4/26/2012

मृत्युदाता -१२


 भाग -१भाग -२भाग -३भाग -४भाग -५भाग -६भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१० आणि भाग -११ पासून पुढे

कोल्हे एका छोट्याशा चहाच्या टपरीजवळ बसून चहा पित होता. तेव्हाच दुसरा एक दाढीचे खुंट वाढलेला अजागळ माणूस टपरीवर येऊन उभा राहिला. एकंदर कपड्यांवरून तो मेकॅनिक वाटत होता. कोल्हे युनिफॉर्ममध्ये नव्हता. पण कोल्हेनं त्या माणसाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो शांतचित्तानं चहा भुरकत राहिला. मेकॅनिकनं कळकट हातांनी त्याहूनही कळकट असा चहाचा कप उचलला आणि तोंडाला लावला. सकाळची गडबडीची वेळ असल्यानं अधूनमधून इतरही लोक येऊन पटापट कटिंग चहा मारून पुढे जात होती. कोल्हे उठला आणि त्यानं खिशातून पाचची नोट काढली आणि त्यासोबतच काही नावं लिहिलेली एक चिठ्ठी. ते दोन्ही त्यानं बेमालूमपणे गाडीच्या उंचवट्यावर ठेवलं आणि वळून सरळ चालू लागला. मेकॅनिकनंही खिशातून पाचची नोट काढली आणि कोल्हेच्या नोटेवर ठेवली आणि ठेवतानाच त्यानं ती चिठ्ठी तेव्हढी उचलून घेतली आणि तो ही मागे न पाहता वेगळ्या रस्त्यानं चालत निघून गेला.

-----
 
रमेश पोलिस स्टेशनात बसून कोल्हेची वाट पाहत होता. तेव्हा त्याला कमिशनर साहेबांनी बोलावल्याचं हवालदार सांगायला आला. रमेश गेला.
"या स्पेशल ऑफिसरसाहेब." कमिशनर थोडेसे कुत्सितपणे म्हणाले.
"नमस्कार साहेब. मी आधी तुम्हालाच भेटायला आलेलो, पण तुम्ही नसल्याकारणे मग मी थेट कोल्हेंच्या जागी गेलो." रमेश स्पष्टपणे म्हणाला.
"ह्म्म. हरकत नाही. इथे आम्हाला असंही कुणी विचारत नाही."
रमेशला त्यांच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं.
"असो. तुम्ही वरूनच ऑर्डर्स घेऊन आलात त्यामुळे मी काही वेगळं सांगत नाही. फक्त आमच्या कुठल्याही एव्हिडन्सला टँपर करू नका एव्हढीच सूचना करेन. बाकी कोल्हे समर्थ आहेतच." सिन्नरकर विषादानं म्हणाले.
"ठीक सर. मी यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न करेनच." असं म्हणून रमेश उठला आणि केबिनमधून बाहेर पडला.
'नक्की काय चाललंय इथे?' हा विचार मनाशी करत रमेश कोल्हेच्या जागेकडे निघाला. आणि रमेशचे सगळे सर्व्हिस रेकॉर्ड्स मागवायची हालचाल सिन्नरकरांनी सुरू केली.


-----


नरेंद्र सावकाश एकेक पाऊल टाकत, बोगीतल्या प्रत्येक सहज दिसणार्‍या आणि सहज न दिसणार्‍या प्रवाशाची हालचाल, हावभाव टिपत स्वतःच्या जागेकडे निघाला. आणि तो स्वतःच्या जागी पोचला तेव्हा रेखा जागेवर नव्हती. नरेंद्रच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानं जागेचं निरीक्षण केलं, तर झटापटीची काहीच खूण नव्हती. आणि झटापट झाली असती, तर डब्यात थोडीतरी हालचाल झाली असती. एव्हढीही रात्र झालेली नव्हती. गाडी कुठल्यातरी सिग्नलला थांबण्याच्या बेतास आली होती. चटचट विचार करणं भाग होतं. ती बाथरूमला गेली असण्याची शक्यता होती, त्यामुळे ती एकमेव शक्यता फेटाळण्यासाठी तो आला त्याच्या विरूद्ध दिशेनं वेगानंच पण प्रत्येक बोगीचं निरीक्षण करीत निघाला. कुठे पोती पोती धान्य घेऊन निघालेलं भलथोरलं कुटुंब होतं तर कुठे कॉलेजच्या मुलामुलींचा गट, तर कुठे दोन छोटी कुटुंब मोठ्या कंपार्टमेंटमध्ये एकत्र होती. आणि दोन दोन जणांच्या बाकांवर तर बहुतांश एकेकटे प्रवास करणारे किंवा नवरा-बायको असे सगळे. नरेंद्र बोगीच्या शेवटाकडे पोचला आणि बंद बाथरूमच्या दाराबाहेर उभा राहिला. गाडी थांबली. त्यानं झटदिशी दरवाजा उघडला आणि बाहेर वाकला. त्याहून पुढच्या कंपार्टमेंटमधून एक पाच सहा जणांचा गट गाडीतून उतरताना त्याला दिसला. त्यामध्ये कुणीतरी जबरदस्तीनं धरून ठेवल्यासारखंही घोंगडीखाली असल्यासारखं त्याला वाटलं. एव्हढ्यात मागून टीसीनं त्याला हटकलं. असं उघड्या दरवाज्यातनं वाकू नका, आत जा म्हणून. त्यानं एकदा बाथरूमच्या बंद दरवाज्याकडे पाहिलं, एकदा टीसीकडे पाहिलं आणि एकदा त्या अंधारात हळूहळू माळरानांच्या दिशेनं नाहीशा होत जाणार्‍या गटाकडे पाहिलं. निर्णय चटकन घ्यायचा होता. आणि एकदमच त्याची ट्यूब पेटली, त्यानं खिशातून मोबाईल काढला आणि त्याचा स्क्रीन उघडला, ठिपका गाडीपासून दूर चालला होता. नरेंद्रनं क्षणार्धात गाडीतून बाहेर उडी मारली. टीसी दोन मिनिटं बोंबलला आणि त्यानं रेल्वेतल्या पोलिसाला पाचारण केलं, पण तोवर नरेंद्र त्या गटाप्रमाणेच अंधारात हरवून गेला होता.


-----


"काय रमेशसाहेब. नाईस टू सी यू." कोल्हेनं तोंडभरून हसूनच रमेशचं स्वागत केलं. त्याच्या हसण्यामधला कुत्सितपणा रमेशला चटकन जाणवला.
रमेश साधा इन्स्पेक्टर होता आणि कोल्हे आयपीएस. रमेशचं पोलिसी कौशल्य आणि प्रामाणिकपणा ह्यामुळे रमेश कायम स्टँडआऊट होता आणि कोल्हे त्याच्या एकंदरच धूर्त असण्यानं स्टँडआऊट होता. दोघेही आपापल्या परीनं पोलिसांच्या दोन विरूद्ध रूपांचे पोस्टरबॉईज होते. आणि त्यामुळेच त्यांचं आपापसात पटणं अशक्य होतं. एका केसमध्ये रमेशला कोल्हेला रिपोर्ट करावं लागलं असता त्यांच्यामध्ये काहीतरी घडलं आणि तेव्हापासून त्यांनी कधीही एकत्र कामही केलेलं नव्हतं किंवा ते एकमेकांशी कधी बोललेही नव्हते. पण त्यादिवशी परिस्थितीनं त्यांना पुन्हा एकत्र आणलं होतं.
"नमस्कार एसीपी." रमेशनं जेव्हढ्यास तेव्हढं बोलायचं ठरवलं होतं.
"मग स्पेशल ऑफिसर! काय म्हणते इमानदारीची पुंगी?"
"एसीपी. आपण कामाचं बोललं तर बरं होईल."
"हाहाहा. कामाचं काय? कुणासाठी करताहात सध्या काम?" कोल्हेचं कुत्सित हसू आणि बोलण्याचा टोन दोन्ही अतिशय तापदायक होते.
"इथे काही ट्रेल मिळाली आहे तुम्हाला असं ऐकतोय मी."
"ह्म्म. काहीतरी चांगलीच नस दाबलेली आहे वाटतं तुमची?" कोल्हे टेबलाच्या ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत म्हणाला, "नाहीतर माझ्यासमोर इतका वेळ बसून माझं इतकं ऐकून घेण्याइतपत तुमची प्रगती किंवा तुमच्या भाषेत तुमचं अधःपतन झालं नसतं." त्याला जे हवं होतं ते सापडलं आणि ती फाईल टेबलावर ठेवत तो पुढे म्हणाला, "असो. प्रत्येकाची एक किंमत असते असं माझं जे ठाम मत होतं, ते दृढ करण्यात तुम्ही हातभार लावलात ते बरं झालं."
"मी इमान विकलं नाहीये एसीपी." रमेश बराच दुखावला गेला होता.
"विकलं नसाल हो, पण गहाण नक्कीच ठेवलं आहात." कोल्हे फाईल उघडत म्हणाला, "हे बघा. वर्तकच्या ऑफिसातली शर्माची हिट, मी पाहिलेल्या बेस्ट हिट्सपैकी म्हणेन. मला कळतंय की हे वर्तकनं केलेलं नाहीय, पण सगळे पुरावे त्याच्याविरूद्ध आहेत आणि नुसतेच पुरावे नाही, तर ते अशा पद्धतीनं की ते प्लांट केलेले नाहीत असं कुणालाही वाटेल."
"देअर इज नो सच थिंग ऍज परफेक्ट क्राईम एसीपी." रमेश फाईलकडे निरखून बघत होता.
"देअर इज, व्हेन यू कॅन पिन इट ऑन समवन एल्स. वर्तकला पद्धतशीर गोवलाय पण मला असं पदोपदी जाणवतंय की त्याला गोवण्यापलिकडे खुन्याला अजून काही नकोय. तो स्वतः कधीही ट्रेस होणार नाही आणि वर्तक स्टेलमेटमध्ये अडकेल एव्हढीच सोय केलेली जाणवते."
"म्हणजे?"
"म्हणजे हे एक डिस्ट्रॅक्शन म्हणा किंवा पहिली पायरी म्हणा. धीस सीम्स टू लीड अप टू समथिंग."
"कशावरून म्हणता तुम्ही हे?"
"कारण लगेचच वर्तकच्या मेव्हण्याचा खून झाला आणि त्याची ब्लॅकमेल रिंग बाहेर पडली."
"तो ज्यांना ब्लॅकमेल करत होता, त्यांच्यापैकी कुणाची हिट असू शकते."
"नक्कीच, पण टायमिंग? आणि पुन्हा त्यामध्ये एक संदिग्ध व्यक्ती वर्तकला सोडवायच्या मिशानं त्या लोकांच्या घरी जाते आणि ही रिंग अचानकच उघडकीस येते हा योगायोग नाही वाटत."
"मी ऐकलं त्याप्रमाणे ती संदिग्ध व्यक्ती कोण, काय अन कशी हे सर्वच गुलदस्त्यात आहे."
"तुम्ही होमवर्क व्यवस्थित करता ऑफिसर. पण ती कमजोर कडीच मला संशयाला भाग पाडते आहे. कारण इतकं व्यवस्थित काम तोच करू शकतो."
"कोण तो? रतन?"
"होय."
"पण त्याचा इथे काय संबंध?"
"त्याला जी सुपारी मिळाली होती, त्यातले पैसे ज्या हवाल्यामार्फत आलेले होते, ती रिंग वर्तक आणि शर्मा सुपरव्हाईज करत होते. त्यांच्या पर्सनल डायर्‍यांतल्या नोंदी बघा." असं म्हणून कोल्हेनं फाईलमधली शेवटची काही पानं काढून रमेशसमोर ठेवली.
"डायरीची बाकीची पानं कुठे आहेत?"
"त्याची तुम्हाला गरज नाही." कोल्हे शांतपणे म्हणाला.
रमेशनं एक तिखट कटाक्ष कोल्हेकडे टाकला पण तो असहाय होता त्यामुळे त्यानं पुन्हा ती पानं पाहिली.
"म्हणजे तुमचं म्हणणं आहे की रतन तुरूंगातून पळाल्यावर त्याला सुपारी देणार्‍यांचा खून करत सुटला आहे? ह्यामध्ये काय लॉजिक आहे?"
"लॉजिक तर तुमच्याही इथे येण्यामध्ये काही नाही हो. आमच्यासोबत तुम्ही काम करण्यामध्ये तरी काय लॉजिक आहे? महत्वाचं हे आहे की कुठेतरी आणि कसेतरी ह्या लोकांशी रतनचे लागेबांधे होते. कदाचित त्यांनी त्याला वार्‍यावर सोडलं म्हणून तो बदला घेत असेल. पण हे काम त्याचं आहे हे मी निश्चित सांगू शकतो. तो नक्षलवाद्यांचा हेर होता एकेकाळी हे विसरू नका ऑफिसर."
"बरं मग मी नक्की करायचं काय आहे?"
"काय करायचंय हे तुम्हाला तिथूनच सांगून पाठवलंय. फक्त कसं करायचंय ते तुम्ही ठरवायचंय. तुम्हाला माग काढण्यासाठी लागेल ती मदत मी करणार, त्याप्रमाणे करतोय." कोल्हे हसत म्हणाला, "आणि हो त्याची एक लेडी ऍकॉम्प्लिस असल्याचेही काही दिशानिर्देश सापडतील तुम्हाला फायलीत."
रमेशनं ती फाईल उचलली आणि काही न बोलता तिथून बाहेर पडला.
'तो म्हणतोय ते खरंय. अधःपतन झालंय आपलं. काय करतोय आपण? आणि नक्की कशासाठी? कुठल्या मृगजळामागे धावतोय आपण?' रमेशला स्वतःचा प्रचंड राग येत होता. पण आता पश्चात्ताप करून उपयोग नव्हता. तो झरझर स्वतःच्या हॉटेलच्या दिशेनं चालू लागला.


रमेश बाहेर पडल्यापडल्या कोल्हेनं एक कॉल फिरवला.
"लेडी ऍकॉम्प्लिसचं बोललोय त्याला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजून त्याला महातोबद्दल काही बोललो नाहीये."
"शाब्बास."
"पण महातोबद्दल सांगणं महत्वाचं आहे नाहीतर तो त्याच्यापर्यंत पोचेल कसा?"
"त्याची काळजी तुम्ही नका करू. महातोच्या पुढचा प्लॅन काय आहे ते कदाचित तो शोधून काढू शकेल."
"तो कसा शोधू शकेल ते." आणि कोल्हेला एकदम लक्षात आलं. "म्हणजे तुमच्या मते तो माझ्याहून चांगला पोलिस आहे?"
"हे बघा एसीपी तुमची स्पेशालिटी वेगळी, त्याची वेगळी. त्यामुळेच त्याला वेगळा घेतला आहे ना टीमवर."
"पण त्यानं माझ्या केसेसमध्ये लुडबूड करता कामा नये."
"तेव्हढी काळजी तुम्ही स्वतः घ्यायला समर्थ आहात एसीपी." एव्हढं बोलून फोन कट झाला.
कोल्हेचा चेहरा थोडासा काळजीग्रस्त झाला.


