2/27/2012

मराठी भाषा दिवस

आज २७ फेब्रुवारी अर्थात आपले कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस आणि अर्थातच 'मराठी भाषा दिवस'. ह्या दिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा देणं ठीकच, पण त्याहूनही जास्त अर्थ तेव्हा येईल, जेव्हा नुसतं ह्याच दिवशी नाही तर सगळ्याच दिवशी आपण 'आपल्या' मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन कसं होईल हे पाहिलं पाहिजे. बरं, मागचं वाक्य बरंच जड आणि ज्याला इंग्रजीत 'क्लिशे' म्हणतात तसं झालं. पण मला बुवा पटतं. पुन्हा मुद्दामच आपली मातृभाषा मराठी म्हटलं नाही. कारण ज्यांची मातृभाषा मराठी नाही, असेही अनेकानेक लोक मराठीवर मनापासून प्रेम करतात आणि तिच्या जतन-संवर्धनासाठी प्रयत्न करतात. तर आज मराठीवर प्रेम करणार्‍या आणि तिला जीव लावणार्‍या सर्वांसाठीच एक महत्वाचा दिवस. मग त्यानिमित्त मी एक प्रयोग करतोय. मराठीत उत्तमोत्तम साहित्य आहे, ते अजूनही फार मोठ्या प्रमाणात जगापर्यंत पोचलं नाहीये. मराठीमध्ये अनेक उत्तम अनुवादक आहेत, जे जागतिक साहित्य मराठीत आणतच आहेत, पण अनेक असेही असतील जे मराठी साहित्य इंग्रजी किंवा इतर जागतिक भाषांमध्ये अनुवादित करतात. तेव्हा आज मी एक प्रतीकात्मक पाऊल म्हणून माझी एक आवडती वि.स.खांडेकरांची लघुकथा 'विजयस्तंभ' इंग्रजीत अनुवादित करतोय. कदाचित आधीही अनुवाद झाला असेल, कल्पना नाही. पण हे केवळ प्रतीकात्मक म्हणून करतोय. मी ना साहित्यातला फार मोठा जाणकार ना अनुवादातला आणि मराठी व वाघिणीचं दूध इंग्रजी ह्या दोन्ही भाषांबद्दल प्रेम, आदर आणि जिव्हाळा ह्यापलीकडे प्रावीण्य नाही, त्यामुळे चूकभूल माफ असावी.

आणि हो 'आपली' मराठी वृद्धिंगत व्हावी आणि ज्ञानभाषा होऊन जगाच्या कानाकोपर्‍यात पोचावी ही सदिच्छा!

अनुवादित कथा -

The Monument

The victorious King paraded into the city with his troops. “Come to me. I am a worshiper of Peace.”, was his message for every orphan, every widow and every cripple.
But no one seemed to believe him.
King was dismayed. He decided to build a huge monument in the city with the inscription of his message.
A huge monument was thus built. A saintly image of the Goddess of Peace was inscribed on it. The Goddess' eyes had motherly affection; its neck adorned with beautiful flowers; the lips had a bright smile; and the hands complete with urns of abundance.
The location was fixed at the centre of the city, so that it would be widely visible. The digging at the site soon started. But while digging, broken pieces of some old construction started to appear. The broken stones had strange shapes inscribed on them.
All the pieces were excavated and sent to a great researcher who lived in the far away mountains.
The King's new Peace Monument was established right in the centre of the city with much fanfare. Soon each and every passerby would stop at the monument; kneel in front of the Goddess and chant the inscribed words 'I am a worshiper of Peace' while walking away.
The King was overwhelmed with satisfaction.
One day, the King traveled to the far away mountains to find out whether the researcher made any sense of the excavated stones. On seeing the King, the researcher explained joyously, “Your highness, these stones aren't ordinary. They together form an image. The image's eyes have  motherly affection; its neck adorned with beautiful flowers; the lips have a bright smile; and the hands complete with urns of abundance. The words 'I am a worshiper of Peace' are inscribed at the bottom of that image. I humbly request you to organize all these stones and rebuild the sculpture and establish it as the City's Parent Deity. It is a very very ancient sculpture and the beauty of its inscriptions and art of design is astonishing.”
Before the researcher could finish, the King silently walked away with his head hung in shame.

मूळ कथा -

विजयस्तंभ

विजयी राजा सैन्यासह नगरात शिरला. अनाथ बालके, विधवा स्त्रिया, लुळेपांगळे पुरुष या सर्वाना तो सांगत सुटला, 'या, माझ्याजवळ या. मी शांतीचा उपासक आहे.'
पण कुणीही त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला तयार होईना.
राजाला फार वाईट वाटले. नगरमध्ये एक मोठा स्तंभ उभारून त्यावर आपला संदेश कोरण्याचा त्याने निश्चय केला.
एक प्रचंड स्तंभ तयार झाला. एखाद्या योगिनीप्रमाणे दिसणारी शान्तिदेवतेची आकृती त्याचावर कोरण्यात आली. त्या देवतेच्या डोळ्यांत आईचे वात्सल्य होते; गळ्यात फुलांच्या माळा होत्या; ओठांवर उषेचे स्मित होते; हातां मेघांचे कुंभ होते.
तो स्तंभ सर्वांना दिसावा म्हणून नगरच्या मध्यभागी उभा करण्याचे ठरले. त्याच्याकरिता एक जागा खणण्यात येऊ लागली. ती खणता खणता अनेक फुटकेतुटके दगड सापडू लागले. त्या दगडांवर चित्रविचित्र आकृती कोरलेल्या होत्या. त्या आकृतीचा अर्थ कुणालाच कळेना!
सारे दगड बाहेर काढून दूर दूर एका पर्वतावर राहणाऱ्या श्रेष्ठ संशोधकाकडे पाठवण्यात आले.
राजाने तयार कराविलेला स्तंभ नगरच्या मध्याभाघी मोठ्या थाटामाटात उभारण्यात आला. प्रत्येक नागरिक जाता येत त्या स्तंभापाशी थांबे, शान्तिदेवतेला वंदन करी आणि 'मी शांतीचा उपासक आहे.' हे त्याच्यावर कोरलेले शब्द उच्चारीत पुढे चालू लागे.
राजा कृतकृत्य झाला.
संशोधकाला त्या दगडावरील आकृत्यांचा अर्थ लागला की नाही हे पाहण्याकरिता एके दिवशी राजा त्या दूरच्या पर्वतावर गेला. संशोधक आनंदाने नाचत त्याला म्हणाला,
'महाराज, हे दगड साधे नाहीत. त्या सर्वांवर मिळून एक आकृती कोरलेली आहे. आकृतीच्या डोळ्यांत आईचे वात्सल्य आहे; गळ्यात फुलांच्या माळा आहे; ओठांवर उषेचे स्मित आहे; हातां मेघांचे कुंभ आहेत. 'मी शांतीचा उपासक आहे' असे शब्द त्या आकृतीखाली कोरले आहेत. हे सारे दगड जुळवून ती मूर्ती आपण तयार करावी आणि नगरदेवता म्हणून तिची स्थापना करावी अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे. फार फार प्राचीन शिल्प आहे हे! या शिल्पातली कला सुद्धा किती सुंदर आहे!'
राजा काहीच न बोलता खाली मान घालून का निघून गेला हे त्या संशोधकाला कळेना!

लेखक - वि.स.खांडेकर.

