6/19/2011

प्रिझन ब्रेक - आदिम मानवी भावभावनांचा चित्तथरारक कोलाज

परदेशी सिनेमांमधून नेहमीच दिसलेलं आणि भारतीय सिनेमामध्ये पूर्वी बरेचदा सांकेतिक पद्धतीनं दिसणारं किंवा सहसा नसणारंच आणि हल्ली हल्ली खुलेपणाने सामोरं येणारं एक अंग म्हणजे आदिम मानवी भावभावना. ज्याला रॉ इमोशन्स असं म्हणता येईल. म्हणजे उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यापासून अस्तित्वात असलेल्या मूलभूत अशा भावना. सूड, द्वेष, हिंसा इत्यादी. भारतात आधीच्या काळात बहुतेककरून सिनेमे कौटुंबिक मनोरंजनाचा सोहळा म्हणून अभिप्रेत असल्याने त्यामध्ये अशा आदिम भावभावनांचं उघड प्रदर्शन म्हणजे एकतर सेन्सॉरची कात्री किंवा प्रौढ प्रमाणपत्र किंवा पडेल पिक्चर हे नक्की समजलं जायचं. पण हळूहळू परदेशी सिनेमांची भारतीय सिनेप्रेक्षकाला ओळख आणि सिनेमाची केवळ कौटुंबिक मनोरंजनापलिकडे जाऊन एक कला आणि कधीकधी समाजमनाचा आरसा म्हणूनही होऊ शकणारा वापर ह्यामुळे आधी उभी राहिलेली समांतर सिनेमाची चळवळ आणि त्यानंतर कालौघामध्ये समांतर आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा ह्यांच्यातील कमी होत गेलेली दरी असा एक प्रवास घडला. मग काही उत्तम दिग्दर्शकांनी मुख्य प्रवाहातीलच सिनेमात ह्या आदिम भावनांना स्थान देऊन प्रेक्षकांकडून स्वीकृतीही मिळवून दाखवली. अजूनही प्रवास सुरूच आहे आणि ह्या पद्धतीची दृश्य सिनेमांत कितपत दाखवावीत किंवा कितपत दाखवू नयेत किंवा कुठलं प्रमाणपत्र देण्यात यावं ह्यावर बरेच वादप्रवाद आहेत, त्यांत मी पडत नाही. मुद्दा हा की, पाश्चात्य सिनेमा आणि अतिपूर्वेकडचा सिनेमा हे दोघेही ह्या पद्धतीच्या कथांमध्ये फार पुढे निघून गेलेले आहेत.
पाश्चात्य, मुख्यत्वेकरून अमेरिकन दूरदर्शनदेखील कथावस्तू, कथा, तांत्रिक बाजू, अभिनय आणि बजेट यामध्ये भारतीय दूरदर्शनच्या अनेक प्रकाशवर्षे पुढे आहे. त्यांची पातळी बरेचदा सिनेमाच्या जवळपास जाणारी असते. तेव्हा त्यांनीही कथावस्तूंमध्ये उपरोल्लेखित भावनांना हात घातला नसता तर नवलच होतं. अमेरिकन दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर अनेकानेक उत्तमोत्तम मालिका चालतात ज्यामध्ये निखळ विनोदी, कौटुंबिक विनोदी ते अगदी चित्तथरारक आणि भयकथा हाताळणार्या मालिकांचाही समावेश होतो. आणि अनेक मालिका इतक्या उच्च दर्जा गाठतात की अनेक सिनेमेही त्यापुढे फिके वाटावेत.
