8/30/2010

आय लव्ह हेट स्टोरीज - उत्तरार्ध

पूर्वार्ध पासून पुढे

"पप्पा, तो आपला अकाऊंटंट आहे ना?" अनु वडिलांना ब्रेकफास्टच्या वेळी सांगत होती.
"कोण?"
"तो सिटी ऑफिसला बसतो ना, सहा महिन्यांपूर्वी जॉईन झालाय."
"ओह्ह, उमेश! ब्राईट बॉय. दिवस-रात्र न बघता मान मोडून काम करतो, असा रिपोर्ट आलाय त्याचा. मुलगा मेहनती आहे, पुढे जाईल."
तिच्या चेहर्‍यावर हलकं स्मित आलं. "पप्पा, त्याला साहित्य वगैरेंमधलं खूप चांगलं कळतं."
क्षीरसागरांनी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं.
"म्हणजे पप्पा, मीच दोन तीनदा जबरदस्तीनं जाऊन त्याला भेटले. तसं त्याच्या मनातही काही नाहीये आणि अजून काही नाहीये."
"पण तुला एका मामुली अकाऊंटंटमध्ये एव्हढा का इंटरेस्ट!"
"पप्पा, तो खूप चांगला मुलगा आहे. बाकी काही नाहीये अजून."
"हे अजून अजून काय लावलंयस?"
"पप्पा, मी एव्हढंच म्हणतेय, की त्याला तुमच्या पब्लिकेशनमध्ये एडिटोरियल साईडला शिफ्ट करा. बघा काय कमाल करेल तो!"
क्षीरसागर विचारात पडले. पब्लिकेशन शहराबाहेर होतं. म्हणजे तो इथून दूर गेला असता. एका दगडात दोन पक्षी.
पण सगळेच फासे उलटे पडले. उमेशनं पब्लिकेशनमध्ये दोन वर्षं काढली आणि सगळी ट्रेड शिकून तो शहरात स्वतःचं पब्लिकेशन काढायला परतला. अनु तर त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. पण उमेशचं लक्ष फक्त स्वतःच्या पब्लिकेशनमध्येच होतं. पाच वर्षं राबून त्यानं स्वतःचं एक स्थान शहरात निर्माण केलं. एक अतिशय प्रथितयश असा तरूण उद्योगपती म्हणून तो उभ्या शहरात प्रसिद्ध होता. पण स्त्रियांबद्दल त्याची असलेली विलक्षण अलिप्तता हीदेखील त्याच्याबद्दलच्या चर्चेचा कायम विषय होती. क्षीरसागरांनाही त्याचं कौतुक होतं, त्यामुळेच अनुच्या इच्छेनुसार त्यांनी उमेशच्या आई-वडिलांशी आणि उमेशशी बोलणी करून त्यांचा साखरपुडा उरकला होता. अनु उमेशच्या होकारानंतर हवेतच होती. तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. उमेश आपल्यावर प्रेम करत नाही, ह्याची तिला जाणीव होती. त्यातून उच्च स्थानाचा आणि अति कामाचा उमेशवर वाईट परिणाम सुरू झाला होता. पण ह्या सगळ्यातून लग्नानंतर मार्ग निघेल हा अनुचा विश्वास होता.
आणि आज तो दिवस आला होता. आज उमेश कायमचा अनुचा होणार होता. अनु लग्न पूर्ण एन्जॉय करत होती. पण उमेशच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. तशात कमलेश घाबराघुबरा आला होता.
"काय झालं? सांगशील लवकर."
"अरे, गंधेची बायको..."
"हां तिचं काय?"
"अरे ती... ती नाहीये रे..."
"काय?" उमेशला घेरी यायचीच बाकी होती.
"काय बरळतोयस तू?"
"होय. मी स्वतः बघून आलो आत्ता. कन्फर्म करून आलोय. ती गंधेचीच बायको आहे, पण ती, ती नाहीये."
"अरे, पण हा सुरेश पुरुषोत्तम गंधेच आहे ना. लग्नपत्रिका मी स्वतः बघितली होती."
"होय रे. पण ती, ती नाहीये."
उमेश अवाक् झाला होता. थोडा वेळ तो विचारात गढला.
"मला गंधेच्या बायकोला भेटावं लागेल."
"वेडा झालायस काय?" कमलेश काळजीत पडला.
उमेशनं एक फोन फिरवला.
----
मिसेस गंधे अनोळखी घरात जसं चालावं तश्याच चालत नोकरानं दाखवलं, त्या खोलीत शिरल्या. आणि समोर उमेशला पाहून एकदम दचकल्या.
"दचकू नका. मीच खोटं बोलून इथे बोलावलं तुम्हाला. माझ्या होणार्‍या सासूनं नाही, मीच तो निरोप पाठवला, कारण मला काहीतरी फार महत्त्वाचं विचारायचंय तुम्हाला!"
"काय?" मिसेस गंधेंना काहीच कळत नव्हतं.
"तुमचं आणि मिस्टर गंधेंचं लग्न कधी झालं? आणि तुम्ही त्यांच्या पहिल्या पत्नी आहात का? आणि नाही, तर त्यांच्या पहिल्या पत्नीचं काय झालं?"
ह्या विचित्र प्रश्नांच्या सरबत्तीनं त्या गांगरून गेल्या. पण मग उमेशच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून त्यांच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला लागला.
"तुम्ही तेच उमेश का?"
----
उमेश लग्नमंडपात उभा होता. पण मिसेस गंधेंचे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. तो आतून पूर्ण कोलमडला होता. त्याला पुन्हा एकदा तीच असहायतेची भावना घेरत होती. त्याच्या डोक्याला मुंडावळ्या होत्या. शेजारी सजून अनुप्रिया बसली होती. स्वर्ग त्याच्या पायाशी येणार होता. कित्येक कॅमेरे त्याच्यावर रोखलेले होते. समोर हवनकुंड होतं. पण तो त्यात कसली आहुती देत होता.
अनुप्रियाला त्याचा अस्वस्थपणा जाणवत होता. कारण कळत नव्हतं. तो अजूनी चुळबुळत होता. मंत्रोच्चारण सुरू झालं होतं. आणि अचानक त्याला समोर मिस्टर आणि मिसेस गंधे दिसले. मिसेस गंधेंच्या चेहर्‍यावरचे भाव त्यानं बघितले मात्र तो मंडपातच उठून उभा राहिला. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. अनुप्रियाचे वडील, अनुप्रिया, त्याचे आई-वडिल सगळेच गडबडले. त्यानं मुंडावळ्या काढल्या आणि अनुप्रियाच्या डोळ्यांत बघितलं. तिच्या काय ते लक्षात आलं. त्यानं मुंडावळ्या तिच्या हातात ठेवल्या आणि तो सरळ दरवाजाच्या दिशेनं चालायला लागला. सगळेच गडबडले. एकच गोंधळ उडाला.
उमेश बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडला आणि त्यानं सर्वप्रथम आपला कोट काढून फेकला. चालता चालताच त्यानं टाय काढून टाकला आणि त्यानं रिक्षाला हात केला. रिक्षा एका छोट्याश्या बिल्डिंगसमोर थांबली. त्यानं रिक्षावाल्याला पाचशेची नोट काढून दिली आणि सुटे न घेताच तो बिल्डिंगमध्ये शिरला. त्यानं बाह्यांची बटणं सोडवली आणि बाह्या दुमडतच तळमजल्यावरच्या घराची बेल वाजवली. एक मिनिटानं दरवाजा उघडला.
तिची नजर उमेशवर पडली मात्र, ती स्तब्ध झाली. तिला कळतच नव्हतं काय चाललंय.
"आत तरी घेशील?"
आत शिरून तो सोफ्यावर बसला.
"तुला काय वाटलं, तू मला भीक देशील आणि मी घेईन?"
तिच्या चेहर्‍यावर फक्त प्रश्नचिन्ह होतं.
"तुझ्या बहिणीनं मला सगळं सांगितलं. तू कसा ऐनवेळी लग्नाला नकार दिलास आणि मला शोधायला निघालीस. ज्यामुळे तुझ्या चुलत बहिणीचं तडकाफडकी लग्न गंधेशी लावलं गेलं. पण मी शहर सोडून गेलो होतो, हे कळल्यावर तू माझ्या आई-बाबांना काहीही न सांगता परत आलीस. आणि महिन्याभराने मी शहरात परतलो, तेव्हा तुला कळलं नाही. पण जेव्हा मी खूप मोठा झालो, तेव्हा माझ्यावर हक्क न सांगण्याचा तू निर्णय घेतलास."
ती त्याच्या चेहर्‍याकडे पाहत होती. आणि तो तिच्या डोळ्यांत.
"सगळे निर्णय तूच घेतलेस ना. मला सोडायचाही, गंधेशी लग्न न करण्याचाही, आणि माझ्याकडे परत न येण्याचाही! स्वतःला तू समजतेस तरी कोण?" त्याच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या. तोच असहायपणा पुन्हा त्याला जाणवत होता. तो मनानं आज पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये बसला होता आणि आपल्या आयुष्याचे निर्णय आपोआप झालेले बघत होता. "मी तिथे तुझ्याबद्दलची हेट्रेड, तुझ्याबद्दलचा द्वेष मनात जागवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या द्वेषापोटी, त्या ईर्ष्येपोटी वर वर चढत होतो. पण आत्ता जाणवतंय, की तो द्वेष तुझ्याबद्दल नव्हता, तर माझ्याबद्दल होता. मी स्वतःचाच द्वेष करत होतो. आणि त्यापायीच मी पुढे जाण्यासाठी धावत होतो, जेणेकरून मला स्वतःकडे बघायला वेळच मिळू नये. धावता धावता मी सगळं मिळवलं, आलिशान गाडी, घर, महागडा मोबाईल, उंची कपडे, मोठ्या लोकांमध्ये ऊठबस, उंची लाईफस्टाईल. पण एव्हढं सगळं बाह्य आणि लौकिक यश मिळूनही मी सुखी नव्हतो, कायम एक बोचरी जाणीव मन कुरतडत राहायची. पूर्वी सहज कवितेतून मिळत असलेली शांतता त्या रेस्टॉरंटमधून तू उठून गेल्यापासून कधीही परत मिळाली नाही. आजही माझ्या लग्नात मी पाण्यासारखा पैसा खर्च करून तुला जळवायला निघालो होतो खरा, पण त्यात माझाच स्वतःबद्दलचा द्वेष कमी करण्याची धडपड जास्त होती. पण माझं हे यशही तूच भीकेत दिल्यासारखं वाटतंय मला. कारण ह्या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस. प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुझ्याचमुळे मी आज जसा आहे, तसा आहे."
तो जितकं बोलला, त्यानंच त्याला थकल्यासारखं वाटत होतं. तो नुसताच तिच्याकडे पाहत होता.
"तुला मी काय सांगू, त्या संध्याकाळी तुझे पाणावलेले डोळे मला तुझ्या हृदयाची शकलं दाखवत होते. ते पाहून माझं काळीज पिळवटत होतं. कॉलेजात तुझ्या आधारानं असलेली मी, तुलाच मोडताना पाहत होते. पण त्याहीपेक्षा दुःखदायक जाणीव ही होती, की तुझ्या मोडण्याचं कारण मीच होते. तुझ्या दाटलेला स्वर, तुझी विनवणी मला काहीच सहन होत नव्हतं. पण तुझ्यासमोर स्वतःला दुबळं दिसू द्यायचं नव्हतं मला.
रात्री गादीवर पडल्यावर मी खूप अस्वस्थ होते. तुझे डोळे माझा पाठलाग करत होते. तुझ्या मिठीतली ती आश्वासक ऊब आता मला पुन्हा कधीच मिळणार नाही, ही भयावह जाणीव अचानकच मला झाली आणि माझ्या मनानं बाजू बदलली. दुसरा अख्खा दिवस मी काय करू पेक्षा कसं करू ह्याच विचारात होते आणि शेवटी मी एका अविवेकी निर्णयामुळे दुसरा अविवेकी निर्णय घेतला. मी घरातून निघून गेले. माझ्या आई-वडिलांना, सगळ्या कुटुंबियांना अवघड स्थितीत ढकलून. पण वसुधानं तिच्या काका-काकूंची म्हणजे माझ्या आई-वडिलांची लाज राखली आणि माझ्याऐवजी लग्नाला उभी राहिली.
इकडे मी तुझ्या घरी पोचले, तर तू शहर सोडून गेल्याचं तुझ्या आई-वडिलांकडून कळलं. तू तुझ्या घरी आपल्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतंस, हे त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं. मी तर त्याक्षणी कोलमडूनच गेले होते. मी एकाच वेळी किती जीवांना भरकटवलं होतं आणि दुःखात टाकलं होतं. त्याच विमनस्क अवस्थेत माझ्या मैत्रिणीनं मला आधार दिला. आई-वडिलांनीही मोठ्या मनानं मला माफ केलं आणि मी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. तू शहरात परत आल्याचं मला कळलं नाही. आणि कदाचित तुझे आई-बाबा तुला माझ्या येण्याबद्दल सांगायला विसरले. आणि अचानक दोन-तीन वर्षांनी तुझं नाव दुमदुमायला लागलं. मी हर्षभरित झाले आणि सरळ तुझ्याकडेच यायला निघणार होते. पण मग विचार केला, की आज तू तिथे आहेस कारण मी तुझ्यासोबत नाहीये. कदाचित मीच तुझ्या आयुष्याला लागलेलं ग्रहण होते. आणि पुन्हा तेव्हा तुझ्याजवळ जाणं म्हणजे तुझ्या यशातला वाटा मागण्यासारखं वाटलं मला.
मी कायमसाठीच एकटी राहायचं एव्हाना ठरवलं होतं. मी केलेल्या चुकांची भरपाई म्हणून. दुःख खूप होतं, पण तुझ्या यशाकडे बघून मी खुश राहायचे. मग एक दिवस तुझ्या साखरपुड्याची बातमी वाचली आणि क्षणभर खूप दुःख झालं. ढसाढसा रडावंसं वाटत होतं. पण मग सावरलं. तू आनंदात असशील ह्या जाणीवेनंच मन शांत केलं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वसुधा तुझी लग्नपत्रिका मला दाखवत होती. तिला ठाऊक नव्हतं की तू तोच आहेस. पण मी ती पत्रिका डोळेभरून पाहिली. गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर सगळीकडे येत असलेल्या तुझ्या लग्नसराईच्या बातम्या पाहून मला किती आनंद होत होता आणि किती दुःख होत होतं, हे माझं मलाच कळत नाही."
"ही सगळी प्रसिद्धी फक्त तुला जळवण्यासाठी होती." तो खजील होत म्हणाला. "मला ह्या लग्नात फक्त एव्हढाच इंटरेस्ट होता."
तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. "मी माझ्या एका अविवेकी निर्णयामुळे किती जणांची आयुष्य बदलली आणि किती जणांना दुखावलं ह्याची काही गणतीच नाहीये. पण आज तू इथे आलास आणि हे सगळं बोललास. तुला खरं सांगू, मला प्रायाश्चित्त झाल्यासारखं वाटतंय."
ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती.
तो पुढे झाला, त्यानं तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या भाळी ओठ टेकवले.
"अश्रू बापुडे अथक वाहती,
शब्दांना न सुचे काही,
शब्द हरवले ओठांत कुठे,
अर्थ डोळ्यांवाटे वाही"
आज कित्येक वर्षांनंतर त्यानं पुन्हा काव्य केलं होतं.
"मला जे हवं होतं ते मिळालं उमेश! तू आलास आणि मला आणि तुला दोघांनाही हरवलेला तू सापडलास. आता मात्र तू परत जा!"
"काय?"
"होय. जी चूक आठ वर्षांपूर्वी मी केली, ती तू आज करू नकोस. तुझ्यावर प्रेम करणार्‍या इतक्या माणसांना दुखवू नकोस. मी तुझ्याशिवाय राहायला शिकलेय आणि ह्या आठवणी मला आयुष्यभर पुरतील. पण जी तिथे मंडपात तुझ्या जाण्यानं कोसळली असेल, तिला तुझी गरज आहे!"
उमेश तिच्या डोळ्यांत पाहत होता. ही तीच होती, जिनं प्रॅक्टिकल निर्णय घेऊन त्याला तोडलं होतं आणि इमोशनल निर्णय घेऊन स्वतःचं लग्न मोडलं होतं. तीच आज त्याला सुवर्णमध्य काढायला सांगत होती.
----
उमेश रिक्षातून बंगल्यासमोर उतरला. सगळे पाहुणे पांगले होते. उमेश शांतचित्तानं चालत बंगल्यात शिरला. दिवाणखान्यातच मंडप होता. मंडपाशेजारीच त्याचे आई-वडिल आणि अनुचे वडिल चिंताग्रस्त चेहर्‍याने बसले होते. उमेशकडे त्यांचं लक्ष गेलं पण उमेशची नजर अनुला शोधत होती. आणि त्याला अनु दिसली. ती अजूनी हवनकुंडासमोरच्या तिच्या जागेवर स्तब्ध बसली होती. तिचे वडिल त्याला काहीतरी बोलणार ह्याआधी तो बोलला.
"अनु..."
तिनं एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिचा विश्वासच बसत नव्हता. ती उठून उभी राहिली आणि धावतच त्याच्याजवळ गेली. ती त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत होती आणि तो मिश्किल हसत होता. आणि ती त्याला एकदम बिलगली. आजवर कधीही हे तिनं केलं नव्हतं. त्याच्या अंगावर एक गोड शिरशिरी आली. ती शांतता, ज्यासाठी तो इतके दिवस धडपडत होता, जिला क्षणभर फक्त स्पर्शून आल्यागत वाटायचं आत्ता त्याच्या चहूकडे असल्याचं त्याला जाणवत होतं.
"स्पर्शातूनही न कळे असे कुठले कोडे पडले,
श्वासातूनही न कळे असे कुठले काव्य हे स्फुरले,
स्पर्शा-श्वासापलिकडले हे बंध आज जे जुळले,
दोन जीवांचे स्वतंत्र असे अस्तित्वही मग नुरले."

--समाप्त--

अख्खी कथा एकत्र इ-बुक म्हणून इ-बुक्स पानावर वाचा!

8/29/2010

आय लव्ह हेट स्टोरीज - पूर्वार्ध

उमेश टेबलावर पडलेल्या अर्धवट खाल्लेल्या डिशेसकडे आणि अर्धवट प्यायलेल्या चहांकडे बघत होता. त्याला स्वतःमध्ये एक विचित्र पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटत होती. त्याची तंद्री भंग पावली ती, 'बिल आणू का?' हे विचारायला आलेल्या वेटरमुळे. त्यानं एकदम वर बघितलं. 'हं' एव्हढं म्हणून तो पाकिट काढू लागला. बिल देऊन उमेश बाहेर पडला आणि पलिकडच्या फुटपाथला लावलेल्या आपल्या स्कोडा ऑक्टेव्हियाकडे जाऊ लागला. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शनिवारची रात्र. शहराचा तो बर्‍यापैकी मध्यवर्ती आणि उच्चभ्रू भाग झगमगाटानं न्हाऊन निघाला होता. ती बदनाम वस्ती नव्हती, पण तिथल्या वातावरणात एक वेगळीच नशा होती. तरूणाईची झिंग!

शुक्रवार आणि शनिवार रात्री त्या भागाचं लावण्य आणि तारूण्य ऊतू जात असे. अश्याच त्या धुंद रात्री प्रेमी जोडपी रंगात येत असत. पैश्याचे पाट वाहत. काही रेस्टॉरंट्समध्ये सभ्य उच्चभ्रू तर काहींमध्ये रंगेल उच्चभ्रू चैन करत. काही साधीशी मध्यमवर्गीयांसाठीची रेस्टॉरंट्सही होती. उमेश आत्ता एका क्लायंटबरोबरची मीटिंग संपवून एका सभ्य उच्चभ्रूंच्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडला होता. रस्त्याच्या कडेलाही काही रेस्टॉरंट्सच्या छत्रीवाल्या टेबल-खुर्च्या असत. आत्ता उमेशही काही खुर्च्यांच्या शेजारूनच चालला होता. प्रेमी युगुलांची हळू आवाजातली कुजबूज त्याला अस्वस्थ करायला लागली. त्यानं काळ्या कोटाच्या खिशातून त्याची सोनेरी सिगरेट केस काढली आणि त्यातून त्याची परदेशी सिगरेट काढून ओठांमध्ये अडकवली. सिगरेट केस आत ठेवून त्यानं हस्तिदंती लायटर बाहेर काढला आणि सिगरेट शिलगावून ठेवून दिला. अचानक त्याचा पाय चिखलात पडल्याचं त्याला जाणवलं. 'ओह, धीस फिल्दी सिटी!' काळ्या पँटच्या खिशातून पांढरा स्वच्छ रूमाल त्यानं बाहेर काढला. काळेभोर चामड्याचे बूट पुसले आणि रूमाल शेजारच्या गटारात भिरकावला. अचानक कसलीशी जाणीव होऊन त्यानं रस्त्याच्या दिव्यांच्या प्रकाशात आपल्या पांढर्‍या शर्टावर कसले डाग नाहीत ना, हे तपासलं. एव्हाना तो स्वतःच्या गाडीपाशी पोचला होता. सिगरेट आत्ताशी अर्धीही झाली नव्हती. ती प्रेमी युगुलांची कुजबूज आता ऐकू येईनाशी झाली होती. वर आकाशातल्या चांदण्यांकडे निरुद्देशपणे टक लावून बघत तो सिगरेटचे हळूहळू पण खोल असे कश घेऊ लागला. आता त्याला शांतता जाणवू लागली होती. त्यानं गाडी लावली होती, तिथे सगळ्या गाड्यांचंच पार्किंग होतं. त्यामुळे तिथे वर्दळ अशी नव्हती, कारण ह्या सगळ्या गाड्या मध्यरात्री किंवा पहाटेच इथून हलणार होत्या.