2/26/2012

मृत्युदाता -६

भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४ आणि भाग -५ पासून पुढे


"रेखा, ऊठ. आपल्याला गाडी बदलायची आहे." नरेंद्र खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला.
"ह्म्म." रेखा डोळे चोळत उठून बसली, "तू खालच्या बर्थवर कधी येऊन बसला आहेस?"
"अर्धा तास झाला. नशीबानं आपल्याला हा दोन सीट्सचा सेक्शन मिळाला, नाहीतर चार लोकांना झोपेतून उठवायचं आणि पुन्हा त्यांच्या नजरेत यायचं." तो अत्यंत हळू आवाजात बोलत होता, तरीही सगळेजण झोपलेले असल्यानं ट्रेनमधल्या भयाण शांततेत त्याचं बोलणं रूळांच्या खडबडाटी पार्शसंगीतासह तिला ऐकू येत होतं.
"बरं, मी तोंडावर पाणी मारून आले."
"ठीक. मी पण बॅग्ज घेऊन दरवाजापाशी जातोय, तिथेच ये थेट."

-----

रमेशनं बेल वाजवली आणि दरवाजा उघडायची वाट पाहत होता, तेव्हढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. 'शिंदे' मनाशीच म्हणत त्यानं फोन उचलला.
"बोला शिंदे."
"काय साहेब, दोन दिवस झाले स्टेशनात फिरकला नाहीत, फोन नाही आणि तुमचा फोन लागत नाही. घरी जाऊन आलो, तर तिथेही सापडला नाहीत आणि इथे तुम्ही सिकात असल्याचं कळलं."
"अहो शिंदे, जरा पर्सनल काम होतं थोडं. म्हणून मग सिक लीव्ह टाकली. अचानकच निघालंय काम त्यामुळे कळवता आलं नाही." रमेशनं पुन्हा बेल वाजवली.
"ओह्ह. काही मदत लागली तर सांगा साहेब."
"ते काही तुम्ही सांगायची गरज नाही शिंदे. काही लागलं तर हक्कानं सांगेन मी."
एव्हढ्यात दरवाजाची पत्रांसाठीची फट हलकेच उघडल्यासारखं दिसलं.
"शिंदे, नंतर करतो मी फोन."
"बरं साहेब."
रमेशनं फोन खिशात टाकला आणि गुडघ्यावर बसून फटीकडे पाहू लागला. दोन निरागस, थोडेसे घाबरेघुबरे डोळे त्याच्याकडे पाहत होते.
"आई आहे का घरी?"
"नाही." पोरीचा आवाज मोठा गोड होता.
"मग कुणी मोठं?"
"नाही."
"ह्म्म. कुणाही अनोळखी व्यक्तिला दार उघडायचं नाही असं सांगितलंय आईनं?"
त्या पोरीनं फक्त होकारार्थी मान डोलावली.
रमेशनं घड्याळात पाहिलं. दुपारचे दोन वाजत होते.
'नवर्‍याचा संशयास्पद मृत्यू झालाय आणि आठवडाही उलटला नाहीये आणि ही बाई एव्हढ्या लहान मुलीला एकटीला घरात ठेवून बाहेर कशी जाऊ शकते?' रमेश स्वतःशीच बोलत बिल्डिंगचे जिने उतरू लागला आणि आपल्याच तंद्रीत चालताना त्याचा धक्का कुणालातरी लागला.
"सॉरी, सॉरी" तो चटकन स्वतःला सावरत म्हणाला आणि त्याच्या लक्षात आलं की त्या धक्क्यामुळे समोरच्याच्या हातातली पिशवी खाली पडलीय आणि भाज्या इतस्ततः विखुरल्या आहेत. तो चटकन खाली बसून भाज्या गोळा करू लागला आणि ती व्यक्तिसुद्धा जिन्यावरच्या भाज्या गोळा करू लागली. एक संच हातात घेऊन तो वळला आणि ओशाळवाण्या स्वरात म्हणाला, "खरंच सॉरी, अजिबात लक्ष नव्हतं माझं."
ती व्यक्ती एक तिशीची स्त्री होती, ती चटकन वळली आणि म्हणाली, "इट्स ओके. माझंतरी कुठे लक्ष होतं."
आत्ता पहिल्यांदा रमेशनं तिच्या चेहर्‍याकडे पाहिलं. आखीव-रेखीव नाक, जिवणी आणि विलक्षण सुंदर पण थकून गेलेले डोळे. 'कुठेतरी पाहिलंय हिला.' तो मनाशी म्हणेपर्यंत त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्या छोट्या पोरीचे डोळे एकदम त्याच्यासमोर फ्लॅश झाले.
"मिसेस काळे?"
"अं..हो" तिला एकदमच आश्चर्याचा धक्का बसला, "पण तुम्ही कोण? आणि मला कसे ओळखता?"
"इन्स्पेक्टर रमेश." तो आयकार्ड काढून दाखवत म्हणाला, "मी तुमच्या मिस्टरांचा मित्र."
"ओह्ह." तिच्या चेहर्‍यावर एकदम वेदना दाटून आली.

-----

इंदूरच्या पोलीस मुख्यालयामध्ये फारच तणावपूर्ण वातावरण होतं. शहरामध्ये अचानक झालेले दोन हाय-प्रोफाईल मर्डर्स आणि अचानकच एक्स्पोज झालेली एक मोठी ब्लॅकमेल रिंग, ह्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेबद्दल चहूबाजूंनी प्रश्नचिन्ह उभी केली जात होती. प्रसारमाध्यमं, वर्तमानपत्र सर्वत्र पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात होते. पोलीस आयुक्तांना सरकारकडून कानपिचक्या मिळाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी आपत्कालीन मीटिंग बोलावली होती, ज्यामध्ये राज्याचे गृहमंत्रीदेखील उपस्थित राहणार होते.
"पण साहेब, हे पुरावे फारच दूरान्वयाने सगळं सिद्ध करताहेत." आयुक्त गृहमंत्र्यांना सांगत होते.
"दूरान्वयानं का होईना सिद्ध करताहेत ना. तपास थांबवा आणि केस उभी करा. पहिल्या मर्डरला आपल्याकडे सस्पेक्ट आहे."
"पण दुसर्‍यासाठी आपल्याकडे एक सोडून पाच सस्पेक्ट्स आहेत."
"मला वाटलं वीस होते."
"वीस व्हिडिओटेप्स आहेत सर. पण फक्त पाचचजणांची फायनॅन्शिअल ऍक्टिव्हिटी संशयास्पद आहे."
"हे बघा ते सगळं मला सांगू नका. वरून ऑर्डर्स आहेत की ह्या केसेसचा गाजावाजा थांबवला पाहिजे. केस उभी करा लवकरात लवकर आणि तपास थांबवा."
"पण मीडिया?"
"ते आम्ही बघतो कसं मॅनेज करायचं ते. आठवड्याभरात हवा निघून जाईल ह्या केसेसमधली, एकदा संशयाचं धुकं कमी करा, दुसर्‍या केसमध्ये एका कुणालातरी बकरा करा. नंतरचं नंतर बघू." एव्हढं बोलून मंत्री उठून निघून गेले. आयुक्त सिन्नरकर हतबलतेनं एकदा खिडकीबाहेर आणि एकदा टेबलावरच्या केसफाईल्सकडे पाहत होते. तीन तास मीटिंग होऊनही काहीही मार्ग कुणीही शोधला नाहीच, पण मीटिंगनंतर मंत्रीमहोदयांनी धर्मसंकटात मात्र टाकलं.

"हां यादवजी." गृहमंत्री पित्रे आपल्या पीएला सांगत होते, "यह मेसेज शशिकलातक पहुंचाईये."
"बोलिये सरजी." यादव अदबीनं म्हणाले.
"उसकेपास जो कमलाकरजीका व्हिडिओ टेप है, उसे ठीक दो दिन बाद मीडिया में लीक करना है. पैसों की बात हम खुद आके करेंगे."
यादव मान डोलावून गाडीतून उतरले आणि पार्टी ऑफिसात शिरले. आणि पित्रेंची लालदिवा गाडी शहराबाहेर जाणार्‍या रस्त्याला लागली.

