12/16/2022

जाग -२

भाग १ वरून पुढे

तो जागा झाला आणि तोच पंखा वर भिरभिरत होता.

उठून तो बाहेर आला. तिनं यांत्रिकपणे त्याला चहा दिला. आई टेबलवर चिंताक्रांत मुद्रेनं बसली होती.

तो काही न सुचून तिच्या शेजारी बसला.

“काय झालंय तुला?” आई कातर आवाजात म्हणाली.

“हं?” त्याला काय बोलावं सुचेना.

“का असं वागतोयस. झालं ते झालं. आता कोण काय करू शकणार आहे?”

“अगं पण..”

“काय अगं पण? ह्या पोरीची अवस्था बघवत नाही माझ्याच्यानं. तिनं जास्त सोसलं ह्या सगळ्यात आणि तू असा वागतोयस जणू तुलाच त्रास झाला फक्त.”

तो मूकपणे तिच्याकडे पाहत होता.

“भोगलं तिनं. रडली, सावरली, तुला त्रास होऊ नये म्हणून आणि तू असा वागू लागलास? तिनं काय करावं? कुणाकडे पाहावं?”

त्यानं बायकोच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो अनोळखी तरी ओळखीचा वाटणारा चेहरा. पण ती वेदना ओळखीची. चांगलीच ओळखीची.

“ही मला खोटं सांगून डॉक्टरांकडे घेऊन गेली.” तो एकदमच बोलून गेला.

“काय?” बायकोच्या चेहऱ्यावर अविश्वास होता.

“मी त्या डॉक्टरांचं नाव गुगल केलं तिथेच. ते मॅटर्निटी सायकोलॉजिस्ट नाहीत. ग्रिफ स्पेशालिस्ट आहेत.” आणि एकदम त्याला साक्षात्कार झाला. ह्या त्याच डॉक्टर आहेत. तेच. बरोबर तेच.

“मग काय करणार होते मी? काय पर्याय ठेवलास तू माझ्यापुढे? हे तुझं असं वागणं. अलिप्त राहणं. असून नसल्यासारखं. मी असून नसल्यासारखी मला वागणूक देतोस.” तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं.

“म्हणून काय तू फसवणार मला?”

“तुझ्याशिवाय आता उरलंय कोण माझं?”

त्याला परत सर्व आठवू लागलं. महिन्याभरापूर्वी ते झालं होतं. तिनं त्यांच्या बाळाला जन्म दिला होता. मृत. आठ वर्षं प्रयत्न केल्यावर राहिलेला गर्भ. नऊ महिने पूर्ण झाले आणि आनंदाऐवजी अपरिमित दुःख पदरात आलं होतं. ती कळ त्या क्षणीही त्याच्या छातीत उठली.

पण हे सगळं स्वप्नात का? तो परत गोंधळला. हे खरं नाहीये. आपण स्वप्नात आहोत. बरोबर. स्वप्न.

“कसला विचार करतोयस? उत्तर तरी देणार आहेस का? की नेहमीप्रमाणेच टाळणार आहेस. मी इथे बसलेलीच नाहीये असं वागणार आहेस?”

पण स्वप्नातही हे असं का? इतकं दुःख, इतके क्लेश? आणि हे सगळे? उलट सुलट. अरूणा ऑफिसात का? ही इथे का? आई अशी का? मी असा का? इतके डिटेल्स का?

“बोल ना अरे काहीतरी. पुतळ्यासारखा का बसून आहेस. बोल ना. निचरा कर ना मनातल्या भावनांचा. हे दुःस्वप्नासारखं आहे, पण स्वप्न नाहीये रे. हे सत्य आहे आणि इथे लढण्यासाठी मला तुझी गरज आहे. मी एकटी कमी पडतेय रे.”

त्याच्या कानांवर तिची प्रत्येक किंकाळी पडत होती. तिचे रडून सुजलेले गाल. डोळ्यांवर सुकलेले अश्रू. हॉस्पिटल बेडच्या शेजारी अस्ताव्यस्त पडलेले तिचे ते लालभडक लकी सॅन्डल्स. हॉस्पिटलमधलं आणि घरातलं वातावरण. जणू एखादी चित्रफीत डोळ्यांसमोर झरझरत जावी. तो जागेवरून उठला आणि आत गेला.

तिला काहीच कळेना. तीही त्याच्या मागे गेली.

त्यानं बेडरूमच्या शेजारच्या स्टोररूमवरची कडी काढली. आत पाळणा, खेळणी अस्ताव्यस्त धूळ खात पडले होते. त्याला ते कुठून आणि कसे विकत घेतले ते प्रत्येक क्षण आठवले. त्या क्षणीचा अनुभव त्याला जाणवला. जणू तो ते सगळे क्षण परत जगत होता.

मग तो परत मागे वळला. ती हुंदका रोखून उभी होती. पुन्हा तेच हॉस्पिटल आणि घरातले आवाज आणि वास त्याच्या मेंदूत गर्दी करायला लागले.

स्वप्न आहे हे. स्वप्न आहे हे. तो स्वतःला समजावू लागला. ल्युसिड ड्रीम. सजग स्वप्नावस्था. खरेंनी घडवून आणलेली.

आणि त्याला अजून एक साक्षात्कार झाला. तिचा चेहरा त्यानं ओळखला. ती त्या डॉक्टरांची असिस्टंट डॉक्टर होती. पहिले डॉक्टर. सायकॉलॉजिस्ट.

----

तो खडबडून जागा झाला. अनोळखी जागी.

“कसं वाटतंय?” खरेंच्या आश्वासक आवाजानं तो भानावर आला.

मग त्याला सगळं आठवलं. तो कुठे होता, काय करत होता. खरेंनी त्याला पाणी प्यायला दिलं.

“मला पेन पेपर द्या खरे. किंवा लॅपटॉप. मला सगळं आठवतंय.”

“रिलॅक्स. तुम्ही विसरणार नाही आता काही. दॅट्स द ब्युटी ऑफ ल्युसिड ड्रीमिंग.”

तो खुर्चीत बसला. सुन्न होता.

“काय झालं?” खरे त्याच्या समोर बसत म्हणाले.

“प्रचंड वेदना आहे त्याच्या आयुष्यात.”

“कुणाच्या नसते?”

“नाही खरे. कदाचित तुम्ही नाही समजू शकणार.” तो शून्यात पाहत म्हणाला. “मीही चार महिन्यांपूर्वी माझं मूल गमावलंय. दोन वर्षांची माझी मुलगी. अचानक तापानं गेली. कुणालाही काही कळायच्या आत. आत्ता होती, मग क्षणार्धात नाही.”

खरेंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

“ती वेदना, खरे, असह्य असते. आपल्या शरीराचा अंश आपल्या अस्तित्वाचा अंश कुणीतरी ओरबाडून नेल्यासारखी जाणीव. त्यामुळे निर्माण झालेली कधीही भरून न निघणारी पोकळी.” तो बोलतच होता. “स्वप्नातही तेच आहे खरे. का असं?”

“अजूनही तुम्हाला वाटतंय की हे स्वप्न आहे?”

“मग?” तो प्रश्नार्थक मुद्रेनं म्हणाला. “इतकं साम्य? तीच वेदना, तेच दुःख, थोड्याशा फरकानं. तीच पात्रं. इकडची तिकडे.”

“बोला पुढे.”

“माझी बायको म्हणजे इथल्या सायकॉलॉजिस्टची असिस्टंट. आणि तिथे ती मला घेऊन गेली. योगायोग आहे हा? मी आणि माझी आई-Disjunctive Cognition. इथली बायको तिथे ऑफिसातली माझी विश्वासू कलिग. इथे मी कायम तिला सगळं सांगत आलोय. ती लग्नापूर्वी माझी बेस्ट फ्रेंड होती आणि आजही आहे.”

“इथे येता हे सांगितलंय तुम्ही तिला?”

तो गप्प बसला.

“आपण सगळं समजून घेतल्याशिवाय निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही एव्हढंच म्हणायचंय मला. डोन्ट गेट ऑफेंडेड.” खरे शांतपणे म्हणाले. “त्याचं घर. त्याची माणसं. त्याचे इमेल्स, फोटो, आठवणी सगळं ऑथेंटिक वाटतं?”

“होय. एकदम. जणू मला सगळं माहित आहे. असं वाटतं की सगळं माझ्या मेंदूत कुठेतरी भरून ठेवलंय आणि एक एक करून त्या मेमरीज बाहेर येतात.”

“असं इथेही वाटतं?”

“नाही. इथे अजिबात काहीही आठवत नाही. हे सगळं फक्त ल्युसिड ड्रीम मध्येच.”

“ओके.” खरे नोट करत होते. “आणि काही लक्षात आलेल्या आणि अशक्य अशा गोष्टी?”

“Illusory Dreaming?”

“मायावी स्वप्नावस्था. अशक्य, अतर्क्य गोष्टी.”

तो थोडा विचारात पडला, “मी स्वतःच, स्वतःला दिसणं.”, त्याला एकदम आठवलं.

“विस्तारानं सांगा.”

“स्वप्नातला मी, एसटीनं पुण्याला जात असताना, पलिकडच्या रांगेत माझी गाडी मुंबईकडे जाताना दिसली होती.”

“तुमची गाडी?”

“हो. आणि गाडीत मीच होतो.”

“म्हणजे स्वप्नातले तुम्ही?”

“नाही. हा मी. इथला मी.”

“ओह. आणि गाडीचा नंबर, मॉडेल सगळं तेच?”

"होय."

“ओके.”

“पण एक गोष्ट. स्वप्नातल्या मी नं जेव्हा तो गाडीचा नंबर शोधून काढायचा प्रयत्न केला तेव्हा एक विचित्र गोष्ट लक्षात आली.”

“ती गाडी अस्तित्वात नव्हती. म्हणजे, तो नंबरच कुठल्याही RTO नं इश्यू केलेला नव्हता.”

“ओके. पण मग, इश्यू केला नव्हता असं कसं?”

“त्याला वेबसाईटवर कळलं की ह्या नंबरचं RTO देखील अजून उघडलं नाहीये.”

खरे जागेवरून उठले आणि त्यांनी व्हाईटबोर्ड समोर ओढला. “आय थिंक आय नो व्हॉट इज हॅपनिंग.”

“काय?”

त्यांनी दोन रंगांच्या दोन रेषा काढल्या.

“आय थिंक यू आर जंपिंग टाईमलाईन्स.”

“म्हणजे?”

“अनेक जागृतावस्था तर माझ्या मते सिद्ध झाल्यातच जमा आहे, पण तुम्ही त्यातून सामायिक अवस्थेकडे पोचलात. फक्त वर्तमानात नाही. एक भूतकाळात आणि एक आत्ता.” डॉक्टर दोन्ही रेषांना जोडणारी रेष काढत म्हणाले.

“काय?”

“एक हा तुम्ही. वर्तमानकाळातला आणि एक हा तुम्ही भूतकाळातला.”

“स्पेस टाईम कंटिन्यूअम. लिनिऍरिटी ऑफ टाईम. एकसलग कालावकाशाचा सिद्धांत आणि कालाची रेषीयता. सगळं काही जुळून येतंय इथे. कालाची रेषीयता आपल्या आकलनशक्तीच्या मर्यादेचा परिणाम आहे हे पुन्हा सिद्ध होईल. माणसं इकडची तिकडे होऊ शकतात. सर्वांचेच वेगवेगळे पुनर्जन्म. कधी बायको, कधी कलिग, कधी डॉक्टर.” खरेंच्या चेहऱ्यावर तेज पसरलं.

“पण मग त्यानं मला कसं पाहिलं.”

“तेच एक खटकतंय मला. ही कालावाकाशाची खिडकी उघडली कशी. आणि हे दोन वेगळ्या माणसांचं कनेक्शन आहे की तुमच्याच भूतकाळाशी तुमचं? पुनर्जन्माशी. तुम्ही सर्च केलंत तुमच्या स्वप्नातल्या ओळखीसाठी?”

“हो. पण असा माणूस अस्तित्वातच नाही. कधीही नव्हता.”

“ओह्ह.” खरे वहीत नोंद करत म्हणाले. “लेट्स डू वन थिंग. तुम्ही परत एकदा तिथे जा. अजून काही क्ल्यूज मिळतात का ते पहा. तुमचं खरं नाव तिथे सर्च करा.”

“खरे. मला अजूनही वाटतंय हे स्वप्न आहे सर्व. तुम्ही उगाच तुमच्या थियरीज जोडण्यासाठी ठिगळं लावताय. अशक्य आहे हे सर्व.”

“लेट्स प्रूव्ह अदरवाईज.”

----

“इट्स बियॉंड रिकव्हरी मॅडम.” डॉक्टर तिच्याशी बोलत होत्या.

“तो व्हिलचेअरवर शून्य नजरेनं बसला होता.”

तिनं त्याच्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिलं. चालत ती त्याच्याजवळ आली.

“का असं करतोयस? व्हाय आर यू गिव्हिंग अप? माझ्यासाठी नाही तर आईंसाठी बाहेर ये ह्यातून. काय घेतलंयस हे डोक्यात?” ती काय बोलतेय ते त्याला कळत होतं. पण त्याच्या मेंदूमध्ये काहीच करावं असं वाटत नव्हतं.

“आईंनी अन्नपाणी सोडलंय तुझ्या ह्या अशा अवस्थेमुळं. बाळ माझंही गेलंच ना. मी कुणाचा आधार घेऊ? तू अशी हाय खाल्लीस. सगळी लढाई मीच लढायची का?” तिची आर्जवं त्याचं काळीज हलवत होती पण त्याला काहीच करता येत नव्हतं. जणू तो त्या शरीरात ट्रॅप्ड होता. की फायनली त्या शरीरातल्या खऱ्या त्यानं कंट्रोल परत घेतला होता.

