3/20/2012

एका सत्यकथेचा शेवट

राहुल द्रविडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळपास दोन आठवडे लोटलेत. जेव्हा त्यानं पत्रकार परिषद बोलावली, त्याक्षणीच त्याच्या निवृत्तीचे कयास मांडले जाऊ लागले आणि खूप विचित्र वाटू लागलं. मन सगळ्या इतर शक्यतांचा विचार करू लागलं. कदाचित एक शेवटची मालिका खेळून निवृत्ती घेण्याची घोषणा असेल असं स्वतःला समजावत होतो. कारण, द्रविडला स्टीव्ह वॉ सारखा ग्रँड समारोप मिळावा अशी माझी इच्छा होतीच. पण समारोप कशासाठी? इतकी कसली घाई? असले निरर्थक प्रश्नही पडत होते. पण मग निवृत्तीसाठी अशी अडनिडी वेळ का? हे ही कळत नव्हतं. पण मग त्यानं अत्यंत साधीसुधी निवृत्ती घेतली आणि सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलं. ऑस्ट्रेलियातली दुर्दैवी टेस्ट सिरीज संपल्यावरच त्याच्या निवृत्तीच्या बातम्या फिरू लागल्या होत्या, पण तेव्हा त्यानं त्या स्पष्ट शब्दांत नाकारल्या होत्या, ते का हे आता लक्षात येतं. कारण अख्खी वनडे मालिका शिल्लक होती आणि द्रविडसारख्या खेळाडूची निवृत्ती सहजपणे अख्ख्या ड्रेसिंगरूमला झाकोळून टाकू शकत होती. त्याचसाठी त्यानं ऑस्ट्रेलिया दौरा संपवून सगळे खेळाडू परत घरी येईपर्यंत वाट पाहिली आणि मग निवृत्ती जाहीर केली.
निवृत्ती काय त्याच्यासाठी सोपी असेल? आपण आपले इथे बसून मोठ्या गप्पा करतो, पण योग्य ठिकाणी थांबणं सगळ्यांनाच जमतं असं नाही.
"If you want a happy ending, that depends, of course, on where you stop your story."
असं ऑर्सन वेल्सचं एक वाक्य आहे. राहुल द्रविडची कथा अशीच आहे. त्यानं फुलस्टॉप जिथे दिलाय, तिथे तो त्याला हवा आहे. पण मला तो थोडा त्याआधी हवा वाटतो, इतर कुणाला अजून कुठेतरी हवासा वाटेल.
१९९६ मध्ये मला क्रिकेटची अक्कल फार होती अशातला भाग नाही, पण जबरदस्त वेड मात्र होतं. मी भारतीय संघाच्या हारजितीशी खूपच भावनात्मकरित्या जोडला गेलेला होतो. एरव्ही ज्याला बघून कबूतरही उडून जाणार नाही त्या वेंकटेश प्रसादनं ज्याक्षणी आमिर सोहेलला क्लीन बोल्ड केलं होतं, तो क्षण आजही अंगावर तितकंच रोमांच उभं करतो. प्रसाद त्यादिवशी अढळपदी जाऊन बसला. त्याआधी किंवा त्यानंतर त्यानं काहीही केलं तरी त्याच्या पुढच्या सात पिढ्या त्या एका क्षणावर मिशांना तूप लावून फिरतील, रादर त्यांना हक्क असेल. असो, मुद्दा तो नाही. तर प्रसादचा तो अविस्मरणीय चेंडूनंतर मला झालेला आनंद असो, किंवा श्रीलंकेकडून चारीमुंड्या चीत होताना इडन गार्डन्सवर झालेल्या प्रकारानंतर कांबळीसोबतच माझ्याही डोळ्यांतून आलेले अश्रू असोत, क्रिकेट नसांतून वाहत होतं. तो माझ्या अन क्रिकेटच्या प्रेमप्रकरणाचा सुरूवातीचा कालखंड होता. त्याच्याच आसपास गांगुली आणि द्रविडनं 'त्या' लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पण केलं. आणि शतकवीर गांगुलीपेक्षा थोडक्यात शतक हुकलेला कमनशिबी राहुल द्रविड मला जास्त जवळचा वाटला. त्याचा अतिशय शांत आणि सालस आविर्भाव की काय माहित नाही, पण काहीतरी वेगळं पाणी होतं. सामान्य कमनशिबी मध्यमवर्गीयाला जवळचं वाटेल असं बरंच काही त्याच्या पुढील १६ वर्षांच्या कारकीर्दीत पाहायला मिळणार होतं, ती इंग्लंडमधली सिरीज केवळ एक झलक होती.
राहुल द्रविडबद्दल एकंदर मतप्रवाह हा बराच नकारात्मक असण्याचा कालखंड होता. आणि माझ्यासारख्या मुंबईकरासाठी तर अजूनच. कारण तेव्हाच्या वर्तमानपत्रांतील स्तंभलेखकांच्या मते दक्षिण विभागाच्या निवड समिती सदस्याचा अमोल मुजुमदारशी छत्तीसचा आकडा होता, कारण अमोलनं त्याला काहीतरी असं करताना पाहिलेलं होतं, जे त्यानं पाहायला नको होतं. आणि केवळ ह्या वैमनस्यातून अमोलनं आयुष्य भारतीय संघाच्या दरवाज्यात बसून काढलं. आणि अमोलपुढे जायला मिळालेल्यांपैकी एक म्हणजे राहुल द्रविड होता, जो दक्षिण विभागाकडून खेळत असे. त्यामुळे समस्त मुंबईकरांच्या रोषाचं कारण अगदी पहिल्यापासूनच तो होता. त्यातच तेव्हा विनोद कांबळीची घसरण सुरू झाली आणि कांबळीच्या करियरच्या विझणार्‍या ज्योतीवर राहुल द्रविडच्या कारकीर्दीची मेणबत्ती पेटवली गेली, असा अजून एक मतप्रवाह मला स्पष्टपणे स्मरतो. राष्ट्रीय संघातल्या निवडीचं श्रेयही त्याला स्वतःला, त्याच्या खेळाला न मिळता खेळातल्या राजकारणाला मिळावं, ह्यापरता दैवदुर्विलास कोणता? आणि ह्याच वशिल्याच्या तट्टूनं पुढली १६ वर्षं राष्ट्रीय संघाचा भार वाहिला.
ती एक गोष्ट आहे ना, की एक मनुष्य स्वर्गात गेल्यावर देवला विचारतो, की माझ्या आयुष्याची जी पावलं वाळूत उमटली आहेत, त्यामध्ये नेहमी तू माझ्यासोबत होतास, म्हणून सगळीकडे पावलांच्या दोन जोड्या दिसतात, पण माझ्या वाईट काळात एकच जोडी दिसते. हे कसं काय? वाईट काळात तू कुठे होतास? तेव्हा देव हसून म्हणतो, ती जोडी माझ्या पावलांची आहे, मी तुला खांद्यावर घेऊन चालत होतो. द्रविड त्या देवासारखा कायम संघासोबत होता, वाईट काळात त्यानं संघाला खांद्यावर घेतलं, पण जगाला फक्त पावलांची एकच जोडी दिसली. ती पावलं माझी आहेत, हे सांगायची द्रविडला कधी गरज पडली नाही.
ऑफ कोर्स, कर्नाटकाकडून पर्यायाने दक्षिण विभागाकडून खेळण्याचा द्रविडला नक्कीच फायदा झाला, कारण पश्चिम विभागातल्या तीव्र स्पर्धेला त्याला सामोरं जावं लागलं नाही. पण ती काय त्याची निवड होती? तो लहानाचा मोठाच कर्नाटकात झाला. तो संघात निवडीची संधी मिळावी म्हणून बडोद्याकडून, बंगालकडून किंवा महाराष्ट्राकडून खेळला नाही. जसजशी दानं पडत गेली, त्यानुसार तो वाट चालत गेला. त्याच्यावर हळू खेळण्याबद्दल प्रचंड टीका झाली आणि त्याला वनडे संघातून वगळलं गेलं, तेव्हा मला किती वाईट वाटलं होतं हे आजही स्मरतं. लहानपणापासूनच मला सशापेक्षा कासव जास्त आवडतं आणि म्हणूनच संजय मांजरेकर आणि नंतर त्याचा वारसदार म्हणून द्रविड माझे फार आवडते. पण द्रविड इतका मोठा झाला की संजय काजवा वाटू लागला. पण द्रविडनं त्याच्या खेळावर काय अन किती मेहनत घेतली कळायला मार्ग नाही, पण तो जो परत आला तो राहण्यासाठीच. १९९९ च्या वर्ल्ड कपमध्ये तो टॉप स्कोअरर होता, हे त्याचे टीकाकार सोयीस्कररित्या विसरतात. त्यानं कात नव्हती टाकली, त्याला त्याचा खेळ बदलायची गरज नव्हती, त्यानं तो फक्त असा वळवला की त्याचा एकदिवसीय खेळात अडथळा न होता उपयोग होईल. तो तेव्हाही टेक्स्टबुक बॅटिंगच करत होता, फक्त त्यानं तिला कपडे वेगळे घातले होते. ग्राऊंड स्ट्रोक्स फील्डर्सकडे न जाता गॅप्समध्ये जात होते आणि एरियल स्ट्रोक्स फक्त अतिशय गरज असेल तेव्हाच तो डोळे मिटून मारत होता. स्वतःच्या पांढर्‍याशुभ्र कपड्यांवर स्लॉग स्ट्रोक्सचे डाग त्यानं पडू दिले कारण त्याला ठाऊक होतं की तेच त्याला आणि पर्यायानं संघाला पुढे घेऊन जाऊ शकतात.