-----

"बसा हं जरा. हे सर्व आत ठेवते आणि पाणी आणून देते." असं म्हणून ती आत गेली.
"हो." म्हणून रमेश हॉलवर नजर फिरवत कोचावर बसला. हॉलच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या दाराच्या कडेने दोन डोळे कुतूहलानं त्याच्याकडे पाहत होते. त्यानं तिथे पाहिलं आणि एक स्मित केलं. मग त्या डोळ्यांची भीड थोडी चेपली आणि ती बटुमूर्ती दरवाजात येऊन उभी राहिली.
तीन वर्षांची तरतरीत मुलगी. आईसारखं तरतरीत नाक अन डोळे. बाकी चेहरामोहरा बहुतेक वडिलांचा असावा असा विचार त्याच्या डोक्यात येईस्तो समोरच्याच टेबलावर ठेवलेला गंध लावलेला तिच्या वडलांचा फोटो त्याच्या नजरेस पडला. आणि इतका वेळ मागे पडलेलं केसचं सगळं भलमोठं रहस्य पुन्हा त्याच्या मनःपटलावर उमटलं आणि तो पुन्हा चिंताग्रस्त झाला.
ती मुलगीसुद्धा त्याच्या चेहर्‍यावरचे झरझर बदलणारे भाव निरखत होती. त्याचं लक्ष पुन्हा तिच्याकडे गेलं आणि त्यानं पुन्हा हलकं स्मित केलं. ह्यावेळेस तिनंही स्मित केलं. 'खरंच मुलं देवाघरची फुलं असतात. दोन क्षण विसर पाडला सगळ्याचा तिच्या गोड हसण्यानं.' तो मनाशीच म्हणाला.
"इथे ये." तो हातानं कोचावर बसण्याची खूण करत म्हणाला, "नाव काय तुझं?"
"वैभवी" ती हळूच म्हणाली आणि दारातून थोडी पुढे आली.
मग तोच कोचावरून उठला आणि तिच्याकडे गेला आणि गुडघ्यांवर बसला.
"माझं नाव रमेश." तो हात पुढे करत म्हणाला. तिनं त्याच्याशी हात मिळवला. मग त्यानं दुसर्‍या हातानं तिच्या नाकाच्या शेंड्याला हळूच स्पर्श केला. तशी ती चटकन लाजून आत पळाली. आणि तिची आई पाणी घेऊन बाहेर आली. तो एकदम उठून उभा राहिला.
"सॉरी, मी जरा तिच्याशी गंमत करत होतो." वैभवी पुन्हा येऊन दरवाजात उभी राहिली. तो पाण्याचा ग्लास घेऊन कोचावर जाऊन बसला. ती कोचाशेजारच्या खुर्चीवर बसली. वैभवी हळूच येऊन तिच्या आईच्या मांडीवर बसली आणि रमेशकडे पाहू लागली.
"सॉरी मी अचानकच आलो.."
"अहो किती वेळा सॉरी म्हणाल. खरंच त्याची गरज नाही. तुम्ही आवर्जून भेटायला आलात ह्यातच सर्व आलं."
".."
"ह्यांचे अन माझे दोघांचेही आई-वडील नाहीत, त्यामुळे जे काही नातेवाईक होते ते अंत्यसंस्कार उरकल्यावर निघून गेले. आणि आज नेमकी हिची आया आजारी पडल्यामुळे मला घरी थांबावं लागलंय. पण घरसामान तर आणावंच लागणार म्हणून मग हिला एकटी ठेवून गेले होते. तर नेमकी आपली चुकामूक होत होती." तिच्या आवाजात कंप जाणवत होता.
"अहो ठीकच आहे."
"तुमच्या चेहर्‍यावर मगाशी हा प्रश्न जाणवला होता मला. म्हणून बोलले."
".." रमेश एकदम ओशाळला.
"असू दे. तुमचा प्रश्न योग्य होता."
हिचं पाणी काही वेगळं आहे हे रमेशला तत्क्षणीच जाणवलं, त्यामुळे आता लपवाछपवीला काही अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं.
"मी तुमच्या मिस्टरांचा मित्र नाही."
"मला लक्षात आलंच ते, कारण त्यांनी कधीही तुमचा उल्लेख केला नाही."
"मग तुम्ही मला घरात.."
"कारण तुमचं आयकार्ड खरं आहे."
"ह्म्म."
"आणि तुम्ही खरं न बोलता आला आहात म्हणजे तुम्हालाही त्यांच्या मृत्युबद्दल संशय आहे."
"मलाही म्हणजे अजून कुणाला?"
"मला." ती एकदम म्हणाली.

-----

"आता पुन्हा नाही ना रे गाडी बदलायची?" ती त्यांच्या दोन छोट्या बॅगा बर्थखाली सरकवत म्हणाली.
"नाही, आता थेट गुवाहाटी."
"तुला कसे रे बरोबर दोन्ही गाड्यांमध्ये दोन सीटवाले सेक्शन मिळाले."
"फक्त व्यवस्थित अभ्यास आणि रिझर्व्हेशन खिडकीतल्या बाईशी योग्य तर्‍हेने फ्लर्टिंग." तो डोळा मारत म्हणाला.
"हो हो. तू मदनाचा पुतळाच आहेस." ती लटक्या रागानं म्हणाली.
तो फक्त खिडकीतून बाहेर पाहत होता.
तिला खूप राग आला, त्याचं हेच वागणं तिला खटकायचं. मधेच संवाद सोडून कसल्यातरी विचारात गढायचा. तिला तिच्याकडे त्यानं असं दुर्लक्ष केलेलं अजिबात आवडत नसे. पण तो तसाच होता. मग तिनं नवा विषय काढला.
"आपण एव्हढंच सामान का घेतलं?"
"बाकी सर्व विकत घेऊ." तो खिडकीबाहेरची नजर न हटवता म्हणाला.
"अरे हो, त्या हॉटेलमालकाच्या पैशांचं काय झालं?" तिला एकदम आठवलं. त्यानं सावकाश तिच्याकडे पाहिलं आणि आजूबाजूला नजर फिरवली. गाडीतली मंडळी अजूनही पहाटेच्या साखरझोपेत होती.
"मालकानं ऍज एक्स्पेक्टेड नकार दिला."
"मग?"
"काही नाही, त्या हॉटेलच्या सिक्युरिटी रूम आणि तत्सम चाव्यांच्या डुप्लिकेट्स मी त्याच्या घरातल्या व्हॉल्टमध्ये ठेवल्या आहेत. पोलिस सगळ्यांची चौकशी करताना त्याच्याही घरी पोचतीलच. आणि मर्डर वेपनही त्यांना हॉटेलच्या ड्रेनेजमध्ये मिळेल."
"ते कसं?"
"असलं काही होईल हे मला आधीच ठाऊक होतं. मी मर्डरच्याच रात्री उशिरा आलो, त्याचं कारण तेच. बंदूक मी हॉटेलच्या ड्रेनेजमध्ये डिस्पोज केली आणि टेप घेऊन मालकाच्या घरी गेलो."
"तू अट्टल घरफोड्या आहेस."
"मी बरंच काही आहे."

