिंडलरचं उत्तर अतिशय साधं होतं, "मी त्या सगळ्यांना ओळखत होतो. आणि जेव्हा तुम्ही कुणाला ओळखता तेव्हा तुम्ही त्याच्याशी एका किमान सभ्यतेच्या पातळीनं वागता."
बस? इतकंसं कारण? त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याइतकं?
तो म्हणतो मी ओळखतो, म्हणजे काय ते त्याचे मित्र किंवा कौटुंबिक मित्र नसतात. ती त्याच्यासारखीच चालती बोलती माणसं असतात, ज्यांना तो रोज बघतो.
अर्थातच अनेक कंगोरे असतील शिंडलरच्या मनात. कितीतरी मोठी द्वंद्व उद्भवली असतील. अगदी सगळं संपल्यावरही, मी गाडी विकली असती तर अजून दहा जीव वाचले असते हे म्हणून शोक करणार्‍या शिंडलरच्या मनाचा ठाव कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही शब्दांनी घेण निव्वळ अशक्य आहे. पण त्याचे साधे शब्द एक साधी भावना दाखवतात. माणुसकीची भावना. एक माणूस दुसर्‍या माणसाशी कसा वागतो बस. 

इतकं साधं आहे सगळं. पण तसं वागणं महा कर्मकठीण. माणसांतली माणुसकी बाहेर यायला बरेचदा त्याच्यातल्या माणसावरच हल्ला होणं गरजेचं ठरतं. जसं, 'डिस्ट्रिक्ट ९' सिनेमातला विकस जसजसा माणसापासून परग्रहवासीय जीवांमध्ये ट्रान्स्फॉर्म होत जातो, तसतसं त्याच्यातलं माणूसपण, त्याच्यातली माणुसकी वाढत जाते.
थोडक्यात, माणसाचा जन्म घेऊन माणूस बनणंच जगातली सर्वांत कठीण गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.

11/07/2011

मुखवटा

"डॉक्टर, हे घ्या आजचं पत्र!" नर्सनं एक कागद आणून डॉ. म्हांब्रेंकडे दिला.
"हे तेच का?" अभिजीतनं विचारलं.
"होय." डॉक्टर तो कागद नीट निरखत म्हणाले. "लिखाण बरंचसं गचाळ होऊ लागलंय." डॉक्टर तो कागद अभिजीतच्या हातात देत म्हणाले.
"ह्म्म. म्हणजे केस बिघडत चाललीय की सुधरत चाललीय." अभिजीत त्या लेखनाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता.
"मला वाटतंय सुधारणा आहे. कारण बिघडलेलं हस्ताक्षर म्हणजे त्याच्या दुसर्‍या पर्सनालिटीचा त्याच्यावरचा कंट्रोल कमी कमी होतोय."
"पण कदाचित हे फ्रस्ट्रेशन वाढल्याचंही लक्षण असू शकतं ना? म्हणजे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट डॉक्टर, पण माझ्या थिसिससाठी मी इतर ज्या केसेस बघितल्या, त्यावरून असं वाटलं मला."
"ह्म्म शक्य आहे." डॉक्टर चष्म्याची काच साफ करत म्हणाले.
अभिजीत ते पत्र निरखून वाचू लागला.

-----

फेड इन. पाण्याची मोठी लाट दरवाज्यावर एकदा धडकते. फेड आऊट. कट टू बेडरूम. पाच वर्षांचे सुशील आणि आयुब पलंगावर घाबरून बसलेत. कट टू आऊटसाईड. पाण्याची लाट खिडक्यांवरही आदळतेय. कट टू इनसाईड. पाण्याचा लोट दरवाजा तोडून आत शिरतो आणि हॉलमधला टीपॉय त्यात वाहतो आणि फिशटँकचा स्टँड कोलमडल्यामुळे फिशटँकही पाण्यात पडतो. प्रिफरेबली फिशटँक न फुटता, पाण्यातच तरंगत राहतो. आतल्या माशांच्या मोशनवर झूम इन. थोड्याच वेळात कशावरतरी आपटून फिशटँक फुटेल तोपर्यंत फॉलो करायचा. कट टू बेडरूम. सुशील आणि आयुब एकमेकांना घट्ट धरून बसलेत.चादरी स्वतःभोवती गुंडाळून. कट टू आऊटसाईड बेडरूम. पाण्याचा लोंढा बेडरूमचा दरवाजाही तोडून आत शिरतो. कट टू आऊटसाईड. पाण्याचा दुसरा लोंढा खिडक्या तोडून आत शिरतो. कट टू स्काय व्ह्यू. चहूकडे पाण्याचं थैमान. पाण्याखाली गेलेली घरं. भल्याथोरल्या झाडांचे नुसते दिसणारे शेंडे. कट टू बेडरूम. आयुब छताजवळच्या झरोक्यात थोडासा अडकतो आणि त्यातून बाहेर फेकला जातो. कट टू शेजारच्या घराचं छप्पर. आयुब तिथेच बेशुद्ध पडलाय. पाऊस मंदावलाय. पाणी ओसरलंय. कट टू रोड. बंद पडलेल्या असंख्य गाड्या. कट टू वन पर्टिक्युलर कार. एक जोडपं काचा बंद असलेल्या गाडीत गुदमरून मेलंय. कट टू आयुब. तो डोळे चोळत उठतो आणि घराकडे बघतो. कट टू झरोका. अंगानं लहानसा आयुब त्यात अडकल्याचा फ्लॅश. पुन्हा झरोक्याचा स्टिल शॉट. अन मग हळूहळू कॅमेरा खाली येऊन उघड्या खिडकीवर स्थिरावतो. कट टू इनसाईड बेडरूम. सगळं अस्ताव्यस्त, पण कुठेही सुशील नाही. कॅमेरा एका मोडक्या फोटोफ्रेमवर स्थिरावतो. सुशील अन त्याच्या आईवडलांचा (बंद कारमधलं मृत जोडपं) फोटो. कट टू स्काय व्ह्यू. शहरभर पडलेल्या मोडक्या कार्स, घरांचे भाग, झाडं अन प्रेतं. कट टू आयुबचा क्लोज-अप. फेड आऊट.
एव्हढं लिहून त्यानं वर पाहिलं. दूरवर निरूद्देश नजर फिरवली आणि एक उसासा टाकून चहाचा अजून एक घोट घेतला. पुन्हा एकदा लिहिलेल्या मजकुराकडे पाहिलं. त्याला एकदम जडत्व आल्यासारखं वाटलं. हातातलं पेन त्यानं खाली ठेवलं आणि पुन्हा दूरवर पाहण्यात हरवून गेला.
"एक्सक्यूज मी." त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. "मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. रोज तुम्हाला इथे बसून लिहिताना पाहतो." त्याच्या चेहर्‍यावरचे त्रासलेले भाव पाहून तो पोरगेलासा युवक घाईघाईनं पुढे म्हणाला. "तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण उद्या मी देश सोडून दोन-तीन वर्षांसाठी शिकायला परदेशी चाललोय. तर जाण्यापूर्वी तुमची सही घ्यावी म्हणून तुम्हाला डिस्टर्ब केलं. खरंच सॉरी!"
तो हलकंसं हसला आणि त्यानं पेन उचललं. त्या युवकानं स्वतःच्या बॅगेतून चटकन त्यानंच लिहिलेलं एक पुस्तक काढलं आणि त्याच्यासमोर धरलं. त्यानं स्वतःच्या पुस्तकाचं कव्हर निरखलं. पुस्तकावर एका चेहर्‍याची सावली अर्धी काळी आणि अर्धी पांढरी काढलेली होती आणि मानेच्या मुळाशी 'मुखवटा' हे शीर्षक फराटे ओढल्याप्रमाणे लिहिलेलं होतं. आणि कोपर्‍यात त्याचं नाव. स्वतःचं नाव त्यानं बराच वेळ टक लावून पाहिलं आणि मग पुस्तकाच्या नावाकडे पाहून तो स्वतःशीच हसला. मग पहिल्या पानावर त्यानं संदेश लिहिला, "स्वतःची ओळख बनवा." आणि खाली स्वाक्षरी करून त्याला दिलं. एव्हढ्यात मोठे फटाके फुटल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ काचा फुटल्याचा. दोघांचीही नजर आवाजाकडे गेली आणि त्यांच्या सर्वांगाचा थरकाप उडाला. दारात दोन मशीनगनधारी तरूण उभे होते. अन त्यांच्या कोवळ्या चेहर्‍यांवर खुनशी भाव होते. त्यांनी खिशातून दोन ग्रेनेड्स काढून भिरकावली. प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे हे दोघेजण टेबलखाली शिरून पाहू लागले. धूर कमी झाल्यावर थोडं नीट दिसू लागलं एव्हढ्यात दोघांची बखोटी धरून एकानं त्यांना टेबलाखालून बाहेर ओढलं आणि त्यांच्यावर मशीनगन रोखून उभा राहिला. त्यांचं टेबल भिंतीकडे असल्यानं ते सापळ्यातच अडकलेले होते. दुसर्‍यानं बंदुकीचा धाक दाखवून उर्वरित टेबलांवरच्या अद्याप जिवंत असलेल्या लोकांना ह्यांच्याजवळ आणलं आणि एका ओळीत उभं केलं. ह्या गदारोळात तो लिहित असलेले कागद इतस्ततः पसरले. तो विषण्णपणे सर्वत्र पसरलेला रक्त अन मांसाचं थारोळं पाहत होता. त्यानं असंच थारोळं कित्येक वर्षांपूर्वी पाहिलं होतं, फक्त कारणं वेगळी अन कर्ते वेगळे. त्यावेळेसचं संकट अस्मानी होतं, ह्यावेळेस इन्सानी. त्याच्यासोबतचा मुलगा पुरता गर्भगळित झाला होता.

-----

"हे काही नीट वाचता येत नाहीये डॉक्टर." अभिजीत वाचण्याचा प्रयत्न सोडत म्हणाला.
"मजकूर नेहमी तोच असतो, त्यामुळे मला सवयीनं वाचता येतो." डॉक्टर स्मित करत पुढे म्हणाले. "तुमच्यासाठी सुरूवातीच्या काळातलं एक पत्र काढतो." असं म्हणत डॉक्टर उठून त्यांच्या कपाटाकडे गेले.
"पण असं नक्की काय घडलं होतं त्यादिवशी की ह्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला." अभिजीत म्हणाला.
"नक्की काय घडलं ते, ते स्वतः सोडून कुणालाच माहित नाही आता." डॉक्टर एक फाईल काढत पुढे म्हणाले, "नेहमीच्याच कॅफेमध्ये बसून पुढच्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते. तेव्हा अतिरेकी हल्ला झाला. अतिरेक्यांनी ग्रेनेड्स फेकली आणि अंदाधुंद गोळीबार केला. हे एका प्रेताखाली अडकले आणि चारीबाजूंनी रक्तामांसाचा खच पडला होता. हे निश्चेष्ट पडून राहिल्यामुळे बहुतेक हे जिवंत की मेलेले ते अतिरेक्यांनाही कळलं नसावं, त्यामुळे ते तिथून निघून गेले. पुढे अतिरेक्यांचंही एन्काऊंटर झालं. त्यामुळे त्या कॅफेमध्ये असलेल्यांपैकी हे एकटेच जिवंत आहेत आता."
डॉक्टरांनी एक कागद काढून अभिजीतसमोर धरला.

-----

"भाईजान, जल्दीसे उडा डालते हैं सबको, आगे भी जाना है. यहां से स्टेशन और फिर हो सके ते अस्पताल में जाके बाकी भाईयों की मदद करनी है!" ह्या वाक्यानं सगळ्यांचीच गात्रं गोठली. पण त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळंच समाधान झळकू लागलं. तो वेगळ्याच नजरेनं त्या हलणार्‍या बंदुकींच्या नळ्यांकडे पाहू लागला. त्याला काही ऐकू येईनासं झालं. ते रक्त-मांसांचं थारोळं अन पस्तीस वर्षांपूर्वीची ती चित्र, सगळं एकामागोमाग एक त्याच्या डोळ्यांपुढे फिरू लागलं. आणि अचानक बंदुकीच्या नळीच्या धक्क्यानं तो भानावर आला.
"चले पँट उतार." दोघांमधला एकजण त्याच्या बरगडीवर बंदुकीची नळी आपटत त्याला दटावत होता. त्याला काहीच कळेना.
"चल उतार साले पँट, नहीं तो ऐसेही उतार दूंगा गोली." असं म्हणून त्यानं बंदुकीची नळी त्याच्या बक्कलात अडकवून ओढली आणि त्याची पँट खाली पडली. बंदुकीची नळी त्यानं जेव्हा अंतर्वस्त्रात घातली तेव्हा त्याचं डोकं ताळ्यावर आलं आणि त्याला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागला. त्याचं लक्ष बाकीच्यांकडे गेलं आणि बंदुकीचा दस्ता त्याच्या डोक्यात बसला आणि तो खाली पडला. डोक्यात पुढचा काही विचार येण्याच्या आतच उभ्या सगळ्यांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. तो जमिनीवर स्वतःच लिहिलेल्या कागदांच्या आणि रक्त-मांसाच्या चिखलात पडला होता. "मुझे भी मारो. मुझे भी मारो." असं त्याला ओरडावंसं खूप वाटत होतं पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याची सही मागणार्‍या मुलाचं प्रेत त्याच्या अंगावरच पडलं होतं आणि त्याला अचानकच खूप जडत्व आल्यासारखं वाटू लागलं. तो तसाच निपचित पडून राहिला.

-----

अभिजीत परत परत ते पत्र वाचत होता.

"तारीख - २७ नोव्हेंबर

सुशील,

कुठे आहेस तू? आहेस ना तू खरंच? तू असायलाच हवंस रे. तू जर नसशील तर कसं चालेल. मी किती ओझी उचलू रे! हे ओझं असह्य होत होतं म्हणून मी ते उतरवायचा प्रयत्न करत होतो. पण त्यात दुसरंच ओझं डोक्यावर आलं. आणि आता हे नुसतंच असह्य नाही तर अशक्य झालंय. मी एकटा हा भार उचलू नाही शकणार. एक तर तू ये, नाहीतर मला यावं लागेल. आजपासून शंभर दिवस मी तुझी वाट पाहीन. त्यानंतर मी तुझ्याकडे येईन.

तुझाच आयुब."

"हा आयुब नक्की कोण डॉक्टर?" अभिजीत म्हणाला.
"हा सुशीलकुमारांचा लहानपणीचा जिवलग मित्र."
"?"
"सुशीलकुमारांच्या आई-वडलांकडे घरकामाला येणार्‍या बाईचा तो मुलगा. ते लहान असताना, घरकामाची बाई आयुबला सुशीलकुमारांच्या घरी सोडून इतर घरी कामांना जायची. ज्यादिवशी अचानक पूर आला, त्यादिवशी सुशीलकुमारांचे आई-वडील पावसाचा रागरंग बघून अत्यावश्यक सामानाचा साठा करावा ह्या इराद्यानं बाहेर पडले आणि लगेच येता येईल हा अंदाज असेल कदाचित, पण त्यांनी मुलांना घरीच ठेवलं. अन बाहेर मात्र ट्रॅफिकचे बारा वाजले आणि अचानक आलेल्या पुरानं सगळंच गणित बिघडवलं. पुरात सुशीलकुमार वाचले, पण आयुब मात्र कुठेतरी वाहून गेला. तो कुठे गेला ते कुणालाच कधीच कळू शकलं नाही. सुशीलकुमारांच्या आई-वडीलांना त्यांच्या पालकांनी, प्रेमविवाह केल्यामुळे टाकलं होतं. पण ह्या दुर्घटनेनंतर त्यांनी कधी तोंडही न पाहिलेल्या आपल्या नातवाला जवळ केलं, अन सुशीलकुमारांचं आयुष्य वाया जाण्यापूर्वी सावरलं. पण त्या जखमेच्या खुणा त्यांच्या मनावरून कधीच पुसल्या गेल्या नाहीत. त्यांनी आजवरची सगळी पुस्तकं आयुबला डेडिकेट केलीत आणि प्रत्येक सिनेमाच्या सुरूवातीला त्यांच्या आई-वडलांच्या फोटोनंतर ज्या ओळी लिहून येतात, त्यात हा सिनेमा आयुबला डेडिकेट केल्याचंही लिहून येतं."
"येस, येस, तो फोटो जो येतो, तो पुरातूनही वाचलेला त्यांच्या आई-वडीलांचा एकमात्र फोटो आहे नाही का? तो अर्धा फाटलेला आहे पुरात. वडलांचं धड आणि सुशीलकुमार अख्खेच त्यामधून गायब आहेत. फक्त आई आणि वडलांचा चेहरा."
"होय बरोबर. तर असा हा आयुब. इम्प्रेशनेबल एजमध्ये असं झाल्यावर मनावरचे ओरखडे कायम राहतात." डॉक्टर गंभीरपणे म्हणाले.
"तरी मृत्यूच्या तांडवामुळे डोक्यावर परिणाम होणं समजू शकतो मी. पण पस्तीस वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मित्राच्या पात्राची कल्पना करून आपण स्वतःच तो आहोत असं कल्पून मग स्वतःलाच रोजरोज पत्र लिहिण्याचं कारण मला समजू शकत नाहीये." अभिजीत म्हणाला.
"आधी मला पण कळत नव्हतं की ह्या दोन घटनांचा संबंध कसा लावायचा. मग त्यांच्या सेक्रेटरीनं मला सांगितलं की जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा ते ज्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते, तो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावरच बेतलेला होता. त्यांची आत्मकथा. त्यामध्ये ते पाच वर्षांचे असताना आलेला तो पूर आणि त्यामध्ये ते कसे त्यांच्या मित्राबरोबर अडकले आणि कसे ते एकटेच वाचले आणि ह्या सगळ्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण कसं लागलं, हे सगळं ते दाखवणार होते. कदाचित हा सगळा स्क्रिप्टचा एक भाग असेल जो ते तेव्हा लिहित होते. तशीही त्यांच्या सिनेमाची स्टाईल थोडी फँटॅस्टिकलच असते."
"पण म्हणून असं? दिवसरात्र फक्त त्याचाच ध्यास घ्यायचा, आणि इतका की आपण स्वतःच आयुब आहोत असं समजू लागायचं?"
"मानवी मनाचे खेळ शंभरातून नव्याण्णव वेळा कुणाच्याही समजण्यापलीकडचे असतात.