आत शिरणारा प्रत्येक कश त्याच्या संवेदना बोथट करत होता. ज्या शांततेसाठी तो धडपडत होता, ती ह्या किकमधून मिळणार नव्हती, पण कदाचित एक क्षणभर तिला स्पर्शून आल्यागत नक्कीच वाटायचं. आत्ताही, सिगरेट जशी संपत आली होती, संवेदनांचे दिवे हळूहळू मालवू लागले होते. देहामध्ये एक वेगळीच चेतना जागृत होतेय असं वाटत होतं.

आणि एकदम त्याच्या खांद्यावर कुणाचातरी हात पडला. तो भानावर आला. सगळा भर क्षणार्धात ओसरला. समाधी भंग पावली. अतिशय वैतागलेल्या मनःस्थितीत त्यानं सिगरेटचं थोटूक भिरकावलं आणि त्यानं वळून पाहिलं.

"कमलेश, तू!" आश्चर्यानं तो म्हणाला.

"होय उम्या, मीच!"

"तू मला कसं शोधलंस?"

"तुझा दिनक्रम शहरातल्या सगळ्या सुंदर स्त्रियांना ठाऊक आहे. कुणाही एकीकडून सहज माहिती मिळू शकते."

"तू मला इथे टोमणे मारायला आलायस का?"

"नाही, एक बातमी सांगायला आलोय!"

"आठ वर्षांनंतर मला तू बातमी सांगण्यासाठी भेटायला आलायस?"

"होय. बातमीच तशी आहे!"

"ओकशील आता?"

"गंधे शहरात असिस्टंट म्युनिसिपल कमिश्नर म्हणून आलाय."

"कोण गंधे? तोच?" आश्चर्यातिशयानं आणि दुःखातिशयानं अशा मिश्र भावनेनं उमेश म्हणाला.

"होय, तोच!"

उमेश दोन मिनिटं विचारात गढला. "मग मी काय करू?"

"मला काय ठाऊक, मी तुला सांगायचं काम केलं!"

"हराम्या, मी आता काय उखडणार आहे!"

"आलास असलियतवर. तुझ्याच्यानं तेव्हाही काही झालं नाही. आजही काही होणार नाही."

उमेशच्या डोक्यात सणक गेली. त्यानं कमलेशची कॉलर धरली.

"अरे! लग्न करतोयस ना शहरातल्या सर्वांत मोठ्या उद्योगपतीच्या मुलीशी! मग मांड ना प्रदर्शन, घे बदला!" कमलेश कसंनुसं म्हणाला, पण त्यानं कॉलर सोडवायचा प्रयत्न नाही केला.

उमेश पुन्हा विचारात पडला. त्यानं कमलेशची कॉलर सोडली. मनाशी काही निश्चय केला.

"बस गाडीत, सोडतो तुला."

तेव्हढ्यात त्याचा फोन वाजायला लागला. पँटच्या खिशातून ब्लॅकबेरी काढून त्यानं चटकन कानाला लावला. "हां अनु..." आणि तो गाडीचं दार उघडून गाडीत बसला.

---------

"आंधळ्या प्रेमाची कुणी शपथ द्यावी,

नाजूक नात्याची कुणी उपमा द्यावी,

जाणीवा एक झाल्याची पोच, कुणी कुणाला द्यावी?"

तो नेहमीप्रमाणेच मैफिल गाजवत होता आणि ती, सर्वकाही तिलाच उद्देशून आहे हे जाणून त्याच्या प्रत्येक रचनेवर लाजत होती. कॉलेजच्या मित्रमैत्रीणींचा तो फड ट्रीपच्या ठिकाणी हॉटेलात रात्री २ वाजेपर्यंत रंगला होता. शेवटी सगळे दमून झोपायला आपापल्या खोल्यांवर निघाल्यावर ती थोडा वेळ तिथेच रेंगाळली. त्याच्याच खोलीवर फड रंगला होता.

तो तिच्याकडे, तिच्या लाजण्याकडे पूर्णवेळ पाहत होता. त्याचे हसरे डोळे सारखे तिच्या लाजर्‍या नजरेचा पाठलाग करत होते. आणि आता तर ते दोघेच उरले होते. ती त्याच्या बेडवर बसली होती आणि तो शेजारीच खुर्चीवर. तिची बोलायची खूप इच्छा होत होती, पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याला आपण आवडतो, हे तिलाही कळत होतं. पण त्यानं ते सांगावं अशी तिची इच्छा होती. तो सांगत का नाही, हा प्रश्न तिला दिवसरात्र छळत होता. आत्ताही ती रेंगाळून हाच विचार करत बसली होती. तो तिलाच निरखत होता. तिची स्थिती बघून त्याला गंमत वाटत होती.

"बरं मग, गुड नाईट!" ती कशीबशी उठली.

"ओके, गुड नाईट." त्याच्या चेहर्‍यावर मिश्किल हास्य होतं.

'कसा दुष्ट आहे हा. सांगत का नाही मला!' ती मनाशीच विचार करत होती. जड पावलांनी ती दाराकडे निघाली.

"उमलत्या कळीने उमलण्याचं सुख दाखवावं कसं,

उगवत्या चंद्राने चांदणं पसरवावं तसं,

अनुरक्तीचं मोजमाप सांगायला शब्द मिळेना,

माझिया प्रियाला प्रीत कळेना!"

त्याच्या आवाजाच्या जाणीवेनंच तिनं चटकन वळून पाहिलं. तो तिच्या डोळ्यांमध्येच एकटक पाहत होता. ती धावत त्याच्याजवळ गेली. त्यानं तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या भाळी ओठ टेकवले. त्या रात्री ते दोघे त्या हॉटेलच्या कॉरीडॉरमध्येच सकाळ होईपर्यंत बोलत बसले. ती त्याच्या बाहुपाशात अपार सुख अनुभवत होती. तिची प्रतीक्षा संपली होती.

----

"अनु, आय वाँट अवर मॅरेज टू बी ऍज ग्रँड ऍज इट कॅन गेट!" हातातला मद्याचा प्याला खेळवत उमेश बोलत होता.

"ते ग्रँड करतीलच पप्पा!" अनु सोफ्यावर बसून त्याच्याकडे पाहत होती.

"अरे पप्पासुद्धा विचार करू शकत नाहीत एव्हढं ग्रँड करायचंय मला!" त्याच्या आवाजात थोडीशी धुंदी जाणवत होती. "एव्हढं मोठं, एव्हढं मोठं की सगळ्या दुनियेनं पाहिलं पाहिजे की साला उमेश राजहंसचं लग्न लागलं"

"पण म्हणजे करायचं काय आहे तुला?"

"शहरातल्या सगळ्या मोठ्या हस्तींना तर बोलावूच, पण देशभरातल्या पण मोठ्या लोकांना बोलावू. साला हेलिकॉप्टरची वगैरे स-स-स-ओ-सोय करू." आताशा त्याची जीभही अडखळू लागली होती.

"अरे पण जास्त दिवस कुठे राहिलेत."

"सो व्हॉट. पाण्यासारखा पैसा खर्च करू. साला, शहरातले सगळ्यात मोठे उद्योगपती श-श-श-क्श-क्षीर-सागर-क्षीरसागरांच्या मुलीशी लग्न करतोय मी." पेला संपता संपता तो हाताबाहेर गेला होता.

अनुसाठी हे नवीन नव्हतं. तो स्ट्रेस्ड असला की असंच करायचा. मग ती त्याला सोडायला तिच्या गाडीतून जायची. त्याचे आईवडिल हे सगळं पाहून दुःखी व्हायचे. पण तिच्याकडे पाहून त्यांना थोडा दिलासा मिळायचा. ती न रागावता हे सगळं सहन करायची. ती बरेचदा विचार करायची. तो, पूर्वीचा तो राहिला नव्हता. सुरूवातीला अलिप्त असणारा आणि फक्त ध्येयाकडेच लक्ष असणारा, अगदी तिच्याकडेही लक्ष न देणारा. कधीतरी सिगरेट पिणारा, पण मद्याला हातही न लावणारा. मग तो जसाजसा मोठा होत गेला. तो श्रीमंत वर्गात मोडू लागला. तो अजूनही तिच्याबाबतीत अलिप्तच होता. पण तिलाच तो आवडायचा. कारण तो सेल्फ मेड होता. त्यानं तिच्या पैश्यावर डोळा ठेवूनही कधी तिच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं नव्हतं. पण मग तो त्याच्या साहेबांच्या मुलीशी, म्हणजेच तिच्याशी लग्नालाही हो म्हणाला. तो अजूनही आतून तसाच होता, पण त्याचं हे बाह्य रूप थोडंसं नासायला लागलं होतं. पण आपण लग्नानंतर प्रेमानं सगळं ठीक करू हा तिला विश्वास होता. कारण त्याच्यातल्या आतल्या चांगुलपणावर तिचा पूर्ण विश्वास होता.

----

तो अतिशय अस्वस्थ होता. त्यानं जे ऐकलं होतं, त्यानं त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. तो तिचीच वाट बघत होता. वेटर तीनदा येऊन ऑर्डर मागून गेला होता. त्याची नजर दरवाज्याकडेच होती. अस्वस्थपणात तो सारखी हाताची बोटं मोडत होता. आणि ती आली. तो तिचा चेहरा निरखत होता. पण तिच्या चेहर्‍यावरचे भाव आज त्याला वाचताच येत नव्हते. ही कोण वेगळीच भासत होती. ती शांतपणे त्याच्यासमोर बसली.

तो काही बोललाच नाही, पण त्याच्या चेहर्‍यावर खूप मोठ्ठं प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होतं. अशीच स्तब्ध शांतता होती.

"तू ऐकलंयस ते खरं आहे. मी उद्या लग्न करतेय!" तिनं तो विचारायच्या आतच सांगितलं.

"साहेब, ऑर्डर!" वेटर तेव्हढ्यात कडमडला. तो काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. अवाक् झाला होता.

"नेहमीचंच." तीच बोलली.

त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.

"मस्करी करतेयस ना?" तो काकुळतीला आला होता. तिला बघवत नव्हतं.

"नाही. मी खरंच उद्या लग्न करतेय."

"अगं.." त्यानं आवंढा गिळला."पण का? काय झालं असं? मी काय केलं गं?" तो मोडला होता.

"तू काहीच केलं नाहीस, हीच चूक आहे तुझी."

"काय?"

"हो. कॉलेज संपून वर्ष होत आलं, तू अजून आहेस तिथेच आहेस. आयुष्यात प्रेम हे सर्वकाही नसतं."

तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत होता. तासनतास आपल्या मिठीत निःशब्द बसून राहणारी हीच का ती? "कविता, लेखन हे काही पोटापाण्याचे उद्योग नव्हेत. त्यानं आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांचं पोट भरत नसतं."

"..." त्याच्या तोंडून अजूनही शब्द फुटत नव्हते.

"आई-वडिलांवर भार बनून राहिलायस. तुझं पुस्तक बेस्टसेलर होणार हे मी गेली तीन वर्षं ऐकतेय. कॉलेजात ते सगळं रम्य वाटायचं. आता गेलं वर्षभर मीच नोकरी करतेय. जग कळतंय मला."

त्यांच्या टेबलावर वडा-सांबारच्या प्लेट्स आल्या.

"मी आई-वडिलांवर भार झालोय, हे तू कशाला मला सांगतेयस. ते माझे आई-वडिल आहेत, मला पोसतील नाहीतर घरातनं हाकलून देतील. तुझ्याशी काय? तू स्वतःचं बोल. तुला लाज वाटते सांग माझी!"

"होय. तसंच समज मग. मी कमावते आणि माझा प्रियकर दिवसभर कुठेतरी कट्ट्यावर नाहीतर वाचनालयात बसून कविता करतो. कसं वाटतं हे? अशा माणसाशी लग्न कसं करावं एखाद्या मुलीनं!"

त्याच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या. तो उसनं अवसान आणून तिच्यावर रागवायचा आणि तिला टाकून बोलायचा निष्फळ प्रयत्न करत होता. त्याला रडू फुटत होतं. मोठी विचित्र अवस्था झाली होती. एकेकाळी सगळं जग पायाशी असावं असं वाटणारा तो आज असहाय झाला होता. त्याला निष्ठुर जगातला पहिला धडा मिळत होता, आणि धडा देणारीही कोण, तर जिच्यावर जिवापाड प्रेम केलं ती.

तिनं प्लेट अर्ध्याहून जास्त संपवली. त्याला एकच घास कसाबसा गेला होता. तिनं वेटरला चहा आणायला सांगितलं.

तो तिच्याकडे फक्त रागीट कटाक्ष टाकायचा प्रयत्न करत होता, पण ते रडवेले आणि असहाय जास्त वाटत होते. तिलादेखील त्याची ती नजर सहन होत नव्हती.

"माझा होणारा नवरा आय.ए.एस. ऑफिसर आहे. असा नवरा नशीबवाल्यांनाच मिळतो. दिमतीला दहा नोकर-चाकर. सगळीकडे साहेबी थाट."

टेबलावर चहा आला. तिनं पटकन उचलून तोंडाला लावला.

"निघ इथून. निघून जा." त्याच्या तोंडून शब्द फुटले. तिनं चमकून वर पाहिलं. आजूबाजूचीही दोन गिर्‍हाईकं वळून पाहायला लागली. "मला डोळ्यासमोरही नकोयस तू. सोडून दे मला माझ्या अवस्थेवर."

तिनं कप खाली ठेवला आणि नेहमीच्या सवयीनं पर्समध्ये हात घालायला गेली.

"नको. भीक नकोय तुझी मला. आता तू माझी कुणी नाहीयेस. माझं बिल द्यायची आवश्यकता नाही. आणि मी तुला इथे बोलावलं होतं, त्यामुळे पूर्ण बिल मी देईन. कसंही देईन. भीक मागून देईन, पण देईन मीच. तो चहा संपव आणि जा इथून. पुन्हा तोंड दाखवू नकोस मला."

ती उठून गेली. तो टेबलावर पडलेल्या अर्धवट खाल्लेल्या डिशेसकडे आणि अर्धवट प्यायलेल्या चहांकडे बघत होता. त्याला स्वतःमध्ये एक विचित्र पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटत होती. त्याची तंद्री भंग पावली ती, 'बिल आणू का?' हे विचारायला आलेल्या वेटरमुळे. त्यानं एकदम वर बघितलं. 'हं' एव्हढं म्हणून तो पाकिट काढू लागला. रेस्टॉरंटची गर्दीची वेळ होती. वेटिंगला लोक गल्ल्यापाशी उभे होते, त्यामुळे बराच वेळ मोकळा बसलेल्या त्याला हटकायला वेटर आला होता बहुतेक. बिल देऊन तो बाहेर पडला आणि निरुद्देशपणे रस्त्यावरून चालू लागला. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शनिवारची रात्र. शहराचा तो बर्‍यापैकी मध्यवर्ती आणि उच्चभ्रू भाग झगमगाटानं न्हाऊन निघाला होता. ती बदनाम वस्ती नव्हती, पण तिथल्या वातावरणात एक वेगळीच नशा होती. तरूणाईची झिंग!

शुक्रवार आणि शनिवार रात्री त्या भागाचं लावण्य आणि तारूण्य ऊतू जात असे. अश्याच त्या धुंद रात्री प्रेमी जोडपी रंगात येत असत. पैश्याचे पाट वाहत. काही रेस्टॉरंट्समध्ये सभ्य उच्चभ्रू तर काहींमध्ये रंगेल उच्चभ्रू चैन करत. काही साधीशी मध्यमवर्गीयांसाठीची रेस्टॉरंट्सही होती. तो अश्याच साध्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडला होता. रस्त्याच्या कडेलाही काही रेस्टॉरंट्सच्या छत्रीवाल्या टेबल-खुर्च्या असत. आत्ता तोही काही खुर्च्यांच्या शेजारूनच चालला होता. प्रेमी युगुलांची हळू आवाजातली कुजबूज त्याला अस्वस्थ करायला लागली. त्यानं शर्टाच्या खिशातून विल्सचं पाकीट काढलं आणि त्यातून एक सिगरेट काढून ओठांमध्ये अडकवली. पँटच्या खिशातून काडेपेटी काढून सिगरेट शिलगावली. चालत चालत तो एका जागी थांबला. सिगरेट आत्ताशी अर्धीही झाली नव्हती. ती प्रेमी युगुलांची कुजबूज आता ऐकू येईनाशी झाली होती. वर आकाशातल्या चांदण्यांकडे निरुद्देशपणे टक लावून बघत तो सिगरेटचे हळूहळू पण खोल असे कश घेऊ लागला. आता त्याला शांतता जाणवू लागली होती. तो जिथे उभा होता, तिथे सगळ्या गाड्यांचंच पार्किंग होतं. त्यामुळे तिथे वर्दळ अशी नव्हती, कारण ह्या सगळ्या गाड्या मध्यरात्री किंवा पहाटेच इथून हलणार होत्या.

आत शिरणारा प्रत्येक कश त्याच्या संवेदना बोथट करत होता. ज्या शांततेसाठी तो धडपडत होता, ती ह्या किकमधून मिळणार नव्हती, पण कदाचित एक क्षणभर तिला स्पर्शून आल्यागत नक्कीच वाटायचं. आत्ताही, सिगरेट जशी संपत आली होती, संवेदनांचे दिवे हळूहळू मालवू लागले होते. देहामध्ये एक वेगळीच चेतना जागृत होतेय असं वाटत होतं.

आणि अचानक गाडीचा दरवाजा कुणीतरी ठोकतंय असं त्याला जाणवू लागलं. तो भानावर आला. सगळा भर क्षणार्धात ओसरला. समाधी भंग पावली. अतिशय वैतागलेल्या मनःस्थितीत त्यानं सिगरेटचं थोटूक भिरकावलं आणि आवाजाच्या दिशेनं पाहिलं. एक पंचविशीची मुलगी गाडीची काच आतून ठोकत होती. ती गाडीत अडकल्यागत. उमेशला क्षणभर काहीच उमजेना. तो दोन मिनिटं डोळे फाडफाडून फक्त बघत राहिला होता. मग तिचं काच ठोकणं अजून जोरात सुरू झालं आणि उमेश पुन्हा भानावर आला. तो चटकन त्या टॅव्हेराजवळ गेला. ती त्याला दार उघडायला खूण करत होती. उमेश तिचं निरीक्षण करत होता. रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात तिचा सावळा वर्ण वेगळाच भासत होता. नाकी डोळी नीटस. तिच्या रेखीव जिवणीच्या हालचाली निरखतानाच एकदम आपण इथे कशासाठी आलोय ह्याचं त्याला भान आलं. त्यानं चटकन दार उघडायचा प्रयत्न केला. पण दार उघडत नव्हतं. म्हणजे चाईल्ड लॉक नव्हतं. गाडी व्यवस्थित इलेक्ट्रॉनिकली लॉक झालेली होती. मालक आल्याशिवाय काच फोडणं एव्हढाच पर्याय होता. काचेपलिकडून तिचं बोलणंही स्पष्ट ऐकू येत नव्हतं. त्यानं तिला काय करू असं खुणेनंच विचारलं. ती स्वतःच सैरभैर झाली होती. त्यानं चारी बाजूंनी दारं चेक केली, पण त्याला काहीच कळेना झालं होतं. तो धावत पळत तिथल्या एका रेस्टॉरंटकडे धावत गेला आणि त्यांना झाला प्रकार सांगितला. तिथलाच एक पोर्‍या हॅकसॉ ब्लेड घेऊन आला आणि त्यानं लगेच लॉक उघडून दिलं. नशीबानं गाडीला अलार्म नव्हता. ती चटकन बाहेर आली आणि तिनं मोकळा श्वास घेतला. पोर्‍या तिथेच घुटमळत होता. पण त्यानं जवळचे सगळे पैसे बिलातच दिल्यामुळे तो अवघडून उभा होता. तिच्या लक्षात आलं आणि तिनं 'सॉरी' म्हणून पोर्‍याचे पैसे वळते केले.

"सॉरी, ऍक्च्युअली माझं पाकिट चोरीला गेलंय." तो ओशाळून खोटं बोलला.

"इट्स ओके. तुम्ही माझी मदत केलीत. मी गुदमरून मेलेही असते नाहीतर."

"पण तुम्ही अडकलात कशा?"

"ऍक्च्युअली मी खूप दमले होते, दिवसभर कॉलेजमध्ये गॅदरिंगचं काम होतं आणि आत्ता पार्टी. मी दमून गाडीतच झोपले. माझी मित्रमंडळी कॉलेजातूनच नशेत निघाले होते. मला विसरूनच गेले असावेत."

"चला मी निघतो." तो तिच्या उत्तराचीही वाट न बघता चालायला लागला.

----

"तुम्ही इथे कुठे?" तिनं चकित होऊन विचारलं. त्याला तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं, पण चटकन आठवेना. "अहो महिन्याभरापूर्वी नाही का, रात्री मी गाडीत अडकले होते, तुम्ही मला बाहेर काढलंत."

"ओह बरोबर. मी अकाऊंटंट आहे इथे. आजच जॉईन केलंय."

"ओह, सही. कॉन्ग्रॅट्स. हे माझ्या वडिलांच्याच कंपनीचं ऑफिस आहे."