क्रमशः

2/20/2012

मृत्युदाता -५

भाग १, भाग २, भाग ३ आणि भाग ४ पासून पुढे


रमेश भणगेंच्या बोलण्याचा विचार करत होता. ही केस सुरू झाल्यापासून त्याला पुन्हा निद्रानाशाचा त्रास सुरू झाला होता. गादीवर पडल्या पडल्या तो त्यांच्या वागण्याचा आणि त्यांच्या प्रत्येक वाक्याचा ऍनालिसिस करत होता. त्याचा अंदाज खरा ठरला होता, ती केस त्याला वाटत होतं त्याहून खूप जास्त गुंतागुंतीची होती आणि ह्या सगळ्यामागे काहीतरी काळं गुपित दडलेलं होतं आणि कुणीतरी खूप शक्तिशाली माणूस किंवा गट मोठ्या कटाक्षानं ते गुपित, गुपितच राहावं ह्यासाठी प्रयत्नशील होता. 'त्या' तीन गुन्हेगारांच्या फाईल्स मिळणं अत्यावश्यक होतं आणि महत्वाचं म्हणजे राजेंचा खरा
ऑटॉप्सी रिपोर्ट किंवा त्यांच्या मृत्यूचं खरं कारण कळणं भाग होतं. 'डॉ. कुर्लेकर' त्याला एकदमच सुचलं. ते आपली मदत करू शकतात.

-----

"आता काय झालं?"
"..."
"हे काय? आता काय गर्लफ्रेंडसारखा अबोला धरणार आहेस?" नरेंद्र डोळे मिचकावत म्हणाला.
"मी आपली गप्पच बसते. कारण काही विचारलं तर प्लॉझिबल डिनायेबिलिटीच्या नावाखाली तू सांगणार नाही म्हणशील. इन केस यू डोन्ट गेट इट, यू आर इन्सल्टिंग मी." तिच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या.
नरेंद्र दोन मिनिटं शांत बसला, "ह्म्म. ऑलराईट. काय विचारायचंय ते विचार. मी उत्तर देईन."
"ही गुवाहाटीची काय भानगड आहे? मला सगळं व्यवस्थित आणि तपशीलवार सांग."
"त्या रात्री जेव्हा मी क्षीरसागरला मारलं..."
"..आपण.."
"ओके, आपण जेव्हा क्षीरसागरला मारलं, तेव्हा मी त्याच्या लॉकरच्या चाव्या काढून घेतल्या."
"ज्या तो नेहमी गळ्यात घालून फिरतो असं मीच तुला सांगितलं होतं."
"एक्झॅक्टली. तर त्या चाव्या मी अलगद, मानेवर कुठेही खेचून काढल्याचा मार्क येणार नाही अशा तोडून घेतल्या. आणि दुसर्‍या दिवशी मी क्षीरसागरच्या घरी पोचलो."
"असाच?"
"ऑफकोर्स गेट-अप बदलून. खोटं नाक, हनुवटी आणि लेन्सेस लावून."
"बिना दाढी-मिशी?"
"प्रत्येक वेळी दाढी-मिशी हा बेस्ट गेट-अप नसतो. जेव्हा खून झालेल्याच्या नातेवाईकांकडे आपण जातो, तेव्हा ती
माणसं दुःखी असतात पण सावध असतात. तेव्हा दाढी-मिशी फार ऑबव्हिअसली संशयाचं कारण बनू शकतं. अशा
वेळेस त्यांना कॉन्सन्ट्रेट करायला एक डिटेल द्यावं."
"म्हणजे?"
"मी इथे मानेवर एक ॐ चा टॅटू लावून गेलो होतो. इट ऑल लाईज इन द डिटेल्स. लोक असलं काही दिसलं की बाकी पाहत नाहीत. खोटी हनुवटी आणि नाक नजरेत यायला बरंच कॉन्सन्ट्रेशन लागतं, ते होत नाही. तर असो. मी तिथे गेलो. आणि त्यांना प्रणवच्या हस्ताक्षरात लिहिलेलं मला पुण्याला मिळालेलं पत्र दाखवलं."
"कुठलं पत्र? तेच जे तीन दिवसांपूर्वी रात्री लिहित बसलेलास ते?"
"होय. की 'मी माझ्या चाव्या सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवतोय कारण मला जीवाला धोका असल्याची भीती आहे. माझा मेव्हणा ज्या व्यवहारांमध्ये गुंतलेला होता, त्याची फळं मलाही बहुतेक भोगावी लागतील, म्हणून मी इतके दिवस गप्प आहे. त्यामुळे माझ्या चाव्या आता माझ्या शरीरासोबत सुरक्षित नाहीत, मी त्यांना माझ्या मेव्हण्याच्या घरी, त्याच्या लॉकरमध्ये ठेवतो आहे. ह्या जागेची कुणाला शंका येणार नाही. माझ्या लॉकरमध्ये जे काही आहे, ते इतकं संवेदनशील आहे की ते तिथे आहे, म्हणूनच मी जिवंत आहे. मला पुढील दहा दिवसांमध्ये काही झाल्यास तू येऊन माझ्या कुटुंबियांना हे पत्र दाखव आणि चाव्या घेऊन लॉकर उघडून त्यातलं सर्वकाही माझ्या कुटुंबियांपर्यंत पोचव. ते माझ्या मेव्हण्याला लवकरात लवकर निरपराध सिद्ध करू शकतं.' आणि मायना वगैरे बाकी सगळं."
"पण त्यांना जराही शंका आली नाही?"
"कशी येईल, वर्तकच्या लॉकरचा कोडही एका वेगळ्या कागदावर होता असं मी सांगितल्यावर, दे हॅड टू गिव्ह मी अ चान्स."

-----

"डॉ. तुमच्याशिवाय माझी कोण मदत करणार?"
"रमेश, हे बेकायदेशीर आहे. कुणाला कळलं की मी ह्यात तुला मदत केलीय, तर माझ्या अब्रूचे आणि नोकरीचे
दोन्हीचे तीन तेरा वाजतील."
"डॉ. तुम्ही सिनियर डॉक्टर आहात. तुम्हाला मॉर्गला ऍक्सेस मिळेल. तुम्ही फक्त मॉर्गमध्ये शिरा आणि मला कसंतरी आत घ्या. मी बघतो पुढे काय ते."
"अरे पण मी सायकिऍट्रिस्ट आहे, मी मॉर्गमध्ये कशाला गेलो असा प्रश्न कुणी विचारला तर?"
"त्याचं सोल्युशन आहे. तिथला जो हवालदार आहे, त्याला मी ओळखतो. त्याला सध्या बरेच पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत. मी कालच त्याच्यासोबत बराच वेळ बोललो आणि त्याला नसलं तरी ओढवून त्याला डिप्रेशन असल्याची मी खात्री करून दिली आहे, त्याचसोबत त्याला तुमचा रेफरन्स दिला. त्याप्रमाणे त्यानं आज तुमच्यासाठी रिक्विझिशन भरलंय. तुम्ही त्याला अर्जंटली अपॉईंटमेंट द्या आणि तुमच्या घराजवळ असल्याने मॉर्गमध्येच येऊन भेटतो म्हणून सांगा."
"रमेश, इतकं काय आहे ह्या केसमध्ये? आय होप, तुला माहितीय तू काय करतोयस ते. मी तुझ्यासाठी माझंही करियर पणाला लावतोय."
"मला ठाऊक आहे मी काय करतोय. एका निरपराध, कर्तव्यदक्ष माणसाच्या मृत्यूचा तपास लावतोय. तुम्हाला आत शिरून ही किंवा ही खिडकी उघडायची आहे." रमेशनं हातातल्या मॉर्गच्या नकाशावर खूण केली.