अभिजीत ते जुनं पत्र आणि त्यादिवशीचं ताजं पत्र ताडून पाहत होता. आणि एकदम तो चमकला.
"डॉक्टर, हे त्यांनी लिहिलेलं पहिलं पत्र आहे?"
"हो. का? काय झालं?"
"डॉक्टर, ह्याच्यावरची तारीख वाचलीत? २७ नोव्हेंबर."
"हो २६ नोव्हेंबरला दुर्घटना झाली आणि २७ ला ते इथे भरती झाले."
"डॉक्टर! आज ६ मार्च आहे." अभिजीत उठून उभा राहत म्हणाला.
"मग?" डॉक्टरांना कळेना.
"डॉक्टर आज शंभरावा दिवस आहे."
"डॅम!" डॉक्टर ताडकन उठत म्हणाले. टेबलावरची बेल वाजवत त्यांनी कोट उचलला आणि ते केबिनबाहेर पडले. पाठोपाठ अभिजीतही बाहेर पडला.
"नर्स, सुशीलकुमारांवर आज स्पेशल लक्ष ठेवा. आज काहीतरी होऊ शकतं. चला आधी माझ्यासोबत, मी एकदा चेक करतो त्यांना."
डॉक्टर अन अभिजीत नर्ससोबत सुशीलकुमारांच्या खोलीकडे गेले. नर्सनं खिडकीतून डोकावून पाहिलं.
"झोपलेत ते." नर्स म्हणाली अन तिनं दरवाजा उघडला.
डॉक्टर अन अभिजीत आत गेले. डॉक्टरांनी नस चेक केली अन त्यांना धक्काच बसला. दोन्ही हातांच्या नस इंटॅक्ट होत्या, गळा नॉर्मल होता. तेव्हढ्यात डॉक्टरांनी प्रेताचा खिसा चेक केला. आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी प्रेताचं तोंड उघडलं आणि त्याच्या घशामध्ये कोंबलेला एक कागदाचा बोळा बाहेर काढला.
"स्मार्ट वे टू कमिट स्युसाईड." डॉक्टर उसासा टाकत म्हणाले.
"हे काय आहे?" अभिजीतला कळेना.
कागदाचा बोळा उघडत डॉक्टर म्हणाले, "आयुबचा लहानपणीचा फोटो. ते कायम स्वतःजवळ ठेवायचे. नो वन थॉट ऑफ धीस."
अभिजीत तो फोटो निरखत होता. 'कुठल्यातरी मोठ्या फोटोतून फाटून उरलेला वाटतोय.' तो स्वतःशीच म्हणाला.

(ही कथा मोगरा फुलला'२०११ च्या दिवाळी अंकातही इथे प्रकाशित झालेली आहे.)

11/03/2011

बिल

"साहेब, ह्यावेळच्या विस्तारातपण जर त्या समाजाला एकही मंत्री मिळाला नाही, तर ते परत दहा आमदारांची धमकी द्यायला लागतील."
"अहो लक्ष देऊ नका तिकडे. दहा आमदारांच्या धमक्या गेली अडीच वर्षं देताहेत. समित्यांवर बसून मजा मारायला मिळतेय, ती पण जाईल त्यांची. पुन्हा दहानं मोठा फरक पडायचा नाही, तीन-चार इथून तिथून सहज मिळून जातील. तुम्ही त्यापेक्षा गृहमंत्रीपदाचं काय करता येतं ते बघा. मागच्या अतिरेकी हल्ल्यात राजीनामा घेतला होता आपण आबांचा, आता तर एक निवडणुकही उरकलीय, बराच काळ गेलाय. पुन्हा बसवा त्यांनाच."
"अहो पण साहेब ते मित्रपक्षाचे लोक.."
"त्यांना बोंबलू दे हो. त्यांची मलिदेवाली खाती जाणार नाहीत तेव्हढं बघा म्हणजे झालं. आणि दोन-चार राज्यमंत्री इथे-तिथे देऊन टाका."
"पण ते ह्यावेळेस अजून मंत्री मागणार नाहीत कशावरून."
"मागतील ना, पण आमदार आपले जास्त आहेत. गेल्यावेळेस त्यांचे जास्त होते, तेव्हा त्यांची दादागिरी आपण सहन केली. आघाडीचा धर्म आहे तो!"
"ह्म्म.. पण साहेब, ह्या विस्ताराची आत्ता फारशी गरज नव्हती. फुकटच मित्रपक्षाला दोन-चार मंत्रीपदं खैरातीत द्यावी लागणार, आपले आमदार कमी होते, तेव्हा आपल्याला खूपच कमी मंत्रीपदं होती."
"भाऊ, अहो आपल्याला आपले अपक्ष राखायचेत की नाहीत? आणि उद्या विकास पार्टीवाल्यांची कुलंगडी बाहेर पडली आणि त्यांचा राजीनामा मागायची आपल्यावर पाळी आली, तर त्यांचे वीस आमदार राजीनामे फडकवतील, तेव्हासाठी बॅक अप हवा आपल्याकडे."
"ह्म्म."

-----

"ए अकबर, ती हातोडी दे रे." विनय ओरडला.
पंधरा वर्षांचा अकबर धावत धावत हातोडी घेऊन आला. विनयनं अलगद खाली वाकून ती हातोडी घेतली आणि मग सराईतपणे बांबूंच्या त्या सांगाड्यावरून चढत वर गेला. कोपर्‍यावरती खिळा ठोकून त्यात कापडाचं टोक अडकवलं आणि पुढच्या कोपर्‍याकडे गेला. अकबर कुतूहलानं हे सगळं पाहत होता.
भव्य मैदानावरती तितकाच भलाथोरला तंबू उभारण्याचं काम सुरू होतं. दुसर्‍या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी तिथे होणार होता. वातानुकूलित तंबूचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू होतं. मैदानाच्या दुसर्‍या कोपर्‍याशी डेकोरेटर्सचा तांत्रिक चमू काहीतरी करत होता. विनय भल्याथोरल्या बांधकामामध्ये कुठेतरी हरवलेला पाहून अकबर तांत्रिक चमूचं काम पाहण्यासाठी निघून गेला.

"काय रे अकबर, कधीपासून लागलास शेठकडे?" दुपारी टपरीवर जेवताना विनयनं विचारलं.
"कलहीच." अकबर तिखट लागल्यामुळे नाकातून वाहणारं पाणी पुसत म्हणाला.
"तुला काही शाळा-बिळा नाही का?" विनयनं अचानक विचारलं.
अकबरला क्षणभर सुचेचना काही. त्यानं टेबलावर नजर फिरवली, सगळे दमलेभागलेले जीव बकाबक खात होते, फक्त विनय थांबून अकबरच्या उत्तराची वाट पाहत होता.
"महिन्याभरापूर्वी अब्बा वारले माझे..."
"बस बस. कळलं मला. जेव आता." विनय एकदम घाईघाईत त्याला पुढे बोलू न देता म्हणाला.

-----

एक जुनाटशी ऍम्ब्युलन्स थडथडत म्युनिसिपल हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये शिरत होती, तेव्हाच विनय हॉस्पिटलच्या गेटसमोर रिक्षातून उतरला. रिक्षावाल्याला पैसे दिले आणि लक्षपूर्वक हाताचा आधार देऊन रिक्षामधून आपल्या आईला उतरवू लागला.
"तिथे लाईनमध्ये जाऊन बसा." इमर्जन्सी वॉर्डातल्या नर्सनं कोर्‍या चेहर्‍यानं भल्याथोरल्या हॉलच्या एका टोकाकडे बोट दाखवत म्हटलं.
विनय खोकणार्‍या आईला आधार देत कोपर्‍याकडे निघाला. 'जुनी असल्यामुळे प्रशस्त बिल्डिंग्ज आहेत.' विनय मनाशीच विचार करत होता.
दोनेक तास लाईनमध्ये बसून आणि आईचा खोकला वाढतच चालल्यानं त्याचा संयम संपला. त्यानं मोबाईलवरून मित्राला फोन लावला आणि थोड्याच वेळात तो एका खाजगी क्लिनिकमध्ये पोचला. चटकन एक्स-रे काढण्यात आला आणि त्याला एका डॉक्टरांचा रेफरन्स देण्यात आला, आणि त्यांच्या कन्सल्टेशन रूमसमोर नेऊन त्याला बसवण्यात आलं. आतला पेशंट बाहेर आला की पुढचा नंबर त्याचा.\

डॉक्टरांची फी फार जास्त नसली तरी बजेटच्या बाहेरच होती, पण आईच्या तब्येतीपुढे काहीच नव्हतं. घोळ तिथेच झाला होता. आईला टीबी झाल्याचं निदान होतं. तिला हॉस्पिटलाईज करणं भाग होतं. त्यातल्या त्यात चांगलं पण स्वस्त असं हॉस्पिटल डॉक्टरांनीच सजेस्ट केलं. आणि औषधं लिहून दिली, जी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वाचायला देण्यास सांगितलं.
त्यानं आईला हॉस्पिटलाईज केलं आणि मग डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या परवानगीनुसार घेऊन आला. आईला कदाचित तीन-चार दिवस तिथेच राहावं लागेल असं त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि तिच्या वॉर्डबाहेर रात्री थांबण्याची परवानगी दिली. मग तो धावतपळत घरी गेला आणि आईसाठी काही हलकं जेवण तयार करून पुन्हा हॉस्पिटलला पोचला.

-----

"तुझे वडील मिल्ट्रीत होते ना? त्याचा काही उपयोग होत नाही काय सरकारी हॉस्पिटलांमध्ये?" रमाकांत विचारत होता. विनयनं शेठकडे फोन करून कळवलं होतं की दोन दिवस यायला जमणार नाही म्हणून. शेठ आधी पगार कापायची धमकी देत होता, पण आई आजारी आहे सांगितल्यावर एक दिवसाची भरपगारी रजा मंजूर केली होती. मग शेजारीच चालू असलेल्या साईटवर काम करणारा रमाकांत त्याला भेटायला हॉस्पिटलात आला होता.
"त्याचा काही उपयोग नाही रे." विनय शून्यात बघत म्हणाला.
"अरे चहा पी. थंड होईल." रमाकांत हातातल्या कटिंगचा एक घोट घेत म्हणाला. दोघे हॉस्पिटलबाहेरच्या टपरीवर बसले होते.
"माझा बाप युद्धात शहीद झाला. पण आम्हाला चक्राशिवाय काही नाही मिळालं." विनय थोडासा कडवटपणे म्हणाला.
"पैसे?"
विनय कुत्सित हसला, "मिळाले ना. बाप मेल्याच्या तीन वर्षांनंतर मिळाले. माझी शाळा सुटली होती. वीरचक्र मोडून विकून झालं होतं आणि मीच गावच्या सुताराकडे काम करताना सुट्ट्या टाकून सरकारी ऑफिसांमध्ये खेटे घालून ते मिळवले." विनयनं चहाचा एक घोट घेतला.

-----

"काय रे आई कशी आहे?" रमाकांतनं ऑफिसात शिरणार्‍या विनयला पाहून विचारलं.
"डॉक्टर सांगताहेत बरी आहे आता. औषधं लिहून दिलीत आणि आराम करायला सांगितलाय. चाळीतच एक बाई डबा देतात, त्यांना सांगून आलोय."
"मग आजपासून काम सुरू तुझं?"
"हो रे. म्हणून तर आलो. शेठनं एकच दिवस भरपगारी दिली होती रजा. आधीच हॉस्पिटलचं बिल अन औषधांच्या खर्चाचे लाखभर झाले रे. बँक अकाऊंट रिकामं होत आलंय. त्यात दोन दिवसाचा पगारही गेला."
"गेला नाही. तुझी रजा भरपगारी करायला सांगितलीय शेठनी." अकाऊंटंटचा असिस्टंट रघू म्हणाला. तो सिगरेट फुकून आत शिरत होता.
"काय सांगतोस?" विनयच्या चेहर्‍यावर एकदम वीतभर हसू उमटलं.
"अरे मोठा लग्गा लागला ना आपल्याला!" रघू त्याची पाठ थोपटत आत गेला.
विनयला अजून उलगडा झाला नाही.
"विनय, तू रमाकांतबरोबर जा. तो शपथविधीचा तंबू उतरवायचाय." सुपरवायझर सांगून आत गेला. विनय सही करायचं रजिस्टर शोधू लागला.
"अरे पण शपथविधी तर परवाच होता ना? आज कसा तंबू?" विनय सही करत म्हणाला.
"तोच तर लग्गा, रघू म्हणत होता तो. म्हणूनच शेठ खुषीत आहे." रमाकांत हसून म्हणाला. "चल रस्त्यात सांगतो."

------

गाडी चालवता चालवता रमाकांत बोलत होता, "अरे शपथविधी झाला आणि दहा नवे मंत्री बनले. पण एकाही मंत्र्यानं पंडाल काढायची ऑर्डर दिली नाही. शेठनं तंबू तसाच ठेवला. दोन दिवस एक्स्ट्रा झाले. वीस लाखाचं जास्तीचं बिल झालं. शेठनं मंजूर पण करून घेतलं. सरकारला काय वीस लाख म्हणजे...."

(ही  कथा जालरंग प्रकाशनाच्या 'दीपज्योती-२०११' ह्या दिवाळी अंकातही इथे प्रकाशित झालेली आहे.)

7/19/2011

मृत्युदाता -३

भाग -१ आणि
भाग -२ वरून पुढे

"रेखा, वर्तकसाहेबांकडे किती वाजता जायचं ठरलंय आपलं?" नरेंद्र शर्टाची बटणं लावत म्हणाला.
"दुपारी दीड वाजता!" ती गॅसचा नॉब बंद करत म्हणाली.
"ऑल द बेस्ट!" तो हसून म्हणाला आणि डोळ्यांवर गॉगल चढवून दरवाजाकडे गेला.
"तुलापण." ती हलकंच हसून म्हणाली.
तो दरवाजातून वळून हसला पण गॉगलमुळे त्याच्या डोळ्यांतले भाव दिसले नाहीत. त्याचे डोळे सगळंच सांगतात असं तिचं मत होतं.

