भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६, भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१०, भाग -११, भाग -१२, भाग -१३, भाग -१४ आणि भाग -१५ पासून पुढे
बोलता
बोलता नरेंद्रचं लक्ष वारंवार
खिडकीबाहेर जात होतं.
आता
ते जंगली भागातून थोड्याशा
पठारीसदृश भागात शिरले होते.
रेखाला
आपली इत्थंभूत माहिती सांगताना
नरेंद्रला प्रचंड हलकं वाटू
लागलं.
तो
तिला त्याच्या आयुष्यातल्या
एका अशा काळाची कथा सांगत
होता,
जो
त्यानं स्वतःतच कुठेतरी पुरून
टाकला होता.
आत्ताही
ते सांगताना आपल्याला
त्रयस्थासारखंच वाटेल असा
त्याचा ग्रह होता,
पण
प्रत्यक्षात तसं होत नव्हतं.
तो
पुन्हा एकदा तो काळ जगत होता.
अंगावर
शहारे येत होते,
छातीत
धडधड वाढत होती आणि ह्या
सगळ्याचा परिणाम म्हणून त्याला
एकाच वेळी हलकं आणि थोडंसं
अवघडल्यासारखं झालं होतं.
पण
त्याचं डोकं अजूनही पूर्णपणे
गाडीच्या रस्त्यावर केंद्रित
होतं आणि काहीतरी चुकतंय अशी
एक जाणीव त्याला खात होती.
-----
रमेशच्या
कपड्यांवरचे डाग नुसत्या
शॉवरच्या पाण्यानं जाणार
नव्हते आणि मनावरचे चरेही,
पण
तो तसाच वाहत्या शॉवरच्या
पाण्याखाली बसून होता,
कदाचित
सगळं धुतलं जाईल ह्या आशेने.
शॉवरमुळे
सगळं धूसर दिसत होतं,
कदाचित
रमेशला तेच हवं होतं.
धूसरता,
अनिश्चितता,
खरं-खोटं
ह्यांच्यामधली कुठलीतरी
जागा.
त्याच्या
डोळ्यासमोर त्याच्या बहिणीचा
मृतदेह,
तिचं
रक्ताळलेलं ओळखपत्र,
सुवर्णाचा
मृतदेह,
कोल्हेचा
टॉर्चच्या प्रकाशातला रक्ताचे
शिंतोडे उडालेला आश्चर्यचकित
आणि भेसूर चेहरा आणि त्यानंतर
त्यानं एकामागोमाग एक झाडलेल्या
गोळ्या हेच सर्व वारंवार येत
होतं.
एखाद्या
सिनेमाचं रीळ फिरावं तशी
वारंवार तीच फीत मेंदू पुनःपुन्हा
डोळ्यांसमोर फिरवत होता.
पण
तरीही ते सर्व रजिस्टर होत
नव्हतं.
असंबद्ध
चित्रं फक्त डोळ्यांसमोर
नाचत होती.
धुक्यात
हरवून गेल्यासारखा रमेश बसून
होता.
एखाद्या
भ्रमिष्टासारखा किंवा तारेत
असलेल्या गर्दुल्ल्यासारखा.
बर्याच
वेळानंतर कधीतरी रमेशला हळूहळू
त्या सर्व चित्रांची संगती
लागू लागली.
आणि
त्यानंतर एकएक करून सर्व
गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या.
धुकं
विरळ होऊ लागलं.
आपल्या
हातून नक्की काय घडलं ह्याचा
अंदाज रमेशला येऊ लागला.
बहिणीच्या
मृत्यूचा आणि त्यानंतर त्यानं
केलेल्या तडजोडीचा सल मनात
बाळगून रमेशनं बर्याच केसेस
सोडवल्या होत्या.
पण
अपिरिमित त्रास होत असूनही
त्यानं कधी ते सर्व स्वतःच्या
कामाच्या आड येऊ दिलं नव्हता
की स्वतःवरचा ताबा कधी सुटू
दिला नव्हता.
पण
ह्यावेळेस मात्र त्याचा नुसताच
ताबा सुटला नव्हता,
तर
त्यानं एका पोलिसाला अन ते
ही एसीपी लेव्हलच्या आयपीएस
अधिकार्याला मारलं होतं.
कारणं
काहीही असोत.
तो
शॉवरमधून बाहेर आला आणि आरशासमोर
उभा राहिला.
