10/07/2012

आवर रे-३

"काय बब्या!" दृष्टद्युम्न कॉफी शॉपमध्ये शिरत नेहमीप्रमाणेच जोरात म्हणाला. आणि मग नेहमीप्रमाणेच बभ्रुवाहनासोबतच कॉफी शॉपच्या स्टाफसकट सर्व गिर्‍हाईकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आणि बभ्रुवाहनाला नेहमीप्रमाणेच मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्याची मनोवस्था पाहता त्याक्षणी त्याला मेल्याहून मेल्याहून मेल्यासारखं झालं.
तो काहीही न बोलता मेन्युकार्डात डोकं खुपसून बसला. दृष्टद्युम्न सराईतपणे बब्याच्या समोरची खुर्ची ओढून बसला आणि वेटरला खूण केली. वेटर जवळ आल्याबरोबर त्यानं एक कपुच्चिनो आणि एक माक्कियातो अशी ऑर्डर केली. वेटरसोबत बब्यासुद्धा हडबडला.
"सर, यू नो व्हॉट इज माक्कियातो राईट?" वेटरनं थोडंसं कुतूहलानं आणि थोडंसं तुच्छतेनं दृष्टद्युम्नाकडे वरपासून खालपर्यंत पाहत विचारलं. दृष्टद्युम्नाचे कपडे पाहून कुणीही त्याला हडतूड करावं इतके साधे कपडे घालून तो फिरत असे आणि पायात चक्क कोल्हापुरी. आता तो काय उत्तर देतो ह्याकडे बब्याचं लक्ष लागलं होतं.
"यू नो व्हॉट इज माक्कियातो राईट?" दृष्टद्युम्नानं शांतपणे वेटरकडे पाहत विचारलं.
वेटरला काही कळेना, तो "येस सर." एव्हढंच म्हणाला.
"झालं तर. घेऊन या मग." म्हणून दृष्टद्युम्न बब्याकडे पाहू लागला. वेटर आपला पडलेला चेहरा जमिनीवर हुडकत कॉफी आणायाला गेला.
बब्या प्रचंड भडकलेला असूनही दृष्टद्युम्नाचं त्याला नेहमीप्रमाणेच प्रचंड कौतुक वाटत होतं. आणि त्याचवेळी आपण असे का वागू शकत नाही अशी एक सूक्ष्म खंतही त्याला चाटून गेली. बब्या दृष्टद्युम्नाच्या अगदी विरूद्ध. रात्री झोपतानाही असला नाईटसूट घालेल की दृष्टद्युम्न स्वतःच्या लग्नालाही घालायचा नाही.
आता नेहमीप्रमाणेच दृष्टद्युम्न काहीतरी बोलेल असं बब्याला वाटत होतं, पण तो फक्त बब्याकडे टक लावून पाहत बसला होता.
"का बे डी! आता काही बोलणार का?" शेवटी न राहवून बब्याच बोलला.
डीनं शेवटी नजर बब्यावरून काढली आणि त्याच्या हातातून मेन्युकार्ड हिसकावून घेतलं. "तू काय मेन्युकार्ड पाठ करत होतास काय? की कुणीतरी ऑर्डर द्यायची वाट पाहत होतास?"
"च्यायला. एकतर मी तुला भेटायचं नाही असं निक्षून सांगितलेलं असूनही तू इथे मला शोधत आलास आणि आता ही निरर्थक बडबड करतो आहेस काय?" बब्याचं डोकं अजूनही तापलेलंच होतं.
"जगात सगळंच निरर्थक असतं बाबा." डी चहूकडे एक नजर फिरवत म्हणाला. कॉफी शॉपमधल्या काही अपर्‍या नाकांना अजूनही डीचं कुतूहल वाटत होतं.
"झालं सुरू तुझं निरूपण? हेच नकोय मला आत्ता. म्हणून तुला टाळत गावभर फिरतोय मी."