-----


नरेंद्रनं धावता धावताच कंबरेचं पिस्तुल हातात घेतलं आणि तीन-चार मिनिटांतच त्या गटाजवळ पोचला. 'त्यांचे भाईबंद जवळपासच असतील आणि त्यांच्यापर्यंत ते पोचण्याआधीच त्यांना गाठावं लागेल.' असा मनाशी विचार करतच तो नक्की हल्ला कसा करायचा ह्याचा मनाशी आराखडा बनवत होता. पण एकदमच त्याला त्यांचं वागणं विचित्र वाटलं. ती मंडळी घाबरल्यासारखी वाटत होती. तो अजून जवळ गेला आणि जराशी खात्री होताच त्यातल्या सर्वांत दणकट माणसाच्या डोक्यावर त्यानं पिस्तुल ठेवलं आणि मानेला धरून त्याला मागे ओढलं, त्याबरोबर त्यांच्यातली एक स्त्री किंचाळली आणि मधोमध असलेल्या घोंगडीतनं छोटासा एक मुलगा दचकून बाहेर आला. त्या सगळ्यांच्याच चेहर्‍यावर भेदरलेले भाव दिसत होते.
"आपके आदमी बोले वैसा गाडीसे उतरके आ गये, अब क्या गोली भी मारोगे? सब तो गाडीमेंही दे दिया था." त्यातला म्हातारासा मनुष्य गयावया करत म्हणाला.
आणि नरेंद्रच्या लक्षात आलं. त्यानं त्या मुलाची तपासणी केली आणि त्याच्या अंगरख्यात रेखाचं घड्याळ होतं, ज्यामध्ये नरेंद्रचा बग होता. दगाफटका झाला होता. त्यानं झटकन मागे वळून पाहिलं, पण गाडी फार दूर गेली होती. ही संधी साधून त्यातल्या एकानं नरेंद्रला धक्का देऊन पाडायचा प्रयत्न केला, पण नरेंद्र झोपेतही हल्ले परतवू शकला असता. त्यानं त्याला जमिनीवर पालथं घातलं आणि माझं तुमच्याशी वैर नाही सांगून गाडीच्या दिशेनं थोडा पळत गेला. पण मग थोडा विचार करून तो परत त्या मंडळींकडे आला.
"यहां से कोई गांव, या रास्ता कहां पडेगा कुछ जानते हैं?" त्यानं विचारलं. पण ती मंडळी विशाखापट्टणमचीच होती, त्यामुळे ओरिसात कुठेतरी उतरल्यानं त्यांचीही पाचावर धारण बसली होती.
नरेंद्रची विचारचक्र भराभर फिरत होती. तो रेल्वे ट्रॅकपासून थोड्या तिरक्या कोनात धावू लागला, जेणेकरून तो पुढच्या दिशेलाच जाईल पण ट्रॅकपासून थोडा थोडा दूर जात राहिल्यानं कदाचित एखादं गाव नजरेस पडेल. असा तो किती तास चालत-धावत राहिला हे त्याच्याही लक्षात आलं नाही, पण रस्त्यात त्याला एक विहिर लागली. तो थकून तिथे दोन मिनिटं बसला आणि त्यानं पाणी प्यायलं. 'विहिर आहे म्हणजे नजीकच गाव असणार.' तो मनाशी म्हणाला आणि तसाच उठून पुन्हा गावाच्या शोधार्थ निघाला आणि अपेक्षेप्रमाणेच त्याला गाव सापडलं. पहाटेची वेळ होती, एक दूधवाला मोटरसायकलवरून दूध घेऊन निघाला होता. नरेंद्रनं त्याला पुढचं स्टेशन कसं गाठायचं ते विचारलं आणि पुढे जी पहिली मोटरसायकल दिसली ती सरळ घेऊन हॉटस्टार्ट करून निघाला. जवळच्या स्टेशनावर पोचून त्यानं गाडी त्यापुढे कुठे थांबेल आणि किती वेळ थांबेल ती माहिती काढली आणि मग स्टेशनाबाहेर पडून एक चांगल्यातल्या गाडीची काच फोडली आणि ती गाडी घेऊन वेगानं पुढे निघाला.
'आपण फार जास्त गुन्हे करतोय, रडारवर यायला फार वेळ लागणार नाही.' तो मनाशीच म्हणत होता, पण पर्याय नव्हता. रेखाला गमावणं अशक्य होतं. 'पण हे केलं कुणी?' मनात हजारो विचारचक्र चालली होती, पण फार अवघड होतं. तो पुढच्या स्टेशनावर ट्रेनला गाठूच शकत नव्हता, त्याहीपुढच्या नाही. पण त्यापासूनच्या तिसर्‍या स्टेशनावरच ते शक्य होतं. तिथपर्यंत पोचणं म्हणजे अजून साडेचार तास सलग गाडी चालवणं होतं. पण उपाय नव्हता.
जवळपास दोन तासांनंतर एकदम त्याचा मोबाईल वाजू लागला. आणि तो आश्चर्यचकित झाला. त्यानं गाडी बाजूला घेतली आणि उतरून मोबाईल कानाला लावला.
"मी पुढच्या स्टेशनावर उतरलेय. लवकर ये, मी बाहेरच एका टपरीमध्ये लपलेय." आणि फोन डिसकनेक्ट झाला.
नरेंद्रला हर्षवायूच व्हायचा बाकी होता. हा नंबर वन टाईम कॉल इमर्जन्सी नंबर होता. त्यानं सिमकार्ड काढलं आणि लायटरनं आग लावून फेकून दिलं आणि मग मोबाईल जमिनीवर टाकून पायांनी चिरडून टाकला आणि शेजारच्या गटारात ढकलून त्यानं खिशातून रूमाल काढला. गाडीची स्टेअरिंग पुसली, दरवाज्याची हँडल पुसली आणि गावात शिरला. तिथे त्यानं मागच्या गावाकडे जाणारी रिक्षा केली आणि अर्ध्या तासात तो स्टेशनापाशी पोचला. तिथे तो टपरी शोधू लागला. सकाळची वेळ झालेली असल्यानं सगळ्यांनाच जाग आली होती. आता इथे काही घमासान होण्याच्या शक्यता फार कमी होत्या. तेव्हढ्यात ती एका भाजीवालीच्या मागून बाहेर पडली आणि धावतच त्याच्या दिशेनं आली.
त्यानं चहूबाजूनं नजर फिरवली आणि तिचा हात धरून तिला एका बाजूस घेऊन गेला.
"काय झालं?"
"मी घेतलेल्या ट्रेनिंगचा आज उपयोग झाला. पण लवकर चल इथून, इथूनच मला पुढे कुठेतरी घेऊन जायचा त्यांचा प्लॅन होता. त्यांची माणसं असतील इथेच."
"असतील नाही आहेत." नरेंद्र शांतपणे म्हणाला, त्याची नजर चहूबाजूंना भिरभिरत होती.
"म्हणजे?"
"आपण घेरलो गेलो आहोत."
रेखा प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहत होती.
"इट वॉज ऑल अ ट्रॅप. हा पद्धतशीर सापळा होता रेखा. ती भाजीवाली, त्या टपर्‍या, ते फूलवाले, हे रस्त्यावर चालणारे लोक, ही सगळीच त्यांची माणसं आहेत. आपल्याला त्यांना हव्या त्या जागी आणि त्यांना सोयीचं जाईल इतपतच तयारीनिशी आणण्यासाठी रचलेला फूलप्रूफ प्लॅन."
मग एक एक करून तीन-चार बंदूकधारी त्यांच्या दिशेनं चालत आले.
रेखानं नरेंद्रचा हात एकदम आवळून धरला.
"चलो. दीदी राह देख रही है." त्यातला एक बंदूकधारी म्हणाला.
नरेंद्रचा चेहरा नेहमीप्रमाणेच कोरा होता, "हाथ दूर रखो. हम चलतें हैं." तो दरडावून म्हणाल्यावर बंदूकधारी थोडे दूरच उभे राहिले. "काळजी करू नकोस. मी काहीतरी मार्ग काढेन." तो हळूच रेखाच्या कानात म्हणाला आणि बंदूकधारी चालू लागले, त्यांच्यामागे चालू लागला.


-----


"ही घ्या ठरल्याप्रमाणे तुमची नवी ओळखपत्रं." कोल्हेनं वर्तकच्या पत्नीला एक एन्व्हलप दिला.
तिनं तो लगेच उघडून पाहिला, त्यात एक नवा पासपोर्ट होता आणि पॅन कार्ड वगैरे.
"आता तुम्ही जिथे आपलं ठरलंय, तिथे पोचलात की दुसरा एक एन्व्हलप मिळेलच, त्याप्रमाणे पुढे वागलात की लवकरच तुमच्या नवर्‍याची खबर येईल तुमच्यापर्यंत." कोल्हे पुढे म्हणाला.
"पण सगळं व्यवस्थित आहे ना?"
"होय होय. पैसे माझ्या अकाउंटमध्ये पोचलेत. आता आजच तुरूंगात त्यांच्या मरण्याची सोय केली आहे." कोल्हे डोळे मिचकावत म्हणाला आणि त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडला.


बाहेर पडल्या पडल्या त्यानं आधी फोन फिरवला.
"वर्तक आज तुरुंगात आत्महत्या करेल साहेब आणि त्याची बायको देशाबाहेर जाईल. आपल्या मार्गातला पहिला काटा दूर आहे साहेब." असं म्हणून कोल्हेनं फोन ठेवला. त्यानं पुढचा फोन करून, थायलंडमधल्या पॅकेजची सोय लागल्याची खात्री केली आणि मग स्वतःच्या गाडीत बसून शांतचित्तानं घराकडे निघाला.


-----


"आर यु शुअर भणगे?" सिन्नरकर मोबाईलवर बोलत होते.
"व्हेरी शुअर साहेब. त्याची गॅरंटी मी घेईन."
"ओके. थँक यू व्हेरी मच." असं म्हणून सिन्नरकरांनी फोन बंद केला.
इंदूरच्या कमिशनरांच्या डोक्यात भलतीच विचारचक्र सुरू होती. त्यांनी नुकतीच रमेशची अख्खी फाईल तपासली होती आणि त्याच्या त्यांना माहित असलेल्या सर्व सुपिरियर्सना फोन करून त्याची माहिती घेतली होती. पण जमेल तेव्हढी गुप्तता पाळून. कारण त्यांना रमेशचा जसा अंदाज आला, तसाच तो निघाला होता. तो नक्की ह्या लोकांसोबत का आहे, हे त्यांना कळत नव्हतं. पण कोल्हेला मात देण्यासाठीचा जो वजीर त्यांना हवा होता, तो रमेश ठरू शकत होता. रमेशशी ह्याबद्दल बोलणं म्हणजे जुगारच होता. पण हा जुगार त्यांना खेळावाच लागणार होता. नाहीतर त्यांना आरशात स्वतःकडे बघणंही कठीण होऊन बसलेलं होतं.

क्रमशः

4/16/2012

मराठी ब्लॉगिंगोन्नतीचे पाच सोपान

मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला अगदी चौथी-पाचवीपासूनच काहीतरी लिहावं आणि लोकांनी आपलं कौतुक करावं असं वाटायचं. कविता वगैरेसुद्धा पाडायचा प्रयत्न मी अगदी लहान वयात केला होता. त्या कवितेला फारसा अर्थ नव्हता हा भाग अलाहिदा, पण लेखक किंवा कवी ह्या शब्दांबद्दल फार आकर्षण वाटायचं. त्याभोवती एक अनामिक ग्लॅमर असल्यागत आणि ते आपण बनावं असं वाटायचं. आता वाटून कुणी लेखक होत नसतो, पण वाटायचं हे महत्वाचं.
तर अशी सुरूवात झाल्यावर माझी हौस मुरत गेली नसती तरच नवल. मी चांगलाच लिहिता झालो. मुख्यत्वेकरून कथा लिहायचो, पद्य मनुष्य मी कधीच नव्हतो आणि हे सत्य मी फार पूर्वी मान्य केलं. एकदा पाय फ्रॅक्चर झाल्यावर मी प्लॅस्टरमध्ये वीस दिवस पडून होतो, तेव्हा एक रेल्वेकादंबरीस्टाईल ऍक्शन दीर्घकथादेखील लिहून काढली होती. एकदा एअरपोर्टवर विमानाची वाट पाहताना मी ई-तिकिटाच्या प्रिंटआऊटच्यामागे कथा लिहिली होती. घरातल्या अडगळींमध्ये आवराआवरी करताना आजही आईला मी कथा लिहिलेले कागदाचे कपटे अधूनमधून सापडतात. आणि हे सगळं 'मराठी ब्लॉग' ह्या माध्यमाची ओळख होण्यापूर्वी. त्याआधी कॉलेजात असताना मित्राच्या नादानं इंग्लिश ब्लॉग लिहायचो. आणि ते अत्यंत बालिश आणि माझ्या अत्यंत मर्यादित महाविद्यालयीन वर्तुळापर्यंतच सीमित असे ब्लॉग्ज असायचे.
तर मुद्दा हा की आजपासून अडीच वर्षांपूर्वी मराठीमध्ये ब्लॉग लिहायला सुरूवात करण्यापूर्वीदेखील मी लिहितच होतो आणि जेव्हा मी ब्लॉगवर काही लिहित नसतो, तेव्हाही कागदांवर मी लिहितच असतो. पण ब्लॉग हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे.
आपण सर्वप्रथम ब्लॉग म्हणजे काय ते पाहू. Blog म्हणजे Weblog ह्या शब्दाचं छोटं, सुटसुटीत रूप आहे. Web वर ठेवला जाणारा Log अर्थात ढोबळमानानं ऑनलाईन दैनंदिनी. पण ब्लॉग तिथपर्यंतच मर्यादित राहिला नाही. सुरूवातीला इंग्रजीनं आणि नंतर इतरही अनेक ज्ञानभाषांमध्ये समृद्ध असे ब्लॉग्ज जगभरात तयार झाले. ब्लॉगचा वापर नुसती दैनंदिनी म्हणून करणारे जसे लोक आहेत, तसेच ब्लॉग म्हणजे ऑनलाईन ग्रंथच बनवणारेही अनेक महाभाग आहेत. आणि इतका लवचिकपणा हीच ब्लॉगची मुख्य खासियत. थोडक्यात ब्लॉग म्हणजे महाजालावरचा एक असा कोपरा जो वेळ पडल्यास सगळ्या जगालाही दिसू शकतो. अनेकजण असा स्वतःचा कोपरा केवळ मर्यादित वर्तुळापर्यंतच सीमित ठेवतात अर्थात त्याही बाबतीत ब्लॉग हे लवचिक माध्यम आहे. पण ज्याप्रकारे इंटरनेटचा प्रसार होऊ लागला, त्यामुळे ब्लॉगिंग हे संवादाचं एक माध्यम बनू लागलं. अगदी राज्यक्रांत्यांमध्येची ब्लॉगिंगनं बरीच महत्वाची भूमिका वठवली. अर्थात ब्लॉगिंग ही एक भाषा बनली. आणि मग ज्याप्रकारे प्रत्येक भाषेच्या बाबत होतं, त्याप्रमाणेच ब्लॉगिंगबाबतही गुणात्मक आणि संख्यात्मक तुलनांना सुरूवात झाली. इंग्रजी, फ्रेंच, चायनीज, रशियन, स्पॅनिश इत्यादी मोठा सुशिक्षित आणि इंटरनेट उपलब्ध असलेला वर्ग असणार्‍या भाषांमध्ये अनेक ब्लॉग्ज निर्माण झाले. ह्या ब्लॉगिंग जगतांमध्येदेखील निश्चितच अशा प्रकारची ओरड कोणत्या न कोणत्या कालावधीमध्ये झाली असणारच, पण मी तितका शोध घेतला नाही त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. पण सध्या, सध्या कशाला, मी जितके दिवस ब्लॉगिंग करतोय तितके दिवस मी 'मराठी ब्लॉग्जचा दर्जा उंचावत नसल्याची खंत' व्यक्त करणारे उसासे वाचतोय. गंमतीचा भाग असा की की लहानपणापासून मी 'मराठी भाषा मरणासन्न आहे' असलेही उसासे ऐकत आलोय आणि त्या उसाशांना काहीही अर्थ नसतो हे मला नेहमीच तितक्याच प्रकर्षाने वाटत आलंय.
आता आपण मराठी ब्लॉगिंगबद्दलच्या काही ठळक काळज्या पाहू -

