4/25/2011

अक्षय कुमार यास अनावृत पत्र

अक्कीदादा (तुझ्याबद्दल प्रचंड आपुलकी वाटते त्यामुळे, तुम्हाला/आपल्याला वगैरे न वापरता थेट अरे दादावर घसरतोय),
तुला मराठी उत्तम कळतं आणि बोलता येतं त्यामुळे बिनधास्त मराठीमध्ये पत्र लिहितोय. बर्‍याच वर्षांपासून तुला पत्र लिहिण्याची इच्छा होती, पण नेहमी काही ना काही कारणामुळे राहून गेलं. प्रत्येक वेळी पत्र लिहिण्याचं कारण आणि विषयही वेगळे होते. आज मात्र अनावृत पत्र लिहितोय कारण मी जे लिहू इच्छितो ते थेट तसंच्यातसं तुझ्या इतर असंख्य चाहत्यांनाही वाटतं.
मी तुझा एक असा पंखा आहे जो कधीच फिरायचा बंद होणार नाही. तुझ्या असंख्य कट्टर चाहत्यांपैकी एक. तुझ्या 'खिलाडी' सिनेमापासून तुझ्याशी जडलेलं नातं 'जीना इसी का नाम है' कार्यक्रमातल्या तुझ्या मुलाखतीनं घट्ट झालं. ही मुलाखत पाहेपर्यंत एक मार्शल आर्ट एक्सपर्ट ऍक्शन हिरो वाटणारा तू थेट आपल्यातला वाटू लागलास. तुझं सामान्य बालपण आणि त्यातनंच पुढे येऊन तू मिळवलेलं असामान्य यश आणि तरीही आपल्या सामान्य बालपणाशी कधीच तुटू न दिलेली नाळ हे सगळं तुझ्याशी कनेक्ट करून गेलं. मग तुझे 'मिस्टर बॉन्ड' पासून ते 'अंगारे', 'जानवर' इत्यादी इत्यादी सारे सिनेमे पाहिले. काहींची नावे विसरलोही असेन, पण टीव्हीवर तुझा सिनेमा आहे आणि मी चॅनेल बदलला असं कधी झालं नाही. तू अनेक सामान्य ते तद्दन भिकार सिनेमे केलेस, हे तू स्वतःही मान्य करतोस. किंबहुना तुझा हाच सच्चेपणा मला भावतो. नसीरूद्दीन शाह हा असामान्य कलावंत तुझ्याबरोबर दोन-तीन मसाला सिनेमांमध्ये होता. तेव्हा तू छोटा स्टार होतास. सुपरस्टार झाल्यानंतर एकदा नसीरूद्दीन शाहनं एका मुलाखतीत तुझा उल्लेख केला होता. तो म्हणाला, "अक्की स्वतः मला म्हणतो की मला ठाऊक आहे मी चांगला अभिनेता नाही, पण मी नेहमीच उत्तम देण्याचा प्रयत्न १०० टक्के करतो. आणि अक्की खरंच सिनेमाला जेव्हढं देतो, जेव्हढी मेहनत करतो ती काबीलेतारीफ आहे." ती मुलाखत पाहिल्यावर मला तुझा आणखीनच अभिमान वाटलेला.
मी तसा एलिटिस्टही गणला जाऊ शकतो असा सिनेरसिक आहे. फेस्टिव्हल फिल्म्स किंवा आर्ट फिल्म्सवर तासनतास विचार करणं आणि मग अगम्य भाषेत लिहिणं हा माझा छंदही आहे. पण तरीही तू माझा आजच्या पिढीतला सर्वांत आवडता अभिनेता आहेस, ह्याचं लोकांना आश्चर्य वाटतं. कधीकधी मलाही वाटतं, पण हे सत्य आहे. एक मिथुनदा आणि त्यानंतर थेट तू. तू केलेली असंख्य लफडीसुद्धा मला तुझा फॅन होण्यापासून कधीच रोखू शकली नाहीत. त्याचं कारण कदाचित हे आहे की तू कधी त्यांपासून दूर पळायचा प्रयत्न केला नाहीस. जे जसं होतं तसंच तू मान्य केलंस. एका वर्षांत अर्धा डझन फ्लॉप सिनेमे दिल्यावर तू एकदा सिनेसंन्यासाची भाषा केली होतीस, पण मग 'जानवर' आला आणि तू निर्णय बदललास. योग्यच केलंस कारण नाहीतर 'हेराफेरी' आला नसता आणि हिंदी सिनेमाला एक वेगळा प्रकार मिळाला नसता. 'हेराफेरी' येईपर्यंत कधीच सिनेमाचे मुख्य नायक 'कॉमेडी' करत नव्हते. त्यासाठी स्पेशल पात्र असायची. पण 'हेराफेरी' नं मुख्य नटाला 'कॉमेडीयन' बनता येतं हे सिद्ध केलं. त्यानंतर अशा सिनेमांची लाट आली, त्यातच तू ही काही सारखे सिनेमे केलेस पण 'हेराफेरी' पुन्हा जमला नाही. चालायचंच.