डॉक्टर तिच्याजवळ आल्या. “तुम्ही म्हणाला होतात ना की हे असेच अनरिस्पॉन्सिव्ह झाले होते तुमच्या डिलिव्हरीनंतर?”

“हो. ३-४ दिवस नर्व्हस ब्रेकडाऊन झाला होता. मग अचानकच एक दिवस तो परत बोलू-चालू लागला. पण अनोळखी असल्यासारखा. परत कालपासून हे असं.” तिनं परत हुंदका आवरला.

“आम्ही त्यांचे ब्रेन स्कॅन्स घेतलेत. ऍक्टिव्हीटी जवळपास बंद आहे. त्यांची जगण्याची इच्छा संपली आहे.”

“मग काय करू मी डॉक्टर? मीही त्याच्यासारखीच गिव्ह अप करू? सोडून देऊ आशा? त्याच्या आईचं काय? तिचीही जवाबदारी माझीच? माझं कुणी नाही डॉक्टर. असं कसं सोडून देऊ मी ह्याला?”

“तुम्ही काहीही केलंत तरी काही फरक पडणार नाहीये मॅडम. मी तुम्हाला सगळे रिपोर्ट्स दाखवलेत. तुम्ही क्वालिफाईड आहात. तुम्हालाही कळतंय आम्ही काय करतोय ते. इलेक्ट्रोशॉक थेरपी हा शेवटचा पर्याय आम्ही चाचपून पाहतो. इलेक्ट्रिक इम्पल्सेसनी मेंदू जागृत झाला तर ठीक. नाहीतर ह्यांना इथेच ऍडमिट करून ठेवणं हा एक पर्याय आहे.”

तिचं सगळं अवसान गळून पडलं. ती मटकन खाली बसली आणि त्याच्या मांडीत डोकं ठेवून रडू लागली. डॉक्टर समजून घेऊन तिथेच बाजूला उभ्या राहिल्या. तिचा भर ओसरल्यावर ती उठून उभी राहिली आणि डोळे पुसून तिनं एकदा त्याच्या डोळ्यांत पाहिलं.

त्याच्या डोळ्यांत ओळख नव्हती. वेदना नव्हती. काहीच नव्हतं.

तिनं मान डोलावली. डॉक्टरांनी इशारा केला आणि नर्सनं त्याची व्हिलचेअर फिरवली.

----

तो परत उठून बसला. त्याला दरदरून घाम फुटला होता.

“तो मी नाहीये खरे. ते स्वप्न नाही. तो खराखुरा माणूस आहे. तो तिथे त्याच्या मेंदूत आहे. त्यानं जगण्याची इच्छा गमावलीय. त्याचं आणि त्याच्या बायकोचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय खरे. प्लीज. प्लीज काहीतरी करा.”

“रिलॅक्स. शांत व्हा. काय पाहिलंत तुम्ही.”

“मी तिकडे अस्तित्वात नाही. माझं नाव तिथे नाही. पण आज मला पहिल्यांदा जाणवलं की त्या मेंदूत, माझ्याशिवाय कुणीतरी आहे. तो असहाय आहे, दुःखात आहे.”

“अजून काय पाहिलंत?”

“ती. तिचं खरंच त्याच्यावर प्रेम आहे. ती खरंच एक व्यक्ती आहे. हे स्वप्न नाहीये. त्या लोकांना मदतीची गरज आहे.”

“आपल्याला काही करता येईल जेव्हा आपल्याला हे नक्की का घडतंय ते कळेल.”

“त्यानं काय फरक पडतो. मला परत पाठवा खरे. मी त्याला समजावतो.”

“काय समजवाल? त्याला हे कळतंय का? तुमचं कनेक्शन काय आहे.”

“दुःखाचं कनेक्शन आहे खरे. त्याचं दुःख मला कळतंय.”

“ओह्ह.” खरे एकदम उठून उभे राहिले. “दॅट्स इट.”

“काय?”

“दुःख. पेन. वेदना. दॅट्स द कनेक्शन.” खरेंच्या चेहऱ्यावर परत तेज पसरलं.

“प्लीज एक्सप्लेन खरे.”

खरेंनी परत व्हाईटबोर्ड समोर ओढला.

“यू आर ट्रॅव्हलिंग टू ऍन आल्टर्नेट रिऍलिटी, पॅरॅलल युनिव्हर्स. समांतर विश्व.”

“काहीही.” त्याचा संयम सुटला.

“ऐकून घ्या.” खरेंनी त्या दोन रेषांमध्ये एक तुटक रेषा काढली. “माझी सर्वांत महत्वाची थियरी आहे की वेदना ही सर्वांत आदिम भावना आहे. मनुष्यजन्म म्हणजेच एक वेदना आहे. सगळ्या भावना वेदनेची रूपं आहेत. आनंद, काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर. सर्वकाही. वेदना कमी जास्त झाली, साकळली, तिचं कुणामुळे तयार झालेलं वेगवेगळं रूप म्हणजेच ह्या सर्व भावना. वेदना हे शाश्वत सत्य. बाकी सर्व आकलन. हीच आदिम भावना शाश्वत असल्यानं तिला काळ, काम, वेग, प्रकाशाचा वेग, एकसलग कालावकाश वगैरेंचे नियम लागू होत नाहीत. ही भावना पराकोटीला पोचली तर दोन विश्वांतला पडदा भेदू शकते.

आता दोन विश्व म्हणजे काय ते सांगतो.”

“मल्टिव्हर्स ना.”

“एक्झॅक्टली. दोन नाही, अनेक विश्वं. आपलीच अनेक रूपं.” खरेंनी त्या दोन रेषांच्या अलीकडे नदीच्या त्रिभुज प्रदेशासारखं जाळं रेखाटलं. “अगणित पर्यायांपैकी एक पर्याय आपण रोज अनेकदा निवडतो. आपली प्रत्येक निवड एक नवं विश्व असू शकते. म्हणून मग थोडे वेगळे दिसणारे आपण, आई, वेगळीच बायको, वेगळेच डॉक्टर, वेगळीच कलिग. धीस एक्स्प्लेन्स एव्हरीथिंग. शेवटी तुम्ही जम्प करताय ह्या त्या दोन रेषा. हे तुम्ही इथले आणि हे तिथले. तुम्ही ह्या असंख्य रेषांपैकी कुठेही जाऊ शकला असतात, पण इथे गेलात. कारण तुमच्या वेदनांच्या तीव्रतेनं सारखी पातळी गाठली.”

“पण मग त्यानं मला कसं पाहिलं.”

खरे विचारात पडले, “त्याच्या वेदनेची तीव्रता त्यावेळी फार वाढली असेल. ज्यामुळे त्या क्षणाला दोन विश्वांमधला पडदा थोडासा हलला. त्या क्षणाला तुम्ही त्याच्यासोबत जागृतावस्था शेअर करत होतात. म्हणून हे आपल्याला कळलं. तुम्हाला तो आणि त्याच्या जगात तुमचं काहीच अस्तित्व नाही ह्याचं कारणही तेच.”

“पण तो मीच कशावरून? आम्ही वेगवेगळी माणसंही असू शकतो.”

“नीट आठवा. तुमच्या चेहऱ्यांमध्ये फार वेगळेपण नसेल.”

“तुम्ही थियरी सिद्ध करायला पुरावे निर्माण करताय खरे.”

“नाही.” खरे ठामपणे म्हणाले. “हा सिद्धांत सिद्ध होतोय. ऐतिहासिक आहे हे. तुमची आई हा कॉमन फॅक्टर त्यामुळेच आहे. ती वेगळी दिसूनही तुम्हाला वाटत राहिलं की ही तुमचीच आई आहे. तुम्हाला कधीही डाऊट नव्हता.”

“पण मग, मला कधी दुसरी बाजू का दिसली नाही?”

“तुमची वेदना त्या पातळीपर्यंत कधी पोचली नसेल.”

“खरे. आपल्याला त्याला वाचवायला हवं.”

“हं.” खरे विचार करत म्हणाले. “तुम्ही आणि तो एकच असाल तर हे शक्य आहे. तुमचं कनेक्शन. तुमचं समदुःख. तुम्ही इथे बाहेर पडताय त्या दुःखातून, तिथे तो ही बाहेर पडू शकतो.” खरेंच्या आवाजात एक कंप आला होता.

तो लगेच उठून आरामखुर्चीत बसला. खरेंनी इंजेक्शन भरून घेतलं. तो झोपला आणि खरे थकून गेल्यासारखे त्यांच्या टेबलपाशी आले. त्यांनी टेबलवरच्या फोटोंकडे डोळे भरून पाहिलं. अचानक त्यांचं लक्ष टेबलवरच्या त्याच्या कारच्या चावीकडे गेलं. त्यावर गाडीचा नंबर लिहिला होता.

----

खरे डायरीची पानं उलटत होते. सुंदर अक्षरात काही काही कविता लिहिलेल्या होत्या. खरेंना त्या तोंडपाठ होत्या पण तरी नजर अक्षरांवरून फिरत होती. 

'क्षण एक गहिवरला

पानातून ओघळला

मृत्तिकेत विरघळला

पण स्वतःतच हरवला

ना अंकुर ना मुळांत रमला

परि तो खोल खोल पाझरला

कातळास त्याची सलगी

शिरून त्याच्या पोटी

युगायुगांच्या प्रतिक्षेत तो स्थलकालच विस्मरला'

डोळे पाणावत होते. अक्षरं धूसर होत होती. मन भरभर मागे जात होतं.

तीन वर्षांपूर्वीची ती सकाळ. खरे, त्यांचा मुलगा आणि बायको पुण्याहून मुंबईकडे निघाले होते. रस्ता हाताखालचा, वळणं सवयीची पण तरी पलिकडच्या बाजूनं उलटून आलेला ट्रक घात करून गेला होता.

दैवाच्या फटकाऱ्यानं खरेंना फक्त खरचटलं पण बायको आणि मुलगा गंभीर होते. 

हॉस्पिटलच्या त्यांच्या बेडवरून उठून ते त्यांच्या बायकोमुलापाशी गेले होते. डॉक्टर त्यांना काहीतरी सांगत होत्या पण खरेंच्या कानावर काहीच पडत नव्हतं. त्यांच्या डोक्यात ऍक्सिडेंटचा क्षण सारखा घडत होता आणि आपण काय वेगळं केलं असतं तर हे टळलं असतं असा विचार करण्यात मेंदूचा एक भाग व्यग्र होता आणि दुसरा भाग अत्यवस्थ पडलेल्या आपल्या कुटुंबाकडे हतबल, हताश नजरेनं पाहत होता. त्यांची अवस्था पाहून काय होणार हे त्यांना कळलंच होतं, आणि म्हणूनच कदाचित ते डॉक्टरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते.

"... आपल्याला त्यांचा व्हेंटिलेटर काढावा लागेल कदाचित." डॉक्टरांच्या ह्या वाक्यानं ते एकदम भानावर आले आणि डॉक्टरांकडे पाहू लागले.

"दे आर बोथ ब्रेन डेड. आय ऍम रियली सॉरी." डॉक्टर जमेल तितक्या सहानुभूतिपूर्वक बोलल्या. त्यांच्या आवाजात खरी अनुकंपा जाणवत होती.

त्यांना एकदम पायातलं त्राण गेल्यासारखं झालं आणि ते डॉक्टरांच्या पायाशीच कोसळले. शुद्ध हरपण्यापूर्वी त्यांच्या डोळ्यांमध्ये झालेली शेवटची नोंद डॉक्टरांच्या लालभडक सॅन्डल्सची होती.

----

व्हीलचेअर ढकलणाऱ्या नर्सला एकदम काहीतरी हालचाल जाणवली. तिनं आश्चर्यानं थांबून पुढे जाऊन त्याच्याकडे पाहिलं. तो सावरून सरळ बसला होता. त्याच्या डोळ्यांत चमक होती. नर्सनं धावत डॉक्टरांना बोलावलं. 

"नक्की काय वाटतंय तुम्हाला?" डॉक्टर विचारत होत्या. त्यांच्यासमोर तो थकलेला, दमलेला बसला होता. त्याच्याशेजारी ती. ती सुद्धा थकलेली, दमलेली पण नवी उमेद सापडलेली.

"काही कळत नाही डॉक्टर, पण मला सगळं पूर्ववत करावंसं वाटतंय. हे गेले काही दिवस, महिने सगळे रिसेट व्हावेत असं वाटतंय." तो एक एक शब्द मोठ्या कष्टानं उच्चारत होता.

डॉक्टर काहीतरी नोट करत होत्या.

"ठीक आहे, तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल. मी ही काही औषधं लिहून देते, थोडं शांत वाटण्यासाठी, झोपेसाठी अशी आहेत." डॉक्टर त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत म्हणाल्या. "काही वाटलं तरी फोन करा. माझा वैयक्तिक नंबर तुमच्याकडे आहेच." त्या तिच्या दिशेनं पाहत म्हणाल्या.

ती जायला उठली, तो बसलाच होता. मग तो एकदम म्हणाला, "तू बाहेर थांबतेस का जरा. मला थोडंसं डॉक्टरांशी बोलायचंय. तिनं काळजीनं डॉक्टरांकडे पाहिलं. त्यांनी तिला मानेनंच तो सांगतोय ते ऐकायला सांगितलं. त्यांची नजर आश्वासक होती. ती विचारातच बाहेर गेली.