स्वतःच्या
अवताराकडे पाहून त्याला
स्वतःची अजूनच जास्त कीळस
वाटू लागली.
अशावेळी
जे होतं तेच झालं,
त्याला
स्वतःच्या सगळ्या चुका
एकामागोमाग एक आठवू लागल्या.
राजे
अन डॉ.
काळेंच्या
खुन्याचा अर्धवट सोडलेला
तपास,
डॉ.
काळेंच्या
विधवेबद्दल वाटणारं आकर्षण,
त्याच
खुन्यांकडून मिळणारी अर्धवट
अन बरेचदा खोटी अन चुकीचीही
माहिती आणि हे कळूनदेखील
त्याकडे दुर्लक्ष करून चालू
ठेवलेला तपासाचा अर्थहीन
प्रयत्न.
'हे
सर्व कशासाठी तर बहिणीच्या
खुन्याची ओळख मिळावी म्हणून?
खुनी
कोण हे कळल्यावर मी काय करणार
होतो?
जर
काही करायचंच होतं तर ते मी
तेव्हाच का नाही केलं?
जे
मी कोल्हेसोबत केलं तेच जर
मी करणार होतो,
तर
आता ती पातळीही गाठून झाली.
जेव्हा
तपास करण्याची वेळ होती,
तेव्हा
मला बहिणीबाबतच्या न्यायापेक्षा
कुटुंबाची अब्रू महत्वाची
वाटली होती.
आणि
ती अब्रू वाचवूनही काय मिळालं
होतं?
समाधान
तर अजिबातच नाही,
उलट
जवळपास संपूर्ण कुटुंबाशी
माझे संबंध तुटल्यातच जमा
आहेत.
मी
स्वतःलाच अपराधी समजतोय का?
समजायचं
काय आहे?
मी
आहेच तिचा अपराधी.
तिचा
खून करणाराही तिचा जेव्हढा
अपराधी नसेल तेव्हढा मी आहे.'
हीच
भळभळती जखम वागवत तो अस्वस्थ
अश्वत्थाम्यासारखा प्रत्येक
नव्या केसला औषध समजत वणवण
भटकत होता.
त्यादिवशी
मात्र त्यानं नवीच पायरी
ओलांडली होती.
-----
नरेंद्रची
कथा ऐकता ऐकता रेखाचे डोळे
विस्फारले गेले होते.
नरेंद्र
आठ वर्षांपूर्वीपर्यंत विवेक
जोगळेकर होता.
एक
साधा सर्वसामान्य मध्यमवर्गीय
इंजिनियर.
सकाळी
साडेआठ वाजता ऑफिसात जाणारा
आणि संध्याकाळी सहा वाजता
घरी येणारा.
कधी
आईवडिलांपासून दूर राहिला
नाही आणि कधी आईवडिलांच्या
आज्ञेबाहेर गेला नाही.
कायम
लाडका असल्यानं म्हणा पण
अत्यंत प्रोटेक्टेड वातावरणात
वाढलेला अन त्यामुळेच स्वतःचे
निर्णय स्वतः घेण्याची क्षमता
हरवून बसलेला एक २५ वर्षांचा
एलिजिबल बॅचलर.
पण
काहीतरी घडलं अन तो जातीबाहेरच्या
वसुधाच्या प्रेमात पडला.
आपल्या
निर्णयावर ठाम राहायचं असं
ठरवून आईवडिलांना बोलला खरा
पण आईवडिलांच्या पहिल्याच
नकाराला त्यानं शस्त्रं टाकली.
वसुधाला
नकार देऊन स्वतःचं कर्तव्य
बजावून मोकळा झाला.
पण
मग हळूहळू त्याला आतून
खाल्ल्यासारखं होऊ लागलं.
कुठेतरी
केलेली गोष्ट त्याला पटत
नव्हती.
स्वतःच्या
कमकुवतपणाचं,
बुळेपणाचं
त्याला आश्चर्य वाटू लागलं.
'थोडा
अधिक प्रयत्न केला असता तर
कदाचित...
पण
कसं करणार होतो आपण?
काय
केलंय आजवर आपण स्वतः?
कसा
देणार होतो तिलासुद्धा न्याय
आपण?
सर्वांच्या
विरोधात जाऊन केलं जरी असतं
तरी पुढे काय?
असल्या
बुळ्या अन भित्र्या माणसासोबत
कोण सुखी होणार?'
असल्या
विचारांच्या वावटळीत तो फसू
लागला होता.