नमनाला एव्हढं घडाभर तेल ओतण्याचं कारण की मध्यंतरी 'प्रिझन ब्रेक' ही अमेरिकन मालिका माझ्या पाहण्यात आली आणि अशा मालिका भारतात का बनू शकत नाहीत किंवा भारतातल्या मालिका जशा आहेत तशा का? असे काही प्रश्न मला पडले आणि वरील विचारशृंखलेसोबत ते विझूनही गेले. पण 'प्रिझन ब्रेक' मात्र डोक्यातून जात नाही. त्यामध्ये दाखवलेली, अंगावर सरसरून काटा आणणारी दृश्य असू देत किंवा चित्तथरारक पाठलाग असू देत किंवा कधीमधी डोळ्यांत पाणी आणणारं दृश्य असू देत, 'प्रिझन ब्रेक' इज अ क्लास अपार्ट!

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीच्या भावाची हत्या केल्याबद्दल 'लिंकन बरोज'ला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली असते. पण तो निर्दोष असल्याची खात्री असलेला त्याचा धाकटा भाऊ 'मायकल स्कोफिल्ड' त्याच्या सुटकेचे अन्य सर्व प्रयत्न थकल्यावर एक धाडसी निर्णय घेतो. लिंकनला ज्या जेलमध्ये ठेवलंय त्या जेलची रचना केलेल्या फर्ममध्येच मायकलनं एकेकाळी काम केलेलं असतं, ती ब्ल्यू प्रिंट आणि अन्य बरेच क्ल्यूज स्वतःच्या अंगावर गोंदवून मायकल खोटा बँक दरोडा घालतो आणि लिंकनला सोडवायला त्याच जेलमध्ये येतो.
मायकलप्रमाणेच लिंकनच्या निर्दोषत्वावर विश्वास असलेली वकील व्हेरॉनिका आणि जेलमधले अनेक चित्रविचित्र सहकारी ह्यांच्या रगाड्यामध्ये एक एक रहस्य उलगडत जातं. लिंकनला फसवण्यामागे असलेली 'कंपनी' वगैरे प्रकार अमेरिकन स्पाय नॉव्हेल्स वगैरेंमधून बरेचदा हाताळले गेले असले तरी मालिका चित्तथरारक करण्यामध्ये इथे ही संज्ञा बराच हातभार लावते.
जेलमधलं आयुष्य इतक्या ग्राफिक पद्धतीनं दाखवलंय की बरेचदा ते अंगावर येतं. आणि जेलमधल्या घडामोडींमध्ये आपल्याला इतका रस निर्माण होतो की बरेचदा जेलबाहेरची दृश्य लवकर संपावीत असं आपल्याला वाटत राहतं.
जेलमधली सगळीच महत्वाची पात्रं अगदी चौथा सीझन संपेपर्यंत मायकलच्या आयुष्यात अशी ना तशी येत-जात राहतात.
प्रिझन ब्रेकच्या कथेबद्दल जास्त सांगून त्यातली मजा घालवण्यापेक्षा मी त्यातल्या महत्वाच्या पात्रांबद्दल थोडं लिहितो, कारण कथा जरी उत्तम असलीच तरी प्रिझन ब्रेकची खरी जान त्यातली पात्रं आणि त्यांच्या बालपणामुळे त्यांचे बनलेले स्वभाव, त्यांचे आपसातले संबंध, हेवेदावे, मैत्री, प्रेम हेच सर्वकाही आहे.
१. लिंकन बरोज - पूर्ण मालिका घडण्याचं कारण. बाप सोडून निघून गेल्यावर आजारी आईची काळजी आणि धाकट्या भावाची जवाबदारी वयाच्या १४ व्या वर्षीच खांद्यावर पडल्यानं जगावर रागावलेला असा काहीसा माणूस.मग आईच्याही अकाली मृत्यूनंतर स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवून धाकट्या भावाला शिकवणारा पण स्वतः मात्र छोटे मोठ्या नोकर्या, गुन्हेगारांची संगत अशामध्ये वहावत गेलेला आणि नंतर पत्नीच्या मुलासोबत सोडून जाण्यामुळे अजूनच निराश असा आयुष्यात पूर्णतया हरलेला एक माणूस. ह्याची पूंजी दोनच, एक्स-गर्लफ्रेंड व्हेरॉनिका, जी केवळ लिंकनच्या वाईट संगतींमुळे त्याच्यापासून दुरावलीय, पण त्यानं खून केलेला नाही ह्यावर विश्वास असणारी एकमेव व्यक्ती. आणि धकाटा भाऊ मायकल जो आधी लिंकनच्या वागणुकीमुळे नाराज असतो पण जेव्हा व्हेरॉनिका त्याला लिंकनच्या उपकारांची माहिती करून देते, जे मायकललाही माहित नसतात, तेव्हा मायकल बदलतो. आणि एकदा लिंकनशी बोलल्यावर त्यालाही त्याच्या निर्दोषत्वाची खात्री पटते आणि तो त्याला बाहेर काढण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याचा निर्णय घेतो.