दरवाजा बंद होईपर्यंत तो त्याच दिशेनं पाहत होता. दरवाजा बंद झाल्यावर त्यानं एक दीर्घ श्वास घेतला. आजूबाजूला पाहून कुणी नसल्याची खात्री केल्यासारखं केलं आणि डॉक्टरांकडे पाहिलं. त्याच्या  डोक्यात बोलावं की न बोलावं हे द्वंद्व स्पष्ट दिसत होतं. खोल गेलेल्या डोळ्यांत तेज होतं, पण संशय होता, काळजी होती. डॉक्टर त्याचं फक्त निरीक्षण करत होत्या. त्यांनी त्याला त्याचा वेळ दिला.

"कसं सांगू कळत नाही डॉक्टर. तुम्ही ह्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मला तुमची मदत लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगण्याची रिस्क घ्यावीच लागेल." त्यानं सुरूवात केली. तो डॉक्टरांचा चेहरा पाहत जोखत होता की डॉक्टर त्याचं बोलणं किती सिरियसली घेत आहेत.

आणि त्याक्षणाला त्याच्या डोक्यात अनेक तारा एकदम जुळल्या. त्या डॉक्टर म्हणजेच खरेंच्या डेस्कवरच्या फोटोतली स्त्री. आणि त्याची मुलगी गेली त्या हॉस्पिटलमधली डॉक्टर!


---

"त्याला काय झालंय?" डॉक्टर पहिल्यांदा म्हणाल्या ते कळूनही केवळ अविश्वासानंच तिनं तो प्रश्न विचारला.

"सायकॉटिक ब्रेक"

ती गप्पच राहिली.

डॉक्टर दोन क्षण थांबल्या आणि बोलू लागल्या, "मी तुम्हाला सगळे डिटेल्स देऊ शकत नाही, पण ते काही विचित्र गोष्टींची कल्पना करत आहेत. आणि त्या गोष्टी अगदी तपशीलवार आहेत. ससंदर्भ, वैज्ञानिक संज्ञांनी परिपूर्ण आणि एका वेगळ्याच पातळीवर पूर्ण सुसूत्र वाटणारी कल्पना. फक्त आपल्याला माहित आहे की हे का घडतंय आणि ह्याचा ट्रिगर काय आहे, म्हणून हे सगळं काल्पनिक आहे मी सांगू शकते. पण त्यांचा स्वतःचा त्या कल्पनेवर प्रगाढ विश्वास आहे. त्यांच्यासाठी तेच सत्य आहे."

"मग आता?" तिच्या आवाजात पुन्हा तीच पराभवाची झाक होती.

"काही नाही. मी काही औषधं देते. ते हळू हळू ठीक होतील कारण ट्रिगर आपल्याला माहित आहे. हे तात्पुरतं असण्याचीच शक्यता आहे. ते हिंसक नाहीत आणि बाकी सर्व ठीक आहे. त्यामुळे वाट पाहणं एव्हढंच आपल्या हातात आहे."

ती उठून बाहेर गेल्याबरोबर तो परत गडबडीत आत आला.

"सॉरी डॉक्टर, माझा मोबाईल मी इथेच विसरलो होतो." असं म्हणत त्यानं मोबाईल डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीतून उचलला आणि बाहेर तिच्यापाशी आला.

परतीच्या टॅक्सीमध्ये त्यानं हेडफोन्स लावले आणि तिच्या आणि डॉक्टरांच्यातला रेकॉर्ड झालेला संवाद त्यानं प्ले केला आणि डोळे मिटून हेडरेस्टवर डोकं ठेवलं.

----

तो खडबडून उठला. समोर खरे बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिह्न होतं.

"मी खूप मोठी चूक केलीय खरे."

"काय झालं?"

"जर ती खरोखरच वेगळी कालरेषा असेल तर मी तिथे लुडबूड केली आहे."

"काय?"

"मी तिथे उठून बसलोय."

"म्हणजे?" खरेंना कळत नव्हतं तो काय बोलतोय ते.

"सांगतो. आधी थोडं पाणी द्या." दोन ग्लास घटाघटा पाणी प्यायल्यावर तो ही थोडा शांत झाला आणि सांगू लागला. "मूल गेल्याचा धक्का बसल्यापासून तो कोमामध्ये असल्यासारखा होता. पण आमच्या कनेक्शनमुळे मी तिथे पोचलो आणि तो जागा झाला. म्हणजे मीच त्याचं आयुष्य जगायला लागलो. पण ल्युसिड ड्रीमिंगमुळे असेल कदाचित, माझा कंट्रोल कमी झाला आणि मी तटस्थासारखा राहू लागलो, त्यामुळेच मला माझ्याशिवाय कुणीतरी त्या शरीरात राहत असावं असं वाटू लागलं."

खरे मान डोलावत होते आणि डोक्यात बऱ्याच गोष्टींचा संबंध जुळवण्यात व्यग्र होते.

तो पुढे सांगू लागला. "शेवटी माझ्या तटस्थपणाचा व्हायचा तोच परिणाम झाला. तो पूर्ण कोशात निघून गेला. आणि मगाशी मी जो उठलो होतो तुम्हाला सांगायला की त्याला मदत हवीय, ते म्हणजे तो पूर्ण कोशात गेला होता. त्यानं जीवनाची आशा सोडून दिली होती. बायकोवर अशक्य प्रेम असूनही. दुःखानं त्याला हरवलं होतं. त्यामुळेच त्याला शॉक ट्रीटमेंटसाठी नेणार होते."

"मग, तुम्ही काय केलंत?"

"मी त्याला समजवायला गेलो, पण..." तो एकदम थांबला, स्वतःशीच विचार केल्यासारखा. "तो तिथे नव्हताच. म्हणजे मला जाणवलाच नाही. जणू पुन्हा माझ्या संपूर्ण ताब्यात शरीर आल्यासारखं."

"कसं शक्य आहे? तुम्ही आत्ताही ल्युसिड ड्रीमिंगच करत होतात. तुम्हाला खरंच आधी कुणी वेगळा माणूस जाणवला होता? की तुम्हीच तटस्थ राहिल्यामुळे कोमासारखी स्थिती झाली होती?"

तो विचारात पडला. एकदम त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि संशयाची पडछाया उमटली. पण क्षणभरच. पुढच्या क्षणी तो प्रसन्न चेहऱ्यानं बोलू लागला. "ते काहीही असेल पण आता शेवटी मी उठून बसलो. म्हणजे तो, तिथे." 

आता खरेंच्या चेहऱ्यावर काळजी पसरली.

"मला त्याला थोडा वेळ मिळवून द्यायचाय, ह्यातून बाहेर पडायला." मग पुन्हा काळजीग्रस्त होत तो म्हणाला, "म्हणून मी लुडबूड केलीय."

खरे तो पुढे काय बोलतोय ह्याची वाट पाहत होते.

"मी त्याच्या डॉक्टरांना सगळं सांगून टाकलं."

"काय?" खरे जवळपास ओरडले.

"हो. हे सगळं. कालरेषा, मल्टिव्हर्स. शेअर्ड कॉन्शसनेस, मल्टिपल कॉन्शसनेस, मी, तुम्ही, ल्युसिड ड्रीमिंग सगळंच. आणि त्यांनाच सांगितलं, की तुमची मदत लागेल त्याला जागं करायला."

खरे खुर्चीत कोसळल्यासारखे झाले होते. पण त्यांच्या चेहरा एकदम कठीण झाला होता.

"त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला?" खरेंनी शेवटी विचारलं.

"नक्की कळलं नाही. पण माझ्याकडे पर्याय काय होता?" तो खरेंचा चेहरा निरखत होता. डॉक्टर म्हणजेच खरेंची पत्नी हे कनेक्शन त्यांना सांगावं का? ह्या विचारात तो पडला होता.

----

"या बसा!" डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहत म्हटलं.

तो थोडासा विचारातच बसला.

डॉक्टर समोरची फाईल वाचत म्हणाले, "काही नवीन प्रोग्रेस आहे का?"

त्यानं फक्त मान डोलावली.

तो खुर्चीत सावरून बसला होता. अजून तो नर्व्हस होता. आता सगळं म्हणजे कुठून सुरू करायचं, काय सांगायचं ह्याची तो मनाशी जुळवाजुळव करत होता.

"मला हे सगळे भास का होत आहेत, मला तो माणूस रोज का दिसतो आणि मी त्याच्याशी तासनतास का बोलतो आणि तो माणूस प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही असं का, ह्याचं उत्तर मला मिळालंय डॉक्टर."

"औषधं घेऊनही ते चालूच आहे अजून?"

"तो माणूस प्रत्यक्षात आहे ही आणि नाहीही."

"म्हणजे?" डॉक्टर थोडा विचार करत म्हणाले. "पूर्ण स्पष्ट करता का?"

"मी थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगतो." तो सर्वकाही सांगावं की नाही ह्या विचारात होता. ही अगदी समान स्थिती त्यानं नुकतीच पाहिली होती. काय बोलावं आणि कसं त्याची मनात तो जुळवाजुळव करत होता.

डॉक्टर त्याच्या चेहऱ्यावरची चलबिचल पाहत होते. त्याच्या डोक्यातली चक्रं फिरताना चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

"समजा मी तुम्हाला एक थियरी सांगितली तर तुम्हाला पटेल?"

"तुम्ही योग्य पद्धतीनं पटवून देऊ शकलात तर का नाही."

"ओके. आता माझी परिस्थिती घ्या. एका भयानक ऍक्सिडेंटमध्ये मी माझी पत्नी आणि मुलगा गमावला. त्यानंतर मला प्रचंड नैराश्य आलं असं सगळे म्हणतात. पण ते नैराश्य नव्हतं. ती अपरिमित वेदना आहे. दुःख आहे. अमानवी पातळीचं दुःख. अमानुष दुःख."

"ह्म्म." डॉक्टरांचा चेहरा कठीण झाला होता. पूर्ण एकाग्रचित्तानं ते त्याच्याकडे पाहत होते.

"आता थियरी अशी आहे की ह्या अतिभयंकर दुःखाच्या पहाडानं माझं मन तीक्ष्ण झालं. ज्याला आपण मानसिक शक्ती म्हणतो ती जणू भट्टीत तापून कठीण झाली आणि त्याचं शस्र झालं आणि त्या शस्त्रानं कालावकाशाच्या पडद्यावर प्रहार होऊ लागले."

डॉक्टर नोट करत नव्हते कारण त्यांना त्याचा प्रत्येक सूक्ष्म हावभाव टिपायचा होता.

"त्याच वेळी, अगदी त्याच वेळी, माझंच एका दुसऱ्या जगातलं, कदाचित दुसऱ्या कालातलं प्रतिबिंब तशाच अपरिमित दुःखातून जात होतं. तिकडूनही असेच प्रहार होत होते. कालावकाशाचा पडदा भयंकर पातळ झाला आणि त्यातूनच तो इथे आला."

डॉक्टर त्याला निरखत होते, तेवढाच तो डॉक्टरांना निरखत होता. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास नव्हता, पण काळजीची छाया त्याला दिसू लागली. त्याच्या लक्षात आलं की डॉक्टरांना हे सगळं सांगणं ही काही फार चांगली कल्पना नव्हती.

"पण ह्या थियरीत खूप लूपहोल्स आहेत. नक्की दुःखामुळे असं काय होतं की कालावकाशाचा पडदा फाटावा. आणि तो येऊ शकतो तर बाकी लोक का नाहीत? आणि काही लोक फक्त मनानंच जातात तर काही लोक शरीरानंही कसे जाऊ शकतात?"

"काय? मनानं कोण गेलं?" डॉक्टरांनी अचानक विचारलं.

"नाही. तसं नाही." तो थोडीशी सारवासारव करत म्हणाला, "म्हणजे अशीही एक शक्यता असू शकते." त्याचं त्यालाही ते पटलं नाही. "पण खरं सांगायचं तर मी आता हे सगळे विविध विषयांचे अभ्यास बंद केले पाहिजेत. डोक्यात इतके विचार फिरत राहतात आणि कधी कधी त्या विचारांचीच एकमेकांत गल्लत तर होत नाही ना असं वाटतं."

डॉक्टर दोन क्षण शांत राहिले आणि मग थोडा विचार करून त्यांनी नोटपॅड समोर ओढलं. त्यावर काही लिहित ते म्हणाले, "तुमची औषधं आता कमी करूया. तुम्हाला किमान जाणीव होऊ लागलीय समस्येची असं वाटतंय तरी."

प्रिस्क्रिप्शन घेऊन तो उठला आणि जायला वळला.

अचानक काहीतरी डोक्यात येऊन तो परत वळला आणि खुर्चीत बसला. पण खोल विचारात गढून गेला.

"काही सांगायचंय का अजून?" दोन मिनिटं वाट पाहून डॉक्टर म्हणाले

"तुम्हाला सांगावं की सांगू नये हे अजूनही ठरत नाहीये माझं" थोडंसं अडखळतच तो म्हणाला.

"टेक युअर टाईम." डॉक्टर त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होते. चेहऱ्याच्या रेषा क्षणात ताठ होत होत्या, क्षणात महिरपी होत होत्या. मध्येच निग्रही, मध्येच व्यग्र, मध्येच भीतीग्रस्त, मध्येच आत्मविश्वासपूर्ण.

