3/25/2024

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या निमित्ताने...

काल वडील आणि मी स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा पाहायला थेटरात गेलो होतो. सकाळचा खेळ होता, त्यामुळे असेल किंवा एकंदरच फारशी गर्दी नव्हती. प्रदर्शित होऊन एकच दिवस झालेला. अर्थात, हल्ली प्रदर्शनाचा दिवसच सगळ्यात जास्त धंदा होण्याचा दिवस असतो, पण असो, मार्केटिंग असंच का केलं आणि तसं का नाही केलं वगैरे न समजणाऱ्या गोष्टींबद्दल आत्ता बोलण्यात मतलब नाही, कारण विषय तो नाहीये. विषय आहे हा सिनेमा.
कळायला लागल्याच्या वयापासून घरातलं वातावरण म्हणा किंवा शाळेतले संस्कार म्हणा, मनातल्या एका कोपऱ्यात एक देव्हारा आहे, आणि त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर. हे असलं बोलल्याबद्दल तेच मला दोन चपला हाणतील, पण आहे ते आहे. 
२००१ साली बाबूजी सुधीर फडकेंनी अनेक प्रयत्नांनी, खिशातले पैसे खर्चून "सावरकर" सिनेमा बनवला होता, पण त्या काळात नसलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे किंवा वय लहान असल्याने शोधाशोध करून कुठे सिनेमा पाहायला जाणं शक्य झालं नव्हतं. नंतरही तो राहूनच गेला. सावरकरांबद्दल मुख्य प्रवाहात बोलणं लुप्त होत गेलं, त्यांच्याबद्दल चांगलं बोललं की बोलणाऱ्यावर टीकेची झोड उठवायची, लगेच गांधीवध म्हणा किंवा माफीची पत्रं म्हणा, ह्यांचं पुराण सुरू करायचं. पुन्हा देशातले प्रमुख विरोधी पक्षही त्यांना राजरोसपणे शिव्या घालतात आणि त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे त्यांना 'भारतरत्न' द्यायला अजून घाबरतात, अशा वातावरणात, जे काही प्रेम त्यांच्याबद्दल उरलंय ते महाराष्ट्रातच असं वाटत असताना रणदीप हूड्डानं हा सिनेमा बनवत असल्याची घोषणा केली. मनाला सुखावणारी ती बातमी होती. त्यानंतर अनेक अडथळ्यांचा सामना करत त्यानं हा सिनेमा एकदाचा लोकांसमोर आणला आणि खरं सांगतो, त्या पॉश थेटरात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा पोस्टर पाहून जेवढा आनंद झाला तेवढा आनंद कधी झाला नव्हता.
सर्वप्रथम 'रणदीप हूड्डा' ला शतशः धन्यवाद की त्यानं हे कार्य केलं. जो लढा बाबूजींनी २००१ साली दिला अगदी तसाच नसला तरी लढा त्यालाही द्यावाच लागला. सगळी सरकारं सावरकरांच्या विचारांचा वारसा सांगणारी असूनही. त्याचे धन्यवाद ह्यासाठीसुद्धा की त्यानं हे शिवधनुष्य उचललं, ह्यासाठीसुद्धा की तो आपल्या विचारांवर आणि आपल्या दृष्टिकोणावर ठाम राहिला आणि ह्यासाठीसुद्धा की त्यानं आजच्या पिढीसाठी एक संदर्भ तयार केला. 
गेल्या काही वर्षांत विक्रम संपतसारख्या इतिहासकार लेखकांकडून सावरकरांवर उत्तम पुस्तकं आलेली आहेत आणि त्यांच्याबद्दल हळूहळू का होईना जनमतप्रवाह बदलायचा प्रयत्न काही लोकांकडून होतो आहे, पण सिनेमा ह्या माध्यमाची ताकद नव्या पिढीला प्रभावित करण्यात सर्वांत जास्त आहे. त्यामुळे तिथे हा प्रयोग होणं फार फार गरजेचं होतं आणि रणदीपनं ते केलं. सिनेमा अपेक्षेप्रमाणे चालेल, नाही चालणार, पुढे ओटीटी वर येईल, पण तो राहील. आज नाही तर उद्या लोक पाहतील. रणदीप अजूनही अनेक सिनेमे करेल आणि त्याचं नाव जे आजही मोठं आहे ते अजून मोठं होईल, पण त्याच्या सिनेमांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी हा सिनेमा कायम राहील. हा जो संदर्भ आहे तो महत्वाचा आहे. कुणी म्हणेल त्यात काय मोठं आहे, पण स्वातंत्र्याला ७५ वर्षं होऊनही, ज्या माणसाचा त्या लढ्यामध्ये सिंहाचा वाटा होता, त्या माणसावर मोजून २ सिनेमे निघावेत, हे किती करंटेपणाचं लक्षण आहे? म्हणून मी म्हणतोय की हा संदर्भ म्हणून फार महत्वाचा सिनेमा ठरेल.
