1/30/2011

३० जानेवारी

३० जानेवारी हा दिवस भारतामध्ये मो.क. गांधींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. ह्याच दिवशी नथुराम गोडसेंनी गांधींचा गोळ्या घालून वध/खून केला (ज्याला जे हवे ते घ्यावे, मूळ मुद्दा हा नाही). आणि भारताच्या इतिहासातला एक अध्याय संपला. पण एका अपमानित व्यक्तिनं जागृत होऊन अन्याय्य शक्तिंविरूद्ध एक अख्खं राष्ट्र जागं करण्याची जगातल्या इतिहासातली पहिलीच वेळ असावी. राष्ट्रीय चळवळ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं श्रेय अवश्य गांधींना जातं. पण जसजसे दिवस उलटत गेले तसतसे गांधी दुराग्रही अन हट्टी होत गेले. आणि मग हळूहळू व्यक्ति राष्ट्रापेक्षा मोठी होत गेली. जेव्हा असं घडतं तेव्हा राष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसानच होतं आणि तसंच ते होऊही लागलं होतं. आणि पुढे अजूनही मोठ्या प्रमाणावर होण्याच्या शक्यता होत्या.
अशा वेळी नथुरामनी घाई केली की उतावीळपणा केला की शांतपणे निर्णय घेतला हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या मते देशाचं नुकसान थांबवण्याचा एकच मार्ग होता आणि त्यांनी तो अनुसरला. त्यासाठी होणार असलेलं यथोचित शासनही स्वीकारण्याची पूर्ण तयारी करूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. तो निर्णय चुकीचा की बरोबर किंवा नथुराम माथेफिरू की हुशार हे महत्वाचं नाही. पण नथुरामच्या कृतीचे किती विचित्र परिणाम घडले ते महत्वाचं.
नथुरामच्या कृतीनं गांधींना हौतात्म्य मिळालं. ज्याचा पुरेपूर वापर नेहरू सरकारनं करून घेतला. गांधी म्हातारपणानं गेले असते तर गांधींना जे अतिमानवीय रूप देण्यात आलंय बहुदा तसं झालं नसतं. गांधींच्या चुका आणि अतिरेक कदाचित आपोआपच देशासमोर आला असता. शेवटी गांधीदेखील माणूस होते, पण त्यांना देव बनवण्याचं काम नथुरामच्या कृतीमुळे सोपं झालं. गेली ६० वर्षं काँग्रेससकट देशातले अनेक पक्ष त्यांच्या जीवावर भाकरीचे तुकडे मोडतायत (किंवा नोटा मोजतायत असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल).
गांधींचे विचार कितीही आदर्श असले तरी त्यांनी त्या विचारांना योग्य ठिकाणी मर्यादा घातल्या नाहीत. गांधींचा प्रत्येकच बाबतीत अतिरेक होता. मग ती अहिंसा असू दे, असहकार असू दे किंवा ब्रह्मचर्य असू दे. असे प्रकार संतांसाठी ठीक असतात, पण देश चालवणार्‍यांसाठी नव्हे. त्यातही त्यांनी ब्रह्मचर्याबाबत केलेले प्रयोग हे कधीकधी विकृती ह्या सदरात मोडणारे होते. मग भले ते त्यांनी कितीही निरागसपणे केल्याचं सांगण्यात आलं तरीही.
कुठलीही मागणी मान्य करून घेण्यासाठी उपोषणाला बसून अख्ख्या देशाला वेठीला धरणं हे त्यांचं अमोघ अस्त्र होतं. आधी हे त्यांनी ब्रिटीशांवर आजमावलं. पण ब्रिटीशांच्या वेळी केस वेगळी होती. गांधी मेले असते तर अख्खा देश पेटेल ही भीती ब्रिटीशांना होती. थोडक्यात ते अन्यायी ब्रिटीशांना केलेलं हुशार ब्लॅकमेलिंग होतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याच लोकांकडून स्वतःची तत्त्व राखण्यासाठी (किंवा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी) आपल्याच लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करणं हे कितपत योग्य होतं. एका माणसाच्या तत्वांसाठी अख्खा देश आणि हजारो लोकांचे प्राण पणाला लावले जात होते. आपली तत्व लोकांवर जबरदस्तीनं लादणं ही एकप्रकारची वैचारिक हिंसा ठरत नाही का? पण गांधींनी काही काही गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं.
गांधींनी एकट्यानीच देशाचं नुकसान केलं असं म्हणणं कदाचित अतिशयोक्ति ठरेल. पण अशा न तशा पद्धतीनं गांधींचं पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान होतं. नेहरू आणि कंपनीने गांधींच्या नावाखाली अनेक चुका केल्या. पण गांधींनीदेखील आपल्या हट्टीपणाने अनेक गोष्टी घडवून आणल्या. गांधींची सगळ्यात मोठी चूक कदाचित ही होती की त्यांनी स्वतःची तत्व कधीच काळाच्या कसोटीवर तपासून पाहिली नाहीत. त्यांच्या ज्या समजूती होत्या त्यांचा टिकाऊपणा तपासून पाहण्याची त्यांना कधीच गरज वाटली नाही. उलट अख्ख्या जगानं आपल्याच समजुतींनुसार स्वतःची मतं बदलून चालावं ह्या हट्टाने ते मार्गक्रमणा करत राहिले. त्यांचं अहिंसेचं अन असहकाराचं अमोघ अस्त्र देखील बदलत्या काळानुसार बदल मागत आहे. आजही ज्या ज्या देशांमध्ये उठाव झालेत, तिथे सगळीकडे सुरक्षा दलं निर्दयीपणे आंदोलकांवर हल्ले करताहेत. पण आंदोलक ठिय्या मांडून उपोषणाला बसले तर एकतरी आंदोलन यशस्वी होऊ शकतं का? हा प्रश्न मला पडतो. जोवर आंदोलक आपली एकगठ्ठा शक्ति दाखवून सुरक्षा दलांनाही आपल्या बाजूनं येण्यास मजबूर करत नाहीत तोवर हे अशक्यच ठरतं. काही काही देशांमध्ये रक्तविरहित क्रांतीही झालीय. पण सर्व ठिकाणची परिस्थिती एकसारखी नसते. जेव्हा जखम जुनी होते तेव्हा जवळचा भाग कापूनच काढावा लागतो आणि त्यात थोडं रक्तही वाहून जावं लागतं.
जर नथुरामनं गांधींना गोळ्या घातल्या नसत्या. तर कदाचित काही वर्षांमध्ये स्वतंत्र भारतामध्ये गांधींभोवतीचा बुडबुडा फुटलाही असता किंवा भारत अजून मोठ्या प्रमाणावर गांधींच्या आहारी गेला असता. कदाचित अजून एक दोन संस्थांनांची घोंगडी हिंसक कारवाईअभावी भिजत पडून राहिली असती. पण ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत.
देशातल्या जनतेला ब्रिटीश अन्याय्य राजवटीविरूद्ध जागृत करण्यामधलं गांधींचं योगदान वादातीत आहेच आणि त्याबद्दल मी त्यांचा आदर करतो. पण आज स्वतःच्या तत्वांपायी अख्ख्या देशाचं आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केल्यामुळे त्यांना महात्मा म्हणताना मात्र माझी जीभ कचरते.

आज माझ्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी ३० जानेवारीलाच मी पहिली पोस्ट टाकली होती. सर्व वाचकांच्या प्रेमामुळे आणि सर्व मित्र आणि शुभचिंतकांच्या प्रोत्साहनामुळेच हा प्रवास पूर्ण झाला. सुरू केला तेव्हा स्वतःपासून काहीच अपेक्षा नव्हत्या. पण सर्वांच्या प्रेमानं आणि प्रोत्साहनामुळे आणि वेळोवेळी मिळणार्‍या चांगल्या वाईट अभिप्रायांमुळे लिहिता राहिलो. रस्त्यावर काही कौतुकंही झाली पण सगळ्याचं श्रेय वाचकांनाच जातं.
डिसेंबरमध्ये विचार केलेला की पहिल्या वाढदिवशी ब्लॉगला १०० व्या पोस्टची भेट द्यावी. पण डिसेंबरमध्ये सुट्टीवर असताना लेखनात जवळपास महिन्याभराचा खंड पडला. पण मग तरीसुद्धा पहिलीच भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याखातर गेला आठवडाभर रोज एक अन कालपासून तर दिवसाला दोन पोस्ट केल्या आहेत. ह्या अतिरेकाचा गुणवत्तेवर निश्चितच परिणाम झाला असेल. पण मला हे चॅलेंज पूर्ण करायचं होतं आणि महत्प्रयासाने ते मी पूर्ण करू शकलोय ह्याचा मला आनंद आहे. ही माझ्या ब्लॉगवरची १०० वी पोस्ट आहे.
ह्यापुढे पोस्ट्सची फ्रिक्वेन्सी पूर्ववत होईल. आणि गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, ह्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न करूर करेन.
सर्वांचे मनापासून आभार! आपला लोभ असाच कायम राहिल आणि मी कायम लिहिता राहिन हीच सदिच्छा! :)

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये

लहानपणी हे कुठल्याशा गाण्यात ऐकलं होतं. पण त्याचा अर्थ तेव्हा फारसा समजला नव्हता. पण मग एक एक उदाहरणं पाहत पाहत हळू हळू अर्थ थोडाफार समजला. पण आज तर असलं भारी उदाहरण पाहायला मिळालं की हे वाक्य केवळ ह्याच घटनेसाठी लिहिलं गेलं असावं असं वाटलं. आत्ताच 'बीबीसी' वर एक बातमी पाहिली. त्याचं झालं असं -
साल २००९ इराकच्या बगदादमध्ये साखळी स्फोट घडतात आणि शेकडो माणसं मरतात. चर्चा अशी सुरू होते, की इतकी सारी स्फोटकं राजरोसपणे बगदादसारख्या प्रचंड सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागामध्ये आलीच कुठून? मग पोलिसांच्या आणि सुरक्षादलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागू लागतात. चौकशी आणि तपास सुरू होतो आणि सगळ्यांचं लक्ष एका छोट्याशा गोष्टीकडे जातं. आणि अनेक मोठी माणसं कपाळाला हात मारतात.
९०चं दशक. अमेरिकन नेव्हीकडे काही उद्योजक जातात आणि म्हणतात, 'आमच्याजवळ सर्व प्रकारची स्फोटकं शोधून काढणारं एक यंत्र आहे.' एक छोटंसं खेळण्यातल्या बंदुकीसारखं दिसणारं यंत्र, ज्याच्यापुढे एक छोटीशी एरियल लावलेली आहे. ती बंदूक धरायची आणि एरियल पूर्ण उघडून चालायचं. एरियल स्फोटकं जिथे असतील त्या दिशेने फिरते. इतकं सोपं आणि सुटसुटीत यंत्र. ते ही प्लॅस्टिकचं. अमेरिकन नेव्ही त्याची परीक्षा घेते आणि ते यंत्र परीक्षेमध्ये फेल होतं. एफबीआय हे यंत्र अमेरिकेत मार्केट होऊ नये असं फर्मान काढतं.
२००० साली इंग्लंडमध्ये असेच काही उद्योजक ब्रिटीश आर्मीकडे जातात आणि चक्क एका मेंबर ऑफ पार्लमेंटच्या शिफारसीवर ह्या यंत्राची चाचणी ठरते. प्राथमिक चाचणी फेल होते. पण तरीसुद्धा चाचणी घेणारे प्रशिक्षित नाहीत असं कारण सांगून पुढची चाचणी पुढे ढकलली जाते.
पण ९० च्या दशकापेक्षा आता जागतिक परिस्थिती बदललेली असते. जग फारच मोठ्या प्रमाणावर साशंक आणि अस्थिर झालंय. नेमक्या ह्याच गोष्टीचा फायदा हे उद्योजक उचलतात. आणि माल्टामध्ये एअरपोर्ट सिक्युरिटी आणि पोलिसांकडे ह्या यंत्राचा प्रस्ताव जातो. शिफारस करणारे काहीजण ब्रिटीश आर्मी आणि पार्लमेंटशी निगडीत असतात. काही चाचण्या फसतात पण तरीही थोड्याप्रमाणात संशयास्पद विक्री होतेच.
नंतर ह्या यंत्राचे प्रस्ताव जगभरच्या अनेक अस्थिर देशांकडे जातात आणि शिफारसी पाहता आणि देशोदेशीच्या सरकारांमध्ये असलेले भ्रष्टाचार पाहता ह्या यंत्रांची प्रचंड प्रमाणावर विक्री होते. त्या देशांच्या यादीत पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान वगैरे देशांचीही नावं आहेत. नशीबानं त्यात भारताचं नाव दिसलं नाही.
पण २००९ मध्ये इराकमध्ये हेच यंत्र सापडल्यावर लोकांच्या भुवया उंचावल्या. इराक सरकारनं काही मिलियन खर्च करून ही यंत्र सुरक्षाव्यवस्थेसाठी विकत घेतली होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे स्फोटकं बिनासमस्या शहरामध्ये प्रवेश करती झाली. शेकडो लोकांचे जीव गेले. चौकशी समिती बसली. बीबीसीनं सुद्धा स्फोटकांच्या तज्ज्ञांबरोबर तपास केला आणि लक्षात आलं की ही यंत्र केवळ खेळणी आहेत. त्यामध्ये स्फोटकं शोधू शकेल असं काहीच नाही. आणि जगभर ही एकसारखीच यंत्र वेगवेगळ्या नावांनी कधी स्फोटकं शोधणारी, कधी ड्रग्ज शोधणारी तर कधी हस्तिदंत शोधणारी म्हणून विकली गेली. आणि सगळ्यांत गंमतीची गोष्ट ही, की असलं एक यंत्र बनवायला जास्तीत जास्त १० ब्रिटीश पौंड एव्हढा खर्च येतो, पण एक एक यंत्र १५००० पौंडांपर्यंत विकलं जातं. माल्टा एअरपोर्टचा सिक्युरिटी हेड आजही टेलिव्हिजनवर सांगतो की हे यंत्र 'फ्रॉड' आहे आणि ते काहीही शोधू शकत नाही. तो त्या यंत्राची खोटी हालचाल कशी होते ह्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवतो.
असं म्हणतात की ह्या यंत्राची शिफारस करणार्‍या ब्रिटीश मेंबर ऑफ पार्लमेंटला एका यंत्रामागे ३००० पौंड मिळणार होते. त्यानं एका काऊंटर टेरर एक्स्पो मध्ये तर खुलेआम त्या यंत्राची वकिली केली होती. तो अजूनही इंटरव्ह्यू मध्ये गोल गोल बोलतो. पण अजूनही तो हे मान्य करत नाही की तो कित्येक जीवांशी खेळलाय.
सगळ्यांत गंमतीशीर गोष्ट ही की ब्रिटीश सरकारनं ह्या यंत्राच्या 'अफगाणिस्तान आणि इराकच्या निर्यातीवर बंदी' घातलीय. कारण, ब्रिटीश आणि मित्र राष्ट्रांच्या सैनिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. बाकी जगभर माणसं मेली तरी चालतील!
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये! हेच खरं.