१. मराठीत विषयांचं वैविध्य नाही.

-मी स्वतः अत्यंत थोडेसेच ब्लॉग्ज पाहिले आहेत आणि माझ्या अत्यंत तुटपुंज्या परिघामध्येही एक फोटोग्राफीचा ब्लॉग, भरपूर ट्रेकिंगचे ब्लॉग्ज, ललितलेखनाचे विपुल ब्लॉग्ज, कथा/लघुकथा, कविता, तांत्रिक बाबींशी संबंधित ब्लॉग्ज, पाककला, चित्रकला, हस्तकला, समाजकार्यातले अनुभव, प्रवासवर्णनं, रामायण, महाभारत इत्यादी इत्यादी ब्लॉग्ज मी पाहिलेत. मी स्वतः अत्यंत छोटा अन सामान्य मनुष्य असल्यानं मला जास्त विषयांमध्ये गती नाही त्यामुळे मी फारसे वैविध्यपूर्ण ब्लॉग्ज शोधले नाहीत. पण न शोधताही जर मला इतके मिळाले असतील, तर बाकीचेही काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे, एखादा ब्लॉग हा एकाच विषयाला वाहिलेला असावा असा एक टीकाकारांचा सार्वत्रिक अट्टाहास मला जाणवतो, तो अनाकलनीय आहे. एखाद्या व्यक्तीनं एका विषयासाठी एकच ब्लॉग लिहिला तरच तो गुणात्मकदृष्ट्या वरचढ का गणाला जावा? जर एखाद्यानं त्याची फोटोग्राफी, चित्रकला, हस्तकला, तांत्रिक बाबी आणि ललितलेखन एकाच ब्लॉगवर केलं तर लगेच त्याला ललित ब्लॉगर म्हणून हिणवायचं? हे म्हणजे 'लघुत्तम सामायिक विभाजक' काढण्यासारखं आहे आणि तेदेखील चुकीचा. कारण कुठल्याही प्रकारचं लेखन कमी दर्जाचं जास्त दर्जाचं असं म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे. ललित लिहिलं की वाईट, विवेचन केलं की चांगलं, इंग्रजीमिश्रित बोलीभाषा वापरली की वाईट, जडबंबाळ अललंकारिक लिहिलं की चांगलं ही वर्गवारी कशासाठी?
ज्याप्रमाणे कुठलाही एक मनुष्य दुसर्‍याप्रमाणे नसतो, त्याप्रमाणे कुठलीही एक अभिव्यक्ती दुसर्‍या अभिव्यक्तीसारखी नसते. त्यामुळे एकाच शाळेत, एकाच बाकावर एकाच तासाला बसणारी दोन मुलं त्या तासात घडलेल्या घटनांचं संपूर्ण वेगळं वर्णन करतील. ते आपलं 'एकच कुत्रा आहे म्हणून आमचा निबंध सारखा आहे' असल्या बालिश जोकसारखं कधीच नसतं. तस्मात एकाच धाटणीचे ब्लॉग असं म्हणून जे एक जनरलायझेशन केलं जातं ते मला पूर्णपणे आक्षेपार्ह वाटतं.

२. मराठी ब्लॉगिंगमध्ये रोजच्या घडामोडींबद्दल किंवा फक्त स्वतःच्याच परिघातल्या अनुभवांबद्दल अत्यंत ट्रिव्हियल लिहिणार्‍या ब्लॉग्जचाच भरणा जास्त आहे. थोडक्यात ब्लॉग ह्या माध्यमात 'नवा विचार' येत नाही.

-मी कुणी मोठा लेखक नाही की लोकप्रिय ब्लॉगर नाही की कॉम्प्युटर आहे आणि मराठी टंकलेखन जमतंय म्हणून चार ओळी खरडणारा हौशी मनुष्यही नाही, पण मी ह्या सर्वांचाच प्रतिनिधी आहे. कारण कधी मी लेखक म्हणून लिहितो, तर कधी मनातलंच ललितलेखनाच्या माध्यमातून लिहून चार समविचारी लोकांचे प्रतिसाद मिळावेत म्हणून लिहितो, तर कधी निव्वळ हातात लॅपटॉप आहे म्हणून लिहितो. आणि हो, मीसुद्धा वाचलेली पुस्तकं, पाहिलेला सिनेमा किंवा मस्त जमलेली ट्रीप ह्यांवर ब्लॉगपोस्ट लिहितो. पण जेव्हा 'मराठी ब्लॉगिंगमध्ये नवा विचार येत नाही' असली ओरड होते, तेव्हा मोठी मौज वाटते.
मुळात 'नवा विचार' ही किती सापेक्ष संकल्पना आहे. जी व्यक्ती फक्त स्वतःच्या घरातल्या गोष्टी ब्लॉगवर लिहिते, त्या व्यक्तीनं कथा लिहिणं हा 'नवा विचार' ठरतो. जी व्यक्ती पुस्तक परीक्षणं लिहिते, तिनं ललित लिहून पाहणं हा 'नवा विचार' ठरतो आणि जी व्यक्ति अक्षरशः डोक्यात चाललेल्या कुठल्याही विचारचक्रावर लिहिते, तिनं कविता लिहिणं हा 'नवा विचार'च नाही का?
फक्त दणदणीत शब्दप्रयोग करून वैचारिक लिहिणं म्हणजेच 'सध्याच्या विचारांपलिकडचं' होऊ शकत नाही. अर्थापलिकडला अर्थ शोधणं आणि तो शब्दांकित करणं हा निश्चितच कौतुकास्पद 'नवा विचार' ठरतो, पण फक्त तोच नवा विचार ठरतो हे आक्षेपार्ह आहे. असं लिहिणार्‍यानं एकदा घरात काय घडतंय, ते हलक्याफुलक्या बोलीभाषेत (मग ती इंग्रजीमिश्रित का असेना) शब्दांकित करून पाहणं, हा निश्चितच 'नवा आणि सध्याच्या विचारांपलिकडचा' विचार ठरू शकतो. किएस्लोव्स्कीचे 'थ्री कलर्स' हे तीन सिनेमे, तिन्ही संपूर्ण वेगवेगळ्या धाटणीचे. एकामध्ये डार्क ह्यूमरमध्ये दडलेला सिम्बॉलिझम, दुसर्‍यामध्ये कोंबून भरलेला थेट अंगावर येणारा सिम्बॉलिझम आणि तिसर्‍यामध्ये प्रचंड स्टाईलबाज सिम्बॉलिझम. डेकालॉगचे दहाही एपिसोड वेगवेगळ्या धाटणीचे, एकात रडायला येईल, तर दुसर्‍यात घृणा वाटेल, तिसर्‍यात थरारून जायला होईल तर चौथ्यात चेहर्‍यावर स्मितहास्य येईल. हा 'नवा विचार'. जर किएस्लोव्स्की फक्त सिम्बॉलिझमला कवटाळून बसला असता, तर सिम्बॉलिझमवरचे त्याचे इतके प्रयोग पाहायला कुणी थेटरात फिरकलंही नसतं किंवा त्यावर तासनतासाचा अभ्यास करून लेख पाडायचीही कुणी तसदी घेतली नसती. क्युब्रिकचा प्रत्येक सिनेमा त्याच्या मागच्या सिनेमापेक्षा वेगळा असतो. त्याला 'सध्याच्या विचारापलिकडे जाणं' म्हणतात. जर तो प्रत्येकच सिनेमात 'अर्थामागचे अर्थ' शोधत बसला तर अभिव्यक्तीची बोंब होईल ह्याची त्याला कल्पना असते.
उद्या जर टॉड फिलिप्सनं (हँगओव्हरचा दिग्दर्शक) किएस्लोव्स्कीच्या 'द पर्गेटरी' चं काम पूर्ण करायला घेतलं तर ते त्याला जमेल का? आणि क्रिश्तॉफ पिएशिविचला जर 'हँगओव्हर ४' ची स्क्रिप्ट लिहायला सांगितली तर ती त्याला जमेल का? सांगण्याचा मुद्दा हा की अगदी एखाद्याला नसेलच 'नवा विचार' करायचा तर काय हरकत आहे? 'जरी राजहंसाचे चालणे जगी झालें या शहाणे, म्हणोनि काय कवणें चालोचि नये?'
रडगाणी गाण्यापूर्वी थोडा विचार केलेला बरा असतो.

३. मराठी लेखक, खेळाडू, गायक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांमधील कुणीही ब्लॉगलेखनाकडे वळलेले दिसत नाहीत.

-हा एक अत्यंत योग्य मुद्दा आहे. मराठी ब्लॉगजगताला वेगळा आयाम मिळवून देण्यामध्ये ही गोष्ट मोलाची ठरू शकते. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपल्याकडे शाळेनंतरचं शिक्षण मराठीमध्ये उपलब्ध नाही, आणि असलं तरी ते कुणी घेत नाही कारण त्याचा वास्तविक जगात उपयोग होत नाही हे कटू सत्य आहे. थोडक्यात मराठी ही ज्ञानभाषा नाही. त्यामुळे व्यावसायिक शब्दकोष किंवा खेळामधल्या संज्ञा, शास्त्रीय संज्ञा ह्या मराठीतून एकतर असणं आणि असल्या तरी प्रथितयश किंवा त्या त्या क्षेत्रातले जाणकार, खेळाडू, शास्त्रज्ञ किंवा व्यावसायिक व्यक्तींना ब्लॉगमधून तितक्या पातळीपर्यंत मराठीतून व्यक्त होणं अंमळ अवघडच दिसतं. पण हो, गायक, लेखक, संगीतकार किंवा अगदी व्यावसायिकही काही काही मार्गांनी निश्चितच मराठीतून व्यक्त होऊ शकतात. जुन्या काळातले उत्तम शास्त्रज्ञ उदा नारळीकर किंवा बाळ फोंडकेंसारखे उत्तम शास्त्रीय लेखक आताच्या पिढीत न होण्याची कारणमीमांसा थेट इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत घेऊन जाते आणि ह्या विषयामध्ये लिहिण्या/बोलण्यासारखं इतकं काही आहे की माझ्या मर्यादित बुद्धीनं मी काही लिहिणं चुकीचं ठरेल.
थोडक्यात, वाट बिकट आहे, पण जर प्रथितयश लोकांनी मराठीत प्रयत्नपूर्वक लिहिलं (जसं अमिताभ बच्चन हिंदीत ब्लॉगिंग करतात), तर मराठी ब्लॉगजगताला एक नवा आयाम मिळेल ह्यात शंकाच नाही.

४.तांत्रिकदृष्ट्या मराठी ब्लॉग्जना अजून बरीच मजल गाठायची आहे.

-अजून एक योग्य मुद्दा. मराठीमध्ये टंकलेखनाची सुविधा ही तुलनेने अलिकडची घटना आहे. त्यामुळे मराठी ब्लॉगलेखनही अलिकडचंच. त्यातली बरीच मंडळी अशी आहेत जी इंग्रजी ब्लॉग्ज वाचत नाहीत किंवा लिहितही नाहीत त्यामुळे तिथल्या विविध संकल्पनांची ओळख नाही. आणि ब्लॉग लिहिणारे सगळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले किंवा रोजच्या रोज संगणकाशी निगडीत कामें करणारे नाहीत, त्यामध्ये गृहिणी, पेन्शनर्स आणि इतरही अनेक व्यावसायिकांचा भरणा आहे, ज्यांना ब्लॉगचा आराखडा, प्लगिन्सची व्यवस्था इत्यादी गोष्टींबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही. त्यामुळे मराठी ब्लॉग्जमध्ये दिसायला सुटसुटीत आणि विविध सोयीसुविधांनी युक्त असे ब्लॉग्ज फारच कमी आहेत.
ह्या बाबतीमध्ये सुधारणेला बराच वाव आहे.पण सध्या ब्लॉगजगतात तांत्रिक बाबी स्पष्ट करून, समजावून सांगणारे अनेक ब्लॉग्ज आहेत आणि त्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे लवकरच चित्र पालटलेलं बघायला मिळण्यास हरकत नाही.

५. शुद्धलेखन आणि परिच्छेद, विरामचिह्ने इत्यादी लेखनविषयक तांत्रिक बाबी.