२००३ च्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं विकेटकिपींग केली त्याची कारणं दोन होती. एक म्हणजे संघाला खरोखर गरज होती आणि दुसरं म्हणजे सर्व काही करूनही पुन्हा एकदा त्याच्यावर टेस्ट फलंदाज म्हणून शिक्के मारण्याची सुरूवात झालेली होती आणि अचानकच तथाकथित अष्टपैलूंचं पीक येऊ लागलं होतं. त्यामुळे यष्टिरक्षण करून द्रविड संघासाठी इन्डिस्पेन्सेबल झाला आणि गांगुलीचाही एका अतिरिक्त फलंदाजाचा प्रश्न सुटला. २००३ वर्ल्ड कपनंतर सर्व अष्टपैलूंच्या फुग्यांमधली हवा निघाली आणि द्रविडला पुन्हा एकदा अग्निपरीक्षा देण्याची गरज राहिली नाही. त्याबरोबरच त्यानं यष्टिरक्षकाचे ग्लोव्हज उतरवून ठेवले आणि गांगुलीच्या अपयशातून मार्ग काढण्यासाठी इतके दिवस त्याच्या सावलीसारखा फिरणार्‍या द्रविडच्या डोक्यावर निवड समितीनं कर्णधारपदाचा काटेरी मुकुट ठेवला.
त्यानं तो घेतला आणि ग्रेग चॅपलच्या बदनाम काळामध्ये संघाचं तारू हाकारायला सुरूवात केली. कारकीर्दीच्या प्रत्येक पडावावरच त्याच्या नशीबी उपेक्षा लिहिलेली होती. आधी तो मुजुमदारच्या ऐवजी वशिल्यानं संघात शिरलेला खेळाडू होता, नंतर कांबळी पुनरागमन करण्यासाठी रणजीमध्ये खोर्‍यानं रन ओढत असताना संघातली जागा अडवून बसलेला बोअरिंग खेळणारा टेस्ट फलंदाज होता, त्यानंतर तो सचिनच्या आधी बॅटिंगला येऊन वेळ खाणारा बॅट्समन होता आणि आता तो लोकप्रिय कर्णधाराला त्याच्याइतकाच इगो असणार्‍या कोचसोबत झालेल्या भांडणानंतर काढून टाकल्यावर रिप्लेस करणारा कर्णधार होता.
गांगुली कर्णधार असताना नागपूरला कसोटी सामन्याच्या वेळेस क्युरेटरनं हिरव्या खेळपट्टीवरून गवत काढण्यास नकार दिला (वास्तविक अशी विनंती करण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे यजमान कर्णधाराला अधिकार असतो), त्यामुळे चिडून गांगुली अनफिट झाला आणि ऐनवेळी द्रविडनं कर्णधारपद भूषवलं होतं. आणि तोच द्रविड गांगुलीच्या ऐवजी कर्णधार झाला (चॅपेलची चाटून कर्णधार झाला) म्हणून त्यानंतरच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यासाठी ईडन गार्डन्सच्या क्युरेटरनं मुद्दाम हिरवी खेळपट्टी दिली. द्रविड काही न बोलता खेळायला उतरला. भारतीय प्रेक्षक दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं आणि द्रविडच्या विरूद्ध घोषणा देत होते. तो सामना दक्षिण आफ्रिकेनं १० गडी राखून जिंकला. सामना संपल्यावर द्रविड एका शब्दानं काहीही वावगं बोलला नाही, पण दक्षिण आफ्रिकन मार्क बाऊचर म्हणाला, "आम्हाला आमच्या घरच्या मैदानावर सामना असल्यासारखं वाटत होतं." ईडन गार्डन्सवर झालेल्या अनेक अखिलाडू प्रसंगांपैकी हा प्रसंग मला खरोखर घृणास्पद वाटला होता. त्यापुढची मॅच वानखेडेवर होती, द्रविडनं ती मॅच एकहाती जिंकून दिल्यावर थोडासा भावूक होऊन प्रेक्षकांना दोनतीनदा बॅट फिरवून दाखवली आणि सामना संपल्यावर प्रेक्षकांचे खासकरून आभार मानले. २००७ वर्ल्ड कपपर्यंत संघात इतके भाग पडले होते की द्रविडसाठी सगळंच अवघड होऊन बसलं होतं. त्याच्या आवाक्यात होतं ते सगळं त्यानं केलं. दुफळी माजलेल्या संघाबरोबर आणि अतिशय इगोइस्टिक असलेल्या कोचसोबत त्यानं वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये टेस्ट मालिका जिंकून दाखवल्या. सलग यशस्वी पाठलागांचा रेकॉर्ड बनवला आणि कर्णधार असतानाचा त्याचा बॅटिंग ऍव्हरेज त्याच्या करिअर ऍव्हरेजपेक्षा जास्त होता, हे फार कमी लोकांना जमलं.
पण सर्वच गोष्टी जमणं अवघड असतं, त्याप्रमाणेच त्याला संघाला एकत्र ठेवणं जमलं नाही. दुफळी आणि बेशिस्तीनं कळस गाठला आणि भारत वर्ल्ड कपमधून पहिल्याच फेरीत गारद झाला. तो ही बांग्लादेशकडून हरून. पण बांग्लादेशचा तमिम इक्बाल ज्यानं त्या सामन्यात तुफान फलंदाजी करून भारताला बाहेर फेकलं होतं, तो त्यादिवशीची आठवण सांगतो. मॅच हरल्यानंतर द्रविड तमिमला भेटायला गेला आणि त्यानं त्याचं कौतुक केलं. त्याच्या फलंदाजीची तारीफ केली आणि काही टिप्स दिल्या. तमिम सांगतो की त्याचं आश्चर्र्य ओरसतच नव्हतं. द्रविडच्या खिलाडूवृत्तीनं आणि माणूसपणानं तो भारावून गेला होता. खेळाबद्दलचं सच्चं प्रेम म्हणजे काय असतं ह्याचं हे एक आदर्श उदाहरण ठरावं.
पण वर्ल्ड कपच्या फियास्कोनंतर एक गोष्ट चांगली झाली की निवड समितीनं तडकाफडकी द्रविडला काढलं नाही, त्याऐवजी त्यांनी द्रविडला एक तरूण टीम दिली. द्रविडनंही जवाबदारी घेतली आणि इंग्लंड टूरवर गेला. तिथे तो २८ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकला आणि मग त्यानं शरद पवारांना थेट आपला राजीनामा कळवला. ह्यामुळे निवड समिती अध्यक्षांचा इगो दुखावला गेला आणि त्यांनी त्यानंतर द्रविडचा वनडेमध्ये किती आणि कसा अपमान करता येईल ह्याची पुरेपूर काळजी घेतली. आणि नव्या कर्णधाराचा आधार होताच ह्या सर्वाला.
थोडक्या बॅड पॅचवर तो वनडे संघाबाहेर गेला. पण तो रणजी आणि दुलीपमध्ये दमदार द्विशतकं झळकावतच राहिला. आयपीएलमध्ये प्रशंसनीय कामगिरी झाल्यावर अचानकच चंँपियन्स ट्रॉफीच्या वेळेस सगळ्या इतरांचे बॅड पॅचेस सुरू असताना सर्वांना त्याची आठवण झाली. तो इमानदारीत खेळला आणि उत्तम सरासरीसकट खेळला. पाकिस्तानविरूद्ध हरलेल्या मॅचमध्ये त्याचे एकट्याचे ८७ नाबाद होते. पण ते पुरेसे नव्हते. कदाचित त्याच्यासाठी स्पेशल हाय स्टँडर्ड्स होते. तो पुन्हा बाहेर गेला आणि मग त्याला वर्ल्ड कप प्रॉबेबल ३० मध्येही जागा न देऊन त्याच्या अपमानाचा अजून एक अंक सादर झाला होता. शेवटचा अपमान अजून व्हायचा बाकी होता. वर्ल्ड कप विजेत्या संघात असण्याचा त्याला पूर्ण अधिकार होता पण तोही नाकारला गेला, पण अत्यंत अनडिझर्व्हिंग अशा कित्येक जणांना तो मान मिळाला.