हळूहळू
स्वतःचं निर्णयक्षम नसणं
त्याला फारच खटकू लागलं.
लहानपणापासून
झालेल्या प्रत्येक गोष्टीत
तो स्वतःचं अपयश शोधू लागला.
एका
विचित्र आवर्तात तो सापडला.
त्याचं
साधंसं,
छोटंसं,
सुरक्षित
जग अंतर्बाह्य हादरून गेलं
होतं.
त्याच्या
आयुष्याच्या सुरक्षित भिंतींना
संशयाचे आणि अविश्वासाचे तडे
गेले होते.
त्याचं
कामात लक्ष लागेना.
असंच
वर्षं उलटलं आणि यथावकाश
वसुधाचं लग्न दुसरीकडे लागलं.
विवेक
मात्र अजूनची स्वतःचेच अवगुण
मोजत गर्तेत जात होता.
आणि
जेव्हा त्याच्या आईवडिलांनी
त्याच्यासाठी मुली पाहायला
सुरूवात केली तेव्हा मात्र
कडेलोट झाला.
विवेक
एके दिवशी पहाटे घरातून बाहेर
पडला.
एकटाच
निरूद्देश भटकत,
मिळेल
ती बस,
मिळेल
ती ट्रेन करत तो काही दिवस
नुसताच फिरत राहिला.
आणि
एक दिवस त्याला गोदीमध्ये
हमालाचं काम मिळालं.
स्वतःचा
सगळा भूतकाळ त्याला पुस्रून
टाकावासा वाटत होता.
जे
आयुष्य त्यानं कधी पाहिलंही
नव्हतं ते पाहावं असं त्याला
वाटत होतं.
पण
सुरक्षित वातावरणात वाढलेल्यांसाठी
बाहेरचं जग म्हणजे कर्दनकाळ
असतं,
हे
त्याला अजूनही कळलेलं नव्हतं.
जीवाच्या
करारावर तो हमालाचं काम करू
लागला.
आठवडे
अन आठवडे दाढी केलेली नव्हती
आणि बहुतेक आंघोळही.
पण
तरीही मुळात सुखवस्तू कुटुंबातला
गोरागोमटा विवेक वेगळा दिसतच
होता.
इतर
हमालांसोबत एका खोलीत आठजण
असा तो दाटीवाटीनं राहत होता.
अशा
सात-आठ
खोल्या एका बाजूला एक होत्या.
आणि
त्यानं काम सुरू केल्याच्या
महिनाभरातच ती घटना घडली.
विवेकचं
विश्व अंतर्बाह्य ढवळून
काढणारी आणि बदलून टाकणारी.
-----
एके
रात्री विवेक नुकताच जेवून
स्वतःच्या कोपर्यातल्या
चटईवर पहुडला होता,
तेव्हा
त्याच्या खोलीतले नेहमीचे
लोक उठून बाहेर गेले आणि भलतेच
पाच लोक आत शिरले.
आडदांड
आणि राकट असे ते पाच लोक
विवेकच्याच दिशेनं येऊ लागले.
आणि
काही कळायच्या आत त्यातल्या
चौघांनी विवेकला धरलं आणि
पाचवा विवेकसमोर उभा राहिला.
अचानक
घडत असलेल्या घटनाक्रमानं
विवेकचा आश्चर्याचा भर ओसरतही
नव्हता आणि त्या आडदांड लोकांना
पाहून त्याची वाचाच बसली होती.
आणि
एकदम त्या समोर उभ्या माणसानं
स्वतःची विजार काढली.
त्याबरोबर
विवेकला पकडून उभ्या असलेल्यांपैकी
दोघांनी विवेकची विजार उतरवायचा
प्रयत्न चालू केला.
त्या
क्षणामध्ये विवेकमध्ये काय
संचारलं ते त्याला कधीच सांगता
आलं नसतं.
त्यानं
जोरात हिसडा मारून स्वतःला
सोडवून घेतलं आणि कोपर्यात
पडलेला भाजी चिरायचा चाकू
हातात घेतला आणि मग कुणी काहीही
हालचाल करण्यापूर्वीच त्यानं
सपासप वार करून तिघांना कंठस्नान
घातलं.
त्याचा
तो अवतार पाहून बाकीचे घाईगडबडीत
ओरडत दार उघडून पळून गेले.