-इंग्रजी माध्यम आणि तत्सम मुद्द्यांमुळे मराठी शुद्धलेखन किंवा प्रमाण (राजमान्य) मराठी शुद्धलेखन हा एक काळजीचा विषय आहे. योग्य परिच्छेद पाडणं, र्‍हस्व-दीर्घ आणि स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम हे योग्य पद्धतीने किती जणांना जमत असेल ते सांगणं कठीण आहे. पण इथे आपल्याला अभिव्यक्ती महत्वाची आहे की सादरीकरण हा एक मुद्दा कळीचा ठरतो. भाषेचा मूळ उद्देश संवाद साधला जाणं आणि माहितीची देवाणघेवाण होणं हा आहे असं धरून चालल्यास तांत्रिक माहिती किंवा प्रवासवर्णनपर किंवा तत्सम माहितीपर ब्लॉग्जमध्ये शुद्धलेखन किंवा परिच्छेदांचा मुद्दा बाजूला ठेवता येईल, पण अर्थातच कविता किंवा कथा ह्यांमध्ये ह्याची अपेक्षा ठेवणं रास्त ठरेल.
पण एकंदरितच सरसकट सर्वत्रच शुद्धलेखन, परिच्छेद हा अट्टाहास धरून चालणं म्हणजे थोडासा अतिरेकच म्हणावा लागेल. सादरीकरण महत्वाचं आहे, पण अभिव्यक्तीचाच गळा घोटणारं सादरीकरण काय कामाचं हाही विचार व्हायला नको काय? माध्यमाला सरावल्यानंतर आपोआपच सादरीकरणात सफाई येऊ लागते. पण सादरीकरणाच्या नावाने गळे काढून नवीन अभिव्यक्ती दडपण्यात काय हशील?

मी एव्हढं सगळं पाल्हाळ लावण्याचं कारण एव्हढंच होतं, की मराठी ब्लॉगिंगमध्ये नव्या वाटा चोखाळल्या जाव्यात हा विचार मांडताना जी सद्यस्थितीबद्दल ओरड होते आहे ती अनाठायी आणि संकुचित मनोवृत्तीची आहे असं माझं ठाम मत मला मांडायचं होतं. आणि त्याचसोबत मराठी ब्लॉगिंग माझ्या नजरेतून खरोखरच कुठे आहे, ह्याचीही एक पडताळणी करायची होती. मी कुणीही तीसमारखाँ नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो, पण जे खटकलं किंवा वाटलं ते मांडण्याचं माझं स्वातंत्र्य वापरून मी हे लिहितोय.
नव्या वाटा ह्या कायमच उपलब्ध असतात, अगदी इंग्रजी ब्लॉगजगतामध्ये सर्व काही पादाक्रांत झालंय असा दावा कुणीही करणार नाही, त्यामुळे नव्या वाटा अन नव्या विचारांसाठी आत्ता लिहिणार्‍या किंवा लिहिण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कमी गुणवत्तेचे, ट्रिव्हियल, स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणारे वगैरे म्हणणं हे चूक आहे. जोवर लेखन होत नाही, तोवर ते वेगळं आहे की नाही हे कसं कळेल? तेव्हा कायम उपलब्ध साहित्याबद्दल बोंब ठोकण्यापेक्षा किंवा व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार्‍यांना शेरेबाजीनं नामोहरम करण्यापेक्षा प्रत्येकाचंच स्वागत आणि कौतुक करायला काय हरकत आहे? इंटरनेटची लोकशाही तर सर्वोच्च प्रकारची लोकशाही आहे आणि ती तितक्याच उच्च दर्जाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही देते. तर आपलं स्वातंत्र्य आपण इतरांच्या अभिव्यक्तीला अधिक फुलवायसाठी वापरायचं की दडपायसाठी ते प्रत्येकानं ठरवायचं.

टीप - काल नजरचुकीने काही वाक्यांची दोन परिच्छेदांमध्ये पुनरूक्ती झाली होती. ती दुरूस्त केली आहे.

4/15/2012

मृत्युदाता -११


भाग -१भाग -२भाग -३भाग -४भाग -५भाग -६भाग -७, भाग -८, भाग -९ आणि भाग -१० पासून पुढे

"तुला आत्ता माझ्याबद्दल जे काही वाटत असेल ते सर्व मी समजू शकतो." नरेंद्र व्हेंटिलेशन डक्ट उघडत म्हणाला.
"ह्म्म. वाटण्यासारखं जास्त काही नाही." तिनं खांदे उडवत म्हटलं.
त्यानं एक सेकंद थांबून फक्त तिच्याकडे पाहिलं आणि मग तिला आत शिरण्याचा इशारा केला. ती आत शिरल्यावर तिच्या मागे तो आत शिरला. हळूहळू जास्त आवाज न करता दोघेजण पुढे सरकत होते.
नरेंद्रला तिला खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते, पण त्यात काही अर्थ नव्हता. आणि ती तो काहीच कसा बोलत नाही ह्या विचारात होती. एका विवक्षित ओपनिंगपाशी ते दोघे थांबले. त्यानं स्क्रूड्रायव्हरनं ते ओपनिंग उघडलं आणि दोघांनी त्या खोलीत उडी मारली. ती कुठलीतरी स्टोअर रूम होती. त्यामध्ये जुनाट गाद्या, उशा, पडदे, मोडक्या खुर्च्या इत्यादी भंगार पडलेलं होतं. नरेंद्रनं कोपर्‍यातली एक खुर्ची त्यावरच्या फाटक्या गादीसकट उचलून बाजूला केली आणि त्याखालची जुनाट सतरंजी बाजूला केली. त्याखालची लाकडी फळी बाजूला केली आणि रेखाला आत शिरण्याची खूण केली.
त्या खडबडीत भुयारात पावलं सांभाळत ते दोघे पुढे गेले. तिच्या हातात टॉर्च होता. थोडंसं पुढे अजून एक लाकडी फळकुट होतं, ते बाजूला करून दोघेजण वाकून पलिकडे शिरले. आता काटकोनात जे भुयार होतं ते एकदम मोठं आणि प्रशस्त होतं. फुरसतीनं बनवलेलं. त्यामध्ये एक लोखंडी दरवाजा असलेला भाग होता, ज्यामध्ये महातोला बांधून ठेवलेलं होतं. नरेंद्रनं शांतचित्तानं दरवाज्याचं कुलूप काढलं. फट उघडून आतली स्थिती पाहिली आणि हळूवार दरवाजा उघडला. रेखा बाहेरच थांबली. महातो अजूनही झोपलेला होता आणि त्याला जोडललं उपकरण अजून व्यवस्थित सुरू होतं. नरेंद्रनं ते उपकरण सोडवलं आणि रेखाला खूण केली. तिनं दरवाजा बाहेरून लावून त्याला कडी घातली आणि कुलूप लावून ती आली त्या मार्गानं परत जाऊन त्या स्टोअररूममध्ये वाट पाहू लागली.
तिला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. 'नरेंद्र नक्की काय करतोय आणि तो परत येईल काय? आपण त्याच्यावर एव्हढा विश्वास कसा ठेवतोय. तेही कालपासून त्याची एव्हढी रूपं समोर येऊनसुद्धा? आपण त्याच्यावर रिसर्च केला होता एकेकाळी, पण आता सगळंच खोटं होतं की काय असं वाटतं. इतके दिवस आपण त्याच्यासोबत आहोत. रिसर्चमधला नरेंद्र, आपण ज्याच्यासोबत राहिलो तो नरेंद्र आणि कालपासून नवाच कळणारा नरेंद्र सगळेच वेगवेगळे वाटतात. पण तरी हे अनामिक बंध कसले वाटतात? का इतका विश्वास टाकून राहिलोत आपण? त्याच्याबरोबरीनं सुरूवात केली होती आणि आता जणू तो आपला नवरा असल्यासारखं.. छे छे.. काहीतरी काय? असा विचार करू तरी कसा शकतो आपण. काय करायला निघालो आहोत, त्यावरून लक्ष कसं ढळू शकतं. शांत राहून वाट पाहूया त्यानं सांगितलंय तितका वेळ. नंतर त्यानं सांगितलं तसंच चेक आऊट करून निघून जाऊ. पण मग त्याचं काय? छे छे. त्याचं काही नाही. प्लॅनप्रमाणे वागू. तो आपला कुणी नाहीये. प्लॅन महत्वाचा आहे.' तिनं महत्प्रयासानं मनाची समजूत घातली आणि एक नजर घड्याळाकडे आणि दुसरी त्या स्टोअररूमच्या दरवाज्याकडे ठेवून ती कानोसा घ्यायचा प्रयत्न करू लागली.

-----

"या कोल्हे या." पित्रे दरवाजाकडे पाहत म्हणाले.
कोल्हेनं कडक सॅल्यूट ठोकला आणि सावधान उभा राहिला.
पित्रेंनी एक स्मितहास्य केलं अन कोल्हेला बसायची खूण केली.
"यादवजी, एक चाय भेज दीजिये कोल्हेसाहबके लिये." पित्रेंनी इंटरकॉमवर ऑर्डर सोडली आणि दोन्ही कोपरं खुर्चीच्या हातांवर टेकवून दोन्ही तळवे हनुवटीखाली घेऊन कोल्हेकडे पाहू लागले. त्यांची नजर नेहमीसारखीच रोखलेली होती.
"काय काम काढलंत साहेब?" कोल्हे नेहमीसारखाच आत्मविश्वासपूर्ण होता.
"कुठवर आलंय तुम्हाला दिलेलं काम?" पित्रे थोडेसे दरडावून म्हणाले.
"मी काम संपवायच्या उंबरठ्यावर आहे साहेब. फक्क्त थोडे दिवस अजून द्या." कोल्हेवर पित्रेंच्या स्वराचा जराही परिणाम झाला नव्हता.
"तुमच्या आत्मविश्वासाचेच आम्ही चाहते आहोत कोल्हे. फक्त हा आत्मविश्वास, अति होऊ देऊ नका."
कोल्हेनं फक्त स्मित केलं.
"आम्ही राज्याचे गृहमंत्री आहोत, पण तुमच्याशी आपली दोस्ती आहे. तेव्हा दोस्तीखात्यात अजून एक काम आहे, तेव्हढं बाजूबाजूनं केलंत, तर थोडे दिवस वाढवून देऊ मूळच्या कामाचे." पित्रे कोल्हेचा चेहरा निरखत म्हणाले.
कोल्हेनं दोन मिनिटं विचार केला, "चहा आला नाही साहेब अजून." कोल्हे पेपरवेटशी खेळत म्हणाला.
"उत्तरासोबत चहाही येईल."
"ह्म्म. आता दोस्तीचं नाव काढलंत तर करावंच लागेल ना काम." कोल्हेनं छद्मी हास्य केलं. त्याबरोबर दरवाजातून चहा घेऊन बटलर आला.
कोल्हेनं चहाचा कप उचलला आणि पित्रेंकडे पाहत चहा भुरकू लागला.
तो काहीतरी बोलेल म्हणून पित्रेंनी थोडा वेळ वाट पाहिली, पण कोल्हे मुरलेला होता. तो त्या गावचाच नसल्यासारखा चहात रंगून गेला होता.
"कोल्हे, काम काय आहे ते माहित करून नाही घ्यायचं का?" पित्रेंनी न राहवून विचारलं.
समोरचा माणूस कितपत डेस्परेट आहे हे माहित करून घ्यायची कोल्हेची हातोटी होती. त्यानं एक स्मितहास्य केलं आणि म्हणाला, "साहेब, दोस्तीखात्यात म्हटलं की काहीही असलं तरी करणार आपण. काळजीच नको."
"ह्म्म. ते करावंच लागणार तुम्हाला." पित्रेंचा आवाज थोडा चढला.
"सांगा काय ते." कोल्हेनं कप खाली ठेवला.
पित्रेंनी इंटरकॉमवर फक्त बटण दाबलं आणि यादव आत आला. त्यानं कोल्हेसमोर एक फोटो ठेवला. कोल्हेनं फोटो उचलून पाहिला. तो एका तिशीतल्या बाईचा फोटो होता. नुकताच हा फोटो त्यानं कुठेतरी पाहिला होता. कपड्यावरून ती शिक्षिका असावी असा अंदाज येत होता, पण बाकी डिटेल स्टडी करण्याइतका आत्ता वेळही नव्हता आणि गरजही.
"हिचं काय?"
"हिचा मर्डर झालाय." पित्रेंनी दोन्ही हात टेबलावर ठेवत म्हटलं.
"ह्म्म. मग?" कोल्हेला काय झालंय ह्याचा थोडा थोडा अंदाज येत होता.
"केस दबा देना है हमेशा की तरह." यादव मध्येच म्हणाला.
कोल्हेनं त्याच्याकडे रागानं पाहिलं आणि मग पित्रेंकडे पाहत म्हणाला, "हा कोण मला ऑर्डर देणारा साहेब."
"रिलॅक्स कोल्हे." पित्रेंनी यादवला बाहेर जायची खूण केली. यादवही भडकला होता, पण गपचूप बाहेर गेला.
"असं बघा कोल्हे. ही आपली खास होती." पित्रे डोळे मिचकावत म्हणाले.
"मग मर्डर कसा काय?"
"लायकीपेक्षा जास्त मिळालं की माज येतो ना हो लोकांना. हिच्या मदतीनं मध्यंतरी एका दुसर्‍या नेत्याला अडकवला होता. त्यावरून ब्लॅकमेल करू लागली."
"ह्म्म."
"कोल्हेसाहेब, तुम्हाला केसवर एव्हढा वेळ हिच्यामुळेच मिळाला होता. हिची टेप नसती आली बाहेर तर मीडियानं तुम्हाला केव्हाच खाल्ला असता ह्या केसवरून."
"ओह्ह. राईट. ही शशिकला नाही का. तरीच म्हटलं फोटो ओळखीचा वाटतो."
"बरं आता गप्पा खूप झाल्या. यादव म्हणाले त्याप्रमाणे केस दाबून टाका काहीतरी करून."
"साहेब. एक बकरा लागेल. तुमचा कोणी असेल तर बघा. ७-८ वर्षं आत जायची तयारी असलेला. मॅनस्लॉटरची केस बनवू. पण ऑफकोर्स तुमच्या माणसांनी नक्की काय केलंय ते बघावं लागेल."
"आमच्या खास माणसांनीच घोळ घातलाय कोल्हे. नाहीतर तुम्हाला बोलवायची वेळ आली नसती. गरम डोक्यानं खून झालाय हा."
"ह्म्म. बघतो मी काय ते. कळवेनच प्रोग्रेस. तेव्हढा एक महिना मात्र जास्त लागेल मला."
"ह्म्म. तुम्ही कधीकधी आम्हालाही मात देता कोल्हे. नशीब राजकारणात नाही तुम्ही."
"कसचं कसचं." म्हणत कोल्हे उठून उभा राहिला आणि सॅल्यूट मारून निघून गेला.