टेस्टमध्ये त्याला हात लावण्याची कुणाची हिंमतही नव्हती कारण सेहवागच्या दोन ३०० धावांच्या इनिंग्जमधल्या सर्व इनिंग्ज सावरण्याचं काम त्याच्याशिवाय कुणी करत नाही हे सर्वज्ञात होतं. पण वनडेसाठी फ्रेम ऑफ रेफरन्स दुर्दैवानं कोणतीच नव्हती आणि धूर्त कर्णधार, इगो दुखावलेला निवड समिती अध्यक्ष आणि वाढतं वय ह्या गोष्टी त्याच्याविरूद्धच जात होत्या. पण गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौर्‍यावर चमत्कार झाला. द्रविडच्या निवृत्तीच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. आणि त्याच वेळेस इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळू लागली. फक्त भारताच्या अभेद्य भिंतीला तडा गेला नाही. तो एकटाच खेळपट्टीवर उभा राहून शतकामागे शतकं ठोकू लागला. हिरव्या आणि जलद खेळपट्ट्यांवर सगळं नवं रक्त पांढरं पडत होतं पण तंत्र आणि निष्ठा असल्या गोष्टींची मिंधी नसते. आयुष्यातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटीपासून ज्या 'लॉर्ड्सवरील शतकानं' त्याला हुलकावणी दिली ते शेवटी त्याच्या शेवटच्या इंग्लंड दौर्‍यावर लागलं आणि ब्रिटीशांनीही त्याला उठून उभं राहून मानवंदना दिली. द्रविडच्या नावाशिवाय लॉर्ड्सवरचा ऑनर बोर्डही अधुराच राहिला असता, त्याला पूर्णत्व मिळालं आणि द्रविडचा शेवटचा अपमान करायची संधी निवड समितीनं घेतली. दाणादाण उडालेल्या फलंदाजीमुळे द्रविडचं वनडेत पुनरागमन झालं. पण ते त्याला लागलं. आपल्याला गृहित धरलं गेलं ह्याचं त्याला किती वाईट वाटलं असावं. तो नाही म्हणू शकत होता, पण ते त्याला शोभलं नसतं. तो खेळला पण ती स्पर्धा संपताच वनडेतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा करून.
त्यानंतर जणू त्याचा पर्पल पॅच होता. घरी येऊनही त्याची शतकं थांबत नव्हती, म्हणूनच त्यानं ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जाऊनही ब्रॅडमन ओरेशनमधला पहिला नॉन ऑस्ट्रेलियन वक्ता ठरला आणि नुसतं तिथेच त्याचं वेगळेपण संपलं नाही तर त्याच्या त्या भाषणामध्ये त्याच्या अभ्यासू आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे इतके पैलू दिसले की लोकांची तोंड स्तुती करून थकत नव्हती. पण काहीतरी बिनसलं आणि पहिल्या डावात निर्दोष अर्धशतक करूनही अचानकच त्याचा खेळ ढासळला. तो पुढच्या प्रत्येक डावात थोडक्यात क्लीन बोल्ड झाला. तो काही त्याच्या कारकीर्दीचा शेवट नव्हता, तो त्यातनंही निश्चित बाहेर आला असता. पण कदाचित त्याच्यासाठी कथेचा शेवट तिथे होता. टीममधली राजकारणं, दुफळी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर कळसास पोचली होती. कदाचित आता हे सर्व पाहत स्वतःचा खेळही सांभाळण्याचे कष्ट घ्यावेत का हा प्रश्न त्याला पडला असावा. इतकी वर्षं सगळी राजकारणं, सगळे दुर्दैवी अंक आणि अर्थातच एक छोटंसं सुवर्णयुग पाहत तो खेळला. आणि नुसताच खेळला नाही, तर उपकर्णधार आणि कर्णधार ह्या पातळीवरून त्यानं ते सगळं काही जवळून पाहिलं, अनुभवलं. पण अजून एका परीक्षा द्यायची गरज त्याला वाटली नसावी. त्याची कारणं त्याच्याजवळ आहेतच आणि ती त्यानं कुणाला सांगायची गरज नाही.
मी फॅनबॉय नाही. मी चाहता अनेक व्यक्तिंचा आहे, पण वेडा मी फार कमी लोकांबद्दल आहे. अशी दोन माणसं म्हणजे मिथुनदा आणि राहुल द्रविड. "बाबा"च्या भिंतीतला बाबा मिथुनदा आहेत आणि भिंत म्हणजे राहुल द्रविड हे स्पष्टीकरण पुरेसं आहेच. मला कधी कुणाचे पोस्टर्स घरात लावावे वाटले नाहीत, फक्त राहुल द्रविडचा अपवाद वगळता. ह्या दोन माणसांबद्दल मी वेडा फॅनबॉय आहे, हे मला तेव्हा लक्षात आलं जेव्हा मी एका शनिवारी ऑफिसात असताना बाबांचा अचानक फोन आला, "राहुल द्रविड आलाय इथे, लवकर येऊ शकशील काय?"
माझ्या छातीत धडधडायला लागलं. माझे वडील रिटायरमेंटनंतर एका स्पोर्ट्स क्लबमध्ये मेंटेनन्सचं काम पाहतात. आणि तो क्लब माझ्या ऑफिसच्या समोर आहे. तिथे राहुल द्रविड एका प्रायोजकाच्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. मी चटकन तिथे गेलो. नशीबानं मी त्यादिवशी वडलांच्या क्लबचा एक टीशर्ट घातला होता. त्यामुळे मी जेव्हा द्रविडच्या दिशेनं चालत गेलो तेव्हा त्याला वाटलं मी क्लबचा माणूस आहे, त्यामुळे तो बसल्याजागी थोडासा पुढे झाला. माझ्या दैवताला असा समोर प्रत्यक्ष पाहून माझी बोलतीच बंद झाली होती. मी हात पुढे केला आणि त्यानं हात मिळवला. मी कृतकृत्य झालो होतो. त्यानं प्रश्नार्थक चेहरा केला.
"आय ऍम युअर बिग फॅन सर." माझ्या तोंडून जेमतेम शब्द निघाले.
"ओह्ह. ओके." तो थोडं हसून म्हणाला.
बस. मला अजून काही सुचलं नाही. जाताना किती काय काय विचार करून गेलेलो.
हरकत नव्हती. पुरेसं होतं देवदर्शन!
द्रविडच्या कारकीर्दीपासून आणि त्याच्या एकंदरच वर्तनापासून सर्वांनाच शिकण्यासारखं खूप काही आहे. मी जर काही शिकायचा प्रयत्न करतो तर ते हे की कुठल्याही स्थितीत टिकून राहायचं. तुमच्याकडे ते असामान्यत्व नसेल, पण तुमची टिकून राहण्याची, मेहनत करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती तुमचं असामान्यत्व बनू शकते. सचिन सुपरमॅन असेल तर द्रविड बॅटमॅन होता. त्याच्या शक्ती त्यानं स्वतः बनवल्या आणि त्यांवर काम केलं. आजही जेव्हा कधी अतिशय नैराश्य येतं तेव्हा मी द्रविडचा विचार करतो. आणि लढण्याची नाही तरी किमान टिकून राहण्याची प्रेरणा पुन्हा एकदा मिळते. टिकून राहणं महत्वाचं, योग्य चेंडूची वाट पाहत.
राहुल द्रविडला पुन्हा कधी भेटेन की नाही ठाऊक नाही. पण कधी भेटलोच तर अजिबात हक्क नसतानाही काही गुस्ताख प्रश्न विचारेन. एक म्हणजे निवृत्तीचा निर्णय नक्की कशामुळे. आणि दुसरा म्हणजे त्यादिवशी सचिन १९४ नाबाद असताना नक्की त्यानं डाव का घोषित केला. त्याचं एकंदर व्यक्तिमत्व पाहता, नक्कीच 'त्या' निर्णयामागेही काही पटण्यासारखं कारण असेल असा विश्वास वाटतो. पण महत्वाचं म्हणजे हे विचारेन की इतकं प्रचंड यश मिळूनही पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे तो आजच्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या होणार्‍या पोरांना शिकवेल का? आणि 'ज्यांना कधी संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी तरी मी चांगलं खेळलंच पाहिजे' इतका परिपक्व विचार नक्की आला कुठून?
द्रविडची कारकीर्द म्हणजे परीकथा नव्हती. एका सामान्य माणसाच्या असामान्यत्वाकडच्या वाटचालीची कथा होती. म्हणून ती सत्यकथा होती. त्याच्या निवृत्तीनं ती कथा संपली. सत्यकथांचा शेवट सर्वांना हवाहवासा किंवा अगदी सर्वांना अश्रूपाताकडे लोटणारा शोकांतही नसतो. तो वेगळाच असतो. खराखुरा. म्हणूनच ती सत्यकथा असते.