-----

जशी पोलीसांची गाडी सायरन वाजवत धारावीच्या झोपडपट्टीत शिरली तशी एखाद्या मुंग्या लागलेल्या पदार्थावर फुंकर मारली की मुंग्याची जी हालचाल होते तशी माणसांची अस्ताव्यस्त हालचाल सुरू झाली. कातड्याच्या व्यवसायामुळे दरवळत असलेला उग्र दर्प सर्वत्र जाणवत होता.
"ह्या वासाच्या मास्कमागे अमली पदारर्थांचा साठा आणि वाहतूक करणं सोपं होतं." रमेश सहजच म्हणाला.
"इन्स्पेक्टर तुम्हाला माहित नसेल पण माझंही सुरूवातीचं पोस्टिंग मुंबईतच होतं." राजे म्हणाले.
रमेशनं चमकून पाहिलं, "पण मग.."
"मुंबईत टिकण्यासाठी भूक पाहिजे इन्स्पेक्टर आणि वरच्यांचं पोट भरलेलं ठेवता आलं पाहिजे." राजे विषादानं खिडकीतून बाहेर पाहत म्हणाले.
"किंवा नशीब." रमेशला राजेंच्या बोलण्यातली वेदना एकदम टोचली.
राजेंनी रमेशकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं.
शिंदे शिताफीनं बोळांमधून गाडी काढत होते. पण एका जागी मात्र गाडी अजून पुढे जाणं अशक्य होतं, तिथे रमेश, एसीपी राजे आणि शिंदे उतरले. रमेशनं शिंदेंना खूण केली आणि ते एका विवक्षित गल्लीत चटकन शिरले.
"त्याचं सो कॉल्ड गॅरेज ह्याच गल्लीत गेल्यावर आहे." रमेश शिंदे गेले त्या गल्लीकडे खूण करत राजेंना म्हणाला.
"मग आपण नाही जायचंय का तिथे?"
"गरज नाहीय, ते पहिलंच घर म्हणजे गॅरेज आहे, गाड्या गल्लीत शिरूच शकत नाहीत."
"ह्म्म." राजे चटकन तिकडे गेले, तोवर त्या घराचा समोरचा दरवाजा उघडला आणि आतून एक राकट दिसणारा पंचविशीचा काळाकभिन्न तरूण बाहेर आला. केस तेल लावून व्यवस्थित बसवलेले होते आणि कपडेही व्यवस्थित होते. राजेंनी त्याच्यावरून चटकन एक नजर फिरवली. चेहर्‍यावरचे उर्मट भाव आणि व्यवस्थित पेहराव ह्यांची सांगड बसत नव्हती.
"हा गगन महाडिक. बबनचा धाकटा भाऊ. दादाच्या गैरहजेरीत हाच धंदा चालवतो." रमेशनं माहिती दिली. एव्हढ्यात शिंदे घराच्या समोरच्या दरवाजातून बाहेर आले.
"बबनची बायको नाहीये घरात साहेब. कुठेतरी गेलेली दिसतेय."
"साहेब, बिना वॉरंटचे कसं काय तलाशी घेताय?" गगन थोडासा चिडून म्हणाला.
"तुझं कायद्याचं ज्ञान धंदा चालवायला वापरतोस तेव्हढं ठीक आहे. मी बिना वॉरंटचा तुला आत पण टाकू शकतो आणि तुझे सगळे अवयव बाहेरपण काढू शकतो." रमेश दरडावून म्हणाला. राजेंनी चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"काय साहेब, गरीबांवर दादागिरी करा. तिथे मोठे खुनी जेल तोडून पळाले."
"त्यांच्याबरोबरच तुझा भाऊपण पळालाय हे तर माहितीच असेल तुला." राजे म्हणाले.
"मग मी काय करू शकतो त्यात? इथे तर तो आला नाही. आला तर तुम्हाला कळवेन मी."
"हा शहाणपणा तुझ्या गिर्‍हाईकांसाठी राखून ठेव." गगनच्या उद्धटपणामुळे राजेंचा पारा चढला होता.
"जा साहेब, मी कायपण केलेलं नाही आणि तुमची कायपण मदत करू शकत नाही. म्हात्रेसाहेबांना विचारा हवंतर." गगन छद्मी हसत म्हणाला.
रमेशनं राजेंच्या खांद्यावर हात ठेवला आणि काही न बोलता वळला. राजे अनिच्छेनंच वळले. शिंदेंनी गाडी सुरू केली.
"तुम्ही वॉरंट वगैरे घेऊन का नाही निघालात. आणि हे म्हात्रेसाहेब म्हणजे.." राजे थोडे वैतागले होते.
"होय. तेच म्हात्रेसाहेब, आमदार म्हात्रे. तुम्ही असाल तेव्हाचा झोपडपट्टी दादा. ह्याच्याविरूद्ध कसलंही वॉरंट मिळवणं म्हणजे इथल्या पोलीस स्टेशनच्या थ्रू जाणं आणि म्हात्रे असताना ते अशक्य आहे. हा अन ह्याचा भाऊ म्हात्रेचे महत्वाचे इलेक्शन डोनर्स आहेत." रमेश मोबाईलशी खेळत म्हणाला.
"पण म्हणजे काय? आपण पुढे काय करायचं? आपण बबनला ऍलर्ट तर नाही केलं?"
"अजिबात नाही. उलट आपण अतिशय सरधोपट रस्ता वापरलाय. बबनच्या घरी जाण्याचा." रमेश शांतपणे म्हणाला.
"म्हणजे?"
"बबनला एव्हढी कल्पना नक्कीच असणार की आपण त्याच्या घरी सर्वप्रथम जाऊ. म्हणूनच त्यानं बायकोला गायब करून संदिग्ध वातावरणनिर्मिती करून ठेवलीय. आपण बायकोला शोधत बसणार, भावावर पाळत ठेवणार आणि रस्ता चुकणार, हेच त्याला हवंय."
"म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की आता आपण हेच करून त्याला गाफील करायचं?" राजे विचारात पडून म्हणाले.
"यस. शिंदे तुम्ही त्याला मिळेल अशा जागी आपला मायक्रोफोन लावून आलात ना?" रमेशनं विचारलं. शिंदेंनी मान डोलावली. "त्यांना गाफील गाठणं हाच उपाय आहे." रमेश स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला.
"पण जर हे दोघे भाऊ पार्टनर्स आहेत तर तुम्ही गेल्या वेळेस फक्त बबनलाच कसं पकडलंत?" राजेंनी विचारलं.
"गेल्यावेळी मी बबनवर पूर्ण माहिती गोळा केली होती. सगळ्या खबर्‍यांकडून बबनबद्दल सगळी माहिती येत होती पण बबनपर्यंत प्रत्यक्ष काहीच पोचत नव्हतं. फार चलाखीनं चोरीच्या गाड्यांमधून ड्रग्जचा धंदा चालवतात हे भाऊ. चोरीच्या गाड्यांची गॅरेजमध्ये दुरूस्ती आणि कायापालट करायचा, खोट्या नेमप्लेट्स लावायच्या आणि काळ्याबाजारात विक्री किंवा ड्रग्जच्या वाहतुकीसाठी वापर करायचा. मग मी तब्बल सहा महिने ह्या झोपडपट्टीत फिल्डिंग लावली आणि बबनच्या शेजारच्या गॅरेजवाल्याला चोरीच्या गाड्यांसाठी पकडलं. तोही चोरच पण बबनइतका पोचलेला नव्हे. त्याला पकडल्यावर आम्ही इथला वावर कमी करून टाकला आणि हे दोघे गाफील झाले. मग एक दिवस मोठ्या डीलची टीप घेऊन गगननं माणूस पाठवला. आणि त्याचा माग काढून आम्ही बबनला गाठला आणि बबनवर पाळत ठेवून डील होताना रंगेहाथों पकडलं. पण दुर्दैवानं त्यांच्या गाड्या चोरीच्या नव्हत्या, म्हणून फक्त बबनच गजाआड झाला आणि गगनपर्यंत आम्ही काहीच पोचवू शकलो नाही."
"पण मग आता कोऑर्डिनेशन कसं साधताहेत हे भाऊ?"
"मीपण तोच विचार करतोय." रमेश विचारात पडला आणि एकदम म्हणाला, "हे सगळं बबन जेलमध्ये असतानाच ठरलेलं असणार. जेलमधून पळण्याचा प्लॅन ठरल्यावरच. सर, तुम्हाला जेलमधल्या सगळ्या कम्युनिकेशनचा ऍक्सेस मिळेल ना? त्यावरून आपल्याला बराच काही अंदाज येऊ शकतो."
राजेंचा चेहरा आधी उजळला आणि मग पडला. रमेशच्या नजरेतून ते सुटलं नाही.
"काय झालं सर?"
"मला काही परमिशन्स रन कराव्या लागतील." राजे सारवासारव करत होते हे रमेशच्या लक्षात आलं.
"सर, एक गोष्ट विचारू?" रमेशनं राजेंचा अंदाज घेत विचारलं.
"विचारा."
"आपण फक्त बबन महाडिकचाच का विचार करतोय? एक केंद्रीय मंत्र्यांचा खुनी, एक कुख्यात चिटफंड घोटाळेबाज आणि एक नक्षलवादी असे तीन हायप्रोफाईल कैदी पळालेले असताना आपण फक्त बबन महाडिकचा का विचार करतोय?"
"कारण मला तेव्हढंच सांगितलं गेलंय. बाकी तिघांचा तपास वेगळं पथक करतंय." राजे म्हणाले.
"कोण?"
"ते कुणालाच माहित नाहीय."
"पण हे इंटररिलेटेड आहे, एकत्र तपास का केला जात नाहीय?"
"तो तुमचा आमचा प्रश्न नाही."
"पण मग जेलमधली कम्युनिकेशन्स?"
"मी परमिशन्स मिळवायचा प्रयत्न करतो, पण माझ्या मते त्याशिवायच आपल्याला पुढे जावं लागेल." राजे शून्यात बघत म्हणाले.
रमेश विचारात पडला. त्याला हे सगळंच विचित्र वाटत होतं.

-----

"बोला मालक." नरेंद्र गॉगल टेबलावर काढून ठेवत म्हणाला.
"हा फोटो आणि हे नाव."
हॉटेलचा मालक आणि नरेंद्र मालकाच्या प्रायव्हेट केबिनमध्ये बसून बोलत होते.
"प्रणव क्षीरसागर." नरेंद्रनं नाव वाचलं. "२५ लाख द्यायला तयार झाला आहात एव्हढं काय बिघडवलंय ह्यानं तुमचं?"
"ब्लॅकमेल करतोय मला तो."
"कशावरून?"
"तुम्हाला काय करायचंय?"
"हा माणूस खरंच मरण्यालायक आहे का? हे मला पटल्याखेरीज मी ही सुपारी घेणार नाही."
"काहीही काय? सुपारी किलर आहात का शहेनशहा आहात."
"तो तुमचा प्रश्न नाही. हे काम मी करावं असं वाटत असेल तर मला पूर्ण माहिती असणं भाग आहे. नाहीतर दुसरा माणूस शोधा."
"पण मग नंतर तुम्ही मला ब्लॅकमेल करू लागलात तर? तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा?"
"तुमच्याकडे पर्याय आहे?" नरेंद्र त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला. गांजलेला मालक नवा सुपारी किलर शोधण्याच्या फंदात पडणार नाही ह्याची नरेंद्रला पूर्ण कल्पना होती.
"त्याचं असं झालं.." मालकानं सांगायला सुरूवात केली.

-----

बरोब्बर तीन वाजत आले होते. नरेंद्र त्या गेटसमोर जाऊन उभा राहिला. सिक्युरिटी कॅमेराजचं सर्किट चेकिंग आणि मेंटेनन्स चालू होता. इंदूरमधल्या सर्वांत मोठ्या वकीली फर्मचं ऑफिस होतं ते. 'वर्तक आणि शर्मा असोसिएट्स' बरेच छोटेमोठे वकिल आणि भरपूर क्लायंट्सची ये-जा सुरू होती. नरेंद्र त्यांच्यासारखाच काळा कोट घालून होता. वेगळेपण दर्शवणारा गॉगल काढून त्यानं खिशात टाकला आणि गेटमधून आत शिरून गर्दीत मिसळून तो मुख्यदरवाजातून आत शिरला. खिशातून एक ऍक्सेस कार्ड काढून ते पंच करून तो खाली मान घालूनच आत शिरला. सिक्युरिटी कॅमेराजचं काम सुरू असल्यानं सगळेच सिक्युरिटीवाले अस्ताव्यस्त फिरत होते. तो शांतपणे जिन्यानं चढून पहिल्या मजल्यावर गेला लंचटाईम सुरू असल्यानं तिथली टेबलं रिकामी होती. तो एका टेबलामागे लपला आणि त्या टेबलावरूनच दुसर्‍या टेबलावर फोन फिरवला. दोन-तीन रिंग्ज झाल्यावर समोरच्या काचेच्या दरवाजासमोरचा गार्ड फोन उचलायला आला आणि नरेंद्र कुणाच्याही नजरेस न पडता ऍक्सेस कार्ड पंच करून राखीव क्षेत्रात शिरला. तिथे फर्मच्या दोन मालकांची ऑफिसेस एकमेकाला लागून होती. लंच टाईम असल्यानं सेक्रेटरी जागेवर नव्हती. ह्यावेळेस फक्त शर्मासाहेबच केबिनमध्ये असतात. केबिनचा दरवाजा उघडून तो आत शिरला आणि त्यानं दरवाजा आतून बंद केला. शर्मासाहेबांनी वर पाहिलं आणि ते काही बोलण्याच्या आतच नरेंद्रनं कोटाच्या खिशातून बंदूक काढली आणि सलग चार गोळ्या झाडल्या. शर्मासाहेब जागच्याजागी गतप्राण झाले. गोळ्यांच्या आवाजानं गार्ड धावत आला आणि दरवाजा ठोकू लागला. दरवाजा तोडेस्तोवर नरेंद्रकडे तीन-चार मिनिटं होती. शर्मासाहेबांच्या आणि वर्तकसाहेबांच्या केबिनच्यामधोमध एक तिजोरी होती ज्यावर बोटांच्या ठशानंच उघडायची सोय होती. १०० पैकी ९९ वेळा माणसं तिजोरी उघडल्यावर स्कॅनरवरचा ठसा पुसत नाहीत. त्याप्रमाणे नरेंद्रनं खिशातून छोटं प्लास्टिक काढून तो ठसा घेतला आणि तो ठसा वापरून ती तिजोरी उघडली. त्यातली सगळी कागदपत्र घेऊन फोल्ड करून पँटमध्ये अडकवली आणि चटकन टेबलामागे गेला. खिडकीला ग्रिल्स होते, पण एअरकंडिशनरला नव्हते. लाथेनं त्यानं एअरकंडिशनर बाहेर ढकलला आणि त्या फटीतून तो बाहेर डोकावला. समोर कंपाऊंड वॉल होती ज्याच्या पलिकडे एक नाला होता. एसी पडल्याचा आवाज आल्याबरोबर कंपाऊंड वॉलवरून एक दोरी त्याच्यासमोर आली आणि त्यानं ती दोरी धरल्याबरोबर रेखानं कंपाऊंड वॉलवरून पलिकडे उडी मारली. त्याबरोबर नरेंद्रही ओढला गेला आणि गार्ड दरवाजा उघडून आत आला.
जेव्हा खून करून नामानिराळं राहायचं असतं तेव्हा सगळ्यांत उत्तम मार्ग म्हणजे दुसर्‍या कुणावर तरी खुनाचा आळ आणणं आणि तो जर रोज भांडणारा असंतुष्ट पार्टनर असेल तर अजूनच उत्तम. नरेंद्र आणि रेखानं गेला महिनाभर ह्या सगळ्याची तयारी केली होती. वर्तकसाहेबांचा वीक पॉईंट होता एस्कॉर्ट्स आणि अशाच एका सर्व्हिसच्या थ्रू रेखा त्यांना भेटली. गोड बोलून दोन तीन भेटींमध्ये ऑफिस आणि तिजोरीबद्दलची जुजबी माहिती मिळवली आणि सिक्युरिटी सिस्टमची माहिती पाळत ठेवून पूर्ण केली. ऑफिसात सुट्टीवर गेलेल्या माणसाचं ऍक्सेस कार्ड चोरलं आणि तीन भेटी होऊनही वाट पाहायला लावून शेवटी खुनाच्या दिवशी दुपारी वर्तकसाहेबांना हॉटेलात रूम बुक करायला सांगून बोलावलं.
खुनाचा आळ दुसर्‍यावर घालतानाही सरळ सरळ फ्रेम केल्यासारखं दिसेल असं करण्यात अर्थ नसतो. पुरावेही अगदी सटल असायला हवेत. त्याप्रमाणे खुनाच्या दोन दिवस आधी लेजर बीम मारून दोन सिक्युरिटी कॅमेरे नरेंद्रनं निकामी केले. सिक्युरिटी कॅमेरांमध्ये गडबड होतेय हे समजून वर्तकसाहेबांनी सिक्युरिटी कॅमेरांच्या मेंटेनन्सची ऑर्डर दिली. मग बरोब्बर ठरल्याप्रमाणे सगळं घडलं आणि पोलिसांनी वर्तकसाहेबांना अटक केली कारण तिजोरी शर्मासाहेबांच्या ठशानं उघडली ह्याचा अर्थ कुणीतरी विश्वासाचं केबिनमध्ये गेलं असावं असा पोलिसांचा अंदाज कारण नरेंद्रनं ग्लोव्हज घातल्यामुळे इतर कसलेही ठसे कुठेही नव्हते. आणि सिक्युरिटी कॅमेरे मेंटेनन्स करायची ऑर्डर वर्तकसाहेबांची आणि वर्तकसाहेबांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली असली तरी खोट्या नावानं केली होती आणि ऐनवेळी रेखानं फोन करून त्यांना एस्कॉर्ट कंपनीच्या रेग्युलर मीटपॉईंटवर बोलावल्यामुळे त्यांच्याजवळ प्रवासात असल्यामुळे ऍलिबी नव्हती. मीटिंग पॉईंट ऑफिसजवळच होता आणि पोलिस चौकशीत रोझी नावाच्या ज्या एस्कॉर्टबद्दल वर्तकसाहेब बोलत होते, तशी कुणी एस्कॉर्ट रजिस्टर्डच नसल्याचं एस्कॉर्ट कंपनीनं सांगितलं.

