9/30/2010

एकसो छब्बीस

रात्रीचा प्रहर होता. मुसळधार पावसातून तो धावत होता. पायात कसल्याशा वहाणा होत्या. काही चावेल, काही रुतेल, असली कसलीही पर्वा न करता तो फक्त जीवाच्या आकांतानं धावत होता. धावता धावता अचानक त्याला जवळपास वस्ती असल्याच्या खुणा जाणवू लागल्या. रानात पायवाटा झाल्याचं जाणवत होतं. अंधारात काही दिसत नसलं, तरी मोकळा झालेला रस्ता, त्याच्या सराईत वावराला जाणवून गेला. तो पायवाटेला धरून धावू लागला. पहाट फुटायच्या आत त्याला नेपाळ बॉर्डर पार करायची होती. पुढचं पुढे. पण रस्त्यात ह्या वस्तीत काही खायची सोय झाली तर, म्हणून तो तिथे निघाला होता.
बघता बघता वस्ती आली. पण झाडी कमी होण्याशिवाय आणि छोट्या घरांखेरीज वस्तीच्या कुठल्याच खुणा दिसत नव्हत्या. वीज तर सोडूनच द्या, पण तेलाचे दिवेही दिसत नव्हते. किर्र अंधार होता. आणि जरी गाव झोपलेलं असलं, तरी जिवंतपणाची जाणीव ही होतेच. तीच मुळात होत नव्हती.

'चकमकीच्या भीतीनं लोक आधीच पळालेत बहुधा!' तो मनाशीच म्हणाला. आणि थेट वस्तीत शिरला. एखादं उघडं आणि बर्‍यापैकी घर शोधत. तरच त्याला काही अन्न मिळण्याची शक्यता होती. तो एक एक घर बघत पुढे सरकत होता. सगळ्या घरांना कुलुपं लागलेली होती. अचानक एका घराकडे त्याचं लक्ष गेलं, ज्या घराची खिडकी उघडी होती. त्यानं जवळ जाऊन, आत एखादं जनावर नाही ना, ह्याचा अंदाज़ घेतला आणि सराईतपणे आत उडी टाकली. पण आत शिरताच त्याला एक विचित्र जाणीव झाली. काहीतरी एकदम वेगळंच त्याला जाणवलं. काय ते त्यालाही कळलं नाही. पण त्याची भूक त्याच्या सहाव्या इंद्रियावर भारी पडली आणि तो प्रकाश करण्यासाठी काहीतरी चाचपडू लागला. योगायोगानं जवळच्याच टेबलावर त्याच्या हाताला काडेपेटी लागली. त्यानं काडी पेटवली आणि पेटलेल्या काडीचा मिणमिणता प्रकाश खोलीभर पडला. त्याचं लक्ष एकदम समोर गेलं आणि घराचा दरवाज्याला आतून कडी असल्याचं त्याला दिसलं. क्षणभर त्याच्या मणक्यातून भीतीची एक थंड शिरशिरी गेली. त्यानं संरक्षणासाठी एखाद्या वस्तूचा शोध घ्यायला नजर फिरवली आणि ...त्याच्या हातून जळती काडीच खाली पडली. किर्र अंधारात त्याच्यासारख्या सराईत माणसालादेखील धडकी भरली होती. आपण पाहिलं ते खरंच होतं का? इथे जवळपास अजून काही असेल का? आपल्याला त्यानं पाहिलं तर नसेल?
आपल्या दिशेनं काही येतंय का? ह्याचा तो शांत राहून अंदाज़ घेऊ लागला. सोबतच आवाज न करता तो आजूबाजूला चाचपडून हाताला काही लागतंय का हे बघत होता. जवळपास दहा मिनिटं अशीच गेली असतील. काहीच घडत नव्हतं. त्याचा संयम हळूहळू तुटू लागला. त्याची पुढे जायची ओढ अनावर होत होती, ज्यामुळे त्याची भीड चेपली जात होती. एव्हाना त्याच्या हाताला एक छत्री लागली होती. तो हळूच आवाज न करता उठून उभा राहिला. मगाशी जे दिसलं होतं, त्या दिशेला तोंड करून उभा राहिला. टेबलावर त्यानं पटकन हातात घेता येईल अशा अंदाज़ानं छत्री ठेवली. काडेपेटी हातात घेतली आणि चर्र्कन आवाज होऊन काडी पेटल्याबरोबर क्षणार्धात पेटी खिशात टाकून त्यानं छत्री उचलली आणि समोर पाहिलं. समोर काहीच हालचाल नव्हती.
समोरच्या खाटेवरची ती मानवी आकृती मगाचसारखीच निपचित पडलेली होती. त्यानं धीर करून खोलीच्या चहूबाजूला नजर फिरवली. कुठेही काही हालचाल नव्हती. शेजारीच स्वयंपाकघर दिसत होतं आणि तिथेदेखील काहीच हालचाल नव्हती. आत्ताची काडी विझत आली होती, त्यानं छत्री खाली ठेवली. करंगळी आणि बाजूच्या बोटामध्ये काडी धरली आणि काडेपेटी काढून अंगठा आणि तर्जनीनं दुसरी काडी पेटवली. पहिली काडी फेकून, छत्री उचलून हळूवार धीरानं चालत तो खाटेच्या दिशेनं निघाला. बाहेर पावसाचा जोर किंचितसा कमी झाला होता. जसा तो जवळ पोचला, मंद श्वासोच्छवासाचा आवाज त्याला जाणवू लागला. खाटेजवळ तो खाली बसला आणि छत्री ठेवून काडी त्या आकृतीच्या चेहर्‍याजवळ नेणार एव्हढ्यात त्याच्या बोटांना चटका बसून काडी पडून विझली. पुन्हा किर्र अंधार झाला. अचानक काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवलं आणि नकळतच त्याचा हात पुन्हा छत्रीकडे गेला. पण तेव्हढ्यात त्याला अगदी हळू आवाजात कण्हण्याचा आवाज आला. त्यानं पुढची काडी पेटवली आणि चेहर्‍याजवळ नेली. एक साठीची खंगलेली म्हातारी कण्हत होती. त्याला थोडं हायसं वाटलं, पण तिचा उष्ण श्वास त्याच्या हातावर पडला आणि तिला भरलेल्या तापाची त्याला जाणीव झाली. त्यानं तिच्या कपाळाला हात लावला आणि त्याची खात्री पटली. तिच्याकडून काही धोका नाही हे त्याच्या लक्षात आलं.
तो चटकन उठला आणि पुढची काडी पेटवून स्वयंपाकघरात पोचला. अशा भागामध्ये कंदिल लावून लक्ष वेधून घेऊ नये हे त्याला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळेच तो समोर पडलेला कंदिल सोडून मेणबत्त्या शोधत होता. त्याला लगेच त्या मिळाल्यादेखील. चटकन एक मेणबत्ती त्यानं लावली आणि आता त्याच्या जीवात जीव आला.
स्वयंपाकघरात बरंच खाण्याचं सामान होतं. 'सगळा गाव पळाला' आणि ही काहीच उत्तर देत नसल्यानं ही गचकल्याचं समजून लोक असेच निघून गेले असतील.' तो मनाशी विचार करतच पातेल्यात तांदूळ घालून चुलीवर चढवत होता. आणि हळूच चुलीची ऊब घेत होता. घालायला कोरडे कपडे मिळाले तर हा युनिफॉर्म फेकता येईल असा विचार करत तो दुसरी मेणबत्ती पेटवून घेऊन बाहेर आला. इथे तिथे नजर फिरवत असतानाच त्याच्या कानांवर क्षीण आवाजातले शब्द पडले, "बेटा!"
अचानकच त्याची गात्रं गोठली. हा शब्द त्यानं आज कित्येक दिवसांनी ऐकला होता. त्यानं म्हातारीकडे बघितलं आणि तिच्याजवळ गेला. तिचे डोळे अजून मिटलेलेच होते. ती तापातच बरळत होती बहुतेक. "बेटा!" ती पुन्हा म्हणाली. त्याला आत्ता अचानकच १० वर्षांपूर्वीचा त्याच्या आईचा अंतिम संस्कार आठवला. तिथे तो पोलिसांसोबतच गेला होता. त्याला स्पेशल परवानगी (पॅरोल) मिळाली होती आईच्या अंत्यसंस्कारासाठी. आईचा तिर्डीवर ठेवलेला निश्चेष्ट वाळलेला देह त्याच्या डोळ्यासमोर तरळला. नक्षलवादी कॅम्पात भरती व्हायला जेव्हा तो निघाला होता, तेव्हा आपल्या मोडक्या घराच्या दरवाजात उभी राहून त्याला जिवाच्या आकांतानं "बेटा!" म्हणून हाका मारून थांबवायचा प्रयत्न करणारी आई त्याला आज का आठवली हेच त्याला कळेना! तेच तिचं झालेलं शेवटचं जिवंत दर्शन होतं. त्यानंतर गरीबीनं आणि पोलिसांच्या अत्याचारांनी पिचून तिनं दोन वर्षांत प्राण सोडला. तेव्हा तिचं जगात जर कुणी होतं, तर बाप पोलिस-नक्षली चकमकीत मेल्यानंतर तोच होता. आणि तोच तिच्या अंतिम क्षणी तिच्यासोबत नव्हता. त्यानंतर जेव्हा तो तिर्डीवर पडलेला निश्चेष्ट देह त्यानं पाहिला होता, तेव्हा तो लहान मुलासारखा हमसून हमसून शेवटचाच रडला होता. मग आज आत्ता ते सगळं त्याला का आठवत होतं?
त्या म्हातारीनं हलकेच डोळे उघडले.
"बेटा!"
तो दचकून भानावर आला.
"कौन हो बेटा?" ती खरंतर दचकायला हवी होती, पण तिची स्थिती वेगळीच होती.
".." त्याला काही सुचतच नव्हतं.
"कौन हो बेटा?" तिनं पुन्हा विचारलं.
"एकसो छब्बीस!" त्याच्या तोंडून त्याचा कैदी नंबर निघाला.
"क्या?" तिला त्या अवस्थेतही आश्चर्य वाटलं.
त्यालाही आपल्या उत्तराचं आश्चर्य वाटलं.
"तुम्हारा नाम क्या है?"
क्षणभर तो विचारात पडला. आपलं नाव? "हां भैरू!" त्याला हेच आश्चर्य वाटत होतं की तो आपलं नाव चक्क विसरला होता. जेलमध्ये तो फक्त "एकसो छब्बीस" होता. गेली १२ वर्षं तो फक्त एव्हढंच होता. हीच त्याची सर्वत्र ओळख होती. एका कालावधीनंतर त्यानंही आपलं नाव सांगणं सोडलं होतं, कारण विचारणारे लोकच कुठे होते. जेलमध्ये असलेल्या नक्षलवाद्याला कोण त्याचं नाव विचारायला येणार? आज त्याला कित्येक वर्षांनी कुणीतरी नाव विचारलं होतं आणि एकदम कोपर्‍यात अडगळीत पडलेली एखादी फाईल शोधावी तद्वत त्यानं आपलं नाव मेंदूच्या कोपर्‍यातून शोधून काढलं.
"भेरू? यहां के नहीं लगते!"
"भै.." तो तिला योग्य उच्चार समजावता समजावता थांबला. तिनं बरोबर ओळखलं होतं. तो तिथला नव्हता. महाराष्ट्रात भर्ती झालेला आणि छत्तीसगढ मध्ये लढायला आलेला नक्षली होता. १२ वर्षांपूर्वीच तो पकडला जाऊन जेलमध्ये सडत होता. ह्या जेलमधून त्या जेलमध्ये त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव हलवलं जात असताना, त्यांच्या ताफ्यावर त्यांना सोडवण्यासाठी नक्षली हल्ला झाला आणि क्रॉसफायरमध्ये तो पळाला होता. एका नक्षल्यानं त्याला नेपाळमधल्या माणसाचा संदर्भ दिला होता आणि मार्ग सांगितला होता. त्याच दिशेनं तो निघाला होता.
अचानक त्याच्या लक्षात आलं की त्याला पहाटेच्या आत पुढे पोचायचंय. तो लगेच भाताकडे बघायला उठला आणि एकदम म्हातारीनं आपल्या क्षीण हातानं त्याला स्पर्श केला. तो अचानक अपराधी जाणीव होऊन खाली बसला. मेणबत्ती तिच्या डोक्याशेजारी ठेवून तिला निरखून पाहू लागला. तिच्या डोळ्यातले करूण भाव पाहून त्याला आतल्या आत काहीतरी होऊ लागलं. तो चटकन उठून स्वयंपाकघरात गेला. भात छान शिजला होता. त्यानं भाताची पेज एका भांड्यात काढली आणि बाहेर येऊन म्हातारीला चमच्यानं पाजू लागला. त्याला एकदमच अपार समाधान वाटू लागलं. असं वाटू लागलं की ही धावपळ इथेच थांबावी. म्हातारीच्या डोळ्यांत आलेली थोडीशी चमक आणि कृतज्ञ भाव पाहून त्याला थोडंसं आंतरिक स्वास्थ्य लाभल्यासारखं वाटलं. त्याला कळत नव्हतं असं का वाटतंय. पण कदाचित आईसाठीची कर्तव्य पूर्ण न करू शकल्याचा एक अज्ञात सल जो त्याच्या मनात होता तो कमी होत होता. पेज खाऊन झाल्यावर त्यानं म्हातारीला पेलाभर पाणी पाजलं आणि चादर नीट करून तिला परत निजवलं. तिनं मायेनं त्याचा हात थोपटला.
"भेरू! बेटा!" ती हळूच म्हणाली. त्यानं फक्त एक स्मित केलं.
तिला झोप लागेस्तोवर तो तिथेच बसून राहिला. त्याला भूक राहिली नव्हती. तो एकटक मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात दिसणार्‍या म्हातारीच्या तृप्त चेहर्‍याकडे पाहत होता.
-------------------------

पाऊस पूर्ण थांबला होता. लख्ख प्रकाश पडला होता. पोलिसांच्या गाड्या गावात घुसल्याचे आवाज येऊ लागले होते. एकदमच खिडकीतून आत उडी टाकून एक हवालदार आला आणि खाटेशेजारी बसलेल्या त्याच्यावर बंदूक ताणून उभा राहिला.
"साहब!" तो जोरात बाहेरच्या दिशेस आवाज देत ओरडला.
त्याच्या मागोमाग दोघे तिघे आत आले आणि मग त्यांनी दरवाजा उघडल्यावर अजून तिघे-चौघे!
तो तसाच आपल्या कैद्याच्या पोशाखात एकटक म्हातारीकडे पाहत होता. म्हातारीच्या तृप्त चेहर्‍यावर एक छोटंसं स्मित होतं. मेणबत्ती केव्हाच विझून गेली होती. त्याच्या डोळ्यांखाली दोन सुकलेले ओघळ होते.
"कैदी नंबर एकसो छब्बीस!" त्यांच्यातला इन्स्पेक्टर म्हणाला. "अच्छा हुआ, शांतीसे पकडे गये, वरना एनकाऊंटर के ऑर्डर्स थे! चलो उठो!"
तो अजूनी तंद्री लागल्यागत बसला होता.
"एकसो छब्बीस!" इन्स्पेक्टर जोरात म्हणाला.
त्याची तंद्री मोडली. त्यानं इन्स्पेक्टरकडे पाहिलं आणि त्याच्या तोंडून शब्द फुटले, "भेरू!"
"क्या?" इन्स्पेक्टर चक्रावला.
"कुछ नहीं!" म्हणत तो उठला.
शेजारीच पेजेचं रिकामं भांडं आणि पाण्याचा रिकामा पेला पडला होता.
इन्स्पेक्टर वायरलेसवर मेसेज देत होता, "कल भागे हुएमेंसे अकेला ज़िंदा कैदी - एकसो छब्बीस पकड़ा गया है। ओव्हर।" आणि हवालदारांच्या गराड्यात बसलेला तो आपली एका रात्रीपुरती बदललेली ओळख पुन्हा पुसून टाकायचा प्रयत्न करत होता.