3/13/2012

मृत्युदाता - ८

भाग  -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६ आणि भाग -७ पासून पुढे


"अपहरण?" रेखाच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला, "काय बोलतोयस तू?"
"होय. अपहरण." नरेंद्रनं बॅगेतून स्टनगन ऊर्फ टेझर बाहेर काढला. "हे वापरून बरंच सोपं होईल."
"कुठून आणलंस हे? आणि ठेवणार कुठे आहेस महातोला? आणि महत्वाचं म्हणजे उचलणार कसं मुळात?"
"शांत हो आधी." नरेंद्र स्टनगन टेबलावर ठेवत म्हणाला, "सगळं सांगतो. आधी चटचट तयार हो. आपल्याला महातोच्या ऑफिसकडे जायचं आहे."
"आणि जेवणाचं?"
"रस्त्यात घेऊ काहीतरी. चल."
"आणि कपडे काय घालू?"
"आता काय समारंभाला चाललोय का आपण? कोव्हर्ट ऑपरेशनसाठी जे घालायचे तेच घाल."
"अरे म्हणजे तू मला डिस्ट्रॅक्शन म्हणून वापरणार आहेस का? म्हणून विचारलं."
"ओह्ह. राईट. पण आज आपण रात्रीच्या वेळेस फक्त पुरूषमंडळी असलेल्या ठिकाणी चाललो आहोत, त्यामुळे सुंदर स्त्रीचं डिस्ट्रॅक्शन योग्य नसतं. कारण त्यांना ती सुंदर स्त्री जास्तीत जास्त वेळ तिथेच राहावी असं वाटतं आणि मग त्यासाठी ते काहीही करू शकतात. मग तिचं परत निघणं रिस्की होऊन बसतं. म्हणून आज आपण बेवड्याचं डिस्ट्रॅक्शन घेऊ. नकोशा व्यक्तिंचं डिस्ट्रॅक्शन बेस्ट असतं, त्यांना घालवण्याचा सगळेच आटोकाट प्रयत्न करतात." असं म्हणत त्यानं एक शर्ट आणि पॅंट जमिनीवर टाकून मळवायला सुरूवात केली.
"आणि मी काय करायचं?"
"काहीही नाही. त्याऑफिसकडे व्यवस्थित लक्ष ठेवता येईल असा जवळच्याच एका बिल्डिंगमधला एक स्पॉट मी पाहून ठेवलाय. तिथे दुर्बिण घेऊन तू बसायचंस आणि मी तिथे धिंगाणा घालायला गेलो की त्यांचा सिक्युरिटी रिस्पॉन्स कसा होतो त्यावर लक्ष ठेव."
"पण जर त्यांना जराही संशय आला तर ते तुला पकडतीलच ना."
"इतकं सरळ नाहीय. ते आधी अंदाज घेतील की मी जेन्युईनली घोळ घालतोय का? आयडियल सिक्युरिटी टीम अशा वेळेस सर्व एक्झिट्स कव्हर करते आणि ते डिस्ट्रॅक्शन नाही ना हे चेक करते. आणि इतर कुठलाही धोका नाही ह्याची खात्री पटून ते निश्चिंत झाले की मग ते मला बाहेर काढतील. उगाच प्रिझनर्स घेण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो."
"मग आपल्याला नक्की काय हवंय?"
"त्यांचा सिक्युरिटी रिस्पॉन्स कसा होतो, ह्यावरून नक्की कुठल्या मजल्यावर किती महत्वाच्या गोष्टी आहेत ह्याचा अंदाज येतो. हवं असलं तर व्हिडिओशूटिंग करून ठेव संपूर्ण ऍक्टिव्हिटीचं."
"आणि त्याचा काय उपयोग?"
"पुढे कामाला येईल ही माहिती."

-----

"एसीपी विशाल कोल्हे रिपोर्टिंग सर." सिन्नरकरांनी वर पाहिलं.
"या. या. यू कम हायली रेकमेंडेड एसीपी." सिन्नरकर चेहर्‍यावरची रेषही हलू न देता म्हणाले.
"सर." कोल्हेनं हलकं स्मित दिलं.
"हे शहरात झालेले दोन हाय प्रोफाईल मर्डर्स आहेत." सिन्नरकर फाईल्स पुढे करत म्हणाले, "आम्ही केसेस उभ्या करू शकत नाहीये, त्यामुळे पित्रेसाहेबांनी तुम्हाला पाठवलं आहे." सिन्नरकरांच्या आवाजात खोच होती.
"आय विल डू माय बेस्ट सर." कोल्हेसाठी हे नवीन नव्हतं.
त्यानं फाईल्स उचलल्या.
"आत्तापर्यंत ह्या केसेसवर डीवायएसपी तिवारी काम करत होते. त्यांच्यासोबत तुमची मीटिंग ४ वाजता ठेवली आहे, इथेच माझ्या ऑफिसात. ते तुम्हाला ब्रीफ करतील आणि हँडओव्हरही. तोवर ह्या फाईल्स पाहून घ्या.. हवालदार तुम्हाला तुमचं ऑफिस दाखवतील."
कोल्हे सॅल्यूट मारून निघून गेला. सिन्नरकर खिडकीबाहेर हताशपणे पाहत होते.

-----

"आता काय?" रेखा सूपचा एक घोट घेत म्हणाली.
"आता काही नाही, उद्यापासून तीन दिवस आपल्याला महातोच्या दिनक्रमावर लक्ष ठेवायचं आहे. सहसा माणसं रूटीनची गुलाम असतात, त्याच्या रूटीनचा अभ्यास करूनच आपल्याला त्याचं अपहरण करण्याच्या प्लॅन बनवता येईल."
"आणि ह्या व्हिडिओटेपचं काय?"
"त्याचा अभ्यास तर करूच, पण सकाळी तो ऑफिसला यायच्या वेळेस आणि तो निघताना अशा दोन वेळेस ऑफिसची एकंदरित हालचाल टिपणे हे तुझं काम राहिल."
"आणि तू त्याचा पाठलाग करणार का?"
"मग अजून कोण करणार?"
"कमॉन, काहीतरी बोलायचं म्हणून बोलले."
"हो कळलं ते मला." तो सिरियस असला की त्याच्या चेहर्‍यावरची रेषही हलत नसे.
"आणि बाकी वेळ काय करायचं?"
"मला शहरामध्ये एक उत्तम जागा शोधायची आहे आणि तुला त्या कागदांवर लिहिलेला कोड सोडवता येतो का ते पाहायचं आहे."
"ह्म्म."
तो उठताना एकदम कळवळला.
"त्यांनी जोरात मारलं काय रे खूप?"
"कितीही सवय असली तरी मुका मार दुखतोच." तो हळूच म्हणाला आणि त्या चायनीजच्या गाडीवाल्याला पैसे दिले आणि चालायला लागला. ती कसल्याशा विचारात गढून सवयीनं त्याच्यामागे चालायला लागली.