"निरूपण कसलं रे. मनात असतं ते बोलतो झालं."
बब्या कितीही उखडला, भडकला असला तरी डी जे बोलायचा ते ऐकण्यात आणि प्रसंगी त्याच्याशी तुटपुंजा वाद घालण्यात त्यालाही गंमत वाटायचीच. पण सध्या खरंच त्याचा मूड नव्हता. त्याप्रमाणेच डी पुढे काय म्हणेल हे त्याचं कुतूहल, सद्यपरिस्थितीच्या जाणिवेचा चटका बसताच शमून गेलं. त्याच्या चेहर्‍यावर पुन्हा उदासी पसरली.
"तुझ्या नव्या फोनचं काय झालं रे पुढे?" डी शेजारच्या टेबलावरून इंग्रजी पेपर ओढत घेत म्हणाला. त्यावर तिथल्या अपर्‍या नाकानं नाक मुरडलं.
"कसला नवा फोन? माझा ५ वर्षं जुना फोन आहे." बब्या आश्चर्यचकित होत म्हणाला.
"अरे तेच रे. नवा घेणार होतास ना तू? धत् च्यायला."
"का धत् च्यायला काय?"
"अरे तुला नाही रे. चॅम्पियन्स लीगचा ड्रॉ बकवास निघालाय म्हणून  म्हटलं." असं म्हणत डीनं पेपराचं पान पलटलं. 
"का? डेअरडेव्हिल्स आणि नाईट रायडर्स एकाच ग्रुपमध्ये आहेत?" बब्यानं विचारलं.
"क्रिकेटच्या चॅम्पियन्स लीगमध्येही ग्रुप असतात? मी फुटबॉलबद्दल बोलत होतो." डीनं पेपराची घडी घालून बाजूला ठेवली. "बाकी हल्ली बिग बॉसमुळे इम्रान हाश्मीदेखील मला जंटलमन वाटू लागलेला आहे."
"अरे तुला नक्की कशावर बोलायचंय ते ठरव ना बाबा." बब्या काकुळतीला येत म्हणाला.
"बरं. तुझ्या नवीन मोबाईलबद्दल बोलू."
"मी नवा घेतलेला नाहीये."
"तेच ते. घेणार होतास ना नवा. त्याचं काय झालं?"
"मला हवा तसा मिळत नाहीये."
"म्हणजे?"
"मला हवी ती सगळी फीचर्स एकाच मोबाईलमध्ये नाहीयेत यार."
"कशी असतील?"
"म्हणजे?"
"ती तशी नसतात म्हणून तर आपल्याला हवी असतात." डी बब्याचा चेहरा आणि त्यावरचे झरझर बदलणारे भाव निरखत म्हणाला.
".." बब्या अजूनही डीचा डायलॉग डोक्यामध्ये प्रोसेस करत होता.
तेव्हढ्यात डीनं वळून काऊंटरकडे एक नजर टाकली. मगाचचाच वेटर डीची नजर चुकवून इथेतिथे पाहू लागला.
"म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय?"
"तुझा पगार फार वाढलाय का रे?" डी बोलला.
"अरे पगारावर कुठून आलास तू?"
"नाही तू कॉलेजपासूनच व्यवस्थित कपडे घालायचास. पण हल्ली जरा जास्त होतंय असं नाही वाटत? आणि पुन्हा हा कॉफी शॉपही जरा उच्चभ्रूंचाच वाटतोय. पण सगळे एकजात नवश्रीमंत आहेत." डी आजूबाजूच्या पाच-सहा बाकड्यांना ऐकू येईल इतक्या जोरात म्हणाला.
"अरे हळू बोल जरा." बब्या अवघडून गेला होता.
"काय फरक पडतोय. ह्यांच्यातल्या अर्ध्यांना माझं बोलणं कळणार नाही आणि ज्यांना कळेल त्यांना ते कळल्याचं लोकांना कळेल ह्याची लाज वाटेल म्हणून ते न कळल्याचं नाटक करतील. त्यामुळे, रिलॅक्स!"