पण तू त्यात वाहावत गेलास, ह्याचं वाईट वाटतं. शाहरूख खानमध्ये जर काही अभिनय असलाच तर तो चोपडा-जोहर कंपनीनं झाकून टाकला आणि तुझ्यातला कलाकार तू स्वतःच. मिथुनदांनीही त्यांच्या उतारवयात तेच केलेलं. माझ्या दोन सर्वाधिक आवडत्या नटांचा एकसारखा रस्ता पाहून थोडंसं आश्चर्य आणि वैषम्य वाटतं. तुझे 'कॉमेडी' च्या नावाखाली हल्ली जे सिनेमे येतात, ते पाहून अपार यातना होतात. मी तरीदेखील भारतात असेन तर तुझा प्रत्येक पिक्चर थेटरात जाऊन पाहतोच. पण खरंच माझ्यासोबत येणार्‍या मित्रांना तुला नावं ठेवताना पाहून काळीज तुटतं. तुला आपला मानलंय त्यामुळे प्रत्येक वेळी तुझी बाजू घेऊन मी भांडत राहीनच. पण आता खरंच बदलाची वेळ आहे रे.
माझ्या मते हिंदी सिनेसृष्टीला मिळालेलं सर्वोत्तम ऍक्शन हीरो मटेरियल तू आहेस. जर हॉलीवूडच्या तोडीस तोड कुणी ऍक्शन हीरो असेल तर तूच आहेस आणि ह्यात कुणीही हरकत घेऊ शकत नाही. पण तू ते सगळं वाया घालवतोस असं वाटतं. तू अभिनेता नाहीस असं नाही, पण तुला जेव्हढा अभिनय येतो त्याच्या एकशतांशाचाही तू वापर करत नाहीस. तुझी गणितं आणि तुझे निर्णय सर्वस्वी तुझेच आहेत आणि ह्या गोष्टीचा मान राखूनच मी सांगतो की तुझी सिनेमांची निवड हल्ली मला कोड्यात टाकते. तू आता मोठा माणूस आहेस त्यामुळे तू थेट सहनिर्माता बनून नफ्यातला हिस्सा घेतोस. मग एव्हढी ताकद हाताशी असताना तू 'थँक यू' आणि 'खट्टा मीठा' सारखे सिनेमे का करतोस? मला तुलना आवडत नाही पण मी तुला बॉलीवूडचा विल स्मिथ मानतो, पण तू असे सिनेमे करत राहशील तर कसं होईल? तुझ्या व्यक्तिमत्वात जादू आहे हे 'खतरों के खिलाडी' सारख्या शोजच्या यशावरून सिद्ध होतं. पण ती जादू योग्य जागी लागत नाही असं नाही वाटत तुला?
आजच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत चाळिशी उलटून गेलेल्या हिरोंचीच चलती आहे, त्यामधलंच एक नाव तू. पण तू इतर सर्वांहून वेगळा आहेस. तुझा रस्ता निराळा आहे आणि तुझी कलाही. तू तुझा आब वेगळ्याच पद्धतीनं राखला आहेस, पण मग ही हुशारी तुझ्या सिनेमांच्या निवडीत का दिसत नाही ह्याचं प्रचंड वैषम्य वाटतं. थेट हॉलीवूडपर्यंत झेप घेण्याची तुझी क्षमता आहे आणि तशी तू घेतलीही असल्याचं मध्यंतरी कानावर आलं होतं. पण मग अचानक ह्या बथ्थड सिनेमांची लाट आली आणि काहीतरी मोठी चूक झाल्यागत जाणवू लागलं.
