2/15/2012

मृत्युदाता -४


आणि भाग -३ पासून पुढे


"मर्डर वेपन नाल्यात योग्य ठिकाणी डिस्पोज केलंस ना? पोलिसांना बरोबर सापडेल ना ते?" रेखा विचारत होती.
"होय, होय. टेन्शन सोड आता. वर्तकसाहेबांची बंदूक त्यांच्या ग्लोव्ह कंपार्टमेंटमधून तिथे कशी पोचली हाच प्रश्न त्यांना पुढचे काही दिवस छळत राहील." नरेंद्र गालातल्या गालात हसत म्हणाला.
"पुढचे काही दिवस?"
"होय. कळेलच तुला."
"तू इतका कोड्यात का बोलतोस?" तिनं विचारलं खरं पण नरेंद्र तोवर उठून खोलीच्या कोपर्‍यातल्या स्वयंपाकाच्या ओट्याकडे गेला आणि कांदा घेऊन चिरू लागला.

-----

रमेशला झोप येत नव्हती. त्याची नेहमीची अस्वस्थता बर्‍याच आटोक्यात असली तरी आज डोक्याला नवं खाद्य होतं. पळून गेलेल्या प्रमुख कैद्यांबद्दल पाळण्यात येत असलेली गूढ गुप्तता, राजेंची अस्वस्थता आणि त्यांच्यापासून बरंच काही लपवलं जातंय हे लपवण्याची धडपड हे सगळं त्याला आतल्या आत खात होतं. जे आणि जसं दिसत होतं, त्यापलिकडे ह्या केसमध्ये बरंच काही होतं. बबन महाडिकचा शोध, जो त्याच्यामते पूर्णपणे निष्फळ होता, त्यामागे नक्कीच काहीतरी वेगळं होतं. पण काय? हाच प्रश्न त्याला छळत होता. पुन्हा हे सगळं प्रकरण त्याच्या अखत्यारित येत नव्हतं. त्याचे हात बांधलेले होते. जर कुणी काही करू शकत होतं, तर ते राजेच. त्यांच्या विश्वासास पात्र होऊन त्यांच्याकडून जमेल तितकी माहिती गोळा करणं हाच एक मार्ग होता. किंवा कदाचित बबन महाडिक स्वतःच ह्या सगळ्यावर काही प्रकाश टाकू शकला तर. पण बबन आहे कुठे? आठवडा उलटलाय आणि ह्यावेळेस तो जास्त हुशार झालाय. दोन नंबरचा धंदाही बंद करून ठेवलाय बर्‍याच दिवसांपासून. आणि कुठल्याच खबर्‍याकडे काहीही थांगपत्ता नसावा त्याचा? इतका चलाख तो कधीच नव्हता. आणि बाकीच्या तिघा कैद्यांचं काय? त्यांचा तपास वेगळा का? की राजे खोटं बोलताहेत? विचार करकरून त्याच्या डोक्याचा भुगा व्हायची पाळी आली. शेवटी कधीतरी उशीरानंच निद्रादेवी त्याच्यावर प्रसन्न झाली.

"साहेब, एक जॅकपॉट लागलाय." शिंदे उत्साहानं सांगत आले.
"काय झालं?" रमेशनं विचारलं.
"आपण जो मायक्रोफोन प्लांट केला होता, त्यावर चक्क गगनच्या बायकोचा आवाज रेकॉर्ड झालाय, बबनच्या बायकोशी बोलताना!" शिंदेंच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.
"इतके बेसावध कसे काय झालेत हे लोक?" रमेश स्वतःशीच म्हणाला, तेव्हढ्यात राजे आले.
"कोण बेसावध झालं इन्स्पेक्टर?"
"काही नाही सर, बहुतेक आपल्याला बबन महाडिकच्या बायकोचा पत्ता मिळालाय." रमेशचं आश्चर्य अजून ओसरलं नव्हतं.
"काय सांगताय काय?" राजे एकदमच आनंदित झाले.
"होय. शिंदे, फोन रेकॉर्ड्स काढा आणि पाहा बरं कुठला नंबर आहे ते?" रमेश बबनच्या फाईलकडे पाहत म्हणाला.