टीप - ह्या यंत्रांबद्दलची अधिक माहिती इथे पहा.

1/29/2011

झापडं

जन्माला मीही तिथेच आलो
पण बाकीच्यांइतका नशीबवान नव्हतो
माझ्या बापाकडे पैसा नव्हता
रूढार्थाने मी श्रीमंत नव्हतो
मोठं होता होता कळलं
श्रीमंती पैशांची नसते
श्रीमंती असते संस्कारांची
तिथे मी कमनशीबी नव्हतो
नोकरीला लागेस्तोवर जगच बदललेलं
एकदम अंगावर येणारं
प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मागणारं
अन देणारा मी एकटाच नव्हतो
नव्या जगाच्या नियमांना
सरावणं फारच अवघड होतं
संस्कारांवर दरोडा पडला
पण पुरेसा श्रीमंत मी होत नव्हतो
सरकारी चाकांना वंगण लागतं
हे निर्लज्जपणे सांगत होतो
पण कुटुंबाची जवाबदारी उचलणारा
मी काही जगात एकटाच नव्हतो
डोळ्यांवर झापडं घालून चालताना
सगळीकडचा हाहाकार अनुभवत होतो
मी अन माझं घर ह्यापलिकडे
कुणाचं देणं लागत नव्हतो
कॅन्सरसारखी खोल विवेकबुद्धि
हाडांमध्ये रुतून बसलेली
तिची हाक टाळून चालत राहायला
मी कुणी राजकारणी नव्हतो
एक दिवस दुखणं असह्य झालं
अन साकळलेलं रक्त बाहेर आलं
इतक्या वर्षांचा साचलेला आवाज
थांबवायचा प्रयत्न मी करीत नव्हतो
तोंडावर कुलूप लावून जगणार्‍यानं
जगाचा नियम मोडला होता
राखणदारांच्या झोपा उडल्या
पण मी आता थांबणार नव्हतो
तेव्हा जगानं झापडं बंद केली
जेव्हा काडी माझ्या दिशेनं झेपावली
आग मलाच लागली होती
पण मी एकटाच जळत नव्हतो

छंद

लहान असताना मला कुणी विचारलं की तुझा छंद काय? की मी बेधडक कुठलाही विचार न करता सांगायचो, "वाचन!" अगदी लहान असताना पुढचा प्रश्न येत नसे. मी लॉजिकली विचार केला होता. मला वाचायला कंटाळा येत नाही, उलट मजा येते, ह्याचा अर्थ वाचन हा छंद असायला हवा. पण वाचनाचं वेड वगैरे कधी नव्हतं, ही प्रांजळ कबुली दिलीच पाहिजे. अन छंद नसला तरी आवड निश्चितच होती. कारण माझा कुठलाही सो कॉल्ड छंद उदा. स्टँप गोळा करणे, नाणी गोळा करणे, हा एका विशिष्ट टाईम पिरियडच्या पुढे टिकलाच नाही. वर्ष, दोन वर्षं बस. कारण पुढे काय? हा प्रश्न मला अनादि अनंत काळापासून पडत आलेला आहे. म्हणजे आता बघा. मी स्टँप गोळा करतो. बरं मग मी दोनशे स्टँप जमवले. अन एके दिवशी कळतं की कुणा मित्राकडे पाचशे आहेत. मग मी थोडा हिरमुसतो आणि विचार करतो की मी जर पाचशेपर्यंत जरी पोचलो, तरी पुढे अजून कुणीतरी असणारच आणि स्टँप गोळा करून मुळात आपल्याला आनंद मिळतो का? की आपण फक्त स्पर्धा म्हणून हा प्रकार करतो? अर्थात एव्हढे सखोल विचार मी तेव्हा केले होते की नाही माहित नाही, पण थोडक्यात असं की आपण अशी स्पर्धा खेळतोय ज्याला अंत नाही अन (बहुतेक त्यामुळेच) त्यात मजा नाही अशा निष्कर्षाप्रत मी पोचलो अन ते स्टँप किंवा नाण्यांचं कलेक्शन वगैरे प्रकार मी बंद केले.
छंद म्हणजे काय? हा मूलभूत प्रश्न मला तेव्हा पडला. ओके, ऍक्च्युअली इतका मूलभूत नव्हता, 'माझा छंद नक्की कोणता?' इतपत मूलभूत तरी होता. मी बराच विचार केला. नाणी जमवून पाहिली, स्टँप जमवून पाहिले, डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या पैलवानांची कार्डं जमवून अन त्याचा खेळ खेळून झाला, क्रिकेटरांची मिळणारी कार्डं जमवून झाली. पण कशालाच मला छंद म्हणता येईना. कारण त्या सगळ्यांचाच मला एका काळानंतर कंटाळा आला होता. मग असं काय होतं ज्याचा मला कधीच कंटाळा आला नाही. वाचन? खरंतर वाचन हा खूप ढोबळ शब्द आहे. जेव्हा कुणी वाचनाचा छंद आहे म्हणतं तेव्हा ते फार ढोबळ वक्तव्य होतं. कारण वर्तमानपत्र, हँडबिलं, पॅम्प्लेट्स, पुराणं, पौराणिक कथा, साहित्य.. पुन्हा साहित्यामध्ये प्रचंड विविध प्रकार. नक्की काय वाचायला आवडतं?
थोडा मोठा झाल्यावर माझ्या छंद कोणता? ला दिलेल्या 'वाचन' ह्या उत्तरावर सहसा "नक्की काय वाचायला आवडतं?" हा पुढचा प्रश्न असायचा. मग मी निरूत्तर व्हायचो. मग थोड्या शांततेनंतर, "असंच काहीही, चांगली पुस्तकं, तशी वर्तमानपत्रंही, पौराणिक कथासुद्धा.." झाला गेम? तसं सगळंच आहे, पण सगळ्यातलं सगळं नाही. पण माझा एक मित्र आहे, तो खरा क्वालिफाय करतो 'वाचन' छंद म्हणून सांगायला. कारण तो काहीही वाचतो. अगदी तल्लीन होऊन. अक्षरशः काहीही. पण मी नाही वाचू शकत काहीही. म्हणजे जेव्हा एखादं पुस्तक झपाटून टाकतं, तेव्हा मी वेड्यासारखा तहानभूक-झोप विसरून पुस्तक वाचत बसतो, नाही असं नाही. अगदी पु.ल. देशपांड्यांची असू देत, किंवा 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' असू दे किंवा जेम्स हॅडली चेज च्या 'द वेअरी ट्रान्सग्रेसर'च्या शेवटाकडे अंगावर सरसरून काटा येऊन डोळ्यांत पाणी उभं राहू दे किंवा ग्रिशम च्या 'द रेनमेकर' मधल्या नायकाच्या शेवटाकडच्या निवडीवर चेहर्‍यावर स्मित उमटू दे ते अगदी प्रेमचंद ची 'कर्मभूमी' मिलानमध्ये वाचताना दोन तीन दिवस धड जेवणालाही बुट्टी मारण्यापर्यंत मी वाचनाच्या आहारी जातो. पण वाचनाशिवाय राहू शकत नाही असं म्हणणं अति होईल. काही काही लोकांना खरंच वाचनाशिवाय राहता येत नाही, अन मला अशा लोकांचा हेवा वाटतो. पण मला जमतं बुवा! म्हणजे 'वाचन'ही बाद. पण छंद म्हणून सांगायचं काय, म्हणून मी 'Anything except career books' अशी एक पळवाट काढली. कारण मी बाकी काहीही सहन करू शकतो, पण करियर टाईपची बुक्स मला झेपत नाहीत. 'तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार' टाईप संदेश असला की मी सहसा दूर असतो.
लहानपणापासून दुसरी एक हौस आहे. लेखनाची! 'कविता' वगैरे, ह्याबद्दल पूर्वीही लिहिलेलं थोडं. अन ते करताना मजाही यायची. अगदी घुसून जायला व्हायचं. अजूनही होतं. पण लिखाणाचं मोटिव्हेशन काय? प्रोत्साहन कुठून मिळतं? तर लिहिलेलं चार लोकांनी वाचलं तर. प्रचंड दुःखी असताना किंवा घुसमट होत असताना लिहिलेलं काही फार वैयक्तिक स्वरूपाचं लिखाण (स्ट्रेस मॅनेजमेंट) सोडता बाकी मी जे काही लिहितो, ते कुणीतरी वाचेल ह्या अंदाजानंच. त्यामुळे ते लोकांसमोर यावं ही सुप्त इच्छा कायमच प्रत्येक क्षणी डोक्यात असते. माझ्यासाठी लिखाण जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक आहे कुणीतरी ते वाचणं. अभिप्राय देणं न देणं हे सर्वस्वी वाचकावर. पण ते लोकांपर्यंत पोचणं मला फार महत्वाचं वाटतं. का ते मला माहित नाही, पण हे अगदी लहानपणापासून आहे. मी लिहिलेल्या कविता किंवा कथा फारशा कधी लोक काय म्हणतील म्हणून दडवून ठेवल्यात असं झालं नाही. आई-बाबांना वाचून दाखवायचो. शाळेच्या मासिकाला द्यायच्या. मग कॉलेजच्या असं करत करत आता ब्लॉगपर्यंतचा प्रवास. जेव्हा मनुष्य कुठलीही गोष्ट ब्लॉगवर पब्लिकली पब्लिश करतो तेव्हा ती पर्सनल कधीच असू शकत नाही. कुणीतरी वाचावं म्हणूनच असते. ह्याचा अर्थ मीही हा ब्लॉग रेकग्निशनसाठीच लिहितो. उगाच ताकाला जाऊन भांडं कशाला लपवा. मी स्वतःसाठी लिहितो हे जरी सत्य असलं, तरी ते पूर्णसत्य नाही. पण लेखनामध्ये मात्र मी वाचनासारखा नाही, मी लिहायला काहीही लिहू शकतो. अर्थात ते चांगलं असेलच असं नाही. पण त्याचा कंटाळा नाही. कितीही अन काहीही!
माझी तिसरी अन लेटेस्ट म्हणजे गेल्या पाचेक वर्षांतली आवड म्हणजे सिनेमे. अन ही आवड ऑलमोस्ट वेडाच्या उंबरठ्यावर आहे. सिनेमे लहानपणापासून पाहिले, पण एका अंतरावरून. पण 'ओल्डबॉय' ने प्रत्यक्ष सिनेमाशी गळाभेट घडवली. सिनेमा अंगावर येतो किंवा विचारप्रवृत्त करतो किंवा अंतःकरण हेलावून सोडतो म्हणजे काय, हे 'ओल्डबॉय' ने दाखवलेल्या वाटेवर चालल्यानंतर कळू लागलं. मग पेपरात समीक्षकांनी किंवा सिनेजाणकारांनी लिहिलेल्या गोष्टींचे अर्थ उमजू लागले, समजत आधीही होते. आणि सिनेमाचं वेड इतकं भारी पडू लागलं, की पूर्वी मोकळ्या वेळात हातात येत असलेलं पुस्तक तसंच न वाचता पडून राहू लागलं. सुरूवात झाली वाचायला तरच झपाटायला होणार, पण इथे पुस्तकाला सुरूवातही होत नाही आताशा!
तर थोडक्यात अजूनही माझा छंद नक्की कोणता? हा प्रश्न बर्‍यापैकी अनुत्तरित आहे. पण बहुतेक निवडक वाचन, लेखन अन सिनेमा असे तीन छंद आहेत असं ढोबळमानाने म्हणता येईल. हुश्श! चला एक प्रश्न निकाली निघाला. आता आपण अजून मूलभूत प्रश्नाकडे वळू. छंद म्हणजे नक्की काय?
मला ठाऊक आहे. प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा क्रम चुकलाय. पण आधी लौकिकदृष्ट्या महत्वाचा प्रश्न सोडवणं महत्वाचं होतं. आत्मिक अन आध्यात्मिक प्रश्न नेहमी शेवटी सोडवावेत. तस्मात आता मूलभूत प्रश्न.
छंदाची एक जबरदस्त व्याख्या आहे. जे करताना माणसाला आनंद मिळतो, तो त्याचा छंद! अन ही एकदम बँग-ऑन वगैरे म्हणतात ना तशा टाईपची व्याख्या आहे. पण लोक इथे एक पायरी ओलांडून पुढे जातात अन म्हणतात जेव्हा माणसाचा छंद आणि उत्पन्नाचं साधन एक असतं, तेव्हा तो माणूस सर्वांत सुखी असतो. पण इथे एक गोम आहे. जेव्हा छंद उत्पन्नाचं साधन बनतो, तेव्हा त्यामध्ये व्यावसायिकता येण्याची दाट शक्यता निर्माण होते. माणसाला ती सीमारेषा न ओलांडण्याची तारेवरची कसरत करावी लागते. तरच तो खर्‍या अर्थाने अर्थार्जन अन छंदजोपासणी दोन्ही करू शकतो. पण बरेचदा परिस्थितीमुळे म्हणा किंवा वाईट संगतीमुळे ही सीमारेषा पार होते आणि छंदाचं रूपांतर व्यवसायात होतं. आणि एकदा तो व्यवसाय झाला की त्यातनं आनंद मिळणं बंद होतं.
हल्लीच्या मुलांकडून पालक ज्या मणामणांच्या अपेक्षा ठेवून छंद 'जोपासायला' लावताना दिसतात ते पाहून कधी कधी बरं वाटतं की आपल्याला लहानपणी 'वाचन' हा एकदम हार्मलेस छंद होता! अन कुठल्याच छंदाचा तेव्हा व्यवसाय झालेला नव्हता.