(समाप्त)

9/26/2010

सांप्रतच्या हिंदी सिनेमातील चतुर्महाभूते आणि 'दबंग'

हिंदी सिनेमाचे - म्हणजे खराखुरा इथल्या मातीतला - प्रामुख्याने चार भाग पडतात.

१.राजा हरिश्चंद्र ते मुग़ल-ए-आज़म
२.मुग़ल-ए-आजम ते शोले
३.शोले ते गुंडा
४.गुंडा च्या पुढचे

वरील वर्गीकरण हे माझं स्वतःच्या निरीक्षणाचं अपत्य आहे. अनेकांना ह्यावर अनेक साक्षेपी आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं म्हणजे सुरूवातीला प्री-गुंडा आणि पोस्ट-गुंडा असे दोनच वर्ग मी करणार होतो. पण मग स्युडो-इंटलेक्च्युअल्स अर्थात दांभिक बुद्धिवाद्यांनी माझ्या प्रस्तुत लेखाकडे वाचनापूर्वीच पाठ फिरवली असती. मला आलमआरासुद्धा टाकायचा होता पण मग अति झालं असतं. म्हणून मग मांडवलीमध्ये मी चार कालखंड केले. नीट बघितलं तर प्री-गुंडा आणि पोस्ट गुंडा हे वर्ग योग्य ठरतात, पण ते सिनेमाच्या एकंदर जडणघडणीच्या दृष्टीने. आज मला सिनेमाच्या अंगभूत घटकांबद्दल ऊहापोह करायचाय, त्यामुळे वरील वर्गीकरण त्यादृष्टीने करण्यात आलेलं आहे.
रंगांबद्दल कदाचित ठाऊक असेल. लाल, पिवळा आणि निळा हे एका थिअरीनुसार तीन मूळ रंग आहेत. बाकी सगळे रंग ह्या तीन आणि ह्या तिघांपासून बनलेल्या रंगांची वेगवेगळी संगती मिसळून बनवता येतात. तर ह्या वैज्ञानिक सिद्धांताशीच मिळतंजुळतं एक स्फोटक विधान मी करणार आहे.

"आजच्या तारखेला बनणारा कुठलाही हिंदी सिनेमा 'राजा हरिश्चंद्र', 'मुग़ल-ए-आज़म', 'शोले' आणि 'गुंडा' ह्या चार मूळ आणि ह्या चौघांपासून बनलेल्या सिनेमांची वेगवेगळी संगती मिसळून बनवला जातो."

संपलं विधान! आता स्पष्टीकरण.
राजा हरिश्चंद्र हे भारतीयत्वाचं आद्य प्रतीक आहे. भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कारांचं सर्वोच्च उदाहरण. चित्रमहर्षी दादासाहेब फाळक्यांनी बनवलेली ही कलाकृती म्हणजे पहिला सिनेमा म्हणजे एका अर्थी भारतीय सिनेमाचा गोत्रपुरूष. तत्कालीन भारतीय मानसिकतेची नस अचूक पकडून त्यांनी जशी चित्रनिर्मिती केली त्याला तोड नाही. आणि तत्कालीन भारतीय मानसिकता आजही मुळाशी तशीच आहे. त्यामुळे हा एक मूलभूत घटक अर्थात महाभूत मानला गेलाय.
मुग़ल-ए-आज़म हा प्रेमकथात्मक भारतीय सिनेमामधला मैलाचा दगड आहे. पराकोटीचं प्रेम आणि पराकोटीची कर्तव्यबद्धता त्यावर पराकोटीचा खर्च असं एक वेगळंच रसायन म्हणजे मुग़ल-ए-आज़म. 'लार्जर दॅन लाईफ' असा गरीब मुलगी व श्रीमंत मुलाचा रोमान्स आणि त्या रोमान्सपायी पार शहेनशाहशी बगावत हे सगळे मसाले तत्कालीन भारतीय सिनेमाला एका वेगळ्या वाटेवर नेण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे हादेखील एक महाभूत मानला गेलाय.
शोले बद्दल मी खरंतर बोलण्याचीच गरज नाही. मुळात शोले हा काही परकीय सिनेमांवरून प्रेरित असल्याचं जरी म्हटलं गेलं असलं आणि प्रथमदर्शनी ते खरंही वाटत असलं, तरी शोलेमध्ये (असलीच तर) मूळ कलाकृतीचं जे काही भारतीयीकरण केलं गेलंय, त्याला तोड नाही. शोलेतला एक एक संवाद आणि एक एक सीन आजही भारतीय मानसामध्ये बसलाय आणि त्यामुळेच त्याच्याशी जवळिक करणारं काहीही उचलून धरलं जातं. शोलेनं भारतीय सिनेमाला अजून एक वेगळी वाट दाखवली आणि ती खूप बहुपेडी होती. म्हणूनच शोलेदेखील एक महाभूत मानला गेलाय.
आता चौथं महाभूत 'गुंडा'. होय. गुंडानं भारतीय सिनेमाला अजून एका नव्याच वाटेवर नेलं. तत्कालीन भारतीय सामाजिक स्थिती आणि स्थित्यंतरं तसंच ह्या स्थित्यंतरामुळे थोडीफार गोंधळलेली सामाजिक मानसिकता ह्यांवर परखड भाष्य करत प्रसंगी अतिशय खालच्या पातळीवर जात लिहिलेले मनोरंजनही करणारे संवाद आणि अत्यंत 'ऍब्स्ट्रॅक्ट' एडिटिंग तसेच कमी निर्मितीमूल्यामध्ये फारच थेट पद्धतीचं आणि नायकाचं मसीहा प्रमाणे केलं गेलेलं चित्रिकरण अशा वेगळ्याच वाटेवरून गुंडाचा प्रवास होतो. ही वाट पूर्वीही अनेक सिनेमांनी चोखाळली होती पण 'गुंडा'चं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व दोन गोष्टींमुळे अधोरेखित होतं. एक म्हणजे 'गुंडा' ही 'त्या' विशिष्ट वाटेवरची निर्विवाद सर्वोच्च कलाकृती आहे. आणि दोन म्हणजे, 'त्या' वाटेला गुंडाने प्रदर्शनाच्या अनेक वर्षांनंतर राजमान्यता मिळवून दिली. ती दुय्यम म्हणून अभिजनांकडून नाकं मुरडली गेलेली वाट 'मुख्य प्रवाहा'त आणण्याचं श्रेय फक्त आणि फक्त गुंडाला जातं. त्यामुळेच गुंडाला चौथं किंवा चतुर्थ महाभूत म्हणून मी मानलंय.
तर ही झाली भारतीय सिनेमाची 'चतुर्महाभूते'. आजच्या भारतीय सिनेमाला उलटं पालटं करून कसंही पहा, ह्या चौघांपासूनच तो बनलेला असल्याचं तुमच्या लक्षात येईल. कुठलंही उदाहरण घ्या. अगदी 'हम आपके है कौन?' पासून सुरूवात करूया. 'राजा हरिश्चंद्र' ह्या कलाकृतीचं स्पष्ट प्रतिबिंब पडलेलं तुम्हाला दिसेल. त्यातला तळ्याकाठचा रोमान्स वगैरे पाहता 'मुग़ल-ए-आज़म' ही थोडाफार डोकावतो. बाकी कालानुरूप आलेली चकचकाटी निर्मितीमूल्य वगैरे वर्खं आहेत. अस्सल माल हा उपरोल्लेखित दोन महाभूतांपासूनच बनलेला आहे. (टीप - 'हम आपके हैं कौन?' बनेपर्यंत 'गुंडा' प्रदर्शित झाला नव्हता, नाहीतर 'गुंडा' चे निशान देखील दिसले असते.)
शोले ह्या महाभूतापासून बनलेले शेकड्याने सिनेमे असतील, त्यातले कित्येक तर सुपरहिटही ठरले, पण त्यातलं घटक महाभूत तर दिसतच. त्याचबरोबर 'आयटम सॉन्ग' ही देखील शोलेनं भारतीय सिनेमाला दिलेली (माझ्या मते) देणगी आहे. 'मेहबूबा मेहबूबा' ह्या गाण्याच्या अभूतपूर्व यशाने कित्येक सिनेमांमध्ये व्हिलनच्या कॅम्पातलं आयटम सॉन्ग घातलं गेलं असेल ह्याला गणतीच नाही. आणि हल्ली तर कुठेही आयटम सॉन्ग घालता येतं.
यश चोप्रा आणि करण जोहर ह्या द्वयीनं मात्र 'मुग़ल-ए-आज़म' च्या गायीचंच दूध काढायचं ठरवलं. त्यांच्या सर्व कलाकृती 'श्रीमंत बापाचा प्रेम सोडून आयुष्यात कसलीही विवंचना नसलेला मुलगा, प्रेमभंग किंवा प्रेम ह्या दुःखांपलीकडे काहीच दुःख नसलेलं एक जग ज्यामध्ये सगळेजण प्रचंड श्रीमंत असतात, प्रत्येकाला नातेवाईक असतात, नात्यांची जाम काळजी असते, महालांमध्ये राहतात आणि सारखे रडतात' ह्या तत्वांपासून बनतात. त्यामुळे त्यांचे बहुतांश सिनेमे हे 'मुग़ल-ए-आज़म' ह्या महाभूतापासून बनल्याचं स्पष्ट होतं. बाकी, राजा हरिश्चंद्र चं प्रतिबिंबही कुटुंबाच्या एकमेकांशी चाललेल्या वागणुकीवरून स्पष्ट दिसतं. शोले आणि गुंडा मात्र अभावानेच त्यांच्या सिनेमांमध्ये दिसून येतात. कारण ही दोन महाभूतं सर्वाधिक अवघड अशी आहेत.
पण पोस्ट गुंडा इरामध्ये मात्र सुरूवातीच्या कालावधीमध्ये बाकी तीन महाभूतांनीच धुमाकूळ माजवला होता. मी आधीच सांगितल्याप्रमाणे 'गुंडा' ची वाट ही अभिजनांनी नाकं मुरडलेली वाट होती. पण म्हणतात ना, खरं सोनं काळाच्या कसोटीवर नेहमीच जिंकतं. तद्वतच पूर्णपणे दाबून टाकलेलं असून देखील गुंडानं व्हिसीडी आणि इंटरनेटच्या मार्फत जनमनामध्ये चंचुप्रवेश केला. हळूहळू गुंडाबद्दलची जागृती एव्हढी झाली की लोकांना सिनेमात काही ठिकाणी सूचकपणे पेरलेले गुंडाचे रेफरन्स कळू लागले. मग गुंडाची वाट आधीच लोकमान्य झालेली असल्याने अल्पावधीतच राजमान्य झाली आणि त्याला 'सिनेमा ऑफ योअर' असं गोंडस नाव देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची मखलाशी केली गेली. पण आमच्यासारख्या हाडाच्या सिनेरसिकांना 'सिनेमा ऑफ योअर' म्हणजेच गुंडा हे लगेच लक्षात येतं.
पोस्ट गुंडा इरामध्ये 'गुंडा' ची काही वैशिष्ट्य पेरलेले अनेक सुपरहिट सिनेमे आले. जसं चित्रविचित्र वेशभूषा केलेले विनोदी खलनायक, मसीहा आणि पराकोटीचा अन्यायग्रस्त नायक संपूर्ण खलनायकी टोळीला एकहाती नेस्तनाबूत करणारा नायक, यमकामध्ये किंवा कवितांमध्ये किंवा वनलायनर्स मध्ये बोलणारा खलनायक, नायकाने खलनायकाच्या मृत्यूची तारीख (मौत की डेट) फिक्स करणे ही सगळी गुंडाचीच वैशिष्ट्य आहेत आणि ही वैशिष्ट्य लेवून अनेक सुपरहिट सिनेमे आले पण नजीकच्या काळात आऊट ऍन्ड आऊट गुंडा ज्यॉनरवाल्या सिनेमांची लाट आली. उदा. 'गज़नी', 'वॉन्टेड' आणि 'दबंग'.
चतुर्महाभूतांवर मला प्रत्येकी एक पोस्ट ह्या पद्धतीने विस्तृत चर्चा करावी लागेल, त्यामुळे चतुर्महाभूतांबद्दल तूर्तास इतकंच. पुढच्या लेखासाठी पुरेशी पूर्वतयारी झालेली आहे.