-----

'आय शुड बी अशेम्ड ऑफ मायसेल्फ.' रमेश स्वतःशीच बोलत होता. 'मला तिच्याबद्दल काहीही कसं वाटू शकतं? नुकताच तिचा नवरा गेलाय. आणि मी... छ्या. लाज कशी वाटत नाही मला. आणि काहीतरी जवाबदारी आहे माझ्यावर. ज्यासाठी मी स्वतःच्या तत्वांनासुद्धा मुरड घालून बसलोय. ते सगळं विसरून मी असले विचार कसे करू शकतो.' रमेश भैरवीबद्दल वाटणार्‍या आकर्षणामुळे सैरभैर झाला होता. हॉस्पिटलच्या आवारात फेर्‍या मारत होता. पहाट होत होती. 'छे छे. हे सगळे विचार मनातून काढून टाकले पाहिजेत. इतके दिवस काही एक कारणामुळे आपण ह्या सगळ्यात पडू शकत नव्हतो आणि आता त्याच कारणामागचं रहस्य सोडवायची संधी आलीय. कदाचित आपल्या आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटायची शक्यता आहे. अशा वेळेस आपण नसत्या आणि अनैतिक गुंत्यांमध्ये पडणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणं आहे.' तो स्वतःशीच पुटपुटत फेर्‍या मारतानाच त्याच्यसमोर कुणीतरी येऊन उभं राहिलं. त्यानं वर पाहिलं. ती भैरवी होती.
"मला आतल्या वातावरणानं कसंतरी होऊ लागलं म्हणून इथे आले. ती झोपलीय आता. तासाभरात टेस्ट रिपोर्ट्स येतील मग बहुतेक डिस्चार्ज मिळेल म्हणाले डॉक्टर."
"ह्म्म." तो कुठेतरी दूर पाहायचा प्रयत्न करत होता. त्याला तिच्या चेहर्‍याकडे पाहायचं नव्हतं.
"तुम्ही ठीक आहात ना."
"अं. हो, हो. मी ठीकच. मला सवय आहे जागरणांची."
"सॉरी. मी तुम्हाला उगाचच त्रास दिला. पण नक्की कुणाला बोलवू तेच कळेनासं झालेलं मला."
"अहो सोडा की ते आता. मला फोन केलात, उत्तमच. त्यालायक समजलंत ह्यातच सर्व आलं." रमेशला आता तिच्याशी अजून वेळ बोलणं अवघड होत चाललं होतं. "बरं आता मला निघायला हवं." त्यानं उगाचच घड्याळाकडे पाहत म्हटलं. "मी शिंदेंना इथे बोलावून घेतो. ते तुम्हाला घरपोच करतील आणि इतरही काहीही हवं असेल तरी बिनधास्त त्यांना सांगू शकता." आणि त्यानं घाईघाईनं मोबाईलवर फोन लावला आणि तिथून थोडा बाजूला झाला.
"शिंदे, आता मी तुमचा सुपिरियर नाही, पण एक फेवर हवा होता..."

-----

रेखा घड्याळाकडे पाहत होती. बरोब्बर तीन तास होत आले होते. अजून पाच मिनिटांनंतर तिनं त्या भुयाराच्या तोंडापाशी असलेला छोटासा चार्ज त्या भुयारात ढकलायचा होता, त्याबरोबर ते पुन्हा मातीनं भरलं गेलं असतं. मग स्टोअररूममध्ये ठेवलेल्या मातीच्या पोत्यानं त्याचा वरचा भाग भरायचा होता. त्यानंतर त्यावर सतरंजी, खुर्ची आणि गादी पुन्हा पूर्ववत करून व्हेंटिलेशन डक्ट मध्ये शिरून स्वतःच्या खोलीत परत जायचं होतं. मग बॅगा उचलून चेक आऊट करायचं होतं. त्यानंतर त्यानं लिहून दिलेल्या एका मुंबईतल्या पत्त्यावर जायचं होतं. मुंबईचं तिचं निश्चित नव्हतं. पण बाकी ती जसंच्या तसं करणार होती. तेव्हढ्यात स्टोअररूमच्या दरवाजाबाहेर हालचाल झाली. तिनं हातातलं पिस्तुल नीट धरलं आणि दरवाज्याजवळ जाऊन कानोसा घेऊ लागली. आणि अचानक व्हेंटिलेशन डक्टमधून कुणीतरी खाली उडी मारली. तिनं दचकून त्या दिशेनं पिस्तुल केलं आणि ट्रिगर दाबला. पण तो रिकामा शॉट होता. आणि तो नरेंद्र होता.
"रिकामा शॉट कसा काय?" नरेंद्र जराही विचलित न होता तिच्या दिशेनं चालत येत म्हणाला.
"तुला काहीच वाटत नाही? आय जस्ट फायर्ड ऍट यू." ती जवळजवळ किंचाळलीच. ती अजूनही थरथरत होती.
"रिलॅक्स." त्यानं तिच्या हातातली बंदूक घेतली. "मी दोन मिनिटं उशीर केलाय. त्यामुळे मला गोळी अपेक्षित होती. आणि काळजी करू नकोस, झाडली असतीस तरी मी चुकवली असती."
तिला काही बोलायला सुचतच नव्हतं. तिची नुसती चीडचीड होत होती.
त्यानं ठरल्याप्रमाणे भुयार बंद केलं आणि ते दोघे पुन्हा डक्टमध्ये चढले. त्यानं डक्टचं झाकण मॅग्नेटिक स्क्रू ड्रायव्हर वापरून बाहेरूनही स्क्रू केलं आणि मग ते परत त्यांच्या खोलीमध्ये गेले.
"आर यू ओके नाऊ?" त्यानं तिला गादीवर बसवत विचारलं आणि तो बॅगा भरू लागला.
"काय झालं ते सांगशील?"
"जावेद इज डेड. व्हिच मीन्स मी आता रडारवर आहे. पण गुड न्यूज इज, त्यांना अजून माहित नाहीय नक्की कुठे. पण आपल्याकडे जास्त वेळ नाहीय. महातो त्यांना काहीतरी क्ल्यू नक्कीच देईल."
"महातो? त्याला तू सोडलंस?"
"होय. आपल्याला हवी ती माहिती त्यानं दिलीय आणि त्याला मारायची आपल्याला गरज नाही. मला अजून एक ब्लड ट्रेल बनवायची नाहीय."
"पण मग?"
"त्याची स्वतःची माणसं तो जिवंत परत आलेला पाहून, त्याला जिवंत ठेवणार नाहीत."
"पण त्यानं तुला माहिती दिली कशी?"
"लवकर तयार हो. तुला रस्त्यात सर्व सांगतो मी." तो भराभर बॅगा भरत होता.
रेखा थोडीशी नाराजीनंच पुन्हा तयारीला लागली.

-----

रमेश घरी पोचण्यापूर्वीच त्याला त्याच्या नवीन स्पेशल मोबाईलवर इंदूरला जाण्यासाठी मेसेज आला. तिथे जाऊन त्याला एसीपी कोल्हेसोबत को-ऑर्डिनेट करायचं होतं. रतन आणि इतर पळालेल्या कैद्यांचा माग काढण्यासाठी काही धागेदोरे इंदूरमध्ये सापडले होते.
रमेशनं सगळ्या फाईल्स उचलल्या आणि काही कपडे बॅगेत भरून तो बाहेर पडला. ट्रेनचं रिझर्व्हेशन झालेलं होतं. त्याप्रमाणे तो सीटवर बसला आणि त्यानं सर्वप्रथम रतनची तुरूंगातली फाईल उघडली.
अगदी सुरूवातीलाच त्याचा मानसिक मूल्यमापन अहवाल होता. रतन हायपर स्युसाईडल अर्थात आत्महत्याप्रवण होता. तुरूंगात त्यानं चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. चारही वेळेस तो विचित्र पद्धतीने वाचला होता. पहिल्यांदा त्यानं शर्ट एका गजाला बांधून स्वतःला फाशी लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकदा त्यानं स्वतःच्या दातानं हाताची नस कापून घेतली होती, पण तो कुणाच्यातरी नजरेस पडला आणि वाचला. तेव्हापासून त्याचे हात पाठीमागे बांधलेले होते. तरीसुद्धा त्यानं एकदा डोकं भिंतीवर आपटून घेतलं होतं. तेव्हाही कुणाच्यातरी नजरेला पडून तो वाचला होता. त्यानंतर एकदा त्यानं मोडून बाहेर आलेला एक गज स्वतःच्या छातीत खुपसून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर हळूहळू त्याचं वर्तन सुधरत गेलं होतं. तुरूंगात चालणार्‍या गांधीवादी वर्गांना तो हजेरी लावू लागला आणि महिन्या-दोन महिन्यांमध्ये त्याचे मूल्यमापन अहवाल खूपच चांगले होत गेले. पण त्यानंतरच्या महिन्यात तो पळून गेला होता.
मग रमेशनं सगळ्या तारखा तपासल्या. त्याप्रमाणे हे सर्व गेल्या वर्षीचं होतं. रतननं मंत्र्यांचा खून तीन वर्षांपूर्वी केला होता. त्यानं दुसरी एक फाईल उघडली. त्यामध्येदेखील रतनचा मानसिक मूल्यमापन अहवाल होता. पण तो अगदी जुना. पहिलाच. रतन एकदम अबोल आणि पूर्णपणे गप्प असल्याची त्यात नोंद होती. स्वरयंत्र आणि तोंडातले सर्व स्नायू व्यवस्थित असूनही रतन एकही शब्द बोलत नव्हता.
रमेशला ती केस सुरू झाली तेव्हाचं सर्व आठवू लागलं. त्याचा खास मित्र असलेल्या विराज सरपोतदारनं रतनला अटक केली होती. सब-इन्स्पेक्टर सरपोतदार एकदम प्रकाशझोतात आला होता. रतन स्वतःला गोळी झाडून घेत असतानाच विराजनं त्याला थोपवलं होतं अन म्हणूनच रतनला जिवंत अटक होऊ शकली होती. पण रतन पूर्णपणे गप्प होता. कोर्टातच काय, पोलिसांसमोरही तो काहीही बोलला नाही. थर्डच काय अगदी फोर्थ डिग्रीसुद्धा त्यानं सहज पचवली होती. पण त्याच्या गप्प राहण्यामुळेच त्याला लवकर फाशीची शिक्षा मिळाली होती. पण विराज. विराज मात्र एव्हढा झोतात येऊनही कमनशिबीच ठरला. एक सशस्त्र दरोडा रोखताना महिन्याभरातच हकनाक मारला गेला होता. रतनला फाशीची शिक्षा मिळालेली पाहायलाही तो जिवंत नव्हता. विराज रमेशचा बराच ज्युनियर होता, पण दोघेही एकाच गावचे असल्याने त्यांची घनिष्ट मैत्री होती. पण रमेशच्या बहिणीच्या मृत्यूचा तपास विराजच्याच ठाण्याच्या हद्दीत होता. त्यावेळेपासून दोघांमध्ये जी कटुता आली ती कायमचीच. रतनला पकडल्याबद्दल शाबासकी द्यावी असं एकदा रमेशच्या मनात आलंही, पण टाळाटाळ करताना ते राहून गेलं. बहिणीच्या खुनाच्या तपासाच्या फियास्कोबद्दल विराजला जवाबदार धरणं रमेशनं केव्हाच सोडून दिलं होतं. पण ते विराजला सांगण्यापूर्वीच त्यानं जगाचा निरोप घेतला होता. विराजच्या पाठीमागे त्याची पत्नी असल्याचं रमेशला कळलं होतं. पण तो तिला भेटायला जाईपर्यंत ती जागा सोडून कुठेतरी निघून गेली होती.
रमेशचं मन भटकून पुनश्च फाईलवर आलं. पण फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टातही मान्य झाल्यानंतर त्याच्या नावाने राष्ट्रपतींकडे दयाअर्ज गेला होता. आणि त्यामुळे त्याची फाशी अनिश्चित काळासाठी थांबली. ही घटना घडल्याबरोबर त्याचे आत्महत्येचे प्रयत्न सुरू झाले होते. सगळंच विचित्र आणि गुंतागुंतीचं होतं. रतन ह्या माणसाचा काहीच थांग लागत नव्हता. आत्महत्येचा प्रयत्न, त्यानंतर फाशीची वाट पाहणं आणि फाशी मिळाल्यावर मात्र दयाअर्ज करणं. पण दयाअर्ज केल्याबरोबर आत्महत्येचे प्रयत्न. कशाचाच कशाशी संबंध नाही. म्हणूनच त्याचं मानसिक मूल्यमापन सुरू असावं.
मग त्यानं अजून काही पानं उलटली. आणि पुढच्या तपशीलानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. तो तुरूंगात आल्यावर पाचच दिवसांमध्ये त्याला भेटायला एक जोडपं आलं होतं. पण त्यानंतर ते पुन्हा कधीही आल्याचं दिसत नव्हतं. पण त्यानंतर बरोब्बर एका महिन्यानंतर एक स्त्री त्याला दर आठवड्याला भेटायला येऊ लागली होती. ती अगदी त्याचा दयाअर्ज जायच्या तारखेपर्यंत. त्यानंतर मात्र त्याला भेटायला कधीही कुणीही आलं नाही.
हे फार महत्वाचे क्ल्यू होते. त्यानं ठरलेल्या नंबरवर फोन केला.
"तुला काय वाटतं आम्ही त्या तपशीलांचा पाठपुरावा केला नाही? ती स्त्री खोट्या नावाने भेटायला येत होती आणि तिचा चेहरा कुठल्याही कॅमेरावर कधीही येऊ शकलेला नाही. आणि ते जोडपं, रतन त्यांचा हरवलेला मुलगा आहे असं समजून त्याला भेटायला गेलं होतं. पण रतन काहीही न बोलता नेहमीसारखाच मख्खपणे त्यांच्याकडे पूर्णवेळ पाहत राहिला आणि तो त्यांचा मुलगा नसल्याची त्यांची खात्री पटली."
"पण मग त्यांच्या मुलाचं काय झालं? आम्ही थोडा तपास केला, पण तो आठ वर्षांपूर्वी घरातून एक दिवस निघून गेला होता. प्रेमभंगातून उठणं अशक्य झालं होतं त्याला. त्यानंतर त्याचं काय झालं कुणालाच ठाऊक नाही."
"पण त्याचा काही संबंध?"
"रमेश. रतनचा डीएनए मॅच झाला आहे. तो रतनच आहे. ऑफ ट्रॅक जाऊ नकोस. इंदूरला जा. योग्य पुरावे तिथे मिळतीलच."
"पण मला एकदा तरी येरवड्याला गेलंच पाहिजे."
"आधी कोल्हेंशी बोल. मग येरवड्याला जाण्याची सोय मी करून देतो तुझी. लक्षात ठेव इथे काय पणाला लागलं आहे ते."
आणि समोरून फोन कट झाला.
रमेश खिडकीतून बाहेर पाहू लागला. चांगलंच ऊन पडलं होतं. पण त्याच्या मनात अंधार दाटत चालला होता.