1/28/2011

जाळ

गेल्या दोन आठवड्यांपासून जगामध्ये एक फार मोठा बदल व्हायला सुरूवात झालीय. बर्‍याच जणांना त्या बदलाचं महत्व कळत नसलं तरी त्याचे सुरू झालेले अन पुढे होतच राहणारे परिणाम प्रचंड दूरगामी असतील. हा बदल म्हणजे मध्यपूर्वेमध्ये (अर्थात पश्चिम आशिया अन उत्तर आफ्रिकेचा काही भाग) सुरू झालेली सरकारविरोधी आंदोलनं.
मध्यपूर्व हा जगाची तेलाची गरज पुरवण्यामध्ये फार महत्वाचा वाटा उचलणारा भाग आहे. आणि योगायोगाने हा भाग बहुतांशी अरब अन त्यातही मुस्लिमबहुल असा आहे. इस्लामची पताका इथूनच जगभर गेल्यामुळे अरबी मुस्लिम हे जरा जास्तच कट्टर आहेत. पण त्याच कारणामुळे इथल्या बहुतांश देशांमध्ये उत्तम शिक्षणाचं फारसं महत्व नाही. त्यातच ह्या भागामध्ये तेलाचे प्रचंड साठे असल्यानं औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा सर्व देशांचे इथे हितसंबंध असणं नेहमीच जरूरी होतं. ह्या धंद्यामध्ये अमेरिका नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे, कारण वर्षांनुवर्षांपासून अमेरिकेची तेलाची भूक महाप्रचंड आहे. आणि त्याचबरोबर इस्रायल हे अमेरिकेच्या मांडीवरचं बाळही तिथेच शत्रूंच्या मधोमध राहत असल्यानं तिथे आपली माणसं असणं अमेरिकेसाठी अत्यावश्यक ठरतं. त्यामुळे अमेरिकेने ह्या देशांमध्ये अनेक हुकूमशहा पोसलेले आहेत. जे गेली कित्येक दशकं अशिक्षित अन गरीब जनतेला नाडत सिंहासनांवर बसून आहेत. कधी थेट हुकूमशहा म्हणून तर कधी खोट्या लोकशाहीचा मुखवटा घालून. एकंदर ह्या भागामध्ये गरिबी अन शिक्षणाचा अभाव फार असल्याकारणाने सत्तेवरची मांड लष्कराच्या मदतीनं टिकवणं सोपं जातं.
पण गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटच्या प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रसाराने लोकांच्या, विशेषतः तरूणांच्या आतल्या खदखदणार्‍या विचारांना वाट मिळाली. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून त्यांना व्यक्त होण्याची अन जगाच्या पाठीवरच्या समविचारी लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. इथल्या सरकारांनी कधी माहिती तंत्रज्ञानच काय कसलीच व्यवस्था नीट न ठेवल्यामुळे इंटरनेटचा विस्तारही अव्यवस्थितपणेच होत होता. पण हेच बंडखोर तरूणांच्या पथ्यावरही पडलं कारण त्यांना रोखण्यासाठीही फारसं काही केलं जाऊ शकत नव्हतं. इराण किंवा सौदी अन इतर काही देशांमध्ये बंडखोर तरूणाईच्या इंटरनेट स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचाही प्रयत्न झाला, पण तरूणाई ह्या सगळ्याला पुरून उरली. जग छोटं झाल्यामुळे सगळ्या जगभरात चालणार्‍या गोष्टी, लोकशाही मूल्य अन पुरोगामी विचार ह्यांसारख्या गोष्टी ह्या भागातील लोकांनाही कळू लागल्या. आणि त्यातच गेल्या वर्षीपासून आलेल्या जागतिक मंदीमुळे मध्यपूर्वेतल्या छोट्या देशांची तर अवस्था बिकटच झाली. पण अर्थात जनतेची, शासकांची नाही. त्यामुळे लोकांमध्ये इतक्या काळापासून खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्ह होतीच. प्रथम इराणमध्ये झालेलं अयशस्वी अन निर्दयरित्या दडपलं गेलेलं सरकारविरोधी आंदोलन हे त्याचीच नांदी होतं.
आणि आता आठवड्याभरापूर्वी ट्युनिशियात घडलेली ते अभूतपूर्व आंदोलन. ट्युनिशिया, हा जागतिक नकाशावरचा एक ठिपका. पश्चिम आशियाला जवळ असणार्‍या उत्तर आफ्रिकेच्या किनार्‍याने वसलेला एक छोटासा देश. अक्षरशः इतका छोटा की आम्ही शाळेत नकाशा खेळताना (ह्या खेळात प्रतिस्पर्ध्याला नकाशावरचं एक ठिकाण शोधायला सांगायचं असतं) ट्युनिशिया हमखास सांगत असू. माझी अन ट्युनिशियाची पहिली ओळख ती अन दुसरी ही की त्यांची फुटबॉल टीम बरीच तगडी आहे. तर अशा ह्या नगण्या ट्युनिशियात गेली काही दशकं राज्यपदावर बसलेल्या राष्ट्रप्रमुखाविरूद्ध आंदोलन होतं आणि मोठ्या सातत्याने दडपशाहीविरूद्ध प्रक्षुब्ध जनता आणि तरूणाई आपल्या मागण्या लावून धरते आणि शेवटी त्या राष्ट्रप्रमुखाला देश सोडायला भाग पाडते, ही अभूतपूर्व घटना गेल्या आठवड्यात घडली.
अरब जगताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जनतेनं 'यशस्वी' उठाव घडवून आणला. आणि एकजात सारे अरब नेते हडबडून गेले. कारण त्यातले जवळपास सगळेच कमीअधिक फरकाने हुकूमशहा. आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व प्रगतीमुळे सार्‍या जगानं ही घटना पाहिली आणि ती सार्‍या जगापर्यंत व्यवस्थित पोचवायचं काम सोशल नेटवर्किंग साईट्सनीही केलं. ह्यामुळे आता मध्यपूर्वेच्या सगळ्या देशांमधल्या तरूणाईला एक आदर्श मिळालाय. एक असं उदाहरण जे आशादायी आहे. संपूर्ण व्यवस्थाच उलथून टाकणे हा मार्ग आचरण्यासाठी बरीच तरूणाई उत्सुक आहे. त्यामुळे लगेचच शेजारी अल्जेरियात उठाव सुरू झालेत. आणि आज इजिप्तमध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झालंय.
वर्षांनुवर्षं लोकांना गृहित धरून स्वतःची घरं भरणार्‍या राजकारण्यांना यःकश्चित प्रजाजन देशातून हुसकावून लावायच्या प्रयत्नात आहेत. एका ठिकाणी तर यशस्वीही झालेत आणि बाकी ठिकाणी लढाया सुरू झाल्यात. माझ्या मते तर ही खूप लांब चालणारी लढाई असेल. ह्या हुकूमशहांचे आलिशान प्रासाद जाळून आंदोलनकर्ते योग्य तो संदेश परिणामकारकपणे देताहेत. हा जाळ आता लवकरच पसरेल आणि जर हुकूमशहा जाऊन तिथे योग्य तशी लोकशाही येऊ शकली तरच खरा विजय ठरेल पण अमेरिकेसह तमाम स्वार्थी युरोपियन देशांचे वांधे होतील. अन्यथा अराजकच माजेल आणि त्यात जनतेची परवड अन अजून एखाद्या हुकूमशहाचा उदय एव्हढंच निष्पन्न होईल. पण दोन्हीही परिस्थितींमध्ये जगामध्ये अन जगाच्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत आहेत. ही उलथापालथ अगदी रातोरात नाही झाली तरी हळूहळू पण निश्चितपणे होईल आणि कायमस्वरूपी परिणाम करेल.
पण हा जाळ भारतात कधी येईलसं वाटत नाही. आपले लोक फारच निर्ढावलेत. इतके घोटाळे रोजच्या रोज बाहेर येऊनही फक्त घराणं, नातेवाईक हे बघूनच आपले लोक वर्षांनुवर्षं मतदान करताहेत. सरकारला जाब विचारणं दूरच साधा विरोध प्रदर्शित करणंही आपल्या लोकांच्यानं होत नाही. रोज एकेका जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत चाललेत पण आपल्याला पुतळे, इतिहास, जात ह्या गोष्टींमध्ये प्रचंड स्वारस्य आहे. आणि अन्यायविरोधी आंदोलनांसाठी नाही तर जातीपाती अन धर्मांवरून दंगलींसाठी जाळपोळ करायला अन रक्त सांडायला आपले लोक तयार आहेत.
आपल्या माणसांना कधीतरी हे समजेल का की मेणबत्त्या आणि संग्रहालयं पेटवून काही होत नाही. आयुष्याच्या मशाली पेटवायला लागतात आणि त्यांतूनच जो जाळ निर्माण होतो तो जगातल्या मोठ्यांतल्या मोठ्या पापाच्या पैशांच्या प्रासादांना स्वाहा करायची ताकद ठेवतो.

1/27/2011

अनुवाद -१

ब्लॉगवर सगळे प्रकार हाताळून बघायचे असं सध्या डोक्यात चालू आहे. त्यामुळे आज फारसं काही सुचत नसल्याचा मुहूर्त साधून 'अनुवाद' हा प्रकार धरावा असं ठरवलंय. अनुक्रमांक अशासाठी, की पुन्हा कधी अशीच 'शून्य वैचारिक अवस्था' आली की अनुवादाचं शस्त्र काढायला बरं!

डॉ. व्हिक्टर फ्रँकल हा एक मानसशास्त्रज्ञ नाझींच्या ज्यू छळाच्या पर्वामध्ये छळछावणीमध्ये होता. ऑशविट्झ च्या कुप्रसिद्ध छळछावणीत जाऊनही जिवंत परत आलेल्यांपैकी हा एक. व्हिक्टर फ्रँकलनं ह्या छळादरम्यानदेखील स्वतःच्या अभ्यासामध्ये बरीच भर घातली. त्यानं तर बाहेर पडल्यानंतर आपल्या अनुभवांवरून मानसशास्त्रातल्या नवीन उपचारपद्धतीही शोधल्या. आपले छळछावणीतले अनुभव अन त्यावरून त्यानं बनवलेली उपचारपद्धती असं एक पुस्तक त्यानं लिहिलेलं आहे. अन ते जगभरात बरंच नावाजलंही गेलंय. 'मॅन'स सर्च फॉर मीनिंग' असं पुस्तकाचं नाव. मी ह्या पुस्तकाची-खासकरून 'छळछावणीतले अनुभव' ह्या भागाची पारायणं केलेली आहेत. त्यामुळे 'अनुवाद' ह्या प्रयोगाची सुरूवात ह्या पुस्तकातल्याच एका उतार्‍यापासून करतोय.

मूळ उतारा -

The prisoner who had lost faith in the future-his future-was doomed. With his loss of belief in the future, he also lost his spiritual hold; he let himself decline and became subject to mental and physical decay. Usually this happened quite suddenly, in the form of a crisis, the symptoms of which were familiar to the experienced camp inmate. We all feared this moment-not for ourselves, which would have been pointless, but for our friends. Usually it began with the prisoner refusing one morning to get dressed and wash or to go out on the parade grounds. No entreaties, no blows, no threats had any effect. He just lay there, hardly moving. If this crisis was brought about by an illness, he refused to be taken to the sick-bay or to do anything to help himself. He simply gave up. There he remained, lying in his own excreta, and nothing bothered him any more.
I once had a dramatic demonstration of the close link between the loss of faith in the future and this dangerous giving up. F---, my senior block warden, a fairly well-known composer and librettist, confided in me one day: "I would like to tell you something, Doctor. I have had a strange dream. A voice told me that I could wish for something, that I should only say what I wanted to know, and all my questions would be answered. What do you think I asked? That I would like to know when the war would be over for me. You know what I mean, Doctor-for me! I wanted to know when we, when our camp, would be liberated and our sufferings come to an end."
"And when did you have this dream?" I asked.
"In February, 1945," he answered. It was then the beginning of March.
"What did your dream voice answer?"
Furtively he whispered to me, "March thirtieth."
When F-- told me about his dream, he was still full of hope and convinced that the voice of his dream would be right. But as the promised day drew nearer, the war news which reached our camp made it appear very unlikely that we would be free on the promised date. On march twenty-ninth, F-- suddenly became ill and ran a high temperature. On March thirtieth, the day his prophecy had told him that the war and suffering would be over for him, he became delirious and lost consciousness. On March thirty-first, he was dead. To all outward appearances, he had died of typhus.

Those who know how close the connection is between the state of mind of a man-his courage and hope, or lack of them-and the state of immunity of his body will understand that the sudden loss of hope and courage can have a deadly effect. The ultimate cause of my friend's death was that the expected liberation did not come and he was severely disappointed. This suddenly lowered his body's resistance against the latent typhus infection. His faith in the future and his will to live had become paralysed and his body fell victim to illness-and thus the voice of his dream was right after all.