"पण ते फीचर्सबद्दल काय बोलत होतास? असतात-नसतात."
"ते होय. मी म्हटलं की एकाच मोबाईलमध्ये सगळी तुला हवीत ती फीचर्स नसतात कारण मुळात ती तशी एका ठिकाणी नाहीत ह्यासाठीच तुला हवी असतात."
"अजूनही मला कळत नाहीये डी."
"अरे कळण्या-न कळण्यासारखं काही गहन बोलत नाहीये मी. मानवी मनाचे खेळ आहेत हे साधे-सोपे. जे नसतं तेच हवं असतं. आता तूच सांग. तुझ्या पाहण्यात अशी किती माणसं आहेत की ज्यांना त्यांच्याजवळ जे आहे तेच आणि तेव्हढंच हवंय."
"तू मोबाईलवरून तत्वज्ञानात शिरतोयस."
"बरं मोबाईलवरच राहूयात. किती जणांकडे मोबाईलमध्ये त्यांना हवीयेत ती सगळी फीचर्स आहेत?"
"तुझ्याकडे." बब्या दबकत म्हणाला.
"मी नोकिया ११०० वापरतो म्हणजे मला तेव्हढंच हवंय असा अर्थ होत नाही. मी आहे ते चावून घेतोय एव्हढाच त्याचा अर्थ. मलाही कधीकधी आयफोन हवा असं वाटतं. पण मला तो नोकिया ११०० च्या किंमतीत बसवता येत नाही."
"मला बाऊन्सर्स जाऊ लागलेत."
"बरं. आता तुझंच उदाहरण घेऊ. तुला तुझ्या गर्लफ्रेंडमध्ये मॉडर्नपणाही हवा होता अन संस्कारही हवे होते, बिनधास्तपणाही हवा होता आणि शालीनताही हवी होती. सौंदर्यही हवं होतं अन निरागस वेंधळेपणाही हवा होता. आणि ह्यासगळ्याउप्पर तुला निष्ठाही हवी होती. पण मुळात ही सगळी फीचर्स एकत्र नसतातच म्हणून तुला हवी होती असं मी म्हणेन."
"डी!" बब्याचा आवाज चढला. "मी तिच्याशी एकनिष्ठ असताना तिनं माझ्याशी असावं एव्हढी माफक अपेक्षा ठेवणं चूक आहे का?"
"प्रश्न माफक नव्हे तर अपेक्षेचा आहे. मुळात अपेक्षाच अशा का ठेवाव्यात ज्या पूर्ण होणे नाही."
"म्हणजे?"
"तू जेव्हा तिला भेटलास तेव्हा ती त्या पलिकडच्या चौकातल्या पिंट्यासोबत फिरत होती. जर ती त्याला सोडून तुझ्याकडे आली तर तुला सोडून तिसर्‍याकडे जाणार नाही असं कसं वाटलं तुला?"
"असं काही नसतं रे डी. तू किती मुलींना ओळखतोस असली वक्तव्यं करायला? ती बदलली होती मला भेटल्यावर."
"कुणी बदलत नसतं बब्या. सगळे मुखवटे असतात. आपण समोरच्या माणसाला हवे तसे वागतो थोडा काळ. कधी कळून सवरून तर कधी आपल्याही नकळत."
"पण आपला मूळ स्वभाव बदलत नाही असंच ना?"
"आपला मूळ स्वभाव असा काही प्रकार नसतो. आपण कायम मुखवटे घालूनच फिरतो. स्वतःशी खरं असणे वगैरे भंपकपणा काही लोक करतात, त्यातही फार अर्थ नाही. आपण स्वतःलासुद्धा लई गंडवत असतो पावलोपावली. पण ऍक्च्युअली ते गंडवणं नाही. स्वतःलाच बरं वाटावं म्हणून घातलेला मुखवटाच."