बाबूजींच्या सिनेमापेक्षा निश्चितच जास्त असलेलं निर्मितीमूल्यं, उत्तम कॅमेरा आणि मेनस्ट्रीममधले नटनटी, ह्यामुळे हा सिनेमा वेगळा ठरतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, सगळी मराठी माणसं त्यांना 'स्वातंत्र्यवीर' म्हणूनच ओळखतात, पण महाराष्ट्राबाहेर त्यांना 'वीर' म्हटलं जातं, पण हूड्डानं सिनेमाचं नाव 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ठेवलं, ह्याचं मला कौतुक वाटलं. कदाचित सुरूवातीला महेश मांजरेकर ह्यामध्ये असल्याने असेल, पण तरीही, हा एक सुखद अनुभव वाटला.
आता सिनेमावर येतो.
पहिल्याच सीनपासून सिनेमा अंगावर येऊ लागतो. जे अपेक्षितच होतं कारण रणदीपनं काळ निवडलाय तो १८९७ पासूनचा. प्लेगच्या साथीपासूनचा, ज्या काळानं लहानग्या विनायकला परिस्थितीची खरी जाणीव करून दिली आणि विनायकच्या जीवनयज्ञाची दिशा ठरवून दिली. 
सिनेमाच्या कथानकाच्या फार खोलात जात नाही कारण कथा सगळ्यांना माहित आहे, पण ती माहित असूनही माहित नसल्याचा आव आणणाऱ्यांसाठी हा सिनेमा नाही. 'दे दी हमें आजादी बिना खड्ग, बिना ढाल" ह्या वाक्यातला खोटेपणा दाखवणारा हा सिनेमा आहे. नवीन पिढी, ज्यांना सोशल मीडियामुळे 'गांधी-नेहरू' भोवतीचं वलय किती बेगडी आहे हे कळू लागलं, त्यांना इतिहासातले काही कधीच न जोडले गेलेले दुवे दाखवणारा हा सिनेमा आहे.
खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, अनंत लक्ष्मण कान्हेरे, सेनापती बापट, भगतसिंग-सुखदेव-राजगुरू ते अगदी नेताजी सुभाषचंद्र बोस, ह्यांची नावं इतिहासाच्या पुस्तकांत नाईलाजानंच आल्यासारखी वेगवेगळ्या धड्यांमध्ये कधी एक ओळ, दोन ओळी ते एखादा धडा (सुभाषबाबू) विखुरलेली असतात. पण त्यांना जोडणारा एक ओतीव लोखंडी दुवा त्यावेळीही आणि स्वातंत्र्यानंतरही अस्तित्वात होता हे कुठेच लिहिलेलं नसतं. तो दुवा म्हणजेच देशाचा आद्य क्रांतिकारक सावरकर हे दाखवणारा हा सिनेमा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचं योगदान 'दे दी हमें आजादी...' म्हणून एका फटक्यांत पुसून टाकणाऱ्या वृत्तीला आरसा दाखवणारा हा सिनेमा आहे. स्वातंत्र्य मिळताना आणि ते मिळाल्यावरही फक्त राजकारण आणि स्वतःच्या अमर्याद सत्तेला खुपणारा एक काटा बाजूला करण्यासाठी, ज्यानं आयुष्य देशासाठी उधळून दिलं, त्याचंच सामाजिक अस्तित्व संपवणाऱ्या वृत्तीला लोकांसमोर उघडं करणारा हा सिनेमा आहे.
असं म्हणतात की सावरकरांनी घरात बसून लहानपणी आरण्यक वाचलं म्हणून त्यांच्या घराचं अरण्य झालं. बोलायच्या गोष्टी बोलायच्या, पण एका दैदिप्यमान बुद्धीच्या युवकानं, ह्याच्यासमोर विलायतेतली बॅरिस्टरी आणि एक सुखद भविष्य सहज शक्य होतं, त्यानं एका ध्येयासाठी सगळ्या आयुष्याचंच समर्पण करावं, ह्यातलं मूल्य आणि अध्यात्म आरण्यकातही नसेल. सिनेमामध्ये सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाचंच समर्पण फार चांगल्या पद्धतीनं दाखवलं गेलंय. बाबाराव, तात्याराव, नारायणराव आणि बाबाराव आणि तात्यारावांच्या पत्नी. एकेक करून सगळी वैयक्तिक आयुष्य उद्धस्त होत जातात. तात्यांच्या हयातीतच पोटचा पोरगाही जातो आणि थोरला भाऊही जातो आणि ब्राह्मणविरोधी दंगलींमध्ये धाकट्या भावाला जमाव जिवंत जाळतो. सगळे धक्के पचवून हा महामेरू पुढे जात राहतो. आईसमान वहिनी एकदा लंडनला गेल्यावर पुन्हा कधीही भेटत नाही. देवानं शारीरिक कष्ट जणू कमी पडले म्हणून मानसिक धक्के देतच राहतो. सिनेमात एकेक घटना थोडक्यात येते पण पाहणाऱ्याला अंतर्बाह्य हलवून सोडते. एकाच जेलमध्ये ९ वर्षं राहिल्यावर सख्खे भाऊ एकमेकांना भेटतात, हे वाचूनही ज्याच्या अंगावर शहारा नाही आला त्याच्यासाठी हा सिनेमा नाहीच.