तर काल मी दबंग पाहिल्यामुळे आज आपण दबंगची चिरफाड करू. सर्वप्रथम - मला 'दबंग' प्रचंड प्रचंड आवडला. होय, 'वॉन्टेड' नंतर कित्येक दिवसांनी मूलतः 'गुंडा' वर आधारलेला चित्रपट पाहिल्याने असेल, पण जाम जाम मजा आली. मला कशी कुणास ठाऊक पण प्रचंड लवचिकपणे सिनेमा पाहण्याची हातोटी जन्मजात मिळालीय. त्यामुळे मी चित्रपटाच्या ज्यॉनरनुसार आपोआपच चष्मा बदलून सिनेमा पाहतो, त्यामुळे 'डेकालॉग' असो वा 'चांदनी चौक टू चायना' (होय मी हादेखील एन्जॉय केला होता) मला कंटाळा वगैरे प्रकार सहसा येत नाही. आणि 'दबंग' तर प्रत्यक्ष धर्मचित्रपटाशी साधर्म्य सांगतोय अशी हवा असल्याने मी चित्रपट सुरू व्हायच्या आधीच योग्य चष्मा लावून तयार होतो.
पण मजा इथेही झालीच. जेव्हा एखादा सिनेमा मला एकाच वेळी एकाहून जास्त चष्मे लावायला मजबूर करतो, तेव्हा मला तो सिनेमा जास्त आवडतो. 'दबंग'चं तसंच आहे. तो 'गुंडा' प्रमाणेच विसंगत आविर्भाव आणून अनेक ठिकाणी व्यवस्थेला शालजोडीतले लगावत पुढे सरकतो. 'सरकारतर्फे जखमी पोलिसांना ५०००० आणि मेलेल्यांना १ लाख' हा प्रसंग असू दे किंवा 'मोटे वाले उस तरफ, पतले वाले इस तरफ और फिट वाले मेरे पीछे' म्हणून मागे वळून जेव्हा नायक पाहतो, तेव्हा मागे कुणीच नसल्याचं पाहून तो म्हणतो 'क्या हो गया है पुलिस फोर्स को!' किंवा 'वो डकैत हमारे फंडरेजर थे और उन्होने रेज किया हुआ फंड आप ले गये' हा प्रसंग असू दे. त्यानंतर पोलिओ झालेल्या माणसाला 'बचपन में दो बूंद नहीं पिलायी क्या?' अशा संदेशपर प्रसंगात 'बाप को शराब पीनेसे फुरसत नहीं मिली' असं सणसणीत आणि विचित्रपणे दाहक ब्लॅक कॉमेडी स्टाईल उत्तर अशा विविध छोट्या छोट्या वरवर विसंगत वाटणार्‍या पण साथीनेच प्रचंड मनोरंजन करणार्‍या प्रसंगांतून दबंग पुढे सरकतो.
'वॉन्टेड' प्रमाणेच तोंडात बसतील असे डायलॉग्ज हे 'गुंडा' वरून घेतलेलं वैशिष्ट्य.
"१०१ कमिनों की बलि चढाई थी हमारे मां-बाप ने तब जाके हम पैदा हुए थे।" मुख्य खलनायक.
"हम उन्ही १०१ कमिनों के भगवान हैं, बदला लेने के लिये आये हैं।" नायक.

"जंगल में रहके सेर से बैर! देखो भैया हम आदमी थोडे जटिल किस्म के हैं।" मुख्य खलनायक.
"जंगल में शेर कम और शिकारी ज्यादा हो गये हैं, ज्यादा ज़ोर से दहाडना नहीं, वरना चमडी भी उधड सकती है!" नायक.

असले एक से एक गुंडा स्टाईल डायलॉग्ज. त्यात मुख्य खलपात्राचं नाव 'छेदी सिंग' हे 'गुंडा'तल्या मुख्य खलपात्राच्या नावावरूनच प्रेरित झाल्यागत वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे 'गुंडा' प्रमाणेच मुख्य खलपात्र इथेही नायकाच्या जवळपास संपूर्ण कुटुंबाच्या विविध प्रकारे छळाला कारणीभूत होतो. 'गुंडा'त नायकाच्या बहिणीचा वापर होतो, इथे भावाचा. 'लंबा करणे' हा वाक्प्रचार, जो की गुंडामुळे प्रसिद्ध झाला, त्याचाही कौशल्यपूर्वक कथानकामध्ये वापर करण्यात आलाय. एकट्याच धावणार्‍या नायकावर काटकोनात होत असलेला गोळीबार लगेच 'गुंडा'तला सीन डोळ्यापुढे आणतो. शेवटाकडे जेव्हा नायक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घेऊन खलनायकाकडे पोचतो, तेव्हा गुंडातल्या ऍबॅसेडर्सचा आणि शेवटाकडला रिक्षाचा सीन तडक डोळ्यासमोर येतो. आणि गुंडाप्रमाणेच एव्हढं सगळं असूनही शेवटी खलनायकाबरोबर नायक वन ऑन वन फाईट करतो. पण खलनायकाचा शेवट मात्र वेगळा घेतलाय. तो मात्र 'गुंडा' तल्याच खलपात्राच्या भावाच्या खुनाप्रमाणे 'काव्यात्म न्याय' दर्शवणारा आहे.
बाकी, सलमानच्या पात्राची बिनधास्त दबंगाई आणि काय वाटेल ते करण्याची स्टाईल खरंच प्रभुजी मिथुनदांची आठवण करून देते. सलमाननं 'चुलबुल पांडे' पेललायही जबरा. एकीकडे तो दिसेल त्या खलपात्राला आणि मधे तर भावालासुद्धा हवा तसा फिरवून उडवून ठोकतो. कुठूनही कुठेही उड्या मारतो, गोळ्या घालतो. आणि त्याचबरोबर त्याचं भावाला ठोकताना गॉगलमागचं डोळे पुसणं, आई दगावल्याचं लक्षात आल्यावर दबंगाईच्या बुरख्यामुळे नीट रडताही न येणं आणि बापासमोर आपल्या दबंगाईचं खरं स्वरूप सांगताना हलकेच डोळ्यातून पाणी काढणं अशा प्रसंगांमुळे सिनेमाला बॅलन्स मिळतो. काही ऍक्शन सिक्वेन्सेस, 'मुन्नी बदनाम हुई' हे व्हिलनच्या कॅम्पातलं आयटम सॉन्ग, प्रेमामुळे बदलणारा नायक आणि यूपीचा बॅकड्रॉप हे 'शोले' ह्या महाभूतावरून घेतलेले प्रकार आहेत. स्वप्नवत रोमान्स, गरीब मुलगी हे 'मुग़ल-ए-आजम' वरून तर कुटुंब आणि नीतीमूल्य हे प्रकार 'राजा हरिश्चंद्र'वरून. एकंदरच 'दबंग' हे योग्य मिश्रण आहे.
त्यातही दिग्दर्शक अभिनवसिंग कश्यप (मी ऐकल्याप्रमाणे हा 'अनुराग कश्यप' चा धाकटा भाऊ आहे) काही ठिकाणी आपल्यावरचा टॅरँटिनोचा प्रभाव दाखवतो. वेगवेगळ्या ठिकाणी मारामारी करताना मधेच सलमानच्याच लोकप्रिय गाण्यांचे रिंगटोन्स व्हिलनच्या मोबाईलवर वाजू लागतात (इथे एक चूक आहे, सलमान ह्याला 'कॉलरट्यून' म्हणतो, जे माझ्या मते चूक आहे) आणि सलमान नाचता नाचता मारामारी सुरू करतो. पुन्हा लग्नाच्या वेळी बँडवाले 'अनुराग कश्यप'च्या सिनेमातलं गाणं वाजवतात. सिनेमाभर सलमान असताना 'काऊबॉय' सिनेमांच्या पद्धतीचं पार्श्वसंगीत वाजतं. सलमान स्वतःला रॉबिन हूड म्हणतो. अशा प्रकारे टॅरँटिनो स्टाईल इन-रेफरन्सिंग बरोबरच, सलमानची भ्रष्ट पोलिसांची टोळी आणि सलमान आपापसात जसं बोलतात (म्हणजे गंभीर विषयांवर एकदम कॅज्युअली), ते थोडंफार टॅरँटिनोच्या 'पल्प फिक्शन' वरून प्रेरित वाटतं. असो कदाचित मी अति सूक्ष्म निरीक्षणात शिरतोय.
अर्थात दबंगमध्येही अनेक सुटलेल्या जागा आहेत. पण सिनेमाचं विचित्र ज्यॉनर अशा गोष्टींना माफ करतं. अप्रतिम काम करणारा खलनायक सोनू सूद आणि सुंदर दिसणारी(थोडाफार अभिनय देखील करणारी) नायिका सोनाक्षी सिन्हा हे सिनेमाचे उर्वरित चांगले भाग. बाकी सिनेमात फक्त आणि फक्त सलमान आहे. 'गुंडा' प्रमाणेच नायकाचे नातेवाईक (विनोद खन्ना, डिंपल कपाडिया आणि अरबाज़ खान) हे फक्त खलनायकाशी वैयक्तिक शत्रुत्व निर्माण करण्यासाठीच सिनेमात आहेत.
एकंदर जवळपास ६०% गुंडा एलिमेन्ट असणारा 'दबंग' एकदातरी प्रत्येक सामान्य सिनेरसिकाने आणि 'गुंडा'ने भारतीय सिनेमा आणि सिनेरसिकांच्या आवडीनिवडींवर केलेले दूरगामी परिणाम पाहण्यासाठी सिनेअभ्यासकांनी पहायलाच हवा.
माझ्या मते ज्याप्रमाणे दारूच्या बाटलीवर ज्या पद्धतीनं किती टक्के अल्कोहोल आहे हे लिहिलेलं असतं, त्यापद्धतीनं प्रत्येक सिनेमाच्या पोस्टरवर किती टक्के 'गुंडा' आहे ते लिहायला हवं. जेणेकरून प्रेक्षकांना 'चष्मा' लावायला सोयीचं जाईल. आणि मी फक्त 'गुंडा' हे महाभूत एव्हढ्याचसाठी म्हणतोय कारण तेच सगळ्यांत 'स्ट्राँग' महाभूत आहे.

9/23/2010

बामनी कावा

कधी कधी काय होतं, मी असाच बसलेलो असतो. लॅपटॉपच्या पडद्याकडे एकटक बघत. समोर लिहिण्यासाठीची खिडकी उघडलेली. बाजूला घराची खिडकी उघडलेली. घराच्या खिडकीतून पलिकडच्या रस्त्यावरून जाणार्‍या तुरळक गाड्यांचा तुरळक आवाज येतोय. मधेच माझी बेचैन नजर टीव्हीच्या रिमोटकडे जातेय. 'नाही हां. आपल्याला लिहायचंय!' असं स्वतःलाच दटावून मी पुन्हा पडद्याकडे लक्ष केंद्रित करतोय. बोटं हलवून तयारीत ठेवलीयत, न जाणो कधी वीज पडेल. समोर ठेवलेल्या अर्धवट संपलेल्या कांदे-बटाट्याच्या थैल्यांकडे नजर जाते. मग अशीच भिरभिरत राहते. एक रिकामटेकडा जीव, विचार करून करून कसला आणि किती करणार?

मग माझ्या डोक्यात दुपारी माझं एका सहकार्‍याबरोबर झालेलं संभाषण येतं. तो आपला मला म्हणालेला असतो, "आज नको, उद्या ये सिनेमा घ्यायला! आज त्या दुसर्‍याकडे जेवायला जायचंय!" मला आत्ता हे संभाषण आठवल्यावर एकदम वाटायला लागतं, "एक सिनेमा द्यायला एव्हढी नाटकं. काहीतरी असणार, ज्यासाठी मला टाळतोय. काहीतरी पार्टी बिर्टी असेल घरी आणि मला बोलवायचं नसेल. नाहीतर मग त्याचा तो मित्र आहे ना, त्यानं ह्याला सांगितलं असेल मला द्यायचं नाही, परवा त्या मेलबाजीवरून त्याच्याबरोबर मचमच झाली होती ना, त्याचं उट्टं काढायला मित्राचा वापर करत असेल!"

ह्याला म्हणतात कॉन्स्पिरसी थिअरी. आज नेमकं हेरंबनेदेखील कॉन्स्पिरसी थिअरीबद्दलच लिहिलंय. बरेचदा रिकाम्या डोक्याचे प्रताप. पोस्ट लिहायचं कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं सोडून डोकं इथे जबरा वेगात पळतं. इतका वेळ सुस्तावलेला मेंदू इथे कसा चपळ होऊन जातो. आता आमच्यासारखी पामरंसुद्धा असले विचार करू शकतात, तर महान मेंदूंचे विचार किती उच्च दर्जाचे असतील.

हल्लीच एक जबरा थिअरी वाचनात आली. "औरंगजेबानं संभाजीराजांना मारण्याचा मुस्लिम धर्माशी काही संबंध नव्हता. औरंगजेबानं संभाजीराजांना मुस्लिम धर्म न स्वीकारल्याबद्दल मारलं असतं, तर शिरच्छेद केला असता. पण त्यानं संभाजीराजांना एका ब्राह्मण मंत्र्याच्या सांगण्यावरून मनुःस्मृतीच्या आधारावर हालहाल करून मारलं!"