-----

"आपण त्याच्या बिल्डींगच्या सिक्युरिटी रिस्पॉन्सचा व्हिडिओ बनवला होता आठवतंय?" नरेंद्र ट्रेनच्या खिडकीतून बाहेर बघत म्हणाला.
"ह्म्म. त्याचं काय?"
"त्यावरून त्याच्या महत्वाच्या गोष्टी कुठे असतील ह्याचा अंदाज बांधता येतो. मी त्याच माहितीचा उपयोग त्याला प्रेशराईज करण्यासाठी केला."
"पण त्याचा तुझ्यावर विश्वास कसा बसला?"
"जावेदचा फायदा झाला. त्याची आयडी चीप मी काढून घेतली होती. ती जाळून डिसेबल केली आणि तीच दाखवून मी आयएसआयचा माणूस असल्याची बतावणी करत राहिलो. "
"पण एव्हढ्यावरून.."
"नाही. मला काही अत्यंत क्रूर छळदेखील करावा लागला. पण त्याशिवाय असल्या गोष्टी होत नाहीत."
"मला घृणा वाटतेय तुझ्यासोबत असल्याची." रेखाला खरोखरच अस्वस्थ वाटू लागलं होतं.
"आणि मला रोज स्वतःचा चेहरा आरश्यात पाहावा लागतो." म्हणून नरेंद्र उठला आणि डब्याच्या दाराकडे गेला.
रेखाला त्याच्या वाक्याचा अर्थ समजला नाही. ती खिडकीच्या बाहेर पाहू लागली. 'कोण आहे हा नक्की? काय आहे हा? का माझं मन तरीसुद्धा त्याला सारखं माफ करतं? का त्याच्यासोबत सुरक्षित वाटत राहतं?' आणि तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले.

नरेंद्र डब्याच्या दरवाजाजवळ टेकून उभा राहिला होता. रात्र दाटली होती. बाहेरचं काहीही दिसत नव्हतं. मोकळी माळरानं मैलोनमैल पसरलेली होती. ट्रेनच्या गतीनं गार वारा येत होता. त्यानं शर्टाच्या आत टाकलेली एक कागदाची घडी बाहेर काढली आणि त्याकडे पाहू लागला.
'तिला जास्त वेळ अंधारात ठेवण्यात अर्थ नाही. तिच्यासमोर आपलं खरं रूप उघड करण्याची वेळ आलेली आहे.' आणि त्यानं कंबरेला खोचलेलं पिस्तुल नीट असल्याची खात्री केली, कागदाची व्यवस्थित घडी घालून शर्टात सारली आणि आपल्या सीटकडे निघाला.

क्रमशः

4/08/2012

मृत्युदाता -१०


भाग -१भाग -२भाग -३भाग -४भाग -५भाग -६भाग -७, भाग -८ आणि भाग -९ पासून पुढे 


"मिस्टर इंगोले?"
"येस?"
"एसीपी कोल्हे." कोल्हेनं नेहमीप्रमाणे आयडी फ्लॅश केलं.
"काय प्रॉब्लेम झालाय साहेब." इंगोले कपाळावरचा घाम पुसत म्हणाला.
"काही विशेष नाही. तुम्ही प्रणव क्षीरसागरच्या खुनातले एक संशयित आहात, म्हणून इथे आलोय." कोल्हे इंगोलेच्या ऑफिसातल्या खुर्चीत बसत म्हणाला.
"पण तुमच्याकडे पुरावे काय आहेत?" इंगोलेनं बाहेर पाहत ऑफिसचा दरवाजा लावून घेतला.
"पुरावे मिळतीलच हो. तुमचा व्हिडिओ आम्हाला सापडला आहेच आणि तुमची फायनान्शियल ऍक्टिव्हिटी संशयास्पद आहे."
"संशयास्पद काय, मी सगळी ट्रान्स्झॅक्शन्स दाखवली ना तुम्हाला?"
"होय, पण तुमच्या ओव्हरसीज अकाऊंटचं काय? त्यामध्ये तर लाखोंची ऍक्टिव्हिटी असते."
"त्याचे रेकॉर्ड्स यायला वेळ लागेल साहेब, ट्रस्ट मी. मी निर्दोष आहे."
"ह्म्म." कोल्हे इंगोलेला नीट निरखत होता, "तुमची कंपनी गेल्या काही महिन्यांत चांगलीच प्रगती करते आहे."
"तर?" इंगोलेला संभाषणाचा रोख कुठे जातोय ते कळत नव्हतं.
"अशात जर तुमचा व्हिडिओ लीक झाला, तर.."
"काय बोलताय साहेब तुम्ही?" इंगोलेच्या आवाजात कंप जाणवायला लागला.
"मी असंच म्हणतोय हो, समजा झाला तर..."
"अहो पण सगळे व्हिडिओ पोलीस कस्टडीत आहेत ना?"
"होय हो, पण शेवटी पोलिससुद्धा माणसंच असतात नाही का?" कोल्हे दात विचकत म्हणाला.
"तुम्ही मला ब्लॅकमेल करताय एसीपीसाहेब?" इंगोलेचा श्वास फुलू लागला.
"अजून तुम्हाला शंका आहे?"
".." इंगोलेच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते.
"एनीवे. ते रेकॉर्ड्स माझ्याकडे पोचले की मी माझी किंमत तुम्हाला कळवेनच." असं म्हणून कोल्हे उठला.

-----


रमेशनं टेबललॅम्प चालू केला आणि बॅगेतून फाईल्सचा गठ्ठा बाहेर काढला. 'सुरूवात मंत्री बेळे-पाटलांच्या खुन्यापासून करूया.' स्वतःशीच म्हणत त्यानं पहिली फाईल उघडली.
'नाव - रतन सहदेव. विचित्र नाव आहे. आगापीछा कळत नाही. वडलांचं नाव - नाही. टिपिकल. मूळ गांव - बहुतेक छत्तीसगडमध्ये कुठेतरी. वाह! काय माहिती आहे त्याच्याबद्दल. नातेवाईक - कुणीही माहित नाही. पार्श्वभूमी - एकेकाळचा नक्षलवादी आणि त्याआधी छोटा-मोठा गुन्हेगार. पोलिसांवरच्या हल्ल्यातल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपी. दोन वेळा छत्तीसगडमधल्या आणि गडचिरोलीतल्या गावांमधल्या हत्याकांडामध्येही हात असल्याचा संशय. माहित असलेल्या इतर खोट्या ओळखी - एकही नाही. माहित असलेले जुने साथीदार - कल्पना दोरनाल. कल्पना दोरनाल? कुख्यात कल्पना दोरनाल? आंध्रातल्या नक्षलवादी गटाची एक प्रमुख नेता? तरीच हे सगळं इतकं गुलदस्त्यात ठेवलं गेलं. पण ह्या माणसाबद्दल काहीच माहिती कुणालाच कशी नाही.'
रमेश वेड्यासारखी फाईलची पानं उलटत होता. त्याच्यावरच्या आरोपांचे पोलिस रिपोर्ट्स होते. त्याच्या नक्षलवादी काळातला एकही फोटो कुठेही नव्हता. केवळ कधीतरी मिळालेल्या डीएनएवरून तो रतन असल्याची ओळख पटली होती. त्याचे पोलिस रेकॉर्ड्समधले फोटो होते. जुन्या खटल्यांमधल्या साक्षीदारांच्या त्याच्याविरूद्धच्या साक्षी होत्या. पण तो कधीच सापडलेला नसल्याने ते सगळे खटले धूळ खातच पडलेले होते. पण तो नक्षलवादी होण्यापूर्वीच्या त्याच्या आयुष्याबद्दल काही जणांचे अंदाज सोडल्यास काहीच नव्हतं आणि एक दिवस तो रहस्यमयरित्या नक्षलवादी गटातून गायबच झाल्याच प्रथमदर्शनी दिसत होतं. त्यानंतर त्यानं काय केलं ह्याबद्दलही काहीही माहिती नव्हती. त्यानंतर तो थेट एक दिवस केंद्रीय मंत्र्यांना मारायची सुपारी घेऊन आला आणि खून करून आत्महत्या करताना पकडला गेला. इतका विचित्र सगळा प्रवास. रमेशचं डोकं भंजाळून गेलं.
मग त्यानं रतनची तुरूंगाची फाईल समोर ओढली. ह्या फाईलमुळे राजे आणि त्यामुळे डॉ. काळेंनी प्राण गमावले. काय असेल असं ह्या फाईलमध्ये?
तो ती फाईल उघडणार एव्हढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. रमेशनं घड्याळात पाहिलं. रात्रीचा एक वाजत होता. 'कोण असेल आत्ता?' असा विचार करत रमेशनं फोन उचलला.
"इन्स्पेक्टर रमेश?"
त्याला आवाज ओळखीचा वाटला. "हो बोलतोय."
"मी भैरवी."


-----


चालता चालताच रेखाला चक्कर आली आणि ती पडली. नरेंद्र दोन पावलं पुढे होता, तो चटकन वळून मागे आला. तिला उचलून त्यानं एका खांबाला टेकून बसवलं आणि धावतच शेजारच्या एका टपरीवरून पाणी घेऊन आला. आजूबाजूची दोन-तीन माणसं गोळा झाली होती, त्यांना जायला सांगून त्यानं तिच्या चेहर्‍यावर दोन-तीन शिंतोडे उडवले. तिनं हळूहळू डोळे उघडले.
"काय झालं ग एकदम? बरी आहेस ना?"
ती काही न बोलता उठू लागली आणि पुन्हा तोल जाऊन तशीच बसली.
"कशाला लगेच उठतेयस? बस ना दोन मिनिटं."
"हो. दोन मिनिटं बसल्यामुळे माझा सगळा स्ट्रेस लगेच जाणार आहे अरे हो पण ती दोन मिनिटं कमी झाली तर आपल्याकडे आधीच कमी असलेला वेळ अजून कमी होईल नाही." ती रागानंच म्हणाली.
त्यानं मान खाली घातली. मग एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याशेजारी खाली काही न बोलता बसला. दोन-तीन मिनिटं अशीच गेली.
"बोल ना काहीतरी. झाली माझी दोन मिनिटं." आता तिचा धीर राहीना.
त्यानं फक्त परत एकदा तिच्याकडे पाहिलं.
"बोल ना आता? मी रागावलेय आता तू रागवायचं नाहीस. डोन्ट स्टील माय थंडर."
"मला काही सुचत नाही बोलायचं अशावेळेस."
"अशावेळेस म्हणजे?"
"म्हणजे जेव्हा जिच्यासोबत तुम्ही असता ती व्यक्ति रागावलेली असते आणि तुम्हाला सगळं समजत असतं तरीसुद्धा काहीही समजत नसतं."
ती त्याच्याकडे पाहत राहिली. "म्हणजे हे सगळं पूर्वीही कधी..."
"उठता येतंय का बघ तुला." तो तिचा हात धरून उठत म्हणाला, "गप्पा मारत बसण्याएव्हढा वेळ मात्र खरंच नाहीये आपल्याकडे."
तिनं तो विषय तिथंच सोडायचं ठरवलं, "आधीच ह्या सगळ्या, त्याला फोन करून जाळ्यात ओढण्याच्या प्रकरणानं डोक्याला ताप झाला होता, त्यात तो मृत मनुष्य आणि तू न जाणे कोण आहेस?" ती उठून उभं राहत म्हणाली.
"तुझा माझ्यावर विश्वास आहे की त्याच्यावर?"
"होय, जो माणूस मी मृत आहे असं सांगत येतो, तो जे सांगतो ते खरं आहे असं सांगणार्‍या तुझ्यावर माझा विश्वास आहे."
"हे बघ तो मृत नव्हता."
"ते मला पण दिसत होतं. पण मग तो बाकी जे सांगत होता ते खरं का मानायचं?"
"कारण त्याला एकच मानसिक समस्या आहे बाकी काही नाही."
"काय?"
"त्याला माईल्ड स्किझोफ्रेनिया होता, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलेलो." नरेंद्र तिला आधार देत चालवत म्हणाला.
"मृत असल्याचं वाटणं हा स्किझोफ्रेनिया आहे?"
"नाही. हा त्याच्याशीच रिलेटेड भलताच आजार आहे. 'कोटार्ड डिल्युजन'"
"काय? आणि तुला कशी खात्री."
"मी त्याचा हात धरला तेव्हा त्याची पल्स चेक केली. आणि त्याच्या कोटाच्या उजव्या बाजूमागे त्याच्या शर्टावर गोळी लागल्याची खूण होती. बहुतेक ती गोळी आरपार गेली होती. आणि त्याला उजवीकडची किडनी नाहीये, त्यामुळे ती गोळी त्याला थोड्याफार रक्तपातापलिकडे काहीही डॅमेज न करता गेली. त्याच्या अशाच मानसिक रोगांमुळे त्याच्याच माणसांनी त्याला संपवायचा प्रयत्न केलाय बहुतेक आणि तो मेलाय असं त्याच्या आधीच बिकट मनोवस्थेमुळे त्याला वाटतंय."
"आणि त्याची माणसं आता त्याच्या मागे नसतील?"
"त्याला मारण्याचा प्रयत्न होऊन फार वेळ झालेला नाही. त्याची त्वचा रक्तपातामुळे पांढरी पडलीय आणि फारतर दोन दिवस न जेवल्यानं त्याचे डोळे खोल गेलेत. तो ज्यापद्धतीनं मृत असल्याचं समजून फिरतोय, तो लवकरच त्यांच्या रडारवर परत येईल."
"आणि तू त्याला असाच मरू देणार?"
"मी त्याला वाचवायचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे. त्याच्या पाठीवर टारगेट रंगवलेलं आहे, मी त्याच्यासोबत राहाणं म्हणजे मी रडारवर येणं."
"आणि तुला स्वतःचा जीव महत्वाचा आहे." ती चटकन बोलून गेली आणि तिच्या लक्षात तिची चूक आली. त्यानं तिच्याकडे फक्त एक दुखावलेला कटाक्ष टाकला.
"पण त्यानं तुला शोधलं कसं?"
"बहुतेक मेल्याच्या भावनेनं त्याला माझी मदत करायला उद्युक्त केलं आणि ऍक्सिडेंटली मी त्याला दिसलो किंवा..." नरेंद्रच्या डोळ्यांतले भाव झरझर बदलले.
"किंवा काय?"
"त्यांना माहितेय मी कुठेय ते."
"मग ते आले का नाहीत तुझ्यामागे?"
"ते पण वेटिंग गेम खेळताहेत. आपण महातोला कुठे ठेवलंय हे कुणालाच माहित नाही आपण दोघे सोडता." त्यानं हळूच खिशातून एक मोबाईलसदृश उपकरण काढलं. "महातोची हार्टबीट नॉर्मल आहे, ब्लड प्रेशर ओके आहे. आणि त्यानं पाच वेळा बांधलेल्या दोरीला स्पर्श करायचा प्रयत्न करून शॉक घेतलाय. ओह डॅम.."
"काय झालं?"
"जावेद शहराच्या अगदी मुख्य भागात फिरतोय. तो एकतर पोलिसांना तरी सापडेल किंवा त्याच्या माणसांना तरी."
"हे तुला.. तू त्याच्यावर बग प्लांट केलास? म्हणजे तुला चक्क त्याची काळजी आहे?"
"वेडी आहेस का? तो माझ्याकडे येणं हा ट्रॅप नव्हता हे कन्फर्म करण्यासाठी हा बग आहे. तो मरणार आहे हे निश्चित, असा किंवा तसा. मरण्यापूर्वी त्याचा आपल्याला कितपत फायदा होऊ शकतो हे फक्त हा बग आपल्याला सांगू शकतो."
रेखा नरेंद्रकडे पाहतच राहिली.
"काय?" त्याला एकदम विचित्र वाटलं.
"किती थंड रक्ताचा आहेस तू? मला वाटतंय की मी तुला ओळखतच नाही."
"आय सरप्राईज मायसेल्फ टू. हे बघ हॉटेल आलं. नॉर्मल हो आता जरा."
"पण तू त्याच्यावर नकळत कसा काय बग प्लांट केलास?"
"माझ्या हातात कला आहे. मी बग प्लांट केलेला कुणालाच कळत नाही." तो डोळे मिचकावत म्हणाला.
"बरं बरं" आणि एकदम तिच्या डोक्यात प्रकाश पडला, "म्हणजे.. कुठे ते सांग आधी."
"ओह्ह जस्ट लेट इट बी." आणि तो चटकन गेटमध्ये शिरला.