-----

त्याची बायको आणि बायकोचा बाप, मला वर्तकच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्या बेडरूममधलं पेंटिंग दाखवलं आणि त्याच्यामागे सेफ असल्याचं मला सांगितलं. वर्तकची बायकोसुद्धा ऑब्व्हिअसली त्याच बेडरूममध्ये झोपत असणार, म्हणजे वर्तकचं खरं सेफ त्या खोलीत नसणार ह्याची मला खात्री पटली. बीसाईड्स, ती खोली बाहेरूनही फारच ऍक्सेसिबल होती. वर्तकसारखा हजार घोळांमध्ये असणारा माणूस कमालीचा पॅरानॉईड असणार. मी पाणी मागवायच्या आणि मग प्यायच्या मिषानं खोलीवर एक नजर फिरवली. खिडक्यांची लॉक्स टॅम्पर्ड होती. आणि तीन ग्रिल्स बदललेली दिसत होती. कुणीतरी गेल्या काही दिवसांत बाहेरून आत आलं होतं. म्हणजे एक तर मला जे हवं होतं, ते ऑलरेडी गेलेलं होतं, किंवा अजूनही संधी होती. ती सगळी मंडळी माझ्याकडे मोठ्या आशेनं पाहत होती. मला चक्क थोडंफार अपराधी वाटू लागलं होतं."
"हाहाहा...  अपराधी कशाबद्दल?" तिच्या हसण्यात विषाद होता.
"होय, मीही स्वतःशी तोच विचार केला. त्यांच्या स्थितीबद्दल वाईट वाटणं ठीक, पण अपराधी वाटण्याची काहीच गरज नव्हती. मग मी कामाला लागलो. त्यांनी ते पेंटिंग एक कळ दाबून बाजूला केलं आणि सेफ मला दाखवलं. मी सेफ नीट पाहिलं, ते नुकतंच हाताळलं गेलं होतं. त्याच्या डायलवर धूळ नव्हती आणि त्या सेफच्या दरवाजाभोवतीच्या धुळीच्या पॅटर्नवरून ते उघडलं गेल्याचं स्पष्ट होतं. आता हे सेफ उघडून काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे हे ते सेफ नसल्याचं मी जाहीर केलं.
सर्वांनाच धक्का बसला. मग कुठलं सेफ? मी माझा आतला आवाज ऐकायचं ठरवलं. जर मी पॅरानॉईड असेन तर मी कुठे ठेवेन?
मी विचारलं, "घरात अशी एखादी खोली आहे का, जिथे खिडकी नाही?"
त्याच्या पर्सनल लायब्ररीला खिडकी नव्हती. आणि तो घरात असल्याचा जवळपास सगळाच वेळ लायब्ररीत घालवायचा. ऑफकोर्स त्याच्या सागवानी टेबलाखाली, ज्यावर त्याचे पाय कायम असायचे, त्याची सेफेस्ट जागा होती. मी ते सागवानी टेबल सरकवलं आणि खालचं लिनोलियम बाजूला केलं आणि तिथे त्याचं 'ते' सेफ होतं."
"पण तुझ्याकडे तर कोड नव्हताच."
"मला कोडची गरज नव्हती. ह्या शोधामुळे त्यांची सर्वांचीच बोलती बंद होती, त्यामुळे एकदम शांतता होती. मी नंबर माहित असल्याप्रमाणे, ते डायल कॉन्फिडन्टली पण हळुवार फिरवू लागलो आणि त्याच्या त्या विवक्षित 'क्लिक' ची वाट पाहत राहिलो, ऍज एक्सपेक्टेड काही क्षणांनी पहिली 'क्लिक' मग दुसरी आणि तिसरी. मी चटकन लिव्हर फिरवलं आणि जुगार चालला, सेफ उघडलं आणि मी शर्टाच्या बाहीत दडवलेला चाव्यांचा जुडगा अलवार आत सरकवला.
"दिवा लावता का जरा" असं म्हणत मी लिनोलियमला धक्का लावला आणि एकदम धुळीचा लोट उडाला, आत असलेली एकमेव छोटी फाईल, मी उचलून कोटाच्या खिशात सरकवली. दिवा लागल्यावर चाव्या मिळाल्या आणि आमचा मोर्चा क्षीरसागरच्या घराकडे वळला."
"एक ऑम्लेट आणि एक कटलेट. तू कटलेटच खाणार ना गं?" त्यानं मधेच तिला विचारलं आणि तिची तंद्री भंगली.
"अं. हो. कटलेट."
"ओक्के. लाओ जल्दी." त्यानं भारतीय रेलचे स्टँडर्ड पदार्थ ऑर्डर केले. गेले काही दिवसांच्या अनुभवावरून तिला ट्रेनमधलं कटलेट आवडतं, हा अंदाज त्याला आला होता.
"मधेच कुठे रे, ऑम्लेट-कटलेटवाला दिसला तुला?"
"एकाग्र तू होतीस, मी नव्हतो, मी फक्त घडलेली गोष्ट सांगत होतो."
"हो हो, तू तर झोपेतही आजू-बाजूला काय घडतंय त्यावर लक्ष ठेवून असतोस."
'त्याची कारणं तुला नाही कळली तरच उत्तम' असं तो मनात म्हणाला आणि प्रकट पुढे सांगू लागला, "तर आम्ही
क्षीरसागरच्या घरी गेलो. आणि त्याच्या बेडरूममध्ये, एका कपाटाच्या मागे त्याचं सेफ होतं."

-----

"एनी लक रमेश?" डॉ. कुर्लेकर रमेशला विचारत होते.
रमेश आत्ताच त्यांच्या क्लिनिकमध्ये नेहमीसारखा आला होता. "नाही डॉक्टर, बॉडीवरून तरी काहीही फाऊल-प्ले चा अंदाज येत नाहीय. त्यांचं पोस्ट-मॉर्टेम कुणी केलंय त्यालाच गाठणं भाग आहे. पण ते कळेल कसं?" असं म्हणून त्यानं डॉक्टरांकडे सूचक नजरेनं पाहिलं.
"रमेश, यू एक्स्पेक्ट टू मच फ्रॉम मी."
रमेशनं फक्त एक हलकं स्मित केलं.
डॉ. कुर्लेकरांनी चष्मा ऍडजस्ट केला आणि म्हणाले, "तू एव्हढा गुंतलेला पाहून मी माझ्या पद्धतीनं काही चौकशा केल्या आणि हे बघ काय सापडलं. त्यांनी पोस्ट-मॉर्टेमचा फॉर्म त्याला दाखवला. डॉ. काळे, हा एक तरूण सर्जन होता."
"होता?"
"होय. हा पोस्ट-मॉर्टेम रिपोर्ट सबमिट झाल्यावर तो एका रोड ऍक्सिडेंटमध्ये ठार झाला." डॉ. कुर्लेकरांनी रमेशकडे एक पेपर सरकवत म्हटलं.
"डॉ. काळेंचा पत्ता?"
"होय. मी एव्हढंच करू शकतो तूर्तास."
रमेशनं त्यांचे आभार मानले आणि तो बाहेर पडला.

