4/12/2015

स्मारक

फार पूर्वी शेजारी शेजारी दोन राज्यं होती. राज्यांमध्ये प्रचंड वैर होतं. दोन्ही राज्यांच्या जनतेमधून विस्तवही जात नव्हता म्हणा ना. कारण काय? तर त्याहूनही फार पूर्वी एक नदी दोन राज्यांमधून वाहत होती. एका राज्यात उगम पावून दुसर्‍या राज्यात वाहायची. उगमवाल्या राज्याला पुरेसं पाणी मिळत नसे, म्हणून ते बंधारे घालायचे, तर दुसर्‍या राज्यात तुटवडा निर्माण व्हायचा. मग त्यावरनं चकमकी झडायच्या, माणसं मरायची. मग पाणीवाटपाचे करार व्हायचे. पुन्हा उन्हाळा आला की पुन्हा तेच जुनं चक्र.
उगमवाल्या राज्यानं गपचूप बरीच वर्षं मेहनत करून पाण्याचे नवे साठे शोधून काढले आणि नदीचा एक छोटा प्रवाह आपल्या राज्याकडे वळवून घेतला. त्यामुळे त्यांचं पाण्याचं दुर्भिक्ष बंद झालं आणि बंधारे बांधायची गरज संपून गेली. उन्हाळा आला आणि त्यांनी बंधारेच घातले नाहीत. दुसर्‍या राज्याकडे पुरेसं पाणी गेलं. दुसर्‍या राज्याचा राजा काळजीत पडला. त्याला वाटलं ह्यात काहीतरी खेळी आहे. सैनिक रिकामे बसले. 
अशी सलग पाच वर्षे गेली. सैनिक रिकामे बसून बसून सुस्तावले. आणि एक वर्षं दुष्काळ पडला. नदीचं पाणी आटलं. उगमवाल्या राज्याकडे पर्यायी साठे होते. ते निवांत होते. पण दुसर्‍या राज्यात परिस्थिती बिकट झाली. त्या राजाला वाटलं पुन्हा बंधारे घातले गेले. त्याला हायसं वाटलं आणि त्यानं सैन्याला पुन्हा चकमकींचा आदेश दिला. सैन्य सुस्तावलेलं होतं त्यामुळे त्यांचा सहज पाडाव झाला. लज्जास्पद पराभवानं राजाला वाटू लागलं की नदीच्या पाण्यातच काहीतरी कालवून पलीकडचं राज्य गेली पाच वर्षं पाणी पाठवत होतं. त्यामुळे आपल्या राज्यातले लोक कमकुवत झालेत. 
त्या राजानं मग दुसर्‍या बाजूकडल्या एका राज्याकडे सैन्याची मागणी केली. त्या राज्यानं लगेच मदत देऊ केली. तिसर्‍या राज्याचं सैन्य दुसर्‍या राज्यात आलं आणि एका घनघोर युद्धाला सुरूवात झाली. रक्ताचे पाट वाहिले. जिंकलं कुणीच नाही पण तिसर्‍या राज्याच्या सैनिकांनी पहिल्या आणि दुसर्‍या राज्यातल्या उद्ध्वस्त इमारतींवर स्वतःच्या सैनिकांची स्मारकं बांधली आणि ती उजाड भूमी सोडून ते सगळी मालमत्ता आणि जडजवाहिरं घेऊन ते आपल्या भूमीवर निघून गेले.
शेकडो वर्षं गेली त्या राज्यांमधून नदी तशीच वाहत राहिली, राजघराणी बदलली, सत्ताधीश बदलले, वैर अजूनही तसंच होतं, पण आता ते युद्धस्मारकं पाडण्यावरून होतं.