"अरे पण जेव्हा आपण स्वतःची चूक समजावून घेतो तेव्हा आपण स्वतःला क्लेश देत असतो. त्यावेळचं काय?"
"त्यावेळेस ती चूक मान्य करणे किंवा त्यातनं स्वतःला क्लेश होणे ही आपली गरज असते. मग त्यातून आपण सच्चेपणाचं सोंग घेतो. जेव्हा काही आक्षेपार्ह घडतं तेव्हा बरेचदा आपण स्वतःला माफही करतोच की. सगळं सोईप्रमाणे असतं आणि त्यात चूक-बरोबर काही नाही."
"म्हणजे जे संत-महात्मे होऊन गेले, किंवा जी चांगली माणसं असतात ती मुळात महान किंवा चांगली नाहीतच असं तुझं म्हणणं आहे? तुकोबांचे अभंग किंवा रामदासांचे मनाचे श्लोक ही सगळी बाष्कळ बडबड आहे का?"
"मी  कुठे असं म्हटलं? मी फक्त एव्हढंच म्हणतोय की ती सगळी मनोवस्था आहे. आपण सगळं काही ग्लोरिफाय करून ठेवतो. मी महान म्हणत नाही ह्याचा अर्थ बाष्कळ म्हणतो असं नव्हे. पण प्रत्येक गोष्ट रेट करणं जरूरी आहे का? गोष्टी ह्या फक्त गोष्टीच असू शकत नाहीत का?"
"म्हणजे जगात चांगुलपणा नाहीच आहे का?"
"चांगुलपणा-वाईटपणा हा मानण्यावर आहे."
"अरे पण मन म्हणजे काही चीज असते की नाही?"
"एक्झॅक्टली. मन. गंमतीशीर कन्सेप्ट आहे एकदम. तुला जे वाटतं ते मन. मग तुला जे वाटेल तेच योग्य-अयोग्य, चांगलं-वाईट. कुणीहीकडून तुझ्या मनाला बरं वाटण्याशी कारण. आणि तुझ्या मनाला बरं वाटणं म्हणजे काय तर तुझ्या मेंदूची प्लेझर सेंटर्स उद्दिपित होणं किंवा शरीरात एन्डॉर्फिन्सचा स्राव होणं. मग तो कशानंही होऊ शकतो की. त्यासाठी चांगलीच कामं करावीत असं कुठे म्हटलंय. मेडिटेट कर किंवा चरस घे."
"तू ड्रग्ज घेणं योग्य आहे म्हणतोयस?"
"पुन्हा. मी काहीही योग्य-अयोग्य म्हणत नाहीये. मेडिटेट केल्यानं शरीराला नुकसान होत नाही पण चरस घेतल्यानं होतं हे जरी सत्य असलं तरी त्या दोघांचाही तात्काळ परिणाम एकसमानच आहे हे तू नाकारू शकत नाहीस."
"त्यामुळे तुझं आर्ग्युमेंट सिद्ध होत नाही."
"मला काहीही सिद्ध करायचं नाहीय." डी म्हणत वळला आणि जोरात म्हणाला, "काय रे तुलाही माक्कियातो म्हणजे काय ठाऊक नाही काय?"
"सॉरी. सॉरी सर. जरा शिफ्ट चेंजचा ब्रेक होता." असं म्हणत मगाचचाच वेटर मेल्याहून मेल्यासारखा होत धडपडत दोन कप कॉफी मशीनसमोर ठेवू लागला.
"तू कधी नव्हे ते चुकतोयस डी. जग इतकं ऍबस्ट्रॅक्ट नाहीय तू म्हणतोयस तसं. जगाला काहीतरी अर्थ आहे."