-----


"मिसेस काळे?" रमेश अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता.
"सॉरी मी इतक्या रात्री फोन केलाय, पण नक्की काय करावं कळत नव्हतं."
"काय झालं?"
"वैभवी.." तिचा आवाज थोडा थरथरू लागला.
"काय झालं तिला?"
"तिला खूप ताप आलाय. आमच्या डॉक्टरांनी आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये आणलंय आणि मला खूप भीती वाटतेय."
"तुम्ही काळजी करू नका. कुठलं हॉस्पिटल?"


-----


"डोन्ट वरी साहेब. मी सगळ्या संशयित ब्लॅकमेल व्हिक्टिम्सना टोचून आलोय. लवकरच सुपारी देणारा आपल्यासमोर असेल, मग सुपारी किलरला शोधणं सोपं जाईल." कोल्हे कमिशनर सिन्नरकरांना सांगत होता.
"ह्म्म. आय होप तुमचा प्लॅन सक्सेसफुल होईल." सिन्नरकर कोरडेपणानं म्हणाले.
"येस सर."
"आणि वर्तक केसवर कितपत प्रोग्रेस?"
"आय ऍम क्लोजिंग इन ऑन इट सर."
"दहा दिवस देतो मी तुम्हाला अजून."
"ते तुम्ही ठरवणार की मंत्रीसाहेब सर?" कोल्हे कुत्सितपणे म्हणाला.
"माईंड युअर टंग एसीपी."
"सॉरी सर." कोल्हे माफीचा लवलेशही न बाळगता म्हणाला.
"त्या ब्लॅकमेलसाठी वापरलेल्या टेप्स एव्हिडन्सला आजच्या आज जमा करा. आणि यू मे गो नाऊ." सिन्नरकर तुटकपणे म्हणाले.
कोल्हे सॅल्युट मारून निघून गेला.
सिन्नरकर त्यांच्या टेबलावरचं एक पत्र पाहत होते. रियल इस्टेट बॅरन इंगोलेंकडून आलेलं ते पत्र होतं. एसीपी कोल्हे ब्लॅकमेल करत असल्याबद्दल. आता सिन्नरकरांना एक असा वजीर हवा होता जो कोल्हेला त्याच्याच डावात चेकमेट करू शकेल. 'कुठे मिळेल असा वजीर? तिवारीत तो दम नाही.'


-----


"कशी आहे आता वैभवी?" रमेशनं तिच्यासमोरच्या बाकावर बसत विचारलं.
तिनं एकदम रूमालातून डोळे वर केले. रडून डोळे लाल झाले होते.
"आता ताप वाढणं थांबलंय. आमचे फॅमिली डॉक्टर पण आत आहेत. तिला ऑब्झर्व्ह करत आहेत. तिला जोरात उचक्या येताहेत मधेच. अख्खी थरथरतेय ती. मला बघवतही नाहीये."
"तुम्ही.." रमेशला मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी बोलायची सवय होती पण अशी सिच्युएशन नवी होती. "तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल तर तिच्याकडे कोण बघेल." त्याला अजून काही सुचत नव्हतं. "मी बघून येतो थांबा. तुम्ही शांत व्हा आधी." आणि तो उठून आत गेला.
वैभवीची कंडिशन सुधरत होती. तिच्या उचक्या बंद झाल्या होत्या. ताप उतरणीला होता. रक्ततपासणीवरून नक्की निदान होणार होतं, पण फ्लूचाच अंदाज होता.
तो बाहेर आला आणि तिला सांगितलं. ती उठून धावतच आत वैभवीला पाहायला गेली.
तो चहा आणायला बाहेर गेला. तो परत आला तेव्हा ती पुन्हा तिथेच त्या खुर्चीवर बसली होती.
"कुठे गेला होतात तुम्ही?"
"चहा आणायला तुमच्यासाठी. पण तुम्ही बाहेर का आलात?"
"ती झोपलीय आता. तिच्याकडे फारवेळ पाहत राहिले तर माझीच नजर लागेल तिला." तिचे अश्रू आज आवरतच नव्हते.
"शांत व्हा. हा घ्या चहा."
"तीच माझं सर्वस्व आहे आता. तिला काही झालं तर.."
"काही होणार नाहीये तिला. बोललो मी डॉक्टरांशी, तुम्हालाही सांगितलं असेलच ना."
ती हुंदके देतच होती. त्यानं बळेच तिच्या हातात चहाचा ग्लास दिला. चहाचे दोन घोट आणि थोड्या वेळानंतर ती थोडी शांत झाली.
"सकाळी तुम्हाला ड्यूटी असेल ना? आणि मी तुम्हाला त्रास.."
"मी आता पोलिस स्टेशनात काम करत नाही. काळजी नका करू."
"मग?"
"आता मी सीबीआयमध्ये ट्रान्सफर झालोय. त्यामुळे आता माझं पोस्टिंग थोडं वेगळं आहे."
"अरे वा! पण म्हणजे कसं?"
"म्हणजे मी आता चोवीस तास ऑन ड्यूटी आहे." तो हसत म्हणाला.

 क्रमशः

4/01/2012

मृत्युदाता -९

भाग -१भाग -२भाग -३भाग -४भाग -५भाग -६भाग -७ आणि भाग -८ पासून पुढे


"एसीपी कोल्हे" कोल्हेनं त्याचं आयडी पुढे केलं.
"आईये साहब, मॅडम अभी आती हैं." बटलरनं मोठ्या अदबीनं कोचाकडे दिशानिर्देश केला आणि तो आत गेला.
कोल्हे त्या उंची दिवाणखान्याचं निरीक्षण करण्यात गुंग झाला.
"नमस्कार" आणि कोल्हेची तंद्री भंग पावली, "मी वृंदा वर्तक."
"ओह्ह. नमस्कार मॅडम. फार त्रास द्यायचा नव्हता. पण मी केसवर नवाच आलोय, त्यामुळे थोडेफार प्रश्न विचारायचे होते."
"ह्म्म. विचारा काय ते, आता सवय झालीय चौकशांची आणि पेपरातल्या बदनामीची. ती विषादानं कुठेतरी दूर पाहत म्हणाली."
कोल्हेच्या डोक्यात बरीच विचारचक्र सुरू होती.

-----

"शिंदे, इच्छा असूनही मी तुम्हाला जास्त काहीही सांगू शकत नाही." रमेश चहाच्या ग्लासाशी खेळत म्हणाला.
"ठीक आहे साहेब. नक्की काहीतरी झालं असणार. ही केस सुरू झाल्यापासून विचित्र गोष्टी पाहण्याची सवयच झालीय. आता तुम्ही मला बाजूला करणं अजून एक." शिंदे विषादानं म्हणाले.
"प्लीज शिंदे. मी तुम्हाला बाजूला वगैरे केलेलं नाहीये. काही खरोखर अविश्वसनीय गोष्टी घडल्या आहेत, ज्यामुळे हे सगळे बदल घडलेत. आणि.." त्याचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी ते बसले होते त्या हॉटेलबाहेर हॉर्न वाजला. "ओह." रमेश बाहेर पाहत म्हणाला.
एक काळ्या रंगाची टाटा सफारी उभी होती.
"तुमच्यासाठी आलीय ती गाडी?"
रमेशनं मान डोलावली आणि गॉगल चढवला.
"पण त्यांना कसं कळलं तुम्ही इथे.." शिंदेंचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी रमेशनं कंबरेच्या पट्ट्याला लावलेल्या छोट्याशा गॅजेटकडे अंगुलीनिर्देश केला आणि जागेवरून उठला.
"शिंदे, ट्रस्ट मी, इट्स टू कॉम्प्लिकेटेड." आणि त्यानं टेबलावर बोटांनी एक विशिष्ट आवाज काढला आणि दरवाजाच्या दिशेनं गेला.
तो त्या दोघांनी ठरवलेला सिग्नल होता. त्यानुसार आता शिंदेंनी रमेशच्या पुढच्या संदेशाची वाट पाहायची होती आणि रमेशच्या संदर्भात काहीही न करता.

-----

 "मॅडम, लेट मी बी व्हेरी क्लिअर अबाऊट धीस." कोल्हे अतिशय कोरड्या चेहर्‍यानं आणि थंड आवाजात बोलत होता, "तुमच्या नवर्‍याविरूद्ध सगळे पुरावे व्यवस्थित आहेत. त्याचं पूर्णपणे अडकणं निश्चित आहे."
"म्हणायचं काय आहे तुम्हाला?" वर्तकची बायको शहारली होती.
"म्हणजे असं बघा, पुराव्यांमध्ये मर्डर वेपन-पिस्तुल-जे मिळालंय, ते त्यांचंच आहे आणि त्याच्या आतल्या भागांवर फक्त त्यांच्याच बोटांचे ठसे आहेत. बाहेरचे ठसे कसेही फेटाळता येतात, आतले नाही."
"आता त्यांची बंदूक कुणी चोरली आणि खून करून फेकून दिली तरी आत त्यांचेच ठसे असणार ना."
"होय. खरं आहे पण ही आर्ग्युमेंट्स फक्त केसची लांबी वाढवतील. आणि विश्वास ठेवा, वर्तकसाहेब जास्तीत जास्त वेळ आत राहावेत अशी खूप मोठ्या लोकांची इच्छा आहे." कोल्हे आजूबाजूला एक नजर फिरवत म्हणाला.
"काय?" तिचा आवाज थरथरला.
"तुम्हाला काही माहित नाही असं दाखवू नका. वर्तक अन तुमचा भाऊ मिळून काय धंदे करायचे ते देखील पोलिसांना कळलंय."
"ते केवळ माझा भाऊ करत होता."
"त्याच्या अनेक व्हिक्टिम्सच्या विरूद्ध केसेस तुमच्या नवर्‍यानं लढल्यात."
ती एकदम गप्प बसली. मग हळू हळू बोलू लागली, "तुम्हाला नक्की काय हवंय?"
"मी तुमच्या नवर्‍याला जिवंत सोडवू शकतो. खोटं खोटं मरावं लागेल फक्त आणि मग देशाबाहेर जावं लागेल. ती सगळी व्यवस्था मी करेन, फक्त कुठे जायचं, तिथे कसं राहायचं हे सर्व तुम्हाला पहावं लागेल आणि हो.. माझी फी द्यावी लागेल" तो तितक्याच सहजपणे म्हणाला.
ती विचारात पडली.
"तुम्ही आरामात विचार करा. पुढली सुनावणी आठवडाभराने आहे. तोवर ऍज अ गुडविल जेस्चर, मी वर्तकसाहेबांना काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेईन. जितकं लवकर तुम्ही उत्तर कळवाल, तितक्या लवकर मला माझी पुढची पावलं ठरवता येतील."
"तुमची फी?"
त्यानं कागदाचा एक घडी घातलेला छोटासा तुकडा तिच्या दिशेनं सरकवला आणि उठून निघून गेला.

-----

"मंत्र्यांचा खुनी आणि बाकीचे कैदी हे सगळं काय गौडबंगाल आहे?" रमेश गाडी चालवणार्‍याला विचारत होता.
"रिलॅक्स. आता आपण जिथे जात आहोत, तिथे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील." गाडीचालक सफारी सुटात होता. पहिल्या नजरेतच मिलिटरी किंवा पोलिस ट्रेनिंग झालेला आणि नक्कीच कुठल्यातरी सुरक्षा दलामध्ये काम केलेला किंवा करत असलेला वाटत होता. त्याच्या शरीरावर नक्की किती हत्यारं कुठे कुठे असू शकतील ह्याचा अंदाज रमेश मनातल्या मनात बांधत होता.
"माझ्या उजव्या बुटामध्ये एक छोटी बंदूक, एक शोल्डर होल्स्टरची बंदूक आणि दुसर्‍या बुटामध्ये एक छोटा चाकू आहे." चालक रस्त्यावरची नजर न हटवता म्हणाला.
रमेश चमकला, पण तसं न दाखवता म्हणाला, "ह्म्म आणि ते पेन? तो रेकॉर्डर असावा."
"क्लोज. पण तो फक्त ट्रॅकर आहे आणि सिग्नल स्क्रँबलर, माझ्या आसपास २ फूटाच्या परिघातून केलेला कुठलाही कॉल टॅप किंवा ट्रेस होऊ शकत नाही."
रमेश गेल्या तीन दिवसांत जे जे पाहून आला होता, त्याहीपुढे हे सर्व जात चाललं होतं. त्यानं नक्की कशात उडी घेतली होती, हे अजूनही त्याच्या आकलनापलिकडे होतं. हा आगीशी खेळ त्याला कितपत महागात पडणार होता ह्याची त्याला कल्पना नव्हती.