क्रमशः

7/11/2011

मृत्युदाता -२

भाग -१ वरून पुढे

"इन्स्पेक्टर रमेश कुठे बसतात?" एक उंचसा, मध्यम बांध्याचा सावळा इसम विचारत होता.
हवालदार शिंदे त्याला घेऊन रमेशच्या टेबलाकडे गेले.
"नमस्कार, मी एसीपी बिपिन राजे."
"ओह्ह.. सर!" रमेशनं सॅल्यूट केला. शिंदेंनीही गडबडून सॅल्यूट केला.
"रिलॅक्स." राजे हसत म्हणाले.
"शिंदे, हे एसीपी राजे. सीबीआयकडून आलेत. एका केससाठी त्यांना आपली मदत हवीय."
"पर्टिक्युलरली तुमची!" राजे नजर रोखून म्हणाले.
"एनीटाईम सर. बसा ना! शिंदे, चहा सांगा साहेबांसाठी." रमेश खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाला.
शिंदे गेल्यावर राजेंनी हातातली फाईल रमेशसमोर ठेवली.
"मला कमिशनर साहेबांनी थोडं ब्रीफिंग दिलं होतं." असं म्हणत रमेशनं फाईल उघडली आणि पहिल्या पानावरच्या फोटोवर त्याची नजर स्थिरावली.
"ह्याला ट्रॅकडाऊन करण्यात मला तुमची मदत हवीय." राजे म्हणाले.
"सर" नजर वर करत रमेश म्हणाला, "टेल मी द होल स्टोरी."
राजेंनी एक नर्व्हस हास्य केलं. "गेल्या आठवड्यात येरवडा सेंट्रल जेलमधून मनुष्यबळ विकास मंत्र्यांचा खुनी पळाला ही बातमी तर जगभर झालीय आता. तर त्याच्यासोबत जे तीन अजून कैदी पळालेत त्यातला एक हा आहे."
"ते मीही ऐकलं, पण चौघांपैकी सुरूवात ह्याच्यापासून का? हा मला पडलेला प्रश्न आहे." रमेश शांतपणे म्हणाला.
"हे बघा इन्स्पेक्टर, ते जाणून घ्यायची तुम्हाला खरंच काही आवश्यकता नाही. ह्याला पकडण्यासाठी मला तुमची मदत हवीय, कारण तुम्हीच ह्यापूर्वी ह्याला पकडलेलं होतं." राजे थोडे वैतागल्यागत वाटले.
रमेश त्यांच्याकडे निरखून पाहत होता. "असो. थोडी पार्श्वभूमी कळली असती तर त्याच्या मूव्हमेंट्सची भाकितं करणं सोपं झालं असतं एव्हढंच. पण राहू दे. आपण काहीच माहित नाही असं समजून सुरूवात करू."
राजेंनी फक्त एक नर्व्हस हास्य केलं.
रमेशला हे प्रेशर ओळखीचं होतं, फक्त ग्रेड वेगळी होती एव्हढंच. शिंदे चहा घेऊन आले. ते चहा ठेवून जात असता रमेशनं त्यांना खूण केली आणि ते तिथेच बसले. राजेंच्या कपाळावर पडलेली सूक्ष्म आठी रमेशच्या नजरेतून सुटली नाही.
"हा तपास शिंदेशिवाय अपुराच राहिल सर." रमेश म्हणाला.
राजेंनी फक्त हसून मान डोलावली.
"बबन महाडिक ऊर्फ मेकॅनिकला शोधण्याची पहिली जागा म्हणजे त्याच्या धंद्याची जागा. सर्वप्रथम आपल्याला त्याच्या भागात, अर्थात धारावीला जायला हवं."
रमेशनं निघण्याची तयारी सुरू करताच राजे म्हणाले, "पण काही प्लॅन वगैरे?"
"रिलॅक्स सर, तो तिथे आपल्याला अजिबात सापडणार नाही." राजेंच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिह्न पाहून तो पुढे म्हणाला, "तो आत्ता नक्कीच शहरात नसेल, तुम्ही आठवडाभरानंतरची गोष्ट करताय, तो धोक्याच्या वेळेस महिनोन्महिने धंद्याकडे फिरकत नाही. पण काहीतरी धागा नक्कीच हाती लागेल. चार-दोन माणसं उलटीपालटी करावी लागतील."
"पण वर्दीतच चलणार तिथे?" राजेंनी विचारलं.
"काही ठिकाणी वर्दीची वट चालते तर काही ठिकाणी जिगरीची, पण काही ठिकाणी दोन्ही लागतं, ही त्यातलीच एक जागा." रमेश हसत म्हणाला आणि उठून उभा राहिला.

-----

तो रेस्टॉरंटच्या एका कोपर्‍यात कॉफी पित बसला होता. पण त्याचं लक्ष कॉफीकडे कमी आणि दरवाज्याजवळच्या टेबलावर बसलेल्या सुटाबुटातल्या माणसाकडे जास्त होतं. नुकताच गल्ला चेक करायला आलेला मालक एकटक त्याच्याकडे पाहत होता. तिशीचा, मध्यम बांध्याचा, डोळ्यांवर काळा गॉगल चढवलेला तो कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता.
सुटातल्या माणसाची प्रत्येक हालचाल तो टिपत होता आणि त्याची प्रत्येक हालचाल मालक.
"नाव काय तुमचं?" मालक त्याच्या टेबलावर बसत म्हणाला.
"अं.." त्याची तंद्री एकदम भंग पावली.
"नाव नाव.." मालक तोंडभर स्मित करत म्हणाला.
"नरेंद्र." तो शांत नजरेनं मालकाच्या डोळ्यांत डोळे घालत म्हणाला.
"तो चष्मा काढता का जरा. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय." मालक हसत म्हणाला.
"माझे डोळे आलेत."
"आय कॅन टेक अ रिस्क."
तो लगेच उठून उभा राहिला, "तुमच्याकडे गिर्‍हाईकांना प्रायव्हसी द्यायची पद्धत नाही का?" तो जोरातच बोलला जेणेकरून आजूबाजूच्यांचं लक्ष वेधलं जाईल.
मालक त्याला हाताला धरून बसवत म्हणाला, "सॉरी सॉरी. एक काम होतं तुमच्याकडं."
"पण मला तुमच्याशी कसलंही काम नाही. हे घ्या तुमच्या कॉफीचे पैसे." तो टेबलावर पन्नासची नोट फेकत उठला.
"साहेब, कॉफीचे पासष्ट होतात." मालक बोलला.
"हं हं ठीक आहे." त्यानं वीसची एक नोट काढून टेबलावर फेकली. "बाकीचे टीप म्हणून ठेवा."
"हाहा.. ओके ओके.. बाय द वे, त्या साहेबांना सांगू का की तुम्हाला भेटायचंय म्हणून त्यांना. तोवर बसा इथे." मालक त्या सुटातल्याकडे निर्देश करून म्हणाला.
नरेंद्रनं गॉगलमागूनच एक तिखट कटाक्ष टाकला आणि मुकाट्यानं खाली बसला.
"तुम्ही केव्हापासून त्यांच्यावर नजर ठेवून आहात ते मी पाहतोय." मालक डोळे मिचकावत म्हणाला.
त्यानं मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
"तुम्ही पीआय आहात?"
"पीआय?"
"प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर."
"ओह्ह.. नाही नाही.. मी.." हीच वेळ होती ही ब्याद घालवायची. "मी कॉन्ट्रॅक्ट किलर आहे." तो शांतपणे म्हणाला आणि मालकाच्या चेहर्‍यावरचे भाव निरखू लागला.
मालक दोन क्षण विचारात पडला आणि म्हणाला, "परफेक्ट. मला वाटलंच होतं. तुमच्या कॉफी पिण्याच्या स्टाईलवरून आणि गॉगलवरून आणि.. मोज्यामधल्या छोट्या गनवरून."
त्यानं एकदम पँट सारखी केली. फासे उलटे पडले होते.
"माझं तुमच्याकडे तसलंच एक काम आहे." मालक डोळा मारत म्हणाला.
तेव्हढ्यात तो सुटातला माणूस उठून जाऊ लागला.
"माफ करा मला जावं लागेल." तो उठू लागला.
"ते साहेब आमचे रेग्युलर कस्टमर आहेत. त्यांचा मोबाईल नंबरही ठेवतो आम्ही." मालक.
त्यानं एक हात कपाळावर ठेऊन मान खाली केली आणि मोबाईलवरून काही मेसेज पाठवला. दरवाज्याजवळच्या दुसर्‍या टेबलावर बसलेली ती उठली आणि सुटातल्यापाठोपाठ बाहेर पडली.
"बोला. काय हवंय तुम्हाला." त्रासलेल्या स्वरात तो बोलला.
"ह्याचा मृतदेह." मालक मोबाईलवर एक फोटो दाखवत म्हणाला.
".." त्याला काय बोलावं तेच सुचेना.
"मग काय? करणार की.."
"हा घ्या फोन. लावताय की मी लावून देऊ? बंदूक मात्र बिना ओळखीची कुठेही चालते एव्हढं लक्षात असू द्या."
"सॉरी सॉरी. पण माझं हे काम खरंच अर्जंट आहे हो."
"हे काय टॅक्स रिटर्न किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक वाटली तुम्हाला?" तो पुरता वैतागला होता.
"मी कामासाठी माणूस कसा शोधायचा तेच बघत होतो गेले काही दिवस. तुम्ही अनायासेच हाती लागलात. मग करणार ना माझं काम. मी २५ लाख द्यायला तयार आहे."
त्याचे डोळेच विस्फारले गेले. क्षणभर काय बोलावं तेच त्याला सुचेना. मग सावरला आणि म्हणाला, "मी असं अनोळखी माणसांकडून कामं घेत नाही. तुमचा नंबर देऊन ठेवा मी उद्यापर्यंत तुम्हाला फोन करीन. हो की नाही ते तेव्हा पाहू."
मालकानं त्याच्याकडे कार्ड सरकवलं. ते घेऊन तो लगेच उठला आणि बाहेर पडला.

"आज फारच फालतूपणा झाला. नवशिक्यासारखा वागलास तू." ती चरफडत होती.
"इट हॅपन्स. ती जागाच तशी होती. सगळीच गिर्‍हाईकं मला उच्च्भ्रू गुन्हेगार वाटत होती. अन त्यातून, आपली पैशाची अडचण दूर व्हायचा मार्ग सापडलाय मला."
"डोन्ट टेल मी. तू कॉन्ट्रॅक्ट किलींग करणार आहेस?" तिचे डोळे विस्फारले होते.
"मी गंभीरपणे विचार करतोय. जर ज्याला मारायचंय तो मरण्याच्याच लायक असेल आणि हे काम करण्याचे आपल्याला पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे?"
"तुला वेड लागलंय? कुणी मरण्याच्या लायक आहे की नाही हे ठरवणारा तू कोण?"
"माझ्या निवडीवर आणि निर्णयक्षमतेवर कधीच कुणी विश्वास दाखवला नाही अन मी आयुष्यातून उठलो. आता जर माझ्या निवडीवर माणसांची आयुष्य संपणार असतील तर तो काव्यात्म न्याय ठरेल. बीसाईड्स, मी नाही मारलं तर कुणी दुसरा मारेलच की."
"ही सैतानी मनोवृत्ती आहे. मी ह्यात तुझ्यासोबत नाही."
"ठीक मग आपल्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी पैसे कुठून आणायचे ते सांग."
तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. तो तिच्याशेजारी जाऊन बसला.
"विश्वास ठेव माझ्यावर. मी काही चुकीचं करणार नाहीये." ती अजून तशीच बसली होती. "माझ्यावर आजवर कुणीच विश्वास ठेवला नाही. तू पहिलीच. एकदा विश्वास ठेवलास आणि आपण इथवर आलोय. अजून एकदा फक्त."
तिनं त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं.
तो पण हसला आणि उठून उभा राहिला. "वर्तकसाहेबांचं रूटीन पूर्ण रेकॉर्ड झालं की नाही?"
तिनं मानेनंच होकार दिला.
"सूट बाकी मस्त होता त्यांचा. कुठून शिवतात काही कल्पना आली का?" तो डोळे मिचकावत म्हणाला.

क्रमशः

7/05/2011

मृत्युदाता -१

"मला माफ कर आई. खरंच असं काही व्हावं अशी इच्छा नव्हती आई.. तू अन बाबांनी जी स्वप्न पाहिली होतीत ती पूर्ण करावीशी नेहमीच वाटत होती पण.. नाही जमलं आई!" त्याचा बांध फुटेल अशी आता त्याला भीती वाटू लागली.
"असं का बोलतोस? अजूनही सगळं ठीक होईल रे.. तू परत ये रे आता... तुला पाहायचंय एकदा.." आजूबाजूच्या एव्हढ्या गदारोळातही आईचा सद्गदित स्वर फोनवरूनही त्याला स्पष्ट जाणवला.
"आता फार उशीर झालाय आई... मला जावं लागेल.एक लक्षात ठेव नेहमी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आई."
"ते सांगायची गरज आहे का?" आई आता रडतच होती.
"बाबांना दे पटकन."
"अरे पण चाललायच कुठे?"
"बाबांना दे.." त्याचा आवाज थोडासा रूक्ष झाला.
"विकू.."
"बाबा.. मला माफ करा.. मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही. पण.. पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा."
"अरे काय बोलतोयस तू? असं का बोलतोयस? निर्वाणीचं असल्यागत." आणि एकदम त्यांच्या उरात धडकीच भरली.
"टाटा बाबा!" त्यानं चटकन फोन कट केला.
बाबांनी कॉलर-आयडी चेक केला पण तिथे ब्लॉक्ड नंबर म्हणून दाखवत होतं.
डोळ्यांवरचा गॉगल उतरवून त्यानं डोळे पुसले. आजूबाजूला एक नजर फिरवली. भर उन्हाळ्यातल्या रणरणत्या दुपारीसुद्धा लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मराठवाड्यात राजकारण पिकतं म्हणतात ते खरं असल्याचं त्याला जाणवलं. त्यानं गॉगल परत चढवला आणि एका कोपर्‍यात बिसलेरीच्या पाण्याचे मोठे कंटेनर्स ठेवलेले होते, तिथे तो गेला. उन्हाळ्यामुळे तिथे बरीच लगबग होती. मोबाईलवर काहीतरी चाळे करताकरता बुटाच्या मागच्या भागानं एका विवक्षित ठिकाणी त्यानं उकरायला सुरूवात केली. तीन-चार इंच खणल्याबरोबर त्याच्या पायाला काहीतरी जाणवलं. तो थांबला. मोबाईलवर त्यानं एक नंबर टाईप केला आणि दोन मिनिटं तो नंबरकडे फक्त बघत राहिला. डोळ्यांच्या कडा पुन्हा पाणावत होत्या. त्यानं वर पाहिलं.
माननीय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री उत्तमराव बेळे-पाटील भाषणाला सुरूवात करत होते. आणि त्यांच्यासमोरचा अथांग जनसमुदाय आता बराचसा शांत आणि सुनियोजित झाला होता. भाषण सुरू झाल्यामुळे पाण्याच्या कंटेनर्सची आवक-जावक थंड पडली होती. काळ्या सफारी सुटातले सुरक्षारक्षक वॉकीटॉकी घेऊन मैदानाच्या चौफेर नजर फिरवत फिरत होते आणि फक्त प्रशिक्षित नजरेला दिसतील असे बिन-सफारीसुटातले साध्या वेशातले खाजगी सुरक्षारक्षक माणसांच्या गटांमध्ये मिसळून नजर ठेवून होते. मैदानांच्या प्रवेशद्वारांशी कसून तपासणी करणारे पोलीस आणि मेटल डिटेक्टर्स होते. सफारी सुटांच्या कमरेची पिस्तुलं शर्टावर आलेल्या फुगवट्यामुळे कमीअधिक प्रमाणात दिसत होती मात्र बिन-सफारीसुटवाल्यांचे शोल्डर होल्स्टर त्यांच्या ढगळ शर्टांमुळे दिसत नसले तरी प्रशिक्षित नजरेला त्यांच्यातल्या एकदोघांच्या खांद्यावर शर्टाखाली दिसणार्‍या काळ्या पट्ट्यावरून लक्षात येत होते. व्यासपीठावर मंत्रीमहोदयांसोबत गावच्या सरपंचापासून ते राज्याच्या पालकमंत्र्यापर्यंत सगळे छोटेमोठे पक्षपदाधिकारी बसलेले होते. आणि मंत्रीमहोदयांच्या पोडियमच्यामागे दोन महागातले सफारी सूट कमरेच्या पिस्तुलावर हात ठेवूनच उभे होते. आणि ह्या सर्वांखेरीज प्रचंड जनसमुदायाला रोखून धरणारे पोलीस हवालदार, व्यासपीठाच्या दोन्ही बाजूस उभे असणारे दोन सब-इन्स्पेक्टर्स आणि व्यासपीठामागे गाडीत बसलेला एसपी आणि एक इन्स्पेक्टर. छोटं गाव असल्यामुळे व्यवस्थित सिक्युरिटी कॅमेरे लावण्याची तसदी घेण्यात आलेली नव्हती पण रेकॉर्डसाठी म्हणून कॅमेरांचा देखावा केलेला होता. त्याचं लाईव्ह फूटेज एसपीच्या गाडीत होतं, पण ह्या कॅमेरांच्या रेंजमध्ये अनेक रिकाम्या जागा (ब्लाईंड स्पॉट्स) होत्या. आणि त्यातल्याच एका जागी आत्ता तो उभा होता.
त्यानं पुन्हा मोबाईलकडं पाहिलं आणि एकदाच 'कॉल' बटण दाबलं आणि फोन कानाला लावला. रिंग बराच वेळ वाजत होती. त्याचा जीव खालीवर होत होता. शेवटी फोन उचलला गेला आणि पलिकडून तो आवाज आला.
"हॅलो"
".." त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. ते सगळे दिवस त्याच्या नजरेसमोरून सर्रकन गेले.
"हॅलो"
".." तो अजूनही निःशब्दच होता. तिचा आवाज तो कित्येक दिवसांनी ऐकत होता. ते सगळं जणू कालपरवाच घडल्यासारखं त्याला वाटलं.
"कोण बोलतंय?" तिनं निर्वाणीचं विचारलं.
"वसू.." त्याच्या तोंडून शब्द फुटले.
".." आता निःशब्द व्हायची पाळी तिची होती.
"मी बोलतोय."
"हं." काही सुचलं नाही की तिचा ट्रेडमार्क हुंकार.
"कशी आहेस?"
".."
"मला ठाऊक आहे हे.. तुला फोन करणं, चूक आहे.. पण.. एकदाच.. शेवटचं."
"हं... शेवटचं" ती हलकंसं विषादपूर्ण हसली.
"हाहा.." त्यालाही तेच आठवलं. "पण ह्यावेळेस खरंच शेवटचं.. म्हणजे एकदम शेवटचं शेवटचं."
"नेहमीप्रमाणे आपण कारणाशिवाय लांबड लावतोय."
"अरे हो." तिचा बोलणं तोडण्याचा प्रयत्न त्याला जाणवला. "तुला काही सांगायला फोन केला." आणि एकदम आपण काय बोलणार आहोत हे आठवून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तिच्याशी बोलताना त्याला कसलंच भान राहिलं नव्हतं.
"काय?"
त्यानं घसा खाकरला. "वसू.. मला माफ कर गं!"
"कशासाठी?"
"सगळ्याचसाठी. जे जे काही झालं, त्या सगळ्यासाठी. माझ्यामुळे जी लोकं दुखावली गेली त्यासाठी आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे, तू दुखावली गेलीस त्याच्यासाठी!"
"अरे पण.."
"बोलू दे मला. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही असं फार वाटतं कधी कधी. पण खरं तर कुणाचसाठी काहीच करू शकलो नाही मी. अगदी स्वतःसाठीही. आज फक्त तुझ्याकडे माफी मागायला मी फोन केला आणि तुझा आवाज शेवटचाच कानात साठवायला."
"विवेक.." तिनं काही बोलण्याआधी फोन कट झाला होता.