"काय अर्थ आहे जगाला? रादर तुझ्या-माझ्या जगण्याला? तू आयुष्यात लग्न करून, कुटुंब बनवून काय मोठा अर्थ प्रदान करणार आहेस मानवजातीला? आईनस्टाईननं मूलभूत गोष्टी शोधूनही तुझ्या दुःखावर काही उपाय सापडला का? अंतराळात फेर्‍या मारूनही मनुष्य अमर काही झाला नाही. समुद्र, पाऊस, वादळं, ऋतू ह्यांवर आपला  अजूनही कंट्रोल नाही. आणि मी हे सगळे विचार करून नक्की काय साध्य करणार आहे?"
"डी, तू देवाबद्दल वगैरे बोलणार आहेस का?"
"नाही रे बाबा. मी फक्त सांगतोय तुला. की अर्थ वगैरे काही नाहीये कशाला. आपल्या जगण्याची सोय व्हावी ह्यासाठी आपण शोधलेलं ते एक कारण आहे. 'वेटिंग फॉर गोदो' मध्ये कसे 'गोदो' च्या येण्याची वाट पाहत ती माणसं दिवस कंठत असतात. तसं 'अर्थ' हा आपला 'गोदो' आहे. रादर 'गोदो' हा त्यांच्या जीवनाचा 'अर्थ'."
"टोटली कन्फ्युज्ड." असं बब्या म्हणेस्तोवर टेबलावर कॉफीचे कप आले.
"एव्हढं करूनही गंडलासच की रे. 'मोका' घेऊन आलास."
"यू ऑर्डर्ड इट सर."
"मी 'माक्कियातो' मागवली होती."
"दॅट इज व्हेरी डार्क कॉफी सर."
"मग?"
"आय थॉट.."
"काय थॉट? मला माहित नाही ते?"
"सॉरी सर."
"सॉरी काय आता? तेव्हाच विचारलं होतं तुला 'माक्कियातो' म्हणजे काय माहितीय ना म्हणून."
"मला वाटलं.."
"तू काय मनकवडा आहेस काय?"
"प्लीज डोन्ट यूज ऍव्युझिव्ह लँग्वेज हियर." शेजारच्या टेबलवरचं अपरं नाक अचानकच चिरक्या आवाजात बोललं. डीनं तिच्याकडे पाहिलं अन मग वेटरकडे पाहिलं. बब्या हसून हसून खुर्चीवरून पडायच्या बेतात होता. तिला कळेना तिचं काय चुकलं ते.
"तुला कळलं ना रे मी काय बोललो ते?" डी चेहर्‍यावरची रेषही न हलू देता म्हणाला.
"येस सर."
"बोलतो ते नीट समजून घेतलंस तरी बस. मनातले विचार वाचायच्या फंदात पडू नकोस परत." वेटर मोकाचा कप उचलून निमूटपणे गेला. आणि डी आता अपर्‍या नाकाकडे वळला. "डू यू नो व्हाय ही इज लाफिंग सो हार्ड?" डी बब्याकडे बोट दाखवत म्हणाला. बब्या एकदम अवघडून गेला.
"नो?" अपर्‍या नाकाला डी तिच्याशी बोलतोय ह्या गोष्टीनंच अवघडल्यासारखं झालं होतं.
"गुड. दॅट प्रूव्हज यू आर नॉट मनकवडी."
"मिस्टर.  डोन्ट ऍब्यूज मी. आय विल कॉल पोलिस." डीच्या चेहर्‍यावर फायनली स्मितरेषा आली. "तुम्हाला शाळेत मराठी कुणी शिकवलं हो, त्यांचा फोन नंबर देता का जरा? फोनवरूनच पाया पडेन म्हणतो."
अपरं नाक रागानं लालबुंद झालं आणि तिथून उठून तोंडानं 'स्टुपिड, इडियट, पेडेस्ट्रियन स्कमबॅग' म्हणत दुसर्‍या रिकाम्या टेबलावर बसलं.