२. मायकल स्कोफिल्ड - लिंकनचा धाकटा भाऊ आणि एका अर्थाने मालिकेचं प्रमुख मध्यवर्ती पात्र - हिरो. मायकल हा बुद्धीनं तल्लख आणि मानसिकदृष्ट्या कणखर असा एक स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, जो केवळ भावाच्या प्रेमापोटी आणि त्याच्या उपकारांची जाणीव ठेवून आपलं व्यवस्थित बसलेलं करियर सोडून जेलमध्ये जातो आणि अनेक लोकांची आयुष्य पालटवतो. जसजशी मालिका पुढे सरकते, त्याच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू सामोरे येत जातात. मायकलची व्यक्तिरेखा बहुरंगी असली तरी मुख्यत्वेकरून सकारात्मक आहे अन त्यामुळेच इतर अधिक नकारात्मक पैलू असलेल्या व्यक्तिरेखांसमोर थोडीशी कृत्रिम वाटण्याचा संभव आहे.
३. डॉ. सारा टॅनक्रेडी - मायकल आणि लिंकनच्या तुरूंगातली डॉक्टर. बिनआईची सारा राजकारणी बापासोबत लहानाची मोठी झालेली. त्यामुळे आई-वडलांची माया न मिळाल्यानं ड्रग्जच्या आहारी जाते. पण मग एक दिवस डॉक्टर असूनही ड्रग्जच्या अमलाखाली असल्यानं जेव्हा तिला एका व्यक्तिचा इलाज करता येत नाही, तेव्हा ती बदलायचं ठरवते आणि बदलते. समाजसेवेला वाहून घेते. मनानं खंबीर पण एका कोपर्यात तितकीच हळवी सारा राज्याच्या गव्हर्नरची मुलगी असल्यानं तुरूंगातली कमजोर कडी असल्याचं मायकल व्यवस्थित हेरतो. हिच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करूनच मायकल तुरूंगात आलाय. त्याच्या प्लॅनमध्ये साराचा वापर करणंही समाविष्ट आहे. पण ह्यादरम्यानच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. तरी मायकल आपल्या उद्दिष्टापासून ढळत नाही आणि साराचं आयुष्य मात्र आमूलाग्र बदलून जातं.
४. फर्नांदो सुक्रे - मायकलचा तुरूंगातला सेल पार्टनर. इथे मायकलकडे चॉईस नसतो, तुरूंगात जो कोणीही पार्टनर मिळेल त्याच्याशी जुळवून घेणं भाग असणार ह्याची त्याला पूर्ण कल्पना असते. मग केवळ आपल्या होणार्या बायकोला महागडं गिफ्ट देण्यासाठी एका दगाबाज मित्राच्या फूस लावण्यावरून दुकान लुटताना पकडला गेलेला सुक्रेच नेमका मायकलला सेलमेट म्हणून भेटतो. नेमक्या वेळी दुकानावर पोलिस पाठवणारा हा दगाबाज मित्र सुक्रेच्या जेलमध्ये असण्याचा वापर करून त्याच्या प्रेयसीशी लग्न करायच्या प्रयत्नात असतो. आणि सुक्रे लवकरात लवकर बाहेर पडायच्या, कारण त्याची प्रेयसी गरोदर असते आणि ती त्याची शिक्षा संपेस्तो म्हणजे अजून दोन वर्षं थांबू शकत नाही. सुरूवातीला संशय घेणारा सुक्रे नंतर मजबुरीमध्ये मायकलला सामील होतो पण नंतर ते दोघे एकमेकांच्या जीवाला जीव देणारे मित्र बनतात.