त्यानं सिमकार्ड बाहेर काढलं. खिशातून लायटर काढला आणि सिमकार्ड पेटवलं. ते जवळपास पूर्ण जळल्यावर त्यानं जमिनिवर फेकलं आणि त्याचा चुराडा केला. मोबाईलची बॅटरी त्यानं आपल्या सफारीच्या खिशात टाकली आणि खिशातून दुसरं एक सिमकार्ड काढून मोबाईलमध्ये भरलं. जमिनीतल्या खड्ड्यातून पिशवी काढून त्यानं त्यातलं सामान खिशात टाकलं आणि सिमकार्डचा चुराडा आणि ती पिशवी असं दोन्ही त्या खड्ड्यात टाकून वरची माती पुन्हा सारखी केली. घड्याळ्याच्या पट्ट्यावरच्या पिनेनं मोबाईलची बॉडी उघडली आणि आतमध्ये आधीच तयार करून ठेवलेल्या दोन वायर्स शॉर्ट केल्या. मोबाईल परत सारखा केला आणि मैदानाच्या दुसर्‍या बाजूकडे चालू लागला. भाषण अर्ध्यावर आलं होतं. मैदानाच्या दुसर्‍या बाजूस खाजगी सुरक्षारक्षकांची कंट्रोल रूम होती. तिथे दोन साध्या वेषातले हवालदारही तैनात होते.
जिथे प्रचंड मोठी अन गुंतागुंतीची सुरक्षा व्यवस्था असते तिथे फक्त योग्य पेहराव आणि देहबोली असेल तर सहज काम बनतं. तस्मातच तो सफारी सूट आणि गॉगल घालून कंट्रोलरूमकडे गेला आणि हवालदारांकडे ढुंकूनही न बघता सरळ आत गेला. सरकारी सुरक्षेला कमी लेखणं ही खाजगी सुरक्षारक्षकाची पहिली खूण. त्यामुळे हवालदारांनी साहजिकच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा हवापाण्याच्या गप्पांमध्ये मग्न झाले. तो आत शिरून थेट मुख्य बोर्डकडे गेला आणि आपला मोबाईल तिथल्या टेबलावर सहजच ठेवत म्हणाला,
"सगळ्या वॉकीटॉकीचे सिग्नल्स नीट येताहेत ना हे पाहायला साहेबांच्या पीएंनी सांगितलंय."
"हो चेक करतो." मुख्य कंट्रोलर संशयानंच त्याची ओळख करायचा प्रयत्न करू लागला.
"तुम्ही..?"
"बरं झालं की फक्त साहेबांना मेसेज पाठवा." त्याचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच त्याच्या पाठीवर थाप मारून आपला मोबाईल तिथेच ठेवून तो बाहेर पडला.
कंट्रोलरला त्याचा राहिलेला मोबाईल दिसला, त्यानं तो उचलला आणि काही माहिती मिळतेय का म्हणून चालू करायचा प्रयत्न केला, पण तो चालू होत नव्हता. त्यानं तो तिथेच कोपर्‍यात सरकवून ठेवला.
"कोण होता काय माहित? कुठले साहेब ते पण बोलला नाही." कानाला ब्ल्यूटूथ कम रेडिओ रिसिव्हर कम ट्रान्समिटर लावत कंट्रोलरची वाक्य ऐकत तो कंट्रोलरूमच्या तंबूबाहेर पडला आणि हवालदारांकडे पुन्हा दुर्लक्ष करत तो पुढे चालू लागला. त्यानं खिशातून एक सिगरेट काढली अन ती काढताना त्याच्या खिशातून काहीतरी पडलं. तो आत्ता ब्लाईंड स्पॉटमध्ये नव्हता. तो जिथे उभा होता तिथे आजूबाजूला ३०-४० माणसं होती अन तो मैदानाचा व्यासपीठापासून दूरचा कोपरा होता. त्यानं सिगरेट शिलगावली आणि एक झुरका मारून खाली फेकली. पायानं न विझवता, पायानं थोडीशी सारखी केली आणि तो माणसांमधून मैदानाच्या दुसर्‍या कोपर्‍याकडे वाट काढत चालू लागला. ब्ल्यूटूथवर त्याला कंट्रोलरूममधले संवाद ऐकू येत होते. त्यानं घड्याळाकडे नजर टाकली. दुपारचा एक वाजत आला होता. लोकांच्या पोटात कावळे कोकलण्याची सुरूवात झाली होती. हवालदार, सफारीसूट आणि बिन-सफारीसूट सगळेच वैतागले होते. मंत्रीमहोदयही भाषण आटोपतं घेण्याच्या मूडमध्ये होते. तो मैदानाच्या मध्याला पोचला आणि तिथून तिरक्या रेषेत कमीतकमी सुरक्षारक्षक मधे लागतील अशा बेतानं आत्मविश्वासानं व्यासपीठाच्या उजव्या बाजूकडे चालू लागला. त्याच बाजूला मंत्रीमहोदय भाषण देत होते. सिगरेट जसजशी जळत होती, ती वातीच्या जवळ जात होती आणि तो व्यासपीठाच्या जवळ. तो माणसांच्या तिसर्‍या रांगेजवळ पोचला. आता त्याच्यापुढे दोन रांगा, मग दोन हवालदार, त्यापुढे बॅरिकेड मग पाच फूट मोकळी जागा आणि मग एक सब-इन्स्पेक्टर आणि त्याच्याजवळ जिना. त्यानं परत एकदा घड्याळाकडे पाहिलं. मंत्रीमहोदयांचं भाषण संपत आलं होतं.
'सिगरेट आधीच विझली तर नसेल? कुणी विझवली तर नसेल? कुणाच्या लक्षात तर आलं नसेल?' त्याच्या डोक्यात प्रश्नांचं जंजाळ उभं राहिलं. तो 'प्लॅन बी' काय असेल ह्याचा विचार करू लागला. एव्हढ्यात ते झालं. मैदानाच्या दुसर्‍या कोपर्‍यात एकदम गलका झाला. माणसांमध्ये गोंधळ उडाला. लवंगी फटाक्यांच्या छोट्याशा माळेनं आपलं काम केलं होतं. ब्ल्यूटूथवरून त्याला कंट्रोलरूममधला गोंधळ ऐकू येत होता. अर्धे सफारीसूट घटनास्थळी धावले होते आणि ब्लाईंड स्पॉट नसल्यानं पोलिसांनाही एसपीच्या जीपमधून ऑर्डर्स सुटल्या होत्या. समोरचा सब-इन्स्पेक्टर वॉकीटॉकीला लागला होता. आणि दोन्ही हवालदार कोपर्‍यातल्या गर्दीच्या दिशेनं पाहत होते. त्यानं ब्ल्यूटूथ कम रेडिओ रिसिव्हर कम ट्रान्समिटरचं बटण दाबल्याबरोबर तिकडे कंट्रोलरूममध्ये मोबाईल ब्लास्ट झाला. मंत्रीमहोदयांनी भाषण थांबवलं आणि त्यांना त्यांच्यामागचे सफारीसूट दोन्हीबाजूंनी कव्हर करून जिना उतरू लागले एव्हढ्यात तो पुढे झेपावला. हवालदारांची नजर चुकवून बॅरिकेड ओलांडून तो सब-इन्स्पेक्टरच्या बाजूनं पुढे सरकला. कुणाला काही कळायच्या आत तो जिन्यावरून उतरलेल्या मंत्री अन त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांसमोर उभा होता. त्यानं खिशातून ९मिमिची बंदूक काढली आणि पापणी लवायच्या आत दोन्ही सफारीसुटांच्या हातांवर एक एक गोळी घातली. लाथेनं त्या दोघांना बाजूला सारून त्यानं मंत्रीमहोदयांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. मंत्र्यांचं धूड जिन्यावर कोसळलं. त्यानं पटकन पुढे होऊन त्यांच्या मानेवर हात ठेवून ते मेल्याची खात्री केली आणि लगेच ती बंदूक स्वतःच्या डोक्याला लावून ट्रिगर ओढला.
गोळी झाडली गेली, पण हवेत आणि सब-इन्स्पेक्टरच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तो मंत्रीमहोदयांच्या मृतदेहावर कोसळला. सब-इन्स्पेक्टरनं त्याचे दोन्ही हात मागे दाबून धरले आणि उरल्यासुरल्या सगळ्या सुरक्षारक्षकांचा त्याला घेराव पडला. बीडमधल्या प्रचारसभेत सत्ताधारी पक्षाचा ताकदवान मंत्री प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता. पण विवेकचं काम अर्धवटच झालं होतं.

क्रमशः

6/19/2011

प्रिझन ब्रेक - आदिम मानवी भावभावनांचा चित्तथरारक कोलाज

परदेशी सिनेमांमधून नेहमीच दिसलेलं आणि भारतीय सिनेमामध्ये पूर्वी बरेचदा सांकेतिक पद्धतीनं दिसणारं किंवा सहसा नसणारंच आणि हल्ली हल्ली खुलेपणाने सामोरं येणारं एक अंग म्हणजे आदिम मानवी भावभावना. ज्याला रॉ इमोशन्स असं म्हणता येईल. म्हणजे उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यापासून अस्तित्वात असलेल्या मूलभूत अशा भावना. सूड, द्वेष, हिंसा इत्यादी. भारतात आधीच्या काळात बहुतेककरून सिनेमे कौटुंबिक मनोरंजनाचा सोहळा म्हणून अभिप्रेत असल्याने त्यामध्ये अशा आदिम भावभावनांचं उघड प्रदर्शन म्हणजे एकतर सेन्सॉरची कात्री किंवा प्रौढ प्रमाणपत्र किंवा पडेल पिक्चर हे नक्की समजलं जायचं. पण हळूहळू परदेशी सिनेमांची भारतीय सिनेप्रेक्षकाला ओळख आणि सिनेमाची केवळ कौटुंबिक मनोरंजनापलिकडे जाऊन एक कला आणि कधीकधी समाजमनाचा आरसा म्हणूनही होऊ शकणारा वापर ह्यामुळे आधी उभी राहिलेली समांतर सिनेमाची चळवळ आणि त्यानंतर कालौघामध्ये समांतर आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा ह्यांच्यातील कमी होत गेलेली दरी असा एक प्रवास घडला. मग काही उत्तम दिग्दर्शकांनी मुख्य प्रवाहातीलच सिनेमात ह्या आदिम भावनांना स्थान देऊन प्रेक्षकांकडून स्वीकृतीही मिळवून दाखवली. अजूनही प्रवास सुरूच आहे आणि ह्या पद्धतीची दृश्य सिनेमांत कितपत दाखवावीत किंवा कितपत दाखवू नयेत किंवा कुठलं प्रमाणपत्र देण्यात यावं ह्यावर बरेच वादप्रवाद आहेत, त्यांत मी पडत नाही. मुद्दा हा की, पाश्चात्य सिनेमा आणि अतिपूर्वेकडचा सिनेमा हे दोघेही ह्या पद्धतीच्या कथांमध्ये फार पुढे निघून गेलेले आहेत.
पाश्चात्य, मुख्यत्वेकरून अमेरिकन दूरदर्शनदेखील कथावस्तू, कथा, तांत्रिक बाजू, अभिनय आणि बजेट यामध्ये भारतीय दूरदर्शनच्या अनेक प्रकाशवर्षे पुढे आहे. त्यांची पातळी बरेचदा सिनेमाच्या जवळपास जाणारी असते. तेव्हा त्यांनीही कथावस्तूंमध्ये उपरोल्लेखित भावनांना हात घातला नसता तर नवलच होतं. अमेरिकन दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर अनेकानेक उत्तमोत्तम मालिका चालतात ज्यामध्ये निखळ विनोदी, कौटुंबिक विनोदी ते अगदी चित्तथरारक आणि भयकथा हाताळणार्या मालिकांचाही समावेश होतो. आणि अनेक मालिका इतक्या उच्च दर्जा गाठतात की अनेक सिनेमेही त्यापुढे फिके वाटावेत.
नमनाला एव्हढं घडाभर तेल ओतण्याचं कारण की मध्यंतरी 'प्रिझन ब्रेक' ही अमेरिकन मालिका माझ्या पाहण्यात आली आणि अशा मालिका भारतात का बनू शकत नाहीत किंवा भारतातल्या मालिका जशा आहेत तशा का? असे काही प्रश्न मला पडले आणि वरील विचारशृंखलेसोबत ते विझूनही गेले. पण 'प्रिझन ब्रेक' मात्र डोक्यातून जात नाही. त्यामध्ये दाखवलेली, अंगावर सरसरून काटा आणणारी दृश्य असू देत किंवा चित्तथरारक पाठलाग असू देत किंवा कधीमधी डोळ्यांत पाणी आणणारं दृश्य असू देत, 'प्रिझन ब्रेक' इज अ क्लास अपार्ट!