"ऐका तर मग." तो शेवटी म्हणाला, "हा जो माणूस मला भेटायला येतो. तो स्वप्नावस्थेत असताना त्याच्या मोबाईलकडे माझं लक्ष गेलं, तो त्याच्या खिशातून खाली पडणार होता, म्हणून मी पकडून टेबलावर ठेवला. काहीतरी वेगळ्याच प्रकारचा फोन होता, त्यावर कीबोर्डच नव्हता, कदाचित फक्त इनकमिंग असेल. तर एकदम त्याचा स्क्रीन ऑन झाला. त्यावर एका स्त्रीचा हसरा फोटो होता. मी अंदाज बांधला की तो त्याच्या बायकोचा असेल. पण पण..."

डॉक्टरांनी फक्त त्याच्याकडे रोखून पाहिलं.

"तो फोटो त्याक्षणाला मला क्लिक झाला नव्हता. पण आत्ता.." त्यानं उभं राहून डॉक्टरांच्या केबिनच्या दाराच्या काचेच्या चौकटीतून बाहेर बोट दाखवलं.

डॉक्टरांनीही उठून बाहेर पाहिलं. बाहेर त्यांची असिस्टंट डॉक्टर तिच्या डेस्कपाशी बसलेली होती.

"मिस तावडे?"

त्यानं खाली बसून फक्त मान डोलावली.

डॉक्टरही खाली बसले आणि तो पुढे बोलायची वाट पाहू लागले.

तो शून्यात पाहत होता. त्याच्या डोक्यातली चक्र भिरभिरत होती. एकदम तो भानावर आला. "डॉक्टर. मला बहुतेक थोडा आराम करण्याची गरज आहे."

डॉक्टरांनी चष्मा काढला आणि चेहऱ्यावर स्मित आणून ते बोलू लागले, "खरे, तुम्ही जे काही बोलताय आणि जो विचार प्रत्यक्ष करताय ह्यांत बरीच फारकत आहे हे मलाही कळतंय, पण तुम्ही ही जी सारवासारव करताय आणि माझ्या प्रतिक्रियांचा अभ्यास करताय ह्यावरून तुम्हाला मानसिक आजार असावा असं मला वाटत नाही. बाकी तुम्ही जे काही विचार करताय किंवा अनुभवताय ते खरं की खोटं हे बहुतेक माझ्याहून जास्त तुम्हालाच कळेल." हे बोलताना त्यांच्या डाव्या डोळ्याशेजारचा तो व्रण प्रश्नचिह्नासारखा दिसत होता.

तो फक्त हसला आणि बाहेर पडला.

--समाप्त--

(प्रेरणास्रोत - Awake ही अमेरिकन मालिका)

जाग -१

 एसटी तिच्या वेगाने चालली होती. खिडकीतल्या सीटवर बसून त्याची तंद्री लागली होती. तो बाहेर पाहत होताही आणि नव्हताही. एक्स्प्रेसवेच्या दिशेनंचा हा प्रवास नेहमीचाच. ओळखीचा रस्ता, ओळखीचं ट्रॅफिक, ओळखीचे धक्के आणि खड्डे आणि त्यामुळे तयार झालेल्या मसल मेमरीमुळे एक समाधीवस्था गाठल्यागत तो बसला होता. उजवीकडून पुण्याकडून मुंबईकडे येणारा वाहनांचा लोंढा होता. त्यातही विविध रंगाच्या, विविध ढंगाच्या बसेस, गाड्या. तो स्वतःशीच विचार करत होता,

‘किती लोक, किती वेगवेगळी कारणं ह्या प्रवासाची. लोंढेच्या लोंढे. कुणीतरी आपल्या बसकडे बघूनही हाच विचार करत असेल का? अगदी नेमका हाच? ह्याच क्षणी? तंतोतंत सारखा विचार? शक्य आहे का? दोन वेगवेगळ्या जाणिवा.. एकाच क्षणी तंतोतंत एकच भावना? शक्य आहे?’

आणि त्याच क्षणाला त्याला काहीतरी दिसल्यासारखं वाटलं? रस्त्याच्या पलिकडे एका गाडीत. ती गाडीही त्याला ओळखीची वाटली. नक्की काय पाहिलं ह्याची पूर्ण जाणीव व्हायला त्याला क्षण दोन क्षण लागले. पण एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडल्यावर तो खडबडून भानावर आला. बसमधून डोकं बाहेर काढून मागे गेलेल्या गाड्यांच्या गर्दीकडे धडपडून पाहू लागला. त्याच्या धडपडीनं शेजारच्याचंही जडत्व भंगलं. त्याच्या बाजूच्यालाही लक्षात येईना नक्की काय झालं ते.

ती गाडी काही परत दिसेना. ५ १० मिनिटे निष्फळ प्रयत्न झाल्यावर तो भांबावून आणि थकून स्वतःच्या जागेवर स्तब्ध बसला. त्याक्षणी नक्की काय घडलं हे तो परत परत स्वतःच्या डोक्यात घोळवत होता. एसटी विश्रांतीसाठी थांबली आणि तो हळूहळू गाडीतून उतरला. स्वच्छताग़ृहात शिरला आणि तोंडावर पाणी मारण्यासाठी बेसिनजवळ गेला. मागे माणसांची गर्दी झाली पण तो तोंडावर पाणी मारतच होता. ७ – ८ हबकारे मारल्यावर त्याला थोडं शांत वाटलं. मागची गर्दी त्याला मनातल्या मनात आणि काही दबक्या आवाजात शिव्या देत शेजारच्या बेसिनवर सरकत होती. त्यानं वर पाहिलं आणि त्याचं लक्ष आरश्याकडे गेलं. तो जागच्या जागीच थिजला. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आज नक्की काय सुरू आहे, ह्या विचारानं तो थरारून गेला होता. की शेवटी त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला सुरूवात झाली होती?

----

“बट व्हाय डू यू थिंक यू हॅव अ प्रॉब्लेम?” डॉक्टर त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले.

“काहीतरी ठीक नाहीये डॉक्टर. मला कळत नाहीये नक्की काय सुरू आहे पण खरंच, माझी स्वप्न खूपच स्पष्ट होत चालली आहेत. आणि मोठी होत चाललीयत. म्हणजे, झोपेतली स्वप्नं, आयुष्यातली नाही, तसं असतं तर तुमच्याकडे नसतो आलो.” त्यानं माफक विनोद केला. पण तो स्वतः हसण्याच्या मूडमध्ये नव्हता.

डॉक्टरांनी स्मित केलं. “इट्स गुड दॅट युअर सेन्स ऑफ ह्यूमर इज इन टॅक्ट. आज आपली तिसरी सिटींग आहे पण तुम्ही अजूनही मला सगळं सांगत नाही आहात. मला जोपर्यंत सगळं कळत नाही तोवर मी काय सांगू तुम्हाला?”

“डॉक्टर, मुळात मी तुमच्याकडे येतोय हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. मी अजून कुणाला काही सांगितलं तर मला वेडा ठरवून मोकळे होतील सर्व.”

“कुणी तुमच्या जिवावर उठलंय असं वाटतंय का?”

“ओह डॉक्टर, आय ऍम नॉट पॅरानॉईड. मी स्वतः व्हॉलंटरी काऊन्सिलर आहे आमच्या कंपनीत, त्यामुळे आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला हे बेसिक वॉर्निंग साईन्स शिकवले जातात.”

“गुड. म्हणजे तुम्ही समजून सवरून इथे आलेले आहात. दॅट्स अ गुड स्टार्ट. आज तिसऱ्या सेशनमध्ये पहिली माहिती कळली मला तुमच्याबद्दल.” डॉक्टर नोट्स घेत म्हणाले, “नक्की काय स्वप्न पडताहेत? कधी सुरू झालं हे सर्व?”

“असं होणं कठीण आहे ना डॉक्टर? आय ऍम अ हेल्दी पर्सन. मला काही कसं होऊ शकतं? माझं छान कुटुंब आहे, चांगली नोकरी आहे, चांगले छंद आहेत, मग हे असं कसं काहीतरी?”

“नक्की काय स्वप्न पडतात?”

“मी सांगतो डॉक्टर पण मला खरं खरं सांग़ा, शहाण्या माणसांना इतकी स्पष्ट स्वप्नं पडू शकतात? इतकी स्पष्ट की जणू ती स्वप्नं नाहीत, हे जे सुरू आहे तेच स्वप्न आहे?”

डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. “तुम्हाला असं वाटतं की हे जे आहे ते स्वप्न आहे?”

“ऑफ कोर्स नॉट डॉक्टर. मला स्वप्नं पडतात ती वेगळी आहेत. म्हणजे त्यात मी आहे, माझं कुटुंब आहे, माझं ऑफिस आहे, पण सगळं वेगळं. सगळी माणसं वेगळी, सगळी नाती वेगळी, जागा वेगळी, ऑफिस वेगळं. जगच पूर्ण वेगळं.”

“काय काय असतं तिथे?”

“बरंच काही. पण सगळं तुटक तुटक आठवतं. जाग आली की लक्षात राहत नाही फार, पण एक भावना असते काहीतरी वेगळं जगल्याची. तुकडे लक्षात राहतात, पण एक खरं, आधी छोटे छोटे क्षण दिसायचे, मग अख्खे प्रसंग आणि आता दिवसाचा बराच काळ दिसतो. बऱ्याच घटना दिसतात.”

“म्हणजे?”

“नक्की अजून स्पष्ट नाही होत डॉक्टर. पण जणू कुणाच्यातरी दिनचर्येचा भाग असावा असं जाणवतं. आणि तो कुणीतरी म्हणजे मीच.”

“नक्की स्वप्नंच वाटतात का ती?”

“आता डॉक्टर, मी जागा आहे इथे तुमच्यासमोर. मला सकाळपासून काय काय केलं आणि माझ्या मागच्या आयुष्यातलं सर्व आठवतंय. पण स्वप्नातलं नाही. म्हणजेच काय ते समजून जा ना?”

“पण तुम्ही म्हणालात की स्वप्नं स्पष्ट होताहेत, मग सांगत का नाही तुम्ही तुम्हाला काय दिसतंय ते?”

“स्पष्ट होतंय सर्व हे जाणवतं, त्या क्षणाला, झोपेत. ती भावना उठल्यावरही कायम असते. पण खरंच सगळं नाही आठवत. खूप वेळ गेला स्वप्नात हे ही जाणवतं. काही चेहरे, काही जागा, काही रंग, काही गोष्टी असं तुटक तुटक आठवतं.”

“कुणी ओळखीचा चेहरा?”

“हो. माझी बायको.”

“गुड. त्या वर्किंग आहेत का?”

“इथे की तिथे?”

“म्हणजे? काही फरक आहे का?”

“हो. ती तिथे माझ्या ऑफिसात नोकरी करते.”

“इथे नाही करत का नोकरी?”

“नाही, दुसरीकडे करते.”

“कदाचित तुमचं मन तुमच्या आयुष्यातल्या दोन गोष्टींना ओव्हरलॅप करतंय.”

“नाही डॉक्टर. ते शक्य नाही.”

“का?”

“कारण तिथे ती माझी बायको नाही.”

----

पुण्याला पोचल्यावर दुसरी बस पकडण्याइतपतही त्राण त्याच्यात उरलं नव्हतं. जे दिसलं होतं त्यावर विचार करकरून तो थकून गेला होता. त्यानं रिक्षा शोधायचा प्रयत्न केला पण कोणी मीटरनं यायला तयार नव्हतं, मग त्यानं ओला केली आणि आली त्या गाडीत अंग झोकून दिलं.

ड्रायव्हरला ओटीपी देताना अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. त्यानं मोबाईलचे फोटो उघडले. एक-एक करून सगळे फोटो बघितले, सेल्फी बघितले, पण तेच. तो निराश झाला होता. नक्की काय सुरू होतं सर्व. त्यानं गडबडून एकदम ओलाचं ऍप उघडलं आणि आत्ताच सबकॉन्शसली टाकलेला पत्ता वाचला. काहीतरी चुकत होतं. पण नक्की काय चुकत होतं ते कळत नव्हतं.

सांगितलेल्या पत्त्यावर पोचला, पण आता तो सावध होता. गेटमधून आत शिरताना त्यानं वॉचमनकडे पाहिलं. वॉचमनजवळ रजिस्टर होतं पण वॉचमननं त्याच्याकडे पाहून ओळखीचं स्मित केलं आणि रजिस्टरजवळ हात नेला नाही. म्हणजे तो इथे नक्कीच बरेचदा येत असावा, असं त्यानं मनाशी बांधलं. तीन विंग्ज होत्या, पण त्याचे पाय आपसूकच सी विंगकडे वळले. खाली मालकांच्या नावावरून त्यानं नजर फिरवली पण एकही ओळखीचं नाव दिसेना. पुन्हा पुन्हा त्यानं ती लिस्ट वाचली पण काहीच नाही. मग तो लिफ्टमध्ये शिरला आणि प्रतिक्षिप्त क्रियेनं त्यानं तिसरा मजला निवडला. लिफ्टपासून सर्वच ओळखीचं होतं. त्याची मेमरी पुढेमागे होत होती. काही क्षण सगळंच नेहमीचं आहे, योग्य आहे, असं वाटत होतं, तर काही क्षण सगळंच अनोळखी. बाहेर पडला तर समोरच्याच घरावरच्या पाटीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. ज्ञानेश्वर गणपुले. ओळखीचं वाटत होतं की नाही ह्यावर तो संभ्रमात पडला. सवयीनं डावीकडे वळला आणि पाटी शोधू लागला. पण त्या घरावर पाटीच नव्हती. दरवाजा नेहमीचा वाटत होता. त्यानं विचार करून बेल दाबली आणि आतुरतेनं दरवाजा उघडायची वाट पाहू लागला.