अनुवाद -

ज्या कैद्याचा स्वतःच्या भविष्यावरून विश्वास उडायचा, तो संपलाच होता. त्याचं आत्मिक भानही सुटायचं. तो स्वतःला कोसळू द्यायचा आणि मानसिक अन शारिरीक स्तरावर त्याची अधोगती सुरू व्हायची. हे सहसा अगदी अचानक घडायचं, एखाद्या समस्येच्या रूपात अन अनुभवी कैद्यांना लगेच ह्या लक्षणांचा अर्थ लागायचा. ह्या क्षणाची आम्हा सर्वांनाच भीती वाटायची, पण स्वतःसाठी नाही कारण त्याला अर्थ नव्हता, तर आमच्या मित्रांसाठी. सहसा ह्याची सुरूवात एखाद्या कैद्यानं एका सकाळी उठायला, आंघोळ करायला, अन कपडे घालून परेड ग्राऊंडवर जायला नकार देऊन व्हायची. कुठल्याही प्रकारच्या विनवण्या, लाथा-बुक्के अन धमक्यांचा कसलाही परिणाम नाही. तो तसाच तिथे पडून राहायचा अगदी निश्चल. जर ही समस्या एखाद्या आजारपणामुळे निर्माण झालेली असेल तर तो स्वतःला आजारी कैद्यांच्या राखीव जागेत न्यायला नकार द्यायचा किंवा स्वतःसाठी काहीच न करता निश्चल पडून राहायचा. त्यानं आशा सोडून दिलेली असायची. तिथेच स्वतःच्याच मलमूत्रात पडलेल्या त्याला आता कशानंच काही फरक पडणार नसायचा.
एकदा मला भविष्यावरून उडालेला विश्वास अन ह्या भयंकर अशा परमोच्च नैराश्याच्या अवस्थेतील जवळच्या संबंधाचा मोठा नाट्यपूर्ण अनुभव आला. क्ष, माझा सिनियर ब्लॉक वॉर्डन, एक बर्‍यापैकी प्रसिद्ध संगीतकार जो ओपेराच्याही रचना लिहायचा, एक दिवस मला विश्वासात घेऊन सांगू लागला, "मला तुला काहीतरी सांगायचंय, डॉक्टर. मला एक विचित्र स्वप्न पडलं. एक आवाज मला म्हणाला की इच्छा असेल त्याप्रमाणे मी मला काही जाणून घ्यायचं असल्यास विचारू शकतो, आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुला काय वाटतं, मी काय विचारलं? की मला हे जाणून घ्यायचंय की माझ्यासाठी हे युद्ध केव्हा संपेल. तुला कळलं डॉक्टर, मला काय म्हणायचंय - माझ्यासाठी! मला जाणून घ्यायचं होतं की केव्हा आपण, आपला कॅम्प मुक्त होईल आणि आपल्या वाटचे भोग संपतील."
"आणि हे स्वप्न तुला केव्हा पडलं?" मी विचारलं.
"फेब्रुवारी १९४५ मध्ये." तो म्हणाला. तेव्हा मार्चची सुरूवात नुकतीच होत होती.
"अन तुझ्या स्वप्नातल्या आवाजानं काय उत्तर दिलं?"
तो हळूच माझ्या कानात म्हणाला, "तीस मार्च."
जेव्हा क्ष नं मला त्याच्या ह्या स्वनाबद्दल सांगितलं, तेव्हा तो प्रचंड आशावादी होता अन त्याला पूर्ण विश्वास होता की त्याच्या स्वप्नातला आवाज बरोबर बोलतोय. पण जसजसा सांगितलेला दिवस जवळ येत गेला, आमच्या कॅम्पवर येणार्‍या युद्धाच्या बातम्यांवरून हे स्पष्ट होत गेलं की सांगितलेल्या दिवशी आमचं मुक्त होणं अशक्यप्राय होतं. एकोणतीस मार्चला क्ष आजारी पडला अन तापाने फणफणला. अन त्याच्या भाकिताप्रमाणे युद्ध अन भोगांपासून त्याच्या मुक्तीसाठी ठरलेल्या दिवशी म्हणजे तीस मार्चला तो भ्रमिष्ट झाला अन त्याची शुद्ध हरपली. एकतीस मार्चला, तो गेला. तसं तिर्‍हाईतासाठी, लक्षणांवरून त्याचा मृत्यू टायफसमुळे झाला होता.

ज्यांना माणसाची मानसिक अवस्था (धैर्य अन आशा किंवा निराशा) अन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती ह्यांच्यातल्या जवळच्या संबंधाची कल्पना आहे त्यांच्या लक्षात येईल की, अचानक गमावलेलं धैर्य किंवा नैराश्याचा झटका भयंकर परिणामांना कारणीभूत ठरू शकतो. माझ्या मित्राच्या मृत्यूचं अस्सल कारण हे होतं की अपेक्षित मुक्ती आलीच नाही अन त्याचा प्रचंड भ्रमनिरास झाला. ह्या घटनेमुळे त्याच्या शरीराचा सुप्त रूपातल्या टायफसच्या संसर्गाविरूद्धचा प्रतिकार एकदम कमी झाला. त्याचा स्वतःच्या भविष्यावरचा विश्वास उडाला अन त्याची जगण्याची इच्छाच लोप पावली आणि त्याचं शरीर आजारपणाला बळी पडलं - अन त्याअर्थी त्याच्या स्वप्नातला आवाज खरा झाला.

ह्या पुस्तकाची विकिपीडिया लिंक.

1/26/2011

काही (फुटकळ) चारोळ्या

(माथाटीप - सर्वांच्या वतीने 'आवरा' मी आधीच म्हणून घेतोय स्वतःला, पुनरुक्ति टाळावी :D )

कधीतरी शांतपणे चालताना विचित्र जाणीव होते
काहीतरी मागे सुटून गेलं अन नकळत वाट वळते
नव्या नवख्या वाटेवरती नवलाईच्या सोबतच
सुटून गेलेल्या कसलीतरी रूखरूख लागून राहते

----

ऋतू तो पानगळीचा जरी ओरबाडून गेला
दिसण्यास तो जरीही सर्वस्व घेऊनी गेला
तरी अंतरी अजूनी तो ध्येयाग्नी आहे
मी वृक्ष कालही होतो मी वृक्ष आजही आहे

----

लाटांच्या आधाराने समुद्र लाथाडीत होतो
क्षितिजाच्या नजरेने सूर्य बुडवीत होतो
बुडता बुडताही तो फिस्सकन हसला
अन कल्पनेचा प्रयत्न कल्पनेतही फसला

----

उदास संध्याकाळी एकट्या वाटसरूला
ना चालण्यात मर्जी ना थांबण्यात अर्थ
दूर थांबलेले पैलतीर ते खुणावे
जड संथ पावले पण सावलीत गर्क

----

वेडा म्हणून कोणी मला एकदा हाक मारली
मी नजर वर करून भुवई वर केली
दोन क्षण नजरानजर झाली अन
'हाक मी नाही मारली' म्हणत प्रतिबिंबानंच नजर खाली केली

----

दिसतोस उंच शांत ऐटीत डोलताना
स्वातंत्र्यदिन कधी अन गणतंत्रदिनही आहे
मज पामरास किंतु अप्रूप काय त्याचे
भाकरीच्या चंद्रकळांना मी ओळखून आहे!

----

1/25/2011

झोल आहे

झोल आहे

कविता करायची आहे असं ठरवून
कागद पेन घेऊन बसणं फोल आहे
नेहमीच असं घडतं म्हणजे
आपल्याच अकलेत झोल आहे

फुका ट ला ट करण्यापेक्षा
अर्थवाही शब्दांना मोल आहे
पण तेदेखील जमण्याइतपत
आपली बुद्धि कुठे खोल आहे?

हल्ली जिकडे बघावं तिकडे
कसलं ना कसलं ओपिनियन पोल आहे
पण सत्तेच्या खुर्चीत सगळा प्रकार
होल ऍन्ड सोल आहे

आमची कविता म्हणजे
राष्ट्रकुलमधला ओव्हररेटेड टॉयलेट पेपर रोल आहे
अन कांदा महागल्यानं हुंगवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या
फाटक्या बुटाचा सोल आहे

एका कडव्यात तरी राजकीय भाष्य
हा कवीनं ठरवलेला गोल आहे
बाकी कविता म्हणजे कापला गेलेला
पतंग भरदोल आहे

स्वतःच्याच स्वतःबद्दलच्या गैरसमजांची
केलेली पोलखोल आहे
स्वतःलाच समजावण्याचा एक प्रयत्न की
"मित्रा, दुनिया गोल आहे"

स्वतःला कवि न समजण्याइतपत
समज माझी समतोल आहे
प्रतिभावंत हिर्‍यांच्या गर्दीत
मी आपला एक कोल आहे..

(टीप - उगाच काहीही)

1/24/2011

सिनेदिग्दर्शक सचिन यांस अनावृत पत्र

प्रिय सचिनजी,

पत्र लिहिणेंस कारण की, नुकताच आपला नवा(?) सिनेमा 'आयडियाची कल्पना' पाहण्याचा (कालसर्प)योग आला अन आपणांस पत्र लिहिल्यावाचून राहावले नाही. 'मी लहानपणापासून आपला चाहता आहे' वगैरे असली पुस्तकी विधाने मी करणार नाही पण आपलं गोंडस रूप, मग ते 'उठा, राष्ट्रवीर हो' मधलं असो, किंवा 'सत्ते पे सत्ता' मधला शनि असो नेहमीच मला भावलं होतं हे मात्र तितकंच खरं. त्यानंतर थोडं कळू लागल्यानंतर स्वतःच्या बळावर 'लेखन-दिग्दर्शन-निर्मिती' करून पुन्हा अभिनय करून बर्‍यापैकी दर्जाचे मराठी सिनेमे काढणारा एक कलावंत म्हणून तुमचं कौतुक अन अभिमानही वाटायचा. तुमच्या 'तू-तू-मैं-मैं' चा मी कट्टर चाहता. पण तुम्ही हिंदीत कधी मोठे न होऊ शकल्याचं दुःखही नेहमी 'अखियों के झरोकों' से पाहिल्यावर होत असे. पण जसजसा मोठा होत गेलो अन समज येत गेली, तसतसा हिंदीतलं यश जरी सुखावणारं अन आर्थिकदृष्ट्या मोठं असलं, तरी ते न मिळणं म्हणजे आयुष्याचं नुकसान नव्हे असं अनेक प्रादेशिक (केवळ मराठीच नव्हे) कलावंतांकडे पाहून लक्षात येऊ लागलं. मात्र तुमच्या मनात तो सल कुठेतरी आजही कायम आहे ह्या गोष्टीची कल्पना तुमच्या सिनेमातल्या काही संवादांवरून आली अन विषाद वाटला.
सिनेमातल्या ह्या संवादांमध्ये हिंदीची श्रीमंती अन मराठी सिनेमाची गरीबी ह्या गोष्टीवर इतका भर देण्यात आलाय की गेल्या पाचेक वर्षांत नुसती बजेटपातळीवर नव्हे, तर बजेटच्या योग्य नियोजनाच्या पातळीपासून ते तांत्रिक अन मार्केटिंगपातळीवर क्रांती घडून आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतच बनलेला हा चित्रपट आहे ना अशी शंका यावी. उत्तमोत्तम कथावस्तू मराठी वाड्मयापासून ते मराठी नाटकांपर्यंत उपलब्ध असताना आपणांस एका पडलेल्या (किंवा फारशा न चाललेल्या म्हणा) हिंदी चित्रपटाची भ्रष्ट आवृत्ती का काढावीशी वाटली (ते ही 'आम्ही सातपुते' चं उदाहरण ताजं असताना) हे मला पडलेलं कोडं आहे. कथावस्तू सोडून पुढे गेलं, तर संवादांमध्ये जाणवणारं दारिद्र्य हे मन विषण्ण करणारं होतं. अनेकानेक उत्तमोत्तम विनोदी चित्रपट देणारे हेच आपण का? असं कोडं मला वारंवार विनोदी होण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे संवाद पाहून पडत होतं. (एकंदरच मी एकामागून एक पडणार्‍या कोड्यांमध्ये गुंतलो होतो.) तांत्रिक पातळीवर पाहण्यास जावे, तरी हल्लीच्या एकंदर सिनेमाकडे पाहता, आपल्यासारख्या जुन्याजाणत्या कलाकाराच्या चित्रपटात अजून सफाई अपेक्षित होती. अन कलादिग्दर्शनाबद्दल जितकं कमी बोलेन तितकं चांगलं. एकही सेट डोळ्यांत भरत नाही, अन लोकेशन्सही ऍडजस्ट केल्यागत वाटतात. अर्थात मी काही मोठा सिनेजाणकार नव्हे, पण एका सामान्य सिनेप्रेमीला जे खटकू शकतं तेच सांगतोय, ते ही केवळ तुमच्या अन मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमापोटी.
सेट अन तांत्रिक पातळीसाठी बजेटचा मुद्दा पुढे येईल हे मी जाणून आहे, पण शिवाजीराजे भोसलेसारख्या सिनेमाला अर्थसहाय्य देणारा मनुष्य तुमच्या सिनेमासाठी हात आखडता असा किती घेईल हा प्रश्न मनात येतोच. मग बजेटचं योग्य नियोजन झालं नसेल का? असाही एक प्रश्न पडतो. खरंच सांगतो, मला ह्या सगळ्यांतला 'ब' ही कळत नाही, पण सामान्य सिनेरसिकाला हे प्रश्न पडू शकतात. अन तुमच्यावर वर्षांनुवर्षं असलेल्या प्रेमामुळे अन लोभामुळे हे प्रश्न खुलेपणी विचारण्याचा हक्क आम्हाला मिळतो असं समजूनच चालतोय मी. हा आगाऊपणा वाटू शकेल, पण तुम्ही पोटात घालाल अशी आशा करतो.
पुढची गोष्ट म्हणजे आता तुम्ही 'हिरो' म्हणून पुढे येण्याचा अट्टाहास सोडावा अशी कळकळीची विनंती. कारण आपण बिलकुलच तरूण दिसत नाही. आपला चेहरा अन पोट झाकण्यासाठी ठेवलेला आऊट शर्ट आपलं वय सहजच सगळ्यांसमोर आणतो. अन जर आपल्याला खरंच हिरोची कामं करायचीच आहेत, तर रजनीकांतचा मेकअप आर्टिस्ट अन त्या दर्जाचे कॅमेरे आणण्यास सुरूवात करा, नाहीतर आपला प्रयत्न खरोखर उघडा पडत होता, अन मला खरंच अपार यातना होत होत्या. 'अखियों के झरोकों से', 'बालिका बधू', 'गंमत जंमत' वगैरेंमधले कुठे तुम्ही ते रूबाबदार सचिन, अगदी 'नवरा माझा नवसाचा' मध्येही आपलं वय दिसूनही व्यक्तिरेखेसोबत शोभत होतं, पण इथे मात्र तरूण दिसण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाखेरीज मला काहीही दिसत नव्हतं, अन फार फार वाईट वाटत होतं.
अशोक सराफ, महेश कोठारे अन निर्मिती सावंतसारख्या चांगल्या कलावंतांना वाया घालवण्याचं अर्ध काम स्क्रिप्टनं केलं अन उर्वरित काम संवादांनी अन दिग्दर्शनानं मिळून केलं. निर्मिती सावंत ह्यांची व्यक्तिरेखा तर पहिल्यापासूनच शेंडा-बुडखा नसलेली आहे अन महेश कोठारेंना फक्त 'डॅम इट' म्हणायला सिनेमात घेतलंय की काय? असा प्रश्न पडावा इतपत त्यांच्या व्यक्तिरेखेची कधी कधी गळचेपी होते. अशोक सराफ ह्यांची भूमिका कथेच्या दृष्टीनं खरं म्हणजे मध्यवर्ती असायला हवी होती (जशी 'लाखों की बात' मध्ये संजीव कुमारची होती) पण तुमच्या स्वतःबद्दलच्या ऑब्सेशनमुळे तिथे थोडासा बट्ट्याबोळ झालाय.
स्वतःच स्वतःचं फॅन असणं काही चूक नाही. शाहरूख खान अन करिना कपूर ही त्याची ढळढळीत (यशस्वी) उदाहरणं. पण ते कुठे दाखवावं ह्यामुळे बराच फरक पडतो. प्रस्तुत चित्रपटात ह्या गोष्टीचा अतिरेक झाल्यागत वाटतो अन बरेचदा काही प्रसंग नको तेव्हा हास्यास्पद होतात. अन क्लायमॅक्सचा प्रसंग विचित्र पद्धतीने हास्यास्पद वाटण्याइतपत खेचला गेला आहे. त्याचबरोबर सिनेमाला अर्थसहाय्य मिळतं म्हणून 'सरोगेट ऍडव्हर्टायझिंग' चा वापर करणं ही युक्ति चांगली होती. पण ज्या पद्धतीनं त्या जाहिराती झाल्यात, त्यांच्यासमोर सुभाष घईंच्या 'यादें' मधल्या 'पासपास' च्या जाहिरातीसुद्धा जास्त कल्पक वाटतात. पण सगळ्यांत वाईट म्हणजे MRI चा फुलफॉर्म 'Magnetic Resonance Imaging' असा आहे, पण सिनेमातल्या हॉस्पिटलच्या सेटमध्ये चक्क 'Medical Resonance Imaging' असं लिहिलेलं दिसतं.
भार्गवी चिरमुलेचं काम जरी ठीक झालं असलं तरी एकंदरच आपली अन तिची जोडी कुठेही सूट होत नसल्यामुळे अन तिच्याही व्यक्तिरेखेला शेंडाबुडखा नसल्याने (एकंदरित थोड्याफार प्रमाणात अशोक सराफ ह्यांची व्यक्तिरेखा सोडल्यास सगळ्यांच व्यक्तिरेखा बिन शेंडा-बुडख्याच्या आहेत) बरेचदा कंटाळवाणंच वाटतं. त्यातून तिच्यासाठी जे पेहराव वापरले आहेत, ते अनेकदा इनऍप्रॉप्रियेट वाटतात.
संगीतामध्ये अवधूत गुप्तेंनी दिलेली लावणी चांगली आहे अन टायटल साँग (जे कुणी संगीतबद्ध केलंय ते मला ठाऊक नाही) हे दोन वगळता काहीही लक्षात राहिलं नाही.
आपल्या सिनेमाबाबत इतकं वाईट लिहिण्यामागे माझा कोणताही वैयक्तिक आकस नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक सिनेमाने लावलेल्या सवयी अन वाढवलेल्या अपेक्षा जेव्हा मराठी सिनेमा अन थोड्या प्रमाणात हिंदी सिनेमाही पूर्ण करू लागला, तेव्हा माझ्या अपेक्षा अजूनच वाढत गेल्या. त्यात आपण मराठी चॅनेल्सवरती, असेल नसेल त्या कार्यक्रमात येऊन अन स्वतःच्याच 'एकापेक्षा एक' मध्ये सिनेमाची तोंड फाटेल तेव्हढी स्तुती करू लागलात. ह्या सगळ्या परिस्थितीत मी सिनेमाला गेलो अन माझ्या सगळ्या अपेक्षांच्या फुग्याला पहिल्याच फ्रेममध्ये टाचणी लागली. अन मग त्या फुटलेल्या फुग्यावर पुढची प्रत्येक फ्रेम असंख्य टाचण्या बरसवतच राहिली. सिनेमा संपेस्तोवर मी फारच दुःखी झालो होतो. खरंच सांगतो, माझं मराठीवर, सिनेमावर अन पर्यायाने मराठी सिनेमावर प्रचंड प्रेम आहे. अन गेल्या काही वर्षांमध्ये तर मराठी सिनेमाने माझी मान अभिमानाने ताठ केलेली आहे. अशा वेळी आपल्यासारख्या एकेकाळी मराठी सिनेमाला गर्दी खेचून आणणार्‍या कलावंताने इतका वाईट (माझ्या मते) सिनेमा बनवावा हे फारच खटकलं. त्या सगळ्या वेदना कागदावर उतरल्या अन तुमच्यावर असलेल्या प्रेमाखातर थेट तुम्हाला लिहिण्याचं धाडसही करू शकलो. फार जास्त आगाऊपणा झाला असेल तर क्षमा करा. पण एका खर्‍या सिनेरसिकानं सच्च्या कळकळीनं लिहिलेलं हे पत्र आहे.
कळावे. लोभ असावा.