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीच्या भावाची हत्या केल्याबद्दल 'लिंकन बरोज'ला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली असते. पण तो निर्दोष असल्याची खात्री असलेला त्याचा धाकटा भाऊ 'मायकल स्कोफिल्ड' त्याच्या सुटकेचे अन्य सर्व प्रयत्न थकल्यावर एक धाडसी निर्णय घेतो. लिंकनला ज्या जेलमध्ये ठेवलंय त्या जेलची रचना केलेल्या फर्ममध्येच मायकलनं एकेकाळी काम केलेलं असतं, ती ब्ल्यू प्रिंट आणि अन्य बरेच क्ल्यूज स्वतःच्या अंगावर गोंदवून मायकल खोटा बँक दरोडा घालतो आणि लिंकनला सोडवायला त्याच जेलमध्ये येतो.
मायकलप्रमाणेच लिंकनच्या निर्दोषत्वावर विश्वास असलेली वकील व्हेरॉनिका आणि जेलमधले अनेक चित्रविचित्र सहकारी ह्यांच्या रगाड्यामध्ये एक एक रहस्य उलगडत जातं. लिंकनला फसवण्यामागे असलेली 'कंपनी' वगैरे प्रकार अमेरिकन स्पाय नॉव्हेल्स वगैरेंमधून बरेचदा हाताळले गेले असले तरी मालिका चित्तथरारक करण्यामध्ये इथे ही संज्ञा बराच हातभार लावते.
जेलमधलं आयुष्य इतक्या ग्राफिक पद्धतीनं दाखवलंय की बरेचदा ते अंगावर येतं. आणि जेलमधल्या घडामोडींमध्ये आपल्याला इतका रस निर्माण होतो की बरेचदा जेलबाहेरची दृश्य लवकर संपावीत असं आपल्याला वाटत राहतं.
जेलमधली सगळीच महत्वाची पात्रं अगदी चौथा सीझन संपेपर्यंत मायकलच्या आयुष्यात अशी ना तशी येत-जात राहतात.
प्रिझन ब्रेकच्या कथेबद्दल जास्त सांगून त्यातली मजा घालवण्यापेक्षा मी त्यातल्या महत्वाच्या पात्रांबद्दल थोडं लिहितो, कारण कथा जरी उत्तम असलीच तरी प्रिझन ब्रेकची खरी जान त्यातली पात्रं आणि त्यांच्या बालपणामुळे त्यांचे बनलेले स्वभाव, त्यांचे आपसातले संबंध, हेवेदावे, मैत्री, प्रेम हेच सर्वकाही आहे.
१. लिंकन बरोज - पूर्ण मालिका घडण्याचं कारण. बाप सोडून निघून गेल्यावर आजारी आईची काळजी आणि धाकट्या भावाची जवाबदारी वयाच्या १४ व्या वर्षीच खांद्यावर पडल्यानं जगावर रागावलेला असा काहीसा माणूस.मग आईच्याही अकाली मृत्यूनंतर स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवून धाकट्या भावाला शिकवणारा पण स्वतः मात्र छोटे मोठ्या नोकर्या, गुन्हेगारांची संगत अशामध्ये वहावत गेलेला आणि नंतर पत्नीच्या मुलासोबत सोडून जाण्यामुळे अजूनच निराश असा आयुष्यात पूर्णतया हरलेला एक माणूस. ह्याची पूंजी दोनच, एक्स-गर्लफ्रेंड व्हेरॉनिका, जी केवळ लिंकनच्या वाईट संगतींमुळे त्याच्यापासून दुरावलीय, पण त्यानं खून केलेला नाही ह्यावर विश्वास असणारी एकमेव व्यक्ती. आणि धकाटा भाऊ मायकल जो आधी लिंकनच्या वागणुकीमुळे नाराज असतो पण जेव्हा व्हेरॉनिका त्याला लिंकनच्या उपकारांची माहिती करून देते, जे मायकललाही माहित नसतात, तेव्हा मायकल बदलतो. आणि एकदा लिंकनशी बोलल्यावर त्यालाही त्याच्या निर्दोषत्वाची खात्री पटते आणि तो त्याला बाहेर काढण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याचा निर्णय घेतो.
२. मायकल स्कोफिल्ड - लिंकनचा धाकटा भाऊ आणि एका अर्थाने मालिकेचं प्रमुख मध्यवर्ती पात्र - हिरो. मायकल हा बुद्धीनं तल्लख आणि मानसिकदृष्ट्या कणखर असा एक स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, जो केवळ भावाच्या प्रेमापोटी आणि त्याच्या उपकारांची जाणीव ठेवून आपलं व्यवस्थित बसलेलं करियर सोडून जेलमध्ये जातो आणि अनेक लोकांची आयुष्य पालटवतो. जसजशी मालिका पुढे सरकते, त्याच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू सामोरे येत जातात. मायकलची व्यक्तिरेखा बहुरंगी असली तरी मुख्यत्वेकरून सकारात्मक आहे अन त्यामुळेच इतर अधिक नकारात्मक पैलू असलेल्या व्यक्तिरेखांसमोर थोडीशी कृत्रिम वाटण्याचा संभव आहे.
३. डॉ. सारा टॅनक्रेडी - मायकल आणि लिंकनच्या तुरूंगातली डॉक्टर. बिनआईची सारा राजकारणी बापासोबत लहानाची मोठी झालेली. त्यामुळे आई-वडलांची माया न मिळाल्यानं ड्रग्जच्या आहारी जाते. पण मग एक दिवस डॉक्टर असूनही ड्रग्जच्या अमलाखाली असल्यानं जेव्हा तिला एका व्यक्तिचा इलाज करता येत नाही, तेव्हा ती बदलायचं ठरवते आणि बदलते. समाजसेवेला वाहून घेते. मनानं खंबीर पण एका कोपर्यात तितकीच हळवी सारा राज्याच्या गव्हर्नरची मुलगी असल्यानं तुरूंगातली कमजोर कडी असल्याचं मायकल व्यवस्थित हेरतो. हिच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करूनच मायकल तुरूंगात आलाय. त्याच्या प्लॅनमध्ये साराचा वापर करणंही समाविष्ट आहे. पण ह्यादरम्यानच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. तरी मायकल आपल्या उद्दिष्टापासून ढळत नाही आणि साराचं आयुष्य मात्र आमूलाग्र बदलून जातं.
४. फर्नांदो सुक्रे - मायकलचा तुरूंगातला सेल पार्टनर. इथे मायकलकडे चॉईस नसतो, तुरूंगात जो कोणीही पार्टनर मिळेल त्याच्याशी जुळवून घेणं भाग असणार ह्याची त्याला पूर्ण कल्पना असते. मग केवळ आपल्या होणार्या बायकोला महागडं गिफ्ट देण्यासाठी एका दगाबाज मित्राच्या फूस लावण्यावरून दुकान लुटताना पकडला गेलेला सुक्रेच नेमका मायकलला सेलमेट म्हणून भेटतो. नेमक्या वेळी दुकानावर पोलिस पाठवणारा हा दगाबाज मित्र सुक्रेच्या जेलमध्ये असण्याचा वापर करून त्याच्या प्रेयसीशी लग्न करायच्या प्रयत्नात असतो. आणि सुक्रे लवकरात लवकर बाहेर पडायच्या, कारण त्याची प्रेयसी गरोदर असते आणि ती त्याची शिक्षा संपेस्तो म्हणजे अजून दोन वर्षं थांबू शकत नाही. सुरूवातीला संशय घेणारा सुक्रे नंतर मजबुरीमध्ये मायकलला सामील होतो पण नंतर ते दोघे एकमेकांच्या जीवाला जीव देणारे मित्र बनतात.
५. व्हेरॉनिका डोनोव्हन - लिंकनची एक्स गर्लफ्रेंड आणि वकील. लिंकन आणि मायकलची लहानपणापासूनची मैत्रीण. लिंकनपासून दुरावलेली असली तरी तिचं लिंकनवर अजूनही प्रेम असतं. त्यामुळेच त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो. अन त्यातूनच ती लिंकनला वाचवायला जंग जंग पछाडते, ह्यातूनच तिचं ठरलेलं लग्न मोडतं आणि शेवटी जीवही जातो.
६. थिओडोर 'टी-बॅग' बॅगवेल - अलाबामासारख्या एक्स-कॉन्फेडरेट स्टेटमध्ये एका वंशवादी आणि विक्षिप्त बापाच्या घरी जन्म घेतलेला टी-बॅग हा जन्मतःच विक्षिप्त असतो. मालिकेत विविध भागांमध्ये, तुकड्या-तुकड्यांमध्ये टी-बॅगची पार्श्वभूमी उलगडत जाते. त्याचा बाप स्वतःच्या मानसिक बिकलांग बहिणीवर बलात्कार करतो आणि तिचा त्याच्यापासून झालेला मुलगा म्हणजे टी-बॅग. त्यात बाप लहानग्या टी-बॅगकडून सगळ्या डिक्शनर्या आणि बरीच पुस्तकं तोंडपाठ करून घेतो, त्याला मुलाला प्रेसिंडेंट बनवायचं असतं. पण दारूडा अन गुन्हेगार बाप टी-बॅगवरसुद्धा लैंगिक अत्याचार करतो. चुकीच्या संबंधातून जन्मलेला टी-बॅग प्रजननक्षम नसतो. पण त्यामुळे आणि वाईट बालपणामुळे तो गुन्हेगार बनतो. आणि स्त्रिया आणि बालकांवर अनेक लैंगिक गुन्हे, खून इत्यादी करतो. मानवी जीवाची बिलकुल पर्वा नसलेला आणि स्वतःचा जीव वाचवायला कुठल्याही थराला जाणार्या, तल्लख बुद्धीचा टी-बॅगला अपघातानेच मायकलचा प्लॅन कळतो आणि तो मायकलला ब्लॅकमेल करून जबरदस्तीनं त्याच्या प्लॅनचा हिस्सा बनतो.
७. अलेक्झांडर महोन - अलेक्झांडर महोनचं पात्र दुसर्या पर्वामध्ये मालिकेत येतं. तुरूंग फोडून जेव्हा सगळे कैदी भूमिगत होतात, तेव्हा एफबीआयचा एजंट महोनची एंट्री होते. अत्यंत तल्ल्ख बुद्धीचा महोन वेगानं मायकलचा सगळा प्लॅन समजून घेऊ लागतो. महोन आणि मायकलची बुद्धिमत्ता तोडीस तोड असते. पर्वाच्या सुरूवातीपासून क्रूरपणे एकेका पळालेल्या कैद्याला मारणार्या महोनची दुर्बळता हळू हळू पुढे येत जाते. एका सिरियल किलरला पकडण्यात अपयश येत असल्यानं तो करत असलेले सगळे खून आपलीच जवाबदारी असल्याचं जाणवून महोन खचत जातो आणि मग एक दिवस त्या खुन्याला पकडल्यावर त्याच्यावर केस चालणं चुकीचं आहे असं वाटून तो त्याला मारून टाकतो आणि त्याचं प्रेत आपल्याच घराच्या अंगणात पुरून टाकतो आणि खुनी कधी सापडलाच नाही असं सांगू लागतो. पण हे सत्य आपल्या कुटुंबापासून दडवणं शक्य होत नसल्यानं तो बायको आणि मुलाला काळजावर दगड ठेवून घराबाहेर काढतो. आणि ह्या टेन्शनमुळे तो ड्रग ऍडिक्टदेखील बनतो. त्याचं नेमकं हेच रहस्य हेरून 'कंपनी' त्याला ब्लॅकमेल करते आणि मायकल आणि लिंकनसकट सर्व कैद्यांना संपवायसाठी त्याचा वापर करते. अत्यंत जबरदस्त असा एजंट महोन कंपनीच्या हातचं बाहुलं बनून राहतो. पण पुढे पुढे त्याची कथाही वेगळी वळणं घेते. महोनच्या व्यक्तिमत्वाचेही अनेक पैलू नजरेस पडत जातात.
ह्या पात्रांखेरीज, एजंट पॉल केलरमन, जॉन अब्रुझ्झी, सी-नोट, ब्रॅड बेलिक, ट्वीनर, हेवायर इत्यादी पात्र आहेत ज्यांच्या कथादेखील गुंतवून ठेवतात आणि कथेला नवी वळणं देतात.
मुळात ही एक चित्तथरारक कथा असूनही माणसांच्या भावनांना ह्या मालिकेत सर्वाधिक महत्व आहे. त्यांचे आपापसातले संबंध, आपापसातलं वागणं, बोलणं, सर्व्हायव्हल म्हणजेच जगण्यासाठीची धडपड इत्यादी गोष्टी बरेचदा आपल्या मध्यमवर्गीय, सुखवस्तू मानसिकतेला धक्का लावून जातात. अर्थात बरेचदा बर्याच गोष्टी अतिरंजित होतातही. पण मुळात मनोरंजनासाठी बनवलेल्या गोष्टीमध्ये असं तर घडणारच.
पहिलं अन दुसरं पर्व झाल्यावर तिसर्या पर्वाची सुरूवात जोरात होते, अपेक्षा फार वाढतात, पण नेमका त्याच वर्षी 'रायटर्स गिल्ड स्ट्राईक' झाल्याने तिसरं पर्व मालिकेच्या निर्मात्यांना गुंडाळावं लागलंय. त्यामुळे बर्याच त्रुटी राहून गेल्यात आणि शेवटाकडे भ्रमनिरास झाल्यासारखं होतं. चौथ्या पर्वामध्ये मात्र थीम एकदम बदलून मायकल आणि कंपनी कैदी न राहता गुप्तहेर बनतात आणि मालिकेतला अतिरंजितपणा वाढत जातो. पण तरीदेखील थोडंफार तारतम्य बाळगल्यानं हे पर्व सुसह्य होतं आणि मालिका संपते. मालिकेचा शेवट अपेक्षा पूर्ण करत नाही तरीही अगदी अपेक्षाभंगही होत नाही.
कलाकारांच्या बाबत बोलायचं तर अभिनेता म्हणून दोन माणसं प्रचंड भारी कामं करतात. एक म्हणजे 'टी-बॅग'च्या भूमिकेत रॉबर्ट नेपर आणि एजंट महोनच्या भूमिकेत विलियम फिक्टनर.
टी-बॅगसारखा विक्षिप्त क्रूरकर्मा रॉबर्ट नेपरनं ज्या स्टाईलनं रंगवलाय त्याला तोड नाही. आपण टी-बॅगचा पराकोटीचा तिरस्कार करतोच पण एका क्षणी अलाबामामध्ये उद्विग्न नजरेनं दूरवर पाहत बसलेल्या टी-बॅगची क्षणभर कणवही आल्यावाचून राहत नाही इतकं प्रभावी काम नेपरनं केलंय. आणि एजंट महोनचा सुरूवातीचा थाट नंतर दुर्बळतेकडे जेव्हा झुकत जातो आणि मायकलकडूनही कुरघोडी सुरू झाल्यावर चहूबाजूंनी अडकलेला हतबल महोन फिक्टनर ठळकपणे उभा करतो. महोन जेव्हा क्रूरपणे एकेका पळालेल्या कैद्याला संपवतो तेव्हादेखील त्याचं प्रत्येक काम तो केवळ काही कारणानं करतोय ह्याची जाणीव आपल्याला छळत राहते. त्याचं कुशाग्र बुद्धीचं असणं आणि तितकंच मानसिकदृष्ट्या दुर्बळ आणि असंतुलित असणं एकाच वेळी फिक्टनर नेमकं उभं करतो. पुढे पुढे त्याच्यात घडलेला बदल आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू महोनला सकारात्मक बनवतात पण ते तसं आपल्या मनावर बिंबवण्यासाठी कलाकार तितकाच ताकदीचा हवा, फिक्टनर ते बिंबवण्यात यशस्वी होतो. महोनचे थरथरणारे हात आणि अस्वस्थ नजर आणि बॉडी लँग्वेज केवळ बघण्यासारखे आहेत.
लिंकन बरोजच्या भूमिकेतला डॉमिनिक पर्सेल आणि मायकल स्कोफिल्डच्या भूमिकेतला वेंटवर्थ मिलर बरीच छाप सोडतात. त्यातही स्कोफिल्डचे गूढ डोळे आणि निग्रही नजर मिलरनं अगदी अचूक पकडलीय. पण ही दोन्ही पात्रं बहुतांशी सकारात्मक असल्यामुळे इतर सर्व वारंवार बदलणार्या व्यक्तिरेखांच्या गोतावळ्यात एकसुरी वाटू लागतात. पण तरीही वेळोवेळी घडणारी स्कोफिल्डची मानसिक द्वंद्व मिलरनं व्यवस्थित दाखवलीत आणि बरोजचं धटिंगणासारखं असणं आणि रांगड्या भावभावना पर्सेलला शोभून दिसतात. डॉ. सारा ही एकमेव पूर्ण सकारात्मक व्यक्तिरेखा आहे आणि त्यामध्ये सारा वेन कॅलिज योग्य वाटते. तिचा सोज्वळ चेहरा भूमिकेला पूरक आहे. फर्नांनो सुक्रेच्या भूमिकेत अमॉरी नोलास्को बर्याच प्रसंगांमध्ये थोडा रिलीफ आणतो. त्याचा वावर बरेचदा तणाव कमी करतो.
बाकी सर्वच कलाकारांच काम थोड्याफार फरकानं उत्तमच जमलंय. पण खरी तारीफ हवी ती मालिकेचा कर्ताधर्ता पॉल श्युअरिंगची. मालिकेची संकल्पना आणि बरीचशी निर्मिती त्याचीच. अर्थात दोन बंधूंनी त्यांच्या अनुभवावर आधारित पुस्तकावरून मूळ संकल्पना चोरल्याचा दावा केलेला असला तरी ती कथा फुलवून जो चार पर्वांच्या मालिकेचा डोलारा उभा केलाय त्याचं श्रेय पॉलला द्यायलाच हवं.
एकंदरित एका वेगळ्याच प्रकारच्या थरारक आणि धक्के देणार्या अनुभवाबरोबरच मानवी भावनांच्या चिरफाडीसाठी 'प्रिझन ब्रेक' ही मालिका पाहायलाच हवी. पण अर्थातच अनेक हिंसक दृश्य, शिवराळ भाषा आणि नैराश्य आणू शकेल अशी कथा असल्यानं दुबळ्या मनाच्या लोकांनी पाहण्यात अर्थ नाही.