दहा-पंधरा सेकंदांनी दरवाजा उघडला. समोर ती उभी होती. तिनं त्याच्याकडे हसून पाहिलं आणि ती आत निघून गेली. तो आत शिरला आणि सोफ्यावर बसला. हे नक्की कुणाचं घर असेल? तो विचार करत राहिला. ती परत आली पाण्याचं तांब्या-भांडं घेऊन. थकलेली शिणलेली दिसत होती ती. त्याच्या शेजारी येऊन बसली आणि त्याच्या खांद्यावर तिनं मान टाकली.

तो एकदम अवघडला. एव्हढ्यात आतून कुणाचीतरी चाहूल लागली आणि ती स्वतःहूनच थोडी दूर सरकली. तिनं डोळ्यातलं पाणी पुसलं असावं असं त्याला वाटलं. आतली व्यक्ती बाहेर आली आणि तो चकित झाला. ती त्याची आई होती.

“आई?” तो आश्चर्यानं म्हणाला.

“काय झालं? आत्ताच झोपून उठले. तुझ्या बेलनं चाहूल लागली. झालं का तिथलं काम नीट? तसा फोनवर झालं म्हणालाच होतास. तरी.”

त्याचं आश्चर्य ओसरत नव्हतं. आई इथे काय करत होती? पण, ती वेगळी का दिसत होती? हे कुणाचं घर आहे? आणि ही कोण?

----

तो पार्किंग लॉटमधून गाडी काढत होता. डोक्यात विचारांची गर्दी झाली होती. शेवटी एकदाचं डॉक्टरना सर्व सांगितलं होतं त्यानं. तसं सगळं नव्हतं सांगितलं पण तरी डॉक्टरांना अंदाज येईल एव्हढं तरी नक्कीच. पण त्याला कुठेतरी हे सगळं पटत नव्हतं. असं कसं शक्य होतं? एव्हढे डिटेल्स स्वप्नात कसे दिसतील? आणि ते ही अनोळखी जागा, अनोळखी माणसं? काही काही माणसं तीच आहेत, पण बाकीची? घर, ऑफिस, शहर सगळं वेगळं?

तो मानसोपचारतज्ज्ञांकडे जात होता हे त्यानं घरी किंवा ऑफिसात कुणालाच सांगितलं नव्हतं. त्याला ट्रेनिंग देणाऱ्या डॉक्टरांकडून त्यानं ह्या डॉक्टरांचा रेफरन्स घेतला होता. पहिल्या दोन सिटींग तो फक्त अंदाज घेत होता डॉक्टरांचा. ट्रेनिंग घेतल्याचे दुष्परिणाम हे की तो उगाच इतरांना मोजपट्ट्या लावत होता. पण दुसरं असं की आपल्यासोबत हे असं काही होईल असं त्याला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. आणि दैवदुर्विलास असा की स्वप्नच त्याला भंडावून सोडत होत होती.

घराकडे जाणाऱ्या रस्त्याला नेहमीप्रमाणेच भयंकर ट्रॅफिक लागलं होतं. सगळ्या गाड्यांच्या काचा वर होत्या आणि आपापल्या छोट्याशा विश्वांच्या गारव्यामध्ये सगळीजण दोन क्षणाचा विसावा शोधत होती. कुणी गाणी लावली होती, कुणी गाडीतच बोलत होतं, कुणी फोनवर बोलत होतं, कुणी जीपीएससाठी वर लावलेल्या फोनवर व्हिडिओ पाहत होतं, तर कुणी जराही न बदलणाऱ्या जीपीएसवरच्या ट्रॅफिककडे प्राण कंठाशी आणून पाहत होतं आणि आशा करत होतं की ट्रॅफिक जरा तरी ओसरेल आणि आपण एका बंदिस्त विश्वातून दुसऱ्या बंदिस्त विश्वात पोहोचू. एक सिग्नल पडला की ती सगळी तुटक जगं एकाच दिशेनं पुढे सरकायची, दिशा एकच पण बाकी सगळंच वेगळं. तो आजूबाजूला पाहत होता. त्याच्या गाडीतही रेडिओ लागला होता. त्यावरची असंबद्ध बडबड आणि जाहिरातींच्या मधे लागणारी गाणी त्याच्या कानावर पडत होती, पण त्याचं लक्ष ह्या लोकांकडेच होतं. काय असतं माणसांच्या डोक्यात? मनात? मेंदूत? किती विश्व तयार करतो तो स्वतःची. कुणी दिवसा ऑफिसमध्ये काय झालं त्यात हरवला आहे, कुणी कॅबमध्ये बसून व्हॉट्सऍपवर कॉलेज ग्रुपमध्ये हरवला आहे, कुणी फेसबुकवर मैत्रिणींच्या साखरपुड्याच्या फोटोंवर कॉमेंट करतेय, कुणी वाग्दत्त वराशी चॅट करत स्वतःशीच हसतेय, तर कुणी आवडत्या मित्राशी फोनवर हळूहळू बोलत स्वतःशीच लाजतेय, कुणी शेअर कॅबमध्ये शेजारी बसलेल्या तरूणीच्या गंधानं आणि स्पर्शानं मोहरून गेला आहे, तर कुणी घरून सारखा बायको आणि मुलीचा फोन येतोय त्यांना समजावून थकून गेला आहे. कुणाच्या घरी त्रास वाट पाहतोय, तर कुणाच्या घरी विसावा पण शाश्वताची अनामिक ओढ सगळ्यांनाच तिथे घेऊन जातेय.

शाश्वत. हेच हवं असतं ना माणसाला. सगळं काही नक्की, ठरलेलं, कायम आणि समजणारं. काही आकलनाच्या बाहेरचं दिसलं, घडलं, आयुष्यात आलं की थरकाप उडतो मनाचा. ते चांगलं असेल किंवा वाईट पण ते शाश्वत हवं.

अचानक मागून हॉर्न वाजले. सिग्नल पडला होता. घराच्या ओढीनं तो ही पुढे सरकत होता पण डोक्यात शाश्वत-अशाश्वताचा कल्लोळ माजला होता. जे घडत होतं ते कळत नव्हतं आणि कळलं असतं, ते घडत नव्हतं. आज त्या घटनेला चार महिने होऊन गेले होते, पण अजूनही अर्थ लागत नव्हता. कदाचित कधी लागणारही नव्हता.

----

तो झोपेतनं उठला आणि समोर छतावरचा पंखा एका तालात फिरत होता. नेहमीचाच ओळखीचा पंखा. पण अचानकच त्याच्या अंगावर काटा आला. ओळखीचा वाटतोय खरा पण हे त्याचं घर नाही. तो झपकन उठून बसला. त्याच्या शेजारची जागा रिकामी होती. चादरीची घडी करून ठेवली होती. ती घडी करण्याची टिपिकल पद्धत त्याच्या चांगलीच लक्षात होती. त्याची बायको करते तशी घडी. एव्हढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला आणि त्यानं त्या दिशेनं पाहिलं. ती ती होती. कालचीच, सोफ्यावर त्याच्या शेजारी येऊन बसलेली. ती त्याची बायको नव्हती. पण तिलाही कुठेतरी पाहिलं होतं त्यानं. कुठे ते मात्र आठवत नव्हतं. तिनं त्याच्याकडे पाहून हलकं स्मित केलं. तिच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं त्याच्या नजरेतून सुटली नाहीत. ‘आधी ही अशी नव्हती.’ तो स्वतःशीच म्हणाला आणि त्याला असं का वाटलं ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं.

“चहा करू गरम? आज जाणार आहेस का ऑफिसला?”

त्यानं फक्त मान डोलावली. ती बाहेर गेली. तो परत आडवा झाला आणि सगळ्याचा अर्थ लावायचा डोक्यात प्रयत्न करू लागला.

सगळं ओळखीचं होतं, पण तरी अनोळखी. कोण होती ती सगळी माणसं? तो तिथे काय करत होता? तो पुण्यात का होता? नोकरी कुठे करत होता? डोक्यावर थोडा जोर दिल्यावर त्याला धूसर धूसर आठवू लागलं. तो सकाळी साडेसातला घरातून बाहेर पडत असे. गल्लीच्या टोकाशी ऑफिसची बस येत असे. त्यानं सवयीनं उशीच्या उजवीकडे पाहिलं. त्याचा मोबाईल आणि शेजारी घड्याळ होतं. सकाळचे सव्वा सहा वाजत होते.

त्यानं मोबाईलवर फिंगरप्रिंट लॉक उघडलं. तीन मिस्ड कॉल्स होते. तिन्ही ऑफिसचे. रात्री १० वाजता? मग त्याला आठवलं की तो नाईटशिफ्टवाल्या एका टीमलाही मॅनेज करत होता. सिनेमात जणू एखाद्याची मेमरी परत यावी तद्वत त्याला गोष्टी आठवत होत्या. ‘पण माझी मेमरी गेल्याचं बाकी कुणाला कसं काही जाणवत नसेल? की नुकतीच माझी मेमरी जाऊ लागलीय? मला काही होतंय का?’

ऑफिसचे मेल उघडून पाहिले, त्याला सगळं ठाऊक होतं, कळत होतं. सगळं नॉर्मल होतं. तो नुकताच परदेशात जाऊन आला होता, त्याच्या सेटलमेंटशी संबंधित मेल्स होते. बरोबर – जर्मनी. पंधरा दिवस तो जर्मनीत होता. पण एव्हढंच. बाकी त्याला त्या ट्रिपबद्दल काहीच आठवत नव्हतं. आणि ती त्याला असं का म्हणाली, की ऑफिसला जाणार आहेस का? तो आदल्या दिवशी मुंबईहून का परत येत होता? आणि संध्याकाळी सोफ्यावर बसल्यानंतरचं त्याला काहीच का आठवत नव्हतं?

त्यानं पर्सनल मेल उघडले. एसटीचं तिकीट होतं, पन्नास साठ नोकरीचे मेल्स होते. एक त्याच्या अत्यंत जिवलग मित्राचा मेल होता. ‘आर यू ओके?’. बस एव्हढंच लिहिलेलं होतं. त्यानं तो मेल वाचलाही होता. पण जणू आत्ताच वाचतोय असं त्याला वाटलं.

तो त्याचा जिवलग मित्र होता हे त्याला आठवत होतं. पण काहीतरी जुळत नव्हतं. त्याला कालचे प्रसंग आठवले आणि त्यानं फोटो ऍप उघडलं. कदाचित ते सगळं दुःस्वप्न असेल अशी मनोमन इच्छा करत त्यानं एक एक करत सगळे फोटो पाहिले. सेल्फी पाहिले. तेच. तिच्याबरोबरचे फोटो. हसतानाचे खूष असतानाचे.

हे नक्की काय होतं? स्वप्न की सत्य?

आणि काल आरशात पाहिलं ते? तो खडबडून उठला आणि ड्रेसिंग टेबलसमोर जाऊन उभा राहिला. तो स्वतःलाच ओळखत नव्हता. आरशात जो होता, तो तो नव्हता.

----

एकदम त्यानं डोळे उघडले. मध्यरात्र होती. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्यानं काय पाहिलं होतं ते त्याला लख्ख आठवत होतं. शेजारी बायको झोपली होती आणि ती, तीच होती. त्यानं ठरवलं, आज मात्र विसरायचं नाही. पटकन लॅपटॉप उघडून तो टाईप करू लागला.

पहाटे पुन्हा कधीतरी त्याचे डोळे उघडले. बायको अजूनही शेजारी झोपलेलीच होती, पण आता काहीही आठवत नव्हतं. कदाचित काही स्वप्नच पडलं नव्हतं. मग एकदम त्याला आठवलं आणि त्यानं उठून लॅपटॉप उघडला. त्याला भीती वाटत होती की मध्यरात्री उठल्याचंही स्वप्नच तर नसावं. पण डेस्कटॉपवरच ती फाईल होती. त्यानं एक एक डिटेल नीट लिहून ठेवली होती. त्याचं मन थोडं शांत झालं. नेहमीप्रमाणे आवरून तो ऑफिसला गेला.

संध्याकाळी लवकर निघून तो डॉक्टरांकडे गेला.

“धीस लूक्स इंटरेस्टिंग!” डॉक्टर त्याने दिलेले प्रिंटआऊट्स वाचत म्हणाले. “कधी जाग आली म्हणालात तुम्हाला?”

“मध्यरात्री. मग परत पहाटे उठलो, तेव्हा काहीही आठवत नव्हतं.”

“मेक्स सेन्स. रात्री REM झोपेतून उठला असणार तुम्ही. Rapid Eye Movement अर्थात तीव्र नेत्रचलन. पहाटे तसं नसेल.”

“आय नो डॉक्टर.” तो डॉक्टरांच्या चेहऱ्यावर विश्वास आहे की अविष्वास त्याचा अदमास बांधण्याचा प्रयत्न करत होता.

“राईट. यू आर ट्रेन्ड.”

“ते आहेच, पण मी स्वप्न ह्या विषयावर बरंच वाचन करतोय सध्या.” त्याच्या बोलण्यात कुठलीही आढ्यता नव्हती. डॉक्टर त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते.

“ह्म्म.” डॉक्टर थोडे विचारात पडत म्हणाले. “कदाचित असं तर नसेल की तुमच्या ह्या वाचनामुळे तुम्ही ह्या चक्रात अजून अडकत चालले असाल? मनी वसे ते स्वप्नी दिसे.” डॉक्टरांच्या उभट चेहऱ्यावर डाव्या डोळ्याच्या शेजारी आणि गालाच्या वर कोपऱ्यामध्ये एक मोठा व्रण होता. कधीतरी पडलेली खोक असावी, पण जाणवू येण्याएवढी मोठी होती. मेंदूचं ऑपरेशन झाल्यावरही असंच दिसत असेल का? असा एक विचित्र विचार त्याच्या मनात येऊन गेला.