हे वाचलं आणि मी थेट जागेवरून उठून स्वच्छतागृहात गेलो आणि पोटभर हसलो. बाहेर आल्यावरही माझं हसू आवरत नव्हतं. न जाणे मी किती वेळ आठवून आठवून हसत होतो. माझ्या डोळ्यासमोर रामाच्या देवळात सोवळं घालून मनुःस्मृती वाचणारा औरंगजेब(प्रभाकर पणशीकर) आला. तो म्हणे कुराणाच्या प्रती स्वतःच्या हाताने लिहून विकायचा. माझ्या डोक्यात लगेच कॉन्स्पिरसी थिअरी आली. 'कदाचित, तो मनुःस्मृतीचाच फारसी अनुवाद 'कुराण' म्हणून खपवत असेल.' एकदा कॉन्स्पिरसी थिअरी डोक्यात यायला लागल्या ना की धरबंद राहत नाही. 'ऍक्च्युअली औरंगजेबच ब्राह्मण असेल. तो कदाचित जानवंपण घालत असेल.' लहान असताना मुंडण झालेला, कानात भिकबाळी घातलेला औरंगजेब डोळ्यासमोर उभा राहिलासुद्धा माझ्या! औरंगजेब (प्रभाकरपंत पुन्हा) महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची बातमी ऐकून 'धिक् माम्' म्हणतोय. आणि द्वारपालाची सावली अंगावर पडली म्हणून 'शिव शिव' म्हणत स्नान करतोय, जेवणाच्या ताटाभोवती चित्रावत्या घालून 'वदनि कवळ घेता' म्हणतोय असं कैच्याकै माझ्या डोळ्यापुढे यायला लागलं.

संभाजीराजांबद्दलच्या उपरोल्लिखित वाक्यानं जो औरंगजेबाच्या ग्लोरिफिकेशनचा परिणाम साधलाय त्याला तोडच नाही, पण आमचा आपला औरंगजेबाला व्हिलन बनवायचा केविलवाणा प्रयत्न - 'पंडित औरंगजेबशास्त्री आगरकर!' झाला एकदाचा औरंगजेब व्हिलन. आता पुढे काय काय सुचतं बघू.

तर पंडित औरंगजेबशास्त्रींनी जेव्हा उत्तरेत राज्य केलं होतं, तेव्हा त्यांना चहाची चटक लागली. सारखे चहा प्यायचे. पण ते चहाला चहा नाही, 'कावा' म्हणायचे. उत्तरेत काही ठिकाणी चहाला अजूनी कावा म्हणतात. त्यामुळे काय झालं, की पं.औ.शास्त्रींचा 'कावा' त्यांच्यासारख्या बर्‍याच ब्राह्मण घरांमध्ये प्यायला जाऊ लागला. मग तर 'कावा' ही ब्राह्मण घरांची खासियत बनली. मग काय झालं, इतर कुणी बनवला, तर त्याला ती सर यायची नाही, असं लोकांच्या मनावर ब्राह्मणांनी बिंबवलं. त्यामुळे काय झालं, 'ब्राह्मणी कावा' एकदम फेमस झाला. जो तो 'ब्राह्मणी काव्या'चा उदोउदो करू लागला. मग सगळे ब्राह्मणांना 'कावेबाज' म्हणायला लागले. वर्षं उलटत गेली तसा 'बामनी कावा' असा अपभ्रंश झाला. (कदाचित 'बहामनी' नावाचे जे राजे होते, ते पण मुळात ब्राह्मणच असावे)

अशा प्रकारे, ब्राह्मणांनी कावा करून 'कावा' फेमस करून टाकला. मग अनेक वर्षांनी 'सुखविंदर सिंग' ह्या पंजाबी गायकानं (हादेखील प्रत्यक्षात ब्राह्मणच असणार) 'कावा कावा कावा' ह्या गाण्यातून कावा पुन्हा फेमस केला. आता संभाजी ब्रिगेड आणि कंपनीनं 'बामनी कावा' 'बामनी कावा' असा बवाल सुरू केलाय. मला तर डाऊट येतोय, की अनेक वर्षांनी पुन्हा 'बामनी काव्या'ला मुख्य प्रवाहात आणण्याचाच हा कावा आहे. हे संभाजी ब्रिगेडवालेच मुळात ब्राह्मण असावेत, त्यामुळे तेच 'बामनी काव्या'ची एव्हढी प्रसिद्धी करताहेत.

मला तर आता काळजी वाटतेय, की हे लोक 'बामनी कावा अमृततुल्य' नावाचं चहाचं दुकान काढतील आणि पुन्हा एकदा 'बामनी कावा' सफल होईल.

9/19/2010

बॉईज डोन्ट क्राय!

काल परवाच नदाल आणि फेडरर ह्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? ह्या निरर्थक चर्चेचं गुर्‍हाळ चालू असताना अचानक, फेडरर एकदा पाच सेटची फायनल हरल्यावर ढसाढसा रडला होता, आणि ते कसं चूक होतं, अखिलाडू होतं ह्यावर चर्चा सुरू झाली. सर्वप्रथम मला हा मुद्दा बाद वाटला. कोर्टवर रडणं न रडणं हा चांगला किंवा वाईट खेळाडू किंवा चांगला किंवा वाईट माणूस असण्याचा क्रायटेरिया असू शकत नाही.

दुसरा मुद्दा हा की इतकी वर्षं कोर्टावर(टेनिसच्या) घालवल्यानंतर फेडररमध्ये एव्हढी खंबीरता आणि खिलाडूवृत्ती यायला हवी होती की त्यानं मोठ्या मनाने नदालला त्याच्या विजयाचा आनंद लुटू द्यायला हवा होता. २८ वर्षांच्या १३ ग्रँडस्लॅम जिंकलेल्या फेडररला २२ वर्षांचा ३-४ स्पर्धा जिंकलेला नदाल सांत्वन देत होता आणि पुन्हा, "विजयावर त्याचाही हक्क होताच ना!", इतकं प्रगल्भ विधानही करत होता.

ओके. आता मी काही बोलू ह्यावर? एखाद्याची मरमर मेहनत वाया गेल्यावर त्याने रडूही नये काय? त्याच्या रडण्याचा आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या आनंद साजरा करण्याचा काय संबंध? तो न रडून काय मोठेपणा दाखवणार होता? तो २८ वर्षांचा होता, ही त्याची चूक होती का? मनाची खंबीरता आणि रडणं ह्यात काही थेट संबंध आहे का? एखादे क्षणी फुटतो बांध माणसाचा, त्यात लगेच इतक्या वर्षांचा अनुभव, खंबीरपणा ही लेबलं कशाला लावायची? नदाल हा खंबीर आहे आणि वयाच्या मानाने प्रगल्भही, म्हणून लगेच फेडररला दोष देऊन मोकळं व्हायचं? नदालने फेडररची सांत्वना केली, म्हणून लगेच फेडरर खुजा झाला? पाच सेट्सची मॅच तो ही खेळला होताच ना? शेवटच्या क्षणापर्यंत तो ही लढला होताच! हरला तो, त्याची १४ वी ग्रँडस्लॅम तीन महिने अजून दूर गेली! त्याला अपार दुःख झालं असेल. त्याचा स्वतःबद्दलचा विश्वासच उन्मळून पडला असेल. त्यानं रडूही नये? त्याचा स्वतःबद्दलचा विश्वास उन्मळून पडायचं नदाल फक्त एक कारण होता, लगेच, तो नदालबद्दल इन्सिक्युअर झालाय वगैरे ठरवून लोक मोकळे! त्यानंतर त्यानं आठपैकी फक्त दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या! फक्त दोन? बरं, मग लगेच, त्या दोन्ही मध्ये नदालशी तो खेळला नाही हे आर्ग्युमेंट. बरं.. फेडरर नदालबद्दल इन्सिक्युअर आहे, रडका आहे!(इथे मला 'सचिन संपला' स्टाईलचे लेख आठवतात) आय रेस्ट माय केस! बस फेडरर एकदा परत जिंकेस्तो! असो, विषयबदल होतोय.

हाच फेडरर वयाच्या २३ व्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा ग्रँडस्लॅम जिंकला, तेव्हा कोर्टवर ढसाढसा रडला होता! त्याचं संवेदनशीलता म्हणून कौतुक झालं होतं. तोच फेडरर १३ ग्रँडस्लॅम जिंकला, मोठा झाला, म्हणून रडका ठरला. का तर पहिल्यांदा तो जिंकल्यावर रडला आणि नंतर हरल्यावर! तो माणूस आहे, हेच कुणाला मान्य नाही. त्याचेच चाहते त्याला अखिलाडू ठरवून मोकळे झाले! अशाच एका ठिकाणची चर्चा वाचताना, एका माणसानं, एक मुद्दा मांडला. तो म्हणाला, हेच जर स्टेफी ग्राफ कोर्टवर हरल्यावर रडली असती, तर कुणाला वाईट वाटलं असतं? इथे फेडरर, एक पुरुष रडला, म्हणून लगेच सगळ्यांनी त्याला अखिलाडू ठरवलं. मी विचारात पडलो.

खरंच, कदाचित असंही असू शकतं. नुसती भारतीय नाही, तर ही जागतिक मानसिकता आहे. 'बॉईज डोन्ट क्राय!' पुरुषांनी रडायचं नाही. मागे एकदा महेंद्रकाकांनी एक पोस्ट लिहिली होती सारख्याच विषयावर. पुरुषाची संवेदनशीलता कधी विचारातही घेतली जात नाही. त्यालाही मन असतं, तो ही माणूस असतो. इथे स्त्रियांना चूक-बरोबर ठरवत नाहीये मी. मी फक्त एक सामाजिक समजूत मांडतोय.

क्लासिक केस म्हणजे 'राम'. 'मर्यादा पुरुषोत्तम राम'! आधुनिक काळात सगळ्या स्त्रीवाद्यांनी आणि विचारवंतांनी रामाला धारेवर धरलं. त्यानं धोब्याच्या सांगण्यावरून सीतेला त्यागलं. त्याच्या मर्यादा पुरूषोत्तम असण्यावरच प्रश्न उठले. पण कुणालाच त्याच्या बाजूनं एकदा विचार करावासा वाटला नाही. एकतर कट्टर आंधळे भक्त नाहीतर टीकाकार! राम ह्या पात्राचा कुणीच विचार केला नाही.

एक असा राजा ज्याच्यावर हजारो अपेक्षा होत्या. त्याच्यावर जगातला सर्वांत अवघड निर्णय लादला गेला. पत्नी किंवा राज्य! त्यानं राजाची कर्तव्य पूर्ण करणं इष्ट मानलं. कारण तो राजा आधी होता आणि पती नंतर. त्यानं यःकश्चित धोब्याच्या बोलण्यावरून पत्नीला त्यागलं, कारण त्याचा तिच्यावर संशय होता म्हणून नव्हे, तर तो चुकीचा का असेना, राजधर्म होता म्हणून. सीतेच्या माथी कलंक लागला, पण राम काय सुखी झाला का त्यामुळे? तो चुकला होता, पण तेच त्याचं प्रारब्ध होतं. सीता गेल्यावर त्यानं हजारो विनंत्या धुडकावल्या. तो सीतेशिवाय एकटाच राहिला. त्यानं दुसरं लग्न केलं नाही. त्याला शक्य नव्हतं का? त्यानं देखील तिच्याबरोबरीनंच वनवास केला, फक्त तो महालात राहून! आधी सीता रावणाच्या ताब्यात राहिली आणि महत्प्रयासाने तिला सोडवल्यावरही तिला त्यागणं रामाच्या नशीबी आलं. त्याच्या मनाला झालेले क्लेष कुणाला दिसले नाहीत. तो सामान्य माणूस असता, तर त्याचा निर्णय कदाचित वेगळा असता, पण तो राजा होता. हा फरक कुणी लक्षात घेत नाही. एक त्याच्या राजा असण्याने त्याच्यातल्या माणसाची, संवेदनशील पुरुषाची झालेली कुचंबणा कुणाला दिसत नाही. त्यानं महालातल्या एकांतात घालवलेले अश्रू कुणाला दिसत नाहीत. तो 'मर्यादा पुरूषोत्तम' होता. परिपूर्ण, अचूक नव्हता!

असो. मी कुठून कुठे भरकटत आलो. पण विचार आले की लिहून टाकावेत आणि लिहून झालं, की उगाच चेक न करता पोस्टून टाकावं!

9/16/2010

विरोधाभास

१९२० च्या आसपासचं दशक होतं. तुर्कस्तान पहिल्या महायुद्धात पराभूत झाला होता. तुर्कस्तानचा राजा म्हणजेच "खलिफा", ज्याला जगभरातले सगळे सुन्नी मुसलमान आपला नेता मानत, त्याची गणना पराभूतांमध्ये होत होती. तुर्कस्तानच्या सैन्याच्या सेनापतीनं म्हणजेच मुस्तफा केमाल पाशानं(पाशा म्हणजे जनरल) 'टर्किश नॅशनल मूव्हमेंट' सुरू केली. त्यानं स्वतंत्र तुर्कस्तानाची घोषणा केली. 'खलिफा'ची खिलाफत रद्द करून त्याला लोकशाही आणायची होती. पराभूत होत असलेल्या तुर्कस्तानात त्यानं आपल्या 'आझाद हिंद सरकार' पद्धतीनं एक सरकार स्थापन केलं आणि स्वतःच सैन्यप्रमुख बनून मित्र राष्ट्रांविरुद्ध लढा सुरू केला. मित्र राष्ट्रांनी मूळ तुर्की संसद बरखास्त केली आणि तेव्हाच केमाल पाशानं स्वतःची संसद सुरू करून वाटाघाटी सुरू केल्या. मग लुसॉनच्या करारानुसार 'रिपब्लिक ऑफ टर्की' ची स्थापना झाली.