-----

"ऍडव्हान्समध्ये फक्त ५ लाख रूपये घेतलेस?" रेखा गोंधळली होती.
"मग किती घ्यायला हवे होते?" नरेंद्र थंडपणे म्हणाला.
"अरे २५ लाखाचा सौदा आहे ना? मग किमान १० लाख तरी.."
"नव्हते म्हणाला, ठीक आहे म्हटलं काम होईस्तो बाकीच्याचा बंदोबस्त होईल म्हणाला."
"अरे पण काम झाल्यावर बंदोबस्त नाही झाला म्हणाला तर?"
"तर काय.. ५ लाखसुद्धा खूप आहेत ह्या कामासाठी. मला तर वाटतं तो उगाच त्यादिवशी तोंडाला येईल ते बोलला."
"पण खरंच तुला असं वाटतं की आपण शर्माच्या खुनानंतरही इथेच थांबणं ठीक आहे?"
"जास्त दिवस कुठे? मी म्हणालो ना चार-पाच दिवस. तेव्हढ्यात हे कामही उरकेल आणि ५ लाखही तर मिळालेत. पुढची मोहिम बरीचशी स्पॉन्सर झाल्यागत आहे."
"ह्म्म, तू नक्की कसली वाट पाहतो आहेस, तेच मला सांगत नाहीस."
"कळेल आपोआप." असं म्हणतो तो उठला आणि त्याचा सूट चढवू लागला.
"आता कुठे?"
"टारगेटकडे पहिलं पाऊल." तो हलकसं स्मित करत म्हणाला.
"पण तू सगळं व्हेरिफाय केलंयस ना? की तो खरंच.."
"होय, होय. केलंय. आता त्याच गोष्टीचा उपयोग करायचाय."

-----

"डेड एन्ड आहे साहेब!", शिंदे चेहरा पाडून रमेशच्या केबिनमध्ये शिरले.
रमेशनं कोर्‍या चेहर्‍यानं राजेंकडे पाहिलं. त्यांचा चेहरा नुसता पडलाच नाही तर एक विचित्र काळजी त्यांच्या चेहर्‍यावर दाटून आली.
"पण नक्की काय झालं?" राजेंचा आवाज थोडासा बदलला.
"त्यावेळेस कुठलाही फोन झाला नाहीय. थोडक्यात एकतर त्यांच्याकडे सिक्रेट फोनलाईन आहे, जे शक्य नाही किंवा ते जुनंच टेप्ड कॉन्व्हर्सेशन आहे, आपल्याला ऑफ द ट्रॅक करण्यासाठी!"
"ह्म्म." एव्हढं म्हणून राजे जागेवरून उठले आणि म्हणाले, "मी जरा जेलमधल्या कम्युनिकेशन्सचं कुठवर आलं ते पाहतो." आणि फोनवर काही डायल करत ते बाहेर पडले.
"तुम्हाला काय वाटतं साहेब?" शिंदे खुर्चीत बसत म्हणाले.
"मला वाटतंय काहीतरी विचित्र घाटतंय." रमेश राजेंच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत म्हणाला. "इतक्या चलाखीनं गायब होण्यामागे एकटा बबन किंवा त्याचा भाऊ असणं अशक्य आहे. बघू राजे काय करू शकतात. तोवर आपण आपल्या इतर केसेसचं पेपरवर्क चालू ठेवूया."

-----

"तुझ्या पुढच्या काही दिवसांचं काय झालं? आता तीन दिवस होत आलेत.. तू काय पकडलं जाण्याची वाट बघतो आहेस का?" रेखाच्या स्वरात खरोखर काळजी होती.
"ह्म्म. हे घे." नरेंद्र मंद स्मित करत तिच्या दिशेने एक एन्व्हलप फेकत म्हणाला.
"आता काय कणकेच्या हातांनी एन्व्हलप उघडू? ते भाजी चिरायचं नाटक बंद कर आणि त्याच सुरीनं एन्व्हलप उघडून वाचून दाखव."
"सुरीची गरज नाही आणि एन्व्हलपमध्ये वाचायचं काही नाही." तो एन्व्हलप उघडत म्हणाला, "दोन तिकिटं आहेत गुवाहाटीची."
"गुवाहाटी?" तिचं आश्चर्य लपलं नव्हतं. "मला वाटलेलं आता महाराष्ट्रात.."
"त्यासाठीच हे पाच दिवस जाऊ दिले मी."
"म्हणजे?" ती म्हणून गेली. "ह्म्म, हा प्रश्न मी विचारावा ह्यासाठीच ना सगळी सिक्रसी."
त्याच्या चेहर्‍यावर एक छोटीशी स्मितरेषा उमटली, "मी शर्माच्या तिजोरीतून काही कागदपत्रं उचलली होती. ती सगळीच टोटली युजलेस होती, पण रिकामी तिजोरी उघडी टाकायची मी दक्षता घेतली होती. त्यामुळे वर्तकसाहेबांच्या ऍरेस्टला महत्व आलं होतं. हाय प्रोफाईल मर्डर असल्यानं त्याला खुल्लमखुल्ला सोडवणं जरा अवघड होतं, पण शर्मा कॉम्प्रोमाईज झाल्याने आता वर्तकला महत्व आलं आहे. म्हणून त्याच्यासोबत काय होतं, ह्यावर मी नजर ठेवून होतो. त्याच्या ऑफिसचा क्राईम सीन झाल्यानं त्याच्या घरी कुणी ना कुणी पोचणार ह्याची मला खात्री होती आणि म्हणूनच मी परवाची आपली सुपारी ऍक्सेप्ट केली होती."
"म्हणजे?" रेखाच्या आश्चर्याला पारावार नव्हता.
"मी ज्या माणसाच्या सापळ्यात अडकल्याचं नाटक काल केलं होतं, तो वर्तकच्या बायकोचा भाऊ."
"थांब थांब थांब. हे सगळं.."
"बरं विस्तारानं सांगतो." असं म्हणत नरेंद्रनं पुन्हा भोपळी मिरची चिरायला घेतली.