“कम ऑन डॉक्टर. मी एव्हढा वेडा वाटतो का तुम्हाला?”

“जे झालंय तुमच्या आयुष्यात, त्यानं मनावर थोडा परिणाम होणं स्वाभाविक आहे.” डॉक्टर एखादा मुद्दा अधोरेखित करत तेव्हा त्यांच्या भुवया ते एकदम वर करत आणि तो व्रण एकदम प्रश्नचिन्हासारखा दिसू लागे.

तो एकदम चिडून उठला. “एकदा तुम्ही मनाशी खूणगाठ बांधलीत तर मग झालंच. तुम्ही थोडे वेगळे आहात असं आमचे ट्रेनर म्हणाले होते. पण.. असो. मी पाहून घेईन पुढे काय होतं ते. तुम्ही केलीत तेव्हढी मदत पुरे झाली.” असं म्हणत तो दरवाजाकडे निघाला.

“एक मिनिट.” डॉक्टर जोर देऊन म्हणाले. “ज्याला बरं व्हायचं असतं, तो माझ्याकडे येतो. ज्यांना माझी पातळी जोखायचीय किंवा उत्तरं शोधायचीयत त्यांची मी मदत करू शकत नाही. तुम्ही जोवर तुम्हाला समस्या आहे हे मान्य करणार नाही, तोवर मी काहीच करू शकणार नाही. शुभेच्छा!”

तो रागारागानंच इमारतीतून बाहेर पडला. ‘डॉक्टर म्हणत होते ते खरं असेल का? आता तर चार महिने होत आले. अजूनही मी त्यातून सावरलो नसेन? पण असं का झालं माझ्यासोबत? का सावरावं मी? असा तडाखा का बसावा? असं दुःख वाट्याला का यावं?’

त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. गाडी काढून तो गेटबाहेर पडला. त्या गल्लीतून बाहेर पडताना सहजच त्याचं लक्ष कोपऱ्यावरच्या इमारतीकडे गेलं. ती इमारत बाकीच्यांमध्ये उठून दिसत होती. वेगळीच. आणि त्यावरच्या एका बोर्डानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. “विनायक खरे. थियरिस्ट.” बस, एव्हढाच बोर्ड होता. त्याला गंमत वाटली. इमारतीला पार्किंग दिसत नव्हतं. गाडी रस्त्यावरच लावून तो इमारतीत शिरला.

एव्हढ्या छोट्याशा इमारतीच्या मानानं सिक्युरिटी मस्त होती. रिव्हॉल्व्हिंग डोअर्स होते. चकाचक ठेवण होती. लिफ्टनं तो दुसऱ्या मजल्यावर गेला आणि एका दारावर पुन्हा तशीच पाटी होती, ते ढकलून तो आत शिरला.

“या. बसा.” आवाजाच्या दिशेनं त्यानं पाहिलं तर एक स्पीकर होता. तो जवळच असलेल्या सोफ्यावर बसला. दोनच मिनिटांनी एक दार उघडलं आणि त्यातून एक जवळपास त्याच्याच अंगकाठीचा मनुष्य बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं.

तो त्याच्यासोबत आत गेला. आत एक छोटीशी अभ्यासिका होती. टेबलावर एका लहान मुलाचा हसरा फोटो होता. शेजारच्या फ्रेममध्ये एक स्त्रीचा फोटो होता. त्या स्त्रीला त्यानं कुठेतरी पाहिलं होतं. पण कुठे? बाकी पाच-सहा पुस्तकांचा पसारा आणि पाण्याची बाटली आणि दोन ग्लास, बस एव्हढंच टेबल.

“आय डोन्ट गेट व्हिजिटर्स. काय काम काढलंत तुम्ही?” खरे पाण्याचा ग्लास समोर करत म्हणाले.

“पण मग तुम्ही बाहेर पाटी का लावली आहे?”

“हाहा. ती होय. गंमत म्हणून. आजूबाजूचे लोक माझी थट्टा करतात, त्यामुळे मी मुद्दाम तशी पाटी लावली आहे. यू नो. इफ यू कान्ट बी फेमस… वगैरे वगैरे..”

तो थोडा नर्व्हस झाला.

“अरे. काळजी नका करू. तुम्हाला काहीही वाटलं असलं तरी मी तुमची मदत करु शकलो तर नक्की करीन.”

“खरं सांगायचं तर मलाही माहित नाही मी का वर आलो ते. तुमचं नाव आणि वेगळीच पाटी…तुम्ही नक्की कसले थियरिस्ट आहात?”

“नावाचं काय?”

“ते सोडा ना सर. थियरिस्ट कसले आहात?”

“कसलाही ठराविक नाही. मी अभ्यासक आहे. बऱ्याच गोष्टींचा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित, पॅराफिजिक्स, पॅरानॉर्मल.”

त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिह्न उमटलं. ते खरेंनी लगेच ओळखलं.

“म्हणूनच लोक थट्टा करतात.”

“नाही. मला तसं नाही वाटत. मला… खरं तर मदत हवी होती थोडी.”

“बोला ना.”

“मला स्वप्नं पडतात. विचित्र, स्पष्ट आणि तुटक. कधी लहान, कधी मोठी. कधी लक्षात राहतात, कधी नाहीत. हळूहळू लांबी वाढत चाललीय असं वाटतंय.”

खरे विचारात पडले. जागेवरून उठले आणि पुस्तकांच्या एका शेल्फकडे चालत गेले. “ओनेरॉलॉजी” ते प्रकट म्हणाले. “स्वप्नशास्त्र” त्यांनी दोन पुस्तकं काढली.

खाली वाकले आणि बऱ्याच वह्या होत्या त्या काढल्या आणि परत टेबलाकडे आले.

“काही वर्षांपूर्वी मी बराच रिसर्च केला होता.” वह्यांवर हात थोपटत ते म्हणाले.

“मग, तुम्ही मदत करु शकता?”

“हो. पण तुम्हालाही स्वतःची मदत करायला लागेल.”

“काय?”

“ही दोन पुस्तकं घेऊन जा आणि वाचून झाली की परत या. मग आपण बोलू.” त्यांनी ती दोन पुस्तकं त्याच्या दिशेनं सरकवली.

“ओनेरॉलॉजी : अ स्टडी इन ह्यूमन ड्रीम्स” मायकेल कारमायकेल आणि “इन युअर ड्रीम्स” चार्ल्स फिनली.

----

“डॉक्टर प्लीज हेल्प हिम.” ती डोळ्यांत पाणी आणून डॉक्टरांना सांगत होती.

“तुम्ही त्यांना घेऊन आला आहात का?”

“हो, पण त्याला खरं नाही सांगितलंय मी. तो मॅटर्निटी वॉर्डच्या बाहेर बसला आहे. मी माझ्यासाठी आलेय असं सांगून त्याला घेऊन आले आहे.”

डॉक्टर विचारात पडल्या. “ओके. एक काम करा, त्यांना सांगा की मी मॅटर्निटी सायकोलॉजिस्ट आहे. तिथल्या एका कन्सल्टिंग रूममध्ये भेटू आपण.”

 

“काय प्रॉब्लेम वाटतो मॅडम.” डॉक्टर पहिल्यांदाच बोलाव्यात तशा बोलल्या.

तिनं त्याच्याकडे एक क्षण पाहिलं आणि म्हणाली. “आम्हाला फार त्रास होतोय डॉक्टर. सहन होत नाही आता. रात्र रात्र झोप लागत नाही.”

“आणि तुम्हाला?” डॉक्टरांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं.

तो टेबलावरची स्टेशनरी निरखत होता. डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पेपरवेट ओढून घेतला आणि ड्रॉवरमध्ये ढकलला.

“नाही लागत झोप?” तो मनाशी विचार करत होता.

“अजून?”

“अजून काय?”

“यू हॅव टू ओपन अप.”

“मी कशाला ओपन अप होऊ. थेरपी हिच्यासाठी आहे ना?” तो मोबाईलशी चाळा करत म्हणाला.

“मला काळजी वाटते तुझी.” ती एकदम म्हणाली.

“काय झालं काळजी करायला. समर्थ आहे मी स्वतःला सांभाळायला.” तो एकदम तीक्ष्णपणे म्हणाला.

तिच्या डोळ्यांत आता निराळीच वेदना आली. “अनोळखी नजरेनं बघतोस हल्ली. माझ्याकडे, आईंकडे, सगळ्यांकडे. विचित्र पद्धतीनं बोलतोस. शून्यात पाहतोस. जवळ येत नाहीस. घरी उशीरा येऊन लवकर जातोस. तुझ्या ऑफिसातलेही लोक तेच म्हणतात. फक्त.. फक्त अरूणाशी बोलतोस. तू जे काही बोलतोस, ते तिलाही कळत नाही, फक्त तू बोलतोस म्हणून ती ऐकत होती. तिलाही तुझी काळजी वाटली म्हणून ती घरी आली आणि मला सगळं सांगितलं. माझीही मदत ह्याच डॉक्टरांनी केली होती.” तिला हुंदका अनावर झाला. “ते झाल्यावर.” मग तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

त्याच्या डोक्यात कल्लोळ माजला होता.

‘कोण आहे मी. का मला जाणवतंय ही म्हणतेय ते दुःख. नको वाटतंय हे सगळं. सगळं अनोळखी आणि सगळं परिचितही.

“इट हॅज जस्ट बीन अ मंथ. त्रास दोघांनाही आहे आणि थेरपीची गरज तुम्हा दोघांनाही आहे.”

आणि एकदम त्याला जाणवलं काय झालं होतं ते. एक महिन्यापूर्वी. त्याच्या अंगावर शहारा आला. त्यानं तिच्याकडे पाहिलं. तिच्या खोल गेलेल्या डोळ्यांतली वेदना त्याला जाणवली. आरशात दिसणाऱ्या चेहऱ्याच्या सदैव लाल डोळ्यांमागचं कारणही कदाचित कळलं होतं. छातीवर सदैव जाणवणाऱ्या दडपणामागचं सत्यही उलगडलं होतं.

“हे सगळं स्वप्न आहे. हे खरं नाही. सगळं सगळं स्वप्न आहे. दुःस्वप्न आहे हे. थांबत का नाहीये हे. का परत परत मी ह्याच स्वप्नात येतो. का परत परत हीच वेदना आणि हेच दुःख भोगतोय.” त्यानं डोळ्यांवर हात ठेवला आणि ढसाढसा रडायला लागला.

तिनं त्याच्याभोवती हात ठेवले आणि त्याला मिठी मारून तीही रडायला लागली.

तो मनात वाट पाहत होता, पण त्याला जागच येत नव्हती.

----

“झालीदेखील पुस्तकं वाचून?” खरे हसत त्याच्याकडे पाहत होते. “तीनच दिवस झाले आपल्याला भेटून.”

“झोपलोच नाही मी गेले दोन दिवस.”

“म्हणजे एक दिवस झोपलात.” खरे विचार करत म्हणाले. “लेट मी गेस. ह्यावेळेसच्या स्वप्नानंतर हिंमत झाली नाही झोपायची?”

त्यानं तारवटलेल्या लाल डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत फक्त मान डोलावली.

“लेट्स स्टार्ट.”

“काय सांगू.”

“लेट्स स्टार्ट विथ… तुम्ही माझ्याशी का बोलताय? व्हाय डू यू थिंक आय कॅन हेल्प यू.”

“माहित नाही. खरंच माहित नाही. कदाचित, तुम्ही डॉक्टर नाही म्हणून. ज्ञानाचा भपकारा नाही म्हणून. मी वेडा आहे हे ठरवून तुम्ही मला पाहत नाही म्हणून कदाचित.”

“इंटरेस्टिंग. मी डॉक्टर नाही हे टेक्निकली सत्य नाही. मी पीएचडी आहे.” खरे हसत म्हणाले.

“मुख्य म्हणजे, मला स्वप्न पडतात म्हटल्यावर तुम्ही एक क्षणही माझ्यावर अविश्वास दाखवला नाहीत.”

“बीन देअर, डन दॅट.” खरे पुन्हा हसले.

“कसं करायचं?”

“हं.” खरे स्वतःची नोंदवही समोर ओढत म्हणाले. “लेट्स बिगिन विथ कॅरॅक्टर मॅपिंग.”

“मी म्हणजे मीच आहे, पण इथे आहे तसा दिसत नाही. माझी आई, माझी आईच आहे, पण, पण ती वेगळी दिसते असं मला वाटतं. पण तरी मी तिला ओळखतो, ती माझी आईच आहे, पण माझं स्वतःचं तसं नाही. माझी इथली बायको म्हणजे, तिथली ऑफिसातली कलिग.”

“आणि तिथली बायको? इथे कुणीतरी सिग्निफिकंट असेल ना.”

“तेच तर कळत नाही. ती इथे कुणी नाही.”

“असं कसं. नीट विचार करा. नक्कीच कुणीतरी असेल.”

“ओळखीचा आहे चेहरा. पण आय कान्ट प्लेस इट.”

“सम ओल्ड फ्लेम? क्रश?”

“फ्रॉईड?”

“कोण फ्रॉईड?”

“यू मस्ट बी जोकिंग.” म्हणून तो क्षीण हसला.

“ठीक. हरकत नाही. आठवेल तुम्हाला. हळू हळू चित्र उलगडतंय असं म्हणत होतात.”