बाजूच्या
खोल्यांतल्या लोकांनी डोकावून
पाहिल्यावर समोर रक्तानं
माखलेला विवेक त्यांना दिसला
आणि जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात
पडलेले तीन मृतदेह.
सगळेजण
आपला जीव वाचवून पळत सुटले.
पण
विवेकसाठी तो साक्षात्काराचा
क्षण होता.
"त्या
क्षणी मला पहिल्यांदाच मी
जिवंत आहे असं जाणवलं.
इतके
दिवस मी जगत होतो,
पण
त्या क्षणी मी जिवंत झालो.
माझ्या
अस्तित्वाला काही अर्थ आहे
असं वाटलं.
पण
अर्थातच तो फक्त एक ऍड्रेनलिन
रश होता.
ते
जिवंत वाटणं वगैरे ऍड्रेनलिन
रशचीच वर्णनं आहेत हे नंतर
कळलं."
नरेंद्र
रेखाला सांगत होता,
"पण
त्या तसं वाटण्यामुळेच मी
लवकर सावरलो.
व्हिक्टिम
होता होता मी व्हिक्टर झालो
होतो.
चटाचट
आंघोळ केली आणि कपडे बदलून,
जे
आणखी सामान हाताला लागेल ते
घेऊन मी तिथून बाहेर पडलो.
जी
पहिली मिळाली ती लॉन्ग डिस्टन्स
ट्रेन पकडली आणि माझा नवा
प्रवास सुरू झाला."
रेखा
त्याच्याकडे एकटक पाहत होती.
"ज्या
ट्रेनमध्ये होतो ती ट्रेन
हैदराबादला जाणारी होती आणि
आंध्राच्या तिरूमला जिल्ह्याच्या
जवळपास ती ट्रेन नक्षलवाद्यांनी
हायजॅक केली."
नरेंद्र
चेहरा जमेल तितका सरळ ठेवण्याचा
प्रयत्न करत सांगत होता.
"मला
माहितीय हे सगळं अगदी फिल्मी
वाटतंय.
पण
माझी कहाणी अशीच आहे.
ऐकायला
फिल्मी पण जगायसाठी नरकाहून
वाईट."
"तू
बोलत राहा रे.
वरची
कॉमेंट्री नको."
रेखा
ताण हलका करायचा प्रयत्न करत
होती.
आताशा
त्यांची गाडी रहदारीच्या
रस्त्याला लागू लागली.
नरेंद्रनं
वल्लभला विचारायचं ठरवलं
एव्हढ्यात गाडी पुन्हा मुख्य
रस्ता सोडून कच्च्या रस्त्याला
लागली आणि वल्लभच बुधियाला
काय करतोयस म्हणून विचारू
लागला.
नरेंद्र
एकदम सावध झाला आणि त्यानं
रेखाचा हात धरून तिला शांत
राहण्याची खूण केली.
बुधियानं
फुल ऍक्सिलरेटर दिला आणि गाडी
वेगानं मुख्य रस्त्यापासून
दूर जाऊ लागली.
वल्लभनं
बंदूक काढायचा प्रयत्न करेस्तोवर
बुधियानं गोळी झाडली आणि वल्लभ
जागच्या जागी गतप्राण झाला.
रेखाला
काही समजेनासं झालं होतं आणि
नरेंद्र सोबत बंदूक न ठेवल्याबद्दल
स्वतःला कोसत होता.
"घबराओ
मत। तुम दोनोंको जिन्दा उनके
हवाले करना है।"
बुधिया
आरशातून नरेंद्रकडे पाहत
म्हणाला आणि त्याचा डावा हात
बंदूक रेखाच्या डोक्यावर
धरून होता.
आणि
पाच मिनिटांनी जेव्हा गाडी
मुख्य रस्त्यापासून फार दूर
अंतरावर माळरानाच्या मधोमध
आली तेव्हा त्यानं गाडी थांबवली.
त्याबरोबर
दूरून अजून दोन गाड्या त्यांच्या
दिशेनं येताना नरेंद्रला
दिसल्या.
त्या
गाड्या इथपर्यंत पोचल्या तर
सुटणं पुरतंच अशक्य होईल हे
लक्षात येऊनही नरेंद्र फक्त
रेखाच्या डोक्यावरची बंदूक
पाहत शांत बसून राहिला.
गाड्या
जवळ येऊन थांबल्या आणि बुधियाचं
लक्ष विचलित झालेलं पाहून
रेखानं त्याचा हात झटकला आणि
एका फटक्यात नरेंद्रनं त्याला
बेशुद्ध केलं.