-----

"ह्याचं सिक्रेट सेफ नव्हतं?"
"क्षीरसागर मस्त-मौला माणूस होता, त्याप्रमाणे त्याची लायब्ररी वगैरे असण्याच्या शक्यता नव्हत्या. आणि दुसरं म्हणजे, तो फक्त वर्तकचा यःकश्चित साला होता, त्याच्याकडे वर्तकची काहीही इन्फो नव्हती.पण तरीही त्याचा खून झाल्यामुळे त्याच्याही घरी कुणीतरी येऊन गेलं होतं पण मला त्यानं फरक पडत नव्हता. त्याच्या सेफमध्ये त्यांच्या उपयोगाचं काहीही नव्हतं."
"मग?"
"क्षीरसागर मस्तमौला असला, तरी हुशार होता. त्या चाव्या, दिसायला चाव्या होत्या, खरं तर त्या सगळ्या पेन-ड्राईव्हज होत्या. पण हे मी त्या घरच्यांना सांगू शकत नव्हतो."
"हे तुला आधीच माहित होतं?"
 "होय, पण त्यांना चाव्यांसारखं डिसगाईज करण्याचा नक्की उद्देश्य मला कळत नव्हता. पण क्षीरसागरच्या सेफला नशीबानं चाव्यांची सोय होती. तोच डिसगाईजचा भाग असावा असा मी अंदाज बांधला. मी त्या चाव्या त्यात घातल्या आणि फिरवायची कृती केली आणि एका हातानं डायल फिरवू लागलो. ऍज एक्सपेक्टेड, चाव्यांची सोय हे फक्त डिसगाईज होतं. आणि सेफचं लॉक 'क्लिक' असं वाजलं. मी सेफ उघडला आणि आतमध्ये एक छोटासा जुनाट व्हिडिओगेम होता. ऑबव्हिअसली तो आधी येऊन गेलेल्या लोकांनी पाहिला होता आणि रागानं फेकला होता, त्यामुळे तो तिरका आणि पालथा एका कोपर्‍यात पडला होता."
"मग?"
"तो व्हिडिओगेम नव्हता. तो चाव्यांचा ऍडाप्टर होता. कुणीही ब्लॅकमेलर आपलं सगळं भांडवल व्यवस्थित डिसगाईज करूनच ठेवेल."
"मग काय केलंस?"
"मग काय? मी त्या चाव्यांपैकी एक त्या ऍडाप्टरला लावली आणि ऍडाप्टर कॉम्प्युटरला कनेक्ट केला आणि आपल्या हॉटेलमालकासारख्याच कुणातरी एकाचे व्हिडिओ त्यावर दिसू लागले. ते सगळे अचंबित झाले. मी म्हटलं, मी माझं काम केलं, आता ह्या सगळ्याचं काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. एव्हढं सांगून मी बाहेर पडलो आणि एक कॉल पोलिसांना केला, त्यांना एका विवक्षित पोलिस स्टेशनच्या गेटच्या बिजागरीवर ठेवलेल्या चावीची खूण दिली आणि त्याचबरोबर त्या चावीचा ऍडाप्टर आणि इतर चाव्या कुठे मिळतील ते सांगितलं. दॅट वॉज इनफ फॉर देम टू बिलीव्ह द ऍनॉनिमस कॉलर."
"पण मग गुवाहाटी?"
"वर्तकच्या सेफमधली फाईल!" तो ती फाईल कोटाच्या खिशातून काढून तिच्यासमोर फडकवत म्हणाला.


क्रमशः

2/15/2012

मृत्युदाता -४


आणि भाग -३ पासून पुढे


"मर्डर वेपन नाल्यात योग्य ठिकाणी डिस्पोज केलंस ना? पोलिसांना बरोबर सापडेल ना ते?" रेखा विचारत होती.
"होय, होय. टेन्शन सोड आता. वर्तकसाहेबांची बंदूक त्यांच्या ग्लोव्ह कंपार्टमेंटमधून तिथे कशी पोचली हाच प्रश्न त्यांना पुढचे काही दिवस छळत राहील." नरेंद्र गालातल्या गालात हसत म्हणाला.
"पुढचे काही दिवस?"
"होय. कळेलच तुला."
"तू इतका कोड्यात का बोलतोस?" तिनं विचारलं खरं पण नरेंद्र तोवर उठून खोलीच्या कोपर्‍यातल्या स्वयंपाकाच्या ओट्याकडे गेला आणि कांदा घेऊन चिरू लागला.

-----

रमेशला झोप येत नव्हती. त्याची नेहमीची अस्वस्थता बर्‍याच आटोक्यात असली तरी आज डोक्याला नवं खाद्य होतं. पळून गेलेल्या प्रमुख कैद्यांबद्दल पाळण्यात येत असलेली गूढ गुप्तता, राजेंची अस्वस्थता आणि त्यांच्यापासून बरंच काही लपवलं जातंय हे लपवण्याची धडपड हे सगळं त्याला आतल्या आत खात होतं. जे आणि जसं दिसत होतं, त्यापलिकडे ह्या केसमध्ये बरंच काही होतं. बबन महाडिकचा शोध, जो त्याच्यामते पूर्णपणे निष्फळ होता, त्यामागे नक्कीच काहीतरी वेगळं होतं. पण काय? हाच प्रश्न त्याला छळत होता. पुन्हा हे सगळं प्रकरण त्याच्या अखत्यारित येत नव्हतं. त्याचे हात बांधलेले होते. जर कुणी काही करू शकत होतं, तर ते राजेच. त्यांच्या विश्वासास पात्र होऊन त्यांच्याकडून जमेल तितकी माहिती गोळा करणं हाच एक मार्ग होता. किंवा कदाचित बबन महाडिक स्वतःच ह्या सगळ्यावर काही प्रकाश टाकू शकला तर. पण बबन आहे कुठे? आठवडा उलटलाय आणि ह्यावेळेस तो जास्त हुशार झालाय. दोन नंबरचा धंदाही बंद करून ठेवलाय बर्‍याच दिवसांपासून. आणि कुठल्याच खबर्‍याकडे काहीही थांगपत्ता नसावा त्याचा? इतका चलाख तो कधीच नव्हता. आणि बाकीच्या तिघा कैद्यांचं काय? त्यांचा तपास वेगळा का? की राजे खोटं बोलताहेत? विचार करकरून त्याच्या डोक्याचा भुगा व्हायची पाळी आली. शेवटी कधीतरी उशीरानंच निद्रादेवी त्याच्यावर प्रसन्न झाली.

"साहेब, एक जॅकपॉट लागलाय." शिंदे उत्साहानं सांगत आले.
"काय झालं?" रमेशनं विचारलं.
"आपण जो मायक्रोफोन प्लांट केला होता, त्यावर चक्क गगनच्या बायकोचा आवाज रेकॉर्ड झालाय, बबनच्या बायकोशी बोलताना!" शिंदेंच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.
"इतके बेसावध कसे काय झालेत हे लोक?" रमेश स्वतःशीच म्हणाला, तेव्हढ्यात राजे आले.
"कोण बेसावध झालं इन्स्पेक्टर?"
"काही नाही सर, बहुतेक आपल्याला बबन महाडिकच्या बायकोचा पत्ता मिळालाय." रमेशचं आश्चर्य अजून ओसरलं नव्हतं.
"काय सांगताय काय?" राजे एकदमच आनंदित झाले.
"होय. शिंदे, फोन रेकॉर्ड्स काढा आणि पाहा बरं कुठला नंबर आहे ते?" रमेश बबनच्या फाईलकडे पाहत म्हणाला.

-----

"ऍडव्हान्समध्ये फक्त ५ लाख रूपये घेतलेस?" रेखा गोंधळली होती.
"मग किती घ्यायला हवे होते?" नरेंद्र थंडपणे म्हणाला.
"अरे २५ लाखाचा सौदा आहे ना? मग किमान १० लाख तरी.."
"नव्हते म्हणाला, ठीक आहे म्हटलं काम होईस्तो बाकीच्याचा बंदोबस्त होईल म्हणाला."
"अरे पण काम झाल्यावर बंदोबस्त नाही झाला म्हणाला तर?"
"तर काय.. ५ लाखसुद्धा खूप आहेत ह्या कामासाठी. मला तर वाटतं तो उगाच त्यादिवशी तोंडाला येईल ते बोलला."
"पण खरंच तुला असं वाटतं की आपण शर्माच्या खुनानंतरही इथेच थांबणं ठीक आहे?"
"जास्त दिवस कुठे? मी म्हणालो ना चार-पाच दिवस. तेव्हढ्यात हे कामही उरकेल आणि ५ लाखही तर मिळालेत. पुढची मोहिम बरीचशी स्पॉन्सर झाल्यागत आहे."
"ह्म्म, तू नक्की कसली वाट पाहतो आहेस, तेच मला सांगत नाहीस."
"कळेल आपोआप." असं म्हणतो तो उठला आणि त्याचा सूट चढवू लागला.
"आता कुठे?"
"टारगेटकडे पहिलं पाऊल." तो हलकसं स्मित करत म्हणाला.
"पण तू सगळं व्हेरिफाय केलंयस ना? की तो खरंच.."
"होय, होय. केलंय. आता त्याच गोष्टीचा उपयोग करायचाय."