"ग्रेट. ओके मॅडम, मला जरा चीफ अकाऊंटंटनी केबिनमध्ये बोलावलंय, मी जातो."

"ओके, पण प्लीज मला मॅडम नका म्हणू. माझं नाव अनुप्रिया आहे."

"ओके. अनुप्रिया."

----

"उम्या, कसला सेटप केलायस गड्या. मानलं तुला."

"कमलेश, आज माझ्या बदल्याची रात्र आहे. तिला कळू दे तिनं काय गमावलंय. एक छोटासा म्युनिसिपल कमिश्नर आणि एक बिझनेस टायकून ह्यातला फरक कळेल तिला."

"ऑल द बेस्ट गड्या. आपले सगळे मित्रमैत्रीणीपण येताहेत. तुझ्या सांगण्यावरून मी सगळ्यांना बोलावलंय."

"बेस्ट. आज स्पेशली अरमानीकडून डिझाईन केलेला सूट माझ्यासाठी आणि अनुची साडी भारतातल्या नामवंत डिझायनरकडून बनवलीय. आणि हे दोन्ही डिझायनर्सही आहेत लग्नात. सगळे स्टार्स, सुपरस्टार्स झाडून सगळे आहेत. आजच्या दिवसासाठीच कदाचित आठ वर्ष मी वाट पाहिलीय."

"येस. तुझे आई-बाबा?"

"असतील बाहेर. एनी वे तू हो पुढे. माझी महत्वाची थोडी काम निपटून मी येतोच."

अचानक ब्लॅकबेरी वाजायला लागला. त्यानं उचलून कानाला लावला.

"कमलेश, ती आलीय. माझ्या रिसेप्शनवाल्याला मी इंस्ट्रक्शन दिल्या होत्या, त्याचाच फोन होता."

"ओके. मी बघून येतो थांब."

पाचच मिनिटांत कमलेश धावत परत आला. "उम्या," तो धापा टाकत होता, तो बावरला होता.

"काय झालं?" उमेश काळजीत पडला.

क्रमशः

मी वचन मोडलंय, महिना संपायच्या आतच परत कथा. पण दोष माझा नाहीये. दोष सचिनचा आहे. कथेची कल्पना त्याची आहे. आणि क्रमशःबद्दल व पब्लिश केल्याबद्दल निषेध माऊताईचा करावा. ती कल्पना तिची, नाहीतर मी इतक्यात टाकणार नव्हतो किंवा इबुक म्हणून एका फटक्यात पब्लिश करणार होतो.

उत्तरार्ध

8/26/2010

आवर रे-१

नावामधला अंक पाहून पळू नका. ही कथा नाहीये! प्रसंगवर्णन आहे. काही वर्षांपूर्वी प्रवीण दवणे 'सावर रे' अश्या नावाचं एक सुंदर सदर पेपरात लिहायचे. त्यावरून हे शीर्षक सुचलंय, ही त्या सदराची पॅरडी, थट्टा, विडंबन, विटंबन वगैरे नाहीये. पण मग हे नक्की काय आहे, ते वाचूनच ठरवा.

बभ्रुवाहन 'कॅफे कॉफी डे' मध्ये त्याच्या मैत्रीणीची वाट पाहत बसला होता. एव्हढ्यात समोरून दृष्टद्युम्न आला. बभ्रुवाहननं इकडे-तिकडे बघण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण दृष्टद्युम्नच्या बाज़ नजरेनं त्याला बरोबर पकडलं आणि समस्त प्रेमी युगुलं, मीटिंग करत असलेले बिझनेसमन आणि पाचकळपणा करत बसलेले कॉलेज ग्रुप्स एकत्रच फ्रीज झाले अशी एक हाळी कॅफे कॉफी डे (ह्यापुढे सीसीडी) च्या आसमंतात घुमली.

"आयला बब्या!"

आता सगळ्याजणांनी 'बब्या' कोण म्हणून बभ्रुवाहनाकडे पाहिलं. चेहर्‍यावर कसंनुसं हासू आणत बभ्रुवाहननं (बब्या) दृष्टद्युम्नाकडे पाहिलं. दृष्टद्युम्न आपल्याच मस्तीत चालत चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं हसू घेऊन बब्याच्या सोफ्यापाशी आला आणि हक्कानं बसला (बब्यानं मोठ्या कष्टानं वेळेच्या तासभर आधी येऊन कष्टानं नजर ठेवून पटकावलेल्या आयत्या सोफ्यावर).

"काय रे बब्या, तू चक्क सीसीडीमध्ये!" दृष्टद्युम्न.

"अरे हळू बोल ना डी." बब्या गयावया करत, इकडेतिकडे बघत म्हणाला. (दृष्टद्युम्न ह्या नावाचा कुठलाही शॉर्टफॉर्म संभवत नसल्याने त्याला सगळेच 'डी' एव्हढंच म्हणतात. नाईलाजाने 'बब्या' देखील.)

"अरे काय तिच्यायला तू पण, भित्री भागूबाई, चुलीपुढे.."

"बरं बरं कळलं."

"काय मग, इथे कुठे?"

"अरे सहज, कॉफी प्यायला!"

"बब्या, सीसीडीमध्ये एकट्यानं कोणी 'कॉफी प्यायला' येत नाही. इथे लोक गप्पा मारून वेळ काढण्यासाठी किंवा तत्सम प्रकारांसाठी येतात, कॉफी जागेचं भाडं म्हणून पितात. एकट्यानं येऊन कॉफी पिउन जाण्याइतकी एकतर कॉफी स्वस्त नाही आणि दुसरं म्हणजे कॉफीसारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी ७० रुपये उगाच मोजणार्‍यातला तू नाहीस."

"बरं बरं. पुरे माझी स्तुती." बब्याचं लक्ष अजून दरवाज्याकडे होतं. मैत्रीण यायच्या आत ही ब्याद घालवणं आवश्यक होतं. "मग तू एकटा कसा काय? की तुझ्याकडे आहे पैसा उडवायला?" कितीही प्रयत्न केला तरी बब्याला डी इतकं तिरकं बोलता येत नसे.

"अरे मी असाच. हा गल्ल्यावर उभा आहे ना, 'अरविंद' तो माझा मित्र आहे." डी गल्ल्याच्या दिशेने बोट करून म्हणाला. बब्यानं पाहिलं, तर गल्ल्यावर तीन माणसं होती.

"डी, अरे तीन जण आहेत, ह्यातला अरविंद कोण?" डीचं लक्ष नव्हतं. तो मेन्युकार्ड वाचण्यात गढला होता. "डी.." बब्यानं अजून एक प्रयत्न केला.

"हं." डीनं वर पाहिलं.

"अरे गल्ल्यावर तीन जण आहेत. ह्यातला अरविंद कोणता?" डीनं बेफिकीरपणे गल्ल्याकडे पाहिलं.

"तो रे! उजवीकडे उभा आहे ना!" असं म्हणून डी पुन्हा मेनुकार्डात गढला.

"अरे पण तुझ्या उजवीकडे की त्या माणसाच्या?" बब्याला खूप इंटरेस्ट आला होता. गल्ल्यावरच्या माणसाशी ओळख असणं भविष्यात उपयोगी पडलं असतं. बब्या आधीच भविष्यात पोचला होता, पण वर्तमानातली मैत्रीण अजून पोचली नव्हती, सीसीडीत.

"अरे तुझ्या उजवीकडे आहे तो." डी नेहमीच्याच शांतपणे, न वैतागता, मेन्युकार्डामधून डोकंही वर न उचलता म्हणाला.

"म्हणजे तो, हिरवा शर्ट?"

"असेल रे. तू कशाला चौकश्या करतोयस एव्हढ्या? इंट्रो करून हवाय का?" डीनं नेहमीप्रमाणेच इंट्रो शब्दावर खोचकपणे भर देत विचारलं.

"कैच्याकै!" बब्या एकदम वरमला. पुन्हा त्याचं लक्ष दरवाज्याकडे जाऊन परत डीवर आलं.

"तू एव्हढं काय वाचतोयस त्यात. काय पाठ करणार आहेस काय मेन्युकार्ड? अरविंदच्या जागी घेताहेत की काय तुला?" बब्यानं सूक्ष्म विनोदनिर्मितीचा प्रयत्न केला, पण डी वर हवा तो परिणाम झाला नाही. त्यानं शांतपणे मेन्युकार्ड बंद केलं आणि टेबलावर ठेवलं.

"काय आहे, मेन्युकार्ड वाचताना मला अचानकपणे काही गोष्टी जाणवल्या!"

"फार महाग आहेत ना सगळ्या गोष्टी! जायचा विचार करतोयस ना तू इथून."

चेहर्‍यावर एक छोटंसं स्मित आणून डी म्हणाला, "मी काय म्हणतो, तू मेन्युकार्ड वाचतोस, तेव्हा उजवी बाजू आधी वाचतोस की डावी बाजू?"

"आयला अरे तो अरविंद बोलावतोय बहुतेक तुला. जा ना भेटून घे त्याला. तुला पुढेही जायचं असेल ना, उशीर होईल रे तुला, माझ्याशीच गप्पा मारण्यात वेळ काढलास तर!" बब्याचा एक डोळा दरवाज्याकडे होता आणि दुसरा डीच्या हालचालींकडे. दोन्ही डोळ्यांना हवी तशी दृश्यं दिसली नाहीत.

"अरे गोली मारो अरविंदको! त्याची ड्युटी बराच वेळ आहे. बीसाईड्स, त्याला माझ्याकडे काम आहे. गरज असेल तर येईल इथे. आणि मला पुढे काहीही कार्यक्रम नाहीये. मी तुझ्याच घरी चक्कर टाकायच्या विचारात होतो."

"तू कॉफी पिणार का?" बब्या डी ला कटवण्यासाठी पैसेही खर्च करायला तयार होता.

"मी पिऊन आलोय घरून. तू मागव पाहिजे असेल तर! पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे!" बब्यानं मनातल्या मनात हिशोब केला आणि त्याचं चित्तपावन मन भारी पडलं, "नाही मला आत्ता थोडी ऍसिडीटी वाटतेय, थोड्या वेळाने घेईन!"

"अरे मग एखादं एरेटेड ड्रिंक घे!"

"नको रे बाबा, होईल सगळं आपोआपच थोड्या वेळात ठीक."

"हं, पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस!"

"कुठला प्रश्न!"

"मेन्युकार्ड वाचताना तू उजवी बाजू आधी वाचतोस की डावी बाजू?"

"तू माझ्या घरी चक्कर टाकणार होतास म्हणालास. काही विशेष काम होतं का?" बब्याला विषय बदलायचा होता, कारण डी जेव्हा असं काही सुरू करतो, तेव्हा त्यात काहीतरी मोठा मुद्दा दडलेला असतो. आणि आत्ता त्याला मोठी चर्चा परवडणारी नव्हती.

"काही विशेष नाही, सहज कॉलेजची बाष्कळ गॉसिपिंग करावीशी वाटत होती."

"काय?"

"अरे काही नाही, ते सोड, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे!" आता अजून तंगवणं शक्य नाही हे उमजल्यानं, बब्यानं पुन्हा एकदा दरवाज्याकडे व्यर्थ कटाक्ष टाकला आणि म्हणाला,

"तुझी उजवी की माझी उजवी!"

"मेन्युकार्डची उजवी-डावी"

"उजवी की डावी?"

"ते उत्तर तू द्यायचंय." कितीही फालतूपणा केला तरी डी विचलित कसा होत नाही, ह्याचं बब्याला नेहमीप्रमाणेच आजही आश्चर्य वाटलं.

"उजवी ऑफकोर्स. मी चित्तपावन आहे."

"हं. मी तुझ्याकडून तीच अपेक्षा केली होती. पण ही चित्तपावनांचीच नाही, तर तमाम मध्यमवर्गीयांची थोड्याफार फरकाने मेंटॅलिटी असते. पण उगाच प्रत्येक गोष्टीला जातीय रंग द्यायची आपल्याला खोड असते."

"मी कुठे जातीय रंग दिला. मी सहज म्हणालो होतो. बीसाईड्स मी माझ्या जातीबद्दल बोललो."

"जातीचा उल्लेख करायची काय गरज होती? आणि तुझी जात म्हणजे काय तू काहीही बोलशील का? मी म्हणू का मी मराठा आहे म्हणजे पैलवानी डोक्याचा असणारच."

"अरे म्हणायची पद्धत आहे. आणि काहीही काय बोललो, मला अभिमान वाटतो मी काटकसरी आहे ह्याचा."

"कसलेही अभिमान बाळगणे ही दुसरी वाईट खोड. उद्या मी म्हणीन मी डोक्यानं विचार करत नाही ह्याचा मला अभिमान आहे."

"आवरा! तू फुकट काहीतरी उकरून काढतोयस. तुला वादासाठी वाद घालायचाय का?"

"नाही, तू मला सोप्पं सांग. तुला मी चित्तपावन आहे हे सांगावंसं का वाटलं?"

"अरे सांगायचं काय आहे? मी आहे हे तुला ठाऊक आहे. बोलायची पद्धत आहे राजा."

"बरी आहे की बोलायची पद्धत. मग आमचे छावा आणि ब्रिगेडचे पब्लिक बोलले की राग येतात तुम्हाला."

"तुमचे ब्रिगेड आणि आम्हाला राग? अरे कैच्याकै काय बोलतोयस तू? ठीक आहेस ना? कालच वर्गात रिताला मराठा ही जात नसून साम्राज्याच्या पाईकांसाठीचा शब्द असल्याचं सांगत होतास!"

"रिताला मधे आणून विषय बदलू नकोस. ब्रिगेडचा कशाला रे राग तुम्हा लोकांना? काय चुकीचं बोलतात ते?"

"काय चुकीचं बोलतात? आवरा, हे तू मला विचारतोयस?"

"इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे?"

"तू पण असला करंटा निघशील वाटलं नव्हतं मला. ती बांडगुळं..."

"बरं ते सोड. मला एक सांग, भगव्या आतंकवादाबद्दल तुझं काय मत आहे? कालच चिदुभाऊ म्हणालेत, की तो आपल्या देशासमोरचं एक मोठं आव्हान बनलाय म्हणून."

"अरे काय चाललंय तुझं? ह्या प्रश्नाचा आधीच्या मुद्द्याशी काय संबंध आहे?"

"अरे तू बांडगूळ म्हणालास त्यावरून एकदम आठवले चिदुभाऊ!"

"तू ठीक आहेस ना?"

"होय, मी आता ठीक आहे." घड्याळाकडे बघत डी म्हणाला.

"म्हणजे?"

"नंदिनीचा आज साखरपुडा झाला." डी बब्याचा चेहरा निरखत म्हणाला.

"क्काय?" बब्या जोरात ओरडला. मगाचचेच लोक पुन्हा फ्रीज झाले, पुन्हा नजरा वळल्या आणि पुन्हा बब्या ओशाळला.

"अरे तिनं मला इथे भेटायला बोलावलं होतं!"

"ठाऊक आहे मला. तुला कुणीना कुणीतरी फोन करून हे सांगितलं असतं आणि तू तिथे जाऊन धिंगाणा घातला असतास म्हणून मी इथे आलो."

"काय संबंध?"

"ती तुझ्या लायक नव्हती हे मला पहिल्या दिवसापासून ठाऊक होतं. तिचं ऑलरेडी अफेयर चालू होतं. तू तिला परीक्षेच्या नोट्ससाठी हवा होतास आणि तू वेडा!"

"मग हे आधीही सांगता आलं असतं ना!"

"तू विश्वास ठेवला असतास माझ्यावर?"

"आता का ठेवू?"

"फोन चालू करून बघ, मित्रांचे मिस्ड कॉल्स मेसेजेस दिसतील. त्यातल्या कुणालाही फोन करून विचार!"

"फोन ऑफ कधी केलास?"

" मेन्युकार्ड वाचायला मला तीस सेकंद पुरतात, पण तुझं लक्ष दरवाज्यापासून गल्ल्याकडे भिरभिरत असताना तुझ्या खिशातून मोबाईल काढून ऑफ करून पुन्हा ठेवायला ५ मिनिटं!" डी मिश्किल हसत म्हणाला.

"अरे पण तुला कसं कळलं ती इथे येणार होती ते!"

"हीच प्रत्येक गोष्टीची चिरफाड करण्याची सवय देशाला घेऊन बुडणार!" डी उठत म्हणाला.

"अरे पण कॉफी तर घेऊ!"

"नको, एक कुकीजचा पुडा घेऊ काऊंटरवरून!"

गल्ल्यावर आत्ता एकच माणूस होता. आणि त्याच्या शर्टावर 'पुनीत' असं लिहिलेला बॅज होता. बब्यानं प्रश्नार्थक नजरेनं डी कडे पाहिलं.

"बाजीप्रभूंनी शिवाजीमहाराजांसाठी प्राण दिले! एव्हढं पुरेसं नाही ना तुम्हा लोकांना? ते कोण, कसे.."

"आवरा!!!"

काहीही क्रमशः नाहीये आणि समाप्तही नाहीये. आता क्रमांकाबद्दल सांगतो. भविष्यात कधी पुन्हा असंच काहीतरी निरूद्देश लिहावंसं वाटलं, तर अनुक्रमांकांची सोय आत्तापासूनच करून ठेवतो.

8/22/2010

वेटिंग फॉर गोदो

वेटिंग फॉर गोदो बद्दल मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा 'टॉम ऑल्टर' त्यातली लकीची भूमिका मराठी आवृत्तीत करणार अशी काहीशी बातमी होती. तेव्हा नाटकाबद्दल चार-दोन ओळी पेपरात वाचल्या आणि त्यातलं अवाक्षरही कळलं नव्हतं. मग नाटकाबद्दल मी तसा विसरून गेलो. पण ते नाव, विचित्र नाव मी कधीच विसरलो नाही. मग पुन्हा एके दिवशी कुठेतरी ह्याच नाटकाचा उल्लेख वाचला. तेव्हा हाताशी विकिपीडिया होता. लगोलग विकिमातेला प्रणाम केला. आणि मला धक्का बसला. हे नाटक ऍब्झर्डिस्ट असल्याचं लिहिलं होतं. माझी गाडी नेहमीच ऍब्झर्डिझमपाशी येऊन थांबते. मग प्लॉट वाचायला गेलो, पण थांबलो. म्हटलं आधी नाटक वाचूया.

मग लेखक सॅम्युएल बेकेटच्या मूळ फ्रेंच पण इंग्रजी अनुवादित नाटकाचा शोध सुरू झाला. 'प्रोजेक्ट गुटेनबर्ग' नावाचा एक स्तुत्य उपक्रम आहे, खूप जुनी अनेक पुस्तकं, ज्यांचे कॉपीराईट्स एक्स्पायर झालेत, त्यांची इ-बुक्स बनवून फुकटात डाऊनलोड करायला दिली जातात. तिथेच मला २०व्या शतकात लिहिलेलं हे नाटक मिळालं. अवघं ४० पानांचं नाटक. मी म्हटलं, 'वाह, चटदिशी वाचून होईल. मग जेव्हा ती चाळीस पानं समोर धरली, तेव्हा भ्रमनिरास झाला.

कारण, नाटक ह्या प्रकाराशी इतका जवळून संबंध शाळा सुटल्यावर पहिल्यांदाच आला होता. अर्थात शाळेतही, एकदाच स्नेहसंमेलनाला केलं होतं म्हणा. पण नाटकाचं वाचन, तेही काही दशकं जुनं, प्रगल्भ नाटक. मी तीन-चार ओळींतच पानं खाली ठेवून दिली.

मग ६-७ महिने उलटले. एका शुक्रवारी संध्याकाळी मला कुठेतरी जायचं होतं. मी ठराविक वेळ होण्याची वाट पाहत होतो आणि अश्या कंटाळवाण्या प्रतिक्षेच्या क्षणीच योगायोगानं मला 'वेटिंग फॉर गोदो' ची आठवण झाली. माझा पराभव करणारं एक छोटंसं नाटक. मी निर्धाराने ते पुन्हा हातात घेतलं आणि कष्टानं पहिल्या १०-१२ ओळी वाचल्या. आणि ह्यावेळी मात्र जमलं होतं. मी हळूहळू नाटकात शिरू लागलो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनच्या जगात पोचलो होतो. ती संध्याकाळ, तो निर्मनुष्य रस्ता, ते पानगळ झालेलं झाड, तो एस्त्रागॉन बसतो तो कट्टा, ते एस्त्रागॉनचे बूट, विसरभोळा एस्त्रागॉन आणि ठाम, तत्वज्ञानी व्लादिमीर. नाटकाची टॅगलाईनच सांगते, 'ए ट्रॅजिकॉमेडी इन टू ऍक्ट्स'. कदाचित हे नावातच दिल्यामुळे असेल, पण वाचताना खरंच प्रत्येक ओळीला कारूण्याची एक अदृश्य झालर जाणवत राहते. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची बरेचदा असंबद्ध आणि विस्मृतीने ल्यालेली संभाषणं विनोदाची निर्मिती तर करतात, पण त्यांचं शेवटचं, 'नथिंग टू बी डन.' त्यांची असहायता पुढे आणतं. आणि मग, "व्हाय कान्ट वी गो?" , "वी आर वेटिंग फॉर गोदो!" "आह.." हे प्रत्येक संवादाचं धृवपद ठरतं.