तुझ्याबद्दल प्रचंड तळमळ वाटते म्हणून एव्हढं सगळं लिहिलं. तू अजून मोठा व्हावंस अशी नेहमीच इच्छा आहे. म्हणूनच एकदा आपल्या सिनेमांच्या निवडीवर लक्ष देऊन पाहा. तू प्रयत्न करतोस हे '८x१० तस्वीर' वरून दिसतंच पण एक प्रयत्न फसला म्हणून प्रयत्न करणं सोडू नकोस. आणि सिनेमामध्ये 'अक्षय कुमार' बनून राहू नकोस, जे शाहरूखचं झालं तेच तुझंही होताना दिसतंय, पण शाहरूखच्या इमेजला(लव्हरबॉय) मरण नाही, हे त्याचं नशीब आणि तुझ्या 'स्ट्रीटस्मार्ट' इमेजला तेव्हढं शेल्फ लाईफ नाही हे तुझं. त्यामुळे लवकरात लवकर ह्या फेजमधून बाहेर पड. माझ्यासारख्या चाहत्यांच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत.
तुझा,
(तुला आणि मिथुनदांना घेऊन 'शॉशँक रिडेम्प्शन'चा रिमेक बनवायचं स्वप्न बाळगणारा चाहता) विद्याधर.

4/21/2011

बर्न नोटीस

'मालिका' ह्या गोष्टीबद्दलच्या माझ्या संकल्पना 'फक्त एका रूपयासाठी' वगैरेंपासून सुरू होऊन 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' पर्यंत, फारतर 'सीआयडी' आणि 'आहट' पर्यंत येऊन थांबतात. आणि इंग्रजी मालिकांमध्ये अगदी लहान असताना जेव्हा 'स्टार प्लस' हे अप्रूप टीव्हीवर लागायचं तेव्हा 'सांता बार्बरा' आणि मजेशीर टायटल ट्रॅकवाली 'नेबर्स' (अर्थातच त्यापुढे काही कळण्याचा किंवा आता आठवण्याचा प्रश्न उद्भवत नाही) एव्हढंच आठवतं. त्यानंतर मूळच्या इंग्लिश पण हिंदीमध्ये डब केलेल्या 'डेनिस द मेनेस', 'डिफरन्ट स्ट्रोक्स', 'आय ड्रेम्ट ऑफ जिनी', 'सिल्व्हर स्पून्स', 'हूज द बॉस' किंवा 'बिविच्ड' ह्या मात्र सगळ्याच लक्षात आहेत. पण हे सर्व आजपासून किमान दहा ते बारा वर्षांपूर्वीचं. त्यानंतर मी 'इंग्रजी मालिका' ह्या प्रकाराच्या कधी वाटेला गेलो नाही. पण मालिका नावाखाली हिंदी-मराठी चॅनेल्सवर जे ही लागतं ते निमूटपणे पाहणं मी कर्तव्यकर्म मानतो. कारण आपली कुठलीही कामं उरकताना सोबत म्हणून चालू ठेवता येण्याजोगं अन मधेच एखादा सीन पाहिला तरी हरकत नसणारं असं काही केवळ मालिकाच देऊ शकते. आणि मालिका ही टीव्हीवरच पाहिली पाहिजे हा माझा आजवरचा अलिखित नियम होता. त्यामुळे अनेक मित्रांनी रेकमेंड करूनही मी कधीही 'फ्रेंड्स' च्या वाट्याला गेलो नाही. अन्यही अशा बर्‍याच मालिकांना मी टांग दिली. पण एक दिवस '३० रॉक' ही इंग्रजी मालिका मी मित्र फारच मागे लागल्यानंतर पाहिली अन प्रथमच 'मालिका' कॉम्प्युटरवरही पाहता येऊ शकते आणि ती प्रत्यक्षात मनोरंजन करू शकते ह्याचा साक्षात्कार झाला. पण माझा मूळ स्वभाव कर्मठ, त्यामुळे '३० रॉक' चे माझ्याजवळचे एपिसोड्स संपल्यावर मी दुसरीकडे कुठेही पाहणं टाळलं. 'फ्रेंड्स' रिक्वेस्टही रिजेक्ट केल्या आणि माझं एकमालिकाव्रत पाळलं.