-----

"साहेब, आपण तुमच्या घरी न बसता इथे हॉटेल बुक करून का अभ्यास करतोय ह्या पुस्तकाचा?" शिंदे पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पेरिमीटर चेकसाठी एक नजर टाकून म्हणाले.
"कारण माझं घरदेखील बग केलं गेलेलं आहे."
"काय? मग आता?"
"मग काय? असू देत की बग्ज, बग्ज असताना काय बोलायचं आणि काय नाही ह्याचा मला पूर्ण अंदाज आहे. म्हणूनच ह्या केसशी रिलेटेड कुठलीही गोष्ट मी घरी करत नाही."
"पण मग तुमच्यावर कुणाचातरी वॉचही असू शकतो."
"तितकी हिंमत नाहीये त्यांची, किंवा मी अजून तितका मोठा धोका झालेलो नाही. कारण अजूनतरी माझ्या सराईत नजरेला कुणी माझा पाठलाग करत असल्याचं जाणवलेलं नाहीये."
"पण कुणीतरी उच्च दर्जाचा प्रोफेशनल असला तर?"
"ह्म्म. बघू. इतकं पॅरानॉईड होणं मला परवडणारं नाहीय."
"ह्म्म ते ही आहेच. पण ह्या पुस्तकाचं काय पुढे?"
"काही कळेना झालंय मलाही. सगळ्या घड्या, सगळे मार्किंग्ज दहा दहा वेळा पाहिले. डॉ. कुर्लेकरांनाही दाखवलं. पण ते मार्किंग्ज आधी ज्यांनी पुस्तक घेतलं असेल, त्यांच्यापैकीही कुणी केलेले असतील. काहीच कळायला मार्ग नाही. वेड्यासारखं ह्यामध्ये क्ल्यू शोधण्यात वेळ दवडणं मला ठीक वाटत नाहीये."
"मग?"
"आता आपल्यासाठी पुढचा रस्त खुद्द खुनीच दाखवेल." रमेश डोक्यात काही गोष्टी पक्क्या करत म्हणाला.
"ते कसे?"
"ह्या पुस्तकावर सखोल चर्चा आज रात्री आपण माझ्या घरी करूयात." रमेश डोळे मिचकावत म्हणाला.
"पण ह्या पुस्तकात प्रत्यक्षात काही क्ल्यू नसलाच तर?"
"कसंही असलं तरी खुन्याला ते माहित असणं अशक्य आहे. त्याला काळजी घ्यावीच लागेल."
"पण हे धोकादायक नाही वाटत? कारण कव्हरअपसाठी पोलीस ऑफिसरचं घर बग करण्यापर्यंत ज्यांची मजल गेलीय, ते लोक किती पॉवरफुल असतील, ह्याची कल्पनाच केलेली बरी."
"धोकादायक आहेच आणि म्हणूनच तुम्ही माझ्या घरी येणार नाही आहात. मी तुमच्याशी फोनवर चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेसाठी तुम्हाला मी एक फोन देईन, तो चर्चा संपल्यावर लगेच डिस्पोज ऑफ करून टाकायचा."
"साहेब.."
"आय अंडरस्टँड शिंदे. पण तुमचं कुटुंब आहे, जवाबदार्‍या आहेत."
शिंदे काही बोलले नाहीत.
"चला आता निघायला हवं, जाता जाता तुम्ही एक नजर काळेंच्या घरावरून टाकून जा आणि मी एक नजर राजेंच्या घरावरून टाकून जातो."

-----

"एनी लक?" नरेंद्र अंगावरचा कोट उतरवत म्हणाला.
"तुला तो कोट घालूनच बाहेर जावं लागतं का रे?"
"फाईव्ह स्टार हॉटेल्सचा व्यवस्थित अभ्यास करायचा म्हणजे व्यवस्थितच राहावं लागतं."
"फाईव्ह स्टार हॉटेल? पण तू त्याला होस्टेज ठेवण्यासाठी जागा शोधत होतास ना?"
"यप्प! आपण त्याला हॉटेल ट्युलिप ग्रूव्हमध्ये होस्टेज ठेवणार आहोत. बेस्ट सिक्युरिटी सिस्टम्स आणि सॉफ्टवेअरवर कमी डिपेन्डन्सी म्हणजे माझ्यादृष्टीनं व्हल्नरेबल, पण कुठल्याही इतर सिक्युरिटी ग्रुप्ससाठी टफ."
"आर यू इन्सेन?"
"अजिबात नाही. सगळा अभ्यास यथास्थित झालाय."
"पण मग त्याला आत नेणार कसं?"
"न्यायची गरज नाही, तो स्वतः येईल आत."
"आणि ते कसं?"
"त्यासाठी आपल्याला तुझी मदत लागेल."
"पुन्हा तेच?" ती वैतागून म्हणाली.
"नाही, ह्यावेळेस फक्त काही फोन कॉल्स."
"??" तिच्या चेहर्‍यावरची अनेक प्रश्नचिह्न त्याला दिसली आणि तो फक्त हलकंसं हसला.
"ते सगळं आपण नंतर बघू सविस्तर. आधी तुला त्या कागदपत्रांचा काही अर्थ लागला का ते सांग."
"वैताग आहे तो. पण सांग ना आपण त्याला उचलत का नाही आहोत थेट?"
"कारण तू त्याची सिक्युरिटी सिस्टम तीन दिवसांपूर्वी पाहिली आहेस."
"हो पण तू तर कॉन्फिडन्ट होतास एकदम."
"होय. पण तो रूटीन फॉलो करणारा माणूस नाहीये. त्याला असलेल्या धोक्यांची संपूर्ण कल्पना आहे, म्हणून तो रँडमली दिवसाचं रूटीन ठरवतो. त्याचे सिक्युरिटी गार्ड्स उत्तम ट्रेन्ड आहेत. मीसुद्धा एकदा त्यांच्यातल्या एकाच्या नजरेस पडता पडता वाचलो."
"का, तू काय मोठा तीसमारखाँ आहेस?"
"ते जाऊ दे. तर तो किडनॅपिंग आणि प्राणघातकी हल्ला ह्यांपासून वाचण्याची पूर्ण काळजी घेतो. आणि त्याची सिक्युरिटी खुद्द त्याच्या बायकोचा बाप पाहतो."
"काय?"
"होय. तो एका हॉटशॉट पॉलिटिशियनचा जावई आहे."
"कपाळ माझं. कसं करणार आहोत हे आपण?"
"एक्झॅक्टली हेच आपण आपल्या फायद्याकरता वापरणार आहोत." बोलताना नरेंद्रचे डोळे चमकत होते, "एव्हरीथिंग इज प्लॅन्ड."
"ह्म्म." तिनं हातातले कागद खाली ठेवले आणि पंखा लावायला उठली.
"कागदांची काही प्रोग्रेस?" त्यानं परत विचारलं.
"असती तर मी अजूनपर्यंत बोलले नसते?" ती थोडीशी वैतागली होती.

-----

"साहेब, तिवारींनी केलेलं ब्रीफिंग वगैरे ठीक आहे. पण मी स्वतंत्रपणे काम करतो हे तुम्हाला ठाऊक असेलच. त्यामुळे मला कुणीही मदतीला नकोय." कोल्हे मीटिंगनंतर सिन्नरकरांशी बोलत होता.
"होय, तुमच्या सर्व गरजा थेट पित्रेसाहेंबाकडूनच माझ्यापर्यंत पोचल्या आहेत." सिन्नरकर तुटकपणे म्हणाले.
"ठीक तर मग. उद्यापासून मी माझ्या पद्धतीने तपास सुरू करेन. पहिल्या मर्डर सस्पेक्टची कस्टडी एक्स्टेंड करण्यासाठी प्रोसिजर सुरू करेन, त्यावर मला तुमची सही लागेल. आणि दुसर्‍या केससाठी मला काही सर्च वॉरंट्स लागतील. पेपरवर्क मी तुमच्याकडे पाठवून देईन." कोल्हेचं सगळं वागणंच अतिशय आत्मविश्वासपूर्ण होतं.
"बरं."
कोल्हे सॅल्यूट मारून निघून गेला. आणि सिन्नरकर पुढे उद्भवणार्‍या धर्मसंकटांना कसं सामोरं जायचं ह्या विचारांमध्ये गढून गेले.

-----

शिंदे आणि रमेशचं शेवटचं बोलणं झाल्याला तीन दिवस उलटले होते. रमेशची सिक लीव्हही त्यादिवशी संपत होती. रमेशचा कुठेही काहीही पत्ता नव्हता. घरचा फोन कुणी उचलत नव्हतं आणि मोबाईल स्विच्ड ऑफ होता. शिंदे रमेशच्या घरीही तीनचारदा जाऊन आले होते. त्यादिवशी मात्र त्यांचा पेशन्स संपला. त्यांनी मोबाईल कंपनीला रमेशचं सिमकार्ड ट्रेस करायला सांगितलं आणि सुपिरियरला रिपोर्ट करायला म्हणून ते गेले, तर रमेश तिथेच बसला होता.
"सॉरी शिंदे, मी आधी साहेबांना भेटायचं म्हणून इथे आलो." रमेशला शिंदेंचा चेहरा पाहताक्षणी त्यांची घालमेल लक्षात आली.
"येस शिंदे?" डीसीपी तवटेंनी शिंदेंना विचारलं.
"काही नाही सर, साहेबांचा पत्ता लागत नव्हता तीन दिवस झाले तरी, आणि फोनही लागत नव्हता. म्हणून फोन कंपनीला सिमकार्ड ट्रेस करायला सांगितलं, ते तुम्हाला रिपोर्ट करायलाच इथे आलो होतो."
"काय? अहो शिंदे रमेशची लीव्ह आज संपतेय. त्याला लीव्हमध्ये तरी स्वस्थ बसू देणार का? आधी तो ट्रेस मागे घ्या बरं."
"असू दे साहेब. त्यांना काही मोठं काम पडत नाही. घेतील मागे नंतर." रमेशनं रदबदली करायचा प्रयत्न केला.
"बरं एनी वे शिंदे. उद्यापासून तुम्हाला इन्स्पेक्टर दिवेकरांना रिपोर्ट करायचं आहे."
"कोण इन्स्पेक्टर दिवेकर?" शिंदेंना आश्चर्याचा धक्काच बसला.
"आपल्या स्टेशनातले नवे इन्स्पेक्टर."
"का? आणि साहेब?" शिंदेंना काही समजेनासं झालं होतं.
"साहेब आता मोठे साहेब झालेत." तवटे हसत हसत म्हणाले, "रमेश हॅज बीन टेकन इन बाय सीबीआय. आता तो तुरूंगातनं पळालेल्या चार कैद्यांची केस पाहणार आहे."
शिंदेंना काही बोलायचं सुचलंच नाही, ते केवळ रमेशकडे पाहत राहिले. रमेश नजरेनंच त्यांना काही सांगू पाहत होता.