५. व्हेरॉनिका डोनोव्हन - लिंकनची एक्स गर्लफ्रेंड आणि वकील. लिंकन आणि मायकलची लहानपणापासूनची मैत्रीण. लिंकनपासून दुरावलेली असली तरी तिचं लिंकनवर अजूनही प्रेम असतं. त्यामुळेच त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो. अन त्यातूनच ती लिंकनला वाचवायला जंग जंग पछाडते, ह्यातूनच तिचं ठरलेलं लग्न मोडतं आणि शेवटी जीवही जातो.
६. थिओडोर 'टी-बॅग' बॅगवेल - अलाबामासारख्या एक्स-कॉन्फेडरेट स्टेटमध्ये एका वंशवादी आणि विक्षिप्त बापाच्या घरी जन्म घेतलेला टी-बॅग हा जन्मतःच विक्षिप्त असतो. मालिकेत विविध भागांमध्ये, तुकड्या-तुकड्यांमध्ये टी-बॅगची पार्श्वभूमी उलगडत जाते. त्याचा बाप स्वतःच्या मानसिक बिकलांग बहिणीवर बलात्कार करतो आणि तिचा त्याच्यापासून झालेला मुलगा म्हणजे टी-बॅग. त्यात बाप लहानग्या टी-बॅगकडून सगळ्या डिक्शनर्या आणि बरीच पुस्तकं तोंडपाठ करून घेतो, त्याला मुलाला प्रेसिंडेंट बनवायचं असतं. पण दारूडा अन गुन्हेगार बाप टी-बॅगवरसुद्धा लैंगिक अत्याचार करतो. चुकीच्या संबंधातून जन्मलेला टी-बॅग प्रजननक्षम नसतो. पण त्यामुळे आणि वाईट बालपणामुळे तो गुन्हेगार बनतो. आणि स्त्रिया आणि बालकांवर अनेक लैंगिक गुन्हे, खून इत्यादी करतो. मानवी जीवाची बिलकुल पर्वा नसलेला आणि स्वतःचा जीव वाचवायला कुठल्याही थराला जाणार्या, तल्लख बुद्धीचा टी-बॅगला अपघातानेच मायकलचा प्लॅन कळतो आणि तो मायकलला ब्लॅकमेल करून जबरदस्तीनं त्याच्या प्लॅनचा हिस्सा बनतो.
७. अलेक्झांडर महोन - अलेक्झांडर महोनचं पात्र दुसर्या पर्वामध्ये मालिकेत येतं. तुरूंग फोडून जेव्हा सगळे कैदी भूमिगत होतात, तेव्हा एफबीआयचा एजंट महोनची एंट्री होते. अत्यंत तल्ल्ख बुद्धीचा महोन वेगानं मायकलचा सगळा प्लॅन समजून घेऊ लागतो. महोन आणि मायकलची बुद्धिमत्ता तोडीस तोड असते. पर्वाच्या सुरूवातीपासून क्रूरपणे एकेका पळालेल्या कैद्याला मारणार्या महोनची दुर्बळता हळू हळू पुढे येत जाते. एका सिरियल किलरला पकडण्यात अपयश येत असल्यानं तो करत असलेले सगळे खून आपलीच जवाबदारी असल्याचं जाणवून महोन खचत जातो आणि मग एक दिवस त्या खुन्याला पकडल्यावर त्याच्यावर केस चालणं चुकीचं आहे असं वाटून तो त्याला मारून टाकतो आणि त्याचं प्रेत आपल्याच घराच्या अंगणात पुरून टाकतो आणि खुनी कधी सापडलाच नाही असं सांगू लागतो. पण हे सत्य आपल्या कुटुंबापासून दडवणं शक्य होत नसल्यानं तो बायको आणि मुलाला काळजावर दगड ठेवून घराबाहेर काढतो. आणि ह्या टेन्शनमुळे तो ड्रग ऍडिक्टदेखील बनतो. त्याचं नेमकं हेच रहस्य हेरून 'कंपनी' त्याला ब्लॅकमेल करते आणि मायकल आणि लिंकनसकट सर्व कैद्यांना संपवायसाठी त्याचा वापर करते. अत्यंत जबरदस्त असा एजंट महोन कंपनीच्या हातचं बाहुलं बनून राहतो. पण पुढे पुढे त्याची कथाही वेगळी वळणं घेते. महोनच्या व्यक्तिमत्वाचेही अनेक पैलू नजरेस पडत जातात.