आपला,
(आपल्याकडून उत्तम सिनेमाची अपेक्षा करणारा चाहता) विद्याधर.

1/23/2011

कडू गुपित

एखादा चित्रपट महोत्सव झाला आणि त्याबद्दल पेपरात वाचलं की मग मी मनाशी एक कुठलीही भाषा धरतो आणि त्या भाषेतल्या सिनेमांबद्दल नेटवर माहिती शोधतो. मग त्यातून अनेकदा हाताला रत्नं लागतात. वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या संस्कृतींची निदान एक तोंडओळख होते. आणि माणूस ह्या प्राण्याची सुखदुःख वरकरणी कितीही वेगवेगळी वाटली तरी एका समान वैश्विक धाग्यानं एकमेकांत गुंफली गेल्याचं सत्य वारंवार मनात गडद होत जातं. सापडलेला/ले सिनेमे मिळवून बघणं म्हणजे खरी गंमत. तो मिळून पाहेस्तोवर त्याबद्दल जास्त वाचणं टाळायचं वगैरे, एकदम माहौल बनवायचा. पण सिनेमा सहज मिळणारा नसला तर मग अजून मजा. जंग जंग पछाडून, नेटाने नेटावर शोधून तो सिनेमा मिळवणं आणि मग तो बघणं, ह्यात मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान आणि चांगला सिनेमा अनुभवल्याचा आनंद असा दुहेरी फायदा होतो.
ह्या सगळ्या उपक्रमांतून आजवर खूप सिनेमे अनुभवलेत, ह्यापुढेही अनुभवेन. अगदी कोरियन, जपानीपासून ते पॅलेस्टिनियन, तुर्की आणि फिनलँड, स्वीडन पासून ते नॉर्वेजियन पर्यंत अनेकानेक सिनेमांचा आनंद केवळ इंटरनेटच्या कृपेमुळे घ्यायला मिळाला. २००२ सालच्या ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित, अल पचिनो अभिनित इन्सॉम्निया चा ओरिजिनल सिनेमा म्हणजे १९९७ सालचा नॉर्वेजियन इन्सॉम्निया मिळवण्यासाठी मी तब्बल दोन आठवडे तडफडलो होतो. पण मिळाल्यानंतर पाहताना जे समाधान लाभलं, त्याला तोड नाही. ह्या चित्रविचित्र भाषांचे सिनेमे सबटायटल्ससकट पाहिल्याचा एक दुष्परिणाम असा झाला आहे की मी अगदी मराठी सिनेमा पाहत असलो तरी खाली सबटायटल्स आली तर नजर तिथेच जाते.
आणि असाच एक दिवस मी मनाशी धरला सर्बिया आणि सिनेमा शोधता शोधता हाताशी लागला बोस्नियन सिनेमा - गर्बावित्सा (Grbavica). उच्चार नक्की असाच नसला तरी जवळपास जाणारा आहे. बोस्नियन राजधानी सारायेव्हो (Sarajevo) चं एक छोटं उपनगर 'गर्बावित्सा' मध्ये घडणारी एक छोटीशीच, पण उद्विग्न करणारी कहाणी म्हणजे हा सिनेमा.
पुढे सिनेमाच्या कथेतलं छोटंसं रहस्यदेखील सांगण्यात आलेलं आहे ह्याची मी आधीच कल्पना देऊन ठेवतो.
ही गोष्ट घडते ती युद्धोत्तर बोस्नियामध्ये. १९९२ सालच्या जवळपास बोस्नियाक आणि सर्ब लोकांमध्ये घडलेल्या युद्धाची सुन्न करणारी अदृश्य पार्श्वभूमी ह्या सिनेमात आहे. सिंगल मदर एस्मा जमेल ते आणि पडेल ते काम करून आपल्या १२ वर्षांच्या मुलीला साराला वाढवतेय. अधुनमधुन ती सपोर्ट ग्रुप्समध्येही जाते. परिस्थितीनं गांजलेली, थकलेली आणि हतबल अशी वाटणारी एस्मा सारासाठी मात्र आपली सगळी ताकद एकवटून उभी आहे. १२ वर्षांची सारा कुठल्याही नॉर्मल १२ वर्षीय मुलीसारखी उत्स्फूर्त, खेळकर आणि मोकळं आयुष्य जगतेय. एस्मा तिला गरजेचं असं काही कमी पडू देत नाही. आणि मग एक दिवस साराच्या शाळेची ट्रीप निघण्याची सूचना येते.
ट्रीपची फी भरा किंवा ज्या मुलांचे वडील बोस्नियाक-सर्ब युद्धात (सिनेमामध्ये जाणून बुजून 'सर्ब' शब्दाऐवजी 'चेटनिक' हा स्लँग शब्द वापरलाय) शहीद झालेत अशांना सर्टिफिकेट दाखवून फुकट ट्रीप, अशी सूचना शाळा काढते. साराला लहानपणापासून आईनं हेच सांगितलंय की तुझे वडील चेटनिक्स शी लढताना शहीद झालेत. त्यामुळे शाळेतही मिरवून आणि मित्र समीरला सांगून की तुझ्या वडलांप्रमाणेच माझे वडीलही शहीद झाले होते, सारा घरी येते आणि आईकडे वडलांच्या हौतात्म्याचं सर्टिफिकेट मागते. एस्माचं छोटंसं जग हादरतं. पूर्वीपासूनच वडलांच्या ओळखीबद्दल सारवासारव करणारी एस्मा आता मात्र भांबावून जाते आणि तिचं ते भांबावून जाणं साराच्याही नजरेतून सुटत नाही.
एस्माकडे सर्टिफिकेट तर नाहीये ती साराला सांगते की ती सर्टिफिकेट मिळवायचा प्रयत्न करेल आणि प्रत्यक्षात ती ट्रीपचा खर्च उचलण्याची तयारी सुरू करते. सगळ्या ओळखीच्यांकडून उधार मिळवण्याचेही प्रयत्न अपुरे ठरतात. ती एका नाईटक्लबमध्ये वेट्रेसचं कामही सुरू करते. इकडे सारा सर्टिफिकेटसाठी जसजशी मागे लागत राहते, माय-लेकींमधला तणाव वाढत जातो. आणि जेव्हा शाळेत हुतात्म्यांच्या मुलांची यादी लागते, तेव्हा त्यात स्वतःचं नाव न पाहून सारा हादरते. एका वर्गमित्राच्या खोचक टोमण्यावर कुणा दुसर्‍याच्या तोंडून ऐकलेली बापाच्या हौतात्म्याची कहाणी स्वतःच्या बापाची म्हणून सांगते. घरी येऊन ती आईला खूप टोचते तेव्हा शेवटी एस्मा पूर्ण कोलमडून जाते आणि साराच्या वडलांबाबतचं कडू गुपित ती सांगते.
बोस्नियाक-सर्ब युद्धांमध्ये चेटनिक्स अर्थात सर्ब सैनिकांनी बोस्नियन स्त्रियांचे 'मास रेप' केले होते. ही एका पद्धतीची अमानवी युद्धनीती आहे, ज्यात स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून पूर्ण समाजाचा पायाच हालवून टाकला जातो. नुकताच आफ्रिकेतील वांशिक युद्धांमध्येदेखील ह्या पाशवी नीतीचा वापर केल्याचं बातम्यांमध्ये ऐकलं होतं. तर एस्मा ह्याच पाशवी प्रकाराचा एक बळी असते. आणि ह्याचाच अर्थ सारा ही एका हुतात्म्याची नाही, तर एका चेटनिकची म्हणजे शत्रूची मुलगी असते.
हे कडू गुपित ऐकल्यावर साहजिकच सारा सुन्न होते आणि आपल्या खोलीत जाऊन बसते. दुसर्‍या दिवशी एस्मा साराला घेऊन ट्रीपच्या बसपर्यंत सोडायला जाते. सारा अजूनही बोलत नाहीये. पण बस जशी पुढे जायला लागते, तशी मागच्या खिडकीतून सारा आपल्या हतबल आईकडे पाहत राहते. आणि अगदी शेवटी ती तिला हात करते. आणि मग बसमध्ये गाणार्‍या इतर मुलांसमवेत आवाजात आवाज मिसळून गायला सुरुवात करते.
हा सिनेमा माय-लेकींचं तरल नातं तितक्याच हळुवारपणे रेखाटत जातो. एस्माची व्यक्तिरेखा कधी हतबल तर कधी निग्रही तर कधी कमालीची कोसळलेली इतक्या टोकांपर्यंत हेलकावे खाते आणि अभिनेत्री मिरयाना करानोविचनं ती तितक्याच तपशिलासकट उभी केलीय. सारा (लुना मिओविच) सकट सर्वच प्रमुख पात्रांचं काम पूरक आहे. मुलीसाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची आहुती देणारी आई वैश्विक आहे हेच हा सिनेमा पुन्हा अधोरेखित करतो.
सिनेमा बर्‍यापैकी संथ आहे. काही काही ठिकाणी, एस्पेशली सपोर्ट ग्रुप्सच्या सीन्समध्ये तर सिनेमा चक्क थांबल्यागत वाटतो. पण तीच ह्या सिनेमाची प्रकृती आहे. एखादं विकल करणारं संथसं शोकगीत असावं, तद्वत हा सिनेमा आपलं अंतःकरण विदीर्ण करत जातो. एस्माच्या गुपिताची आपल्याला तिनं सांगायच्या आधीच थोडी कल्पना येते. पण रहस्य हे सिनेमाचं सार नसल्याने, फारसा फरक पडत नाही. आपले वडील कोण, ह्याची जाणीव झाल्यानंतर सारा जेव्हा स्वतःच्या खोलीत जाते. आणि पूर्वी एकदा सारानं आईला विचारलेलं असतं की माझे केस तुझ्यासारखे नाहीत, म्हणजे माझ्या वडलांसारखे असणार, तो प्रसंग आठवून सारा स्वतःच्या केसांकडे पाहते आणि हेअर ट्रीमरनं आपले सगळे केस काढून टाकते. हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणतो.हा, तसेच साराचं आपल्या वर्गमित्रावर रागावणं किंवा एस्माचे काही प्रसंग सिनेमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.
सिनेमाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेली आहेच. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचा प्रतिष्ठेचा गोल्डन बेअर पासून अनेक सन्मान मिळालेत. पण दिग्दर्शिकेचा हा सिनेमा हृदयाची जी तार छेडून जातो, त्यावरचा कुठलाही पुरस्कार अस्तित्वातच नाही.
(पोस्टरचं छायाचित्र विकिपीडियावरून साभार. बोस्नियाक-सर्ब युद्धाबद्दल अधिक माहिती इथे.)