-----


"साहेब!" शिंदे लगबगीनं रमेशच्या टेबलापाशी आले.
शिंदेंचा हा स्वर रमेशच्या ओळखीचा होता. वाईट बातमीसाठी रमेशनं मनाची तयारी केली. आणि चेहरा प्रश्नार्थक केला.
"राजेसाहेब.."
"त्यांचं काय?"
"काल रात्री हार्ट ऍटॅक येऊन गेले."
"काय?" रमेशलाच ऍटॅक यायची वेळ होती. "अशक्य आहे हे. त्यांना ओळखणारा कुणीही सांगेल."
"कॉरोनरचा रिपोर्ट आहे साहेब."
"कॉरोनरचा रिपोर्ट इतक्यात?"
"लॉ एन्फोर्समेंटचा माणूस साहेब, चटचट झालीत कामं."
"चटचट कामं होण्याचं कारण काही वेगळंच असणार शिंदे."


-----


"पहिल्या दिवशी जेव्हा मला सुपारीची ऑफर झाली, तेव्हा मी साशंक होतो, पण वेळ मारून नेण्यासाठी मी होकार दिला
होता. पण नंतर मात्र मी मागे फिरण्याचा निर्णय घेऊन मालकाला भेटायला गेलो."
"पण तू तर इथे काय काय सांगत होतास..."
"मला पूर्ण बोलू देशील?"
"ह्म्म" ती नाक मुरडत म्हणाली.
"तर मी मागे फिरण्याचा निर्णय घेऊन मालकाला भेटायला गेलो."
"पुढे.."
त्यानं डोळे वटारले तशी तिनं तोंडावर बोट ठेवलं.
"तर मी.. एनीवे. मालकाला उगाच माझी तत्व वगैरेचे डोस देऊन वातावरणनिर्मिती केली. पण मग जेव्हा मालकानं मला
त्याच्याविषयी माहिती द्यायला सुरूवात केली, तसतसे माझे डोळे चमकू लागले. मी लगेच ऑफर ऍक्सेप्ट केली. मोठ्या
हॉटेलांमध्ये जंगी पार्ट्या द्यायच्या. मेव्हण्याच्या ओळखीमुळे मोठी धेंडं पार्टीला यायची. मग सुंदर मुलींच्या जाळ्यामध्ये
त्यांच्यातलं कुणी अडकलं, की मग आपल्याच माणसांकरवी ब्लॅकमेल करायचं आणि पार्टी अवघड असेल तर मग
स्वतः पार्टीच्याच बाजूनं निगोशियेशन्स करायचा आव आणायचा आणि स्वस्तात सेटलमेंट्स करायच्या. प्रकरण अगदीच हाताबाहेर गेलं तर निस्तरायला वकील मेव्हणा होताच.
अशातच मालक अडकला होता. बरेच पैसे गेल्यानंतर त्याला अक्कल आली होती की हाच सगळ्याच्यामागे आहे. म्हणून मग सुपारीचा प्रपंच."
"पण तू काल नक्की काय केलंस?"
"ऍक्च्युअली, फार काही नाही. पार्टीला गेलो. आणि ड्रींक लेस, स्पिल मोअर पॉलिसी वापरून पूर्ण टाईट झाल्याचं नाटक केलं. मग ऍज एक्स्पेक्टेड एक मुलगी मला वर एका स्वीटमध्ये घेऊन गेली. ती चेंज करायला बाथरूममध्ये गेल्यावर मी सर्वप्रथम जॅमर वापरून सर्व रेडिओ इक्विपमेंट्स डिसेबल केली. इलेक्ट्रिक सॉकेट्स किंवा रिमोट कंट्रोल आणि वॉल क्लॉकसारखे रेडिमेड पॉवर सोर्सेस चेक केले. तेव्हढी अक्कल ह्या लोकांनी