त्यांच्या एक झाड, कट्टा आणि रस्त्याच्या जगात पोझ्झो आणि लकी प्रवेशतात. पोझ्झो हा एक निर्दयी जमिनदार आहे आणि लकी त्याचा गुलाम. तो लकीकडून अशी अशी कामं करून घेतो, जी पोझ्झोची अमानुषता दर्शवतात. पण मजा म्हणजे, लकीही ती कामं अगदी मन लावून करत असतो. पोझ्झो त्याला, 'पिग', 'हॉग' म्हणून संबोधतो. एका प्रसंगी तर त्याला लकी म्हटल्यावर तो 'ओ' देत नाही, पण 'पिग' म्हटल्यावर लगेच 'ओ' देतो. पोझ्झोच्या म्हणण्यानुसार, त्याला आता लकी नकोय, कारण तो म्हातारा झालाय, त्यासाठीच तो त्याला विकायला निघालाय. पण लकीला त्याला सोडून जायचं नाहीये, म्हणून तो अधिक जास्त आज्ञाधारकपणा दाखवतोय, जेणेकरून पोझ्झो त्याला विकणार नाही. पोझ्झोचं एकंदर आगाऊ आणि दांभिक वागणं, तो व्लादिमीर आणि एस्त्रागॉनशी वागताना मात्र दाखवत नाही. ते दोघे त्याचे वेळ घालवण्याचे साथी असल्याने तो त्यांना समान वागणूक देतोय, असे तो म्हणत राहतो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची लकीबद्दलची सुरूवातीची अनुकंपा, नंतर लकीच्याच विचित्र वागण्यानं कमी होते. मग लकी आणि पोझ्झो निघून जातात. थोड्या वेळाने गोदोचा संदेश घेऊन एक मुलगा येतो आणि गोदो आज येणार नाही, उद्या नक्की येईल असे सांगून जातो. संध्याकाळ संपते, रात्र सुरू होते. पहिला अंक पडतो.

एव्हढे वाचून मी बाहेर गेलो, पण मला त्याच दिवशी पूर्ण वाचायचं होतं. पण मग परत यायला उशीर झाल्यामुळे मी शनिवारी पुन्हा नाटक उचललं.

तीच जागा, पण ह्यावेळी झाडाला पालवी फुटलेय. पुन्हा व्लादिमीर आणि एस्त्रागॉन उगवतात. पुन्हा ते दोघे दिवसभर काय केलं ह्याच्या चर्चा करतात. पुन्हा गाडी विविध असंबद्ध आणि विसराळूपणाच्या संवांदावरून फिरत, "नथिंग टू बी डन." आणि "वी आर वेटिंग फॉर गोदो." वर येऊन थांबते. आश्चर्य म्हणजे, पुन्हा लकी आणि पोझ्झो येतात. ह्यावेळी, पोझ्झो आंधळा झालाय. लकी अजून म्हातारा झालाय. एस्त्रागॉन त्या दोघांनाही ओळखत नाही, पण व्लादिमीर ओळखतो. ह्यावेळी, रंगमंचावर सगळीच पात्र कोलमडतात आणि मग मदत आणि मानवजात सारख्या गहन विषयांवर अतिशय सामान्य भाषेमध्ये अर्थपूर्ण चर्चा होते. लकी आणि पोझ्झो पुन्हा निघून जातात आणि पुन्हा व्लादिमीर आणि एस्त्रागॉन वाट पाहत राहतात. शेवटाकडे पुन्हा एक मुलगा येतो, ह्यावेळी हा दुसरा मुलगा असतो. तो पुन्हा गोदोचा तोच संदेश देतो, की गोदो आज नाही येणार उद्या येईल आणि निघून जातो.

व्लादिमीर आणि एस्त्रागॉन रात्र पडल्यामुळे, 'आता आपण जाऊया.' म्हणतात आणि पहिल्या अंकाप्रमाणेच जागचे न हलता बसून राहतात.

नाटक फक्त संध्याकाळींंचंच वर्णन करतं. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनच्या संवादांवरून जाणवतं, की ते दोघे रात्र आणि दिवस वेगवेगळे असतात, पण संध्याकाळी मात्र ते वाट बघायला ह्या विवक्षित ठिकाणी येतात. गोदो कोण आहे, हे त्यांच्या संवादांवरून पुसटसंच जाणवतं. प्रत्यक्षात दोघेही गोदोला नीट ओळखत नाहीत. एस्त्रागॉन तर विसरभोळा आहे, पण व्लादिमीरही 'गोदो आपल्याला कसलीतरी प्रार्थना शिकवणार आहे' असं काहीसं सांगतो. एस्त्रागॉन रोज कुणाकडून तरी मार खाऊन येतो.व्लादिमीर रोज त्याला सांगतो, की मी आहे म्हणून तू आहेस, मी नसतो तर तुझं काय झालं असतं. दोघे अनेकदा एकमेकांवर चिडतात, पण मग एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांना सावरतात.

लकी आणि पोझ्झो ही जोडी मालक आणि गुलामाची जोडी आहे. पोझ्झो लकीकडून वाट्टेल ते करवतो. लकीच्या गळ्यात एक दॉरी बांधलेली आहे, जिचं एक टोक पकडून पोझ्झो चालतो(ह्या दोरीचा परिणामकारक वापर स्टेजचं माप घेऊन दृश्य परिणामासाठी सुद्धा केलाय). पोझ्झोच्या हातात एक चाबूक सुद्धा आहे, जो फटकावून तो वेळोवेळी लकीचं लक्ष वेधून घेतो. लकी खूप सारं सामान घेऊन फिरतो. तो दमलाय, तो उभ्याउभ्याच पेंगतो आणि मग पोझ्झोच्या शिव्या खातो. पोझ्झो त्याला गायला, नाचायला तर सांगतोच, पण करमणुकीसाठी 'विचार करायला' पण सांगतो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉन, पोझ्झोची साथ दिल्याच्या मोबदल्यात करमणूक म्हणून लकीला विचार करायला लावतात. लकीचं प्रकट विचार करणं हा नाटकाचा एक हायपॉईंट आहे. तो प्रसंग, लकीचं काम करणार्‍या नटाची परीक्षा पाहणाराच असेल. पोझ्झो जेव्हा दुसर्‍या अंकात येतो तेव्हा तो आपण 'ब्लाईंड ऍज फॉर्च्युन' झाल्याचं सांगतो. ह्यावरून लेखक नशीब आणि धन ह्या दोन्हीवर श्लेष तर साधतोच पण पोझ्झो नक्की कशाचं प्रतिनिधित्व करतोय हे ही सांगतो.

अंकांच्या शेवटी येणारी मुलं हा अजून एक विचित्र भाग आहे. दोन्ही वेळेला मुलं आपल्या दुसर्‍या भावाविषयी बोलतात. दोन्ही वेळेस ही मुलं आपल्या भावाबरोबर गोदोसाठी काम करत असल्याचं सांगतात, पण कधीही ती दोन्ही मुलं भाऊ असल्याचं स्पष्ट होत नाही. व्लादिमीर दोन्ही वेळी चौकशी करतो, पण ती मुलं आपण व्लादिमीरला पहिल्यांदाच भेटत असल्याचं सांगतात.

नाटकाच्या संपूर्ण संवादांमध्ये सांकेतिकता पुरेपूर भरलीय. व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांशी जे काही बोलतात, त्यावरून त्या दोघांची शोकांतिका सामोरी येत राहते. ते दोघे, जीजस बरोबर सुळावर गेलेल्या दोन चोरांबद्दल बोलतात. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या गॉस्पेल्समध्ये असलेल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाबद्दल बोलतात. इथे मला 'राशोमान'ची बीजं जाणवतात. नंतर ते एस्त्रागॉनच्या कवी असण्याबद्दल बोलतात, तेव्हा तो कवी होणं मला परवडणारं नसल्याचं बोलतो. इथे मला 'प्यासा'ची बीजं दिसतात. लकी आणि पोझ्झो कोसळलेले असताना, आणि आंधळा पोझ्झो मदतीची याचना करत असताना व्लादिमीर आणि एस्त्रागॉन जे बोलतात, ते असंच समजावायला एखाद्या तत्ववेत्त्याला पुस्तक लिहावं लागेल, पण नाटकातला तो सहज आणि सुंंदर संवाद ५ मिनिटांत खूप मोठं तत्वज्ञान समजावून जातो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची पात्र ही न उलगडणारी कोडी आहेत. ते नक्की काय आहेत, ह्यावर अनेक दिग्गजांचे मतभेद आहेत. कुणाला ते घट्ट मित्र वाटतात, तर कुणाला समलिंगी जोडपं. पण मला ती पात्र ह्याहीपेक्षा वेगळी वाटतात. मला ती पात्र जगात दोन व्यक्तिंमध्ये असू शकणार्‍या सगळ्या नात्यांचं प्रतिनिधित्व करणारी वाटतात.

लकी आणि पोझ्झो ही दोन पात्रं अनुक्रमे शोषित आणि शोषकाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचे संवाद हे आजही ह्या दोन वर्गांचं प्रतिनिधित्व करतात. शोषित शोषकांचंच लांगुलचालन करत राहतो आणि शोषक शोषत राहतो. पुन्हा, शोषक शोषिताचे विचारही करमणुकीसाठी ऐकतो. इतकी भेदक वक्तव्य नाटकात विनोदी स्थितीमध्ये होतात. ह्या नाटकाची खासियतच अशी आहे, की विनोद हा त्या पात्रांच्या स्थितीमुळे येतो. ती पात्र हसत नाहीयेत, ती आनंदी नाहीयेत. सगळीच पात्र दुःखी आहेत. पण त्यांचं दुःख आपल्यासाठी 'तमाशा' बनलंय.

व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांबरोबर रोज त्याच ठिकाणी येतात आणि रोज, हीच जागा आहे की नाही ह्यावर वाद घालतात. आपण मूळचे ह्या भागातले नसल्याने आपल्याला कल्पना नाही असं सांगत राहतात. जरी नाटकात सलगचे दोन दिवस असल्याचं लिहिलेलं असलं, तरी ते दोन दिवस सलगचे आहेत का? आणि असे किती दिवस आधी आणि किती दिवस नंतर ते वाट पाहणार आहेत? आणि ते दोघे कधी वेगळे तरी होतात का? कारण शेवटीही आपण जाऊया म्हणून ते जागचे हलत नाहीत. असे कित्येक प्रश्न आपल्याला पडत राहतात. त्यांच्या संवादांमधून त्यांच्या वाट पाहण्याचा कालावधीचा एक पुसटसा अंदाजही येतो. लकी आणि पोझ्झोचं त्यांच्या आयुष्याच्या 'रस्त्या'वरचं त्यांना अचानक भेटणं, आणि त्यांचं 'नथिंग' हे काहीतरी असल्यागत 'नथिंग' टू बी डन म्हणणं, ह्यातून लेखकाची जबरदस्त प्रतिभा दिसत राहते.

गोदो हे असं पात्र आहे जे कधी येतंच नाही. पण त्याची चर्चा बरेचदा होते. त्याच्या कामाच्या स्वरूपाबद्दलही बोलणं होतं. त्याचे दोन दूतही येऊन जातात. काही नाट्यसमीक्षकांच्या म्हणण्यानुसार 'गोदो' जो कसलीतरी प्रार्थना शिकवणार असतो, तो म्हणजे देव किंवा प्रेषित आहे आणि ती दोन मुलं, म्हणजे दूत किम्वा एंजल्स सारखे. पण एक नक्की, की गोदो, दिदि आणि गोगो (व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांना असे बोलावतात) ची वाट पाहण्यातून मुक्तता करू शकतो. त्यांना मोक्ष मिळवून देऊ शकतो.

एकंदरित, मोक्षप्राप्तीसाठी किंवा उद्धारासाठी कायम कुणा 'गॉड'(God) किंवा 'गोदो'(Godot) ची वाट पाहत राहणार्‍या मर्त्य मानवाची एक रुपककथा असं हे नाटक आपल्यावर गारूड करून जातं हे नक्की. जेव्हढ्या वेळा हे नाटक वाचावं तेव्हढ्या वेळा नवं काहीतरी मिळत जाईल. आता फक्त एकदा, ह्या नाटकाचा प्रयोग बघायचाय. कुठल्याही भाषेत असला, तरी काय फरक पडणार आहे. व्लादिमीर, एस्त्रागॉन, पोझ्झो आणि लकी तर इथे माझ्या डोक्यात बसलेत.

8/20/2010

कालछिद्र - २

भाग - १ पासून पुढे

हे सगळं काय होतं? एक काळाला पडलेलं छिद्र, जे माझ्या मेंदूशी आणि आत्म्याशी त्या वीजेनं जोडलं गेलं होतं? की नुसतेच माझ्या मनाचे खेळ?

मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज द्यायला डॉक्टर तयार झाले. लाडू कावळ्याच्या वेळी खोलीभर झालेल्या पाण्याचा अन्वयार्थ माझ्या धक्क्याने जमिनीवर पडलेला फ्लास्क असा लागला होता. पण मी भिजलो कशाने होतो, ह्याचं उत्तर मी सोडून कुणाकडेच नव्हतं. मी घरी पोचलो पण मला बिलकुल स्वस्थता मिळत नव्हती. माझं मन पुनःपुन्हा कालछिद्राकडे झेप घेत होतं. एक प्रकारचा चस्का लागला होता. तब्बल ५ दिवस झाले होते मला काळाचे पापुद्रे ओलांडून. आताशा तल्लफ यायला लागली होती. आई-बाबा एक दिवस सकाळचेच कुणाकडे तरी गेले. आणि मी तहानलेल्या माणसानं पाण्याचा एक थेंब शोधावा, तस्मात पेपर शोधत होतो. आदल्याच दिवशी बहुतेक रद्दी टाकण्यात आली होती. माझी अस्वस्थता वाढत होती. आणि अचानक माझी नजर एका कोपर्‍यात गेली. तिथे एक काळवंडलेला पेपर पडला होता. मला शंका वाटली, म्हणून मी अजून जवळ गेलो आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हा तोच पेपर होता, जो माझ्याबरोबरच वीजेतूनही बचावला होता. मी तो पेपर उचलणार एव्हढ्यात दरवाजाची बेल वाजली. मी नाईलाजानंच दार उघडायला गेलो. कुरियरवाला होता. घाईगडबडीत सही करून त्याला कटवलं. दरवाजा बंद केला आणि एखाद्या नशैडीनं भांगेकडे जावं त्या उत्कटतेनं मी विद्युतंजय पेपराकडे निघालो पण एकदम पायात काहीतरी आलं. मी खाली पाहतो तर त्यादिवशीचा ताजा पेपर. मी अधाश्यासारखा तो पेपर उचलला आणि वाचायला लागलो.

मी एका मोठ्या महालसदृश इमारतीमध्ये उभा होतो. इमारत अनोळखी वाटत होती. काहीतरी विचित्र अशी जाणीव होत होती. चहूकडे 'जनाब', 'वजीर-ए-आज़म', 'वजीर-ए-आला' असले शब्द ऐकू येत होते. मला जनाब हा शब्द माहित होता, पण वजीर-ए-आज़म? मी मुगले आजम ऐकलं होतं. आम्ही आमच्या एका मित्राला, चुगले आजम आणि एकाला फुकटे आजम ही म्हणायचो, पण वजीर-ए-आज़म? आणि वजीरे आला, हे कुठलं मराठी? वजीर आला किंवा वजीर आले. वजीरे हे कुठलं रूप आणि त्यापुढे आला. जाऊ दे. एव्हढा सगळा विचार करेपर्यंत एकदम मोठा जमाव समोरून येताना दिसला. आधी वाटलं की मोर्चेकरी आहेत, मग लक्षात आलं पत्रकार आहेत. सगळ्यांच्या ओळखपत्रांवर उर्दूत खरडलं होतं काहीतरी आणि मग माझ्या डोक्यात पुन्हा एकदा प्रकाश पडला की आपण पाकिस्तानात आहोत. मी पुन्हा आजूबाजूला पाहिलं. काहीतरी गडबड वाटत होती. अचानक एकदम हळू आवाजात चर्चा होत असल्यासारखं वाटलं. मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. मी उभा होतो त्याच दालनात एका बाजूला एक पडदा टाकून ठेवला होता. मी तिकडे गेलो. जसजसा जवळ जात होतो, आवाज थोडा थोडा वाढत चालला होता. मी पडद्यामागे पोचलो आणि पडदा थोडासा सरकवून डोकावलो. पाहतो तर काय, समोर एका सोफ्यावर आपले परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा आणि एक खुनशी चेहर्‍याचा गृहस्थ बसले होते. तो बहुधा पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री असावा असा मी अंदाज़ बांधला. कारण एस.एम. कृष्णा त्याला सज्जड दम देत होते. भारतानं एव्हढे पुरावे देऊनही 'हाफिज़ सईद' ला पुरावा ही मागणी का मान्य केली जात नाही. भारताच्या सामंजस्याला भारताचं दौर्बल्य समजू नका वगैरे हाग्या दम इंग्रजीत देणं चाललं होतं. एस.एम. कृष्णांचा आवाज दोन फुटांपलिकडेही ऐकू येतो आणि त्यांच्या चेहर्‍यावरच्या रेषाही हलतात हा साक्षात्कार मला अचानकच झाला होता. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री चक्क खाली मान घालून ऐकत होता आणि सगळं मान्य असल्याचंही उर्दूत सांगत होता. एव्हढ्यात मी ज्या पडद्याला धरलं होतं तो पडदा वरूनच तुटला आणि मी तोंडावर पडलो.

आई मला उठवत होती.

'असा हॉलच्या जमिनीवरच कशाला झोपला होतास रे? तब्येत तर ठीक आहे ना?' आई काळजीच्या स्वरात विचारत होती. पण मला काही ऐकू कुठे येत होतं. मला पुन्हा अशक्तपणा आला होता, पण हवी ती किक मात्र मिळाली होती.

कसेबसे दोन दिवस ढकलले आणि पुन्हा आई आणि बाबा एकत्र बाहेर पडण्याचा मणिकांचन योग जुळून आला. आताशा माझ्या प्रत्येक संदिग्ध बेशुद्धीच्या घटनास्थळी मिळालेल्या वर्तमानपत्रांवरून आईचा संशय वर्तमानपत्रांवर बळावला होता. त्यामुळे घरातली वर्तमानपत्र गायब होऊ लागली होती. पण मी हुशारीनं स्वयंपाकघरातल्या फडताळांच्या फळ्यांवर टाकलेलं एक वर्तमानपत्र काढलं. जुनं तर जुनं. आणि वाचायला सुरूवात केली.

मी एका बंगल्याच्या हॉलमध्ये उभा होतो. मला काही संदर्भ लागायच्या आत, मोठमोठ्या किंकाळ्या ऐकू यायला लागल्या. एक बाई वरच्या मजल्यावरून जिवाच्या आकांतानं धावत खाली आली. मी जागच्या जागीच थिजलो. तिच्या अंगावर ठिकठिकाणी रक्त होतं. तिच्या मागोमाग एक पुरूष हातात चाकू घेऊन धावत खाली आला. मी काही कळण्याच्या स्थितीत नव्हतो. ती बाई दरवाजाच्या दिशेनं धावली, पण तिला दरवाजाच उघडता येईना. मग ती मागे आली आणि सरळ माझ्या दिशेनेच धावायला लागली. मी उभ्या जागी हादरलो. तो माणूस तिच्या मागेच होता. त्यानं तिला मधेच गाठलं, सोफ्यावर ढकललं आणि ... आणि भोसकून ठार मारलं. मग त्यानं त्याची नजर वर केली आणि ती माझ्यावर स्थिरावली. आईनं त्याक्षणी मला जागं केलं नसतं, तर काय झालं असतं हे मला ठाऊक नाही. मी जागा झाल्या झाल्या उलट्या करायला लागलो. न जाणे किती वेळ उलट्या करत होतो. पोटातला कणनकण बाहेर पडला पण मळमळ जात नव्हती. ते रक्ताचं थारोळं डोळ्यांसमोरून जात नव्हतं. मी पुन्हा पेपरांना हात न लावण्याचा प्रण केला.

दोन दिवस झाले होते. हळूहळू गाडी पूर्वपदावर येत होती. मी सोफ्यावर बसून रिमोटशी खेळत होतो. तेव्हा एका न्यूज चॅनेलवर, "क्या रोहिणीका पती ही उसका खुनी है?" अशा नावाची एक सेगमेंट सुरू झाली. खाली, हां किंवा ना साठी वापरायचे एसएमएस कोड्स स्क्रॉल होत होते. पण एकदम टीव्हीवर आलेल्या फोटोनं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ही तीच बाई होती. होय, तीच. मी कसा विसरू. तीच. तेच डोळे, तेच नाक. म्हणजे मी हिचा खून पाहिला होता! पण मग पुढे आलेल्या बातमीनं मी सुन्नच झालो. तिचा खून नवर्‍यानं केला होता आणि नवर्‍याला शिक्षा सुनवायची तेव्हढी बाकी होती आणि नवरा.... तो नव्हता ज्याला मी पाहिलं होतं!

मी इंटरनेटवर बसून गेल्या दोन महिन्यांतली सगळी वृत्तपत्र चाळली आणि मला ते विवक्षित पान मिळालं. इंटरनेटवर धुंडाळताना मी फार काळजीत होतो, पण इंटरनेटवर वाचताना मला ते होत नव्हतं, जे पेपर वाचताना व्हायचं. मी ते पान काळजीपूर्वक परत वाचलं. त्या पानावर खून झाल्याझाल्याची प्राथमिक माहिती होती आणि पोलिसांचा प्राथमिक अंदाज एका चोरानं हे कृत्य केलं असल्याचा होता, ह्याचंच वर्णन केलेलं होतं. मी विचारात पडलो.