“हो. आधी क्षण, दोन क्षण लक्षात दिसायचे, लक्षात राहायचे. मग तास, दोन तास, आता दिवसच्या दिवस दिसतो. इकडचे तिकडचे तुकडे लक्षात राहतात. मी लिहून ठेवायला सुरूवात केली. आधीचंही जे आठवलं ते ही लिहून ठेवलं.”

“गुड.”

“तुम्हाला वाचायचंय?”

“नको. मला ऐकायला आवडेल तुमच्या तोंडून.”

ते कसं.

“ल्युसिड ड्रीमिंगचा प्रयोग करू आपण. सजग स्वप्नावस्था.”

“पण त्यासाठी इक्विपमेंट वगैरे लागतील का?”

“कशाला? ड्रग्ज माझ्याकडे आहेत. मला तुमची ब्रेन ऍक्टिव्हिटी वगैरे मॅप करायची नाही. रेम झोप मला अशीही कळेल. 

“पण काही प्रॉब्लेम झाला तर?”

“तुम्ही म्हणालात की काही कारणानं तुम्हाला माझा विश्वास वाटतो.” खरे त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले. “पुन्हा माझ्या काही थियरीज चाचपून पाहण्याची ही योग्य संधी आहे.”

“थियरीज?” तो चिडून म्हणाला. “ते महत्वाचं आहे तुमच्यासाठी?”

“एका गोष्टीतून दुसरी गोष्ट घडत असेल तर प्रॉब्लेम काय?”

“नाही.” तो जागेवरून उठत म्हणाला. “आता मला तुमच्यावर विश्वास ठेवल्याचा पश्चात्ताप होतोय.”

“तुम्ही मला शोधत इथे आलात. काहीतरी कारण असेल. मी डॉक्टर नाही, थेरपिस्ट नाही. ही फक्त माझी अभ्यासिका आहे. मी फक्त मदत करतोय, मला तुमच्याकडून काहीही नकोय. तुमची इच्छा असेल तर थांबा. नाही तर हरकत नाही.” खरे शांतपणे म्हणाले.

“आपण करू प्रयोग.” तो थोडा शांत होत म्हणाला. “पण आधी मी एकदा माझ्या घरी भेटून येतो सर्वांना.”

“अहो काही होणार नाही तुम्हाला.”

“पण मी, मीच राहीन ही शाश्वती देऊ शकता तुम्ही?”

खरे गप्प राहिले.

“पण एक गोष्ट. प्रयोग करण्याआधी, मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. तुम्ही नुसतंच कॅरॅक्टर मॅपिंग घेतलंत.”

“गोष्ट ऐकल्याशिवाय काय निष्कर्ष काढू?”

“डिस्जंक्टिव्ह कॉग्निशन?”

“तुटक आकलन. गुड. पुस्तकं वाचली आहेत तुम्ही. म्हणूनच पुस्तकं दिली आहेत तुम्हाला. इथे मी डॉक्टर तुम्ही पेशंट असं रिलेशन नाही. आपण दोघांनी मिळून ह्याचा माग काढायचा आहे.” खरे नोंदवही उघडत म्हणाले. “तुम्ही स्वतः आणि तुमची आई, ह्या तुटक आकलनाचा परिणाम असू शकता. तुम्हाला माहित आहे की ते तुम्ही आहात, आणि तरी तुम्ही तसे दिसत नाही. स्वप्नशास्त्रामध्ये शेकडो केसेस आहेत अशा. पण खरं सांग़ायचं तर तुमची स्वप्न त्या पलिकडली वाटतात. तुमची बायको, तुमची तिकडची बायको, इट्स व्हेरी पिक्युलिअर. म्हणून जोवर तुम्ही गोष्ट सांगत नाही, किंवा सांगू शकत नाही, मला निष्कर्ष काढायचा नाहीये.”

“पण तुमच्या थियरीज?”

खरे उठून पुस्तकांच्या शेल्फकडे गेले. एक पुस्तक त्यांनी शोधून काढलं आणि त्याला आणून दिलं.

“थियरी ऑफ मल्टिपल ऍंड शेअर्ड कॉन्शसनेस”, विनय खरे

“अनेक जागृतावस्था आणि सामायिक जागृतावस्थांचा सिद्धांत.” खरे गंभीरपणे म्हणाले.

“तुम्ही सगळं मराठीत का सांगताय मला?”

“कारण माझं पीएचडी मराठीत केलेलं आहे, मी पुस्तक इंग्रजीमध्ये जागतिक आकलनासाठी लिहिलं आहे.”

“काय? मराठीत?”

“ते सोडा हो.” खरे विषय बदलत म्हणाले. “ही माझी थियरी. माणूस एका वेळी दोन जीवनं जगू शकतो का? एकमेकांना न कळता असेल तर अनेक आणि एकमेकांना कळत असेल तर सामायिक. क्वांटम फिजिक्सचे नियम वळवता आले तर हे शक्य होऊ शकतं का असा उहापोह केलेला आहे.”

“म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मी एकाच वेळी अनेक आयुष्य जगतोय?”

“माहित नाही. तेच सिद्ध तरी करायचंय किंवा खोडून तरी काढायचंय. शास्त्रज्ञ म्हटलं की सिद्धांत खरा की खोटा हे दोन्ही तितकंच महत्वाचं. खरा असेल तर आपला विजय, खोटा असेल तर पुढच्या पावलासाठी रस्ता स्पष्ट होतो.”

तो पुस्तकाचं मलपृष्ठ पाहत होता.

“या तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटून. मी तयारच आहे प्रयोगासाठी.”

तो विचारमग्न अवस्थेतच बाहेर पडला.

----

क्रमशः

भाग -२

12/04/2022

पुनश्च हरिओम

गाडी चालवत असताना एखादं गाणं अचानक कानावर पडतं. कधी कधी मला असं बरं वाटतं, की एक साधारण १५ - २० वर्षं जुनी गाणी लागणारं स्टेशन लावून गाडी चालवावी, कुठलंही यादॄच्छिक गाणं कानावर पडावं, आपलं काहीही नियंत्रण नसताना. एखादं आवडतं, एखादं माहितही नसतं, एखादं कंटाळा आणतं, एखादं असंही गाणं कधी होतं असा विचार येऊन हसू आणतं तर एखादं आठवणींच्या जगात घेऊन जातं. पण सगळ्यात विचित्र भावना होते ती एखाद्या अशा गाण्याने, जे आपण आत्ताच्या क्षणी ऐकताना वेगळाच अर्थ घेऊन येतं, जो आपल्याला १५ - २० वर्षांपूर्वी एकतर कळला नव्हता किंवा वयाच्या, आयुष्याच्या त्या टप्प्यावर साजेसा अर्थ लागला होता, आज सर्वस्वी वेगळा अर्थ लागतो. त्या शब्दांतली गंमत एकदम चमकून जाते, स्वतःशीच आणि स्वतःचंच हसू येतं. शब्दांची ताकद ही ते ऐकणाऱ्या-वाचणाऱ्याच्या मनात किती आणि कागदावर किती हा प्रश्न पडतो आणि लेखक किंवा शब्दरचनाकाराचा आणि वाचक किंवा आस्वादकाच्या परस्परावलंबनाची नवीच बाजू समोर येते.

मग स्वतःच कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेले लेख, कथा डोक्यात फिरायला लागतात. मी आत्ता जो विचार करतोय आणि मला जो विचार फार वैचारिक किंवा भारी वाटतोय, तो विचार कदाचित वैश्विक आहे. जगातल्या प्रत्येक लेखक, कलाकार किंवा कसलंही काम करणाऱ्या किंवा केलेल्या माणसानं केलेला. जसं मी काहीतरी असामान्य करून दाखवेन हा जगातल्या प्रत्येक माणसानं केलेला एक अतिसामान्य विचार आहे, तद्वतच आपल्याला काहीतरी फार मोठं गुपित उकललंय असं वाटतं तेव्हा ते निश्चितच ह्याआधी कुणीतरी सोडवलं असणार हे निश्चित. मानवी विचार आणि त्याचे विविध आविष्कार हे आपल्याला वाटतात तेवढे अद्वितीय नसतात असं माझं ठाम मत आहे. हजारो वर्षांपासून, विविध संस्कृतींमधून, भाषांमधून, कलाकृतींमधून मला नाही वाटत की काही नवं उरलं असेल. विचारांचं प्रकटीकरण बदलत असेल, पण मूळ विचार, मूळ कल्पना, त्यामागचं तत्व, त्यामागचा तर्क.. सगळं तेच असावं. जसं ऊर्जा आपण म्हणतो, ती निर्माणही करता येत नाही आणि नष्टही होत नाही, आहे तीच वेगवेगळी रूपं घेऊन समोर येते. विचार ही ऊर्जाच नाही का? असो. ह्या विषयावर कुणाचंही एकमत होणं शक्य नाही आणि ते व्हावं अशी अपेक्षाही नाही. मुद्दा हा की एकच गोष्ट स्थल, काल आणि पात्र बदलली की पूर्णपणे वेगळी वाटू शकते, पण म्हणून ती वेगळी ठरते का?

हा सगळा रतीब घालण्याचं कारण की, पुन्हा लेखणी उचलावीशी वाटतेय पण पूर्वी ज्या सहजतेनं विचार उतरायचे ती सहजता वाटत नाही, प्रत्येक शब्दाला पन्नासवेळा पारखावंसं वाटतं, जोखावंसं वाटतं. प्रत्येक विचाराचं मूल्यमापन करावंसं वाटतं. आयुष्याचा बदललेला टप्पा, बदललेलं स्थल आणि बदललेले आपण स्वतः, मग तोच विचार जो कदाचित १२ वर्षांपूर्वी आला होता, तो पूर्णपणे वेगळा न वाटेल तर नवलच.

तर आता परत लिहिणं होईल, कदाचित मला ते वेगळं वाटेल, पण नसेल. कदाचित वाचकांनाही वेगळं वाटेल, पण नसेल किंवा असेलही. फक्त ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित झाल्याशी मतलब.


6/24/2021

टेकर!!

एकदा एक मराठी मुलगा पहिल्यांदाच परदेशात चर्चमध्ये जातो. एकदम सुनसान चर्चमध्ये एका बाकड्यावर बसून तो आजूबाजूचा अंदाज घेत असतो. त्याचवेळी लाईट जातात आणि एकदम तासाची घंटा जोराजोरात वाजते. तो एकदम घाबरून म्हणतो - "आईच्या गावात, अंडरटेकर आला वाटतं."

---

आता वरच्या जोकमधल्या तार्किक घटकांना सोडून देऊ, पण हा जोक म्हणजे माझ्यासारख्या असंख्य मुलांना थेट त्यांच्या बालपणात घेऊन जातो. डब्ल्यूडब्ल्यूएफ बघणाऱ्या पोरांमध्ये अंडरटेकर ऊर्फ़ टेकरचं मानाचं स्थान होतं. तो टेकर काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाला. त्या दिवशी ही पोस्ट लिहायला सुरू केली होती. ३० वर्षं टेकर व्यावसायिक कुस्ती खेळला आणि शेवटी 'डेड मॅन वॉकिंग' चं ही वय झालंच. एकदम वय वाढल्यासारखं वाटलं मलाही.

माझ्या बालपणामध्ये ह्या डब्ल्यूडब्ल्यूएफ ऊर्फ़ डब्ल्यूडब्ल्यूई चा वेगवेगळ्या पद्धतीनं शिरकाव झाला होता. सगळ्यात पहिल्यांदा हे असं काही प्रकरण असतं हे कळलं ते ट्र्म्प कार्ड गेममुळे. शाळेत विविध वेळी विविध प्रकारचे वारे वाहायचे. कधी सॉरेड, कधी च्युईंग गमवरची क्रिकेट कार्ड, तर कधी हे ट्रंप कार्ड. नक्की कुणी मला पहिल्यांदा दाखवली माहित नाही, पण मी काही काही खटपटी लटपटी करून बरीच कार्ड गोळा केलेली. मग प्रत्येकाचे चेस्ट, बायसेप्स, उंची, किती मॅच खेळला, किती हरला वगैरेचं कंपेअर करून डाव खेळायचे हा आता अत्यंत निर्बुद्ध वाटणारा खेळ आम्ही तासनतास खेळत असू.

तरी तोवर मी प्रत्यक्षात मॅचेस पाहिल्या नव्हत्या. घरी केबल नव्हतं म्हणून असेल पण नव्हत्या पाहिल्या हे खरं. कार्डावरूनच ओळख होती. त्यातही नेहमी हमखास जिंकवणारा म्हणजे टेकर. उंची सांगायची किंवा किती जिंकला ते सांगायचं. अगदीच आंद्रे द जायंट असेल समोर तरच उंचीवर हरणार किंवा ब्रेट हार्ट असेल तर किती जिंकला त्यावर.

मग कधीतरी डब्ल्यूडब्ल्यूएफ पाहायला सुरूवात झाली. ते सगळं खोटं असतं वगैरे सगळ्यांनी कितीही सांगितलं तरी त्या वयात ते खरं असावं असं समजण्यातच मजा होती. अंडरटेकर मेलेला आहे, अंडरटेकर बरोबर जो पॉल बेअरर हातात मडकं घेऊन येतो त्यात अंडरटेकरची राख आहे इत्यादी अनेक अफवा चवीन्ण चघळायला भयंकर मजा यायची. मग ते अंडरटेकरचं येणं, होणारा काळोख, वाजणारी घंटा, तो कोट घातलेला पॉल बेअरर. एकदम वातावरणनिर्मितीची परिसीमा होत असे. मग अंडरटेकर केसांमध्ये तोंड लपवून येणार. कधी डायरेक्ट रिंगमध्येच उगवायचा. एकदोनदा कॉफीनमधून आणलेला. तो चेहरा दाखवायचा तेव्हा डोळ्याची बुबुळं वर करून डोळे पांढरे करायचा. मी तसं करण्याची बरेच दिवस प्रॅक्टीस केली आणि मग आईला करून दाखवून मारही खाल्ला. त्या वयात जो ठसा माझ्या बालमनावर उमटलाय तो वेगळाच. मला अजूनही अंडरटेकरसारखे डोळे करता येतात. त्यात तसं काही फार भारी नाही, पण अंडरटेकरसारखे हेच त्यात भारी.