त्याची
बंदूक घेतली आणि त्याच्या
डोक्यात गोळी घालून तो गाडीबाहेर
पाहू लागला.
एव्हाना
त्याच्या गाडीवर फायरिंग
सुरू झालं.
त्यानं
गाडीचा मागचा दरवाजा उघडला
आणि वल्लभची बंदूक रेखाला
देऊन तिथून बाहेर पडायला
सांगितलं.
बुधियाची
बॉडी ढाल म्हणून वापरून तो
पुढे झाला आणि रेखा गाडीतनं
उतरल्याचं पाहून त्यानं गाडी
सुरू करून ऍक्सिलरेटरवर
बुधियाचा निष्प्राण पाय टाकला.
त्याबरोबर
ती सरळ जाऊन पुढच्या गाडीवर
धडकली.
तोपर्यंत
त्यानं स्वतः मागच्या दरवाज्यातून
बाहेर उडी मारली होती.
रेखानं
एका गाडीवर अचूक नेम साधून
दोघांना टिपलं होतं आणि
दुसर्यावर गाडी धडकल्यानं
सगळंच कोलमडलं होतं.
"ठीक
आहेस ना?"
नरेंद्रनं
तिच्या जवळ जात विचारलं.
"हो
पण हे.."
"आयएसआय"
तिचं
बोलणं पूर्ण व्हायच्या आत तो
बोलला आणि दुसर्या गाडीच्या
दिशेनं निघाला.
त्यातले
सगळे मेलेत ह्याची खात्री
करून तो वळला तोवर ज्या गाडीवर
त्यानं गाडी धडकवली होती
त्यातून फायरिंग सुरू झाली.
त्यानं
रेखालाही दुसर्या गाडीच्या
आडोशाला ओढलं आणि वाट पाहू
लागला.
पाच
गोळ्या झाडल्या गेल्यावर
नरेंद्र शांतपणे चालत त्या
गाडीपाशी गेला आणि दोन गोळ्या
झाडल्या आणि पुन्हा सर्व
मेल्याची खात्री करून मागे
आला.
"तुला
कसं कळलं की त्याच्या गोळ्या
संपल्यात?"
रेखा
आश्चर्यानं विचारत होती.
"सगळ्या
बंदुकांमध्ये एकच वॉल्थर
पी९९ चा आवाज होता.
आणि
ह्या गोळ्या.."
शेजारच्या
गाडीच्या दरवाज्यावर लागलेल्या
गोळ्यांकडे बोट दाखवत तो पुढे
म्हणाला,
"०.४०
स्मिथ ऍन्ड वेसन आहेत.
वॉल्थर
पी९९ मध्ये त्यांचं मॅगझिन
१२ राऊंडचं येतं.
त्यामुळे
टोटल १२ व्हायची मी वाट पाहत
होतो."
"पण
तुला काय माहित की तो दुसरी
बंदूक उचलणार नाही?"
"तो
ज्या पद्धतीनं अंदाधुंद गोळ्या
चालवत होता.
त्यावरून
तो ट्रॅप्ड असल्याचा मला अंदाज
आला.
धडकेमुळे
त्याचा पाय दरवाजात चेमटला
होता.
आणि
१२ गोळ्या झाल्यावर मी दोन
मिनिटं थांबलो,
त्यावरून
त्याला दुसरी बंदूक मिळत
नव्हती.
शेवटचे
अंदाधुंद राऊंड्स म्हणजे
असहायता होती."
त्यानं
गाडीतली हत्यारं एकत्रं केली
आणि कागदपत्रं काढून पाहू
लागला.
"पण
आयएसआयला कसंकाय.."
रेखा
बोलणं पूर्ण करायच्या आतच
नरेंद्र बोलू लागला.
"बुधिया.
आय
न्यू इट."
नरेंद्र
कपाळाला हात मारत म्हणाला,
"मला
वाटतच होतं काहीतरी गडबड आहे.
अर्ध्या
रस्त्यात पोचल्यावर बुधियाच्या
मानेवर मला टॅटू दिसला होता
आणि तो टॅटू मी आधीही कुठेतरी
पाहिला होता.
पण
कुठे ते आठवेना.
आता
आठवलं मला.
बुधिया
'उल्फा'
चा
मेंबर आहे.
आणि
हा सुद्धा."