हे कसं शक्य आहे. मी जे पाहिलं, ते सत्य होतं, की जे न्यायालयात सिद्ध झालंय ते? पेपरात लिहिलेलं जर मी प्रत्यक्षात बघू शकतो, अनुभवू शकतो, तर तेच खरं असणार ना. काय चाललंय नक्की! मी कोलमडून गेलो होतो. शरीर थकत होतं आणि मनही.

दुसर्‍याच दिवशी मी एक प्रयोग करायचा ठरवला. मी घराच्या खालच्या सार्वजनिक वाचनालयातून एक पेपर लपवून घेऊन आलो. कारण माझ्या घरातली सगळी वर्तमानपत्र एव्हाना गायब झालेली होती. कुणी आजूबाजूला नाही हे पाहून मी ते वर्तमानपत्र समोर ठेवलं आणि वाचायला लागलो. पहिलीच बातमी नक्षली हल्ल्याची होती. नक्षलवाद्यांनी किती निर्घृणपणे ४० पोलिसांची हत्या केली ह्याचं अंगावर काटा आणणारं वर्णन होतं. पण गंमत बघा. मी ते वर्णन पूर्ण वाचून काढलं आणि मला काहीही झालं नाही. मी तिथेच होतो. हातात पेपर धरून. मला काहीच कसं झालं नाही? मी त्या हल्ल्याच्या जागी कसा पोचलो नाही? मी मनोमन देवाचे आभार मानले, कारण मी मूर्खासारखी एव्हढी डेंजर बातमी वाचायला घेतली होती.

मग मी त्याखालची बातमी वाचायला घेतली. विदर्भातल्या एका शेतकर्‍याच्या आत्महत्येची बातमी होती. त्याच्या कुटुंबाची दुर्दशा वर्णन केली होती. आश्चर्य म्हणजे मी तीसुद्धा बातमी पूर्ण वाचून काढली आणि मला काहीही झालं नाही. च्यामारी, म्हणजे माझा मेंदू ह्या विचित्र कालछिद्राच्या संपर्कात येऊनही आपला निर्ढावलेपणा राखून होता म्हणायचा. की मी चक्क बरा झालो होतो? मला कळेना.

मग मी दुसरं पान उघडलं, तर एकदम तीच नेहमीची संवेदना निर्माण झाली. मी एका भल्यामोठ्या स्टेडियमसमोर उभा होतो. एकदम डोळ्यांचं पारणं फिटावं असं स्टेडियम होतं. थोडं बारकाईनं पाहिलं, तर तिथे लागलेलं मोठं होर्डिंग दिसलं, 'दिल्ली, २०१०'. मायला, म्हणजे मी चक्क राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्टेडियमच्या बाहेर उभा होतो. जवळपास पूर्ण बांधून होत आलेलं स्टेडियम. मी रखवालदाराचा डोळा चुकवून, पत्रकारांच्या गर्दीत लपून आत शिरलो आणि माझे डोळेच दिपून गेले. इतकं सुंदर आणि सुबक बांधकाम होतं. प्रेक्षकांची बसायची सोय, व्हीआयपी स्टँड, प्रेस बॉक्स सगळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं! माझा ऊर राष्ट्राभिमानानं भरून आला. आणि एकदम कुणीतरी माझा ऊर बडवत असल्याची मला जाणीव झाली. खिडकीतल्या कबुतरांच्या धक्क्यानं टेबलावरची दोन पुस्तकं जमिनीवर बसलेल्या माझ्या छाताडावर पडली होती आणि मी राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रेक्षागृहातून माझ्या शयनगृहात परतलो होतो. मी अजून बरा झालो नव्हतो. माझा कालछिद्राशी संपर्क अजूनी अस्तित्वात होता. पण मग हे काय होत होतं? काही बातम्यांना मी काही रिस्पॉन्स देत नव्हतो, पण काही बातम्यांना देत होतो, असं का?

दुसर्‍या दिवशीच टीव्हीवर राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्टेडियमचं स्टिंग ऑपरेशन झाल्याची बातमी झळकली. स्टेडियमचं प्रत्यक्षात किती बांधकाम अपूर्ण आणि हलक्या दर्जाचं झालंय हे दाखवणारा एक स्टिंग व्हिडिओ सगळ्या वाहिन्यांवर दाखवला जात होता आणि ती सगळी चित्र आणि मी बघून आलो होतो, ती चित्र किती वेगळी होती हे मला जाणवलं. मला काही सुधरतच नव्हतं. हा सलग दुसरा धक्का होता. मी बघितलेलं खोटं कसं काय ठरलं होतं? आणि जर ते खोटंच होतं तर मी तिथे कसा पोचलो होतो? मी ते सगळं खरं असल्यागत कसं काय पाहिलं होतं? आणि त्या काहीच न जाणवलेल्या बातम्या? प्रश्न वाढत चालले होते, पण उत्तरं सापडत नव्हती.

आता मी सोफिस्टिकेटेड पद्धतीनं माझे कालछिद्राचे प्रयोग करायचं ठरवलं होतं. मी एक गजराचं घड्याळ घेऊन बसणार होतो. कदाचित, अक्षय कुमारचा ८X१० तस्वीर बघितल्याचा परिणाम असावा. १० मिनिटांचा गजर लावला आणि वाचनालयातून लपवून आणलेला पेपर समोर ठेवला. पहिली बातमी बारावीच्या निकालाची होती आणि मी कुठेही गेलो नाही. जसाच्या तसा. मग मी विचार केला की आपण वर्ल्ड कप फुटबॉल बघून येऊ. तर तिथेही तीच गत. काहीतरी गडबड झाली होती खास. कदाचित माझी शक्ति हळूहळू क्षीण होत होती. माझा कालछिद्राबरोबरचा संपर्क कमी होत होता कदाचित. मग मी सहजच एक रँडम पान काढलं आणि वाचायला लागलो.

मी एका मोठ्या आलिशान बोटीच्या डेकवर उभा होतो. बोट जुन्या जमान्यातली दिसत होती. समुद्र शांत दिसत होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता. बोटीच्या एका मजल्यावरून मस्तपैकी पार्टी चालू असल्याचा आवाज येत होता. मी डेकवर असाच भटकत होतो, तर मला समोरच एका टोकाला, चक्क लिओनार्दो दीकाप्रिओ आणि केट विन्स्लेट त्यांची फेमस पोज घेऊन उभे असलेले दिसले. मी डोळे पुनःपुन्हा चोळले. हे खरंच असं घडत होतं? मी नक्की वाचत तरी काय होतो? ओ माय गॉड, टायटॅनिक सिनेमाची कथा तर नाही? मेलो. जहाजाची कशालातरी धडक बसली. गेम! संपला आमचा अवतार अशी माझी खात्री झाली आणि तेव्हढ्यात मी लावलेला गजर वाजला. मला त्यानंतर दोन दिवस खार्‍या वार्‍यांचा वास येत होता. कदाचित मतलई वार्‍यांचाही असेल, पण ते मला कळत नाहीत. चालायचंच!

पण ह्या सगळ्या अनुभवांमुळे माझी शारीरिक आणि मानसिक दोन्ही अवस्था वाईट होत चालली होती. माझं डोकं आता एका ट्रॅकवर धावायला लागलं होतं. मग मी तब्येतीकडे लक्ष न देता प्रयोगांचा धडाका लावला. अतिरेकी आणि नक्षलवादी हल्ल्यांच्या बातम्या काहीही न होता वाचून काढल्या, विदर्भातल्या सावकारांच्या कर्जामुळे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याला जरी भेटता नाही आलं, तरी दारू पिऊन आत्मह्त्या करणार्‍या शेतकर्‍यांना भेटून आलो. देशांतली भुकेनं मरणारी जनता बघायला मिळाली नाही तरी एक्स्पोर्टर्सच्या रिकाम्या धान्यकोठारांना भेट देऊन आलो. कर्जबाजारी, देशोधडीला लागलेले गिरणीकामगार बघता आले नाहीत, पण मिलला आग लागण्यास कारणीभूत असलेलं शॉर्टसर्किट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. १२५करोडचं रिलीफ पॅकेज मिळालेलं उद्ध्वस्त लेह बघायला मिळालं नाही, पण १००० करोड खर्चून बदललेलं दिल्लीचं रूपडं पाहिलं, इराक युद्ध पाहायला मिळालं नाही पण इराकमध्ये सापडलेली धोकादायल अण्वस्त्र बघितली, जागतिक मंदीमुळे बेरोजगार झालेली माणसं भेटली नाहीत पण पगारकपात झालेले फायनान्स जायंट्सचे अर्थसल्लागार सीईओ मात्र दिसले, ३००% वेतनवाढ घेणार्‍या लोकसभेत जाता आलं नाही, पण लोकसभेवरील हल्ल्यात शहीदांना न्याय मिळताना पाहिला. अहो काय काय पाहिलं नाही, त्याची यादी कशाला करू, काय काय पाहिलं ते सांगतो. हाऊसफुल्ल चाललेला 'रावण' चा शो पाहिला, खच्चून गर्दी झालेली अशोकराव चव्हाणांची सभा पाहिली, समाजसेवा करताना संजय दत्त पाहिला, सलमान आणि कतरिनाचा विवाहसोहळा पाहिला, सामाजिक जबाबदार्‍या पार पाडणारे अंबानी बंधू पाहिले, शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेले पाहिले.

अधे मधे मी पुरवणी वाचायचो. त्यातले लोकांचे अनुभव वाचताना कधीकधी कुणाचा दुखण्याशी लढा, कुणाची मूकबधिर मुलाच्या लढ्याची कहाणी वाचताना, त्यांना भेटावंसं खूप वाटायचं. पण कधी भेटता आलं नाही. पण एकदा ताम्हिणी घाटात चुकीच्या बाजूला लावलेल्या गाडीतून दरीचं जवळून दर्शन झालं, एकदा त्याच घाटात चढावर गाडी असताना ब्रेकखाली टेनिसचा बॉल आल्यानं ब्रेकफेल झाल्यागत स्थिती उद्भवली, हरवलेले मोबाईल, चोरीला गेलेली कागदपत्रं असं बरंच कायकाय परत मिळताना बघितलं. अहो एव्हढंच काय, मी तर चक्क एकदा सायना नेहवालला भेटलो आणि ती माझ्याबरोबर बॅडमिंटन नाही तर टेनिस खेळली. आता हे सांगितल्यावर लोक मला वेड्यात काढतील, पण काढोत. मी खरंच तिच्याबरोबर खूप वेळ खेळलो आणि दमून गेलो. गजर मी चुकीचा लावल्याने तो उशिराने वाजला. मी भानावर येईस्तो पार घामाघूम झालो होतो. हा एक नवाच पायंडा पाडत होतो मी. आजपर्यंत लाडूकावळ्याच्या प्रसंगानंतर मी तिकडे गेल्यावर घटनाक्रम बदलायच्या फंदात पडलो नव्हतो. पण हल्ली हल्ली मी हा प्रकारही सुरू केला होता. कारण, हे प्रकरण समांतर विश्वाचं असल्याचा माझा ठाम ग्रह झाला होता, त्यामुळे मी निर्धास्तपणे माझं दुहेरी आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगत होतो.

त्यानंतर एके दिवशी बर्‍याच दिवसांनी बाबांनी आमची चारचाकी मला चालवायला दिली. मी ती घेऊन निघालो होतो. रस्त्याला फारशी गर्दी नव्हती. अचानक लूज झालेलं ग्लोव्ह कंपार्टमेंट उघडलं आणि त्यातनं काहीतरी खाली पडलं. मी गाडी चालवता चालवताच नजर खाली वळवली. तर तो माझा तोच विद्युतंजय पेपर होता. माझा विश्वासच बसेना. आणि नकळतच मी त्यातल्या मजकुरावर नजर फिरवली.

मी एका इस्पितळसदृश ठिकाणी होतो. माझ्या समोरच एक परदेशी गोरी छोटी मुलगी युनिफॉर्मसदृश कपडे घालून गाणी ऐकत बसली होती. पोरगी मोठी गोड होती. मी हळूवार चालत तिच्याजवळ गेलो, तर तिनं तिचे हेडफोन्स काढून मला दिले. मी ते कानात घातले आणि घात झाला. त्यामध्ये एव्हढ्या मोठ्याने गाणी वाजत होती की काही विचारू नका. ती गाणी ऐकण्याची पाच मिनिटं माझं आयुष्य बदलून टाकायला पुरेशी होती.

मी पेपरातल्या बातमीतून अमेरिकेतल्या एका वेड्यांच्या इस्पितळात आलो होतो. आणि इथे ती गाणी ऐकतानाच कदाचित तिथे काहीतरी अपघात झाला असावा. घटनाक्रम बदलण्याची माझी खोड मला महागात पडली असावी. मी एकतर तिथे मेलोय किंवा कोमात गेलोय. कारण मला गेल्या पाच वर्षांत कुणी उठवलंच नाहीये. मी इथेच आहे, ह्या अमेरिकेतल्या वेड्यांच्या इस्पितळात. अडकून पडलोय. कालछिद्रच बंद झालंय. एकाच आशेवर जगतोय, की तो मृत्यू नसावा, कोमाच असावा. आणि एक दिवस मी कोमातून बाहेर येईन आणि खरंच सांगतो, पुन्हा कधीही पेपराला हात लावणार नाही!

-समाप्त-

8/19/2010

कालछिद्र -१

ही एक कथा आहे. पण एक मिनिट, पळू नका. नेहमीसारखी पकवापकवी होऊ नये असा मी प्रयत्न करतोय. ह्यानंतर मी किमान महिनाभर तरी कथा टाकणार नाही. आज एक डाव माफी द्या! सहन करा!

हे सगळं ५ वर्षांपूर्वी सुरू झालं. मी माझं साधंसं सरळमार्गी, मध्यमवर्गीय आयुष्य जगत होतो. एक छोटीशी नोकरी, एक छोटंसं घर, घरात आई-वडिल आणि मी. सुबत्ता नसली तरी शांतता होती. त्या दिवशी झालं असं. रात्रीची वेळ होती. दमून भागून आलो होतो. जेवण वगैरे उरकलं आणि घराच्या गॅलरीत शांतपणे पेपर वाचत बसलो होतो. आभाळ भरून आलं होतं. अचानक ढग कडाडायला लागले. विजा चमकायला लागल्या. आणि काही समजायच्या आत एक वीज माझ्यावर पडली. एकदम प्रकाशाचा मोठा लोळ उठल्यागत वाटलं. डोळे दिपून गेले. आपण चितेवर बसलो आहोत असं वाटलं आणि पुढचं काही आठवत नाही. आई-बाबा सांगतात की मी फ्रीज झाल्यागत पडलो होतो. आता एव्हढ्या उष्ण वीजेनं मी फ्रीज कसा झालो मला ठाऊक नाही, पण झालो असेन.

तर त्या वीजेतून मी वाचलो. कसा वाचलो, ते मला ठाऊक नाही. पण खरी गोष्ट पुढेच आहे. तेव्हापासून एक विचित्र गोष्ट सुरू झाली. आणि ती मला कळली ती अशी.

एक दिवस मी हॉस्पिटलमध्येच पेपर वाचत बसलो होतो. पेपरात राहुल गांधींनी कशी एका दलिताच्या घरी रात्र घालवली. किती कामं केली, अशी बातमी होती. ती वाचता वाचता अचानक माझं डोकं भिरभिरायला लागलं. मला अचानक खूप तहान लागल्यासारखं झालं. मी पाणी घेण्यासाठी हात बाजूला करणार एव्हढ्यात हातातलं त्राण गेल्यागत वाटायला लागलं. आणि मी एकदम एका पर्णकुटीसमोर उभा असल्याचा मला साक्षात्कार झाला. पर्णकुटीच्या आजूबाजूला अनेकानेक सुरक्षारक्षक उभे होते. मी एकदम सावध झालो. एव्हढ्यात त्यातला एकजण माझ्या दिशेनंच येत असल्याचा मला भास झाला. मी चटकन आजूबाजूच्या किर्र अंधाराचा फायदा घेतला. मला कळेना, की आपण इथे काय करतोय. डोकं काम करेनासं झालं होतं. मी लपत छपत कसातरी त्या पर्णकुटीच्या मागच्या बाजूला पोचलो. तिथे एक छोटीशी खिडकी होती आणि त्यातून मिणमिणता प्रकाश येत होता. मी हळूवार पावलं टाकत टाकत खिडकीपर्यंत पोचलो आणि आतलं दृश्य पाहून त्या मिणमिणत्या प्रकाशातही माझे डोळे दिपून गेले. राहुल गांधी कंदिलाच्या प्रकाशात जेवत होते. ती माऊली आपल्या पोरांबरोबरच कोरडं-ओलं जे काही होतं, ते त्यांना घालत होती. ते ही मोठ्या आनंदाने ते खात होते. मी मनाशीच म्हटलं, आपण काय समजत होतो राहुलजींना. चुकलंच आपलं.

मग मी बराच इथे तिथे फिरलो, पण मला अंदाजच येईना मी कुठेय. शेवटी कंटाळून पुन्हा पर्णकुटीजवळ आलो आणि खिडकीतून डोकावलो. कंदिलाचा उजेड थोडा कमी केला होता आणि राहुलजी इतरांबरोबरच गोधडीवर झोपले होते. शांत, लहान मुलासारखे. माझे डोळे भरून येताहेत वाटेस्तोवर कुणीतरी माझा दंड धरल्याची मला जाणीव झाली आणि मी एकदम भानावर आलो. आई माझ्या दंडाला धरून मला हलवत होती. मी माझ्या हॉस्पिटलच्या खाटेवर होतो. माझ्यासमोर पेपर पडला होता.

"काय झालं रे?"

"कुठे काय?"

नाही, ते स्वप्न नव्हतं. मलाही आधी तसंच वाटलं होतं. पण मग मी तो प्रयोग दुसर्‍या दिवशी लगेच पुन्हा केला. ह्यावेळी मी मंत्रीमंडळाच्या बैठकीचा रिपोर्ट वाचत होतो. मी आपोआप मंत्रालयात बैठकीच्या सभागृहात पोहोचलो. अतिशय सामंजस्यानं जनहिताचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. साधक-बाधक चर्चा होत होती. योग्य ते निर्णय सार्वमतानं घेतले जात होते. एव्हढंच काय तर मंत्र्यांनी नाष्टाही केला नाही हो. तसाच पडून राहिला बैठक संपल्यावर. मी पडद्याच्या मागे उभा राहून सगळं पाहत होतो. मंत्री कलटल्यावर मी राहिलेल्या नाष्ट्यातले दोन वडेही हाणले. मग सभागृहातून बाहेर पडायचा प्रयत्न केला. पण मी बाहेर पडूच शकत नव्हतो. मला कळेना. मला सभागृहाचा दरवाजा दिसत होता. तिकडूनच सगळ्यांना बाहेर जातानाही पाहिलं होतं मी. पण माझ्यासाठी मात्र ती एक भिंत झाली होती. एखाद्या भित्तीचित्रासारखी! मग माझ्या लक्षात आलं. माझी बातमी फक्त बैठकीची आहे. मग मी टंंगळमंगळ करत बसलो. दोन वडे अजून हाणले. कुणीतरी उठवायची वाट बघत बसलो. शेवटी एकदाचं नर्सनं हलवलं आणि मी बातमीतून बाहेर आलो.

आता कन्फर्म झालं होतं की ते स्वप्न नव्हतं. एक विचित्र थकवा जाणवत होता. आदल्या दिवशीही असंच झालं होतं. असं वाटत होतं जणू माझ्या आत्म्याला कुणीतरी शरीरातून खेचून नेतं. मी वेड्यासारखा झोपलो. तब्बल १४ तास सलग. काहीतरी घोळ होता खास. तिसर्‍या दिवशी मी आराम करायचं ठरवलं. माझ्या विचित्र झोपण्याने बावचळलेल्या डॉक्टरांनी मला अजून थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवशीही मी पेपरापासून दूरच राहिलो. मला क्षणभर असंही वाटून गेलं की हा एखादा मानसिक आजार तर नाहीये! पण मग मन कसंतरी शांत केलं. पण पाचव्या दिवशी मन स्वस्थ बसू देईना. सकाळचा नाष्टा उरकल्यावरची औषधं झाली, की दुपारपर्यंत कुणी येत नाही, तेव्हाच मी धडधडत्या छातीनं पेपर हातात घेतला.

मग लक्षात आलं की मी पुरवणी उचललीय. मी एका घरामध्ये बसलो होतो. विचित्र वाटत होतं. घरामध्ये कुणीच नव्हतं. असं कसं होईल, हा मी विचार करत होतो. मी नक्कीच कुणाच्यातरी अनुभवांचा लेख वाचायला घेतला होता. तेव्हढ्यात मला काही वेगवेगळे आवाज ऐकू आले. ते घराच्या बाहेरून येत होते. मी आवाजाच्या दिशेनं गेलो तर घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि बाहेर एक नवरा-बायको एक कावळ्याला बुंदीचा लाडू खायला घालत होते. माझा क्षणभर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो कावळा चक्क एखाद्या लहान बाळाच्या आकाराएव्हढा मोठा होता. मी डोळे चोळले आणि दरवाज्यातून बाहेर पडून अंगणात आलो, तर एक २०-२५ वर्षांचा तरूण व्हिडिओ कॅमेरानं त्या सोहळ्याचं शूटिंग करत होता. मी सुन्न झालो होतो. ते नवरा-बायको 'घे लाडू, लाडू! घे ना!' असं काहीतरी असंबद्ध बरळत होते. एव्हढ्यात तो शूटिंग करणारा मुलगा म्हणाला, "मामी, तुमचा हा लाडू कावळा भारी बरं का?" मला मूर्च्छना येते की काय असं वाटायला लागलं. त्या कावळ्याच्या समोरच एक पाण्याचा मोठा वाडगा भरून ठेवला होता, मी काही विचार न करता धावत धावत तिथे गेलो, आणि तो वाडगा उचलून तोंडावर पाणी मारलं. ह्या धक्क्यानं लाडू कावळ्यालाच मूर्च्छना आली, त्या तरूणाचा व्हिडिओकॅमेरा जमिनीवर पडला आणि नवरा-बायको हातात लाडू घेऊन अविश्वासाने एकदा मूर्च्छित कावळ्याकडे आणि एकदा माझ्याकडे पाहत होते. तो तरूण 'माझा अमेरिकन व्हिडिओ कॅमेरा पडला' असं काहीसं पुटपुटत होता. आता मात्र मी टेन्शनमध्ये आलो. मी लेखातला घटनाक्रम बदलला होता. काहीतरी लोचा होऊ शकला असता. पण नशीबानं एक नर्स मला हलवायला आली आणि मी परतलो. मी पूर्ण भिजलो होतो. खोलीभर पाणी झालं होतं. म्हणूनच अवेळी नर्स बघायला आली होती. मला खूपच अशक्तपणा आला होता. मी आडवा पडलो, पण विचारचक्र फारच जोरात सुरू झालं होतं.