पण मग गेल्या सुट्टीत भारतात होतो तेव्हा कधीतरी चॅनेल्स बदलताना एका नव्या इंग्रजी मालिकेची जाहिरात दृष्टीस पडली. 'बर्न नोटीस' अशा वेगळ्या नावानं आणि कल्पक जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. इथे परत आलो अन एक दिवस इंटरनेटचे बरेच तास शिल्लक असल्याकारणे चाळा म्हणून बर्न नोटीसचा पहिला सीझन उतरवायला सुरूवात केली. बर्‍याच फाईल्स असल्यानं टप्प्याटप्प्यानं पार्ट टाईम करत दोनेक महिन्यांमध्ये पूर्ण पहिला सीझन येऊन माझ्या कॉम्प्युटरवर पडून राहिला. मध्यंतरी मित्रही 'बर्न नोटीस' ची बरीच तारीफ करत होता, पण नेहमीप्रमाणेच माझा कर्मठपणा अन 'कॉम्प्युटरवर पाहायची मालिका' ह्या विषयाबद्दल माझं औदासिन्य ह्यामुळे मी निवांत होतो. अन एके दिवशी फारच कंटाळा आलेला असताना मी कॉम्प्युटर चाळत होतो तेव्हा हा फोल्डर दृष्टीस पडला. ज्या सिरियलमागे मी बरेच तास घालवले होते, ती पाहू तर कशी आहे अशा अतिशय विरक्त विचाराने मी पहिला भाग सुरू केला.
मायकल वेस्टन हा एक सीआयए चा कॉन्ट्रॅक्टेड गुप्तहेर. जो अमेरिकेसाठी हेरगिरी करतो अन अमेरिकेच्याच असंख्यांपैकी एका सुरक्षायंत्रणेचा भाग आहे, पण थेट सीआयएसाठी काम न करता त्यांचीच काही अंडरकव्हर कामं करतो. पहिल्या भागाची सुरूवातच मायकलच्या नायजेरियातल्या एका छुप्या कामगिरीपासून होते. ही कामगिरी पार पाडताना अर्ध्यातच त्याला अमेरिकन सुरक्षायंत्रणा 'बर्न' करतात. जसं नोकरदारांना 'फायर' केलं जातं, तसंच गुप्तहेरांना 'बर्न' केलं जातं. एखाद्याच्या नावानं 'बर्न नोटीस' बजावली की त्याच्याशी असलेला सरकारचा सर्व संबंध संपला. त्याचा सगळा इतिहास, पैसे रेकॉर्डसमधून पुसलं जातं. अन सरकारला त्याच्यापासून धोका वाटत असेल तर त्याच्या मरणाचाही बंदोबस्त केला जाऊ शकतो. कामगिरीच्या मध्यातच 'बर्न' झालेला मायकल जीव वाचवून पळतो आणि विमानातच अतिदमणुकीनं बेशुद्ध होतो. जेव्हा तो उठतो, तेव्हा तो त्याच्या मूळ शहरात 'मायामी' मध्ये असतो. कामावरचा किंवा कामाशी निगडीत एकही मनुष्य त्याच्याशी संबंध ठेवू शकत नाही किंवा इच्छित नाही आणि त्याच्या 'बर्न' केलं जाण्याची कारणं किंवा 'बर्न नोटीस' कुणी अन का बजावली ह्याचंही उत्तर कुणी देऊ शकत नाही. त्याच्याकडे पैसे नाहीत अन तो शहराच्या बाहेर पडू शकत नाही ह्याची काळजी घ्यायला त्याच्यावर चोवीस तास पाळत आहे. प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि इतर आयडेंटिटी प्रूफ्सही त्याच्याजवळ नाहीत.