-----

"डेड एन्ड आहे साहेब!", शिंदे चेहरा पाडून रमेशच्या केबिनमध्ये शिरले.
रमेशनं कोर्‍या चेहर्‍यानं राजेंकडे पाहिलं. त्यांचा चेहरा नुसता पडलाच नाही तर एक विचित्र काळजी त्यांच्या चेहर्‍यावर दाटून आली.
"पण नक्की काय झालं?" राजेंचा आवाज थोडासा बदलला.
"त्यावेळेस कुठलाही फोन झाला नाहीय. थोडक्यात एकतर त्यांच्याकडे सिक्रेट फोनलाईन आहे, जे शक्य नाही किंवा ते जुनंच टेप्ड कॉन्व्हर्सेशन आहे, आपल्याला ऑफ द ट्रॅक करण्यासाठी!"
"ह्म्म." एव्हढं म्हणून राजे जागेवरून उठले आणि म्हणाले, "मी जरा जेलमधल्या कम्युनिकेशन्सचं कुठवर आलं ते पाहतो." आणि फोनवर काही डायल करत ते बाहेर पडले.
"तुम्हाला काय वाटतं साहेब?" शिंदे खुर्चीत बसत म्हणाले.
"मला वाटतंय काहीतरी विचित्र घाटतंय." रमेश राजेंच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत म्हणाला. "इतक्या चलाखीनं गायब होण्यामागे एकटा बबन किंवा त्याचा भाऊ असणं अशक्य आहे. बघू राजे काय करू शकतात. तोवर आपण आपल्या इतर केसेसचं पेपरवर्क चालू ठेवूया."

-----

"तुझ्या पुढच्या काही दिवसांचं काय झालं? आता तीन दिवस होत आलेत.. तू काय पकडलं जाण्याची वाट बघतो आहेस का?" रेखाच्या स्वरात खरोखर काळजी होती.
"ह्म्म. हे घे." नरेंद्र मंद स्मित करत तिच्या दिशेने एक एन्व्हलप फेकत म्हणाला.
"आता काय कणकेच्या हातांनी एन्व्हलप उघडू? ते भाजी चिरायचं नाटक बंद कर आणि त्याच सुरीनं एन्व्हलप उघडून वाचून दाखव."
"सुरीची गरज नाही आणि एन्व्हलपमध्ये वाचायचं काही नाही." तो एन्व्हलप उघडत म्हणाला, "दोन तिकिटं आहेत गुवाहाटीची."
"गुवाहाटी?" तिचं आश्चर्य लपलं नव्हतं. "मला वाटलेलं आता महाराष्ट्रात.."
"त्यासाठीच हे पाच दिवस जाऊ दिले मी."
"म्हणजे?" ती म्हणून गेली. "ह्म्म, हा प्रश्न मी विचारावा ह्यासाठीच ना सगळी सिक्रसी."
त्याच्या चेहर्‍यावर एक छोटीशी स्मितरेषा उमटली, "मी शर्माच्या तिजोरीतून काही कागदपत्रं उचलली होती. ती सगळीच टोटली युजलेस होती, पण रिकामी तिजोरी उघडी टाकायची मी दक्षता घेतली होती. त्यामुळे वर्तकसाहेबांच्या ऍरेस्टला महत्व आलं होतं. हाय प्रोफाईल मर्डर असल्यानं त्याला खुल्लमखुल्ला सोडवणं जरा अवघड होतं, पण शर्मा कॉम्प्रोमाईज झाल्याने आता वर्तकला महत्व आलं आहे. म्हणून त्याच्यासोबत काय होतं, ह्यावर मी नजर ठेवून होतो. त्याच्या ऑफिसचा क्राईम सीन झाल्यानं त्याच्या घरी कुणी ना कुणी पोचणार ह्याची मला खात्री होती आणि म्हणूनच मी परवाची आपली सुपारी ऍक्सेप्ट केली होती."
"म्हणजे?" रेखाच्या आश्चर्याला पारावार नव्हता.
"मी ज्या माणसाच्या सापळ्यात अडकल्याचं नाटक काल केलं होतं, तो वर्तकच्या बायकोचा भाऊ."
"थांब थांब थांब. हे सगळं.."
"बरं विस्तारानं सांगतो." असं म्हणत नरेंद्रनं पुन्हा भोपळी मिरची चिरायला घेतली.

-----


"साहेब!" शिंदे लगबगीनं रमेशच्या टेबलापाशी आले.
शिंदेंचा हा स्वर रमेशच्या ओळखीचा होता. वाईट बातमीसाठी रमेशनं मनाची तयारी केली. आणि चेहरा प्रश्नार्थक केला.
"राजेसाहेब.."
"त्यांचं काय?"
"काल रात्री हार्ट ऍटॅक येऊन गेले."
"काय?" रमेशलाच ऍटॅक यायची वेळ होती. "अशक्य आहे हे. त्यांना ओळखणारा कुणीही सांगेल."
"कॉरोनरचा रिपोर्ट आहे साहेब."
"कॉरोनरचा रिपोर्ट इतक्यात?"
"लॉ एन्फोर्समेंटचा माणूस साहेब, चटचट झालीत कामं."
"चटचट कामं होण्याचं कारण काही वेगळंच असणार शिंदे."