हे सगळं काय होतं? एक काळाला पडलेलं छिद्र, जे माझ्या मेंदूशी आणि आत्म्याशी त्या वीजेनं जोडलं गेलं होतं? की नुसतेच माझ्या मनाचे खेळ?

क्रमशः (हा फालतूपणा आहे, गोष्टीत क्रमशः टाकण्यासारखं काहीही नाहीये. पण खूप रात्र झालीय, मला झोपणं भाग आहे. त्यामुळे मन मारून मी क्रमशः करतोय.)

भाग - २

8/15/2010

स्वातंत्र्य

ही कथा फारच लांब झाली. पण मला ती क्रमशः म्हणून पोस्ट करायची नाहीये, म्हणून एकत्रच टाकतोय. बाकी, नेहमीप्रमाणेच प्रयत्न आहे. गोड मानून घ्या!

"विक्रम, तुला माहितीय काल मी माझी लास्ट इयरची पुस्तकं आवरत होते!" समीना उत्साहानं सांगत होती.
"हं." विक्रमनं फक्त हुंकार भरला.
"विक्रम?" समीनानं त्याच्याकडे बघितलं. त्याचं लक्ष त्याच्या ब्लॅकबेरीकडेच होतं.
"विक्रम!" तिनं थोडं जोरानं म्हणताच त्यानं तिच्याकडे पाहिलं.
"हं. काय? काय झालं गं?"
हे हल्ली असंच झालं होतं. त्यांच्या लग्नाला दोन वर्षंच होत होती. पण लग्नापूर्वीचा आणि लग्न झाल्यावर वर्षभरानंतरचा विक्रम ह्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. तो पूर्णपणे कामात बुडून गेला होता. रात्रंदिवस फक्त काम काम. समीना कंटाळून गेली होती.
त्यांचं लव्ह मॅरेज होतं. ते दोघंजण तिच्या कॉलेजच्या हिस्टरी फेस्टिव्हलमध्ये भेटले होते. विक्रम इंजिनियर होता, पण इतिहासात त्याला खूप रस आणि गती होती. ती मराठा, मुघल आणि राजपूत हिस्टरीवरची मास्टर. एका इव्हेंटमध्ये त्या दोघांच्या गप्पा ज्या रंगल्या, त्या पार प्रेमापर्यंत पोचल्या होत्या. तो हिंदू आणि ती मुसलमान, त्यामुळे गोंधळ उडणार हे ठाऊकच होतं. तेव्हढ्यातच नशीबानं विक्रमला दिल्लीत नोकरीही मिळाली होती. मग त्या दोघांनी पळून लग्न केलं आणि सरळ दिल्लीला स्वतःचा स्वतंत्र संसार थाटला.
स्वतंत्र संसार म्हणजे त्या दोघांची परीक्षाच होती. विक्रमनं सुरूवातीला तिला खूप साथ दिली. पण मग हळूहळू त्याच्या कामाचा व्याप वाढत गेला. विक्रम दिवसातला फारच कमी वेळ तिला मिळायचा. सुरूवाती सुरूवातीला ती रुसायची तेव्हा तो गंमतीनं म्हणायचा, "सॅम, स्वातंत्र्याची किंमत ही चुकवावीच लागते. एकतर स्वातंत्र्याच्या आधी किंवा स्वातंत्र्यानंतर!"
पण मग तिचे रुसवे जाणवण्यापुरता वेळही त्या दोघांना एकत्र मिळेनासा झाला. समीना दिवस ढकलत होती. तिच्या डोक्यात वेळ घालवण्यासाठी नोकरी शोधण्याचे विचार येऊ लागले होते. योग्य वेळ झाली, की आपण त्याला सांगू असा विचार तिनं केला होता.
तो दिवस १५ ऑगस्टचा होता. विक्रमला सक्तीची सुट्टी होती. मग तिला बाहेर घेऊन जाणं भाग होतं. दोघेजण दिल्लीतच फेरफटका मारू असा विचार करून निघाले होते. "आज फार सिक्युरिटी असेल गं. कशाला जायचं?" वगैरे प्रकार त्यानं करून पाहिले, पण समीनाला जायचंच होतं.
दोघेजण रस्त्यानं चालले होते. विक्रमनं पांढर्‍या रंगाची पँट आणि चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला होता, त्यावर पांढरा कोट. डोळ्यांवर काळा चष्मा होता आणि हातात त्याचा जीव की प्राण, "ब्लॅकबेरी".
समीना आपल्या सवतीकडे बघावं, तशी त्या ब्लॅकबेरीकडे पाहत होती.
"तू सूट कशाला घातलायस. कुठे कामाची अपॉइंटमेंट वगैरे नाहीये ना?" समीनानं साशंक होत विचारलं.
"नाही नाही, ते म्हणजे, मला काही दुसरं मिळालं नाही."
"कसं मिळेल, ह्या असल्या कपड्यांशिवाय, गेल्या वर्षभरात काही घातलंयस. असो."
त्याचं लक्ष अजूनही ब्लॅकबेरीकडेच होतं. समीना नुसती धुमसत होती. हिरव्या रंगाच्या सलवार कमीजचा दुपट्ट्याचं एक टोक हातात घेऊन खेळवत होती.
दोघेही गप्प होते. आपापल्याच विचारात. रस्त्याला वर्दळ तुरळक होती. विक्रमला थोडंसं विचित्र वाटलं.
"ते पुस्तकांचं काहीतरी म्हणत होतीस."
"अरे वा, तुझं लक्ष होतं माझ्या बोलण्याकडे?" समीना कुत्सितपणे म्हणाली.
विक्रमला थोडं वाईट वाटलं. "अगं जरा.."
"राहू दे, राहू दे"
"बोलशील तर काय झालं?"
"अरे नाही, तर काल वाचत होते. आपले योद्धे, आपले सरदार, त्यांचे पराक्रम. आणि हे गोरे लोक त्यांना दरोडेखोर, चोर वगैरे म्हणतात."
"अगं, जसा आपला इतिहास आहे, तसा त्यांचा पण आहे नाही का? आपल्याला जशी आपल्या पूर्वजांपासून स्फूर्ती मिळते, तशीच त्यांनाही त्यांच्या पूर्वजांकडून. बाकी, इतिहासाचा वापर हा वर्षानुवर्ष राजकारण्यांनी केलेला आहे. जर त्यांनी आपल्या बाजूनं इतिहास लिहिला, तर त्यांच्या देशाच्या मनोधैर्याचं काय होईल? खरा इतिहास हा फार कमी वेळा लिहिला जातो. असा इतिहास जो निष्पक्ष असतो, तो मिळणं कठीणच असतं. म्हणून मला नेहमी वाटतं. इतिहास फक्त शिकायचा नसतो, तर इतिहासापासून शिकायचं असतं. आणि तो कवटाळून तर बिलकुलच बसायचं नसतं."
"तुला मी काय वाटते. मी इतिहासाची बी.ए. आहे. आणि तू मला असा ज्ञान देत असतोस जणू मी कुणी मूर्ख आहे." समीना वड्याचं तेल वांग्यावर ओतत होती.
आणि अचानक त्याच्या ब्लॅकबेरीचा लाईट फ्लॅश झाला. त्यानं झपाट्यानं मेसेज वाचला.
"सॅम..." तो अत्त्यानंदानं ओरडला. "सॅम आय हॅव डन इट."
"काय झालं?"
"मी आता माझा स्वतःचा बिझनेस चालू करतोय. यू.एस. मध्ये."
"काय?" तिला काहीच कळेना.
"नोकरीला लागल्यापासूनच एक ठरलं होतं. मला स्वतंत्र व्हायचंय. मी कुणाची चाकरी करू शकत नाही, तो माझा पिंड नव्हे. त्यासाठीच मर मर मरत होतो. अनेक लोकांशी संपर्कात होतो. एक क्लायंट होता, त्याच्याशी बरीच चर्चा झाली होती. पैसे उभे करत होतो. अनेक बाकीच्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करत होतो. तो तिकडचं बघत होता. हा बघ त्याचा मेसेज आलाय आत्ता. मी सकाळपासून ह्याच मेसेजची वाट बघत होतो. पुढच्या महिन्यांत आपण दोघे न्यू यॉर्कला."
"..."
"अगं काही बोलशील?"
"काय बोलू. तुला मला एका शब्दानंही विचारावंसं वाटलं नाही ना? आयुष्याचा एव्हढा मोठा निर्णय तू मला न विचारताच घेतलास. माझी काय इच्छा आहे, मला काय वाटतं, कशाचीच गरज नाहीय ना."
"अगं पण, तू तर हाऊवाईफच आहेस. तुला इथे काय तिथे काय. उलट तिथे जास्त आराम आहे गं! आपल्या दोघांसाठीच तर करतोय सगळं."
"वा वा! दोघांसाठी म्हणे. मग दोघांचीही मतं विचारात घ्यायची असतात. हे सगळं तू स्वतःसाठीच करतोयस."
"समीना!" त्याला कळतच नव्हतं.
"बस झालं आता. मला कंटाळा आलाय ह्या असल्या आयुष्याचा. अशा घरात जिथे मला कस्पटाएव्हढीही किंमत नाही, तिथे मला राहायचंच नाहीय."
"काय? सॅम डोन्ट ओव्हररिऍक्ट!"
"ओव्हररिऍक्ट? अरे मी आहे म्हणून इतके दिवस सहन केलंय. मला साधा एक तासही मिळत नाही दिवसाकाठी तुझ्याबरोबर. एनीवे, संपलंय आता. मला अम्मी कित्येक दिवसांपासून परत बोलावतेय."
"हे कधीपासून..." पण त्याचं वाक्य पूर्ण ऐकायलाही ती तिथे उभी नव्हती.
विक्रम थिजला होता. त्याला कळतच नव्हतं काय झालं होतं. मेंदूला झिणझिण्या आल्यागत वाटत होतं. तो ती गेली त्या दिशेला बघतच राहिला होता. ती दिसेनाशी झाली, तेव्हा तो भानावर आला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. तो जिथे उभा होता तिथल्या एका दुकानदारानं टीव्हीवर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम लावला होता. त्याच्या टीव्हीच्या शेजारीच घड्याळ होतं. सकाळचे ९.३० वाजत होते. विक्रमला अचानक जाणीव झाली आणि तो धावतच निघाला. त्यादिवशी मेट्रोही उशीरानं चालत होत्या. त्याला मेट्रो मिळायला उशीर झाला आणि घरी पोचायलाही. त्याच्या घराचं घरपण गेलं होतं. त्याच्या स्वातंत्र्यानं किंमत वसूल करायला सुरूवात केली होती.

अभयनं अजून एक झुरका घेतला आणि सिगरेट शेजारी बसलेल्या शीबाकडे दिली. तिनंही झुरका घेतला आणि परत अभयला दिली. ती साधी सिगरेट नव्हती. त्यात गांजा होता. कान फाडून टाकेल इतक्या कर्कश आवाच्या संगीतानंही त्या सगळ्यांना चढलेली झिंग उतरत नव्हती, उलट वाढतच चालली होती. रात्र रंगत होती. शंभरच्या आसपास उच्चभ्रू घरातली मुलं-मुली ह्या रेव्ह पार्टीला आली होती. ह्यातले अनेकजण रेग्युलर होते. आणि ५-६ जण डीलर्स. हा प्रकार फारच सामान्य होता. दिल्लीसारख्या शहरात श्रीमंतांना काय कमी. अनेक नाईट क्लब्ज आणि पब्जमधून बनवलेलं डिलर्सचं जवळपास अख्खं नेटवर्कच अश्या पार्ट्यांची शान वाढवत असतं. सगळे श्रीमंत, उच्चभ्रू. पार्टीमध्ये उंची मद्य, जेवण आणि सर्व प्रकारच्या नश्याच्या पदार्थांचे पाट वाहत होते.
अभय आणि शीबा ही जोडी अश्या प्रत्येक पार्टीत असायची. ते दोघेजण दिल्लीतल्या दोन मोठ्या उद्योगपतींची मुलं होती. बाप पार्टनर्स, त्यामुळे दोघांची मैत्री लहानपणापासून. आई-वडलांची दुर्लक्ष झालेली ही दोघंच एकमेकांचा आधार होती. पण अक्कल यायची त्याआधीच हातात नको तेव्हढा पैसा आला होता आणि दोघंही वाहावत गेली होती. दोघंही आत्ता जेमतेम २१ वर्षांची होती. कॉलेजची शेवटच्या वर्षाची पार्टी अगदी रंगात आलेली होती. आता शीबाच्या हातात कोकेनची एक पुडी आली होती. तिनं ती पुडी सोडली आणि ओढली आणि.. आणि एकदम ती कोसळली. तिच्या नाकातून रक्त येत होतं. अभय एकदम गडबडला, त्याची झिंग उतरली. ती त्याच्याच मांडीवर पडली होती. त्यानं ती पुडी उचलून वास घेतला. ते हेरॉईन होतं. तो पॅनिक झाला आणि आरडाओरडी करायला लागला. कुणी ऐकण्याच्या स्थितीत नव्हतं हे एक आणि कर्णकर्कश संगीतामध्ये त्याच्या किंकाळ्या विरून जात होत्या. शेजारीच उभा एक डीलर पुढे झाला आणि त्यानं तिला उचलायला अभयची मदत केली.
"आम्ही तिला वाचवू शकतो." खुर्चीवर बसलेला इसम म्हणत होता.
"तिला हॉस्पिटलला घेऊन चला ना लवकर. तिला काहीतरी होईल." अभयच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. त्याचा गळा दाटला होता. तो सारखे हुंदके देत होता.
"हॉस्पिटलला नेलंस तर दोघंही आत जाल."
"पण मग. ती बरी कशी होणार. प्लीज, तिला वाचवा हो." अभय गयावया करत होता. त्याला काय करावं सुचत नव्हतं. वडलांना फोन करून हे सगळं कसं सांगणार!
"आम्ही तिला वाचवतो. इथेच डॉक्टरची सोयही होईल."
"मग करा ना. वाट कसली बघताय." शेजारीच सोफ्यावर शीबा निश्चेष्ट पडली होती. नाकातून आलेलं रक्त तसंच वाळलं होतं.
"त्याच्यासाठी एक काम करावं लागेल तुला."
"कसलं काम?"
"सांगतो." तो इसम दात विचकून हसला. "तुझ्या बापाचं ऑफिस ज्या बिल्डिंगमध्ये आहे, तिथे खूप सारी मोठी मोठी ऑफिसेस आहेत."
"मग?"
"तिथे आत जाण्यासाठी खूप सुरक्षा तपासणी होते."
"मग?" अभयला काही कळतच नव्हतं. "ह्या सगळ्याचा शीबाला वाचवण्याशी काय संबंध?"
"पण तिथे तुला कोणी हटकणार नाही."
"हो. ते आहे."
"मग, मी एक छोटीशी बॅग देतो, तेव्हढी नेऊन तिथल्या दुसर्‍या मजल्यावर लिफ्टच्या शेजारच्या कचरापेटीमागे ठेवायची आणि परत यायचं. बस."
"काय? काय आहे त्या बॅगेत?"
"त्याच्याशी तुला काय करायचंय? आम्ही हिचा जीव वाचवतो, पण तुला हे काम करावं लागेल."
"बॉम्ब आहे की काय? मी असलं काहीही करणार नाही."
"बघ. विचार कर. एकतर तुझ्याकडे वेळ कमी आहे. बाकी, इथून बाहेर पडणं फक्त माझ्यावरच अवलंबून आहे."
अभयनं चहूकडे घाबरूनच नजर फिरवली. बरीच माणसं होती.
"आणि त्यातून, तू हा असा. एक दिवस नशा मिळाला नाही, तर भीक मागत येतोस. तुझ्याकडे काही पर्याय आहे तरी का दुसरा? कमीत कमी तिचा जीव वाचवल्याचं समाधान तरी मिळेल." तो दात विचकत हसत होता. आणि अभय खचत चालला होता.

विक्रम मेट्रोमधून उतरला. त्यानं घड्याळाकडे पाहिलं. अजून ९च वाजत होते. वेळ होता. तो शांतपणे रस्त्यावरून चालत होता. त्यानं पांढरी पँट, चॉकलेटी रंगाचा शर्ट आणि पांढरा कोट घातला होता. फक्त आज काळा चष्मा नव्हता आणि हातात ब्लॅकबेरी नव्हता. चालता चालता तो विवक्षित ठिकाणी आला आणि थांबला. त्याची नजर कुणाला तरी शोधत होती. पण कुणीच नव्हतं. त्या दुकानासमोर तो उभा होता. टीव्हीवर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम चालू होता. विक्रम खिशात हात घालून एकटक टीव्हीकडे बघत होता.

अभय रस्त्यानं चालत होता. त्याचे डोळे एका रात्रीतच खोल गेल्यागत झाले होते. कित्येक वर्षांपासून झोपला नसावा असं वाटत होतं. शेवटचा डोस घेऊन ९ तास होत आले होते. त्याला आत्तापासूनच तल्लफ येत होती. पण त्याच्या खिशात आज नेहमीप्रमाणे पुडी नव्हती. कारण, कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कुणालाही संशय येणं परवडण्यासारखं नव्हतं. हातातली ४-५ किलोंची बॅग त्याला फारच जास्त जड वाटत होती. तो पाय ओढत चालला होता. अंगावरचा शर्ट त्यानं निघण्यापूर्वी बदलला. थोडं सोबर वाटावं म्हणून त्यानं फॉर्मल्स घातले होते. पांढरा शर्ट आणि काळी पँट घालून तो अजूनच कृश वाटत होता. चालून चालून तो थकला. त्याला धाप लागल्यागत झालं म्हणून तो फुटपाथवरच एका दुकानासमोर उभा राहिला. दुकानात टीव्ही चालू होता, पण त्यावर काय चाललंय, ह्याकडे त्याचं लक्ष नव्हतं.
"लक्षात ठेव, काही शहाणपणा केलास, तर हिच्या जीवावर बेतू शकतं. पोलिसांत जायचा विचारही करू नकोस. सर्वप्रथम ते तुलाच आत टाकतील. आणि सगळ्यांची बेअब्रू निश्चित आहे." तो सांगत होता आणि अभयची एकएक तटबंदी कोसळत होती. तिथून निघताना अभय शीबाजवळ गेला. ती अजूनही निश्चेष्ट पडली होती. तिचा श्वासोच्छवास सुरू होता. नाकाशी सुकलेलं रक्त, त्यानं आपल्या बाहीनं पुसलं आणि एकदमच त्याचा बांध फुटला. तो ओक्साबोक्शी रडायला लागला. मग एकदम सावरला आणि तिथून निघाला. आपल्या घरी गेला आणि तयारी करून तो निघाला होता. आई-वडिल, शीबा, शीबाचे आई-वडिल सगळ्यांचे चेहरे एक एक करून त्याच्या डोळ्यासमोर आले. त्याला ठाऊक होतं, प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आपण दिसणार. आज आपण हाराकिरी करायला निघालोय. त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं.
विक्रमनं एक क्षण आपली नजर फिरवली तर शेजारी एक पोरगेलासा तरून उभा होता. अशक्त वाटत होता आणि तो टीव्हीकडेच एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. आजच्या मुलांमध्येही किती देशभक्ती आहे ते पाहून विक्रमला कौतुक वाटलं. त्यानं अभावितपणे त्या तरूणाच्या खांद्यावर हात ठेवला.
अभय एकदम दचकला आणि भानावर आला. त्यानं शेजारी पाहिलं. एक २७-२८ वर्षांचा तरूण त्याच्याकडे पाहत होता. त्याचा हात अभयच्या खांद्यावर होता आणि चेहर्‍यावर स्मितहास्य होतं.
"खूप कृतज्ञता वाटते ना!" विक्रम म्हणाला.
".." अभयनं फक्त मान डोलावली.
"स्वातंत्र्यदिनाला असंच मन भरून येतं." विक्रम कुठेतरी शून्यात पाहत म्हणाला.
अभयला काही सुचत नव्हतं. "पण आजच्या दिवशी फार सिक्युरिटी असते हो!" तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
"हं" विक्रमचं क्षणभर लक्ष विचलित झालं होतं. "काय?" तो भानावर येत म्हणाला.
"नाही, मी म्हणतोय, सिक्युरिटी किती असते ना?"
विक्रमच्या चेहर्‍यावर पुन्हा स्मितहास्य आलं. "स्वातंत्र्याची किंमत आहे ती. कुठल्याही स्वातंत्र्यासाठी किंमत चुकवावी लागते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी किंवा मिळाल्यावर, पण किंमत ही चुकवावी लागतेच."
"पण आपल्याच देशात आपणच घाबरून राहायचं.." अभयला तिथेच काळ थांबावा असं वाटत होतं.
"हो, कारण आपण कर्तव्यांमध्ये कमी पडतो. आपण स्वातंत्र्यामध्ये फक्त हक्क बघतो, कर्तव्यांचा आपल्याला विसरच पडतो. आपण जर हक्कांबरोबरच कर्तव्य पूर्ण केली, तर ही स्वातंत्र्याची किंमत लवकर चुकती होईल." विक्रमला आत काहीतरी डांचत होतं. त्याला आपले बांध फुटतील की काय असं वाटत होतं.
एव्हढ्यात अभयचं लक्ष घड्याळाकडे गेलं. ९.३० वाजत होते.
"चला मला जायला हवं." अभय म्हणाला.
विक्रमला का कुणास ठाऊक, त्याला मिठी माराविशी वाटली. त्यानं त्याला एकदम मिठी मारली. अभयला आधी काही सुधरलं नाही. पण मग त्याला एक अनामिकशी शक्ती मिळाल्यागत वाटलं. त्याच्या डोळ्यांमध्ये थोडंसं तेज आल्यागत झालं. स्मित करून तो निघाला.