त्यानं आधुनिक तुर्कस्तानचं स्वप्न बघितलं होतं. केमाल पाशानं सर्वप्रथम 'खलिफा' ला पदच्युत केलं. 'खिलाफत' रद्द केली. त्याकाळात तुर्कस्तानात अरबी संस्कृती मूळ धरत होती. धर्मसंस्थेची राज्यकारभारावर पकड होती. केमाल पाशाला नेमकं हेच खटकत होतं. तो स्वतः एक भाविक मुसलमान होता, पण त्याला राजकारण आणि धर्मकारण, न्यायव्यवस्था आणि धर्मव्यवस्था आणि शिक्षण आणि धर्मव्यवस्था ह्यांची सांगड खटकत होती. त्यानं सगळंच्या सगळं बदलून टाकायचा चंग बांधला. त्यानं सैन्यप्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि निवडणुका लढवल्या. घवघवीत यश मिळाल्यावर त्यानं सर्वप्रथम सगळ्या मदरशांच्या मान्यता रद्द केल्या. अरबी संस्कृतीचं उच्चाटन होण्यासाठी, तुर्की भाषेसाठी फोनेटिक लॅटिन लिपी दत्तक घेतली आणि जुनी अरेबिक लिपी रद्द करून टाकली. युरोपीय शिक्षणपद्धतीवर आधारित आधुनिक शिक्षणपद्धती आणण्याच्या दिशेनं संशोधन सुरू केलं. धर्मनिरपेक्ष राज्यघटना स्वीकारून त्यानं राजकारणातून धर्म दूर केला. आणि इथेच न थांबता, इस्लामिक लॉ ची मान्यता काढून इतर युरोपीय कायद्यांवर आधारित न्यायव्यवस्थेचा त्यानं स्वीकार केला. त्याला सर्व धार्मिक संस्थांकडून टोकाचा विरोध झाला. पण त्याचा स्वच्छ उद्देश आणि खंबीरपणा ह्यामुळे तो लोकांमध्ये टिकून राहिला. त्याला प्रेमानं 'अतातुर्क' म्हटलं जातं. अतातुर्क म्हणजे तुर्कांचा पिता.

थोडंच दूर आशियात, मो.क. गांधी नावाचा एक माणूस राष्ट्रीय चळवळीत मुसलमानांना सामील करण्यासाठी त्याच वेळी एक घातक चाल खेळला. त्यांनी 'खिलाफत' रद्द करण्याविरुद्ध भारतात चळवळ सुरू केली. तिकडे अतातुर्क सर्व मुसलमानांच्या भल्यासाठी 'खिलाफत' रद्द करत होता, तर इथे होणारा भारतीय 'राष्ट्रपिता' भारतातील मुसलमानांसकट सर्वांनाच दुहीकडे लोटणारी एक अर्थहीन 'खिलाफती'च्या रद्द होण्याविरोधात चळवळ उभारत होता.

अनेक वर्षं लोटली. अतातुर्क गेला आणि हळूहळू तुर्कस्तानात कट्टरता मूळ धरू लागली. अतातुर्कचा पक्ष सत्तेपासून दूर झाला आणि थोडा कट्टर पक्ष सत्तेत आला. त्यांनी हेडस्कार्फवरची बंदी उठवणे वगैरे प्रकार करून पाहिले, पण अतातुर्कचे संस्कार अजून बळकट होते. त्याच्या संस्कारात मुरलेलं सैन्य आणि न्यायव्यवस्था सरकारला पुरून उरत होते. अतातुर्क जात्याच सैन्यप्रमुख असल्यानं त्याच्या कारकीर्दीत सैन्याचे अधिकार जास्त होते आणि सैन्य त्याच्याच प्रभावाखाली राहिल्यानं कायम धर्मनिरपेक्ष राहिलं. अतातुर्कने आणलेली स्वतंत्र न्यायव्यवस्था काही बाबतींमध्ये राज्यव्यवस्थेपेक्षाही जास्त अधिकार राखून होती. आणि हे मुद्दे, आदर्श लोकशाहीच्या थोडे विरोधात जातात. नेमक्या ह्याच मुद्द्यांचा फायदा घेऊन, युरोपियन युनियनचा जयघोष करत कट्टर पक्षानं सरकारचे अधिकार वाढवणारी संविधानदुरूस्ती सार्वमतासाठी आणली आणि ती पासही झाली. आता, धर्मनिरपेक्ष सैन्याचे आणि न्यायव्यवस्थेचे पंख छाटले जाणार! त्यांच्या आधाराने असलेला अतातुर्कचा पक्षही थोडासा बॅकफूटवर गेलाय.

आणि धर्माच्या नावाने चळवळी उभ्या करून दुहीची बीजं रोवणार्‍या गांधींचा पक्ष मात्र भारतात अजूनही 'धर्मनिरपेक्ष' म्हणून टिमकी बडवत असतो.

पण विरोधाभास पहा. आज जो अतातुर्कच्या धर्मनिरपेक्ष पक्षाचा नेता आहे. त्याच्या बोलण्याच्या आणि दिसण्याच्या पद्धतीमुळे त्याला तुर्कस्तानचा "गांधी" म्हणतात.

---अतातुर्कच्या आत्म्याला किती वेदना होत असतील.

9/12/2010

विचित्र

'मुंबई मेरी जान' ह्या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे. आर. माधवन ट्रेन पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लाससमोर उभा असतो. आणि अचानक एक विविध इन्व्हेस्टमेंट्सची माहिती सांगणारा माणूस त्याला जबरदस्तीनं सेकंड क्लासच्या डब्यात घेऊन जातो. आणि त्याच ट्रेनमध्ये माधवनच्या नेहमीच्या फर्स्ट क्लासमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतो. माधवन बाल बाल बचावतो. तो एजंट ज्याला माधवन मनातल्या मनात शिव्या घालतच सेकंड क्लासमध्ये चढतो, तो प्रत्यक्षात देवदूतासारखाच असतो. ह्याउलट 'जॉनी गद्दार' मध्ये शेवटच्या दृश्यामध्ये काव्यात्म न्याय दाखवण्यात आलाय, ज्यामध्ये गैरसमजामधून योग्य माणसाचा खून होतो. एकदम विचित्र.

असेच अनेक अनुभव वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यानंतरही वाचण्यात आले होते. कुणी मेडिकल स्टोअर्स मध्ये जाण्यासाठी खाली उतरलं होतं. कुणी त्याच दिवशी ऑफिसात उशिरा आले होते, तर कुणी नेमके तो एकच दिवस काही कामानिमित्त वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये गेले होते आणि मृत्युमुखी पडले. २६/११ हल्ल्यानंतरही सारख्याच प्रकारचे अनुभव वाचले मी. मला अशा विचित्र घटना फार भुरळ पाडतात. मी बराच वेळ विचार करत बसतो.

नक्की काय घडतं अशा क्षणी. इतक्या माणसांची भविष्य एका घटनेवर जेव्हा अवलंबून असतात, तेव्हा नक्की खेळ कशाचा असतो. ज्याला नशीब म्हणतात तेच, की निव्वळ शक्यतेचं एक गणितीय सूत्र. २५ बाटल्या जमिनीवर घरंगळत सोडल्या आणि वरून एक दगड सोडला, तर किती बाटल्या फुटतील, एव्हढा सोपा हिशोब, की पाप-पुण्याचे तराजू तोलून झालेली दैवी निवड?

मग अशा वेळेस प्रश्न पडतो, की निरपराध लोक मरतात पण गुन्हेगार मात्र मजेत आयुष्य जगतात. इथे कुठला हिशोब आणि कुठले ठोकताळे लागतात? दाऊद इब्राहिम, ओसामा आणि बरेचसे राजकीय नेते बिनबोभाट मजेचं ऐषारामी आयुष्य जगताहेत आणि आपल्या जगण्याच्या मरण्याच्या किल्ल्याही त्यांच्याच हातात? पाप-पुण्याचा कुठल्या प्रकारचा मापदंड इथे वापरला जातो. की मग आपल्या अशा अनिश्चित जगण्यातच जगाची व्यवस्था आहे. जगाची रचनाच तशी झालीय. आपण मरणं, कुत्र्याच्या मौतीनं मरणं हेच आपलं प्रारब्ध आहे. पण मग आपण जी विविध जीवनध्येय घेऊन जगतो, त्याला काय अर्थ आहे. मला जर खूप मोठा सिनेदिग्दर्शक बनायचंय आणि मी फर्स्टक्लासच्या डब्यातल्या ब्लास्टमध्ये मेलो, तर काय उपयोग होता, त्या रात्रंदिवस जोपासलेल्या स्वप्नाचा आणि ढोरमेहनतीचा? की मग ते मी तितकंच करणं हेच जगाच्या व्यवस्थेचा भाग आहे? पण हा विचार फारच दैववादी होतोय.

आता ह्याच वाक्याचा दुसरा अर्थ कसा निघतो बघा. की मग ते मी तितकंच करणं हेच जगाच्या व्यवस्थेचा भाग आहे? ह्याचा दुसरा अर्थ हा ही होतो, की हे कर्मवादी वाक्य आहे. मी माझं कर्म करत राहणं, हेच माझं दैव आहे? बापरे.. मी रिकरिंग लूप मध्ये जातोय. पण प्रारब्धाला घाबरून, किंवा प्रारब्धाला शरण जाऊन आपण जर जीवनध्येय घेतलंच नाही तर आपण जगणारच नाही.

माझ्या वरच्या विचारांवरून, 'कर्म कर फल की अपेक्षा न कर' हे वाक्य १००% दैववादी आहे. असो. तर एव्हढा मानसिक गोंधळ माजण्याचं कारण एव्हढंच आहे, की मी 'मॅन्स सर्च फॉर मीनिंग' हे पुस्तक वाचत होतो. त्यामध्ये 'ज्यू कॉन्सन्ट्रेशन कॅम्प'मधून परतलेल्या एका सायकॉलॉजिस्टचे अनुभव आहेत. त्यामध्ये त्यानं बराच वैचारिक ऊहापोह केलाय, माणसाच्या जगण्यावर आणि जगण्याच्या कारणावर. त्याच्या मते माणूस आयुष्यभर जगण्यामागचं कारण आणि पर्यायाने अर्थ शोधत असतो. कधी कधी त्याला ते कारण कुणीतरी सांगावं लागतं, किंवा अचानकच त्याला त्याची जाणीव होते. आणि मग तो त्या कारणासाठी जेव्हा आयुष्य जगतो, तेव्हा तो खर्‍या अर्थाने जगतो. आणि कधी कधी हा शोध, हेच त्याच्या जगण्याचं कारण बनून जातं. कॅम्पमध्ये अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, कधी कधी तर स्वतःलाच परावृत्त करण्यासाठी तो कशा पद्धतीने माणसांना कारणं शोधायला, जीवनाचा अर्थ समजायला मदत करायचा ह्याबद्दलही त्यानं छान लिहिलंय.

त्यामध्ये योगायोगाने दोनतीनवेळा तो कसा वाचतो हे सांगण्याबरोबरच तो एक पर्शियन दंतकथा सांगतो. ती दंतकथा आत्ता आठवली आणि त्यावरूनच हे सगळं विचारचक्र सुरू झालं.

एकदा एका पर्शियन श्रीमंत माणसाच्या घरात काम करणार्‍या नोकराला बागेत प्रत्यक्ष मृत्यू सामोरा येतो. मृत्यूला पाहून त्याची पाचावर धारण बसते. तो धावतच आपल्या मालकाकडे जातो. रात्रीची वेळ असते. तो मालकाला झाला प्रकार सांगतो आणि रातोरात तेहरानला - राजधानीला- जाण्याची परवानगी मागतो. मालक काळजीनंच त्याला सगळ्यात वेगवान घोडा देतो, जेणेकरून तो पहाटेच तेहरानला सुखरूप पोहचेल आणि पुरेसे पैसे आणि शुभेच्छा देतो.

थोड्या वेळाने मालक बागेत फेरफटका मारायला जातो, तर त्यालासुद्धा मृत्यू दिसतो. तो मृत्युला नोकराला घाबरवल्याबद्दल जाब विचारतो. तर मृत्यू म्हणतो, "अरे काही नाही. तो अजून इथे कसा हे पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. कारण त्याची माझी भेट उद्या पहाटे तेहरानमध्ये ठरली होती."

9/09/2010

बर्न अ 'गुंडा' डे

आज सकाळी अचानकच एक मोठं पार्सल माझ्या नावाने आलं. मी विचारात पडलो. म्हटलं मला कुणी एव्हढं मोठं पार्सल पाठवेल असं नाहीये. कोण असेल बरं? काय असेल बरं? असे नेहमीचे विचार करतच मी पार्सल उघडलं. आतमध्ये जे काय होतं ते बघून मी विस्मयचकित झालो. त्यामध्ये 'गुंडा' ह्या सिनेमाच्या शंभर एक सीडी/डीव्हीडीज होत्या. सोबत एक बुकलेट होतं. त्या बुकलेटवर "बर्न अ 'गुंडा' डे" असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं होतं. त्यामध्ये 'गुंडा'ची अक्षरं खालून थोडीशी काळपट रंगांची होती, त्यावर लालभडक आणि वर जळत असल्यामुळे ज्वाळा दाखवलेल्या होत्या. मी अचंभ्यात पडलो. माझ्या डोळ्यासमोर धडाधड भारतातले नेते यायला लागले. एक क्षण चिमणरावांचा भाऊ गुंड्याभाऊ पण डोळ्यासमोर तरळून गेला. मग एक बुकलेट उचलून पाहिलं. त्यात 'जो कर' ह्या संप्रदायाच्या लोकांनी '४ सप्टेंबर, २०१०' ज्यादिवशी "गुंडा" ह्या चित्रपटाला रिलीज होऊन एक तप पूर्ण होत होतं, त्या दिवसाला "बर्न अ 'गुंडा' डे" म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं. त्या दिवशी 'गुंडा' सिनेमाच्या मिळतील तेव्हढ्या प्रती जाहीररित्या जाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. किमान एक तरी 'गुंडा' जाळा असं कळकळीचं आवाहन करण्यात आलं होतं.

आता मला महत्वाचा प्रश्न पडला. हे पार्सल मला पाठवण्याचा चावटपणा कुणी केला. होय, चावटपणाच. अहो मी 'बाबाईझम' किंवा अलम दुनिया ज्याला 'मिथुनिझम' म्हणून ओळखतात, त्या धर्माचा खंदा पुरस्कर्ता आहे. प्रेषित देखील होता ह्या धर्माचा, त्याला लोक 'बाबा' म्हणतात आदराने. त्यांच्या निर्वाणाला तीन दशके लोटलीत. काही भाविक त्यांना 'प्रेषित' मानतात, काही नुसताच सामान्य भक्त मानतात. पण त्यानं फारसा फरक पडत नाही. 'मिथुनिझम' मध्ये सर्वभक्तसमानता आहे. आमचा देव 'प्रभुजी मिथुनदा'. आमच्या देवापर्यंत पोचायला आमच्यात बडवे, मौलवी किंवा प्रीस्ट लागत नाहीत. आता महत्वाचा मुद्दा. 'गुंडा'चा आणि 'मिथुनिझम'चा काय संबंध? तर मंडळी. 'गुंडा' हा 'मिथुनिझम'चा 'धर्मचित्रपट' आहे! होय, धर्मचित्रपट. हा जगातला एकमेव धर्म आहे, जिथे धर्मग्रंथ नाहीये. धर्मचित्रपट आहे. धर्माचा संदेश आम्हाला तिथूनच मिळतो. हा संदेश 'बाबां'पर्यंत पोचवणारा आमचा फरिश्ता म्हणजे दिग्दर्शक कांती शाह.