-----


"पहिल्या दिवशी जेव्हा मला सुपारीची ऑफर झाली, तेव्हा मी साशंक होतो, पण वेळ मारून नेण्यासाठी मी होकार दिला
होता. पण नंतर मात्र मी मागे फिरण्याचा निर्णय घेऊन मालकाला भेटायला गेलो."
"पण तू तर इथे काय काय सांगत होतास..."
"मला पूर्ण बोलू देशील?"
"ह्म्म" ती नाक मुरडत म्हणाली.
"तर मी मागे फिरण्याचा निर्णय घेऊन मालकाला भेटायला गेलो."
"पुढे.."
त्यानं डोळे वटारले तशी तिनं तोंडावर बोट ठेवलं.
"तर मी.. एनीवे. मालकाला उगाच माझी तत्व वगैरेचे डोस देऊन वातावरणनिर्मिती केली. पण मग जेव्हा मालकानं मला
त्याच्याविषयी माहिती द्यायला सुरूवात केली, तसतसे माझे डोळे चमकू लागले. मी लगेच ऑफर ऍक्सेप्ट केली. मोठ्या
हॉटेलांमध्ये जंगी पार्ट्या द्यायच्या. मेव्हण्याच्या ओळखीमुळे मोठी धेंडं पार्टीला यायची. मग सुंदर मुलींच्या जाळ्यामध्ये
त्यांच्यातलं कुणी अडकलं, की मग आपल्याच माणसांकरवी ब्लॅकमेल करायचं आणि पार्टी अवघड असेल तर मग
स्वतः पार्टीच्याच बाजूनं निगोशियेशन्स करायचा आव आणायचा आणि स्वस्तात सेटलमेंट्स करायच्या. प्रकरण अगदीच हाताबाहेर गेलं तर निस्तरायला वकील मेव्हणा होताच.
अशातच मालक अडकला होता. बरेच पैसे गेल्यानंतर त्याला अक्कल आली होती की हाच सगळ्याच्यामागे आहे. म्हणून मग सुपारीचा प्रपंच."
"पण तू काल नक्की काय केलंस?"
"ऍक्च्युअली, फार काही नाही. पार्टीला गेलो. आणि ड्रींक लेस, स्पिल मोअर पॉलिसी वापरून पूर्ण टाईट झाल्याचं नाटक केलं. मग ऍज एक्स्पेक्टेड एक मुलगी मला वर एका स्वीटमध्ये घेऊन गेली. ती चेंज करायला बाथरूममध्ये गेल्यावर मी सर्वप्रथम जॅमर वापरून सर्व रेडिओ इक्विपमेंट्स डिसेबल केली. इलेक्ट्रिक सॉकेट्स किंवा रिमोट कंट्रोल आणि वॉल क्लॉकसारखे रेडिमेड पॉवर सोर्सेस चेक केले. तेव्हढी अक्कल ह्या लोकांनी वापरली नव्हती हा माझा अंदाज बरोबर होता. सगळे कॅमेरे आणि माईक्स डिसेबल झाले होते. ती जशी बाहेर आली मी तिला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध केलं आणि बांधून बाथरूममध्ये लॉक करून टाकलं. कॅमेरा फीड गंडल्याचं कळताच ऍज एक्स्पेक्टेड दोन माणसं रूम सर्व्हिसचे कपडे घालून आली. मी खिडकीतून बाहेर पडून लॉबीत पोचलो होतो, त्यांना आत कोण आहे ह्याचा अंदाज नसल्यामुळे त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं आणि मी त्यांनाही जामलं आणि खोलीत डांबून ठेवलं. त्यातल्या एकाच्या मोबाईलवरून क्षीरसागरला एसएमएस केला, की "तो येतोय, सांभाळून." "
"अच्छा म्हणजे क्षीरसागरला मोबाईलपासून दूर ठेवायला ह्यासाठी मला सांगितलं होतंस." रेखाला एकदम साक्षात्कार झाला.
"यप्प." नरेंद्रचा चेहरा उजळला होता. "मग मी रूमसर्व्हिसचे कपडे घालून वरच्या मजल्यावर आलो, तू दार उघडलंस आणि मी आत येऊन त्याला गोळ्या घातल्या आणि मग आपण दोघे खिडकीतून खाली उतरलो आणि मी तुला चालत घरी जायला सांगितलं."
"आणि तू काय करत होतास?"
"मी बेसमेंटमध्ये जाऊन लॉबीतल्या कॅमेर्‍यांचा फीड पॅच करत होतो. गेले महिनाभर हॉटेलात दाढीमिशा लावून वेटरची नोकरी  उगाच करत नव्हतो. मी आणि तू एग्झॅक्टली किती कॅमेरांमध्ये येऊ ह्याचा मी पूर्ण आराखडा बनवला होता, म्हणूनच तुला स्पेसिफिक लिफ्ट आणि स्पेसिफिक जिने वापरायला सांगितले होते मी."
"पण मग तू नोकरी सोडल्याचं काय?"
"म्हणून तर पाच दिवस जास्तीचे. नाहीतर काम तर त्याच दिवशी झालं होतं. काल आणि आज दिवसभर कामावर होतो. पोलिसांना मुलाखतही दिली. त्या रात्री नाईट क्वीन बारमध्ये असल्याची ऍलिबीसुद्धा दिली."
"ती कशी काय?"
"तू काय मुलाखत घेते आहेस का माझी?"
"सांग ना. इतकं अंधारात का ठेवतोस. मी तुझी पार्टनर आहे ह्या सगळ्यात."
"तुला प्लॉझिबल डिनायेबिलिटी असावी म्हणून." एव्हढं म्हणताना त्याचा चेहरा गंभीर झाला आणि त्यानं कांदा कापायला घेतला.
". प्लीज. मला प्रोटेक्ट वगैरे करू नकोस. मी माझ्या मर्जीनं ह्यात आहे." ती कणिक मळणं अर्धवट सोडत त्याच्याजवळ आली. "आपल्या दोघांचीही गरज आहे ही."
"पण हे सगळं..." त्याचा आवाज थोडासा बदलला. "तू नाहीयेस अशी."
", रडतोयस की काय?"
"छे, कांदा.." आणि तो उठून गेला.
ती त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे दोन क्षण पाहत राहिली. आणि मग पुन्हा कणिक मळायला लागली.


-----


"इन्स्पेक्टर रमेश." जेलरनी त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं. "या बसा. तुमचीच वाट पाहत होतो."
"अख्खं जेलच माझ्या येण्याची वाट पाहत असल्यासारखं वाटतंय मला. दारावरच्या हवालदारापासून, नोंदणी हवालदार आणि थेट तुमच्यायापर्यंत." रमेश त्यांचा चेहरा निरखत म्हणाला.
"राजेंच्या मृत्यूनंतर तुम्ही इथे येणार ह्याचा अंदाज होताच."
रमेशने कान टवकारले. "राजेंशी तुमचा संपर्क झाला होता?"
"अर्थात."जेलरच्या चेहर्‍यावरची रेषही हलत नव्हती, " एकदा प्राथमिक चौकशी करायल आले होते, तेव्हा तुमच्यासोबत तपास करणार असल्याचं बोलले होते."
"तुम्ही मला कसे ओळखता?"
"तुम्ही मला अजून कसं ओळखलं नाही?" जेलरनी पुन्हा रमेशकडे रोखून पाहिलं आणि भुवया वर केल्या.
आणि रमेशच्या डोक्यात प्रकाश पडला. एक एक प्रतिमा डोळ्यासमोर तरळू लागली. त्याच्या बहिणीचा छिन्नविछिन्न मृतदेह आणि त्या केसचा तपास करणारा मुख्य अधीक्षक आणि त्याचा बॉस म्हणजेच हे जेलर, ज्यांनी रमेशला ती केस जास्त बदनामी न होता क्लोज करायला मदत केली होती.
"भणगेसाहेब."
जेलरच्या चेहर्‍यावर हलकं स्मित झळकलं. रमेशला मात्र अस्वस्थ वाटू लागलं. "मला त्या कैद्यांच्या फाईल्स मिळतील का?"
"बबनची फाईल राजे घेऊन गेले होते, ती कदाचित त्यांच्या घरी असेल आणि बाकीच्या फाईल्स सीबीआयची दुसरी टीम घेऊन गेली."
रमेशला का कुणास ठाऊक अजिबात आश्चर्य वाटलं नाही. त्यानं टेबलावरचं पाणी प्यायलं आणि कसाबसा उठून निघाला.
"एक सांगू रमेश..." ह्या आवाजानं तो जाता जाता क्षणभर थबकला आणि त्यानं मागे वळून जेलरकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
"तू इथे यायला नको होतंस."
ह्यापुढे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार नाही हे रमेशच्या लक्षात आलं आणि तो विचारमग्न आणि अस्वस्थच बाहेर पडला.

-----

"हे घे तुझे पैसे." नरेंद्र एका दांडगोबाला पैसे देत होता.
"पण तू त्याच्यासारख्याशी कशाला पंगा घेतला. काल मी त्याला मारलं तर अख्ख्या बारमध्ये मारामारी सुरू झाली आणि तू कुठे गायब झाला होता बे?"
नरेंद्रनं फक्त एक स्मित केलं आणि तो नाईट क्वीन बारमधून बाहेर पडला. रात्रीचे दहा वाजत आले होते.
'रेखा स्टेशनवर वाट पाहत असेल, गाडी यायला तासभरच बाकी आहे' असा स्वतःशीच विचार करत तो स्टेशनच्या दिशेनं भरभर चालू लागला, 'आता गुवाहाटीचं कसं कळलं, त्याची अख्खी स्टोरी सांगावी लागेल, इतके तास शेजारी बसून विषय टाळता येणार नाही.'

क्रमशः