हा लेख शब्दगाSSरवा ह्या जालरंग प्रकाशनाच्या २०१० च्या हिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. मूळ लेख इथे वाचता येईल.

1/17/2011

आप्पाच्या लग्नाची गोष्ट - ३

भाग १ आणि
भाग २ पासून पुढे

चॅप्टर थ्री - द रिटर्न

संध्याकाळी सुहास, सचिन अन भारतची बस निघाल्यानंतर मी अन सागर 'नांदेड बाय द नाईट' बघायला निघालो. आधी प्लॅन होता काही पुस्तकं विकत घ्यायची. मग जेवून कुठलातरी सिनेमा पाहायला जायचं. पुस्तकं घेण्याचं कारण की दुसर्‍या दिवशी १२ तासांचा कंटाळवाणा होऊ शकणारा प्रवास वाट पाहत होता. पण दैवयोगानं दोनेक दुकानं पालथी घालूनही हवी ती पुस्तकं हाती लागली नाहीत. मग सागर अजूनही दुकानांच्या शोधात होता, पण मीच जाऊ दे म्हटलं. तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात सागरला राहचलते ४-५ ओळखीचे मुलं-'मुली' भेटले. पण सागरनं फार न ताणता काढता पाय घेतला. मग आम्ही ठरवलं की एखादे ठिकाणी सफरचंदं घेऊ प्रवासासाठी म्हणून अन मग 'काकां'च्या मेसमध्ये जेवायला जाऊ. सफरचंद घेऊन रिक्षा शोधताना मला एक बुक स्टॉल दिसला. मी म्हटलं एखादं मासिक विकत घेऊ, प्रवासात अगदीच काही नाही असं नको व्हायला.
मी पुढे झालो अन स्टॉलवाल्याला लोकप्रभा मागितला. त्यानं लोकप्रभा काढून समोर ठेवला मी दहाची नोट काढून त्याला दिली अन तो दोन रूपये काढून मला परत देत असतानाच मागून सागरनं वाचलं 'आध्यात्मिक विशेष'. मी लोकप्रभा उचलला अन नीट पाहिला. 'स्वामी समर्थ' वगैरेंचे फोटो होते अन तो चक्क 'आध्यात्मिक विशेष' अंक होता. मी सेकंदभर विचार करून तो खाली ठेवला अन दुकानदाराला म्हटलं, "हा राहू दे, चित्रलेखा द्या." दुकानदाराच्या चेहर्‍यावरची रेषही नाही हलली. त्यानं शांतपणे आतून चित्रलेखा काढून मला दिला अन दोन रूपये परत घेतले. मी चित्रलेखा डोळे फाडून चेक केला, तर तो 'सेलिब्रेटी हेल्थ गुरू' असं काहीसं मुखपृष्ठवाला होता. माझी नजर सहजच दुकानदाराकडे गेली. आता मात्र तो माझ्याकडे पाहून मिश्किल हसला अन म्हणाला, "दहापैकी नऊजणांनी ह्या आठवड्यात लोकप्रभा घेऊन परत ठेवलाय!" मी अन सागर मनापासून हसलो. अन रिक्षा केली.
पण संध्याकाळचे पावणेआठ-आठच होत होते. अन मी साडे-चार पाचच्या आसपास मोठा ग्लासभरून बोर्नव्हिटा घेतलेला होता. त्यामुळे मला फारशी भूक लागलेली नव्हती. सागरही जेवण नकोच म्हणाला (मी नको म्हणत असल्यानं की काय ठाऊक नाही). मग आम्ही सागरच्या मते हॅपनिंग स्पॉट असणार्‍या 'भाग्यनगर' भागात गेलो. तिथे एका ठिकाणी संध्याकाळभर उत्तम पाणी-पुरी अन संध्याकाळ उतरली की उत्तम पावभाजी मिळते असं सागरचं म्हणणं होतं. पण मला पावभाजीही खायची इच्छा नव्हती. मग आम्ही एका छोट्या हॉटेलात पाववडा अन वडापाव असं कॉम्बो खाल्लं.
ह्या भाग्यनगरमध्ये मी एक वेगळीच गोष्ट पाहिली. तिथे एका विशिष्ट ठिकाणी पाच-दहा मूकबधिरांचा एक गट एकत्र येऊन त्यांच्या खाणाखुणांच्या भाषेत गप्पा मारत होता. हे मी आदल्या रात्रीही पाहिलं होतं. सागरच्या म्हणण्यानुसार हा गेले कित्येक वर्षांचा शिरस्ता आहे. 'मूक-बधिरांचा कट्टा' ही संकल्पनाच किती मस्त आहे. 'काय काय गोष्टी शेअर करत असतील आपापसात?' हा प्रश्न मनाला चाटून गेला.
वडापाव अन पाववडा झाल्यावर निवांतपणे चालत चालत आम्ही निघालो. सागरचा सिनेमाचा मूड वाटत नव्हता. मी अंदाज घेऊन त्याला विचारलं, "तुला खरंच सिनेमा पाहायचाय?" तो चटकन म्हणाला, "खरं सांगू? नाही. सगळे बकवास सिनेमे लागलेत. आपण मस्तपैकी गप्पा मारूया ना." मीही लगेच दुजोरा दिला अन चालत हॉटेलवर पोचून गप्पाष्टक सुरू केलं. मधेच चक्क आनंदचा परत फोन. "सगळं व्यवस्थित झालं ना? हॉटेलच्या रिसेप्शनवर काय झालं? उद्या सकाळी मी फोनवर अव्हेलेबल असेन, किंवा स्वतःच येऊन जाईन." मी म्हटलं, "अरे वेडा आहेस का तू? लग्न झालंय ना आज तुझं? उद्या येऊन जाईन वगैरे काय? आम्ही पाहून घेऊ काय होतं ते." आनंदचा पाहुणचार काही संपायचं नाव घेत नव्हता.
मग ह्याच्या त्याच्या कागाळ्यांवरून सुरू झालेल्या गप्पा टीव्हीवरचा 'पीस टीव्ही ऊर्दू' पाहून धर्मापासून ते पार जागतिक राजकारणापर्यंत पोचल्या. रात्रीचे ११.३० होत आले होते. सागरच्या दिनक्रमाप्रमाणे सागरला भूक लागली. मग आम्ही रात्री ११.३० वाजता जवळच असलेलय एस.टी. स्टँडवरचे पोहे खायला बाहेर पडलो. नांदेडात कॉलेजच्या दिवसांत केलेले सगळे प्रकार सागर मला दाखवत होता. गरमगरम पोहे अन कटिंग चहा मारून रात्री बारा वाजता आम्ही हॉटेलसमोरच्या रस्त्यावर निरर्थक फेर्‍या मारत होतो. मग थोड्या वेळाने वर जाऊन पुन्हा थोडा वेळ टाईमपास करून आम्ही एकदाचे झोपलो.
सकाळी ७ ला मी उठून बसलो. काही झालं तरी नऊला हॉटेलातून बाहेर पडणं भाग होतं. कारण नाश्ता करून १०.३० ची ट्रेन गाठायची होती. पण सकाळी सकाळी गरम पाणीच येईना. मग मी शेवटी कंटाळून गार पाण्यानेच आंघोळ उरकली अन तयार होऊन रिसेप्शनवर आलो. आदल्या दिवशी मारे आनंदला आश्वासन दिलं होतं, पण रिसेप्शनवाला काही आमचं ऐकेना. मग पुन्हा आनंदला फोन लावला. तो ही फोनवर सापडला! :-o
पण तो काही बोलायच्या आतच रिसेप्शनवाल्याला त्याची चूक समजली अन त्यानं आमची माफी मागून आम्हाला सोडलं. मी आनंदला सगळं व्यवस्थित झाल्याचं सांगितलं अन पुन्हा डोसे खायला निघालो. डोसे खाऊन, चहा पिऊन स्टेशनला आलो अन ऑलरेडी प्लॅटफॉर्मला लागलेल्या ट्रेनमध्ये चढून खिडकीची जागा पकडून बसलो. सागर माझ्यासमोरच बसला. ट्रेन सुटायला अजून अर्धा तास होता. डबा तसा रिकामाच होता. एक सीट सोडून माझ्या तिरक्या रेषेत दोन ग्रामस्थ बसले होते. त्यातला एकजण माझ्याकडे थोडा वेळ निरखून पाहत होता. मग तो उठून माझ्याजवळ आला अन आपलं तिकिट मला दाखवून म्हणाला, "साहेब, हे 'सेलू'पर्यंत जायला चालेल ना?" काय होतंय हे माझ्या लगेच लक्षात आलं अन मी फक्त मिश्किल हसलो. पण मी काही बोलायच्या आधी सागरनं ते तिकिट ओढलं अन बघून म्हणाला, "सेलू पर्यंत ना. चालेल की!" तो ग्रामस्थ ओशाळवाणंसं हसला अन सागरला संकोचानंच ,"ते ठीक आहे" अन माझ्याकडे बोट दाखवून म्हणाला, "पण साहेब बसलेत, ते सांगतील ना!" मी सागरकडे विजयी मुद्रेनं पाहिलं अन मी काही वेळापूर्वीच सागरला सांगितलेला किस्सा सागरला स्ट्राईक झाला. सागर मी घातलेल्या काळ्या कोटाकडे पाहून हसला अन त्या ग्रामस्थाला म्हणाला, "अहो, तो टीसी नाहीये." त्या ग्रामस्थाला कितपत अर्थबोध झाला माहित नाही पण तो ओशाळवाणंसं हसून उठून गेला. मी रावणासारखा हसू लागलो.
तो काळा कोट माझ्या वडिलांनी १९९६ साली ते अमेरिकेला गेलेले तेव्हा शिवलेला होता. त्या दोन महिन्यांच्या अमेरिकावारीनंतर तो कोट त्यांनी कधी लग्नांनाही घातल्याचं मला स्मरत नाही. पण ते जेव्हा उत्तर प्रदेशात राहणार्‍या माझ्या काकांकडे रात्रीच्या ट्रेननं जायचे तेव्हा तो कोट घालून जायचे. तेव्हा एकदा एक मुलगा बाबांना सीट ऍडजस्ट करून देता का विचारायला आला होता अन बाबांनाही दोन मिनिटं आपण एव्हढे स्मार्ट दिसतो का? हा प्रश्न पडला होता. बाबांनी सांगितलेला हा किस्सा माझ्या चांगल्याच लक्षात होता. पुढे त्या कोटाला उर्जितावस्था थेट २००७ मध्ये म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा युरोपात आलो तेव्हा आली. तेव्हापासून आजतागायत मी प्रत्येक लांब प्रवासात आवर्जून तो कोट घालतो. कधीकधी ऑफिसातही. तर जेव्हा हा कोट घालून मी ह्या ट्रेनप्रवासाला निघालो, तेव्हाच मला असं काहीतरी होणार हे अपेक्षित होतं अन मी हे सागरला आधीच बोलून दाखवलं होतं. पण पुढे जी गंमत घडली त्यानं ह्या सगळ्यावर कडी केली.
तो ग्रामस्थ जाऊन दोनच मिनिटं उलटली असतील. खिडकीजवळ एक भिकारी आला अन माझ्याकडे पाहून म्हणू लागला, "वकिलसाब ओ वकिलसाब! औरंगाबाद जा रहे हो इतना बड़ा केस लड़ने. गरीब की मदद करो और दुआ लेके जाओ. केस जीत जाओगे!" मी सागरकडे पाहून खो खो हसत होतो. दोनच मिनिटांत मी अजून एक प्रोफेशन चेंज केलं होतं.
थोड्या वेळाने सागर उतरला. मी आनंदला मेसेज केला सगळं व्यवस्थित झाल्याचा, तशी त्याचा फोन आला. तो सांगत होता की हॉटेलवाल्यानं त्याला फोन करून झाल्या त्रासाबद्दल त्याची माफी मागितली. मग मी त्याला म्हटलं आता जरा फोनपासून दूर हो! :) आणि एकदाची ट्रेन निघाली. मी सागरला टाटा केला अन सागर नांदेडातल्याच त्याच्या मित्रांकडे गेला. तिथे एक दिवस राहून तो दुसर्‍या दिवशी सकाळी त्याच्या घरी जाणार होता.
थोड्याच वेळात ट्रेन भरू लागली. पूर्णा रोडला माझ्यासमोर एक जोडपं अन त्यांची तीन लहान मुलं असे सहप्रवासी आले. फक्त माझं अन त्यांचं रिझर्व्हेशन होतं. मग पुढे पुढे एकेका स्टेशनवर रिझर्व्हेशनवाले येऊन बाकीच्यांना उठवू लागले. आमचा रिझर्व्ह्ड डबा असूनही जनरल डब्यासारखी गर्दी होती. टीसी एकदोनदा येऊन डबा नियमित करायचा व्यर्थ प्रयत्न करून गेला. पण नंतर तो येऊही शकणार नाही इतपत गर्दी डब्यात झाली. मनमाड जंक्शनला तर डब्यात एव्हढी माणसं चढली की मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. लहान लहान बाळांना घेऊन आया सरळ मधल्या मोकळ्या रस्त्यात फतकल मारून बसत होत्या. महाराष्ट्र अन बिहारमध्ये फरक एव्हढाच असावा की इथे माझी रिझर्व्ह्ड जागा आहे सांगितल्यावर अनरिझर्व्ह्ड माणूस सहसा बिनतक्रार उठून उभा राहतो. पण आता उठून उभं राहणे वगैरेच्या पलिकडे गाडी गेलेली होती. मी मनमाडला दोन वडे खाल्ले, पण माझं पित्त प्रचंड चढू लागलं होतं. त्यात मला मायनर क्लॉस्ट्रोफोबिया असावा, त्यामुळे चारी बाजूंनी आपण बंदिस्त झाल्याच्या भावनेमुळे मला मळमळल्यासारखं होऊ लागलं. अजून पाच तास मला एकाच जागी बसून काढायचे होते.
नशीबानं खिडकीतलीच जागा होती. अन समोरच्या पोरांच्या बाळलीला चालू होत्या. त्यामुळे करमणूक सुरू होती. हळूहळू मी स्टेबल झालो. मग पायांपाशी जी मोकळी जागा शिल्लक होती, तीही कुणालातरी बघवली नाही. कुणाचं तरी लहान मूल कुठूनतरी आणून त्या मोकळ्या जागेत सोडण्यात आलं. मी आता राग, क्रोध, चीड वगैरे येण्याच्या पलिकडे पोचलो होतो. कारण त्या डब्यात असलेल्या ९०% लोकांपेक्षा माझी जागा असूया वाटण्याजोगी होती. एक मुलगा तर चक्क बॅगा ठेवण्याच्या रॅकवर झोपून प्रवास करत होता. आणि मग माणसं वाढल्यावर बॅगा ठेवायला जागा नसल्याने त्यानं अन त्याच्या आईनं इतरांच्या शिव्याही खाल्ल्या. पण तो काही शेवटपर्यंत तिथून उतरला नाही. अख्ख्या डब्यात काहीना काही करमणूक चालूच होती. तास हळूहळू पण निश्चित वेगानं उलटत होते. एकदाचं कल्याण आलं अन पावलं हलवण्याइतकी जागा झाली. मग ठाण्याला झोपण्याइतकी जागा झाली आणि शेवटी एकदाचं दादर आलं. मी ठाण्यालाच पोचल्याचा मेसेज बनवून ठेवला होता, तो दादरला उतरल्या उतरल्या सगळ्यांना पाठवून दिला अन गंमत म्हणजे प्रत्येकाचं क्षणार्धात उत्तर आलं. आनंदचं उत्तर, "प्रवास व्यवस्थित झाला न?"
सुरूवातीला जो संवाद मी टाकला होता त्याचं कारण हेच. की आनंदरावांना प्रत्येक क्षण दुसर्‍यांची किती काळजी लागून राहिलेली असते हे मला सोदाहरण स्पष्ट करायचं होतं. मी पार दादरला पोचलो तरी आनंदची काळजी संपली नव्हती. मग त्याला परतचा एक मेसेज टाकला आणि तासाभरात अजून कुठलीही घटना न घडता घरी पोचलो. :)
सुट्टीतला एक फार महत्वाचा कार्यक्रम पार पडला होता. आणि माझ्या ब्लॉगचा ब्रेकही सुरू झाला होता.
आता ब्रेक संपलेला आहे. अन आप्पाच्या लग्नाची गोष्टही आता खर्‍या अर्थाने संपलेली आहे!