ह्या पात्रांखेरीज, एजंट पॉल केलरमन, जॉन अब्रुझ्झी, सी-नोट, ब्रॅड बेलिक, ट्वीनर, हेवायर इत्यादी पात्र आहेत ज्यांच्या कथादेखील गुंतवून ठेवतात आणि कथेला नवी वळणं देतात.
मुळात ही एक चित्तथरारक कथा असूनही माणसांच्या भावनांना ह्या मालिकेत सर्वाधिक महत्व आहे. त्यांचे आपापसातले संबंध, आपापसातलं वागणं, बोलणं, सर्व्हायव्हल म्हणजेच जगण्यासाठीची धडपड इत्यादी गोष्टी बरेचदा आपल्या मध्यमवर्गीय, सुखवस्तू मानसिकतेला धक्का लावून जातात. अर्थात बरेचदा बर्याच गोष्टी अतिरंजित होतातही. पण मुळात मनोरंजनासाठी बनवलेल्या गोष्टीमध्ये असं तर घडणारच.
पहिलं अन दुसरं पर्व झाल्यावर तिसर्या पर्वाची सुरूवात जोरात होते, अपेक्षा फार वाढतात, पण नेमका त्याच वर्षी 'रायटर्स गिल्ड स्ट्राईक' झाल्याने तिसरं पर्व मालिकेच्या निर्मात्यांना गुंडाळावं लागलंय. त्यामुळे बर्याच त्रुटी राहून गेल्यात आणि शेवटाकडे भ्रमनिरास झाल्यासारखं होतं. चौथ्या पर्वामध्ये मात्र थीम एकदम बदलून मायकल आणि कंपनी कैदी न राहता गुप्तहेर बनतात आणि मालिकेतला अतिरंजितपणा वाढत जातो. पण तरीदेखील थोडंफार तारतम्य बाळगल्यानं हे पर्व सुसह्य होतं आणि मालिका संपते. मालिकेचा शेवट अपेक्षा पूर्ण करत नाही तरीही अगदी अपेक्षाभंगही होत नाही.
कलाकारांच्या बाबत बोलायचं तर अभिनेता म्हणून दोन माणसं प्रचंड भारी कामं करतात. एक म्हणजे 'टी-बॅग'च्या भूमिकेत रॉबर्ट नेपर आणि एजंट महोनच्या भूमिकेत विलियम फिक्टनर.