पाकिटामध्ये 'इमर्जन्सी कॉन्टॅक्ट' म्हणून एक्स-गर्लफ्रेंडचा नंबर असल्यानं तो बेशुद्ध असताना तिला बोलावलं जातं. तीदेखील गुन्हेगारी टोळ्यांमधली असल्यानं नवं शहर म्हणून निघून येते. मूळ शहर असल्यानं मायकलची कुटुंबवत्सल पण चेनस्मोकर आई आणि छोटेमोठे गुन्हे करणारा भाऊदेखील त्याच शहरात आहेत. आणि ह्यांच्या व्यतिरिक्त एफबीआयचा इन्फॉर्मर असलेला मायकलचा जुना जिगरी दोस्त सॅम (जो मायकलच्या सांगण्यावरून मायकलबद्दलच एफबीआयला खबरी देतो), एव्हढीच ओळखीची लोकं मायकलशी बोलतात.
विचित्र परिस्थितीत अडकलेला मायकल आपल्या 'बर्न' होण्यामागचं रहस्य जाणून घ्यायचा निश्चय करतो आणि त्यादिशेनं पावलं टाकू लागतो. पण ह्या सगळ्यासाठी पैशांची गरज आहे. मग तो बिना लायसन्सचा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बनतो. त्यापुढे प्रत्येक भागामध्ये मायकल आपल्या 'बर्न नोटीस'च्या रहस्याकडे एक एक पाऊल टाकतो आणि त्या त्या भागात एक एक 'मायामी'मधली केस सोडवतो. अशा भन्नाट प्रकारे ही मालिका पुढे सरकते.
मायकल वेस्टनचं काम करणारा 'जेफ्री डोनोव्हन' हा मालिकेची जान आहे. त्याचा बोलका चेहरा अन मिस्किल हास्य मायकलच्या पात्रात रंगत भरतात. एखाद्या वर्षांनुवर्षं जगभर गुप्तहेरी केलेल्या माणसाला शोभेलसं व्यक्तिमत्व आणि अप्रतिम संवादफेक ह्यामुळे मायकल वेस्टन फारसं काही भव्यदिव्य न दाखवताही प्रचंड विश्वसनीय वाटतो. मालिकेचा फॉर्मॅट ज्यामध्ये बर्‍याच प्रसंगांमध्ये पॉज येतो आणि मायकल व्हॉईसओव्हरने एखाद्या होतकरू गुप्तहेराला टिप्स द्याव्यात तशा टिप्स देतो, मायकल साध्या साध्या गोष्टींमधून विविध यंत्र कशी बनवतो किंवा प्रत्यक्षात काहीही न करता टॅक्टिकली भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी कसं पळवतो आणि सगळ्या पात्रांच्या तोंडी असलेले खुसखुशीत संवाद, ह्यांमुळे एका अर्थानं थ्रिलर असलेली मालिकादेखील तणावपूर्ण किंवा नाटकीय न होता मनोरंजक होते आणि तरीही बर्‍यापैकी विश्वसनीय राहते.
मायकलचं पात्र इतक्या विचारपूर्वक लिहिलंय की लेखकाला सलाम करावासा वाटतो. एका भागात मायकल सांगतो 'People with happy families don't become spies. Bad childhood is the perfect background to become a spy. You don't trust anyone, you are used to getting smacked around and you never get homesick.'. मायकलचं बालपण असंच आहे. त्याचे वडील बिलकुल चांगले नसल्याचं आणि मायकलचं त्यांच्याशी वाकडं असल्याचं आपल्याला मायकल आणि त्याच्या आईच्या प्रत्येक संवादातून कळतं. पण त्याच्या आईनं तरीही केवळ मुलांसाठी अनेक वर्षं संसार केलेला आहे. एका प्रसंगात ती मायकलला म्हणते, 'You missed your father's funeral.. by eight years." मायकलचं आईवर प्रेम आहे, कसाही असला तरी भावाबद्दल ओढ आहे पण विचित्र बालपणामुळे तो नात्यांना घाबरतो, त्यामुळे कायम घरापासून आणि नात्यांपासून पळत राहिलाय. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कामाचं कारण देऊन. पण कुटुंबवत्सल आईमुळे मायकलच्या वागण्यातला फरक प्रत्येक भागानुसार गडद होत जातो. "Thirty years of karate, combat experience on five continents, a rating against every weapon that fires a bullet or holds an edge... still haven't found any defence to mom crying into my shirt." मायकलचा हा डायलॉग त्याची व्यक्तिरेखा स्पष्ट करून जातो. वर्षांनुवर्षं जगाच्या कानाकोपर्‍यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितींमध्ये आणि वाईटात वाईट लोकांसोबत आयुष्य घालवलेला गुप्तहेर मायकल अचाट कामगिर्‍या करून एकेक केस सोडवतोच पण एक माणूस म्हणूनही ह्या मालिकेमध्ये पदोपदी दिसत राहतो. त्यामुळेच मी आजवर पाहिलेल्या किंवा वाचलेल्या सर्व गुप्तहेरांमधला माझा सर्वांत आवडता गुप्तहेर हे बिरूद मी मायकल वेस्टनलाच देईन.