गुंडाचे मुख्यत्वेकरून चार भाग पडतात.

१. खलकांड - ह्यामध्ये सर्व खलपात्रांच्या ओळखी आणि त्यांचे आपापसातले संबंध ह्यांवर प्रकाश पडतो. प्रमुख खलनायकाचा (प्रमुख खलनायकाचं नाव मी लिहू शकत नाही, कारण ते मिथुनींना अ-मिथुनींसमोर बोलणं हराम आहे) काटा काढण्यासाठी एक 'कफनचोर नेता' दुसर्‍या नावाजलेल्या गुंडाला सुपारी देतो. मग सर्व खलपात्रांच्या ओळखीचा एक दीर्घ प्रसंग आहे, ज्यात काही अतिशय गाजलेल्या ओव्या आहेत. उदाहरणार्थ, "मेरा नाम है पोते, जो अपने बाप के भी नहीं होते". ह्या प्रसंगातल्या अनेक ओव्या अ-मिथुनींसमोर वर्ज्य आहेत. त्यानंतर तो गुंड प्रमुख खलनायकाच्या बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करतो. त्यावर मुख्य खलनायक अतिशय दीर्घ, ह्रद्य असं एक स्वगत म्हणतो, "मुन्नी, मेरी बहन मुन्नी! तो तू मर गयी. तू कटा हुआ गुर्दा, याने के मुर्दा हो गयी! लंबू(दुसरा गुंड) ने तुझे लंबा कर दिया, माचिस की तिली को खंबा कर दिया!" मला सांगा कुठल्या संवेदनशील माणसाला हे वाचून गलबलून येणार नाही? हे स्वगत हा गुंडाचा हायपॉईंट आहे. कारण इथे तो खलप्रवृत्तींची एक वेगळीच बाजू समोर आणतो. शेवटी खल देखील मानवच असतात असा एक मानवतावादी संदेशही ह्यातून जातो. अनेक खल मिथुनी पापक्षालनासाठी ह्या ओव्यांचं नित्य पठण करतात. असो. तर ह्यानंतर जेव्हा मुख्य खलपात्र लंबूला मारण्यासाठी घेराव घालतं, तेव्हा लंबूही एक दीर्घ संवाद म्हणतो. जो लिहिणं मला शक्य नाही. कारण, तो काही विशिष्ट परिस्थितींमध्येच उद्घृत करण्याचा सख्त अलिखित दंडक सारे मिथुनी मानतात. असे अनेक संवाद आहेत, जे अ-मिथुनींसमोर म्हणणं वर्ज्य आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी! तर ह्या वधावेळी मुख्य खलपात्र 'हम दो नंबरके धंदे करनेवालोंकी बहू-बेटियों की जान और इज्जत का कोई भरोसा नहीं होता' असं एक अतिशय सखोल तत्वज्ञानपूर्ण वाक्य म्हणतं. ह्या एका प्रसंगात, किंबहुना ह्या वाक्यातच कित्येक वाममार्गाला लागलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याची ताकद आहे. ह्यानंतर लंबूवधाचा प्रसंग संपतो.

२. हमालकांड - ह्यामध्ये प्रभुजी हमाल म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करतात आणि त्याचबरोबर जगाला बंधुभाव आणि नागरिकशास्त्राचे धडेही देतात. ह्या कांडामध्ये प्रभुजींनी गुंडायुगात विमानतळ आणि गोदी अश्या दुहेरी कॉम्प्लेक्समधल्या हमालाचा अवतार घेतल्याचं स्पष्ट होतं. मग प्रभुजी विमानतळावर मुख्य खलपात्राच्या एका अनुयायाला गैरकृत्य करताना पकडतात आणि विमानतळापासून पार कोर्टापर्यंत पाठलाग करून पकडून देतात. आणि ह्याबद्दल बक्षिस मिळाल्यावर 'बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा' हा श्लोकही म्हणतात. ह्यानंतर प्रभुजी एका मुलीच्या लग्नासाठी पैसे कमी पडत असलेल्या म्हातार्‍या हमालाच्या मदतीसाठी मुख्य खलपात्राच्या पैलवानाला सहज चीत करून आपल्या निःस्वार्थी वृत्तीने आपल्या अवतारकार्याची एक चुणूक दाखवतात. पण त्याचबरोबर सामान्य हमालांप्रमाणेच दारू पिऊन धिंगाणाही घालून दाखवतात.

३. अन्यायकांड - ह्यामध्ये प्रभुजींची बहिण आणि एकंदरच त्यांच्या कुटुंबावर सर्व प्रकारचे अन्याय केले जातात. प्रभुजींच्या बहिणीचं फसवून लग्न लावून दिलं जातं आणि मुख्य खलपात्राचा भाऊ तिचा बलात्कार करून तिचा खून करतो. प्रभुजींचे वडिल जे पोलिसात हवालदार असतात, त्यांचा इन्स्पेक्टर बॉस त्यांच्यासमोर खुन्यांची मदत करतो. (पण प्रभुजींचे हवालदार वडिलही एकाच प्रसंगात मिश्या असलेले आणि नसलेले असे दिसून आपल्या दैवी अंशाचं दर्शन घडवतात, पण मर्त्य इन्स्पेक्टरला हा इशारा उमगत नाही आणि तो प्रभुजींच्या हातच्या अटळ मरणाच्या दिशेनं जातो.) ह्या दुर्घटनेनंतर प्रभुजी खलनायकांच्या घरी जातात, तो प्रसंग जर कुठल्या दा व्हिंची नं चितारला, तर 'लास्ट सपर' च्या तोडीचं पेंटिंग बनेल. प्रभुजी दरवाजात उभे आहेत आणि सर्व खलनायक समोरच बंगल्यातल्या जिन्यावर उभे आहेत. ह्याच प्रसंगात प्रभुजी आपल्या अवतारी असण्याचा प्रकट पुरावा देतात, जेव्हा ते सर्व खलपात्रांच्य 'मौत ची डेट' फिक्स करतात. आणि 'दो, चार, छे, आठ, दस...बस' ह्या मंत्राने तो प्रसंग संपतो.

४. धमालकांड - ह्यामध्ये प्रभुजींना आपलं अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी शस्त्र हातात उचलावी लागतात. आणि प्रभुजी सर्व खलपात्रांना एक एक करून संपवतात. ह्यामध्ये प्रभुजी एका खलनायकाचा वध करताना 'भिगी हुई सिगरेट कभी जलेगी नही, और यह तय है की तेरी मौत की तारीख कभी टलेगी नही' ही ओवी म्हणतात (इथे लोक 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' चे संदर्भ शोधतात, शोधोत). प्रभुजींच्या शस्त्रांमध्ये बझूका लॉन्चरचाही समावेश आहे, जे प्रभुजी आपल्या लीलेनं एका यःकश्चित गाडीच्या डिकीतून घेऊन येतात. आणि हा लॉन्चर रिफील करावाच लागत नाही, तो आपोआप रिफील होत राहतो (इथे काही लोक द्रौपदीच्या न संपणार्‍या साडीचे रेफरन्स शोधतात, पण तो मूर्खपणा आहे कारण इथे द्रौपदीपण प्रभुजी आणि कृष्णपण.) अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रभुजी बच्चू भिगोना ह्या राजकीय नेत्याचा वध करण्यासाठी म्हणून अशक्य अंतरावरून रायफलने चालत्या गाडीवर नेम धरतात, तेव्हा दुसरंच खलपात्र बच्चू भिगोनाचा खून करतं, मात्र पोलिस प्रभुजींना पकडतात. ह्याउलट प्रभुजी त्यानंतर सर्व खलपात्रांना स्वतः संपवतात पण पोलिस काहीही करू शकत नाहीत. ह्यातून हा संदेश मिळतो, की 'बळी तो कान पिळी'. आणि शेवटी तर प्रभुजी मुख्य खलपात्राच्या अनौरस संततीला आपलं अपत्य म्हणून स्वीकारून जगाला एक वेगळाच मानवतेचा संदेश देतात.

तर असा धर्मचित्रपट लाभलेला हा खराखुरा आधुनिक धर्म म्हणता येईल. तर ह्या आमच्याच धर्माविरुद्ध रचलेलं हे कुभांड मलाच पाठवण्याचा उपद्व्याप माझ्या लक्षात आला नाही.

मग मला अजून एक गहन प्रश्न पडला. कारण पाचच दिवसांपूर्वी मी 'गुंडा दिवस' मोठ्या आनंदानं साजरा केला. त्यादिवशी सगळे 'मिथुनी' दिवसभर 'निर्जळी' कडकडीत उपवास करतात. आणि संध्याकाळी 'गुंडा' तल्या एका श्लोकात सांगितल्याप्रमाणे (संदर्भ - हमालकांडातील प्रभुजींचे टल्ली होऊन असलेले गाणे. मूळ पंक्ति "क्यूं ये बर्फ पीता है व्हिस्की में डालके?") व्हिस्कीत टाकून बर्फ पिऊन उपवासाची सांगता करतात (नीट वाचा. व्हिस्कीत टाकून बर्फ पितात, बर्फ टाकून व्हिस्की पीत नाहीत.). सहसा मिथुनी हा सोहळा समूहात मिळून करतात. कुटुंबंच्या कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा साजरा करताना मी कित्येकदा पाहिली आहेत. एकदा उपवासाची ऑफिशियल सांगता झाली की मग सगळे एकमेकांना मिठ्या मारून शुभेच्छा देतात. मग ज्या कुटुंबाचे सर्वाधिक सदस्य सहभागी असतील, त्या कुटुंबाला यजमानपदाचा मान मिळतो आणि जेवणाच्या पंगतींना वाढण्याची जवाबदारीही. जेवण अगदी हॉटेलातलही चालतं. त्यावर कुठलीही आडकाठी 'मिथुनिझम' करत नाही. फक्त सहसा गोड्या पाण्यातल्या माशांचा समावेश त्या दिवशी जास्त असतो जेवणात. कारण प्रभुजींना 'गोड्या पाण्यातले मासे' फार आवडतात. पण शाकाहारी-मांसाहारी सर्वांसाठी सोय असते. त्यामुळे मोठ्या आनंदात जेवणं होतात. पुन्हा इथल्या जेवणाचा नियम आहे, जोवर खाणारा 'दो, चार, छे, आठ, दस... बस'(संदर्भ - अन्यायकांडामध्ये प्रभुजी त्यांच्या बहिणीच्या हत्येनंतर खलनायकांच्या घरी जाऊन ज्या ओव्या म्हणतात, त्यातली शेवटची ओवी) म्हणत नाही, तोवर वाढतच राहायचं. जेवणं उरकल्यावर मग 'गुंडा' चा एक सामुदायिक खेळ होतो. त्यानंतर एकदा प्रभुजींच्या नावाचा जयघोष करून सगळे मिथुनी समाधानानं आपापल्या घरी जातात. ह्यावर मला अनेकांनी विचारलं की स्वतः प्रभुजी कधी सहभागी होतात की नाही. मी म्हटलं, अरे अज्ञानी जीवांनो, 'देवाला कधी धर्म असतो का? धर्म आपण मर्त्य मानव बनवतो. सण आपण साजरे करतो, देवाच्या नावानं!'

तर मुद्दा होता की आज त्या घटनेला १०० वर्षं पूर्ण होऊन पाच दिवस होत असताना मला हे पार्सल आलं कसं? आणि त्या पवित्र दिवशी आमच्या धर्मावर आलेल्या ह्या संकटाबद्दल मला काहीच कसं ठाऊक नव्हतं. मी लगेच ते पार्सल कुठून आलंय हे शोधायला सुरूवात केली. मग माझ्या लक्षात आलं की भारतातल्या अगदी मोजकी फॉलोईंग असलेल्या 'जो कर' ह्या संप्रदायाचा हे मला पाठवण्यात काहीही हात नाहीये. एक विलक्षणच गोष्ट होती. त्याचं झालं असं होतं.

'जो कर' हा अतिशय रद्दड आणि मूर्ख असे रोमॅन्टिक सिनेमे पाहणार्‍यांचा संप्रदाय होता. ते बहुधा 'श्श चुपरहा' आणि 'जोहर कर'(ह्याच्या नावावरूनच संप्रदाय सुरू झालाय) ह्या दिग्दर्शकांचेच सिनेमे पाहायचे. त्यांचा स्वतःचा आमच्यासारखा फुल फ्लेज धर्म नाहीये. ते स्वतःची जागा बनवायचा प्रयत्न करत होते. ह्याच त्यांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आमच्यासारख्या प्रसिद्ध पण विचित्र धर्माचा प्रसिद्धीसाठी वापर करून घ्यायचं ठरवलं. सूर्यावर थुंकून लोकप्रियता मिलवायचा केविलवाणा प्रयत्न म्हणून ही अशी पार्सल बर्‍याच मध्यममार्गी लोकांना पाठवली. पण परिणाम उलटा झाला. आमच्या धर्मचित्रपटात असं आहे तरी काय? की ज्यामुळे इतका बवाल होतोय हे जाणण्यासाठी अनेकांनी उत्सुकतेपोटी 'गुंडा' पाहिला. आणि उलट आमच्या धर्माची लोकप्रियता रातोरात वाढली. 'गुंडा' जळणं तर राहिलं दूर, उलट लोकांनी अनेक दिवस वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल्स सगळीकडे फक्त आमच्याच 'मिथुनिझम'बद्दल लेख लिहिले, डॉक्युमेंट्रीज बनवल्या. ज्यामुळे 'जो कर' संप्रदायाचे वांधे झाले. त्यांनी अजून जोरात बोंबलायला सुरूवात केली. त्यांनी ४ सप्टेंबरला काही सीडीज जाळल्यादेखील, पण ते पहायला कुणीच गेलं नाही. उलट त्यादिवशी 'गुंडा दिवसा'ची सेलिब्रेशन्स मात्र सगळ्यांनीच अनुभवली.