समाप्त

1/16/2011

आप्पाच्या लग्नाची गोष्ट -२

भाग १ पासून पुढे

चॅप्टर टू - सम गाईज कॅन हँडल नांदेड

सकाळची वेळ होती. ७ च्या आसपास डोळे उघडले. अपेक्षेएव्हढी नसली तरी छान गुलाबी थंडी पडलेली होती. एखाद्या दुसर्‍या दिवशी, पहिल्या जागेला मी चादर पुन्हा डोक्यावर ओढून झोपलो असतो, पण त्यादिवशी निराळ्या गोष्टीचा उत्साह होता. खरं म्हणजे मी आदल्या दिवशी रात्रीची एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरलो. आदल्या रात्री आम्हांला बॅचलर्स पार्टी करायची होती. आनंदला बोलावून :) ! एकदम 'द हँगओव्हर' स्टाईलमध्ये. पण आनंद त्या रात्री सापडणार नाही हे आधी लक्षात आलं अन 'हँगओव्हर' स्टाईलमध्ये केल्यास दुसर्‍या दिवशी पहाटे सापडणार नाही हे नंतर लक्षात आलं. मग आदल्या रात्रीच न सापडणं जास्त सेफ आहे, ह्यावर शिक्कामोर्तब करून आनंदऐवजी सचिनची (ज्याचे फेब्रुवारीत दोनाचे चार होणार आहेत) बॅचलर्स पार्टी करण्याचं ठरलं. पण सचिन जेवण उरकल्या उरकल्या मोबाईल बॅलन्स रिचार्ज मारून जो मोबाईलला चिकटला तो थेट रात्री झोपेस्तो (झोपेतही त्याचा हात मोबाईलवरून न हटल्याचं काही खात्रीलायक सूत्रांकडून समजलेलं आहे.). अशा पद्धतीनं आमच्या 'हँगओव्हर' च्या आशा धुळीत मिळाल्या :P. तर अशा एकंदर इव्हेंटफुल किंवा अनइव्हेंटफुल रात्रीनंतर आलेला दिवस खात्रीलायकरित्या इव्हेंटफुल करण्याची जवाबदारी आमच्या भक्कम खांद्यांवर येऊन पडलेली होती.
सचिननं जरी बॅचलर्स पार्टीला टांग दिलेली होती, तरी त्यानं सकाळी बाहेर पडून टूथपेस्ट, तेल आणि वर्तमानपत्र अशा आवश्यक गोष्टी (ज्या सगळेजण सोयीस्कररित्या विसरलेले होते) आणल्या अन थोडी कसर भरून काढली.
आनंदरावांनी मराठवाडी पाहुणचाराच्या सगळ्या सीमा गेल्या रात्री हे सांगून ओलांडल्या होत्या की सकाळी लग्नस्थळी घेऊन जायला एक गाडी येईल (शहरात थांबलेल्या सगळ्या पाहुण्यांना थोडं शहराबाहेर असलेल्या लग्नस्थळी घेऊन जायला ही सोय होती). आम्ही आपले तयार झालो अन सागर आमची वरात एका प्रसिद्ध डोसेवाल्याकडे घेऊन गेला. एकाच वेळी दहाच्या आसपास डोसे घालणारा मुख्य आचारी ही ह्यांची खासियत. बटर ओनियन, बटर मसाला वगैरे वगैरे नावं असलेले डोसे अन त्यांचा वातावरणात भरून राहिलेला सुगंध अन त्याला जोड लागलेल्या भुकेची. मग सगळे स्थानापन्न झालो अन सागरच्या रेकमेंडेशनवर ऑर्डरी सुटल्या. सुहासनं काही फोटोज काढले, पण भुकेपुढे फोटो फिके पडले. यथेच्छ पोटपूजा झाल्यावर आम्ही गाडीसाठी फोन केला अन परत हॉटेलवर आलो, अन चहाच्या ऑर्डरी देऊन लाऊंजमध्ये पेपर वाचत बसलो.
'पत्रे विवाह सोहळा' असं लिहिलेली गाडी आली, ज्यामध्ये आनंदचे बहुतेक हैदराबादेचे मित्रही होते. अन आनंदची वरात काढायला आमची वरात निघाली. थोड्याच वेळात विवाहस्थळी आम्ही पोचलो, तर नवरामुलगा हनुमानाच्या देवळात जाण्यासाठी म्हणून दरवाजाशीच येऊन उभा होता. चांगला सूट-बूट घालून अन दोन्ही हात भरून मेहंदी काढून! आम्ही जाऊन त्याला मिठ्या मारल्या अन त्याची खेचायला तिथेच सुरूवात केली :) बिचारा आधीच लग्नाच्या टेन्शननं गांगरलेला होता, त्यात आम्ही अन त्याचे इतरही मित्र त्याची यथेच्छ खेचत होते. मग तिथेच त्याच्या मेहंदीचं अन त्याचं आमच्यासोबत फोटोसेशन चटकन उरकलं अन त्याची वरात काढायची तयारी सुरू झाली. वरात म्हणजे अर्धा किलोमीटरवर असलेल्या हनुमानाच्या देवळापर्यंत अन परत. वरातीसाठी घोडं नव्हतं, तर गाडी होती. मी कारण विचारलं असता, बँडवाल्यांना "तेनु घोडी किन्ने चढाया, भूतनीके" हे गाणं वाजवावयास सांगता येऊ नये ह्यासाठीची ही तजवीज असल्याचं मला सांगण्यात आलं. मग बाकायदा बँडसकट वरात निघाली, अन वरातीमागून गाडी ज्यात नवरामुलगा होता.
मी आजवर कधी गणपती विसर्जनातही नाचलो नव्हतो, पण त्यादिवशी आनंदच्या विसर्जनासाठी नाचायचंच असं ठरवून स्वतःही नाचलो अन सचिन, सुहास, भारत आणि सागरलाही नाचवलं. अर्थात सचिनला नाचवणं थोडं अवघड गेलं, पण जमलं शेवटी :D देवळात काय काय विधी करायचे हे सचिननं नीट पाहून घेतलं अन ते नीट पाहताना आम्ही सचिनला पाहून घेतलं. मग वरात परतताना पुन्हा सगळ्यांच्या नृत्यकौशल्याला बहर आला. सरतेशेवटी तर गाडीतून उतरवून नवरदेवाला खांद्यावर घेऊन नाचवलं गेलं, अन मग खाली उतरवून पुन्हा नाचवलं गेलं. नवरदेवाचा उत्साह चांगलाच ओसंडून वाहू लागला होता.
मग आम्ही सर्व लग्नमंडपात पोचलो. आणि तो प्रचंड मोठा माणसांनी भरून वाहणारा हॉल पाहून आम्हा शहरी लोकांची छातीच दडपली. सागर म्हणाला गावाकडे लग्नात असंच असतं. सगळी सजावट अन स्टेजवर नवरानवरीनं जाण्यासाठी बनवलेला स्पेशल कमानी रस्ता वगैरे पाहून मस्त वाटत होतं. आनंद येऊन कमानी रस्त्याच्या सुरूवातीला उभा राहिला. ऑर्केस्ट्रावाले गाणी गात होते. त्यावेळेस चालू होतं, "रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना!" पण आनंदराव यायला आय मीन जायला तयारच नव्हते. पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली. मी आपला, 'वाळू अन बन नाहीये ना, म्हणून जात नसेल तो" असले माफक विनोद करून पाहिले. पण माणसांच्या अशक्य कोलाहलात अन ऑर्केस्ट्राच्या आवाजात माझे विनोद हवेतच विरून गेले. मग लक्षात आलं, की नवरा-नवरी दोघे एकत्रच स्टेजवर जाणार आहेत, म्हणून आज्ञाधारक वर वाळू अन बनाला भुलत नव्हता. एकदाची वधू आली, अन मग दोघे जोड्यानं स्टेजकडे गेले अन जोडे काढून बसले. मग विधी सुरू झाले. आनंदनं आधीच सांगितलं होतं, की मेजर विधी आदल्या दिवशीच झालेले आहेत अन आज जास्त नाही, तद्वत अर्ध्या तासातच विधी झाले अन मंगलाष्टकं सुरू झाली. आम्ही बरेच मागे होतो अन सचिन मात्र थोडा पुढे गेला होता. त्यामुळे आम्ही आनंदच्या अक्षता थोड्याफार सचिनवरही टाकून त्याच्या लग्नाला जाता न येण्याची कसर थोडी भरून काढली.
लग्न लागलं अन इथे आम्हाला भुका लागल्या. पण आधीच आनंदला भेटून घेण्यात शहाणपणा होता. त्यामुळे गर्दीतून वाट काढत आम्ही स्टेजजवळ पोचलो, पण सचिन गायब. मग त्याला फोन करून स्टेजजवळ बोलावलं तोवर जिन्यांवरती बायकांचा घोळका. मग सरळ समोरच्या बाजूनंच स्टेजवर चढलो अन वाट काढत आनंदच्या जवळ जाऊन पोचलो. स्टेजवर बरीच माणसं होती, त्यामुळे आनंद काय बोलतोय ते ऐकूच येत नव्हतं. वहिनींशी आनंदने ऐकू न येणारी ओळख करून दिली, नमस्कार केले आणि फोटो काढले. पण ह्या कोलाहलामुळे मला जो पीजे मारायचा होता तो मारता आला नाही. ती हौस इथे भागवून घेतो. आम्ही ठरवून गेलेलो की स्टेजवर त्याला आलं द्यायचं. पण आलं घ्यायला विसरलो, त्यामुळे मी तिथे त्याला म्हणणार होतो की "तेव्हढं आलं राहिलं बघ!". मग त्यानं विचारलं असतं "काय?" मग मी म्हटलं असतं, की "तू लग्नाच्या निमंत्रणात लिहिलं होतंस ना, की लग्नाला आलंच पाहिजे म्हणून!" :D
मग चटाचट जेवून अन लग्नाचा (खरा) लाडू खाऊन (व्हर्च्युअल लाडू आनंदनं खाल्ला होता) आम्ही निघालो. सागर आमची वरात नांदेडच्या प्रसिद्ध हुजूरसाहेब गुरूद्वाराला घेऊन गेला. अतिशय सुंदर संगमरवरी बांधकाम अन इतकी स्वच्छता अन शांतता पाहून शीण कमी झाला. शीख समाज गुरुद्वारेच्या अन एकंदरितच त्यांच्या धर्माच्या बाबतीत फार कट्टर आहे, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पण धर्मासाठी अन धर्मबांधवांसाठी ते काय काय करतात (इतरधर्मीयांना त्रास न देता) ह्यांतलं बरंच काही शिकण्यासारखंदेखील आहे. सागर एखादा ऑफिशियल गाईड असावा तशागत त्या जागेचा इतिहास, भूगोल अथक सांगत होता. तिथून बाहेर पडल्यावर थोडी कडी अन हातरूमालांची खरेदी होईस्तो सचिनचं बालपण जागृत झालं अन तो कुल्फीवाल्याकडे पोचला. मग आमचंही सर्वांचं बालपण जागृत झालं. त्यानंतर तिथून रिक्षा करून सगळे गपगुमान हॉटेलावर पोचलो. रिक्षापण भारी होती. आम्ही सगळे (सागर सोडून) हट्टेकट्टे नौजवान, तरी आदल्या दिवशीपासून एकाच रिक्षात पाचजण फिरत होतो. आदल्या रात्री एकजण पुढे बसला त्यामुळे ठीक होतं, पण लग्नाच्या दिवशी शाळेच्या पोरांसारखे पाचजण मागच्या बाजूला बसलो होतो. सीटवर तिघे अन छोट्याशा लाकडी फळीवर मी अन सागर. पण त्यातही गंमतच होती.
सचिन, सुहास अन भारत संध्याकाळीच बसने निघणार होते, पण मी दुसर्‍या दिवशी सकाळच्या ट्रेनने एकटाच जाणार होतो. मग मला सोबत द्यायला म्हणून सागर थांबणार होता, नाहीतर तो घरी जाणार होता त्याच्या गावी. मराठवाडी पाहुणचाराचं हे अजून एक उदाहरण. मीही स्वार्थीपणा करून घेतला, कारण तेव्हढ्याच अजून गप्पा झाल्या असत्या आणि ह्यानंतर पुन्हा इतकं निवांत भेटणं सहा महिने तरी शक्य नव्हतंच.
दुपारी हॉटेलावर पोचल्यावर आम्ही सगळ्यांनी झोप काढायचं ठरवलं. झोपा झाल्यावर सागर त्याच्या मित्रांना भेटायला गेला अन तिघेजण तयार झाले. आम्ही दुपारसाठी गरमगरम बोर्नव्हिटा मागवले. आणि ते पिऊन ताजेतवाने होऊन सगळेजण बाहेर पडलो. आनंदचं लग्न नक्की झालंय ना अशी शंका यावी इतक्या वेळा तो बिचारा आमच्याशी फोनवर बोलत होता. आमचं सगळं व्यवस्थित होतंय ना ह्या काळजीनं तो अस्वस्थ होत होता. मंडळी निघाली तेव्हाही हॉटेलच्या रिसेप्शनवर थोडा गैरसमज झाल्यावर आम्ही त्यालाच फोन करून त्रास दिला. पण हा सदैव तत्परच होता. बसस्टॉपवर पोचलो तर बस निघायला थोडा वेळ शिल्लक होता. मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मंडळी स्लीपर बसमध्ये स्थानापन्न झाली. बस निघाली अन आम्ही आनंदला सगळं व्यवस्थित पार पडल्याचं कळवलं. व्हॉटेव्हर हॅपन्स इन नांदेड स्टेज इन नांदेड! इथे क्रेडिट्स रोल करता येतील. सिनेमा संपला.
पण क्रेडिट्सबरोबरसुद्धा बरेचदा काही स्टोरी पुढे गेलेली दाखवतात. तस्मात माझी स्टोरी अजून शिल्लक आहे. ती उद्याच्या भागात!