क्रमशः

3/05/2012

मृत्युदाता -७

भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५ आणि भाग -६ पासून पुढे


"जेव्हा सुरूवातीला इथे पोलीस आले तेव्हा मला त्यांना सर्व सांगावंसं वाटलं, पण त्यांचा ऍप्रोच आणि त्यांचे प्रश्न ऐकून माझी खात्री पटली की त्यांना केस बंद करण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा ते इथलीच झडती घेत होते." डॉ. काळेंची पत्नी बोलत होती.
"कोण होतं? नाव आठवतंय तुम्हाला?"
"हो, कसं विसरेन मी. एसीपी विशाल कोल्हे."
"ह्म्म." रमेशला कोल्हेचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड ठाऊक होता. "काय काय केलं त्यांनी नक्की."
"सगळ्या घराची झडती घेतली आणि ह्यांचा लॅपटॉप घेऊन गेले."
"डॉक्टर अलिकडे कशामुळे चिंताग्रस्त वगैरे होते का?"
"होय, हेच तेलीही विचारत होता पण मी सांगितलं नाही काहीच."
"नक्की काय काय नाही सांगितलंत तुम्ही?"
"हेच की नुकतेच एका ऑटॉप्सीमुळे ते चिंताग्रस्त होते. राजे म्हणून कुणीतरी."
"त्याचं काय?" रमेश एकदम कानात प्राण आणून ऐकू लागला.
"ह्यांना त्या केसमध्ये काहीतरी फाऊल प्ले वाटत होता बहुतेक. एकदा काहीतरी अर्धवट म्हणाले, पण ते सहसा कामावरच्या गोष्टी घरी बोलत नसत, त्यामुळे मीही जास्त खोदून विचारलं नाही. पण मग ते राजेंच्या घरी एकदा जातो म्हणाले."
"मग गेले की नाही?"
"कल्पना नाही."
रमेश विचारात पडला.
"त्यांचा ऍक्सिडेंट कुठल्या रस्त्यावर झाला?" रमेशनं विचारलं.
"अंधेरी वीरा-देसाई रोड."
रमेशनं डोक्यात कॅलक्युलेशन्स केली. "परफेक्ट!" तो एकदम म्हणाला.
"काय?"
"ते बोरिवलीच्या दिशेनं येत होते की सांताक्रूझच्या?"
"बोरिवलीच्या, पण का?"
"ते राजेंच्या घरूनच परत येत होते." रमेश म्हणाला.
"पण ह्याचा काय अर्थ."
"ह्याचा अर्थ हा की राजेंच्या घरावर कुणाचीतरी पाळत होती. आणि डॉक्टर त्यांच्या घरी गेल्यामुळे डॉक्टर रडारवर आले. आणि त्यांना लगेच मार्गातून हटवलं गेलं." रमेश बोलून गेला, पण मग आपण कुठे बसलो आहोत ह्याचं त्याला भान आलं आणि तो चटकन थांबला.
तिचे डोळे पाण्यानं डबडबले होते. आणि तिच्या मांडीवरचं पिल्लू एकदा तिच्याकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहत होतं.
"आय ऍम सॉरी मिसेस काळे" तो जेमतेम म्हणाला.
"इट्स ओके." ती डोळे पुसत म्हणाली, "तुम्ही जर त्यांच्या खुन्यांना शोधणार असाल तर मी काहीही मदत करायला तयार आहे. फक्त पुन्हा इथे येऊ नका, कारण जर त्यांची इथेही नजर असेल तर.." आणि तिनं वैभवीच्या डोक्यावरून हात फिरवला.
"अं.. हो.." रमेशच्या एकदमच त्यानं केव्हढी मोठी चूक केली होती हे लक्षात आलं. त्याच्या ऑब्सेशनमध्ये त्यानं एका छोट्याशा पोरीचा जीव धोक्यात घातला होता.
"माझा नंबर लिहून घ्या आणि कधीही कॉल करा." ती म्हणाली.
"ओके." तो नंबर लिहून घेत म्हणाला. "मी कॉल करीन." त्यानं नंबरखाली 'मिसेस काळे' असं लिहिलं.
"भैरवी."
"काय?"
"मिसेस भैरवी काळे नाव आहे माझं."
"ओह्ह." त्यानं कागदावर करेक्शन केलं.
तो उठून उभा राहिला आणि त्यानं पुन्हा एकदा हॉलवरून नजर फिरवली.
"तुम्ही आत्ता आलाच आहात, तर तुम्हालाही एकदा झडती घ्यायची असली घराची, तर घेऊ शकता." ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली.
"त्याची गरज नाही. कोल्हे जे काही करतात, त्यात निष्णात आहेत."


-----


नरेंद्र आणि रेखा गुवाहाटीतल्या फेमस पान बझार भागातून चालले होते. नरेंद्र कधीकाळी तिथे येऊन गेल्यासारखा इथे तिथे पाहत चालला होता.
"नरेंद्र."
तिच्या बोलण्यानं त्याची तंद्री भंग पावली. "हं."
"आपण इथे का फिरतोय?" ती उन्हामुळे कंटाळली होती.
"काही नाही, सहज, हा गुवाहाटीतला फेमस एरिया आहे, म्हणून म्हटलं तुला जरा दाखवावा. चल इथे छानपैकी रेस्टॉरंट आहे, जेवून घेऊ, तुला भूक लागली असेल."
"तू मला इथे साईटसिईंगला आणलंयस का?"
"कमॉन, मी एरव्ही खूप कोरडा वागतो म्हणून तक्रार करत असतेस तू."
"हं. पण आत्ताही काही फार वेगळा वागत नाहीयेस." तिनं थोडंसं रागानंच म्हटलं. तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता.
"हाहाहा." त्याला हसू फुटलं.
"काय झालं?" ती अजूनच रागावली.
"काही नाही. जेवून घे बरं तू, त्याशिवाय तुझा राग उतरायचा नाही."



रेस्टॉरंटमध्ये शिरता शिरता त्यानं '.बी. महातो ऍन्ड असोसिएट्स' ही पाटी आणि इमारतीचा परीघ नीट पाहून घेतला. 'दुपारी पुन्हा एकदा आढावा घ्यावा लागेल म्हणजे रात्री कामास लागता येईल' असा मनाशी आडाखा बांधत तो टेबल शोधू लागला.


-----


रमेशनं इमारतीवर एक नजर फिरवली. मोठ्या कॉम्प्लेक्समधली एक इमारत. शेजारी ३-४ इमारती, म्हणजे पाळत ठेवण्यासाठी शेकडो मार्ग. तो तिथे आल्याचं एव्हाना रजिस्टर झालंच असणार. पण फरक पडत नव्हता. त्यानं बाईक स्टँडवर लावली आणि बेफिकीरपणे पावलं टाकत इमारतीत शिरला. पत्रपेट्यांच्या ओळीवर एक नजर टाकली. राजेंच्या पत्रपेटीच्या कुलूपाशी कुणीतरी झटापट केल्याचं दिसत होतं आणि ती पत्रपेटी रिकामी होती. तो जिन्यानं वर गेला.