अंडरटेकरची सगळ्यात फेमस माझ्या लहानपणीची माझ्या लक्षात राहिलेली मॅच म्हणजे अंडरटेकर विरूद्ध योकोझुना. योकोझुनाची फिनिशर मूव्ह होती ती प्रतिस्पर्ध्याला रिंग़च्या कोपऱ्यात ओढत न्यायचं आणि रिंग़वर चढून उडी मारून त्याच्या छाताडावर बसायचं. आता हा योकोझुना जपानी सुमो कुस्तीगीर होता, २५० किलोचा ऐवज. तो उडी मारणार म्हणजे संपलंच. मग प्रतिस्पर्धी हरायचा. पंच १-२-३ मोजायचा की मॅच संपली. आम्ही सगळे मित्र एकदम एक्साईटेड होतो. पण हाय रे दुर्दैवा, १० - १५ मिनिटांतच योकोझुनाने टेकरला आडवा घातला आणि कोपऱ्यात फरफटवत नेत उडी मारली आणि त्याच्या छाताडावर बसला. मग हळूहळू विजयी मुद्रेनं उठला आणि पंचाकडे बघू लागला. पंच आला, १ - २ आणि एकदम टेकर उठून बसला. 

सगळं खोटं आहे, सगळं स्क्रिप्टेड आहे, सगळं माहित असूनही मी जो आनंदलो होतो. योकोझुना मेलेल्या माणसाला काय हरवणार. टेकर टेकर आहे. टेकर मॅच जिंकला. 

माझ्याकडे टेकरचा एक फोटो होता, तो मी ज्यावर्षी शाळेत डब्ल्यू डब्ल्यू एफ फोटो एक्सचेंजचं वारं आलं होतं त्यावर्षी ब्रेट 'द हिटमॅन' हार्ट च्या फोटोबदल्यात मित्रासोबत बदलला होता. ही दुर्बुद्धी का सुचली माहित नाही. बाय द वे, रोहित शर्माच्या आधी असल्यानं माझ्यासाठी ब्रेट हार्टच कायम हिटमॅन राहिल. पण कितीही काही म्हणा, अंडरटेकरची बातच और. हिटमॅन अंडरटेकरलाही हरवत असे, कारण डब्ल्यू डब्ल्यू ई च्या स्क्रिप्टमध्ये हिटमॅन कायम नायक होता. अंडरटेकर कधीच नायक-खलनायक नव्हता. अंडरटेकरचं स्वतंत्र अस्तित्व होतं.

कॉलेजला जायला लागल्यावर मी फार नियमितपणे डब्ल्यू डब्ल्यू एफ पाहत असे. आपल्याकडे २ -३ दिवस उशिरा लागत असत मॅचेस मग मी वेबसाईटवर निकाल पाहून मग ठरवायचो कुठली मॅच पाहायची वगैरे. मी आणि माझ्यासोबत माझा अजून एक कॉलेज मित्र आम्ही फार मनावर घेत असू. एकदम वेड लागल्यागत. आता आठवलं की हसू येतं पण त्यावेळेस फार भारी वाटायचं, त्यातल्या कुणा कुणासारखी बॉडी बनवायची वगैरे ठरवायचं. ती बॉडी कधी बनली नाही ते सोडा, पण बाकी सगळं बाजूला ठेवलं तरी त्या डब्ल्यू डब्ल्यू एफनं अनेकांना व्यायामाची गोडी लावली.

मग काळ बदलला. डब्ल्यू डब्ल्यू एफ चं डब्ल्यू डब्ल्यू ई झाल्यावर त्यांनी बऱ्याच गोष्टी बदलल्या. टेकर नॉर्मल झाला. मोटरसायकलवरून यायचा. डोळे नॉर्मल असायचे. एंट्रीला गाणं वाजायचं. तो नायक झाला. त्याचा भाऊ केन खलनायक म्हणून आणला (तो प्रत्यक्षात त्याचा भाऊ नाही). बऱ्याच नव्या स्क्रिप्टस आल्या. द रॉक नायक झाला आणि निवृत्तही झाला, मग जॉन सीना नायक झाला आणि तोही निवृत्तीला आला. पण टेकर तिथेच होता. घरातल्या कर्त्या पुरूषासारखा. वाढत्या वयातही टेकरचे स्टंट्स खतरनाकच होते. त्यानं लोकांचं मनोरंजन करण्यात काही कसूर केली नाही. अगदी निवृत्त होईपर्यंत तो उत्तम खेळाडू होता. पडद्याबाहेरचं आयुष्यही फार रसभरीत कधीच नव्हतं की डब्ल्यू डब्ल्यू ई मध्येही काही त्याच्या स्क्रिप्टमध्ये बायका, लफडी वगैरे प्रकार नसायचे. टेकरचा मान होता आणि तो शेवटपर्यंत राहिला.

डब्ल्यू डब्ल्यू ई च्या कुस्त्या काही फार सन्माननीय खेळ नाही, ते मनोरंजन आहे पण खेळाडूंना मेहनत तेव्हढीच घ्यावी लागते. त्यात पुन्हा ग्लॅमर, व्यसनं - ह्या सगळ्यांतही ३० वर्षं टिकून राहणं हे कर्तृत्वच आहे. माझ्या आणि माझ्यासारख्या अनेकांच्या बालपण आणि किशोरवयाचा एक कोपरा व्यापून टाकणाऱ्या टेकरला मानाचा मुजरा!

5/28/2020

दधिची

दरवर्षीप्रमाणे २८ मे येतो. सावरकरांच्या शौर्याच्या गाथांचे फॉरवर्ड पाठवतं, कुणीतरी त्यांच्या गीतांच्या रेकॉर्डिंग पाठवतं, कुणी त्यांना अभिवादन करतं, कुणी त्यांचे फोटो डीपी म्हणून, स्टेटस म्हणून लावतं, तर कुणी त्यांच्या लेखांचे संक्षेप किंवा त्यांच्याबद्दल त्याकाळात लिहून आलेल्या, बोलल्या गेलेल्या गोष्टींबद्दल माहिती पाठवतं.
तर कुणी मुद्दामहून माफीवीर टाईप पोस्ट टाकतं, कुणी ५ मिनिटांच्या टीआरपीसाठी लक्षवेधक शीर्षकं देऊन विशेष कार्यक्रम करतं (आणि मग लोकांनी तोंडी शेण घातलं की माफी मागतं), कुणाला त्यांनी बीफ खाणं योग्य होतं म्हणून सांगितल्याचं आठवतं, कुणाला ते कट्टर असल्याचा साक्षात्कार (सालाबादप्रमाणे) होतो.
दिवस संपतो.

इंग्रजीमध्ये एक सुंदर शब्द आहे - 'एनिग्मा'.
Enigma a person or thing that is mysterious or difficult to understand

ह्या पुस्तकी व्याख्येतही त्या शब्दाचा खरा मतितार्थ बसत नाही, पण तरी अंदाज येण्यासाठी एव्हढा अर्थ पुरे, की ज्याचा थांग लागत नाही असा - अथांग. तरी अथांग हे त्याचं शब्दशः भाषांतर झालं अर्थशः नाही. थोडक्यात एनिग्मा हा शब्दसुद्धा मला एनिग्मा च वाटतो. पण ते असो.

सावरकरांचं वर्णन करायचं झालं, तर ह्याहून योग्य शब्द नाही. आजच्या विकाऊ लोकसंपर्काच्या काळात काय, जन्महक्काने पदावर बसलेले आणि आजन्म 'राजकीय खेळ्या' खेळलेले सुद्धा स्वतःबद्दल 'समजायला शंभर जन्म लागतील' वगैरे बिरूदावल्या आपल्या चेल्यांकडून लावून घेतात. पण खऱ्या अर्थाने जो लोकांना तेव्हाही कळला नाही आणि दुर्दैवाने (त्यांच्या नव्हे, आपल्या) आजही कळला नाही, तो सावरकर आणि त्यांचा विचार हा एक एनिग्मा आहे.

फार पूर्वीदेखील मी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे, असंच तारखांचे मुहूर्त धरून. त्यादिवशी मनातली एखादी दुखरी रग ठणकायला लागते. चीड येते उलटसुलट वाद ऐकून, विषाद वाटतो की नेहरू-गांधींच्या मार्केटिंग लाटेत अनेक अस्सल देशभक्त योद्ध्यांसारखी ह्यांचीही आठवण अज्ञातात विरून चालली आहे  , लाजही वाटते की आपण कितीही प्रयत्न केला तरी एक सहस्रांशदेखील ते धैर्य, ती चिकाटी, ते साहस, ती जिद्द, ती सहनशक्ती आणि पराकोटीची आत्मिक शक्ती स्वतःच्या अंगी बाणवू शकत नाही. पण आनंदही वाटतो की त्या त्या तारखांना पडणारे डीपी, स्टेटस वाढताहेत, देशाचे पंतप्रधान अभिमानानं आणि नम्रतेनं प्रत्येक तिथी तारखेला औपचारिकता म्हणून नाही तर मनापासून अभिवादन करत आहेत. पण हे सगळं स्वतःबद्दल आहे. ह्या माझ्या भावना, माझ्या अपेक्षा, माझा इगो.
त्यांनी कार्य केलं, देह ठेवला. कसली अपेक्षा होती म्हणून त्यातलं काहीच नाही, हे कसलं पाणी. इथे आपण साधी देणगी दिली तर दहा जणांना कळेल असा प्रयत्न करतो. विनामोबदला काहीच नाही. आणि तिथे अख्खं आयुष्यच ओवाळून टाकलं गेलं. ते कशावर? कशासाठी? आणि कुणासाठी?

मागे त्यांच्याबद्दल लिहिलं होतं तेव्हा मी अंदमानला गेलो नव्हतो. त्यानंतर जाणं झालं. आणि त्या भेटीनंतर सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असं वाटलं. पुलं हरितात्यामध्ये म्हणतात तसं, की कधी वेळ आली तेव्हा तसं वागलो असं नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तसाच धैर्याने, चिकाटीने वागेन अशी जी एक भावना मनात निर्माण झाली ती महत्वाची होती. 
माणसाचं खरं चारित्र्य तेव्हा कळतं जेव्हा त्याच्याकडे काही नसतं, मग अंदमान ही माणसाकडून त्याचं उभं माणूसपणच हिरावून घेण्याची जागा. उरतं काय माणसाकडे त्या क्षणाला? अंदमानचं सेल्युलर जेल हे एक तीर्थक्षेत्र व्हायला हवं. देशाचे अनेक सुपुत्र तिथे होते आणि त्यांनी ह्याच देशासाठी तिथे अनंत हालअपेष्टा भोगल्या. त्यांच्या त्या हालअपेष्टा त्यांनीच मिळवून दिलेल्या स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेनं स्वतःच्या कोषात गेलेल्या त्यांच्या देशबांधवांच्या विस्मरणात गेल्या आहेत. तिथे जाऊन त्यांना उजाळा मिळू शकतो. आज लॉकडाऊनमध्ये बसून आपण मजेत आहोत आणि फिरायला मिळत नाही म्हणून दुःखी आहोत, पण दिवस दिवस दुसऱ्या माणसाचं अस्तित्वही न जाणवता फक्त कोठडीच्या दाराखाली असलेल्या वधस्तंभाचे आक्रोश ऐकत राहणं म्हणजे काय ह्याची तिथे प्रत्यक्ष उभं राहूनही कल्पना करवत नाही. कमतरता झाली तर कोलू आणि चाबकाचे फटके होतेच. हे सगळं होऊनही ज्याची जीवनासक्ती गेली नाही, ज्याची इच्छाशक्ती मेली नाही, ज्याची आत्मिक शक्ती क्षीण झाली नाही आणि ज्याची प्रतिभा कोमेजली नाही, त्याच्या चारित्र्याबद्दल काय वेगळं लिहायचं.

जसा दिवस जातो, तसं तसं पुन्हा मनावर पापुद्रे चढायला लागतात. रोजची धावपळ, कोशातली धडपड, कुटुंब-मित्रमैत्रिणी-सहकारी, थट्टा-विनोद, आशा-निराशा, यश-अपयश ह्या गृहित धरलेल्या सगळ्या गोष्टींचे एक एक थर चढत जातात. ती वेदना बोथट होते. फक्त एका गोष्टीची शाश्वती असते, की मनात ह्या सगळ्यामागे एक स्फुल्लिंग धगधगतंय. आपल्या परीनं ते तसंच सांभाळायचंय, इतरांपर्यंत पोचवायचंय.

ते अथांग आहेत, एनिग्मा आहेत. ज्याने त्याने आपला अर्थ लावायचाय. 

ह्या दधिचीनं आपला देह केव्हाच ठेवलाय. जेव्हा संकट येईल, तेव्हा लढायला लागेल ते त्यांच्या विचारांचं, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या दूरदृष्टीचं वज्र आपण पेलू शकतो का हाच खरा प्रश्न आहे?