वापरली नव्हती हा माझा अंदाज बरोबर होता. सगळे कॅमेरे आणि माईक्स डिसेबल झाले होते. ती जशी बाहेर आली मी तिला क्लोरोफॉर्म देऊन बेशुद्ध केलं आणि बांधून बाथरूममध्ये लॉक करून टाकलं. कॅमेरा फीड गंडल्याचं कळताच ऍज एक्स्पेक्टेड दोन माणसं रूम सर्व्हिसचे कपडे घालून आली. मी खिडकीतून बाहेर पडून लॉबीत पोचलो होतो, त्यांना आत कोण आहे ह्याचा अंदाज नसल्यामुळे त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं आणि मी त्यांनाही जामलं आणि खोलीत डांबून ठेवलं. त्यातल्या एकाच्या मोबाईलवरून क्षीरसागरला एसएमएस केला, की "तो येतोय, सांभाळून." "
"अच्छा म्हणजे क्षीरसागरला मोबाईलपासून दूर ठेवायला ह्यासाठी मला सांगितलं होतंस." रेखाला एकदम साक्षात्कार झाला.
"यप्प." नरेंद्रचा चेहरा उजळला होता. "मग मी रूमसर्व्हिसचे कपडे घालून वरच्या मजल्यावर आलो, तू दार उघडलंस आणि मी आत येऊन त्याला गोळ्या घातल्या आणि मग आपण दोघे खिडकीतून खाली उतरलो आणि मी तुला चालत घरी जायला सांगितलं."
"आणि तू काय करत होतास?"
"मी बेसमेंटमध्ये जाऊन लॉबीतल्या कॅमेर्‍यांचा फीड पॅच करत होतो. गेले महिनाभर हॉटेलात दाढीमिशा लावून वेटरची नोकरी  उगाच करत नव्हतो. मी आणि तू एग्झॅक्टली किती कॅमेरांमध्ये येऊ ह्याचा मी पूर्ण आराखडा बनवला होता, म्हणूनच तुला स्पेसिफिक लिफ्ट आणि स्पेसिफिक जिने वापरायला सांगितले होते मी."
"पण मग तू नोकरी सोडल्याचं काय?"
"म्हणून तर पाच दिवस जास्तीचे. नाहीतर काम तर त्याच दिवशी झालं होतं. काल आणि आज दिवसभर कामावर होतो. पोलिसांना मुलाखतही दिली. त्या रात्री नाईट क्वीन बारमध्ये असल्याची ऍलिबीसुद्धा दिली."
"ती कशी काय?"
"तू काय मुलाखत घेते आहेस का माझी?"
"सांग ना. इतकं अंधारात का ठेवतोस. मी तुझी पार्टनर आहे ह्या सगळ्यात."
"तुला प्लॉझिबल डिनायेबिलिटी असावी म्हणून." एव्हढं म्हणताना त्याचा चेहरा गंभीर झाला आणि त्यानं कांदा कापायला घेतला.
". प्लीज. मला प्रोटेक्ट वगैरे करू नकोस. मी माझ्या मर्जीनं ह्यात आहे." ती कणिक मळणं अर्धवट सोडत त्याच्याजवळ आली. "आपल्या दोघांचीही गरज आहे ही."
"पण हे सगळं..." त्याचा आवाज थोडासा बदलला. "तू नाहीयेस अशी."
", रडतोयस की काय?"
"छे, कांदा.." आणि तो उठून गेला.
ती त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे दोन क्षण पाहत राहिली. आणि मग पुन्हा कणिक मळायला लागली.