"नमस्कार. मी इन्स्पेक्टर रमेश." रमेशनं दरवाजा उघडणार्‍या मध्यमवयीन स्त्रीला आपलं आयकार्ड दाखवलं.
"या." रडून सुजलेल्या डोळ्यांवरून ती स्त्री बहुतेक राजेंची पत्नी असावी असा रमेशनं अंदाज बांधला. "बसा, मी पाणी आणते." म्हणून त्या आत गेल्या.
रमेशनं हॉलवरून नजर फिरवली आणि समोरच्याच फोटोवरून ती स्त्री श्रीमती राजे असल्याचं स्पष्ट झालं. रमेशनं खिशातून एक उपकरण काढलं आणि सुरू केलं, त्याबरोबर ते वाजू लागलं.
"हे तुमच्याबद्दल गेले काही दिवस बरंच काही सांगायचे." राजेंच्या पत्नी बाहेर आल्या आणि त्यांना काय चालू आहे कळेना. रमेशनं त्यांना शांत राहण्याची खूण केली आणि एकेक करून तो एलेक्ट्रिक सॉकेट्स चेक करू लागला.
"राजेंसोबत थोडे दिवस काम केलं मी वहिनी. त्यांच्यासारखा सिनियर मी आजवर पाहिला नाही. इट वॉज ऍन ऑनर टू वर्क विथ हिम." रमेश एकीकडे बोलता बोलता आता रिमोट कंट्रोल्स शोधू लागला. त्याला समोरच पडलेली एक पोलिस बेनिफिट समारंभाची सीडी दिसली. "ह्या समारंभाला ते मला भेटले होते. ही ती सीडी." असं म्हणून त्यानं सीडी लावली आणि आवाज अतिशय मोठा केला. मग तो श्रीमती राजेंच्या अगदी जवळ गेला आणि हळू आवाजात त्यांना म्हणाला, "तुमच्या घरामध्ये छुपे मायक्रोफोन्स लावलेले आहेत."
"काय?" त्यांचा आवाज एकदम वाढला. रमेशनं त्यांना हळू बोलण्याची खूण केली.
"होय. पोलीस तपासाला कोण आलं होतं?"
"एसीपी विशाल कोल्हे."
"ह्म्म." रमेशनं स्वतःशीच मान डोलावली.
"म्हणजे पोलिसांनीच.."
"नक्की सांगता येत नाही." रमेशनं काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. "पण तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला किंवा तुमच्या घरच्या अजून कुणालाही धोका नाही." हे तो बोलला आणि एकदम त्याला शरम वाटली. "आय ऍम सॉरी. माझा तो अर्थ नव्हता, पण खरंच आता ते फक्त राजेंच्या खुन्यापर्यंत कुणी पोहोचू नये म्हणूनच प्रयत्न करताहेत."
"खुनी? पण त्यांना तर हार्ट ऍटॅक आला होता."
"होय. हार्ट ऍटॅक आला होता, पण तो नॅचरल नव्हता. काहीतरी गडबड केली गेली होती. आणि ती काय आहे, तेच मी शोधायचा प्रयत्न करतोय."
"पण मग नक्की काय.."
"डॉ. काळे काय विचारत होते?"
"ते तुम्हाला भेटले नाहीत का?"
"ही इज डेड." रमेश बोलला आणि त्यानं जीभ चावली. "घाबरू नका वहिनी. आय नो, ह्या शब्दांना अर्थ नाही. पण खरंच तुमच्या जीवाला धोका नाहीये. मला सगळं नीट आठवून सांगा."
"त्यांनी ह्यांना काय काय विकार होते आणि हे कुठली औषधं घेत होते म्हणून विचारलं?"
"मग?"
"ह्यांना फक्त डायबिटीस होता आणि त्यांची तीच औषधं सुरू होती."
"औषधं कुठे आहेत?"
"पोलीस घेऊन गेले तपासासाठी."
"आणि प्रिस्क्रिप्शन देणारे डॉक्टर कोण?"
"डॉ. केदार. मी त्यांचं कार्ड देते तुम्हाला."
रमेशची नजर हॉलभर फिरत होती. 'राजेंच्या मृत्युला पाच दिवस उलटलेत आणि अजूनही ट्रान्समिटर्स सुरू आहे, म्हणजे घरातलाच पॉवर सोर्स वापरला आहे. पण कुठे?' असं स्वतःशीच तो म्हणत असताना त्याची नजर कोपर्‍यातल्या मोठ्या स्पीकर्सवर गेली. त्यानं ते सरकवले आणि मागे पॉवर केबलला जोडलेला छोटासा मायक्रोफोन त्याच्या नजरेस पडला.
मायक्रोफोन बघून श्रीमती राजे अजूनच गांगरल्या. "हे सगळं काय चाललंय माझ्या घरात?" म्हणून त्या सोफ्यावर बसल्या.
रमेश त्यांच्या शेजारी बसला आणि थोडा वेळ तसाच बसून राहिला. मग हळू हळू एक एक शब्द म्हणाला, "राजे वॉज अ व्हेरी ब्रेव्ह मॅन. त्यांनी काही खूप पॉवरफुल लोकांना एक्सपोज करायचा प्रयत्न केला. फार मोठ्या फोर्सपुढे एकटे उभे ठाकले. त्यामुळे हे सर्व घडलंय आणि आता सारवासारव सुरू आहे त्यामुळे थोडा त्रास होणार. पण तुम्हाला ह्या सर्वावर मात करायलाच हवी वहिनी. आणि आय ऍम शुअर तुम्ही निश्चितच कराल." हौसलाअफजाई हे रमेशचं डिपार्टमेंट कधीच नव्हतं, त्यामुळे त्याला स्वतःचंच नवल वाटत होतं.
"पण मग हे पॉवरफुल लोक कोण आहेत?" श्रीमती राजेंनी रमेशकडे पाहत म्हटलं. त्यांचे डोळे विलक्षण सुन्न वाटत होते.
"तेच मी शोधायचा प्रयत्न करतोय."
"पण मग तुमच्याही जीवाला धोका.."
"असाच विचार राजेंनाही करता आला असता, पण त्यांनी नाही केला. आता मी तसा विचार करून त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही." रमेशला अशा सिच्युएशन्समध्ये कसं वागायचं ते मृत व्यक्तिंच्या नातेवाईकांना भेटून थोडंफार माहित होतं, पण काय बोलायचं हे मात्र जमत नसे, त्यामुळे तो फार पुस्तकी बोलत असे.
"हे घ्या कार्ड डॉक्टरांचं."
"ओके."
मग त्यानं घरभर बग स्वीपर फिरवला आणि झडती घेतली. पण मायक्रोफोन फक्त हॉलमध्येच होता.
"आणि हो. अजून एक .. डॉ. काळे मला विचारत होते की ह्यांना पाठीचं काही दुखणं होतं का म्हणून. आणि त्यावर ते काही औषधं घ्यायचे का म्हणून."
"मग?"
"नाही. ह्यांना पाठीचं कसलंही दुखणं नव्हतं."
"ह्म्म." रमेश स्वतःशीच सगळे तुकडे जुळवायचा प्रयत्न करत होता.



"फक्त एव्हढीच काळजी घ्या की हॉलमध्ये विचारपूर्वक बोला. बाकी घरभर काळजी नाही. आणि कुणीही आलं किंवा काही झालं तर मला फोन करा." रमेशनं आपलं कार्ड त्यांना दिलं. "आणि हो. आजपासून तीन-चार दिवसांनी, तो मायक्रोफोन काढा आणि कचर्‍यात फेकून द्या." असं म्हणून रमेशनं सीडी प्लेयर बंद केला आणि तो घराबाहेर पडला.


-----


नरेंद्र खिडकीतून बाहेर पाहत होता. त्यानं इमारतीचे सगळे एन्ट्रन्स दिसतील अशीच खोली निवडली होती. तो त्याच्या खोलीपर्यंत पोचणारे सगळे मार्ग पुन्हा एकदा नीट पाहून घेत होता.
"नरेंद्र, तुला मला काही सांगायचंय?" रेखा ओट्याजवळून म्हणाली.
"अं" तो खिडकीपासून दूर झाला. "नाही. पण तू आत्ता कसला स्वयंपाक करते आहेस? मी बाहेरून जेवण आणेन म्हटलं होतं ना तुला?"
"ही खोली तुला कशी मिळाली?"
"कशी मिळाली म्हणजे?" तो उसनं हसत म्हणाला, "हे हॉटेल आहे आणि आपण इथे खोली बुक केलीय."
"मला नक्की काय समजतोस तू?"
"म्हणजे?" त्याला काही उमजेनासं झालं होतं.
"मी पहिल्या दिवसापासून तुला संपूर्ण साथ दिली आहे. आणि प्रत्येक काम मी स्वेच्छेनं केलंय. आणि जे आपण करतोय, त्यात तुझ्याएव्हढीच किंबहुना तुझ्याहून जास्तच माझी गुंतवणूक आहे."
"हो मग?"
"मग तू मला अंधारात का ठेवतो आहेस?" ती नरेंद्रकडे रोखून पाहत म्हणाली.
नरेंद्रनं तिच्या नजरेला नजर दिली नाही.
"माझ्याकडे बघ." तिचा आवाज चढला होता. "डोन्ट ट्राय टू प्रोटेक्ट मी."
"मी तुला प्रोटेक्ट करत नाहीये." नरेंद्र जमेल तेव्हढ्या ताकदीनं बोलला.
"मग काय करतोयस?"
"मी फक्त एव्हढाच प्रयत्न करतोय की तुला.."
"प्लॉझिबल डिनायेबिलीटी राहावी?"
"होय."
"कशासाठी?"
"कारण.."
"काय कारण?"
"कारण हे सगळं संपल्यावरही तुझ्यासाठी एक आयुष्य राहावं अशी माझी इच्छा आहे." नरेंद्र शक्तिपात झाल्यासारखा मटकन खाली बसला.
रेखा त्याच्याकडे अविश्वासानं पाहत राहिली. मग ती त्याच्याशेजारी जाऊन बसली.
"मी तुला भेटले, त्याआधीच कितीतरी दिवस माझं आयुष्य संपलं होतं." ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली.
नरेंद्रनं फक्त तिच्याकडे पाहिलं. तिनं त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि ती क्षणभर थोडीशी शहारली.
"काय झालं?" नरेंद्रला तिची अस्वस्थता जाणवली.
"काही नाही." ती उठू लागली.
नरेंद्रनं तिचा हात धरला. "काय झालं ते सांग."
तिनं दोन क्षणाचा पॉज घेतला, "तुला भेटल्यापासून पहिल्यांदाच तुझे डोळे मला वाचता आले नाहीत." त्याच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिह्न पाहून ती चटकन पुढे म्हणाली, "आय नो, मी काहीही बोलते कधीकधी. बायकांचं असंच असतं." म्हणून तिनं हात सोडवला आणि ओट्याकडे गेली.