-------

हा लेख जालरंग प्रकाशनच्या वर्षा विशेषांक २०११ मध्ये देखील इथे वाचता येईल.

5/09/2011

चारोळ्या - पुन्हा एकदा

चालत्या बोलत्या दुःखांना
मधेच वाचा फुटते
एकमेकांचं ऐकून
ओठांवर हास्याची लकेर उमटते

----

उडत्या पक्ष्याला कधीकधी
जमिनीचा विसर पडतो
जागा कळून पुन्हा ओळख पटताना
चार-दोन पंखांचा बळी जातो

----

वेड्या वार्‍याला आपल्या शक्तीचा
पुरेसा अंदाज नसतो
समुद्राबरोबरच्या निरागस खेळात
कुणाचा उभा संसार कोलमडतो

----

एकदा गिरक्या घेता घेता
उकाड्यानं पृथ्वीला चक्कर आली
लाख-दोन लाख माणसं मेली अन
शे-दोनशे खडबडून जागी झाली

----

खोटं बोललं म्हणून शिक्षा भोगायला
मी काय आता लहान आहे?
खरं बोललो तर शिक्षा होईल भाऊ
माझा भारत महान आहे

----

4/25/2011

अक्षय कुमार यास अनावृत पत्र

अक्कीदादा (तुझ्याबद्दल प्रचंड आपुलकी वाटते त्यामुळे, तुम्हाला/आपल्याला वगैरे न वापरता थेट अरे दादावर घसरतोय),
तुला मराठी उत्तम कळतं आणि बोलता येतं त्यामुळे बिनधास्त मराठीमध्ये पत्र लिहितोय. बर्‍याच वर्षांपासून तुला पत्र लिहिण्याची इच्छा होती, पण नेहमी काही ना काही कारणामुळे राहून गेलं. प्रत्येक वेळी पत्र लिहिण्याचं कारण आणि विषयही वेगळे होते. आज मात्र अनावृत पत्र लिहितोय कारण मी जे लिहू इच्छितो ते थेट तसंच्यातसं तुझ्या इतर असंख्य चाहत्यांनाही वाटतं.
मी तुझा एक असा पंखा आहे जो कधीच फिरायचा बंद होणार नाही. तुझ्या असंख्य कट्टर चाहत्यांपैकी एक. तुझ्या 'खिलाडी' सिनेमापासून तुझ्याशी जडलेलं नातं 'जीना इसी का नाम है' कार्यक्रमातल्या तुझ्या मुलाखतीनं घट्ट झालं. ही मुलाखत पाहेपर्यंत एक मार्शल आर्ट एक्सपर्ट ऍक्शन हिरो वाटणारा तू थेट आपल्यातला वाटू लागलास. तुझं सामान्य बालपण आणि त्यातनंच पुढे येऊन तू मिळवलेलं असामान्य यश आणि तरीही आपल्या सामान्य बालपणाशी कधीच तुटू न दिलेली नाळ हे सगळं तुझ्याशी कनेक्ट करून गेलं. मग तुझे 'मिस्टर बॉन्ड' पासून ते 'अंगारे', 'जानवर' इत्यादी इत्यादी सारे सिनेमे पाहिले. काहींची नावे विसरलोही असेन, पण टीव्हीवर तुझा सिनेमा आहे आणि मी चॅनेल बदलला असं कधी झालं नाही. तू अनेक सामान्य ते तद्दन भिकार सिनेमे केलेस, हे तू स्वतःही मान्य करतोस. किंबहुना तुझा हाच सच्चेपणा मला भावतो. नसीरूद्दीन शाह हा असामान्य कलावंत तुझ्याबरोबर दोन-तीन मसाला सिनेमांमध्ये होता. तेव्हा तू छोटा स्टार होतास. सुपरस्टार झाल्यानंतर एकदा नसीरूद्दीन शाहनं एका मुलाखतीत तुझा उल्लेख केला होता. तो म्हणाला, "अक्की स्वतः मला म्हणतो की मला ठाऊक आहे मी चांगला अभिनेता नाही, पण मी नेहमीच उत्तम देण्याचा प्रयत्न १०० टक्के करतो. आणि अक्की खरंच सिनेमाला जेव्हढं देतो, जेव्हढी मेहनत करतो ती काबीलेतारीफ आहे." ती मुलाखत पाहिल्यावर मला तुझा आणखीनच अभिमान वाटलेला.
मी तसा एलिटिस्टही गणला जाऊ शकतो असा सिनेरसिक आहे. फेस्टिव्हल फिल्म्स किंवा आर्ट फिल्म्सवर तासनतास विचार करणं आणि मग अगम्य भाषेत लिहिणं हा माझा छंदही आहे. पण तरीही तू माझा आजच्या पिढीतला सर्वांत आवडता अभिनेता आहेस, ह्याचं लोकांना आश्चर्य वाटतं. कधीकधी मलाही वाटतं, पण हे सत्य आहे. एक मिथुनदा आणि त्यानंतर थेट तू. तू केलेली असंख्य लफडीसुद्धा मला तुझा फॅन होण्यापासून कधीच रोखू शकली नाहीत. त्याचं कारण कदाचित हे आहे की तू कधी त्यांपासून दूर पळायचा प्रयत्न केला नाहीस. जे जसं होतं तसंच तू मान्य केलंस. एका वर्षांत अर्धा डझन फ्लॉप सिनेमे दिल्यावर तू एकदा सिनेसंन्यासाची भाषा केली होतीस, पण मग 'जानवर' आला आणि तू निर्णय बदललास. योग्यच केलंस कारण नाहीतर 'हेराफेरी' आला नसता आणि हिंदी सिनेमाला एक वेगळा प्रकार मिळाला नसता. 'हेराफेरी' येईपर्यंत कधीच सिनेमाचे मुख्य नायक 'कॉमेडी' करत नव्हते. त्यासाठी स्पेशल पात्र असायची. पण 'हेराफेरी' नं मुख्य नटाला 'कॉमेडीयन' बनता येतं हे सिद्ध केलं. त्यानंतर अशा सिनेमांची लाट आली, त्यातच तू ही काही सारखे सिनेमे केलेस पण 'हेराफेरी' पुन्हा जमला नाही. चालायचंच.
पण तू त्यात वाहावत गेलास, ह्याचं वाईट वाटतं. शाहरूख खानमध्ये जर काही अभिनय असलाच तर तो चोपडा-जोहर कंपनीनं झाकून टाकला आणि तुझ्यातला कलाकार तू स्वतःच. मिथुनदांनीही त्यांच्या उतारवयात तेच केलेलं. माझ्या दोन सर्वाधिक आवडत्या नटांचा एकसारखा रस्ता पाहून थोडंसं आश्चर्य आणि वैषम्य वाटतं. तुझे 'कॉमेडी' च्या नावाखाली हल्ली जे सिनेमे येतात, ते पाहून अपार यातना होतात. मी तरीदेखील भारतात असेन तर तुझा प्रत्येक पिक्चर थेटरात जाऊन पाहतोच. पण खरंच माझ्यासोबत येणार्‍या मित्रांना तुला नावं ठेवताना पाहून काळीज तुटतं. तुला आपला मानलंय त्यामुळे प्रत्येक वेळी तुझी बाजू घेऊन मी भांडत राहीनच. पण आता खरंच बदलाची वेळ आहे रे.
माझ्या मते हिंदी सिनेसृष्टीला मिळालेलं सर्वोत्तम ऍक्शन हीरो मटेरियल तू आहेस. जर हॉलीवूडच्या तोडीस तोड कुणी ऍक्शन हीरो असेल तर तूच आहेस आणि ह्यात कुणीही हरकत घेऊ शकत नाही. पण तू ते सगळं वाया घालवतोस असं वाटतं. तू अभिनेता नाहीस असं नाही, पण तुला जेव्हढा अभिनय येतो त्याच्या एकशतांशाचाही तू वापर करत नाहीस. तुझी गणितं आणि तुझे निर्णय सर्वस्वी तुझेच आहेत आणि ह्या गोष्टीचा मान राखूनच मी सांगतो की तुझी सिनेमांची निवड हल्ली मला कोड्यात टाकते. तू आता मोठा माणूस आहेस त्यामुळे तू थेट सहनिर्माता बनून नफ्यातला हिस्सा घेतोस. मग एव्हढी ताकद हाताशी असताना तू 'थँक यू' आणि 'खट्टा मीठा' सारखे सिनेमे का करतोस? मला तुलना आवडत नाही पण मी तुला बॉलीवूडचा विल स्मिथ मानतो, पण तू असे सिनेमे करत राहशील तर कसं होईल? तुझ्या व्यक्तिमत्वात जादू आहे हे 'खतरों के खिलाडी' सारख्या शोजच्या यशावरून सिद्ध होतं. पण ती जादू योग्य जागी लागत नाही असं नाही वाटत तुला?
आजच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत चाळिशी उलटून गेलेल्या हिरोंचीच चलती आहे, त्यामधलंच एक नाव तू. पण तू इतर सर्वांहून वेगळा आहेस. तुझा रस्ता निराळा आहे आणि तुझी कलाही. तू तुझा आब वेगळ्याच पद्धतीनं राखला आहेस, पण मग ही हुशारी तुझ्या सिनेमांच्या निवडीत का दिसत नाही ह्याचं प्रचंड वैषम्य वाटतं. थेट हॉलीवूडपर्यंत झेप घेण्याची तुझी क्षमता आहे आणि तशी तू घेतलीही असल्याचं मध्यंतरी कानावर आलं होतं. पण मग अचानक ह्या बथ्थड सिनेमांची लाट आली आणि काहीतरी मोठी चूक झाल्यागत जाणवू लागलं.
तुझ्याबद्दल प्रचंड तळमळ वाटते म्हणून एव्हढं सगळं लिहिलं. तू अजून मोठा व्हावंस अशी नेहमीच इच्छा आहे. म्हणूनच एकदा आपल्या सिनेमांच्या निवडीवर लक्ष देऊन पाहा. तू प्रयत्न करतोस हे '८x१० तस्वीर' वरून दिसतंच पण एक प्रयत्न फसला म्हणून प्रयत्न करणं सोडू नकोस. आणि सिनेमामध्ये 'अक्षय कुमार' बनून राहू नकोस, जे शाहरूखचं झालं तेच तुझंही होताना दिसतंय, पण शाहरूखच्या इमेजला(लव्हरबॉय) मरण नाही, हे त्याचं नशीब आणि तुझ्या 'स्ट्रीटस्मार्ट' इमेजला तेव्हढं शेल्फ लाईफ नाही हे तुझं. त्यामुळे लवकरात लवकर ह्या फेजमधून बाहेर पड. माझ्यासारख्या चाहत्यांच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत.
तुझा,
(तुला आणि मिथुनदांना घेऊन 'शॉशँक रिडेम्प्शन'चा रिमेक बनवायचं स्वप्न बाळगणारा चाहता) विद्याधर.