"तुला मजा येते ना फार हे असं करायला?"
"काय करायला?" डी निरागसपणे म्हणाला. तेव्हढ्यात वेटर 'माक्कियातो' घेऊन आला. "मॅडमच्या कॉफीचे पैसे मी देईन रे." डी लालबुंद अपर्‍या नाकाकडे बोट दाखवत वेटरला म्हणाला. अपर्‍या नाकाचं लक्ष होतं पण ते गप्प बसलं.
"तर काय बोलत होतो आपण?" डीनं माक्कियातोमध्ये पाकिटभर साखर ओतली आणि हळूवार छोट्याशा चमच्यानं ढवळू लागला.
"जीवनाचा अर्थ आणि गोदो वगैरे..." बब्या म्हणाला.
"अरे म्हणजे सिंपल. आता इथे आपण जर काहीच न बोलता एकमेकांकडे पाहत बसलो तर केव्हढं बोअर होईल. तसंच वेळ काढायसाठी आपण हे सगळे फंडे शोधलेत. मिनिंग, सुपर मिनिंग, देव, दानव, चांगलं-वाईट, धर्म-बिर्म आणि त्याचबरोबर निरिश्वरवादसुद्धा. निरीश्वरवादसुद्धा एका लेव्हलच्या पुढे टाईमपासच आहे. मुळात आयुष्य हाच एक टाईमपास आहे. आपल्या पुराणांमध्ये लिहिलंय तसं आपण जगून टाकण्यासाठीच जगात येतो."
"तू फार समजण्यापलिकडे चालला आहेस."
"अरे आता अजून किती सोपं करून सांगू. ओन्ली थिंग यू हॅव टू अंडरस्टँड इज दॅट देअर इज नथिंग टू अंडरस्टँड."
"पण मग नाती, प्रेम ह्या सगळ्याचीच काही किंमत नाही काय?"
"मुळात प्रेम हा शब्द ओव्हररेटेड आहे. पुस्तकांत, कवितांत, कथांमध्ये, सिनेमांमध्ये, तुमच्यासारख्या मजनूंच्या उसाशांमध्ये किंवा साहित्यिकांच्या प्रेमाच्या विविध नात्यांमधल्या आविष्कारांना आलंकारिक लेणी घातलेल्या लेखनामध्ये असतं तसलं प्रेम वगैरे काही नसतं. असते ती फक्त गरज."
"काय?"
"हे बघ. आपल्या प्रत्येकाला कशाची न कशाची गरज असते. आपुलकीची, सहवासाची, शाबासकीची, जखमेवर फुंकर घालण्याची इतकंच काय शरीराचीही. मग त्या गरजा आपण नात्यांतून पूर्ण करतो."
"हे फारच सेन्सेशनल आणि फार फेच्ड आहे असं नाही वाटत डी?"
"अजिबात नाही. तूच विचार कर. मुळात नातं हे गरजेपोटीच बनतं असं नाही वाटत तुला?"
"आई-मुलाचं नातं कुठल्या गरजेपोटी बनतं?"
"त्या नात्याच्या गरजेपोटी."
"म्हणजे तुझ्या आईचं तुझ्यावर प्रेम नाही?"
"प्रेम नाही असं कुठे म्हणतोय मी. पण प्रेम हा जग वापरतं तो शब्द आहे एव्हढंच माझं म्हणणं आहे. प्रत्येक नात्याला, भावनेला नाव देण्याच्या अट्टाहासातून आलेल्या अनेक शब्दांपैकी एक शब्द. मी त्या भावनेला गरज म्हणतो, बाकी दुनिया प्रेम. एव्हढाच फरक."
"म्हणजे तुझ्या आईला तुझी गरज आहे?"
"तुझी गरजेची व्याख्या खूप संकुचित आहे. त्यामुळे तुला मागचं वाक्य उथळ वाटेल. खोलात जाऊन विचार केलास तर कदाचित पटेल मी काय म्हणतो ते."