-----


"इन्स्पेक्टर रमेश." जेलरनी त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं. "या बसा. तुमचीच वाट पाहत होतो."
"अख्खं जेलच माझ्या येण्याची वाट पाहत असल्यासारखं वाटतंय मला. दारावरच्या हवालदारापासून, नोंदणी हवालदार आणि थेट तुमच्यायापर्यंत." रमेश त्यांचा चेहरा निरखत म्हणाला.
"राजेंच्या मृत्यूनंतर तुम्ही इथे येणार ह्याचा अंदाज होताच."
रमेशने कान टवकारले. "राजेंशी तुमचा संपर्क झाला होता?"
"अर्थात."जेलरच्या चेहर्‍यावरची रेषही हलत नव्हती, " एकदा प्राथमिक चौकशी करायल आले होते, तेव्हा तुमच्यासोबत तपास करणार असल्याचं बोलले होते."
"तुम्ही मला कसे ओळखता?"
"तुम्ही मला अजून कसं ओळखलं नाही?" जेलरनी पुन्हा रमेशकडे रोखून पाहिलं आणि भुवया वर केल्या.
आणि रमेशच्या डोक्यात प्रकाश पडला. एक एक प्रतिमा डोळ्यासमोर तरळू लागली. त्याच्या बहिणीचा छिन्नविछिन्न मृतदेह आणि त्या केसचा तपास करणारा मुख्य अधीक्षक आणि त्याचा बॉस म्हणजेच हे जेलर, ज्यांनी रमेशला ती केस जास्त बदनामी न होता क्लोज करायला मदत केली होती.
"भणगेसाहेब."
जेलरच्या चेहर्‍यावर हलकं स्मित झळकलं. रमेशला मात्र अस्वस्थ वाटू लागलं. "मला त्या कैद्यांच्या फाईल्स मिळतील का?"
"बबनची फाईल राजे घेऊन गेले होते, ती कदाचित त्यांच्या घरी असेल आणि बाकीच्या फाईल्स सीबीआयची दुसरी टीम घेऊन गेली."
रमेशला का कुणास ठाऊक अजिबात आश्चर्य वाटलं नाही. त्यानं टेबलावरचं पाणी प्यायलं आणि कसाबसा उठून निघाला.
"एक सांगू रमेश..." ह्या आवाजानं तो जाता जाता क्षणभर थबकला आणि त्यानं मागे वळून जेलरकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
"तू इथे यायला नको होतंस."
ह्यापुढे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार नाही हे रमेशच्या लक्षात आलं आणि तो विचारमग्न आणि अस्वस्थच बाहेर पडला.

-----

"हे घे तुझे पैसे." नरेंद्र एका दांडगोबाला पैसे देत होता.
"पण तू त्याच्यासारख्याशी कशाला पंगा घेतला. काल मी त्याला मारलं तर अख्ख्या बारमध्ये मारामारी सुरू झाली आणि तू कुठे गायब झाला होता बे?"
नरेंद्रनं फक्त एक स्मित केलं आणि तो नाईट क्वीन बारमधून बाहेर पडला. रात्रीचे दहा वाजत आले होते.
'रेखा स्टेशनवर वाट पाहत असेल, गाडी यायला तासभरच बाकी आहे' असा स्वतःशीच विचार करत तो स्टेशनच्या दिशेनं भरभर चालू लागला, 'आता गुवाहाटीचं कसं कळलं, त्याची अख्खी स्टोरी सांगावी लागेल, इतके तास शेजारी बसून विषय टाळता येणार नाही.'

क्रमशः 

6 comments:

  1. मला आता पुन्हा पाहिले ३ भाग वाचणे क्रमप्राप्त आहे... :) मग हा चौथा.. ;)

    ReplyDelete
  2. अरे लक्षात होत होय तुझ्या लिहायचं

    ReplyDelete
  3. येवढा उशीर लावल्याचा झायीर णीषेध!
    फुडचा भाग लवकर येऊ द्या..

    ReplyDelete
  4. रोहन मी पहिले ३ पुन्हा वाचले. :) बाबा, आता पुढचा लगेच टाक रे! :)

    ReplyDelete
  5. पहिले तीन भाग पुन्हा वाचावे लागणार आता आधी ...:-) आता तुम्ही हे समाप्त केलत की मगच वाचेन सगळे :-)

    ReplyDelete
  6. @रोहना,
    वाचावे लागतील रे भावा, मला पण वाचावे लागले, चौथा भाग लिहिण्यासाठी! :D
    @सचिन,
    अहो झोप लागत नाही, एक कथा शिल्लक आहे म्हटल्यावर! :P
    @सुदीप मिर्जा,
    मी स्वतःदेखील स्वतःचा निषेध करतो आहे. काय करू, काही कारणं होती, ज्यामुळे लिहिणं होत नव्हतं. तुम्ही लक्ष ठेवून होतात, ह्यातंच सर्व आलं. धन्यवाद!
    @श्रीताई,
    होय, आता टाकेन लवकर लवकर. :)
    @सविताताई,
    समाप्त व्हायला फार वेळ लागणार आहे. एकच कथा राहिलेली नाही आता :( माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त सूत्र तयार झालेली आहेत. एकंदर वाचकांवर बराच अत्याचार होणार आहे :-|

    ReplyDelete