त्या विचित्र दिवसामुळे 'मिथुनिझम'ची पताका सगळीकडे फडकली, पण 'जो कर' संप्रदाय मात्र अनुल्लेखानेच मारला गेला किंवा झालाच तर इतका बदनाम झाला की जवळपास नामशेषच झाला. कित्येक त्याच संप्रदायाच्या लोकांनी फुटून वेगळी चूल मांडली. आणि त्या फजितीमुळे त्यांनी तो दिवस विसरून जाणंच पसंत केलं. मिथुनींच्या तत्कालीन धुरिणांनी हा द्वेषपूर्ण दिवस विसरून जाण्याचं आवाहन मिथुनींना केलं त्यामुळे ही ऐतिहासिक घटना इतिहासाच्या पानात हरवून गेली होती. पण हे एक त्याकाळचं पार्सल माझ्या आजोबांनी जपून ठेवलेलं होतं. ते त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षाने मला पाठवण्याचं त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं असल्याने हे मला आलं होतं. पण तरी मला कळत नव्हतं, की त्या दिवसाचे सगळे पुरावे जर नष्ट झाले होते, तर आजोबांनी हे जपून का ठेवलं?

दुसर्‍या दिवशी सहज त्यातली एक गुंडा ची नसलेली डीव्हीडी माझ्या नजरेस पडली. ती मी उत्सुकतेपोटी लावली. आणि मला धक्काच बसला. त्यात माझ्या आजोबांचा माझ्यासाठी व्हिडिओ संदेश होता. त्याचा सारांश असा-

"मी प्रत्यक्ष 'बाबां'चा वंशज आहे. आणि आजच्या जगाला 'मिथुनिझम'च्या विजयाची किंवा त्यापेक्षा 'आक्रस्ताळेपणा'च्या पराभवाची ही विलक्षण कथा सांगण्यासाठीच माझी नेमणूक 'बाबां'नी केली होती."

सर्व मिथुनी आणि अ-मिथुनींना 'गुंडा दिवसा'च्या उशीरानेच शुभेच्छा!

9/05/2010

सकाळ

कधी कधी लिहायला बसलं, की एकदम रिकामं वाटतं. जी शून्य वैचारिक अवस्था गाठण्यासाठी लोक तप करतात, ती कधी कधी लेखक बनू इच्छिणार्‍या लोकांना आपोआप मिळते, पण फक्त लिहायला बसल्यावर. म्हणजे बघा, जेव्हा झोप येत नसते, तेव्हा जर अभ्यासाचं किंवा कुठलंही जड पुस्तक हातात घेतलं, की कशी मस्त झोप डोळ्यांवर झुलायला लागते, तद्वतच!

आत्ताही अशीच शून्य वैचारिक अवस्था लाभलीय. लिहायला बसलोय आणि काही सुचतच नाहीये. पण लिहायचा सोस भारी. त्यामुळे जबरदस्तीनं विचार करायला लागलो. आणि एकदम एक चमकदार (!) कल्पना सुचली. आपण शाळेत कसे निबंध लिहितो, एक काहीतरी विषय दिला की आपण आपल्या कल्पनेचं वारू मोकाट सोडून देतो. आता ब्लॉगमध्येही दुसरं काही आपण करत नाही, फक्त विषय निवडायचं काम आपण करतो आणि ते रोजच्या जीवनातले असतात. मग आत्ता मी एकदम ठरवलं, की आपण जो शब्द पहिला डोक्यात येईल त्याच्यावर निबंध सॉरी ब्लॉग लिहायचा. हे म्हणजे लोककथांमध्ये असतं ना, 'जो वेशीतून पहिला माणूस येईल त्याला राजा बनवायचं.' तसलाच प्रकार. मग आधी मी स्वतःलाच विरोध केला. पण आत्ता 'झी टीव्ही'वर 'सारेगमप सिंगिंग सुपरस्टार' हा कार्यक्रम चालू आहे. त्यात सलमान खान पाहुणा म्हणून आलाय. त्याला बघून, त्याच्या 'वॉन्टेड' सिनेमातला माझा फेव्हरेट डायलॉग मला आठवला, 'एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता'. आधी मी स्वतःलाच 'आवरा' म्हटलं आणि मग मी स्वतःचं न ऐकता पहिला शब्द शोधायला लागलो. आणि पहिलाच शब्द डोळ्यासमोर आला तो 'सकाळ'.

आता 'सकाळ' हा शब्द का डोक्यात यावा हा प्रश्न मला सर्वांत आधी पडला. काहीही लॉजिक नाही. उगाच. अक्षरशः रॅन्डम. आधी मी बरीच डोकेफोड केली, की हा शब्द आला कुठून आणि मग ह्यावर डोकेफोड केली, की लिहायचं काय? मग अचानक जाणवलं, की ह्या शब्दाला अनेक फाटे फुटतात. (फाटा म्हटलं, की आधी मला शीळफाटा आठवतो. आणि त्यानंतर राजू परूळेकर. असो.) खूप कंगोरे असलेली विचारचक्र सुरू होतात. मग म्हटलं, क्रमवार एकेक करून लिहू.

१. सकाळ म्हटल्या म्हटल्या पहिल्यांदा माझ्या डोक्यात, 'सकाळी उठोनी देवासी भजावे, गुरूसी वंदावे, जीवेभावे।' हा श्लोक आला. कुठल्यातरी एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये संचालक म्हणाले होते, 'आपण स्वतःलाच वारंवार चकित करत असतो'. ह्याचा प्रत्यय मला वारंवार येतो, पण ते सहसा नकारात्मक चकित असतं, आज मी चक्क सकारात्मक चकित झालो. मला असलं चांगलं, साजूक आणि सोज्वळ आठवावं, हे माझं मलाच आधी पटलं नाही. मला भरून यायला सुरूवात झाली होती, पण तेव्हढ्यात ह्याचंच ऐकलेलं एक बाळबोध शाळकरी विडंबन आठवलं आणि माझा आश्चर्याचा भर लगेच ओसरला. 'सकाळी उठोनि देवासी भाजावे, गुरूसी वधावे, जीवेभावे।' अत्यंत ऍमॅच्युअर विडंबन आहे, शुद्ध मराठीत हौशी विडंबन म्हटलं तर तेसुद्धा एक विडंबनच होईल. असो पाचकळपणा पुरे. पण खरंच हे जे विडंबन आहे ते सुचल्यामुळे एक गोष्ट झाली, मी अजून नॉर्मल आहे आणि एकटेपणाचा माझ्यावर अजून काहीही परिणाम झालेला नाही हे कन्फर्म झालं.

जाता जाता - 'गुरूसी वधावे' नंतर 'जीवेभावे' येतं ना राव, तो किलर टच आहे विडंबनातला, शब्दशः सुद्धा!

२. दुसरा वैचारिक फाटा फुटला तो म्हणजे आजची सकाळ. आज सकाळी मी काय केलं. ७.३० ला जागा झालो. ८ वाजेपर्यंत गादीतून आळसावत बाहेर आलो. ८.३० च्या आसपास चहा वगैरे उरकून घरी मिस्ड कॉल दिला, आणि स्काईप चालू करून आईची वाट बघत बसलो. जाऊ द्या. हे सगळं लिहून काय होणार आहे. 'जाऊ द्या' च्या आधीची तीन वाक्य इग्नोअर करा, दुर्लक्षित करा, मला बॅकस्पेस मारायचा कंटाळा आलाय. तर मी सकाळी काहीतरी टाईमपास करत असताना ऑर्कुटवर काहीतरी कीडे करत होतो. जेव्हा मी ऑर्कुट नवं जॉईन केलं होतं, तेव्हा जोशात येऊन वाट्टेल तेव्हढ्या कम्युनिटीज जॉईन केल्या होत्या. माझ्या जवळपास ९९ कम्युनिटीज आहेत आणि मी एकावरही काहीही करत नाही. रोज उजवीकडच्या विंडोत ९-१० ऍक्टीव्ह कम्युनिटीज दिसतात. सहसा मी बघतही नाही(कबुली - समीरा मखमलबाफ ची कम्युनिटी असली की तिकडे सहसा लक्ष जातं). पण आज चक्क तिची कम्युनिटी दिसत नसतानाही लक्ष गेलं. 'ओल्डबॉय' ची कम्युनिटी दिसली आणि डोक्यात हजारो घंटा वाजायला लागल्या. जवळपास ५ वर्षांपूर्वी पाहिलेला सिनेमा. आजही त्याच्या फ्रेम्स डोक्यात घर करून आहेत. ती क्लॉ हॅमर, ते पिंजारलेले केस आणि तो शेवटून दुसरा लिफ्टमधला सीन. त्यानंतर मी आवरलं, म्हणजे आंघोळ वगैरे हो. आजची सकाळ संपली.

३. अजून एक वैचारिक फाटा. रोजची सकाळ. रोज सकाळी मी काय करतो. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत मी सकाळी उठोनी, चालायला जायचो. १५ मिनिटं ते अर्धा तास मधलं जे काही उठण्याच्या वेळेला सूट करेल. पण हल्ली जाम थंडी पडायला लागलीय सकाळी, त्यामुळे बंद केलंय. आता संध्याकाळी जातो. पण संध्याकाळ हा आजचा विषय नाही, त्यामुळे त्याबद्दल पुन्हा कधीतरी. तर चालून आल्यावर मी चहा बनवतो. हल्ली उठल्या उठल्या चहा बनवतो, कारण चालण्याची वेळ झोपेच्या वेळेला अधिकारिकरित्या जोडण्यात आलेली आहे. चहा झाला की आन्हिकं उरकून बस पकडायला नेमाने(नेमाडे नव्हे. ओके ओढून ताणून केलेला विनोद होता. सॉरी.) धावतो. मग बस, मग मेट्रो आणि मग चालतो. थोडक्यात वाहतुकीचे सगळे प्रकार होतात. मग गुगल सुरू होतं आणि माझी रोजची सकाळ संपते.

४. हा मात्र खराखुरा वैचारिक फाटा बरं का. सकाळ वृत्तपत्र. सकाळ म्हटलं की मला सर्वप्रथम त्यांचं ओळखचिन्ह डोळ्यासमोर येतं. पहिल्यांदाच बघणार्‍यांना ते 'सुकाळ' असंही वाटू शकतं (हे मला एकदा बाबांनी दाखवलं होतं). मग 'सुकाळ' म्हटलं की मला 'गाढवाचा गोंधळ अन लाथांचा सुकाळ' ही म्हण आठवते. आणि 'गाढव' म्हटलं की मला बाबांनीच केव्हातरी सांगितलेला एक 'मुद्राराक्षसाचा विनोद' अर्थात प्रिंटींग जोक आठवतो.

"एकदा एक पत्रकार एका ज्येष्ठ नेत्याच्या घरी मुलाखतीसाठी जातो. तेव्हा नेता झोपलेला असतो. तर तो पत्रकार परत येऊन बातमी तयार करतो. 'आम्ही त्यांच्याकडे मुलाखतीसाठी गेलेलो असता, ते गाढ व शांत झोपलेले होते.'

पेपरात दुसर्‍या दिवशी छापून येतं. 'आम्ही त्यांच्याकडे मुलाखतीसाठी गेलेलो असता, ते गाढव शांत झोपलेले होते.' "

मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल्या कॉम्बिनेशनवरून मला शरद पवार आठवले (आठवले वरून आत्ता मला रामदास आठवले आठवले, पण तिथे डेड एन्ड आला म्हणून मी पुन्हा शरद पवारांनाच आठवले) आणि शरद पवार आठवल्यावर त्यांचा पेपर 'सकाळ' आठवला. थोडक्यात एक वर्तुळ पूर्ण झालं.

५. किती विचित्र. मला सकाळवरून मुक्तपीठ आठवायला इतका वेळ लागला. ५व्या क्रमांकावर चक्क! तिथल्या प्रतिक्रिया हल्ली कमी झाल्यात हे एक कारण असेल किंवा एकंदरच तिथे हल्ली मजा येत नाही हे दुसरं. किंवा एकंदरच आपण आपल्या माणसांना गृहित धरतो म्हणून असेल. पण मुक्तपीठ आठवलं हे महत्वाचं! मागच्या वाक्यात मी 'आठवले' असं लिहिणार होतो. पण मग म्हटलं, नपुंसकलिंगी आहे त्यामुळे 'आठवलं' ऍप्रॉप्रियेट आहे आणि पुन्हा 'आठवले' लिहिलं की श्लेष होतो आणि मला पाचकळ राजकीय विनोद करावेसे वाटतात. पण मग ह्या नपुंसकलिंगावरून मला एक झकास शाळकरी विनोद आठवला.

एकदा एक मुलगा रडत रडत घरी येतो. बाबा विचारतात काय झालं. मुलगा म्हणतो, 'बाबा, मास्तरांनी मारलं.' बाबा विचारतात 'काय केलंस?' तो म्हणतो मास्तरांनी विचारलं, "मराठी भाषेत लिंग किती आणि कुठली?" मी सांगितलं, "तीन. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग." बाबा म्हणतात, "मग? बरोबर तर उत्तर दिलंस. मग मारलं का मास्तरांनी?" त्यांनी पुढे विचारलं, "उदाहरणं दे!" मी दिली, "तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर!"