-----


"शिंदे. एक काम आहे तुमच्यासाठी." रमेश बाईक चालवताना ब्ल्यूटूथवर बोलत होता.
"बोला साहेब."
"मी एक सिरियल नंबर सांगतो, तो लिहून घ्या. आणि ह्या मॉडेलचे आणि ह्या लॉटचे स्पाय मायक्रोफोन्स कुणी आणि कुठून घेतलेत त्याची माहिती काढा." मग त्यानं सिरियल नंबर सांगितला, तेव्हढ्यात त्याला दुसरा कॉल येऊ लागला. "शिंदे, मिळाली माहिती की फोन करा." असं म्हणून त्यानं दुसरा कॉल घेतला.
"हॅलो?" एका स्त्रीचा आवाज होता.
"कोण बोलतंय?"
"मी भैरवी काळे."
"ओह्ह. बोला बोला." त्यानं बाईक लगेच रस्त्याच्या कडेला घेतली. "काय झालं?"
"ह्यांचा लॅपटॉप ते एसीपी घेऊन गेले, पण ते मरण्यापूर्वी एक पुस्तक लायब्ररीतून इश्यू करून घेऊन आले होते, ते आमच्या उशीखाली पडलं असल्यामुळे कुणाच्या नजरेस पडलं नाही. ते मला आत्ता मिळालंय."
"काय आहे त्याच्यात?" आणि ती काही बोलायच्या आत त्याला राजेंच्या घरच्या मायक्रोफोन आठवला. "आईशप्पथ. मिसेस काळे. एक मिनिट. काही बोलू नका. फक्त मी सांगतो तसं करा. आणि प्लीज काहीही प्रश्न विचारू नका." आणि मग त्यानं तिला काही सूचना केल्या आणि शिंदेंना पुन्हा एक फोन लावून वेगानं मोटरसायकल हाणली.
काळेंच्या घरापासून एक किलोमीटरवर त्यानं मोटरसायकल थांबवली आणि तिला फोन केला.
"तुमच्या सोसायटीच्या ऑफिसच्या दरवाजाशेजारी ठेवलेलं उपकरण चालवून पाहिलंत?"
"होय. त्यावर काहीही आवाज आला नाही."
"सगळ्या खोल्या चेक केल्यात?"
"होय."
"ह्म्म.. म्हणजे नशीबानं त्यांनी तुमच्यावर नजर ठेवलेली नाहीये. तरीही मी काही तिथे येत नाही. पुस्तक उपकरण होतं तिथेच ठेवलंत ना?"
"होय. ठीकच. काही वाटलं तर कधीही फोन करा. आणि काळजी घ्या." एव्हढं बोलून त्यानं फोन ठेवला.


-----


"आज रात्री मी '.बी. महातो असोशिएट्स'च्या ऑफिसकडे जाणार होतो." नरेंद्र ओट्याजवळ जात म्हणाला.
"पण त्या इमारतीकडे पाहून वाटत नाही की तिथे सिक्युरिटीसाठी दोनदा पाहणी करण्याची गरज आहे."
नरेंद्रनं एकदम चमकून तिच्याकडे पाहिलं.
"काय? तुला काय वाटलं, तूच एकटा ऍलर्ट असतोस?"
त्याच्या चेहर्‍यावर एक हलकंसं हसू उमटलं.
"मग कितव्यांदा आलायस गुवाहाटीत?"
नरेंद्र पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला.
"अरे काय, तुझ्या डोळ्यांत दिसत होती ती ओळख."
"मला माझ्या डोळ्यांवर काम करणं तरी गरजेचं आहे किंवा कायम गॉगल्स वापरणं तरी."
"काही नको, गॉगल्स वापरा. चांगले छान स्वच्छ डोळे आहेत, ते चेहर्‍यासारखे दगडी नको करून घेऊस."
"ह्म्म." म्हणून त्यानं बॅगेतून छोटी बंदूक काढली.
"आज काय करणार आहेस नक्की? रात्री कोण असणार आहे तिथे?"
"जर ए.बी.महातो असोशिएट्समध्ये काही असेल तर आपल्याला तिथे रात्री काय चालतं, ह्यावरूनच कळेल."
"आणि जर काही आहे हे कळलं तर आपण ती माहिती ऑफिसातून काढणार कशी? हंगामा टाळता येणं अवघड आहे, स्टेट ऑफ द आर्ट सिक्युरिटी सिस्टम्स असतील."
"आपल्याला ऑफिसातून किंवा कुठल्याही कॉम्प्युटरमधून माहिती काढायची नाहीये."
"मग कशी काढायची आहे."
".बी.महातोकडून."
"काय करायचंय नक्की?" रेखाला काहीच कळेनासं झालं होतं.
"अपहरण."


-----


"साहेब, ह्यात फक्त पाठदुखीच्या स्टेरॉईड्सची माहिती आहे." शिंदे रमेशच्या शेजारी बसत म्हणाले.
रमेश गेले दोन तास पुस्तक वाचत होता. "तेच मला कळत नाहीये. हे पाठदुखीचं काय गौडबंगाल आहे कळायला मार्ग नाही. राजेंना पाठदुखी नव्हतीच, त्यांना फक्त डायबिटीस होता. मग काय संबंध आहे ह्या सगळ्याचा?" आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तो पुस्तकाची पानं पलटू लागला.
"परफेक्ट. हे स्टेरॉईड, जर डायबिटीक ओरल मेडिकेशन म्हणून घेतलं, तर कार्डिऍक अरेस्ट होऊ शकतो."
"म्हणजे.."
"म्हणजे राजेंना कुणीतरी त्यांच्या औषधांमधून पाठदुखीचं स्टेरॉईड दिलं आणि तेच डॉ. काळेंना सापडलं. आणि कदाचित त्यांनी पोस्ट-मॉर्टेममध्येही लिहिलं असेल. पण मग रिपोर्ट बदलला गेला आणि त्यांना शंका येऊ लागल्या, त्यामुळे त्यांनाही संपवलं गेलं."
"पण मग हे केलं कुणी? आणि कुठलं स्टेरॉईड आहे हे कसं कळणार आपल्याला?"
"शिंदे, डॉ. काळे जरी तरूण असले, तरी त्यांचा अनुभव ७-८ वर्षांचा सहज होता."
"मग?"
"त्यांना पुस्तकाची गरज कशाला भासावी?" रमेश पुस्तक उलटं पालटं करून प्रत्येक पान पाहू लागला.
"म्हणजे?"
"म्हणजे डॉ. काळेंना नक्कीच शंका आली असावी कुणीतरी मागावर असल्याची. म्हणून हे पुस्तक आहे."
"म्हणजे ह्यामध्ये क्ल्यू आहे?"
"होय. आणि तो सहजासहजी सापडणार नाही, कारण जर पुस्तक चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तरी तो शोधणं अवघड व्हावं असाच प्रयत्न असणार डॉक्टरांचा."
"म्हणजे आता क्ल्यू शोधायचा म्हणजे खुनी सापडेल?"
"कदाचित. पण निदान खुन्यापर्यंत पोचायचा रस्तातरी सापडेल."



क्रमशः