-----

"तुला नक्की वाटतंय की हा प्लॅन यशस्वी होईल?" रेखा थोडीशी अस्वस्थ होती.
"होय. नक्की होईल. कारण ही अनिता रडारवरून गायब झाली होती दोन वर्षांपूर्वीच."
"म्हणजे?"
"म्हणजे ती नक्की कुठे गेली ह्याचा ठावठिकाणा कुणालाच लागला नाही. सगळ्यांना वाटत होतं की महातोच्या माणसांनीच तिला गायब केलं म्हणून. पण तसं नव्हतं."
"मग?"
"तिला नक्षलवाद्यांनी गायब केलं कारण ती त्यांच्यातलीच एक होती. ती एका प्लॅनचा भाग होती, वाघाच्या शिकारीसाठीची बकरी होती."
"हे सगळं तुला कसं माहित?"
नरेंद्रच्या डोळ्यांतले भाव झरझर बदलले, "काय फरक पडतो? तुला जेव्हढी माहिती आवश्यक आहे तेव्हढी ही इथे कागदावर आहे बघ."
"पण मग ती आता जिवंत आहे?"
"नाही. म्हणूनच आपण हे सोयीनं करू शकतोय."
"म्हणजे तिच्याशी महातोचं अफेयर झालं आणि मग महातोच्या सासर्‍यापासून हे लपवून ठेवायला तिच्यामार्फत महातोला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन होता राईट?"
"होय."
"पण मग केलं का नाही तसं?"
"ती महातोच्या प्रेमात पडली आणि ती महातोपासून गरोदरसुद्धा राहिली. त्यामुळे तिनं ब्लॅकमेल करायला नकार दिला. म्हणून मग तिलाच गायब केलं नक्षलवाद्यांनी."
"च्च" रेखाला एकदम वाईट वाटलं.
नरेंद्र शांतपणे तिच्याकडे पाहत होता.
"तुला अजिबात काहीच नाही वाटत?"
"आपण जे करतोय, ते सोडून मला बाकी कशाहीबद्दल काहीही वाटून घ्यायचं नाहीये. आणि तूही वाटून घेऊ नयेस अशी माझी इच्छा आहे."
"अरे इथे दोन जीव बरबाद..."
"हजारो-लाखो जीव रोज बरबाद होतात रेखा. आपल्याकडे प्रत्येकाबद्दल विचार करण्याइतका वेळ नाहीये." त्याचा आवाज थोडासा बदलला.
रेखा अविश्वासानं त्याच्याकडे पाहत राहिली.
"हा घे फोन. बोलून झालं की डिस्पोज ऑफ करायचाय."
तिनं फोन घेतला पण हा नरेंद्र तिच्यासाठी अगदीच अनोळखी होता.
"पण आपण जसं करतोय, तसं ब्लॅकमेल तिच्या आधीच्या सहकार्‍यांनी का नाही केलं."
"कारण आपल्याला एकदाच त्याला जाळ्यात ओढण्याइतपत ब्लॅकमेलं करायचंय. त्यांना लॉन्ग टर्म ब्लॅकमेल करायचं होतं." नरेंद्र आता वैतागला होता, "आता करशील का फोन?"

-----

"मिसेस क्षीरसागर, तुमचा नवरा ब्लॅकमेलर म्हणूनच ओळखला जाणार आहे, त्याला आपण काही नाही करू शकत." कोल्हे त्याच्या ट्रेडमार्क रोखलेल्या नजेरेनं पाहत म्हणाला.
"तुम्हाला म्हणायचंय काय एसीपी साहेब." तिचा बाप तिच्या खांद्यावर हात ठेवत थोडा रागानेच म्हणाला.
"मला एव्हढंच म्हणायचंय की सगळे पुरावे स्पष्ट निर्देश करतात की ह्यांचे पती हेच ब्लॅकमेलर होते आणि त्यांच्या अनेक व्हिक्टिम्सपैकी एकानंच त्यांचा खून केलाय."
"पण आम्ही सांगतोय ना की एक माणूस आमच्याकडे आला आणि आम्हाला तो सर्व डेटा देऊन गेला."
"ह्म्म आणि तुम्ही ह्या अनोळखी माणसाला घरात का घेतलंत ते सांगितलं नाहीत कुठेच.""
"तो.." दोन क्षण विचारांसाठी पॉज घेऊन तो पुढे म्हणाला, "प्रणवचा मित्र असल्याचं सांगत होता. ऍडव्होकेट वर्तकांना निर्दोष सोडवण्याचे काही पुरावे देतो म्हणाला."
"आणि तुम्ही विश्वास ठेवलात?" कोल्हे खिजवत म्हणाला.
त्यानं फक्त मान खाली घातली.
"एनीवे. तुम्ही दिलेलं त्या माणसाचं स्केच अतिशय जेनेरिक आहे. तो टॅटू सोडला तर काहीही अर्थ नाही. असो. मी हे सांगायला आलेलो की आता झालं ते झालं. ह्यातलं काहीही मी कुटुंबातल्या इतर कुणावर येऊ देणार नाही. आणि तुम्हालाही ह्या बदनामीपासून वाचायला नवीन ओळख, नवी जागा हवी असेल तर मी मदत करू शकेन." कोल्हे आजूबाजूस पाहत म्हणाला.
"त्यासाठी तुम्ही काय करणार?"
"मी तुमच्या आत्महत्येचं नाटक उभं करेन." कोल्हे क्षीरसागरच्या बायकोकडे अंगुलीनिर्देश करत म्हणाला, "आणि माझी माणसं तुमची नवी ओळख तयार करून देतील. कुठे जायचं, तिथे कसं राहायचं ते तुम्ही ठरवा."
"पण प्रणवचा खुनी?" ती म्हणाली.
"ह्म्म. आता बघा. तुम्हाला नक्की काय हवंय ते ठरवा. खुनी सापडायला कितीही वेळ लागू शकतो. तुमच्या नवर्‍यानं किती कांंडं केलीत त्यावरूनच तुम्हाला अंदाज बांधता येईल. आता खुनी महत्वाचा की मुलांचं भविष्य हे तुम्हीच ठरवा." एव्हढं बोलून तो उठला आणि एक कागदाची छोटीशी घडी त्यानं तिथे ठेवली, "ह्यात तुम्ही भविष्याला महत्व देत असाल तर काय करायचं ते लिहिलेलं आहे." आणि तो निघून गेला.
क्षीरसागरची बायको आणि तिचा बाप एकमेकांकडे आणि त्या कागदाकडे पाहत बराच वेळ बसून राहिले.

-----

"रमेश, तुला हवी असलेली सर्व माहिती ह्या फाईल्समध्ये आहे." रमेशनं कर्नलकडे एकदा निरखून पाहिलं. पन्नाशीचा गृहस्थ होता. बांधेसूद आणि मिलिटरी ट्रेनिंग स्पष्ट दिसत होतं. व्यवस्थित सूटाबुटांत होता. अर्धवट पांढरे केस मागे फिरवलेले होते. आता मिलिटरीत नसावा, पण तरीही ही गुप्त सरकारी कागदपत्र द्यायचं काम ह्याच्याकडे कसं हा विचार तो करत होता.
"मी आता सैन्यातून निवृत्त असलो तरी मंत्रालयाचा सुरक्षा सल्लागार आहे."
रमेश पुन्हा चमकला, "तुमच्यात समोरच्याचे विचार वाचण्याचंही ट्रेनिंग देतात वाटतं." रमेशनं माफक विनोद केला.
कर्नल हसले, "तुला ट्रेनिंगची गरज नाही असं माझं ठाम मत आहे. तुझ्याकडे सगळं आहे, तुला फक्त ते पाहायचंय. आणि ही केस तुला ते पाहायला मदत करेल."
"आणि हो, मला कर्नल म्हणत असले तरी मी कर्नल नव्हतो कधीच. ते माझं टोपणनाव आहे."
"ओह्ह." अजून एक गोष्ट कर्नलसाहेब, "बबन महाडिक..."
"ही इज डेड. यू मे गो नाऊ. मला अन्यही बरीच कामं आहेत." कर्नल तुटकपणे म्हणाले.
रमेश उठून बाहेर आला. 'बबन महाडिक मेलाय? मग आम्ही नक्की कशाचा पाठलाग करत होतो?' आता त्या फायलींचा अभ्यासच सगळे गोंधळ मिटवणार होता. पण कसे? त्यानं हे गोंधळ मिटवण्यासाठी स्वतःला भलत्याच चक्रव्यूहात ढकललेलं होतं.

-----

"आता पुढे काय? महातोकडून इन्फो काढायची कशी?" रेखाचे हात अजूनही थरथरत होते.
"हे काय, तुझे हात कशानं थरथरताहेत अजून?"
"आय ऍम सॉरी. मी तुझ्यासारखी अट्टल गुन्हेगार नाही." रेखा रागानंच म्हणाली आणि मग एकदम तिलाच वाईट वाटलं, "सॉरी रे. चुकलं माझं बोलायला. रागाच्या भरात.."
"एनीवे. आता मला त्याच्यासोबत दोन दिवस लागतील, तो आपल्याला सगळं काही व्यवस्थित सांगेल."
"आणि तुला एव्हढी खात्री.." आणि बोलतानाच ती थांबली, "ओह्ह.. तू आधी हे केलेलं असशील."
नरेंद्रनं फक्त तिच्या डोळ्यांत एकदा पाहिलं. आणि तो पुढे काही बोलणार एव्हढ्यात एका माणसानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. नरेंद्रनं चमकून मागे पाहिलं.
"ओळखलंस शंकर?" त्याचे डोळे खोल गेलेले होते, बर्‍याच दिवसांत आंघोळ किंवा दाढीही केलेली वाटत नव्हती. एक दुर्गंधी येत होती त्याच्यापासून. अंगावरचा सूट काही दिवसांपूर्वीपर्यंत नवा असावा.
नरेंद्र थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होता. एव्हाना त्या रेस्टॉरंटमधली एक-दोन टाळकी त्यांच्या दिशेनं पाहू लागली होती. नरेंद्र चटकन उठला आणि त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर घेऊन गेला. रेखाही मागोमाग बाहेर पडली. रेस्टॉरंटच्या मागच्या बाजूस छोटासा बोळ होता, तिथे ते तिघे पोचले.
"शंकर, तू माझा हात कसा काय धरलास?" त्या माणसाचा आवाज अतिशय खोल गेलेला होता.
"जावेद, काय बोलतोयस तू? दारू प्यायलायस काय? आणि काय ही स्थिती?" तो दारूचा वास येतोय का हे पाहत होता.
"आमचे लोक तुझ्या मागावर आहेत शंकर. तू शहरात आलायस हे त्यांना कळलंय." आणि तो चालायला लागला. नरेंद्रनं त्याचा हात पुन्हा धरला आणि त्याला थांबवलं.
"काय बोलतोयस तू? आणि तू मला कसं शोधलंस?"
"मी कुणालाही शोधू शकतो आता. मी मृत आहे शंकर." तो विचित्र आवाजात म्हणाला.
"काय?" रेखा जवळजवळ किंचाळलीच. नरेंद्रनं तिला शांत केलं.
"कुणी मारलं तुला?" नरेंद्रनं विचारलं.
"आमच्याच माणसांनी. पण ते सगळं सोड शंकर. निघून जा इथून लवकर. कारण तुझ्यावरही मेल्यावर माझ्यासारखीच भटकण्याची वेळ येईल हे निश्चित." असं म्हणून तो परत चालायला लागला. पण नरेंद्रनं त्याला थांबवलं नाही.
"शंकर कोण? आणि तो खरंच मेलेला होता? काय चाललंय सगळं?" रेखा भीतीनं थरथरत होती.
"तो मेलाय की जिवंत आहे ते महत्वाचं नाही. तो जे बोलला ते महत्वाचं आहे. जर खरंच त्याची माणसं आपल्या मागावर आहेत, तर आपण जितकं मोठं हे प्रकरण समजत होतो, त्याहून मोठं आहे."
"शंकर कोण? आणि त्याची माणसं कोण?"
"त्याची माणसं म्हणजे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना - आयएसआय. आणि शंकर म्हणजे मी." नरेंद्र हातावरचं घड्याळ पाहत म्हणाला.
"चल लवकर, महातो शुद्धीवर यायला फारसा वेळ शिल्लक नाही आणि जर आयएसआयवाल्यांना माहित असेल तर एव्हाना ते त्याला बाहेर काढायच्या प्रयत्नात असतील. आपल्याकडे दोन दिवसही नाहीत आता." नरेंद्र चालायला लागला.
"एक मिनिट थांब. तू त्याला अन तो तुला इतका चांगला कसा ओळखतो? तुझी मदत करायला तो का आला?"
नरेंद्र दोन क्षण घुटमळला.
"तू उत्तर दिल्याखेरीज मी इथून हलणार नाही." रेखाला आपण नक्की कशात फसलो आहोत हेच कळत नव्हतं.
".. कारण मी त्याच्याबरोबर काम केलं होतं. एकदा." नरेंद्र एक एक शब्द जपून बोलला.
"काय?" रेखाचा विश्वासच बसत नव्हता. ज्या माणसासोबत ती होती, त्याला ती कितपत ओळखते असा प्रश्न तिला पडला.
"रेखा प्लीज, ही वेळ नाहीये विचार करण्याची. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. मी तुला सगळं एक्सप्लेन करेन. देवाशप्पथ." तो बोलला आणि त्यानं जीभ चावली.
रेखा त्याच्याकडे पाहत राहिली. एकदा तिनं त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि म्हणाली, "हे शेवटचं. आता आपण जेव्हा थांबू, तेव्हा तू मला अथपासून इतिपर्यंत सर्व सांगायचंस. मी आजपर्यंत तुला जास्त काही विचारलं नाही कारण गरज वाटली नाही. पण आज, आत्ता तुझ्यावर विश्वास ठेवावा की नाही इथपर मी गोंधळलेय."
"आय डोन्ट ब्लेम यू. लेट्स गो." नरेंद्रनं अभावितपणे तिचा हात धरला आणि चालायला लागला. तिला थोडा धक्का बसला, कारण त्यानं आजवर कधी आपणहून तिचा हात असा हक्कानं धरला नव्हता.

क्रमशः