पाच दिवसांमध्ये मी 'बर्न नोटीस' च्या पहिल्या सीझनचे पाऊण तासाचे १२ भाग संपवले. आता ह्या सप्ताहांताला दुसरा सीझन आणि कदाचित दोनेक आठवड्यांत आजवरचे सगळे भाग पाहून होतील, पण मायकल वेस्टन आणि त्याच्या जगाचं गारूड उतरणं थोडं अवघडच आहे.

4/05/2011

तो

वैराण रस्त्यावरचा मैलाचा दगड
त्यावर बसलेला तो
आणि जमिनीमध्ये विरघळलेली नजर
डोक्यात केवळ प्रश्न
साथीला भर दुपारी भरून आलेलं आभाळ
आणि तितकंच भरून आलेलं मन
नजर जाईल तिथवर फक्त वैराण रस्ता
पण पावलं पुढं सरकायला नाखुष
अधूनमधून मागे पडलेल्या रस्त्याचा अदमास घेणारे डोळे
कधी काठोकाठ भरून तर कधी कोरडे पडून
अचानकच जसा नेहमी येतो, तसाच
त्याही थांब्यावर 'तो' आला
'ह्या'ला रस्त्याची कधीच गरज का पडत नाही
असा विचारही त्याच्या मनात तरळून गेला
साधंसंच पण आश्वासक हसत त्यानं
खांद्यावर टाकलेला ओळखीचा हात
आणि त्याच्या स्पर्शातली ती ऊब
हजारो जन्मांचा शीण जणू वितळवून टाकणारी
"मागे वळून काय पाहतोस?" 'त्या'नं विचारलं
मागल्या फाट्यावर सुटलेलं बरंच काही आठवलं
"फाटा तरी दिसतो का आता?"
शोधक नजर पुन्हा निराश झाली
"आणि फाट्यापर्यंत पोचेस्तोवरची पावलं?"
निराशेचं रूपांतर वेदनेत झालं
"आता पावलांचे ठसे पाहत अश्रू गाळणार?
की पुढच्या रस्त्यावर नवे ठसे उमटवणार?"
वेदना कमी झाली नाही पण
पुढच्या पावलांसाठीचा जोर आला
नजरेचा मागे वळण्याचा हट्ट कमी झाला नाही
पण पुढे बघायची इच्छा झाली
पुन्हा पुढे वैराण रस्ता, नवनव्या फाट्यांची भीती
मनकवड्या 'त्या'चा हात लगेच पडला खांद्यावरती
पुन्हा ते साधंसंच हसू, 'आहे मी' असं सांगणारं
बिनधास्त पुढे हो असं न बोलून समजावणारं
पावलं पुढे टाकण्याआधी त्यानं 'त्या'ला मिठी मारली
भरून आलेलं आभाळ अखेर एकदाचं बरसलं
वैराण रस्त्याचा दाह थोडा कमी झाल्यागत वाटलं
पहिलं पाऊल टाकून तो एकदा मागे वळला
फाट्याप्रमाणेच 'तो'ही आता तिथे नव्हता
पुढची पावलं टाकताना एकच विश्वास होता
पुन्हा फाटा फुटताना खांदे पडताच सावरायला
'तो' नक्कीच येणार होता