"स्वातंत्र्याची किंमत....हक्क, कर्तव्य..." अभयच्या डोळ्यांसमोर चेहरे अजूनही नाचत होते. विक्रमचे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. त्याला काहीच कळत नव्हतं.
'आई-वडिलांकडून दुर्लक्ष झालं हे खरं. पण मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपणही किती गैरफायदा घेतला. आपल्या आई-वडिलांची चूक झालीही असेल, पण म्हणून आपण जे केलं ते बरोबर होत नाही. आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार केला आणि आज त्याचे परिणाम भोगतोय. आणि नुसते आपणच नाही, तर परिणाम शीबा, आपले घरचे आणि देशालाही भोगायला लागणार आहेत. हा बॉम्ब दिल्लीतली सगळ्यात मोठी कमर्शियल कॉम्प्लेक्स उडवून टाकेल. हाहाःकार माजेल. आपण ड्रग्जच्या आहारी जाऊन त्याचे गुलाम झाल्याने ही परिस्थिती ओढवलीय. होय गुलामच. ती आता मजा कुठे राहिलीय. पदरचे पैसे खर्च करून आपण गुलामी करतो. आपल्यासाठी बाकी जगणं राहिलंय कुठे?
ह्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं? कॉलेजातल्या इतरांसारखं स्वच्छंद, स्वतंत्र जगणं कसं अनुभवायचं? काय करायचं?'
चालता चालता त्याला परत धाप लागली.
'छातीचा भाता झालाय. वय वर्ष एकवीस आहे फक्त माझं. चाळिशीच्या माणसासारखं होतंय. काय करत होतो मी? काय केलंय? आणि काय करतोय?'
त्याला स्वतःचीच प्रचंड घृणा आणि कीव येऊ लागली. त्यानं एकदा बॅगकडे बघितलं. त्याला एकदम काहीतरी वाटलं. त्यानं निर्णय घेतला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. समोरच एक पोलिस उभा होता. अभय पोलिसाच्या दिशेनं चालायला लागला. त्यानं किंमत द्यायचं ठरवलं होतं!

विक्रम अजून पाच मिनिटं तसाच उभा राहिला. अभय दिसेनासा झाल्यावर तो वळला, आणि... समोर तीच उभी होती. हो, समीना!
आधी विक्रमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तशीच, हिरव्या सलवार कमीजमध्ये. जशी गेली होती, तशीच. आपण स्वप्न पाहतोय, अशी विक्रमला खात्री झाली. आणि त्यानं अभावितपणे तिच्या दिशेनं पाऊल टाकलं. पण मग तिथेच थबकला. आणि उलट दिशेला वळून चालायला लागला.
"बोलणारही नाहीस?" तिचे शब्द कानांवर पडले मात्र तो लगेच थांबला आणि वळला.
त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. आता बांध नक्कीच फुटणार होता. गळा दाटून आला होता. एकेक पाऊल टाकत तो तिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला,
"तू गेल्यावर मी तुला खूप शोधलं. पण तुझ्या आई-वडिलांनी मला तुझा पत्ता लागू दिला नाही. मग मी एकटाच अमेरिकेला निघून गेलो. वाटलं होतं, तुझ्यापासून दूर कदाचित तुला विसरून जाईन. पण तुला गमावल्यावरच मला तुझी किंमत कळली. मी तुझाशिवाय राहूच शकत नाही. मी ५ महिन्यांतच परतलो. माझी खूप मोठी चूक झाली की मी तुला गृहित धरलं. कदाचित तू म्हणतेस तेच खरं. मी फक्त स्वतःचाच विचार करत होतो. मी माझ्या हक्कांचाच विचार केला, कर्तव्य पूर्ण केलीच नाहीत. असो. आता कदाचित फार उशीर झालाय. पण तुला एकदातरी हे सगळं सांगायचं होतं. तुझी माफी मागायची होती. बस. तेव्हढ्यासाठी दरवर्षी इथे येतो. की कधीतरी तू येशील. आता तू मला माफ नाही केलंस तरी चालेल. मी ह्या दुःखाबरोबर जगायला शिकलोय." तिच्या डोळ्यांत पाणी होतं. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तिचे अश्रू त्याला पाहवेनात. तो वळला आणि चालायला लागला.
"माझं ऐकणारही नाहीस?" पुन्हा तिचे शब्द त्याच्या कानी पडले. तो पुन्हा वळला.
आता ती त्याच्या दिशेनं आली.
"तुला तडकाफडकी सोडून मी व्यक्तिस्वातंत्र्याच्या शोधात निघाले होते. पण तुला गमावल्यामुळे हे स्वातंत्र्य महागातच पडलं. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी मला स्वतःच्या विचारांना स्वतंत्र करणं पुरेसं होतं, पण हे लक्षात यायला मला खूप वेळ लागला. तुझ्याशी तेव्हाच बोलले असते, तर कदाचित..! एव्हढी धावाधाव करूनही मी कधीच सुखी होऊ शकले नाही. कारण तू नव्हतास. तीन वर्षं तुझ्याशिवाय मी जगलेच नाहीये. आजही आले नसते, तर.." त्यानं तिच्या ओठांवर हात ठेवला. तिनं त्याचा हात हातात घेतला.
"आपण एकमेकांच्या पारतंत्र्यात सुखी राहूया ना!" ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली.

अचानक बाजूनं एक पोलिस व्हॅन जोराजोरात सायरन वाजवत आली. दोघांनी तिकडे बघितलं. जशी व्हॅन त्यांच्या शेजारनं गेली, विक्रमला आत बसलेला अभय दिसला.

8/12/2010

कैच्याकै

माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. मला ठाऊक आहे, की मी हे इतक्या वेळा सांगितलंय, की 'माझा जन्म..' हे वाचल्यावर पुढचं वाक्य लिहायचीही गरज उरणार नाही मला. तरीही पुन्हा सांगतो, कारण ह्या माहितीची पुढच्या लेखाला तेव्हढीच गरज आहे, जेव्हढी मुक्तपीठ वरच्या प्रतिक्रिया एन्जॉय करण्यासाठी लेख वाचण्याची.

तर असं आहे, की माझे वडील सातार्‍याचे आणि ते माझ्या जन्माआधी मुंबईत येऊन बरीच वर्षं झाली होती. त्यामुळे त्यांची भाषा वेगळीच पण बर्‍यापैकी मुंबईकर झाली होती. आई कोकण/पुण्याची त्यामुळे तिचा वेगळाच शब्दसंग्रह, ज्याला मुंबईकर मराठीचा तडका. आता मागचं वाक्य नीट पहा. फोडणी नव्हे, तडका. हे मुंबईकर मराठी. फोडणी पुणेरी भाषेची असते, आमचा तडका. कारण मुंबईकर मराठीवर गुजराती, हिंदी आणि हल्लीची पोरं इंग्रजी शाळांमध्येच जात असल्याने इंग्रजीचे मुख्यत्वेकरून संस्कार आहेत. बरं इथे मी मध्यमवर्गीय मुंबईकर मराठीची गोष्ट करतोय. उदाहरणार्थ, 'वांधा' हा शब्द मूळचा बहुधा गुजराती लोकांचा आहे, पण मुंबईत मराठी काय सगळ्यांच भाषांमध्ये वापरतात. 'तडका' हा पंजाबी/हिंदी शब्द असाच अलगद मराठीत वापरला जातो. सगळ्यात मस्त गोष्ट 'बिंदास' ह्या शब्दाची आहे. मूळ मराठी शब्द 'बिनधास्त', त्याचा दाक्षिणात्य लोकांनी अपभ्रंश केला, 'बिंदास'. हा शब्द मुंबैय्या(भैय्या शी यमक जुळतो नै!) हिंदीत दत्तक गेला आणि मजेशीर गोष्ट ही, की हल्ली मराठी माणसं सुद्धा 'बिंदास' असा उच्चार अगदी बिंदास करतात.

तर नेहमीप्रमाणेच मी विषयावरून वाहावत गेलो. मूळ विषयावर परत येऊ. माझ्या घरी असं जबरा मराठी भाषिक वैविध्य असल्याने, माझं मराठी स्पेशल असणं भाग होतं. पण पुलं म्हणतात ना, 'नारळ आणि मुलगा, कसा निघेल ते सांगता येत नाही', तस्मात आमचं मराठी हे 'ना घर का, न घाट का' असं झालं. मागच्या वाक्यात वापरायला मला मराठी म्हण सापडेना. हां आत्ता आठवली, 'कशाचं काय अन् फाटक्यात पाय'. चुकीची असावी बहुधा, पण असो. आम्ही प्रयत्न तर केला.

हां, तर आमच्या मातोश्री कोकणात शाळा आणि पुण्यात कॉलेज अन् नोकरी केलेल्या. त्यामुळे फटकळ शब्दांचा संग्रह त्या योग्य वेळी बटव्यासारखा मोकळा करतात. 'खुटापर्‍यागत बसू नकोस', 'निवणं करून कशासाठी बसले आहात', 'सपाज्ञा देउ नकोस (की करू नकोस?)' हे आणि असे अनेक वाक्प्रचार मला कळतात, पण मला योग्य वेळी इतक्या वर्षांचा दांडगा श्रवणानुभव असूनही वापरता येत नाहीत. पण तिच्या बोलण्यात पुणेरी तिरकसपणापेक्षा कोकणी फटकळपणा जास्त आहे. त्यामुळे ती रागावून बोलली तरी तिलाच जास्त त्रास होतो. आम्हा दगडांना सहसा जास्त काही वाटत नाही. उलट बाबांची केस आहे. बाबांचा शब्दसंग्रह सातारी आहे. ते कधीच 'चावी' वापरत नाहीत, फक्त 'किल्ली'. ते भाज्या कापू शकत नाहीत, फक्त 'चिरता' येतात. 'टोमॅटो' चं स्पेलिंग अचूक ठाऊक असूनही, ते फक्त 'टामाटू'च खातात, माझ्यासाठी ते नेहमी 'बारके बारके' पेरू आणतात आणि 'मामुली' गोष्टींमुळे त्यांना फरक पडत नाही. सातारी लोकांना सहसा वाक्प्रचार ह्या भाषाविशेषाविषयी प्रेम नसतं, तद्वत माझे वडिल वाक्प्रचारांच्या फंदात पडत नाहीत. पण रांगडेपणा भरपूर. बोलताना फारसा विचार करायचा नाही. फटकळ नव्हे, लहेजाच रांगडा. म्हणजे उदाहरणार्थ. "नमस्कार, काय म्हणता?" च्या ऐवजी, "काय लेका, हैस कुठं?" अर्थात बाबांच्या मूळ भाषेलाही मुंबईचा तडका बसलाय, त्यामुळे हे 'लेका' वगैरे मी सातार्‍याला गेल्यावर माझ्या आतेभावाच्या तोंडूनच ऐकतो.

बरं मी मराठी शाळेत शिकलो. पण सगळी पोरं शहरीच आणि शाळेतलं मराठी आपलं प्रमाणित अधिकृत मराठी असतं. त्यामुळे काही विशेष बदल संभवत नव्हता. पण माझ्या इमारतीमध्ये राहणार्‍या इंग्रजी मिडियमच्या पोरांमुळे आणि त्यांच्या 'बड्डे' ला केक खायला जात असल्याकारणे माझ्या शब्दसंग्रहात, आमच्या 'बिल्डिंग'ची 'बॅगसाईट' (मागची बाजू) आणि 'टेरेस' अशी भर पडली होती. भरीस भर म्हणून मी क्रिकेट खेळताना 'फास बॉल' टाकायचो आणि बरेचदा 'क्लीन बोल्ट' व्हायचो. आणि मी बिल्डिंगमधल्या लहान पोरांमध्ये गणना होत असल्याने बरेचदा 'इंटर पिंटर' असायचो (म्हणजे दोन्ही टीम कडून खेळायचो, 'लिंबू टिंबू' ह्या मराठी कारकुनाला 'अकाउंटंट' म्हणायची पद्धत आहे ती). मग इंजिनियरिंग कॉलेजात पोचेस्तोवर हळूहळू अनेक रोजच्या वापरातले शब्द इंग्रजी झाले होते. पण वर्गातल्या हॉस्टेलाईट पोरांच्या विविध भाषांशी ओळख होऊ लागली होती. सगळ्यात लगेच लक्षात येणारा लहेजा म्हणजे नागपुरी. "अबे काय करून राहिला बे तू?" "मी इथे तुझी वाट पाहून राहिलो न बे!" ही वाक्यरचना मला जाम म्हणजे जाम आवडते. पण नागपुरी पब्लिकची दुसरी सवय म्हणजे आपापसात बरेचदा हिंदीत बोलतात. हे मला न उलगडलेलं कोडं आहे. बाकी वैदर्भीय बंधूंची बोली ही नागपुरीसारखीच थोडीफार, पण त्यातही व्हेरियेशन्स असतात. त्यांना आपापसात बरोबर कळतं कोण कुठला आहे. माझा त्यामध्ये विशेष अभ्यास नसल्याने आत्ता जाऊ दे.

पुढे नोकरीला लागलो तर तिथेही माझ्या पुढच्याच टेबलवर माझा मित्र नागपुरी. बरेच दिवस त्याच्याबरोबरच प्रोजेक्टवर होतो. त्यामुळे नकळत मी त्याच्याशी त्याच्याच बोलीत बोलायला लागलो. ही माझी समस्या आहे. माझा लहेजा फार सहजपणे समोरच्यासारखा होऊन जातो. ६वी-७वीत असताना मी महिनाभर वडगाव बुद्रुकला राहिलो होतो, माझ्या आजोबांच्या घरी. तिथल्या गावातल्या पोरांबरोबर खेळायला जायचो. आईलाच माझ्या लहेजाची काळजी लागली. पण मग मुंबईत परतल्यावर महिन्याभरात मी नॉर्मलला आलो.

तर माझ्या ह्याच समस्येचा मला सध्या भारी त्रास होतोय. त्याचं झालं असं.

मी मराठी ब्लॉग विश्वामध्ये जानेवारी २०१० मध्ये इवल्याश्या पावलांनी, दबकत दबकत चंचुप्रवेश केला. गरीबासारखा पोस्टा लिहायचो. चार-दोन भली माणसं, 'मराठी ब्लॉग विश्व' च्या कृपेनं चक्कर टाकून जायची. एखादा अतिशय भला भेटदाता, प्रतिक्रियाही देऊन जायचा. मी सुखावायचो. काही प्रथितयश ब्लॉगकारांचे ब्लॉग्ज आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचा पाऊस पाहून डोळे दिपून जायचे. कधीतरी आपला ब्लॉगही असा होईल का? अश्या निरर्थक स्वप्नांमागे मन दुडूदुडू धावायचं. हो दुडूदुडू, कारण तेव्हा मी मराठी ब्लॉगिंगमधलं बाळ होतो. अर्थात अजून मोठा झालो नाहीये, पण तेव्हा बाळ होतो हे कन्फर्म. तर अश्या वेळी, एक फरिश्ता माझा फॉलोअर झाला. त्याचं नाव मी सांगत नाही, पण आडनाव पत्रे होतं. त्याचं नाव सांगायला मला फार आनंद झाला असता, पण असो. आणि माझा आत्मविश्वास दुणावला. मग मी अजून जोमाने आपल्या मतांची पिंक टाकायला लागलो. मग कळलं, की जितकं जास्त वाचेन तितकं जास्त लिहिता येईल, मग मी अजून ब्लॉग्ज वाचायला घेतले. त्या फरिश्त्याशी नेट ओळख झाली. मग अनेक प्रथितयश ब्लॉगर्सच्या ब्लॉग्जवर प्रतिक्रिया देऊन देऊन त्यांच्याशी ओळखी काढल्या. मग गुगल बझ नामक एका झंझावातानं अनेकानेक ओळखींची कवाडं उघडली. रोजच्या रोज कित्येक मराठी ब्लॉगर्स आणि ब्लॉगवाचकांशी ओळखी झाल्या आणि इथेच घात झाला.

महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या नव्हे जगाच्या कानाकोपर्‍यातल्या अनेकानेक लोकांशी रोजच्या रोज बोलण्यामुळे माझ्या भाषेची वासलात लागली. आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाला. मीच हरवलो. हे म्हणजे, अमिताभपासून सगळ्या गायकांच्या आवाजात गाणी गाऊन गाऊन सुदेश भोसलेंचा स्वतःचाच आवाज कुणाला ठाऊक नाही, तसं झालं. इतके विविध शब्द माझ्या संग्रहात आलेत की हल्ली मी जे लिहितो, ते मीच लिहिलंय का असा प्रश्न मला पडतो. बरं, हे शब्द स्पेशल आहेत. ते अर्थांसकट इथे मी स्वतःच्याच आठवणीसाठी देतोय. जेणेकरून आजपासून काही वर्षांनी जेव्हा माझी भाषा पुन्हा एकदा बदलून गेली असेल, तेव्हा हा लेख मला माझ्या आजच्या स्थितीची कल्पना देईल.

१. भारी - भारी म्हणजे मुंबईकर मराठीत झकास. मी भारी हा शब्द दोन-तीन महिने पूर्वीपर्यंत कधीच वापरला नसेल. आणि आजच्या तारखेला, ह्या शब्दाशिवाय माझा दिवस पुरा होत नाही. कुठलीही चांगली गोष्ट 'भारी'च असते, असा माझा ठाम समज झालाय.

२. प्रचंड - प्रचंड हा शब्द मी पुस्तकात कित्येकदा वाचलाय, पण मी बोलीभाषेत तो वापरेन असं मला कधी स्वप्नातही वाटलं नसेल. आज मी हा शब्द कशाच्याही मागे लावतो. 'तो प्रचंड त्रास देतोय मला' पासून 'त्याने प्रचंड वेळ काढला.'

३.प्रचंड भारी - हे डेडली कॉम्बो आहे. प्रचंड भारी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. एखादी गोष्ट प्रचंड भारी आहे म्हणजे अतिशय सुंदर किंवा अतिशय झकास किंवा अतिशय .... भारी आहे!

४. कैच्याकै भारी - ओके, आता ह्यासाठी मला कैच्याकैचा अर्थ सांगावा लागेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची अजिबात गरज नाही. कैच्याकै भारी म्हणजे 'ब्युटिफुल, मोअर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल' मधल्या 'मोस्ट ब्युटिफुल' सारखं आहे. म्हणजे, ह्यापुढे उच्च दर्जा नाही. ह्यापुढे दाद असूच शकत नाही. उदाहरणार्थ, लतादीदी कैच्याकै भारी गातात, सचिन तेंडुलकर कैच्याकै भारी क्रिकेट खेळतो आणि विद्याधर भिसे कैच्याकै भारी पकवतो. ओके, शेवटचा वाक्यातला प्रयोग चुकलाय पण असो.

थोडक्यात, कुठल्याही विशेषणापुढे 'प्रचंड' आणि 'कैच्याकै' हे लावता येतात. पण 'कैच्याकै' वेगळा वापरला तर मात्र अर्थ बदलतो बरं का. तेव्हा इथे थोडं सांभाळावं लागतं.

५. कैच्याकै - कैच्याकै ह्या शब्दाचा 'काहीच्या काही' ह्या शब्दसमूहाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. हां, काही भाषाप्रभू कैच्याकै हे अपभ्रंश झालेलं रूप असल्याचा दावा करतील, पण करोत बापडे. आमच्या मते ते फक्त 'होमोफोन्स' (सारखा उच्चार असलेले) आहेत. पण, ह्याच भाषाप्रभूंमुळे काही लोक कैच्याकै ला 'काहीच्या काही' च्या ऐवजी वापरतात. कैच्याकैचा खरा(!) अर्थ 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड' असा आहे. आता कुणी म्हणेल, मराठी काय अर्थ. अरे मनुष्यांनो, हा एकमेवाद्वितीय शब्द आहे. मराठीत ह्या शब्दाला समानार्थी शब्दच नाहीये. आणि इंग्रजीतही अख्खा शब्दसमूह वापरावा लागला.

६. निवांत - हा शब्द मी पुस्तकांमध्ये वाचला होता, पण मग हल्ली ब्लॉग आणि बझच्या कृपेने मीदेखील सर्रास वापरू लागलोय. कुणी विचारलं काय चाललंय, की मी 'निवांत' असं उत्तर देईन हे मला ५ महिन्यांपूर्वी कुणी म्हणालं असतं तर मी निवांतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं.