4/21/2011

बर्न नोटीस

'मालिका' ह्या गोष्टीबद्दलच्या माझ्या संकल्पना 'फक्त एका रूपयासाठी' वगैरेंपासून सुरू होऊन 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' पर्यंत, फारतर 'सीआयडी' आणि 'आहट' पर्यंत येऊन थांबतात. आणि इंग्रजी मालिकांमध्ये अगदी लहान असताना जेव्हा 'स्टार प्लस' हे अप्रूप टीव्हीवर लागायचं तेव्हा 'सांता बार्बरा' आणि मजेशीर टायटल ट्रॅकवाली 'नेबर्स' (अर्थातच त्यापुढे काही कळण्याचा किंवा आता आठवण्याचा प्रश्न उद्भवत नाही) एव्हढंच आठवतं. त्यानंतर मूळच्या इंग्लिश पण हिंदीमध्ये डब केलेल्या 'डेनिस द मेनेस', 'डिफरन्ट स्ट्रोक्स', 'आय ड्रेम्ट ऑफ जिनी', 'सिल्व्हर स्पून्स', 'हूज द बॉस' किंवा 'बिविच्ड' ह्या मात्र सगळ्याच लक्षात आहेत. पण हे सर्व आजपासून किमान दहा ते बारा वर्षांपूर्वीचं. त्यानंतर मी 'इंग्रजी मालिका' ह्या प्रकाराच्या कधी वाटेला गेलो नाही. पण मालिका नावाखाली हिंदी-मराठी चॅनेल्सवर जे ही लागतं ते निमूटपणे पाहणं मी कर्तव्यकर्म मानतो. कारण आपली कुठलीही कामं उरकताना सोबत म्हणून चालू ठेवता येण्याजोगं अन मधेच एखादा सीन पाहिला तरी हरकत नसणारं असं काही केवळ मालिकाच देऊ शकते. आणि मालिका ही टीव्हीवरच पाहिली पाहिजे हा माझा आजवरचा अलिखित नियम होता. त्यामुळे अनेक मित्रांनी रेकमेंड करूनही मी कधीही 'फ्रेंड्स' च्या वाट्याला गेलो नाही. अन्यही अशा बर्‍याच मालिकांना मी टांग दिली. पण एक दिवस '३० रॉक' ही इंग्रजी मालिका मी मित्र फारच मागे लागल्यानंतर पाहिली अन प्रथमच 'मालिका' कॉम्प्युटरवरही पाहता येऊ शकते आणि ती प्रत्यक्षात मनोरंजन करू शकते ह्याचा साक्षात्कार झाला. पण माझा मूळ स्वभाव कर्मठ, त्यामुळे '३० रॉक' चे माझ्याजवळचे एपिसोड्स संपल्यावर मी दुसरीकडे कुठेही पाहणं टाळलं. 'फ्रेंड्स' रिक्वेस्टही रिजेक्ट केल्या आणि माझं एकमालिकाव्रत पाळलं.
पण मग गेल्या सुट्टीत भारतात होतो तेव्हा कधीतरी चॅनेल्स बदलताना एका नव्या इंग्रजी मालिकेची जाहिरात दृष्टीस पडली. 'बर्न नोटीस' अशा वेगळ्या नावानं आणि कल्पक जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. इथे परत आलो अन एक दिवस इंटरनेटचे बरेच तास शिल्लक असल्याकारणे चाळा म्हणून बर्न नोटीसचा पहिला सीझन उतरवायला सुरूवात केली. बर्‍याच फाईल्स असल्यानं टप्प्याटप्प्यानं पार्ट टाईम करत दोनेक महिन्यांमध्ये पूर्ण पहिला सीझन येऊन माझ्या कॉम्प्युटरवर पडून राहिला. मध्यंतरी मित्रही 'बर्न नोटीस' ची बरीच तारीफ करत होता, पण नेहमीप्रमाणेच माझा कर्मठपणा अन 'कॉम्प्युटरवर पाहायची मालिका' ह्या विषयाबद्दल माझं औदासिन्य ह्यामुळे मी निवांत होतो. अन एके दिवशी फारच कंटाळा आलेला असताना मी कॉम्प्युटर चाळत होतो तेव्हा हा फोल्डर दृष्टीस पडला. ज्या सिरियलमागे मी बरेच तास घालवले होते, ती पाहू तर कशी आहे अशा अतिशय विरक्त विचाराने मी पहिला भाग सुरू केला.
मायकल वेस्टन हा एक सीआयए चा कॉन्ट्रॅक्टेड गुप्तहेर. जो अमेरिकेसाठी हेरगिरी करतो अन अमेरिकेच्याच असंख्यांपैकी एका सुरक्षायंत्रणेचा भाग आहे, पण थेट सीआयएसाठी काम न करता त्यांचीच काही अंडरकव्हर कामं करतो. पहिल्या भागाची सुरूवातच मायकलच्या नायजेरियातल्या एका छुप्या कामगिरीपासून होते. ही कामगिरी पार पाडताना अर्ध्यातच त्याला अमेरिकन सुरक्षायंत्रणा 'बर्न' करतात. जसं नोकरदारांना 'फायर' केलं जातं, तसंच गुप्तहेरांना 'बर्न' केलं जातं. एखाद्याच्या नावानं 'बर्न नोटीस' बजावली की त्याच्याशी असलेला सरकारचा सर्व संबंध संपला. त्याचा सगळा इतिहास, पैसे रेकॉर्डसमधून पुसलं जातं. अन सरकारला त्याच्यापासून धोका वाटत असेल तर त्याच्या मरणाचाही बंदोबस्त केला जाऊ शकतो. कामगिरीच्या मध्यातच 'बर्न' झालेला मायकल जीव वाचवून पळतो आणि विमानातच अतिदमणुकीनं बेशुद्ध होतो. जेव्हा तो उठतो, तेव्हा तो त्याच्या मूळ शहरात 'मायामी' मध्ये असतो. कामावरचा किंवा कामाशी निगडीत एकही मनुष्य त्याच्याशी संबंध ठेवू शकत नाही किंवा इच्छित नाही आणि त्याच्या 'बर्न' केलं जाण्याची कारणं किंवा 'बर्न नोटीस' कुणी अन का बजावली ह्याचंही उत्तर कुणी देऊ शकत नाही. त्याच्याकडे पैसे नाहीत अन तो शहराच्या बाहेर पडू शकत नाही ह्याची काळजी घ्यायला त्याच्यावर चोवीस तास पाळत आहे. प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि इतर आयडेंटिटी प्रूफ्सही त्याच्याजवळ नाहीत.
पाकिटामध्ये 'इमर्जन्सी कॉन्टॅक्ट' म्हणून एक्स-गर्लफ्रेंडचा नंबर असल्यानं तो बेशुद्ध असताना तिला बोलावलं जातं. तीदेखील गुन्हेगारी टोळ्यांमधली असल्यानं नवं शहर म्हणून निघून येते. मूळ शहर असल्यानं मायकलची कुटुंबवत्सल पण चेनस्मोकर आई आणि छोटेमोठे गुन्हे करणारा भाऊदेखील त्याच शहरात आहेत. आणि ह्यांच्या व्यतिरिक्त एफबीआयचा इन्फॉर्मर असलेला मायकलचा जुना जिगरी दोस्त सॅम (जो मायकलच्या सांगण्यावरून मायकलबद्दलच एफबीआयला खबरी देतो), एव्हढीच ओळखीची लोकं मायकलशी बोलतात.
विचित्र परिस्थितीत अडकलेला मायकल आपल्या 'बर्न' होण्यामागचं रहस्य जाणून घ्यायचा निश्चय करतो आणि त्यादिशेनं पावलं टाकू लागतो. पण ह्या सगळ्यासाठी पैशांची गरज आहे. मग तो बिना लायसन्सचा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बनतो. त्यापुढे प्रत्येक भागामध्ये मायकल आपल्या 'बर्न नोटीस'च्या रहस्याकडे एक एक पाऊल टाकतो आणि त्या त्या भागात एक एक 'मायामी'मधली केस सोडवतो. अशा भन्नाट प्रकारे ही मालिका पुढे सरकते.
मायकल वेस्टनचं काम करणारा 'जेफ्री डोनोव्हन' हा मालिकेची जान आहे. त्याचा बोलका चेहरा अन मिस्किल हास्य मायकलच्या पात्रात रंगत भरतात. एखाद्या वर्षांनुवर्षं जगभर गुप्तहेरी केलेल्या माणसाला शोभेलसं व्यक्तिमत्व आणि अप्रतिम संवादफेक ह्यामुळे मायकल वेस्टन फारसं काही भव्यदिव्य न दाखवताही प्रचंड विश्वसनीय वाटतो. मालिकेचा फॉर्मॅट ज्यामध्ये बर्‍याच प्रसंगांमध्ये पॉज येतो आणि मायकल व्हॉईसओव्हरने एखाद्या होतकरू गुप्तहेराला टिप्स द्याव्यात तशा टिप्स देतो, मायकल साध्या साध्या गोष्टींमधून विविध यंत्र कशी बनवतो किंवा प्रत्यक्षात काहीही न करता टॅक्टिकली भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी कसं पळवतो आणि सगळ्या पात्रांच्या तोंडी असलेले खुसखुशीत संवाद, ह्यांमुळे एका अर्थानं थ्रिलर असलेली मालिकादेखील तणावपूर्ण किंवा नाटकीय न होता मनोरंजक होते आणि तरीही बर्‍यापैकी विश्वसनीय राहते.
मायकलचं पात्र इतक्या विचारपूर्वक लिहिलंय की लेखकाला सलाम करावासा वाटतो. एका भागात मायकल सांगतो 'People with happy families don't become spies. Bad childhood is the perfect background to become a spy. You don't trust anyone, you are used to getting smacked around and you never get homesick.'. मायकलचं बालपण असंच आहे. त्याचे वडील बिलकुल चांगले नसल्याचं आणि मायकलचं त्यांच्याशी वाकडं असल्याचं आपल्याला मायकल आणि त्याच्या आईच्या प्रत्येक संवादातून कळतं. पण त्याच्या आईनं तरीही केवळ मुलांसाठी अनेक वर्षं संसार केलेला आहे. एका प्रसंगात ती मायकलला म्हणते, 'You missed your father's funeral.. by eight years." मायकलचं आईवर प्रेम आहे, कसाही असला तरी भावाबद्दल ओढ आहे पण विचित्र बालपणामुळे तो नात्यांना घाबरतो, त्यामुळे कायम घरापासून आणि नात्यांपासून पळत राहिलाय. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कामाचं कारण देऊन. पण कुटुंबवत्सल आईमुळे मायकलच्या वागण्यातला फरक प्रत्येक भागानुसार गडद होत जातो. "Thirty years of karate, combat experience on five continents, a rating against every weapon that fires a bullet or holds an edge... still haven't found any defence to mom crying into my shirt." मायकलचा हा डायलॉग त्याची व्यक्तिरेखा स्पष्ट करून जातो. वर्षांनुवर्षं जगाच्या कानाकोपर्‍यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितींमध्ये आणि वाईटात वाईट लोकांसोबत आयुष्य घालवलेला गुप्तहेर मायकल अचाट कामगिर्‍या करून एकेक केस सोडवतोच पण एक माणूस म्हणूनही ह्या मालिकेमध्ये पदोपदी दिसत राहतो. त्यामुळेच मी आजवर पाहिलेल्या किंवा वाचलेल्या सर्व गुप्तहेरांमधला माझा सर्वांत आवडता गुप्तहेर हे बिरूद मी मायकल वेस्टनलाच देईन.
पाच दिवसांमध्ये मी 'बर्न नोटीस' च्या पहिल्या सीझनचे पाऊण तासाचे १२ भाग संपवले. आता ह्या सप्ताहांताला दुसरा सीझन आणि कदाचित दोनेक आठवड्यांत आजवरचे सगळे भाग पाहून होतील, पण मायकल वेस्टन आणि त्याच्या जगाचं गारूड उतरणं थोडं अवघडच आहे.

4/05/2011

तो

वैराण रस्त्यावरचा मैलाचा दगड
त्यावर बसलेला तो
आणि जमिनीमध्ये विरघळलेली नजर
डोक्यात केवळ प्रश्न
साथीला भर दुपारी भरून आलेलं आभाळ
आणि तितकंच भरून आलेलं मन
नजर जाईल तिथवर फक्त वैराण रस्ता
पण पावलं पुढं सरकायला नाखुष
अधूनमधून मागे पडलेल्या रस्त्याचा अदमास घेणारे डोळे
कधी काठोकाठ भरून तर कधी कोरडे पडून
अचानकच जसा नेहमी येतो, तसाच
त्याही थांब्यावर 'तो' आला
'ह्या'ला रस्त्याची कधीच गरज का पडत नाही
असा विचारही त्याच्या मनात तरळून गेला
साधंसंच पण आश्वासक हसत त्यानं
खांद्यावर टाकलेला ओळखीचा हात
आणि त्याच्या स्पर्शातली ती ऊब
हजारो जन्मांचा शीण जणू वितळवून टाकणारी
"मागे वळून काय पाहतोस?" 'त्या'नं विचारलं
मागल्या फाट्यावर सुटलेलं बरंच काही आठवलं
"फाटा तरी दिसतो का आता?"
शोधक नजर पुन्हा निराश झाली
"आणि फाट्यापर्यंत पोचेस्तोवरची पावलं?"
निराशेचं रूपांतर वेदनेत झालं
"आता पावलांचे ठसे पाहत अश्रू गाळणार?
की पुढच्या रस्त्यावर नवे ठसे उमटवणार?"
वेदना कमी झाली नाही पण
पुढच्या पावलांसाठीचा जोर आला
नजरेचा मागे वळण्याचा हट्ट कमी झाला नाही
पण पुढे बघायची इच्छा झाली
पुन्हा पुढे वैराण रस्ता, नवनव्या फाट्यांची भीती
मनकवड्या 'त्या'चा हात लगेच पडला खांद्यावरती
पुन्हा ते साधंसंच हसू, 'आहे मी' असं सांगणारं
बिनधास्त पुढे हो असं न बोलून समजावणारं
पावलं पुढे टाकण्याआधी त्यानं 'त्या'ला मिठी मारली
भरून आलेलं आभाळ अखेर एकदाचं बरसलं
वैराण रस्त्याचा दाह थोडा कमी झाल्यागत वाटलं
पहिलं पाऊल टाकून तो एकदा मागे वळला
फाट्याप्रमाणेच 'तो'ही आता तिथे नव्हता
पुढची पावलं टाकताना एकच विश्वास होता
पुन्हा फाटा फुटताना खांदे पडताच सावरायला
'तो' नक्कीच येणार होता

3/27/2011

माणुसकी

तो निर्विकार चेहर्‍यानं गाडी चालवत होता. त्याच्या शेजारच्या सीटवर दोन लहान मुलं खिडकीला टेकून डोळे विस्फारून बाहेरचं दृश्य पाहत होती. मागच्या सीटवर त्या मुलांची आई होती. गाडीची गती सामान्यच होती. प्राप्त परिस्थितीही जास्त वेगास अनुकूल नव्हती अन रस्त्यांची स्थितीही. तो हेच काम गेले कित्येक दिवस करत होता. त्यामुळे त्याच्या चर्येवर किंवा मनोवस्थेवर फारसा परिणाम होत नव्हता. थंडपणे त्यानं गाडी एका ठिकाणी उभी केली आणि गाडीचं इंजिन बंद केलं. एकदम स्मशानशांतता पसरल्यासारखी वाटली. त्यानं एकवार मुलांकडे अन मग मागे बसलेल्या त्यांच्या आईकडे पाहिलं. तिघंही कुठेतरी हरवलेली होती. त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. तो थोडासा खाकरला. मुलांची आई एकदम भानावर आली आणि डोळ्यांतलं पाणी टिपत तिनं त्याच्याकडे पाहून मान हलवली. तो चटकन गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उतरला आणि मुलांच्या बाजूला आला. आधी त्यानं आईचा दरवाजा उघडला आणि ती उतरल्यावर मग मुलांचा दरवाजा. पण आईला आधी उतरवण्याचा त्याचा उद्देश सफल झाला नाही. मुलं वार्‍यासारखी वेगात समोर अथांग पसरलेल्या सिमेंट-विटा-मातीच्या ढिगार्‍याकडे धावली आणि आई फक्त हताशपणे पाहत राहिली. तो दरवाजाही न लावता ते विचित्र दृश्य पाहत उभा राहिला.
रोज थोड्याफार फरकानं अशीच दृश्यं पाहूनही रोज ह्याच क्षणी त्याच्या अंगावर सरसरून काटा येत असे. नजर जाईल तिथवर पसरलेला तो ढिगारा. धरणी अन समुद्राच्या रौद्र रूपाने उद्भवलेल्या दुहेरी नैसर्गिक संकटानंतर उरलेले मानवी संस्कृतीचे अवशेष. त्याखाली न जाणे किती संसार गाडले गेले असतील, किती स्वप्नं मातीत पुरली गेली असतील, किती महत्वाकांक्षा क्षणात जमीनदोस्त झाल्या असतील आणि किती मायेला आसुसलेले जीव थेट धरणीमातेच्या कुशीत विसावले असतील. कशाचाच थांग लागू न शकणार्‍या त्या ढिगार्‍याच्या भयंकर पोकळीमध्ये आपल्या संसारांचे, नात्यांचे किंवा स्वप्नांचे अवशेष शोधणारे ते व्याकुळ जीव रोजच्या रोज पाहताना त्याच्या गणवेषाच्या इस्त्रीआतला माणूस रोज चुरगळला जायचा. दूर दूर नजर फिरवल्यावर फक्त शोधकाम करणारे किंवा आपल्याच भूतकाळामध्ये वर्तमानाशी लढण्यासाठी एक आधार शोधणारी माणसं. पण क्षणात तो भानावरही यायचा. आजही आला. त्यानं स्वतःला सावरलं. दरवाजा बंद केला. गणवेषाचा शर्ट ठीकठाक केला. टोपी नीट केली आणि अदबीनं पुढे झाला. थोड्या अंतरावरून त्या भागातल्या शोधकार्याच्या ऑफिसातून एका कार्यकर्त्याला आणायला गेला.
एव्हढं होईस्तोवर मुलांनी त्यांचं घर एकेकाळी ज्या जागी उभं होतं ती जागा शोधून काढली होती. आणि एक परदेशी पत्रकारांचा गटही कॅमेरांसकट तिथे पोचून सगळं शूट करत होता. "इथे माझी बेडरूम होती. आणि इथे वरती माझं अभ्यासाचं टेबल." मुलगा सांगत होता. एव्हढ्यात मुलगी थोड्या अंतरावरून धावत धावत हातात एक वाळूनं भरलेली स्कूलबॅग घेऊन आली. "मी ह्यामध्ये काहीबाही भरून बाबांसोबत समुद्रावर जायचे." 'समुद्र' ऐकूनच तो क्षणभर दचकला. ती मुलगी अजूनही ती बॅग निरखून पाहत होती आणि मुलगा ढिगारा उपसत होता. आईला कदाचित अश्रूंमुळे सगळं धूसर दिसत असावं, पण तिला समोर तो ढिगारा दिसत नसावा. तिला तिथे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत उभं असलेलं तिचं छोटंसं विश्वच दिसत असावं. एव्हढ्यात तो घेऊन आलेल्या शोधकार्यकर्त्यानं तिला त्या विश्वातून बाहेर आणलं. "तुमच्या नवर्‍याची अजूनही काही माहिती नाही." असं तो कार्यकर्ता तिला पाहताच थेट बोलला. तो इतका वेळ शून्य नजरेनं सगळं पाहत होता. हा संवाद ऐकून तो थोडा संभ्रमात पडला, हा कार्यकर्ता हिला कसा ओळखतो. "हे बघ काय?" मुलगी आईला काहीतरी दाखवत होती. तिला एक मोडलेली फोटो फ्रेम मिळाली होती. त्यामध्ये त्या कुटुंबाचा त्यांच्या कुटुंबप्रमुखासोबतचा फोटो होता. त्या माऊलीनं ती फ्रेम फेकून दिली आणि त्या फोटोवरून एकदा प्रेमानं हात फिरवला. इतका वेळ कडांपर्यंत येऊन थांबलेले अश्रू एकदाचे गालांवरून ओघळले. आत्तापर्यंतची प्रत्येक गोष्ट शूट करणारे कॅमेरामन आता तिच्याकडे कॅमेरा रोखून उभे राहिले. एक स्त्री पत्रकार तिच्याजवळ गेली आणि तिला काहीतरी विचारू लागली. पण तिला इंग्रजी येत नव्हतं मग ती पत्रकार इथे तिथे पाहू लागली. हा प्रसंग पाहत असलेला तो दुभाष्या म्हणून पुढे झाला.
"हा फोटोतला तुमचा नवरा का?"- पत्रकार.
"हो." ती डोळे पुसत म्हणाली. गरज नसतानाही त्यानं भाषांतरित करून सांगितलं.
"तुमची अन तुमच्या नवर्‍याची ताटातूट कशी झाली?"- पत्रकार.
"ते इथल्या आपत्कालीन यंत्रणांचे समन्वयक होते. संकट उद्भवल्यावर इथल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर पडण्याचे मार्ग दाखवण्याची जवाबदारी त्यांची होती. त्यामुळे सगळे नागरिक सुखरूप मार्गस्थ होईस्तो ते बाहेर पडू शकत नव्हते. आम्हाला तिघांना त्यांनी पुढे पाठवलं." भाषांतरित करायचं आहे हे विसरून तो तिच्याकडे पाहतच राहिला.
हजारो लोकांचं सर्वकाही हरवलेल्या त्या ढिगार्‍यांमध्ये अचानकच त्याला माणुसकी सापडली होती.

टीप - जपानच्या भूकंपानंतर चाललेल्या शोध आणि मदतकार्यामध्ये समोर आलेली एक सत्यघटना पाहून ही कथा लिहावीशी वाटली.