"मग निःस्वार्थी भावनेला तुझ्या लेखी काहीच किंमत नाही म्हणायची."
"मुळात निःस्वार्थी हा शब्द दिशाभूल करणारा आहे. जगात निःस्वार्थी असं काही नसतं. निःस्वार्थी वागणं हा काही व्यक्तिंचा स्वार्थ असतो. त्यामुळे टेक्निकली इट्स अ पॅराडॉक्स."
"म्हणजे?"
"काही माणसांना दानधर्म करून किंवा गरजूंना मदत करून आनंद मिळतो. जगासाठी ते निःस्वार्थीपण असतं. पण त्यातनं त्यांना आनंद मिळतो म्हणजे टेक्निकली तो स्वार्थच नव्हे काय?"
"म्हणजे तुझ्यासाठी चार्ल्स शोभराज आणि संत गाडगेबाबा दोघेही स्वार्थीच."
"हे बघ. शेवटी माणूस त्याच्या आत लागलेली चिरंतन आग विझवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. प्रत्येकाचे रस्ते वेगळे असतात. काहींचे रस्ते इतरांसाठी सुखाचे होतात तर काहींचे इतरांना त्रासाचे. माणूस अल्टिमेटली जगतो तो स्वतःसाठी. जरी तो इतरांसाठी जगणारा असला तरी तसं करून त्याला आत्मिक समाधान मिळत असतं किंवा निदान त्याला तसं वाटत असतं, अर्थात तो स्वतःसाठीच जगत असतो."
"तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही." बब्याला काहीही बोलायला सुचत नव्हतं.
"एक्सक्यूज मी. हू आर यू टू पे माय बिल? हू डू यू थिंक यू आर?" मगाचचंच अपरं नाक तावातावानं भांडायला आलं होतं.
डीनं वळून तिच्याकडे पाहिलं, "आय न्यू यु वुड कम लॅशिंग आउट ऍट मी लाईक धीस."
"सो?"
"नथिंग. दॅट मेक्स मी अ मनकवडा." आणि डीच्या चेहर्‍यावरची एकही रेषा हलली नव्हती.
"पे माय बिल ऍन्ड गो टू हेल." ती तणतणत पाय आपटत कॉफीशॉपबाहेर पडली.
"तुला एक गंमत सांगू?" डी म्हणाला.
बब्यानं फक्त त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहर्‍यानं पाहिलं.
"जेव्हा माणसाच्या मनात अपराधी भावना असते ना, तेव्हा त्याची दुःख सहन करण्याची शक्ति वाढते."
"म्हणजे?"
"म्हणजे आपण दुःखात आहोत, ह्याचं जस्टिफिकेशन त्याच्याकडे असतं. त्यामुळे ते दुःख तो शिक्षा म्हणून  सहज ऍक्सेप्ट करतो."
"हे अचानक कुठून आलं?"
"तुझ्याकडे पाहून."
"म्हणजे? व्हॉट डू यू मीन? मी कुणाचं काय केलंय?" बब्याचं डोकं एकदमच भडकलं. तो उठून उभा राहिला.
डी फक्त बब्याकडे पाहत होता.
"यू नो व्हॉट डी. ती पोरगी म्हणाली तसं गो टू हेल. तुझं डोकं सडकं आहे एक नंबरचं. इथे भेटलास, तिथे भेटू नकोस ही विनंती!" असं म्हणत बब्या जाऊ लागला.
"सी यू इन अनदर लाईफ, ब्रदर!" डी म्हणाला.
"ओह, गेट लॉस्ट!" बब्या म्हणाला आणि कॉफीशॉपमधून बाहेर पडला.
वेटर बिल घेऊन डीकडे आला.
"तू मनकवडा आहेस म्हणायचा." डी खिशातून पैसे काढत वेटरला म्हणाला.