७. अशक्य - अशक्य ह्या शब्दाचे 'शक्य नसलेलं' ह्यापलिकडेही अर्थ आहेत, हे जर नेपोलियनला वेळेत कळलं असतं, तर त्यानं त्या शब्दासकट डिक्शनरी छापली असती. अशक्य म्हणजे 'प्रचंड' आणि 'कैच्याकै' ह्यामधली पातळी. अशक्य सुंदर म्हणजे अतिशय सुंदर. ऑन सेकंड थॉट्स, असं पाहिजे - 'भारी, प्रचंड भारी, अशक्य भारी'. कैच्याकै म्हणजे 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड' आहे ना! पण अशक्यचा दुसरा अर्थ म्हणजे 'शब्दांपलिकडे' म्हणजे 'कैच्याकै' सारखं नाही, ऍक्च्युअली कशासारखंच नाही. म्हणजे, आता बघा, एखाद्यानं तुम्हाला तुमच्या आवडत्या मुलीसमोर दुसर्‍याच मुलीबद्दल चिडवलं, तर तुमच्याकडे काय शब्द असतात त्याच्यासाठी? मागचा प्रश्न नीट वाचा मी शब्द म्हणतोय, शिव्या नव्हे. असा शब्दांपलिकडला आशय सभ्यपणाने व्यक्त करायचा असेल तर, 'अशक्य आहेस तू!' एव्हढं म्हणता येईल.

आता असा शब्द जो मी अभिजीत वैद्यला भेटण्यापूर्वी ऐकलाही नव्हता आणि आता सर्वांत जास्त वापरतो.

आवरा - 'आवरा' हा शब्द मी ऐकला नव्हता असं नाही. 'चला आता दप्तराचा पसारा आवरा नाहीतर फटके मिळतील' अश्या आशयाने ऐकला होता. पण आवरा हे पाणचटपणाचं एकक आहे हे मला अभिजीतमुळे कळलं. एखाद्या लेखावर खूपच 'आवरा' कॉमेंट्स येताहेत, किंवा अमकातमका 'आवरा' फॉर्ममध्ये आहे ,अश्या पद्धतीने ते विशेषण म्हणूनही वापरलं जातं. आता ते विशेषण आहे म्हटल्यावर, आवरा, प्रचंड आवरा, अशक्य आवरा आणि कैच्याकै आवरा असेही वाक्प्रयोग हल्ली मी बरेचदा करतो.

आता लोकं 'आवरा' म्हणण्याच्या आत ही साता उत्तरांची कहाणी साठा उत्तरीं सुफळ संप्रूण(संपूर्ण) करतो!

विशेष टीप - वरती शब्दांचा क्रम हा त्यांची प्राथमिकता किंवा महत्व दर्शवत नाही, तो कसाही आहे. आणि 'आवरा'ला अनुक्रमांक न देणं हे त्याचं निर्विवाद वर्चस्व दर्शवण्यासाठी वापरलं गेलेलं 'गिमिक' आहे.

8/08/2010

स्वामी तिन्ही जगांचा..

परवा माऊताईबरोबर सहजच्या गप्पा मारताना आईला मुलासाठी किती काय काय करावं लागतं असा विषय निघाला. मी विचारात पडलो. आपण आईला किती गृहित धरतो (इथे आपण म्हणजे मी स्वतः आहे, ह्याची नोंद घ्यावी). किती म्हणजे कुठल्या हद्दीपर्यंत. विचार भिरभिरायला लागले होते, पण तेव्हढ्यात कलिग बोलवायला आला आणि नावेची दिशा बदलली. जोवर दिवस संपत आला, मी थकून गेलो होतो. मीटिंग रूममध्ये तेच तेच बोलून बोलून डोकं भणाणून गेलं होतं. अचानक माझा मोबाईल व्हायब्रेट व्हायला लागला. मी घड्याळाकडे बघितलं. ५.४५ झाले होते. मी नेहमी ५-५.१५ ला घरी फोन करतो. आता तीन वर्षं झालीत इथे, तरीसुद्धा मला ५ मिनिटं जरी उशीर झाला तरी आईचे तिथून फोन सुरू. मी थोडा वैतागूनच मनात विचार करायला लागलो, "काल सांगितलं होतं की आज मीटिंग आहे!" मी फोन उचलत नव्हतो, म्हटलं १५-२० मिनिटांत उरकेल मग निवांत करू फोन. पण एकदा वाजून थांबला नाही तो पुन्हा सुरू. शेवटी मी बाहेर पडलो, मोबाईलवरूनच फोन लावला, म्हटलं, "अगं आई, दम धर की थोडा. बोललो होतो ना काल. संपली मीटिंग की करतो ना निवांत." तिनं बरं म्हणून फोन ठेवला. मला ठाऊक होतं की आता नाही केला तरी चालणार होता, आईला आजच्या दिवसाची खात्री झाली होती की मी ठीक आहे. 'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी!'

त्यानंतर काल बीबीसीवर मी पाकिस्तानच्या पुरांची बातमी पाहत होतो. एक बाई गुडघाभर पाण्यातून चालत होती. कॅमेरा पहिल्यांदा मागून चालत होता. मग कॅमेरा पुढे गेला. तिच्या हातांमध्ये तिचं दोनेक वर्षांचं बाळ होतं. त्याच्या इवल्याश्या हाताला सलाईन लावलेलं होतं आणि त्या सलाईनची पिशवी त्या माऊलीनं हातात धरली होती. ती अथक रडत होती. बोलतानाही रडत होती. तिच्या बाळाला डायरिया झाला होता. तिला काही डॉक्टरांनी औषधं दिली होती आणि सलाईन दिलं होतं. पण पुढच्या इलाजासाठी हॉस्पिटललाच जावं लागेल असंही सांगितलं होतं. आता ती एकटीच हॉस्पिटल शोधत निघाली होती. बीबीसीवाल्यांनी तिची मदत केली की नाही, ते ठाऊक नाही, पण माझ्यासाठी ती पाकिस्तानी आहे हे सत्य क्षणभरासाठी बाजूला पडल्यागत वाटलं. त्या आईचा आपल्या मुलासाठी चाललेला जिवाचा आटापिटा पाहून क्षणभर काळीज हललं. पण मग बातमी बदलली.

मग दिवसभर बरंच काही केलं, वाचलं. पण विचार बदलत नव्हते. आई दोन आठवड्यापूर्वी १० दिवसांसाठी माझ्या एका मामेबहिणीकडे जाऊन आली. बाबा सांगत होते आईचं माहेरपण व्यवस्थित झालं तिथे. आईला खरंच छान आराम मिळाला. मग मी पुन्हा विचारात पडलो, की खरंच घरी आई किती राबत असते. मी सुट्टीवर गेलो की तर तिच्या लगबगीला उधाण येतं. तुला हे करून घालायचंय, तुला ते करून घालायचंय. मग जायच्या दिवशी तिला अचानक एखादी गोष्ट आठवते, जी राहून गेली. मग चुटपुटत बसते. दिवसभर काम करत राहते, पण तिला मदत नाही केली तर चालतं, फक्त , "आई किती दमलीस गं!" एव्हढं बोललेलंही पुरतं. पण आपण ते ही किती वेळा बोलतो. लहानपणापासून आजपर्यंतची एक क्विक रिकॅप आत्ता माझ्या डोळ्यासमोर येतेय. आनंदाचे क्षण, यशाचे क्षण, दुःखाचे क्षण, अपयशाचे क्षण; पण प्रत्येक वेळी आईच्या डोळ्यांत अश्रूच दिसताहेत मला. की मलाच धूसर दिसतंय सगळं!

आई नेहमी सांगते, लहान असताना, म्हणजे अगदी ४-५ वर्षांचा असताना तिनं मला एक गोष्ट सांगितली होती.

एक मुलगा त्याच्या आईचा फार लाडका असतो. तो मोठा होतो आणि लग्न करतो. पण त्याची बायको वाईट असते. एक दिवस ती त्याला त्याच्या आईचं काळीज घेऊन यायला सांगते. तो बर्‍याच विचारांती जातो आणि आईचं काळीज घेऊन परतीला निघतो. रस्त्यात त्याला ठेच लागून तो पडतो. तर आईच्या काळजातून आवाज येतो, "बाळा, लागलं तर नाही ना तुला?"

आई सांगते, त्या काहीच न कळण्याच्या वयात मी हमसून हमसून रडलो होतो. बराच वेळ रडत होतो. पण आता मोठा झालो ना. आता कळतं, की गोष्ट सिंबॉलिक आहे. त्यावेळेस निरागस असेन, आई हेच विश्व असतं त्या वयामध्ये. 'स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी' ह्या ओळींचे अर्थ तेव्हा जसे कळतात, तसे जग कळायला लागल्यावर कळेनासे होतात. मग आई मोठ्या विश्वाचा एक भाग बनून जाते. पण मग काही काही घटना दिसतात आणि पुन्हा जाणीव होत रहाते, की आपल्यासाठी आता आई मोठ्या विश्वाचा एक भाग असेल पण आईसाठी तिचं मूल हेच तिचं विश्व असतं, कायमसाठी!

आणि आपण आईला किती गृहित धरतो!
(ही पोस्ट माझ्या आईसाठी आहेच, पण सगळ्याच आईंसाठी आहे, आणि माझ्या सगळ्याच तायांसाठी ज्या आईसुद्धा आहेत. खासकरून माऊताई जिच्यामुळे मी विचारात पडलो.)

8/05/2010

नावात काय आहे

कालच टीव्हीवर बातमी बघत होतो. 'टोयोटा' नं जपानमध्ये विक्रमी विक्री केलीय, पण अमेरिकेमध्ये त्यांच्या विक्रीचा नीचांक आहे. काही महिन्यांपूर्वीच 'गुणवत्ता' (क्वालिटी) शी संबंधित अनेक समस्या उद्भवल्याने, टोयोटावर हजारो गाड्या परत मागवण्याची नामुष्की ओढवली होती. अमेरिकेच्या कोर्टांमध्ये त्यांच्यावर बर्‍याच ग्राहकांनी 'सेकंड हँड किंमत' घटल्याबद्दल केसेसही ठोकल्यात. त्यामुळे टोयोटाला आपला गुणवत्ता तपासणी विभाग वाढवावा लागला, अनेक भरपाया द्याव्या लागल्या, कमावलेल्या नावाला बट्टा लागला तो वेगळाच. ह्या सगळ्या प्रकरणामुळे अमेरिकेत आणि इतरत्र त्यांची विक्री विक्रमी घटली, पण टोयोटाचा मूळ देश असलेला जपान मात्र अपवाद ठरलाय. तिथे ह्यावर्षीदेखील लोकांचा टोयोटावरचा विश्वास कायम असल्याचं दिसून आलंय. सर्वेक्षणांमधून हे ही सामोरं आलंय, की मुळात जपानी माणसांना 'त्यांची' कंपनी असलेल्या आणि जगभरात नाव कमावलेल्या टोयोटाचा फार अभिमान वाटतो. युरोपमध्ये पहायला गेलं तर अश्याच प्रकारे, 'सिमेन्स'बद्दल जर्मन लोकांना आणि 'फेरारी' बद्दल इटालियन लोकांना वाटणारा 'जिव्हाळा' आणि अभिमान जाणवतो.

नीट पाहिलं, तर 'टोयोटा' हे नाव जपानी आहे. 'सिमेन्स' हे त्या कंपनीच्या संस्थापकाचं आडनाव (जो प्रसिद्ध संशोधक होता आणि ह्याच्याच नावाने वाहकतेचं एकक आहे) आणि फेरारी हे देखील इटालियन आडनाव आहे. 'होंडा', 'देवू', ही अनुक्रमे जपानी आणि कोरियन आडनावं आहेत. एकंदर 'नोकिया', 'केलॉग्ज', 'कॅडबरी', 'नेस्ले' ह्या सगळ्या परदेशी कंपन्यांची नावं, त्यांच्या त्यांच्या मूळ देशाच्या भाषेतलीच आहेत. माझा मुद्दा असा आहे, की ह्या सगळ्या कंपन्या आपल्याच भाषेतली, आपल्याच मातीतली नावं घेतात आणि नुसत्या स्वतःच्या देशातच नाही, तर जगभरात ते नाव पोहोचवण्यात यशस्वी होतात.

आता आपल्या कंपन्यांकडे पाहू. सर्वप्रथम, 'टाटा' चा सन्माननीय अपवाद आपण बाजूला काढू. 'रिलायन्स', 'इन्फोसिस', 'विप्रो', 'एचसीएल इन्फोसिस्टम्स' ही काही उदाहरणं मोठी. 'पार्ले' हे उत्पादन फक्त भारतातच प्रसिद्ध आहे, तीच गत 'बजाज'चीतरीही त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देऊ. 'गोल्ड स्पॉट', 'थम्स अप'(ही पूर्वी देशी कंपनी होती, मग ती 'कोक'ने विकत घेतली.), 'व्हिआयपी' ही अजून काही उदाहरणं. अनेक देशी नावांची उत्पादनंही आहेत, जी देशामध्ये बर्‍यापैकी प्रसिद्ध आहेत, पण बहुतांशी त्यांना त्यापुढे जाण्याचा स्कोप नाही. तसंही, मला सर्वसमावेशक असं वक्तव्य करायचं नाहीय, पण एकंदर पद्धत कुणाच्याही लक्षात आली असेल. सहज रस्त्याने चालतानाही, दुकानांची नावं वाचत चला. जुन्या दुकानांची नावं अजूनी, 'गणेश जनरल स्टोर्स' वगैरे दिसतील, तुलनेनं नवं दुकान दिसेल, 'मॅग्नम', 'क्लासिक', 'सॉलिटेअर' आमच्याइथे, 'नीलकमल हेअरकटिंग सलून' आहेच, पण 'रिलॅक्स' हेअरकटिंग सलूनदेखील आहे. 'हेमंत केशकर्तनालया'चं रुपांतर 'हेमंत हेअर कटिंग सलून' मध्ये कधी झालं, हे आमच्याही लक्षात आलं नाही. 'कृष्णा विजय हिंदू हॉटेल'चं नाव 'क्रिष्ना रेस्टॉरंट' झालं, 'वसंत विजय हिंदू हॉटेल'चं असंच काहीतरी 'चायना टाऊन' वगैरे कायसं झालं. बदल झाले, मोठे बदल झाले, पण रोज एखादी गोष्ट बघितली, की तिच्यातले सूक्ष्म-सूक्ष्म होत मोठे झालेले बदल कळत नाहीत, पण एकदम बघायचा कोनच बदलला तर बदल डोळ्यांत भरायला लागतात.

युरोपातल्या लोकांचा भाषाभिमान पाहून मला कधीकधी न्यूनगंड वाटायला लागतो. पण ते असा काही ठरवून अभिमान बाळगत नाहीत, तो तसाच त्यांच्या धमन्यांत वाहतो. त्यांच्या कंपन्यांची नावं, 'क्राऊस माफ्फेई बेर्स्तॉर्फ', 'वेअर गाब्बिओनेत्ता' आणि अजूनही सोपी सोपी आहेत, पण त्यांची नावं, जिथली तिथली स्थानिक. उगाच 'पर्सेप्ट', 'कॅनोनिकल' वगैरे उधारउसनवारीची नावं आणत नाहीत ते सहसा. अपवाद सर्वत्र असतात, पण आपण पद्धत पाहिली, तर अशीच असते. आता तुम्ही विचार करा, 'भिवबा प्लॅस्टिक्स' ह्या नावाने कुणी कंपनी काढली, तर ती किती दिवस टिकेल भारतातच, सोडा महाराष्ट्रात. पण त्यानंच 'जेम प्लास्टिक्स' किंवा 'टॉप प्लास्टिक्स' (माझं इंग्रजी नावांचं सिलेक्शन आणि कल्पनाशक्ती फार थिटी पडतेय आत्ता ह्या क्षणी) असं काहीसं नावानं काढलं, तर त्याचा धंदा चालण्याची शक्यता वाढते. ह्याचं कारण बहुधा, इंग्रजांच्या काळापासून आलेलं, 'परकीय' वस्तूंचं आणि पर्यायाने परकीय नावांचं आकर्षण असावं आणि कालांतराने अमेरिकन झळाळीमध्ये दिपून गेलेले डोळे असावं. 'कोलंबस ट्रॅव्हेल्स' हे नाव 'कडमडेकर यात्रा कंपनी' पेक्षा 'हेप' आणि 'हॅपनिंग' वाटतं. ह्याचं कारण आपल्या शिक्षणात आणि आपल्यावर चहूबाजूनी पडत असलेल्या प्रभावात कुठेतरी असावं.

ह्याचा अर्थ काय होतो? आपण सगळेच (सन्माननीय अपवाद असतीलच) कमीअधिक फरकाने, सहज प्रभावित होऊ शकणारे असतो. आपण स्वतःच स्वतःला कमी का लेखतो हे मला न उलगडलेलं कोडं आहे. एक उदाहरण देतो. माझ्या बाबांच्या मते वुडलँड हे बूट उत्कृष्ट असतात, त्यामुळे मी तेच वापरले पाहिजेत. मला स्वतःला महाग बूट आवडत नाहीत, कारण माझ्यामते माझ्या चालण्याच्या पद्धतीमुळे बूट इतरांच्या मानाने लवकर खराब होतात. पण गेल्या वर्षी मी बाबांच्या पुढे हार मानली आणि वुडलँड घेतले. अपेक्षेप्रमाणे सहा महिन्यांत ते ओळखू न येण्याइतपत पालटले. मी सुट्टीवर आलो असताना दुकानात गेलो आणि स्वस्तामध्ये, त्यांचं उत्तम रिव्हँपिंग करून आणलं. अजून वर्षभर ते टिकले आणि मग त्यांनी राम म्हटलं. मग माझी आणि बाबांची वरात पुन्हा वुडलँडमध्ये. माझा सक्त विरोध ह्याही वेळी मोडून काढण्यात आला आणि पुन्हा महागडे बूट माझ्या पायात आले. काऊंटरवर पैसे देताना, तो दुकानदार पॉलिशचा एक ६० रूपयाचा ब्रश दाखवत होता आणि १००-१५० रुपयाचं पॉलिश दाखवत होता. बाबा म्हणाले, "अरे भाऊ, तुम्ही एव्हढे महाग बूट विकताय, तर १००-१५० रूपयाच्या गोष्टी तुम्ही फुकट दिल्या पाहिजेत. वुडलँडसारख्या परदेशी कंपनीला शोभत नाही असं."

तर तो म्हणाला, "काका(हे तो बाबांना म्हणाला), वुडलँड भारतीय कंपनी आहे (संभाषण हिंदीत होतं)."

"क्काय?" मी आणि बाबा एकदमच म्हणालो.

बाबांचा भ्रमनिरास झाला होता. मला क्षणभर वुडलँडबद्दल आदर वाटून गेला.

विचार करा, जर वुडलँडने तितक्याच उत्तम क्वालिटीचे बूट, 'अरण्य' किंवा तत्सम नावाने विकले असते, तितक्याच उत्तम शोरूम्समध्ये, तर ते एव्हढे नावाजले असते का? (ओके, बर्‍याच जणांना वुडलँड माहित नसेल तर ठाऊक नाही, पण मोठ्या शहरांमध्ये त्यांचं बर्‍यापैकी प्रस्थ आहे) ह्या एका प्रसंगानं मी स्वतःच विचारात पडलो, की असं का? ती भारतीय कंपनी आहे म्हटल्यावर माझ्या आणि वडलांच्या अपेक्षा कमी झाल्या होत्या का? नक्की काय वाटलं होतं त्या क्षणी? नेहमी स्वदेशी स्वदेशी म्हणणारा मी, चारचाकीही घ्यायची तेव्हा महिंद्रा किंवा टाटा असं स्कोडावाल्यांसमोर बोलणारा नक्की कसा विचार करतो?

नावामध्ये असा काय महिमा आहे, की ज्यामुळे किस्मत बदलते. क्षेपणास्त्रांची नावं, 'अग्नी', 'पृथ्वी' किंवा 'घौरी' अशी का ठेवतात? 'रघू', 'रमेश' किंवा 'अस्लम' अशी निरुपद्रवी का ठेवत नाहीत? युद्धमोहिमांची नावं 'पराक्रम', 'विजय' अशी का ठेवतात, '११२' किंवा '३६४' अशी आकड्यांमध्ये का ठेवत नाहीत? बर्‍याच नावांशी 'अस्मिता' कशी काय जोडली जाते? खूप विचित्र विषय आहे. मी कधीही भरकटेन अशी भीती वाटतेय. त्यामुळे पुढच्या परिच्छेदात संपवायचा प्रयत्न करतो.

कुठून कुठे फिरून आलो मी. स्थानिक नावं, त्याच्याशी जोडलेला अभिमान, नावांशी जोडलेली अस्मिता, देशी विदेशी कंपन्या, आपली स्वतःलाच कमी लेखायची वृत्ती, परकीय नावं आणि परकीय वस्तू जास्त चांगल्या असल्याचा आपला ग्रह. छ्या. एव्हढं सगळं लिहूनही अजून खूप काही लिहायचं बाकी आहे असं वाटतंय. नावात किती किती काय काय आहे.

टीप - लेखाचं 'नाव' नीट पाहिल्यास कळेल, शेवटी प्रश्नचिन्ह नाहीये. एका विरामचिन्हाने 'नावात काय आहे' ह्याची व्याख्यासुद्धा बदलली!