नरेंद्र
गाडीतून काढलेल्या,
पाय
चेमटलेल्या शवाकडे बोट दाखवत
म्हणाला.
त्याच्याही
मानेवर एक टॅटू होता.
"म्हणजे?"
"उल्फा
ही आसामची दहशतवादी आणि
विघटनवादी संघटना आहे.
साहजिकच
त्यांना चीन,
पर्यायाने
माओवादी,
नक्षलवादी
आणि आयएसआयचा पाठिंबा आहे.
जेव्हा
आपण महातोचं अपहरण करून आयएसआयचं
लक्ष आपल्याकडे ओढून घेतलं,
तेव्हा
साहजिकच आयएसआय मदतीसाठी
जुने फेव्हर्स मिळवायला
उल्फाकडे वळली.
आणि
मी उल्फाचं भुयार वापरून मग
उडवलं,
त्यामुळे
मला पकडायचं त्यांनी मनावर
घेतलं."
"पण
तू तर म्हणालेलास ते नक्षलवादी
भुयार होतं."
"जॉईंट
ऑपरेशन होतं.
दुसर्याच्य
परवानगीशिवाय कुणीही एकानं
ते असं नष्ट करणं इष्ट नव्हतं.
पण
मला फरक पडत नाही."
"पण
म्हणजे कल्पनाही या सगळ्यात?"
"नाही.
मला
वाटत नाही.
पण
बुधियासारखे अन्य उल्फावालेही
तिथे असतीलच.
तिला
मेसेज पाठवायला हवा."
"मग
हे बाकीचे?"
"हे
आयएसआयवाले आहेत.
ह्यांच्या
आयडी चिप्सही सापडतील इथे.
हा
एकटा उल्फावाला होता.
म्हणूनच
ह्याची बंदूक वेगळी आणि जुनी
होती.
त्यामुळेच
मला वेगळा आवाज येत होता."
नरेंद्र
सगळ्या मृतदेहांची झडती घेत
म्हणाला.
वल्लभच्या
खिशातून त्याला एक उपकरण
मिळालं.
"क्लासिक
मेसेजिंग सिस्टम."
नरेंद्र
स्वतःशीच म्हणाला.
आणि
त्यावर टाईप करू लागला.
"काय
आहे हे?"
"मॉर्सकोड.
वल्लभ
गोळी झाडताच मेला नव्हता.
त्यानं
ऑलरेडी कल्पनाला मेसेज पाठवला
आहे.
आता
मीही पाठवतो आपण सुखरूप असल्याचा
आणि उल्फापासून सावध राहण्याचा.
पण
तिची माणसं इथे थोड्याच वेळात
पोचतील,
त्याच्या
आत आपण इथून निघूया."
-----
बराच
वेळ आरशासमोर उभं राहिल्यावर
रमेशनं मनाशी काहीएक निश्चय
केला.
त्यानं
अंगावरचे कपडे बदलले.
रक्ताचे
डाग असलेले कपडे एका पिशवीत
भरले.
घरातलं
स्वतःचं सगळं सामान गोळा केलं
आणि सगळं बॅगेमध्ये भरून एका
कोपर्यात,
त्या
कपड्यांच्या पिशवीसोबतच
ठेवलं.
ज्या
बंदूकीनं त्यानं कोल्हेचा
खून केला होता.
ती
बंदूक घेऊनच तो सोफ्यावर बसला.
तेव्हढ्यात
त्याचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे
गेलं.
तो
व्हायब्रेट मोडवर असल्यानं
इतका वेळ आलेले कॉल्स त्याला
दिसले नव्हते.
ते
सगळे कॉल्स कमिशनर सिन्नरकरांकडून
होते.
त्यानं
मोबाईल शांतपणे स्विच ऑफ केला
आणि समोर टीपॉयवर ठेवला.
बहिणीचं
ओळखपत्र त्यानं शर्टाच्या
खिशातून काढलं आणि एकदा डोळेभरून
पाहिलं.
ते
पुन्हा खिशात ठेवलं आणि बंदूकीची
नळी तोंडात कोंबली.
डोळे
मिटले,
एक
दीर्घ श्वास घेतला आणि ट्रिगर
ओढला.
क्रमशः
(टीप - अजून दोन ते तीन भागांमध्ये कथा समाप्त होईल. डोक्यात शेवट झालेला आहे तो फक्त कळफलकावर उतरणे बाकी आहे. सर्व वाचकांचे त्यांच्या संयमाबद्दल आणि वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार.)