तात्याराव आणि माईंच्या नात्याचं चित्रीकरण नितांतसुंदर केलेलं आहे. त्या एका बाबतीत हा सिनेमा खरंच वेगळा वाटला. क्रांतीसूर्य तात्याराव सगळ्यांना माहित आहेत, पण त्यांच्या मनाचा एक हळवा कोपराही असेलच, तो हा सिनेमा दाखवतो. त्यांची एकमेकांविषयीची ओढ एकेका कटाक्षातून दाखवलीय, कुठेही अतिरंजन नाही, संवाद नाहीत, फक्त एखादी क्रिया. तात्याराव इंग्लंडला चालले असताना डॉकवर लहानग्या प्रभाकरला जवळ घेणं आणि एकदाच माईंकडे पाहणं, जेलमध्ये माई भेटायला आल्यावर त्यांच्या वाक्यावर माईंचं उत्तर देणं, चष्मा घालून माईंची एक झलक मिळेल म्हणून तात्यांची झालेली तगमग,  शेवटच्या प्रसंगात माईंचं तात्यारावांना छत्री आणून देणं, अगदी बारीकसारीक तपशील आहेत पण डोळ्यांत पाणी उभंच राहतं. जेवढा मी ह्या सिनेमात रडलो असेन, तेवढा कदाचितच कधी रडलो असेन.
शेवटाकडे गांधी, नेहरू आणि जिन्नांचे तपशील सत्याशी बरेच प्रामाणिक आहेत. आणि तात्यारावांना सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या संपवायसाठी केल्या गेलेल्या क्लृप्त्या ह्या उघड नोंद झालेल्या घटना आहेत. आपल्याला सांगितलेल्या इतिहासातून गायब केलेला "बॉम्बे डॉक" उठाव असो किंवा प्रत्येक पावलावर इंग्रजांची बाजू घेणारं कॉन्ग्रेसचं मवाळ नेतृत्व असो, तात्यारावांनी लिहिलेले दयेचे अर्ज असोत किंवा त्यांनी हिंदूंनो सैन्यात सामील व्हा हे सांगण्यामागची पार्श्वभूमी असो, सिनेमा अनेक गोष्टी हाताळत आणि योग्य ठिकाणी ठळकपणे दाखवत पुढे सरकतो. 
सिनेमानं निवडलेला कॅनव्हास फार मोठा असल्यानं काही गोष्टी सोडल्या गेल्या आहेत, काही प्रसंग भरभर पुढे सरकतात असं वाटतं पण तात्यारावांच्या मनाचा ठाव घेण्याच्या प्रयत्नात सिनेमा पहिल्या प्रसंगापासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत यशस्वी होतो. लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये सगळ्यांच्या गळ्यातला ताईत असलेला तरूण तडफदार विनायक ते काळ्या पाण्यात कीडेयुक्त अन्न खाऊन खंगलेले आणि पिवळट किडक्या दातांचे व्ही.डी. सावरकर, ज्यांच्या एका भेटीनं इंग्रज ऑफिसर हादरून जातो, ते 'मी तुला पुरून उरलो बॅरी' म्हणून अशक्त हातांनी वाऱ्यावर देह तरंगू देणारा कैदी सावरकर, ते चाळीशीच्या आतच कवळ्या लागलेले, राजनैतिक कार्याला बंदी घातलेले लोकप्रिय तात्याराव, ते शेवटाकडे नेहरूंच्या वर्तनावर स्वतःशीच हसणारे हिंदू महासभा अध्यक्ष आणि शेवटी लियाकत खानच्या ५ दिवसांच्या भारतभेटीसाठी स्वतंत्र भारतातल्या सरकारनं १०० दिवस जेलमध्ये टाकताना उजळमाथ्यानं निघालेले मिश्कील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, प्रत्येक फ्रेममध्ये रणदीप हूड्डा विरघळून जातो आणि राहतात ते फक्त सावरकर, ज्यांचं आयुष्यकार्य, बलिदानं सर्वकाही जणू ह्या देशाच्या इतिहासमंथनातून निघालेल्या हालाहलामध्ये विरघळून गेलंय.
थेटरात जेवढी तरूणाई दिसली ते पाहून एवढीच आशा निर्माण झाली की हे हालाहलही ही पिढी पचवेल आणि इतिहासातून निखळलेले हे दुवे, हे अमृतकण पुन्हा आपापली योग्य जागा ग्रहण करतील.
पुन्हा एकदा, रणदीप - तुला शतशः धन्यवाद! देशाच्या पुढच्या पिढ्या तुझ्या ऋणी राहतील.