क्रमशः

भाग ३

1/15/2011

आप्पाच्या लग्नाची गोष्ट -१

नमस्कार सर्वांना अन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रण केलेला असूनही माझ्या लिखाणात सुट्टीच्या निमित्ताने खंड पडला अन त्यामुळे मलाच फार चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. तर अनेकजणांनी बर्‍याच दिवसांत पोस्ट नाही, नवी पोस्ट कधी असं आपुलकीनं विचारल्यामुळे अतिशय सुखावून गेलो. आता मी पुन्हा नव्या जोमाने पूर्वीप्रमाणे नियमित लिखाण करायचा प्रयत्न करेन. सर्व वाचकांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद!

चॅप्टर वन - ट्रेन टू नांदेड
"१९ तारखेला ठेवलंयस लग्न ते बरं केलंस. मला येता येईल." मी
"खरंच येणार आहेस?" आप्पा.
"असं का विचारतोस?" मी.
"नाही. तू मिलानहून येणार, अजूनही ठिकाणी जायचे प्लॅन्स असतील. नांदेडास येऊन-जाऊन दमायला नाही ना होणार?" आप्पा.
"तू म्हणत असशील तर नाही येत." मी
"मी असं बोललो का बे?" आप्पा.
बहुतेक नोव्हेंबरच्या शेवटाकडला एक दिवस होता आणि मी आनंद पत्रे ऊर्फ आप्पाशी उपरोक्त चॅट करत होतो. ह्या चॅटचा उल्लेख करून गोष्टीची सुरूवात करण्याचं कारण गोष्टीच्या शेवटी कळेल.
तर आप्पाचं लग्न १९ डिसेंबरला होतं. लग्नाला कोण कोण येणार ह्याची हवा तब्बल महिनाभर आधीपासून होती अन रोज एक जण कन्फर्म करत होता अन लगेच दोनेक दिवसांत रद्द करत होता. मी जायचं ठरवलंच होतं, फक्त जाण्यायेण्याची सोय काय, ह्या विवंचनेत होतो. मला इतक्या दूर बसनं जायचं-यायचं नव्हतं. पण अर्धवट रिझर्व्हेशनं करण्यात अर्थ नव्हता. कधी बस, कधी प्रायव्हेट गाडी तर कधी ट्रेन असे रोज नवनवे प्लॅन्स बनत होते, अन उधळले जात होते. मला पूर्ण विश्वास होता की शेवटच्या दिवशीपर्यंत कसं जायचं हे ठरणार नाहीये. पण सचिननं (सपा) मी इथून निघण्याच्या दोनेक दिवस आधी जाण्याचं ट्रेनचं सहा जणांचं (मी, सचिन (पाटील), सुहास (झेले), सागर (बाहेगव्हाणकर), योगेश (मुंढे), दीपक (परूळेकर)) रिझर्व्हेशन केलं. पण परतीचा लोचा होता. कारण, सगळ्या बाकी मंडळींना (मी आणि सागर सोडून) दुसर्‍या दिवशीच कामावर हजर राहायचं होतं. त्यामुळे त्यांना रात्रीची गाडी हवी होती, तिचं रिझर्व्हेशन मिळालं नाही. त्यामुळे ते तत्कालमध्ये बघण्याचा निर्णय घेण्यात आला.
यथावकाश मी मुंबईला आलो. थोडी हपिसाची कामे वगैरे उरकण्यात पहिला आठवडा संपत आला. अन तत्कालमध्येही रिझर्व्हेशन न मिळाल्याचा सचिनचा फोन आला. त्यामुळे बाकी सर्वांनी येण्यासाठी बसचं रिझर्व्हेशन करण्याचं ठरवलं होतं. सागर तिथून थेट त्याच्या जवळच असलेल्या घरी जाणार होता, त्यामुळे तो बाद होता. मग राहिलो मी एकटाच. अन मला काय बुद्धी सुचली, मी परतीचा १२ तासांचा ट्रेनचा प्रवास लग्नाच्या दुसर्‍या दिवशी एकट्याने करण्याचा निर्णय घेतला. सागरनं फक्त मला सोबत म्हणून एक रात्र जास्त नांदेडात राहायची तयारी दर्शवली. प्रत्यक्ष जाण्याच्या आदल्या दिवशी भारतही (मुंबईकर) येत असल्याचं मला कळलं.
सागर अन योगेश पुण्याहून रात्री निघून पहाटे मुंबईला पोचणार होते. अन मग सचिन अन ते दोघे सीएसटीहून ट्रेन पकडणार होते. मी, सुहास, भारत अन दीपक दादरहून चढणार होतो. पण ऐन आदल्याच दिवशी काही वैयक्तिक कारणांमुळे योगेशचं येणं रद्द झालं. त्यामुळे सागर एकटा पडला. मग सचिननं पहाटे लवकर सीएसटीला जाऊन सागरला सोबत करण्याचं ठरलं. त्यानुसार सागर रात्री अकराला पुण्याहून निघाला. मग प्रत्यक्ष जाण्याची पहाट उजाडली. मी ट्रेन यायच्या अर्धा तास आधी दादरच्या प्लॅटफॉर्मवर पोचलो. तिथे भारत आणि सुहास भेटले. अन तिथेच दीपकचंही येणं काही कारणाने रद्द झाल्याचं कळलं. मग ट्रेनमध्ये विवक्षित डब्यात चढल्यावर झोपलेला सागर अन सचिनचं दर्शन घडलं. मी सचिन, सुहास अन भारतला पूर्वी भेटलो होतो. पण सागर अन माझी प्रत्यक्ष भेट अशी नव्हतीच. ती होण्यास अजून थोडा अवकाश होता. तूर्तास मुटकुळ करून झोपलेला सागर अन दोन रिझर्व्ह केलेल्या रिकाम्या सीट्स राखत आम्ही गप्पा टाकत बसलो.
थोड्या वेळाने गाडी हळूहळू भरू लागली. आणि सागर उठून बसला. एकदाची भरतभेट झाली! :) मग चौघांमध्ये पाचव्याची भर पडल्यामुळे गप्पांना चांगलाच रंग चढू लागला. गाडीत गर्दी वाढू लागल्यावर आमच्या दोन रिकाम्या सीट्स राखणं अवघड होऊ लागलं. मग एका लहानग्याला घेऊन प्रवास करणार्‍या ताईंना सीट देऊन आम्ही मोकळे झालो. अजून किमान दहा तासाचा प्रवास शिल्लक होता. पण फिकर कुणाला होती. आनंदनं तिकडे राहण्याची सोयही केल्याचं कळवलं होतं. आणि गप्पा टाकायला सोबत मित्र होते. आणि महत्वाचं म्हणजे गप्पांसाठी विषयांची कमतरताच नव्हती. तासांमागून तास उलटू लागले तसतसा हळूहळू सकाळचा उत्साह ओसरू लागला. पण जशी ट्रेन मराठवाड्यात शिरली, तसा सागर थोडा फुलला. हा फिनॉमेनन मी बरेचदा पाहिलाय. सातार्‍याजवळ पोचल्याबरोबर माझ्या बाबांच्या बॉडी लँग्वेजमध्ये पॉझिटिव्ह बदल होतो. तसाच काहीसा बदल गाव जवळ येऊ लागल्यावर सागरमध्ये आला. सागर मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक मतदारसंघातील आजी अन माजी (अन क्वचितप्रसंगी पाजी) आमदारांचे विविध किस्से सांगू लागला. मग त्यातच पोलिस, मुख्यमंत्री वगैरे शब्द ओघानं येतच होते. त्याचं बोलणं ऐकून महाराष्ट्राचे बहुतांश मुख्यमंत्री का ह्या मला अनेक वर्षांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. त्यातच सचिननं विचारलं, "इथे मराठवाड्यात काय पिकतं रे?" सागर बोलायच्या आत मीच म्हणालो, "राजकारण!"
प्रवासाचे उणेपुरे दोनेक तास उरलेले असताना हळूहळू अवसानं आणि गात्रं दोन्ही गळू लागली होती. आनंदचा मधेच फोन येऊन गेला होता, अन त्यानं सांगितलेल्या हॉटेलच्या नावावरून 'निर्मल पॅलेस' सागरनं ते एक उत्तम हॉटेल असल्याचं ताडलं होतं. आणि त्यातच आनंदनं स्टेशनपासून हॉटेलवर घेऊन जायला गाडीचीही सोय असल्याचं सांगून आमचे आ वासले होते. मग कंटाळ्याचा प्रभाव वाढू लागल्यावर मी आपला, "अरे पॅलेसला उतरायचंय, थोडी कळ काढा!" असं म्हणून चीअर-अप करायचा प्रयत्न करत होतो. आमच्या अपेक्षा पाहून सागर आपला, "अरे नावाचं पॅलेस आहे रे. एव्हढंही काही चांगलं नाहीये." असं सांगायचा आपला एक क्षीण प्रयत्न करत होता. गप्पांमध्ये रंग अधूनमधून यायचा, पण एकंदरित कंटाळ्याचे सूर वाढू लागले होते. सचिनच्या स्पेशल 'एग्झॉटिक' बिस्किटांमुळे जी काय ती एनर्जी शिल्लक होती. शेवटी एकदाचं नांदेड आलं. अन सगळ्यांनीच सुटकेचे निःश्वास टाकले.
हुजूर साहेब नांदेड स्टेशनच्या उत्तम बांधलेल्या इमारतीची तारीफ करत आम्ही सगळे निघालो. हॉटेल स्टेशनच्या जवळच असल्याने आम्ही आनंदला फोन करून चालतच जात असल्याचं अन सुखरूप पोचल्याचं कळवलं. अन एकदाचे 'पॅलेस' वर पोचलो. हॉटेल खरोखरच उत्तम होतं. मनातल्या मनात सगळ्यांनी आनंदरावांना अन त्यांच्या मराठवाडी पाहुणचाराला दुवा दिले अन चटचट फ्रेश होऊन जेवण्यासाठी बाहेर पडलो.
सागरचं कॉलेजशिक्षण नांदेडात झालेलं असल्यानं, तो आमचा ऑफिशियल गाईड होता. तो कॉलेजात असताना ज्या घरगुती मेसमध्ये जेवत असे, त्या मेसमध्येच तो आम्हाला घेऊन गेला.
ह्या मेसचे चालक अन मालक 'काका' म्हणजे एक वल्ली. चार जणांच्या टेबलावर आम्ही चौघे बसलो होतो, अन सागर गपचूप दुसर्‍या टेबलावर बसला होता. तेव्हा सुहास सागरला म्हणाला, "ये इथे, ऍडजस्ट करू." सागर खुणेनं नको म्हणेस्तो काकांनी पाहिलं, अन मिश्किल हसून म्हणाले, "शिस्त म्हणजे शिस्त! बस तिथेच." आम्ही सगळे आधी ओशाळवाणे आणि मग खळखळून हसलो. अगदी ताजं, घरगुती जेवण मिळाल्यावर सगळेच पोटभरून जेवले. अन जेवताना काकांची तिथल्या जेवायला येणार्‍या कॉलेजच्या पोरांवरची मायाही पाहिली. मोबाईलवर बोलणार्‍याला "अरे #4&#, ठेव तो मोबाईल, जेवून घे आधी नीट." असं म्हणून धपाटा घालणारे काका घरापासून दूर मिळणं हे त्या मेसच्या पोरांचं भाग्य.
मग जेवणं झाल्यावर काकांचे आभार मानून आमची वरात सागरसोबत "पागल पान भंडार" कडे गेली. तिथे पान घेऊन आम्ही दिवसाच्या खादाडीची इतिश्री केली. मग बर्‍याच दूर असलेल्या हॉटेलपर्यंत चालत चालत जाऊन भरपेट झालेलं जेवण जिरवलं. रस्त्यात पोट भरलेलं असल्यानं गप्पा अन गंमतीजमतींना ऊत आला होता. दिवसभराचा प्रवासाचा शीण हळूहळू अंगावर येत होता. रूमवर पोचल्यावर थोडा वेळ टीव्ही बघत पुन्हा टवाळक्या केल्या अन मग सुहास, भारत आणि सचिन झोपी गेले. मी अन सागर स्टार न्यूजवर लागलेले 'करमणुकीचे' कार्यक्रम पाहत बराच वेळ गप्पा मारत होतो. मग १२.३० च्या आसपास कधीतरी आम्हीही निद्राधीन झालो. सकाळी ७ ला उठून आप्पाच्या लग्नासाठी तयार जे व्हायचं होतं.

क्रमशः

भाग २

भाग ३