टी-बॅगसारखा विक्षिप्त क्रूरकर्मा रॉबर्ट नेपरनं ज्या स्टाईलनं रंगवलाय त्याला तोड नाही. आपण टी-बॅगचा पराकोटीचा तिरस्कार करतोच पण एका क्षणी अलाबामामध्ये उद्विग्न नजरेनं दूरवर पाहत बसलेल्या टी-बॅगची क्षणभर कणवही आल्यावाचून राहत नाही इतकं प्रभावी काम नेपरनं केलंय. आणि एजंट महोनचा सुरूवातीचा थाट नंतर दुर्बळतेकडे जेव्हा झुकत जातो आणि मायकलकडूनही कुरघोडी सुरू झाल्यावर चहूबाजूंनी अडकलेला हतबल महोन फिक्टनर ठळकपणे उभा करतो. महोन जेव्हा क्रूरपणे एकेका पळालेल्या कैद्याला संपवतो तेव्हादेखील त्याचं प्रत्येक काम तो केवळ काही कारणानं करतोय ह्याची जाणीव आपल्याला छळत राहते. त्याचं कुशाग्र बुद्धीचं असणं आणि तितकंच मानसिकदृष्ट्या दुर्बळ आणि असंतुलित असणं एकाच वेळी फिक्टनर नेमकं उभं करतो. पुढे पुढे त्याच्यात घडलेला बदल आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू महोनला सकारात्मक बनवतात पण ते तसं आपल्या मनावर बिंबवण्यासाठी कलाकार तितकाच ताकदीचा हवा, फिक्टनर ते बिंबवण्यात यशस्वी होतो. महोनचे थरथरणारे हात आणि अस्वस्थ नजर आणि बॉडी लँग्वेज केवळ बघण्यासारखे आहेत.
लिंकन बरोजच्या भूमिकेतला डॉमिनिक पर्सेल आणि मायकल स्कोफिल्डच्या भूमिकेतला वेंटवर्थ मिलर बरीच छाप सोडतात. त्यातही स्कोफिल्डचे गूढ डोळे आणि निग्रही नजर मिलरनं अगदी अचूक पकडलीय. पण ही दोन्ही पात्रं बहुतांशी सकारात्मक असल्यामुळे इतर सर्व वारंवार बदलणार्या व्यक्तिरेखांच्या गोतावळ्यात एकसुरी वाटू लागतात. पण तरीही वेळोवेळी घडणारी स्कोफिल्डची मानसिक द्वंद्व मिलरनं व्यवस्थित दाखवलीत आणि बरोजचं धटिंगणासारखं असणं आणि रांगड्या भावभावना पर्सेलला शोभून दिसतात. डॉ. सारा ही एकमेव पूर्ण सकारात्मक व्यक्तिरेखा आहे आणि त्यामध्ये सारा वेन कॅलिज योग्य वाटते. तिचा सोज्वळ चेहरा भूमिकेला पूरक आहे. फर्नांनो सुक्रेच्या भूमिकेत अमॉरी नोलास्को बर्याच प्रसंगांमध्ये थोडा रिलीफ आणतो. त्याचा वावर बरेचदा तणाव कमी करतो.
बाकी सर्वच कलाकारांच काम थोड्याफार फरकानं उत्तमच जमलंय. पण खरी तारीफ हवी ती मालिकेचा कर्ताधर्ता पॉल श्युअरिंगची. मालिकेची संकल्पना आणि बरीचशी निर्मिती त्याचीच. अर्थात दोन बंधूंनी त्यांच्या अनुभवावर आधारित पुस्तकावरून मूळ संकल्पना चोरल्याचा दावा केलेला असला तरी ती कथा फुलवून जो चार पर्वांच्या मालिकेचा डोलारा उभा केलाय त्याचं श्रेय पॉलला द्यायलाच हवं.
एकंदरित एका वेगळ्याच प्रकारच्या थरारक आणि धक्के देणार्या अनुभवाबरोबरच मानवी भावनांच्या चिरफाडीसाठी 'प्रिझन ब्रेक' ही मालिका पाहायलाच हवी. पण अर्थातच अनेक हिंसक दृश्य, शिवराळ भाषा आणि नैराश्य आणू शकेल अशी कथा असल्यानं दुबळ्या मनाच्या लोकांनी पाहण्यात अर्थ नाही.

-------

हा लेख जालरंग प्रकाशनच्या वर्षा विशेषांक २०११ मध्ये देखील इथे वाचता येईल.