तर 'सकाळ' ह्या शब्दावरून आत्तापर्यंतच मला एव्हढं काय काय सुचलं आणि आधी एक ओळ तरी खरडता येईल का ह्या काळजीत होतो मी. मेंदूच्या खोलीत अडकलेल्या विचारांना मुक्त करायची ही शाब्दिक चावी बरी वाटली. "रूठी हुई प्रतिभा(टॅलेंट ह्या अर्थी) को मनाने का अच्छा आयडिया है।" "व्हाट एन आयडिया सरजी।"

9/02/2010

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

तीन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा युरोपात आलो. तीन महिन्यांसाठीच फक्त आलो होतो. नोकरीला लागून वर्षही झालं नव्हतं. अजून कॉलेजचा मोड बदलला नव्हता. जग पहिल्यांदाच सुरक्षित परिघाबाहेर पडून बघत असेन. येतानाच घरी एक वेबकॅम लावून आलो होतो. याहू मेसेंजर इन्स्टॉल केला होता. आई-बाबांना कसं चालवायचं, ह्याचं प्राथमिक प्रशिक्षण देऊन आलो होतो. समस्या एकच होती - माझ्याकडे लॅपटॉप नव्हता.

मी इथे आल्यावर इथल्या जुन्या-जाणत्या लोकांना काय प्रश्न विचारला असेल, तर हा की इथे जवळपास सायबर कॅफे कुठे आहे? तेव्हा इथे आश्चर्यकारकरित्या कुणीच घरी व्हिडिओचॅट वगैरेच्या फंदात पडत नव्हते. त्यातून त्यावेळेस इथे सगळी सिनियर मंडळी होती, ज्यांना इंटरनेट वगैरे प्रकार नेट बॅकिंग व्यतिरिक्त फारसे अवगत नव्हते. पुन्हा, तेव्हा आमच्या रेसिडन्समध्ये इंटरनेट सहजगत्या उपलब्धही नव्हतं आणि एकंदरच मिलानमध्ये 'इंटरनेट की' ह्या प्रकरणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता. कदाचित अतिशयोक्ति वाटेल, पण भर युरोपात मला आफ्रिकेत आल्यागत वाटत होतं, हे सत्य आहे. त्याचं कारण मला नंतर कळलं ते असं, की लँडलाईन फोनवर इंटरनेट सहजगत्या उपलब्ध होतं, पण आम्ही सर्व्हिस अपार्टमेंट्समध्ये असल्याने लँडलाईन आमच्या मालकीचे नव्हते. असो. तर मुद्दा हा की माझा सायबर कॅफेचा शोध सुरू होता. आणि अपघातानेच एक दिवस, आमच्यातल्याच एका तरूण मुलाशी बोलता बोलता पत्ता लागला. तो ही घरी चॅट करण्यासाठी नाही, तर जवळपासच्या जागांची माहिती काढण्यासाठी एकदा दोनदा जाऊन आला होता. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा आमच्या ऑफिसात ज्युनियर एम्लॉईजना इंटरनेटची सुविधा नव्हती. तर मी ही सो-कॉल्ड बांगलादेशीची कॅफे शोधत निघालो एकटाच.

एकदाचं सांगितलेल्या खाणाखुणांनुसार दुकान सापडलं. ते एक आयएसडी फोन सेंटर कम सायबर कॅफे होतं. दुकानात शिरलो आणि मोठा ऊर्दू बोर्ड नजरेला पडला. दोन आशियाई माणसं काऊंटरपलिकडे बसलेली होती. मी जाऊन सरळ हिंदीत चालू झालो. दोन-चार फेर्‍यांमध्ये ती कॅफे एका पाक कुटुंबाच्या मालकीची असल्याचं ध्यानात आलं आणि त्यातल्या दोघाजणांशी अगदी चांगल्या गप्पा होऊ लागल्या. त्यांच्या कुटुंबातला प्रत्येक जण काय करतो ह्याची इत्थंभूत माहिती मला झाली. त्यांच्यातल्या दोन वर्षांच्या मुलीच्या नावावरून ठेवलेलं कॅफेचं नाव, त्यांची मूळ गावं असं बरंच. एक दिवस त्यांच्यातल्या एक मोठा भाऊ स्पेशली मला भेटायला आला आणि गप्पा मारून गेला. ते चक्क आपल्याकडचे म्हणून भारतीयांना मूळच्या अव्वाच्या सव्वा किमतीत सूटही द्यायचे. माझ्या पाक लोकांच्या जवळिकीबद्दल मला बरेच जण ऐकवायचे, समजावायचे. मलाही धोके कळत होते, पण वळत नव्हते. तारा जुळल्या होत्या.

त्यानंतर मी भारतात परतलो आणि पाच सहा महिन्यांनी लांब पल्ल्यासाठी इथे परत आलो. ह्यावेळेस सोबत लॅपटॉप आणला होता. मध्यंतरीच्या काळात माझा त्यांच्यातल्या कुणाशीही संपर्क नव्हता. मी सहज ते दुकान अजून आहे का म्हणून पाहायला गेलो, तेव्हा त्यांनी एकदम बर्‍याच दिवसांनी भेटलेल्या मित्रासारखं स्वागत केलं. माझ्या रूमवरती नेटचा जुगाड होईस्तो मी तिथे जायचो, आणि जुगाड झाल्यावर तर नुसताच गप्पा ठोकायला जायचो. आठवड्यातून एक दिवस तासभर. त्यानंतर पहिल्याच थंडीत मी न्यूमोनियानं आठवडाभर आडवा पडलो आणि त्यांच्या दुकानावर गेलो नाही. तर तिथे गेलेल्या दुसर्‍या एका मुलाला त्यांनी माझ्याबद्दल विचारलं आणि मी आडवा आहे ऐकून माझ्या मोबाईलवर फोन केला. आपुलकीनं चौकशी केली आणि काहीही लागलं तर सांग म्हणून सांगितलं. बरेचदा, काहीच न करता, नुसत्या आपुलकीच्या चार शब्दांनीच आपल्याला बरं वाटतं. आता माझे १०० सहकारी इथे होते, ह्याची मदत मला कितीशी लागणार होती, पण त्यानं साफ मनानं सांगितलं, ते मला कळलं.

मग आई-बाबा इथे आले होते, तेव्हा बाबांना घेऊन मी खास दुकनावर गेलो. त्यांनी बाबांचं एखाद्या खास पाहुण्यासारखं स्वागत केलं. कॉफी मागवली आणि बर्‍याच गप्पा झाल्या, अगदी भारत-पाक राजकारणापासून सगळ्याच. तिथून निघताना बाबा मला म्हणाले, "खूप चांगली माणसं जोडलीयस तू!"

त्यानंतर माझे दोन मित्र दोन तीनदा माझ्या आग्रहावरून माझ्या घरी आले. बर्‍याचदा सहज भेट व्हायची. मग एक दिवस लॉसमध्ये चालतंय म्हणून आम्ही दुकान विकतोय म्हणून त्यांनी मला सांगितलं. आता भेटायचं कारण गेलं होतं, पण तरी ठरवून कुठेतरी भेटायचोच, महिन्याभरातून एकदा वगैरे. आणि मग २६ नोव्हेंबर,२००८ ला मी मुंबईत उतरलो, आणि त्याच क्षणी मुंबईवर हल्ला सुरू झाला होता. हल्ल्याच्या तारा पार इटलीतल्याच एका फोन सेंटरपर्यंत पोचल्या होत्या. हे ते फोन सेंटर नव्हतं, पण सगळेच जण संशयाच्या घेर्‍यात होते.

महिन्याभराने मी इथे परतलो. आता ह्यावेळी मात्र पाकिस्तानींशी बोलायचं नाही की उगा त्यांना शोधत जायचं नाही असं ठरवलं होतं. मन सारखं सांगत होतं, की 'अरे मित्र आहेत तुझे.' पण मेंदू समजावत होता, 'असा अडकशील की आयुष्यातून उठशील!' मी तब्बल १वर्ष त्यांच्याशी कुठलाही संपर्क केला नाही. ते राहायला माझ्याच भागात होते, पण नजरेस पडले नाहीत. रिसेशन मध्ये नोकर्‍या गेल्यात असे ते एकदा सांगत असल्याचं मला आठवत होतं. 'काय झालं असेल? ते ही इन्व्हॉल्व्ह्ड असतील का? की रिसेशनचे बळी?' हजारो प्रश्न पडत होते. पण मी भीतीचं ओझं वागवत होतो.

मी मधल्या काळात दोनदा सुट्टीवर जाऊन आलो. आणि ह्या फेब्रुवारीत, अचानकच घरासाठी मी बस स्थानकावर उभा असताना, त्यांच्यातल्या एकाला मी दिसलो. तो हर्षभरित होऊन माझ्याकडे आला आणि त्यानं मला मिठी मारली. मी एकदम बावरलो. आनंदित होतो, पण काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हतं.

"होतास कुठे तू?" तो.

"अरे मी मध्यंतरी काही महिने भारतात होतो." मी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत होतो. मला प्रचंड गिल्टी फीलिंग येत होतं.

"अरे माझा नंबर नाहीये का तुझ्याकडे? तुझा नंबर तर लागतच नाही." तो.

माझा नंबर खरंच वर्षभरात रिचार्च न केल्याने एक्सपायर झाला होता. "अरे मेरा नंबर बदल गया है, और तुम्हारा मेरे इस मोबाईल में नही है!" मी उर्वरित लोणकढी मारली. आणि त्याच्यासमोर त्याचा नंबर फीड करायला लागलो, तर डिस्प्ले वर त्याच्या ऑलरेडी स्टोअर्ड नंबरचं सजेशन आलं. ते त्यानंही पाहिलं. मला तर आत्ता धरणी दुभंगून मला आत घेईल का असा सीतास्पद विचार आला. पण मग मी माझं लोणकढ्यांचं भांडार उघडलं.

"मेरे पास दो सेलफोन्स हैं। पहले यह था, फिर बीच में मैं दुसरा वाला लाया था, तो उसमें नंबर नहीं था।" मी प्रचंड असहाय झालो होतो. माझं काय चुकलं होतं, हेच मला कळत नव्हतं, पण मला खूप अपराधी वाटत होतं.

त्याला कितपत पचली थाप कुणास ठाऊक. पण तो माझ्याच एरियात यायला निघाला होता. त्यानं मध्यंतरात जागा बदलली होती, आणि जिथून आम्ही बस पकडली तिथेच त्यानं जागा घेतल्याचं तो मला मनापासून सांगत होता. दुसर्‍या मित्रानं आता बायकोला देशातून इथे आणल्याचं आणि तो जुन्याच जागी राहत असल्याचं त्यानं मला सांगितलं. आणि तो त्याच्या युक्रेनियन मैत्रिणीला भेटायला माझ्या एरियात येत असल्याने, दुसर्‍याला कल्पना नाहीये, तर आत्ता त्याला फोन करू नकोस असंही मला डोळे मिचकावत सांगितलं. मग माझ्या अपराधी आग्रहास्तव आणि त्यालाही त्याची मैत्रीण येईपर्यंत वेळ काढायचा असल्याने तो माझ्या घरी येईन बसला. गप्पाष्टक चालूच होतं. कसाबवरही चर्चा झाली. दोघंही थोडे सांभाळूनच बोलत होतो. मग त्याचे एक नव्याने इथे आलेले काका, बांग्ला वॉरच्या वेळी भारतात युद्धकैदी होते हे तो मला कौतुकानं सांगत होता. पुढच्या रविवारी तुला फोन करून स्टॉपवर बोलावेन आणि मग तुला तिथून माझ्या घरी घेऊन जाईन, मग आपण निवांत गप्पा करू आणि काय ना काय. मग त्याच्या मैत्रीणीचा फोन आला आणि तो गेला.

पुढच्या आठवड्यात काही त्याचा फोन आला नाही. त्याच्या पुढच्या आठवड्यात दुसरा मित्र मला बोलवायला आला आणि कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला. त्याच्या बायकोचे वगैरे फोटो बघून झाले. गप्पा झाल्या आणि आम्ही अलविदा केला. नंतर ना मला कुणाचा फोन आला ना मी कुणाला फोन केला. कदाचित त्या पहिल्याला त्याच्या काकाने डोस पाजला असेल आणि दुसर्‍याला माझ्या चलबिचलीचा अंदाज़ आला असेल! कुणास ठाऊक.

पण मग सहा महिने उलटले आणि अचानक ह्या शनिवारी मी बस स्टॉपवर उभा असताना, बायको आणलेला मित्र दुसर्‍या बसमधून उतरला. त्याच्या चेहर्‍यावर ओळख होती पण आनंद नव्हता. आपली साडेतीन महिन्याची मुलगी दाखवताना तो फारसा उत्साही नव्हता. जबरदस्तीनं माझ्याशी बोलत होता. दुसरा, युक्रेनियन मैत्रीणवाला पाकिस्तानात सुट्टीवर गेल्याचं सांगत होता. मग बसमध्ये चढलो आणि मी दूरच बसणं पसंत केलं. कदाचित विश्वासात मीच कमी पडलो होतो, त्यामुळे आता मीच मागे हटत होतो. मला ठाऊक आहे, मी जे केलं होतं, ते प्राप्त परिस्थितीत योग्यच होतं. पण तरीही तो मैत्रीतला विश्वासघातच होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. तो माझ्या आधीच्या स्टॉपवर उतरतो. उतरताना मला म्हणाला, तुझा नंबर तोच आहे ना? मी कॉल करीन. तो कॉल करणार नाही, हे मला ठाऊक आहे आणि मी तर नाहीच नाही, हे त्याला! पण आम्ही दोघेही किती विचित्र परिस्थितीत अडकलो आहोत ह्याची एक भयाण जाणीव मला त्याक्षणी झाली.

हा जगाचा न्यायच आहे, मानवानं केलेली पापं, अखिल मानवजातीला अशी ना तशी फेडावीच लागतात. आम्ही पाकी अतिरेक्यांची आणि स्वार्थी, संधीसाधू राज्यकर्त्यांची पापं फेडतोय. आमच्या मैत्रीच्या खांद्यावर परस्पर अविश्वासाचं कधी ना कमी होणारं असं ओझं चढलंय. आणि त्या ओझ्याखाली आमचा मोकळेपणा आणि आमच्या मैत्रीतला ओलावा पार दबला गेलाय. हे ओझं कधी आणि कसं उतरणार?